Friday, May 1, 2020

पत्रकारिता व प्रसारमाध्यमे : संधिकालातील निराशा आणि आशा

१८३२ साली बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेल्या 'दर्पण' या वृत्तपत्रापासून एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वाध यावर विखुरलेल्या गेलेल्या वृत्तपत्र-नियतकालिकांपर्यंत (कृष्णराव भालेकरांचं 'दीनबंधु' साप्ताहिक आणि इतर अनेक सत्यशोधकीय नियतकालिकं, शि. म. परांजपे यांचा 'काळ', विष्णुशास्त्री चिपळूणकरांची 'निबंधमाला', गोपाळ गणेश लोकहितवादींच्या प्रेरणेने सुरू झालेलं 'ज्ञानप्रकाश', र. धों. कर्वे यांचं 'समाजस्वास्थ्य', डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 'मूकनायक' आणि इतर अनेक) आणि तिथून पुढे स्वातंत्र्योत्तर काळात सुरू झालेला प्र. के. अत्रे यांचा 'मराठा' (१९५६), जवाहरलाल दर्डा यांचं 'लोकमत' (१९७१), एक्सप्रेस समूहाचं 'लोकसत्ता' (१९४८), टाइम्स समूहाचा 'महाराष्ट्र टाइम्स' (१९६२) यांच्यासह इतर वृत्तपत्रे, अनेक साहित्यिक-सामाजिक नियतकालिकांपर्यंत मुद्रित माध्यमाने मराठी मानस घडवण्यात आपला हातभार लावला आहे. मुद्रित आणि त्यामागोमाग आलेल्या दृकश्राव्य स्वरूपातील प्रसारमाध्यमांचं काम काहीसं अदृश्य हातासारखं असतं. मोजता येईल अशा स्वरूपात त्यांचे परिणाम मांडणं शक्य नसलं तरी विविध विषयांची ओळख, ज्ञानप्रसार, विविध प्रश्नांबाबतची जागृती, सांस्कृतिक समृद्धी या अंगांनी त्यांचं कार्य लक्षणीय ठरतं. अर्थात यातही सांस्कृतिक आणि राजकीय अधिसत्ता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनेही काही प्रसारमाध्यमं कार्यरत असतात हे विसरता येत नाही. आज २०२० च्या संदर्भाने बोलायचं झालं तर हा हात आता अदृश्य राहिला नसून ठसठशीतपणे दिसतोय आणि त्याने काय घडवलं आणि काय बिघडवलं याचा जमाखर्च मांडायला घेतला तर बिघडण्याच्या खात्यातच जास्त रक्कम असण्याचा संभव आहे असं कुणी म्हटलं तर ते चटकन निकालात काढता येणार नाही अशी परिस्थिती आहे. किंबहुना आज 'पत्रकारिता आणि प्रसारमाध्यमं' यावर भाष्य करण्यासाठी एखाद्या जाणकाराची गरज आहे का असाही प्रश्न कुणी विचारू शकेल!

'बातमी', 'माहिती' आणि 'ज्ञान' यावर विशिष्ट लोकांची मक्तेदारी उरलेली नसण्याच्या आजच्या काळात आपल्यासमोरचं चित्र नक्की कसं आहे? तर ते विस्फोटासारखं आहे. विस्फोट झाल्यावर अनेक गोष्टी इतस्ततः पसरतात आणि तुम्ही त्या ओळखण्याचा, तुकडे जुळवण्याचा प्रयत्न करता तसं काहीसं झालेलं आहे. पत्रकारितेचं अस्थिर स्वरूप. माध्यमांची धोक्यात आलेली विश्वासार्हता (आणि दुसरीकडे वाढता प्रभावदेखील), व्यावसायिक गरज, माध्यमांभोवतीचा भांडवली आणि राजकीय विळखा हे सगळे एकमेकांत गुंतलेले विषय आहेतच, पण याच्या मुळाशी असणारी आणि सतत जाणवणारी एक गोष्ट म्हणजे बाळशास्त्री जांभेकर, फुले-आगरकर-आंबेडकर यांची पत्रकारितेची व्याख्या व उद्दिष्टं आणि आजच्या पत्रकारितेची व्याख्या व उद्दिष्टं यातच जर फरक पडला असेल तर आजच्या परिस्थितीला सामोरं कसं जायचं? विशिष्ट कालखंडात विशिष्ट मूल्यं समाजात कशी उदयाला येतात, कशी स्थिरावतात, जुन्यांना बाजूला सारून ती स्वतःसाठी जागा कशी करतात याचा शोध निर्वात पोकळीत घेता येत नाही. विसाव्या शतकाचा उत्तरार्ध हा भांडवलशाही 'संघटित' होण्याचा काळ आहे. भारताच्या संदर्भात याचे परिणाम आर्थिक उदारीकरणानंतर अधिक ठळकपणे दिसू लागले. १९९१ नंतर भारतात सर्वच क्षेत्रांमध्ये जे बदल झाले त्याला भारतीय प्रसारमाध्यमेही अपवाद नव्हती. जागतिकीकरणाची अपरिहार्यता आणि जागतिकीकरणाचे दुष्परिणाम या दोन्ही बाजूंनी आजवर पुष्कळ मांडणी झाली आहे. जागतिकीकरण तुम्हांला मान्य असो  वा नसो, ते आता आलेलं आहे आणि ते असण्याच्या चौकटीतच तुम्हांला पुढचा विचार करावा लागणार आहे असंही एका टप्प्यावर म्हटलं जाऊ लागलं. (मात्र आज कोरोनाचं संकट गडद झाल्यावर कोरोनाच्या नंतरचं जग कसं असेल यावर विचार करताना जागतिकीकरणाचं 'होम कमिंग' सुरू होऊन पुन्हा एकदा देशांच्या अर्थव्यवस्था बंदिस्त होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.) स्थानिक पातळीवर पुरेशा विकसित न झालेल्या उद्योगांना परकीय भांडवलाच्या आगमनाने धक्का बसला, झपाट्याने वाढलेल्या स्पर्धेच्या पर्यावरणात अनेकजण बाजूला फेकले गेले, औद्योगिक-आर्थिकसह सांस्कृतिक विश्वावरही जागतिकीकरणाने आक्रमण केलं हे सत्य नाकारता येत नाही. 

१९९२ मध्ये झी समूहाने टीव्ही मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. त्याआधी १९८८ मध्ये एनडीटीव्हीने दूरदर्शनसाठी 'कंटेंट प्रोव्हायडर' म्हणून काम सुरू केलं होतं. पुढे बऱ्याच कालावधीनंतर, २००३ मध्ये एनडीटीव्हीचं स्वतंत्र चॅनल सुरू झालं. या काळात बातम्या आणि मनोरंजन क्षेत्रात झी, स्टार, एबीपी, इ टीव्ही, टाइम्स, इंडिया टुडे या व इतर समूहांनी आपलं बस्तान बसवल्याचे आपण साक्षीदार आहोत. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या वेळेस पहिल्यांदा फेसबुकचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आणि पुढे फेसबुक, ट्विटर, यू-ट्यूब, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम या समाजमाध्यमांनी पारंपरिक प्रसारमाध्यमांना घाम फोडत स्वतःचं स्थान जनमानसात पक्कं केलं. आज 'पत्रकारिता आणि प्रसारमाध्यमं' या शीर्षकाखाली हे सगळेजण एकत्रितपणे आपापला प्रभाव गाजवत उभे आहेत. या सगळ्यांकडून माहिती आणि बातम्यांचा मारा जोरकसपणे होतो आहे. माहिती, देवाणघेवाण यांचा महापूर, व्हर्चुअल जगात व्यक्तींच्या वास्तव परस्परसंबंधांची वाढती गुंतागुंत आणि त्याने प्रभावित होणारं जनमानस हा मानसशात्रीय-समाजशास्त्रीय संशोधनाचा विषय कधीच बनला आहे. 

या विषयाच्या विविध पैलूंबाबत लिहावं असं बरंच आहे. 'एबीपी माझा'चे वार्ताहर राहुल कुलकर्णी यांच्या अलीकडील अटकेसंर्दभात जी चर्चा झाली त्याबाबत दोन मुद्दे नोंदवावेसे वाटतात. एक म्हणजे या पूर्ण प्रकरणात 'आमच्याकडून अनवधनाने चूक झाली' हे कबूल करण्याचं धैर्य एबीपी माझाने दाखवलं नाही. दुसरं म्हणजे भारतात अस्तित्वात असलेला १८६७ च्या 'प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स अ‍ॅक्ट' हा कायदा आणि १९५५ चा 'वर्किंग जर्नलिस्ट अ‍ॅक्ट' हा कायदा या दोन्हीमध्ये माध्यमांचा उल्लेख 'वृत्तपत्र' असा असल्याने टीव्ही पत्रकार 'पत्रकारा'च्या व्याख्येत बसतात का इथपासून घोळ आहे. टीव्ही चॅनल्सवरील आरडाओरडा, आक्षेपार्ह पद्धतीने केलं जाणारं वार्तांकन, धार्मिक विद्वेषाला उघडपणे खतपाणी घातलं जाणं, सामाजिकदृष्ट्या अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेलाच न येणं, पत्रकारितेला (रोज) विविध प्रकारे फासला जाणारा काळिमा याबरोबरच दुसऱ्या बाजूने टीव्ही पत्रकारितेबाबतची नेमकी कायदेशीर तरतूद याही संदर्भात टीव्ही पत्रकारितेवर नियंत्रण ठेवणारी कुठलीही यंत्रणा अस्तित्वातच नाही असं दिसतं आणि ते सद्यस्थितीत धोकादायक आहे. 

वर उल्लेख केलेल्या पहिल्या मुद्याबाबत अधिक विस्ताराने बोलणं आवश्यक वाटतं. राहुल कुलकर्णी यांच्या अटकेबाबत निषेध नोंदवला जात असतानाच 'एबीपी माझा'ने दिलेल्या अनेक चुकीच्या बातम्याही सामाजमाध्यमांवरुन प्रकाशात आणल्या जात होत्या. (इंटरनेटमुळे तुमची सगळी कुंडली झटक्यात मांडता येते!) त्याबाबत एबीपी माझा मौन बाळगून होतं. हे उदाहरण इतरही अनेक वाहिन्यांना लागू होईल. बहुतेक वाहिन्यांनी पत्रकारितेच्या समाजाप्रती असणाऱ्या जबाबदारीतून स्वतःला मुक्त करून घेतलं आहे. पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासला जात असताना त्याबाबाबत दिलगिरी व्यक्त करणं तर सोडाच, पण आपण काहीतरी श्रेष्ठ काम करतो आहोत अशाच अविर्भावात बहुतेक मंडळी वावरताना दिसतात. आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे. आपण कुठल्या मूल्यव्यवस्थेचे वाहक बनतो आहोत याकडे पूर्ण दुर्लक्ष करून, आपली 'जवाबदेही' पूर्णपणे नाकारून आज टीव्ही पत्रकारिता सुरू आहे. रवीशकुमारसारखा एखादा अतिसन्माननीय अपवाद जेव्हा हताशपणे आपल्या चॅनलवरून 'कृपया टीव्ही  बघणं बंद करा' असं सांगतो तेव्हा त्यातच सगळं येतं. आर्थिक गणितं आहेत, टीआरपीची चढाओढ आहे, स्पर्धा आहे - कबूल आहे, पण आपण ज्या कामाशी बांधील आहोत त्या कामाचे समाजावर दूरगामी परिणाम होतात हे माहीत असूनही जर आपण ते काम नीट करत नसू तर आपण त्यात सुधारणा का करू नये किंवा ते जमत नसेल तर ते काम थांबवू का नये हे प्रश्न कुणालाही पडत नाहीत ही आजची 'प्रसारमाध्यम शोकांतिका' आहे. प्रसारमाध्यमांच्या डिजिटल अवताराकडे पाहिलं की व्यावसायिकतेचा विळखा किती आवळला जातो आहे हे लक्षात येतं. मराठी किंवा इतर भाषांमधील दैनिकांच्या आणि वृत्तवाहिन्यांच्या वेबसाइट्स, इंटरनेटवर सुरू झालेले मराठी व इतर न्यूज पोर्टल्स, त्यांचे यूट्यूब चॅनल्स पाहिले तर अधिकाधिक हिट्स मिळवण्यासाठी भडक शीर्षकाच्या लिंक्स देणं, शून्य किंवा ऋण बातमीमूल्य असलेल्या घटना/माहिती चमचमीत चित्रासह समोर ठेवणं हे सर्रास केलं जाताना दिसतं. कधीकधी तर हे न्यूज पोर्टल आहे की 'सॉफ्ट पॉर्न'साइट आहे अशी शंका येते. (याला अपवाद अर्थातच आहेत.) सर्व प्रश्नांना 'व्यावसायिक अपरिहार्यता' हे उत्तर दिलं जातं, पण त्याची योग्यायोग्यता ठरवण्याचं काही साधन हाताशी नाही. 

'द वायर'चे संस्थापक सिद्धार्थ वरदराजन यांनी २०१९ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातील 'रॉयटर्स इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी इन जर्नालिझम'मध्ये 'रॉयटर्स मेमोरियल लेक्चर' दिलं होतं. त्यात त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की माध्यम क्षेत्रातील बड्या उद्योगांचा महसूल आज डिजिटल माध्यमांच्या आक्रमणामुळे धोक्यात आला आहे. प्रिंट आणि टेलिव्हिजन - दोन्ही प्रकारातील प्रसामाध्यमांचे जाहिरातदार इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत, अनेक छोट्या प्रादेशिक वृत्तपत्रांना तर शासकीय जाहिरातींशिवाय तग धरणं अशक्यच झालं आहे. यातून माध्यमसमूहांची व्यावसायिक अपरिहार्यता दिसते हे खरं आहे. शिवाय इंटरनेटचं व्यासपीठ वापरून सुरू झालेल्या 'स्टार्ट अप' कंपन्यांची व्यावसायिक अपरिहार्यता अधिक असणार हे उघडच आहे. या सगळ्यात बळी जातोय तो पत्रकारितेचा. पत्रकारिता ही निखळ पत्रकारिता न राहता 'व्यवसायाला पूरक अशी कृती होते आहे. 'मार्केटिंग, हार्ड सेलिंग, सॉफ्ट सेलिंग' ही 'विपणनास्त्रे' पत्रकारितेच्या वरचढ ठरतायत. परंतु याचीच दुसरी बाजूही आहे आणि ती सांगणं आवश्यक आहे कारण काही अपवादांमुळे डिजिटल पत्रकारिता जिवंतही राहिली आहे. मराठीपुरतं बोलायचं झालं तर द वायर मराठी, अक्षरनामा, कोलाज, बीबीसी मराठी, इंडी जर्नल, कर्तव्य साधना, मॅक्स महाराष्ट्र अशी काही नावं घेता येतील. हिंदी आणि इंग्लिशमध्ये बरीच नावं आहेत - द वायर, स्क्रोल, न्यूजलाँड्री, न्यूजक्लिक, कोब्रापोस्ट, द सिटीझन, आल्टन्यूजसारखी फेक न्यूजचा पर्दाफाश करणारी महत्त्वाची वेबसाइट, यूट्यूबवरील एचडब्ल्यू न्यूज नेटवर्क, सोच, द लल्लनटॉप, विनोद दुआ, अभिसार शर्मा, पुण्यप्रसून वाजपेयी, ध्रुव राठी, कुणाल कामरा, फैजान मुस्तफा अशासारख्यांचे स्वतंत्र चॅनल्स - हे आणि इतरही अनेक व्यक्ती/संस्था स्वतंत्र पत्रकारितेचा झेंडा खांद्यावर घेऊन आपली वाट चालत आहेत. ही संख्याही नोंद घेण्यासारखी असल्याने तुम्ही जर खऱ्या पत्रकारितेशी बांधील असाल तर तुम्हांला तुमचा मार्ग मिळू शकतो हे दिसून येतं. परंतु याचं भविष्य काय असेल हे सांगता येणं अवघड आहे. सिद्धार्थ वरदराजन यांनी वरील व्याख्यानात सांगितलं की पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या वायरचं वार्षिक बजेट सुमारे सात कोटी आहे आणि वायरवर केले गेलेले अब्रुनुकसानीचे दावे साडेअकरा हजार कोटींच्या घरात आहेत. गौतम अडाणी, अनिल अंबानी, सुभाष चंद्रा (झी), श्री श्री रविशंकर, राजीव चंद्रशेखर (रिपब्लिक), जय अमित शहा ही दावे करणारी काही नावं. एनडीटीव्ही, द सिटीझन, कॅराव्हान मॅगझिन यांच्यावरही दावे करण्यात आले आहेत. मात्र वरदराजन यांचं असं म्हणणं आहे की हे दावे गंभीरपणे केले असण्यापेक्षा डावपेचात्मक भाग म्हणून केले आहेत. स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्यांना कोर्टकचेरीत अडकवून ठेवणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. 

आज मुख्य धारेतील पत्ररकारितेचा संपूर्ण भर भावनिकतेवर आहे. शिक्षण, आरोग्य, जनचळवळी, न्यायव्यवस्था-निवडणूक-प्रशासन यात अपेक्षित असणाऱ्या सुधारणा हे विषय केंद्रस्थानी नाहीत. लोकांना हे नकोच आहे ही माध्यमांची भूमिका आणि तुम्ही दाखवलं नाहीत तर लोक बघणार तरी कसे ही त्याला विरोध करणारी भूमिका (जी प्रस्तुत लेखकाचीही भूमिका आहे) यामध्ये पत्रकारिता हेलकावे खात आहे. 'आंदोलन' सारखं जमिनीवरील घडामोडींचं वृत्तांकन करणारं मासिक वास्तविक घरोघरी जायला हवं, पण तसं होताना दिसत नाही. मुख्य धारेतील माध्यमं आणि 'मुख्य धारेतील' समाज दोघंही एकमेकांना प्रभावित करत आहेत. राजकीय सत्ता, सांस्कृतिक सत्ता, माध्यम सत्ता याच्या पलीकडे आहे ती 'लोकशक्ती'. ही 'लोकशक्ती' आज क्षीण झालेली आहे, स्वतःचं सामर्थ्य विसरून बसलेली आहे. मराठी वाचक जो एके काळी 'नवभारत', 'समाज प्रबोधन पत्रिका', 'आजचा सुधारक', विविध वृत्तपत्रं आणि मासिकांमधून होणाऱ्या अभ्यासकांच्या चर्चा आणि वाद-विवाद, अभ्यासकांची दीर्घ मांडणी - हे सगळं वाचून  स्वतःला समृद्ध करत होता तो आज 'क्विक फिक्स' वर अवलंबून राहतो आहे. टीव्ही आणि समाजमाध्यमांच्या आहारी जाऊन 'वैचारिक दहशतवादी' होतो आहे. हे मराठीच नव्हे तर सर्वच वाचकांचं झालेलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या मेसेजेसवर विश्वास ठेवला जाणं, तिथे तासनतास वेळ घालवणं, टीव्हीवरील चर्चा मनोरंजन म्हणूनही बघणं आणि एखादं दोनशे पानी अभ्यासपूर्ण पुस्तक वाचायला दोन महिने लागणं (जर पुस्तक हातात घेतलं तर) हा 'सामाजिक' बरोबरच मानसशास्त्रीय विश्लेषणाच्या कक्षेतील विषय आहे. 'ज्ञान' आणि 'सुलभीकरण' हा झगडा पुरातन असला तरी आज सुलभीकरणाचं पारडं खूप जड झाल्याचं स्पष्टपणे दिसतं आहे. महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवी वर्षात - २०३५ पर्यंत आपल्याला मराठी प्रसारमाध्यमं आणि मराठी मानस या दोहोंनाही जर अधिक उन्नत झालेलं बघायचं असेल तर 'मराठी लोकशक्ती' विधायकतेकडे कशी नेता येईल, त्यासाठी जवळची आणि लांबची उद्दिष्टं काय असतील, ती पूर्ण करण्याकरता काय करावं लागेल याचं धोरण महाराष्ट्रातील परिवर्तनवादी संघटनांनी, विविध सामाजिक-राजकीय प्रभाव गटांनी, विविध विचारधारांनी आपसांतील मतभेद विसरून, एकत्र येऊन ठरवणं आवश्यक आहे. आजचा प्रश्न हा मूल्यव्यवस्थेच्या पुनःप्रस्थापनेचा प्रश्न आहे. सुलभीकरण', वैचारिक एकारलेपण आणि त्यातून जन्मणारं राजकीय एकारलेपण एका बाजूला आणि ज्ञानाधिष्ठित विचारपद्धती व ज्ञानाधिष्ठित राजकीय भूमिका दुसऱ्या बाजूला यात दुसरी बाजू सक्षम करण्याचा प्रश्न आहे. स्वतंत्र पत्रकारितेवरील दबाव भविष्यात वाढतच जाईल अशी चिन्हं आहेत. हे खोटं ठरवण्याची ताकद महाराष्ट्र उभी करू शकतो का हे महाराष्ट्रापुढील एक प्रमुख आव्हान असणार आहे. 

- आंदोलन, मे २०२० (इ-विशेषांक)

Monday, April 6, 2020

मोदीपर्व आणि 'आर्ट ऑफ केपेबल'

५ एप्रिलच्या रात्री झालेल्या दीपप्रज्वलनाच्या कार्यक्रमानंतर त्याचे पडसाद उमटलेच. 'फेसबुक वृत्तांकना'त लोकांनी फटाके उडवल्याचं वाचनात आलं. एक-दोन पोस्ट्समध्ये सोसायटीनेच दिवे घालवले, दिवे चालू असणाऱ्या घरांमधील लोकांना इतरांनी दिवे बंद करायला सांगितले असेही उल्लेख होते. एका भाजपसमर्थक मित्राने असं लिहिलं होतं की 'याला मूर्खपणा म्हणा हवं तर, पण हेच मूर्ख नरेंद्र मोदींना पुढच्या निवडणुकीत निवडून देतील'. हे विधान गंमतीत केलं गेलं होतं, पण या विधानावरून असं म्हणता येऊ शकेल की दीपप्रज्वलन हा कळत-नकळतपणे राजकीय कार्यक्रम झाला असं त्याला सुचवायचं होतं. अर्थात मोदींच्या प्रतीकात्मक कार्यक्रमांबाबत अशा स्वरूपाचं मत भाजप विरोधकांनीही व्यक्त केल्याचं दिसतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असं राजकारण होण्याला या मित्राचा फारसा आक्षेप आहे असं दिसलं नाही. गेल्या वर्षी बालाकोट हल्ल्यानंतर नरेंद्र मोदींनी एका निवडणूक सभेत शहीद जवानांच्या नावाने मतं मागितल्यानंतर एका मैत्रिणीने त्याचं समर्थन केल्याने मी हतबुद्ध झालो होतो ते आठवलं. ('सोच' या यू ट्यूब चॅनलने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवे लावण्याच्या आवाहनाच्या अनुषंगाने एक फार चांगला विश्लेषणात्मक व्हिडीओ केला आहे. तो जरूर पाहावा. लिंक - https://www.youtube.com/watch?v=MFyHXLBsoac&t=3s)

या संदर्भाने शंतनू पांडे यांनी त्यांचा एक जुना अनुभव शेअर केला आहे तो नोंदवावासा वाटतो. नवरात्रीच्या दिवसात ते एकदा अहमदाबादला असताना सरदार प्रकल्पाचा निकाल गुजरातच्या बाजूने लागल्यावर लोकांनी रस्त्यावर फटाके उडवले, मेधा पाटकरांना शिवीगाळ केली, त्यांचे पुतळे जाळले असं त्यांनी नोंदवलं आहे. वातावरणात उन्माद होता. लोक उत्स्फूर्तपणे गरबाही खेळले. साधारण पहाटे  तीनपर्यंत हे चाललं. पोलीस आले नाहीत. नरेंद्र मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मेधा पाटकरांचे पुतळे जाळण्यात शासनाचा सहभाग अर्थातच नव्हता, पण आपल्या विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी तशी जमीन तयार करून द्यायचं काम नरेंद्र मोदी ज्या विचारधारेतून घडले ती विचारधारा आपल्या प्रचार यंत्रणेद्वारे करतच असते. एकूणच सामाजिक परिस्थितीतील न्यूआन्सेस - बारकावे - पुढे न आणता लोकांच्या मनातील स्वतःचं स्थान बळकट करण्यात नरेंद्र मोदींना सातत्याने जे यश आलं आहे त्याचा बराचसा वाटा या विचारधारेचा आहे. उलटीकडे असं होतं की न्यूआन्सेस लक्षात आणून देणाऱ्यांना विरोध होतो कारण ते एकूणातच 'नकारात्मक बोलणारे', कधी विकासाचे तर कधी संस्कृतीचे विरोधक असतात. मेधा पाटकरांना शिवीगाळ करणाऱ्यांना तसं करण्यात चूक वाटत नाही कारण नर्मदा बचाओ आंदोलन आपल्या विरोधात आहे याची त्यांना खात्री असते. आंदोलनाचा इतिहास त्यांना माहीत नसतो. 'पर्यायी विकासाचं मॉडेल', त्यासंबंधीची चर्चा त्यांच्यापर्यंत पोचलेली नसते. पोचली तरी त्यावरून त्यांच्या आकलनात काही बदल होईल अशीही शक्यता नसते. कारण ते एका व्यवस्थेने घडवलेले, त्या व्यवस्थेत स्वतःच्या जगण्याला आकार देण्यासाठी धडपडणारे सर्वसामान्य नागरिक असतात. 'हे पर्यावरणवादी लोक बघा स्वतः विमानातूनसुद्धा हिंडतील आणि धरणाला मात्र विरोध करतील' अशी बायनरी मांडणी त्यांना आकर्षित करते. बायनरी मांडणीत सर्व बारकावे नष्ट करून 'हा आपला शत्रू आहे' हे ठसवायची ताकद असते. हे अत्यंत घातक आहे आणि  संघ/भाजप हे सातत्याने करत आले आहेत.

आज हे बरेचदा म्हटलं जातं की सगळी चर्चा मोदीभक्ती आणि मोदीद्वेष या बायनरीमध्ये अडकली आहे. त्याचा अनेक सुजाण लोकांना त्रासही होतो. या विधानाचे लेयर्स उलगडले जायला हवेत असं मला वाटतं. एक म्हणजे ज्यांना असं वाटतं त्यांनी नरेंद्र मोदींची मांडणीही बघावी. उदा. नरेंद्र मोदी नेहरूंबाबत घेतात ती भूमिका पूर्णपणे बायनरी असते. त्यांची इतिहास, भारतीय स्वातंत्र्यलढा, फाळणी  याबाबतची भूमिकाही पूर्णपणे बायनरी असते. यावर प्रतिक्रिया उमटल्या की त्यांना मात्र 'मोदीद्वेष' या कोटीत बसवलं जाताना दिसतं. म्हणजे मूळ मांडणी बायनरी आहे हे लक्षात न घेता प्रतिक्रिया मात्र बायनरी ठरतात! मला असं दिसतं की 'नरेंद्र मोदी' या सामाजिक-राजकीय घटिताचा पुरेसा अभ्यास नसल्याने हे होत असावं.

याचा दुसरा लेयर असा की मोदींच्या राजकारणाची चिकित्सा करताना 'चिकित्सा' आणि 'द्वेष' यातला फरक विरळ होत गेला आहे हेही खरं आहे. हा तसा 'स्लिपरी रोड' आहे; पण काही बाबतीत हे अगदीच स्पष्ट दिसतं. मला तपशील नीट आठवत नाही, पण एक नक्की आठवतं की मागे एकदा नरेंद्र मोदी हिंदीत बोलले त्यावरून काहीतरी गदारोळ झाला होता. आता हे मूर्खपणाचं होतं. उलट इंग्लिशपेक्षा भारतीय भाषेतून बोलणं चांगलंच आहे. कुठली भाषा वापरली हा टीकेचा मुद्दा कसा  काय होऊ शकतो? मोदींना विरोध करताना अशा प्रकारे ताळतंत्र सुटण्याचे प्रकार झालेले आहेत. आता यावर कुणी असं म्हणेल की मोदींनी ताळतंत्र सोडलेलं चालतं (उदा. त्यांचा डिस्लेक्सियाबाबतचा रिमार्क, इतरही बरीच उदाहरणं देता येतील), मग विरोध करणाऱ्यांनी सोडलं तर बिघडलं कुठे? हा प्रश्न ठीक आहे; पण याचा संबंध 'पॉवर'शी आहे हे लक्षात घ्यायला हवं. तुमच्याकडे जेव्हा पॉवर असते तेव्हा तुमच्या बाबतीतले मापदंड समाजाकडूनच बदलले जातात. मोदींच्या चुका पाठीशी घालायला जर बहुसंख्य लोक तयार असतील; किंबहुना त्या चुका आहेत असंच जर त्यांना वाटत नसेल तर ही जाणीव या बहुसंख्य लोकांना होईपर्यंत हे चित्र बदलणार नाही. आणि मोदींवर टीका करून ही जाणीव होतेय, हे चित्र बदलतंय असं फारसं दिसत नाही.

होतं असं की संघ-भाजप, हिंदुत्ववाद, नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका केली तर अनेक तटस्थ लोकांना ते नकोसं वाटू लागतंआणि काही समर्थक अर्थातच चिडतात. 'चिडणं' हा एक मानसिक-भावनिक प्रतिसाद आहे आणि तो समजून घ्यायला पाहिजे. आपल्या धारणांवर टीका झाली की चिडणं हे ह्यूमन/इरॅशनल लेव्हलला वर्क होतं. वैचारिक लेव्हलला नाही. चिडणं ही 'इंस्टिंक्टिव्ह प्रतिक्रिया' आहे. इथे धारणा चुकीच्या की बरोबर हा मुद्दा महत्त्वाचा नाही; 'त्या आहेत' हा मुद्दा महत्त्वाचा आहे. माणूस ही अतिशय 'व्हल्नरेबल' प्रजाती आहे. ती जितकी हुशार आहे तितकीच सेन्सिटिव्ह आहे. माणूस रॅशनल असल्याचा क्लेम करतो, पण तो अनेक बाबतीत पूर्णपणे इरॅशनल असतो. हे जसं मोदीसमर्थकांना लागू होतं तसं इतरही नेत्यांच्या समर्थकांना होतं. आता होतं असं की सातत्याने मोदींवर टीका झाली की समर्थक म्हणतात, आता तर काय व्हायचं ते होऊ दे. आपला सपोर्ट मोदींनाच! आणि ते दुप्पट उत्साहाने कामाला लागतात. हे असं होतं कारण वर म्हटल्याप्रमाणे हे 'ह्यूमन/इरॅशनल लेव्हल'ला वर्क होतं. वैचारिक लेव्हलला काही गोष्टी पटल्या तरी ह्यूमन/इरॅशनल लेव्हलचे निर्णय वेगळे असतात.

मुळात नरेंद्र मोदींचं राजकारणच ह्यूमन लेव्हलवरचं आहे. त्याचा मुकाबला वैचारिक लेव्हलवरून कसा करणार?हिंदुत्व, विकास, राष्ट्रवाद, माध्यमांचा प्रभावी वापर, एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फौज, गोष्टींचं सुलभीकरण ही सर्व भाजपच्या/मोदींच्या राजकारणाची अंगं आहेत. त्यामुळे प्रश्न हा की आपल्या राजकारणाचं अंग काय असावं? टीका हे ते अंग असेल तर ते काम करत नाही हे दिसलं आहे. मग आपला पुढचा पर्याय काय आहे? 'पॉलिटिक्स इज द आर्ट ऑफ पॉसिबल' असं जे म्हटलं जातं त्यात मोठा अर्थ दडलेला आहे. 'लोक वेडे झालेत', 'मोदींनी त्यांना हिप्नोटाइज केलंय' असं म्हणून प्रश्न सुटत नाही. तुम्ही त्यातून फक्त वेगळेच पडत जाता. 'वेगळं पडणं' स्वाभाविक आहे पण ते सोल्यूशन आहे का हा प्रश्न आहे. शिवाय त्यातून तुम्हांला हताशा येऊ शकते. त्यामुळे 'तुम्ही काय करणार' हा प्रश्न आहे आणि त्यासाठी आपण राजकीय व्हायची गरज आहे असं मला वाटतं. राजकीय होणं याचा अर्थ पक्षीय राजकारणात पडणं असाच फक्त नसतो. पक्षीय राजकारण हा एक प्रकार झाला. राजकीय होणं याचा अर्थ आपलं धोरण नीट ठरवणं आणि अंमलात आणणं.  बेस्ट पॉसिबल क्रमांक एक, बेस्ट पॉसिबल क्रमांक दोन असा क्रम लावून घेणं. आजवर जे झालं ते झालं, पण आता सततची टीका टाळून, प्रतिक्रिया देत न बसताही आपण लोकांना विचार करायला उद्युक्त करू शकू का यावर विचार होण्याची गरज आहे. सरकारला प्रश्न विचारणं, असं करणं चुकीचं नाही हे लोकांना पटवून देण्याबरोबरच आम्ही अमुक अमुक बाबतीत सरकारच्याबरोबर आहोत हा संदेशही जाणं महत्त्वाचं आहे. प्रतीकात्मक कर्मकांडाबाबत मतभेद असले तर तिथे त्याक्षणी गप्प राहून नेमकेपणानं त्यातील खुपणाऱ्या बाजूंवर बोलणं आवश्यक आहे. (माझ्यासारख्यांनी विनोदाची उबळ टाळणं गरजेचं आहे!) लोक प्रभावाखाली असू शकतात, चुकीचंच वागू शकतात, पण लोक मुळातून वाईटच असतात असं आपण मानून चाललो तर अवघड आहे. अशाने मग तुमचं मोटिव्हेशनच संपून जातं.

यात अर्थातच विविध मुद्दे गुंतलेले आहेत. त्यावर बोलण्यासाठी व निश्चित काही ठरवण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या, डावे-समाजवादी-गांधीवादी-आंबेडकरवादी-स्त्रीवादी अशा सर्वच कार्यकर्त्या-विचारवंतांनी एकत्र येणं फार आवश्यक आहे. पॉलिटिक्स हे जसं 'आर्ट ऑफ पॉसिबल' आहे तसंच ते 'आर्ट ऑफ केपेबल'ही आहे. एकत्र येणं ही आपल्या केपेबलिटीची पहिली कसोटी ठरावी! 

- ६ एप्रिल २०२०, फेसबुक पोस्ट 

Monday, March 9, 2020

जात आहे, जात नाही 

'सावरकर हे गांधीजींच्या खुनाला जबाबदार नाहीत हे एकवार मान्य केले तरी ते हा खून थांबवू शकले असते की नाही हा प्रश्न शिल्लक राहतोच' असं एका तरूण पत्रकाराने विचारल्याचं सुरेश द्वादशीवार यांनी त्यांच्या 'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' या पुस्तकातील एका प्रकरणात लिहिलं आहे. जातीव्यवस्थेबाबत विचार करताना याला समांतर असा एक प्रश्न माझ्या मनात बरेचदा येतो. 'ब्राह्मण जातीव्यवस्था निर्माण करण्याला जबाबदार आहेत की नाही हा प्रश्न क्षणभर बाजूला ठेवला तरी ती वाढू द्यायला आणि कायम ठेवायला ते जबाबदार आहेत का' हा तो प्रश्न. तथाकथित उच्च वर्णात सर्वोच्च स्थानी असलेल्या ब्राह्मणांकडे शेकडो वर्षं समाजाचं बौद्धिक-मानसिक धुरीणत्व होतं. त्यांच्या डोळ्यादेखत जातीव्यवस्थेने भयानक रूप धारण केलं तरी त्यांनी त्यावर फारशी संघटित हालचाल केल्याचं दिसत नाही. ब्राह्मण सुधारक, विचारवंत होऊन गेले; पण जातीअंतासाठी मोठी चळवळ उभारली गेल्याचं दिसत नाही. यावरून जातीव्यवस्थेच्या उच्चाटनाबाबत या धुरीण वर्गाला आस्था नव्हती हे स्पष्ट दिसतं. (ही व्यवस्था त्यांनीच निर्माण केलेली असल्याने त्यांना ती नष्ट करण्यात रस नव्हता हे सरळ आहे असा एक तर्क बांधता येईल). या मुद्द्याशी जोडलेली काही मते व निरीक्षणे पाहू.
  
बाबासाहेब आंबेडकरांनी ९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठातील मानववंशशास्त्र परिषदेत 'कास्ट्स इन इंडिया : देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डिव्हेलपमेंट' हा शोधनिबंध सादर केला होता. या शोधनिबंधात त्यांनी जातीव्यवस्थेच्या उगमाबाबत आणि स्वरूपाबाबत त्यांची मतं मांडली आहेत. सेनार्ट, नेसफील्ड, रिस्ले आणि श्री. व्यं. केतकर या अभ्यासकांनी केलेल्या जातीच्या व्याख्या उद्धृत करून केतकरांची व्याख्या सर्वात अचूक असल्याचं ते लिहितात. केतकरांची व्याख्या अशी - जात म्हणजे दोन प्रमुख गुणधर्म असलेला समूह. १) समूहातील सदस्यांना झालेल्या मुलांनाच फक्त जातीचं सदस्यत्व मिळतं आणि अशा प्रकारे जन्मलेले सर्वजण सदस्य म्हणून सामावून घेतले जातात. २) समूहाबाहेर लग्न न करण्याच्या अनुल्लंघनीय सामाजिक कायद्याने सर्व सदस्य बांधलेले असतात. आंबेडकरांच्या मते एंडोगॅमी (समूहाबाहेर लग्नाला परवानगी नसणे) हे जातीचं मुख्य लक्षण आहे. भारतामध्ये एंडोगॅमी नव्हती, एक्सोगॅमी (समूहाबाहेर लग्नाला परवानगी असणे) होती आणि एंडोगॅमी थोपली जाण्यातूनच जाती निर्माण झाल्या असं आंबेडकर म्हणतात. जातीचा उगम म्हणजे 'एंडोगॅमीच्या मेकॅनिझम'चा उगम असं त्यांचं मत आहे. 

जात हा एक बंदिस्त 'वर्ग' आहे आणि स्वतःभोवती असा बंदिस्तपणा घालून घेण्याची लक्षणे सर्वप्रथम ब्राह्मणांमध्ये आढळतात. हिंदू समाजात प्रारंभी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार 'वर्ग' होते आणि या वर्गांमध्ये स्थलांतरही शक्य होते. पुढे ब्राह्मण वर्ग इतरांपासून वेगळा होत गेला आणि त्यांनी स्वतःला 'जाती'मध्ये बंदिस्त केलं. हाच मार्ग पुढे ब्राह्मणेतर वर्गांनी अनुसरला आणि त्यामुळे जातीसंस्थेचं जनकत्व ब्राह्मणांकडे जातं असं आंबेडकर लिहितात. इथे दोन प्रश्न असे की ब्राह्मणेतर वर्गामध्ये जातीव्यवस्था कुण्या एकाच्या कायद्यान्वये प्रस्थापित झाली की भारतीय समाजाशी संबद्ध अशा एखाद्या सामाजिक विकसनाच्या नियमानुसार ती प्रस्थापित झाली? मनूने जातीव्यवस्था कायद्याने प्रस्थापित केली हे आंबडेकर नाकारतात. जात मनूच्याही आधी होती, मनूने तिला तात्त्विक अधिष्ठान दिलं असं आंबेडकर लिहितात. मग हे ब्राह्मणांनी केलं का? याचंही उत्तर आंबेडकरांनी नकारार्थी दिलं आहे. संपूर्ण समाज आपण निर्मिलेल्या एका नमुन्यात बसवणं ब्राह्मणांसारख्या सामर्थ्यवान वर्गालाही शक्य नव्हतं असं त्यांचं मत आहे. 

मात्र या निबंधात मला एक छोटी विसंगती आढळते. खालील परिच्छेद पहा - 

If the prevalence of these customs in the non-Brahmin Castes is derivative, as can be shown
very easily, then it needs no argument to prove what class is the father of the institution of caste. Why the Brahmin class should have enclosed itself into a caste is a different question, which may be left as an employment for another occasion. But the strict observance of these customs and the social superiority arrogated by the priestly class in all ancient civilizations
are sufficient to prove that they were the originators of this “unnatural institution” founded and maintained through these unnatural means.

यानंतरचा एक परिच्छेद असा आहे - 

The spread and growth of the Caste system is too gigantic a task to be achieved by the power or cunning of an individual or of a class. Similar in argument is the theory that the Brahmins
created the Caste. After what I have said regarding Manu, I need hardly say anything more, except to point out that it is incorrect in thought and malicious in intent. The Brahmins may have been guilty of many things, and I dare say they were, but the imposing of the caste system on the non Brahmin population was beyond their mettle. 

ब्राह्मण हे 'त्यांच्या' जातीचे निर्माते आहेत, पण पुढे जातींचा जो मोठ्या प्रमाणात विस्तार झाला त्याला ते जबाबदार नाहीत असं आंबेडकरांना म्हणायचं आहे. परंतु दुसऱ्या परिच्छेदात 'ब्राह्मणांनी जात क्रिएट केली नाही' असं म्हटलं गेल्याने पहिल्या परिच्छेदातील विधानाशी ते विसंगत होत आहे. कदाचित इथला 'क्रिएट' हा शब्द 'स्प्रेड' या अर्थी वापरला असावा. हा शोधनिबंध मला दोन ठिकाणी सापडला. दोन्ही ठिकाणी असेच उल्लेख आहेत. 

http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_castes.html http://drambedkarwritings.gov.in/upload/uploadfiles/files/Volume_01.pdf  

ब्राह्मणांचं अनुसरण करून इतरांनी एंडोगॅमी स्वीकारून आपआपल्या जाती निर्माण केल्या (काहींनी दारं लावून घेतली तर काहींना आपल्यासाठी दारं बंद झाल्याचं लक्षात आलं) असं आंबेडकरांचं प्रतिपादन आहे. प्रस्तुत शोधनिबंध आंबेडकरांनी वयाच्या २५ व्या वर्षी लिहिला आहे. पुढील काळात त्यांनी जे विपुल लेखन केलं त्यात काही वेगळी मांडणी आढळते का हे स्वतंत्रपणे पाहता येईल. 

विख्यात समाजशास्त्रज्ञ जी. एस. घुर्ये यांनी आपल्या 'कास्ट अँड रेस इन इंडिया' या पुस्तकात जातींच्या निर्मितीविषयी जे लिहिलं आहे ते आंबेडकरांच्या मांडणीशी जुळणारं आहे. भारतातील जातीव्यवस्था इंडो-आर्यन संस्कृतीतील ब्राह्मणांचं देणं आहे असा त्यांचा निष्कर्ष आहे. जातींचा प्रसार होण्यामागची कारणं देताना घुर्ये लिहितात - 

The lack of rigid unitary control of the state, the unwillingness of the rulers to enforce a uniform standard of law and custom, their readiness to recognize the varying customs of different groups as valid, and their usual practice of allowing things somehow to adjust themselves helped the fissiparous tendency of groups and fostered the spirit of solidarity and community feeling in every group. 

जातीविषयीचं हे अगदी प्राथमिक विवेचन आहे. काही हजार जातींची निर्मिती, त्यांच्यातील उतरंड, एकमेकांशी असलेलं नातं आणि ब्राह्मणी वर्चस्व हा अर्थातच सविस्तर अभ्यासाचा विषय आहे. दुसरा लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा की आपण जेव्हा ब्राह्मणी वर्चस्व म्हणतो तेव्हा त्यात ब्राह्मण ही जात स्पष्टपणे अधोरेखित होत असते. परंतु क्षत्रिय, वैश्य या वर्गांचंही जातीत रूपांतर झालं आणि त्यांनीही बहुजनांचं दमन केलेलं असलं तरी तशा अर्थाचा शब्द रूढ झालेला नाही. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर मराठा वर्चस्व हा शब्दप्रयोग नक्कीच करता येईल.

ही पूर्वपीठिका मांडण्याचं कारण सध्याचा जातीय तणाव हेच आहे. हिंदू-मुस्लिम धार्मिक तणाव, कट्टर डावे, डावे-उदारमतवादी आणि कट्टर उजवे, उजवे-उदारमतवादी हा एक तणाव व हिंदूंमधील जातीय तणाव (ज्यात प्रामुख्याने ब्राह्मण-ब्राह्मणेतर तणाव दिसतो) हे तीन प्रकारचे तणाव प्रखर झालेले असताना प्रत्येक तणावाकडे त्यातील बारकावे समजून घेत पाहणं आणि त्यावर चिंतन करणं गरजेचं झालं आहे. भारताची सामाजिक वीण समंजस आणि सहिष्णू आहेही आणि नाहीही, आज ती 'नाही'कडे झुकल्याचं दिसतं. आपल्याला 'आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन्स' हवे आहेत, 'कोअर्सिव्ह इंडियन्स' नको आहेत. त्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकानं उपायांचा शोध घेणं आवश्यक आहे. ब्राह्मणीकरण, ब्राह्मणांचं सांस्कृतिक वर्चस्व हा विषय नव्याने चर्चेत आला असला तरी तो आहे जुनाच. मला याबाबत असं प्रामाणिकपणे वाटतं की जोवर ब्राह्मण मोठ्या संख्येने आपणहून पुढे येऊन गतकाळातील दलित-बहुजनांवरील अन्यायाबाबत आणि आजच्या विस्कटलेल्या परिस्थितीबाबत बोलणार नाहीत, क्षमा मागणार नाहीत, जोवर ते स्वतःहून चार पावलं पुढे येऊन संवाद सुरू करणार नाहीत आणि हे करत असताना स्वतःला दलितांवर न थोपवता त्यांच्या मनातील राग, खळबळ समजून घेणार नाहीत तोवर हा तणाव संपणारा नाही. (हाच मुद्दा इतर उच्चवर्णीयांनाही लागू आहे.) दुसऱ्या बाजूने दलित-बहुजन आपल्या विचारविश्वातून 'ब्राह्मण' हा शब्द, ही संकल्पना वगळून 'स्वतःतील सामर्थ्याची स्वतंत्र, स्वयंभू ओळख, स्वतःकरताचा स्वतंत्र रोड-मॅप आणि त्याकरता लागणाऱ्या संसाधनांची जुळवाजुळव' या गोष्टींना अधिक स्पेस देत नाहीत तोवर त्यांचं मानस मुक्त होऊ शकणार नाही. 

एक गोष्ट सरळ आहे. 'जात' हे ज्या समाजाचं वैशिष्ट्य आहे, वास्तव आहे, रचनेचा अनेकपैकी एक आधार आहे, तिथे 'जातीय दृष्टीने' गोष्टी पाहिल्या जाणार नाहीत, आकळून घेतल्या जाणार नाहीत हे म्हणणं आणि म्हटलं तर मान्य होणं अवघड आहे. 'प्रजनन' हा सजीवांचा एक मुख्य गुणधर्म आहे. त्याच्याशी जोडलेला मुद्दा नर-मादी संबंधांचा आहे - मानवसमाजाच्या संदर्भात विवाहसंस्थेचा आहे. विवाहसंस्थाच जिथे जातीने ड्राइव्ह केली जाते (केवळ माणूस नाही तर आपल्या जातीचा माणूस जन्माला घातला जातो) तिथे जगण्याच्या इतर अंगाकडेही कधी जाणिवेच्या तर कधी नेणिवेच्या पातळीवर जातीय दृष्टिकोनातून पाहिलं जाणार यात आश्चर्य नाही. मुद्दा हा की शांततामय मानवी सहअस्तित्वाच्या, स्वांतत्र्य आणि समतेच्या मूल्यांच्या संदर्भात ही गोष्ट म्हणजे आपला 'वीकनेस' आहे हे कळलं की त्यावर करायचं काय? भिंत नको आहे म्हणताना ती पाडताही येत नाही असं लक्षात आलं की करायचं काय?

हा विषय अर्थातच नाजूक आहे. दलित-बहुजनांसाठी व्यवस्थात्मक आव्हान मोठं आहे. त्यामुळे या एकूणच परिस्थितीवर गंभीरपणे विचार करणाऱ्यासाठी समजून घ्यावेत असे अनेक बारकावे आहेत. कुठलाही तणाव आहे त्याच स्थितीतही राहू शकतो, तो डिस्ट्रक्टिव्ह होऊ शकतो किंवा तो कमी होऊन त्यातून काही कंस्ट्रक्टिव्हही घडू शकतं. निवड अर्थातच आपल्याला करावी लागते.

- फेसबुक पोस्ट

Friday, February 7, 2020

तुकड्या-तुकड्यातला पुरूष

'लिंगाधारित वर्गीकरण' हा मानव समूहामधील वर्गीकरणाचा एक पूर्णतः जैविक पाया असलेला प्रकार आहे. आर्थिक-सामाजिक-राजकीय वर्गीकरणाचा तिथे संबंध पोचत नाही. एखादी स्त्री किंवा एखादा पुरूष हिंदू, मुस्लिम, पारंपरिक, आधुनिक, लोकशाहीवादी, हुकूमशाहीवादी काहीही असले तरी 'स्त्री' आणि 'पुरूष'च राहतात. 'जेंडर' - लिंगभाव - ही आज एका जागी घट्ट उभी असलेली संकल्पना म्हणून अस्तित्वात नाही. ती एक प्रवाही संकल्पना म्हणून पुढे येते आहे आणि लिंगविशिष्ट आग्रह, भिन्नलिंगी संबंधांनाच सामाजिक मान्यता या सगळ्याला आव्हान देते आहे. लिंगभाव प्रवाही होण्याच्या काळात 'स्त्री' आणि 'पुरूष' ही ठळक विभागणी मला खरं तर काहीशी अपुरी वाटू लागली आहे. पण स्त्री व पुरूष या 'पुरातन जैविकते'चं संख्यात्मक प्राबल्य लक्षात घेता या प्रमुख विभागणीभोवती एक मोठं सामाजिक चर्चाविश्व फिरत राहिलं आहे. यातील दुसरा मुद्दा - किंवा विभागणीचा दुसरा निकष - पुनुरुत्पादनाचा आहे. स्त्री आणि पुरूष यांच्या उत्क्रांतीमध्ये लैंगिक पुनुरुत्पादन हा कळीचा घटक ठरला आहे. जीवसृष्टीच्या एका आदिम अवस्थेत अलैंगिक पुनुरुत्पादन अस्तित्वात होतं. काही सजीवांमध्ये लैंगिक पुनुरुत्पादन कसं विकसित झालं हा एक मोठाच अभ्यासविषय आहे. परंतु  लैंगिक पुनुरुत्पादन सुरू झाल्यानंतर स्त्री आणि पुरूष या संकल्पना अस्तित्वात आल्या असं म्हणता येईल. त्यांच्या अस्तित्वावर पुढे समाजव्यवस्थेने अनेक आवरणं अर्थातच चढवली. पण आपण जर आदिम स्वरूपाकडे गेलो तर ते लैंगिक पुनुरुत्पादनाशी जोडलेलं आहे असं दिसेल. स्त्री ही अशी आहे, पुरूष हा असा आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यातला एक धागा त्यांच्या उत्क्रांतीशी जोडलेला असतोच. तो धागा कमी-अधिक प्रमाणात कच्चा-पक्का असू शकतो. पण तो नसतोच असं म्हणणं धाडसाचं आहे. 'शेवटी तो पुरूषच', 'शेवटी त्याने आपला रंग दाखवलाच' असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण त्याच्या 'पुरूष असण्याच्या' काही मूलभूत गुणधर्मांकडे निर्देश करत असतो. असे काही गुणधर्म जे सामाजिकतेच्या आवरणाखालून डोकं वर काढत असतात.

'मला पुरूष कसा दिसतो?' किंवा 'मला आकळलेला पुरूष' या प्रश्नांवर विचार करताना मला सिमॉन द बोवा या प्रख्यात असित्ववादी, स्त्रीवादी विचारवंताच्या प्रसिद्ध विधानाची आठवण होते. (विचारवंत या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप माहीत नाही. बहुधा नसावं. स्त्री-पुरूष विभागणी केवळ जैविक-सामाजिक नाही तर शाब्दिकही आहे! खरं तर भाषेच्या रचनेतून आणि वापरातून ही विभागणी अधिक घट्ट व्हायला मदत झाली आहे असं म्हणायला वाव आहे. सांस्कृतिक विकासाची बरीच अंगं असतात. हे त्यातलंच एक. असो.) 'स्त्री ही जन्मत नाही. स्त्री घडवली जाते.' असं ते विधान आहे. हे विधान इतरही संदर्भात खरं ठरेल. चोर किंवा खुनी जन्मतःच चोर किंवा खुनी असतो की तो तसा 'घडतो' असा विचार केला तर बहुतांश उदाहरणात तो 'घडतो' असं आपल्याला दिसेल. इथे व्यक्तीला दोषमुक्त करण्याचा उद्देश नसून व्यक्तीतील दोष हे पूर्णपणे त्याचे आहेत की ते विशिष्ट परिस्थितीला प्रतिसाद म्हणून निर्माण झाले आहेत हे तपासण्याचा उद्देश आहे. पुरूषांबाबतही हे विधान करता येईल असं मला वाटतं. आज जो 'पुरूष' दिसतो आहे तो मुळातूनच तसा आहे की त्याच्यावर अनेक सामाजिक आवरणं चढली आहेत? याचं उत्तर संमिश्र आहे. पण सामाजिक आवरणं का चढवली गेली आहेत हा मात्र नेमका आणि गंभीर प्रश्न आहे. आणि तिथे हे मान्य करायला हवं की मानवी अस्तित्वाच्या लढ्यापासून आजवर आपण जे जे प्रमुख व्यवस्थात्मक, संकल्पनात्मक टप्पे अनुभवले त्यात पुरूषाचा वाटा मोठा आहे. माणसाच्या राजकीय, सांस्कृतिक इतिहासाकडे नजर टाकली तर तो पुरूषाने प्रभावित केलेला आहे; किंबहुना पुरूषाने डिझाइन केला आहे असं आपल्याला दिसेल. मानवी समाजव्यवस्था स्त्रीप्रधान होती व नंतर ती पुरूषप्रधानतेकडे गेली असं अनेक संशोधक सांगतात. हा स्वतंत्र अभ्यासविषय आहे, परंतु गेल्या काही शतकांचा ज्ञात इतिहास प्रामुख्याने पुरूषांच्या वर्चस्वाची आणि हे वर्चस्व अबाधित राहावं म्हणून झालेल्या संघर्षाची कथा सांगतो. शेतीचा शोध लागल्यावर अतिरिक्त उत्पादन तयार होऊ लागलं आणि तिथून खासगी मालमत्ता, श्रमविभागणी, समाज वर्गांमध्ये विभागला जाणं या गोष्टी घट्ट होऊ लागल्या. या भल्यामोठ्या प्रवासात पुरूषाची मुख्य भूमिका जनक, संरक्षक, पुरवठादार, नियोजक, संघटक, नियंत्रक अशी राहिली आहे. (यातली 'नियंत्रक' ही भूमिका महत्त्वाची आहे. इतर भूमिकांमध्ये स्त्रीदेखील होती, पण परिणामकारक, कळीच्या बाबींवरील नियंत्रण तिच्याकडे नव्हतं.) धर्म, राज्यसंस्था, राष्ट्र या संकल्पना व त्यानुसारच्या व्यवस्थांचं जनकत्वही पुरूषाकडे जातं. आज समाजजीवनाचे विविध आयाम पुरूष प्रभावित राहिले आहेत याचं कारण या ऐतिहासिक वाटचालीत आहे.

पण मग गुणात्मकदृष्ट्या पाहिलं तर पूर्वीचा - म्हणजे खूप मागे न जाता शंभर-दोनशे वर्षांपूर्वीचा - पुरुष आणि आजचा पुरूष यात काहीच फरक पडला नाही का? तर पडला. तो सकारात्मकही आहे. सामाजिक प्रबोधनाबरोबरच बदलत्या कुटुंबव्यवस्थेमुळे, आर्थिक आघाडीवरील अपरिहार्यतेमुळे घरकामात सहभाग, समताधिष्ठित मूल्यांची जाणीव, एकूण मानसिकेतेमधील बदल याबाबत पुरूषांमध्ये बदल झालेला दिसतो. मात्र त्याच्या 'डिफॉल्ट सेटिंग'मध्ये नक्की किती फरक पडला आहे हे तपासावं लागेल. यासाठी पुरूषाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायला हरकत नाहीच, न्यायाची निकड म्हणून त्याला दोषी ठरवायलाही हरकत नाही, परंतु 'व्यापक विश्लेषण; करताना 'स्पेसिफिक’ (विशिष्ट)  विश्लेषण चुकत नाही ना; किंवा ते राहूनच जात नाही ना हेही तपासणं आवश्यक आहे. आपल्याला जे जे सामाजिक प्रश्न दिसतात, ज्या गोष्टी टोचतात त्यातील काही गोष्टी आजार नसून 'आजाराची लक्षणं' असतात. मूळ आजार वेगळा असतो आणि त्याला त्याचा एक इतिहास-भूगोल असतो. अल्बर्ट आइन्स्टाइनचं एक प्रसिद्ध विधान आहे - 'प्रश्न ज्या पातळीवर निर्माण झाला आहे त्याच पातळीवर उभं राहून तो सोडवता येत नाही. त्यासाठी ती पातळी सोडून वरच्या पातळीवर जावं लागतं.' त्यामुळे समाजात, विशेषतः पुरूषांमध्ये, आहे त्याच आर्थिक-राजकीय व्यवस्थेत राहून अधिक टिकाऊ स्वरूपाचे मूल्यात्मक बदल होतील असं मानणं थोडं भाबडेपणाचं होईल. ते अजिबात शक्य नाही असं नाही, पण त्याला एक मर्यादा नक्की आहे. दैनंदिन जगण्यातील अनेक अपरिहार्यतांमध्ये अडकलेला माणूस त्यातून बाहेर पडून शांतपणे सम्यक विचार जोवर करू शकत नाही तोवर मूल्यात्मक बदल संथगतीनेच होतील. आज माणसाच्या जगण्याचा प्रमुख आयाम आर्थिक आहे. माणसाच्या विचारविश्वाचं पहिलं नियमन आर्थिक चौकट करते. त्यामुळे आर्थिक क्षमता हीच जर अस्तित्वाची मुख्य कसोटी असेल तर इतर गोष्टींकडे लक्ष जाण्याइतपत अवकाशच मिळू शकणार नाही. हेच लग्नासारख्या सामाजिक चौकटीबाबतही म्हणता येईल. स्त्री-पुरूष संबंधांचं समाजमान्य प्रकटीकरण फक्त विवाहातूनच होणार असेल तर ती चौकट दोघांनाही जाचक ठरेल. या चौकटीशिवायचं स्त्री-पुरूष नातं हे अधिक स्वतंत्र, सहज आणि सक्षम असेल.

'मला आकळलेला पुरूष' याच्या पोटात 'कुठल्या चौकटीतला पुरूष' हे अध्याहृत आहे. माझ्या घरासमोर रस्त्याचं खोदकाम करणारा कंत्राटी मजूर, ड्रेनेज सफाई करणारा आणि ती सफाई दारू प्यायल्याशिवाय करता येत नाही म्हणून दारूची सवय लागलेला कामगार, अनेक वर्षं कॉर्पोरेट क्षेत्रात आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर वर चढत गेलेला माझा जवळचा मित्र, साहित्यक्षेत्रात नाव कमावलेला लेखक मित्र, स्त्री चळवळीशी जोडलेला कार्यकर्ता मित्र, मी आजवर जिथे जिथे नोकरी केली तिथले माझे बॉसेस, माझ्या घरात ज्याने फर्निचरचं काम केलं तो बिहारमधून महाराष्ट्रात आलेला सुतार, अनेक वर्षं सामाजिक-राजकीय क्षेत्रात राहून सत्तेच्या जवळ गेलेला माझ्या परिसरातला राजकारणी, माझ्या घरी फूड डिलिव्हरी किंवा कुरियर डिलिव्हरीसाठी येणारे वीस ते पन्नास अशा वयोगटातील पुरूष, गेली अनेक वर्षं नियमित येणारा पोस्टमन हे सगळे पुरूष मला वेगवेगळी कथा सांगतायत. (माझ्या घरी धुणं-भांडी करणाऱ्या मावशीदेखील मला एक कथा सांगतात. स्वतंत्रपणे मला हे सगळेजण कळतात, त्यांच्या अडचणी, त्यांच्यातील फरक आणि साम्यस्थळे कळतात. पण मला सर्वाधिक अस्वस्थ करते ती ज्या व्यवस्थेने हे एकत्र बांधले गेले आहेत (आणि जी बहुतांशी पुरूषांनीच लावली आहे) ती व्यवस्था. मला असं दिसतं की ही व्यवस्था स्त्री आणि पुरूष घडवते आहे आणि या  व्यवस्थेच्या चौकटीचं प्रतिबिंब त्यांच्या वर्तनावर, व्यक्तिमत्वावर पडतं आहे. आज पुरूष हा एक 'स्त्री प्रश्न' असला तरी पुरूषाचेही प्रश्न आहेतच. मुद्दा 'वेटेज'चा आहे आणि त्यावरूनच प्रश्नाचं गांभीर्य ठरत असतं हे बरोबर. मुद्दा असा की सामाजिक इतिहास आणि वर्तमान असंख्य 'गिव्ह अँड टेक'च्या परिणामांमधून आकारास येत असतं. म्हणूनच ते समजून घ्यायचं तर सरसकटीकरण टाळून 'स्पेसिफिक'वर बोलावं लागेल. लक्षणांवर मर्यादित चर्चा करून आजारावर अधिक चर्चा करावी लागेल. आज मला आकळलेला पुरूष हा इतिहास-वर्तमानाचं ओझं घेऊन जगणारा, तुकड्या तुकड्यातला पुरूष आहे. त्याला एकसंध करायचं तर आपल्याला एकत्रितपणे पुरूषविशिष्ट वृत्तीसह आजच्या व्यवस्थेवरही काम करावं लागेल.

(लोकसत्ता 'चतुरंग', ७ फेब्रुवारी २०२०)


Wednesday, January 1, 2020

विनोद हाजिर हो

"आयुष्यात काही गोष्टींची संगती लावायची नसते. मुळात आयुष्याची तरी संगती लावावी का हाच एक घनगंभीर प्रश्न आहे. पण सध्या तो विचारार्थ घ्यायला नको. 'काही गोष्टी' या सदरात येणाऱ्या गोष्टींच्या विविध कॅटॅगरीज आहेत. त्यातल्या काही आपल्याला झेपत नाहीत, काही त्रासदायक ठरतात, काही अर्थहीन वाटतात, काही घरातल्या तर काही बाहेरच्या माणसांबरोबर होणाऱ्या आदानप्रदानातून समोर येतात, काही फेसबुकच्या वॉलवर येऊन छळ मांडतात तर काही समोर न आल्यामुळेच वैताग आणतात....त्यामुळे त्यावर आपण किती एनर्जी खर्च करायची हे आपण नीट विचार करून ठरवावं...." मी मन्याला समजावून सांगत होतो की त्याला आणखी डिस्टर्ब करत होतो हे माझं मलाच नीट कळेना. म्हणून मग थांबलो.

मन्या तसा शांत होता. त्याने 'कितना हुआ?' असं विचारत चहाचे पैसे दिले आणि एक सिगरेट विकत घेऊन "चल , मार्गस्थ होऊ" असं मला म्हणत चालू लागला. 'मार्गस्थ' हा शब्द वापरल्याने हा आता ठीक झाला आहे असं माझ्या मनाने घेतलं. पण पाच एक मिनिटं झाली तरी तो काही बोलेना. म्हणून मग शेवटी मीच म्हटलं, "मला असं वाटतं मन्या की एका कॉमेंटमुळे तू खरंच इतकं अस्वस्थ व्हायचं कारण नाही."

"हो. इन प्रिंसिपल मलाही पटतंय ते. पण प्रिंसिपल्सना 'काही गोष्टी' कळत नाहीत ना!" मन्याच्या विधानात विनोद होता, पण सुरात उद्वेग होता.

फेसबुकच्या वॉलवरील कॉमेंट्सचा 'जिव्हार' या ठिकाणाशी जवळचा संबंध आहे हे जाणकारांना माहीत असेल. मन्याच्या बाबतीतही तेच घडलं होतं. शिवाय काय बोललं गेलं आहे यापेक्षा कोण बोललं आहे हे वरचेवर वरचढ ठरत आलंय. एक तर फेसबुकच्या प्रांगणात खेळापेक्षा खरचटणं जास्त. त्यातून मन्याच्या पोस्टवर कमेंट करणारी स्मिता होती. त्यातून कमेंट पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्यावर होती.स्मिताला पुलंचं अ‍ॅव्हर्जन नसलं तरी मन्याइतकं पुलंवर प्रेमही नव्हतं. साहित्य हा दोघांना एकत्र आणणारा फॅक्टर असला तरी तोच अधेमधे दोघांना काही काळ दूरही नेत असे.

'पुलंचा विनोद निर्विष होता यावर पुनर्विचार करायला हरकत नाही. विशेषतः पुरूषांनी. अर्थात त्यांना प्रेमात पडल्यावर विचार-पुनर्विचार या गोष्टी जमत असतील तर...' अशी स्मिताची कमेंट होती. मन्याने लिहिलेल्या पुलंवरील एका क्रिटिकल तरी कौतुककेंद्री पोस्टवर. त्यामुळे मन्याचा फ्यूज उडला होता.

"मला हे मान्यच आहे की गिव्हन युवर फीलिंग्ज अबाउट हर, तिच्याशी बोलणं तुला अवघड वाटत असेल. पण बोलल्याशिवाय पर्यायही नाही..." मी म्हटलं. सिगरेट संपूनही मन्याकडून एकही शब्द न आल्याने बोलणं भाग होतं. "आणि अर्थात फेसबुकवर नाही. प्रत्यक्ष. किमान फोनवर तरी." मी पुढे म्हटलं. निर्णायक सुरात.

मन्या आणि स्मिताबद्दल - म्हणजे ते दोघे एकत्र असण्याबद्दल - मला एक सुप्त, संथ आकर्षण होतं. आणि बहुधा असूयाही! दोघे तसे वेगळे होते, पण प्रेमही घनदाट होतं. स्मिताबद्दल थोडं अधिकचं आकर्षण होतं. कारण तिची सेन्सिबिलिटी जास्त टोकदार होती. मन्या क्रिएटिव्ह होता, पण 'व्हिजन' वाइज अंमळ 'अधूरा' वाटे मला कधीकधी. अर्थात आद्य मित्र म्हणून मन्याचं स्थान वरचं होतंच. असो. गोंधळ वाढतोय असं वाटतंय. असोच.

यानंतरचा सीन लवकरच घडला. म्हणजे तो माझ्याकडून घडवून आणला गेला.

दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ. वीक डे. शहर फुटल्यासारखा ट्रॅफिक. त्यातलेच काहीजण उडप्याकडे. आमच्याबरोबर. मी आणि मन्या चहाच्या जोडीने आजूबाजूचा कलकलाट रिचवत स्मिताची वाट बघत होतो. ती ऑफिसमधून थेट येणार होती. आमच्यानंतर दहा एक मिनिटात आलीच. शिरस्त्राण, स्कार्फ इत्यादी आयुधं काढून सेटल झाली आणि म्हणाली, "सो, हिअर आय अ‍ॅम!"

"विचित्र नाही ना वाटलं? मी असं बोलावलं म्हणून?" मी.

"नो. इट वॉज लिटल ड्रॅमॅटिक, बट दॅट्स फाइन..." स्मिता. हसून.

"ओके. गुड..." मी मन्याकडे पाहिलं.

"कळलं मला. हे माझ्या कॉमेंटबद्दल आहे, राइट?" स्मिता.

"हो..." मन्या.

स्मिता एक क्षण थोडी गंभीर झाली. मग म्हणाली, "फर्स्ट ऑफ ऑल, आय अ‍ॅम सॉरी. मला मान्य आहे की असं जनरलायझेशन करायला नको होतं मी. इट वॉज टोटली अननेसेसरी. रियली सॉरी..."

"कूल. पण पुलंच्या विनोदाबाबत काय?" मन्याने विचारलं.

"काय?" स्मिता.

"पुलंचा विनोद निर्विष नव्हता असं तुला खरंच वाटतं?" मन्या.

"वेल, पुनर्विचार करू नये इतका तो साधा-सरळ-हार्मलेस आहे?" स्मिताने विचारलं.

"कम ऑन! तो मुळात विनोद आहे!" 'विनोद' शब्दावर भर देत एक्साइट होत्साता मन्या उद्गारला.

"आपण चहा सांगू आधी. तू घेणार ना? की आणखी काही?" मी स्मिताला विचारलं.

"चहा..." स्मिता.

मी खुणेनं ऑर्डर दिली आणि मन्या पुन्हा सुरू झाला.

"मला एक कळत नाही विनोद म्हणजे काय एखादा प्रबंध आहे का की ज्याची उलट-सुलट, तौलनिक वगैरे समीक्षा व्हावी?"

"प्रबंध किंवा विचारधारा - आयडियॉलॉजी. " मी म्हटलं.

"राइट. विनोद म्हणजे विचारधारा का?" मन्या.

हे ऐकल्यावर स्मिताने तळहात मुडपून हनुवटीखाली ठेवला. सामना रंगणार होता.

"विचारधारा ही गोष्ट काय फक्त मोठमोठ्या ग्रंथांमधून आणि व्याख्यानांमधूनच फक्त व्यक्त होते का?" स्मिताने विचारलं.

"पण 'विचारधारा' म्हणजे एक पवित्र खांब आहे आणि त्या खांबाला धरून राहण्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता आहे असा आग्रह का? विचारधारा आणि विचारधारेचे आविष्कार यात फरक पडू शकतो. त्यातून विसंगती आणि मानून विनोद निर्माण होऊ शकतो." मन्या.

"हो, पण मूळ विचारधारेला धक्का लागून चुकीचा मेसेज गेला तर काय? पुलंनी स्त्रियांवर विनोद केले, पण त्याचा धक्का स्त्रीवादाला, मुख्य म्हणजे स्त्री चळवळीला लागलाच..." स्मिता.

"माझा 'वादां'वर आक्षेप आहे तो यासाठीच. सगळे 'वाद' जर अंतिमतः आपल्याला कुणीतरी धक्का लावेल या भीतीखालीच जगत असतील तर मला त्यांच्या क्षमतेविषयी - खरं तर रिलेव्हन्सविषयीसुद्धा - शंका येते." मन्याच्या या स्ट्रोकनंतर टेबलावर थोडी शांतता पसरली. स्मिताही गप्प होती. अचूक वेळ साधून चहा आला आणि शांततेला एक वळण मिळालं.

"मला असं वाटतं - रादर मला असं दिसतं - की शेवटी सब्जेक्टिव्हिटीच सगळ्यावर भारी पडते. आपला कल, आपली विचारधारेशी बांधिलकी याहीपेक्षा आपल्याला काय वाटतंय, आपली जाणीव विशिष्ट क्षणी, विशिष्ट परिस्थितीत काय सांगतेय आणि काय करायला लावतेय हेच निर्णायक ठरतं. आणि मला वाटतं यात काही चुकीचं नाही." मी एका दमात हे बोललो याचं मलाच आश्चर्य वाटलं.

"हं, हे पटतंय मला. पण विनोद जेव्हा जेंडर, कास्ट, सेक्शुअल ओरिएंटेशन, लुक्स, अपिअरन्स या मोल्डमधून बाहेर येतो तेव्हा तो निखळ विनोद उरतो का हाही एक प्रश्न आहेच." मन्या म्हणाला.

"ग्लॅड यू सेड धिस." स्मिता सुखावली होती.

"हो. आय मीन, समीक्षा दृष्टीने जसं विचारधारांकडे बघायला हवं, तसं विनोदाकडेही बघायला हवं. त्यावर आक्षेप घ्यायचं कारण नाही. पण समीक्षादृष्टी कलासमीक्षेची असावी. विचारधारेने प्रभावित झालेली नसावी." मन्या म्हणाला.

"हे अवघड आहे. हा एक वेगळा डिबेट तयार होईल. कारण समीक्षा दृष्टी ही अखेरीस एका माणसाची दृष्टी असते. विनोद जसा एका माणसाच्या दृष्टीतून येतो तसंच. त्यामुळे त्या माणसाची घडण - वैचारिक, भावनिक - तिथे आपला प्रभाव दाखवतेच. विचारधारेचा प्रभाव पडणार नाही असं होणार नाही. एखाद्या 'इझम'चा नसला तरी त्या माणसाच्या व्यक्तिगत विचारधारेचा प्रभाव असणारच." स्मिता.

"ओके. म्हणजे मग असं म्हणावं लागेल की सर्व समीक्षा ही सापेक्ष असते कारण ती कुठल्या ना कुठल्या प्रभावातूनच आलेली असते. 'निखळ' समीक्षा असू शकत नाही." मन्याने निष्कर्ष काढला.

"याच न्यायाने विनोदही 'निखळ' असू शकत नाही." मी जोड दिली.

"ही 'निखळ' नावाची भानगड अस्तित्वात तरी आहे का? बहुधा गप्प बसणंच फक्त 'निखळ' असावं." मन्याच्या या रिमार्कवर हसू येणं अपरिहार्य होतं. स्मितालाही.

""दॅट्स अ बिग वन, अ‍ॅक्च्युअली. हा एक फिलॉसॉफिकल मुद्दा आहे. पण त्याचा फार कीस न पाडता, 'निखळ' असं काही नसलं तरी ठीक आहे, बायस असतोच कारण आपण सगळे वेगवेगळ्या सोशल-मेंटल-मॉरल-इकॉनॉमिकल सेगमेंटमधले असल्याने आपल्या जाणिवा वेगवेगळया घडतात हे मान्य करून पुढे जायला हरकत नाही. या न्यायाने मग खरं तर काहीच मनावर घेऊ नये. पण विनोदाचा किंवा कुठल्याही अभिव्यक्तीचा सेन्सेटिव्ह विषयांवर, सोशली महत्त्वाच्या विषयांवर परिणाम होतो हे नाकारताही येत नाही ना..." स्मिता कंटिन्यूड.

"मान्य आहे. म्हणजे आज जवाहरलाल नेहरूंवर खुलेपणानं - निखळपणानं म्हणू..." - इथे मी डोळे मिचकावले - "एखादा विनोद करणं योग्य होणार नाही. याची कारणं आपल्याला माहीत आहेत."

"करेक्ट! माझाही हाच मुद्दा आहे. स्त्री चळवळ जेव्हा मूळ धरत होती तेव्हा पुलंनी स्त्रियांवर विनोद करणं योग्य होतं का?" स्मिताने विचारलं. प्रश्न भेदक होता.

"ओके. असं केल्याने चुकीचा परिणाम होतो - झाला - असं मान्य करू. बट देन इझ इट  क्राइम? लेखकाचं स्वातंत्र्य - ज्यात विनोद करण्याचं स्वातंत्र्यही आहे - आणि लेखकाची स्वतःची वैचारिक-राजकीय भूमिका यात आपण फरक करणार की नाही? पुलंनी स्त्रियांवर काही विनोद केले हे खरं, पण ते स्त्री स्वातंत्र्याचे विरोधक होते का? त्यांना स्त्री चळवळ निरर्थक वाटत होती का? त्यांनी नेहमीच विसंगतीवर बोट ठेवलं. त्याला स्त्री चळवळ अपवाद नव्हती इतकंच. आणि आता स्त्री चळवळीमध्ये काहीच विसंगती नव्हती असं प्लीज म्हणू नकोस. वैचारिक बैठकीमध्ये विसंगती नसेल, पण माणसांमध्ये विसंगती असणारच..." मन्या.

"हं. पण तरी मला असं वाटतं की इट वॉज हार्मफुल फॉर द मूव्हमेंट." स्मिता.

"मला असं वाटत नाही." मन्या.

"ओके. सो लेट्स अग्री टू डिसअग्री." स्मिता.

"राइट. असाही विचार कर की आजच्या मूल्यधारणांनी इतिहास जोखणं योग्य आहे का? गे असण्यावरून विनोद व्हायला सुरूवात झाली होती तेव्हा ते अ‍ॅप्रिशिएट होत होते. नंतर जाणीव बदलली. डेव्हलप झाली. आता तसे गे जोक्स अ‍ॅप्रिशिएट होत नाहीत. तसंच स्त्रियांवरील विनोदाचंही आहे असं मला वाटतं. "अतिविशाल महिला मंडळ' वगैरे आज आवडणार नाहीच. आय थिंक वी शुड लीव्ह सर्टन थिंग्ज टू टाइम अँड नॉट टू आयडियॉलॉजी. आजच्या व्हॅल्यू स्टॅंडर्डने पाहिलं तर इतिहासात अनेकजण व्हिलन ठरतील." मन्या.

स्मिता यावर हसली आणि म्हणाली, "मला असा प्रश्न पडतो की व्हाय डू वी नीड हीरोज? जस्ट बिकॉज यू आर अ डाय हार्ड फॅन ऑफ पुलं, त्यांचं मूल्यमापनच करायचं नाही हे का? व्हाय देअर इज धिस अर्ज टू हॅव हीरोज?" स्मिताने कॅल्क्युलेटेड शांतपणे विचारलं.

"दॅट्स अ व्हॅलिड क्वेश्चन. पण हीरोज तुलाही हवेच आहेत ना? व्हर्जिनिया वूल्फ, सिमॉन द बोवा, गौरी देशपांडे?" मन्याचा प्रश्न.

आता मात्र टेबलावर शांतता पसरली दोनेक मिनिटं. स्मिताला मी ऑब्झर्व करत होतो. देन शी मेड अ गुड पॉईंट.

"ओके. पण तुला खरंच असं वाटतं की यच्चयावत सगळ्या लेखकांना एका मापात तोलता येईल?" स्मिता.

मन्याने इथे 'पटतंय' या अर्थी मान डोलवत स्मिताला दुजोरा दिला. आणि तो पुढे जे म्हणाला त्याला स्मितालाही दुजोरा द्यावा लागला.

"मान्य. सगळयाच लेखकांना एका मापात तोलता येत नाही हे खरं. पण तसंच सगळ्या विनोदांनाही एका मापात तोलता येत नाही. विनोद रिजेक्ट करता येतोच, पण त्या लेखकाला फक्त त्या विशिष्ट विनोदाच्या संदर्भात तोलणं बरोबर नाही."

"फेअरइनफ. हे मी मान्य करते!" असं म्हणत स्मिताने समेटासाठी करावा तसा हात पुढे केला.

एका कॉमेंटमुळे उद्भवलेल्या समरप्रसंगातून आम्ही बाहेर आलो होतो. त्यामुळे साहजिकच उडुप्याकडूनही बाहेर आलो आणि आपापल्या गाड्या काढायला लागलो. स्मिताची गाडी थोडी लांब होती. ती त्या दिशेने गेली आणि आम्ही आमच्या गाड्यांकडे वळलो. तिने हाक मारल्यासारखी वाटली म्हणून पाहिलं तर ती लांबून खुणेने रस्त्याच्या पलीकडचं एक होर्डिंग दाखवत होती. जिमची जाहिरात होती. एक उदास चेहऱ्याची स्थूल मुलगी. 'लूज द वेट, गेन अ बॉयफ्रेंड' अशी हेडलाइन. बाकी तपशील. होर्डिंग पाहिल्यावर आम्ही गाड्या काढून स्मिताजवळ गेलो. मन्या हसत तिला म्हणाला, "पुन्हा आत जायचं का चर्चा करायला?" "नको, नको. मला वाटतं मला निकाल माहितीय. अँड आय होप, तुलाही!" स्मिताही हसून उत्तरली आणि गाडी स्टार्ट करून निघाली.

मला स्मिता आवडते ते उगीच नाही!

- पुन्हा स्त्री उवाच, अंक चौथा 


Tuesday, December 17, 2019

पुरूषातून 'माणूस' घडवण्याचा प्रश्न

आपलीच असं नव्हे तर जगभरातली आजवरची साधारण समाजव्यवस्था, या व्यवस्थेेने घडवलेलं समाजमानस आणि त्यातून उभे राहिलेले स्त्रियांचे प्रश्न यावर चर्चा होणं, त्यावर काम होणं, सामाजिक सुधारणा होणं, कायद्यात सुधारणा होणं ही प्रक्रिया सुरू होऊन बराच काळ लोटला असला तरी मुळापाशी अजून बरंच काम व्हायची गरज आहे याची साक्ष पटवणारे प्रसंग वरचेवर घडत असतात. बलात्कार व हिंसेच्या अमानुष घटनांनी देश हदरून जात असतानाच मेघना गुलजार या संवेदनशील दिग्दर्शकाच्या नव्या चित्रपटाच्या ट्रेलरने स्त्रीला केवळ ती स्त्री आहे म्हणून ज्या गोष्टींचा सामना करावा लागला आहे त्यातीलच एका, काहीशा विस्मृतीत गेलेल्या गोष्टीला उजाळा मिळाला आहे. ‘छपाक’ या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पडुकोण आपल्याला अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या तरूणीच्या भूमिकेत भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मी अग्रवाल या मुलीच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटातून लक्ष्मी अग्रवालवर झालेला अॅसिड हल्ला आणि तिचा पुढचा लढा आपल्याला दिसेलच, पण या विषयासंदर्भातील प्रमुख प्रश्न अर्थातच 'हे का होतं?' आणि 'हे कसं थांबवायचं?' हे आहेत.

सामाजिक गुन्ह्यांमागची कारणं शोधत आपण त्यांच्या मुळाशी जाऊ लागलो की आपल्याला आपल्याच समाजव्यवस्थेतील अनेक कमकुवत धागे दिसू लागतात. त्यामुळे प्रभावित झालेल्या माणसांतील विविधांगी गुणदोष दिसू लागतात. गुन्हेगार हा 'कारण' आहे की 'परिणाम' आहे हाही प्रश्न आपल्याला पडू लागतो. स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत ते पाहता आपण समाज म्हणून अजूनही स्त्रीच्या मानसिक,शारीरिक उर्मींना पूरक असा पुरूष घडवू शकलेलो नाही हे सिद्ध होतच आहे. अर्थात हे एक ढोबळ विधान आहे. पुरूषांमध्ये बदल झाले आहेत, होत आहेत. आज त्याबाबतचं चित्र आशादायक आहे. मात्र त्याचवेळी विविध स्तरातील पुरूषांसोबत विविध पातळ्यांवर , विविध पद्धतीने काम करणं गरजेचं आहे हेही आधोरेखित होतं आहे. स्त्री- पुरुष संबधाचा विचार करताना प्रेम, मैत्री, आकर्षण, लैंगिक इच्छा या भावभावनांचा अनेकविध छटा आणि त्यांचा या संबंधावरील परिणाम आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. आपल्याला हेही लक्षात घ्यावं लागतं की समाजाची घडी ज्याप्रकारे लागत गेली आहे आणि त्यातून ज्याप्रकारे विविध प्रकारच्या विषमतेला मूक मान्यता मिळत गेली आहे. त्यातून स्त्री-पुरूष संबंधावर मोठा परिणाम झाला आहे. स्त्री-पुरूष संबंध हे इतर मानवी संबंधांसारखेच 'द्वंद्वात्मक' आहेत आणि त्याला स्त्री पुरुषांमधल्या आदिम आकर्षणाची जोड आहे. दोन मित्रांमध्ये भांडण झालं की त्यांच्यात वादावादी होईल, कदाचित मारामारीही होईल. इतर वेगवेगळ्या नात्यांबाबत भांडण, मतभेद वेगवेगळी रूप धारणं करतील. स्त्री-पुरूष नात्यातही, म्हणजे रोमँटिक नात्यातही हे लागू होतं. मात्र रोमॅंटिक स्वरूपाच्या नात्यात किंवा त्या नात्याला सुरूवातदेखील व्हायच्या अगोदर स्वत:ला किंवा दुसऱ्याला उद्ध्वस्त करण्याइतपत टोकाचा विचार माणसाकडून का केला जातो हे समजून घेणं, त्यावर बोललं जाणं आवश्यक आहे.

यात माणूस म्हणजे प्रामुख्याने पुरूष अपेक्षित आहे, कारण एकतर्फी प्रेमातून एखाद्या मुलीला त्रास देणं, प्रेम नाकारलं गेल्यावर तिच्यावर हिंसक हल्ला करणं इथंपासून ते स्वत:चा देवदास करून घेऊन आपलं आयुष्य निराशेच्या गर्तेत लोटून देणं इथवरच्या सर्व प्रकारात पुरूषच अग्रेसर आहेत. यातून 'सामान्यत: पुरूष स्त्रीपेक्षा प्रेमाच्या बाबतील असमंजस व कमकुवत आहे' या विधानाला पुष्टी मिळते. आपल्याला नेमक्या याच मानसिकतेमागील कारणं शोधता यायला हवी आहेत.

स्त्री-पुरुष संबंधामध्ये प्रेम, आकर्षण ही भावना बऱ्याच गुंतागुंतीची आहे. या भावनांच्या मानसशास्त्रीय व जीवशास्त्रीय अंगान केलेल्या तपशीलवार विश्लेषणात जाणं आवश्यक आहेच कारण त्याशिवाय त्यांच संपूर्ण आकलन होणं शक्य नाही. (खरं तर आपण आपल्या प्रत्येकच भावनेचा अभ्यास करायला हवा कारण आपल्या भावनाच आपल्याकडून बरंच काही करून घेत असतात). इथे आपण एक अगदी छोटा प्रयत्न करून बघूया. 

स्त्री-पुरूषांबाबत लैंगिक आकर्षण हा एक आदिम 'फोर्स' आहे. निसर्गाला स्त्री-पुरूष जवळ यायला हवे आहेत कारण त्यातून पुनरूत्पादन होणार आहे. या आकर्षणाच्या वर, मानवी संस्कृतीच्या प्रवाहात जो एक सुंदर स्तर निर्माण झाला आहे तो प्रेमाचा आणि त्याच्या विविध छटांचा आहे. मला असं दिसतं की आज आपल्यासमोरचं आव्हान हे आहे की प्रेम, आकर्षण या संकल्पनांना त्यांच्या कमालीच्या ठोकळेबाज, एकांगी रूपातून बाहेर काढणं आणि त्यांचा अधिक प्रगल्भ, समावेशक अर्थ मुलामुलींच्या मनामध्ये रूजवणं.

प्रेम ही भावना निर्माण कशी होते? आपल्याला अमुक मुलींविषयी जे वाटतं ते प्रेम आहे म्हणजे काय आहे? तिला जर आपल्याविषयी काही वाटतं नसेल तर आपण तिथून मागे का फिरू शकत नाही? एका मुलीने आपल्याला नाही म्हटंले म्हणून आपण तिच्यावर अॅसिड फेकण्याइतके हिंसक का होतो? आपल्या आत असं काय आहे जे आपल्याला इतकं हिंसक बनवतं? हे व असे अनेक प्रश्न पुरूषांनी स्वत:ला विचारणं आणि समाजाने - प्रामुख्याने पालक, शिक्षक, मित्र आणि हितचिंतक यांनी - पुरूषांना त्याबाबत तपासत राहणं फार आवश्यक आहे. स्त्री-पुरूष संबधांना मिळालेलं हिंसेचे हे भयानक परिमाण आपल्याला सामूहिक प्रयत्नानेच नाहीसं करता येईल. मला असं दिसतं की त्यासाठी मुलांच्या वाढीच्या वयात त्यांच्या मानसिक स्वास्थाकडे सतत लक्ष देत राहणं गरजेचं आहे. माणसामध्ये हिंसेची बीज आहेतच. ती पुरूषांमध्ये अधिक प्रमाणात आहेत कारण आपल्या पृथ्वीवरील अस्तित्वाच्या लढाईच्या खूप पहिल्या टप्प्यापासून राज्यव्यवस्थेच्या, समाजव्यवस्थेच्या अलीकडील टप्प्यापर्यंत पुरूषातील आक्रमकता व वर्चस्ववादी वृत्ती यांनी कळीची भूमिका बजावली आहे. पुरूषामधील हिंसेला जैविक आणि समाजरचनेतून मिळालेला सामाजिक असे दोन्ही आधार आहेत. या दोन्हींना ओळखून त्याविषयी पुरूषांना जागं करत राहणं आणि हिंचेची धार कमी करत राहणं हे आपल्याला करावं लागणार आहे.

आजवर हे अनेकदा बोललं गेलं आहे की मुलांना विशेष वागणूक देऊन वाढवणं हे त्यांच्यासाठी आणि समाजासाठी घातक ठरत आलं आहे. त्यामुळे पहिला धडा म्हणून तो आपण लक्षात ठेवायला हवाच. सर्वसाधारणपणे पाहता असं दिसतं की पुरूषामध्ये लैंगिक इच्छा ही स्त्रीपेक्षा जास्त प्रमाणात आपला अंमल गाजवत असते. स्त्री ही 'प्राप्त करण्याची गोष्ट' आहे हे पुरूषाच्या मनोवृत्तीत त्याच्याही नकळत आकार घेत असतं. यात जसा जैविक ऊर्मींचा हात आहे तसाच सामाजिक घडणीचाही हात आहे. त्यामुळे पुरूषाला पारंपरिक पौरूषाच्या कल्पनांपासून जाणीवपूर्वक दूर नेणं हा त्याच्यातील जैविक उर्मीला वळण देण्याच्या प्रयत्नातला एक महत्त्वाचा भाग आहे. सामाजिक विषमता आणि त्यातून स्त्री पुरूष संबंधांवर होणारे परिणाम हा एक विस्तृत आणि वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. त्यावर व्यक्तिशः कुणाला काय आणि किती करता येईल हा एक प्रश्नच आहे. त्यामुळे तो मुद्दा बाजूला ठेवला तर आपल्याला आपल्या नियंत्रणाच्या कक्षेत तरी संवेदनशील, सजग आणि पुरूष असण्याच्या अहंकाराच्या ओझ्यापासून मुक्त असलेला 'माणूस' घडवता येईल का हा विचार आपण सर्वांनी करावा. आपण मुलाला केवळ तो मुलगा आहे म्हणून स्वयंपाकघरातील कामातून सूट देतो का हे तपासण्यापासून त्याचं लैंगिक व मानसिक स्वास्थ्य कसं आहे हे चाचपून बघण्यापर्यंत अनेक गोष्टींचा यात अंतर्भाव होऊ शकतो. अशा गोष्टी ओळखून आपण त्यावर काम सुरू केलं तर ते आपल्या मुलींना आपणच निर्माण केलेल्या या समाजात सुरक्षित वाटण्याच्या दिशेने पडलेलं एक आश्वासक पाऊल ठरेल! 

- दिव्य मराठी 'मधुरिमा' (१७ डिसेंबर २०१९)

Sunday, December 8, 2019

वास्तवाचा दाह, वास्तवाचं आकलन

'बलात्कार' या विषयावर काही लिहायचं, बोलायचं बाकी आहे का हा एक आणि तसं केल्याने काही फरक पडणार आहे का हा दुसरा, असे दोन प्रश्न मनात येतात. ते काहीशा हतबलतेने आलेले प्रश्न आहेत. आपल्या - होमो सेपियन्सच्या - जगण्यात आपण इथवर आलो, नेत्रदीपक प्रगती केली हे अचंबित करत असताना त्या जाणिवेच्या तळातून 'आपण इथवर येऊन चूक केली का?' असा एक विरुद्ध, अस्तित्ववादी प्रश्न डोकं वर काढतो. हा प्रश्न पडायला कारण ठरेल अशा घटना आजूबाजूला घडत असतात. आपणच निर्माण केलेल्या वास्तवाच्या दुखऱ्या बाजू आपल्या 'सिव्हिलाइज्ड' जगण्यावर धडका देत असतात. भौतिक अर्थाने आपलं जगणं पुष्कळ सुखकर झालं आहे हे खरं आहे. आपण तुलनेने पुष्कळ सुरक्षित जीवन जगतो आहोत आणि जीवन सुरक्षित झाल्यावर सुरू झालेल्या सांस्कृतिक प्रवाहाला आपण जगण्याचा भाग बनवलं आहे. परंतु कला-संस्कृतीबरोबर राजकारण-शिक्षण-धर्म-तत्त्वज्ञान-नीती या आणि अशा इतर वर्तुळांमधून आपलं जगणं फिरत असताना खाडकन मुस्कटात मारल्यासारखी एखादी घटना घडते आणि आपण क्षणभर सुन्न होतो. यातला आणखी एक सूक्ष्म भाग असा की शास्त्रीयदृष्ट्या एक - म्हणजे होमो सेपियन - आणि सामाजिकदृष्ट्या शेकडो तुकड्यात विभागलल्या गेलेल्या आपल्यामधील कोण, कधी, कशाने सुन्न होतं हाही एक अभ्यासाचा विषय आहे आणि तो मनुष्य या एका प्रजातीचं शतभंग स्वरूप आपल्यासमोर ठेवतो. 

हैदराबाद येथील प्रियांका रेड्डी या व्यवसायाने पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या सव्वीस वर्षांच्या तरूणीवर गेल्या आठवड्यात सामूहिक बलात्कार झाला आणि बलात्काऱ्यांनी तिचा खून करून तिचा मृतदेह जाळून टाकला. त्याच दिवशी रांचीमध्ये विधी शाखेच्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आणि तमिळनाडूतील कांचीपुरम येथे रोजा नावाच्या एका वीस वर्षाच्या मुलीच्या हत्येची घटना उघडकीस आली. स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या या घटनांमधील सातत्य नवीन नाही. गेल्या काही वर्षातली अनेक घटनांची यादी आपल्यासमोर आहे. खैरलांजी, दिल्ली, कोपर्डी, कठुआ, उन्नाव ही काही ठळक नावं. अशा घटनांनंतर संतापाची लाट उसळणं, त्यातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येणं हे समजण्याजोगं आहे. असं होणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. विविध सामाजिक प्रश्नांवर लोकांकडून उत्स्फूर्तपणे आंदोलन होत राहणं हे आश्वासक आहे. मात्र त्याचवेळी या सगळ्या भीषण वास्तवाच्या पोटात नक्की काय आहे आणि जे आहे ते का आहे, त्याचं काय करायचं या प्रश्नाला आपण सामोरं गेलं पाहिजे. 

बलात्कारासारख्या घटनेचे आरंभ बिंदू वेगवेगळे असू शकतात. अनियंत्रित किंवा विकृत लैंगिक इच्छा, लैंगिक उपासमार, पुरूषसत्ताक व्यवस्थेत घडलेल्या मानसिकतेतून निपजलेला स्त्रीबद्दलचा दूषित दृष्टीकोन, गुन्हेगारी पर्यावरणात वाढल्याने घडलेली आणि ज्याला समाज 'गुन्हा' म्हणतो त्याला गुन्हा न मानण्याची मानसिकता, कधी सेंद्रीयपणे तर कधी सामाजिक पर्यावरणामुळे घडलेली हिंसक वृत्ती अशा विविध सुट्या कारणांपैकी काहींच्या / सर्वांच्या एकत्रीकरणामुळे घडलेलं पुरूषाचं मानस बलात्काराच्या मुळाशी आहे. इथे आपण एक मुद्दा लक्षात घेऊया. 'सामान्यीकरण' हा सत्यशोधनाचा आणि त्यामुळे होणाऱ्या ज्ञानाचा शत्रू आहे. 'स्त्री अशी असते', 'पुरूष असा असतो' अशी विधानं किंवा या गृहीतकांवर आधारलेलं चित्रण ललित लेखनात करायला हरकत नाही, पण सामाजिक संशोधनात ते होऊ नये. दुसऱ्या बाजूने हेही खरं आहे की स्त्रीविशिष्ट आणि पुरूषविशिष्ट असे काही गुणधर्म आहेत. ते जैविक आणि सामाजिक अशा दोन्ही प्रभावांमुळे तयार होत असतात. एखाद्या विशिष्ट घटनेचं विश्लेषण करताना त्यामागे हे गुण कार्यरत होते का हे तपासण्याची काळजी मात्र घ्यायला हवी. बलात्काराच्या गुन्ह्यांमागे जे पुरूषी मानस आहे ते तसं का घडत गेलं आहे याचा विचार केल्याशिवाय त्यावर उपाय करणं शक्य होणार नाही आणि परिणामी बलात्कार थांबणारही नाहीत. 

आपण जेव्हा 'का?' हा प्रश्न सतत विचारतो तेव्हा आपण मुळापाशी जाऊ लागतो. बलात्काराचे गुन्हे थांबत नाहीत हे वास्तव या प्रश्नाच्या मुळापाशी आवश्यकतेइतकं काम झालेलं नाही या दुसऱ्या वास्तवाची साक्ष देतं. एकीकडे मूल्याधारित विचार रूजवण्यासाठी प्रबोधनाच्या अंगाने काम होत राहणं आणि दुसरीकडे व्यवस्थेच्या पातळीवर कायदा, सुरक्षेचे विविध उपाय या अंगाने काम होत राहणं आवश्यक आहे. (प्रबोधनाची चळवळ आणि प्रशासन दोन्हीकडून दोन्ही अंगाने कामं होऊ शकतातच). परंतु समाजाच्या विषम रचनेचं काय? पराकोटीची आर्थिक विषमता असताना, त्या विषमतेमुळे लोकांचं जगणं, त्यांचे विचार प्रभावित होत असताना मूल्यविचारांबाबत सगळेजण एकाच पातळीवर यावेत ही अपेक्षा फोलच ठरणार. जगण्याकरताच जर लढाई करायला लागत असेल तर मूल्यांचं महत्त्व कमीच होत जातं. याचा अर्थ मूल्यविचार महत्त्वाचा नाही असं अजिबातच नाही, पण त्याच्या प्रसाराला मर्यादा आहेत, तो विचार उद्ध्वस्त करणाऱ्या गोष्टी आजूबाजूला घडणार याची मानसिक तयारी असणं आवश्यक आहे. मूल्यविचार आणि वास्तवाचं स्वरूप यांच्यातला झगडा कमी व्हायचा असेल तर मूल्यविचारांचा निव्वळ पुरस्कार करून चालणार नाही. त्याकरता वास्तवाच्या डोहात उतरावं लागेल. बलात्काराच्या बऱ्याचशा घटनांमधील गुन्हेगारांची सामाजिक -शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर हे लक्षात येईल. समाजाच्या या 'अंडरबेली'पर्यंत आपण -  बुद्धिवंत आणि विचारी लोक - पोचलेलो नाही. याला अपवाद अर्थातच असतील. शिवाय यात व्यावहारिक अडचणी असू शकतील. इतरही कारणं असतील. पण जिथे काम होणं गरजेचं आहे तिथे ते होत नसेल तर आहे त्या चित्रात फारसा बदल होणार नाही. एका बाजूला लेख लिहिले जातील, चर्चा होतील, मतं व्यक्त केली जातील आणि काही दिवसांनी पुन्हा बलात्काराची बातमी येईल. 

हा निराशावाद नाही. पण यात थोडी हताशा जरूर आहे. आपण समग्रपणे गोष्टी समजून घ्यायला समाज म्हणून कमी पडतोय या जाणिवेची रूखरूख आहे. यादसंर्भात 'लैंगिकता आणि पुरूषाची प्रकृती' या एका गोष्टीबाबत आपण आपलं आकलन जर वाढवलं तर या विषयाकडे बघण्याची एक दृष्टी मिळेल आणि आपला विचार योग्य दिशेने जाईल असं वाटतं. 

इंग्लिशमध्ये 'मेल इरेक्शन हॅज नो कॉन्शन्स' असा एक वाक्प्रयोग आहे. इथे लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट ही की कॉन्शन्स नसणं हे योग्य आहे असं इथे म्हणायचं नाही. 'कॉन्शन्स नसतो' ही वस्तुस्थिती फक्त सांगायची आहे. पुरूषांची लैंगिक इच्छा चाळवली जाण्याचे अनेक प्रकार विविध माध्यमांमधून उपलब्ध असले तरी पुरूषाच्या लैंगिक मनोविश्वाचं स्वरूप काय आहे याचा फारसा अभ्यास होताना दिसत नाही. (स्त्रीच्या लैंगिक मनोविश्वाचं स्वरूप काय आहे यावरही अभ्यास होत नाही. पुरूषाचा उल्लेख करण्याचं साधं कारण हे की त्याची लैंगिक इच्छा धोकादायक वळणं घेते हे अनेक वेळा दिसलं आहे.) इरेक्शन असलेला, येऊ घातलेला पुरूष त्याच्या 'नॉर्मल' रूपाहून वेगळं रूप धारण करू शकतो. पुरूषाची लैंगिक इच्छा ही 'इंसर्टिव्ह' स्वरूपाची असते तर स्त्रीची 'रिसेप्टिव्ह' स्वरूपाची असते. पुरूषाला 'आतलं बाहेर' टाकायचं असतं आणि स्त्रीला 'बाहेरचं आत' घ्यायचं असतं. स्त्रीदेखील लैंगिकदृष्ट्या अतृप्त असूच शकते. पण त्यामुळे ती हिंसक होताना दिसत नाही. पुरूषाबाबत हा 'फोर्स' फार मोठ्या प्रमाणावर काम करतो आणि प्रसंगी त्याच्या विवेकालाही खाऊन टाकतो याच्या मुळाशी लैंगिक संबंधांमधून प्रजोत्पादन होतं हे कारण आहे. तो 'फोर्स' इतक्या ताकदीचा आहे कारण आपण तांत्रिकदृष्ट्या प्रचंड प्रगती केलेली असली तरी आपण प्रजोत्पादन अजूनही लैंगिक संबंधांतूनच करतो आहोत. त्याला अनुसरून स्त्रीचं व पुरूषाचं जे मानस घडलं आहे, जी वृत्ती घडली आहे त्यात अद्याप मोठा बदल झालेला नाही. स्त्रीमध्ये तिचं बीज मासिक पाळीद्वारे बाहेर पडतं तर पुरूषामध्ये ते वीर्यस्खलनाद्वारे बाहेर पडतं. पुरूषबीजाचा संयोग स्रीबीजाशी होणार नसला तरी त्याला शरीराबाहेर पडावंच लागतं. सुरूवातीला पाहिलं त्याप्रमाणे पुरूषाच्या मनात बलात्काराच्या आरंभ बिंदूंचं जे मिश्रण कार्यरत असतं त्यात हा एक जैविक भाग कार्यरत असतो. 

पण म्हणजे मग जैविक प्रेरणा म्हणून पुरूषांना कायम सूट द्यायची का? अजिबात नाही. पण ही जैविक प्रेरणा आहे याची जाणीव त्यांना आणि स्त्रियांना करून द्यायची. माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की लैंगिक इच्छेबाबत, त्यातून येणाऱ्या अवघडलेपणाबाबत नुसतं तोंडाने बोललं तरी तो ताण हलका व्हायला मदत होते. ती इच्छा 'डायव्हर्ट' करण्याचे मार्ग शोधता येतात. लोकसत्ता 'चतुरंग'मधील २०१८ सालच्या माझ्या सदरातील एका लेखात मी पुरूषांसाठी 'सेक्स ऑडिट' करावं असं सुचवलं होतं. त्यावर खरोखर विचार व्हावा. बलात्काराचा विचार करताना 'एक अत्यंत आदिम, सहज क्रिया - ज्यात खरं तर अगदी सौम्य स्वरूपाची हिंसाही अंतर्भूत असू शकते - ती इतक्या टोकाच्या हिंसकतेकडे जाते आहे याचा अर्थ पुरूषांच्या मनात आणि आपल्या सामाजिक रचनेत काहीतरी मोठी गडबड होतेय का' हा विचार आपण केला तर आपल्याला काही उत्तरं मिळू शकतील. इथे आपल्याला पुरूषाची लैंगिकता, पुरूषसत्ताक व्यवस्थेने घडवलेली त्याची वर्चस्ववादी वृत्ती, त्यातून स्त्रीकडे 'माणूस' म्हणून न पाहता निव्वळ 'माझ्या इच्छापूर्तीचं साधन' म्हणून पाहण्याची लागलेली सवय, परिस्थितीजन्य कारणं या सगळ्याचा सुटा सुटा आणि एकत्रित दोन्ही प्रकारे विचार करायला हवा. बलात्कारांच्या अनेक केसेस समोर घेऊन त्यामागील नेमक्या कारणांचा सामाजिक संशोधनाच्या दृष्टीने अभ्यास करायला हवा. समाजातील पुरूषांच्या कोणत्या 'सेगमेंट'वर काम करण्याची जास्त गरज आहे हे शोधायला हवं. पुरूषांच्या वर्तनाचे तपशील, त्यातील वीक पॉईंट्स समजून घ्यायला हवेत. पुरूषांनी त्यांच्या लैंगिक मनोविश्वाला पोर्नोग्राफी, अचकट-विचकट विनोद, स्त्रीचं वस्तूकरण यात बंदिस्त न करता हे मनोविश्व सार्वजनिक चर्चाविश्वाचा भाग व्हायला हवं. 

बलात्काराच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे सार्वजनिक चर्चाविश्वात 'स्त्री विरुद्ध पुरूष' असं एक चित्र उभं राहिल्यासारखं दिसतं. अर्थात हे चित्र केवळ याच संदर्भात उभं राहतं असंही नाही. स्त्रीवादी सिद्धांतनातून पुरूषसत्ताक व्यवस्थेची जी चिकित्सा झाली आहे आणि पुरूषांसमोर जो आरसा धरला गेला आहे त्यातून दिसणारं आपलं रूप मान्य न करण्याच्या पुरूषांच्या अहंकार प्रेरित वर्तनातूनही हा संघर्ष उभा राहतो आहे. दुसऱ्या बाजूने पाहता स्त्रीवादी सिद्धांतनाचं उपयोजन स्त्री-पुरूष संबंधातील प्रत्येक आयामाला लावण्याच्या आग्रहातूनही हे होत आहे. खरं तर वैचारिक संघर्षातून सामाजिक आकलन अधिक नेमकं होत जाणं अपेक्षित आहे, पण तसं न होता शत्रुभावी विचार प्रबळ होताना दिसतो आणि ते धोक्याचं आहे. 

विविध सामाजिक समस्या आपल्यासमोर आपल्या 'प्रगत मेंदू'ला आव्हान देत उभ्या असतात. आपला देश एकाच वेळी अनेक शतकांमध्ये जगत असल्याने इथल्या सामाजिक प्रश्नांचं स्वरूप अधिक गुंतागुंतीचं आहे. ते समजून घेताना एकांगी विचार करण्याचं टाळणं, संख्याशास्त्रीय माहितीचा आधार घेणं, सरसकटीकरण न करता 'स्पेसिफ़िसिटी' लक्षात घेणं आणि कारणांच्या मुळाशी जाण्यासाठी 'फिल्ड'वर उतरणं याला पर्याय नाही. बलात्काराबाबत बोलायचं झालं तर भारतीय पुरूष हा भारतीय स्त्रीचा ऐतिहासिक गुन्हेगार आहे यात शंकाच नाही. परंतु त्याला गुन्हेगार राहू न देण्यासाठी आजच्या भारतीय स्त्रीने 'पुरूष प्रबोधना'च्या प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवायला हवा. ही तिला केलेली विनंती आहे. तिच्या सहभागाशिवाय 'पुरूषांचं सक्षमीकरणा'ला प्रबोधनाच्या चळवळीच्या कार्यक्रमपत्रिकेत प्रमुख स्थान मिळणार नाही!    

- लोकसत्ता 'लोकरंग' (८ डिसेंबर २०१९)