आता या उदाहरणाला आणखी फाटे फुटतीलच. हिंदुत्ववादी म्हणतील की दलितांवर अन्याय झाला हे बरोबरच आहे; पण मुस्लिमांनी जशी हिंदूंची कत्तल केली तशी दलितांची कत्तल झालेली नाही. ('हिंदूंची कत्तल' याला केवळ धार्मिक आयाम नसून साम्राज्यविस्ताराचा आयाम आहे. शिवाय हिंदू राजेही आपसात लढले होतेच. पण सध्या तो मुद्दा बाजूला ठेवू). त्यावर दलितांची एकगठ्ठा कत्तल झाली नसली तरी दलितांवरील सुट्या सुट्या हिंसेचा हिशेब काढला तर तो सामूहिक कत्तलीएवढाच होईल असं प्रत्युत्तर देता येईल. हिंदुत्ववादी म्हणतील की सवर्ण-दलित संघर्ष हा हिंदूंचा अंतर्गत मामला आहे; पण मुस्लिम हे समस्त हिंदूंचे शत्रू होते. त्यावर असं उत्तर देता येईल की अंतर्गत मामला हे सवर्णांना सोयीचं आर्ग्युमेंट आहे. आम्ही मुळात हिंदू धर्माचे शोषित आहोत. आम्हांला ज्या धर्मात मानाचं स्थानच नाही त्या धर्माच्या धुरीणांनी मुस्लिमांना टारगेट करायचं असेल तेव्हा 'अंतर्गत मामला' म्हणायचं आणि इतर वेळी वर्णश्रेष्ठत्व मिरवायचं हा दुटप्पीपणा आहे. आम्हांला मुळात हिंदू धर्माबद्दल काडीचंही प्रेम नाही. उलट इस्लाम स्वीकारल्यानंतर आमच्यातील अनेकांची स्थिती सुधारल्याचे दाखले देता येतील. (काही वर्षांपूर्वी याकूब मेमनच्या अंत्ययात्रेला झालेली गर्दी हा वादाचा मुद्दा झाला होता. बाबरीप्रमाणेच हे उदाहरण घेतलं तर याकूब मेमनचं समर्थन आणि नथुराम गोडसेचं समर्थन असे दोन मुद्दे घेता येतील आणि दोन्हीकडून वर केली आहेत त्या धर्तीची आर्ग्युमेंट्स करता येतील).
वरील चर्चा ही मुद्द्याचा विस्तार करण्याच्या उद्देशाने केली आहे. एखाद्या वादाकडे, वादग्रस्त घटनेकडे बघताना काय प्रकारची आर्ग्युमेंट्स येऊ शकतात याची झलक दाखवण्यासाठी. आर्ग्युमेंट्स, युक्तिवाद ही अनेक बाजूंनी लढवता येण्याजोगी आणि समर्थन करता येण्याजोगी बाब असते. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या दृष्टिकोनाला घट्ट धरून आर्ग्युमेंट्स करतो तेव्हा त्याचा प्रतिवाद होऊ शकतो आणि तोही तितकाच कन्व्हिन्सिंग असू शकतो हे लक्षात घेणं आवश्यक असतं. अर्थात आपल्याला वैचारिक पातळीवर पुढे जायचं असेल तर. अन्यथा आपलं आर्ग्युमेंट लटकं पडतंय याची स्पष्ट जाणीव झालेली असतानाही ते पुढे रेटत राहिल्याची अनेक उदाहरणं पदोपदी दिसतातच.
इतिहासातील घडामोडी, अन्याय आणि आपलं आजचं वर्तमान यात आपल्याकडे इतिहास बरेचदा जिंकतो याचं एक कारण आपण प्रत्यक्षात आपला पायाखालच्या, आजच्या जमिनीवर उभे असलो तरी मनातून आपण 'इतिहासाच्या जमिनी'वर उभे आहोत हे आहे. एका अर्थी आपण इतिहासाचे गुलाम आहोत. कुठल्याही कट्टर धार्मिक विचारसरणीला तर इतिहासाला रजा देणं कधीच परवडत नाही. कारण तसं केलं तर त्यांच्या तथाकथित 'वैचारिक पाया'खालची जमीनच हिसकावली जाते! त्यामुळे पंधराव्या-सोळाव्या शतकात जे झालं त्याच्या आधारे आज एकविसाव्या शतकात आपण काही विचार-कृती करायला नको हा विचार त्यांना पटू शकत नाही. त्यांचं मानसच इतिहासाच्या मोल्डमध्ये घडवलं गेलेलं असतं. अशा मानसिकेतला कसं सामोरं जायचं हा एक मोठाच प्रश्न असतो. (इतिहास हा मुद्दा महत्त्वाचा मानायचाच असेल तर 'हिंदू-मुस्लिम संबंध : तेव्हा आणि आता' तसंच 'सवर्ण-दलित संबंध : तेव्हा आणि आता' असे दोन विषय उभे राहू शकतात).
यानंतर आता याच विषयाशी जोडलेली पण थोडी वेगळी चर्चा करू. काही हिंदी चित्रपटांच्या संदर्भाने आहे. एका सांस्कृतिक अवकाशात हिंदू-मुस्लिम संबंधांबद्दल काही आश्वासक चित्रण होत होतं हे सामाजिक चर्चाविश्वासाठी मार्गदर्शक ठरू शकेल.
'आमिर' नावाचा एक फार प्रभावी चित्रपट २००८ मध्ये येऊन गेला. (दिग्दर्शक - राजकुमार गुप्ता). खिळवून ठेवणारी कथा, अमित त्रिवेदीचं अफलातून संगीत, उत्तम सिनेमॅटोग्राफी, अवाक करणारा शेवट! मुंबई एअरपोर्टवर उतरल्या उतरल्या एका इस्लामिक दहशतवादी गटाचा सूत्रधार (गजराज राव) एका तरुण डॉक्टरला (राजीव खंडेलवाल) त्याच्याकरवी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी वेठीला धरतो. त्याच्या कुटुंबीयांना ओलीस ठेवलं जातं. हा डॉक्टरही मुस्लिम आहे. चित्रपट अवश्य बघावा असा आहे.
चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या एका सहकाऱ्याशी त्याबाबत चर्चा झाली होती. दहशतवादी गटाचा सूत्रधार त्या तरुण डॉक्टरला मुंबईत डोंगरीमध्ये बरंच फिरवतो. तिथले काही व्यावसायिक (हॉटेलचालक, दुकानदार, एसटीडी बूथचालक इ.) कटात सामील असतात. त्यातल्या प्रत्येकाकडून या तरुणाला पुढच्या सूचना मिळत जातात असं चित्रण होतं. यावर बोलताना माझा सहकारी म्हणाला की चित्रपटात सर्वसामान्य मुस्लिम माणूस दहशतवादी कटात सामील आहे असं दाखवलं आहे ते काही बरोबर नाही. त्यावर माझं असं म्हणणं होतं की डोंगरीसारख्या भागात बहुसंख्य मुस्लिम व्यावसायिक असणं स्वाभाविकच आहे आणि दुसरं म्हणजे एखाद्या दहशतवादी कृत्यामागे मोठं प्लॅनिंग असणार हेही सरळ आहे. त्यात सामील होणारे आपणहून सामील झाले की दबावाखाली सामील झाले हाही एक प्रश्न आहेच. पण मुस्लिम समुदायातील लोक त्यात सामील आहेत या चित्रणात मला काही गैर वाटलं नाही. मुख्य म्हणजे सारासार विचार करणारा तो विवेकी मुस्लिम डॉक्टर हा कथानायक आहे हे महत्त्वाचं आहे.
मुळात माझ्या सहकाऱ्याने हा मुद्दा मांडेपर्यंत माझ्या डोक्यात तसं काही आलंच नव्हतं. पण नंतर त्याच्या म्हणण्यावर विचार करूनही मला ते फारसं पटेना. या गोष्टीला आता बरीच वर्षं झाली. दोन हजारच्या दशकापर्यंत आमिर, रंग दे बसंती, वेन्सडे आणि इतरही काही थेट सामाजिक-राजकीय भाष्य करणारे चित्रपट निर्माण होत होते. 'संरक्षण मंत्रालयातील भ्रष्टाचार' हा मुद्दा घेतलेल्या 'रंग दे बसंती'ला तर अनेक पारितोषिके मिळाली. राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. (आज हे अशक्यप्राय वाटतं!) या चित्रपटात एक हिंदुत्ववादी एका मुस्लिमाशी हळूहळू मैत्री करतो हेही प्रभावीपणे दाखवलं गेलं होतं. ज्या नसीरुद्दीन शहाला हिंदुत्ववादी आज सतत टारगेट करतात त्याने 'वेन्सडे'मध्ये इस्लामिक दहशतवादामुळे पेटून उठलेल्या सामान्य माणसाची भूमिका केली होती. इस्लामिक दहशतवादाबद्दल बोलताना वेन्सडे, सरफरोशसारख्या सिनेमात भारतीय मुस्लिम पोलीस अधिकारी (भूमिकेत अनुक्रमे जिमी शेरगिल, मुकेश ऋषी) दाखवले गेले होते. दहशतवादी मुस्लिम असले तरी त्याला विरोध करणारे मुस्लिमही आहेत, ते भारताच्या पोलीस खात्यात आहेत हे दाखवलं जात होतं. खरं तर बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये मुस्लिम व्यक्तिरेखांना आवर्जून स्थान दिलं जात होतं असं दिसतं. (आज मात्र स्थिती पालटली आहे. मुस्लिमांचं दानवीकरण हा बऱ्याच चित्रपटांचा अजेंडा आहे). मुस्लिमांना भारतात आपलं समजलं जात नाही या पार्श्वभूमीवर त्यांना सामावून घ्यायच्या दृष्टीने हे होत होतं. तसा स्पष्ट उल्लेखही व्हायचा. दुसरीकडे 'क्रांतिवीर'सारख्या चित्रपटात वस्तीतला एक मुस्लिम मनुष्य जेव्हा बहकून हिंदूंविरुद्ध भडकाऊ बोलू लागतो तेव्हा नाना पाटेकर त्याच्या कानफटात मारून (आणि अर्थातच पल्लेदार डायलॉग ऐकवून) भानावर आणतो. 'सरफरोश'मधला मुकेश ऋषी आणि आमिर खानचा संवादही अनेकांना आठवत असेल. २०१९ मध्ये, म्हणजे अगदी अलीकडे आलेल्या 'बाटला हाउस'मध्ये जॉन अब्राहमने साकारलेला पोलीस अधिकारी मीडियाशी बोलताना म्हणतो की इथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्याने आम्ही आलो आहोत. यात मुस्लिमांना टारगेट करण्याचा प्रश्न कुठे येतो?
ही उदाहरणं द्यायचं कारण असं की चित्रपट निर्माण करणारे आणि ते बघणारे दोघांचीही दृष्टी तुलनेने अधिक स्वच्छ होती असं वाटतं. आणि बहुतांश समाजमानस प्रत्यक्षातही असंच होतं असं वाटतं. किमान आज जो एकारलेपणा आला आहे तो नव्हता. मुस्लिमांचा अजिबात द्वेष नाही, मुस्लिमांची भारतात होणारी कुचंबणा समजते आहे, त्याबाबत त्यांना पूर्ण पाठिंबा आहे हे एकीकडे असतानाच मुस्लिमांबद्दल 'ब्लॅंकेट' स्वरूपातील अनाठायी सहानुभूतीही नाही - विशेषतः इस्लामिक दहशतवादाचा स्पष्ट निषेध आहे - अशी बहुस्तरीय आणि म्हणूनच सुस्पष्ट भूमिका आपण घेतोय का हे तपासून पाहावं लागेल. वर उल्लेख केलेल्या चित्रपटांमधून, प्रसंगांमधून हे पाहायला मिळतं; पण वास्तवात मात्र दोन टोकं तयार होतात. एका गटाने मुस्लिमांना 'संपूर्ण झिडकारायचं' आणि एका गटाने त्यांना 'संपूर्ण स्वीकारायचं' असं काही होतंय का असं वाटतं.
सवर्ण-दलित-मुस्लिम हे कोन आणि धर्मनिरपेक्ष व हिंदुत्ववादी हे दोन प्रवाह एकमेकात गुंतलेले आहेत. या सगळ्याला इतिहासाचं विशिष्ट पद्धतीने करून दिलं जाणारं आकलन, अनुभव व जडणघडण, मुख्य म्हणजे राजकारण आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यातून निर्माण होणारी मानसिकता, विचारव्यूह, एकारलेपणा यांचे आयाम आहेत. यातले धागे सुटे करून त्यांच्याविषयी बोलत राहणं आवश्यक आहे असं वाटतं. आजच्या भारतात बहुसंख्याकवाद ज्या प्रमाणात आणि ज्या तीव्रतेने पसरला आहे आणि 'धार्मिक ओळख' विवेकाला ज्या प्रकारे गिळंकृत करू पाहते आहे त्या पार्श्वभूमीवर हे करणं फारच आवश्यक आहे. हिंदुत्ववादी आणि उदारमतवादी दोन्ही गटातील समंजस व्यक्तींना एकत्र येऊन काही करता येईल का याचाही विचार होऊ शकतो. निदान चर्चेच्या काही फेऱ्यांनंतर आपल्यात काही प्रमाणात 'अखंडता' निर्माण होऊ शकते की आधीपासून झालेली 'फाळणी'च अटळ आहे हे तरी लक्षात येईल!
No comments:
Post a Comment