Tuesday, December 17, 2019

पुरूषातून 'माणूस' घडवण्याचा प्रश्न

आपलीच असं नव्हे तर जगभरातली आजवरची साधारण समाजव्यवस्था, या व्यवस्थेेने घडवलेलं समाजमानस आणि त्यातून उभे राहिलेले स्त्रियांचे प्रश्न यावर चर्चा होणं, त्यावर काम होणं, सामाजिक सुधारणा होणं, कायद्यात सुधारणा होणं ही प्रक्रिया सुरू होऊन बराच काळ लोटला असला तरी मुळापाशी अजून बरंच काम व्हायची गरज आहे याची साक्ष पटवणारे प्रसंग वरचेवर घडत असतात. बलात्कार व हिंसेच्या अमानुष घटनांनी देश हदरून जात असतानाच मेघना गुलजार या संवेदनशील दिग्दर्शकाच्या नव्या चित्रपटाच्या ट्रेलरने स्त्रीला केवळ ती स्त्री आहे म्हणून ज्या गोष्टींचा सामना करावा लागला आहे त्यातीलच एका, काहीशा विस्मृतीत गेलेल्या गोष्टीला उजाळा मिळाला आहे. ‘छपाक’ या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पडुकोण आपल्याला अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या तरूणीच्या भूमिकेत भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मी अग्रवाल या मुलीच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटातून लक्ष्मी अग्रवालवर झालेला अॅसिड हल्ला आणि तिचा पुढचा लढा आपल्याला दिसेलच, पण या विषयासंदर्भातील प्रमुख प्रश्न अर्थातच 'हे का होतं?' आणि 'हे कसं थांबवायचं?' हे आहेत.

सामाजिक गुन्ह्यांमागची कारणं शोधत आपण त्यांच्या मुळाशी जाऊ लागलो की आपल्याला आपल्याच समाजव्यवस्थेतील अनेक कमकुवत धागे दिसू लागतात. त्यामुळे प्रभावित झालेल्या माणसांतील विविधांगी गुणदोष दिसू लागतात. गुन्हेगार हा 'कारण' आहे की 'परिणाम' आहे हाही प्रश्न आपल्याला पडू लागतो. स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत ते पाहता आपण समाज म्हणून अजूनही स्त्रीच्या मानसिक,शारीरिक उर्मींना पूरक असा पुरूष घडवू शकलेलो नाही हे सिद्ध होतच आहे. अर्थात हे एक ढोबळ विधान आहे. पुरूषांमध्ये बदल झाले आहेत, होत आहेत. आज त्याबाबतचं चित्र आशादायक आहे. मात्र त्याचवेळी विविध स्तरातील पुरूषांसोबत विविध पातळ्यांवर , विविध पद्धतीने काम करणं गरजेचं आहे हेही आधोरेखित होतं आहे. स्त्री- पुरुष संबधाचा विचार करताना प्रेम, मैत्री, आकर्षण, लैंगिक इच्छा या भावभावनांचा अनेकविध छटा आणि त्यांचा या संबंधावरील परिणाम आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. आपल्याला हेही लक्षात घ्यावं लागतं की समाजाची घडी ज्याप्रकारे लागत गेली आहे आणि त्यातून ज्याप्रकारे विविध प्रकारच्या विषमतेला मूक मान्यता मिळत गेली आहे. त्यातून स्त्री-पुरूष संबंधावर मोठा परिणाम झाला आहे. स्त्री-पुरूष संबंध हे इतर मानवी संबंधांसारखेच 'द्वंद्वात्मक' आहेत आणि त्याला स्त्री पुरुषांमधल्या आदिम आकर्षणाची जोड आहे. दोन मित्रांमध्ये भांडण झालं की त्यांच्यात वादावादी होईल, कदाचित मारामारीही होईल. इतर वेगवेगळ्या नात्यांबाबत भांडण, मतभेद वेगवेगळी रूप धारणं करतील. स्त्री-पुरूष नात्यातही, म्हणजे रोमँटिक नात्यातही हे लागू होतं. मात्र रोमॅंटिक स्वरूपाच्या नात्यात किंवा त्या नात्याला सुरूवातदेखील व्हायच्या अगोदर स्वत:ला किंवा दुसऱ्याला उद्ध्वस्त करण्याइतपत टोकाचा विचार माणसाकडून का केला जातो हे समजून घेणं, त्यावर बोललं जाणं आवश्यक आहे.

यात माणूस म्हणजे प्रामुख्याने पुरूष अपेक्षित आहे, कारण एकतर्फी प्रेमातून एखाद्या मुलीला त्रास देणं, प्रेम नाकारलं गेल्यावर तिच्यावर हिंसक हल्ला करणं इथंपासून ते स्वत:चा देवदास करून घेऊन आपलं आयुष्य निराशेच्या गर्तेत लोटून देणं इथवरच्या सर्व प्रकारात पुरूषच अग्रेसर आहेत. यातून 'सामान्यत: पुरूष स्त्रीपेक्षा प्रेमाच्या बाबतील असमंजस व कमकुवत आहे' या विधानाला पुष्टी मिळते. आपल्याला नेमक्या याच मानसिकतेमागील कारणं शोधता यायला हवी आहेत.

स्त्री-पुरुष संबंधामध्ये प्रेम, आकर्षण ही भावना बऱ्याच गुंतागुंतीची आहे. या भावनांच्या मानसशास्त्रीय व जीवशास्त्रीय अंगान केलेल्या तपशीलवार विश्लेषणात जाणं आवश्यक आहेच कारण त्याशिवाय त्यांच संपूर्ण आकलन होणं शक्य नाही. (खरं तर आपण आपल्या प्रत्येकच भावनेचा अभ्यास करायला हवा कारण आपल्या भावनाच आपल्याकडून बरंच काही करून घेत असतात). इथे आपण एक अगदी छोटा प्रयत्न करून बघूया. 

स्त्री-पुरूषांबाबत लैंगिक आकर्षण हा एक आदिम 'फोर्स' आहे. निसर्गाला स्त्री-पुरूष जवळ यायला हवे आहेत कारण त्यातून पुनरूत्पादन होणार आहे. या आकर्षणाच्या वर, मानवी संस्कृतीच्या प्रवाहात जो एक सुंदर स्तर निर्माण झाला आहे तो प्रेमाचा आणि त्याच्या विविध छटांचा आहे. मला असं दिसतं की आज आपल्यासमोरचं आव्हान हे आहे की प्रेम, आकर्षण या संकल्पनांना त्यांच्या कमालीच्या ठोकळेबाज, एकांगी रूपातून बाहेर काढणं आणि त्यांचा अधिक प्रगल्भ, समावेशक अर्थ मुलामुलींच्या मनामध्ये रूजवणं.

प्रेम ही भावना निर्माण कशी होते? आपल्याला अमुक मुलींविषयी जे वाटतं ते प्रेम आहे म्हणजे काय आहे? तिला जर आपल्याविषयी काही वाटतं नसेल तर आपण तिथून मागे का फिरू शकत नाही? एका मुलीने आपल्याला नाही म्हटंले म्हणून आपण तिच्यावर अॅसिड फेकण्याइतके हिंसक का होतो? आपल्या आत असं काय आहे जे आपल्याला इतकं हिंसक बनवतं? हे व असे अनेक प्रश्न पुरूषांनी स्वत:ला विचारणं आणि समाजाने - प्रामुख्याने पालक, शिक्षक, मित्र आणि हितचिंतक यांनी - पुरूषांना त्याबाबत तपासत राहणं फार आवश्यक आहे. स्त्री-पुरूष संबधांना मिळालेलं हिंसेचे हे भयानक परिमाण आपल्याला सामूहिक प्रयत्नानेच नाहीसं करता येईल. मला असं दिसतं की त्यासाठी मुलांच्या वाढीच्या वयात त्यांच्या मानसिक स्वास्थाकडे सतत लक्ष देत राहणं गरजेचं आहे. माणसामध्ये हिंसेची बीज आहेतच. ती पुरूषांमध्ये अधिक प्रमाणात आहेत कारण आपल्या पृथ्वीवरील अस्तित्वाच्या लढाईच्या खूप पहिल्या टप्प्यापासून राज्यव्यवस्थेच्या, समाजव्यवस्थेच्या अलीकडील टप्प्यापर्यंत पुरूषातील आक्रमकता व वर्चस्ववादी वृत्ती यांनी कळीची भूमिका बजावली आहे. पुरूषामधील हिंसेला जैविक आणि समाजरचनेतून मिळालेला सामाजिक असे दोन्ही आधार आहेत. या दोन्हींना ओळखून त्याविषयी पुरूषांना जागं करत राहणं आणि हिंचेची धार कमी करत राहणं हे आपल्याला करावं लागणार आहे.

आजवर हे अनेकदा बोललं गेलं आहे की मुलांना विशेष वागणूक देऊन वाढवणं हे त्यांच्यासाठी आणि समाजासाठी घातक ठरत आलं आहे. त्यामुळे पहिला धडा म्हणून तो आपण लक्षात ठेवायला हवाच. सर्वसाधारणपणे पाहता असं दिसतं की पुरूषामध्ये लैंगिक इच्छा ही स्त्रीपेक्षा जास्त प्रमाणात आपला अंमल गाजवत असते. स्त्री ही 'प्राप्त करण्याची गोष्ट' आहे हे पुरूषाच्या मनोवृत्तीत त्याच्याही नकळत आकार घेत असतं. यात जसा जैविक ऊर्मींचा हात आहे तसाच सामाजिक घडणीचाही हात आहे. त्यामुळे पुरूषाला पारंपरिक पौरूषाच्या कल्पनांपासून जाणीवपूर्वक दूर नेणं हा त्याच्यातील जैविक उर्मीला वळण देण्याच्या प्रयत्नातला एक महत्त्वाचा भाग आहे. सामाजिक विषमता आणि त्यातून स्त्री पुरूष संबंधांवर होणारे परिणाम हा एक विस्तृत आणि वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. त्यावर व्यक्तिशः कुणाला काय आणि किती करता येईल हा एक प्रश्नच आहे. त्यामुळे तो मुद्दा बाजूला ठेवला तर आपल्याला आपल्या नियंत्रणाच्या कक्षेत तरी संवेदनशील, सजग आणि पुरूष असण्याच्या अहंकाराच्या ओझ्यापासून मुक्त असलेला 'माणूस' घडवता येईल का हा विचार आपण सर्वांनी करावा. आपण मुलाला केवळ तो मुलगा आहे म्हणून स्वयंपाकघरातील कामातून सूट देतो का हे तपासण्यापासून त्याचं लैंगिक व मानसिक स्वास्थ्य कसं आहे हे चाचपून बघण्यापर्यंत अनेक गोष्टींचा यात अंतर्भाव होऊ शकतो. अशा गोष्टी ओळखून आपण त्यावर काम सुरू केलं तर ते आपल्या मुलींना आपणच निर्माण केलेल्या या समाजात सुरक्षित वाटण्याच्या दिशेने पडलेलं एक आश्वासक पाऊल ठरेल! 

- दिव्य मराठी 'मधुरिमा' (१७ डिसेंबर २०१९)

No comments:

Post a Comment