Thursday, September 3, 2015

एक लिबरल हिंदू मनोगत 

डॉ. कलबुर्गी यांची हत्या, त्यावरील बजरंग दलाच्या सह-समन्वयकाचे ट्वीट या पार्श्वभूमीवर मी काही लिहिलं होतं. त्याचा समारोप करताना मी 'अजिबात भावनिक न होता पूर्णपणे स्ट्रॅटेजिक विचारच करावा लागेल' असं म्हटलं होतं. त्या पोस्टवर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यापैकी काहींच्या अनुषंगाने मला बोलायचं आहे. पण त्याआधी थोडी प्रस्तावना आवश्यक आहे.

मला धर्मविरहीत जगण्याची कल्पना आकर्षित करते. मी स्वतः खरं तर तसं जगतो आहे. आणि ते केल्याने मला काहीही अडचण आलेली नाही. पण अर्थातच हे सगळं इतकं सोपं नाही याची मला कल्पना आहे. म्हणजे प्रत्येकाला धर्मविरहित जगता येईल असं नाही. वेगवेगळ्या प्रसंगी मी वैयक्तिक दुःख इतरांसारखंच अनुभवलं आहे, पण मी एका टोकाचं दुःख, अस्तित्व पणाला लागतं असं दुःख अनुभवलेलं नाही. उदा. माझं घर भूकंपात पडलेलं नाही किंवा आगीत जळालेलं नाही, माझ्या घरातील कुणी कधी दंगलीत, अपघातात मारलं गेलेलं नाही. मला अतिशय हलाखीत दिवस काढायला लागलेले नाहीत. मी स्त्री नसल्यामुळे मला आपल्या समाजातील स्त्रीच्या मानसिकतेतील असुरक्षिततेचा अनुभव नाही.

एकूणात माझा जो काही थोडाफार संघर्ष असेल तो एक मध्यमवर्गीय संघर्ष आहे. माझं माझ्या दुःखांशी वैर नाही, पण मला दुःख झालं असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा ते मी माझ्या सामाजिक स्थानासकटच म्हणत असतो याचं भान मला ठेवावं लागतं. उदा. सकाळचीच भाजी काय संध्याकाळी असं वाटून जेव्हा मी वैतागतो तेव्हा असं वाटण्यात फार मोठा गुन्हा आहे असं नाही, पण सकाळची भाजी संध्याकाळी मिळणं हेदेखील काही लोकासांठी सुख असू शकतं ही जाण मला ठेवावीच लागते.

माझ्यासारखा माणूस जेव्हा 'माझा' म्हणून विचार करतो तेव्हा मला 'माझा' विचार करण्याइतपत लिबर्टी आहे हे मला लक्षात ठेवावंच लागत. कारण मी जो काही विचार करतो, करू शकतो त्यात माझ्या व्यक्तिगत आयुष्यातील घडणीचा सहभाग असतो. माझ्या सामाजिक स्थानाचा सहभाग असतो. मी जर एखाद्या वेश्येच्या पोटी जन्माला आलो असतो तर मी कसा विचार केला असता? मी जर दंगलीत मारल्या गेलेल्या आई-वडिलांचा मुलगा असतो तर मी कसा वाढलो असतो? मी जर हातावर पोट असणाऱ्या एखाद्या मजुराचा मुलगा असतो तर मी कसा विचार केला असता?

आपल्याला दुःख असणं हे मला मान्यच आहे. पण आपल्या दुःखाची प्रत, त्याची जातकुळी ओळखण्याइतपत आपला मानसिक विकास व्हायला हवा यात मला शंका वाटत नाही. मी जर समाजाचा भाग असेन तर समाजविचार सोडून विचार करणं मला योग्य वाटत नाही.

म्हणूनच मी धार्मिक नसलो तरी धर्म, श्रद्धा या गोष्टींकडे मला काळजीपूर्वक बघावं लागतं हे मला विसरून चालत नाही. धर्म, श्रद्धा या गोष्टींकडे विविध संदर्भात बघावं लागतं. श्रद्धेला संपूर्ण न नाकारता, सत्प्रवृत्त माणसांच्या श्रद्धेचा अनादर न करता माझ्यासारख्या अश्रद्ध माणसांना त्यांचं म्हणणं मांडता यायला हवं. मी उद्वेगाने अनेक वेळा धर्माबद्दल तिरकसपणे लिहिलं आहे, पण तो हल्ला अर्थातच धर्माचे नकारात्मक परिणाम, धर्माच्या अतिरेकामुळे येणारं अवलंबित्व, विचारशक्तीचा ऱ्हास यावर आहे. मला असं वाटतं की स्वतंत्र विचाराची शक्ती असेल तर वेश्येच्या पोटी जन्माला आलेला मुलगा असो की मजुराच्या पोटी जन्मलेला मुलगा असो की एखाद्या विचारवंताच्या पोटी जन्माला आलेला मुलगा असो - सगळ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते. ही शक्ती धर्म देतो असं मला वाटत नाही. मार्क्सचं 'धर्म ही अफूची गोळी आहे' हे वाक्य वारंवार उद्धृत केलं जातं, पण त्या वाक्याआधी जी संपूर्ण मांडणी आहे ती बरेचदा वाचली जात नाही. ती मुद्दाम इथे देतो -

Man makes religion, religion does not make man. Religion is, indeed, the self-consciousness and self-esteem of man who has either not yet won through to himself, or has already lost himself again. But man is no abstract being squatting outside the world. Man is the world of man – state, society. This state and this society produce religion, which is an inverted consciousness of the world, because they are an inverted world. Religion is the general theory of this world, its encyclopedic compendium, its logic in popular form, its spiritual point d’honneur, its enthusiasm, its moral sanction, its solemn complement, and its universal basis of consolation and justification. It is the fantastic realization of the human essence since the human essence has not acquired any true reality. The struggle against religion is, therefore, indirectly the struggle against that world whose spiritual aroma is religion.
Religious suffering is, at one and the same time, the expression of real suffering and a protest against real suffering. Religion is the sigh of the oppressed creature, the heart of a heartless world, and the soul of soulless conditions. It is the opium of the people.

शेवटच्या परिच्छेदात मार्क्स म्हणतो की धर्म हा हृदयशून्य जगाचे हृदय आहे, आत्मा हरवलेल्या परिस्थितीचा आत्मा आहे. धर्म ही अफूची गोळी आहे.

मी धार्मिक मनुष्य नाही. अज्ञेयवादी आहे. घरात देवघर नाही. पण मी क्वचित कधी सत्यनारायणाचं बोलावणं आलं तर जातो. नमस्कारही करतो. ते औपचारिकच असतं, पण निमंत्रणाला नकार देणं काहीसं जड जातं. मी धार्मिक नसलो तरी भिडस्त आहे. पटकन नाही म्हणता येंत नाही. वैचारिक समता की माणसाशी जोडलेपण असा प्रसंग आला तर मी जोडलेपणाची निवड करेन. अर्थात त्यासाठी माणूस सत्प्रवृत्त, हिंसा न करणारा, हिंसेवर विश्वास नसलेला असायला हवा. धार्मिक माणूस सत्प्रवृत्त असूच शकतो. धर्मांध माणूस नाही. मुळात धर्म हे माझ्या दृष्टीने एक कोडं आहे. (धर्म हा शब्द मी सगळीकडे हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन इ. संघटित धर्म या रूढ अर्थानेच वापरतो आहे.)

हे सगळं सांगणं आवश्यक वाटलं कारण मला पुढे जे म्हणायचं आहे ते म्हणायच्या आधी माझी व्यक्तिगत भूमिका काय हे सांगणं गरजेचं वाटलं.

मागे एकदा याकूब मेमनच्या फाशीबाबत लोकसत्तात जो अग्रलेख आला होता त्यावरील एका प्रतिक्रियेला मी प्रतिक्रिया दिली. ती वाचून अर्थातच पुन्हा प्रतिक्रिया आल्या. स्वामीजी निश्चलानंद यांनी तीव्र नकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यांना मी दहशतवादाचं समर्थन करतो आहे असं वाटलं. त्यावर मी दहशतवादाचं समर्थन करत नाही असं म्हणून त्यांची माफी मागितली. मनापासून मागितली. मला असं वाटतं की मी ही माफी मागितली पाहिजे, कारण मी जेव्हा तिरकसपणे काही लिहितो तेव्हा कदाचित काही सत्प्रवृत्त माणसांनाही मी दुखावलं असेल. आणि अशा वेळी माफी मागण्यात कमीपणा वाटायचं कारण नाही. कारण माणूस दुखावला गेला आहे हे सत्य मला नाकारता येत नाही.

डावे-उजवे-मधले हे सगळे विचाराने कुठल्याही बाजूचे असले तरी ती माणसं आहेत आणि म्हणून परिवर्तनीय आहेत असं मला वाटतं. मला सोशल मीडियाची भीती वाटते ती या माध्यमामुळे आपण अधिकाधिक एकारलेले, अपरिवर्तनीय होत आहोत असं वाटतं म्हणून. आपण फार तीव्रतेने भांडतोय. सतत भांडतोय. 'आपलं चुकू शकतं' हे आपण विसरतोय का? आपण सगळे मुळात एकाच व्यवस्थेत राहतोय. तुम्ही कम्युनिस्ट असा किंवा उजवे असा, ऑफिसातला बॉस किंवा व्यावसायिक असू तर आपले क्लायंट्स हेच आपले नियंत्रक आहेत हे सत्य आहे. आपल्याला आपल्या वॉर्डमधल्या नगरसेवकाचे 'की रिझल्ट एरियाज' माहीत आहेत का? अशा वेळी आपण पंतप्रधान, आरबीआयचे गव्हर्नर यांच्या कामाविषयी बातम्या, लेख याच्या आधारे जोरात भांडू शकतो याची मला मौज वाटते.

सोशल मीडियाच्या या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर सिलेक्टिव्ह निषेधाचा मुद्दा पुढे येतो.

मुस्लिम दहशतवाद, मुस्लिमांकडून झालेले/होणारे अत्याचार याबाबत पुरोगामी इ. लोक काही बोलत नाहीत असा एक आक्षेप अनेकजण नेहमी घेतात. याबाबत पुढे काही लिहिण्याअगोदर मी हे कबूल करतो की या आक्षेपात तथ्य आहे. यामागची कारणं सांगता येतील. पण ही वस्तुस्थिती आहे असं मला वाटतं. याचाच थोडा परामर्श घ्यावा असं वाटतं.

मुस्लिम हे अल्पसंख्य आहेत आणि त्यांना या देशात सुरक्षित वाटणं गरजेचं आहे, मुस्लिम दहशतवादाचं रूप उग्र असलं तरी प्रत्येक मुस्लिम दहशतवादी नसतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे असा एक विचार आहे आणि मीदेखील हा विचार मानणाऱ्यांपैकी आहे. मुस्लिम शासकांनी इथे, विशेषतः उत्तर भारतात अनेक शतकं राज्य केलं. बाबराने इब्राहिम लोधीचा पराभव केला तो १५२६ मध्ये. तिथून मुघल साम्राज्याची सुरूवात होते. इब्राहिम लोधीच्या आधी त्याचा बाप सिकंदर लोधी, त्याआधी सिकंदर लोधीचा बाप बहलोल खान, त्याआधी सईद साम्राज्य असा सगळा इतिहास पुष्कळच मागे जातो. आणि त्यात केवढी गुंतागुंत असेल याची कल्पनाच केलेली बरी.
आर्य बाहेरूनच आले आणि त्यांनी इथल्या लोकांना दास केलं अशी जी मांडणी आहे त्याला आंबेडकरांनी आक्षेप घेतला आहे. 'शूद्र पूर्वी कोण होते?' या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात हे सगळं त्यांनी विस्तृतपणे मांडलं आहे. वैदिक परंपरेला आव्हान देणारी श्रमण परंपरा, इतर अनेक पंथ असं बरंच काही इथे घडलेलं आहे. त्यावर पुष्कळ संशोधन झालं आहे. अनेक मत-मतांतरे आहेत. त्यात शिरणं हा माझा उद्देश नाही. माझी तेवढी कुवतही नाही. हे सगळं सांगावसं वाटलं कारण या देशाच्या इतिहासाबाबत काहीही विधान करणं अशक्य आहे असं मला वाटतं. माझं इतिहासाबाबत एवढं एकच मत ठाम आहे. एकाने काही मांडलं की त्यावर दुसरा आक्षेप घेतो, दुसऱ्याने काही मांडलं की त्यावर तिसरा आक्षेप घेतो. भारताचा इतिहास हा बाकी काही नाही तरी आक्षेपांचा इतिहास आहे हे नक्की!

आता या अत्यंत म्हणजे अत्यंत गुंतागुंतीच्या संस्कृतीत, समाजात काहीजण फक्त एकच झेंडा घेऊन उभे आहेत. काहीजण हिंदुत्वाचा झेंडा घेऊन उभे आहेत - मुस्लिम इथले नाहीत, आक्रमक आहेत, त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे ही त्यांची भूमिका आहे. माझ्यासारखे काही आधुनिक विचारांचा झेंडा घेऊन उभे आहेत - धर्म वगैरे विसरा आता आणि खऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्या ही माझी भूमिका आहे. मुस्लिम मूलतत्त्ववादी इस्लामचा झेंडा घेऊन उभे आहेत - त्यांना हिंदू बहुसंख्यांचा धोका वाटतो.

आता आपण माझ्याबद्दल बोलू. मी हिंदू धर्मातील वाईट गोष्टींबाबतच का लिहितो? मला मुस्लिम समाजातील दोष दिसत नाहीत का?

याची ठळक कारणं -

मी लिबरल हिंदू घरात जन्माला आलो. लहानपणी मुस्लिम लोकांमध्ये पुष्कळ वावरलो. अगदी घरातल्यासारखा. ('असलेपण-नसलेपण' या माझ्या ब्लॉगवरील लेखात मी याबाबत सविस्तर लिहिलं आहे.) दंगल पाहिली तेव्हा मुस्लिम काय किंवा हिंदू काय, आक्रमक म्हणून कुणीच लक्षात राहिले नाहीत. दंगलीची प्रत्यक्ष झळ पोचली नाही. हिंदू घरात वाढत होतो त्यामुळे हिंदू परंपरा जवळून पाहिल्या. हिंदू समाजात सतीसारख्या काही भयंकर परंपरा होत्या हे कळलं. देवाची मूर्ती काहीही म्हणजे काहीही करू शकत नाही हे कळलं. पुढे मग सगळंच फोल वाटू लागलं. सामाजिक वाचन झालं त्यात हिंदू समाज, हिंदू धर्मसुधारणा याचाही समावेश होता. धार्मिक वाचन झालं नाही. आईने एकदा लहानपणी शनिमाहात्म्य वाचून दाखवलं होतं. तेव्हा मला साडेसाती सुरू होती म्हणून. पण ती शनीची गोष्ट मी गोष्ट म्हणूनच ऐकली होती. मोठेपणी गीतारहस्य उत्साहाने वाचायला घेतलं होतं, पण ते काही झेपेना. भक्तीयोगात मला शरण जा, माझी भक्ती करा असं काही यायला लागलं तेव्हा कंटाळा अधिकच वाढला. देव समजा ठीक आहे, पण देवळाच्या बाहेर भिकारी का असतात? आत देव - सगळ्या जगाचा त्राता आणि त्याच्या दाराबाहेर भिकारी कसे? पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून अर्ध्या किलोमीटरवर वेश्यावस्ती आहे. मंदिरात जाणं योग्य, पण या बायकांशी बोलणं चांगलं नाही असं का? असे प्रश्न पडू लागले. मला असं लक्षात येऊ लागलं की आपण भौतिक जगाकडे आस्थेने बघणाऱ्यांपैकी आहोत. आपल्याला अध्यात्माची गोडीच नाही. आपल्याला जमिनीवरचे, जगण्याचे प्रश्न जास्त खुणावतात. आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला गणपतीकडे बघून काही वेगळं, शांत, प्रसन्न असं वाटत नाही. आपल्याला त्या वेश्येमध्ये रस आहे. आपल्याला तिच्याशी बोलावसं वाटतं. या जगात दुःखाचं एक मूलभूत कारण पैसे नसणं हे आहे. असं असताना धर्म त्याबद्दल काय सांगतो? तर काही नाही. धर्म म्हणतो की पैसे कसे कमवायचे ते तुमचं तुम्ही बघा. पण तुम्ही पैशासाठी वेश्याव्यवसाय करणं वाईट. आणि ते करणारेही वाईट. पण मग जिला फसवून या व्यवसायात आणलं ती वाईट कशी?

धर्माने मला, म्हणजे प्रश्न विचारणाऱ्या माणसाला काय दिलं? किंवा धर्मपालन करणाऱ्या आसपासच्या लोकांनी मला वैचारिकदृष्ट्या काय दिल? तर काही नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरं ते देऊ शकत नव्हते. त्यांच्या श्रद्धेला माझा विरोध नव्हताच, पण ते बदल घडवून आणू शकत नाहीत हे लक्षात येत होतं. धर्म माणसांना एकत्र ठेवतो असं सांगण्यात येतं. पण जर सगळ्यांना व्यवस्थित पैसे मिळाले आणि सगळ्यांनी नागरिकशास्त्राचे नियम पाळले तरी सगळे एकत्र राहतीलच की. उलट ते अधिक चांगल्या पद्धतीने एकत्र राहतील. मग सगळ्यांकडे पैसे असतील, सगळेजण नागरिकशास्त्र समजून घेतील यासाठी काय करायचं?

ऐहिक जगाचे प्रश्न सोडवण्यासाठी अध्यात्म किंवा धर्म कसे उपयोगी पडतील, मुळात उपयोगी पडू शकतील का असा विचार मी केला नाही हेही खरं आहे. कारण त्यातला रसच संपला होता. माझी वैचारिक भूक भागत नव्हती त्यामुळे धर्माबद्दलची माझी आस्था संपली होती. आपल्या प्रश्नांची उत्तरं धर्मात, परंपरांमध्ये नाहीत हे लक्षात आलं.
माझ्या आसपासचे लोक हिंदू होते. आहेत. ज्या सार्वजनिक उत्सवांमुळे त्रास झाला (आवाज, गर्दी, लोकांची गैरसोय) ते प्रामुख्याने हिंदू उत्सव होते. माझ्यावर ज्यांचा प्रभाव पडला त्या गांधींना मारणारे हिंदू होते. दुसरा प्रभाव म्हणजे आंबेडकर. त्यांनी ज्या समाजातील जाती-आधारित शोषण मला दाखवलं तो हिंदू समाज होता. दाभोळकरांची हत्या झाल्यावर त्यांच्या चित्रापुढे फुली मारणारी सनातन प्रभात ही हिंदू संघटना आहे. स्टेन्स आणि त्यांची दोन लहान मुलं यांना जिवंत जाळणारा दारासिंग हा कट्टर हिंदुत्ववादी होता. कुलबर्गी यांच्या हत्येनंतर ट्वीट करणारा हिंदुत्ववादी होता. दंगलीचा संदर्भ मी देत नाहीये. कारण त्यात दोन्हीकडील माथेफिरू असतात. आणि गरीब हिंदू व गरीब मुस्लिम श्रीमंत हिंदू आणि श्रीमंत मुस्लिमांनी भडकावल्यामुळे मूर्खपणे एकमेकांचे गळे कापतात. दंगल हा एक वेगळाच विषय आहे. मी काही सुटे प्रसंग देतोय ज्यात दंगल वगैरे नसताना अचानकपणे हत्याकांड घडलेलं आहे.

वर उल्लेख केलेल्या कट्टर हिंदुत्ववाद्यांप्रमाणेच कट्टर मुस्लिमांनी इथे अलिकडे अशा प्रकारची हत्याकांडे केली आहेत का? माझ्या माहितीत तरी नाही. आणि जर असं काही घडलं असेल तर ते निषेधार्हच आहे.
मी हिंदू धर्माची माझ्या कुवतीनुसार थोडीफार चिकित्सा करतो, करू शकतो कारण माझ्याकडे तेवढी सामग्री आहे. माझ्याकडे मुस्लिम धर्माविषयीची इतकी सामग्री नाही.

थोडक्यात, 'मला धर्म नाही आणि मला धर्मविरहित जगू द्या' हे मी आज सांगत असलो तरी मी ज्या धर्माला पाहिलं, अनुभवलं आणि ज्या धर्मामुळे मला वैचारिक त्रास झाला तो हिंदू धर्म होता. मी मुस्लिम असतो आणि लिबरल असतो तर मी मुस्लिम धर्माची चिकित्सा केली असती. कारण त्यावेळी माझ्याकडे मुस्लिम धर्माविषयीची सामग्री असती.

आता ही चिकित्सा करताना मी उपरोधिक झालो आहे हे खरं आहे. आणि त्यामुळे कुणा सत्प्रवृत्त धार्मिक माणसाला मी दुखावलं असेल तर त्याबद्दल मी दिलगीर आहे. मला 'खुमखुमी' येते हे खरं आहे, कारण धर्मांधता माझ्यातल्या क्रिएटिव्ह माणसाला जागं करते.

मला मुस्लिमांचा त्रास कुठे दिसतो? अर्थातच दहशतवादी कृत्यात. मग मी त्या हल्ल्यांनी व्यथित होऊन लेख लिहिला का? निषेधाची कविता केली का? नाही केली. याचं कारण? माहीत नाही. मला काही सुचलं नाही इतकंच. ’मला का सुचलं नाही’ याचं विश्लेषण होऊ शकतं. आणि मी त्याबाबतीतील प्रश्नोत्तरांना तयार आहे.

मी स्वतः 'पुरोगामी' गटातला आहे. म्हणजे मला या गटातील लोकांचं सगळं पटतं का? नाही. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण द्यावं का? खुशाल द्यावं. महाराष्ट्र भूषण हा एक फार मोठा पुरस्कार आहे असं मला वाटतं का? अजिबात नाही. नोबेल पुरस्कार मिळालेल्या माणसाहून नोबेल न मिळालेला भारी माणूस जगात असू शकतो का? हो. असू शकतो. दाभोळकर, पानसरे यांचे मारेकरी सापडले तर त्यांना फाशी द्यावी का? देऊ नये. माझ्यावर दाभोळकर, पानसरे यांचा प्रभाव आहे का? अर्थातच आहे. औरंगजेब रोडचं नाव बदलायला माझी काही हरकत? अजिबात नाही. महात्मा गांधी रोडचं नावदेखील बदलावं. त्यांचे पुतळे वगैरेसुद्धा काढावेत. 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक बंद करावं का? करू नये. माझ्या आसपास गांधींना मनसोक्त नावं ठेवणारे लोक आहेत. मी त्यांच्याशी प्रतिवाद करतो का? नाही करत. कारण गांधी न आवडणारे लोक असू शकतात हे मला स्वीकारता आलंच पाहिजे असं मला वाटतं. गांधींवर जे जे आक्षेप आहेत ते ते मला तपासावेसे वाटतात. कारण गांधींचा माझ्यावर प्रभाव आहे. मी त्यांचा भक्त नाही. ज्या दिवशी मी 'भक्त' होईन त्या दिवशी मी संपेन असं मला वाटतं.
माझ्यासमोर आव्हान हे आहे की मी गांधी विचार रस्त्यांची नावं, पुतळे याशिवाय लोकापर्यंत कसे पोचवू शकतो हे बघण्याचं. मला 'गांधी' लोकांपर्यंत पोचवायचे नाहीत. गांधी विचार पोचवायचा आहे.

गांधींचा खून झाल्यावर ब्राह्मणांची घरं जाळली गेली तेव्हा ती वाचवण्यासाठी गांधीवादी मंडळीसुद्धा गेली होती. आता समजा गोळवलकर गुरुजींची हत्या झाली असती तर आपल्याकडे काय घडलं असतं? हिंदुत्ववादी मंडळींनी 'हो, मी गोळवलकरांना मारलं' अशा नावाचं नाटक चालू दिलं असतं का? हत्या समजा मुस्लिम माणसाने केली असती तर मुसलमानांची घरं वाचवायला हिंदुत्ववादी गेले असते का? गांधीप्रणित सहिष्णुता आणि धर्मप्रणित असहिष्णुता यात हा जो फरक आहे तो आपण, विशेषतः हिंदुत्ववादी मित्रांनी लक्षात घेतला पाहिजे.

आता शेवटचं.

'पुरोगामी' या शब्दाबद्दल आणि त्या विचारांच्या लोकांबद्दल आज जी नाराजी दिसते तिकडे दुर्लक्ष नाही करता येणार. आपण स्वतःला तपासलं पाहिजे. आपण खरोखरच सिलेक्टिव्ह निषेध करतो का? आपण खरोखरच काहीही झालं तरी मुस्लिमांची बाजू घेतो का हे तपासलं पाहिजे. देशांतर्गत ज्या काही घटना होत आहेत त्यात मुस्लिम दोषी असतील तर ते दोषी आहेत हे ठामपणे म्हटलं पाहिजे. मुळात हा हिंदू-मुस्लिम असा प्रश्नच नाही. आपण गुन्हेगारांचा निषेध करणार असू तर सर्वच गुन्हेगारांचा निषेध करायला हवा. मला कल्पना आहे की कदाचित असा निषेध होऊनदेखील उजव्या विचारांच्या लोकांपर्यंत तो पोचला नसेल. पण तरी त्यांच्यात जी नाराजी दिसते ती अशी दुर्लक्षून चालणार नाही असं मला वाटतं. आपण आपला विचार फक्त निषेधाच्या माध्यमातून कसा पोचवू शकणार? परिवर्तनाच्या चळवळीत अनेक मोठे कार्यकर्ते होऊन गेले. अनेक कार्यकर्ते आजही काम करत आहेत. पण संघाच्या शाखा झपाट्याने वाढतात आणि परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यक्रमाला परिवर्तन झालेले लोकच जास्त प्रमाणात असतात हे का? धर्म आणि श्रद्धा या देशातल्या लोकांच्या डीएनएमध्ये आहे. कदाचित परिवर्तन माझ्या डीएनएमध्ये आहे तसंच. म्हणून आपल्याला वादापेक्षाही कल्पकता दाखवावी लागेल. संध्याकाळी खेळायला म्हणून मुलांना एकत्र करून संघाची शाखा भरवली जाते. ही कल्पना चांगली आहे. आपण परिवर्तनाचा विचार अशा माध्यमातून रुजवू शकतो का? खेळण्यासाठी मुलांना एकत्र करून त्यांच्यात वैज्ञानिक विचार रुजवता येतील का? आपण परिवर्तनवादी आहोत याचा आपल्याला अहंकार आहे का? आपण सामान्य माणसाशी जोडून घेऊ शकत नाही आहोत का? धर्माची चिकित्सा तर व्हावीच, पण आपण फक्त तेवढंच करतो आहोत का? आपण पर्याय देतो आहोत का? आपल्याला परिवर्तन हवं आहेच, पण असे अनेक प्रश्नही आपण आपल्याला विचारले पाहिजेत. कारण आपण प्रश्न विचारणारेच लोक आहोत. त्यातून आपली स्वतःचीदेखील सुटका नाही.

भारतातील खरा झगडा हा हिंदू-मुस्लिम नसून कम्युनल हिंदू आणि लिबरल हिंदू हा आहे असं राम मनोहर लोहियांनी म्हटल्याचं स्मरतं. मला असं वाटतं हे दोघे एकत्र आले, किमान त्यांच्यातले ताण कमी झाले तर कदाचित आपल्याकडचे बरेच प्रश्न सुटतील. विभागला गेलेला फोर्स एकत्र येईल. हा भाबडेपणा आहे हे मला मान्य आहे. पण तरी मी हे म्हणतो आहे. कदाचित भाबडेपणा हाच माझा स्ट्रॅटेजिक विचार असेल.

३ सप्टेंबर २०१५, फेसबुक पोस्ट