Tuesday, October 10, 2017

पाटी कोरी करणाऱ्या कविता

माणसाचा  इतिहास असंख्य वळणं घेत घेत पुढे गेलेला आहे. या संपूर्ण प्रवासात काही वळणं अशी आहेत की त्यांचं विश्लेषण करताना मती कुंठित होते. भौतिक वा जैविक विज्ञानाशी संबंधित विषयांनाच नव्हे तर भौतिक-जैविक प्रेरणांचा परिपाक म्हणून उभ्या राहिलेल्या सामाजिक क्षेत्राला, व्यक्तींच्या परस्परसंबंधांनादेखील हे लागू होतं. याचं एक मुख्य कारण हेच की मनुष्य म्हणून आपण प्रचंड भौतिक प्रगती केलेली असली तरी आपल्यातला 'माणूस' हा आजदेखील आदिम भावनांचा गुलाम आहे. आपण अजूनही त्या अर्थाने 'प्रगत' नाही आणि कधीकधी तर लाज वाटावी इतके अप्रगत आहोत. 

पृथ्वीचा फोटो काढला चंद्रावरून 
तर खूप डाग दिसतील 
ते आम्ही नाहीत 
तुम्ही आहात!

चिन्नाक्का या वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रीने लिहिलेली ही छोटी कविता आहे. या ओळी वाचल्यावर मनात पहिल्यांदा समाधान आणि नंतर उद्वेग अशा भावना जाग्या झाल्या. चिन्नाक्काप्रमाणेच शांता, चंद्रिका, गुलाब आणि प्रेमला यांच्याही कविता आहेत. या कविता निराश करतात, स्वतःतल्या 'इंपोटंट इंटलेक्च्युअल'ची जाणीव नव्याने करून देतात आणि एक 'आवरणाखालचं समाधान' अशाकरता देतात की या स्त्रियांनी त्यांच्या वाटण्याला, त्यांच्या अनुभवांना अतिशय प्रभावीपणे मोकळी वाट करून दिली आहे. 

या कवितांमधला उदगार संमिश्र आहे. तो कधी आतून तुटलेपणाचा आहे, कधी बेगडी संस्कृतीच्या कानफटात मारणाऱ्या उद्रेकाचा आहे, कधी तटस्थपणाचा आहे, कधी समजुतीचा आहे. 'आम्ही कपडे पाहतो, तुम्ही कातडी पाहता. इतकाच फरक' या तीन ओळीत चिन्नाक्का तटस्थपणे जे बोलते ती नुसती कविता नसून सामाजिक-आर्थिंक भाष्य आहे. चंद्रिकाच्या 'आधी प्रेत म्हणून जन्मायचं' या कवितेतील आक्रोश पुरूषांना सुन्न करणारा आहे. पण हीच कवयित्री पुढच्या एका कवितेत 'त्यांच्याकडे थोडे पैसे असतात आणि एक उपाशी लिंग असतंय, मनात फक्त नाईलाज असतोय' असं म्हणते आणि कवितेचा शेवट 'ते आलेच नसते आमच्याकडे पैसे, लिंग आणि नाईलाज घेऊन तर आम्हीही इथं दिसलो नसतो' असं लिहून करते तेव्हा पुरूषाविषयीची तिची करूणा दिसते. चंद्रिकाच्या कविता लक्षवेधी वाटतात ते या कवितांमधल्या विचार-भावनांच्या जिवंतपणामुळे. त्यातली तीव्रता असह्य व्हाही इतकी जिवंत आहे. याखेरीज या कवितांच्या कवितापणाला वास्तवाच्या काहिलीबरोबर प्रतिभेची विलक्षण 'झळ' बसल्याचं जाणवतं. ही अशी खोलात बुडी मारणारी संवेदना आणि अशी टोकदार अभिव्यक्ती हिने कुठून आणली हा प्रश्न कविता वाचल्यावर सतावत राहतो.     

गुलाब या कवयित्रीची पहिलीच कविता समाजव्यवस्थात्मक झटका देणारी आहे. गटार साफ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला नाकारताना 'तुला तुझी बायको जवळ करत नाही, मग मला नाक नाहीये का?' असा प्रश्न विचारते तेव्हा ती एकमेकांत अडकलेल्या भीषण वास्तवाच्या तुकड्यांचं दर्शन घडवते. सर्वच कवयित्रींच्या कविता माणूस म्हणून, समाज म्हणून, सरकार म्हणून, प्रशासन म्हणून आपल्या सर्व व्यवस्थांच्या थोबाडीत मारणाऱ्या आहेतच, पण गुलाबची ही कविता वास्तवाचं वैचित्र्य जोरकसपणे अधोरेखित करत आपल्याला अधिकच विचारात पाडते. 'मांसाहारीच असतात शाकाहारी म्हणवणारेदेखील' असा शेवट असणाऱ्या तिच्या दुसऱ्या कवितेविषयी काही लिहावं इतकी शक्ती बहुधा कुठल्याच लेखक-समीक्षकात नसावी. ती माझ्यातही नाही.    

प्रेमलाच्या कविताही याच जातकुळीतल्या आहेत. 'तुला लाज नाही वाटत का?' असा प्रश्न एका 'सभ्य' स्त्रीने विचारल्यावर तिने कवितेततून जे उत्तर दिलंय त्याचं वाचन घराघरातून आणि जाहीर कार्यक्रमातून व्हावं इतकं समर्पक आणि आरसा दाखवणारं आहे. ही कविता वाचल्यावर मी कवयित्रीला 'स्टँडिंग ओव्हेशन' दिलं! पुढच्या एका कवितेतदेखील तिने पुरुषांचं लग्नबंधन आणि वेश्येशी असणारं 'लैंगिक बंधन' यांची तुलना करत अखेरीस पुरूष व वेश्या या संबंधातील वैय्यर्थावर नेमकेपणानं बोट ठेवलं आहे आणि ते अतिशय टोकदार, अस्वस्थ करणारं आहे. 

शांताने लिहिलेल्या 'म्हाताऱ्या लिलू'च्या कवितांमधून लिलूच्या लहानपणीच्या पुरूषी अत्याचाराच्या आठवणींबरोबरच एक आनंदी आठवणही आहे. वेश्यांनी लिहिलेल्या या कवितांमधून दिसणाऱ्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर ही एक कविता किंचित सुखावते. अर्थातच याचं एक सरळ कारण म्हणजे म्हाताऱ्या लिलूला लहानपणी काही आनंदाचे क्षण वाट्याला आले होते हे वाचून आपला अपराधभाव काहीही कारण नसताना कमी होतो हे आहे. 

खरं तर प्रत्येक कवितेवर स्वतंत्रपणेही काही लिहिता येईल. कवितेचे म्हणून काही निकष लावून त्यांची चर्चाही करता येईल. पण असं करावंसं वाटत नाही. कविता कुणीही लिहिलेल्या असोत, कवितेची चिकित्सा साहित्यकृती म्हणूनच व्हावी असंही कुणी म्हणतील. पण मला तसं नाही वाटत. साहित्यकृती हा जर माणसाचा उद्गार असेल तर तो त्या माणसासकट पाहता यायला हवा. या दृष्टीकोनाचे काही तोटेही आहेत. अशा दृष्टीकोनामुळे साहित्यकृतीच्या स्वतःच्या 'परिणामकारकतेवर परिणाम' होण्याची शक्यता आहे. पण मला असं वाटतं की दलित साहित्य लिहिलं जाऊ लागलं तेव्हा जसं त्या साहित्याची चिकित्सा करण्याचे वेगळे निकष प्रस्थापित साहित्यदृष्टीला निर्माण करावे लागले, तसंच वेश्यांच्या साहित्यकृतीसाठीही निकष लावावे लागतील. आणि हा खरं तर पुढचा विचार आहे. आत्ता या दहा-पंधरा कवितांमधून जे समोर आलं आहे, ते अस्वस्थ करणारं वास्तव दर्शन तर आहेच, पण कविता म्हणूनही ते अस्सल आहे, प्रभावी आहे. त्यामुळे कविता असण्याच्या पातळीवरच्या सगळ्याच शंका इथे निकालात निघाल्या आहेत. 

या कविता आपला अपराधभाव जागवणाऱ्या आहेत का? नक्कीच आहेत. समाज म्हणून आपल्या पराजयाच्या कहाण्या जिथे जिथे दिसतात त्यातलं एक ठसठशीत स्थान वेश्यावस्ती हे आहे. त्यामुळे या कविता बेतशुद्ध सुखी संसारात बेतशुद्ध अडचणी व बेतशुद्ध दुःख भोगणाऱ्या तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्यांना आणि लैंगिक व भावनिक भुकेची योग्य व्यवस्था लावण्यात अपयशी ठरलेल्या आपल्या समाजव्यवस्थेला झडझडून हलवतात हे तर खरंच आहे. पण या अपराधभावाच्या जोडीनेच वेश्यांच्या जगण्यातील असहायता आणि पुरूषांची लैंगिक असहायता स्थळकाळाचे, संस्कृतीचे जे विविध संदर्भ घेऊन उभी राहते ते अवाक करणारं आहे. या वेश्यांमधली ही लखलखती कवयित्री डोळे दिपवणारी आहे. मुळात वेश्या आधीच समाजातील सगळ्यांना अवघड जागेवर नेऊन उभं करणारी व्यक्ती आहे. या जागेवर सगळ्याच विचारप्रवाहांना एकमेकांच्या नग्नतेचा सामना करावा लागतो. त्यामुळे एकीकडे हे आहेच. दुसरीकडे त्यांच्या कवितांमधून उद्रेकाखेरीज ज्या विविध जाणिवा ज्या समजुतीने प्रकट झाल्या आहेत ते आपल्याला अधिकच लाजवणारं आहे. 

आणि नेमक्या याच कारणासाठी या कविता अधिकाधिक लोकांनी वाचायला हव्यात. त्यातून काय निष्पन्न होईल असाही प्रश्न येईल कदाचित. पण काही निष्पन्न होण्यासाठी नव्हे तर दृष्टीकोनाला वेगळं टोक येण्यासाठी, गुंतागुंत समजण्यासाठी, डोळ्यांवरचे संस्कृतीचे आणि शालीनतेचे भरजरी पडदे हटवण्यासाठी, लग्न नामक संस्थेचे सदस्य होण्यासाठी जी अनाकलनीय धावपळ चाललेली असते त्याचा पुनर्विचार करण्यासाठी, माणसाच्या - विशेषतः पुरूषाच्या नग्नतेची जाणीव होण्यासाठी, लैंगिकतेच्या विज्ञानाला अधिष्ठान मिळवून देण्यासाठी आणि त्यातून उत्तरांची शोधप्रक्रिया सुरू होण्यासाठी या कविता वाचाव्यात. 'अधिक चांगल्या' जगाची अपेक्षा सगळेचजण करतात. पण या जगाच्या निर्मितीचा विचार करताना, त्याचा पाया रचताना कोणत्या मूलभूत मुद्द्यांकडे लक्ष द्यायला हवं, लैंगिक संबंधांची व्यवस्था हा मूल्यव्यवस्थेचा भाग का असायला हवा हे लक्षात येण्यासाठी या कविता वाचाव्यात. 

या कविता वाचणं म्हणजे आपली पाटी कोरी करणं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांच्या शिक्षणाची लवकरात लवकर सुरूवात होवो ही सदिच्छा!

- कविता महाजन यांनी वेश्यांनी लिहिलेल्या काही कवितांचा अनुवाद केला होता. तो 'खेळ' या अनियतकालिकाच्या २०१७ सालच्या एका अंकात प्रकाशित झाला होता. त्याविषयीचा त्याच अंकातील हा लेख. कविता महाजन यांनी अनुवाद केलेल्या कविता खाली देत आहे.   

चिन्नाक्का

१.

आता तो
हस्तमैथुन करतानाही
धापा टाकतो
इतकं दुबळं बनलंय
त्याचं हृदय
प्रेमामुळे, तुझ्यामुळे
तू असं त्याच्या तोंडावर
दार आपटून
बंद करायला नको होतंस!
– त्याचा दोस्त म्हणवणारा
म्हणाला असं
आवाज कनवाळू करत
धंद्याच्या टायमाला
मग ब्ल्यू फिल्म पाहून तर
जोराचा हार्टअटक येवून
मरायलाच पाह्यजे होत्ता तो
आजपस्तोर निदान
बाराशे वेळा –
मी हासून म्हणाले
आणि विचारलं
बसणार आह्येस का तू
आसतील पैसे तर?
शेपूट आणि कनवाळूपणा
दोन्ही गांडीत घालून घेऊन
पळत सुटला
त्याचा दोस्त म्हणवणारा.

२.

आम्ही कपडे पाहतो
तुम्ही कातडी पाहता
इतकाच फरक

३.

पृथ्वीचा फोटो काढला चंद्रावरून
तर खूप डाग दिसतील
ते आम्ही नाहीत
तुम्ही आहात!

४.

खूप घाण साचली आहे
सगळं जग नरक झालंय
आणि सगळे जीव
निव्वळ किडे

शांता

१.

म्हातारी लिलू म्हणते
किती लिंगं बघितली मी आयुष्यात
जितकी नसतील या प्रुथ्वीवरती शिवलिंगं
मंदिरांमध्ये
धाकट्या भावाची इवलुशी नुन्नी
पाळण्यातून शूचं धनुष्य करणारी
आणि सावत्र बापाचा वरवंट्यासारखा बुल्ला
एकाच वयात मला माहीत झाला…
म्हातारी लिलू म्हणते…

२.

म्हातारी लिलू म्हणते
इथं मुलगी जन्मू नये, धंद्याला लावतात
इथं मुलगा जन्मू नये, दल्ला बनतो
इथं हिजडा जन्मू नये, भीकेला लावतो गुरू
पण आपलं कोणीतरी पाह्यजे ना दुनियेत
म्हणून हा कुत्रा पाळला…
म्हातारी लिलू म्हणते…

३.

म्हातारी लिलू म्हणते
पाट्यावर वाटलेल्या उडदाचे वडे
किती चवदार लागतात
आणि घरचा नारळ खवलून त्यात
परसातल्या मिरच्या खुडून घालायच्या
चटणी वाटायची दुधाळ
भरपूर कढीपत्ता घातलेली खमंग फोडणी
आजकाल नाकाला सगळे जुने वासच येतात
लहानपणीचे…
म्हातारी लिलू म्हणते…

चंद्रिका

१.

आधी प्रेत म्हणून जन्मायचं
कपाळावर लाल मळवट
देहावर हिरवी चिंधी पांघरून
सरणावर झोपायचं
वाट पाहायची पेटवण्याची
धाडधाड आग भडकेल
ताडकन फुटेल कवटी
वाट पाहायची

पण ओततच नाही कोणी रॉकेल
म्हणून डोळे उघडून पाह्यलं
तर वेगळंच सरण
लाकडांसारखे रचलेले खाली
पुरुष
दोन्ही बाजूंना पुरुष वरती पुरुष
मग जळण्याची रीत रद्द
मरण्याची रीत रद्द
तरीपण जगायचं
तरीपण जळायचं
धगधग आग धकधक दिल
खिसा कर उलटा
मी कुलटा तर कुलटा

प्रेताची भीती वाटली नाही
की जित्याचीही भीती
वाटत नाही

२.

त्यांच्याकडे थोडे पैसे असतात
आणि एक उपाशी लिंग असतंय
मनात फक्त नाईलाज असतोय
बाकी काही नसतंय
ना दया ना प्रेम ना आकर्षण ना माणुसकी

आमच्याचसाठी नसतंय असंही नाहीये
घरच्यांसाठी जरी असतं
तरी ते इथं दिसले नसते
आणि ते आलेच नसते आमच्याकडे
पैसे, लिंग आणि नाईलाज घेऊन
तर आम्हीही इथं दिसलो नसतो.

३.

काल चार गिर्हाईकं आलती
आज अजून एकावरच अडलंय
तो एक उतरला
समोर साईबाबाच्या फोटोला
झाकलं होतं पँट लटकावून
ती अडकवली पायांत
चेन वर खेचून साईबाबाला
पुन्हा नमस्कार केला
आल्यावर केलताच दचकून
पँटमधून साईबाबाला दिसत असंल काय?
मी विचारलं तर जास्तीच दचकला
शर्ट तर काढलाच नव्हता
तो नीट इन केला
पँटच्या खिशातल्या पाकिटातनं पैसे दिले
साईबाबाला पैशांनी काही दिसलं नसंल काय?

४.

आधी एकेका रात्रीत सात-आठ गिर्हाईकं यायची
सिझनला तर दहा-बारा
वर्षभरात कमी झाली
आता तीन-चार
सिझनला एखादं जास्ती
येतात चढतात उतरतात जातात
मी कधी कोणाचं नाव विचारत नाही
कोणी कधी माझं नावगावफळफूल विचारत नाही

गावात एका रात्रीत सोळा चढले होते
रांग लावून
मग इकडं विकलं मला सोळातल्या पहिल्यानं
अजूनही येतो कधी फुकट चढायला
मुद्दाम सांगतो गावातल्या बातम्या
घरातल्यासुद्धा

गावात आमच्यांची तीन घरं होती
त्यांच्यांची बावीस
दोन मोठे रस्ते अठरा गल्ल्या तीन दुकानं
एक शाळा
सत्तावीस नक्षत्रांची नावं घडाघडा सांगितली
तेव्हा सर म्हणाले होते शाब्बास
गणितात पहिली आलते सातवीला. 

५.

काही दिसत नाही
मला कोणाचा चेहरा दिसत नाही
कोणाला माझा चेहरा दिसत नाही

एक गेला की दुसरा येण्याआधी
मी टॉवेलनं मांड्या पुसते नुसती
ओल दिसत नाही तरी असतेच

काही आठवत नाही सकाळी
न दिसलेलं
पैसेही आता अम्मा दारातच घेते
आधीच

मग पडायचं असतं उलथं नुसतं
आता वासही येत नाहीत नाकाला
ना जिभेला चव

सकाळी कपडे घालावे लागतात
हागायला खोलीतून बाहेर जायचं म्हणून
साडीच्या टिकल्या चमकतात

डोळे दुखतात उजेडानं.

गुलाब

१.

बेंदाड भूत
लागली लूत
अत्तरमारीचा
उप्योग नाहीय्ये

गटार साफ करून आला तर
बायको घेत नाही उरावर
आणि मला काय
नाहीये नाक?

उलथ इथून
बेंदाड भूत

२.

तो खोटारडा म्हणालेला
की तो शाकाहारी आहे
त्यानं खाल्ले माझे ओठ चावून चावून
पिलं माझ्या डोळ्यांतलं रक्त
उठलं नाही त्याचं तर
अपयशानं संतापून
मारल्या बुक्क्या माझ्या मांड्यांमध्ये
खुपसली बोटं कचाकचा
टोचवली घाणेरडी नखं
म्हणाला, तो कधीच
वापरत नाही कण्डोम
बायकोनेही नऊ वेळा पोट पाडलंय
तिच्या भोकाचं भगदाड झालंय
म्हणून इथं येतो
तर काहीच जमत नाही इथल्या
घाणीत
कर प्रयत्न आणि आताही नाही उठलं
तर जीव घेईन तुझा!

मांसाहारीच असतात
शाकाहारी म्हणवणारे देखील.

प्रेमला

१.

मी कुसळय कुसळ… तुझ्या डोळ्यात घुसीन
मी मुसळय मुसळ… तुझा इगो ठेचीन
उखळाचा रोल करून करून
मी बोअर झालेय
जमिनीत गाडून घेऊन एकाचा कोपऱ्यात
मी बोअर झालेय

मी जाईन पळून कांडणारे हात घेऊन
कांडणाऱ्या हातांना सुद्धा आता
बोअर झालंय

सगळी मुसळं मसणात जाळा
कांडणारीचा देह काळानिळा
कोणी द्यावा कोणाला हात
आपल्याच साळी आहेत उखळा
गुपचूप व्हायचं दाढेखालचा भात

तरी म्हणायचं कांडताना गाणं
मी कुसळय कुसळ…

२.

गुपचूप गरोदर राहीन
उकंड्यावर बाळंत व्हईन
गंजक्या ब्लेडने कापीन नाळ
पोरगा जल्मला तर भडवा बनवीन
पोरगी जल्मली तर धंद्याला लावीन
पळून गेली पोरं वस्तीतून
बनली कोणी मोठी सायेब
तरी तुझं नाव लावणार नाहीत
तुला नसेल पत्ता तुला नसेल मालुमात
आणि तुझा वंश धंदा करेल गंदा
हीच तुझी सजा
मजा मारून विसरून गेल्याची

३.

तुला लाज नाही वाटत का? तिनं विचारलं
आणि झर्रकन मान फिरवली
आमच्यासारखी असती तर थुंकलीही असती
मी तिला नीट खालून वर बघितलं
मग वरून खाली बघितलं
बघितलं की लाजेनं बाईचं काय व्हतंय?

लाजत लाजत लग्न करायचं
लाजत लाजत कपडे घालायचे
लाजत लाजत कपडे काढायचे
लाजत लाजत पोट वाढवायचं
लाजत लाजत बाळंत व्हायचं
लाजत लाजत लेकराला पाजायचं
लाजत लेकीला लाजायला शिकवायचं
लाजत लाजत जेवायचं नवऱ्याच्या उष्ट्या ताटात
लाजत लाजत नोकरी करायची
लाजत लाजत सगळी कमाई घरात द्यायची
लाजत लाजत लपवायच्या खालेल्या शिव्या आणि मार
लाजत लाजत म्हातारं व्हायचं
लाजत लाजत दुखणं सोसायचं
लाजत लाजत मरून जायचं

मी म्हटलं तिला शेवटी
तुझा निर्लज्ज नवरा येतो माझ्याकडे
पण माझ्याऐवजी
त्याला विचारशील का जाब
की लाजशील अजून?

४.

मला सोडायचं तर कोर्टात
जावं नाही लागणार
मला सोडायचं तर पोटगी
द्यावी नाही लागणार
मला सोडायचं तर दु:ख नाही
मुलंबाळं दुरावल्याचं
मला सोडायचं तर अडणार नाही
घरसंसाराचा गाडा

मला सोडलं तर
वाचतील थोडे पैसे
खुश होईल लग्नाची बायको

फक्त मीच म्हणू शकते –
ना मी तुला धरलं होतं
ना तू मला धरलं होतं
मग सोडणार कोण कोणाला?
कोणाची सुटका होईल कोणापासून?
जाय जायचं तिकडं!


No comments:

Post a Comment