Wednesday, October 10, 2018

आपलं कामजीवन 

ओट्यावर वाळत घातलेल्या भांड्यांना पाय फुटून ती निमूटपणे आपापल्या जागेवर जाऊन बसली असती तर आयुष्यात सुखाचे काही प्रहर अजून आले असते असं ज्या क्षणी वाटतं तो क्षण म्हणजे आपल्या कामजीवनाचा उत्कर्षबिंदू असतो. आपलं कामजीवन हे आपल्या जड-चेतन विश्वाइतकंच बहुरंगी, बहुढंगी आहे. रोज रात्री दाराबाहेरच्या कडीला दुधाची पिशवी अडकवण्यापासून ते दहाएक वर्षांतून एकदा घराला रंग देण्यापर्यंत कामजीवनाची अद्भुत रूपं फक्त चकितच करणारी नाहीत, तर मानवाविषयी करुणा उत्पन्न करणारी आहेत.

भाई देशपांडे एकदा म्हणाले होते, "सुनीताला कामं दिसतात. मला दिसतच नाहीत." अशा थोर भाग्याच्या पुरुषांपैकी आपण नाही याची जाणीव होऊन, फेमिनिझमचं बाळकडू घेत राहिल्यानं माझं कामजीवन समृद्ध झालं आहे हे आरंभीच नमूद करतो. घर हे मुळात राहण्यापेक्षा काम करण्याची जागा आहे. जेरड डायमंडपासून युव्हाल नोआ हरारीपर्यंत अनेकांनी शेतीनं माणसाची प्रमुख गोची केली असं लिहिलं आहे. माझा मुद्दा त्याहूनही खोलातला आहे. शेतीनंच नव्हे तर काहीतरी करत राहण्याच्या वृत्तीनं माणसाची गोची केली आहे. मग ती शेती असो किंवा अन्य काही असो. जीव वाचला, पोट भरलं, झोपायची सोय झाली की गप राहायचं सोडून 'अजून काहीतरी करू' असं ज्याक्षणी माणसाला वाटलं तो क्षण माणसाची ऐतिहासिकदृष्ट्या लक्षणीय गोची करणारा होता. सारखं काहीतरी करणं हा माणसाला मिळालेला शाप आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण एक काम दुसरी कामं जन्माला घालतं. शिवाय त्यानं इतरांची कामलालसा वाढते, ते वेगळंच. साहित्याचंच उदाहरण घेऊ. (इतकं निरुपद्रवी दुसरं कोण आहे!) एके काळी मोजकेच दिवाळी अंक निघत असत. ती संख्या आता शे-दोनशेच्या घरात आहे असं ऐकतो. शिवाय ऑनलाइन अंकही प्रसिद्ध होऊ लागले. एवढं होऊन सांस्कृतिक सुस्कारे कमी झाले का? तर नाही. खरं तर सांस्कृतिक उपक्रम जेवढे वाढतील तेवढी संस्कृती अधिकाधिक धोक्यात येत जाते. जेव्हा काही लिहिलं जात नव्हतं तेव्हा वास्तविक काही अडत नव्हतं. साहित्य आलं, आणि पाठोपाठ साहित्यव्यवहारही आला. पुढे मग अर्थातच व्यवहार साहित्यावर भारी पडू लागला आणि संमेलनं, चर्चासत्रं, व्याख्यानं सुरू होऊन, जे लिहिलं आहे ते का लिहिलं आहे, किंवा जे लिहिलंच नाही ते का लिहिलं नाही, याविषयी चर्चा झडू लागल्या. आजमितीस मराठीत जितकं साहित्य निर्माण होतं त्याहूनही जास्त चर्चा निर्माण होते. (यात फेसबुक धरलेलं नाही. ते धरलं तर कहरच होईल.) मला तर असंही वाटतं की कालांतरानं चर्चक-समीक्षकच सेंटर कोर्टात उतरून एकमेकांशी मॅच खेळतील आणि लेखक चेंडू उचलून देण्यापुरते राहतील.

काहीही न करण्यात जो आनंद आहे त्याला माणूस पारखा झाल्यानं माणसाचं जीवन विस्कळीत झालं आहे. रोज सकाळी सहस्रांच्या संख्येनं आवराआवरी करून, बूट चढवून कामाला जाणं आणि हे अनंत सकाळी करत राहणं हे प्रगतीचं नसून अधोगतीचं लक्षण आहे. खूप काम करून तर मधमाशासुद्धा आपलं जीवन व्यतीत करतात. काम खूप वाढवून ठेवणाऱ्या प्राण्याला प्रगत कसं काय म्हणायचं हा एक मोठाच प्रश्न आहे. कामं कमी कमी व्हायला हवीत. तर ती प्रगती. यंत्रानं कामं सोपी केली ही तर गेल्या दोन शतकातील सर्वांत मोठी थाप आहे. यंत्रानं काही केलं असेलच तर नवीन कामं निर्माण केली आहेत. माणूस चंद्रावर गेला याचं पुष्कळ कौतुक होतं. पण तो चंद्रावर गेल्यानं नक्की काय झालं याचं उत्तर हे कौतुक करणाऱ्यांपैकी कितीजण देऊ शकतील याची मला रास्त शंका आहे. एकूणच माणसाच्या काम करण्यामुळे तो रिकामपणाच्या आनंदाला कसा मुकला आणि त्याच्यातील परात्मभाव कसा वाढीस लागला ही एलिएनेशनची थिअरी समूळ विस्तारानं सांगणं आज गरजेचं झालं आहे.

या एलिएनेशनची सुरुवात घरापासूनच होते. रोज सकाळी एखाद्या सुखद, बेधुंद करणाऱ्या आठवणीनं (किंवा अजिबात कुठलीच आठवण वगैरे न येता) जाग न येता; पाण्याचा पंप चालू करायचा आहे या आठवणीने जाग येणं ही एक मन विषण्ण करणारी गोष्ट आहे. आणि ही नुसती सुरुवातच असते. पुढचा संपूर्ण दिवस म्हणजे एक न संपणारी कामसाखळी असते. आणि या साखळीतील कामांचे, उपकामांचे, त्यातून उद्भवणाऱ्या वैतागांचे, उपवैतागांचे इतके नमुने आणि कंगोरे आहेत की 'कामेची केला दीन किती नर' असं म्हणावंसं वाटतं. ओट्यावरची भांडी नुसती आपापल्या जागी ठेवली की झालं असं होत नाही. ओट्यावरचं पाणी पुसून घ्यायला लागतं. स्वयंपाक झाला की अन्न मिळतं हे ठीक, पण त्याबरोबरच बर्नरखालची तबकडी स्वच्छ करणं आणि शेगडीच्या मागच्या भिंतीवरील डाग पुसणं ही कामं वाढतात. विशेषतः भरतासाठी वांगं भाजताना ती तबकडी जी काय विद्रूप होते, त्याला तोड नाही. भाजी शिजली की झालं असं नसतं. उरलेली भाजी काढून ठेवावी लागते. उन्हाळयात चुकून भाजी फ्रिजच्या बाहेर राहिली तर संपलंच. कुकर लावणं हे वास्तविक किती सोपं काम आहे? पण त्यातही भात सांडला तर पाणीमिश्रित भातातलं पाणी वेगळं करून भात वेगळा करणं हे काम वाढतं. पोळ्या करणं हा तर फारच सेक्सी प्रकार आहे. एक तर कणीक नीट असावी लागते. ती असली आणि नीट मळली गेली तरी कधीकधी - फॉर सम अननोन रीझन - फुलके फुलायचं नावच घेत नाहीत. सगळं नीट असताना एखादा फटाका का फुटत नाही, हे जसं कळत नाही तसंच इथेही आहे. शिवाय पोळ्या लाटतानाही काही पोळ्या बहुधा केवळ निषेध म्हणून व्यवस्थित लाटून घेत नाहीत. आणि पोळ्या करून झाल्या की ओट्यावर सांडलेलं पीठ पुसून घेणं हा कार्यक्रम आहेच.

सिंक हा द्रौपदीच्या अक्षयपात्रासारखाच प्रकार आहे. फक्त ते पात्रांचं अक्षयपात्र आहे. सिंक पूर्ण रिकामं आहे, त्यात अगदी एकही चमचा नाही हे दृश्य बघायला मी, साहित्यसंमेलनात व्यासपीठावर एकही राजकारणी नाही हे दृश्य बघण्याइतकाच उत्सुक असतो. सिंक हे जसं पात्रांचं अक्षयपात्र आहे तसं बरणी हे पदार्थांचं कृष्णविवर आहे. त्यातून वस्तू बघता बघता नाहीशा होतात. म्हणजे तुम्ही यादी वगैरे करता, सगळ्या गोष्टी आणता. तूरडाळ शिल्लक आहे असा तुमचा दृढविश्वास असतो आणि नेमका दुसऱ्या दिवशी तुरीच्या डाळीनं बरणीचा तळ गाठल्याचं लक्षात येतं. अशा वेळी स्वतःवर चरफडण्यापेक्षा दुसरं काही करता येत नाही. बरेच दिवस झाले कुळथाचं पिठलं केलं नाही, म्हणून कुळथाच्या पिठल्याचे डोहाळे लागावेत तर कुळीथ पीठ आणावं लागणार आहे असा साक्षात्कार होतो. केव्हातरी पुलावाचा वगैरे बेत ठरतो. तुम्ही भाज्या आणून दिलेल्या असतात. चिरून ठेवलेल्या असतात. तांदूळ धुऊन ठेवलेले असतात. पुढचा भाग अर्धांगिनीवर सोपवून तुम्ही नेटफ्लिक्स उघडून बसता. वीसएक मिनिटं होतात न होतात तोच 'अरे, तमालपत्र राहिलंच की' हे कानी पडतं. मग फ्रॅंक अंडरवुड, वॉल्टर व्हाइट किंवा अशाच कुणा सिद्धपुरुषांच्या लीळा पाहण्याचं अर्धवट सोडून तमालपत्र आणण्यासाठी उठावं लागतं. दुकान फार लांब असतं असं नाही, पण व्यत्यय ही संख्यात्मक संकल्पना नसून गुणात्मक संकल्पना आहे. त्यामुळे व्हायचा तो त्रास होऊन गेलेला असतो.

घेऊ घेऊ म्हणून चाललं होतं, ती रॉयल एनफिल्ड घेतल्यावर पाचशे सीसी इंजिनात उत्पन्न होणाऱ्या भरभक्कम टॉर्कइतकाच भरभक्कम आनंद झाला होता. त्या आनंदाच्या भरात 'आता काय होईल ते होईल, पण एनफिल्डच्या हँडलला पिशवी अडकवायची नाही' अशी भीष्मप्रतिज्ञा मनातल्या मनात केली होती. ती सुमारे दीड दिवस टिकली. कृष्णविवरासमोर एनफिल्ड काय चीज आहे?

बसल्या जागी अंतःचक्षूंना कामं दिसणं तर फार वाईट. म्हणजे तुम्ही विचार करत असताना मराठी साहित्याच्या सद्यस्थितीबद्दल (वाढवून ठेवलेल्या कामाचे परिणाम. दुसरं काय!); पण प्रत्यक्षात विचार घरंगळत असतो तो 'दूध गार झाल्यावर विरजण लावायचं आहे' हा. मराठी कथेला पाहिल्यासारखं टोक उरलं आहे की नाही या विषयावर काही लिहिताना 'कोथिंबीर निवडायची राहिली आहे' हा टोकदार विचार जखम करून जातो. (शेपू, कोथिंबीर आणि मेथी निवडणे ही सृजनशक्तीपाताची त्रिसूत्री आहे. आपल्याकडे 'रेनेसान्स' झालं नाही याच्या काही कारणांपैकी एक कारण इथल्या समाजाला भाज्या निवडाव्या लागत होत्या हे आहे. यावर वाद घालायला आपण तयार आहोत!) 'महाराष्ट्रातील प्रबोधनाची वाटचाल' यावर तुम्ही काहीएक मौलिक, आंतरिक गुंतागुंतयुक्त विचार करत असताना स्वयंपाकघरातल्या व्हाइट बोर्डावर लिहिलेली कामांची यादी डोळ्यांसमोर नाचू लागते आणि प्रबोधनाची वाटचाल मंदावते. हे सगळं कशामुळे? तर कामामुळे. म्हणून जीवनाला आराम पडण्यासाठी जीवनातील काम काढून टाकलं पाहिजे. त्यासाठी 'काहीही न करणे' या एकमेव आनंददायी क्रियेला सतत प्रोत्साहन देणं गरजेचं आहे.

'काहीतरी करू' यात ट्रिपला वगैरे जाणंसुद्धा सामील आहे. ट्रिप हा वास्तविक तापदायक प्रकार आहे. ज्या कुठल्या प्रेक्षणीय स्थळी तुम्ही जाता तिथे उंचावलेल्या हातांमधल्या कॅमेऱ्यांपेक्षा वेगळं काय दिसतं? तारखा ठरवा, तिकिटं बुक करा, सामान भरा (यात काहीतरी विसरणं आणि काहीतरी उगीच घेतलं जाणं हे नेहमीचं आहे. थंडी असेल म्हणून स्वेटरने बॅगेतली जागा अडवायची आणि तिथे गेल्यावर उकाडा हजर किंवा पाऊस नसेल म्हणून घेतलेली छ्त्री बाजूला काढायची आणि पोचल्यावर स्वागताला पाऊस हजर!), भलामोठा प्रवास करा, हॉटेलात चेक-इन करा, तिथे अमुक-नाही-तमुक-नाही म्हणून मॅनेजमेंटशी भांडा, चार ठिकाणच्या गर्दीत सामील होऊन काहीतरी बघितल्याचा आपल्याला आनंद झालाय हे स्वतःच्या मनावर ठसवा - हा एवढा खटाटोप सांगितलाय कुणी? 'प्रवासाने माणसाला शहाणपण येते' वगैरे सुविचार तर पूर्णपणे दिशाभूल करणारे आहेत. प्रवासामुळे फक्त खर्च होतो. शहाणपण ही वस्तू मुळातच तुमच्याकडे असावी लागते. त्यासाठी वणवण करायची गरज नसते. मनुष्यप्राणी हा एक कल्पनातीत वैचित्र्यानं भरलेला प्रकार आहे हे कळण्याकरता प्रवास कशाला हवा?

कामजीवन हे एक्स्पोनेन्शियली तापत जाणारं प्रकरण आहे. त्यामुळे वेळच्या वेळीच आवर घातला नाही तर ते हाताबाहेर जाऊ शकतं. त्यासाठी आजूबाजूला सजगपणे बघत ज्या ज्या ठिकाणी कामाचं उगमस्थान दिसेल त्या त्या ठिकाणी ठामपणे 'नाही' म्हणणं आवश्यक आहे. खरेदी वगैरे तर अगदीच टाळावी. जेव्हा खरेदी मिनिमम होईल तेव्हाच इकॉनॉमी ऑप्टिमम होईल. या एकूणच प्रश्नाबाबत मुळात एक गोष्ट माझ्या पक्की लक्षात आली आहे. काहीही न करता निवांत बसलो असतानाच ती लक्षात आली. युरेका मोमेंटच म्हणा ना. (मूलभूत जाणिवा निवांतपणा असतानाच होतात. न्यूटन, आर्किमिडीज साक्ष आहेत. फक्त इतर लोकांनी त्यांनी लावलेल्या शोधापाशी थांबायला हवं होतं. गुरुत्वाकर्षण आहे हे कळलं ना? उत्तम. पुढे जाऊन आकाशात रॉकेट्स कशाला सोडायची?) मी त्याला 'द ह्यूमन ट्रूथ' असं नाव दिलं आहे. हे ट्रुथ असं - माणसं काहीएक संख्येनं एकत्र आली की करेक्ट असं काही घडण्याची शक्यताच लयाला जाते. एकत्र आली की माणसं काहीतरी घोळच घालतात. (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहेच!) त्यामुळे काहीतरी करण्याची जळमटं लोकांच्या मनातून काढून टाकणं अगत्याचं झालं आहे. काहीही न करण्याकरता माणसं एकत्र येतील तेव्हाच मानवी इतिहास आश्वासक वळण घेईल. अन्यथा कामजीवन माणसाचं माकड करतच राहणार आहे!

(ऐसी अक्षरे, दिवाळी २०१८)


1 comment: