Sunday, March 26, 2023

अवधूत नावाचा इसम

अवधूत डोंगरे हा एक 'इसम' आहे. म्हणजे तो लेखक आहे. त्याच्या चार कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. त्याने अनेक इंग्लिश पुस्तकांचे उत्तम मराठी अनुवाद केलेले आहेत. 'रेघ' नावाचा मराठीतील एक अतिशय दर्जेदार, उच्च संदर्भमूल्य असणारा ब्लॉग तो चालवतो. या ब्लॉगवरील लेख वाचणं हा एक दीर्घ संवादात्मक, अतिशय समृद्ध करणारा अनुभव असतो. डिजिटल व्यासपीठावरील कोलाहलात रेघेने आपलं एक वेगळं, शांत-संयमी स्थान निर्माण केलं आहे. पण हे सगळं असलं तरी अवधूत हा एक 'इसम' आहे. कुठेही भेटेल, सापडेल. बोलेल, प्रश्न विचारेल आणि आपल्याला विचारात टाकून आल्या वाटेने निघून जाईल असा इसम. 'इसम' हा 'इझमां'च्या पलीकडे जाईल असा शब्द आहे. 'इसम' फक्त असतो आणि त्याला पुष्कळ बोलायचं असतं. त्याला त्याचं आख्यान लावायचं असतं. आपल्या 'कॉमन मॅन' स्थानावरून. आणि तो ते लावत असतो. ऐकणारं कुणी आहे की नाही याची फिकीर न करता. 

'इसम' म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर असं जे काही उभं राहतं ते मी अवधूतला दहा-पंधरा वर्षांपूर्वी प्रथम भेटल्यापासून माझ्या डोळ्यांसमोर उभं राहत आलं आहे. त्यावेळी तो पुण्यात एका मासिकाच्या संपादकीय विभागात काम करत होता. अगदी अबोल, अंतर्मुख मनुष्य. काही लोकांना भेटलं की 'हा माणूस वेगळा आहे' असं जे आपल्याला जाणवत राहतं ते मला त्याच्याबाबतीत नेहमी जाणवत आलं आहे. अंतर्मुख म्हणजे इतका की याने कधी कुणाला गडगडाटी हसून टाळी दिली नसणार याची खात्रीच पटावी. त्याच्याहून दहा वर्षांनी मोठा असलो तरी भंकस करायची जन्मजात सवय असल्याने त्याच्यासमोर मी जरा सावरूनच असायचो/असतो. अर्थात भंकस हा अनेकपैकी एक पैलू असल्याने तो अडसर कधीच होत नाही. (शिवाय हेही सांगायला हरकत नाही की विनोद प्रिय असला तरी तत्वज्ञान तितकंच, किंबहुना थोडं जास्तच प्रिय असल्याने अवधूतसारखा समानधर्मी भेटला की माझ्यातला 'इसम'ही जागा होतो आणि आपलं आख्यान सुरु करतो.)

अवधूतशी असलेल्या 'लाँग डिस्टंस' मैत्रीने मला पुष्कळ काही दिलं आहे. मुख्य म्हणजे माझ्यातल्या आळशी, बेशिस्त माणसाला जाग आणायला मदत केली आहे. खरं सांगायचं तर कधीकधी थोडा न्यूनगंडही निर्माण केला आहे. कारण सर्वांना समान उपलब्ध असणाऱ्या 'काळ' नामक परिमाणात त्याने जे काम केलं आहे ते अचंबित करणारं आहे. आपल्याकडेही अवधूतकडे आहे तितकाच वेळ असतो; पण आपण तो पुरेपूर वापरण्यात कमी पडतो याची जाणीव झाली की शरमल्यासारखं होतं. पुस्तकांच्या दुकानात गेलं की अवधूतने अनुवाद केलेलं एखादं नवीन पुस्तक दिसतं आणि माझी स्वतःबद्दलची हताशा वाढते. माझ्यापाशी नेमका आकडा नाही; पण त्याने आजवर पंचवीस-एक तरी पुस्तकांचे अनुवाद केले असतील. आणि अनुवादक म्हणून अवधूतचं नाव असेल तर तो अनुवाद उत्तम असणार याची खात्री पटते असा त्याचा अनुवादाच्या क्षेत्रातला दरारा आहे. 

पुण्यात असताना होणाऱ्या गाठीभेटी त्याने पुणं सोडल्यावर फारच क्वचित होऊ लागल्या. अर्थात पुण्यात असतानाही वरचेवर भेटत असे असं नाही. त्याने स्वतःला वाचन-लेखन-अनुवाद याला वाहूनच घेतल्यासारखं होतं. मुळात लेखन-वाचन ही काही त्याच्या केवळ 'आवडीची गोष्ट' नाही. त्याच्यासाठी ते संवादाचं माध्यम आहे. चिंतनाचा विषय आहे. कमालीच्या गंभीरपणे करण्याची चीज आहे. मी संपादक म्हणून काम केलेलं असल्याने अवधूतसारखा लेखक संपादकासाठी किती मोलाचा असतो हे मी सांगू शकेन. लिहिण्याविषयीचं प्रेम, आस्था हा एक भाग झाला. पण मांडणीत वजन असणं, व्याकरणाच्या व इतर चुका नसणं, परिच्छेद नेमकेपणाने पाडलेले असणं, लेखनाला ओघ असणं हेही लेखनातील महत्त्वाचे भाग आहेत. सध्या आता जवळजवळ सगळेचजण लेख टाइप करून पाठवतात. वर्ड फाइल कशी तयार केली आहे याचाही संपादक म्हणून माझ्यावर प्रभाव पडत असतो. एकेकाळी कागदावर समास पाडून, सुवाच्य अक्षरात लिहिलेला मजकूर वाचताना संपादकांना जसा आनंद होत असेल तसा मला व्यवस्थित फॉर्मेट केलेली वर्ड फाइल बघून होतो. अवधूत त्याबाबतीत चुकूनही निराश करत नाही. त्याच्याकडून काहीही आलं की ते डोळे झाकून प्रिंटिंगला पाठवावं इतकं अचूक असतं. त्याच्याशी माझा संवाद हा प्रामुख्याने इमेलवर होतो. तुम्हांला जे म्हणायचं आहे ते नीट, व्यवस्थित फोड करून, संदिग्धतेला अजिबात जागा न ठेवता, सर्वंकष विचार करून आणि भाषेचा प्रभावी वापर करून लिहिता येणं ही वास्तविक फार अवघड गोष्ट नसायला हवी. पण ती दुर्मीळ झाली आहे खरी. अवधूतशी होणारा इमेल संवाद मला हा दुर्मीळ आनंद देतो. तो सोशल मीडियावर नाही. रेघेचं फेसबुक पेज आहे. त्याकरता तो फेसबुक वापरतो. पण व्यक्तिशः नाही. तिथे नसण्याबद्दलही त्याने बऱ्याच वर्षांपूर्वी सविस्तर लिहिलं होतं आणि अलीकडच्या एका भेटीत सविस्तर बोललाही होता. तू चुकूनही सोशल मीडियावर येऊ नकोस असं मी त्याला सांगितलंच. समाजमाध्यमं ही उपयुक्त माध्यमं असली तरी त्यांची एक दुसरी, दुखरी बाजूही आहे. त्याच्या खोलात जाण्याचं इथे प्रयोजन नाही, पण आपली 'परस्पर संवादाची भाषिक कुवत' या माध्यमांनी कमी केली आहे की काय अशी शंका येते. शिवाय 'डिस्ट्रॅक्शन' हा एक मोठा धोका आहेच. 

अवधूतच्या 'इसम' असण्यात त्याच्या व्यक्तित्वाचा वैशिष्ट्यांबरोबरच त्याच्या 'अपीअरन्स'चाही भाग आहे. इन न केलेला, चौकटीचा किंवा रेघांचा फुल शर्ट, दुमडलेल्या बाह्या, साधी ट्राउझर, चप्पल हा त्याचा पोशाख मी अनेक वर्षं पाहतो आहे. चेहरा अतिशय इंटेन्स. एकूणात एकदम साधासुधा. आणि हा साधेपणा 'ऑरगॅनिक' आहे. 'अंगावर येणारा साधेपणा' नव्हे. तो सहसा साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या गजबजाटात फारसा दिसत नाही. त्याला ते अगदीच वर्ज्य नसावं; पण त्याची मूळ प्रकृती शांतपणे आपलं काम करत राहण्याची आहे. लेखक असणं, लेखन करणं याबद्दल त्याची निश्चित मतं आहेत. भालचंद्र नेमाडे यांच्यावर त्याने एक फार प्रभावी, चिकित्सक लेख लिहिला आहे. मूळ लेख जरूर वाचा. पण त्यातला हा एक उल्लेख पहा -     

 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ' ही कादंबरी लिहायला तीस-बत्तीस वर्षं लागली, असं वेळोवेळी कुठे ना कुठे ऐकू येतं. अगदी काही महिन्यांपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीवर एक निवेदिकाही दुसऱ्या एका लेखकाची मुलाखत घेताना हे बोलून गेली. तीस वर्षं हा जगण्याचा कालावधी विविध अपरिहार्य, अटळ कामांसाठी वापरावा लागणं स्वाभाविक आहे. त्यामुळे कादंबरी लिहायला उशीर झाला, किंवा ती गडबडीत लिहिणं योग्य वाटलं नाही, इतर कामं प्राधान्यक्रमात वरती होती, अशी कारणं नोंदवली जात नाहीत. कधीतरी इतर कोणत्या मुलाखतीत ती ओझरती येतात- कौटुंबिक जबाबदाऱ्या, प्राध्यापकीय कामं, इत्यादी. हे गैर नाही. पण जणू काही तीस वर्षं एका कादंबरीचा ध्यास लेखकाला आणि वाचकांनाही होता, अशी मांडणी केली जाते. मग याची मिथकं तयार होतात. कादंबरी लिहिणं हे कष्टाचंच काम असतं, त्यासाठी कोणी प्रवास केला, वाचन केलं, तर ते त्या-त्या विषयसूत्रानुसार करावंच लागतं. पण ते नुसतं करून पुरत नाही. त्यासाठी एक मिथक तयार करावं लागतं- मोठ्ठा कालावधी, मोठ्ठं वाचन, इत्यादी. मग ते खरोखर महत्त्वाचं असल्याचं ठसवलं जातं. लेखकाचं स्वाभाविक काम म्हणून ते उरत नाही. 

स्वतः लेखक असलेला अवधूत लेखनाविषयी जेव्हा असं तटस्थपणे बोलतो तेव्हा बरं वाटतं. अवधूतच्या इतरही लेखांमधून तो शांतपणे, निरीक्षकाच्या भूमिकेतून त्याला जे दिसलं, जे 'पॉईंट आउट' करावंसं वाटलं ते करताना दिसतो. ह्रषीकेश पाळंदेसारखे काही अपवाद वगळता त्याचे समकालीन लेखक समाजमाध्यमांचा, एका अर्थी गर्दीचा भाग होऊन आपलं स्थान पक्कं करण्याच्या प्रयत्नात दिसतात. आज ते अपरिहार्य आहे असं म्हणता येईल; पण दोन्हीकडचे लेखक पाहणाऱ्या माझ्यासारख्या वाचकाला त्यांच्या 'लेखकीय वजना'त थोडा फरक जाणवतो हेही नोंदवायला हरकत नाही. लेखन हे करिअर असण्यात काहीच गैर नाही. शिवाय आज काळ असा आहे की तुम्ही अगदी थिअरॉटिकल फिजिसिस्ट असलात तरी तुमचं नाव होण्यासाठी तुम्हांला (सोशल मीडियावर) नाच करून दाखवता येणं आवश्यक ठरतं! लोकमानस असं काही बदलतं आहे की तुम्हांला दोन मिनिटात किंवा दोन परिच्छेदात 'व्यापक' बोलता येणं गरजेचं झालं आहे. पण हे करायला लागत असल्याने तुमच्या खोलात उतरण्याच्या क्षमतेवर नक्कीच परिणाम होतो असं माझं निरीक्षण आहे. अवधूतसारखा लेखक तिथे वरचढ ठरतो. त्याच्यासाठीदेखील लेखन हे एका अर्थी करिअर आहेच. पण त्याच्यात 'लेखक होण्याचा' अट्टाहास दिसत नाही कारण तो लेखक आहेच. त्याला त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. (इथे सामान्यीकरण करण्याचा हेतू नाही. पण एक ढोबळ निरीक्षण नोंदवण्याचा उद्देश जरूर आहे.)

माध्यमांच्या कोलाहलात काही सखोल वाचनाची, 'पर्स्पेक्टिव्ह'ची गरज 'रेघ' भागवतं. माझ्यासाठी अवधूतशी होणारा संवाद हाच परिणाम साधतो. झालंय असं की आजचं वास्तव विखंडित आहे तसंच माणसंही विखंडित आहेत. दीर्घ संवाद तर फारसा कुणालाच नको असतो. आपली मतं, धारणा पुन्हा पुन्हा तपासायचीही फारशी गरज कुणाला वाटत नाही. वास्तविक कुठलंही घटित त्याच्या आगेमागे शेकडो संदर्भ घेऊन येत असतं. घटिताविषयी भरपूर चर्चा होताना दिसते; पण या संदर्भांविषयी फारशी चर्चा होत नाही. आणि चर्चेला जी वळणं फुटत जातात तो तर वेगळाच विषय! वर जो करिअरचा मुद्दा आला त्याला जोडलेला एक मुद्दा असा की लेखन हा निव्वळ आवडीचा प्रांत असून चालत नाही. त्यासाठी तार्किक क्षमतेची, सुसंगतीची (coherence - the quality of forming a unified whole) गरज असते. अगदी समकालीन घटनांवरील टिप्पणी हा विषय घेतला तरी तिथेही याची गरज असते. पण जर करिअर साधायचं असेल तर मग हे मुद्दे मागे पडतात. कारण 'लेखक होणं' हे अधिक वरचढ ठरतं. त्यातून 'सोशल डिस्कोर्स'चं नुकसान होतं. लेखक जेव्हा कथा लिहितो, कादंबरी लिहितो तेव्हा त्याच्यावर सोशल डिस्कोर्सचं ओझं देण्याचं काहीच कारण नाही. त्या लेखनाची समीक्षा हा वेगळा विषय. पण जेव्हा काही भाष्य करणारं लेखन होत असतं तेव्हा मात्र 'सोशल डिस्कोर्स'चा मुद्दा लागू होतो. या पार्श्वभूमीवर अवधूतसारखा लेखक आणि भाष्यकार महत्त्वाचा ठरतो. 

भाषांतर करत असताना मूळ पुस्तकातील मांडणीविषयी प्रश्न पडून त्यावर भाषांतरकाराला काही म्हणावंसं वाटू शकतं. ते म्हणणं छापील स्वरूपात आल्याची उदाहरणं फारशी दिसत नाहीत. अवधूतची दोन मोठी टिपणं त्यादृष्टीने महत्त्वाची ठरतात. पहिलं म्हणजे 'स्वतःचा अवकाश तपासताना : मराठी भाषांतरकाराचं टिपण' (सुगावा प्रकाशन) आणि दुसरं 'एका शब्दाचा पेच - मराठी भाषांतरकाराचं टिपण' (साधना प्रकाशन).  
        
पहिल्या टिपणाची ओळख (मलपृष्ठावरील मजकूर) - 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'ॲनाहिलेशन ऑफ कास्ट' या संहितेची एस. आनंद यांनी संपादित केलेली व त्यांनीच टिपा जोडलेली आवृत्ती 'नवयान पब्लिशिंग'नं मार्च २०१४मध्ये प्रकाशित केली. या ग्रंथासाठी एक दीर्घ प्रस्तावना 'द डॉक्टर अँड द सेंट' या शीर्षकाखाली अरुंधती रॉय यांनी लिहिली. या संपूर्ण प्रस्तावनेचं मराठी भाषांतर 'सुगावा प्रकाशना'नं 'वंश, जात व जातिव्यवस्थेचं उच्चाटन' या शीर्षकाखाली स्वतंत्र पुस्तक म्हणून प्रसिद्ध केलं. रॉय यांच्या मांडणीसंदर्भात मराठी भाषांतरकाराचे काही तीव्र मतभेद आहेत. या मतभेदांची त्यानं केलेली नोंद स्वतंत्र पुस्तिकेच्या रूपात प्रसिद्ध करण्याचं ठरलं, ती ही पुस्तिका.

'स्वतःचा अवकाश तपासताना : मराठी भाषांतरकाराचं टिपण' हा मजकूर रॉय यांच्या पुस्तकाशी समांतरपणे लिहिला गेला, हे खरं. पण स्वतंत्रपणे वाचताना हा निबंध सध्याच्या काळातल्या अभिव्यक्तीविषयीचा एक अगदी लहानसा घटना-अभ्यास वा व्यक्ति-अभ्यास (केस-स्टडी) म्हणूनही वाचता येईल, असं वाटतं.

दुसऱ्या टिपणाची ओळख (पुस्तिकेचं मनोगत) -

अ. के. भागवत आणि ग. प्र. प्रधान यांनी १९५६ मध्ये लिहिलेल्या लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी चरित्राचं मराठी भाषांतर करण्याचं काम सदर भाषांतरकाराकडे आलं. भाषांतर करताना काही विशिष्ट शब्दांवर अधिक रेंगाळणं होतं. परक्या भाषेतल्या या काही शब्दांसाठी आपल्या भाषेत काही रूढ शब्द असतात. काही वेळा तसे शब्द नसतातही. काही वेळा असे रूढ प्रतिशब्द सहज उपलब्ध असले तरी ते पटत नाहीत, अपुरे वाटतात. अशा वेळी भाषांतरकारासमोरची गुंतागुंत वाढते. या पुस्तिकेमध्ये ही गुंतागुंत मांडली आहे. इथे भाषांतराचा आशय टिळक-चरित्र हा असल्यामुळे वरील गुंतागुंतीची उकल करताना टिळकांच्या जीवनातील काही घटना-घडामोडींचा संदर्भही त्यात सविस्तर आलाच आहे. शेवटी त्यांच्या आयुष्यातल्या घटना-घडामोडींचे वर्णन किंवा विवरण करण्यासाठीच मूळ लेखकांनी शब्द वापरले आहेत. त्यामुळे मराठी भाषांतरकाराने टिळक-चरित्राच्या निमित्ताने इतरही संदर्भ सोबतीला घेत, त्याच्यासमोर आलेले पेच किंवा त्याला जाणवलेल्या काही शक्यता नोंदवायचा प्रयत्न या टिपणातून केला आहे.

ही दोन्ही टिपणं (पुस्तिका) आवर्जून वाचावी अशी आहेत. अवधूतमधला भाषांतरकार आपलं काम करत असताना त्याच्यातला भाष्यकार किती विचक्षणपणे त्या व्यवहाराकडे बघतो हे लक्षात येतं. 'एका शब्दाचा पेच'मध्ये त्याने टिळकांच्या व्यक्तिमत्वावर संदर्भसंपृक्त प्रकाशझोत टाकला आहे. टिळकांच्या संदर्भात वापरलेल्या 'कन्झर्व्हेटिव्ह' या शब्दापाशी रेंगाळत पुढे त्याने एक मोठाच पट मांडला आहे. 'एकेक पदर उलगडणं' म्हणजे काय त्याचा प्रत्यय हे टिपण वाचताना येतो. 

व्यक्तीचित्रात त्या व्यक्तीबाबत लिहावं असं अपेक्षित असतं. पण अवधूतमधली व्यक्ती आणि त्याच्यातला भाष्यकार वेगळा काढणं मला कठीण वाटतं. व्यक्तिगत संदर्भात मला त्याच्याबद्दल फार माहितीही नाही. एकदा बोलता बोलता त्याने एकदम 'अरे मी लग्न केलं' असं हळू आवाजात सांगितलं होतं. त्यावर मी त्याचं अभिनंदन केलं. पुढे त्याला मुलगा झाल्याचं एका मित्राकडून कळलं. त्याच्याशी बोलताना व्यक्तिगत, कौटुंबिक बोलणं होत नाही. पण तो ज्या आस्थेने साहित्यावर, सामाजिकतेवर बोलतो ते त्याचं 'व्यक्तिगत'च असतं. तो साहित्यिक-सांस्कृतिक कोलाहलापासून फक्त भौतिकदृष्ट्याच लांब आहे. रेघेवरचं त्याचं लेखन वाचलं की तो या कोलाहलात आपलं म्हणणं ठामपणे मांडतो आहे हे लक्षात येतं. रेघेवरील त्याच्या निवडक लेखांचं पुस्तक प्रकाशित होतं आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे. या 'इसमा'चं आख्यान अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला त्याची मदत होईल. 

कुठलंही व्यक्तीचित्रण म्हणजे त्या व्यक्तीचं संपूर्ण चित्रण असूच शकत नाही. पण तरी काही व्यक्तींबाबत काहीतरी लिहावं असं वाटतं खरं. अवधूतबाबत मला तसं वाटत होतं. काही लिहावं असं बरेच दिवस मनात होतं. वाचकांना कदाचित हे त्याचं व्यक्तीचित्र वाटणार नाही. पण लेखक-भाष्यकार म्हणून तो मला कसा दिसतो याची कल्पना येईल. आपल्या 'वाटण्या'ला, आपल्या आतल्या गुंतागुंतीला बोलून मांडताना कधीकधी फार अवघड होतं. आमच्या मागच्या भेटीत अवधूतचं तसं होतंय असं मला जाणवलं. लेखक असण्यापेक्षा त्याचं 'इसम' असणं मला भावतं ते त्यामुळेच. त्याबाबतीत तो मला माझा सहप्रवासी वाटतो. कारण आसपास पाहिलं तर उत्तरं तयार असलेले, त्वरित निर्णय देणारे बरेचजण मला दिसतात; पण प्रश्नांपाशी रेंगाळणारे फारसे कुणी दिसत नाहीत.    

अवधूत लेखक आहे, त्याला युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळून आता काही वर्षं झाली. इथून पुढेही त्याला पुरस्कार मिळतील. पण त्याचा लेखकराव होऊ नये असं म्हणण्याचीही मला गरज वाटत नाही. कारण तसं होणार नाही याची मला खात्री आहे. इतपत तर मी त्याच्यातल्या इसमाला नक्कीच ओळखतो!