Sunday, November 10, 2019

उदारमतवादाचा प्रवास आणि हिंदुत्ववादाचा थांबा

वसंत पळशीकर यांचा 'गोध्रा'या शीर्षकाचा एक लेख 'नवभारत'च्या मे २००२ च्या अंकात प्रकाशित झाला होता. हा लेख म्हणजे मिलिंद ओक यांच्या 'गोध्रा' या पुस्तिकेवरील टिपण आहे. भारतीय विचार साधना प्रकाशनाने ही पुस्तिका एप्रिल २००२ मध्ये [प्रकाशित केली होती. भारतीय विचार साधना हे प्रकाशनगृह हिंदुत्वनिष्ठ विचारांच्या प्रसारार्थ साहित्य प्रकाशित करते हे बहुतेक वाचकांना माहीत असेल. किशोर बेडकिहाळ यांनी संपादित केलेल्या 'जिहाद, गुलाल आणि सारीपाट' या पुस्तकात हा लेख आहे. हिंदू-मुस्लिम जातीयवादावरील (जमातवादावरील?) वसंत पळशीकरांच्या लेखांचं संकलन म्हणजे हे पुस्तक. हमीद दलवाई, नरहर कुरुंदकर, अ. भि. शहा यांच्या मुस्लिम जातीयवादाविषयीच्या भूमिकेवर टिप्पणी करणारे लेख या पुस्तकाच्या पहिल्या विभागात आहेत. शिवाय मुस्लिम मानसिकता, धर्मनिरपेक्षता/सांप्रादायिकता, भारत-पाकिस्तान संबंध आणि दंगली अशा पुढील चार विभागात इतर लेख आहेत. 

'गोध्रा' या लेखात पळशीकर लिहितात की एका अंगाने पाहिल्यास विश्व हिंदू परिषद, तबलीगी जमात व तत्सम अन्य धर्मीय संघटनांच्या धर्मकेंद्रित कार्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण सामान्य अनुभव असा की 'विशुद्ध धर्मा'चे पालन जसे वाढते तसे पालन करणाऱ्यांच्या ठायी कट्टरता, इतरांविषयी दुरावा, असहिष्णुता वाढते. याचे एक कारण हे की 'विशुद्ध धर्म' हा रेखीवपणे, धारदारपणे अन्य धर्मीयांपासून स्वतःचे वेगळेपण व श्रेष्ठत्व अधोरेखित करण्यावर भर देतो. त्याची मांडणी ही शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य वाढवणारी असते आणि एका धर्मपीठाची मक्तेदारी सत्ता प्रस्थापित करू पाहणारी असते. पळशीकर पुढे लिहितात की तबलीगी जमात, मदरसे किंवा विश्व हिंदू परिषद यांच्या संदर्भात मिलिंद ओक यांची दृष्टी सम नाही ही खरी समस्या आहे. तबलीगी जमात व अन्य मुस्लिम संघटनांचे कार्य त्यांच्या मनात तीव्र प्रतिक्रिया उत्पन्न करते, पण विश्व हिंदू परिषद व अन्य हिंदू संघटना यांचे कार्य मात्र तीव्र स्वागतशील प्रतिसाद उत्पन्न करते. 

आपापल्या धर्माचे उन्नत व विशुद्ध रूप सिद्ध करण्याची बौद्धिक वा व्यावहारिक कृती योग्य दिशेने व वळणाने होत आहे याची खूणगाठ कोणती हा कळीचा प्रश्न आहे असं पळशीकर पुढे म्हणतात आणि ते महत्त्वाचं आहे.

गेल्या काही वर्षातील मॉब लिंचिंगच्या घटना, गोरक्षकांचे हल्ले, कठुआ आणि उन्नाव येथील बलात्कारांच्या भीषण घटनांमधील हिंदुत्वाच्या धाग्याच्या पार्श्वभूमीवर पळशीकरांचे वरील मुद्दे आठवतात. या घटनांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. कठुआ घटनेनंतर मी स्वतःदेखील उद्वेगाने प्रतिक्रिया लिहिली. नंतर हिंदुत्वनिष्ठ मंडळींकडूनही प्रतिक्रिया आल्या. त्यात प्रामुख्याने निवडक निषेध, या घटनांचा संबंध हिंदू धर्माशी जोडणे याविरोधी प्रतिक्रिया होत्या. शब्दांची, विशेषतः तीव्र शब्दांची अडचण अशी असते की त्यांना उत्तर म्हणून तीव्रतर शब्द उमटू शकतात. हे घटनांनाही लागू होतं. कठुआसारख्या घटनेत जे झालं ते इतकं वाईट होतं की त्यावरील प्रतिक्रिया तीव्र असणं समजण्याजोगं होतं. बहुधा बऱ्याच हिंदुत्वनिष्ठ मंडळींना ते समजून घेता आलं नसावं. गेल्या काही वर्षांत आपलं परस्पर सौहार्द चांगल्यापैकी बिघडलेलं आहे. त्यात प्रतिक्रियांच्या अशा टकरीमुळे भर पडत असते. 

याबाबत बोलावंसं वाटतं याचं कारण हिंदुत्वनिष्ठ आणि विरोधक यांच्यातील मारामारी आजची नसली तरी आज ती गंभीर वळणावर आहे असं दिसतं. त्यात समाजमाध्यमांचा वाटा अर्थातच मोठा आहे. दृष्टिकोनात मूलभूतच फरक असल्याने मतभेद राहणार हे उघड आहे. प्राचीन भारतातील जडवादी आणि चैतन्यवादी यांच्यातील संघर्षाचंच हे विस्तारित, 'मल्टीपोलर' रूप आहे असं म्हणता येईल. पण या वादात मुळातील वादविषयाचा धागा बाजूला पडला आहे की काय अशीही शंका कधीकधी येते. मुळातील जे वादविषय आहेत त्यात दृष्टिकोनातील फरकाबाबत फारसं काही करता येणार नाही, पण हा फरक बाजूला ठेवून प्रत्यक्ष जगण्यात आपण काही विधायक करू शकतो का असा विचार करायला हवा आहे. दोन-एक वर्षांपूर्वी भाजप समर्थक आणि समाजमाध्यमांवर अतिशय सक्रीयपणे भाजपचा अजेंडा पुढे नेणाऱ्या शेफाली वैद्य यांच्याशी एक सविस्तर 'व्हॉट्सअॅप चर्चा' झाली होती. चर्चा चांगली झाली होती. त्यात मी त्यांना एके ठिकाणी असं म्हटलं होतं की मी तुमच्या बाजूला येणार नाही हे तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही माझ्या बाजूला येणार नाही हे मला माहीत आहे. त्यामुळे प्रश्न एवढाच उरतो की आपण 'शांततामय सहअस्तित्व' कसं टिकवायचं ?       
   
मला असं दिसतं की जर काही गोष्टी खुलेपणाने स्वीकारल्या गेल्या तर हे होऊ शकेल. वरील चर्चेमध्ये शेफाली वैद्य मला असं म्हणाल्या होत्या की तुम्ही उदारमतवादी वाटत नाही कारण तुम्ही बऱ्याच समजूतदारपणे बोलताय. आता इथे आपण थोडं खोलात जाऊ. २०१४ पासून राजकीय आघाडीवर जे सुरू आहे ते आपण पाहतोच आहोत. त्याबरोबर सामाजिक ध्रुवीकरण झालं आहे, समर्थक-विरोधक कडाक्याने भांडतायत. या गदारोळात मीही आहे. माझंही एक मत आहे. भाजप का नको याविषयी माझं काहीएक म्हणणं आहे आणि ते मी मांडलेलं आहे. पण तरी सत्तेत असणाऱ्या पक्षाचं मूल्यमापन केवळ माझ्याच निकषांवर करता येत नाही हे मला मान्य आहे. तिथे 'होलिस्टिक' विचार करावा लागतो. मला ज्या पक्षाची वैचारिक बैठक मान्य नाही त्या पक्षाने जर काही चांगली कामं केली, धोरणात्मक दृष्ट्या चांगले निर्णय घेतले  तर मला 'फक्त त्या गोष्टींचं स्वागत' करता यायला हवं. मला आणि आपल्या सगळ्यांना आपल्यातील मतभेदांच्या वर जाऊन एकमेकांतील गुणांचं (ते गुण तत्कालिक प्रभाव टाकणारे असले तरी) कौतुक करता यायला हवं. मी मागे एकदा लिहिलं होतं ते पुन्हा लिहितो. भाजपच्या बाबतीत अडचण अशी आहे की जे निगेटिव्ह आहे ते इतकं अस्वस्थ करणारं आहे की पॉझिटिव्हकडे बघावंसंही वाटत नाही. पण तरी उद्या समजा माझ्या दृष्टीने भाजप हा पक्ष 'सुधारला', माझ्या कडक निकषांवर तो खरा उतरला तर मी काय करेन? मग मला त्याला समर्थन द्यावं लागेल. पण राजकीय पक्ष वगैरे दूरची गोष्ट झाली. मला असं वाटतं की आज आपण एकमेकांमध्येच ही 'सुधारण्याची स्पेस' नाकारतो आहोत. तसा प्रयत्न आपण करत नाही आहोत. शेफाली वैद्य जर असं म्हणत असतील की तुम्ही उदारमतवादी वाटत नाही कारण तुम्ही समजूतदारपणे बोलताय तर उदारमतवादी लोकांबद्दल आज इतरांना काय वाटतं, जर ते नकारात्मक नसेल तर का हा विचार मी सुरू करेन. इथे पुन्हा शेफाली वैद्यांशी इतर बाबतीत सहमत होण्याचा प्रश्नच नाही. जिथे विरोध आहे तिथे विरोध आहेच. शेफाली वैद्य यांच्या व्यक्तिमत्वात समजूतदारपणा आहे/नाही हाही एक मुद्दा असू शकतो. त्यांची फेसबुक व ट्विटरवरील अभिव्यक्ती कधीकधी टोकाची विद्वेषी असते. पण त्यांच्या लिबरल्सबद्दलच्या अनुभवांममुळे त्यांचं जे रीडिंग आहे ते तपासून बघायला काय हरकत आहे? माझ्यात एखादी सुधारणा होऊ शकत असेल तर ती सुधारणा कुणी सुचवली याला मी महत्त्व देऊ नये. 'मॅटर ऑफ फॅक्ट' म्हणून मला ते स्वीकारता यायला हवं. 

हिंदुत्ववाद आणि उदारमतवाद या संघर्षात आणि इतरही टकरींमुळे 'पुरोगामी' शब्दाला नकारात्मक छटा आली आहे. वास्तविक वैचारिक कल म्हणून हिंदुत्ववादी, समाजवादी, कम्युनिस्ट अशा विभागण्या मान्य केल्या तरी हे काही 'वॉटर टाइट कंपार्टमेंट्स' नाहीत. धार्मिक विचारप्रणालीला आपल्या विचारविश्वात स्वतःच्या आत्मिक स्वास्थ्यासाठी स्थान देणारा पण धार्मिक आयडेंटिटी धारदार होऊ न देणारा मनुष्य पुरोगामी असू शकतो असं मला वाटतं. पळशीकर म्हणतात तसं 'विशुद्ध धर्मपालन' करताना कट्टरता, असहिष्णुता वाढते. त्यामुळे धर्मपालनाला जगण्यात काहीएक स्थान असणाऱ्यांची जबाबदारी वाढते. आज समंजस हिंदुत्व कुणीच बाळगत नाही का? मला वाटतं असे अनेक लोक आहेत, पण खरं सांगायचं तर मला हा प्रश्न गोंधळात टाकतो कारण माझ्या आकलनानुसार हिंदुत्व ही धारणा कट्टर मुस्लिम धार्मिकतेला उत्तर म्हणून निर्माण झाली आणि पुढे तिची वाटचाल कट्टर मुस्लिम धार्मिकतेच्या वास्तव/अस्थानी भीतीपोटी झाली आहे. (स्लॅश जाणीवपूर्वक वापरला आहे. हा मुद्दा चर्चेला खुला आहे.) ती 'भारतीयत्वा'कडे, 'आधुनिकते'कडे न जाता हिंदुत्वाभोवतीच रेंगाळत राहिली आहे. त्यामुळे प्रतिक्रियारहित अशी निव्वळ हिंदुत्व अशी काही संकल्पना आहे की नाही हे बहुधा तपासावं लागेल. जे असमंजस, विखारी हिंदुत्व आहे त्याचं दर्शन होत असतं. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया येतात. यात गडबड अशी होते की या प्रतिक्रियांमुळे समंजस हिंदुत्ववादी दुखावले जाऊ शकतात. पण अशा प्रतिक्रिया, असा उद्वेग येणार हे त्यांनी समजून घ्यायला हवं. हिंदू समाज हा एका अर्थाने सहिष्णू आहे म्हणूनच अशा प्रतिकिया येऊ शकतात. हिंदू समाज जातीच्या बाबतीत अतिशय असहिष्णू असला आणि आज विखारी हिंदुत्व प्रभावी होताना दिसत असलं तरी हा समाज ढोबळ मानाने समावेशक वृत्तीचा आहे. यातली एक व्यावहारिक बाजू अशी आहे की 'हिंदू' म्हणून एकच एक चेहरा नसल्याने या समाजाला समावेशक असण्यावाचून पर्यायही नाही. याबाबत सुरेश द्वादशीवारांनी दिलेली उपमा चपखल आहे. त्यांनी एका लेखात म्हटलं होतं की किराणा-भुसारच्या दुकानात किराणा आणि भुसार या नावाच्या वस्तू अस्तित्वात नसतात. अस्तित्वात असतं ते मीठ, मोहरी, साखर, रवा इ. हिंदू धर्म असाच आहे. इथे ब्राह्मण, मराठा, धनगर, माळी आणि इतर अनेक जाती असतात. फक्त 'हिंदू' असा कुणी नसतो. हिंदुत्वनिष्ठ मंडळींचा नेमका हाच आग्रह आहे की आपण सगळे 'हिंदू' आहोत म्हणून आपण एकत्र यायला हवं. 'हिंदू आयडेंटिटी' हा त्यांच्या प्रेमाचा विषय आहे. यात त्यांना संमिश्र यश मिळालं आहे. एक मोठा समुदाय या आयडेंटिटीच्या छत्राखाली आला आहे हे खरं आहे. (त्यातूनच विखारही उत्पन्न झाला आहे हे पुन्हा नोंदवू.) पण दुसरा मोठा समुदाय या छत्राच्या बाहेर आहे. शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदुत्ववाद्यांनी आपलंसं करण्यामागे संख्याबळ वाढवणे हा स्पष्ट हेतू आहेच. अन्यथा हिंदू धर्माचे कठोर टीकाकार असलेले, हिंदू म्हणून मी मरणार नाही असं म्हणणारे आंबेडकर स्वीकारण्यामागची संगती लावता येत नाही. 

एकीकडे टोकदार स्वरूपाचा हिंदुत्ववाद प्रबळ होत असताना दुसरीकडे बहुसंख्य 'हिंदू मानस' अजूनही 'हिंदू असण्या'प्रती हळवं आहे आणि त्यांना हिंदू धर्माची चिकित्सा नको आहे किंवा मुस्लिम धर्माची चिकित्सा झाली तरच हिंदू धर्माची चिकित्सा मान्य आहे असं दिसतं. त्याचा एक साइड इफेक्ट म्हणजे ज्या घटनांचा संबंध अतिरेकी हिंदुत्ववादाशी पोचतो त्याबद्दलही कुणी काही बोलू नये अशी अपेक्षा तयार झाल्यासारखी दिसते.     
  
मला असं वाटतं की आज झुंडीची मानसिकता ज्याप्रकारे वाढते आहे ती लक्षात घेता आपल्या धर्माविषयी सॉफ्ट कॉर्नर असणारी जी धार्मिक मानसिकता आहे (हिंदू आणि मुस्लिम दोन्ही) तिकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. कारण जी मानसिकता आज 'सॉफ्ट' आहे ती उद्या 'हार्ड' होतेच कारण या मानसिकतेचा पायाच मुळात 'रॅशनल' नाही आहे. धार्मिक दुखावलेपण हे तीव्र स्वरूपाचं असतं आणि तिथे प्रतिवाद केला तरी तो स्वीकारला जात नाही. एका धार्मिक कट्टरतेची चिकित्सा दुसऱ्या धार्मिक कट्टरतेच्या 'रेफरन्स'नेच झाली पाहिजे यात 'लॉजिकल फॅलसी' आहे - म्हणजे ते तर्कदृष्ट्या योग्य नाही. पण भारतीय संदर्भात त्याला वेगळा आयाम आहे हे खरं. कारण कट्टर हिंदुत्ववाद हा कट्टर मुस्लिम धार्मिकतेची प्रतिक्रिया म्हणून उभा राहिला आणि बळकट झाला असं म्हटलं जातं. याबाबत एक विचार करायला हरकत नाही. समजा भारतावर मुस्लिम शासकांनी राज्य केलं नसतं आणि पुढे मुस्लिम मूलतत्त्ववादाची झळ भारताला पोचलीच नसती तर हिंदू धार्मिकता कट्टर न होता जातीय कट्टरताच फक्त उरली असती असं म्हणता येईल का? 'जर-तर' च्या प्रश्नांना फारसा अर्थ नसतो हे खरं, पण हिंदू धार्मिकतेच्या स्वरूपाचा विचार करताना हा प्रश्न मनात डोकावतो आणि तो तितकाही अप्रस्तुत वाटत नाही. आणि गंमत म्हणजे आज धार्मिक कट्टरता जशी आहे तशीच जातीयही आहेच. धार्मिक आहे म्हणून सगळे एकत्र एका झेंड्याखाली आहेत असं झालेलं नाही. याला धार्मिक पुनुरुज्जीवनाच्या प्रयत्नांना आलेलं अपयश म्हणायचं, मर्यादित यश म्हणायचं की याची अन्य प्रकारे चिकित्सा करायची हाही एक प्रश्न आहेच. सध्या तो नोंदवून पुढे जाऊ. 

एक गोष्ट स्पष्ट आहे की धर्माची प्रस्तुतता मान्य केली तरी धर्म बहुसंख्य माणसांना हळवा आणि म्हणून कट्टर बनवत असल्याने धर्माच्या कक्षेच्या बाहेर राहून जे विचार करू शकतात त्यांच्यावर जास्त जबाबदारी येऊन पडते. पुढे जाण्याआधी एक किस्सा सांगतो. 'साइनफेल्ड' ही एक गाजलेली अमेरिकन मालिका. 'फ्रेंड्स'च्या आधीची. यातील एका भागात एका स्री व्यक्तीरेखेच्या तोंडी असा संवाद आहे की तिचं आणि गांधींचं पॅशनेट प्रेमप्रकरण होतं. 'गांधी त्यांचं टक्कल असलेलं डोकं तेलात बुडवून माझ्या शरीरावर फिरवत असत' असं ती म्हणते. (मूळ इंग्लिशमध्ये ऐकायला हे अधिक गंमतीदार वाटतं). आता हे बघत असताना मी हसत होतो. याचं कारण काय? एक म्हणजे मी लिबरल आहे, दुसरं म्हणजे विनोदी म्हणूनही, त्या विशिष्ट संदर्भात मला ते मान्य होतं. पण हा किंवा असा विनोद एखाद्या कट्टर हिंदुत्ववाद्याने केला असता तर मला तो चालला असता का? याचं उत्तर असं की विनोद जर खरंच दर्जेदार (आता यात सापेक्षता आहे, पण त्याला इलाज नाही!) असेल तर आवडेल. नसता तर राग आला असता किंवा तिकडे दुर्लक्ष केलं असतं किंवा स्वतंत्रपणे त्याचा उल्लेख लेखात वगैरे केला असता. मी जरी विनोद एंजॉय केला तरी तो 'निखळ विनोद' आहे की 'राजकीय स्टेटमेंट' आहे हे मला समजलं असतं. आता आपण दुसऱ्या बाजूला जाऊ. मी जर कट्टर हिंदू धार्मिकतेबाबत विनोदाने काही लिहिलं तर एखादा हिंदुत्ववादी ते विनोदाने घेऊ शकत नाही कारण त्याला त्यात निखळ विनोद दिसत नाही. त्याला त्यात राजकीय कोन दिसतो कारण विनोदाच्या मांडणीकडे तो त्या कोनातून बघतो. (आमच्या एका बऱ्यापैकी हिंदुत्ववादी काकांनी केलेला एक विनोद आठवला. कशावरून तरी तलाकविषयी बोलणं सुरू होतं. माझी आई उर्दू माध्यमाच्या शाळेत शिक्षिका होती. तिथे बऱ्याच मुस्लिम शिक्षिका होत्या. मी सहज म्हटलं की मला आठवत नाही कधी तलाक वगैरे झाल्याचं. त्यावर काका म्हणाले - नोकरी करणाऱ्या बायकोला कोण तलाक देईल? मी काकांना एक हिंदुत्ववादी टाळी दिली!)  

हा एक तिढा आहे आणि विशिष्ट संदर्भात आपण निव्वळ व्यक्ती म्हणून राहू शकत नाही हे आपल्याला मान्य करावं लागेलच. पण याच्या पुढे जाऊन मला हे म्हणायचं आहे की संघटित धर्माच्या कक्षेबाहेर असणाऱ्या माझ्यासारख्याकडे जास्त जबाबदारी असली तरी जे कक्षेच्या आत आहेत त्यांनीही परिघाकडे थोडा प्रवास करायला हरकत नाही. मुळात एक तर गांधी, फाळणी, काश्मीर, हिंदू-मुस्लिम संघर्ष याबाबत पुष्कळ गैरसमज असतात. राजकीय स्थित्यंतराच्या काळात जे घडतं त्याचं सोपं आणि सोयीस्कर आकलन करून दिलं जातं. त्यामुळे हिंदुत्ववादाच्या स्वरूपाविषयी काही बोललं तर त्याचा संबंध काश्मीर, फाळणी, मुस्लिम तुष्टीकरण याच्याशी न जोडता 'हे आपल्याच सामाजिक सुधारणेसाठी उपयोगी असू शकेल' असा विचार तरी किमान करून पाहावा.  

आज जे अस्वस्थ करणारं चित्र दिसतं त्या पार्श्वभूमीवर मला दोन-तीन गोष्टी दिसतात - 

  • एक म्हणजे उदारमतवादी लोकांनी धार्मिक हळवेपणाची 'ग्रॅव्हिटी' लक्षात घेऊन समंजस हिंदुत्ववाद्यांशी संवाद सुरू ठेवणं - जे अगदी कट्टर आहेत त्यांनाही तिखट उत्तर न देता त्यांना धार्मिक मूलतत्त्ववादाचं गांभीर्य समजावून सांगत राहणं (हे अवघड असू शकेल, पण मला वाटतं हाच एक मार्ग आहे. कारण कट्टरता ही मुळातच एकारलेली, नाजूक आणि म्हणूनच काहीशी हिंस्रही असते. त्यामुळे तिथे प्रहार केला की ती आणखी हिंस्र व्हायची शक्यता असते.) 
  • दुसरं म्हणजे उदारमतवादी लोकांनी धार्मिकदृष्ट्या हळव्या लोकांची ते दुखावले गेले तर माफी मागणं. यात भूमिका बदलायचा प्रश्न येत नाही. पण समजुतीचा प्रश्न येतो. कळत-नकळत जर धर्मश्रद्धेला धक्का बसला असेल किंवा काही कारणाने आपली मांडणी त्यांना एकारलेली वाटत असेल तर त्याची नोंद घेऊन, धार्मिक कट्टरतेची चिकित्सा करणं न सोडता, तिचे दुष्परिणाम दाखवून देणं न सोडता 'माणूस दुखावला गेला' म्हणून माफी मागणं आवश्यक आहे असं मला वाटतं. 
  • तिसरं म्हणजे धार्मिकदृष्ट्या हळव्या लोकांनी आपलं केंद्र सोडून परिघाकडे येणं. धार्मिक कक्षेच्या आत जी मौज आहे त्यापेक्षा अधिक मौज या कक्षेच्या बाहेर आहे कारण इथे मौजेबरोबर आपली परीक्षा घेणारी आव्हानंही आहेत!

यासंदर्भात मला आणखी एक असं वाटतं की कदाचित स्ट्रॅटेजी म्हणून 'डावा हिंदू' ही ओळख माझं म्हणणं पोचवायला उपयुक्त ठरू शकेल. संघटित धर्मापासून मुक्त होण्याच्या वाटचालीत आधी धार्मिक ओळख पुढे आणणं हेच कदाचित उपकारक ठरेल. धर्माचा प्रभाव असलेल्या समाजात धर्माची चौकट संवादाची जागा मोकळी करते म्हणून हे करायचं. हिंदुत्ववादी संघटनांचं यश धार्मिक ओळखीला चेतवण्याच्या सोप्या मार्गावरून गेल्यामुळे आहे. तिथे 'मूलभूत परिवर्तनाचं आव्हान' घेणं टाळलेलं आहे किंवा परिवर्तनाचं आव्हान घेतलं तरी ते बहुतेकदा धर्म-जातीच्या स्ट्रक्चरला, आर्थिक संरचनेच्या स्ट्रक्चरला धक्का न लावता घेतलेलं आहे. परिवर्तनात जेव्हा मूलभूत वैचारिक परिवर्तन अभिप्रेत असतं तेव्हा ते मोठं आव्हान असतं. हिंदुत्ववादी विचारात मूलभूत वैचारिक परिवर्तनापेक्षा हिंदुहितवाद, सेवाभाव या गोष्टी अधिक प्रभावी आहेत. त्या बळावर त्यांनी संस्थात्मक बांधणीही केली आहे. परंतु त्याला धर्माची दृश्य-अदृश्य चौकट आहेच. मग परिवर्तनाच्या विचारानेदेखील ही दृश्य-अदृश्य चौकट स्वीकारावी. आज कदाचित या चौकटीपासून बरीच फारकत घेतल्याने परिवर्तनाचा विचार रूजवता येत नसेल. 'मी तुमच्यातला नाही' असं सांगण्यापेक्षा 'मी तुमच्यातलाच आहे आणि मला माझं वेगळं म्हणणं मांडायचं आहे' असं म्हणणं अधिक फलदायी ठरू शकेल.

माझा एक मित्र मानवी उत्क्रांतीचा चांगला अभ्यासक आहे. त्याच्याबाबत सांगावी अशी एक विशेष गोष्ट म्हणजे त्याने या विषयाचे लहान मोड्यूल्स तयार केले आहेत आणि तो शाळेतील मुलांसमोर ते सादर करतो. त्याचं काम आणि त्याचा दृष्टीकोन मला खूप महत्त्वाचा वाटतो. एकदा गप्पा मारताना तो म्हणाला होता की उत्क्रांतीचा विषय निघाला की मी लोकांना सांगतो की देव आहे-नाही या वादात आपण पडायलाच नको. मी देवाचं अस्तित्व नाकारण्याकरता उत्क्रान्तीचा अभ्यास केलेला नाही. हा अभ्यास करताना मला जाम मजा आली म्हणून मी तो केला. ती मजा तुम्हालाही अनुभवता येईल म्हणून तुम्ही हा अभ्यास करा!

मला असं दिसतं की परिवर्तनाचा विचारदेखील लहान मोड्यूल्समधूनच प्रभावीपणे पोचेल. त्याचाच एक भाग 'डावा हिंदू' ही स्वतःची ओळख न्यूट्रॅलिटीने मान्य करणे हा असू शकेल. माणूस धार्मिक होतो, कट्टर होतो याच्या मुळाशी माणसाचं 'व्हल्नरेबल' मन आहे. मग मन जर व्हल्नरेबल आहे तर ते परिवर्तनाकडेही झुकू शकेल. त्यासाठी परिवर्तनवादी विचारात परिवर्तनशीलता हवी!

- 'सृजन' दिवाळी अंक, २०१९ 

Tuesday, November 5, 2019

गांधीविचार : अध्याय २०१९

गांधींच्या बाबतीत सजगपणे, जाणतेपणानं विचार करायला मी कधी सुरुवात केली हे मला सांगता यायचं नाही. गांधी, नेहरु, जेपी आणि विनोबा हे सगळेजण लहानपणापासून पुस्तकं, चर्चा आणि प्रभाव या स्वरुपात घरामध्ये वास्तव्य करत होते. माझ्या वडिलांची ‘सर्वोदयी’ विचारदृष्टी जगण्याची मूल्यात्मक बाजू सतत स्पष्टपणे दाखवत होती.  व्यावहारिक पातळीवर जगण्याचे अनेक संघर्ष होतेच आणि त्यावेळी ‘या मूल्यांचं नक्की काय करायचं ?’ हा प्रश्‍न पडला नाही असंही नाही, पण या सर्व मंडळींनी जे भरणपोषण केलं त्याचे परिणाम पुढे अनेकदा प्रत्ययास आले.

गांधी हे एक विचारात पाडणारं, कधी कधी गोंधळात पाडणारं रसायन आहे यात शंकाच नाही. गांधींविषयी नव्याने काही लिहायची गरज आहे का असं एकीकडे वाटत असताना दुसर्‍या बाजूने गांधीविचारांच आकलन करुन घ्यायची उत्सुकता असणारी नवीन पिढीही तयार होताना दिसते. गांधी हा समकालीन सामाजिक, राजकीय विचारातला एक ‘लंबी रेस का घोडा’ आहे आणि गांधीविचार हा मानवी परस्पर संबंध, मानवी आकांक्षा, मानवनिर्मित अनेक व्यवस्था यांच्या ‘फंक्शनिंग’मध्ये कमी-अधिक प्रमाणात योगदान देत असतो. हे वारंवार दिसून येतं. आपण गेल्या दोन शतकांकडे नजर टाकली तर ‘व्यवस्था-विचार’ म्हणून उदयास आलेल्या मार्क्सवादानंतर गांधीविचार हा आणखी एक ‘व्यवस्था-विचार’ होता असं स्पष्टपणे दिसतं. भारतीय सामाजिक अभिसरणाची सुरुवात, जोतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर, र.धों.कर्वे, बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे आणि इतरही अनेक अभ्यासक विचारवंत-कार्यकर्त्यांच्या योगदानातून होते. भारतीय समाज प्रवाहाला वळण देण्यात या सगळ्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. गांधींच्या बाबतीत जो अधिकचा फरक पडला तो त्यांच्या राजकीय प्रभावामुळे, त्यांच्या तत्त्वज्ञानात्मक मांडणीमुळे आणि त्यांनी दाखवलेल्या रचनात्मक कार्याच्या दिशेमुळे. खरं पाहता निव्वळ वैचारिक, आधुनिकता केंद्री, क्रांतदर्शी दृष्टीने तुलना केली तर आंबेडकरांचं जातिबद्ध भारतीय समाजाचं आकलन आणि या समाजाच्या रचनेमध्ये मुळातून काही बदल करण्यासाठीची वैचारिक दिशा ही गांधींपेक्षा अधिक’ मूलगामी आहे असं म्हणता येईल. र.धों.कर्व्यांचे स्त्री-पुरुष संबंधाबाबतचे, संतती नियमनाबाबतचे विचार पाहता या विशिष्ट मुद्यावर ते गांधींपेक्षा अधिक पुढे होते असंही दिसू शकेल. त्यमुळे प्रागतिकतेच्या विविध निकषांवर गांधी मागे पडण्याचीच शक्यता जास्त आहे. असं असताना गांधी विचार ‘शिळा’ होत नाही, समाजिक संबंधांमध्ये,राजकीय ’ जाणिवेच्या व आनुषंगिक भूमिकेच्या बाबतीत तो सतत अस्तित्व टिकवून ठेवतो याचं कारण काय असावं?

मला याचं कारण हे दिसतं की गांधीविचार हा ‘आतून बाहेर’ असा प्रवास करणारा विचार आहे. गांधींची एकादश व्रते आणि त्यांच्या मांडणीतला नैतिकतेचा, साधनशुचितेचा आग्रह, त्यांचं एकूण तत्त्वज्ञान माणसाला एका उन्नत पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणारं आहे. त्यात मग अर्थातच अवघड आदर्श आहेत. आपण ज्याला सहजपणे ‘अव्यवहार्य’ म्हणू अशा गोष्टी आहेत. रसहीन-एकसुरी वाटेल अशी जीवनशैली आहे. व्यवस्था-विचार करायचा तर मानव-विचारापासून सुरुवात करायला हवी हे मार्क्सही म्हणतो; पण आधुनिकता, सहज प्रेरणांना न्याय, उद्यमशीलता, सृजनशीलता या व इतर पैलूंना कवेत घ्यायचं स्वातंत्र्य असणार्‍या माणसाची ‘नैतिक बैठक’ काय असावी हा गांधीविचाराचा गाभा आहे. या नैतिक भूमिकेविषयी मत-मतांतरं असू शकतात. कारण गांधीविचार हा प्रामुख्याने 'माणूस कसा असतो?' यापेक्षा 'माणसाने कसं असायला हवं?' याचा विचार करतो. त्यामुळे तो रूढार्थाने 'व्यवहार्य' होत नाही आणि मतभेद उत्पन्न होतात. शिवाय गांधीविचारांचं सुलभीकरण, अपप्रचार, चुकीचे अर्थ लावणं यामुळेही गांधींबद्दल भरपूर गैरसमज होतात.  

माणसाचं एक प्रमुख वैशिष्ट्य असं की त्याच्या आदिम काळातील जगण्याच्या लढाईपासून ते आजच्या अत्याधुनिक जगण्यापर्यंत त्याने ‘विचारधारा’ जन्माला घातल्या आहेत. दुसर्‍या बाजूला त्याचं आजचं दैनंदिन जीवन इतकं गुंतागुंतीचं आहे की ‘विचारधारा’ बरहुकूम वागत येईलच असं नाही. माणसाला क्षणोक्षणी कसले ना कसले निर्णय घ्यावे लागतात. तिथे विचारधारेबरोबरच, किंबहुना त्याहूनही थोड्या जास्त प्रमाणात, त्याच्या मूलभूत प्रेरणाच प्रभावी ठरत असतात. गांधींचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य असं की त्यांनी या मूलभूत प्रेरणांच्या - 'ह्यूमन इंस्टिंक्ट’च्या जागी ‘इन्हेस्टिगेशन’ला आणून बसवायचा प्रयत्न केला. समग्र गांधीविचाराची व्यापकता, त्याविषयीची मत-मतांतरे, त्यांची राजकीय भूमिका या सगळ्यावर पुष्कळ चर्चा होत असते. होत राहीलही. तो एक अभ्यास विषय आहेच. पण समकालीन संदर्भात गांधींची प्रस्तुतता यावर ‘मला’ - म्हणजे नव्वदीच्या दशकात मोठ्या झालेल्या आणि पुढे आर्थिक उदारीकरण, इंटरनेट, मोबाईल, गूगल अन् फेसबुक, यू ट्यूब आणि नेटफिक्स, जनलोकपाल आंदोलन, नर्मदा बचाओ आंदोलन आणि देशभरात सुरु असलेली इतर जनआंदोलनं, टीव्हीची मनोरंजन आणि पत्रकारिता या दोन्ही अंगांनी झालेली संपूर्ण अवनती, उजव्या आणि डाव्या विचारातला तीव्र झालेला संघर्ष, बहुसंख्याकवादाला चढलेली धार आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न, 'सत्योत्तर' काळाचे प्रश्न या आणि आनुषंगिक उलथापालथीचा साक्षीदार असलेल्या एका भारतीयाला - काय वाटतं हे अधिक आत्मीयतेने सांगावसं वाटतं.

फेसबुक हे राजकीय - सामाजिक विचारांचं रणांगण बनलं आहे हे या माध्यमाशी परिचित असलेल्या बहुतेकांना माहीत आहे. याच मैदानात मीही माझं म्हणणं अनेक वर्ष मांडत आलो आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी मी फेसबुकवर ‘मी आणि गांधीजी’ ही संवादमालिका लिहू लागलो. वर उल्लेख केलेल्या ‘अस्वस्थ वर्तमाना’त जगणारा एक तरुण आणि गांधीजी यांच्यात ‘आज’ घडणारा संवाद असं या मालिकेचं स्वरुप आहे. यातले गांधीजी हे ‘महात्मा गांधी’ असले तरी ‘मी’च्या मित्राच्या जागी आहेत. त्यामुळे त्यांच्यातला संवाद मित्रांमधल्या संवादासारखा आहे. मला हे लिहावसं वाटलं, गांधीजींना ‘बोलवावसं’ वाटलं याच्यातच गांधीविचार आज मार्गदर्शक ठरु शकतो हा विश्‍वास दिसून येतो.

इथे एक गोष्ट स्पष्ट करुन घेऊ. ‘गांधीविचार’ म्हटलं की त्यात अनेकविध गोष्टी येऊ शकतात. मला गांधीविचारातला वर उल्लेख केलेला ‘इन्व्हेस्टिगेशन’चा भाग आकर्षित करतो. त्याचा मी संवादमालिकेमध्ये उपयोग केलेला आहे. आता एक गोष्ट खरी की माझा व्यक्तिगत वैचारिक कल (जो गांधीवाद - नेहरूवाद - मार्क्सवाद - स्त्रीवाद - उदारमतवाद यांच्या एका मिश्रणातून तयार झाला आहे) या संवादांमध्ये अधूनमधून प्रतिबिंबित होतो. पण माझा प्रयत्न ‘इन्व्हेस्टिगेशन’चा, विचार तपासून बघण्याचा असतो. स्वतःला तपासून बघणं, स्वतःमध्ये सुधारणेच्या जागा कुठे आहेत त्या शोधणं हा २०१९ मधल्या ‘मला’ आणि १९४० मधल्या गांधींना जोडणारा दुवा ठरतो.

मी मागे लेख/चर्चांमधून अनेक वेळा उल्लेख केलेला मुद्दा इथे पुन्हा लिहितो, कारण तो आवश्यक आहे असं मला वाटतं. वैचारिक कल, व्यक्तिगत घडण, व्यक्तिगत अनुभव हे सगळं एका बाजूला ठेवलं तरी दुसर्‍या बाजूला एक मानवीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असा विचार आहे आणि त्याचा आपल्याला आज विसर पडलाय की काय अशी शंका येते. हा विचार खरं तर अजिबात गुंतागुंतीचा नाही. साधा सरळ आहे. तो अगदी आपल्या आईबाबांनी घरी शिकवलेला असेल इतका साधा आहे. ‘माझं चुकू शकतं’ हा तो विचार. मला असं दिसतं की कमालीचं राजकीय ध्रुवीकरण झालेल्या आजच्या काळात ‘आपलं काहीतरी चुकत असेल’ एवढी शक्यता जरी आपण आपल्या मनाशी बोललो तरी ती एक मोठी सुरुवात ठरेल!

आपल्याला आज असं वाटत नाही कारण आपलं टोकाचं ‘पक्षीय राजकीयीकरण’ झालं आहे. राजकीय भूमिका असण्याबद्दल आक्षेप नाहीच, पण ‘राजकीय हिंसकता’ असण्याबद्दल नक्की आक्षेप आहे. कारण त्याचं पर्यवसन समाजस्वास्थ बिघडण्यात, परस्पर सौहार्द बिघडण्यात होतं. आपण आज या ‘राजकीय हिंसकते’च्या प्रभावाखाली आलो आहोत. माणसातली आदिम ‘टोळी जाणीव’ तीव्र होत आहे आणि आधुनिक उपकरणांनी, तंत्रज्ञानाच्या चमत्कारांनी वेढलेले आपण मनातून मात्र आदिम जाणिवांचे गुलाम होत आहोत. आपण वैचारिकदृष्ट्या इतके ‘स्थितीशील’ कसे झालो ? हिंसक राजकारणाने आपल्यातला स्वतंत्रपणे विचार करु शकणारा, कुठल्याही संघटनेचं - पक्षाचं - नेत्याचं जोखड नाकारणारा लोकशाहीवादी सजग नागरिक कसा काय संपवला? यावर एक प्रतिवाद असा आहे की, मुळातच आपण स्वतंत्र विचार वगैरे करणारे, समता-स्वातंत्र्य-वैज्ञानिकतेचा पुरस्कार करणारे नव्हतोच. आपण परंपराप्रिय आहोत. आपल्याला अधिकारांची, श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची उतरंड मनातूनच आवडते. आज फक्त ते कमकुवत आवरण गळून पडलंय आणि आपल्यातला मूळ ‘विघटित भारतीय’, ‘एकारलेला भारतीय’ समोर आला आहे. आज जर आपण सार्वजनिक चर्चाविश्वाकडे नजर टाकली तर हे सहज लक्षात येईल. आपली 'न्यूरोप्लॅस्टिसिटी' कमालीची कमी झाली आहे / आहे. 'न्यूरोप्लॅस्टिसिटी' म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यभर त्याच्या मेंदूमध्ये नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार करून मेंदूमध्ये बदल होण्याची क्षमता. या क्षमतेमुळे न्यूरॉन्स नवीन परिस्थतीला, एखाद्या बदलाला, नव्या माहितीला प्रतिसाद देऊ शकतात. आपल्या मेंदूचा हा एक भौतिक गुणधर्म आहे आहे. अ‍ॅडल्ट ब्रेनपेक्षा डेव्हलपिंग ब्रेनमध्ये न्यूरोप्लॅस्टिसिटी जास्त असते. साध्या भाषेत सांगायचं तर न्यूरोप्लॅस्टिसिटी जास्त असणं म्हणजे सवयीच्या नसलेल्या परिस्थितीला, विचाराला लवकर 'अ‍ॅडजस्ट' होणं. त्या विचाराप्रती लगेच आक्रमक न होता तो तपासायचा प्रयत्न करणं. एक उदाहरण घेऊ. दोन माणसांना प्रत्येकी एक केळं दिलं. ते दिसायला केळ्यासारखंच आहे, पण चव कारल्यासारखी आहे. दोघांनाही खाल्ल्यावर विचित्र वाटेल, आवडणार नाही. कारण 'केळं खायचं आहे' या विचारातच 'विशिष्ट चवीचं फळ खायचं आहे' हा विचार अनुस्यूत असतो. त्यामुळे दोघेही भांबावतील. परंतु कारल्याच्या चवीचं  केळं असू शकतं या वस्तुस्थितीचा स्वीकार जो मनुष्य तुलनेने सहजगत्या, लवकर करेल त्याची न्यूरोप्लॅस्टिसिटी जास्त आहे असं म्हणता येईल. आता ही परीक्षा अनेक गोष्टींबाबत घेता येऊ शकते. आजच्या 'वैचारिकदृष्ट्या विस्कटलेल्या' काळात आपण अस्मिता, राजकीय पक्ष, विचारसरणी, ऐतिहासिक व्यक्ती यांची ओझी वागवत जगतो आहोत. अशा वेळी आपण जेव्हा विरोधी मताविषयी सहिष्णु असलं पाहिजे असं म्हणतो तेव्हा त्याचा 'भौतिक अर्थ' न्यूरोप्लॅस्टिसिटी वाढवणं हा असतो. माणसं एकच बाजू का घेतात, समोर दिसत असूनदेखील सत्य का नाकारतात किंवा सत्याकडे काणाडोळा का करतात याचं उत्तर न्यूरोप्लॅस्टिसिटीमध्ये दडलेलं आहे. ती त्याला एकतर्फी, एका बाजूला झुकण्याचा गुण बहाल करते.  

भारतीय मनोवृत्तीच्या संदर्भात हे विश्लेषण बऱ्याच अंशी खरं आहे असं मला वाटतं. पण यावर करायचं काय ? तर हा सगळा गुंता सोडवायला गांधीमार्गाचा उपयोग होतोय का पहायचं. मी माझ्यापुरता एक प्रयत्न या संवादमालिकेतून (आणि फेसबुकवरील इतरही लेखनातून) केला आणि मला हे खरचं दिसून आलं की आपली समाजिक - राजकीय भूमिका कुठलीही असली तरी आपण अंतःकरणातून, प्रामाणिकपणे स्व-चिकित्सेला तयार असलो, वैचारिक विरोध कायम ठेवला तरी ‘माणूस’ म्हणून एकमेकांशी जोडून घ्यायच्या जागा आपण सुरक्षित राखल्या तर सहअस्तित्व शांततामय होऊ शकतं. फेसबुकवर हिंदुत्ववादी विचारांच्या मंडळींशी माझी बरेचदा चर्चा झाली आहे. मी माझ्या लिखाणातून कट्टर हिंदुत्ववादाबाबतची नाराजी उघडपणे मांडली आहे. त्याचबरोबर उदारमतवाद्यांच्या दृष्टीकोनातील खटकणाऱ्या गोष्टींबाबतही मी लिहिलं आहे. या चर्चांमध्ये माझ्या हे लक्षात आलं की 'माणूस' म्हणून आपण विरोधी विचाराच्या माणसाच्या मनात प्रेमभाव निर्माण करू शकलो तर संवाद सुकर होऊ शकतो. (याबाबत तपशीलात लिहिता येईल, पण त्याबाबत स्वतंत्रपणे सविस्तर लिहिणं इष्ट होईल. कारण त्यात हिंदुत्ववाद आणि उदारमतवाद यांच्या वैचारिक भूमिकेतील फरक, मूल्यात्मक फरक, अभिव्यक्तीची पद्धत अशा विविध मुद्द्यांवर बोलावं लागेल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा की एखाद्या विचारधारेला एखाद्या नावाने संबोधणं ही खरं तर एक व्यावहारिक तडजोड असते. त्यातून त्या विचारधारेचा साधारण कल लक्षात येतो इतकंच. प्रत्यक्षात दोन भिन्न विचारधारांमध्ये काही साम्यस्थळंही असू शकतात.) आपण एक लक्षात घ्यायला हवं की मानवी मेंदू इतर प्राण्यांच्या मेंदूपेक्षा विकसित (आपल्या विकासाच्या कल्पनेनुसार!) असला तरी तो अंतिमतः मनुष्य‘प्राण्या’चा मेंदू आहे. आधी म्हटल्याप्रमाणे आपले सर्व ‘इन्स्टिक्ट्स' एकविसाव्या शतकातही नीट शाबूत आहेत. प्रत्यक्ष हिंसा कमी झाली असली तरी मेंदूतली ‘हिंसकतेची केंद्रं’ बंद पडलेली नाहीत. (इथे मला असंही म्हणावसं वाटतं की त्यामुळे गडबडून जायचं कारण नाही. आपण सगळे ‘उत्क्रांतीची उत्पादनं’ आहोत. ‘भीती’ या आदिम भावनेपासून असूया, दुःख, एकटेपण, निराशा, आनंद अशा भावनांच्या कोलाहलापर्यंत आपल्या मनात भावनांचा जो भलामोठा पैस (आणि पेच!) तयार झाला आहे त्यामागचा उत्क्रांतीजन्य हेतू ‘टिकून राहणे’ हा आहे. एका टोळीत सामील होऊन राहणं, एक बाजू घेणं, राजकीयीकरण होणं हादेखील याच प्रक्रियेचा भाग आहे. पण आपलं वैशिष्ट्य हे की आपल्याला हे सगळं समजू शकतं. माणूस हा ‘जाणिवेची जाणीव’ असणारा प्राणी आहे आणि ते त्याचं बलस्थान आहे.) त्यामुळे गांधी जे सांगतात ते सहजपणे जमणारं नाही. 

गांधींचा माणसाला उन्नत करण्याचा जो प्रयत्न होता त्याचं बीज ‘जाणिवेची जाणीव’ करुन देण्यात आहे. मानवसमूह जर नैतिकदृष्ट्या समर्थ झाला, सामूहिक निर्णयक्षमता आणि कार्यक्षमता जर विकसित झाली तर ‘हे राजकारण’ आणि ‘हे जीवन’ असं द्वैत नष्ट होईल का? गांधींनी आणि त्यांच्या नंतर विनोबांनी विकेंद्रित राज्यव्यवस्थेबाबत जो विचार केला आहे तो भारतासारख्या देशासाठी पथदर्शक आहे. तो यशस्वी न होण्यामागची मुख्य अडचण सामूहिक इच्छाशक्ती आणि कृतीसामर्थ्याचा अभाव ही आहे. त्याच्या जोडीला बदलत्या काळाची आव्हानेदेखील आहेत. पण स्वयंपूर्ण आणि स्वतंत्र असण्याच्या मूलभूत विचाराचं महत्त्व त्यामुळे उणावत नाही.

गांधी आज ‘रिलेव्हंट’ आहेत का हा प्रश्‍न, हा विषय आता खरं तर जुनाच झालाय जरा. हा प्रश्‍न सारखा सारखा विचारावासा वाटतो, गांधी सारखा ‘आडवा येतो’ याचं कारणच हे आहे की, गांधी अगदी मूलभूत, अगदी आवश्यक आणि खरं तर अगदी सोपं असं काही सांगत होते. सर्वांना जर शांततेने एकत्र राहायचं असेल तर काय करायला लागेल याचा मंत्र त्यांनी दिला होता. गांधींची आठवण होत राहते कारण आपल्याला अद्याप शांततेनं एकत्र राहणं जमलेलं नाही हे आहे!  शांततामय सहअस्तित्वाचा गांधीविचार जेव्हा जगण्याचा भाग होईल तेव्हा तो वेगळा असा काही उरणार नाही. त्याची 'आठवण काढावी' लागणार नाही. मला कधीकधी असं वाटतं की गांधींना रिटायर करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे गांधीविचार आत्मसात करणं!  गांधींना खोटा नमस्कार करणाऱ्यांनी, गांधी ज्यांना सतत सलतात त्यांनी, २०१९ साली गांधींच्या प्रतिकृतीला गोळ्या घालण्याचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं!

(तरूण भारत, दीपोत्सव २०१९)