Saturday, October 27, 2018

पॉलीॲमरी : तिघांची आनंदी गोष्ट

४ नोव्हेंबर २०१७ च्या चतुरंग पुरवणीत 'पॉलीॲमरी' या विषयावर मी एक लेख लिहिला होता. एकाहून अधिक व्यक्तींशी असणारे गंभीर प्रेमसंबंध आणि सर्व संबंधित व्यक्तींना त्याबाबतची स्पष्टता हा पॉलीॲमरीचा गाभा आहे. त्या लेखात संकल्पनात्मक मांडणी झाली होती. या लेखात 'अंमलबजावणी' विषयी विचार करू.  

बहुविध प्रेमसंबंध स्वीकारण्यासाठी प्रगल्भ मानसिकतेची आवश्यकता असते ते आपण आधीच्या लेखात पाहिलं आहे. आता असं गृहीत धरू की अशा नात्यांमध्ये काही व्यक्ती आहेत. तर त्यांनी हे पुढे कसं न्यायचं? इथे दोन शक्यता आहेत. जर सर्व संबंधित व्यक्ती एकमेकांचे नातेसंबंध स्वीकारत असतील तर प्रश्नच नाही. पण जर काहींना असे संबंध मान्य नसतील तर ते अडचणीचं होतं. आणि मग जे पॉलीॲमरस आहेत त्यांनी इतरजण तयार होईपर्यंत वाट पाहणं इष्ट ठरतं. आज आपण समाज म्हणून या संकल्पनेसाठी तयार नाही आहोत. त्यामुळे जे तयार आहेत त्यांना अस्तित्वात असलेले नातेसंबंध टिकवून नव्या नातेसंबंधात जायचं असेल तर त्यांच्याकडे वाट पाहण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. अन्यथा एक नातं थांबवून दुसऱ्या नात्यात जायचा निर्णय घेता येतोच, पण मग ते मोनोगॅमस होतं. 

या व्यवस्थेचा स्वीकार करण्यातली प्रमुख अडचण प्रेमातील पझेसिव्हनेस ही आहे. आणि तो कसा घालवायचा याकरता कुठलंही रेडिमेड उत्तर नाही. सतत बोलत राहून, एकत्र राहण्याचे प्रयोग करत राहून हा बदल होऊ शकतो. यात परिस्थितीच्या आवश्यकतेनुसार भावनिक व लैंगिक दोन्ही प्रयोग करता येतील. त्यावर प्रत्येकाने आपापल्या मानसिक तयारीनुसार विचार करावा व कृती करावी. आपल्या मानसिकतेत पझेसिव्हनेसची भावना खूप खोलवर रुजल्याने ती सहजासहजी बाजूला काढणं अवघड आहे. पझेसिव्हनेस (मालकी हक्क) आणि जेलसी (मत्सर) या दोन्ही भावना एकमेकींना समांतर चालत असतात. आहार, निद्रा, भय, मैथुन या आदिम जाणिवांचा विस्तार होऊनच राग, द्वेष, मत्सर, प्रेम या भावना निर्माण झाल्या आहेत. आपल्या मेंदूत जे जे काही निर्माण होतं त्याचा धागा आपल्या उत्क्रांतीच्या वाटचालीशी जोडलेला आहे. त्यात पुन्हा स्त्री आणि पुरूष असा फरकही आहे. त्यामुळे आपल्या भावनांमुळे विचलित न होता 'हे मला वाटत नाही तर माझ्या मेंदूतल्या न्यूरॉन्सना वाटतंय' असा विचार केला तर आपण आपल्या भावनांना चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. हाच धागा पकडून मालकी हक्क आणि मत्सर या भावनांवरही काम करता येऊ शकेल. दुसरं म्हणजे आपलं प्रेमाचं माणूस आधी 'स्वतंत्र माणूस' आहे हे मनात रूजवायचा प्रयत्न केल्यानेही मदत होईल.   

एक गोष्ट लक्षात घेऊया की व्यक्तींची बलस्थाने आणि कमकुवत स्थाने ही व्यक्तींनी एकत्र येऊन लावलेल्या व्यवस्थेचीही बल स्थाने आणि कमकुवत स्थाने असतात. त्यामुळे कोणत्याही व्यवस्थेला एकच एक ठरीव साचा असत नाही. हेच बहुविध नातेसंबंधांनाही लागू होतं. त्या त्या उदाहरणातील व्यक्तींच्या स्वभावानुसार, सामर्थ्य व कमकुवतपणानुसार त्या त्या उदाहरणातील व्यवस्थेच्या स्वरूपात फरक पडू शकेल. सर्वजण एकत्र राहत असतील तर ही व्यवस्था परिणामकारक ठरते. पण काही ठिकाणी एकत्र न राहताही ती व्यवस्था चांगली चालू शकते. त्यामुळे मुळात व्यवस्था लवचीक असणं चांगलं. (स्त्री-पुरूष संबंधांबाबत इथून पुढे लवचीक व्यवस्थाच परिणामकारक ठरतील असं एकूणात दिसतं.) व्यक्ती एकत्र राहिल्या तर घर चालवण्यासाठी जे करावं लागतं त्या सर्व कामांची विभागणी तर करावी लागेलच आणि प्रत्येक नात्याचं स्वरूप आणि त्यानुसार वेळेची विभागणी हेही करावं लागेल. व्यक्ती एकत्र राहत नसतील तर दैनंदिन कामांचा मुद्दा न येता वेळेच्या विभागणीचा मुद्दा फक्त येईल.   

व्यक्तींमधले संबंध निभावणं यात जशी व्यक्तींमधील प्रगल्भताच मुख्य भूमिका पार पाडते तेच मुलांबाबतही लागू होईल. मुलांसाठी जैविक आई-वडील अर्थातच अग्रस्थानी असतील आणि इतरजण दुय्य्म स्थानी - पण घरातील / नात्यातील सदस्य म्हणून असतील. यातली एक महत्त्वाची बाजू ही की लहानपणापासूनच नातेसंबंधांच्या अशा नव्या स्वरूपाची ओळख मुलांना झाली तर त्यांची वाढही या व्यवस्थेला पूरक होईल आणि प्रेमभावनेतील मुक्तता पहिल्यापासूनच अनुभवल्याने त्याची त्यांना मोठेपणी मदत होईल. 

अशा प्रकारच्या नात्याची कल्पना आसपासच्या लोकांना, नातलगांना द्यावी की न द्यावी या प्रश्नाचे उत्तरही एकसाची नाही. ज्यांना ही गोष्ट पचनी पडणं शक्य नाही त्यांना हे सांगावं की सांगू नये हा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. इथे प्रश्न नैतिकतेचा नाही. 'काही प्रामाणिक इच्छा आणि इतरांची अपुरी तयारी' असा हा संघर्ष आहे. त्यामुळे इथे काहीएक मध्यममार्ग काढावा लागेल. ही गोष्ट हळूहळू समजावूनही सांगता येईल. त्यासाठी उपलब्ध साहित्याचा आधार घेता येईल. गटचर्चा घेता येतील. आपल्या मनातील विविध भावनांबाबत आपली 'साक्षरता' (इमोशनल लिटरसी) कशी वाढेल यासाठी प्रयत्न करता येतील. माणसाचं एक सत्य असं आहे की तो प्रेमाचा भुकेला असतो. त्याला स्वतःचं एक माणूस हवं असतं. ज्यांना पॉलीॲमरी ही संकल्पना स्वीकारायला जड जाते त्यांना हा विश्वास मिळाला की ही प्रेमाची व्याप्ती वाढवणारी संकल्पना आहे, सर्वसमावेशक संकल्पना आहे, यात कुणा एकाला डावलण्याचा प्रश्नच येत नाही, तर त्यांची पावलं हळूहळू स्वीकृतीकडे पडू शकतात.  

एखादा नवा विचार आणि त्याअनुषंगाने नवीन व्यवस्था हा 'पॅराडाइम' (पॅटर्न, साचा) मधला बदल असतो. माणसाच्या इतिहासात वेगवेगळ्या टप्प्यांवर हे बदल घडलेलेच आहेत. कुटुंबव्यवस्थाही त्याला अपवाद नाही. पॉलीॲमरी हाही एक बदल आह. ही व्यवस्था सार्वत्रिक होईल किंवा होणारही नाही. झाली तर भविष्यात तिला कायदेशीर मान्यताही मिळू शकेल. आजचा मुद्दा इतकाच आहे की जर काही (मोजक्या) लोकांना काही वेगळं वाटत असेल तर त्याचा शोध घ्यायची, त्याबाबत प्रयोगशील असण्याची मुभा त्यांना असावी. अडचण अशी होते की पारंपरिक व्यवस्थेतील लोकांना त्या व्यवस्थेबाहेरचं काही दिसलं की ते त्यांना चुकीचं वाटतं. त्यांना 'वेगळं' वाटणं, स्वीकारता न येणं हे मान्यच आहे, पण 'चुकीचं' वाटत असेल तर अडचण आहे. समूहकेंद्री, संस्कृतीकेंद्री, धर्मकेंद्री विचारांनी अस्मितेचा अभिमान गौरवास्पद ठरवला आहे. त्याकरता प्रसंगी हिंसेलाही मूक संमती दिली आहे. पण प्रेमासारख्या मुक्तिदायी भावनेला मात्र बंदिस्त केलं गेलं आहे. तिथे काही वेगळं करायला बंदी आहे. (इथे मला 'प्रेमाचं होऊ द्या ना जागतिकीकरण' असं म्हणणारे कवी अरूण काळे आठवले!) मला असं वाटतं की बहुविध नातेसंबंधांची चर्चा करताना प्रेमभावनेमधील मोकळिकीचा मुद्दा आज जे प्रौढ आहेत, ज्यांची काहीएक मानसिकता तयार झाली आहे त्यांच्यापेक्षा जे तरुण, टीनएजर्स आहेत, जे नव्याने गोष्टी समजून घेत आहेत त्यांच्यापर्यंत पोचवणं गरजेचं आहे. लहान मुलांना वाढवतानाही आपण आपल्याला जे अप्रिय वाटतं त्याविषयी बोलायचं टाळतो. तिथेही जर आपण बदल केला आणि विविध विषयांना नेहमीच मूल्यात्मक दर्जात किंवा मूल्यनिर्णयात न गुंतवता 'जे आहे ते' मांडायचा प्रयत्न केला तर मुलंही कप्पेबंद विचार करणार नाहीत. बदलाच्या मानसिकतेचा संबंध वयाशी असतोच असं नाही हे खरं आहे, पण जर पाटी कोरी असेल तर नवीन चित्र काढायला अधिक अवकाश मिळतो हेही खरंच!

No comments:

Post a Comment