Thursday, October 29, 2020

बुद्धी, विवेक आणि वास्तव – ३

मागील दोन लेखांमध्ये बुद्धिप्रामाण्य, नास्तिक्य, विवेक, वास्तवाचं आव्हान या संदर्भाने आपण काही बोललो. या लेखात आपण विवेकवादाची मूळ मांडणी, विवेक-अविवेक हा निर्णय करण्याच्या कसोट्या याबाबत बोलूया. तत्पूर्वी एक नोंद -  

माणसाविषयी बोलताना सहसा ‘तो’ हे पुल्लिंगी संबोधन वापरलं जातं. वास्तविक ‘माणूस’ म्हणजे स्त्री, पुरुष यांच्यासह आज अस्तित्वात असलेले अनेक इतर लिंगभेद आणि लिंगभावदेखील. सवयीचा, सोयीचा भाग म्हणून ‘तो’ वापरलं जातं. पण संबोधने लिंगसापेक्ष असल्याने ती वाचल्यावर मनात विशिष्ट लिंगाच्या मनुष्याची आकृती तयार होतेच. वस्तूंच्या बाबतीतही हे होतं. ‘पुस्तक’ म्हटलं की लिंगनिरपेक्ष प्रतिमा डोळ्यापुढे येते. पण ‘ग्रंथ’ म्हटलं की पुरुषविशिष्ट आणि ‘पुस्तिका’ म्हटलं की स्त्रीविशिष्ट प्रतिमा डोळ्यापुढे येतात. अशी इतरही उदाहरणं देता येतील. ‘मानव’, ‘माणूस’ या संज्ञानांही ‘तो’ म्हटलं गेल्याने माणूस म्हणून ‘पुरुष’च डोळ्यासमोर येतो. ‘तिथे सगळ्या बायकाच होत्या, माणूस कुणीच नव्हता’ अशा प्रकारची, ‘माणूस’ म्हणजे ‘पुरुष’ आणि ‘बाई’ म्हणजे ‘बाई’ अशी वर्गवारी सहजपणे गृहीत धरणारी वाक्यं मी काही संभाषणांमध्ये ऐकली आहेत. त्या त्या वेळी मी दुरूस्ती केली, पण एकूणात हा गोंधळ बराच मोठा आहे. माणसाच्या बाबतीत ‘तो’ प्रामुख्याने वापरलं जायचं मला दिसतं ते कारण असं की आदिम काळापासून विविध सामाजिक-राजकीय तत्वज्ञानं आणि संबंधित व्यवस्था निर्माण होण्यामागे, ईश्वर-धर्म-सत्ता या संकल्पनांना आकार आणण्यामागे, अस्तित्वाच्या हिंसक लढाईत वर्चस्व प्रस्थापित करण्यामागे मुख्यत्वे पुरुषप्रभाव कार्यरत होता. जगातील सर्व तत्वज्ञाने प्रामुख्याने पुरुषांची निर्मिती आहे. स्त्रीला जग कसं दिसतं, तिचं चिंतन काय आहे हे अलीकडे, गेल्या काही शतकांपासून ठळकपणे पुढे येऊ लागलं आहे. मानवी इतिहासात एके काळी मातृप्रधान व्यवस्था  होती असं अनेक अभ्यासांतून दिसलं आहे, परंतु ती टिकलेली नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे पुरुषप्रभावाचा जो परिणाम इतरत्र आहे तोच भाषिक रचनेबाबतही आहे आणि माणूस प्रामुख्याने ‘तो’ आहे. आता मुद्दा जर सोयीचाच आहे तर माणसाला ‘ती’ हे संबोधनही वापरता येईलच. खरं तर तो किंवा ती ही दोन्ही संबोधने आलटून-पालटून वापरायलाही हरकत नाही. अर्थात जैविक फरकांच्या अनुषंगाने स्त्री आणि पुरुष या दोन प्रमुख श्रेणी असल्या तरी एकूणात लिंगभाव ही एक प्रवाही संकल्पना आहे हे आज पुढे येत आहे. लिंगाधिष्ठीत अडथळे तोडले जात आहेत. या पार्श्वभूमीवर लिंगसापेक्ष शब्दांची मर्यादा अधिकच जाणवते. ‘ती माणूस’ हा शब्दप्रयोग करायला मला आवडेल. इथून पुढे या लेखात हे संबोधन वापरूया. ‘ती व्यक्ती’ असा शब्द वापरता येईलच, पण ‘माणूस’ या संदर्भात ‘ती’ हे संबोधन वापरण्याचा एक प्रयोग या लेखात करून पाहू.

व्यक्त होण्यासाठी शब्द बरेचदा पुरेसे नसतात ही अनुभूती आपल्याला येत असते. शब्द, शब्दांचे प्रचलित अर्थ, केवळ शब्दांमधूनच प्रतीत होणारी/समजून घेऊ शकली जाणारी माणसाची मनोभूमिका, त्याचे मनोव्यापार यातून माणसाबद्दलच्या समग्र आकलनात थोडी त्रुटी राहतेच. हा त्रुटीचा मुद्दा संकल्पनांच्या बाबतीतही लागू होती. प्रतिगामी, पुरोगामी, बुद्धीवादी, श्रद्धाळू, अंधश्रद्ध, विवेकी, अविवेकी, वैज्ञानिक, अवैज्ञानिक हे शब्द काही विचार/कृतींचं मूल्यमापन करून त्यांना परिभाषित करतात. परिभाषित करणं व्यावहारिकदृष्ट्या आवश्यक कारण परिभाषित केल्याशिवाय विशिष्ट लक्षणांना एक ‘नाव’ मिळू शकत नाही. त्यामुळे आधुनिकतेच्या संदर्भात समर्थनीय/असमर्थनीय ठरतील असे विचार/कृती अधोरेखित होऊ शकत नाहीत. पण परिभाषित करणं म्हणजे एका अर्थी ‘मर्यादा घालणं’ही असतं. परिभाषित केल्याने ‘लेबलिंग’ होत असतं. कप्पे तयार होत असतात. अशा वर्गवारीतून, वर्गवारीचा हेतू संकल्पनांमध्ये भेद करण्याचा असला तरी प्रत्यक्षात माणसांमध्ये, समाजामध्ये विभाजन होऊ शकतं; किंबहुना होतंच. त्यातून मग माणसांचं ध्रुवीकरण होऊन माणसं ‘परस्पर अनन्य’ (म्युच्युअली एक्स्क्ल्यूझिव्ह) ठरतात/ठरवली जातात. उदा. श्रद्धाळू वि. विज्ञानवादी, परंपरावादी वि. बुद्धिवादी इ. प्रत्यक्षात माणूस एक ‘मिश्रण’ असू शकते/असते हे लक्षात घेणं आणि माणसांना कप्प्यात बंद न करणं सर्वच दृष्टीने हितकारक आहे.     

सृष्टीशी संलग्न अशा विविध लहान-मोठ्या गुंतागुंतीच्या विषयांचा अभ्यास, ‘जे आहे ते तसं का आहे?’ या प्रश्नाचा शोध घ्यायची पद्धत याअर्थी ‘विज्ञान’ ही संकल्पना मात्र व्यापक, सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक ठरते. जेव्हा आपण माणसाला ‘वैज्ञानिक’दृष्ट्या समजून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा ‘श्रद्धा’ हा माणसाचा एक गुणधर्म म्हणून विज्ञानाचा अभ्यासविषय ठरतो. श्रद्धा ‘माणसाच्या विज्ञानाचा’ विषय ठरते. विज्ञान सृष्टीच्या जड आणि चेतन दोन्ही बाजूंचा करतं. या अभ्यासात, विशेषतः चेतन सृष्टीच्या अभ्यासात, ‘विज्ञान’ या ‘विचारपद्धती’ची ‘विवेक’ ही एक संवेदनाधिष्ठित बाजू आहे. ती विश्लेषणाची, भेद करण्याची शक्ती आहे. माणसाच्या अबोध इच्छा, अनेक प्रेरणा, या इच्छांचं आणि प्रेरणांचं कारण ठरणारं माणसाचं जैविक व सामाजिक वास्तव लक्षात घेऊन, माणसाला ‘ती आहे तशी’ समजून घेत, पुढे जाऊन ‘नवीन माणूस’ घडवण्याची आकांक्षा बाळगणारी ‘विवेक’ ही एक विचारपद्धती आहे. दुसरीकडे श्रद्धा, परंपरा, बुद्धी, निष्ठा या व इतर प्रभावांखाली असणार्‍या माणसासाठीही ‘विवेक’ ही कार्यक्षम विचारपद्धती आहे. 

विवेकवादाच्या मूळ मांडणीसंदर्भात पुन्हा एकदा मे. पुं. रेगे यांची मदत घेऊ. सतराव्या आणि अठराव्या शतकातील युरोपियन तत्त्वज्ञानाचा इतिहास हा प्रामुख्याने विवेकवाद आणि अनुभववाद यांच्यातील विवादाचा इतिहास आहे असं नमूद करत रेगे ‘विवेकवाद’ या शब्दाच्या आजच्या अर्थांकनाकडे वळतात. – 

विवेकवाद म्हणजे आपल्या समजुती, विश्वास सत्य किंवा स्वीकारार्ह ठरवण्याची, किंवा असत्य व/किंवा त्याज्य ठरवण्याची एक विशिष्ट पद्धती आहे. आपले विश्वास, म्हणजे आपण स्वीकारलेली विधाने, सत्य कशावरून ठरतात आणि असत्य कशावरून ठरतात ह्याचा निकष विवेकवादापासून लागतो. विवेकवादी असणे म्हणजे ह्या पद्धतीला अनुसरून जी विधाने सत्य ठरतील तेवढीच सत्य म्हणून स्वीकारणे, जी सत्य ठरणार नाहीत ती सत्य म्हणून न स्वीकारणे; ही पद्धती म्हणजे वैज्ञानिक पद्धती होय.  वैज्ञानिक पद्धती अनुभवावर आधारलेली असते ह्यात शंका नाही. पण अनुभवाला गोचर असणार्‍या पदार्थांचे आणि घटनांचे जे गुणधर्म आपल्या साक्षात प्रत्ययाला आले असतील तेवढ्याचे वर्णन करण्यावर वैज्ञानिक पद्धती समाधानी नसते. म्हणजे ‘हे पाणी त्या पाण्याहून अधिक गरम आहे’, ‘सूर्य उगवताना लाल दिसतो’, ‘ह्या झाडांची पाने डिसेंबर महिन्यात गळून पडली’, हयासारख्या आपल्या अनुभवांच्या आधारे ज्यांची सत्यता सिद्ध झाली आहे अशी विधाने नमूद करून वैज्ञानिक पद्धती थांबत नाही. ‘अणू’, ‘मूलभूत कण’, ‘विद्युतचुंबकीय क्षेत्र’, इत्यादी इंद्रियातीत – ज्यांचा आपल्याला साक्षात अनुभवातून प्रत्यय येत नाही अशा – पदार्थांचे आणि शक्तींचे अस्तित्वही विज्ञानात मानले जाते, आणि त्यांचे अस्तित्व व गुणधर्म वैज्ञानिक पद्धतीला अनुसरून प्रस्थापित झाले आहेत म्हणून मानले जाते. 

(‘विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा’ या पुस्तकातील ‘विवेकवाद’ या प्रकरणातून)

वैज्ञानिक पद्धती अनुभवांच्या, दृश्य-अदृश्य घटितांच्या कार्यकारणभावात शिरते आणि त्याचा उलगडा करण्यासाठी गृहीतक (हायपॉथिसिस) रचून, त्यात इंद्रियातीत अशा कल्पित पदार्थांच्या आणि शक्तींच्या अस्तित्वाची कल्पना करायला पूर्ण वाव ठेवून, त्यांच्या कार्यामुळे काही परिणाम घडून आले हे निरीक्षणाने आढळून आलं तर ती कल्पित रचना ग्राह्य धरते. अन्यथा हे गृहीतक त्याज्य ठरतं. वैज्ञानिक पद्धतीच्या स्वरूपाविषयी आणि तिच्या अनन्य वैशिष्ट्यांविषयी रेगे यांनी वरील प्रकरणात फार विस्तृत आणि नेमकं विवेचन केलं आहे. ते मुळातून जरूर वाचावं. आपल्या विषयाच्या संदर्भाने या प्रकरणाच्या शेवटी त्यांनी काही कळीचे प्रश्न विचारले आहेत. रेगे लिहितात, 

विवेकवादाचे एक परिमाण किंवा अंग म्हणजे विश्वात खरोखर काय आहे ह्याचा निर्णय करण्याची विवेकवादाने पुरस्कारलेली रीत. विवेकवादाचे दुसरे अंग नैतिक आहे. माणसाने कसे जगावे हेही विवेकवाद सांगतो. या दोन अंगांमध्ये काय परस्परसंबंध असू शकेल? अस्तित्वाचे स्वरूप काय आहे ह्याचा शोध घेणारी वैज्ञानिक पद्धती माणसाने कसे जगावे ह्याचे नियमन करणार्‍या तत्त्वाला जन्म देऊ शकते का? वैज्ञानिक नीती, विज्ञानप्रणित मूल्ये असे काही असू शकते का?   

हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. विवेकवादी चळवळीचा रोख या प्रश्नांकडे होता आणि आहे. मात्र मागील भागात उल्लेख केल्याप्रमाणे वास्तवाचं आव्हान प्रबळ ठरल्यानंतर मूल्यसंकल्पनांचीही कसोटी लागते. प्रागतिक विचारातून सामाजिक वास्तव सुधारेल हे एका बाजूला खरं आहे, पण सामाजिक वास्तव – जे पूर्णपणे न्यायावर, समतेवर आधारलेलं नसतं, ज्यात दुःख, शोषण यांचा मोठ्या प्रमाणात अंतर्भाव असतो – प्रागतिक विचाराला जमीन उपलब्ध करून देण्यात कमी पडतं. वास्तवातील झगडे वरचढ ठरून प्रागतिक विचार अव्यवहार्य वाटायची शक्यता बळावते. आजारी पडल्यावर अंगारे-धुपारे न करता डॉक्टरांचं औषध घ्यावं हे बरोबर, पण विशिष्ट डॉक्टरचा किंवा विशिष्ट आरोग्यविषयक सुविधेचा अनुभव कसा आहे, ती डॉक्टर/सुविधा परवडण्याजोगी आहे का हा विचार केला जाऊ शकण्याची शक्यता आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. पहिल्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे जर एखादीने ‘आईला बरं वाटेल म्हणून बरेच उपचार केले. गुण आला नाही. शेवटी देवीसमोर बोकडाचा बळी दिला.’ असं म्हटलं तर त्यावरील आपला प्रतिवाद काय असेल? ‘आजवरच्या अनुभवावरून असं दिसतं की जर औषधांनी गुण आला नाही तर तो इतर कशानेही येत नाही. विशेषतः ज्यात स्वतः रोगी सहभागी नाही अशा उपायांनी तर नाहीच नाही!’ असं उत्तर आपण देऊ शकतो, ते पटवून द्यायचा प्रयत्नही करू शकतो. परंतु ती मनुष्य ‘बोकडाचा बळी देणे’ या कृतीकडे जर ‘उपाय’ म्हणून बघत असेल (तिला ‘अनुभव’ घ्यायचाच असेल) आणि जर कदाचित तिच्याकडे तिच्या समुदायातील कुणाकुणाच्या पूर्वानुभवाचा साठा असेल तर ती ती कृती करेल. कदाचित त्याविषयी साशंक असूनही करेल. या उदाहरणात आणखी एक उपमुद्दा आणून पाहू. औषधनिर्मितीदरम्यान (क्लिनिकल ट्रायल्स) प्राण्यांवर प्रयोग केले जातात आणि त्यात प्राणी दगावतात. आता यात हेतू संशोधनाचा आहे आणि प्राण्यांचा वापर जरी केला जात असला तरी त्यामागे काही विवेक आहे, ते अकारण केलं जात नाही, ‘मारणं’ हा हेतू नाही असा खुलासा करता येईल. परंतु ‘निष्पाप प्राण्याचा मृत्यू’ हा जर अंतिम निर्णायक मुद्दा असेल तर तो उरतोच. मग ‘ज्या मृत्यूतून काही निष्पन्न व्हायची शक्यता असते ते मृत्यू स्वीकारार्ह आणि ज्यातून काहीच निष्पन्न होऊ शकत नाही ते मृत्यू स्वीकारार्ह नाहीत’ अशी वर्गवारी करावी का? अशी वर्गवारी करणं हा वैज्ञानिक नीतीचा एक भाग मानावा का? ‘साध्य’ आणि ‘साधन’ या अनुषंगाने पाहता आधुनिकतेच्या इतरही काही आयामांबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतात.   

या पार्श्वभूमीवर विवेकापुढे आव्हान उभं राहतं. हे आव्हान विचार-कृतींच्या निर्णयनाचं आव्हान आहे. माणसाला सतत निर्णय घ्यावे लागतात. रोजच्या जगण्यातल्या लहान-सहान निर्णयांपासून राज्यव्यवस्थेच्या, न्यायव्यवस्थेच्या निर्णयप्रक्रियेपर्यंत ही एक मोठी मालिका आहे. ही प्रक्रिया प्रत्यक्षातील आव्हानांशी जोडलेला असल्याने मूल्यसंकल्पनांशी तिचा संघर्ष होत राहतो. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक माणूस तिच्या तिच्या क्षमतेनुसार शोधते आणि विविध विचारदृष्टींच्या परिप्रेक्ष्यात त्या उत्तराचं मूल्यमापन केलं जातं. परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून एखादा विद्यार्थी मंदिरात डोकं टेकतो, एखादं जोडपं ‘मूल होऊ दे’ म्हणून देवापुढे नवस बोलतं, कुणी व्रत ठेवतात, ईप्सित साध्य व्हावं म्हणून कुणी उपास धरतं, कुणी फार काही न करता बसल्या जागी हात जोडतं. याच मालिकेतील एक उदाहरण असं असू शकेल की जिथे कुणाला हताश, निराश वाटलं आणि हात जोडावेसे वाटले तरी ते आपण स्वीकारलेल्या निरीश्वरवादाच्या विरोधी होईल म्हणून ते केलं जाणार नाही. एखादं उदाहरण असं असेल की जिथे एखादीला काहीही झालं तरी हात जोडावेत किंवा देवा-धर्मासंबंधीचं एखादा कर्मकांड करावं असं अजिबात वाटणार नाही. इथे एक लक्षात घेऊ की ‘विवेक’ हा निकष केवळ देव-धर्म, श्रद्धा, भक्ती या संदर्भातच लागू होतो असं नाही. आपले परस्परसंबंध, त्यांच्या ‘फंक्शनिंग’मध्ये माणसांच्या वृत्तींमुळे येणारे अडथळे, समाजजीवनातील अनेक प्रश्न या सगळ्यातही ‘विवेक’ आपली भूमिका बजावत असतो. व्यक्तिगत पातळीवर विचार करता नीती-अनीतीबाबतचे माझे विचार काय आहेत, ते तसे का आहेत, माझ्या राजकीय विचारांची बैठक काय आहे, फेसबुकवरचा माझ्या वावर कसा आहे, पर्यावरणाबाबत मी कितपत सजग आहे, माझे ‘कंझंप्शन पॅटर्न्स’ कसे आहेत, याही बाबतीत ‘विवेका’चे निकष लावता येऊ शकतात.

मग हे निकष काय आहेत? तर ते उदाहरणागणिक वेगवेगळे आहेत, ‘परिस्थितीसापेक्ष तारतम्या’वर आधारित आहेत, पण एक प्रमुख निकष ‘वृत्ती कशी घडते आहे?’ हे तपासण्याचा आहे. या संदर्भात काही नेमके मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करू. विवेकवादाच्या विशुद्ध रूपातील मांडणीपासून थोडं पुढे येत आपण वास्तवाच्या संदर्भात विवेकाचं स्वरूप काय असावं हा विचार करू. – 

  • ‘मिश्र आणि सूक्ष्म विचार’ करता येण्याची क्षमता हे विवेकाचं एक लक्षण आहे. ‘ईश्वर आहे’ असं म्हणणारा आस्तिक आणि ‘ईश्वर नाही’ असं म्हणणारा नास्तिक यात नास्तिक केवळ नास्तिक आहे म्हणून प्रागतिक, पुरोगामी ठरतो का? आस्तिक केवळ आस्तिक आहे म्हणून प्रतिगामी ठरतो का? तर नाही. अशा मूल्यमापनासाठी इतर बर्‍याच निकषांचा विचार करावा लागतो. हा विचार करता येणं, तशी वृत्ती घडणं हाच मुळात ‘विवेक’ आहे.
  • ज्या विचार/कृतींबाबात विवेकी/अविवेकी या स्वरूपात निर्णय करता येत नाही तिथे निर्णय देण्याचा अट्टाहास टाळून त्या विचार/कृती अधिक वैचारिक स्पष्टतेसाठी/आकलनातील वाढीसाठी खुल्या ठेवणं ही विवेकी कृती आहे.   
  • श्रद्धेबाबत आपण एक लक्षात घेऊ की ‘श्रद्धा’ – अशी एक मनोभूमिका, मनोवस्था जिथे प्रश्न करणं शक्यच नसतं, जी मूल्यमापनाच्या पलीकडे आहे – ही मुळातलीच एक अडचण आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा भेद करण्याची व्यावहारिक पातळीवर आवश्यकता भासते हे खरं, पण मुळात या दोन्हीमध्ये फरक नाही. एखाद्या देवावर, विचारधारेवर, बाबावर, पोथीवर, ऐतिहासिक व्यक्तीवर श्रद्धा असणं आणि एखाद्या गोष्टीचा प्रभाव असणं, त्या गोष्टीविषयी कृतज्ञ असणं, त्या गोष्टीची परिणामकारकता जाणवणं यात फरक आहे. मुख्य मुद्दा चिकत्सेची दारं बंद करण्याचा आहेच. ‘श्रद्धा’, ‘निष्ठा’, ‘भक्ती’ यात प्रेमभावनेचाही आविष्कार होत असतो. हा संपूर्ण प्रदेश एका अबोध जाणिवेने झाकोळून गेलेला आहे. हे होणं अडचणीचं आहेच, परंतु मानवी वृत्तीची घडण लक्षात घेता ते मान्य केलं तरी ‘श्रद्धेचा विवेक’ काय असू शकेल? तर स्वतःला विचारलेले काही प्रश्न असू शकतील. उदा. - आपल्या श्रद्धेविषयी आपल्याला कुणी प्रश्न विचारले तर आपल्याला राग येतो की आपण शांतपणे चर्चा करू शकतो?  आपल्या श्रद्धेसंदर्भात कुणी विनोद केला तर आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो का? विनोद आवडला नाही तरी विनोद करण्याला आपला आक्षेप नाही असं आपल्याला वाटतं का?  आपण एखाद्या विषयावर चटकन मत देतो की तो विषय समोर आला की त्या विषयाबाबत आपण अभ्यास    केला पाहिजे असं आपल्याला वाटतं? आपण चिकित्सक विचार करू शकतो का? प्रत्येक विषयाला विविध बाजू असतात आणि विविध बाजूंनी विचार करता यायला हवा हे आपल्याला मान्य आहे का? आपल्या श्रद्धेचा आपल्याला मनःशांतीसाठी उपयोग होत असला तरी त्याचा दूरगामी परिणाम आपल्या चिकित्सक विचारपद्धतीवर (क्रिटिकल थिंकिंग) होतो आहे का? आपल्याला कोणकोणत्या ज्ञानशाखा माहिती आहेत? त्यातील काहींमध्ये आपल्याला रस वाटतो का? आपण  नवीन काही शिकायला उत्सुक असतो का? श्रद्धा हे आपलं ‘औषध’ न राहता आपलं ‘मुख्य अन्न’ होतंय का? आपल्या वाचनात विज्ञानविषयक वाचनाचा अंतर्भाव असतो का? 

मूल्यात्मक निर्णय देताना अधिकाधिक सूक्ष्म विचार करणं (वर म्हटल्याप्रमाणे निर्णय न द्यायचीही तयारी असणं), पुनर्मूल्यांकनाला तयार असणं आणि त्याचबरोबर वैचारिक/सामाजिक/राजकीय लढ्यात एक निश्चित भूमिका घेऊन उभंही राहणं अशी बहुस्तरीय वाटचाल विवेकाला सुरू ठेवावी लागते. 

समारोप 

संकल्पनात्मक मांडणी, त्यातील वैविध्य आणि झगडे एका बाजूला सुरू राहतात आणि वास्तवात समाज त्याच्या एका आकलनाने, गतीने, सक्तीने त्याची वाट चालत असतो. याची सांधेजोड कशी करावी, आपल्या जगण्याचा पाया काय असावा, कोणत्या वैचारिक बैठकीवर आपल्या व्यवस्था उभ्या असाव्यात हे काही ‘मूळ प्रश्न’ आहेत. शिवाय माणूस, त्याचे मनोव्यापार, त्याचं समूहजीवन, त्यातील संघर्ष ही निरंतर प्रक्रिया असल्याने तो निरंतर अभ्यासाचा विषय आहे. प्रागतिक विचारदृष्टीने प्रेरित होणं गरजेचं आहेच, परंतु ‘हे तरी’ किंवा ‘ते तरी’ हा आधीच झालेला निर्णय, विचारदृष्टींना ‘कप्पेबंद’ करणं, हे संकल्पना आणि वास्तव - दोन्हीतले बारकावे समजून घेण्याच्या आड येऊ शकतं. विविध विचारदृष्टींमधील कालसुसंगत, समता-न्याय-स्वातंत्र्य या मूल्यांना पोषक असणाऱ्या नेमक्या विचारांच्या समावेशाने, माणूस समूहात राहत असताना निर्माण होणाऱ्या विविध शक्यतांच्या तयारीने सुसज्ज अशी वैचारिक बैठक आपल्यासाठी योग्य ठरते. (समता-न्याय-स्वातंत्र्य यांच्या अर्थाविषयी आणि उपयोजनाविषयी वेगळी चर्चा होऊ शकेल. या मूल्यांचं सारभूत स्वरूप म्हणून 'शांततामय सहअस्तित्व' हा शब्द वापरता येईल.) यातून मग आपण विशिष्ट विचारदृष्टीने प्रेरित झालेलो असलो तरी त्या विचारदृष्टीने भारून जाण्याचा टप्पा ओलांडून विविध विचारदृष्टींच्या मूल्यमापनात, त्यांच्या परिणामांच्या अभ्यासात आपल्याला रस वाटू लागतो. विशिष्ट विचारदृष्टीच्या उपयोजनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे, कलहांकडे आपलं लक्ष जाऊ लागतं आणि त्यातून आपण ‘वर्केबल मॉडेल’ तयार करण्याचा प्रयत्न करू लागतो.   

विवेकवादापुढचं आजचं आव्हान मोठं आहे. भारतासारख्या देशात, जिथे अद्याप वैज्ञानिक प्रवृत्ती (सायंटिफिक टेंपरामेंट) पुरेशा प्रमाणात घडलेलीच नाही, धर्म आणि ईश्वर या संकल्पना कातडीला चिकटून बसल्या आहेत तिथे तर हे आव्हान फारच मोठं आहे. विवेकाविषयी, विवेकी निर्णयप्रक्रियेविषयी सातत्याने बोलत राहणं, प्राप्त परिस्थितीत काय करता येईल याचा विचार एकत्र येऊन करत राहणं, कृतीकार्यक्रम आखणं याला पर्याय नाही. 

या एकूण चर्चेच्या संदर्भाने डॉ. नरेंद्र दाभोळकरांची आठवण होणं अपरिहार्य आहे. साध्या-सोप्या भाषेत लोकांशी जोडून घेत आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोचवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. मुख्य म्हणजे त्यांनी उभं केलेलं संघटनात्मक काम खूप व्यापक आहे. त्यांची आणि कॉम्रेड पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या विवेकवादी चळवळीला मोठा धक्का होता. त्याचबरोबर या हत्यांनी, आजच्या सर्वव्यापी उन्मादाने आणि समाजातील एका मोठ्या वर्गाच्या सामाजिक परिवर्तनाबाबतच्या अनास्थेने, विवेकवादी चळवळीची पुढील रूपरेषा काय असावी हा विचार करायलाही भाग पाडलं आहे. ही आपल्यावरची मोठीच जबाबदारी आहे. 

('आजचा सुधारक'च्या 'बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य' या विशेषांकात (ऑक्टोबर २०२२०) प्रकाशित. - https://www.sudharak.in/2020/10/3870/)

बुद्धी, विवेक आणि वास्तव – २

‘बुद्धिप्रामाण्यवाद हा समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे’ ही या विशेषांकाची मध्यवर्ती कल्पना आहे. ‘बुद्धिप्रामाण्य’ या संज्ञेविषयी पहिल्या लेखात मे. पुं. रेगे यांच्या मांडणीच्या संदर्भाने आपण चर्चा केली. ‘बुद्धिप्रामाण्य’ या शब्दाऐवजी ‘विवेक’ हा शब्द मला अधिक योग्य वाटतो हे मी तिथे मांडलं आहे.

समस्त सृष्टीमध्ये मानव, मानवेतर असंख्य सजीव आणि अर्थातच निर्जीव जग यांचा समावेश होतो. ‘बुद्धिप्रामाण्यवाद हा समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे’ या विधानाचा अर्थ ‘माणसाने बुद्धिप्रामाण्य स्वीकारणं समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे’ असा अभिप्रेत आहे. (मानवासह मानवेतर सजीवांनीही बुद्धिप्रामाण्य स्वीकारावं असा एक दुसरा मजेशीर अर्थ या विधानातून निघू शकण्याची शक्यता आहे; पण तो अर्थ अर्थातच गैरलागू आहे.) ‘सृष्टीसाठी हितकारक काय आहे?’ असा जेव्हा आपण – म्हणजे माणसं – विचार करतो तेव्हा आपण एक रोचक प्रश्न विचारत असतो. ‘हित’, ‘हितकारक’ म्हणजे नक्की काय, हिताची व्याख्या व्यक्तिनिरपेक्ष आहे की विविध परिस्थितींमध्ये, विविध विचारदृष्टींनुसार ती विविध प्रकारे परिभाषित होते अशा तात्त्विक मुद्द्यांपासूनच या प्रश्नाचा वेध सुरू होऊ शकतो. शिवाय पहिल्या लेखातील ‘बुद्धिप्रामाण्य की विवेक’ हा संदर्भही इथे लागू होईल. माणसाने निसर्गात हस्तक्षेप करत स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केलं, त्यात निसर्गाचा ऱ्हास झाला आणि आज तर पर्यावरणीय संकटाने भीषण रूप धारण केलं आहे. माणसाने निसर्गातील हस्तक्षेपाची सुरुवात त्याच्या बुद्धीच्या बळावरच केली. पुढे त्याची गरज/हाव वाढल्यावर जे दुष्परिणाम झाले त्यावरही त्याने आपल्या बुद्धीच्या बळावर उपाय शोधले. माणसाचा हा बुद्धिप्रामाण्यवाद त्याच्या स्वतःसाठी हितकारक ठरला असेल, पण  सृष्टीसाठी तो हितकारक ठरला की अहितकारक? सृष्टीपासून हळूहळू वेगळं होत तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःची प्रतिसृष्टी निर्माण करणार्‍या माणसाला ‘सृष्टी’विषयी काही बोलण्याचा मुळात अधिकार आहे का? की मग बुद्धिप्रामाण्यवादाचे चांगला आणि वाईट असे दोन प्रकार आहेत? असे काही प्रश्न इथे उपस्थित होतात.

हे प्रश्न बाजूला ठेवले आणि वरील विधान ‘विवेकवाद हा समस्त मानवजातीसाठी हितकारक आहे’ असं बदललं तर ते पटण्यासारखं आहे. पण प्रत्यक्षात विवेकवाद किंवा एकूणच आधुनिक विचारपद्धती, मूल्यसंकल्पना व्यापक प्रमाणात प्रभावी ठरत नाही असं दिसतं. आज तर संकुचित राष्ट्रवाद, धार्मिकता यांचा प्रभाव वाढलेला दिसतो. याची कारणं तात्कालिक राजकीय विचारसरणी, माणसाला सतत प्रभावित करत राहणारं सांस्कृतिक राजकारण, अत्यंत विषम अशी सामजिक रचना, त्यातून जन्मणारी आणि आधुनिक विचारपद्धती आपल्या कक्षेत घेऊ शकणार नाही अशी माणसाची असहायता आणि माणसाच्या काही मूलभूत तर काही दृढ झालेल्या/केल्या गेलेल्या प्रेरणांमध्येही सापडू शकतात.  

आपला वैचारिक प्रवास काही मूल्यसंकल्पनांची निश्चिती करतो आणि त्यांना मार्गदर्शक मानून पुढे जाण्यात आपलं सर्वांचं हित आहे असं आपण मानतो. आदिम काळातील हिंसक, वर्चस्ववादी प्रेरणा मागे सारत आपण अधिक सहिष्णू, समावेशक झालो हे खरं असलं तरी वर्चस्व प्रस्थापित करण्याचे इतर अनेक, विशेषतः बाजारकेंद्री, मार्ग आपण शोधलेच. थेट शारीरिक हिंसेपेक्षा ‘अप्रत्यक्ष सामाजिक हिंसा’ होऊ लागली. गुलामीची प्रथा गेली तरी मानसिक गुलामगिरी राहिलीच. (जातिव्यवस्था सर्वात चिवट! सर्व काही पचवून विजयी मुद्रेने उभी आहे.) पण मूल्यसंकल्पना म्हणून काही तत्त्वांना, उदा. न्याय, सत्य, अहिंसा इ., आपण आज सामूहिक मान्यता दिली आहे. आता या संकल्पना सररास, सोयीनुसार वाकवल्या जातात हे आपण बघतोच. परंतु वर्चस्वासाठी, राजकीय-आर्थिक फायद्यासाठी या संकल्पनांना वाकवण्याबरोबरच आर्थिक-राजकीयदृष्ट्या बलवान नसणारेही स्थलकालसापेक्षतेने, दैनंदिन व्यवहारात, धोरणात्मक निर्णय म्हणूनही या संकल्पनांना वाकवत असतात. माणसाचं प्रत्यक्ष जगणं आणि संकल्पनात्मक जगणं यात कायमच तफावत राहते. संकल्पनांचं स्वतःत ‘परिपूर्ण’ असणं आणि वास्तवाचंदेखील स्वतःत ‘परिपूर्ण आणि अटळ’ असणं या झगड्यात माणूस जगत राहतो. वास्तवाला वेगळं वळण देण्यासाठी मूल्यसंकल्पनांना त्यांच्या ‘परिपूर्णतेपासून’, त्यांच्या विशुद्ध स्वरूपापासून किंचितही ढळू न देता वास्तवाचा मुकाबला करणं यासाठी असामान्य मनःशक्ती लागते आणि ती सर्वांच्या ठायी प्रकट होणं शक्य नसतं. त्यामुळे विशिष्ट संकल्पना ‘हितकारक’ आहेत असं म्हणताना ‘माणसाचं वास्तव’ विसरून चालत नाही.    

बुद्धिप्रामाण्य/विवेक, अनीश्वरवाद यांचा विचार माणसाच्या सामाजिक आणि आंतरिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवरच करावा लागेल. हजारो वर्षांच्या प्रवासानंतर, एकोणिसाव्या शतकापासून सुरू झालेल्या उत्क्रांतीच्या अभ्यासानंतर, मोठ्या वैचारिक घुसळणीनंतरदेखील ‘ईश्वर’ ही संकल्पना प्रभावहीन होत नाही कारण माणसाने ईश्वर कल्पनेला त्याच्या नैतिक, सांस्कृतिक जगण्याचा भाग केलं आहे आणि सृष्टीच्या उत्पत्तीचं अन्य स्पष्टीकरण जनमानसात स्थान मिळवू शकलेलं नाही. अर्थात ईश्वरी रूपाच्या कल्पनेत फरक असू शकेल. काही आस्तिकांच्या मनात ईश्वरी अस्तित्वाचा अर्थ ‘एक देहधारी ईश्वर’ असा नसून ‘सृष्टी निर्माण करणार्‍या शक्ती’ असाही असू शकेल. कदाचित काहीजण ईश्वरी अस्तित्व मान्य करून मूर्तिपूजा नाकारत असतील. मागील लेखात म्हटल्याप्रमाणे हा एक स्पेक्ट्रम आहे आणि त्याच्या एका अंतिम टोकाला संपूर्ण जडवादी स्पष्टीकरण आहे. हे जडवादी स्पष्टीकरण स्वीकारणं बहुसंख्य माणसांना कठीण का जातं? एक मुख्य कारण म्हणजे बहुतांश समाज धर्म आणि ईश्वरभक्ती या ‘डिफॉल्ट सेटिंग’मध्येच वाढतो. त्याने धर्म आणि ईश्वरविरहित जग पाहिलेलंच नाही. दुसरं म्हणजे माणसाच्या वृत्ती ईश्वर आणि धर्म कल्पनांमुळे बदलत गेल्या आहेत. माणूस त्याच्या आंतरिक भाव-भावना, इच्छा, विचार आणि विकार यांना ईश्वराचा ‘शोध’ लागण्याआधी देत असलेला प्रतिसाद आणि ईश्वराचा शोध लागल्यानंतर देत असलेला प्रतिसाद यात फरक असणार आहे. या संदर्भात आपल्याला काही प्रश्न विचारता येतील. माणसात जेव्हा जाणीव ‘निर्माण’ झाली तेव्हा तिच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत होत्या? ‘कुणीतरी आहे ज्याने मला निर्माण केलं’ हा विचार तिच्यामध्ये अंतर्भूतच होता की तो एका कुठल्यातरी टप्प्यावर आला? जाणिवेत ‘दुःख’ कधी आलं? माणसाने एका टप्प्यावर ईश्वर शोधला असेल तर त्याने जोवर ईश्वर शोधला नव्हता तोवर तो आपल्या विविध भाव-भावनांचा सामना कसा करत असेल? मुळात ईश्वराचा शोध लागल्यानंतरच माणसाच्या मनात तोवर नसलेल्या काही भाव-भावनांनी जन्म घेतला का? इतर अनेक बाबतीत जसं एकदा ‘शोध लागल्यावर’ मागे फिरणं शक्य होत नाही तसं ईश्वराबाबत (माणूस त्याच्या अस्तित्वाची, त्याच्या दुःखाची कारणं जड सृष्टीबाहेर शोधू लागल्यावर) घडलं का? हे सगळे प्रश्न मानवप्राण्याच्या एका अचंबित करणार्‍या भल्यामोठ्या वाटचालीवर पसरलेले आहेत. कदाचित यांपैकी काहींची उत्तरं शोधली गेली असतील, काहींचा शोध सुरू असेल. हे प्रश्न उपस्थित करण्याचं कारण असं की माणसाची जाणीव एका गुंतागुंतीच्या प्रवासातून निर्माण झाली आहे हे लक्षात यावं. आपण ‘बायनरी’ भूमिका घेऊच शकतो, पण जाणीव सदासर्वदा ‘बायनरी’त काम करत नाही. तिचं स्वरूप प्रवाही आहे. त्यातून सृष्टीचा पसारा इतके अनंत प्रश्न निर्माण करतो की जडवादी स्पष्टीकरण मान्य करणं बहुतेकांना अवघड वाटतं.

या चर्चेतला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ईश्वरी संकल्पना ही एक नाट्यमय, रोमांचकारक संकल्पना आहे. त्यात एक ‘दिव्यत्वा’ची अनुभूती आहे. आपण फारच छोटे आहोत आणि या विराट सृष्टीच्या निर्मात्याला शरण जाणं, त्याला समर्पित असणं हीच आपली गती आहे हे मनुष्य मान्य करतो कारण हे मान्य करण्यात, या समर्पणात त्याला शांतता व समाधान अनुभवता येतं (किमान असा दावा तरी केला जातो. एक मात्र खरं की ‘शांत होण्याची’, बाह्य व आंतरिक खळबळीचा/स्ट्रेसचा परिणाम म्हणून व त्यावर उपाय म्हणून काही मार्गांचा अवलंब करण्याची गरज नास्तिकांनादेखील भासते. हा एक कळीचा मुद्दा आहे. प्रश्न ईश्वराचा नाही, मनाचा आहे!). आधुनिक विज्ञानाने आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली, अनेक रहस्यं उलगडली. खरं तर ‘विज्ञान’ हा काही ‘नवीन शोध’ नव्हेच. अस्तित्वाच्या वाटचालीत माणसाबरोबर विज्ञान होतंच. मात्र गेल्या दोन-तीन शतकांमध्ये वैज्ञानिक विचारपद्धतीला चांगला आकार आला. आधी गूढतेच्या कक्षेत असणारे अनेक मुद्दे विज्ञानाने स्पष्टीकरणाच्या कक्षेत आणले. याची दुसरी बाजू अशी की हे होण्याआधी हजारो वर्षं आणि विज्ञानाचा प्रभाव वाढल्यावरदेखील माणसाच्या मनाची मशागत कथा-नाट्य-संगीत-चित्र यांनी झाली आहे. ‘गोष्टीचं’, ‘नाट्यमयतेचं’ माणसाला असणारं आकर्षण हा एक संशोधनाचाच विषय आहे. (माणसांना एकत्र आणण्यासाठी आणि एकत्र ठेवण्यासाठी माणसाने ‘गोष्टी’चा कसा प्रभावी वापर केला, ‘कल्पित वास्तवा’चा माणसाला त्याच्या आदिम प्रवासात तर उपयोग झालाच, पण आधुनिक काळातील अनेक संस्था-संकल्पनादेखील ‘कल्पित वास्तवा’च्या आधारे उभ्या राहिल्या याबाबत युव्हाल हरारीच्या ‘सेपियन्स’मधील विवेचन वाचण्यासारखं आहे.) ईश्वराची कल्पना, तिची रूपं, या कल्पनेभोवती उभ्या राहिलेल्या कथा माणसाच्या मनाला भुलवतात. माणसाच्या विविध कलात्मक आविष्कारांमध्ये ईश्वराच्या कल्पनेचं प्रतिबिंब सातत्याने पडलेलं दिसतं. अनेकदा तर ईश्वरभक्ती हीच कलात्मक निर्मितीची प्रेरणादेखील ठरते. माणसाच्या चिंतनात स्थान मिळवण्यापेक्षाही ईश्वराने माणसाच्या रंजनात स्थान मिळवल्याने त्याला सहजासहजी निवृत्त करता येत नाही. (बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ‘हू वेअर द शूद्राज?’ या ग्रंथातील ‘द रिडल ऑफ द शूद्राज’ या पहिल्या प्रकरणात ऋग्वेदातील पुरुषसूक्ताचा सविस्तर परामर्श घेतला आहे. पुरुषसूक्त म्हणजे विश्वोत्पत्तीसंबंधीचा एक सिद्धांत आहे. याबाबत आंबेडकरांनी एक टिप्पणी केली आहे – Cosmogonies have never been more than matters of academic interest and have served no other purpose than to satisfy the curiosity of the student and to help to amuse children. विश्वोत्पत्तीबाबतचे जगातील प्राचीन ग्रंथांमधील/धर्मग्रंथातील सिद्धांत ‘अम्यूझमेंट’ – ‘रंजन’ या श्रेणीत नक्कीच मोडतील. पण ‘बिग बँग थिअरी’सारखा संशोधनावर आधारित वैज्ञानिक सिद्धांत या श्रेणीत जाऊ शकणार नाही. आंबडेकरांनाही तसं अभिप्रेत नसावं. मुद्दा असा की कार्यकारणभावाऐवजी ‘रंजन’ हे केवळ मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठीही उपयोगी ठरतं. समाजव्यवस्था लावण्याच्या संदर्भात, ईश्वरविषयक, नीतीविषयक कल्पना दृढ करण्याच्या संदर्भात प्रौढांकडेदेखील बालक म्हणूनच पाहिलं जातं.)

अनीश्वरवादासमोरील आव्हान मोठं का आहे हे या काही मुद्द्यांवरून लक्षात यावं. वास्तविक  ईश्वरविषयक कल्पना, श्रद्धा, धर्मश्रद्धा यांचं विपर्यस्त स्वरूप आपल्याला आजूबाजूला दिसत असतं. माणसाच्या मनोविकासात त्याचा अडथळा होतो आहे, चिकित्सक वृत्तीची, विवेकाची पिछेहाट होते आहे हेही आपण पाहतो. या पार्श्वभूमीवर आणि तात्त्विक कारणामुळेही ईश्वर, धर्म या संकल्पनांवर प्रश्न उपस्थित करणं, त्या नाकारणं स्वाभाविक आहे. मात्र नकाराच्या पुढे जाऊन  ‘जे काहींना दिसतं आहे ते इतर बहुसंख्यांना का दिसत नाही?’ ‘ईश्वर, धर्म यांचं माणसाच्या मनोव्यापारातील ‘फंक्शन’ काय आहे?’ ‘धार्मिक आणि ईश्वरी ‘डाएट’वरच जर माणसं वाढत असतील तर एक वेगळं डाएट चांगलं आहे हे पटवून देण्यासाठी काय करावं लागेल?’ हे प्रश्न विचारणंही गरजेचं आहे. या संदर्भात एक मुद्दा मांडावासा वाटतो. ‘राजकारण’ हा शब्द ऐकला की आपल्या मनात एकदम नकारात्मक भावना उत्पन्न होते. स्वार्थ, सत्तास्पर्धा, त्याकरता विधिनिषेधशून्य मार्गांचा वापर हे सत्तेच्या राजकारणाचं स्वरूप डोळ्यासमोर येत असल्याने असं होतं. पण ‘राजकारण’ ही एक व्यापक संज्ञा आहे आणि ‘सत्ता व्यवहार’ या दृष्टीने पाहता आपल्या घरात, नातेसंबंधांतदेखील राजकारण असतं हे आपल्याला मान्य होईल. आपण – मानव समूह म्हणून – राजकरणापासून मुक्त असू शकत नाही. ईश्वर, धर्म या संकल्पना त्यांच्या मुळातील स्वरूपापासून बदलत बदलत पक्षीय, सांस्कृतिक राजकारणाचे महत्त्वाचे आयाम म्हणून स्थिरावल्या आहेत. या संकल्पनांचा पुरेपूर वापर करून समाजमानस पुरेसं कमकुवत केलं गेलं आहे. चिकित्सेचा अवकाश कमी कमी होत गेला आहे. असं असताना जडवादाचं ‘व्यापक राजकारण’ कसं असावं हा विचार केल्याखेरीज निव्वळ नकाराने काही साध्य होईल असं दिसत नाही. ज्यांना ‘काही अधिक समजलं आहे’ त्यांनी हे अधिकचं ज्ञान समूहात सार्वत्रिक करण्याचे कल्पक मार्ग शोधल्याशिवाय ते ज्ञान, ती विचारदृष्टी विशिष्ट लोकांपुरतीच सीमित राहते.

‘जडवाद’ या आपल्या छोट्या पुस्तकाच्या प्रास्ताविकात लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटलं आहे – 

अनीश्वरवादाला ‘जडवादा’वाचून मुळीच महत्त्व नाही. एकाच वादाच्या जडवाद व अनीश्वरवाद या दोन बाजू आहेत. जडवाद ही विधायक (पॉझिटिव्ह) बाजू असून अनीश्वरवाद ही अभावात्मक (निगेटिव्ह) बाजू आहे. जडवादाची विधायक विचारसरणी बरोबर व निश्चित लक्षात घेतली म्हणजे त्यातून अनीश्वरवाद आपोआप सिद्ध होतो. जडवादाची किंवा विज्ञानाची बौद्धिक भूमिका ज्याच्या नीट लक्षात येईल, त्याच्या बुद्धीत ईश्वराला भूमी मिळूच शकत नाही. मिळाल्यास ती एक बाकीच्या व्यवस्थित विचारसरणीशी विसंगत असलेली व परंपरागत श्रद्धेने राखून ठेवलेली कल्पना होय, असेच म्हणावे लागेल.

वरील उद्धृतामधील ‘विधायक बाजू’ आणि ‘अभावात्मक बाजू’ या संज्ञा लक्षात घेण्यासारख्या आहेत. ‘ईश्वर नाही’ असं म्हटलं की त्यातील नकारामुळे ‘मग काय आहे?’ हा प्रतिप्रश्न लगेच विचारला जातो. ‘ईश्वर आहे’ हा दावा असणार्‍यांनी आपला दावा सिद्ध करावा असं म्हटलं की त्यावर विविध प्रकारे उत्तरं येतात. ‘हवा दिसत नाही, पण ती असतेच. त्यासाठीही तुम्ही पुरावा मागणार का’ वगैरे ठरलेले प्रतिप्रश्न येतात. यातून वितंडवाद सुरू होतो. जडवादाची सविस्तर मांडणी – विधायक बाजू – बाजूला पडते. इथे आपल्या असं लक्षात येईल की ‘धारणांशी सामना’ म्हणजे ‘मनुष्याशी सामना’ असतो आणि मनुष्य हे सलग, एकरेषीय असं घटित नाही. विविध धारणांचा, त्यांच्या रचनेचा विचार करताना, त्यांना भिडताना ‘धोरणात्मक दृष्टी’ (राजकीय दृष्टी) महत्त्वाची ठरते. या दृष्टीने पाहता ईश्वराच्या रोमांचकारक कल्पनेला आव्हान देताना जडवादी मांडणी पहिल्या टप्प्यावर तरी रंजक-रोमांचक, कथात्म पद्धतीने प्रस्तुत करता येईल का, सृष्टीच्या उत्पत्तीमागील रहस्य उलगडणे याबरोबरच माणसाच्या अशांत, अस्थिर अंतर्मनाला आधार देण्यासाठी काय करता येईल यावर मंथन होणं आवश्यक आहे.

अखेरीस या संदर्भाने काही मुद्दे मांडावेसे वाटतात.

  • ‘प्रबोधन’ हा शब्द न वापरता प्रबोधन करता येईल का हा शोध घ्यायची आज गरज आहे. ‘आपल्याला कुणीतरी शिकवायला आलं आहे’ ही भावना बहुसंख्यकांना निरुत्साही करणारी असते. विशेषतः माणसाच्या मुळातल्या अस्थिर मनोवृत्तींवर आज माहितीच्या स्फोटाने, समाजमाध्यमांनी, धार्मिक-राष्ट्रवादी उन्मादाने जे परिणाम केले आहेत त्याचे बरेच आयाम आहेत. अस्थिरतेत भर घालण्याबरोबरच स्वतःविषयीचा अस्थानी आत्मविश्वास वाढणे, स्वप्रतिमेत आणि समोर आलेल्या आयत्या माहितीत गुंग होणे हाही एक आयाम आहे. या पार्श्वभूमीवर आपण ज्या भाषेत संवाद साधू पाहतो ती समोरच्याला आपल्यापासून दूर लोटते आहे का हे पाहणं आवश्यक ठरतं. ‘नवा माणूस निर्माण करणं’ या उद्दिष्टाआधीचं उद्दिष्ट ‘माणूस जोडणं’ हे असायला हवं.    
  • देव-धर्म-श्रद्धा याबाबतची बहुसंख्य समाजाची संवेदनशीलता लक्षात घेता ‘नकारा’ची दृष्टी न ठेवता ‘धर्माचा विवेक’, ‘श्रद्धेचा विवेक’ अशासारख्या शीर्षकांनी आपली मांडणी करता येऊ शकेल. (‘विवेक’ केंद्रस्थानी ठेवून ही मालिका पुढे राजकीय विवेक, भौतिक विकासाचा विवेक अशी पुढे जाऊ शकते.)
  • वैज्ञानिक विचार, परिवर्तनाचा विचार हे ‘काहीतरी वेगळं आहे’ म्हणून मुख्य धारेतील सांस्कृतिक विश्वापासून दूर राहिलेलं आहे. त्यांना लोकांच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग बनवण्याच्या दृष्टीने वैज्ञानिक विषयांवर आधारलेली, चिकित्सेचा विचार झिरपवणारी काही छोटी ‘मोड्यूल्स’ तयार करून ती विविध सांस्कृतिक माध्यमांतून प्रसारित करता येतील का यावर विचार होऊ शकतो.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत सांगीतिक कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, गप्पांचे कार्यक्रम, एकपात्री प्रयोग, स्टँड-अप कॉमेडी या आणि इतर फॉर्मेट्सचा वापर उत्क्रांती, मानसशास्त्र, मेंदूविज्ञान, इहवाद यांची ओळख करून देण्यासाठी कसा होऊ शकेल हा विचार करता येईल. उदा. आपल्या विचार-विकारांच्या मुळाशी मेंदूत स्रवणारे हॉर्मोन्स असतात. या हॉर्मोन्सना व्यक्तिरूप देऊन एखादी एकांकिका बसवता येऊ शकेल का? ‘माणूस दोन पायावर चालू लागला’ किंवा ‘माणूस बोलू लागला’ याची गोष्ट नाट्यरूपात सादर होऊ शकेल का? इ.  
  • प्रागतिक विचारांना धरून उभ्या राहिलेल्या मूल्यसंकल्पना त्यांच्या मूळ स्वरूपाच्या पातळीवर परिस्थितीनिरपेक्ष, ‘वास्तव’निरपेक्ष असल्या तरी सामाजिक वास्तवाच्या संदर्भात जेव्हा त्या उभ्या राहतात तेव्हा वास्तवाच्या शक्तींपुढे त्या निष्प्रभ ठरू शकतात. समाजाचा एकूण जीवनविकास कमालीचा असमान असताना मूल्यसंकल्पनांचा विकास समान व्हावा ही अपेक्षा गैरलागू ठरते; खरं तर असंवेदनशीलही ठरते. आर्थिक असुरक्षिततेचा सामना करणारे असंघटित क्षेत्रातील असंख्य कामगार, जातीय शोषणाचा आजही बळी ठरणारे हजारो दलित, जिवाचीदेखील सुरक्षितता मिळत नाही अश्या परिस्थितीत काम करणारे भारतातील सफाई कामगार या आणि अशा अनेक समाजघटकांच्या संदर्भात विवेक, नास्तिक्य किंवा इतर संकल्पना कोणत्या स्वरूपात उभ्या राहतील? या मोठ्या वर्गाच्या दृष्टीने ‘विवेकी विचार’ म्हणजे काय असेल? प्रबोधनाची चळवळ समाजातील या मोठ्या वर्गासंदर्भात ‘विवेक’ या संकल्पनेचा विचार कशी करते? हे प्रश्न टाळता येणारे नाहीत.
  • समाजाचं होत आलेलं ‘वर्गीकरण’ लक्षात घेता आपली विचारदृष्टी/मांडणी विशिष्ट वर्गाच्या विशिष्ट प्रश्नांना कवेत घेऊ शकते का? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. त्या दृष्टीने पाहता विवेकवादी चळवळीबरोबरच सामाजिक न्यायाचे, मानवी प्रतिष्ठेसाठीचे लढेही अग्रक्रमावर येतात आणि विवेकवादी चळवळीचा त्यांच्याशी समन्वय साधला जातो आहे का, धोरणात्मक देवाण-घेवाण होते आहे का, हे तपासत राहणं आवश्यक ठरतं.
('आजचा सुधारक'च्या 'बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य' या विशेषांकात (ऑक्टोबर २०२२०) प्रकाशित. -  https://www.sudharak.in/2020/10/3812/)

बुद्धी, विवेक आणि वास्तव - १

आपण 'कुणापासून' तरी निर्माण झालो, आपण आहोत त्याअर्थी आपल्याला आपल्याला आई-वडील आहेत हे सरळ आहे हे गृहीत धरणं जीव उत्पत्तीच्या सध्याच्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर योग्यच आहे. बहुतांश सजीव जन्माला यायला आई-वडील लागतात त्याचप्रमाणे माणूस आणि इतर सजीव पृथ्वीवर यायलादेखील कुणीतरी लागत असणार - अन्यथा आपण कुठून आलो याचं उत्तरच सापडत नाही - हा विचार 'या सृष्टीचा निर्माता कुणीतरी असणार' या दृढ झालेल्या धारणेमागे होता/आहे. आपले आई-वडील कोण हे निश्चित करता येतं, त्यांना समोर दाखवता येतं. (अर्थात आई-वडील ही निश्चिती, विशेषतः 'वडील' ही निश्चिती, एका टप्प्यावर करता येऊ लागली). सृष्टी निर्मात्याबाबत हे शक्य नाही. परंतु ती धारणा अत्यंत बळकट झाली असल्याने 'निर्माता दिसला नाही तरी आहे' याबाबत बहुसंख्यांच्या मनात संदेह नसतो. याशिवाय सृष्टी निर्मात्याबरोबर त्याचे 'पदाधिकारी'देखील आहेत. पुराणकथांमधून आपण हे वाचलेलं असतं. उदा. भारतीय परंपरेतील पर्जन्याचा देव वरूण, ग्रीक पुराणातील प्रेमाची देवता अ‍ॅफ्रोडाइट आणि असे अनेक. माणसाचा मूळ ईश्वर विचार आणि त्याचा होत गेलेला विकास हा एक दीर्घ आणि गुंतागुंतीचा प्रवास आहे. त्याला समांतर असा निरीश्वरवादाचादेखील प्रवास आहे. खरं म्हणजे ईश्वर देहरूपात अस्तित्वात आहे या एका टोकापासून ईश्वर कुठल्याच रूपात अस्तित्वात नाही या दुसऱ्या टोकापर्यंतचा एक स्पेक्ट्रम आहे असं आपल्या लक्षात येईल. या पूर्ण स्पेक्ट्रमभर ईश्वरी अस्तित्वाविषयीचे विविध दृष्टीकोन, श्रद्धा, विश्वास विसावलेले आहेत. भारतीय दर्शन परंपरेत 'आस्तिक' म्हणजे वेदप्रामाण्य मानणारी दर्शने आणि 'नास्तिक' म्हणजे वेदप्रामाण्य न मानणारी दर्शने अशी विभागणी आहे. या अर्थाने चार्वाक, जैन व बौद्ध ही तीन दर्शने नास्तिक ठरतात आणि न्याय, वैशेषिक, सांख्य, योग्, पूर्वमीमांसा (मीमांसा) आणि उत्तरमीमांसा (वेदांत) ही आस्तिक ठरतात. आस्तिकांपैकी सांख्य आणि पूर्वमीमांसा ईश्वराचं अस्तित्व नाकारतात. पण ते वेदप्रामाण्य मानत असल्याने आस्तिक ठरतात. आस्तिक याचा आजचा रूढ अर्थ - सृष्टीचा निर्माता कुणीएक आहे आणि तो ईश्वर आहे - लक्षात घेता चार्वाक, जैन, बौद्ध, सांख्य आणि पूर्वमीमांसा ही दर्शने पूर्णपणे नास्तिक ठरतात. याशिवाय प्राचीन वैदिक वाङ्मयातदेखील इहलोकवादी विचारांचं अस्तित्व जाणवतं असं स. रा. गाडगीळांसारख्या अभ्यासकांनी नमूद केलं आहे.  युरोपातील 'रिनेसाँ' (पंधरावे व सोळावे शतक) आणि 'एज ऑफ रीझन' (सतरावे व अठरावे शतक) या कालखंडात नास्तिकतेची बीजं दिसतात. आस्तिक-नास्तिक मत, ईश्वर सृष्टीनिर्माता आहे (क्रिएशनिझम) - सजीव उत्क्रांत होत गेले आहेत (इव्होल्यूशन) याबद्दल सातत्याने चर्चा होत असते. जडवाद वि. चैतन्यवाद म्हणून ओळखला जाणारा हा संघर्ष शतकानुशतकं जगभर चालूच आहे. त्यावर लिखित स्वरूपात पुष्कळ साहित्य उपलब्ध आहे. त्याचं परिशीलन आपल्याला अनेकविध बारकाव्यांची ओळख करून देऊ शकेल.     

ईश्वरी अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणारा आणि जीवसृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया संशोधनाद्वारे मांडणारा डार्विनचा सिद्धांत ईश्वराविषयीच्या चर्चेला ऐतिहासिक वळण देणारा ठरला. तोही पुढे विकसित होत गेला आहेच. उत्क्रांती ही 'वस्तुस्थिती' आहे की 'सिद्धांत' आहे यावरही चर्चा सुरू असते. परंतु उत्क्रांतीची दिशा माणसाला गवसलेली एक क्रांतीकारक दिशा आहे यात संशयच नाही. आपल्या अस्तित्वाभोवती साचलेल्या गूढतेला छेद देणारी, जीवशास्त्रीय संशोधनात मौलिक भर घालणारी, या संशोधनाला गती देणारी, वेगळी दिशा देणारी आणि माणसाला आश्वस्त करणारी ही दिशा आहे. ('आजचा सुधारक'ने ऑगस्ट २००९ मध्ये काढलेला 'डार्विन विशेषांक' आणि पुढे त्याला 'डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य' हे मनोविकास प्रकाशनाने दिलेलं पुस्तकरूप मराठीतील एक मौलिक दस्तावेज आहे.) उत्क्रांतीचा समावेश औपचारिक शिक्षणात करण्यात आला असला तरी अजून आपल्या सांस्कृतिक जीवनावर त्याचा काहीही प्रभाव नसल्याने, आपल्या विचारविश्वात उत्क्रांतीची बैठक अद्याप तयार न झाल्याने सामूहिक जाणिवेत उत्क्रांतीचं स्थान अद्याप पक्कं झालेलं नाही. ते होणं गरजेचं आहे - उत्क्रांती हा दुर्लाघ्य श्रद्धेचा विषय न होता!  

या प्रास्ताविकानंतर आपण या विशेषांकाचा आणि प्रस्तुत लेखाचा विषय असलेल्या 'बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य' या संकल्पनेकडे वळू. 'बुद्धिप्रामाण्यवाद' या संकल्पनेविषयी मे. पुं. रेगे यांनी अत्यंत उद्बोधक विवेचन केलं आहे. त्यांच्या एका अवतरणानेच चर्चेचा प्रारंभ करू. अवतरण बरंच मोठं आहे, पण महत्त्वाचं असल्याने जसंच्या तसं देत आहे. - 

बुद्धिप्रामाण्यवादाचे जे एक स्पष्टीकरण अनेकदा देण्यात येते ते असे की, 'आपल्या बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून पटते, ते आणि तेच सत्य किंवा योग्य म्हणून स्वीकारावे; आपल्या बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून पटलेले नसते त्याचा जरी कुणीही आदेश किंवा उपदेश केलेला असला, एखाद्या धर्मग्रंथात किंवा एखाद्या प्रेषिताने ते सत्य आहे किंवा योग्य आहे असे जरी घोषित केलेले असले, तरी त्याचा स्वीकार करू नये, अशा रीतीने वागणे म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी असणे.'

बुद्धिप्रामाण्यवादाच्या या व्याख्येत असे अभिप्रेत आहे की, बुद्धी अशी एक विशिष्टओळखता येण्याजोगी मनःशक्ती आहे आणि तिला कित्येक गोष्टी सत्य किंवा योग्य आहेत असे दिसून येते. ज्या गोष्टी तिला सत्य किंवा योग्य म्हणून दिसून येतात किंवा आलेल्या असतात, तेवढ्याच सत्य किंवा योग्य म्हणून जो स्वीकारतो तो बु  द्धिप्रामाण्यवादी असतो. बुद्धिप्रामाण्यवादाच्या या मांडणीवर दोन आक्षेप घेता येतील. बुद्धी अशी एक विशिष्ट शक्ती आहे आणि ती काहीतरी करते किंवा तिच्या द्वारा, तिच्या माध्यमातून काहीतरी घडते असे मानायला आधार नाही. माणसे वस्तू उचलतात त्या सामान्यपणे आपल्या हातांचा उपयोग करून उचलतात. पण अपवादभूत प्रसंगी आपल्या पायांचा किंवा कोपरांचा उपयोग करूनही माणसे वस्तू उचलू शकतात. तेव्हा 'ही वस्तू कुणी उचलली असेल?' या प्रश्नाचा सामान्यपणे अभिप्रेत असलेला अर्थ 'ही वस्तू कुणाच्या हातांनी येथून उचलली गेली असेल?' असा असतो. गुप्त पोलीस या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्या वस्तूवर बोटांचे ठसे न्याहाळीत बसतात हे सर्वाना माहीत आहेच. अर्थात चाणाक्ष गुप्त पोलीस ती वस्तू पायांनी किंवा कोपरांनी उचलता येण्याजोगी असली, तर त्या प्रकारेही ती उचलली गेली असण्याची शक्यता ध्यानात बाळगतो.

आता, याच न्यायाने आपल्याला असे म्हणावे लागेल की, वस्तू ज्याप्रमाणे माणसे उचलतात त्याप्रमाणे गोष्टी सत्य किंवा योग्य आहेत हे माणसांना पटते. आणि माणसे वस्तू उचलतात, ती ज्याप्रमाणे सामान्यपणे आपल्या हातांचा उपयोग करून उचलतात, त्याप्रमाणे ज्या गोष्टी सत्य किंवा योग्य म्हणून माणसांना पटलेल्या असतात, त्या सामान्यपणे (किंवा अनेकदा किंवा कित्येकदा) आपल्या बुद्धीचा त्यांनी वापर केल्यामुळे सत्य किंवा योग्य म्हणून त्यांना दिसलेल्या असतात. पण अपवादभूत प्रसंगी (किंवा कित्येकदा किंवा अन्य प्रसंगी) दुसऱ्या एखाद्या मनःशक्तीचा वापर केल्याने त्यांना त्या सत्य किंवा योग्य म्हणून दिसलेल्या असतात. आता बुद्धिप्रामाण्यवादी तो, की जो बुद्धीला दिसलेल्या गोष्टीच सत्य किंवा योग्य म्हणून स्वीकारतो, अन्य शक्तींचा वापर केल्याने दिसलेल्या गोष्टी सत्य किंवा योग्य म्हणून स्वीकारत नाही.

आता, ही वस्तू ह्या माणसाने उचलली असेल तर ती त्याने कशी उचलली, आपल्या हातांचा उपयोग करून, की कोपरांचा की पायांचा? ह्या प्रश्नाचा निर्णय करता येतो. पण ह्या माणसाला ही गोष्ट सत्य म्हणून दिसून आली किंवा जाणवली, ती त्याने बुद्धीचा वापर केल्यामुळे जाणवली की अन्य कोणत्यातरी शक्तीचा वापर केल्याने जाणवली, ह्या प्रश्नाचा निर्णय करण्याचा मार्ग कोणता? आपण आपले व इतरांचे हात ओळखू शकतो आणि एखाद्या प्रसंगी ते वापरले जात आहेत की नाहीत हे निरीक्षणाने ठरवू शकतो. आता ह्या प्रकारे बुद्धी अशी आपली एक विशिष्ट शक्ती आपण ओळखू शकत नाही आणि एखाद्या प्रसंगी ह्या शक्तीचा वापर करण्यात येत आहे की नाही हे निरीक्षणाने ठरवू शकत नाही. तेव्हा, 'आपल्या बुद्धीला जे सत्य म्हणून दिसते, तेवढेच स्वीकारणे योग्य असते' असे घोषवाक्य उच्चारणे सोयीचे असले, तरी त्याला अनुसरून वर्तन करायचे झाल्यास त्याचा अर्थ स्पष्ट करावा लागेल.

बुद्धिप्रामाण्यवादाच्या वरील मांडणीवर घेता येण्याजोगा दुसरा आक्षेप असा; बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून आकलन झाले असेल तेवढेच स्वीकारा ह्या म्हणण्यात असे अभिप्रेत असेल की 'बुद्धीशिवाय इतरही मनःशक्ती आहेत, पण त्यांच्यातील कुणाला जे सत्य किंवा योग्य म्हणून दिसून आले असेल ते स्वीकारणे योग्य नाही; फक्त बुद्धीलाच जे आकलन झालेले असते तेवढेच स्वीकारणे योग्य होय.' मग बुद्धीच्या बाबतीत आपण असा पक्षपात का करतो हा प्रश्न उपस्थित होईल आणि 'हा पक्षपात करणे योग्य आहे,  किंबहुना हा पक्षपातच नाही, कारण फक्त बुद्धीलाच वास्तव सत्य काय आहे ह्याचे आकलन होऊ शकते, इतर शक्तींना होऊ शकत नाही', असे त्याचे उत्तर असेल, तर हे आपल्याला कसे समजले हा पुढील प्रश्न आपल्यापुढे उभा राहील. आणि हे आपल्या बुद्धीला समजते असे त्याचे उत्तर देऊन भागणार नाही; कारण ते वर्तुळात्मक ठरेल. इतर शक्तींच्या बाजूनेही असाच दावा करता येईल. बुद्धिप्रामाण्यवाद हा अनेक पंथांमधील एक पंथ ठरेल. बुद्धिप्रामाण्यवादाप्रमाणे कल्पनाप्रामाण्यवाद, प्रतिभाप्रामाण्यवादभावनाप्रामाण्यवाद असे अनेक पंथ असू शकतील आणि ह्या पंथांमधून निवड कशी करावी ह्याला काही तात्त्विक अधिष्ठान असणार नाही. ती पूर्णपणे निरंकुश अशी निवड होईल.

किंवा आपली भूमिका अशी असेल : 'बुद्धीला जे सत्य म्हणून आकलन होते, तेच केवळ स्वीकारा' ह्या म्हणण्यात असे अभिप्रेत नाही की, बुद्धीशिवाय इतरही ज्ञानशक्ती किंवा मनःशक्ती आहेत, त्याही सत्य म्हणून कशाचे तरी ग्रहण करतात. तो सत्याभास असतो. खरेखुरे सत्य केवळ बुद्धीच ग्रहण करू शकते. बुद्धी हीच केवळ ज्ञानशक्ती आहे आणि केवळ तीच सत्य ग्रहण करू शकते. पण अशी जर आपली भूमिका असेल तर जे 'बुद्धीला पटले आहे तेच केवळ स्वीकारा' ह्या म्हणण्यात स्वारस्य तरी काय? आपण फक्त तोंडाने खाऊ शकतो, इतर कशाने खाऊ शकत नाही. म्हणून, 'तुम्ही रोज एक सफरचंद खा' असा सल्ला डॉक्टर देईल; पण 'तुम्ही रोज एक सफरचंद तोंडाने खा' असा सल्ला तो काही देणार नाही. तोंडाने खाण्याशिवाय दुसरा पर्यायच माणसाला नाही. तसेच 'तुम्हाला जे सत्य म्हणून आकलन झाले आहे तेवढेच सत्य म्हणून स्वीकारा' असे म्हणता येईल; पण तुमच्या बुद्धीला जे सत्य म्हणून आकलन झाले आहे तेवढेच सत्य म्हणून स्वीकारा असे म्हणण्याचे कारण नाही. पण 'तुम्हाला जे सत्य म्हणून आकलन झाले आहे तेवढेच सत्य म्हणून स्वीकारा' असे कुणाला सांगण्याचे प्रयोजन तरी काय? जे आपल्याला सत्य म्हणून आकलन झालेले नसते; दिसलेले, जाणवलेले नसते; त्याचा सत्य म्हणून कुणी स्वीकार करीत असतो काय? हा अनावश्यक सल्ला तर नव्हे?

- मे. पुं. रेगे (विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा या पुस्तकातील 'बुद्धिप्रामाण्यवाद' या प्रकरणातून)

'बुद्धी' या 'मनःशक्तीविषयीचं रेगे यांचं विवेचन रोचक आहे. बुद्धी आणि भावना असं द्वैत असून माणूस जेव्हा बुद्धीच्या आधारे निर्णय घेतो तेव्हा ते योग्य ठरतात कारण त्यात दूरदृष्टी असते आणि भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतो तेव्हा ते चुकतात कारण त्यात क्षणिक सुखाचा विचार असतो असं आपण म्हणतो. परंतु 'जाणीव' हे मूळ आहे, बुद्धी ही जाणिवेने ग्रहण केलेली, जाणिवेबरोबर विकसित होणारी गोष्ट आहे आणि त्यातून माणसाला निर्णयशक्ती मिळते. रेग्यांनी म्हटल्याप्रमाणे कल्पना, प्रतिभा, भावना अशा इतर शक्तीही असल्या तरी त्या मूळ बुद्धीच्या शाखा आहेत किंवा खरं तर बुद्धीमध्येच त्यांचा अंतर्भाव होतो असं प्रस्तुत लेखकाचं मत आहे. त्यामुळे एखादा मनुष्य त्याच्या बुद्धीमुळेच श्रद्धाळूही असतो किंवा अश्रद्धही असतो. परंतु प्रत्येकजण बुद्धीशी प्रामाण्य राखूनच वागतो, निर्णय घेतो असं म्हटलं तर कृतीची योग्यायोग्यताच निकालात निघते. त्यामुळे 'बुद्धी वापरणे' हा मुद्दा नसून 'बुद्धीची कक्षा विस्तारणे' हा मुद्दा पुढे येतो.

रेगे या लेखात पुढे बुद्धिप्रामाण्यवादाची व्याख्या करतात. बुद्धिप्रामाण्यवादी असणे म्हणजे काय? तर पुरेशा पुराव्याअभावी कोणतेही विधान सत्य म्हणून न स्वीकारणे किंवा असत्य म्हणून न नाकारणे. पण मग पुराव्याअभावी एखादे विधान अनिर्णित मानावे इतकेच जर बुद्धिप्रामाण्यवादाचे सार असेल तर तर बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रसार करण्याचे कारण काय? असा प्रश्न ते विचारतात. कारण सत्य, असत्य किंवा अनिर्णित अशा तीन साध्या-सरळ शक्यता असताना माणूस बुद्धिप्रामाण्यविरोधी वागेलच कसा? पण असे होत नाही. माणसाच्या भावना, त्याच्या अंतर्मनातील अबोध इच्छा आणि प्रेरणा व त्यातून उद्भवणाऱ्या समजुती माणूस स्वीकारतो. रेगे लिहितात, 'या प्रेरणांचे समाधान कल्पनेच्या विश्वातच होऊ शकते. स्वप्ने आणि दिवास्वप्ने ह्या स्वरुपातच ह्या प्रेरणा सफल होऊ शकतात. पण ही स्वप्ने आणि पुराव्याच्या आधारे सत्य ठरणाऱ्या तार्किक समजुती माणूस अलग ठेवू शकत नाही. ह्या तर्कसिद्ध समजुतीचे विषय असलेल्या वस्तुस्थिती आणि ही स्वप्ने ह्यांचे बेमालूम मिश्रण असलेल्या जगात माणूस जगत असतो.'

तर्क, कल्पना, प्रतिभा, भावना यांच्याप्रमाणेच अंतर्मनातील अबोध इच्छा आणि प्रेरणा व त्यातून उद्भवणाऱ्या समजुती या सर्व मूळ बुद्धीच्या शाखा आहेत (किंवा बुद्धीच्या आतच हे सगळं काही आहे) हे मान्य असेल तर मग बुद्धीला पटेल त्यानुसारच वागा असं म्हणण्याला फारसा अर्थ उरत नाही. परंतु बुद्धीअंतर्गत जे जे येतं त्या सगळ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन अंतिम निर्णय घ्यायचं बुद्धीचं सामर्थ्य म्हणजे विवेक. या गुणाचा विकास व्हावा आणि या गुणाच्या आधारेच निर्णय घ्यावेत असं मात्र निश्चित म्हणता येईल. पण इथेही 'मी माझ्या आजारी आईला बरं वाटावं म्हणून बरेच उपचार केले, पण गुण येईना. शेवटी देवीसमोर बोकडाचा बळी द्यायचं ठरवलं. माझ्या दृष्टीने हा विवेकी निर्णय होता' असं कुणी म्हटलं तर? तर त्यासाठी विवेक म्हणजे काय यावर आपल्याला अधिक बोलावं लागेल. मे. पुं. रेगे यांनी वरील पुस्तकात विवेकवादाविषयी, विज्ञाननिष्ठा, श्रद्धा याविषयी विस्तृत मांडणी केली आहे. प्रस्तुत चर्चाविषयाच्या संदर्भाने हे पुस्तक अवश्य वाचावं. 

रेग्यांच्या मांडणीतला एक मुख्य धागा माणसाच्या मनाशी, त्याच्या गुंतागुंतीच्या स्वरूपाशी निगडीत आहे. वरील पुस्तकातील 'मी आस्तिक का आहे?' या प्रकरणातील त्यांचं एक म्हणणं लक्षवेधी आहे. 'सृष्टीची रचना सहेतुकपणे केली गेली आहे यावरील आक्षेप मला माहीत असूनही मी माझी बालपणातील श्रद्धा सोडून का दिली नाहीमी 'आस्तिक' का राहिलो? याचं थोडक्यात उत्तर असं की ही माझी स्वाभाविक श्रद्धा आहे. माणूस म्हणून असणारी ही स्वाभाविक श्रद्धा आहे. तार्किक आणि वैज्ञानिक आक्षेपांमुळे ती सोडून द्यावी लागेल असं काही घडलेलं नाही.' आपण जेव्हा 'बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्या'चा विचार करतो तेव्हा आपल्याला माणसाच्या या 'स्वाभाविक श्रद्धा' विचारात घ्याव्या लागतात. या श्रद्धा, त्या निर्माण होण्यामागचं कौटुंबिक आणि मानसिक पर्यावरण, आधीच्या अवतरणात रेग्यांनी उल्लेख केलेलं 'वस्तुस्थिती आणि स्वप्ने यांचं मिश्रण', माणसाच्या मनाचं 'अनेकदिश' असणं, 'विसंगतीसह' विचार करण्याची मनाची वृत्ती असणं हे सगळं आणि महत्त्वाचं म्हणजे माणसाचं सामाजिक स्थान लक्षात घ्यावं लागतं.  

इथवरच्या मांडणीतून मला  'बुद्धिप्रामाण्यवाद' ऐवजी 'विवेकवाद' हा शब्द अधिक योग्य वाटतो हे वाचकांच्या लक्षात आलं असेल. मी आस्तिक नाही, पण तांत्रिकदृष्ट्या पाहता नास्तिकही नाही. काही असलोच तर - म्हणजे माझ्या मनात या विषयासंदर्भाने जी आंदोलनं सुरू असतात त्यांना काही नाव द्यायचं झालंच तर - मी अज्ञेयवादी आहे. मला एक मूलभूत प्रश्न असा पडतो की आपल्याला सत्याकडे जाण्यासाठी संकल्पनांची खरंच गरज आहे का? सत्य काय आहे हे जर मला समजून घ्यायचं असेल तर मी आस्तिक अथवा नास्तिक असण्याची गरज काय आहे? 'मला काय वाटतं' हे सृष्टीच्या अफाट पसाऱ्यापुढे प्रस्तुत कसं ठरू शकेलपरंतु या तात्त्विक पार्श्वभूमीवरही एक गोष्ट नक्की की मी समाजाचा भाग आहे आणि माझ्या विचारशक्तीनुसार सामूहिक हितासाठी काय आवश्यक आहे याचा मी विचार केलाच पाहिजे. त्यासाठी माझी एक निश्चित भूमिका असली पाहिजे. आणि त्यासाठी 'आज समाज कोणत्या वास्तवात जगतो आहे' याचं मला आकलन असलं पाहिजे.  

सर्व संकल्पनांच्या आणि त्यांच्यातील संघर्षांच्या, त्यांच्या आंतरसंबंधांच्या पार्श्वभूमीवर विचार करताना मला असं जाणवतं की 'हितकारक' काही असेल तर तो 'विवेक' आहे कारण ती प्रवाही संकल्पना आहे. स्वतःला कप्प्यात बंद करून घेणारी नाही. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे विवेकाविषयीदेखील अधिक बोलावं लागेल. लेखाच्या पुढील भागांमध्ये त्याविषयी आणि 'सामाजिकदृष्ट्या हितकारक' काय आहे याविषयी बोलूया. 

('आजचा सुधारक'च्या 'बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य' या विशेषांकात (ऑक्टोबर २०२२०) प्रकाशित. लिंक -  https://www.sudharak.in/2020/10/3809/)