Sunday, July 26, 2026

जाणिवांचं 'म्युटेशन' आणि क्रौर्यदर्शन!

माणूस नावाचा ‘प्राणी’ नक्की कसा आहे, त्याच्या वर्तनाचा, विचारांचा अर्थ कसा लावायचा हे कायमच बुचकळ्यात टाकणारे प्रश्न राहिलेले आहेत. आपण मनुष्य म्हणून विकसित झाल्यानंतर, संस्कृतीच्या एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर आपण सर्व माणसांकडून एका विशिष्ट, समान वर्तनाची अपेक्षा करतो. आणि जेव्हा ती अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा आपण अस्वस्थ होतो. समाजाचा गाडा सुरळीत सुरू राहावा या दृष्टीने आणि आपण ज्या मानवी मूल्यांना स्वीकारलं आहे त्यांची जपणूक करण्याच्या दृष्टीने ही अपेक्षा रास्त आहे. पण सामाजिक स्थैर्याच्या, संस्कृतीकरणाच्या ओघात मनुष्याने ‘प्रेडिक्टेबल’ असण्याची आपल्याला सवय होते. आपण वर्तनातील सातत्य गृहीत धरू लागतो. आणि मग जेव्हा माणसाचं विचित्र, गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन समोर येतं तेव्हा आपल्याला धक्का बसतो. 

माणसाच्या विचित्र वर्तनाची आपली अगदीच तयारी नसते असं नाही. माणसांना एकमेकांचा राग येणं, त्यांच्यात भांडणं-मारामाऱ्या होणं, त्यांच्यातले संबंध बिघडणं हे आपण समजून घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला ते मान्य होईलच असं नाही; पण माणसं अशी वागू शकतात हे आपल्याला तत्त्वतः मान्य असतं. आपल्याला स्वतःलाही अनेकदा कुणाचा तरी अतिशय राग आलेला असतो, एखादा माणूस डोळ्यासमोर नको असं वाटत असतं, त्याच्याबद्दल क्वचित काही हिंसक विचारही मनात चमकून गेलेला असतो. पण आपल्याला ज्याचा मोठा धक्का बसतो, दहशत बसते ती गोष्ट म्हणजे हत्या. एखाद्या चालत्या-फिरत्या, जिवंत माणसाला कुणीतरी मारून टाकू शकतं हे वास्तव स्वीकारणं आपल्यासाठी विशेष अवघड असतं. आपल्या आजूबाजूला अलीकडील काळात जे सातत्याने घडतं आहे ते असंच धक्कादायक, चक्रावून टाकणारं आहे. यात स्त्रियांवरील, अल्पवयीन मुलींवरील - अगदी बालिकांवरील अत्याचारांच्या घटना तर आहेतच; पण किरकोळ कारणामुळे खून झाल्याच्या घटनाही आहेत. मुंबई लोकलमध्ये क्षुल्लक कारणामुळे वादावादी होऊन बावीस वर्षांच्या मयंक लोहारची झालेली हत्या, लोहगडावरून खाली ढकलून दिल्याने सव्वीस वर्षांच्या केतन अग्रवालचा झालेला मृत्यू, ठाण्यात एका ज्येष्ठ नागरिकाला कॅब ड्रायव्हरने केलेली मारहाण या काही ताज्या घटना. महाराष्ट्रात या घटनांची चर्चा सुरू असताना एक घटना बंगलोरमध्येही घडली आहे. सोमसुंदर (वय ५२) आणि मुथुलक्ष्मी (वय ४८) हे दांपत्य आणि सुप्रिया ही त्यांची १९ वर्षांची मुलगी या तिघांची हत्या या दांपत्याच्या दुसऱ्या मुलीने (श्वेता, वय २४) तिच्या लिव्ह-इन पार्टनरच्या (केनेथ) मदतीने केल्याचा आरोप आहे. श्वेताला अटक झाली आहे. पुण्यातील येरवडा भागात राहणाऱ्या एका मनुष्याने ‘जेवणात मिर्चीचा खर्डा न दिल्याने पत्नीवर वार करून तिला जखमी केलं’ अशी बातमी ऑक्टोबर २०२४ मध्ये आली होती. त्याच सुमारास नऱ्हे भागात एका रात्री मद्यालयात जेवण करण्यासाठी गेलेल्या तरूणाने मित्राच्या ताटात हात घातल्याने वाद झाला आणि त्या तरूणाला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला अशीही बातमी होती. हडपसर भागात शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या व्यक्तीची ‘मोबाइल हॉटस्पॉट’ न दिल्यामुळे कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. (सप्टेंबर २०२४). 

इथे एक-दोन मुद्दे लक्षात घ्यावेत असं वाटतं. एक म्हणजे बऱ्याच प्रकरणांमध्ये सत्याचा उलगडा होण्याची प्रक्रिया दीर्घ काळ सुरू असते. त्यामुळे आपल्यासमोर जे येतं आहे ते बारकाईने वाचावं/पाहावं. पण निष्कर्ष काढण्याची घाई करू नये. दुसरं म्हणजे काही घटनांची चर्चा जास्त होते तर काहींची होत नाही, काही बातम्या आपल्यापर्यंत पोचतही नाहीत हे लक्षात घ्यावं. ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरो’तर्फे (एनसीआरबी) ‘क्राइम इन इंडिया’ हा अहवाल दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. १९५३ ते २०२४ चे अहवाल त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या अहवालातील ‘मर्डर’ विभागात देशभरात कोणकोणत्या कारणांमुळे किती हत्या झाल्या याची यादी दिलेली असते. २०२४ चा अहवाल पाहिला तर यात व्यक्तिगत वैर, हुंडाबळी, जातीय-धार्मिक तेढ, ऑनर किलिंग, दरोड्याच्या वेळी झालेल्या हत्या, प्रेमसंबंधातून तसेच विवाहबाह्य संबंधांतून झालेल्या हत्या, टोळीयुद्ध, मालमत्तेचे वाद, कौटुंबिक वाद अशी बरीच कारण दिसतात. यातलं एक कारण ‘किरकोळ वाद’ हेही आहे. २०२४ ची महाराष्ट्राची आकडेवारी पाहिली तर किरकोळ वादातून ३५४ हत्या झालेल्या आहेत. तमिळनाडू प्रथम क्रमांकावर आहे (४३१). महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. १९५३ पासून गुन्हेगारीचा आलेख कसा राहिला आहे याबाबतचे अभ्यासही उपलब्ध आहेत. १९५३ साली नोंदणी झालेल्या हत्यांची संख्या १०,००० होती. १९९१ साली ती ३९,००० होती. नव्वदच्या दशकापासून मात्र हा आकडा कमी झालेला दिसतो. २०२३ मध्ये २७,०५६ हत्या तर २०२४ मध्ये २६,३८३ हत्या नोंदल्या गेल्या आहेत. (हे फक्त नोंदणी झालेले गुन्हे आहेत, नोंदणी न झालेले गुन्हे असतातच. आणि कुठलीही आकडेवारी ही अखेरीस एखाद्या विषयाची साधारण निदर्शक असते. प्रत्यक्षात त्यात कमी-जास्त असण्याची शक्यता असते हे लक्षात असलेलं बरं).  

गुन्ह्यांची माहिती उपलब्ध असणं हा विश्लेषणाकरता उपयुक्त असा एक महत्त्वाचा भाग. पण समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि सर्वसामान्य नागिरकांच्याही आस्थेचा प्रश्न अर्थातच हा की हे का होतं? माणूस असं का वागतो? एमिल दुरखिम या प्रख्यात फ्रेंच समाजशास्त्रज्ञाने ‘सामाजिक स्वास्थ्य’ मोजण्यासाठी त्या समाजात किती आत्महत्या होतात हा आकडा ‘सोशल बॅरोमीटर’सारखा वापरला होता. त्याच धर्तीवर ‘खून’ ही घटनादेखील सामाजिक स्वास्थ्याच्या मोजमापासाठी वापरता येऊ शकते असं काही समाजशास्त्रज्ञ म्हणतात. रॉबर्ट मेर्टोन या अमेरिकन समाजशास्त्रज्ञाने म्हटलं आहे की एखाद्या समाजाने आपल्या लोकांपुढे ठेवलेली उद्दिष्टे (उदा. पैसा, प्रतिष्ठा इ.) आणि ही उद्दिष्टं साध्य करण्याचे ‘वैध’ मार्ग यांच्यात जेव्हा विसंवाद तयार होतो तेव्हा खून आणि इतर गुन्ह्यांमध्ये वाढ होते. हा कार्यकारणभाव महत्त्वाचा आहे कारण यातून माणूस हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याकडे वाटचाल कशी करू शकतो याचा एक खुलासा होतो. काही माणसांची वृत्तीच हिंसक असते, त्यांना राग अनावर होतो कारण तो त्यांच्या मेंदूतलाच एक दोष आहे असंही म्हणता येईल. पण एखाद्या मनुष्याची विशिष्ट वृत्ती जशी आहे तशी ती असण्याची संपूर्ण जबाबदारी त्याची एकट्याची आहे की त्यात त्या मनुष्याच्या विशिष्ट पर्यावरणाचा, विविध व्यवस्थांचा, त्या व्यवस्थांच्या ऐतिहासिक वाटचालीचाही वाटा आहे हा प्रश्नही इथे महत्त्वाचा ठरतो. बहुतांश हत्या या मानसिक स्थैर्य गमावल्याने, विवेकाचा विसर पडल्याने, मनात उसळून आलेल्या विकारांच्या अंमलाखाली होतात त्यामुळे व्यवस्थेवर जबाबदारी टाकून माणसाला मोकळं होता येणार नाही असा प्रतिवाद इथे होऊ शकेल. इथे ‘बायनरी’ स्वरूपाच्या वादात न अडकता समग्रतेने विचार करणं, सामान्यीकरण न करता त्या त्या प्रकरणानुसार निष्कर्ष काढणं योग्य होईल. १९७२ साली अमेरिकेच्या ‘फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने (एफबीआय) ‘बिहेवियरल सायन्स युनिट’ (वर्तनशास्त्र विभाग) स्थापन केलं होतं. सत्तरच्या दशकात लैंगिक अत्याचार आणि हत्या यांचं अमेरिकेतील वाढतं प्रमाण लक्षात घेऊन अमानुष स्वरूपाचे हिंसक गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा अभ्यास करण्यासाठी हा विभाग स्थापन झाला होता. (या विभागाने हाताळलेल्या केसेसवर आधारित ‘माइंडहंटर’ ही वेब सीरिज पाहण्यासारखी आहे). आज हा विभाग ‘बिहेवियरल रीसर्च अँड इंस्ट्रक्शन युनिट’ या नावाने कार्यरत आहे. भारतात असा विशेष विभाग स्थापन झालेला नसला तरी संस्थात्मक पातळीवरून गुन्हेगारांचं मानसशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न होत असतो. खून, बलात्कार यासारख्या घटनांमुळे उद्रेक निर्माण होणं स्वाभाविक आहे; पण गुन्हेगारांचं मानसशास्त्र समजून घेण्याची निकड त्याहून जास्त आहे. कारण त्याशिवाय आपण उत्तरांकडे जाऊ शकणार नाही. आणि लोकांनाही हे कळावं यासाठी हा मुद्दा सार्वजनिक चर्चविश्वात येणं गरजेचं आहे. 

याखेरीज फ्रेडरिक एंगल्सने काही हत्यांना ‘सामाजिक हत्या’ म्हटलं आहे. समाजात जेव्हा व्यवस्थात्मक पातळीवरच काही समूहांना वंचित ठेवलं जातं, त्यांचं जीवनमान कधीच सुधारत नाही, त्यांना आरोग्य समस्या किंवा अन्य आपत्तींचा सामना करावा लागतो आणि त्यातून जे मृत्यू होतात त्या समाजाने केलेल्या हत्या असतात असं एंगल्स म्हणतो. हत्येची प्रचलित व्याख्या विस्तारणारं हे एक महत्त्वाचं निरीक्षण आहे.  

२०२६ च्या संदर्भाने आपण खुनासारख्या गुन्ह्यांकडे बघतो तेव्हा या काळाचे विशिष्ट पैलूही लक्षात घ्यायला हवेत. त्यातला एक म्हणजे तरूणांचा वाढता सहभाग. ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार, हिंसक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या मुलांचं प्रमाण २०१६ मध्ये ३२.५% होतं ते २०२२ मध्ये ४९.५% पर्यंत वाढलं आहे. लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या उदाहरणांमध्येही काही आरोपी वयाने लहान आहेत. मला असं दिसतं की आपण आज ज्या परिवर्तनाचा सामना करत आहोत त्यात ‘मूल्यपरिवर्तन’ हा फार कळीचा मुद्दा झाला आहे. आणि तरूण मुलं या मूल्यपरिवर्तनामुळे प्रभावित होत आहेत. यात केवळ आधीची पिढी-आत्ताची पिढी असा नेहमीचा युक्तिवाद करण्याचा उद्देश नाही तर काळ जसजसा पुढे जातो आहे तसतसं नवीन पिढीचं मानस वेगळ्या प्रकारे, आपल्याला न कळणाऱ्या प्रकारे घडतं आहे, त्यांची मूल्यव्यवस्था सामाजिक आदर्शांचा अभाव असलेल्या वर्तमानात आकार घेते आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. वर उल्लेख केला ती ‘समाजाने समोर ठेवलेली उद्दिष्टे’ आज पूर्णपणे भौतिक समृद्धीशी जोडलेली आहेत. समाजातील धुरीण वर्ग, सत्ताधारी-राजकारणी वर्ग मूल्यात्मक बैठक असलेली भाषा बोलताना, आत्मपरीक्षण करताना, चिकित्सक विचार करताना, चिकित्सक विचारपद्धतीचे महत्त्व सांगताना, ‘विकासा’इतकीच ‘संकल्पनां’वर चर्चा करताना दिसत नाही. शिक्षण, नोकरी-व्यवसाय यात स्पर्धा होतीच. आता त्याची धार अमानुष म्हणावी अशी वाढली आहे. त्याचा ताण फार मोठा आहे. समाजमाध्यमं आणि मोबाइल यांच्यामुळे जो परिणाम होतो आहे त्याची आज सतत चर्चा होते आहे ही चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की या गोष्टींनी आपल्या ‘मनाच्या मुळा’पाशी जे घाव घातले आहेत त्याचं गांभीर्य बहुधा अजून आपल्या लक्षात आलेलं नाही. जीवशास्त्रात ‘म्युटेशन’ (सजीवांच्या डीएनए सीक्वेन्समध्ये होणारा बदल) अशी संज्ञा आहे. सतत कोसळणाऱ्य डिजिटल प्रपाताने आपल्या जाणिवांचं, मानसिक क्षमतांचं जवळजवळ म्युटेशन केलं आहे. तरूण असोत की प्रौढ, ‘अस्थिरता’ हा आपल्या मनाचा एक नवीन गुणधर्म झाला आहे. समोरासमोर बसून न बोलता डिजिटली बोलण्यातून मनाचे आणि समजुतीचे गुंते वाढून ते नात्यांमध्येही प्रतिबिंबित होत आहेत. जगण्याचं साधारण रूपांतर ‘कोलाहला’त झालं आहे. वास्तविक ‘वैचारिक कोलाहल’ (‘विचार कलह’ या अर्थी) ही मला अगदी जीवनावश्यक गोष्ट वाटते. पण विचार-कलह आपल्याला अंतर्मुख करणारा, आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा, जगण्याकडे तात्त्विक अंगाने, परानुभूतीच्या अंगाने बघायला शिकवणारा असतो. आजचा कोलाहल हा विचार-कलह नाही. तो अस्थिरतेकडे नेणारा, ताण आणणारा, संयम सोडायला लावणारा, राग निर्माण करणारा कोलाहल आहे. 

‘अमानुषीकरण’ (डीह्यूमनायझेशन) हेदेखील आजचं एक विशेष लक्षण आहे. आणि त्यातून एखाद्या व्यक्ती वा समूहाला लक्ष्य करून केलेली हिंसा समर्थनीय ठरवली जाते. विशेषतः समाजमाध्यमांवर चालणाऱ्या धुमश्चक्रीत एकमेकांना ‘विषारी साप’ ठरवणं, देशद्रोही ठरवणं यातून आपण सगळे ‘माणूस’ आहोत ही जाणीव पुसण्याकडे आपला प्रवास सुरु आहे असं दिसतं. आपल्याच देशातील तरूणांना, मग त्यातले काही तरूण आपल्याला बिनकामाचे वाटत असले तरी, सार्वजनिकरित्या ‘झुरळ’ म्हणणं हे अशाच अमानुषीकरणाचं उदाहरण आहे. त्याचबरोबर सामर्थ्य, पौरुष याचा संबंध थेटपणे आक्रमकतेशी जोडून हिंसेला आपण मूल्यात्मक मान्यताही देऊन टाकली आहे. समाजमाध्यमांमध्ये, फोनमध्ये अडकून पडल्याने जिवंत सामाजिक अनुभव न घेता येणं, अर्थपूर्ण नाती निर्माण न होणं, संवाद थांबणं हे घडतं आहे. मला सर्वात दखलपात्र आणि त्रस्त करणारी एक गोष्ट वाटते ती म्हणजे ‘माझं चुकलं’ या जाणिवेचं हळूहळू नष्ट होणं. आपण चुकू शकतो हे कुणालाच कसं वाटत नाही याचं राहून राहून आश्चर्य वाटतं. आपण स्वतःमध्ये प्रमाणाबाहेर अडकणं (त्याला डिजिटल माध्यमांचा हातभार लागणं) आणि त्यातून आपली चूक कबूल न करण्याची नवीन मूल्यव्यवस्था (!) मनात निर्माण होणं याचा हा परिपाक आहे असं माझं याबाबतचं विश्लेषण आहे.     

हिंसेला पूरक ठरेल, हिंसक वृत्तीला खतपाणी घालेल अशा वर्तमानात हिंसक स्वरूपाचे गुन्हे वाढणं यात आश्चर्य नाही. एक स्वतंत्र एकक म्हणून माणूस हिंसक होतो आहे हे दिसतं आहे. आणि या हिंसेचा भडका उडायला हातातला मोबाइलदेखील पुरेसा ठरू शकतो आहे. त्यामुळे आपण जर तांत्रिक व अन्य प्रगतीचा गौरव करणार असू तर त्याचबरोबर प्रगतीच्या किमतीबद्दल बोलणंही गरजेचं आहे. 

ज्या घटना घडत आहेत त्या प्रत्येक घटनेचं स्वतंत्रपणे विश्लेषण करणं आणि मग काही निष्कर्ष काढणं हे तर आवश्यक आहेच. पण समाज म्हणून आपण ज्या मार्गाने चाललो आहोत त्यातून गुन्हेगारी मानस घडायला हातभार लागतो आहे का याचा एकत्रित विचार करणंही आवश्यक आहे. गुन्हेगारीत तरूणांचा सहभाग वाढतो आहे हे खरं; पण त्याच्याकडे ‘आयसोलेशन’मध्ये बघता येईल का हा विचार प्रौढांनी करणं आवश्यक आहे. हिंसक घटनांच्या वाढत्या वारंवारतेने अस्वस्थ होणं समजण्यासारखं आहे; पण या घटना ‘परिणामस्वरूप’ आहेत हे लक्षात घेतलं आणि व्यक्तीविशिष्ट प्रश्न विचारण्याबरोबरच व्यक्तीला घडवणाऱ्या व्यवस्था नीट कार्यरत आहेत की नाहीत हे तपासलं तर कारणांवर काम करणं शक्य होईल. अन्यथा हळहळत राहण्यापलीकडे आपण काही करू शकणार नाही!    

- लोकसत्ता (लोकरंग), १२ जुलै २०२६ 


Tuesday, June 10, 2025

न भेटलेल्या सहयात्रिकाचं स्मरण

लेखकाने लिहितं असणं, विविध 'ट्रिगर्स'मुळे लिहितं असणं, वाचकांना वाचन थांबवणं अशक्य करणं, विलक्षण सूक्ष्म निरीक्षणशक्ती, स्मरणशक्ती आणि लेखकीय 'कारागिरी' अजिबात दिसू न देताही तिचा योग्य तो उपयोग करून घेण्याचं कौशल्य यांच्या बळावर रंगीबेरंगी माणसांनी नटलेलं 'चित्रमय जगत' उभं करणं, लोकांना त्यात रमवून टाकणं ही 'लेखकपणा'ची वैशिष्ट्यं वाचकांसाठी कुतूहलाचा विषय असतो. त्यातही मग एखादा लेखक जेव्हा तुमच्या रोजच्या जगण्याचा भाग होतो आणि त्याचा प्रभाव लक्षणीय काळापर्यंत राहतो तेव्हा तर अशा लेखकाबद्दल अधिकच कुतूहल वाटतं. लेखकाने लोकांच्या जगण्यात स्थान मिळवणं ही त्याच्या सर्जनशीलतेला मिळालेली पावती असते. महाराष्ट्र देशी हे ज्या लेखकांच्या वाट्याला आलं त्यातले पु. ल. देशपांडे अग्रणी! पुलं वयाच्या साठीत होते तेव्हा 'टीन एज'मधली माझ्यासारखी मुलं त्यांची प्रवासवर्णनं, व्यक्तिचित्रं, ललित लेख, नाटकं वाचून हरखून जात होतो. आजच्या 'मीमांसक' भाषेत (पण नकारात्मक नव्हे तर सकारात्मक अर्थाने) बोलायचं तर आमच्यासाठी पुलंचं लेखन म्हणजे 'डोपामाइन'चा आद्य स्रोत होतं! (नाटक 'वाचणं' याबद्दल कुणाचं काय मत असेल ते असो; पण टेबलावर किंवा एका हातात जेवणाचं ताट आणि एकीकडे 'तुझे आहे तुजपाशी'चं कितव्यांदा तरी वाचन हे दृश्य आमच्या घराने असंख्य वेळा पाहिलं होतं! आता पुस्तकाची जागा स्क्रीनने घेतली आहे. यावर वेगळी चर्चा संभवते. पण ते असो).

एकविसाव्या शतकाची पहिली पंचवीस वर्षं पूर्ण होण्याच्या टप्प्यावर विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या पुलंबद्दल एक नक्की म्हणता येईल की हा लेखक शिळा व्हायला तयार नाही. म्हणजे 'एकेकाळी पारायणं केलेली पुलंची पुस्तक आजही वाचतो' या अर्थी नव्हे. त्या वाचनाने तेव्हा जे आत उतरवलं ते अजूनही टवटवीत आहे या अर्थाने. त्यासाठी ती पुस्तकं पुन्हा वाचायची गरज नसते. नंदा प्रधान/लखू रिसबूड/नारायण/चितळे मास्तर/नाथा कामत/सखाराम गटणे/अंतू बर्वा/बबडू/हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका आणि इतर 'लोकोत्तर' वल्ली किंवा 'असा मी असामी'तले धोंडोपंत, शंकऱ्या, नानू सरंजामे, 'गुरूदेव' आणि कायकिणी गोपाळराव, 'बटाट्याच्या चाळी'तले आचार्य बाबा बर्वे, कोचरेकर मास्तर, सोकरजी त्रिलोकेकर, म्हाळसाकांत पोंबुर्पेकर, जनोबा रेगे, एच्च. मंगेशराव आणि वरदाबाई, नागूतात्या आढ्ये, 'वाऱ्यावरची वरात'मधली 'रविवार सकाळ' आणि 'साक्ष', 'म्हैस'मधली 'सुबक ठेंगणी', मधू मलुष्टे, झंप्या दामले, उस्मान शेठ, 'तुम्ही काही म्हणा उस्मानशेठ, सर्व धर्म सारखे...ऑम्लेट!' म्हणणारे बगूनाना, 'स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर' टेप लावणारे बाबासाहेब मोरे, धर्मा मांडवकर, 'ती फुलराणी'मधली मंजुळा, अशोक जहागीरदार, विश्वनाथ जोशी आणि मटक्याच्या अड्ड्यावरील तत्त्वज्ञ दगडोबा साळुंके, पुलंच्या लेखणीतून आपल्याशी थेट बोलणारे अनेक प्रसंग, व्यक्ती आणि ठिकाणं - हे सगळं पुन्हा वाचायची गरजच नसते इतकं ते तुमच्या आत भिनलेलं असतं. दैनंदिन संवादात पुलंच्या पात्रांचे संदर्भ आणि संवाद आजही हजेरी लावतात. पुलंच्या लेखनाचं साहित्यिक मूल्यमापन जे व्हायचं ते होवो; मराठी वाचकांनी त्यांना दिलेला कौल अबाधित आहे. 

पुलं साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा सगळ्या क्षेत्रात केवळ वावरले इतकंच नाही तर त्यांनी त्या त्या क्षेत्रात एक उंची गाठली. मात्र त्यांचं पहिलं प्रेम संगीतावर होतं. एकाच वेळी एका ठिकाणी गाण्याची मैफल आणि दुसऱ्या ठिकाणी साहित्यिक कार्यक्रम असं असेल तर मी गाण्याच्या मैफिलीला जाईन असं ते म्हणाल्याचं अनेकांना माहीत असेल. म्हणूनच बहुधा त्यांनी चितारलेल्या व्यक्तीचित्रांमध्ये गायक, संगीतकारांची व्यक्तीचित्रं विशेष उठून दिसतात. पुलंची व्यक्तीचित्रं म्हणजे त्यांच्या 'गुण गाईन आवडी' स्वभावाची द्योतक आहेत. गायक, लेखक, अभिनेते, नातलग, मित्र, शिल्पकार, सामाजिक-राजकीय विचारवंत, कार्यकर्ते, बाबा आमटेंसारखे मोठे समाजसेवक अशांविषयी लिहिताना पुलंची लेखणी कमालीची कृतज्ञ होई, भारावून जाई. त्यामुळे पुलंनी 'व्यक्तीचित्रण म्हणजे केवळ गुणवर्णन' असा पायंडा पाडल्याचा आरोपही त्यांच्यावर होतो. पण त्यांनी लिहिलेली काही व्यक्तीचित्रं, विशेषतः भास्करबुवा बखले आणि पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांची, वाचली तर हा समज पूर्णपणे बरोबर नाही याची खात्री पटते. बखले आणि पलुस्कर या दोन्ही व्यक्तीचित्रणात पुलंमधल्या गुणग्राहक, भावुक रसिकाइतकाच त्यांच्यातला संगीताच्या इतिहासाचा अभ्यासकही ठसठशीतपणे दिसतो. इतरही बऱ्याच व्यक्तीचित्रांमधून त्यांच्यातल्या सामाजिक-सांस्कृतिक भाष्यकाराची झलक मिळत असते. ('विश्रब्ध शारदा'च्या दुसऱ्या खंडाला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना हे आणखी एक उदाहरण). फक्त होतं असं की त्या व्यक्तीचित्रणाचा एकूण बाज प्रेमाचा, भारावलेपणाचा असल्याने काही गंभीर तपशील वाचक/समीक्षकांकडून निसटून जातात. पुलं गेल्यानंतर पुढच्याच वर्षी, २००१ साली प्रकाशित झालेल्या 'एक शून्य मी' या त्यांच्या लेखसंग्रहातले काही लेख (विशेषतः 'एक शून्य मी' हाच लेख) वाचून 'अरे! पुलंनी गंभीर लिखाणही केलेलं आहे की!' असा बऱ्याच वाचकांना साक्षात्कार झाला. (त्यात मीही होतो). या संग्रहातल्या त्यांच्या 'नामस्मरणाचा रोग' या लेखाने समाजमाध्यमांची वारी केल्याचं अलीकडे दिसलं. 

माणसाच्या जगण्यात साहित्याचं प्रयोजन काय, किंवा कलेचं प्रयोजन काय, उत्तम साहित्य/कला कशाला म्हणायचं यावर आजवर अगणित पानं खर्ची पडली असतील. माणूस, आणि त्यातही समीक्षक माणूस, स्वतःची दृष्टी, स्वतःचा काहीएक विचारव्यूह घेऊन जगत असल्याने हे होतच राहणार. पण समीक्षेच्या अदृश्य दडपणाखालीदेखील कलावंत त्यांची निर्मिती करत राहतात, समीक्षेला खाद्य पुरवत राहतात हे मला अधिक विशेष वाटतं. 'मोनालिसा स्माइल' या चित्रपटात कला इतिहास शिक्षक कॅथरीन (ज्युलिया रॉबर्ट्स) एकदा विद्यार्थिनींना चेम सूटीन या फ्रेंच इंप्रेशनिस्ट चित्रकाराचं 'कॅरकस ऑफ बीफ' या शीर्षकाचं एक चित्र दाखवते. ते चित्र मुलींनी आजवर पाहिलेल्या चित्रांमधून तयार झालेल्या त्यांच्या सौंदर्यदृष्टीला धक्का देणारं असतं. आणि मुख्य म्हणजे ते 'सिलॅबस'चा भाग नसतं. या 'आउट ऑफ सिलॅबस' चित्राबद्दल चर्चा सुरु होते. त्यात कॅथरीन म्हणते की तुम्हांला हे चित्र 'आवडायला'च हवं असं अजिबात नाही; पण तुम्ही ते 'विचारात' मात्र जरूर घेतलं पाहिजे. मला वाटतं हा विचार कलात्मक अभिव्यक्तीबाबत, कला क्षेत्रातील पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही आविष्कारांबाबत साधकबाधक चर्चा करताना लक्षात घ्यावा असा आहे. पुलंना वाचकांचं उदंड प्रेम मिळालं आणि दुसरीकडे समीक्षकीय दंडुक्यांनीही त्यांना सोडलं नाही. त्यांच्या काही लेखांमधून (उदा. 'विनोदी लेखन म्हणजे साहित्य? हॅट, हडत् किंवा हुडुत!' हा 'अघळपघळ'मधला लेख) त्यांनी या संदर्भात भाष्य केलं आहे. सुधीर बेडेकर, फ. मुं. शिंदे यांना दिलेल्या मुलाखतींमध्येही ते याबद्दल बोलले आहेत. (दोन्ही मुलाखती 'पुरचुंडी' या पुस्तकात आहेत. फ. मुं. शिंदेंना दिलेल्या मुलाखतीत भालचंद्र नेमाड्यांनी पुलंवर केलेल्या टीकेबद्दल पुलं जे बोलले आहेत ते ज़रूर वाचावं. आणि सुधीर बेडेकरांना दिलेल्या मुलाखतीत पुलंवर होणाऱ्या 'मध्यमवर्गीय लोकांचा मध्यमवर्गीय लेखक' आरोपाबद्दल ते जे बोलले आहेत तेही अवश्य वाचावं. पुलंसारखा लेखक 'माणूस' म्हणून कसा मोठा होता आणि वाचकांना तो का आवडतो हे लक्षात येईल!). स्वतः पुलंनी थिएटर ऑफ द ॲब्सर्ड, नवकविता, एकूणच त्यांना 'अनाकलनीय' वाटणाऱ्या कलाविष्कारांबद्दल विडंबनात्मक लेखन केलं आहे. भाऊ पाध्येंच्या लेखनशैलीचीही त्यांनी टोपी उडवली आहे. साहित्याच्या, कलेच्या क्षेत्रात भिन्न वृत्तीच्या, भिन्न विचारप्रवाहांचे पाईक असलेल्या कलाकार-समीक्षकांकडून टीकेची जी देवाण-घेवाण चालते ती ही मंडळी 'माणूस' आहेत हेही लक्षात घेत पाहावी लागते. मला जाणवणारं पुलंचं एक वैशिष्ट्य असं की ते जेव्हा भक्कम आणि निर्विष विनोदाचा आधार घेत टोप्या उडवत तेव्हा त्यातून होणारी 'रसनिष्पत्ती' लाजवाब असे! आज 'रोस्टिंग' हा विनोदाचा प्रकार चांगला रूळला आहे; पण त्यावेळी पुलंनीही काही प्रमाणात हे रोस्टिंग केलं होतं. प्रश्न मुळात विनोदाला मान्यता आणि प्रतिष्ठा देण्याचा आहे. 'विनोद' या साहित्यप्रकाराच्या स्वरूपातच अतिशयोक्ती, थोडी आक्रमकता, थोडे बोचकारे काढण्याची क्षमता हे सगळं असतं हे मान्य करण्याचा आहे. समाज म्हणून, वाचक-प्रेक्षक म्हणून तुम्ही हे करू शकलात तरच पुढची चर्चा संभवू शकते. 

आणि या आघाडीवर आज पुलंचं काय झालं असतं हा विचारही करवत नाही. जेव्हा पुलं विनोद करत होते (आणि जोडीला 'ठणठणपाळ'ची अद्भुत वटवट सुरू होती) तेव्हाही काही प्रमाणात त्यांना त्याचे काही उलट फटके बसत होते. 'वाऱ्यावरची वरात' सुरू होताना पुलं प्रेक्षकांसमोर येऊन 'आमचा हा कार्यक्रम मजेचा आहे. म्हणजे हसून सोडून द्यायचा आहे. त्यात 'साहित्यिक मूल्य वगैरे शोधू नका. सापडणार नाही' असं म्हणून पुढे अगदी काकुळतीने 'कृपा करून कुणी रागवू-बिगवू नका हं' असं म्हणायचे. पण तरी एकूणात बघता लोकांची विनोद स्वीकारण्याची, सहन करण्याची तयारी बरीच बरी होती असं म्हणता येतं. आज कदाचित पुलंचं अवघड झालं असतं. 'या भारतमातेनं एक वैताग आणलाय. जरा कुठे थोडा वेळ नातवंडांना खेळवेल तर नाव नाही. उठसूठ आपली सुपुत्रांना हाका मारत असते' असं त्यांनी एके ठिकाणी ओघात लिहिलं आहे. परदेशात स्त्री-पुरूषांचा मुक्त वावर पाहून 'आम्ही मात्र स्वतः प्रभू रामचंद्र असल्यासारखे सीतामायांना आमच्या मागून वागवत चाललो होतो' असं ते एका प्रवासवर्णनात लिहितात. आणखीही काही उदाहरणं आहेत. आता आज त्यांनी हे विनोद केले असते तर कदाचित संस्कृतीरक्षक आणि देशभक्तांनी त्यांच्या घरावर मोर्चे नेले असते आणि पुलंवर 'अर्बन नक्षल'चा शिक्काही बसला असता. 

१९२० ते २००० हा पुलंचा ऐंशी वर्षांचा कालखंड राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक बदलांच्या संदर्भात ज्या वेगाने पुढे सरकत गेला तितकाच वेग बहुधा २००० ते २०२५ या पंचवीस वर्षांच्या काळाला आहे. या काळातला बदलाचा वेग अचंबित करणारा आहे. डिजिटल जग वेगवान, सोयी-सुविधांचं असलं तरी ते बऱ्याच प्रमाणात हिंसकही आहे. एकीकडे 'प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी' आहे तर दुसरीकडे (ऐतिहासिक) अभावग्रस्तताही आहे. असं असतानाही बाजाराच्या तावडीतून कुणीच सुटलेलं नाही. लेखकही नाही. पुलं ज्या काळात वावरत होते तेव्हा लेखक आजच्याइतका असुरक्षित, प्रभावक्षम नव्हता. लेखक त्याच्या काळाचं अपत्य असतो असं म्हणतात; पण त्याचबरोबर तो त्याच्या काळाला काही प्रमाणात आकारही देत असतो. आज लेखकापुढे 'काळाचं अपत्य' असण्याला पर्याय नसल्यासारखी स्थिती आहे. वाचक आपल्या लेखकाचा शोध घेत असत; पण आता लेखकाला आपला 'टारगेट' वाचक शोधावा लागतो. कारण वाचकांचं लक्ष प्रचंड विभागलेलं आहे. एक तर वाचकाचा प्रेक्षक झाला आहे. त्यामुळे चोवीस तास स्क्रीनवर गळणाऱ्या 'कंटेंट'वरचे त्यांचे डोळे आपण लिहिलेल्या कथेकडे वळवण्याची उस्तवार लेखकालाच करावी लागते.    यातून आजचा लेखक या काळासारखाच विखंडित, विस्कळीत झालेला दिसतो. (हे म्हणणं म्हणजे काही अंतिम निवाडा नाही. एक ढोबळ निरीक्षण आहे इतकंच). आज पुलं असते तर कदाचित ते स्वतःदेखील समाजमाध्यमांच्या जंजाळात हरवले असते. कारण त्यांचा स्वभाव माणसांमध्ये रमण्याचा होता. पण त्यामुळे ते स्वतः भरभक्कम निर्मिती करण्याऐवजी समाजमाध्यमांवर प्रतिक्रियांना उत्तरं देत बसले असते. अंतहीन चर्चांमध्ये अडकले असते. (अर्थात सुनीताबाईंनी त्यांना बाहेर काढलं असतं!). पुलंनंतर त्यांच्यासारखा हरहुन्नरी, अष्टपैलू लेखक-कलावंत मराठी जगतात अद्याप झाला नाही; पण भविष्यात कधी होईल का असा प्रश्न काहीजणांच्या मनात येत असेल. मला हा प्रश्न तितकासा प्रस्तुत वाटत नाही कारण कलाकृती आणि कलावंत या दोहोंच्या 'निर्मिती'बाबत आपण गणिती पद्धतीने काहीच सांगू शकत नाही. (शिवाय वर उल्लेख केलेली 'काळाची दुखणी' आहेतच!). पुलांसारखा लेखक होवो अथवा न होवो, जे लेखक होतील त्यांनी त्यांच्यासारखा 'माणूस' लेखक व्हावं असं मात्र मनापासून वाटतं. पुलंमधला लेखक, रसिक आणि सहृदय माणूस वेगळा काढता येत नाही इतके ते एकजीव झालेले दिसतात. पुलंबद्दल आत्मीयता वाटण्याचं हे एक मुख्य कारण आहे. 

'कृतज्ञ असणं ही सर्वात सुंदर गोष्ट आहे आणि कृतघ्न असणं सर्वात कुरूप गोष्ट आहे' असं पुलंनी म्हटलं आहे. सांस्कृतिक-वैचारिक क्षेत्रात चर्चा, समीक्षा, 'विचारधारा आणि व्याख्यांची युद्धं' हे सगळं सुरू असायला हरकत नाही; पण पुलंचं हे साधं म्हणणं लक्षात ठेवून ते केलं तर कदाचित हा प्रवास सुसह्य होईल. पुलंना 'आनंदयात्री' म्हटलं जातं त्याची अशा वेळी आठवण होते. ते आज असते तर त्यांनी काय केलं असतं किंवा नसतं याचं मला फारसं कुतूहल नाही; पण त्यांच्यासारखा 'सहयात्री' आपल्याबरोबर आहे याचा मला अतीव आनंद झाला असता!

(लोकसत्ता, 'लोकरंग' ८ जून २०२५) 

Wednesday, February 26, 2025

गांधीजी : ‘अवघड आदर्श’ ते ‘सुलभ वर्तन’

गांधीजी आपल्याला कसे दिसतात, अकादमिक अभ्यासाच्या पलीकडे जात लोकांच्या दैनंदिन जगण्यात गांधीजींचं काय स्थान आहे  याचा विचार करताना काहीसं भोवऱ्यात सापडल्यासारखं होतं. ते अशासाठी की गांधीजींचा 'रिलेव्हन्स' संपला आहे का यावरचं माझं स्पष्ट उत्तर 'नाही' असं असलं तरी गांधीजींबद्दल आज हजारो पुस्तकं आणि लक्षावधी पानं उपलब्ध असतानाही भारतीयांना गांधीजी नीट कळले आहेत का आणि मुख्य म्हणजे, गांधीजींकडून आपण काय घ्यायचं हे नीट कळलं आहे का हे प्रश्न हैराण करत राहतात.

गांधीविचारांबाबत खुद्द गांधीजींचं लेखन वाचलेलं नसण्याबरोबरच गांधीजींबाबत स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात जे राजकारण खेळलं गेलं त्याचाही गांधीजी 'न कळण्याला' हातभार लागला आहे. हिंदुत्ववादी विचारधारेने स्वातंत्र्यपूर्व काळापासून सातत्याने, चिकाटीने गांधीजी आणि गांधीविचार मलीन करण्याचा प्रयत्न केला.गांधीजी म्हणजे 'नेभळट अहिंसक' अशी प्रतिमा जनमानसात रुजवण्यात त्यांना यश आलं. (मी माध्यमिक शाळेत असताना शाळेतील समाजशास्त्राचे शिक्षक आणि मराठीच्या शिक्षिका वर्गात मुक्तकंठाने गांधीजींवर तोंडसुख घेत). दुसऱ्या बाजूने हिंदुत्ववादाच्या शीर्ष नेतृत्वाने मात्र कधीच गांधीजींवर थेट टीका केली नाही. कायम त्यांचे गोडवे गायले. गांधीजींची 'दुसरी हत्या' करण्याचं काम केलं ते या शीर्ष नेतृत्वाच्या हाताखालील असंख्य 'फूट सोल्जर्स'नी. गांधी म्हणजे अहिंसा, म्हणजे थोडक्यात हिंसा सहन करणं आणि हिंसेचा प्रतिकार न करणं, हे समीकरण तर लोकांच्या मनात इतकं घट्ट बसवलं गेलं आहे की गांधींनी लोकांना एकत्र करून संघटितपणे सत्याग्रह घडवले, लोकांनी परदेशी कपड्यांवर, परदेशी मालावर बहिष्कार घातले, लोक निर्भयपणे ब्रिटिश सत्तेसमोर उभे राहिले, स्त्रिया फार मोठ्या संख्येने स्वातंत्र्याच्या आंदोलनात आल्या हा सगळा इतिहास जणू आता विस्मृतीतच गेला आहे. गांधी म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नांत बाधा आणणारे कुणीतरी होते अशा प्रकारची मांडणी सातत्याने होताना दिसते. वस्तुतः गांधीजी काँग्रेसप्रणित स्वातंत्र्य चळवळीच्या अग्रभागी होते. सशस्त्र क्रांतिकारक त्यांच्या मार्गाने जात होते आणि आज जी मंडळी उठता बसता गांधींच्या नावाने बोटं मोडतात, गांधीजी नसते तर स्वातंत्र्य लवकर मिळालं असतं असं म्हणतात त्यांचे पूर्वज या सगळ्यात कुठेच नव्हते! 

गांधीजी आणि त्यांचा 'रिलेव्हन्स' या विषयावर चर्चा करताना गांधीजी आणि हिंदुत्ववादी राजकारण हा संदर्भ पूर्णपणे टाळता येणं शक्य नाही म्हणून हे नोंदवलं. 

तर मुद्दा असा की गांधीजी आपल्याला नीट कळले आहेत का? आणि जर गांधीजी म्हणजे 'एका गालावर कुणी मारलं तर दुसरा गाल पुढे करा' किंवा 'रोज खजूर खा, तांबडा भोपळा खा, सिनेमा बघू नका, कुठलंही यंत्र वापरू नका' हे आपलं आकलन असेल तर आपली प्रचंडच मोठी गफलत झाली आहे! ('एका गालावर कुणी मारलं तर दुसरा गाल पुढे करा' हे मुळात येशू ख्रिस्ताचं वचन आहे. गांधीजींचं नाही.) गांधीजींचं एकूण तत्त्वज्ञान, त्यांचा 'जीवनमार्ग' हा अहिंसा, सत्य, साधेपणा, स्वावलंबन या मूल्यांवर आधारित आहे हे स्पष्टच आहे. त्यांची एक जीवनदृष्टी होती. परस्परपूरक आणि माणसाचं 'मनुष्यत्व' सिद्ध करणारं जीवन कसं असावं याविषयी त्यांची एक धारणा होती. आता या विशिष्ट जीवनदृष्टीवर आधारलेलं प्रत्यक्ष जीवन कदाचित कुणाला 'अव्यवहार्य' वाटूच शकतं. पण प्रश्न असा आहे की अशी जीवनदृष्टी असण्याचा आणि त्याप्रमाणे जगण्याचा गांधीजींना अधिकार आहे की नाही? ते ज्या पद्धतीने जगले तंतोतंत त्याच पद्धतीने जगानेदेखील जगावं यासाठी त्यांनी कधी कुणाला वेठीला धरलं नाही. जगाने - निदान भारताने, त्यांच्या आसपासच्या माणसांनी, एक विशिष्ट जीवनशैली स्वीकारावी अशी त्यांची इच्छा नक्कीच असणार/होती, त्यांच्या लेखनातून, भाषणांतून त्यांनी आपल्या जीवनशैलीचा प्रसारही केला असेल; पण पुन्हा तोच प्रश्न - त्यांना तसं करण्याचा अधिकार का नसावा? झालं असं की गांधीजींची एकूण मांडणी इतकी वेगळी आणि अनोखी होती की 'हे काहीतरी ग्रेट आहे' असं वाटून सगळ्यांना गांधीजींचा नैतिक धाक वाटू लागला. पण 'हे ग्रेट आहे'च्या पोटात 'आपल्याला काय हे जमणार नाही' हाही विचार होता. त्याचंच पर्यवसन पुढे 'हे अव्यवहार्य आहे' या विचारात झालेलं दिसतं. 

गांधीजींना त्यांच्या अनुयायांनी, राजकीय वारसांनी गांधीजींना एका उंचीवर नेऊन ठेवलं आणि त्यातून गांधी म्हणजे एक 'अवघड आदर्श' आहे, तो प्रत्यक्षात साध्य करता येत नाही अशी समजूत सार्वत्रिक झाली. वर उल्लेख केल्याप्रमाणे यात भर म्हणून हिंदुत्ववादी विचारधारेने गांधीजींची पुरेपूर बदनामी होईल याची काळजी घेतली. आंबेडकरवादी, कम्युनिस्ट, समाजवादी यांचेही गांधीजींशी मतभेद होतेच; पण त्यांनी गांधीजींबाबत विद्वेषी, विखारी आणि खोटा प्रचार केला नाही. क्वचित काही ठिकाणी तीव्र भाषा वापरलेली आढळू शकेल; पण हिंदुत्ववाद्यांनी जसं गांधी-नेहरूंना शत्रू मानलं होतं तसं इथे नक्कीच झालेलं नाही.   

एका लेखाच्या मर्यादेत आपल्याला सर्वच मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करता येणार नाही; पण गांधीजींबाबत 'ते यंत्रविरोधी होते, त्यांना आधुनिकता नको होती' हा जो आक्षेप दिसतो त्याविषयी थोडं बोलता येईल. यंत्र, आधुनिकता याबाबत गांधीजींचा जो 'डिनायल मोड' दिसतो त्याचा संबंध त्यांना जो 'नीतिमान माणूस' निर्माण व्हावासा वाटत होता त्याच्याशी आहे असं मला दिसतं. (मला कुणी विचारलं की गांधीजी आपल्याला काय देतात तर माझं एका शब्दातलं उत्तर 'नीतीविवेक' हे असेल). माणसाची भौतिक प्रगती, सुखसुविधायुक्त जीवन आणि माणसाची नैतिक उन्नती या झगड्यात त्यांची निवड स्पष्ट होती. खरं तर नैतिक उन्नतीला पर्यायच असू शकत नाही, पण भौतिक प्रगती जेव्हा हळूहळू समाजमनाचा कब्जा घेते तेव्हा नैतिकता 'बॅक सीट'ला जाऊ लागते आणि मग निवडीचीच वेळ येते.  माणूस हा परंपरानिष्ठ, आधुनिकतावादी असा काही असण्यापेक्षा 'माणूस' म्हणून उन्नत असणं गांधीजींना अत्यंत महत्त्वाचं वाटत होतं आणि त्याच्या आड जे येईल ते नको असं त्यांचं म्हणणं होतं. मग ती परंपरा असो की आधुनिकता. 

आज आपण यंत्रांनी घेरले गेलो आहोत. आपलं आयुष्य सोपं झालं आहे. पण आपण जर यंत्र उत्पादनाची पूर्ण साखळी (कच्चा माल - त्यावरील प्रक्रिया - उत्पादन - वितरण) जवळून पाहिली तर तिथे सगळं आलबेल आहे असं आपण म्हणू शकू का? मॉलमध्ये किंवा दुकानात वस्तूंच्या अवतीभवती जी प्रसन्नता आणि चकचकीतपणा दिसतो तो या उत्पादन साखळीतल्या प्रत्येक टप्प्यावर आणि मुख्य म्हणजे त्यात गुंतलेल्या माणसांच्या जगण्यात आणि अंतरंगात दिसतो का? भौतिक प्रगती झाली, पण त्याबरोबर वाढलेलं प्रदूषण, शहरातील बेसुमार गर्दी आणि बकाल जगणं, गुन्हेगारी, आर्थिक विषमता या गोष्टी भौतिक प्रगतीच्या कुठल्या खात्यावर टाकायच्या हा प्रश्न आहे. आज आपण टीव्ही, मोबाइल, इंटरनेट या गोष्टी वापरतो, पण त्यांचे दुष्परिणाम लपून राहिलेले नाहीत. व्हॉट्सअॅप हे संवादाचं माध्यम म्हणून चांगलं आहे, पण त्याचा वापर विद्वेषी प्रचारासाठी केल्याने काय झालं आहे हे आपल्याला माहीत आहे. इथे गांधीजींच्या 'माणसाची' आठवण होतेच. माणूसच जर घडायचा बाकी आहे तर त्याच्या हाती यंत्र देऊन काय उपयोग?

आधुनिकतेने माणसासमोर टाकलेले काही पेच गहन आहेत. एक गोष्ट खरी की तंत्रज्ञान विरुद्ध माणूस असा मूळ झगडा नाही. मूळ झगडा माणूस विरूद्ध माणूस असाच आहे. नैसर्गिक संसाधनं आणि उत्पादन साधनांवरील केंद्रित मालकी, काही मोजक्या लोकांच्या बुद्धीमुळे शक्य झालेली आणि मोजक्या लोकांच्या नियंत्रणात राहणारी तंत्रज्ञानाची झेप, मात्र त्यातून प्रभावित होणारं असंख्यांचं जगणं आणि या सगळ्या गतिशील वास्तवात शासनयंत्रणेचा सहभाग आणि नियंत्रण असे विविध मुद्दे इथे विचारात घ्यावे लागतात. गांधीजींचं वैशिष्ट्य हे की माणसाची स्वतंत्र, स्वावलंबी, 'आत्मबल'युक्त आणि सामाजिक दृष्टी असलेली घडण डोळयासमोर ठेवून ते समाजनिर्मितीचा विचार करतात. प्रत्यक्षात ते शक्य झालं का, होईल का हा मुद्दा वेगळा, पण विवेक जागा ठेवायचं, मूलभूत प्रश्न विचारायचं काम गांधीजी करतात. 'थांबा आणि विचार करा' हे सांगतात आणि म्हणूनच ते आपल्यासाठी 'गाइडिंग लाइट' ठरतात. 

गांधीजींनी पूर्ण यंत्रविरोध केलेला नाही तर यंत्रविवेक सांगितला आहे. आज आपण 'डिजिटल डीटॉक्स'बद्दल बोलतो आहोत. 'स्क्रीन टाइम' कमी करण्याबद्दल बोलतो आहोत. पर्यावरणीय संकटाबद्दल बोलतो आहोत. आत्मिक शांतीबद्दल बोलतो आहोत. यंत्रांचा वापर जेव्हा आजच्यापेक्षा कैक पटीने कमी होता तेव्हा गांधीजी असंच काही सांगत होते यात त्यांचं द्रष्टेपण दिसून येतं. 'पर्यावरण रक्षण' हा शब्ददेखील चर्चेत नव्हता तेव्हा गांधीजी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा पुरस्कार करत होते - पर्यावरणपूरक जीवनशैली हा शब्द न वापरता! लक्षात घेण्याजोगा भाग हा की अशी जीवनशैली स्वीकारणं याला त्यांच्या दृष्टीने एक 'स्वतोमूल्य' होतं. पर्यावरणाचा इतका विनाश होईल याची त्यांना कदाचित त्या क्षणी कल्पनाही नसेल; पण पर्यावरणाला बाधा पोचेल म्हणून नाही तर एक जीवनमूल्य म्हणून विशिष्ट जीवनशैली स्वीकारली पाहिजे हा त्यांचा विचार निश्चितच क्रांतदर्शी होता.  

गांधीजींबाबत एक अडचण अशी झाली आहे की त्यांचा वापर मोजमापाच्या फूटपट्टीसारखा केला जातो. म्हणजे गांधीजींचा प्रभाव असलेल्या एखाद्याने जर नवीन कार घेतली किंवा बंगला बांधला तर 'हे तुम्हांला बरं चालतं? आता कुठे गेला तुमचा गांधीवाद?' असं त्याला विचारलं जाऊ शकतं. गांधीजी ज्या जीवनशैलीचा पुरस्कार करत होते तिच्याशी सुसंगत नसलेल्या काही गोष्टी करूनही आपण गांधीजींच्या प्रभावात आहोत असं म्हणणं योग्य होईल का या प्रश्नाचं उत्तर मी 'हो, होईल' असं देईन. याचं कारण असं की गांधीविचाराचा परीघ बराच मोठा आहे आणि 'गांधीविचार' या फूटपट्टीने सगळंच मोजत राहिलं तर मग जोवर आपण पंचा नेसत नाही तोवर आपल्याला गांधींचं नाव घेण्याचा अधिकार नाही असं म्हणावं लागेल. वर म्हटलं तसं नीतीविवेक हा गांधीविचाराच्या गाभ्याशी आहे. त्यामुळे त्या कसोटीवर आपली कृती घासून पाहणं हे आपण जरूर करावं. गाडी किंवा बंगला बाजूला ठेवू, आपण बाजारातून साधा शर्ट घेतला तरी त्या शर्टच्या निर्मितीत कुणाचं शोषण झालेलं नाही असं आपण खात्रीपूर्वक सांगू शकणार नाही. पण म्हणून आपण शर्टदेखील घ्यायचा नाही असं ठरवण्यात हशील नाही. आपण कपड्यांच्या मोहात किती अडकायचं हा निर्णय मात्र आपण विवेकाने घेऊ शकतो. शिवाय जर एखाद्याला खरंच वाटलं की मी माझा शर्ट माझ्या हाताने तयार करेन आणि त्याने तसं केलं तर ते अर्थातच प्रशंसनीय आहे. पण गांधीविचार उचलून धरण्यासाठी तशी पूर्वअट असू शकत नाही. (आजही हाताने सूत कातून त्याचे कपडे वापरणारे काहीजण आहेत. पुण्यात राहणारे माधव सहस्त्रबुद्धे हे एक उदाहरण. माधवदादा सूतकताईचं प्रशिक्षणही देतात. यूट्यूबवर त्यांचे व्हिडीओ पाहता येतील). 

एका बाबतीत मात्र मी आग्रही आहे. आपण जर गांधीविचारांमुळे खरोखरच प्रभावित झालो असू तर ते आपल्या संवादी आणि सहिष्णू असण्यातून मात्र दिसायला हवं. याबाबतचा माझा अनुभव सांगावासा वाटतो. मी गेली बरीच वर्षं फेसबुकवर सक्रीय होतो. वर उल्लेख केलेली संवादमालिका मी फेसबुकवर लिहिली यात फेसबुकचा एक व्यासपीठ म्हणून जसा सहभाग आहे तसाच याच माध्यमावर पडलेले गटतट, त्यांच्यातला विसंवाद आणि विखार ही कारणेही आहेत. राजकीय ध्रुवीकरण इतक्या घातक वळणावर आलं आहे की विवेक जागृत असणाऱ्या कुणाही माणसाला अगदी नैराश्य यावं. अशा वातावरणात गांधीजींचा शांत, संयमी स्वरच मदतीला येणार आहे. या सगळ्या कोलाहलाला भेदून जाणार आहे. फेसबुकवरील माझ्या वावरात मी संयमीपणे, दुराग्रह न बाळगता, विरोधी मताला - अगदी विद्वेषी टिप्पण्यांनाही शांतपणे उत्तर देत जे लेखन केलं त्याचा प्रेरणास्रोत मला गांधीविचारच वाटतो. आणि मला हे आवर्जून नोंदवावंसं वाटतं की शांतपणे प्रतिवाद करण्याचे सकारात्मक परिणाम मला दिसलेले आहेत. विरोधी मत असलेले अनेकजण माझ्याशी शांतपणे बोलते झाले आहेत. 'माणूस परिवर्तनशील आहे, माणसात बदल होऊ शकतो, माणसातला माणूस जागा करणं हे माझं उद्दिष्ट असायला हवं' यावर गांधीजींचा विश्वास होता. या मूलभूत विश्वासाचा माझ्या व्यक्तिगत आयुष्यात आणि सामाजिक आयुष्यातही मला फार फायदा झाला आहे. 

त्यामुळे आपल्याला सगळ्या चर्चेअंतीदेखील जर गांधीजी 'टोकाचे आदर्शवादी' वाटत असतील तर ठीक आहे. तो मुद्दा बाजूला ठेवू. त्यांचं व्यापक तत्त्वज्ञान/विचार बाजूला ठेवू. पण त्यांनी ज्या मूल्यांचा आग्रह धरला ती मूल्यं - खरं बोलणं, दुसऱ्याचं ऐकून घेणं, संवाद करत राहणं, मुळात माणसांविषयी मनामध्ये प्रेम असणं - ही जरी आपण रोजच्या जगण्यात आचरणात आणू शकलो तरी पुष्कळ झालं.एवढी एक सोपी फूटपट्टी लावली आणि बाकी अवजड फूटपट्ट्या बाजूला ठेवल्या तरी हरकत नाही. इथे यशस्वी झालो की हळूहळू इतर आघाड्यांवरही यश येऊ शकेल! 

('संवाद' या अन्नपूर्णा परिवाराच्या मासिकात प्रकाशित) 


Wednesday, February 19, 2025

इतिहासाचं ओझं आणि वर्तमानाची फाळणी

इतिहासातील घडामोडींकडे आपण जेव्हा आज बघतो आणि आपल्याला त्या अन्याय्य वाटतात तेव्हा त्याबद्दल आपल्या मनात संताप खदखदत राहणं हे समजण्यासारखं आहे. इतिहासातील विध्वंस-अन्याय-शोषणाचं उत्तर जेव्हा शे-दोनशे वर्षांनी एखादं विध्वंसक कृत्य करून दिलं जातं तेव्हा त्याचं समर्थनही केलं जातं. बाबरी मशीद पाडणं बरोबर होतं असं मागे केव्हातरी बोलताना आरएसएसमधला एक मित्र म्हणाला होता. त्याबाबत तो अर्थातच पूर्णपणे ठाम होता - सगळेच हिंदुत्ववादी असतात तसा. आता याची एक 'फ्लिप साइड' अशी आहे की ज्या समूहातर्फे हे उत्तर दिलं जातं त्या समूहालाही जर त्या समूहाने केलेल्या इतिहासातील गैरकृत्यांबद्दल कुणी प्रत्युत्तर दिलं तर त्याला ते स्वीकारणं भाग पडतं. उदा. बाबरी मशीद पाडण्याचं जसं समर्थन होऊ शकतं तसं जर समजा मूळच्या बौद्धांनी (नवबौद्ध नव्हेत) पूर्वी जिथे बौद्ध लेणी होती असं एखादं मंदिर पाडलं आणि ऐतिहासिक अन्यायाचं परिमार्जन करण्याचा आमचा मार्ग म्हणून त्याचं समर्थन केलं तर सवर्ण हिंदूंना ते मान्य करावं लागेल. आजच्या दलितांचा संदर्भ घेतला तर ज्या मंदिराच्या बांधकामात महारांचा बळी गेला आहे असं एखादं मंदिर पाडलं तर ते समर्थनीय होईल. किंवा आमच्यावरील ऐतिहासिक अन्यायाचं परिमार्जन करण्याची आमची प्रतीकात्मक कृती म्हणून एखादं मंदिर पाडलं असंही आर्ग्युमेंट होऊ शकेल. ही उदाहरणं म्हणून सांगितली आहेत. या आर्ग्युमेंट्सच्या योग्यायोग्यतेबाबत वेगळं बोलता येईलच. (पराकोटीचा अन्याय सहन करूनही दलितांकडून कधी विध्वंसक कृत्य झालेलं नाही हे इथे नोंदवावंच लागेल).  

आता या उदाहरणाला आणखी फाटे फुटतीलच. हिंदुत्ववादी म्हणतील की दलितांवर अन्याय झाला हे बरोबरच आहे; पण मुस्लिमांनी जशी हिंदूंची कत्तल केली तशी दलितांची कत्तल झालेली नाही. ('हिंदूंची कत्तल' याला केवळ धार्मिक आयाम नसून साम्राज्यविस्ताराचा आयाम आहे. शिवाय हिंदू राजेही आपसात लढले होतेच. पण सध्या तो मुद्दा बाजूला ठेवू).  त्यावर दलितांची एकगठ्ठा कत्तल झाली नसली तरी दलितांवरील सुट्या सुट्या हिंसेचा हिशेब काढला तर तो सामूहिक कत्तलीएवढाच होईल असं प्रत्युत्तर देता येईल. हिंदुत्ववादी म्हणतील की सवर्ण-दलित संघर्ष हा हिंदूंचा अंतर्गत मामला आहे; पण मुस्लिम हे समस्त हिंदूंचे शत्रू होते. त्यावर असं उत्तर देता येईल की अंतर्गत मामला हे सवर्णांना सोयीचं आर्ग्युमेंट आहे. आम्ही मुळात हिंदू धर्माचे शोषित आहोत. आम्हांला ज्या धर्मात मानाचं स्थानच नाही त्या धर्माच्या धुरीणांनी मुस्लिमांना टारगेट करायचं असेल तेव्हा 'अंतर्गत मामला' म्हणायचं आणि इतर वेळी वर्णश्रेष्ठत्व मिरवायचं हा दुटप्पीपणा आहे. आम्हांला मुळात हिंदू धर्माबद्दल काडीचंही प्रेम नाही. उलट इस्लाम स्वीकारल्यानंतर आमच्यातील अनेकांची स्थिती सुधारल्याचे दाखले देता येतील. (काही वर्षांपूर्वी याकूब मेमनच्या अंत्ययात्रेला झालेली गर्दी हा वादाचा मुद्दा झाला होता. बाबरीप्रमाणेच हे उदाहरण घेतलं तर याकूब मेमनचं समर्थन आणि नथुराम गोडसेचं समर्थन असे दोन मुद्दे घेता येतील आणि दोन्हीकडून वर केली आहेत त्या धर्तीची आर्ग्युमेंट्स करता येतील).

वरील चर्चा ही मुद्द्याचा विस्तार करण्याच्या उद्देशाने केली आहे. एखाद्या वादाकडे, वादग्रस्त घटनेकडे बघताना काय प्रकारची आर्ग्युमेंट्स येऊ शकतात याची झलक दाखवण्यासाठी. आर्ग्युमेंट्स, युक्तिवाद ही अनेक बाजूंनी लढवता येण्याजोगी आणि समर्थन करता येण्याजोगी बाब असते. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या दृष्टिकोनाला घट्ट धरून आर्ग्युमेंट्स करतो तेव्हा त्याचा प्रतिवाद होऊ शकतो आणि तोही तितकाच कन्व्हिन्सिंग असू शकतो हे लक्षात घेणं आवश्यक असतं. अर्थात आपल्याला वैचारिक पातळीवर पुढे जायचं असेल तर. अन्यथा आपलं आर्ग्युमेंट लटकं पडतंय याची स्पष्ट जाणीव झालेली असतानाही ते पुढे रेटत राहिल्याची अनेक उदाहरणं पदोपदी दिसतातच.

इतिहासातील घडामोडी, अन्याय आणि आपलं आजचं वर्तमान यात आपल्याकडे इतिहास बरेचदा जिंकतो याचं एक कारण आपण प्रत्यक्षात आपला पायाखालच्या, आजच्या जमिनीवर उभे असलो तरी मनातून आपण 'इतिहासाच्या जमिनी'वर उभे आहोत हे आहे. एका अर्थी आपण इतिहासाचे गुलाम आहोत. कुठल्याही कट्टर धार्मिक विचारसरणीला तर इतिहासाला रजा देणं कधीच परवडत नाही. कारण तसं केलं तर त्यांच्या तथाकथित 'वैचारिक पाया'खालची जमीनच हिसकावली जाते! त्यामुळे पंधराव्या-सोळाव्या शतकात जे झालं त्याच्या आधारे आज एकविसाव्या शतकात आपण काही विचार-कृती करायला नको हा विचार त्यांना पटू शकत नाही. त्यांचं मानसच इतिहासाच्या मोल्डमध्ये घडवलं गेलेलं असतं. अशा मानसिकेतला कसं सामोरं जायचं हा एक मोठाच प्रश्न असतो. (इतिहास हा मुद्दा महत्त्वाचा मानायचाच असेल तर 'हिंदू-मुस्लिम संबंध : तेव्हा आणि आता' तसंच 'सवर्ण-दलित संबंध : तेव्हा आणि आता' असे दोन विषय उभे राहू शकतात).

यानंतर आता याच विषयाशी जोडलेली पण थोडी वेगळी चर्चा करू. काही हिंदी चित्रपटांच्या संदर्भाने आहे. एका सांस्कृतिक अवकाशात हिंदू-मुस्लिम संबंधांबद्दल काही आश्वासक चित्रण होत होतं हे सामाजिक चर्चाविश्वासाठी मार्गदर्शक ठरू शकेल.    

'आमिर' नावाचा एक फार प्रभावी चित्रपट २००८ मध्ये येऊन गेला. (दिग्दर्शक - राजकुमार गुप्ता). खिळवून ठेवणारी कथा, अमित त्रिवेदीचं अफलातून संगीत, उत्तम सिनेमॅटोग्राफी, अवाक करणारा शेवट! मुंबई एअरपोर्टवर उतरल्या उतरल्या एका इस्लामिक दहशतवादी गटाचा सूत्रधार (गजराज राव) एका तरुण डॉक्टरला (राजीव खंडेलवाल) त्याच्याकरवी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी वेठीला धरतो. त्याच्या कुटुंबीयांना ओलीस ठेवलं जातं. हा डॉक्टरही मुस्लिम आहे. चित्रपट अवश्य बघावा असा आहे.  

चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या एका सहकाऱ्याशी त्याबाबत चर्चा झाली होती. दहशतवादी गटाचा सूत्रधार त्या तरुण डॉक्टरला मुंबईत डोंगरीमध्ये बरंच फिरवतो. तिथले काही व्यावसायिक (हॉटेलचालक, दुकानदार, एसटीडी बूथचालक इ.) कटात सामील असतात. त्यातल्या प्रत्येकाकडून या तरुणाला पुढच्या सूचना मिळत जातात असं चित्रण होतं. यावर बोलताना माझा सहकारी म्हणाला की चित्रपटात सर्वसामान्य मुस्लिम माणूस दहशतवादी कटात सामील आहे असं दाखवलं आहे ते काही बरोबर नाही. त्यावर माझं असं म्हणणं होतं की डोंगरीसारख्या भागात बहुसंख्य मुस्लिम व्यावसायिक असणं स्वाभाविकच आहे आणि दुसरं म्हणजे एखाद्या दहशतवादी कृत्यामागे मोठं प्लॅनिंग असणार हेही सरळ आहे. त्यात सामील होणारे आपणहून सामील झाले की दबावाखाली सामील झाले हाही एक प्रश्न आहेच. पण मुस्लिम समुदायातील लोक त्यात सामील आहेत या चित्रणात मला काही गैर वाटलं नाही. मुख्य म्हणजे सारासार विचार करणारा तो विवेकी मुस्लिम डॉक्टर हा कथानायक आहे हे महत्त्वाचं आहे.

मुळात माझ्या सहकाऱ्याने हा मुद्दा मांडेपर्यंत माझ्या डोक्यात तसं काही आलंच नव्हतं. पण नंतर त्याच्या म्हणण्यावर विचार करूनही मला ते फारसं पटेना. या गोष्टीला आता बरीच वर्षं झाली. दोन हजारच्या दशकापर्यंत आमिर, रंग दे बसंती, वेन्सडे आणि इतरही काही थेट सामाजिक-राजकीय भाष्य करणारे चित्रपट निर्माण होत होते. 'संरक्षण मंत्रालयातील भ्रष्टाचार' हा मुद्दा घेतलेल्या 'रंग दे बसंती'ला तर अनेक पारितोषिके मिळाली. राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. (आज हे अशक्यप्राय वाटतं!) या चित्रपटात एक हिंदुत्ववादी एका मुस्लिमाशी हळूहळू मैत्री करतो हेही प्रभावीपणे दाखवलं गेलं होतं. ज्या नसीरुद्दीन शहाला हिंदुत्ववादी आज सतत टारगेट करतात त्याने 'वेन्सडे'मध्ये इस्लामिक दहशतवादामुळे पेटून उठलेल्या सामान्य माणसाची भूमिका केली होती. इस्लामिक दहशतवादाबद्दल बोलताना वेन्सडे, सरफरोशसारख्या सिनेमात भारतीय मुस्लिम पोलीस अधिकारी (भूमिकेत अनुक्रमे जिमी शेरगिल, मुकेश ऋषी) दाखवले गेले होते. दहशतवादी मुस्लिम असले तरी त्याला विरोध करणारे मुस्लिमही आहेत, ते भारताच्या पोलीस खात्यात आहेत हे दाखवलं जात होतं. खरं तर बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये मुस्लिम व्यक्तिरेखांना आवर्जून स्थान दिलं जात होतं असं दिसतं. (आज मात्र स्थिती पालटली आहे. मुस्लिमांचं दानवीकरण हा बऱ्याच चित्रपटांचा अजेंडा आहे). मुस्लिमांना भारतात आपलं समजलं जात नाही या पार्श्वभूमीवर त्यांना सामावून घ्यायच्या दृष्टीने हे होत होतं. तसा स्पष्ट उल्लेखही व्हायचा. दुसरीकडे 'क्रांतिवीर'सारख्या चित्रपटात वस्तीतला एक मुस्लिम मनुष्य जेव्हा बहकून हिंदूंविरुद्ध भडकाऊ बोलू लागतो तेव्हा नाना पाटेकर त्याच्या कानफटात मारून (आणि अर्थातच पल्लेदार डायलॉग ऐकवून) भानावर आणतो. 'सरफरोश'मधला मुकेश ऋषी आणि आमिर खानचा संवादही अनेकांना आठवत असेल. २०१९ मध्ये, म्हणजे अगदी अलीकडे आलेल्या 'बाटला हाउस'मध्ये जॉन अब्राहमने साकारलेला पोलीस अधिकारी मीडियाशी बोलताना म्हणतो की इथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्याने आम्ही आलो आहोत. यात मुस्लिमांना टारगेट करण्याचा प्रश्न कुठे येतो?

ही उदाहरणं द्यायचं कारण असं की चित्रपट निर्माण करणारे आणि ते बघणारे दोघांचीही दृष्टी तुलनेने अधिक स्वच्छ होती असं वाटतं. आणि बहुतांश समाजमानस प्रत्यक्षातही असंच होतं असं वाटतं. किमान आज जो एकारलेपणा आला आहे तो नव्हता. मुस्लिमांचा अजिबात द्वेष नाही, मुस्लिमांची भारतात होणारी कुचंबणा समजते आहे, त्याबाबत त्यांना पूर्ण पाठिंबा आहे हे एकीकडे असतानाच मुस्लिमांबद्दल 'ब्लॅंकेट' स्वरूपातील अनाठायी सहानुभूतीही नाही - विशेषतः इस्लामिक दहशतवादाचा स्पष्ट निषेध आहे - अशी बहुस्तरीय आणि म्हणूनच सुस्पष्ट भूमिका आपण घेतोय का हे तपासून पाहावं लागेल. वर उल्लेख केलेल्या चित्रपटांमधून, प्रसंगांमधून हे पाहायला मिळतं; पण वास्तवात मात्र दोन टोकं तयार होतात. एका गटाने मुस्लिमांना 'संपूर्ण झिडकारायचं' आणि एका गटाने त्यांना 'संपूर्ण स्वीकारायचं' असं काही होतंय का असं वाटतं. 

सवर्ण-दलित-मुस्लिम हे कोन आणि धर्मनिरपेक्ष व हिंदुत्ववादी हे दोन प्रवाह एकमेकात गुंतलेले आहेत. या सगळ्याला इतिहासाचं विशिष्ट पद्धतीने करून दिलं जाणारं आकलन, अनुभव व जडणघडण, मुख्य म्हणजे राजकारण आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यातून निर्माण होणारी मानसिकता, विचारव्यूह, एकारलेपणा यांचे आयाम आहेत. यातले धागे सुटे करून त्यांच्याविषयी बोलत राहणं आवश्यक आहे असं वाटतं. आजच्या भारतात बहुसंख्याकवाद ज्या प्रमाणात आणि ज्या तीव्रतेने पसरला आहे आणि 'धार्मिक ओळख' विवेकाला ज्या प्रकारे गिळंकृत करू पाहते आहे त्या पार्श्वभूमीवर हे करणं फारच आवश्यक आहे. हिंदुत्ववादी आणि उदारमतवादी दोन्ही गटातील समंजस व्यक्तींना एकत्र येऊन काही करता येईल का याचाही विचार होऊ शकतो. निदान चर्चेच्या काही फेऱ्यांनंतर आपल्यात काही प्रमाणात 'अखंडता' निर्माण होऊ शकते की आधीपासून झालेली 'फाळणी'च अटळ आहे हे तरी लक्षात येईल!

(फेसबुक पोस्ट्सवरून संकलित)  

Monday, February 17, 2025

चार शब्द

१) संवेदना 

'अमेरिकन फिक्शन' हा २०२३ सालचा चित्रपट 'मॉँक' नावाच्या एका आफ्रो-अमेरिकन लेखकाभोवती फिरतो. अमेरिकन कृष्णवर्णीय लेखकांचं साहित्य हे बहुतांशी त्यांच्या जगण्याविषयी, वांशिक भेदभावामुळे त्यांना सोसाव्या लागलेल्या अन्यायाविषयी असतं; पण त्यापलीकडे जाऊन सांगावं असं इतरही बरंच कृष्णवर्णनीय लेखकांकडे असू शकतं, ते त्यांनी सांगावं, आपल्या लेखकीय प्रतिभेला न्याय देत उत्तम कथनात्म साहित्याची निर्मिती करावी अशी त्याची अपेक्षा असते. त्यामुळे लेखकांनी त्यांच्या दुःखाच्या कहाण्या सांगत बसणं हे त्याला पटत नाही. याबाबत त्याचा एका लोकप्रिय कृष्णवर्णीय लेखिकेशी झालेला संवादही ऐकण्यासारखा आहे. त्याचा एक मुख्य आक्षेप हाही असतो की प्रकाशकांना कृष्णवर्णीयांचं दुःख जगवत ठेवण्यात व्यावसायिक इंटरेस्ट आहे. कारण ते विकलं जातं. कृष्णवर्णीय लेखकाने तेवढंच करावं अशी त्यांची अपेक्षा असते. 

वांशिक भेदभाव आहे आणि त्याचे चटके कृष्णवर्णीयांना बसले आहेत, आजही बसत आहेत हे तो नाकारत नाही. चित्रपटात त्याला स्वतःला आलेला एक अनुभवही दाखवला आहे. तरीही त्याला लेखक म्हणून स्वतःचं अस्तित्व केवळ आपल्या कृष्णवर्णीय असण्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाही आहे. हा चित्रपट मला अतिशय रोचक वाटला. आपल्याकडेही दलित साहित्याबद्दल अशा प्रकारची चर्चा झालेली आहे. या चित्रपटाबद्दल आणि त्यातील मांडणीबाबत स्वतंत्रपणे बोलता येईल. पण मला ते इथे करायचं नाही. हा चित्रपट आठवला त्याचं कारण वेगळं आहे. 

अन्याय-उपेक्षा, त्याबद्दल संवेदनशील असणं-नसणं, 'व्हिक्टिमायझेशन'मध्ये 'रमणं' आणि त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणं ही चित्रपटातली मध्यवर्ती चर्चा आहे. ती बघत असताना आपल्याला संवेदनशील असण्याबाबत काही प्रश्न पडत जातात. संवेदनशील मनाला काही गोष्टी अगदी स्पष्टपणे स्पर्श करतात, त्यातून त्या मनात अस्वस्थता-दुःख निर्माण होतं हे बरोबर. मात्र संवेदनशीलता आणि संवेदनशीलतेच्या पलीकडे जाणारी वस्तुनिष्ठता या दोन्हीच्या टोकाला जाणं शक्य असलं तरी ज्याला कदाचित विवेकी/सम्यक/रॅशनल विश्लेषण म्हणता येईल असा अवकाश या दोन्हीच्यामध्ये आहे असं दिसतं. मी आसपासचं दारिद्र्य बघतो आणि त्यामुळे दुःखी होतो ही एक चांगली सुरुवात आहे, ते मनुष्यत्वाचं चांगलं लक्षण आहे. यातला तात्त्विक भाग असा की माझी संवेदनशीलता मी लादावी की नाही? याबाबत थोडं अधिक बोलूया. 

२) सम्यकता 

पुण्यातील बुधवार पेठेत 'सहेली' या संस्थेमार्फत वेश्यागृहांना भेट देताना एक विशेष अनुभव आला होता. एका वेश्यागृहाच्या मालकिणीशी - जिला घरवाली म्हणतात - बोलताना 'सहेली'ची कार्यकर्ती म्हणाली की आम्ही अमुक दिवशी मेडिकल चेक-अप ठेवला होता. तुम्हांला कळवलं होतं. पण तुम्ही कुणीच आला नाहीत. का नाही आलात? त्यावर ती घरवाली काहीशा फटकळपणे उत्तरली - 'तुम्ही इकडे यायचं की. आम्ही कशाला तिकडे येऊ?'  तिच्या उत्तरात 'गरज तुम्हाला आहे - आम्हांला नाही' असं अभिप्रेत होतं. 

आता तिच्या या उत्तराला अनेक कंगोरे आहेत. ते अगदी बरोबर उत्तर आहे असं म्हणता येत नाही. पण त्यातला 'गर्भित संदेश' मला विचार करण्यासारखा वाटला. आणखी एक अनुभव सांगतो. 

माध्यमिक शाळेत असतानाचा प्रसंग. मी गिरणीतून पीठ घेऊन घरी येत होतो. काहीतरी झालं आणि हातातला डबा खाली पडला. पीठ रस्त्यावर पडलं. आता नीट आठवत नाही; पण बहुधा मी वरवरचं थोडं पीठ घेतलं आणि बाकी तिथेच टाकून दिलं आणि घरी आलो. थोड्या वेळाने पुन्हा बाहेर पडलो आणि त्याच रस्त्याने जाऊ लागलो तर एक मनुष्य ते पडलेलं पीठ गोळा करत होता. ते दृश्य पुढे अनेक वर्ष लक्षात राहिलं. आजही त्याची अंधुक इमेज डोळ्यापुढे आहे. 

पीठ गोळा करणारा तो मनुष्य स्वतःच्या मूर्खपणाने गरीब झाला होता असं एक अर्थशास्त्रीय विश्लेषण कुणी करू शकेल. तसा तो झाला होता का याची माहिती माझ्याकडे नाही. आणि जरी तो तसा गरीब झाला असेल तरी त्याच्या मूर्खपणाची शिक्षा अशी असावी का हा असा प्रश्न उरतोच. भारतात अनेक लोक ड्रेनेजमध्ये उतरल्याने मेले आहेत. हे सगळे लोक त्यांच्या मूर्खपणामुळे गरीब राहिले (आणि मेले) असंही आर्ग्युमेंट करता येईल. सिग्नलला, स्टेशनवर लोक भीक मागत असतात. हे सगळे लोक कामचुकार आहेत, यांना काम करायला नको, हे मुद्दाम मुलांना भीक मागायला लावतात इ. युक्तिवाद ऐकत मी मोठा झालो. या युक्तिवादात कदाचित काही प्रमाणात तथ्य असेलही; पण हे युक्तिवाद करणाऱ्यांनी किती भिकाऱ्यांवर रीसर्च करून हा निष्कर्ष काढला आहे हे कधी कळलं नाही. समजा भारतात लाखभर भिकारी असतील (आकडा केवळ उदाहरण म्हणून घेतला आहे) तर त्यातील किती आपल्या मूर्खपणामुळे भिकेला लागले आणि कितीजण भिकेला लावले गेले याची काही आकडेवारी यांनी गोळा केली आहे का हे कळायला मार्ग नव्हता.   

एकदा लोहगड ट्रेकला गेलो होतो. मळवलीला चहा-वडापावसाठी थांबलो होतो. तिथे एक बाई आली. घुटमळत उभी होती. चहावाल्याने विचारलं 'काय पाहिजे?' ती नीट शब्दात 'भीक' असं म्हणाली. बाजूलाच उभ्या असलेल्या मला फार अपराधी वाटलं. 'तार्किक' विचार केला तर मला अपराधी वाटायची काय गरज असं कुणी म्हणेल. पण काहीजणांना भीक मागून जगावं लागतं आणि मला तसं जगावं लागत नाही यात माझा काही म्हणजे काहीच दोष नाही यावर मला लगेच निर्णय देता येत नाही खरा. म्हणजे मी दोषी नसेनही; पण ते सिद्ध कसं करायचं मला कळत नाही. 

या अनुभवांमुळे जाणवलेली अस्वस्थता नमूद केल्यानंतर आता वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करू. 

रस्त्यावर पडलेलं पीठ उचलणारा मनुष्य दुःखात आहे हे माझं गृहीतक होतं का? आता त्याची त्याच्या जगण्याबद्दल काही तक्रार नाही असं असेल तर मग माझ्या वाटण्याला किंवा काही संस्था संघटनांनी त्याच्या प्रश्नांवर काम करण्याला काही अर्थ उरतो का? तात्त्विक मुद्दा म्हणून हा कदाचित मान्य होण्यासारखा असला तरी पुन्हा हाही ॲबसोल्यूट पातळीवरचा विचार झाला. (अंबानीवर कशाला जळता? तुम्ही मेहनत करा, तुम्हीही श्रीमंत व्हाल या विचारासारखाच). माणसाचं जगणं कस असावं यावरच जर आपलं - ह्यूमॅनिटीचं - एकमत नसेल तर मग पुढे जाण्यात काही अर्थ नाही. तो मजूर आजही कदाचित खोल दुःखात बुडालेला नसेल. पण त्याला जर पुरेसं पीठ विकत घेता आलं, दोन वेळा चांगलं आणि पोषक अन्न मिळालं, राहण्यासाठी त्याला पुरेशी जागा मिळाली तर तो आज आहे त्यापेक्षा नक्कीच जास्त आनंदी होईल. 

३) सहकार्य 

पुढचा प्रश्न असा की 'असं व्हावं असं तुम्हाला वाटत नाही का?' असं विचारलं तर कुठल्याही 'इझम'चे पाठीराखे किंवा सामाजिक-आर्थिक विषयांचा फार अभ्यास नसणारे पण सारासार विवेक जागा असणारे कुणी 'नाही' म्हणणार नाहीत. फक्त हे कसं साध्य होईल यावर मतभेद होतील. संपत्ती काही मूठभरांकडे एकवटलेली असताना तो मजूर एक किमान आवश्यक 'क्वालिटी ऑफ लाईफ' असलेलं जगणं कसं जगू शकेल असा प्रश्न काहीजणांना पडेल तर काहीजण हा 'मागणी-पुरवठ्याचा' प्रश्न आहे - मजूर जर संख्येने प्रचंड असतील तर ‘लेबर कॉस्ट’ कमीच राहणार आहे. जर त्यांची संख्या कमी झाली तर त्यांचं उत्पन्न वाढेल असा युक्तिवाद करतील. 

संपत्ती मूठभरांच्या हातात एकवटलेली आहे या विधानाचीही थोडी फोड करावी लागेल असं मला वाटतं. संपत्ती मोठ्या प्रमाणात वर एकवटलेली आहे हे बरोबरच आहे. अंबानी-अदानीसारख्यांकडे पाहिलं की ते कळतंच. पण तिथून पुढे गेलं की जे इतर मोठे-मध्यम उद्योगपती-भांडवलदार दिसतील त्यांच्याही हातात ती आहे असं म्हणता येईल. पुढे जात आयटी, बँकिंग आणि इतर क्षेत्रात काम करणारे नोकरदार-व्यावसायिक पाहिले तर त्यांच्याकडेही काही संपत्ती एकवटली आहे असं म्हणता येतं. अंबानी-अदानीकडे एका व्यक्तीच्या हातात, आणि तिथून खाली आलं की एकेका इंडस्ट्रीच्या (म्हणजे तिथे काम करणाऱ्या अनेकांच्या) हातात संपत्ती एकवटली आहे असं दिसेल. मुळात संपत्ती जर कायदेशीर मार्गाने कमावली असेल तर कुणाकडे किती संपत्ती असावी यावर काही निर्बंध नाही. पण कायदेशीर मार्गांना डावलून, उद्योगपतींना फेवरेबेल धोरणं राबवून संपत्ती काहीजणांकडेच वळवली जाते यावर आक्षेप आहे आणि तो योग्य आहे.

'क्वालिटी ऑफ लाइफ'चा प्रश्न लोकसंख्येशी निगडीत आहे की लोकसंख्येला पूरक धोरणं न राबवता उद्योगांना पूरक धोरणं राबवण्याशी निगडीत आहे, बाजारात निकोप स्पर्धा हवी असं म्हणत प्रत्यक्षात त्या स्पर्धेत भाग घेणं शक्यच होणार नाही अशी स्थिती निर्माण करण्याशी आहे, 'ठेविले अनंते' म्हणत उद्यमी मानसिकताच नसण्याशी आहे की आणखी संबंधित घटकांशी आहे यावर बोलताना कुठल्या एकाच बाजूला जबाबदार धरता येईल असं मला वाटत नाही. पण भांडवली व्यवस्थेनं उत्तम जम बसवला असताना लोकप्रिय 'ट्रिकल डाउन' सिद्धांतानुसार बघितलं तर तळातल्या वर्गात फार लक्षणीय फरक पडला आहे असं दिसत नाही. असंघटित क्षेत्रातील कामगार (असंघटित क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात असणं) हा त्यासंदर्भातला एक मोठा प्रश्न असावा. 

या संदर्भात एका निबंधाचा उल्लेख करावासा वाटतो. प्रा. वि. म. दांडेकर आणि प्रा. नीलकंठ रथ यांचा 'पॉव्हर्टी इन इंडिया' हा निबंध 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'च्या अंकात १९७१ च्या सुरुवातीला प्रकाशित झाला होता. पुढे दांडेकरांनी या निबंधाचा मराठी संक्षेप केला तो 'माणूस' च्या ३१ मार्च १९७१ च्या अंकात प्रकाशित झाला. पुढे पन्नास वर्षांनी 'माणूस'च्या त्या अंकाचं पुनर्प्रकाशन मनोविकास प्रकाशनाने केलं. दिवंगत लेखक-अभ्यासक नंदा खरे यांनी या पुस्तकाचं संकलन केलं होतं. 'भारतातील गरिबी' या शीर्षकाचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या अखेरीस नंदा खरे यांनी 'भविष्य दरिद्री असायला नको!' असा एक लेख लिहिला आहे. त्यात 'लोकसंख्या आणि दबाव' असा एक विभाग आहे. त्यातील सुरुवातीचा उतारा असा - 

१९७९ मध्ये सुमारे ५४.१ कोटी भारतीय होते. आज २०२१ साली जनगणना व्हायला हवी होती, पण ती कोव्हिडमुळे टाळली गेली आहे. तशीही काटेकोर अंकबद्ध माहिती सरकारांना महत्त्वाची वाटत नाही आहे. पण २००१ (१०१.९ कोटी), २०११ (११८.६ कोटी) हे आकडे पाहता आजची लोकसंख्या १३७ कोटींजवळ असावी. म्हणजे आज 'भारतातील गरिबी' काळाच्या (१९७१) अडीचपट भारतीय आहेत! त्यांना सांभाळणं उपलब्ध सोई-सुविधांवर, नैसर्गिक संसाधनांवर प्रचंड दबाव आणतं आहे.

शिडाच्या जहाजांच्या प्रवासाबद्दलच्या परिभाषेत एक 'वाऱ्याच्या फार जवळ जाणं', ‘सेलिंग क्लोज टू द विंड’ असा शब्दप्रयोग केला जातो. सुरक्षित प्रवासासाठी सर्वच्या सर्व उपलब्ध वारा शिडांमध्ये 'भरून' घेणं धोक्याचं ठरू शकते. शहाणी पद्धत अशी की वेग जरा कमी मिळाला तरी जहाज वाऱ्याशी थोडाफार कोन करून हाकावं. तसं न केल्यास जराशाही वाऱ्यातल्या फरकाने जहाज उलटू शकतं! माझ्या मते आपण आज भारतातच नव्हे तर जगभरात, वाऱ्याच्या नको तितक्या जवळ जाऊन काहीतरी अडाणी वेग गाठू पाहतो आहोत आणि त्याला 'विकास' म्हणतो आहोत.

माझ्या मते आज गरज विकासाची नाही, तर नैसर्गिक संसाधनांच्या शहाण्या वापरातून पूर्ण समाजाला दारिद्र्य रेषेच्या वर उचलण्याची आहे. त्यासाठी समाजाच्या पॉवरफुल, पॉवरबाज वर्गाला काही त्याग करावा लागेल. पण तो करायचं टाळल्यास जहाज वाऱ्याच्या फार जवळ जाऊन पलटी मारू शकते!

दांडेकर-रथ यांनीही आपल्या निबंधामध्ये 'बेकारीनिवारणाकरता लागणारा जादा पैसा कुठून आणावयाचा हा प्रश्न पुनःपुनः कितीदाही विचारला तरी त्याला एकच उत्तर आहे ते असे की ज्यांच्यापाशी पैसा आहे त्यांच्यापासून तो घेतला पाहिजे' असं म्हटलं आहे. त्यासाठी सर्वात श्रीमंत ५ टक्के लोकांनी आपल्या खर्चात फक्त १५ टक्के कपात केली आणि त्या खालोखाल श्रीमंत असलेल्या ५ टक्के लोकांनी आपल्या खर्चात ७.५ टक्के कपात केली तरी आवश्यक तो पैसा उभा राहू शकेल असं ते लिहितात. (दांडेकर-रथ यांच्या गणितानुसार हा आकडा आठशे कोटी इतका होता).    

हे पुस्तक अवश्य पाहावं. मला यातला एक 'टेक-अवे' असा दिसतो की पैसा या वस्तूकडे सर्वस्वी, पूर्णांशाने 'न्याय्य, राइटफुल रिवॉर्ड' म्हणून न पाहता 'इंस्ट्रूमेंट ऑफ सोशल बेटरमेंट' म्हणून पाहता आलं तर फरक पडू शकेल.      

४) न्याय 

'जॉली एलएलबी' चित्रपटाच्या अखेरीस वकील (अर्शद वारसी) कोर्टात जे भाषण करतो ते फार प्रभावी आणि नेमकं आहे. रस्त्यावर झोपणाऱ्या गरीब लोकांबद्दल बोलताना तो म्हणतो 'कहाँ से आते है ये लोग? इनके पास ना रहने को घर है, ना रोजगार है, ना पैसा है...फिर क्यूँ चले आते है हमारे खूबसूरत शहरों की खूबसूरती पर बट्टा लगाने? लेकिन इन भूखे-नंगे भिकारियों के पास भी एक चीज का हक है जनाब...और वो है जस्टिस. और ये हक उन्हें देता है हमारा संविधान'.  

आपण जेव्हा आर्थिक विषमता, विकास आणि विस्थापन किंवा तत्संबंधी विषयांवर विचार करतो तेव्हा मला या 'जस्टिस'मध्ये एक उत्तर सापडतं. प्रश्न गरीब-श्रीमंत असण्यापेक्षा न्यायाचा जास्त आहे. अनंत अंबानी-राधिका मर्चंट लग्नाबद्दल घमासान चर्चा सुरू होती तेव्हा ती 'कुणी जास्त पैसे कमावले आणि उधळले म्हणून काय झालं - त्यांचे पैसे आहेत त्यामुळे तो त्यांचा हक्क आहे', ‘तुम्हीही लग्नात पैसे उडवताच की’, 'पण हे पैशाचं विकृत प्रदर्शन आहे' ‘अशी वेगवेगळ्या दिशांना ताणली जात होती. समाजमाध्यमं गोष्टी ताणण्याकरताच असतात हे खरं असलं तरी असं वाटलं की अशी चर्चा ताणण्यापेक्षा ‘जे सगळं चालू आहे, किंवा आजवर होत आलं आहे ते न्यायोचित आहे का?’ यावर चर्चा झाली तर ती कदाचित जास्त फलदायी होईल. (‘सामाजिक न्याय’ हा शब्द आपल्या सार्वजनिक चर्चाविश्वात – लोकांच्या दैनंदिन चर्चेतही यावा).   

दुसरं म्हणजे जगणं अर्थकारणाशी निगडीत असलं तरी ‘माणूस असण्याचा गाभा’ अर्थशास्त्रात लपलेला नाही. त्यामुळे अर्थशास्त्रीय खुलासे ‘मॅटर ऑफ फॅक्ट’ उत्तरं देतील कदाचित; पण त्यातून आपण ‘माणूस’ आहोत म्हणजे काय आहोत, माणूस असण्याचा अर्थ काय याचं उत्तर मिळणार नाही. जर सगळं फक्त अर्थशास्त्रापुरतं, कोरड्या हिशेबापुरतं मर्यादित असेल तर मग माणसाला कधीच कुठल्या गोष्टीचं वाईट वाटण्याचं कारण नाही. उद्या आपल्या डोळ्यासमोर एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी त्याचं अर्थशास्त्रीय उत्तर देता येईलच! 

आरती प्रभू 'कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे' म्हणून गेले आहेत. (बिहाइंड एव्हरी फॉर्च्यून, देअर इज अ क्राइम हे मारियो पुझोचं विधानही याच धर्तीचं आहे). ही केवळ कवीकल्पना आहे की वास्तवात खरंच तसं होतं आहे हे तपासण्याची जबाबदारी आपली आहे. 'तुम्ही मेहनत करा, तुम्हीही श्रीमंत व्हाल' हे विधान 'ॲबसोल्यूट' पातळीवर खरं असेलही; पण आपण त्या पातळीवर जगतो का? तर नाही. आपण 'रिलेटिव्ह' पातळीवरच जगत असतो. त्यामुळे उत्पन्नातील विषमता ही नैसर्गिक न्यायानेच तयार होत असते असं म्हणता येत नाही.   

शाहरुख खानचं एक प्रसिद्ध विधान आहे - आधी मजबूत पैसा कमवा आणि मग फिलॉसॉफर व्हा. हे मान्य केलं तरी मजबूत पैसा कमवून झाला तरी लोक फिलॉसॉफर होताना फारसे दिसत नाहीत. चॅरिटी करतात; पण मूलभूत प्रश्न विचारताना फारसे दिसत नाहीत. बहुतेक वेळ ऑलरेडी मजबूत झालेल्या पैशाला आणखी मजबूत करताना दिसतात. पैसा कमावणं, तो खर्च करणं, लौकिक यश मिळवण्यात साफल्य वाटणं यात काही गैर नाही. बट देअर इज मोअर टू अस – ह्यूमन्स. आपण ‘माणूस’ म्हणून तरी गुंतागुंतीच्या प्रश्नांना सोपी उत्तरं देऊन मोकळं होऊ नये. मुळात योग्य प्रश्न विचारणं हेच ‘माणसा’च्या बुद्धीपुढचं एक आव्हान आहे.  

#let'snotconclude 

#let'skeepthinking 

(फेसबुक पोस्ट्सवरून संकलित)  


Wednesday, February 12, 2025

उत्क्रांतीच्या ‘सांस्कृतिक राजकारणा’ची गरज

१२ फेब्रुवारी १८०९ हा चार्ल्स डार्विनचा जन्मदिवस. त्याच्या जन्माला आता दोनशेहून अधिक वर्षं उलटून गेली. वयाच्या पन्नासाव्या वर्षी (१८५९ साली) त्याचा 'ऑन द ओरिजिन ऑफ द श्पीसीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑर द प्रिझर्वेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन द स्ट्रगल फॉर लाइफ' अशा लांबलचक नावाचा ग्रंथ प्रकाशित झाला. 'आपण कुठून आलो' या माणसाला पडलेल्या सनातन प्रश्नाच्या शोधात माणसाला मिळालेलं उत्तर 'आपल्याला आणि या पृथ्वीवरच्या एकूणच सगळ्या पसाऱ्याला निर्माण करणारा सर्वशक्तीमान ईश्वर' असं होतं. हा ईश्वर एक किंवा अनेक होते. त्याकरता कुठल्या पुराव्याची आवश्यकता नव्हती. जे परंपरेने आपल्याला सांगितलं आहे, जे आपल्या धर्मग्रंथात लिहून ठेवलं आहे ते चुकीचं कसं असेल हा विचार प्रबळ होता. आजही आहे. डार्विनच्या ग्रंथाने या सनातन प्रश्नाला वेगळी दिशा दिली हे खरं असलं तरी आजही एका मोठ्या मानवसमूहाची ईश्वरावरची श्रद्धा, धर्मश्रद्धा अजिबात ढळलेली नाही. 'क्रिएशनिस्ट (निर्मितीवादी) वि. इव्होल्यूशनिस्ट (उत्क्रांतीवादी)' असा संघर्ष आजही सुरूच आहे. देव आहे-नाही, श्रद्धा असावी-नसावी, असल्यास तिची अंधश्रद्धा कशी होऊ नये, श्रद्धा-अंधश्रद्धा यातली सीमारेषा कशी ओळखायची, सगळे तर्क पटूनही जर आपल्या आवडीच्या देवाच्या मूर्तीपुढे लीन व्हावंसं वाटत असेल तर त्याचा खुलासा कसा करायचा या आणि संबंधित मुद्द्यांवर हिरीरीने नित्य चर्चा होत असते. 

दोन उदाहरणं द्यायचा मोह आवरत नाही. पहिलं उदाहरण 'बिग बँग थिअरी' या अतिशय लोकप्रिय टीव्ही मालिकेतलं. विज्ञान आणि तर्क हे जगण्याचे आधार असलेला, सैद्धांतिक भौतिकशास्त्राचा अभ्यासक, बुद्धिमान आणि तऱ्हेवाईक, आपल्या विक्षिप्त वर्तनामुळे इतरांसाठी डोकेदुखी ठरणारा शेल्डन कूपर आणि येशू ख्रिस्तावर अतूट श्रद्धा असलेली, धार्मिक वृत्तीची त्याची आई मेरी कूपर यांच्यात वेळोवेळी झडणारे वाद हे आस्तिक-नास्तिक, सश्रद्ध-अश्रद्ध यांच्यात असलेल्या दृष्टीकोनातील, विचारातील फरकांचं एक चांगलं उदाहरण आहे. एका प्रसंगात आई म्हणते, “ठीक आहे. प्रत्येकाला त्याचं मत असण्याचा अधिकार आहे”. त्यावर शेल्डन उसळून म्हणतो, “मत? उत्क्रांती हे 'मत' नाही. ती वस्तुस्थिती आहे”. त्यावर आई उत्तरते, “आणि हे तुझं मत आहे!”

दुसरं उदाहरण शेल्डनच्या आईची भारतीय आवृत्ती असलेल्या माझ्याच एका मावशीचं. 'डार्विनने उत्क्रांतीचा 'शोध' लावला हे ठीक; पण तो लावण्याची बुद्धी त्याला कुणी दिली?' असं एकदा ती मला म्हणाली होती. तिच्या या प्रश्नानंतर मी चर्चा आवरती घेतली! (तिच्या दृष्टीने हाच मुद्दा न्यूटनच्या गुरूत्वाकर्षणाच्या शोधाला आणि इतर कुठल्याही वैज्ञानिक शोधाला लागू होईल!) 

वरील उदाहरणं प्रातिनिधिक म्हणावीत अशी आहेत. त्यात उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर/आक्षेपांवर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की बहुसंख्य लोकांच्या दृष्टीने मुख्य मुद्दा 'संपूर्ण, सुसूत्र खुलाशा'चा आहे. म्हणजे असं की हे जग, आपण सजीव ही ईश्वराची निर्मिती आहे हे सुलभ स्पष्टीकरण मान्य करण्यामागे 'संशोधकीय आळस' आहे हे मान्य केलं तरी दुसऱ्या बाजूने पाहता, सर्व सजीव उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून लक्षावधी वर्षांचा प्रवास करत विशिष्ट शारीरिक-मानसिक अवस्थेत पोचले याचंही समजेल असं स्पष्टीकरण सर्वसामान्य लोकांपुढे सातत्याने आणलं गेलेलं नाही. (यातले 'समजेल असं' आणि 'सातत्य' हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत). आपण जर धर्मसंस्थेचा विचार केला तर तिने गेली हजारो वर्षं आपल्या 'सुलभ स्पष्टीकरणां'नी लोकांची मनं काबीज केली आहेत. (आजची परिस्थिती तर कमालीची गंभीर आहे. बहुसंख्य लोकांची सारासार विवेकबुद्धीदेखील धर्मश्रद्धेच्या अतिरेकी माऱ्याने पुरती पांगळी केली आहे. अशा स्थितीत 'संशोधकीय' बुद्धी' तर फार दूरची गोष्ट आहे). अर्थात धर्मसंस्थेचा क्रमशः उदय आणि क्रमशः विकास यात केवळ विश्वाची उत्पत्ती हाच एक विषय हाताळला गेलेला नाही. मानवसमूहाला नैतिक आचरणाची चौकट देण्याचं कामही धर्मसंस्थेने केलं. महत्त्वाचं म्हणजे जैविक विकासक्रमात माणसाला पडू लागलेल्या अस्तित्वविषयक प्रश्नांना हाताळण्याचं काम तिने केलं. यातून धर्मसंस्था तिच्या हजारो वर्षांच्या प्रवासात, मानवी बुद्धीच्या मर्यादांच्या बळावर ज्या भक्कमपणे उभी राहिली त्या तुलनेत दोनशे वर्षांपूर्वी सुरु झालेल्या उत्क्रांतीच्या अभ्यासाला भक्कमपणे उभं राहायला वेळ लागणार हे सरळ आहे. शिवाय उत्क्रांती हा श्रद्धेचा विषय नसून अभ्यासाचा विषय असल्याने तो अधिक व्यापक, म्हणून अधिक अवघड आणि म्हणून कमी 'रंजनमूल्य' असलेला आहे. आणि याच मुद्द्यावर विस्ताराने काही म्हणावंसं वाटतं. 

सामर्थ्य आहे ‘गोष्टी’चे...

'रंजनमूल्य' हा शब्द ज्ञानाच्या संदर्भात कदाचित थोडा विरोधाभासी वाटू शकेल; पण आपण ज्या विषयाबाबत बोलतो आहोत त्या संदर्भात आणि सर्वसामान्य लोकांना या विषयाबाबत आस्था निर्माण व्हावी या संदर्भात 'रंजन' हा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. माणसाच्या प्रवासात 'गोष्ट' हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. माणसाला पडणारे अनेक प्रश्न धर्म, अध्यात्म, गूढवाद या कक्षेतून विज्ञानाच्या कक्षेत येण्याआधी हजारो वर्षं माणसाच्या मनाची मशागत कथा-नाट्य-संगीत-चित्र आदि कलांमधून सतत सांगितल्या गेलेल्या ईश्वरी गोष्टींनी झाली आहे. याखेरीज माणसांना एकत्र आणण्यासाठी आणि एकत्र ठेवण्यासाठी माणसाने ‘गोष्टी’चा कसा प्रभावी वापर केला, ‘कल्पित वास्तवा’चा माणसाला त्याच्या जैविक-सामाजिक प्रवासात उपयोग झालाच; पण आधुनिक काळातील अनेक संस्था-संकल्पनादेखील ‘कल्पित वास्तवा’च्या आधारे कशा उभ्या राहिल्या याबाबत युव्हाल हरारीच्या लोकप्रिय ‘सेपियन्स’मधलं विवेचन अनेकांनी वाचलेलं असेल.  

ईश्वर ही संकल्पना निर्माण झाल्यापासून आजवर तिने माणसाचा पिच्छा सोडला नाही. या संकल्पनेबाबत कितीही तार्किक युक्तिवाद केले तरी बहुसंख्य माणसं ही संकल्पना टाकून देऊ शकलेली नाहीत. 'व्हाय गॉड वोन्ट गो अवे - ब्रेन सायन्स अँड द बायॉलॉजी ऑफ बीलिफ' या पुस्तकात यूजीन डाक्विली आणि अँड्र्यू न्यूबर्ग यांनी ईश्वर ही संकल्पना मानवी मेंदूत 'हार्ड-वायर्ड' झाली असल्याचं काही प्रयोगांद्वारे दाखवून दिलं आहे. मानवी मेंदूत ही संकल्पना घट्ट रुजली आणि प्रचंड तांत्रिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवरदेखील ती टिकून राहिली याचा मेंदूविज्ञान आणि सामाजिक-आर्थिक प्रभावांच्या अभ्यासाच्या साहाय्याने आज उलगडा होऊ शकतो. पण यातला एक महत्त्वाचा घटक 'रंजन' हादेखील आहे. येशू ख्रिस्त, महंमद पैगंबर, राम-कृष्ण-शंकर-विष्णू आदि सर्व देव-देवतांच्या, प्रेषितांच्या कथांमध्ये फार मोठं रंजन आहे. ईश्वर, प्रेषित ही संकल्पना माणसाच्या चिंतनापेक्षाही रंजनात जास्त प्रमाणात ठाण मांडून बसलेली आहे. कारण ती एक नाट्यमय, रोमांचकारक संकल्पना आहे. त्यात एक ‘दिव्यत्वा’ची अनुभूती आहे. थरारकता आहे. आपण फारच छोटे आहोत आणि या विराट सृष्टीच्या निर्मात्याला शरण जाणं, त्याला समर्पित असणं हेच आपलं भागधेय आहे हे मनुष्य मान्य करतो आणि हे मान्य करण्यात, या समर्पणात त्याला शांतता व समाधान अनुभवता येतं. 

या पार्श्वभूमीवर निरीश्वरवादाचा पुरस्कार करणाऱ्या सर्वांनीच 'सजीव उत्क्रांती' हा विषय रंजकपणे, सांस्कृतिक अवकाशात प्रवेश करत कसा सांगता येईल यावर विचार करणं आवश्यक आहे. 'मानवी उत्क्रांती हा एक अवघड विषय आहे, तो आपल्याला झेपणारा नाही' अशी सर्वसामान्य लोकांची धारणा असल्याने आणि या विषयाचा अभ्यास करण्याइतपत वेळ हाताशी नसल्याने, तशी वृत्तीही घडलेली नसल्याने अशा मनोवस्थेतील लोकांना आपण कथा, नाटक, चित्रपट, संगीत, चित्र, डिजिटल माध्यमावरील काही कल्पक प्रयोग अशा काही मार्गांनी आकर्षित करून घेऊ शकू का यावर विचारमंथन होणं आवश्यक आहे. मानवी उत्क्रांतीवर आज मुबलक प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. मराठीतही पुस्तकं लिहिली गेली आहेत. पण ते एका वर्गापुरतं मर्यादित आहे. आणि या विषयाबाबत लोकांच्या मनात अनास्था, भीती असं बरंच काही आहे. त्यामुळे इथे गरज आहे तो कल्पक 'योजकां'ची. एका बाजूला उत्क्रांतीविषयक पुष्कळ ज्ञान उपलब्ध आहे तर दुसऱ्या बाजूला त्याच्याशी कधीच संबंध न आलेला एक मोठा मानवसमूह आहे. ज्यांना ज्ञान आहे ते स्वतः कदाचित या ज्ञानातून कल्पकपणे, सोप्या, सुटसुटीत पद्धतीने एकेक विषय लोकांपुढे काढून ठेवू शकणार नाहीत. हे काम 'योजकां'ना करावं लागेल. 

‘इंटेलिजंट डिझाइन’चं आव्हान

उत्क्रांतीचा सिद्धांत सहजपणे पचनी न पडण्याचं एक प्रमुख कारण सजीवांच्या शरीररचनेतील कमालीची गुंतागुंत हेही आहे. एकपेशीय सजीवांपासून उत्क्रांत होत होत आजचं अद्भुत वाटावं असं मानवी शरीर निर्माण झालं - त्यात डोळ्याच्या जागी डोळा बसला, कानाच्या जागी कान बसला, हृदय-फुफ्फुस-यकृत-मूत्रपिंड-आतडी इ. अवयव उत्क्रांत झाले, रक्त-मांस-स्नायू निर्माण झाले, मेंदू नावाचा एक थक्क करणारा अवयव उत्क्रांत झाला या सगळ्याची नीट फोड करून, तुकड्या-तुकड्यात समोर मांडून, त्यातून एका संपूर्ण शरीराची निर्मिती कशी झाली हे समजावून सांगणं आणि तेही रंजकपणे सांगणं हे विलक्षण आव्हानात्मक काम असणार आहे. पण ते झाल्याखेरीज अधिकाधिक लोकांना उत्क्रांतीच्या अभ्यासाकडे, वैज्ञानिक विचारपद्धतीकडे वळवणं अवघड ठरेल.  

ईश्वर नाही’ असं म्हटलं की त्यातील नकारामुळे ‘मग काय आहे?’ हा प्रतिप्रश्न लगेचच विचारला जातो. ‘ईश्वर आहे’ हे मान्य करणाऱ्यांना ईश्वराने सजीव कसे निर्माण केले, सृष्टी कशी निर्माण केली याचं क्रमवार उत्तर देता येणार नाही; पण ज्याअर्थी हे सगळं दिसतं आहे त्याअर्थी हे कुणीतरी निर्माण केलं आहे हे तार्किकच आहे असा त्यांचा विश्वास असतो. 'इंटेलिजंट डिझाइन'च्या पुरस्कर्त्यांकडून मांडला जाणारा घड्याळजीचा सिद्धांत प्रसिद्ध आहे. - एका निर्जन बेटावर जर कुणाला एक घड्याळ सापडलं तर ते तयार करणारा घड्याळजी कुठे ना कुठेतरी असणार हे सरळच आहे. त्याच न्यायाने ज्याअर्थी सृष्टी आहे त्याअर्थी सृष्टीचा निर्माता कुठे ना कुठे असलाच पाहिजे! आता या सिद्धांतातली अडचण अशी की ते विशिष्ट घड्याळ कुणी तयार केलं आहे हे माहीत नसलं तरी घड्याळ ही वस्तू कुणा मनुष्यानेच तयार केलेली आहे हे आपल्याला माहीत असतं. एखाद्या घड्याळजीला आपण भेटलेलो असतो. त्याच्याशी बोललेलो असतो. पण सृष्टीच्या निर्मितीला ते लागू होत नाही. सृष्टीच्या निर्मात्याला कुणीच भेटलेलं नाही. तिच्याशी/त्याच्याशी कुणीच बोललेलं नाही. काही सिद्धपुरुषांना, योग्यांना साक्षात्कार झाले आहेत, त्यांना देवाचं दर्शन झालं आहे असं आपण ऐकतो. पण त्या दर्शनात देवाने सृष्टीनिर्मितीची प्रक्रिया सांगितली का? डोळ्याच्या जागी डोळा कसा बसला आणि मेंदूच्या जागी मेंदू कसा बसला हे सांगितलं का? हे प्रश्न अनुत्तरितच राहतात. (आणि देव जर बोललाच तर कुठल्या भाषेत बोलेल हा आणखी एक प्रश्न!)

उत्क्रांतीच्या अभ्यासातून या प्रश्नांची सुसूत्र उत्तरं मिळावीत असा आग्रह धरला गेला तर त्यात काही वावगं नाही. (तशी उत्तरं मिळू शकतातच; पण मुख्य मुद्दा ‘कळण्या’चा आहे). ईश्वराबाबत ती/तो सर्वशक्तीमान असल्याने, तिच्या/त्याच्यापुढे आपण क्षुद्र असल्याने तिने/त्याने सृष्टीनिर्मितीचा खुलासा आपल्यापाशी करण्याचं कारणच नाही, ते आपल्या बुद्धीच्या कक्षेत येणार नाही अशी ईश्वरवाद्यांची भावना असू शकते. उत्क्रांतीच्या सिद्धांताची मात्र त्यातून सुटका नाही. आणि ईश्वरवाद्यांची अपेक्षा असली-नसली तरी एक ज्ञानशाखा म्हणून उत्क्रांतीने दिलेल्या अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरं सुगम पद्धतीने लोकांसमोर मांडली जावीतच.   

मानवी उत्क्रांती हा प्रचंड गुंतागुंतीचा, डोक्याला शीण आणणारा प्रवास असला तरी यात अनेक चित्तथरारक (आणि अर्थातच प्रदीर्घ कालावधीचे) टप्पे आहेत. उदा. माणूस दोन पायांवर उभा राहिला किंवा कंठातून येणाऱ्या ध्वनीतून माणसाने शब्द विकसित केला हे अतिशय रोमांचकारक विषय ठरू शकतात. आपल्या शरीरातील विविध अवयवांची उत्क्रांती यात तर ठायी ठायी थरारकता असू शकते. आज हा अभ्यास पुस्तकांमध्ये उपलब्ध आहे. एका अर्थी तो 'बंदिस्त' आहे. त्याचं 'माध्यमांतर' करून तो लोकांपुढे आणला गेला तर लोक त्याकडे खेचले जाऊ शकतील. यूट्यूबसारख्या लोकप्रिय डिजिटल माध्यमातून आज ते काही प्रमाणात होतं आहे; पण तरी ईश्वरी कथा जशा लोकांच्या दैनंदिन जगण्याचा भाग झालेल्या आहेत तसं अद्याप या विषयाचं झालेलं नाही. 

डार्विनची उलघाल

आपल्या अस्तित्वाला अर्थ आहे, विश्वाच्या पसाऱ्याला प्रयोजन आहे, आपल्या कृतींचा हिशेब मांडणारी एक पारलौकिक शक्ती आहे हा धर्मश्रद्धेतून आलेला विचार माणसांना आधार देणारा ठरला आहे. उत्क्रांतीची दिशा जो मार्ग दाखवते त्या मार्गावर अशा आधाराला जागा नाही. त्यामुळे आपल्या अस्तित्वाला अंगभूत असा अर्थ नाही, आपल्या असण्याला प्रयोजन नाही हे मान्य करून जीवनाचा हेतू आपला आपण शोधणं, या जीवनात आनंद निर्माण करणं, जीवनेच्छा जागी ठेवणं, निश्चित उद्दिष्ट ठेवून कार्यरत राहणं शक्य आहे हे पटवून द्यावं लागेल. आणि यासाठी वर म्हटलं तसं कल्पक व्हावं लागेल.

‘डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य’ (संपादक - नंदा खरे, रवींद्र रु. पं.) या पुस्तकात विद्यागौरी खरे यांचा ‘संधिकाळातील घालमेल’ या शीर्षकाचा एक लेख आहे. या लेखात त्यांनी जीलियन बीअर लिखित 'डार्विन्स प्लॉट्स' या ग्रंथातील एक विधान उद्धृत केलं आहे - 'क्रांती फक्त वैज्ञानिकांच्या मनात घडून चालत नाही. तिला संपूर्ण प्रामाण्य तेव्हाच लाभते जेव्हा त्याच संस्कृतीतील इतर माणसांच्या विश्वासातही क्रांतिकारक बदल घडतात'. खरे यांनी पुढे डार्विनने २२ मे १८६० रोजी ॲसा ग्रे यांना लिहिलेलं पत्र दिलं आहे. (हे पत्र 'पँडिमोनियम' या हंफ्री जेनिंग्ज लिखित ग्रंथात आढळतं). पत्र मुळातून अवश्य वाचावं. त्यात डार्विन लिहितो - सृष्टीची निर्मिती सुरचित नियमांमधून झाली असावी आणि बारीकसारीक तपशील - चांगला अथवा वाईट - भरण्याचे काम आपण ज्याला योगायोग (चान्स) म्हणतो त्यावर सोडण्यात आले असावे असे मानण्याकडे माझा कल आहे. या कल्पनेमुळे मला जराही समाधान मिळत नाही. 

विवेकवादी वृत्तीचा अंगीकार केल्यानंतर विज्ञानाच्या पलीकडच्या मानवी जाणिवांची धार बोथट झाल्याने कलांचा आस्वाद घेण्याची आपली क्षमता नष्ट झाल्याने डार्विनला वाटणारं दुःख त्याने नोंदवून ठेवलं आहे असं विद्यागौरी खरे लिहितात. त्यांनी 'पँडिमोनियम'मधली डार्विनची नोंद उद्धृत केली आहे –

माझे मन म्हणजे तथ्यांच्या प्रचंड साठ्यातून सामान्य नियम घडवणारे एक यंत्र झाले आहे. पण ह्याच्यामुळे मेंदूच्या ज्या भागात उच्च अभिरुचींचे केंद्र आहे त्याचा क्षय का व्हावा हे मला कळत नाही. ह्या अभिरुची नष्ट होणे म्हणजे आनंदाचा नाश होणे. ह्यामुळे बुद्धीला हानी पोचण्याची शक्यता आहेच; पण आपल्या स्वभावातील भावनिक वृत्ती दुर्बल बनून नैतिक व्यक्तिमत्त्वाचा ऱ्हास होण्याचा धोकाही मोठा आहे.

माणूस उत्क्रांतीच्या वाटेने आज आहे तिथवर पोचला आहे हे मान्य केलं की त्याची भावनिक हतबलता, धर्मभोळेपणा, देवभोळेपणा, माणसाचा विवेक हरवणं या गोष्टीदेखील उत्क्रांतीच्याच आधारे समजून घेता येतील. आणि असं लक्षात येईल की ईश्वर, धर्म या संकल्पना त्यांच्या मुळातील स्वरूपापासून बदलत बदलत पक्षीय, सांस्कृतिक राजकारणाचे महत्त्वाचे आयाम म्हणून स्थिरावल्या आहेत. डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडायच्या आधीपासून इंग्लंडमध्ये या विषयाबाबत लोकांमध्ये कुतूहल जागं होत असल्याची 'पँडिमोनियम' मधली उदाहरणं विद्यागौरी खरे यांनी वर उल्लेख केलेल्या त्यांच्या लेखात दिली आहेत. निरीश्वरवाद भारतीय परंपरेतही आढळतोच. यात चार्वाक तर आहेच; पण 'अचेतन जडद्रव्यच मुळात आहे, चेतन जीव हा जडद्रव्याचाच विकार किंवा जडद्रव्याचीच कार्यरूप परिणती आहे, असे मत उपनिषदकाळापासून भारतात प्रचलित आहे', 'देहाहून निराळा, मृत्यूनंतर ज्याचे अस्तित्व राहते, असा आत्मा नाही असे जडवादी मत कठोपनिषदात सांगितले आहे' असं 'जडवाद' या मराठी विश्वकोशातील नोंदीत  म्हटलं आहे. ईश्वरी अस्तित्वावर शंका घेणं ही काही अर्वाचीन घटना नाही. डार्विनने उत्क्रांतीच्या सिद्धांतामधून ही चौकट आणखी घट्ट केली आणि या अभ्यासाला आजवर न मिळालेली चालना दिली. मात्र ही वैचारिक दिशा सर्वसामान्य लोकांच्या मनाचा ठाव घेऊ शकलेली नाही. भारतासारख्या देशात आज धार्मिकतेचा रेटा मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना उत्क्रांतीपुढील आव्हान मोठं आहे. आणि हे आव्हान पेलण्यासाठी प्रतिक्रियावादी न होता, धोरणी विचार करत सांस्कृतिक अवकाशात भक्कमपणे उभं राहणं गरजेचं आहे. धार्मिक राजकारणाने चिकित्सेचा अवकाश कमी कमी करत नेलेला असताना जडवादाचं, निरीश्वरवादाचं ‘व्यापक, लोकाभिमुख राजकारण’ कसं असावं यावर पुरेसा विचार व्हावा. ‘सांस्कृतिक अवकाशात प्रवेश’ ही या राजकारणाची पहिली पायरी ठरू शकेल.  

(लोकसत्ता, १२ फेब्रुवारी २०२५) 

Friday, November 1, 2024

घडी मोडली कशी याचाही विचार करूया!

लोकसत्ताच्या 'पहिली बाजू' सदरात प्रकाशित होणारे लेख हे विद्यमान सत्ताधारी वर्गाच्या प्रतिनिधींची बाजू मांडणारे असतात. काल, २९ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेला लेख (प्रक्रिया राज्याची घडी बसवण्याची) हा 'सजग रहो' अभियानाविषयी मकरंद मुळे यांनी लिहिलेला लेख एका संघटनेचे प्रतिनिधी म्हणून लिहिलेला असला तरी तो 'पहिली बाजू' या सदरात प्रकाशित होणं आणि लेखात हिंदुत्ववादी विचारधारेचा पुरस्कार करणारी मांडणी असणं यामुळे 'सजग रहो' अभियान कोणत्या राजकीय विचारधारेशी जोडलेलं आहे हे स्पष्ट होतं. अर्थात एखाद्या राजकीय विचारधारेशी जोडलं जायला हरकत नाही; पण हिंदुत्ववादी विचारधारा आणि प्रागतिक, उदारमतवादी विचारधारा यांच्यात गेली शंभराहून अधिक वर्ष जो वैचारिक संघर्ष चालू आहे त्यातील बारकावे समोर येणं, गेल्या दहा वर्षात हिंदुत्ववादी विचारधारेचं जे रूप आपल्याला पाहायला मिळालं त्यावर चर्चा होणं हे जास्त आवश्यक आहे. याचं एक प्रमुख कारण हे की सर्वसामान्य लोकांना हिंदुत्ववादी विचारांचे वाहक करण्यात राजकीय हिंदुत्वाला यश आलं असून त्यातून सर्वसामान्य लोक कमालीचे एकारलेले झाले आहेत, धर्मभावनेने पुरते पछाडले गेले आहेत. (हा वैचारिक संघर्ष शंभरहून अधिक वर्षं चालू आहे असं वर म्हटलं असलं तरी ते एकोणिसाव्या-विसाव्या शतकाच्या संदर्भात आहे. प्राचीन भारतात जडवाद वि. चैतन्यवाद हा जो संघर्ष सुरु होता तो आजही सुरु आहे आणि हा वैचारिक संघर्ष हिंदुत्ववाद वि. उदारमतवाद या संघर्षाच्या मुळाशी आहे). 

या विषयाचा वेध घेत राहणं आणि हिंदुत्ववादी तसंच उदारमतवादी दोन्ही विचारधारांच्या वाहकांशी बोलत राहणं आवश्यक आहे. पण प्रस्तुत लेखाच्या मर्यादेत त्यावर सविस्तर लिहिणं शक्य होणार नाही. मकरंद मुळे यांच्या लेखात उल्लेख केल्या गेलेल्या काही मुद्द्यांवर मात्र चर्चा करता येऊ शकेल. त्यातूनही काही गोष्टींचा उलगडा होईल. लेखात असा उल्लेख आहे की  २०२४ च्या लोकसभेत आणि विशेषत: सध्याच्या विधानसभा निवडणुकीत लढणाऱ्या राजकीय पक्षांच्या मागे उभ्या असणाऱ्या शक्ती ही सामाजिक स्थैर्य आणि शांतता या दृष्टीने काळजीची बाब आहे. या विधानाचा परामर्श घेऊ.           

'राजकीय पक्षांच्या मागे उभ्या असणाऱ्या सामाजिक शक्ती' यातून लेखकांना महाविकास आघाडीच्या मागे उभ्या असणाऱ्या सामाजिक शक्ती असं सुचवायचं आहे हे उघड आहे. कारण हिंदुत्ववादी विचारांच्या राजकीय पक्षांच्या मागे उभ्या असणाऱ्या शक्ती या सामाजिक स्थैर्य आणि शांतता या दृष्टीने लेखकांसाठी काळजीची बाब होऊ शकणार नाहीत असं मानायला पुष्कळच जागा आहे. त्यामुळे लेखात त्यांनी नाव घेतलं नसलं तरी  त्यांचा रोख 'निर्भय बनो' व भाजपविरोधी इतर सामाजिक संघटनांकडे आहे हेही स्पष्ट होतं आहे. 'निर्भय बनो' चळवळीने स्पष्ट राजकीय भूमिका घेतली आणि मे २०२३ पासून वर्षभर महाराष्ट्रात ७५ सभा घेतल्या. मात्र यामुळे सामाजिक स्थैर्य आणि शांतता कशी धोक्यात आली हे लक्षात येत नाही. वास्तविक सिन्नर येथील सभेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी डॉ. विश्वंभर चौधरी यांचं भाषण बंद पाडलं होतं. पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, डॉ. विश्वंभर चौधरी, ॲड. असीम सरोदे यांच्या गाडीवर भाजपच्या शहराध्यक्षांमार्फत जीवघेणा हल्ला केला गेला. अलीकडे श्याम मानव यांची सभा भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली गेली. अकोल्यात योगेंद्र यादव यांची सभा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली. रावसाहेब कसबे यांच्या घरासमोर तर असीम सरोदे यांच्या कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीतर्फे निदर्शनं करण्यात आली.  पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाने एक नाट्यप्रवेश बंद पाडला होता. (नाट्यशिक्षणाचा भाग म्हणून एक सराव परीक्षा सुरु होती आणि त्यात विद्यार्थी छोटे प्रवेश सादर करत होते. ती पूर्ण नाटकं नव्हती. फक्त प्रवेश होते). ११ फेब्रुवारी २०२४ रोजी नॅशनल फिल्म्स आर्काइव्ह्जमध्ये एका हिंदुत्ववादी संघटनेने चित्रपटाचा शो बंद पाडला. २०२३-२०२४ दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांकडून पुणे विद्यापीठात तीन-चार वेळा हल्ले केले गेले होते. 

वरील उदाहरणं लक्षात घेता सामाजिक स्थैर्य आणि शांतता कशामुळे धोक्यात येते आहे हे स्पष्ट होतं. पण स्पष्ट झालं तरी मान्य होत नाही ही आजची मोठीच अडचण आहे. राष्ट्रीय स्तरावर विचार केला तर २०१४ साली पुण्यात मोहसीन शेखच्या हत्येपासून मुस्लिमांच्या झुंडबळींची मालिका सुरु झाली. यात सुमारे पन्नासजणांचे मृत्यू झाले. मृतांमध्ये काही हिंदूही आहेत. समाजमाध्यमांचा वापर करून हिंदूंना मुस्लिमांच्या विरोधात भडकावणं गेली अनेक वर्षं सुरु आहे. भाजपची आयटी सेल यात आघडीवर आहे हे उघड गुपित आहे. इतरही अनेक उदाहरणं देता येतील. 

या अशा पार्श्वभूमीवर जर नागरी संघटनांनी आपला आवाज उठवायचा प्रयत्न केला आणि स्पष्ट राजकीय भूमिका घेतली तर त्यात गैर काय आहे? आणीबाणीच्या काळातही अनेक सामाजिक संघटनांनी, नागरिकांनी आपला आवाज उठवला होता. आणीबाणीच्या काळात उठवलेला आवाज क्षम्य ठरतो आणि भाजपच्या राजवटीत उठवला गेलेला आवाज अक्षम्य ठरतो असं काही आहे का या प्रश्नाचं उत्तर 'हो, अक्षम्य ठरतो' असं आहे असं दिसतं जे अजिबातच योग्य नाही. भारतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कायमच जनआंदोलनं होत आली आहेत. पण या आंदोलकांना कुणी देशद्रोही म्हणत नव्हतं. हे गेल्या दहा वर्षात सुरु झालं. शेतकरी आंदोलनाला किती वाईट प्रकारे बदनाम केलं गेलं याचा इतिहास ताजा आहे. प्रत्यक्ष पंतप्रधानांनीच संसदेत 'आंदोलनजीवी' असा शब्द वापरला तर इतरांची काय कथा?

'सजग रहो' या अभियानातर्फे हिंदूपणाच्या सबलीकरणात राज्याचे हित सामावले आहे, याची अभ्यासपूर्ण मांडणी केली जाईल असं लेखात म्हटलं आहे. हिंदूपणाचं सबलीकरण व्हावं असं जर खरंच वाटत असेल तर वर उल्लेख केलेल्या हिंदूपणाच्या आक्रमकतेकडे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक अस्थैर्याकडे गांभीर्याने बघणं आवश्यक नाही का? की हिंदू सबलीकरणात मुस्लिमद्वेष, मुस्लिमांचे झुंडबळी, विरोधी विचार दडपून टाकणं हे अंतर्भूत आहे? एखाद्या नागरी संघटनेने स्पष्ट राजकीय भूमिका घेताच तो त्यांचा संवैधानिक अधिकार आहे हे मान्य न करता त्यातून सामाजिक स्थैर्य आणि शांतता धोक्यात येते असं का म्हणावंसं वाटतं? इथे आपल्या असं लक्षात येईल की याचा संबंध हिंदुत्ववादी विचारांमधील आक्रमकतेशी आहे. आक्रमक होणं, समोरच्याला गप्प करणं हे योग्यच आहे, तोच खरा मार्ग आहे, त्यातूनच भारताचं भविष्य उज्ज्वल होईल यावर विश्वास असणं, त्याला मूल्यात्मक मान्यता दिली जाणं हे चिंतेचे विषय आहेत. 

वैचारिक-राजकीय लढ्यात एकच बाजू कायम दोषी आणि दुसरी कायम निर्दोष असं कधी होत नाही. याचं भान अर्थातच जागं असायला हवं. त्यामुळे उदारमतवादी, पुरोगामी विचारधारेची चिकित्सा करावीच. आणि ती हिंदुत्ववाद्यांनी करायच्या आधी पुरोगामी विचारांशी बांधिलकी असणाऱ्यांनीच करावी. मात्र कळीचा प्रश्न हाही आहे की हिंदुत्ववादी विचारधारेचे वाहकही हे करतील का? स्वतः स्वतःची चिकित्सा करणं, आपल्या दृष्टिकोनापेक्षा, विचारपद्धतीपेक्षा वेगळ्या दृष्टीने, पद्धतीने इतिहास आणि वर्तमानाकडे बघणं हे मला वाटतं कुणाही सजग व्यक्तीसाठी महत्त्वाचं आहे, आव्हानात्मकही आहे. 'सजग रहो' या नावातच सजगतेचा उल्लेख असल्याने ते होईल असा विश्वास वाटतो!

(लोकसत्ता, ३१ ऑक्टोबर २०२४)