Tuesday, August 5, 2014

लाल सवाल!

हा प्रदेश आपल्या ओळखीचा नाही. हे रस्ते, दोन्ही बाजूचं जंगल, मधूनच विरळ जंगलात जमिनीवरचं काही वेचणारे लोक, रस्त्यालगतची ही लाल ‘शहीद स्मारक’, गस्त घालणारे जवान आणि इथल्या वातावरणात जाणवणारा ताण- हे सगळं आपल्याला नवीन आहे. आणि का कुणास ठाऊक, पण आपल्याला या वातावरणाचं आकर्षण वाटतंय. अनाकलनीय असं आकर्षण.

आमच्या गाडीचा ड्रायव्हर गाडी थोडी हळू करतो. रस्त्यामध्ये काही पत्रकं दिसतायत. पांढर्‍या कागदावर लाल शाईने काहीतरी लिहिलं आहे. काही हाताने लिहिलेली आहेत, काही छापील. पत्रकांवर एक स्टीलचा डबा ठेवलेला आहे. आम्ही गाडीतून उतरून फोटो काढतो. मागून कुठूनतरी लष्करी स्वरातली दरडावणी ऐकू येते आणि आम्ही मुकाट्याने गाडीत बसून पुढे निघतो.

दंतेवाड्यापासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एक कार्यकर्ता श्रीवास्तव आमच्याबरोबर आहेत. त्यांच्याबरोबर ‘पटेलवाडा’ नावाच्या एका छोट्या गावात आम्ही जातो. हे अर्थात श्रीवास्तवांमुळेच शक्य होतं. कारण जिथे आमची गाडी थांबते तिथून डावीकडे आत गेल्यावर एखादी छोटीशी का होईना पण लोकवस्ती आहे असं अजिबात लक्षात येत नव्हतं. गावात एका कुटुंबाची भेट होते. राजकुमार भास्कर, लक्ष्मीबाई आणि त्यांची मुलं. झोपडीवजा घर. पण प्रशस्त. मधल्या मोकळ्या जागेत मोहाची फुलंं वाळवण्याचं काम सुरू आहे. क्रिकेटच्या बॅटसारखी एक मोठी लाकडी बॅट घेऊन लक्ष्मीबाई वाळलेल्या फुलांना धोपटत होत्या. या फुलांपासूनच दारू बनते. राजकुमार भास्कर सांगतात की एस्सारच्या खाणीसाठी इथून एक पाइपलाइन टाकायची आहे. त्यात आमची शेतं घेतली जाणार आहेत. आम्ही त्याला स्पष्ट नकार दिला आहे. आता काय होतं ते पाहायचं. त्या घरावर डिश अँटेना आहे. कुठले चॅनल्स बघता, महिन्याला किती पैसे देता असं विचारल्यावर कळतं की गेल्या वर्षी ‘कन्यादान’ योजनेअंतर्गत सरकारने सगळ्यांना टी.व्ही. आणि ही अँटेना फुकट दिली आहे. त्याचे मासिक चार्जेसही भरायला लागत नाहीत. ‘कन्यादान’ योजनेखाली टी.व्ही.? ही स्कीम की प्रलोभन? राजकुमार-लक्ष्मीबाईंच्या घरून निघताना एका खोलीच्या बंद दरवाजाकडे लक्ष जातं. तिथे प्रियांका चोप्राचा फोटो लावलेला असतो.

पुढचं गाव धुरली. अतिशय टुमदार खेडं. मधून छोटी वाट. दोन्ही बाजूला छोटी छोटी घरं. इथेही मोहाची फुलं वाळवायचं काम चाललं आहे. घराबाहेर मुलं खेळतायत. श्रीवास्तवना ज्यांना भेटायचंय त्यांच्या घरी जाण्यासाठी वाट वळते आणि अचानक समोर सीआरपीएफचा ताडमाड जवान दिसतो. हातात रायफल. जमिनीवर रोखलेली. चेहरा निर्विकार. पाहताक्षणी आवडलेल्या त्या गावामध्ये आपण जवानाचं चित्र कल्पिलेलं नव्हतं म्हणून आपण एकदम चमकलो हे लक्षात येतं. ‘फोटो घेऊ का तुमचा?’ असं त्याला खुणेनी विचारल्यावर तो हातानेच नाही म्हणतो. आम्ही पुढे चालू लागतो.

असं लक्षात येतं की गावच्या एका ‘पटेल’ला पोलिसांनी चौकशीसाठी नेलं आहे. त्याची बायको आम्हांला गावात भेटते. ती त्यामानाने बरीच शांत आहे. ‘ये तो होतेही रहता है’ हे तिचं भाष्यही सूचक असतं. मघाशी रस्त्यात दिसलेल्या टिफिन बॉक्सचाही उलगडा इथे होतो. तो डबा टिफिन बॉम्ब असल्याचा संशय होता हे कळतं. इथे आम्ही आवंढा गिळतो, पण तो बॉम्ब नव्हता, भुसा भरलेला टिफिन होता हे तपासाअंती कळलेलं असतं. गावातून बाहेर पडत गाडीकडे जात असताना आजूबाजूने सीआरपीएफचे  जवानदेखील रस्त्याकडे चालू लागल्याचं दिसतं. धुरली गावचा सीआरपीएफचा आजचा वेढा उठलेला असतो. ‘यहॉं दिन में सीआरपीए फका राज होता है और रातमें अंदरवालोंका’ असं ऐकलेलं असतं. ‘अंदरवाले’ म्हणजे माओवादी.

दंतेवाड्याहून निघाल्यापासून रस्त्याच्या उजवीकडे बैलाडिला डोंगराची रांग दिसत होती. आता आम्ही निघालोय ते बचेलीकडे. बैलाडिलाच्या माथ्यावरचे दिवे आता चमकू लागले आहेत. या डोंगरावर एनएमडीसी (नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) खाणकाम करते. एनएमडीसी स्थापन झाली १९५८ साली. ही खनिज उत्पादक कंपनी भारत सरकारच्या ताब्यात आहे. कंपनी स्थापनेनंतर लगेच बैलाडिला डोंगरावर लोहखनिजाच्या खाणी सुरू झाल्या. आज छत्तीसगड आणि कर्नाटकमधील आपल्या मालकीच्या ३ खाणींमधून कंपनी सुमारे ३ कोटी टन एवढं अजस्त्र लोहखनिज बाहेर काढते. हे लोहखनिज जगातील सर्वोत्तम दर्जाचं आहे आणि स्टील निर्माण करण्यासाठी जे गुणधर्म असावे लागतात ते या लोहखनिजात पुरेपूर आहेत.

छत्तीसगड राज्याची निर्मिती झाली २००० साली. राज्यात एकूण सव्वीस जिल्हे आणि नव्वद विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभा मतदारसंघ अकरा. एनएमडीसी वसली आहे तो दंतेवाडा जिल्हा आणि जवळचे बस्तर, बिजापूर, सुकमा हे जिल्हे अतिशय संवेदनशील. माओवाद्यांच्या प्रभावाखाली असलेले. इथे जम बसवताना माओवाद्यांशी सामना अटळच. अर्थात एनएमडीसी ही सरकारी कंपनी. त्यामुळे सगळंच पाठबळ उपलब्ध. दंतेवाड्यात प्रवेश करतानाच ‘नुसत्या आयडियॉलॉजीने काय होणार? खरा विकास शिक्षणानेच होऊ शकतो.’ अशा आशयाचे एनएमडीसीचे बोर्डस् दिसतात. एनएमडीसीने दंतेवाड्यात २०१० पासून पॉलिटेक्निक कॉलेज सुरू केलं आहे. दंतेवाडा, बस्तरच्या भागात आरोग्य, सार्वजनिक सुविधा यासाठीही कंपनी खर्च करत असते.

एनएमडीसीने बैलाडिला डोंगरावर खाणकाम सुरू केल्यापासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ‘संयुक्त खदान मजदूर संघ’ (एसकेएमएस) स्थापन करून काम सुरू केलं होतं. पुढे १९८० च्या सुमारास या भागात- दंडकारण्यात - पीपल्स वॉर ग्रुपने आपली मुळं पसरायला सुरुवात केली. पीपल्स वॉर ग्रुप म्हणजेच ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) पीपल्स वॉर’. अगदी अलीकडे, म्हणजे २००४ मध्ये पीपल्स वॉर ग्रुप आणि माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर ऑफ इंडिया यांच्या एकत्रीकरणातून भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) स्थापन झाली. १९६७ मध्ये नक्षलवादी चळवळ सुरू झाली ती कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट) च्या पुढाकाराने. त्यात फूट पडून निर्माण झाली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट). आज नक्षलवादी किंवा माओवादी हे शब्द समानार्थानेच वापरले जातात. आम्ही ज्या श्रीवास्तव साहेबांबरोबर हिंडत होतो त्यांचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि डाव्या आघाडीतील मोठा घटक असणारा भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या दोघांहून त्यांचं हे माओवादी भावंड फार जहाल आहे. माओवादी कम्युनिस्ट पक्षावर भारत सरकारने बंदी घातली आहे आणि त्यामुळे अर्थातच माओवाद्यांना सापडले की लगेच अटक होते.

बचेलीला ‘एनएमडीसी’चं साम्राज्य आहे. कंपनीच्या अखत्यारीतील भागात प्रवेश करताच कार्यालयीन इमारती, सुशोभित रस्ते लक्ष वेधून घेतात. इथेच संयुक्त खदान मजदूर संघाचं कार्यालय आहे. तिथे युनियनच्या कार्यकर्त्यांशी थोडावेळ चर्चा करून आम्ही किरंदुलला पोचलो तेव्हा अंधारून आलं होतं. किरंदुरलला पक्षाच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन होतं. तिथे थोडा वेळ थांबून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. चारच दिवसांनी लोकसभेच्या निवडणुका होत्या.

***

‘‘मग बॅक टू जगदलपूर?’’ मन्या विचारता झाला.
‘‘हो. आणि तिथून एक दिवसानंतर रायपूर. मग पुणे.’’ मी म्हटलं.
‘‘निवडणुकीचे निकाल मात्र प्रातिनिधिक आहेत.’’ मन्या म्हणाला.
‘‘हो. बस्तरमधून भाजपचाच उमेदवार निवडून आला. एकूण अकरापैकी दहा जागांवर भाजपचे खासदार निवडून आले. आम्ही जगदरपूरला असताना सोनी सोरीला भेटलो होतो. माओवादी असल्याच्या संशयावरून तिला अनेक महिने तुरुंगात ठेवलं होतं. तिच्यावर अनन्वित अत्याचार झाले. त्या सगळ्यातून सुटून ती ‘आप’तर्फे उभी राहिली तेव्हा आदिवासी समाजाचा खरा चेहरा या निवडणुकीत दिसतोय असं वाटत होतं. पण काही उपयोग झाला नाही.’’ मी.
‘‘पण माओवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला होता ना? म्हणजे ग्रामीण भागातलं मतदान कमी होणारच होतं. आणि सोनी सोरीचा मुख्य मतदार तिथलाच होता.’’ मन्या.
‘‘हो. हे मात्र खरं.’’ मी.
‘‘अतिडाव्या विचारामुळे एक चांगला उमेदवार हरला असं म्हणायचं का?’’ मन्या म्हणाला.
‘‘अतिडाव्या विचाराला संसदीय लोकशाही मान्यच नाही मुळात. त्यामुळे चांगला उमेदवार हरल्याचं त्यांना दु:ख नाही. मुख्य म्हणजे उमेदवार चांगला असेल तरी तो त्यांना हवे ते बदल घडवेल असंही त्यांना वाटत नाही.’’ मी म्हटलं. हे म्हणत असताना सोनी सोरीची तिच्या निवडणूक प्रचारात आम्ही घेतलेली भेट मला आठवली. चाळिशीच्या आतल्या या बाई. गीदम हे त्यांचं गाव. तिथं प्राथमिक शिक्षिका म्हणून त्या काम करतात. त्यांच्यावरील बहुतांश आरोप आता मागे घेतले गेले आहेत. त्या आम्हांला सांगत होत्या, माओवाद्यांशी माझे कधीच संबंध नव्हते. आताही मला बंदुकीपेक्षा शिक्षणाच्या माध्यमातून माझ्या आदिवासी बांधवांसाठी काम करायचंय. त्यांनी त्यांचं संकल्पपत्र एक हजार रुपयांच्या स्टँपपेपरवर छापून प्रकाशित केलं होतं. यात त्यांनी पन्नास मुद्दे मांडले होते आणि एक्कावन्नावा मुद्दा असा होता की निवडून आल्यावर बदल अथवा बदलाची सुरुवात तुम्हाला दिसली नाही तर मतदारांनी मला ‘रिकॉल’ करावं. हे संकल्पपत्रच माझा राजीनामा म्हणून समजावं. संकल्पपत्रात सार्वजनिक सुविधा, प्रशासकीय सुविधा याबाबतचे बरेच मुद्दे अंतर्भूत होते. एनएमडीसी आणि एस्सारसारख्या कंपन्यांमुळे विस्थापित झालेल्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून मी प्रयत्न करेन, तसेच विस्थापित कुटुंबांना त्यांच्या जमिनीचा आणि श्रमाचा मोबदला मिळेल यासाठीही मी प्रयत्न करेन असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र टाटा, एस्सार या खासगी उद्योगांना खाणकामाची कंत्राटं देण्याबाबत त्यांची काय भूमिका आहे याचा उल्लेख नव्हता.
‘‘अतिडाव्या विचाराचं एक रोमँटिक आकर्षण बर्‍याच बुद्धीजीवी लोकांना असतं. हे लोक स्वत: एक दिवस अचानक पुण्याहून मुंबईला जावं लागलं तर आयत्या वेळी तिकीट काढून जायला बिचकतात. त्यांना रिझर्वेशनशिवाय जमत नाही. स्वत:ची सगळी प्रॉपर्टी सुरक्षित ठेवून त्यांनी पार्टटाईम क्रांती करायची असते. अशा लोकांच्या प्रभावाखाली येऊन बिघडू नकोस रे बाबा.’’ मन्याने माझी लिंक तोडली.
‘‘असंच काही नाही. अतिडाव्या चळवळीत कोबाद गांधी आणि अनुराधा गांधीसारखी संपूर्णपणे डीक्लास झालेली माणसं होती. तू समजतोस इतकं सगळंच काही उथळ नाहीये.’’ मी म्हटलं.
‘‘मग चांगलंच आहे. पण तुला स्वत:ला नक्षली-माओवादी विचारांचा मार्ग पटतो का?’’ मन्याने विचारलं.
हा मात्र कळीचा प्रश्‍न होता. मीच कशाला, पण अगदी भल्या जाणत्या विचारवंतांची विकेट काढणारा. ‘विचारधारा म्हणावी तर पटते पण हिंसेचं तत्त्वज्ञान नाही पटत’ असं नेहमीचं उत्तर देता येतंच, पण त्याने भागत नाही. कारण अतिडाव्या चळवळीच्या पोटात शिरून मागे मागे जाऊ लागलं की सरंजामशाही, जातीव्यवस्था यांची भयावह दडपशाही, लोकशाही रुजवण्यात आलेलं अपयश आणि या सगळ्याविरुद्धचा हिंसक उद्रेक दिसू लागतो आणि मग शोषितांनी शस्त्र का उचलायची नाहीत असा प्रश्‍न पडतो. अर्थात १९६९ मध्ये नक्षलबाडीत झालेला पहिला उठाव, तेव्हाची परिस्थिती आणि २०१४ मधला नक्षलवाद यात तुलना व्हावीच. मूल्यमापन व्हावंच. कारण नक्षलवादी हिंसेचं, विशेषत: त्यात भरडल्या जाणार्‍या निष्पापांचं वर्तमान फारच अस्वस्थ करणारं होतं. पण ‘हिंसा नको’ असं म्हणताना आपण एका सुरक्षित स्थानावरून हे बोलतो आहोत हे जाणवत राहतं.
‘‘काय रे?’’ मन्याने मला हलवलं.
‘‘अं? हो, तुझा प्रश्‍न कळला. पण याचं उत्तर देणं अवघड आहे अरे.’’ मी म्हटलं आणि मन्यालाच विचारलं, ‘‘तुला काय वाटतं?’’
मन्या चमकला. त्याने बहुतेक उलट्या प्रश्‍नाची अपेक्षा केली नसावी. पण तो निग्रहाने म्हणला, ‘‘निर्णय हो-नाही मध्येच हवा असेल तर मी म्हणेन नाही.’’
मी हसून म्हटलं, ‘‘हो-नाही मध्ये उत्तर तू मागत होतास. मी मागतच नव्हतो. आता तिथल्या आदिवासींच्या जगण्याबद्दल म्हणशील तर हे खरंच आहे की त्यांची दोन्हीकडून कुचंबणा होते. शासन त्यांना विस्थापित करतं आणि माओवादी त्यांना बंदूक देऊ बघतात. विस्थापित झाले तर झगडून त्यांना काही मिळवता तरी येईल, पण त्यांनी बंदूक हातात घेतली तर देशाचे गुन्हेगार ठरतील पण खरं तर त्यांना कुठे काय मिळालंय विस्थापनाच्या मोबदल्यात आजवर? मायनिंगसारख्या महाकाय प्रोजेक्टस्मुळे त्यांची जमीन, पाणी, जंगलं सगळंच केलं. जातंय. तुला आश्‍चर्य वाटेल, पण गेल्या वर्षी जयराम रमेशनी हे स्वत: एका व्याख्यानात मान्य केलंय की आदिवासींचं शोषण झालेलं आहे. खासगीच नव्हे, तर सार्वजनिक कंपन्यांकडूनही. आणि माओवाद्यांनी या अन्यायाबाबत आपल्याला जागं केलं. पुढे ते असंही म्हणतात की माओवाद्यांचा मुकाबला लष्करी बळाने नाही तर राजकीय पद्धतीने केला पाहिजे. हिंसेचा मार्ग योग्य की अयोग्य हे आपण सांगणं अवघड असतं अरे. उद्या एखादं धरण बांधायचं म्हणून तुझं घर पाण्याखाली गेलं किंवा एखादा मोठा कारखाना लावायचंय म्हणून तुझी जमीन सरकारनी घेतली तर तू शांतपणेच ते सहन करशील याची तुला खात्री आह? मन्या, मला वाटतं हिंसा ही एक अत्यंत थेट प्रतिक्रिया आहे. त्याने प्रश्‍न सुटतो का? नाही कदाचित. पण तू असं बघ की दोन हजारच्या दशकापर्यंत, भारतातील १० राज्यातील १८० जिल्ह्यात माओवादी कार्यरत होते. आत्ताच्या ताज्या सरकारी आकड्यानुसार ती संख्या ८३ आहे. पण हे लोण इतक्या झपाट्याने पसरलं याचा अर्थ काय? शासनाची दडपशाही, जातीयता याची झळ आपल्याला बसत नाही. आपण शहरं वाढताना बघतो. ती कशी वाढतात हे तुलाही माहीत आहे. शहरं वाढतात, वस्तूंच्या गरजा वाढतात, मग उत्पादन वाढवणं आलं. उत्पादन वाढवायचं म्हणजे कच्चा माल हवा. म्हणजे मग निसर्गाकडे जाणं आलं. निसर्ग कुठे आहे? बैलाडिलाच्या डोंगरावर. तिथे खाणकाम करायचं म्हणजे स्थानिकांना हटवणं आलं. ते स्टील वापरतच नाहीत पण आपण वापरतो म्हणून त्यांना तिथून उठावं लागतं.’’ मी धडाधड बोलत होतो.
‘‘मान्य. पण मग असं असतंच. ज्या आदिवासी पाड्यावर वीज आहे ती वीजदेखील त्यांनी निर्माण केलेली नाही. दुसरीकडूनच आलेली आहे. मग आता असं म्हणायचं का की हे आदिवासी शोषक आहेत? या हिशेबाने आपण सगळे एकाच वेळी शोषक आणि शोषित नसतो का?’’ मन्या म्हणाला.
‘‘वीज वापरतात ते ठीक. पण जेव्हा भारनियमन होतं तेव्हा तिथे दहा-बारा तास होतं हे तू विसरतोस. आधी शहरांनाच वीज दिली जाते.’’ मी.
‘‘अरे, पण शहरं महसूलपण देतात. त्याचं काय?’’ मन्या.
‘‘हो, पण तो खर्चही तिथेच होतो ना! म्हणजे सोर्स लांब कुठंतरी आहे. तिथल्या मालाचं प्रोसेसिंग आणि विक्री इथे होते. त्यावर शासन आणि नागरी समाज जगतात. आणि त्या लांबवरच्या सोर्सपाशी त्यांच्या पद्धतीने शांतपणे राहणारे मात्र देशोधडीला लागतात. हे अस्वस्थ करणारं नाही वाटतं तुला?’’ मी विचारलं.
‘‘मी तुझी संवेदना समजू शकतो. पण तू संवेदना अंतिम आहे असं प्लीज मानू नकोस. तुला काय वाटतं? भौतिक प्रगती कशी साध्य होत गेली आहे? आधी नदी पार करून जायला नावा होत्या. त्यामुळे नावाड्यांना रोजगार मिळायचा. पण म्हणून पूल बांधणीचं तंत्र विकसित झालंच ना? ‘पूल नको’ असं आपण म्हणालो का? हे एक उदाहरण झालं, पण हे सगळीकडे लागू होतं असं नाही तुला वाटत?’’ मन्या.
‘‘म्हणजे तुला असं म्हणायचंय की कुठल्याही टप्प्यावर काही माणसांच्या वाट्याला उपेक्षा येणारच?’’ मी.
‘‘तू संवेदना बाजूला ठेवून विचार कर आणि उत्तर शोध. तुम्ही भौतिकतेचा प्रवाह थांबवू शकता का हा प्रश्‍न आहे आणि त्याचं उत्तर नाही असं आहे.’’ मन्या म्हणाला.
‘‘भौतिकतेचा प्रवाह थांबवायचा नाही म्हणजे मानवीय दृष्टीकोनाला तिलांजली द्यायची? एखादी मोठी योजना आखताना लोकांचा विचारच करायचा नाही? अरे मग ‘गव्हर्नन्स’चा अर्थ काय लेको?’’ मी.
‘‘हो. ‘गव्हर्नन्स’चं मोठं फेल्युअर आहे हे मान्यच आहे.’’ मन्या म्हणाला.

मन्याच्या कबुलीनंतर मी अधिक काही बोललो नाही. छत्तीसगडमध्ये पत्रकार मित्रांबरोबर घालवलेला आठवडा अपरिहार्यपणे अस्वस्थ करणारा असणार होता याची मला कल्पना होतीच आणि पुण्याला परतल्यावर ‘कधी भेटतोस?’ हा बोडसाचा मेसेज वाचल्यावर मन्याशी बोलताना आपली अस्वस्थता अपरिहार्यपणे बाहेर पडणार हेही मला कळत होतं. अर्थात ‘गव्हर्नन्स’ या मुद्यावर मन्याचं एकमत झालं असलं तरी ‘गव्हर्नन्स’ उभा राहतो आयडियॉलॉजीवर’ हा माझा पुढचा मुद्दा आणि पुढची चर्चा मी टाळली. कारण गव्हर्नन्स, भौतिक प्रगती, विकास या सगळ्याच्या मुळाशी कुठली आयडियॉलॉजी असावी, मुळात एकच मार्गदर्शक आयडियॉलॉजी असावी का यावर मंथन करणं म्हणजे दंडकारण्यात शिरून वाट शोधण्याइतकं अवघड होतं!

- मिळून साऱ्याजणी (ऑगस्ट २०१४) 

Monday, February 3, 2014

एक होती आजी

मृतदेहाचा स्पर्श चांगलाच गार असतो. आजीला हात लावून बघितलं तेव्हा ती गेली आहे हे मला जाणवलं होतं. खात्री करून घेण्यासाठी डॉक्टरांना बोलावलं. नंतर मग पुढच्या हालचाली. अँब्युलंसमध्ये मी आणि माझे वडील. समोर आजी. वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत तिला ठेवलं. ज्वाळांचा लोट उठता उठता दार बंद झालं आणि मी क्षणभर डोळे मिटले. आजीचं प्रेत आपण जाळलं खरं, पण 'आजी गेली' म्हणजे नक्की काय  झालं? ती नक्की गेली का? असे विचित्र प्रश्न त्याक्षणी डोक्यात घोळत होते.

आजी गेली तेव्हा ती पंच्याऐंशी वर्षांची होती. १ सप्टेंबर २०११. त्या दिवशी गणपती बसले होते. मला त्याचं विशेष असं काही वाटत नसलं तरी आजीला वाटलं असतं. तिच्या अखेरच्या आजारपणात ती काही महिने तिच्या धाकट्या मुलीकडे, म्हणजे माझ्या मावशीकडे होती. त्या दरम्यान संक्रांत आली होती. त्या दिवशी आजीला भेटायचं राहून गेलं. म्हणजे संक्रांत आहे म्हणून मावशीकडे जाऊन आजीला भेटावं असं डोक्यातच आलं नाही. आठवड्यातून दोनदा आम्ही (मी आणि ही) तिला भेटायला जायचोच. पण संक्रांत निसटली. त्यानंतर जेव्हा गेलो तेव्हा आजी आमच्यावर जाम भडकली होती. संक्रांत असून तुम्ही आला नाहीत भेटायला, याचं एक जाऊ दे, पण तुझ्याही लक्षात नाही आलं? असं तिने आम्हाला आणि विशेषतः हिला बरंच सुनावलं. मी मुलगा आहे त्यामुळे काही गोष्टी मला अर्थातच कळणार नाहीत आणि ही मुलगी आहे त्यामुळे तिला त्या अर्थातच कळतील असं एका ऐंशीपलीकडच्या बाईचं गृहीतक असावं यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नाही. पण आजीला दुसरीही एक बाजू होती आणि ती चांगली आधुनिक होती. माझ्याचबाबतीतला एक किस्सा आठवतो. माझं लग्न व्हायच्या आधीची गोष्ट. मी आणि माझी एक मैत्रीण. आम्ही लग्नाचं ठरवलं होतं. पण नंतर काही कारणाने माझ्याकडून नकार दिला गेला. तपशीलात सगळं सांगणं इथे शक्य नाही. कारण ते मोठंच विषयांतर होईल. आजीलाही सगळं तपशीलात सांगणं मला शक्य होत नव्हतं. लग्न ही गोष्ट एकविसाव्या शतकात आधी होती तेवढी 'रूटीन' राहिलेली नाही हे माझ्या प्राचीन आजीला कसं समजावून सांगायचं या विचारात मी होतो तो तिनेच मला त्रिफळाचित केलं. 'ती तुला शरीरसुख देण्यात कमी पडणार आहे का?' असा थेट सवाल टाकला. आजीला मी मार्कं दिले! (लग्नाचा निर्णय न घेण्यामागे हे कारण नव्हतं हे जाता जाता सांगून टाकतो.)

मी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्याला आजीकडे आलो आणि पुढची एकोणीस वर्षे आजीबरोबर राहिलो. सध्या आजी नसलेल्या घरात राहतोय. ती माझ्या आईची आई. तिला दोन मुली. आजोबा ती अठ्ठावीस वर्षांची असताना वारले. आजीने पुढे एकटीने सगळं केलं. त्यामुळे स्वभावात हट्टीपणा भरपूर. 'विशिष्ट' (म्हणजे तिच्या!) पद्धतीनेच सगळं व्हायला हवं हा आग्रह. पन्नाशीतल्या तिच्या मुलींना दांडीवर कपडे कसे वाळत घाला हेही ती उत्साहाने सांगायची. आवडलं नाही की स्पष्ट बोलून दाखवणं हा एक (चांगला) गुण. माणसाचं मूल्यमापन करायची तिची अशी एक खास पद्धत. मी जेव्हा नोकऱ्यांची धरसोड करायचो तेव्हा जरा काळजीत पडायची, पण 'तुला योग्य वाटेल ते कर' हे मात्र तिने कायम ठेवलं. अत्यंत धोरणी, शिस्तप्रिय स्वभाव. त्यामुळे गडबड, बेशिस्त, वेळ न पाळणं याचा मनापासून राग. पैशाची हाव नाही, पण अखेरीस पैसा महत्त्वाचा याबाबत संदेहही नाही. माझे एक दूरचे मामा, जयंत बापट, ऑस्ट्रेलियात असतात. रसायनशास्त्रातून डॉक्टरेट. नावाजलेले अभ्यासक. समाजसशास्त्रातील एका विषयावरही डॉक्टरेट. अलिकडेच 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' पुरस्काराने सन्मानित. आजीला त्यांचं फार कौतुक. पुण्यात आले की आजीला भेटायला यायचे. ते पौरोहित्य करायचे. ऑस्ट्रेलियात त्यांनी लग्नही लावली होती. आजीला या गोष्टीचं विशेष कौतुक. एकदा घरी आले होते. इतरही काही नातेवाईक होते. पौरोहित्याचा विषय निघाला. आजीने स्वछ प्रश्न टाकला, "काय रे जयंता, तुला तिकडे लग्न लावायचे किती पैसे मिळतात?" मी पुन्हा आजीला मार्कं दिले!

म्हातारी माणसं एक 'काळ' वागवत जगत असतात. आजीसुद्धा स्मरणरंजनात रमायचीच. त्यावेळी तिचा चेहरा खुलून यायचा. पण ती स्मरणात 'अडकलेली' मात्र नव्हती. टीव्ही बघताना शंभर प्रश्न विचारायची. रोजचा पेपर नीट वाचायची. त्यावरही प्रश्न. एकदा मला म्हणाली की मला खरं तर पेपरातलं सगळं कळत नाही. पण तरी मी वाचते. किमान शब्द तरी ओळखीचे होतात. एकदा तिने गुगली टाकला होता - 'अमेरिकेत पैसे ठेवले तर व्याज जास्त मिळतं का रे?' मी चकित. हा प्रश्न आजीला का पडावा? मग लक्षात आलं की त्याचा संबंध परकीय गुंतवणुकीबाबतच्या एका बातमीशी होता.

'इतर जातीचे लोक', 'खालच्या जातीचे लोक' असा उल्लेख खूप वर्षांपूर्वी तिच्या बोलण्यात आल्याचं स्मरतं. यात काही वावगं आहे असं तिला वाटत नसणारच. (यात काही वावगं न वाटण्याची आपल्या समाजाची मानसिकता आपल्याबद्दल पुष्कळच बोलते!) त्यावेळी तिच्याशी वाद घातला नव्हता कारण तेव्हापर्यंत वादाचं अंग विकसित व्हायचं होतं. माझ्या आजीच्याच वयाच्या एका दुसऱ्या आजीने एकदा कुठल्यातरी संदर्भात महारांचा उल्लेख केला होता. ही माझ्या एका मैत्रिणीची आजी. नक्की शब्द आठवत नाहीत, पण महारांचा उल्लेख करताना त्यांची 'चेहराबोली' मला बरंच काही सांगून गेली होती. त्यावर मी प्रबोधनाचा थोडा प्रयत्न केला. मैत्रिणीला नंतर फोन करून 'महार जिथवर गेले तिथवरचा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची एक व्याख्या आहे, म्हणजे आपल्या राज्याचं नावच महार लोकांवरून पडलं आहे हे तुझ्या आजीला सांग' असं सांगितलं. तिने ते आजीला सांगितलं की नाही माहीत नाही. माझ्या आजीशी या विषयावर बोलायचा प्रसंग नंतर कधी आला नाही. आता मात्र वाटतं की जातीच्या मुद्द्यावर एकदा तिला काही प्रश्न विचारून बोलतं करायला हवं होतं.

घरात कामाला ज्या बायका यायच्या त्यांच्याशी तिचे सलोख्याचे संबंध होते. (एकदा तिने आमच्या बाईंना अंडा करी करून आणायला सांगितली होती. याचं कारण म्हणजे आजीने एकदा अंडा करी केली होती आणि त्यात खोबऱ्याचा इतका मारा केला होता की ती उपासाची अंडा करी झाली होती! तिची चव आमच्या बाईंनी घेतल्यावर त्यांना अर्थातच 'या बामणांनी वाट लावलीय बैदा करीची!' असं मनात वाटून नैराश्य आलं असणार आणि म्हणून त्यांनी अंडा करी करून आणायची ऑफर दिली होती. ती आजीने स्वीकारली!) आपल्या घरात कुणी माणूस आपली कामं करतो/करते यात एक काहीतरी 'मूलभूत चूक' आहे इथवर माझा जो प्रवास झाला तो आजीचा झाला नव्हता. त्यामुळे सगळ्यांची छान संबंध असले तरी 'या बायकांचं असंच असतं, त्यांना भलती सूट देऊ नये' वगैरेवर तिचा आतून ठाम विश्वास होता. शिवाय 'पगार वेळेवर दिलाच पाहिजे. माझी एक तारीख कधी चुकत नाही. पण काम चोख व्हायला हवं. नसते लाड चालणार नाहीत' अशी स्पष्ट भांडवली भूमिका होतीच. पगार वेळेवर देतो हे चांगलंच आहे, पण पगार 'किती' असावा यावर तिचा वेगळा दृष्टीकोन अर्थातच नव्हता.

पन्नास वर्षांचं अंतर असणाऱ्या आम्हा दोघांबाबत विचार करताना मला वाटतं की जशी तिची मला कधीकधी 'कटकट' व्हायची तशी माझीही तिला होत असणारच. वेळेवर आंघोळ न करणं, मोजे न धुणं, 'हा शर्ट कुठे मळलाय?' ही कायमस्वरूपी भूमिका असणं, व्यायामाचा आळस करणं, रात्री उशीरा घरी येणं, कामात चालढकल करणं या सगळ्याचा तिला त्रास झाला असणारच. वीस-बावीस वर्षांच्या वयात प्रत्येकाला आजूबाजूच्या लोकांविषयी 'हे लोक असं का वागतात?' हाच प्रश्न सारखा पडत असतो. त्याची कारणंही सबळ असू शकतात, पण स्वतःकडे क्रिटिकली बघणं होत नाही कारण ते वयच एका अलौकिक मुग्धतेचं असतं. असो.

घरात आजी असणं याला एक अर्थ होता. एक परिमाण होतं. आजारी माणूस आणि त्याची सेवा हा एक स्वतंत्र विषय आहे. तो अनुभव आपल्याला पुष्कळ काही शिकवतो हा माझा अनुभव आहे. त्यामुळे प्रत्येकाने तो घ्यावा. तो अनुभव अगदी आनंददायकच असतो असं नाही, कारण आजारी माणसामध्ये जी स्वभाववैशिष्ट्ये विकसित होतात ती तापदायक असू शकतात. पण त्यातला आत्मिक आनंद फार मोठा आहे हे खरं. आजीच्या शेवटच्या आजारपणात तिचं सगळं करणं, तिला हळूहळू मृत्यूकडे जाताना बघणं यात अनेक गोष्टी गुंतलेल्या होत्या. त्या अनुभवावर तर स्वतंत्रपणेच लिहिता येईल. पण हिंडती-फिरती असतानाची आजी आठवली की हे परिमाण स्पष्ट होत जातं. जिवंत माणूस त्याच्या गुण-दोषांसह जिवंत असतो. पण माणूस 'असणं' अनेक शक्यतांना जन्म देतं. मग त्यात जिव्हाळा, संवाद, संघर्ष - सगळंच आलं. आजीबरोबर हे सगळं व्हायचं. संघर्षाचं प्रमाण कधी वाढत असलं तरी जो संवाद होता तो प्रामाणिक होता याचं मला बरं वाटतं.

आजीमध्ये जे आधुनिक आणि जुनाटपणाचं मिश्रण होतं त्याचं मला आश्चर्य वाटायचं. लग्न झाल्यावर एकदा केव्हातरी काही निमित्ताने आम्ही दोघांनी तिला वाकून नमस्कार केला तेव्हा आशीर्वाद देताना ती 'पहिला मुलगाच हवा आहे' असं ती स्पष्टपणे म्हणाली होती. आणि वर 'हो, मी स्पष्ट बोलतेय' हेही होतं. मी लग्नाआधीच आपल्याला मूल नको असा निर्णय घेतला होता आणि तसा प्रस्ताव हिच्यासमोर ठेवला होता. त्याला हिने लगेच मान्यताही दिली होती. अशा आशीर्वादानंतर कालांतराने आजीला आमचा हा निर्णय सांगितल्यावर तिला अर्थातच वाईट वाटलं होतं. पण मला अपेक्षित होती तितकी तिची प्रतिक्रिया तीव्र नव्हती. याबाबतीत मघाशी ज्या मैत्रिणीच्या आजीचा उल्लेख केला त्यांचाही एक किस्सा सांगण्यासारखा आहे. या मैत्रीणीला दोन मुली. दुसरी मुलगी झाल्यावर 'देव परीक्षाच बघत असतो' अशी आजीची प्रतिक्रिया. मुलगा होऊ दे असं मागणं मागणाऱ्या आजीचं तर्कशास्त्र असं की 'मुलगा काय अन मुलगी काय - दोन्ही सारखेच, पण मागताना चांगलंच मागावं की!' आजी लोकांचं हे 'मुलगा फिक्सेशन' एकूणच जबरदस्त! आणि मुलीवर प्रेम नाही असं नाही, पण त्यांच्या मेंदूचा एक कोपरा 'मुलगा झाला' या बातमीने जो उल्हसित होतो त्याला तोड नाही. माझ्या एका मित्राला पहिली मुलगी. दुसरा मुलगा. त्याला मुलगा झाल्याचं कळल्यावर माझ्या आजीचा चेहरा लक्षणीयरित्या खुलला आणि ती 'जिंकलं एकदाचं' असं म्हणाली होती! (हा आनंद अतिसूक्ष्म रूपात आजीनंतरच्या पिढीतल्या काही बायकांमध्येही असतो असं माझं निरीक्षण आहे.)

आजीला माझ्याबद्दल किती कळायचं याची मला शंकाच आहे. 'नोकऱ्यांची धरसोड करणारा' ही एक ओळख होती माझी. 'विद्वान' अशीही एक उपरोधिक ओळख (जे ती अर्थातच 'हा स्वतःला फार शहाणा समजतो' याला पर्याय म्हणून म्हणायची!) एखादा लेख कुठे छापून आला की ते मासिक कौतुकाने शेजाऱ्यांना, पाहुण्यांना दाखवायची. लेखात काय आहे हे तिला माहीत नसायचं. कविता वगैरे तर फारच दूरचा प्रांत. 'गाणं' तिला आवडायचं. 'कविता' तिच्या दृष्टीने बहुधा मुलीसारखी असावी!

आजी 'प्रथम व्यवहार, मग बाकी सगळं' यावर श्रद्धा असणारी आणि मी व्यवहाराचं महत्त्व (कदाचित नाईलाजाने) मानणारा, पण माणसातल्या उर्मींना पहिला मान देणारा. एक गोष्ट मात्र खरी की आजीचा हिशेबीपणा, नीटनेटकेपणा, शिस्त याचा मला फायदा झाला. त्या अर्थी ती मॅनेजमेंट गुरू होती! माझ्यातला कमालीचा विस्कळीतपणा आटोक्यात यायला आजीचं मोठं योगदान आहे.

आजीच्या पिढीतले बरेचसे लोक त्यांच्या शिस्तशीर जगण्यामुळे सुखी असावेत. किंवा शिस्तशीर जगणं हाच त्यांच्या आनंदाचा एक भाग असावा. टिळक टँकवर एकदा एक सीनियर काका भेटले होते. 'गेली वीस वर्षं रोज सकाळी सहा वाजता पोहायला येतो!' असं त्यांनी म्हटल्यावर त्यांच्याबद्दल मला एकदम कंटाळायुक्त आदर वाटू लागला होता. आजीच्या आखीव दिनक्रमाविषयी मला असंच काहीसं वाटायचं. मात्र एक उल्लेखनीय गोष्ट ही की तिने कधी कुठली तक्रार केली नाही. आपलं एकटीचं आयुष्य नीट आखून जगत राहिली. तिचं घराबाहेर पडणं बंद झाल्यावर तिचा घरातला दिनक्रम सुरू झाला होता. आम्ही दोघं दिवसभर बाहेर. घरात तिचे काही बारीक-सारीक उद्योग चालायचे. पुढे जेव्हा ती अगदी अंथरूणाला खिळली तेव्हाही 'कंटाळा येतो दिवसभर' असं कधीकधी म्हणायची ती अगदी सहज म्हणून, त्राग्याने अजिबात नाही. शेवटच्या दिवसात 'मला लवकर मरण येऊ दे म्हणून प्रार्थना करा' असं म्हणायची. मात्र दिनक्रम अचूक सुरू होता. तिला मी साधारण एक दिवसाआड आंघोळ घालायचो. आंघोळ झाली की नीट केस वगैरे विंचरून पावडर लावायची. टिकली लावायची. क्वचित केव्हातरी 'आज वडापाव आणतोस का?' अशी फर्माईशही व्हायची!

मी आईबरोबर जितकी वर्षं राहिलो त्याहून जास्त काळ आजीबरोबर राहिलो. अतिशय घट्ट धारणा असलेली आजी आणि सगळ्याच धारणा लवचीक असणारा मी. 'मग त्यात काय झालं?'  हा माझा आवडता प्रश्न आणि 'हे असंच व्हायला पाहिजे' हे तिचं मत. आपण भारत देशात एका विशिष्ट वर्गात, विशिष्ट शहरात, विशिष्ट पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात राहतो म्हणून आपण 'विशिष्ट' घडलो, यात आपलं कर्तृत्व काय हा मला सतावणारा प्रश्न तर असे प्रश्न पाडून न घेता 'मी जे काही केलं ते माझ्या हिमतीवर. पैसे नव्हते तेव्हा काटकसर केली आणि पैसे साठवले. कुणाहीकडे काही मागितलं नाही' असं सांगत दिवाळी-होळीचे पैसे मागायला आलेल्यांना वाटेला लावणारी आजी. 'आहे हे काँम्प्लिकेटेड आहे' हा माझा विचार आणि 'आहे हे असं आहे' हा तिचा विचार. ती आजारपणात जेव्हा माझ्या मावशीकडे राहायला जायची तेव्हा तिला महिन्याचे पैसे द्यायची! तिच्या आजारपणातला सगळा खर्च तिच्याच खात्यातून झाला. म्हणजे अधिक पैसे लागले असते तर आम्ही होतोच, पण ते तसे लागलेच नाहीत. आणि याची नोंद मीही घेतली खरी!

दोन अनोळखी माणसांची भेट, दोन माणसांतला वाद, दोन समूहातला संघर्ष म्हणजे 'दोन विश्वांची' टक्कर असते. स्पष्ट विरोधी भूमिकांमध्ये तर हे दिसतंच, पण प्रेमाच्या नात्यांमध्येही हे दिसतं. आजीच्या शेवटच्या दिवसात तिच्याजवळ असताना मला काय वाटायचं? ती काही असामान्य व्यक्ती नव्हती. पण ती माझी आजी होती. सहवासाने माणसाच्या भावना बहुधा टोकदार होतात. आणि तो माणूस नाहीसा झाला की इतर टोकं बोथट होत जात आपुलकीचं टोक अधिक तीव्र होतं. आजी म्हणजे एक 'काळ', 'स्वभाव', 'पद्धत' असं बरंच काही होती. खरकट्या भांड्यात पाणी घालून ठेवावं, घासलेली भांडी वाळत टाकताना आत थोडी हवा जाईल अशा बेताने पालथे घालावीत, उद्या करायच्या कामांची यादी आज रात्रीच टेबलावर तयार असावी किंवा भिंतीवरच्या पाटीवर लिहिलेली असावी, कॅलेंडरचा उपयोग आपलं एक नवीन कॅलेंडर बनवण्यासाठी कसा करावा, घरातल्या वाणसामानाच्या डब्यांवर घारीसारखी नजर कशी ठेवावी, स्वयंपाकघरातलं लॉजिस्टिक्स कसं सांभाळावं, घड्याळ डोळ्यांना कसं बांधून घ्यावं, स्वछता म्हणजे नक्की काय अशा अनेक गोष्टी मी तिच्याकडून शिकलो. खाड्कन मनातलं बोलायचा स्पष्टवक्तेपणा सोडून!

तिला आजारपणात त्रास झालाच. पण खूप जास्त नाही. गँगरिनने एक पाय निकामी होऊ लागल्यावर त्याचा काही भाग कापायचा निर्णय आंम्ही घेतला आणि त्यानंतर काही दिवसातच ती गेली. ती गेल्याचं मला सकाळी तिला उठवायला गेलो तेव्हा कळलं. रात्रीत कधीतरी ती गेली. त्याआधी तिने मला हाक मारली असेल का? रात्री ती हाक मारायची किंवा जवळचं पाणी प्यायचं भांडं वाजवायची. त्या रात्री तिने हाक मारली नव्हती. भांड्याचाही आवाज ऐकू आला नव्हता. त्यामुळे तो प्रश्न मला त्रास देत राहिला. अस्वस्थ करत राहिला. अजूनही ते आठवलं की मला अस्वस्थ व्हायला होतं. ती जातानाच्या क्षणी मी तिच्याजवळ नव्हतो याचा त्रास होत राहतो.

आजीचा मृत्यू अनपेक्षित नव्हता. त्यामुळे ती गेल्यानंतर आम्हाला कुणाला खूप धक्का असा बसला नाही. एखादा अपेक्षित मृत्यू झाल्यावरही जेव्हा लोक खूप रडतात तेव्हा मला त्याचं काहीसं आश्चर्य वाटतं. अर्थात ते रडणं खरोखरीच मनापासून असेल तर चांगलंच. बरेच दिवस अंथरूणाला खिळलेला माणूस जातो तेव्हा त्याची सेवा करणाऱ्यांना सुटल्यासारखं वाटत असणार हेही सत्य आहे. मला तसं वाटलं का? याचं प्रामाणिक उत्तर 'हो' असं द्यावं लागेल. पण माणसाचं 'वाटणं' इतकं एकरेषीय नसतंच. अमुक घटनेनंतर 'तुम्हाला काय वाटलं?' हा फार अवघड प्रश्न आहे. 'आता आजी नाही' याचा संबंध फक्त 'आता आपलं काम कमी झालं' याच्याशीच फक्त नव्हता. मला तीव्रतेने वाटलं ते हे की आपल्याकडून ती आजारपणात कधी दुखावली तर गेली नसेल ना? आणि तसं झालं असेल तर तिने परत यावं. मी पुन्हा सगळं व्यवस्थित करेन. हे वाटणं अर्थातच तर्काच्या पलिकडचं. पण तर्काच्या पलीकडेच बहुधा आपण स्वतःशी खरं बोलतो! विद्युतदाहिनीत नेईपर्यंत मी अगदीच शांतपणे सगळं करत होतो. रात्री झोपताना मात्र मला तिच्या आठवणीने काहीतरी वेगळं वाटू लागलं. ती असताना घरात देव होते. ती पूजा करायची. मी लहानपणी केव्हातरी पूजा केली असेल. नंतर भावाचा संपूर्ण अभाव निर्माण झाला आणि देवपूजा हा समीक्षेचा विषय बनला. पण आजी गेल्यावर मी तिचा फोटो फ्रेम करून भिंतीवर लावला आणि अनेक वर्षांनी प्रथमच कुठल्यातरी फोटोपुढे हात जोडले. मुख्य म्हणजे ते करताना मला कमालीचं शांत वाटत होतं. मला ते मनापासून करावसं वाटत होतं. माणसाचं पृथ्वीवर असणं हा उत्क्रांतीचा एक भाग आहे आणि त्यामागे कुठलंही प्रयोजन नाही ही माझी धारणा आहे. (तीही अर्थात लवचीक आहे!) आपल्या अस्तित्वाबाबत विचार करताना उत्क्रांतिवाद दाखवतो ती दिशा मला योग्य वाटते. त्यातून कदाचित सगळीच्या सगळी उत्तरं मिळत नसली तरी. शरीर आणि जाणीव यासह असलेलं सजीवांचं अस्तित्व जडातूनच विकसित झालं आहे हे मला पटतं. मात्र 'जाणीव' ही गोष्ट आपल्याला आपल्याचपासून काहीसं वेगळं पाडते खरी. जाणीव हीदेखील जडातूनच आली आहे हे पटतं, पण जाणीवच बहुधा वेगवेगेळे प्रश्नही उपस्थित करते. आज आजीचा फोटो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. तिची आठवण आली की मी तिच्या फोटोला हात लावून नमस्कार करतो. 'नमस्कार करणे' ही क्रिया आपोआप झाल्यासारखी होते. काही क्षण डोळे मिटतो. त्यावेळी मला एक अव्यक्त जोडलेपण जाणवतं. शांतपणे कॉटवर पाय हलवत बसलेली आजी आठवते. तिचे खास टोमणे आठवतात. आजारपणातली तिची असहायता आठवते. आणि अखेरीस तिच्या माझ्या नात्यातलं सगळं पुसलं जाऊन तिच्याविषयीचं प्रेम उरतं. हे सगळं होत असताना मला वाटतं की मी थोडा माझ्या बुद्धीच्या कक्षेच्या बाहेर येतो. आणि कदाचित तिथे थोडा वेळ असायला मला आवडतं.              

आजीला आम्ही 'इन्ना' म्हणायचो. आमचं (म्हणजे आजीचं) घर पुण्यात अगदी मध्यवर्ती ठिकाणी असल्याने मित्रांना जमण्यासाठी सोयीचं होतं - आहे. कॉलेजच्या दिवसांपासून 'इन्नाच्या घरी जमू' हे परवलीचं वाक्य होतं. आजही क्वचित तसं म्हटलं गेलं की मला बरं वाटतं. 'इन्नाचं घर' ही आमच्या घराची ओळख आहे. 'शेरलॉक' या बीबीसीवरील मालिकेत (अ स्कँडल इन बेलग्रॅव्हिया) मिसेस हडसनला होम्सच्या शत्रूकडून इजा झाल्यावर वॉटसन सुचवतो की त्यांनी काही दिवस दुसरीकडे राहायला जावं. त्यावर होम्स म्हणतो, "मिसेस हडसनने बेकर स्ट्रीट सोडायचा? नो! इंग्लंड वुड फॉल!" इन्नाचं तिच्या घरात असणंही काहीसं असंच आहे. त्या घरात तिला सर्वस्वी अनोळखी असे मार्क्स आणि आंबेडकर आलेले आहेत, देव नाहीसे झालेले आहेत. विचारांच्या पातळीवरचा माझा प्रवास तिच्या दृष्टीने दूरचा झाला असला तरी आमचं घर नाव घेताना तरी 'इन्नाचं घर' म्हणूनच ओळखलं जाईल. का ते माहीत नाही, पण मी तिच्याहून वेगळा असलो तरी माझीही ती मूक इच्छा आहे. याचं कारण बहुधा असं असावं की तसं नाही झालं तर द हाऊस मे नॉट फॉल, बट आय वुड फील लिटल पेन!

Saturday, February 1, 2014

मुजफ्फरनगर : भय इथले का संपत नाही?

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर आणि शामली जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर २०१३ मध्ये उसळलेल्या दंगलीत अनेक गावांनी या दंगलीचा भीषण वणवा अनुभवला. लाख बावडी हे असंच एक खेडं. लाख बावडीबरोबरच लिसाड, फुगना, कुत्बा, किराना, बुधना आणि बाहवाडी या गावांनाही मोठी झळ पोचली.

लाख बावडी गावचा पस्तीस वर्षाचा आबिद खान सांगतो की ८ सप्टेंबरला सकाळी साडेसातच्या सुमारास काही तरूण घराबाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की जीव प्यारा असेल तर लगेच पळून जा. घरातले आम्ही सगळे बिल्लू प्रधानच्या घराकडे निघालो. बिल्लू प्रधान म्हणजे सुधीरकुमार, लाखबावडी गावचा निवडून आलेला प्रमुख. तो बिल्लू प्रधान या नावाने ओळखला जातो. तुम्हाला काही होणार नाही असं सांगून बिल्लू प्रधानने त्याच्या मोठ्या घरात काही जणांना आसरा दिला आणि काही जणांना वेगवेगळ्या बाजूंनी पळून जायला सांगण्यात आलं.

आबिदच्या कुटुंबियांप्रमाणेच इतरही काही जण तिथे आले होते. त्यात सुमारे ३० स्त्रिया होत्या. बिल्लू प्रधानने जो रस्ता दाखवला होता त्या रस्त्याने आबिद, त्याचे आजोबा आणि त्याच्याबरोबरचे सुमारे ५० जण निघाले. या रस्त्यातच एक जमाव त्यांची वाट बघत थांबला होता. आबिदचे आजोबा आणि काका त्याच्या डोळ्यासमोर मारले गेले. आबिद आणि त्याचे वडील जीव वाचवण्यासाठी ऊसाच्या शेतात लपले. आबिदने पोलिसांना फोन केला. पोलीस चार तासाने, सगळं संपल्यावर आले. तोपर्यंत गावातल्या ८० लोकांना मारण्यात आलं होतं. आबिदच्या आजोबांचा मृतदेह त्याच दिवशी मिळाला. त्याच्या आईचा जखमी, नग्नावस्थेतला मृतदेह दुसऱ्या दिवशी मिळाला. त्याच दिवशी आबिद आणि वाचलेले कुटुंबीय गाजियाबादमधील लोई येथील निर्वासित छावणीत जाण्यासाठी निघाले.
       
आबिदचा हा अनुभव आऊटलुक साप्ताहिकाच्या तीस डिसेंबरच्या अंकात प्रकाशित झाला आहे. नेहा दीक्षित यांनी लिहिलेल्या लेखात आबिदबरोबरच इतर अनेक अनुभव आहेत आणि ते सुन्न करणारे आहेत. निर्वासित छावण्यात राहणाऱ्या अनेक स्त्रियांना त्यांनी प्रयत्नपूर्वक बोलतं केलं आणि त्या स्त्रियांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या कहाण्या सांगितल्या.

प्रत्येक कहाणीच्या तपशीलात जायची गरज असली तरी एका अर्थी तशी गरज नाहीदेखील कारण त्यात काय असणार आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. दंगल आणि दंगलीत स्त्रियांची विटंबना याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. इतिहास लाजिरवाणा असतो आणि तरीही त्याची पुनरावृत्ती होतेच. मग शतक कुठलंही असो. त्यादृष्टीने मध्ययुग आणि एकविसावं शतक यात काही फरक नाही!    

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हिमांशूकुमार यांचे निर्वासित छावण्यांच्या भेटीदरम्यानचे अपडेट्सदेखील महत्त्वाचे आहेत. ते लिहितात, मुजफ्फरनगर-शामली भागातील जौला येथील निर्वासित छावणीत राहणाऱ्या लियाकतला एके दिवशी विशेष तपासणी पथकाच्या अधिकाऱ्यांनी मुजफ्फरनगरला यायचा आग्रह केला आणि ते म्हणाले की तू ज्यांच्या नावाने तक्रार दाखल केली आहेस ती नावे काढून टाक. त्यावेळेला बहुतेक जण नमाज पढायला गेले होते. लियाकतला जबरदस्तीने गाडीत बसवल्यावर उपस्थित स्त्रिया गाडीपुढे आडव्या पडल्या. थोड्या वेळात नमाज पढायला गेलेले लोक परत आले. पोलिसांना लियाकतला तिथेच सोडून द्यावं लागलं आणि ते परत गेले. लियाकतचा व्हीडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहे. कहर म्हणजे सरकारच निर्वासित लोकांना हुसकावून लावण्याच्या प्रयत्नात आहे. २७ डिसेंबर २०१३ रोजी सरकारनेच काही झोपड्या तोडल्याचं वृत्त आहे.

५१००० मुस्लिम लोकांचे विस्थापन (अधिकृत सरकारी आकडा, खरा आकडा माहीत नाही), बलात्कार, खून, शामली आणि मुजफ्फरनगर भागातील हजारो लोक निर्वासित छावण्यात वस्तीला, त्यांच्या मनातील भीती, गाव सोडायला लागल्याचं दुःख, छावण्यातील अपुऱ्या सुविधा, १२ वर्षाखालील ३४ मुलांचा थंडीने गारठून मृत्यू आणि या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांचं वक्तव्य असं होतं की निर्वासित छावण्यात कुणी निर्वासित राहातच नाहीत, तिथे आहेत ते भाजप आणि काँग्रेसने पेरलेले राजकीय कार्यकर्ते आणि षड्यंत्रकारी लोक!

मुलायमसिंग यादव आजतागायत एकदाही निर्वासित छावणीला भेट द्यायला गेलेले नाहीत. समाजवादी पार्टीचा वार्षिक महोत्सव - सैफई महोत्सव - जो मुलायमसिंगांच्या सैफई या जन्मगावी दरवर्षी साजरा होतो त्यात यावर्षी कपिल शर्मा, कैलाश खेर, सलमान खान, शामक दावर वगैरेंनी हजेरी लावली. या महोत्सवाचं उद्घाटन वरिष्ठ पत्रकार वेदप्रकाश वैदिक यांच्या हस्ते झालं. यावेळी जया बच्चन उपस्थित होत्या. (महाराष्ट्रात अमिताभ बच्चनने राज ठाकरेंशी मांडवली केली त्यावरचा हा बहुधा उतारा असावा!). अखिलेश यादव आणि मुलायमसिंग यादव यांनी या 'सांस्कृतिक' महोत्सवाचा पहिल्या रांगेत बसून आनंद घेतला. ८ जानेवारी रोजी माधुरी दीक्षितचं नृत्य आणि सलमान खान, रणवीर सिंग, सोहा अली खान यांचा संयुक्त कार्यक्रम याने महोत्सवाची सांगता झाली. माधुरी दीक्षितच्या 'डेढ इश्किया' या आगामी चित्रपटावरील मनोरंजन कर राज्यात माफ करण्याची घोषणाही उत्तर प्रदेश सरकारने केली. हा चित्रपट करमुक्त करण्याचं कारण सांगताना एका प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितलं की या चित्रपटाचा काही भाग लखनौमध्ये चित्रित झाला आहे म्हणून तो करमुक्त करण्यात आला! मुजफ्फरनगरच्या जखमा ताज्या असताना, निर्वासित छावण्यात लोक हालात राहात असताना हा महोत्सव नीट सुरू झाला, तो १५ दिवस चालला, त्यावर वारेमाप खर्च केला गेला, माधुरी दीक्षितला आणण्यासाठी सरकारी विमान गेलं आणि दीक्षितबाई सैफईला पोचल्यावर सलमान खान, रणवीर सिंग आणि सोहा अली खानला आणण्यासाठे ते विमान पुन्हा मुंबईला पाठवण्यात आलं!    

मुजफ्फरनगर अनाकलनीय प्रकरण झालं आहे. मुस्लिमांची मसीहा म्हणवणारी समाजवादी पार्टी मुस्लिमांकडे संपूर्ण दुर्लक्ष करते आहे आणि दुसरीकडे भाजप अर्थातच धार्मिक विद्वेषाचा तवा गरम कसा राहील याची काळजी घेण्यात गुंतली आहे. २००२ साली गुजरातमध्ये राज्यसरकार पुरस्कृत हिंसा घडली. २०१३ मधलं मुजफ्फरनगरचं चित्रही वेगळं नाही. नियोजनबद्ध कत्तल! प्रत्येकच सरकार धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करतं. पण महत्त्वाचं असतं ते सरकार अधिकृत पत्रक, जाहीरनामे, घोषणा दर्शनी भागात, लोकांना दिसतील असं ठेवून जे दिसत नाही अशा कोपऱ्यात जे करतं ते!

मुजफ्फरनगर प्रकरण सुरू झालं ते २७ ऑगस्ट २०१२ ला. कवाल गावातल्या शाहनवाज नावाच्या एका मुस्लिम मुलाने एका जाट मुलीची छेड काढली आणि तिच्या दोन भावांनी (सचिन आणि गौरव) त्या मुलाचा खून केला. (एक माहिती अशी आहे की सात जाट युवकांनी मिळून हे कृत्य केलं. उरलेल्या पाच जणांना अजूनही अटक झालेली नाही.) याला प्रत्युत्तर म्हणून चिडलेल्या मुस्लिम समूहाने या दोन्ही भावांना मारलं.

आता गडबड अशी आहे की मुळात छेड काढली की नाही इथपासून गोंधळ आहे. प्रत्यक्षदर्शी लोक सांगतात की असं काही झालंच नव्हतं. वाद सुरू झाला तो सायकलींच्या टकरीवरून आणि त्यात मुलीची छेड काढल्याचा मुद्दा आणला गेला तो हिंदुत्ववादी अजेंड्याचा भाग म्हणून. अजून एक शक्यता अशी की त्या जाट मुलीचे आणि त्या मुस्लिम मुलाचे प्रेमसंबंध होते आणि जाट लोकांना ते मान्य नव्हतं. त्यामुळे शाहनवाजला मारणं हा ऑनर किलिंगचा प्रकार असू शकेल. गावातल्या काही दलितांकडून ही माहिती मिळाली असं फ्रंटलाईन पाक्षिकाच्या सप्टेंबर १८, २०१३ च्या अंकातील अजॉय आशीर्वाद महाप्रशस्त यांच्या लेखात म्हटलं आहे. याच लेखात ते म्हणतात की सचिन आणि गौरवच्या अंत्यसंस्कारानंतर परत येताना जाट लोक कवालमधील मुस्लिम वस्तीत गेले आणि त्यांनी मुस्लिमांच्या घरांची आणि दुकानांची तोडफोड केली. मशीदीचंही नुकसान केलं. एक मुस्लिम रहिवासी सांगतो की त्यावेळी ते 'जाओ पाकिस्तान वर्ना कब्रस्तान', 'हिंदू एकता जिंदाबाद', एक के बदले एकसौ' अशा घोषणा देत होते'. हा रहिवासी पुढे म्हणतो की दोन जाट मुलांना मारलं हे चूकच आहे. त्यातील दोषी लोकांना अटक करा आणि शिक्षा कराच. पण आमचा काय दोष? आम्ही यात हकनाक अडकलो आहोत आणि भीतीत जगण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही.

नात्सी जर्मनीने काही काळ पी. जी. वुडहाऊस या प्रसिद्ध ब्रिटीश लेखकाला अटकेत ठेवलं होतं. जर्मनांकडून छळ होऊनही तुझ्या मनात त्यांच्याबाबत राग कसा नाही असं पत्रकारांनी विचारल्यावर वुडहाऊस म्हणाला, 'आय कॅननॉट हेट इन प्ल्यूरल्स' - मी घाऊक तिटकारा कधीच करत नाही! आणि धार्मिक-जातीय दंगलींमध्ये नेमकं हेच होतं. घाऊक तिटकारा! एका मुस्लिम मुलाने चूक केली (ती चूकदेखील धार्मिक संबंधातली नाहीच!) म्हणून सगळ्या मुस्लिमांवर हल्ला. दुसरीकडे एका मुस्लिम मुलाला मारल्याच्या गुन्ह्याबद्दल कायदा हातात घेऊन त्या हिंदू मुलांना मारून टाकणं हीदेखील चूकच. (हे बहुसंख्याकांच्या हातात कोलीत दिल्यासारखं होतं). गुन्हा आणि गुन्हेगार याकडे सरळ दृष्टीने, एक विशिष्ट केस म्हणून न बघता त्याला हमखास जातीय-धार्मिक रंग दिला जातो आणि मग निष्पापांचं मुजफ्फरनगर व्हायला अजिबात वेळ लागत नाही! सामान्य नागरिक भडक माथ्याचे आहेत आणि अगदी मूर्ख आहेत हे जरी क्षणभर मान्य केलं तरी प्रशासनाचं काय? प्रशासनाने जानवं घालता कामा नये आणि नमाजही पढता कामा नये अशी अपेक्षा ठेवणं गैर आहे का? प्रशासनाने फक्त न्याय करणं आणि परिस्थिती आटोक्यात ठेवणं अपेक्षित आहे. आणि ते जर होत नसेल, कोणत्याही कारणाने, तर तो दोष त्यांचा नाही तर कुणाचा? मुजफ्फरनगरमध्ये एवढं सगळं होऊनही मुलायमसिंग यादव तिकडे फिरकले नाहीत. दुसरीकडे जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या कार्यकर्त्यांनी मात्र १४ ते २० डिसेंबरदरम्यान मुजफ्फरनगरमध्ये फिरून परिस्थितीची माहिती घेतली, लोकांशी संवाद केला आणि २० डिसेंबर ते २३ डिसेंबर अशी चार दिवसांची 'दिल जोडो, नफरत छोडो यात्रा' आयोजित केली. संवेदना जागी असणारे लोक आपल्या परीने शांततेसाठी प्रयत्न करताना दिसतात आणि ज्यांच्या पाठीशी सगळ्या यंत्रणा, पोलीस तैनात आहे ते मात्र अशा वेळीही जागचे हलत नाहीत! दंगलीच्या वेळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसबळाचा वापर केला जातो, पीडितांना नुकसानभरपाई दिली जाते हे ठीकच पण अशा भीतीच्या वातावरणात सलोखा निर्माण करण्यासाठी 'आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, घाबरू नका' हा मानसिक आधार देण्याची फार गरज असते. अल्पसंख्य समाजाला तर याची अतिशय गरज असते. सरकार-प्रशासन हे का करत नाही? की अशा 'आउट ऑफ फॅशन' गोष्टी जनआंदोलनांसाठी राखून ठेवल्या आहेत? (अशा वेळी गांधीबाबांची आणि नौखालीची आठवण येतेच आणि मग प्रशासन, सरकार, अगदी राजकीय विश्लेषक वगैरे मंडळीसुद्धा त्यावर भाबडेपणाचं लेबल लावून मोकळे होतात!)

२७ ऑगस्टच्या घटनेनंतर सेक्शन १४४ लागू केलं गेलं होतं. पण तरीही ३० ऑगस्ट रोजी एक जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीशी संबंधित जिल्हा आणि राज्य पातळीवरचे मुस्लिम नेते उपस्थित होते. त्यांच्याकडून प्रक्षोभक भाषणे केली गेली. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी यांच्यातून वास्तविक विस्तवही जात नाही, पण या व्यासपीठावर ते एकत्र आले. त्यापाठोपाठ भाजपचे आमदार सोम संगीत यांनी एक फेक व्हीडिओ अपलोड केला. (हे संगीत सोम ठाकूर जमातीचे नेते. मुजफ्फरनगरमधील सरधना येथील पूर्णतः धर्माआधारित निवडणुकीत ते भाजपच्या तिकीटावर हाजी याकूब कुरेशी यांच्याविरुद्ध जिंकले होते. हे कुरेशी म्हणजे ज्यांनी डेन्मार्कच्या व्यंगचित्रकाराविरुद्ध त्याने महंमद पैगंबरांच आक्षेपार्ह चित्रण केलं म्हणून फतवा काढला होता आणि त्याचं शीर आणून देणाऱ्याला पन्नास लाखांचं इनाम जाहीर केलं होतं! व्हीडीओ प्रकरणात संगीत सोमवर गुन्हा दाखल झाला.) त्यात मुस्लिम जमावाकडून दोन हिंदू मुलांची कशी निर्घृण हत्या झाली याचं चित्रण आहे असा प्रचार केला गेला. या व्हीडीओमुळे धार्मिक तणाव मोठ्या प्रमाणात वाढला. ७ सप्टेंबर रोजी हजारो जाट शेतकऱ्यांची एक 'बहू बेटी बचाओ महापंचायत' बोलावली गेली. ही सभा भाजपच्या स्थानिक कार्यालयाच्या पुढाकाराने भरवली गेली होती. स्थानिक हिंदू नेत्यांची या सभेत प्रक्षोभक भाषणे झाली. या सभेनंतर हिंसेच्या घटना वाढल्या आणि परिस्थिती हाताबाहेर गेली.

कलम १४४ लागू असताना राजकीय नेत्यांना सभा आयोजित करण्याची परवानगी कशी मिळाली आणि या नेत्यांना अटक का झाली नाही (त्यांची नावे नंतर दाखल केल्या गेलेल्या एफआयआरमध्ये होती) हे प्रश्न अनुत्तरित आहेत. यामधून काही काँस्पिरसी थिअरीजनी जन्म घेतला - हिंदू आणि मुस्लिम मते वाटून घेण्यासाठी समाजवादी पार्टी आणि भाजप यांच्यात छुपा करार झाला आहे, काँग्रेसचा उद्देश मुख्य मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष हटवणं हा आहे, भाजपला जाट मतदारसंघ काबीज करायचा आहे इ. याव्यतिरिक्त या दंग्यांचा सर्वात मोठा 'राजकीय खुलासा' असाही आहे की नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी उत्तर प्रदेश काबीज करण्याचे भाजपचे हे डावपेच आहेत. आजच्या भारतीय राजकारणावरील उजव्या शक्तींचा प्रभाव बघता येत्या दिवसात काय होऊ शकतं याची एक झलक मुजफ्फरनगरच्या निमित्ताने बघायला मिळाली आहे. संघ परिवार आणि भाजप यांच्याकडून जातीविशिष्ट (मुजफ्फरनगरच्या संदर्भात जाट लोकांशी संबंधित) चालीरीतींचा संबंध 'धार्मिकते'शी जोडण्याचा प्रयत्न होताना दिसतो. जात-संस्कृती आणि धर्म-राजकारण यातील सीमारेषा पुसण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जातो आणि त्यातूनच ७ सप्टेंबरच्या 'बहू-बेटी बचाओ पंचायतीचं रूपांतर हिंदू अस्मिता 'लव्ह जिहादीं'पासून वाचवायच्या संघर्षात झालं.  (संदर्भ : इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली, ५ ऑक्टोबर २०१३. Mujaffarnagar 2013 - Meanings of Violence, हिलाल अहमद यांचा लेख). लव्ह जिहाद म्हणजे मुस्लिम तरूण मुलांनी इतर धर्मीय मुलींना लक्ष्य बनवून, त्यांच्याशी प्रेमाचं नाटक करून त्यांना इस्लाम स्वीकारायला लावणे. विश्व हिंदू परिषदेची प्रेस नोट म्हणते की जिहादी लोकांकडून गावोगावच्या हिंदू मुलींच्या शीलहरणाच्या घटना सहन करण्याच्या पलीकडे गेल्या तेव्हा समाज त्यांच्या विरोधात बहू बेटी बचाओ आंदोलनाच्या रूपाने उभा राहिला आहे. गावोगावी जर हिंदू मुली शीलभ्रष्ट होत असतील तर आजवर विश्व हिंदू परिषद आणि भाजप वगैरे मंडळी गप्प बसली हे एक नवलच! आणि ज्या हिंदू मुलींवर हिंदू पुरूषांकडून अत्याचार झाले आहेत त्या हिंदू पुरूषांबाबत आपलं काय म्हणणं आहे हेही विहिंपने एकदा सांगून टाकावं!

हिलाल अहमद यांच्या लेखात त्यांनी आणखी एका मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे ते म्हणजे मुजफ्फरनगरमधील मुस्लिम लोकांमधील जातीभेद. अश्रफ मुस्लिम हे उच्चजातीय आहेत आणि नॉन अश्रफ समूह हे निम्नजातीय समजले जातात. (मुजफ्फरनगरमध्ये एकूण लोकसंख्येच्या ३०% मुस्लिम आहेत). एका अनधिकृत अंदाजानुसार मुजफ्फरमधील दंगलीत जे मुस्लिम मारले गेले त्यातील बहुसंख्य मुस्लिम तथाकथित खालच्या जातीचे होते.

मुजफ्फरनगरची परिस्थिती मानवीय दृष्टीकोनातून पाहिलं तर ती कमालीची भीषण आहे हे उघडच आहे. पण त्याहून धडकी भरते ती भविष्याच्या कल्पनेनी. उत्तर प्रदेशचं भारतीय राजकारणातील महत्त्व सर्वश्रुत आहे. बहुमतासाठी आवश्यक २७२ जागांपैकी ८० म्हणजे सुमारे तीस टक्के जागा उत्तर प्रदेशच्या आहेत. अमित शहा सध्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे 'पोल मॅनेजर' आहेत त्यामुळे बऱ्याच गोष्टींकडे आपोआपच निर्देश होतो आहे. नरेंद्र मोदींना उत्तर प्रदेशमध्ये धडाक्यात प्रमोट केलं जात आहे. समाजवादी पार्टीबाबत संभ्रमच आहे. कारण हिंदू मतांकरता ते उघडपणे काही करणार नाहीत आणि दुसरीकडे मुस्लिमांसाठीही ते काही करत नाही आहेत. मुजफ्फरनगरमुळे त्यांच्यावर प्रशासकीय नामुष्की ओढवली आहे ती वेगळीच. त्यामुळे त्यांची बस जवळजवळ चुकलीच आहे. काँग्रेसचं पानिपत लोकसभा निवडणुकीत रोखता येणार नाही ही बऱ्याच जणांची अटकळ आहे (सोनिया गांधीचीसुद्धा असेल!). आणि तसंही उत्तर प्रदेशातून काँग्रेस उखडली गेल्यात जमा आहे. अजित सिंग यांच्या राष्ट्रीय लोक दल या जाट पक्षाचाही फारसा प्रभाव राहिलेला नाही. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दहा जागा मिळाल्या होत्या. २००१ मध्ये त्यांनी भाजपशी युती केली होती आणि नंतर ते बाजू बदलत राहिले आहेत. त्यामुळे गेली काही वर्षं जाट समुदाय भाजपकडे वळू लागला आहे. (मुजफ्फरनगरने तर त्यावर शिक्कामोर्तबच केलं आहे). वाल्मिकी समुदाय, जो दलित समुदाय आहे, भाजपने आपल्याकडे वळवायला सुरूवात केली आहे. शामलीध्ये सप्टेंबर ४, २०१३ रोजी झालेल्या वाल्मिकी-मुस्लिम चकमकीत काही वाल्मिकींना अटक झाली होती. त्यानंतर भाजपने तिथे बंद पुकारला आणि शामलीच्या पोलिस अधीक्षकांची बदली करण्याची मागणी केली. तो मुस्लिमच होता. काही महिन्यांपूर्वी एका वाल्मिकी मुलीवर बलात्कार झाला तेव्हा भाजप नेते हुकूम सिंग यांनी मोठी सभा बोलावली, धरणं दिलं आणि संबधित पोलिस अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी केली. प्रकरण शेकेल म्हणून सप्टेंबर २० रोजी सरकारने त्या अधिकाऱ्याची बदली केली. रोहिलखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेश (जिथे वरूण गांधी भाजपचे प्रतिनिधी आहेत) मध्ये भाजप सक्रिय आहे. 'आप'ने दिल्लीत झेंडा रोवला असला तरी उत्तर प्रदेशबाबत आत्ता काही सांगता येणं कठीण आहे. या परिस्थितीत भाजपने आपले हातपाय पसरायला जी सुरूवात केली आहे त्यात ते यशस्वी झाले तर?

समकालीन हिंदुत्व स्वतःला कसं प्रकट करतं आहे आणि कोणकोणत्या मार्गाने प्रकट करतं आहे इकडे नीट पाहिलं पाहिजे. हिंदुत्वाचं वादळ पुरेसं ताकदवान झालं आहे. 'आप'सारख्या पक्षाने जनतेत नवचैतन्य आणलं असलं आणि ती अतिशय स्वागतार्ह, कौतुकास्पद गोष्ट असली तरी पूर्ण देशाचा विचार करताना भाजपचं अस्तित्व आणि वेग पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष विचारांसाठी चिंताजनक आहे. म्हणूनच मुजफ्फरनगर देशाला कुठे घेऊन जाईल ही भीती वाटते आणि ही भीती वाटते याचं कारण धर्माधिष्ठीत राजकारण करणारे अजूनही लोकांना आपल्याकडे वळवू शकतात या वास्तवात आहे.

- मिळून साऱ्याजणी (फेब्रुवारी २०१४)