Saturday, November 4, 2017

पॉलीअ‍ॅमरी : बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था

माणसं स्वभावत: वेगवेगळी असतात. त्यांचं वेगळेपण त्यांच्या इतर व्यक्तींबरोबरच्या संबंधांतही परावर्तित होतं. स्त्री-पुरुष संबंधांतही हे परावर्तित होतं. स्त्री-पुरुष संबंधांमध्ये लग्नपूर्व-लग्नोत्तर-लग्नबाह्य़ अशा सर्वच पायऱ्यांवर प्रस्थापित नैतिकता आपली भूमिका बजावत असते. आपल्याकडे स्त्री-पुरुष संबंधांची ‘व्यवस्थात्मक सुरुवात’ सहसा एकपत्नी-एकपती पद्धतीने (मोनोगॅमीने) होत असली तरी मनातून ‘मोनोगॅमी’ राहीलच याची शाश्वती नसते. बऱ्याचदा ती प्रत्यक्षातही राहत नाही.

यात विविध टप्प्यांवर विविध प्रश्न पडत असतात. लग्न झालेलं असताना आपल्याला अन्य कुणाबद्दल काहीतरी वाटतंय, ते वाटणं योग्य आहे का? आपण अमुक गोष्ट करावी की करू नये? अमुक गोष्ट नैतिक की अनैतिक? अशा स्वरूपाचे हे प्रश्न असतात. कारण ज्या भावनांच्या, कृतींच्या संदर्भात हे प्रश्न पडतात, त्यांच्यात आपल्या मन:स्थितीवर दूरगामी परिणाम करण्याची ताकद असते. आपल्या सामाजिक स्थानावरही त्याचा परिणाम होऊ  शकतो. प्रेमभावना ही स्त्री-पुरुष संबंधांमधील निर्णायक भावना आहे. ही भावना प्रवाही असते, आणि प्रबळही. प्रेम म्हणजे नक्की काय, यावर अनेक अंगांनी बोललं जातं. ‘मॅरेज अँड मॉरल्स’ या पुस्तकातील बर्ट्रांड रसेलचं एक विधान उद्धृत करायचा मोह आवरत नाही – Love is something far more than desire for sexual intercourse; it is the principal means of escape from the loneliness which afflicts most men and women throughout the greater part of their lives.  जीवशास्त्रीय अभ्यास मानवी भावनांना अस्तित्वाच्या लढाईशी आणि प्रजोत्पादनाशी जोडतो. आणि ते बरोबरही आहे. आपल्या विचार-वर्तणुकीचा पाया जसा सामाजिक संस्कारांमध्ये आहे, तसाच तो आपल्या जैविक संरचनेतही आहे. ही बाब लक्षात न घेता त्या विचार-वर्तणुकीमुळे आनंदी/ दु:खी होत अपराधी वाटून घेणं हे हानीकारकच आहे. पण मुद्दा भावनांच्या तीव्रतेचा आहे. विशेषत: प्रेमाच्या बाबतीत पाहिलं तर प्रेम, आकर्षण जर प्रजोत्पादनापुरतं मर्यादित असतं तर त्याची तीव्रता लैंगिक इच्छेच्या मर्यादेत राहिली असती. पण प्रेमाची तीव्रता वाढते. प्रेम माणसाला व्यापून टाकू शकतं. माणूस जसा स्थिरावत गेला तसं प्रेमही स्थिरावत गेलं आहे. हे कशामुळे झालं? इथे एक थोडी विचित्र, पण सयुक्तिक तुलना करावीशी वाटते. ‘बलात्कार हे सिव्हिलायझेशनचं अपत्य आहे’ असं म्हणतात. त्याच न्यायाने तीव्र प्रेम, भावनिक गुंतणूक, मनाचा हळवेपणा- एकूणातच विविध प्रकारचे भावनिक आवेग हीदेखील सिव्हिलायझेशनचीच अपत्ये म्हणता येतील. इथे दोन प्रश्न उपस्थित होतात: ही अपत्ये जन्माला घालावीत का? आणि जन्माला आली, तर त्यांच्या संगोपनाचा योग्य मार्ग कुठला?

लग्नव्यवस्थेने प्रेमभावनेच्या बाबतीत हा प्रश्न सोडवण्याचा काही अंशी प्रयत्न केला आहे. स्त्री-पुरुष संबंधांचं नियमन करणारी व्यवस्था म्हणून लग्नव्यवस्था गेली अनेक शतके प्रचलित आहे. या व्यवस्थेला नैतिक अधिष्ठान आहे. लग्नसंस्थेविषयी साधकबाधक चर्चा सतत सुरू असली तरी अजूनही लग्नसंस्थेचं स्थान पक्कं आहे. लग्नाचं काहीसं लोकशाहीसारखं आहे. लोकशाहीत दोष आहेत, पण प्राप्त परिस्थितीत सर्वाना सामावून घेईल असा याहून चांगला पर्याय दिसत नाही. राज्यव्यवस्था लोकशाहीपाशी येऊन स्थिरावली आहे. आता या व्यवस्थेत सुधारणा होऊ  शकतील, पण फार मूलभूत बदल होऊ  शकत नाहीत, असं म्हटलं जातं. मात्र, लग्नव्यवस्थेच्या प्रचलित पद्धतीचा जो गाभा- एकपत्नीत्व/ एकपतीत्व- त्यात बदल होऊ  पाहत आहे. त्याची व्याप्ती कमी आहे; पण बदल होत आहेत. खरं तर बहुपत्नीत्व (पॉलीजिनी) वा बहुपतीत्व (पॉलीअँड्री) या पद्धती आधी अस्तित्वात होत्याच. काही समाजांमध्ये त्या आजही आहेत. परंतु एकपत्नीत्व/ एकपतीत्व (मोनोगॅमी) याला बहुतांश समाजांमध्ये एक घट्ट अशी सांस्कृतिक-नैतिक बैठक मिळाल्याने इतर पद्धतींकडे काहीशा नकारात्मकतेनेच पाहिलं जातं.

लिव्ह-इन रिलेशन, ओपन मॅरेज (लग्न झालेल्या जोडप्याकडून एकमेकांच्या लग्नबाह्य़ लैंगिक संबंधांना मान्यता) अशा व्यवस्था आज अस्तित्वात येताना दिसतात. अशासारखीच एक व्यवस्था म्हणजे ‘पॉलीअ‍ॅमरी’! ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत (२००६) पॉलीअ‍ॅमरीची व्याख्या अशी केली आहे.. The fact of having simultaneous close romantic relationships with two or more other individuals, viewed as an alternative to monogamy, esp. in regard to matters of sexual fidelity; the custom or practice of engaging in multiple romantic relationships with the knowledge and consent of all partners concerned. आज लग्नव्यवस्थेत अभिप्रेत असलेला ‘व्यवस्था विचार’ विस्तारित स्वरूपात, माणसाच्या नैसर्गिक उर्मीना न्याय देत, स्त्री-पुरुष किंवा समलिंगी नात्यांकडे गंभीरतेने बघत, लैंगिक इच्छेकडे आणि प्रेमभावनेकडे थिल्लरपणा म्हणून न बघता या माणसाच्या आंतरिक व सुंदर इच्छा आहेत अशा दृष्टीने बघत माणसांच्या बहुविध नात्यांची व्यवस्था लावण्याचा एक प्रयत्न ‘पॉलीअ‍ॅमरी’ या व्यवस्थेतून केला जातो. ‘पॉली’चा अर्थ ‘पुष्कळ’ (एकाहून जास्त). तर ‘अ‍ॅमोर’ या लॅटिन शब्दाचा अर्थ ‘प्रेम’! या व्यवस्थेची पहिली अट अशी आहे की, संबंधित व्यक्तींपैकी प्रत्येकाला प्रत्येकाच्या इतरांशी असलेल्या प्रेमाच्या नात्याच्या स्वरूपाविषयी पूर्ण कल्पना असेल. मोनोगॅमीमध्ये स्त्री-पुरुषांनी स्वत:च्या नवरा-बायकोकडूनच प्रेम व शारीरिक सुख घेणं अभिप्रेत आहे. ‘पॉलीअ‍ॅमरी’ची संकल्पना माणसातल्या बहुविध ऊर्मीना बहुविध व्यक्तींमार्फत नियमित करण्याचा प्रयत्न करते. त्याअर्थी या व्यवस्थेला एकच एक साचेबद्ध चेहरा नाही. उदा. एखादं लग्न झालेलं जोडपं आहे. जोडप्यातील स्त्रीच्या आयुष्यात अन्य कुणी पुरुष आला तर त्या पुरुषाशी तिचं नातं केवळ भावनिक राहू शकेल, किंवा भावनिक-शारीरिक दोन्ही असू शकेल. हीच गोष्ट जोडप्यातील पुरुषालाही लागू होईल. प्रेम किंवा शारीरिक समाधान या गोष्टी एका व्यक्तीपुरत्याच आहेत, ‘एक्सक्ल्यूझिव्ह’ आहेत, या प्रस्थापित दृष्टिकोनाला आव्हान देणारी ‘पॉलीअ‍ॅमरी’ची संकल्पना आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना काही प्रमाणात प्रत्यक्षात अस्तित्वात आहे. ज्याप्रमाणे लग्न यशस्वी किंवा अयशस्वी होतं, त्याचप्रमाणे नात्यांच्या या व्यवस्थेलाही यशाचा किंवा अपयशाचा सामना करावा लागतो. ही एक वेगळी संकल्पना असली तरी यात माणसंच सहभागी असल्याने व सहभागी माणसांच्या स्वभाववैशिष्टय़ांनुसार, अंगभूत गुण-दोषांनुसार याही व्यवस्थेत अडचणी येऊ  शकतात. परंतु या व्यवस्थेचं वेगळेपण माणसाला बंधमुक्ततेचा अनुभव देण्यात आहे. शिवाय बंधनाबाहेर जायची मुभा असणं याचा अर्थ ‘कुठलंच बंधन कधीच न बाळगणं’ असा होत नाही. (हा मुद्दा नेहमीच वादग्रस्त ठरतो. कारण ‘बंधन बाळगणे’ याची नेमकी व्याख्या करता येत नाही. तिथे तारतम्यच कामी येतं. सध्या हे नोंदवून पुढे जाऊ .)

‘पॉलीअ‍ॅमरी’चा गाभा सर्व संबंधित व्यक्तींना एकमेकांच्या नात्याच्या स्वरूपाची कल्पना असणे हा असला तरी त्याचे विविध ‘फॉर्म्स’ आहेत. यात वरील उदाहरणाप्रमाणे लग्नव्यवस्थेत असलेली जोडपीसुद्धा असू शकतात किंवा लग्न न करताही तिघे-चौघेजण एकत्र राहू शकतात. यात नात्यांमध्ये उतरंड असू शकते किंवा नसूही शकते. मुळात ‘पॉलीअ‍ॅमरी’ मुक्त व्यवस्था असल्याने तिथे कुठल्याच स्वरूपाच्या नातेसंबंधांना नकार नाही. विविध स्वरूपाच्या नातेसंबंधांचं नियोजन करण्याचा प्रयत्न आहे. व्यक्तीला एकाहून अधिक व्यक्तींशी गांभीर्याने (हा शब्द महत्त्वाचा!) संबंध ठेवता यायची मुभा असलेल्या आणि प्रेम व लैंगिकतेबद्दलची नवनैतिकता प्रस्थापित करू पाहणाऱ्या या व्यवस्थेचं स्वरूप समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे प्रयत्न करावे लागतील. कारण आज बहुतेक जण अशा प्रकारच्या बहुविध संबंधांना मनातून तयार नाहीत. आणि यात कुणाचा दोष आहे असंही नाही. ही व्यवस्था नवीन आहे, माहितीची नाही. त्यामुळे ती स्वीकारणं जड जाणारच. शिवाय लग्नव्यवस्थेमुळे ‘एकाला एक’ हे आपल्या मानसिकतेत रुजलं आहे. ते आपण सहजासहजी पुसू शकणार नाही. या लेखात पॉलीअ‍ॅमरीच्या स्वरूपाविषयी आपण प्राथमिक चर्चा करणार आहोत. पण एका लेखात सर्व शक्यतांवर तपशिलात बोलणं शक्य होणार नाही. पॉलीअ‍ॅमरीविषयी इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहे. काही फिल्म्स, माहितीपटही उपलब्ध आहेत.

पॉलीअ‍ॅमरीची मूळ संकल्पना आपण पाहिली. आता त्यातल्या गुंतागुंतीकडे येऊ आणि त्यासाठी प्रेम व लैंगिकता या दोन गोष्टींचा विचार करू.

प्रेम व लैंगिक आकर्षण या पूर्णत: भौतिक गोष्टी नव्हेत. ‘पूर्णत:’ म्हणण्याचं कारण असं की, जाणिवेचा उगमही जडातच आहे असं आधुनिक विज्ञान सांगतं. त्यामुळे या भावनांच्या मुळाशीही ‘जड’ कारणे आहेत. परंतु जाणिवेचं अस्तित्व व स्वरूप मात्र अनुभूतीच्या पातळीवर आहे. या माणसाच्या अंतर्मनात प्रकटणाऱ्या गोष्टी आहेत. दुसरं असं की, विविध भावभावनांचं जे स्वरूप एका व्यक्तीला अनुभवास येतं, ते तसंच्या तसं दुसऱ्या व्यक्तीच्या अनुभवास येईलच असं नाही. परंतु या दोन्ही गोष्टींचा खुलासा ‘आकर्षण’ हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून करता येईल. एकमेकांच्या भौतिक आणि/ किंवा मानसिक वैशिष्टय़ांमुळे व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात. मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासात स्त्रीविशिष्ट व पुरुषविशिष्ट गुणधर्माची बरीच चर्चा झालेली आहे. त्यासंदर्भातील विश्लेषण मॅट रिडलेसारख्या अभ्यासकांच्या पुस्तकात (रेड क्वीन : सेक्स अ‍ॅण्ड द इव्होल्यूशन ऑफ ह्य़ुमन नेचर) व इतरही लेखकांच्या पुस्तकांत पाहावयास मिळेल. यासंबंधी एक गोष्ट नोंदवणं महत्त्वाचं आहे. मानवी उत्क्रांती हा विषय वर्तनामागील जैविक कारणे जाणून घेण्याच्या दृष्टीने, समाजशास्त्रीय विषयांची चर्चा करण्यासाठी अनिवार्य करावा, इतका महत्त्वाचा आहे. कारण उत्क्रांती हे माणसाचं विज्ञान आहे. त्यामुळे माणसाच्या पायाभूत रचनेकडे दुर्लक्षून आपल्याला सामाजिक प्रश्नांची उत्तरं सापडणार नाहीत. समाजाची मूल्यात्मक बांधणी करताना या बांधणीच्या लघुत्तम एककाचं- म्हणजेच मनुष्याचं- ‘नेचर’ काय आहे, तो/ ती या ‘नेचर’ला सामाजिक चौकटीत बसवायचा प्रयत्न कुठवर ताणू शकेल, हा विचार व्हायला हवा. आज लग्नव्यवस्था अस्तित्वात असली तरी ‘मोनोगॅमी’ माणसाच्या आदिम ‘नेचर’च्या विरुद्ध असल्याने या व्यवस्थेला समांतर व्यवस्थाही सुरू असतात. पण त्याचा स्पष्ट उल्लेख होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ‘नेचर’चं महत्त्व इथे लक्षात येतं. मुळात सजीवसृष्टी अस्तित्वात येणं आणि तिच्यात बदल होत जाणं या प्रक्रियेत ‘प्रजोत्पादन’ हे सजीवांचं प्रमुख लक्षण राहिलं आहे. (समलिंगी संबंध याला अपवाद आहेत. या विशिष्ट जाणिवांचा खुलासा प्रजोत्पादनाच्या तर्काने करता येत नाही. जाणिवांची ही वेगळी वाट आहे, इतकंच म्हणता येईल.) समाजव्यवस्था ही ‘उत्क्रांत माणसा’ची गरज आहे; ‘उत्क्रांती’ची नाही. प्रजोत्पादनाच्या उद्देशामुळे स्त्री-पुरुषांमध्ये आकर्षण, लैंगिक ताण अस्तित्वात आहे. अर्थात आज प्रजोत्पादनालाही नियंत्रणात आणण्यात माणूस यशस्वी झाला आहे. पण म्हणून लैंगिक आकर्षण कमी झालेलं नाही. थोडक्यात, ‘माणूस कसा असायला हवा?’ हा जसा महत्त्वाचा विषय आहे, तसाच ‘माणूस आतून कसा आहे?’ हादेखील महत्त्वाचा विषय आहे. आणि दुसऱ्या प्रश्नाचा अभ्यास आधी केला तर पहिल्या प्रश्नाची योग्य उत्तरं मिळू शकतात.

उत्क्रांतीच्या अभ्यासाचं महत्त्व नोंदवून प्रेम व लैंगिकतेच्या मुद्दय़ाकडे येऊ. उत्क्रांती आपल्यासमोर या दोन्हींचे सविस्तर विश्लेषण ठेवू शकते. मात्र, त्यावर सामाजिक नियमनाच्या उद्देशाने प्रभावीपणे काम करणं हे माणसाचं कौशल्य आहे. उत्क्रांतिजन्य जाणिवांना आपण नैतिक चौकटीत बसवलं आहे. या चौकटी कणखर असतात आणि बहुसंख्य माणसे या चौकटीत राहणंच स्वीकारतात. माणसाचं अंतर्मन हे अनेकविध तृष्णांचं कोठार असल्याने चौकट दिली नाही तर अराजक माजेल अशी भीती असते आणि ती अनाठायी नाही. हीच भीती स्त्री-पुरुष आकर्षणालाही लावली जाते आणि या आकर्षणावर बंधनं येतात. ‘पॉलिअ‍ॅमरी’सारखी संकल्पना या आकर्षणाला, ओढीला नैसर्गिक व रास्त मानते आणि या ऊर्मीना वाट द्यायचा प्रयत्न करते. परंतु हे समजण्यासाठी ‘प्रेम’ या संकल्पनेचा विस्तार समजणं आवश्यक आहे. हा नाजूक मुद्दा आहे. कारण ‘प्रेम’ (एका वेळी तरी) एकाच व्यक्तीवर होऊ  शकतं, हा जवळजवळ सर्वमान्य सिद्धांत आहे. याचा एक खुलासा असा केला जातो की, प्रेमभावना ही अतिशय तरल, मनोविश्व व्यापणारी, सखोल भावना असल्याने ती एका वेळी एकाच व्यक्तीच्या बाबत अनुभवता येऊ  शकते. विशेषत: नात्याच्या आरंभीच्या काळात हे प्रकर्षांने जाणवतं. लैंगिक इच्छा प्रेमभावनेहून स्वतंत्र असली तरी एका व्यक्तीवरील प्रेमाची विस्तारित अभिव्यक्ती, मानसिक ओढीचं शारीरिक जोडलेपणात परावर्तित होणं अशा स्वरूपात लैंगिक संबंधाचं वर्णन केलं जातं. अर्थात कामेच्छा तिच्या स्वयंभू, प्रेमविरहित रूपातही अस्तित्वात असतेच. पण निव्वळ कामेच्छेला निव्वळ प्रेमाइतकी मूल्यात्मक मान्यता नाही. मुळात कामेच्छा ही ‘वाईट प्रवृत्ती’ या सदरातच ढकलली जाते. किमान आपल्याकडे तरी. (वास्तविक ‘प्रेम’ या भावनेचा ‘ट्रिगर पॉइंट’ शारीर आकर्षण आहे. विशेषत: स्त्री आणि पुरुषामध्ये जे जे काही असतं त्याचं मूळ लैंगिकतेत आहे अशीही एक मांडणी आहे. यात लैंगिकता केवळ शरीरसंबंध या अर्थाने येत नाही, तर ‘दोन व्यक्तींमधला निसर्गदत्त जैविक ताण’ या अर्थी येते.) तर मग ‘हे प्रेम एकाहून अधिक व्यक्तींबाबत शक्य होईलच कसं?’ हा प्रश्न येतो. इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की, हा प्रश्न अनुभूतीचा आहे. एखादी अनुभूती आपल्याला येत नाही म्हणजे ती अस्तित्वातच नसते असं नाही. यासाठी समलिंगी संबंधांचा दाखला देता येईल. समलिंगी संबंधांना आज इतरांकडून हळूहळू मान्यता मिळते आहे. अमेरिकेत समलिंगी लोकांना लग्नाची कायदेशीर संमतीही देण्यात आली आहे. समलिंगी संबंध ही नक्की काय अनुभूती आहे, हे माझ्यासारख्या हेटेरोसेक्शुअल लोकांना कळणार नाही. पण म्हणून मी या अनुभूतीला मोडीत काढू शकत नाही. मी या अनुभूतीचा धिक्कार करणं योग्य होणार नाही. त्यामुळे काही लोक जसे समलिंगी असतात किंवा काही लोक जसे डावखुरे असतात, तसेच एकाच वेळी दोन माणसांवर प्रेम करणारे काही ‘पॉलिअ‍ॅमरस’ लोक असतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी प्रेम ही एक गंभीर अनुभूती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रेमाकडे बऱ्याचदा थिल्लरपणा म्हणून पाहिलं जातं. वास्तविक प्रेम हा माणसाच्या भावनिक-लैंगिक आकांक्षांचा एक नैसर्गिक परिपाक आहे. आणि त्याला वाट करून देणं आवश्यक आहे. त्याचं नियमन करणं अगदीच गरजेचं आहे. कारण आपण आपल्या सर्वच इच्छा-आकांक्षांना एका ‘चॅनेल’मधून पुढे न्यायचा प्रयत्न करत असतो. ‘आत्ता मला हे हवं आहे आणि हे मिळालंच पाहिजे’ या वृत्तीचं समर्थन होऊ शकत नाही. परंतु प्रेमभावनेचं पूर्णपणे दमन करणं मात्र क्रूरपणाचं आहे.

भारतीय विचारामध्ये ‘स्वधर्म’ ही एक संकल्पना आहे. मे. पुं. रेगे यांनी त्यांच्या ‘व्यक्तिवादाचा उदय’ या लेखात या संकल्पनेच्या संदर्भाने म्हटलं आहे- ‘व्यक्तीच्या सामाजिक नात्यांना अनुसरून स्वधर्म अनेक रूपे धारण करतो. उदा. पतिधर्म, पुत्रधर्म, राजधर्म, इत्यादी. स्वधर्म निश्चित असतो. त्याच्या अनेक विशिष्ट रूपांत – उदा. पतिधर्म आणि राजधर्म यांच्यात- संघर्ष येऊ  शकेल किंवा संघर्ष आल्याचा भास होईल. तेव्हा विशिष्ट प्रसंगी स्वधर्माला अनुसरून आपले कर्तव्य काय आहे, हे ओळखणे कठीण असते. कर्म काय आणि अकर्म काय, याविषयी शहाणे लोकही गोंधळात सापडतील. पण ‘कर्म काय आहे’ याचे उत्तर सापडणे कठीण असले तरी त्याचे वस्तुनिष्ठ असे उत्तर असेल. आपले कर्तव्य काय, हे व्यक्तीने ‘ठरवायचे’ नसते, तर या प्रश्नाचे पूर्वनिश्चित उत्तर तिने ‘शोधून’ काढायचे असते. उत्तराला अनुसरून व्यक्तीने आचरण केले तर तिचे कल्याण होते. नाही तर तिला पाप लागते, तिचे अकल्याण होते. एवढेच कृतीपुरते स्वातंत्र्य व्यक्तीला असते. पण स्वधर्म काय आहे, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य तिला नसते.’

व्यक्तीला आपलं कर्तव्य ‘ठरवता’ येत नाही, तिला पूर्वनिश्चित उत्तर ‘शोधून’ काढावं लागतं, यात मेख आहे. बहुविध नातेसंबंधांमध्ये या गृहीत तत्त्वाला आव्हान दिलं जातं. कारण इथे पती-पत्नी-आई-वडील म्हणून करायच्या कर्तव्यांवर प्रश्न केले जात नसले तरी ‘माझं स्वत:प्रतिदेखील काही कर्तव्य आहे आणि मी त्याला न्याय देईन’ हा विचार प्रबळ आहे. आजच्या वर्तमानात बहुविध नातेसंबंधांबाबतची सर्वात मोठी अडचण ही आहे की, समाज म्हणून आपण अशा नातेसंबंधांना तयार नाही. प्रेम एकाच व्यक्तीवर असू शकतं, दुसऱ्याशी जे असतं ते ‘लफडं’ असतं, ही धारणा घट्ट आहे. प्रेमाकडे पहाण्याची आपली दृष्टीच मुळात स्वच्छ नाही. आपण प्रेम सहजतेने घेत नाही. ओझं म्हणून घेतो. त्यामुळे ज्या मोजक्या लोकांना दोन व्यक्तींबाबत ‘प्रेम’ वाटतं तेदेखील प्रस्थापित धारणेच्या दबावाखाली असतात. ‘स्वत:प्रतिचं कर्तव्य ठरवायचा’ प्रयत्न ते करतात, पण प्रस्थापित नीतीने निर्माण केलेल्या पेचातून त्यांचीही सहज सुटका होत नाही.

‘माझ्या लग्नाच्या जोडीदाराचा मला कंटाळा आलाय, अगदी नाइलाज म्हणून आम्ही एकत्र राहतोय’ अशा अवस्थेत अन्य कुणी आवडणं याला ‘पॉलिअ‍ॅमरी’ म्हणता येणार नाही. कारण यात एक नातं मुळात ‘रेटलं जातंय.’ तिथे प्रेम उरलेलंच नाही. ‘पॉलिअ‍ॅमरी’मध्ये एकाहून अधिक व्यक्तींवर ‘समान प्रेम’ अपेक्षित आहे. हा मुद्दा अधिक स्पष्ट करायला हवा. प्रेम ही अनुभूती वाहती असल्याने तिचं एकच सार्वत्रिक ठोकळेबाज स्वरूप असत नाही. दोन व्यक्तींबद्दलच्या प्रेमाच्या जातकुळीत सूक्ष्म भेद असू शकतात. यात प्राधान्यक्रमही असू शकतो. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या नातेसंबंधात असणारे अतिशय प्रगल्भ असावे लागतात. प्रेमाच्या पारंपरिक व्याख्येपासून, पारंपरिक अनुभूतीपासून वेगळं होऊन एका नव्या, अधिक समावेशक, प्रेम आणि लैंगिकतेतल्या ‘अहम्’ला बाजूला काढू शकणाऱ्या अनुभूतीपर्यंत ज्यांना जाता येईल तेच अशा व्यवस्थेत राहू शकतात. हे अवघड आहे. आणि आज तरी आपण समाज म्हणून या व्यवस्थेसाठी तयार नाही, हे नोंदवणं आवश्यक आहे.

लग्नसंबंधामध्ये जशा अडचणी असतात तशाच अडचणी बहुविध नातेसंबंधातही येऊ  शकतात. या व्यवस्थेतही माणूस अखेर माणूसच असतो आणि त्याचे अंगभूत गुणधर्म या व्यवस्थेलाही यशस्वी किंवा अयशस्वी करू शकतात. पण लग्नव्यवस्थेत जो एक मूळ ‘व्यवस्थे’चा म्हणून दोष आहे, तो या व्यवस्थेत नाही. एका माणसाने त्याच्या सर्व इच्छा एकाच माणसाकडून आयुष्यभर पूर्ण करून घ्याव्यात, हे मुळातच विवादास्पद आहे. ‘पॉलिअ‍ॅमरी’मध्ये ही सक्ती नाही. इथे ‘भावनिक साक्षरता’ (इमोशनल लिटरसी) मोठय़ा प्रमाणात वाढणं अभिप्रेत आहे. व्यक्तिस्वातंत्र्य विस्तारणं (प्रामाणिकपणा, नात्यांमधली पारदर्शकता, जिव्हाळा, एकमेकांना समजून घेणं- या मूलभूत तत्त्वांना न डावलता) अभिप्रेत आहे. त्याअर्थी ही व्यवस्था लग्नाहून प्रगल्भ आहे. परंतु लग्नाला पर्याय म्हणून ही व्यवस्था लगेच उभी राहू शकते असं नाही, हे अधोरेखित करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल, मनोविकासाचे बरेच टप्पे गाठावे लागतील. आपली आजची स्थिती अशी आहे की, तंत्रज्ञान, राहणी, अभिव्यक्ती यांत अचाट बदल झाले असले तरी आपला मेंदू अजूनही ‘मन इन्स्टिंक्ट’चा गुलाम असल्यासारखा आहे. आणि त्या, त्या समाजाचे प्रस्थापित नीतिनियम हेदेखील त्याच्या इन्स्टिंक्टचा भाग बनले आहेत. (उदा. अत्याधुनिक यंत्राचं डिझाइन करणारा एखादा बुद्धिमान तंत्रज्ञ आपल्या बायकोला कुणी अन्य पुरुष आवडतो आहे, हे सत्य सहज स्वीकारू शकेल का? किंवा एखादी आधुनिक आई आपला मुलगा समलिंगी आहे, हे वास्तव सहज स्वीकारू शकेल का? ‘सहज’ हा शब्द महत्त्वाचा आहे आणि सर्वसाधारण निरीक्षण अभिप्रेत आहे. अपवाद अर्थातच असतील.) तंत्राचा प्रदेश विस्तारला, पण जाणिवेचा प्रदेश तितकासा विस्तारला नाही. कदाचित माणसाने निर्माण केलेली सामाजिकता इतकी मजबूत आहे, की स्व आणि सामाजिकता या द्वंद्वात तीच कायम वरचढ ठरते आणि नेमकं हेच जाणिवेचा प्रदेश विस्तारण्याच्या आड येत असावं. आधी म्हटलं तसं जाणिवेचं जडवादी स्पष्टीकरण देता येत असेल तर जाणीव म्हणावी इतकी प्रवाही न होण्याचंही जडवादी स्पष्टीकरण देता येऊ  शकेल. माणूस आधी होता त्यापेक्षा कमी हिंसक (शारीरिक हिंसेबाबत) झाला आहे. (तुलनात्मकदृष्टय़ा बघा. वर्तमानातही हिंसा आहे, पण माणसाचं माणसाविषयीचं क्रौर्य तरी काही अंशी कमी झालं आहे.) पण इतर बाबतीत तसे म्हणता येईल का, याची शंका वाटते. द्वेष, मत्सर, असुरक्षितता, टोळी मानसिकता या प्रवृत्ती लाखभर वर्षांपूर्वी निर्माण होत होत्या, त्याच आजही निर्माण होतात. याला कारण चिरेबंदी सामाजिक-आर्थिक-लैंगिक बांधणी हेच असेल का, यावर विचार करायला हवा. ज्या जाणिवांच्या मुळाशी निखळ लैंगिकता आहे त्यांचं स्पष्टीकरण लैंगिक पुनरुत्पादनाच्या ‘उत्क्रान्तिजन्य जबाबदारी’च्या आधारे देता येऊ  शकेल. पण इतर मानवी इच्छा-आकांक्षा, भावना-संवेदना यांचा जो मोठा पट आहे तो अजूनही का बदलत नाही, यावर विचार व्हायला हवा. ‘पॉलिअ‍ॅमरी’सारखी संकल्पना प्रेमभावनेच्या बाबतीत हा पट विस्तारायचा प्रयत्न करते. प्रेमातील पझेसिव्हनेस, मत्सर या भावनांना बाजूला सारायचा प्रयत्न करते.  समाजाची घडी चालावी म्हणून कायदेशीर मान्यता असलेल्या लग्नव्यवस्थेअंतर्गत किंवा या व्यवस्थेच्या बाहेर स्वतंत्रपणे ही व्यवस्था कार्य करू शकते. ही अखेरीस माणसांची व्यवस्था असल्याने यात परस्परसंबंध, मुले, पालकत्व असे अनेक मुद्दे गुंतलेले आहेत. ही व्यक्तिसापेक्ष व्यवस्था आहे.  आणि एका लेखातून या व्यवस्थेचे सगळेच कंगोरे दाखवणं शक्य नाही.  त्याविषयी सविस्तर आणि सतत चर्चा करावी लागेल कारण ही व्यवस्था आपल्या प्रस्थापित मानसिकतेत बदल करू पाहते. पण लेखाच्या समारोपात या व्यवस्थेची काही मूलभूत लक्षणे सार रुपात पाहूया-
  • पॉलिअ‍ॅमरी’ ही माणसांच्या एकाहून अधिक गंभीर स्वरूपाच्या नात्यांची व्यवस्था आहे.
  • प्रेम एकाच व्यक्तीला देता येतं आणि तिथेच ते संपतं’ या प्रस्थापित धारणेला ही व्यवस्था आव्हान देते. प्रेम अमर्याद आहे आणि एका व्यक्तीवर तुम्ही ज्या तीव्रतेने प्रेम करता त्याच तीव्रतेने दुसऱ्या व्यक्तीवरही करू शकता, तुम्ही तुमचं ‘पूर्ण हृदय’ एकाहून अधिक व्यक्तींना देऊ शकता असं ही संकल्पना मांडते. या व्यवस्थेत प्रेम, प्रेमाच्या विविध छटा गांभीर्याने समजून घेणं अभिप्रेत आहे.
  • सामावून घेणं’ हे या व्यवस्थेचं प्रमुख लक्षण आहे. थोडक्यात सांगायचं तर ‘पती, पत्नी और वो’मधला ‘वो’ या व्यवस्थेत त्रासदायक ठरत नाही. त्याला/ तिला सामावून घेतलं जातं. ही ‘तीन लोकांची आनंदी व्यवस्था’ असणं अपेक्षित आहे.
  • या व्यवस्थेत ‘वन नाइट स्टँड’ चा समावेश होत नाही. केवळ लैंगिक आकर्षण व लैंगिक संबंधांची इच्छा म्हणजे पॉलीअ‍ॅमरी नव्हे. पण पॉलीअ‍ॅमरीमध्ये लैंगिक संबंध वर्ज्य नाहीत. याबाबत संबंधित स्त्री-पुरुषांना ‘लैंगिक शेअिरग’साठी तयार असावं लागतं. आणि ते आव्हानात्मक असू शकतं. विशेषत: पुरुषांसाठी (आधी म्हटल्याप्रमाणे लंगिकतेबाबतच्या स्त्री व पुरुष विशिष्ट जाणिवा उत्क्रान्तीजन्य आहेत आणि त्या उत्क्रांतीच्या अभ्यासाच्या आधारेच समजून घेता येतील व त्यावर कामही करता येऊ शकेल.)
  • सर्व संबंधित व्यक्ती एकाच छताखाली एकत्र राहिल्यास ही व्यवस्था प्रभावीपणे काम करू शकते.
  • प्रेम जर एकाहून अधिक व्यक्तींवर असू शकतं, मग ते दहा किंवा पन्नास जणांवर असू शकतं का? हा प्रश्न रास्त आहे. तत्त्वत: ‘असं असू शकतं’ हे मान्य करावं लागेल. पण आजचे सर्व वैयक्तिक व सामाजिक घटक, आपल्या मर्यादा लक्षात घेता व प्रेमभावना प्रतिसाद अपेक्षिते, हे लक्षात घेता आजच्या मानवाला दोन नात्यांमध्ये स्वत:ला विभागणं शक्य आहे. असं प्रस्तुत लेखकाला वाटतं. आजच्या मानवाची भावनिक, शारीरिक ऊर्जा त्याहून जास्त नाही.
  • ही व्यवस्था एकाहून अधिक व्यक्तींना कुटुंबाच्या कक्षेत घेणारी असल्याने मुलांचं पालकत्व ‘दोन आया’ किंवा ‘दोन बाबां’कडे जाऊ शकतं. जैविक पालकांची प्राथमिक जबाबदारी व इतरजण ‘विस्तारित पालक’ होऊ  शकतात.
  • विवेक आणि तारतम्य हा कोणत्याही व्यवस्थेचा गाभा असतो. ‘विशिष्ट परिस्थितीत काय केलं तर ते योग्य होईल, हे संबंधित व्यक्तींनी समजुतीने ठरवणं म्हणजे विवेकाने वागणं’ असं म्हणता येईल. या व्यवस्थेतदेखील प्रत्येक टप्प्यावर हेच अपेक्षित आहे.
  • ही व्यवस्था फक्त सुखवस्तू समाजापुरती मर्यादित आहे का? याचं उत्तर ‘हो’ असं द्यावं लागेल. याबाबत संख्याशास्त्रीय अभ्यास करता येईल. पण ज्याप्रमाणे माणसाच्या भौतिक आकांक्षा तीव्र असल्या तरी त्या आर्थिक पाठबळाशिवाय प्रत्यक्षात येत नाहीत, तसंच भावनिक आकांक्षादेखील वर्गीय (आपल्याकडे वर्गीय व जातीय) मर्यादांमुळे घडतात/ बिघडतात, हे क्लेशदायक वास्तव आहे. या व्यवस्थेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्यांमध्ये एका वेगळ्या प्रतीची प्रगल्भता असेल तरच या व्यवस्थेच्या यशाची शक्यता वाढते.
  • पॉलिअ‍ॅमरी’मध्ये ‘भावनिक साक्षरता’ (इमोशनल लिटरसी) मोठय़ा प्रमाणात वाढणं अभिप्रेत आहे. व्यक्तिस्वातंत्र्य विस्तारणं (प्रामाणिकपणा, नात्यांमधली पारदर्शकता, जिव्हाळा, एकमेकांना समजून घेणं- या मूलभूत तत्त्वांना न डावलता) अभिप्रेत आहे. त्याअर्थी ही व्यवस्था लग्नाहून प्रगल्भ आहे. परंतु लग्नाला पर्याय म्हणून ही व्यवस्था लगेच उभी राहू शकते असं नाही, हे अधोरेखित करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल, मनोविकासाचे बरेच टप्पे गाठावे लागतील.
(पॉलिअ‍ॅमरीबाबत इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहे. वाचकांनी ती अवश्य बघावी. morethantwo.com ही वेबसाइट पाहावी. पॉलिअ‍ॅमरीबाबतच्या अनेक प्रश्नांची उत्तरं या वेबसाइटवर मिळतील. यूटय़ूबवर काही फिल्म्स उपलब्ध आहेत, त्या बघाव्यात. १) Hidden Lives : Three in a bed २) 3 in a bed (ही बंगाली फिल्म आहे.)   फिल्म्सच्या शीर्षकात ‘बेड’हा शब्द असला तरी या फिल्म्स केवळ लैंगिक संबंधांबद्दल बोलत नाहीत. हा लेख लिहिण्यासाठी मला प्राजक्ता कोलते या मत्रिणीशी झालेल्या चर्चाचा पुष्कळ उपयोग झाला. या विषयावरील फिल्म्स, वेबसाईटची माहितीही तिनेच दिली आहे. प्राजक्ताचे आभार.)

(लोकसत्ता 'चतुरंग' ४ नोव्हेंबर २०१७ )

Monday, October 16, 2017

फेसबुकचं 'नेचर आणि नर्चर' 

'द सोशल नेटवर्क' हा डेव्हिड फिंचर दिग्दर्शित चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. हा चित्रपट फेसबुकची जन्मकथा सांगतो. मार्क झकरबर्ग हार्वर्डमध्ये शिकत असताना, वयाच्या वीस-बाविसाव्या वर्षी त्याने फेसबुक जन्माला घातलं. आधी त्याने फेसमॅश नावाची एक वेबसाईट तयार केली होती ज्यात दोन तरुणींच्या फोटोंची तुलना करून 'हॉट ऑर नॉट हॉट' हा गेम खेळता येई. कॉपीराईटचा मुद्दा आणि व्यक्तिगत प्रायव्हसीचा भंग या कारणांमुळे हार्वर्डने ही वेबसाईट बंद केली. यादरम्यान कॅमेरॉन विंकलवॉस, टायलर विंकलवॉस आणि दिव्य नरेंद्र यांनी 'हार्वर्ड कनेक्शन' नावाची वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी झकरबर्गला आमंत्रित केलं. परंतु हार्वर्ड कनेक्शनवर काम करण्याआधीच झकरबर्गने एदुआर्द सॅव्हेरीन या मित्राच्या मदतीने 'द फेसबुक' या वेबसाईटची निर्मिती केली. 'द फेसबुक' (आणि पुढे 'नॅपस्टर'चा सहसंस्थापक शॉन पार्करने सुचवल्यावरून फक्त 'फेसबुक') लोकप्रिय होऊ लागल्यावर झकरबर्गने आपली कल्पना चोरली म्हणून कॅमेरॉन विंकलवॉस, टायलर विंकलवॉस आणि दिव्य नरेंद्र यांनी त्याच्यावर खटला भरला. हा खटला चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे.

चित्रपटात एक प्रसंग आहे. मार्क झकरबर्ग त्याच्या वर्गात बसलाय. एक मित्र त्याच्याजवळ येतो. अमुक एक मुलगी सध्या सिंगल आहे का असं त्याला विचारतो. झकरबर्ग वैतागून 'माहीत नाही' म्हणतो. पण त्याच क्षणी त्याच्या मनात काहीतरी चमकतं आणि तो धावत आपल्या रूममध्ये येतो. लॅपटॉप उघडतो आणि 'द फेसबुक' वर नवीन फीचर अ‍ॅड करतो - रिलेशनशिप स्टेटस. फेसबुकवरची फीचर्स कशी तयार झाली असतील याची एक झलक या प्रसंगातून मिळते. आणखी एक प्रसंग सांगतो. हा चित्रपटाच्या अगदी सुरुवातीला आहे. मार्क झकरबर्गचं आणि त्याची गर्लफ्रेंड एरिका ऑलब्राईट यांचं ब्रेक-अप होतं आणि झकरबर्ग विमनस्क अवस्थेत त्याच्या रूमवर येऊन तिच्याबद्दल ब्लॉगवर अवमानकारक मजकूर पोस्ट करतो. (यानंतरच तो 'फेसमॅश'ला सुरूवात करतो.)

या चित्रपटाचा आणि प्रसंगांचा संदर्भ द्यायचं कारण हे की फेसबुकच्या स्वरूपाबद्दल हे प्रसंग काही बोलतात. दुसरं म्हणजे मी गेली काही वर्षं हे जे व्यासपीठ लिहिण्यासाठी वापरतो आहे त्याबद्दल थोडं लिहावं असं वाटतंय आणि ते लिहिताना या व्यासपीठाच 'नेचर' काय आहे आणि आपण 'नर्चर' करून ते बदलू शकतो आहोत का हेही तपासावंसं वाटतंय.

कविता लिहिण्यापासून सुरुवात करुन इतर लेखन (काही तर फक्त फेसबुकसाठी) करेपर्यंत जो अनेकांचा प्रवास झाला तोच माझाही झाला. यात जे मित्र-मैत्रिणी भेटले, माहिती मिळाली, चांगलं लेखन वाचायला मिळालं ते या प्लॅटफॉर्मचं मोठं देणं आहे. ही एक फार मोठी सकारात्मक गोष्ट नोंदवून पुढे जाऊ.

फेसबुक, ट्विटर किंवा इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स हा एक 'मानसशास्त्रीय आविष्कार' आहे असं मला वाटतं. माणसामधील अंतःस्थ भावनांना, विशेषतः विकारांना हात घालायची ताकद या माध्यमाच्या रचनेत आहे. फेसबुक निर्माण होताना मार्क झकरबर्गच्या मनात 'ऑफलाईन सोशल एक्सपीरियन्स ऑनलाईन आणणे' ही कल्पना होती. परंतु या ऑनलाईन एक्सपीरियन्समध्ये काही कळीचे फरक पडलेले दिसतात आणि त्याचा संबंध माणसं समोरासमोर बोलत नसल्याशी आहे. आज एखाद्या मुद्द्यावरून फेसबुकवर एकमेकांशी भांडणारे लोक किंवा शिवराळ भाषेतून व्यक्त होणारे लोक समोरासमोर आले तर ते तसं बोलतील का? भाजप समर्थक-विरोधक, आस्तिक-नास्तिक, डावे-उजवे, धर्म-विज्ञान, सवर्ण-दलित, खरा स्त्रीवाद-खोटा स्त्रीवाद अशा सगळ्या उदाहरणात हे दिसतं की माणसं समोरासमोर बोलत नसल्याने हे वाद टोकाला जातात, माणसं आपलं संतुलन हरवतात. हे होतं कारण संतुलन हरवण्याची मुभा इथे पटकन मिळते. माणूस समोर नाही आणि तो समोर यायची शक्यताही नाही हे समजलं की एक प्रकारची सुरक्षितता येते आणि माणूस तीव्रतेने बोलू लागतो. माणसं समोरासमोरदेखील भांडू शकतातच, पण आपल्यासमोर एक माणूस बसला आहे आणि बोलतो आहे हे पाहिल्यावर आपल्यातला तारतम्य बाळगणारा माणूस अधिक जागा राहतो. यात रूढ शिष्टाचारांचाही भाग आहेच. आणि तो ठीकच आहे. शिष्टाचार तोंडदेखले असतात हे खरं, पण ते शांततामय सहअस्तित्वासाठी आवश्यकही असतात. प्रत्यक्ष भेटीचा आणखी एक फायदा असा की दुसऱ्या भेटीच्या, माणूस अधिक कळण्याच्या शक्यता निर्माण होतात. हे ऑनलाईन भेटींमध्ये फारसं होत नाही.

मुळात वादविवादात काहीच गैर नाही. पण वाद कसा घालावा याची पद्धत मात्र गैर असू शकते. योग्य वादपद्धतीसाठी स्वतःला तयार करावं लागतं, थोडी मेहनत घ्यावी लागते. अहंकार नष्ट करणं शक्य नसलं तरी अहंकारावर नियंत्रण ठेवावं लागतं. आपण अपूर्ण आहोत, आपण चुकू शकतो हे लक्षात ठेवावं लागतं. आपलं वर्तन / विचार समीक्षेसाठी खुले ठेवावे लागतात. माणूस या प्राण्याविषयी आस्था, करुणा असावी लागते. माणसाचं मन, त्यातील तर्क प्रक्रिया हे अभ्यासण्याजोगं आहे, रोचक आहे. माणसाच्या आत एक डोह आहे जो निरखण्याजोगा आहे. ऑनलाईन जगात हे जमणं फार अवघड आहे. इथे माणसाच्या व्हर्च्युअल अतिदर्शनामुळे ही 'निरखण्याची स्पेस'च नाहीशी होतेय की काय अशी शंका येते. माणूस ऑफलाईन असताना जितका मोकळा होतो तितका तो ऑनलाईन असताना होतो का? (जे साधारण चित्र दिसतं त्यात त्याच्यातली नकारात्मकता मोकळी होताना दिसते.) एक तर तो स्वतःचा अजेंडा घेऊन वावरत असतो. फेसबुकसारखा प्लॅटफॉर्म हा प्रतिमानिर्मिती, मत-प्रतिक्रिया, वैचारिक शेअरिंग, निव्वळ गंमत, 'अनावर अभिव्यक्ती' अशा कारणांसाठी वापरला जातो. पण या गोष्टी या प्लॅटफॉर्मवरच फक्त घडत असल्याने माणसाला बांधतात जास्त, मोकळं कमी सोडतात. (ब्लॉग हे माध्यम मात्र मला स्वतःला या बाबतीत चांगलं वाटतं. कारण ब्लॉग मुळात सविस्तर लिहिण्यासाठी डिझाइन केलेला प्रकार आहे.)

जानेवारी २०१२ पासून मी हे माध्यम वापरायला सुरुवात केली. माध्यमावर 'होल्ड' येऊ लागल्यावर लिहिणं वाढत गेलं. आधी मी हिंदुत्ववादाबद्दल, धार्मिक विचारसरणीबद्दल टीकात्मक लिहायचो. तिरकसपणे लिहायचो. पण जेव्हा असं लक्षात येऊ लागलं की या विचारसरणीचे बरेच लोक इथे आहेत तेव्हा मला वाटू लागलं की प्रतिक्रियात्मक न लिहिता विश्लेषणात्मक लिहायला हवं. कारण माझ्या अवतीभवती माणसं आहेत आणि ती मला ऐकतायत. जेव्हा त्यांना हे कळेल मी माझं काहीएक विश्लेषण आहे तेव्हा ते माझं उपहासात्मक लिहिणंही समजून घेऊ शकतील. माझ्या म्हणण्याला, विरोधी भूमिकेला बैठक मिळेल. अन्यथा माझी एक पोस्ट-त्यावर तुझी एक पोस्ट, माझी एक कमेंट-त्यावर तुझी एक कमेंट एवढंच सुरु राहील. आपण इथे 'स्क्रीनशॉट-स्क्रीनशॉट' खेळायचं नाही हे मी ठरवलं होतं. किंबहुना तसा विचारही कधी मनात आला नाही. कधीकधी काही कमेंट्सवर शांत राहणं अवघड गेलं, पण जमलं. फेसबुकवरचा गलका वाढल्यावर जाणवू लागलं की हे प्रकरण हाताबाहेर जाऊ शकतं. आपल्याला लिहायचं वगैरे असलं आणि त्यासाठी हे माध्यम एका बाजूने अनुकूल असलं तरी दुसऱ्या बाजूने धोकादायकही आहे. कारण गर्दीचा, गलक्याचा परिणाम तुमच्या इच्छेची वाट न बघता तुमच्यावर होतो. या माध्यमाच्या रचनेतील अंगभूत मर्यादा आपल्यामध्येही हळूहळू येतील ही जाणीव काहीशी भीतीदायक होती. त्यामुळे जाणीवपूर्वक अंतर राखणं सुरु केलं.

वर उल्लेख केलेले जे विशिष्ट वाद आहेत त्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकेल पण त्यातला समान धागा विविध सामाजिक-आर्थिक-वैचारिक-भाषिक स्तरातील माणसं व्हर्च्युअली एकत्र येणं आणि आपल्या आजूबाजूला अशा विविध स्तरातील माणसं आहेत हे भान न राहणं हा आहे. पण मग गर्दी आहे म्हणून मी माझ्या मनातलं, विशेषतः संवेदनशील विषयांबाबतचं, बोलूच नये का? तर बोलावं, पण सतत न बोलता अधूनमधून, विस्ताराने, धक्कातंत्राचा आधार न घेता, स्वतःचंही मूल्यमापन करत बोलावं. आपण जर समीक्षाच करायला बसलो असू तर स्वतःला का वगळायचं? शिवाय आपण प्रेडिक्टेबल होतो आहोत का, धक्कातंत्रावर आपली हुकूमत असली तरी आपण धक्का देण्याकरताच लिहू लागलो आहोत का हेही जरूर तपासावं. एका विशिष्ट जागी गेल्यावर सगळ्यांच्याच भूमिका ठाम होत जातात. आणि मग त्या भूमिकेच्या रक्षणासाठी आपण आपल्या आतला आवाजदेखील दाबू लागतो. हे राजकारणात करावं लागतं. आपण हे करत असू तर ते राजकारण म्हणून करतो आहोत की आपल्याला करायचं नाहीये पण उघडपणे कबूल करायला अवघड वाटतं म्हणून करतो आहोत याची स्पष्टता स्वतःशी तरी असावीच. अलीकडे एकदा गप्पा मारताना मंदार काळे म्हणाला की आपण तोंड उघडलं की राजकारणीच होतो. आता या म्हणण्यात तथ्य आहे. त्यामुळे एखाद्या टोकाच्या भूमिकेसारखीच समन्वयाची भूमिकाही राजकारणी भूमिका आहे का? तर आहे. पण या राजकारणाचा उद्देश 'एलिमिनेशन' हा नाही. याचा उद्देश शांततामय सहअस्तित्व हा आहे. एक अंतःस्थ हेतू विरोधकाचं मतपरिवर्तन हाही आहे, पण ते विचारशील आणि म्हणून सक्षम परिवर्तन आहे.

कधीकधी असं होतं की रचना निर्दोष असते, पण माणसं दोषयुक्त असतात. कधीकधी रचनेतच दोष असतात. हे दोष माणसाच्या मूळच्या स्खलनशील स्वभावाला पूरक ठरतात. फेसबुकसारखं ,माध्यम दुसऱ्या वर्गात मोडणारं आहे. तरीही ते प्रभावी आणि उपयुक्त आहेच. मात्र सहअस्तित्व शांततामय असावं की द्वेषमय असावं हे अजून तरी आपल्या हातात आहे. वैचारिक विरोधासह एकोपा आणि सुसंवाद टिकवायचा असेल तर कदाचित फेसबुकच्या रचनेतही काही बदल होऊ शकतील, पण त्याबद्दल आज काही सांगता येणार नाही. त्यामुळे आपल्याला स्वतःमध्येच बदल करावा लागेल.

'द सोशल नेटवर्क' चित्रपटाचा शेवटही रोचक आहे. खटला संपल्यावर झकरबर्ग त्याच रूममध्ये बसलेला आहे. तो एरिका ऑलब्राईटला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो आणि तिच्या प्रतिसादाची वाट बघत पेज रिफ्रेश करत राहतो. फेसबुक कसं 'डिमांडिंग' होऊ शकतं याचा हा एक दाखला आहे. आणि जेव्हा एखादी गोष्ट 'अती डिमांडिंग'होते तेव्हा ती संथपणे राक्षसी होऊ लागली आहे का हा विचार डिमांड पुरवणाऱ्याने करावा लागतो. मार्क झकरबर्गने एक 'मॉन्स्टर' निर्माण केला आहे असं गमतीने म्हणता येईल पण ते गमतीतच स्वीकारणं मात्र धोक्याचं ठरेल!

(फेसबुक पोस्ट)  

Tuesday, October 10, 2017

पाटी कोरी करणाऱ्या कविता

माणसाचा  इतिहास असंख्य वळणं घेत घेत पुढे गेलेला आहे. या संपूर्ण प्रवासात काही वळणं अशी आहेत की त्यांचं विश्लेषण करताना मती कुंठित होते. भौतिक वा जैविक विज्ञानाशी संबंधित विषयांनाच नव्हे तर भौतिक-जैविक प्रेरणांचा परिपाक म्हणून उभ्या राहिलेल्या सामाजिक क्षेत्राला, व्यक्तींच्या परस्परसंबंधांनादेखील हे लागू होतं. याचं एक मुख्य कारण हेच की मनुष्य म्हणून आपण प्रचंड भौतिक प्रगती केलेली असली तरी आपल्यातला 'माणूस' हा आजदेखील आदिम भावनांचा गुलाम आहे. आपण अजूनही त्या अर्थाने 'प्रगत' नाही आणि कधीकधी तर लाज वाटावी इतके अप्रगत आहोत. 

पृथ्वीचा फोटो काढला चंद्रावरून 
तर खूप डाग दिसतील 
ते आम्ही नाहीत 
तुम्ही आहात!

चिन्नाक्का या वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रीने लिहिलेली ही छोटी कविता आहे. या ओळी वाचल्यावर मनात पहिल्यांदा समाधान आणि नंतर उद्वेग अशा भावना जाग्या झाल्या. चिन्नाक्काप्रमाणेच शांता, चंद्रिका, गुलाब आणि प्रेमला यांच्याही कविता आहेत. या कविता निराश करतात, स्वतःतल्या 'इंपोटंट इंटलेक्च्युअल'ची जाणीव नव्याने करून देतात आणि एक 'आवरणाखालचं समाधान' अशाकरता देतात की या स्त्रियांनी त्यांच्या वाटण्याला, त्यांच्या अनुभवांना अतिशय प्रभावीपणे मोकळी वाट करून दिली आहे. 

या कवितांमधला उदगार संमिश्र आहे. तो कधी आतून तुटलेपणाचा आहे, कधी बेगडी संस्कृतीच्या कानफटात मारणाऱ्या उद्रेकाचा आहे, कधी तटस्थपणाचा आहे, कधी समजुतीचा आहे. 'आम्ही कपडे पाहतो, तुम्ही कातडी पाहता. इतकाच फरक' या तीन ओळीत चिन्नाक्का तटस्थपणे जे बोलते ती नुसती कविता नसून सामाजिक-आर्थिंक भाष्य आहे. चंद्रिकाच्या 'आधी प्रेत म्हणून जन्मायचं' या कवितेतील आक्रोश पुरूषांना सुन्न करणारा आहे. पण हीच कवयित्री पुढच्या एका कवितेत 'त्यांच्याकडे थोडे पैसे असतात आणि एक उपाशी लिंग असतंय, मनात फक्त नाईलाज असतोय' असं म्हणते आणि कवितेचा शेवट 'ते आलेच नसते आमच्याकडे पैसे, लिंग आणि नाईलाज घेऊन तर आम्हीही इथं दिसलो नसतो' असं लिहून करते तेव्हा पुरूषाविषयीची तिची करूणा दिसते. चंद्रिकाच्या कविता लक्षवेधी वाटतात ते या कवितांमधल्या विचार-भावनांच्या जिवंतपणामुळे. त्यातली तीव्रता असह्य व्हाही इतकी जिवंत आहे. याखेरीज या कवितांच्या कवितापणाला वास्तवाच्या काहिलीबरोबर प्रतिभेची विलक्षण 'झळ' बसल्याचं जाणवतं. ही अशी खोलात बुडी मारणारी संवेदना आणि अशी टोकदार अभिव्यक्ती हिने कुठून आणली हा प्रश्न कविता वाचल्यावर सतावत राहतो.     

गुलाब या कवयित्रीची पहिलीच कविता समाजव्यवस्थात्मक झटका देणारी आहे. गटार साफ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला नाकारताना 'तुला तुझी बायको जवळ करत नाही, मग मला नाक नाहीये का?' असा प्रश्न विचारते तेव्हा ती एकमेकांत अडकलेल्या भीषण वास्तवाच्या तुकड्यांचं दर्शन घडवते. सर्वच कवयित्रींच्या कविता माणूस म्हणून, समाज म्हणून, सरकार म्हणून, प्रशासन म्हणून आपल्या सर्व व्यवस्थांच्या थोबाडीत मारणाऱ्या आहेतच, पण गुलाबची ही कविता वास्तवाचं वैचित्र्य जोरकसपणे अधोरेखित करत आपल्याला अधिकच विचारात पाडते. 'मांसाहारीच असतात शाकाहारी म्हणवणारेदेखील' असा शेवट असणाऱ्या तिच्या दुसऱ्या कवितेविषयी काही लिहावं इतकी शक्ती बहुधा कुठल्याच लेखक-समीक्षकात नसावी. ती माझ्यातही नाही.    

प्रेमलाच्या कविताही याच जातकुळीतल्या आहेत. 'तुला लाज नाही वाटत का?' असा प्रश्न एका 'सभ्य' स्त्रीने विचारल्यावर तिने कवितेततून जे उत्तर दिलंय त्याचं वाचन घराघरातून आणि जाहीर कार्यक्रमातून व्हावं इतकं समर्पक आणि आरसा दाखवणारं आहे. ही कविता वाचल्यावर मी कवयित्रीला 'स्टँडिंग ओव्हेशन' दिलं! पुढच्या एका कवितेतदेखील तिने पुरुषांचं लग्नबंधन आणि वेश्येशी असणारं 'लैंगिक बंधन' यांची तुलना करत अखेरीस पुरूष व वेश्या या संबंधातील वैय्यर्थावर नेमकेपणानं बोट ठेवलं आहे आणि ते अतिशय टोकदार, अस्वस्थ करणारं आहे. 

शांताने लिहिलेल्या 'म्हाताऱ्या लिलू'च्या कवितांमधून लिलूच्या लहानपणीच्या पुरूषी अत्याचाराच्या आठवणींबरोबरच एक आनंदी आठवणही आहे. वेश्यांनी लिहिलेल्या या कवितांमधून दिसणाऱ्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर ही एक कविता किंचित सुखावते. अर्थातच याचं एक सरळ कारण म्हणजे म्हाताऱ्या लिलूला लहानपणी काही आनंदाचे क्षण वाट्याला आले होते हे वाचून आपला अपराधभाव काहीही कारण नसताना कमी होतो हे आहे. 

खरं तर प्रत्येक कवितेवर स्वतंत्रपणेही काही लिहिता येईल. कवितेचे म्हणून काही निकष लावून त्यांची चर्चाही करता येईल. पण असं करावंसं वाटत नाही. कविता कुणीही लिहिलेल्या असोत, कवितेची चिकित्सा साहित्यकृती म्हणूनच व्हावी असंही कुणी म्हणतील. पण मला तसं नाही वाटत. साहित्यकृती हा जर माणसाचा उद्गार असेल तर तो त्या माणसासकट पाहता यायला हवा. या दृष्टीकोनाचे काही तोटेही आहेत. अशा दृष्टीकोनामुळे साहित्यकृतीच्या स्वतःच्या 'परिणामकारकतेवर परिणाम' होण्याची शक्यता आहे. पण मला असं वाटतं की दलित साहित्य लिहिलं जाऊ लागलं तेव्हा जसं त्या साहित्याची चिकित्सा करण्याचे वेगळे निकष प्रस्थापित साहित्यदृष्टीला निर्माण करावे लागले, तसंच वेश्यांच्या साहित्यकृतीसाठीही निकष लावावे लागतील. आणि हा खरं तर पुढचा विचार आहे. आत्ता या दहा-पंधरा कवितांमधून जे समोर आलं आहे, ते अस्वस्थ करणारं वास्तव दर्शन तर आहेच, पण कविता म्हणूनही ते अस्सल आहे, प्रभावी आहे. त्यामुळे कविता असण्याच्या पातळीवरच्या सगळ्याच शंका इथे निकालात निघाल्या आहेत. 

या कविता आपला अपराधभाव जागवणाऱ्या आहेत का? नक्कीच आहेत. समाज म्हणून आपल्या पराजयाच्या कहाण्या जिथे जिथे दिसतात त्यातलं एक ठसठशीत स्थान वेश्यावस्ती हे आहे. त्यामुळे या कविता बेतशुद्ध सुखी संसारात बेतशुद्ध अडचणी व बेतशुद्ध दुःख भोगणाऱ्या तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्यांना आणि लैंगिक व भावनिक भुकेची योग्य व्यवस्था लावण्यात अपयशी ठरलेल्या आपल्या समाजव्यवस्थेला झडझडून हलवतात हे तर खरंच आहे. पण या अपराधभावाच्या जोडीनेच वेश्यांच्या जगण्यातील असहायता आणि पुरूषांची लैंगिक असहायता स्थळकाळाचे, संस्कृतीचे जे विविध संदर्भ घेऊन उभी राहते ते अवाक करणारं आहे. या वेश्यांमधली ही लखलखती कवयित्री डोळे दिपवणारी आहे. मुळात वेश्या आधीच समाजातील सगळ्यांना अवघड जागेवर नेऊन उभं करणारी व्यक्ती आहे. या जागेवर सगळ्याच विचारप्रवाहांना एकमेकांच्या नग्नतेचा सामना करावा लागतो. त्यामुळे एकीकडे हे आहेच. दुसरीकडे त्यांच्या कवितांमधून उद्रेकाखेरीज ज्या विविध जाणिवा ज्या समजुतीने प्रकट झाल्या आहेत ते आपल्याला अधिकच लाजवणारं आहे. 

आणि नेमक्या याच कारणासाठी या कविता अधिकाधिक लोकांनी वाचायला हव्यात. त्यातून काय निष्पन्न होईल असाही प्रश्न येईल कदाचित. पण काही निष्पन्न होण्यासाठी नव्हे तर दृष्टीकोनाला वेगळं टोक येण्यासाठी, गुंतागुंत समजण्यासाठी, डोळ्यांवरचे संस्कृतीचे आणि शालीनतेचे भरजरी पडदे हटवण्यासाठी, लग्न नामक संस्थेचे सदस्य होण्यासाठी जी अनाकलनीय धावपळ चाललेली असते त्याचा पुनर्विचार करण्यासाठी, माणसाच्या - विशेषतः पुरूषाच्या नग्नतेची जाणीव होण्यासाठी, लैंगिकतेच्या विज्ञानाला अधिष्ठान मिळवून देण्यासाठी आणि त्यातून उत्तरांची शोधप्रक्रिया सुरू होण्यासाठी या कविता वाचाव्यात. 'अधिक चांगल्या' जगाची अपेक्षा सगळेचजण करतात. पण या जगाच्या निर्मितीचा विचार करताना, त्याचा पाया रचताना कोणत्या मूलभूत मुद्द्यांकडे लक्ष द्यायला हवं, लैंगिक संबंधांची व्यवस्था हा मूल्यव्यवस्थेचा भाग का असायला हवा हे लक्षात येण्यासाठी या कविता वाचाव्यात. 

या कविता वाचणं म्हणजे आपली पाटी कोरी करणं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांच्या शिक्षणाची लवकरात लवकर सुरूवात होवो ही सदिच्छा!

- कविता महाजन यांनी वेश्यांनी लिहिलेल्या काही कवितांचा अनुवाद केला होता. तो 'खेळ' या अनियतकालिकाच्या २०१७ सालच्या एका अंकात प्रकाशित झाला होता. त्याविषयीचा त्याच अंकातील हा लेख. कविता महाजन यांनी अनुवाद केलेल्या कविता खाली देत आहे.   

चिन्नाक्का

१.

आता तो
हस्तमैथुन करतानाही
धापा टाकतो
इतकं दुबळं बनलंय
त्याचं हृदय
प्रेमामुळे, तुझ्यामुळे
तू असं त्याच्या तोंडावर
दार आपटून
बंद करायला नको होतंस!
– त्याचा दोस्त म्हणवणारा
म्हणाला असं
आवाज कनवाळू करत
धंद्याच्या टायमाला
मग ब्ल्यू फिल्म पाहून तर
जोराचा हार्टअटक येवून
मरायलाच पाह्यजे होत्ता तो
आजपस्तोर निदान
बाराशे वेळा –
मी हासून म्हणाले
आणि विचारलं
बसणार आह्येस का तू
आसतील पैसे तर?
शेपूट आणि कनवाळूपणा
दोन्ही गांडीत घालून घेऊन
पळत सुटला
त्याचा दोस्त म्हणवणारा.

२.

आम्ही कपडे पाहतो
तुम्ही कातडी पाहता
इतकाच फरक

३.

पृथ्वीचा फोटो काढला चंद्रावरून
तर खूप डाग दिसतील
ते आम्ही नाहीत
तुम्ही आहात!

४.

खूप घाण साचली आहे
सगळं जग नरक झालंय
आणि सगळे जीव
निव्वळ किडे

शांता

१.

म्हातारी लिलू म्हणते
किती लिंगं बघितली मी आयुष्यात
जितकी नसतील या प्रुथ्वीवरती शिवलिंगं
मंदिरांमध्ये
धाकट्या भावाची इवलुशी नुन्नी
पाळण्यातून शूचं धनुष्य करणारी
आणि सावत्र बापाचा वरवंट्यासारखा बुल्ला
एकाच वयात मला माहीत झाला…
म्हातारी लिलू म्हणते…

२.

म्हातारी लिलू म्हणते
इथं मुलगी जन्मू नये, धंद्याला लावतात
इथं मुलगा जन्मू नये, दल्ला बनतो
इथं हिजडा जन्मू नये, भीकेला लावतो गुरू
पण आपलं कोणीतरी पाह्यजे ना दुनियेत
म्हणून हा कुत्रा पाळला…
म्हातारी लिलू म्हणते…

३.

म्हातारी लिलू म्हणते
पाट्यावर वाटलेल्या उडदाचे वडे
किती चवदार लागतात
आणि घरचा नारळ खवलून त्यात
परसातल्या मिरच्या खुडून घालायच्या
चटणी वाटायची दुधाळ
भरपूर कढीपत्ता घातलेली खमंग फोडणी
आजकाल नाकाला सगळे जुने वासच येतात
लहानपणीचे…
म्हातारी लिलू म्हणते…

चंद्रिका

१.

आधी प्रेत म्हणून जन्मायचं
कपाळावर लाल मळवट
देहावर हिरवी चिंधी पांघरून
सरणावर झोपायचं
वाट पाहायची पेटवण्याची
धाडधाड आग भडकेल
ताडकन फुटेल कवटी
वाट पाहायची

पण ओततच नाही कोणी रॉकेल
म्हणून डोळे उघडून पाह्यलं
तर वेगळंच सरण
लाकडांसारखे रचलेले खाली
पुरुष
दोन्ही बाजूंना पुरुष वरती पुरुष
मग जळण्याची रीत रद्द
मरण्याची रीत रद्द
तरीपण जगायचं
तरीपण जळायचं
धगधग आग धकधक दिल
खिसा कर उलटा
मी कुलटा तर कुलटा

प्रेताची भीती वाटली नाही
की जित्याचीही भीती
वाटत नाही

२.

त्यांच्याकडे थोडे पैसे असतात
आणि एक उपाशी लिंग असतंय
मनात फक्त नाईलाज असतोय
बाकी काही नसतंय
ना दया ना प्रेम ना आकर्षण ना माणुसकी

आमच्याचसाठी नसतंय असंही नाहीये
घरच्यांसाठी जरी असतं
तरी ते इथं दिसले नसते
आणि ते आलेच नसते आमच्याकडे
पैसे, लिंग आणि नाईलाज घेऊन
तर आम्हीही इथं दिसलो नसतो.

३.

काल चार गिर्हाईकं आलती
आज अजून एकावरच अडलंय
तो एक उतरला
समोर साईबाबाच्या फोटोला
झाकलं होतं पँट लटकावून
ती अडकवली पायांत
चेन वर खेचून साईबाबाला
पुन्हा नमस्कार केला
आल्यावर केलताच दचकून
पँटमधून साईबाबाला दिसत असंल काय?
मी विचारलं तर जास्तीच दचकला
शर्ट तर काढलाच नव्हता
तो नीट इन केला
पँटच्या खिशातल्या पाकिटातनं पैसे दिले
साईबाबाला पैशांनी काही दिसलं नसंल काय?

४.

आधी एकेका रात्रीत सात-आठ गिर्हाईकं यायची
सिझनला तर दहा-बारा
वर्षभरात कमी झाली
आता तीन-चार
सिझनला एखादं जास्ती
येतात चढतात उतरतात जातात
मी कधी कोणाचं नाव विचारत नाही
कोणी कधी माझं नावगावफळफूल विचारत नाही

गावात एका रात्रीत सोळा चढले होते
रांग लावून
मग इकडं विकलं मला सोळातल्या पहिल्यानं
अजूनही येतो कधी फुकट चढायला
मुद्दाम सांगतो गावातल्या बातम्या
घरातल्यासुद्धा

गावात आमच्यांची तीन घरं होती
त्यांच्यांची बावीस
दोन मोठे रस्ते अठरा गल्ल्या तीन दुकानं
एक शाळा
सत्तावीस नक्षत्रांची नावं घडाघडा सांगितली
तेव्हा सर म्हणाले होते शाब्बास
गणितात पहिली आलते सातवीला. 

५.

काही दिसत नाही
मला कोणाचा चेहरा दिसत नाही
कोणाला माझा चेहरा दिसत नाही

एक गेला की दुसरा येण्याआधी
मी टॉवेलनं मांड्या पुसते नुसती
ओल दिसत नाही तरी असतेच

काही आठवत नाही सकाळी
न दिसलेलं
पैसेही आता अम्मा दारातच घेते
आधीच

मग पडायचं असतं उलथं नुसतं
आता वासही येत नाहीत नाकाला
ना जिभेला चव

सकाळी कपडे घालावे लागतात
हागायला खोलीतून बाहेर जायचं म्हणून
साडीच्या टिकल्या चमकतात

डोळे दुखतात उजेडानं.

गुलाब

१.

बेंदाड भूत
लागली लूत
अत्तरमारीचा
उप्योग नाहीय्ये

गटार साफ करून आला तर
बायको घेत नाही उरावर
आणि मला काय
नाहीये नाक?

उलथ इथून
बेंदाड भूत

२.

तो खोटारडा म्हणालेला
की तो शाकाहारी आहे
त्यानं खाल्ले माझे ओठ चावून चावून
पिलं माझ्या डोळ्यांतलं रक्त
उठलं नाही त्याचं तर
अपयशानं संतापून
मारल्या बुक्क्या माझ्या मांड्यांमध्ये
खुपसली बोटं कचाकचा
टोचवली घाणेरडी नखं
म्हणाला, तो कधीच
वापरत नाही कण्डोम
बायकोनेही नऊ वेळा पोट पाडलंय
तिच्या भोकाचं भगदाड झालंय
म्हणून इथं येतो
तर काहीच जमत नाही इथल्या
घाणीत
कर प्रयत्न आणि आताही नाही उठलं
तर जीव घेईन तुझा!

मांसाहारीच असतात
शाकाहारी म्हणवणारे देखील.

प्रेमला

१.

मी कुसळय कुसळ… तुझ्या डोळ्यात घुसीन
मी मुसळय मुसळ… तुझा इगो ठेचीन
उखळाचा रोल करून करून
मी बोअर झालेय
जमिनीत गाडून घेऊन एकाचा कोपऱ्यात
मी बोअर झालेय

मी जाईन पळून कांडणारे हात घेऊन
कांडणाऱ्या हातांना सुद्धा आता
बोअर झालंय

सगळी मुसळं मसणात जाळा
कांडणारीचा देह काळानिळा
कोणी द्यावा कोणाला हात
आपल्याच साळी आहेत उखळा
गुपचूप व्हायचं दाढेखालचा भात

तरी म्हणायचं कांडताना गाणं
मी कुसळय कुसळ…

२.

गुपचूप गरोदर राहीन
उकंड्यावर बाळंत व्हईन
गंजक्या ब्लेडने कापीन नाळ
पोरगा जल्मला तर भडवा बनवीन
पोरगी जल्मली तर धंद्याला लावीन
पळून गेली पोरं वस्तीतून
बनली कोणी मोठी सायेब
तरी तुझं नाव लावणार नाहीत
तुला नसेल पत्ता तुला नसेल मालुमात
आणि तुझा वंश धंदा करेल गंदा
हीच तुझी सजा
मजा मारून विसरून गेल्याची

३.

तुला लाज नाही वाटत का? तिनं विचारलं
आणि झर्रकन मान फिरवली
आमच्यासारखी असती तर थुंकलीही असती
मी तिला नीट खालून वर बघितलं
मग वरून खाली बघितलं
बघितलं की लाजेनं बाईचं काय व्हतंय?

लाजत लाजत लग्न करायचं
लाजत लाजत कपडे घालायचे
लाजत लाजत कपडे काढायचे
लाजत लाजत पोट वाढवायचं
लाजत लाजत बाळंत व्हायचं
लाजत लाजत लेकराला पाजायचं
लाजत लेकीला लाजायला शिकवायचं
लाजत लाजत जेवायचं नवऱ्याच्या उष्ट्या ताटात
लाजत लाजत नोकरी करायची
लाजत लाजत सगळी कमाई घरात द्यायची
लाजत लाजत लपवायच्या खालेल्या शिव्या आणि मार
लाजत लाजत म्हातारं व्हायचं
लाजत लाजत दुखणं सोसायचं
लाजत लाजत मरून जायचं

मी म्हटलं तिला शेवटी
तुझा निर्लज्ज नवरा येतो माझ्याकडे
पण माझ्याऐवजी
त्याला विचारशील का जाब
की लाजशील अजून?

४.

मला सोडायचं तर कोर्टात
जावं नाही लागणार
मला सोडायचं तर पोटगी
द्यावी नाही लागणार
मला सोडायचं तर दु:ख नाही
मुलंबाळं दुरावल्याचं
मला सोडायचं तर अडणार नाही
घरसंसाराचा गाडा

मला सोडलं तर
वाचतील थोडे पैसे
खुश होईल लग्नाची बायको

फक्त मीच म्हणू शकते –
ना मी तुला धरलं होतं
ना तू मला धरलं होतं
मग सोडणार कोण कोणाला?
कोणाची सुटका होईल कोणापासून?
जाय जायचं तिकडं!


Sunday, August 27, 2017

व्यक्तिस्वातंत्र्य आणि 'सामाजिक करार'

व्यक्तिस्वातंत्र्य ही इतर संकल्पनांसारखीच रोचक संकल्पना आहे. सर्वच संकल्पना प्रवाही असतात, त्यांना आपण 'शब्दा'त बांधतो, पण 'सत्या'त बांधू शकतो का हा तसा गहन प्रश्न आहे. याही संकल्पनेचं तसंच आहे. 'राईट टू प्रायव्हसी' बाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर 'व्यक्तिस्वातंत्र्य' म्हणजे नेमकं काय, ते कसं-कधी-कुठे-किती मिळतं/आपण मिळवतो असा प्रश्न मनात घोळू लागला. यावर थोडं बोलावसं वाटतंय.    

'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास'या वि. का. राजवाडे यांच्या पुस्तकाच्या ब्लर्बची सुरूवात अशी आहे - 'जातिसंस्थेच्या उत्पत्तीची, विकासाची व स्थैर्याची जी परंपरा राजवाडे यांनी वर्णन केली, त्यामध्ये मुख्य बिंदू 'वृत्ती' हा आहे. वृत्ती बांधून देणे म्हणजे काय हा खरा प्रश्न आहे. वृत्तीसामर्थ्याच्या रचनेवर आधारलेला जो समाज तो जातिबद्ध समाज.' यातल्या जातिसंस्थेच्या उत्पत्ती, विकास व स्थैर्याबाबत मत-मतांतरे असू शकतील, पण 'वृत्ती बांधून देणे म्हणजे काय हा खरा प्रश्न आहे'हे विधान मात्र महत्त्वाचं आहे, मननीय आहे. काळाच्या कुठल्याही टप्प्यावर ज्या ज्या संकल्पना व त्यानुसार मुरलेले रीती-रिवाज प्रबळ असतात आणि त्यांच्याशी अल्पसंख्येने संघर्ष करणाऱ्या इतरही संकल्पना व रीती-रिवाज असतात त्या सगळ्यात सहभागी असलेला माणूस याच प्रश्नाला सामोरा जात असतो. 

वृत्ती ही तृष्णेला वळण देऊ शकणारी गोष्ट आहे. स्वातंत्र्य हीदेखील मुळात तृष्णाच आहे. त्यामुळे वृत्ती स्वातंत्र्यालाही वळण देऊ शकते. 'मला जे हवं आहे ते मिळावं, मला जे करायचं आहे ते करू दिलं जावं' या स्वातंत्र्याच्या अगदी कच्च्या स्वरूपातल्या व्याख्येपासून 'जर देणारा तयार असेल तर इतर कुणी आमच्यामध्ये येऊ नये', 'देणारा आज तयार असेल तर तो उद्याही तयार असला पाहिजे, असं नाही झालं तर तो माझ्या स्वातंत्र्यावर घाला आहे' अशा व इतर विस्तारित व्याख्या स्वातंत्र्य या संकल्पनेला लागू होई शकतील. संकल्पनांची मौज अशी की त्या विश्लेषणापासून मुक्त असू शकत नाहीत. एखाद्या संकल्पनेची आधारभूत जमीन कायम स्थिर असेल असं नाही. विविध संदर्भात, विविध परिस्थितीत कुठला आधार घ्यायचा, कुठला नाही यात मतभेद असतात, कारण सर्व माणसांचं आकलन एकसारखं नसतं. तहान-भूक यासारख्या भौतिक गरजा 'नैसर्गिक अधिकार' म्हणून मान्य करता येतात, पण आज संकल्पनांना (निदान काही संकल्पनांना) हे सुख नाही कारण त्या मानवनिर्मित असतात आणि त्यांना इतर मानवांच्या संकल्पनांशी झगडावं लागतं. आहार,निद्रा, भय, मैथुन व मनातील इतर आनुषंगिक भावना सगळ्यांमध्येच असल्याने तिथे झगडा होत नाही. तू माझा शत्रू असलास तरी मला भूक लागते तशी ती तुलाही लागते हे मान्य होतं. पण 'तुझी संकल्पना' मान्य होत नाही. आणि हा झगडा तीव्र झाला की हिंसकही होऊ शकतो. मग तिथे मानवीय दृष्टिकोनदेखील मागे पडतो. मनुष्य प्राणी आहे याची ओळख संकल्पनांच्या झगड्यातूनही पटते ही नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे.   

व्यक्तिस्वातंत्र्यदेखील विश्लेषणापासून मुक्त नाहीच. उद्या जर कुणी असं म्हणालं की 'तिहेरी तलाक हे व्यक्तिस्वातंत्र्य आहे' किंवा 'माझ्या म्हाताऱ्या, कटकट्या आणि आजारी आई-वडिलांची जबाबदारी नाकारणं हे माझं व्यक्तिस्वातंत्र्य आहे' तर त्यावर 'तिहेरी तलाक' हा व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला नसून पुरुषवर्चस्वाला आळा आहे' आणि 'आई-वडिलांची जबाबदारी नैसर्गिकरित्याच मुलांकडे जाते. ती नाकारली तर माणसांच्या व्यवस्थेचा ऱ्हास होईल' अशी उत्तरे मिळतील. आता कायदा करून पुरुषवर्चस्व संपेल का किंवा मुलांची कटकटीतून मुक्तता होईल का हा प्रश्न आहेच, पण कायदा 'परिघावरचं नियमन' करत असतो आणि ते ठीकच आहे. कायद्याला 'अदृश्य अराजक' मान्य असतं, 'दृश्य अराजक' मान्य नसतं. 'व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे बलवापरस्वातंत्र्य' या वृत्तीला कायद्याला आळा घालावा लागतो कारण या वृत्तीमुळे सहअस्तित्वच धोक्यात येतं. सहअस्तित्व शांततामय आहे की नाही, दुर्बलांना सबल कसं करता येईल हे प्रबोधनाच्या कक्षेतले मुद्दे आहेत, कायद्याच्या नाही. कायदा दुर्बलांना काही प्रमाणात सबल करतोच, पण तो सबलांना दुर्बल करेलच असं नाही.  

जोवर व्यक्ती आणि शासन या दोन एकमेकांहून भिन्न संस्था अस्तित्वात आहेत तोवर स्वातंत्र्याचा तिढा सुटणारा नाही. आणि शासन म्हणजे फक्त सरकार असं नाही. यात समाजाची सर्वसाधारण नैतिक बैठक, आर्थिक व्यवस्था - थोडक्यात व्यक्तीला प्रभावित करू शकेल असं सगळं समाविष्ट होतं. 'सामाजिक करारा'चा सिद्धांत राज्यसंस्था आणि व्यक्ती याप्रमाणेच नैतिक-सांस्कृतिक-आर्थिंक संस्था आणि व्यक्ती यांनाही लागू होऊ शकेल. 'सामाजिक करार' हा माणसाच्या वैचारिक प्रवासातला एक कळीचा सिद्धांत आहे. आपल्या काही हक्कांच्या रक्षणासाठी व्यक्तींनी त्यांच्या काही स्वातंत्र्यांचा त्याग करावा, त्याबाबतीत राज्यसंसंस्थेची महत्ता मान्य करावी असं हा सिद्धांत सांगतो. व्यक्ती जर परस्परसंबंधांचे नियमन करू शकत नसतील, त्यातून अराजक माजणार असेल तर शासनसंस्था निर्माण होणार आणि मग व्यक्तीना शासनसंस्थेचं वर्चस्व मान्य करावं लागणार. लोकशाही व्यवस्थेत व्यक्तींकडे शासन बदलण्याचा पर्याय उपलब्ध आहेच, पण तो खूप प्रभावी आहे असं नाही कारण शासन बदललं तरी 'स्टेट ऑफ अफेअर्स' बदलत नाहीत. इथे 'वृत्ती'चा प्रश्न येतो आणि प्रबोधनाचं महत्त्व लक्षात येतं. 

परस्परसंबंधांचे प्रश्न, सहजीवनाचे प्रश्न, नैतिक स्वरूपाचे प्रश्न, मानवी दुःखाच्या कारणांचे प्रश्न या सगळ्याचा मुळातून विचार करण्यासाठी, त्याची व्यवस्था निर्माण करण्यासाठी लहान समूहांची स्वायत्त व्यवस्था असेल तर ते हितकारक होईल. आज हा विचार अप्रस्तुत नसला तरी अप्राप्य नक्कीच वाटू शकेल. कारण अशी स्वतंत्र समूहव्यवस्था आजच्या आपल्या आकांक्षा लक्षात घेता शक्य नाही असं अनेकांचं मत आहे. मानवी आकांक्षा व्यवस्थेच्या पुढे असतात आणि त्यातून व्यवस्थेची गुंतागुंत वाढून ती केंद्रित करण्यावाचून पर्याय उरत नाही . 'केंद्रित व्यवस्थेच्या अंतर्गत विकेंद्रित व्यक्तिस्वातंत्र्य उघडपणे, निरोगीपणे नांदू शकेल का?' हा प्रश्न इथे येतो. 

माणूस अस्थिर आहे. म्हणूनच स्वातंत्र्यदेखील स्थिर असू शकत नाही. माणूस आहार-निद्रा-भय-मैथुन, इतर भावना (आणि अगदी प्रतिक्रियात्मक विकारांपाशीही) जितका स्थिर आहे तितका तो संकल्पनांपाशी आज तरी स्थिर नाही. व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच प्रेम, शोषणापासून मुक्ती, लैंगिक प्रवृत्ती (सेक्शुअल ओरिएंटेशन) यासंदर्भात करणं क्रूरपणाचं आहे कारण तिथे स्वातंत्र्यापेक्षाही आदिमतेमुळे सौंदर्यपूर्ण असलेल्या मानवी तृष्णांची मुस्कटदाबी आहे. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य तत्वतः मान्यच आहे. पण एका मुद्द्यावर विचार करायला हवा. माणसातल्या आदिमतेच्यावर 'कंझ्यूमर' उभा आहे. त्याचं स्वत्व भौतिक-भावनिक-आर्थिक कारणांमुळे पातळ झालेलं आहे. तो परावलंबी झालेला आहे. दुसरीकडे तो स्वतः प्रस्थापित नैतिकता आणि आर्थिक-सामाजिक नियमांनी, दबावांनी शोषलाही गेलेला आहे. म्हणजे तो शोषकही आहे आणि शोषितही आहे. रचनेचं केंद्रीकरण त्याने मुकाटपणे मान्य केलं आहे. या पार्श्वभूमीवर त्याने 'व्यक्ती म्हणून आपण मुळातच किती उरलोय, आपण जे व्यक्तिस्वातंत्र्य मागतोय ते 'आतल्या स्वयंभू व्यक्तीशी जोडलेलं, 'आतलं' किती आणि 'कॉस्मेटिक' किती याचा विचार जरूर करावा. आधारसक्तीचा त्रास आहेच, माझी माहिती अन्य कुणी वापरण्याचा त्रास आहेच आणि त्याविरोधात आवाज उठवणं योग्यही आहेच. पण अशा अनेक 'सक्ती' आपल्यावर आहेत आणि ज्याअर्थी सक्ती आहेत त्याअर्थी केवळ राज्यसंस्थाच नव्हे तर सर्वच मानवनिर्मित संस्था समीक्षेस पात्र आहेत. मगच बहुधा 'आतला माणूस' सापडेल आणि 'संस्थांच्या विलिनीकरणा'ची किंचित सुरुवातही होऊ शकेल.  
                     
('सामाजिक करार' या विषयाच्या प्राथमिक माहितीसाठी 'सोशल कॉन्ट्रॅक्ट' ही विकीपीडियावरील एंट्री बघता येईल.) 

- फेसबुक पोस्ट 

Saturday, May 27, 2017

'भारत' नावाचा कोलाहल 

ज्या विविध ताण्या-बाण्यांनी 'भारत' ही 'घटना' घडत आलेली आहे ते ताणे-बाणे अभ्यासणे ही एक विलक्षण गोष्ट आहे, दमवणारी गोष्ट आहे. भारताच्या इतिहासाबाबतच काय, पण वर्तमानाबाबतही काही निश्चितपणे बोलणे अवघड आहे कारण भारतीय समाज एकाच वेळी विविध कालखंडात वावरत असती. भारतीय समाज ज्या विविध राजकीय आणि सामाजिक वळणांच्या प्रवाहातून वहात गेलेला आहे त्यांची गती आणि दिशा समजून घेणे सोपे नाही. कारण या प्रवाहांचे वाहणे जसे स्वतंत्र आहे तसेच ते एकमेकांत गुंतलेलेही आहे. आचार-विचार, श्रद्धा-समजुती, रूढी-परंपरा यांचे कमालीचे वैविध्य, त्यांच्यातील झगडा आणि या वैविध्याला कवेत घेऊन कधी अतीव कष्टाने तर कधी क्लांत समाधानाने उभे असलेले 'भारतीयत्व' ही जगभरातल्या समाजशास्त्रज्ञांसाठी कुतूहलाची गोष्ट ठरत आली आहे यात नवल नाही.   

भारतीयत्वाच्या बहुविधतेचा हा धागा पकडून आजच्या भारतातील परिस्थतीविषयीची निरीक्षणे मांडणारे 'इंडिया डायव्हर्सिटी' हे पुस्तक म्हणजे इथल्या विविधतेची आणि खरे म्हणजे विविध प्रश्नांची एक छोटी सफर आहे. पुस्तकात एकूण १८ लेख आणि काही कविता आहेत. बरेचसे लेख विविध इंग्लिश नियतकालिकांतून, रीसर्च जर्नल्समधून आधी प्रकाशित झालेले आहेत. पुस्तकाचे संपादन हिल्डा डेव्हिड आणि फ्रान्सिस जार्मन यांचे आहे. हिल्डा डेव्हिड पुण्यातील सिम्बायोसिस महाविद्यालयात प्राध्यापक आहेत तर फ्रान्सिस जार्मन जर्मनीतील हिल्डशाईम विद्यापीठातील इंग्लिश, सांस्कृतिक अभ्यास आणि आंतरसांस्कृतिक संवादाचे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांनी इजिप्त, थायलंड, जपान व युरोपातील विविध विद्यापीठांमधूनही अध्यापन केले आहे.पुस्तकाची सुरूवात त्यांच्याच लेखाने होते. लेखात त्यांनी  'वैविध्य' आणि 'भिन्नत्व' या संकल्पनांची चर्चा केलेली आहे. माणसाला विशिष्ट माणूस 'आपला' वाटतो आणि विशिष्ट माणूस 'वेगळा' वाटतो, हे का होते? आज ज्ञान-तंत्रज्ञान युगातही माणसातल्या आदिम आणि संपादित प्रेरणा माणसाला माणसापासून दूर किंवा जवळ करतात हे आपण अनुभवतो. यात भाषा, वर्ण, धर्म, जात हे मुद्दे तर आहेतच, पण स्त्री आणि पुरूष हे भिन्नत्वदेखील स्त्रीला पुरूष व पुरूषाला स्त्री समजण्याच्या आड येते. जार्मन यांनी इथे 'जेंडर कल्चर' ही संज्ञा वापरली आहे. आणि याचाच पुढचा भाग म्हणजे लैंगिक प्रवृत्तीमुळे (सेक्शुअल ओरिएंटेशन) आलेली भिन्नत्वाची भावना. अर्थात या विविध मुद्द्यांच्या 'वैज्ञानिक खोला'त न जाता त्यांनी लेखाचा रोख भारताच्या सामाजिक-राजकीय घडणीवर ठेवला आहे. 

२००२ च्या गुजरात दंगलीवर 'फायनल सोल्यूशन' हा माहितीपट तयार करणारे राकेश शर्मा यांची मुलाखत भाजपच्या २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या विजयाचा ऊहापोह करणारी आहे. विविध राज्यात भाजपने वापरलेली रणनीती, नरेंद्र मोदी-अमित शहा यांचे संघटन कौशल्य व इतर आनुषंगिक बाबींवर ते बोलले आहेत. ही मुलाखत सप्टेंबर २०१४ मधील आहे. मुलाखतीच्या अखेरीस त्यांनी भाजपच्या पुढील वाटचालीबाबत उत्सुकता दर्शवली आहे. संघाच्या कडव्या हिंदुत्वाचाच आधार घेत भाजप पुढे जाणार की राष्ट्रीय ओळख आणि राष्ट्रीय प्रभाव निर्माण करण्यासाठी 'सेंटर-राईट' पक्ष म्हणून आपली प्रतिमा निर्माण करणार? २०१९ मध्ये जे नवीन मतदार असतील (अंदाजे ३५ कोटी) त्यांच्यापुढे भाजप कुठला चेहरा घेऊन जाईल? या प्रश्नांची उत्तरे 'डायव्हर्स' आहेत आणि वादाला आमंत्रण देणारी आहेत हे वेगळं सांगायला नको. 

लेखिका गीता हरिहरन यांचा लेख दिल्लीतील निर्भया बलात्कार घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली शहर आणि लगतच्या हरियाणाचे भीषण वास्तव समोर ठेवतो तर या लेखानंतरचे आर्मेन मोदी यांचे अनुभवकथन बचतगटांच्या मदतीने खेड्यातील स्त्रियांच्या जगण्यात घडणाऱ्या 'सायलेंट रिव्होल्यूशन'चे चित्रण करतो. कवी, नाटककार आणि समलिंगी व्यक्तींच्या हक्कांसाठी लढणारे आर. राज राव यांचा लेख कलम ३७७, भारतीय कायदा आणि समलिंगी संबंधांबाबतची सामाजिक मानसिकता यावर विस्तृत भाष्य करणारा आहे. समलैंगिकतेचा धावत ऐतिहासिक आढावाही त्यांनी घेतला आहे. दुसऱ्या महायुद्धात नाझी पक्षाने जर्मनीतील समलिंगी व्यक्तींना जी क्रूर वागणूक दिली तो अध्यायही या लेखात आला आहे. आदिवासी व वन्य जमातींचा समावेश असणाऱ्या डीनोटीफाईड ट्राइब्जपैकी (डीएनटी) बऱ्याच जमातींना चुकीने 'गुन्हेगार जमाती' ठरवले गेले आहे. या प्रश्नाचा मागोवा घेणारा मंजू रामानन यांचा लेख पुस्तकात आहे. ईशान्येकडील राज्यांमधील सांस्कृतिक भिन्नता, तिथले स्थलांतरितांचे प्रश्न, फुटीर संघटनांच्या हालचाली, धर्माचे राजकारण याची चिकित्सा दिब्यज्योती सरमा यांनी केली आहे. वाल्मिकी रामायणातील मानव, वानर व राक्षस हे तीन मुख्य समूह व त्यांच्या समूहांतर्गत असणाऱ्या भिन्न चालीरीती (विशेषतः स्त्री-पुरूष संबंध, विवाहसंस्था) आणि त्यांच्या संघर्षातून निर्माण झालेले प्रश्न याचा रोचक वेध अर्शिया सत्तार यांनी घेतला आहे. शूर्पणखेला रामायणातील संघर्षाचा आरंभबिंदू म्हणता येईल. राक्षसी म्हणून शूर्पणखेला तिला आवडणाऱ्या पुरूषांना मिळवण्याचा 'राक्षस धर्मदत्त' अधिकारच आहे. याचा सामना जेव्हा राम-लक्ष्मणाच्या 'अयोध्या धर्मा'शी होतो तेव्हा संघर्ष सुरू होतो. मानव, वानर व राक्षस स्त्रियांचे व त्यांच्या सामाजिक अधिकारांचे वाल्मिकी रामायणातील चित्रण पुष्कळच बोलके आहे.

भारतात धार्मिक संघर्षाच्या त्रिकोणाचे तीन कोन म्हणजे हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन. एम. एच. जफर आणि जोएल टिमोथी यांनी अनुक्रमे इस्लामच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता आणि भारतातील ख्रिस्ती धर्माचे, विशेषतः चर्चचे  स्थान यावर विवेचन केले आहे. जफर यांचा लेख त्रोटक आहे. इस्लामच्या काही माहीत नसलेल्या बाजूंविषयी ते बोलले आहेत, पण इस्लामचे आजचे सर्वसाधारण स्वरूप दहशतवादाशी जोडले गेलेले असल्याने कुराणचे आकलन, इस्लामचा गाभा आणि त्यातील गुंतागुंत अधिक स्पष्टपणे समोर यायला हवी होती असे वाटते. भारतातील चर्चचे इतिहास-वर्तमान मांडताना चर्चमध्ये जातीव्यवस्था आपली भूमिका बजावते हे जोएल टिमोथी यांचे निरीक्षण महत्त्वाचे आहे. चर्चसंबंधी त्यांनी एकूणातच परखडपणे आपली भूमिका मांडली आहे. 

नाटककार रामू रामनाथन यांचा ललित व माहितीपर अशा दोन अंगांनी लिहिलेला लेख महाराष्ट्रातील विद्रोही चळवळीतील कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा विस्तृत आलेख मांडतो. कबीर कला मंच, नागपूरचा देशभक्ती युवा मंच आणि यातील कलाकारांना झालेली अटक, मुंबईत शिवाजी पार्कवर झालेले साहित्य संमेलन आणि धारावीत आयोजित केले गेलेले विद्रोही साहित्य संमेलन, महाराष्ट्राचे गदर म्हणून ओळखले जाणारे शाहीर संभाजी भगत यांच्या 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाला झालेला विरोध, 'विद्रोही' मासिकाचे संपादक सुधीर ढवळे यांच्या अटकेचा तपशील (यात त्यांच्यावरील आरोपपत्रातील काही भागही दिला आहे) हे सर्व मांडत त्यांनी शासनाच्या भूमिकेवर प्रश्न उभे केले आहेत. कबीर कला मंचाच्या दोन केसेसबाबत (पहिली ज्योती चोरगे व सुषमा रामटेके आणि दुसरी दीपक डेंगळे व इतर) न्यायाधीश अभय ठिपसे यांनी जो निकाल दिला त्यातील पहिल्या केसच्या २६ पानी निकालपत्रातील काही महत्त्वाचे मुद्दे लेखात जसेच्या तसे उद्धृत केले आहेत. माओवादी चळवळीचा विचार करताना सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक भेदभावामुळे वंचित समूहातील अनेक लोक माओवादाकडे आकर्षित होतात आणि त्यामुळे त्या सर्वांना दहशतवादी संघटनेचे सभासद समजणे चुकीचे आहे असे निकालपत्रात म्हटले आहे. विद्रोही कलावंतांबाबत शासनाच्या नकारात्मक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा उठून दिसतो. मराठी वाचकांना महाराष्ट्रातील विद्रोही चळवळीतील घडामोडींची ओळख करून घ्यायच्या दृष्टीने हा लेख उपयुक्त ठरेल. 

प्रमिला पॉल यांचा लेख भारताच्या सहिष्णू-असहिष्णू अशा संमिश्र रूपाकडे लक्ष वेधतो. टी. डब्ल्यू. गेराघटी या आयरिश लेखकांचा एका परदेशी माणसाच्या नजरेतून दिसणाऱ्या भारताविषयीचा लेखही अशाच स्वरूपाचा आहे. पुस्तकात याखेरीज जेरी पिंटो, संयुक्ता दासगुप्ता. गायत्री पगडी यांचे ललित स्वरूपाचे लेख आहेत. लॅमिंग्टन रोडला केंद्रस्थानी ठेवून मुंबई महानगरातील घरांचे प्रकार, घराभोवतीचे पर्यावरण आणि इथल्या 'प्रॉपर्टी मार्केट'मध्ये होणारे बदल टिपणारा प्रसाद शेट्टी व रूपाली गुप्ते यांचा लेख आहे. मीना कंडासामी, पीर खान व अरुंधती सुब्रमणियम यांच्या कविता आहेत. 

या देशातील विविधता,  त्या पार्श्वभूमीवर ठळक होणारा लेखकाचा आस्थाविषय आणि त्याचे लेखकाला जाणवलेले पैलू, परिघावरील / उपेक्षित लोकांच्या जगण्याचे प्रश्न, त्यांच्या सामाजिक अस्तित्वाशी जोडलेले न्यायाचे प्रश्न आणि यातून लेखकाच्या मनात उमटलेली प्रतिक्रिया हा संपूर्ण पुस्तकाचा अंतःस्वर आहे. यात प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न फारसा नाही तर प्रश्नाची व्याप्ती वाचकांना जाणवून द्यायचा प्रयत्न आहे. सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक म्हणजे भारतातल्या काही ठिकाणांची धावती सफर आहे. पुस्तकाचे शीर्षक 'इंडिया डायव्हर्सिटी' असे असले तरी पुस्तकाचे स्वरूप या डायव्हर्सिटीमुळे निर्माण होणारे प्रश्न आणि त्यांचा सामना करताना होणारी दमछाक प्रामुख्याने दाखवते. आणि ते योग्यही आहे. कारण 'वैविध्य असूनही भारतातील लोक गुण्यागोविंदाने राहतात' या विधानाबरोबरच 'ते गुण्यागोविंदाने राहात नाहीत' हेही सांगणे आवश्यक आहे. दोन्ही विधानांमध्ये सत्यांश आहेच, पण अप्रिय सत्यांश न सांगण्याकडे सहसा आपला कल असतो. तो इथे टाळला गेला आहे. मात्र पुस्तकाच्या शीर्षकावरून कदाचित काही वाचकांची दिशाभूल व्हायची शक्यता नाकारता येत नाही. 

पुस्तकातील लेख धावता आढावा घेणारे असले तरी लेखातील मांडणीविषयी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी त्यांचे मत नोंदवू शकतील. पुस्तकात ज्या विषयांना स्पर्श केला गेला आहे त्यातील प्रत्येक विषय अर्थातच स्वतंत्रपणे अभ्यासावा असा आहे. आणि तसे केले तरच त्या विषयाचे योग्य आकलन होऊ शकेल. त्यामुळे भारतातील वैविध्य व त्यातील अडचणी यांचे 'ट्रेलर' म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल. शक्य तितक्या वैविध्यपूर्ण विषयांना हात घालणारे लेख संकलित करून छोटेखानी पुस्तकाच्या माध्यमातून या विषयांची तोंडओळख वाचकांना करून द्यायच्या दृष्टीने पुस्तक नक्कीच उपयुक्त आहे.

इंडिया डायव्हर्सिटी. संपादक : हिल्डा डेव्हिड, फ्रान्सिस जार्मन 
ओम बुक्स इंटरनॅशनल
पृष्ठे : २१५
किंमत : रू. ३५०/-            

(२७ मे २०१७, बुकमार्क - लोकसत्ता)

Sunday, May 14, 2017

स्वराज्यशास्त्र : काही मूलभूत  

राजकारण, परिवर्तनवादी विचाराची स्थिती, उजवे-डावे-मधले यांच्यातील प्रेममय संवाद आणि एकूणातील तप्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 'काही मूलभूत' म्हणून विनोबांच्या 'स्वराज्यशास्त्र'ची आठवण होते. प्रस्तुत टिपणात या पुस्तकाचा परिचय किंवा त्याची सविस्तर चर्चा नाही. काही परिच्छेद, जे मला माझ्या आकलनाच्या दृष्टीने उल्लेखनीय वाटले ते जसेच्या तसे दिले आहेत आणि त्याआधारे मीही काही मांडायचा प्रयत्न केला आहे. यात थोडा विस्कळीतपणा आला आहे, पण तरी मुद्दा पोचेल अशी मला आशा आहे. पुस्तकाच्या आरंभी विनोबांनी 'राजकीय प्रश्नाचे आजचे कृत्रिम अर्थ' आणि 'राजकीय प्रश्नाचा स्वाभाविक अर्थ' अशी दोन टिपणे लिहिली आहेत. ती अशी - 

राजकीय प्रश्नाचे आजचे कृत्रिम अर्थ - 

आजच्या घटकेला मानवसमाजात वरचा वर्ग, मधला वर्ग आणि खालचा वर्ग, असे तीन वर्ग विनाकारण करण्यात येतात. आणि ह्या तीन वर्गांनी परस्परांत कशी व्यवस्था राखावी असा राजकीय प्रश्नाचा कृत्रिम अर्थ केला जातो. हिंदू समाजात कार्यविभागानुसार वर्ण-विभाग कल्पून ह्या वर्णांनी परस्परांत व्यवस्था कशी राखावी, असा राजकीय प्रश्नाचा दुसरा एक कृत्रिम अर्थ केला जातो. तसेच जगामध्ये काही लोकांपाशी सपंत्ती गोळा झाली आहे आणि काही लोकांपाशी ती नाही; ही आजची अवस्था लक्षात घेऊन श्रीमंत आणि गरीब असे किंवा अशांसारखे दोन वर्ग कल्पून ह्या वर्गांनी परस्परांची व्यवस्था कशी राखावी, असा राजकीय प्रश्नाचा आणखी एक कृत्रिम अर्थ केला जातो. 

ह्या तिन्ही अर्थांना कृत्रिम म्हणण्याचे कारण, त्यांची उभारणी काल्पनिक किंवा अ-मूलभूत भेदावर केली आहे हे होय. 'वर, खाली आणि मधे' म्हणजे काय याची व्याख्या कल्पनेशिवाय काहीच नाही. तीन, चार किंवा अधिक वर्ण हे आम्हीच बनवलेले. तेव्हा त्यावर उभारलेली विचारसरणी ही काल्पनिकच, म्हणजे आमच्या कल्पनेची. आणि जेथे ती आहे, तेथे 'मिथ्या' या अर्थाने काल्पनिक नाही असे म्हटले तरी ती मूलभूत तर नाहीच. श्रीमंत आणि गरीब ह्या भेदाला काल्पनिक म्हणणे जड वाटले, तरी तो मूलभूत भेद नाही. म्हणजे तो कारणरूप नव्हे, तर कारण-विशेषाचे कार्य आहे. शिवाय, सूक्ष्म पाहिले तर तो भेद काल्पनिकही आहे. म्हणजे श्रीमंत हा पैशाने श्रीमंत आणि गरीब हा पैशाने गरीब असे म्हटले तर ह्याच्या उलट गरीब हा श्रमशक्तीने श्रीमंत आणि आजचा श्रीमंत म्हणवलेला श्रमशक्तीने गरीब असे म्हणता येईल. असे पाहिले म्हणजे श्रीमंत आणि गरीब याही कल्पना ठरू पाहतात. 

वरील तीन प्रकारांशिवाय, पुन्हा भाषाभेदाला आणि धर्मभेदाला धरून पारस्परिक व्यवस्थेचा प्रश्न उभा करून त्याला राजकीय रूप दिले जाते. पण हेही भेद मूलभूत नव्हेत, असे थोड्या विचाराने लक्षात येईल. 

राजकीय प्रश्नाचा स्वाभाविक अर्थ -  

काही माणसे स्वभावतःच, म्हणजे निसर्गाने, अधिक बुद्धिमान किंवा अधिक शक्तिशाली असतात आणि काही अर्थात कमी बुद्धीचे आणि कमी शक्तीचे असतात. बुद्धी आणि शक्ती ह्या दोहींचा समावेश सामर्थ्य ह्या एका शब्दात करता येईल. ज्याला आपण संपत्ती, साधन-सामग्री, दर्जा इत्यादी म्हणतो, त्या सर्व गोष्टी सामर्थ्यातूनच निर्माण होतात. म्हणून मानवात काही समर्थ आणि पुष्कळसे असमर्थ असे दोन वर्ग कल्पिता येतील. पण वर्ग ह्या नात्याने ते सिद्ध होण्यास त्यांच्यात संघटना कल्पून घ्यावी लागेल. म्हणजे सर्व समर्थ संघटनेने एकवटले तर समर्थांचा वर्ग सिद्ध होईल. अन्यथा तो वर्ग काल्पनिकच. असमर्थ एकवटले तर त्यांचा वर्ग सिद्ध होईल. पण सिद्ध होता क्षणीच तो आत्महत्या करून घेईल. म्हणजे तो असमर्थ ठरणार नाही, समर्थ होईल. कारण सामर्थ्य जसे शक्तीने आणि बुद्धीने तसे संख्येनेही निर्माण होते. उलट तो वर्ग एकवटला नाही तर वर्ग ह्या नात्याने काल्पनिकच ठरेल. 

थोडक्यात हा अर्थ निष्पन्न झाला की समाजात स्वाभाविकपणे वर्ग असा कोणताच नाही, कमीअधिक सामर्थ्याची माणसे आहेत. ह्या कमीअधिक सामर्थ्याच्या माणसांनी मिळून आपली व्यवस्था कशी राखून घ्यावी हा राजकीय प्रश्नाचा मूलभूत आणि स्वाभाविक अर्थ होतो. ह्यातून अ-मूलभूत आणि काल्पनिक अनेक प्रश्न कल्पिता येतात आणि मग पुढे सोडवावेही लागतात. 

यानंतर विनोबांनी 'विविध राज्यपद्धतींचे संभवनीय प्रकार' मांडले आहेत. प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात ही मांडणी आहे. इतर आनुषंगिक विषयांवरही विनोबा बोलले आहेत. यातील काही मुद्दे आदर्शवत वाटतील, कदाचित अव्यवहार्यही वाटतील. पण विनोबांचा हा धागा अर्थातच गांधीजींशी जुळणारा आहे. गांधीजींची ग्रामस्वराज्याची मांडणी किंवा त्यांची माणसाच्या नैतिक उन्नयनाविषयीची मांडणी वाचताना 'हे कसं होणार? हे माणसाच्या मूलभूत ऊर्मींशी फटकून होतंय का?' असं वाटतं, पण तरी एक मान्य होतं की हे 'फंडामेंटली करेक्ट' आहे. त्यांचा 'माणसाचा आदर्श' हा व्यावहारिक वास्तवापेक्षा आकर्षित करतो. गांधींचं 'फंडामेंटली करेक्ट' असणं गांधींना दुर्लक्षित न करता येण्याचं एक प्रमुख कारण आहे. गांधी-विनोबा, त्यांचा आदर्श विचार हे काहीसं व्यायामासारखं आहे. व्यायाम करायचा कंटाळा येतो, पण व्यायाम करणं नेहमीच करेक्ट असतं!

विनोबांचं वरील टिपण किंवा पुस्तकातील पुढील मांडणी वाचतानाही हे होतं. आज आपण राजकारणाचं स्वरूप पाहतो आहोत. त्यातील नैतिक ऱ्हासाविषयी बोलतो आहोत. राजकारणातील नैतिक ऱ्हास हा खरं तर फार धक्कादायक विषय असण्याचं कारण नाही. तो अशासाठी की हा ऱ्हास होणं अपरिहार्यच होतं आणि आहे. पक्षीय राजकारणाच्या 'डीएनए'मध्येच हा ऱ्हास लिहिलेला आहे. राजकारणी संधीसाधू असतात यात नवल वाटावं असं काय आहे? राजकारणात टिकून राहणं, सत्ता हातात ठेवणं यासाठी ते करावंच लागतं. लोकशाहीचं स्वरूपच मुळात 'शहाण्याला संधी' असं नसून 'बहुमताला संधी' असं आहे. व्यवस्थेसाठी एक चौकट आखावी लागते, ती लोकशाहीने आखली आहे. या चौकटीत सुधारणेला जागा कुठे आहे ते बघणं आवश्यकच आहे. पण त्याबरोबरच 'मानवी सहजीवन अधिकाधिक सुकर कसं होईल? आपल्याला जो उतरंडविहीन, परस्परावलंबी समाज अभिप्रेत आहे तो कसा घडेल? माणसाचं नैतिक उन्नयन कसं होईल' हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून जे विचार करतात त्यांनी या चौकटीचा वापरच न करता बहुमताला नावं ठेवली तर त्यातून परिवर्तन साध्य होणार नाही. किंवा 'स्वराज्यशास्त्र'मध्ये सत्ताकेंद्री राजकारणाच्या वातावरणात विनोबा, गांधी या लोकांचं म्हणणं कितपत तग धरेल? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आज मूल्यव्यवस्था देखील बदलू पाहते आहे. तेव्हा आज काही नवीन मांडणी करताना या मांडणीचा आधार घेणं योग्य आहे का हा प्रश्न पडणं रास्त आहे. या प्रश्नाचा शोध घेताना पुन्हा एकदा 'स्वराज्यशास्त्र'मधलंच एक उद्धृत द्यावंसं वाटतं - 

'जनता केव्हाही वादनिष्ठ किंवा पद्धतीनिष्ठ नसते. ती जीवननिष्ठ असते. जीवन चांगले चालले, मग वाद किंवा पद्धती कोणती का असेना, जनतेला त्याची फिकीर नसते. वाद तत्त्वज्ञानी काढतात, पद्धती व्यवहारी चालवतात आणि समाज सहकार्य करतो. पहिले दोघे अनुक्रमे वादनिष्ठ आणि पद्धतीनिष्ठ असतात. पण तेही शेवटी आपल्या मतांप्रमाणे जीवननिष्ठ असतात, म्हणूनच तसे असतात. अमुक वादाशिवाय जीवन चांगले बनणे शक्य नाही, असे तत्त्वज्ञानी विचाराने मानतो आणि म्हणून, म्हणजे आपल्या जीवननिष्ठेमुळेच तो वादनिष्ठ झालेला असतो. व्यवहारी अमुक पद्धतीशिवाय जीवन चांगले चालणे शक्य नाही असे आपल्या अनुभवावरून ठरवतो आणि म्हणून आपल्या जीवननिष्ठेमुळेच तो पद्धतीनिष्ठ बनलेला असतो. परंतु आग्रहामुळे आणि मोहामुळे कधी कधी जीवननिष्ठा आणि पद्धतीनिष्ठा लोकांची मने - तत्त्वज्ञाची, व्यवहाऱ्याची आणि इतरांचीही - काही काळापर्यंत काबीज करू शकतात.'      
विनोबांच्या या मांडणीत एक 'कायमस्वरूपी झगडा' दिसतो. आजच्या संदर्भातही हे दिसेल. आज बहुमताचा कल भाजपकडे झुकलेला असताना अनेकांना असं वाटतं की सांप्रदायिकतेचा, धार्मिक ध्रुवीकरणाचा आधार घेत मोठ्या झालेल्या पक्षाला लोकांनी निवडून कसं दिलं? लोकांना नक्की काय झालं आहे? भारताच्या बहुविध सांस्कृतिक ओळखीचं काय होणार? हे प्रश्न रास्तच आहेत. पण तें वादनिष्ठेतून आलेले आहेत. पण वस्तुस्थिती अशी की जनता काँग्रेसच्या काळातही जीवननिष्ठ होती आणि आजही आहे. उद्या भाजप किंवा काँग्रेस सोडून तिसऱ्या पक्षाचं सरकार आलं तरी जनता जीवननिष्ठच असेल. त्यामुळे आपल्याला बदल हवा असेल  तर आपलया वादनिष्ठेला जनसन्मुख कसं करायचं हे पाहावं लागेल. 'जीवननिष्ठ'ही व्हावे लागेल. वादनिष्ठेला सोडचिट्ठी देऊ नये, पण तीमुळे जीवननिष्ठा झाकोळू देऊ नये. 

विनोबादेखील गांधींसारखेच 'प्युरिस्ट' असले तरी त्यांची मनुष्यस्वभावाची समज व्यावहारिक पातळीवरची होती हे स्वराज्यशास्त्र वाचताना जाणवतं. तरीही त्यांच्या माणसाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. गांधी-विनोबांसारख्या मंडळींचं अप्रूप अशाकरता वाटतं की 'माणूस कसा असतो' हे माहीत असूनदेखील त्यांनी 'माणूस कसा असावा' याची आग्रहपूर्वक मांडणी केली. माणसाला व्यायाम घडवायचा प्रयत्न केला. त्यांची मांडणी आज कशी लागू होईल हा विचार अप्रस्तुत नाही. गांधी-विनोबांनी विचार केलेला नव्हता अशा अनेक गोष्टी आणि आव्हाने आज असतील. परंतु 'माणूस' आमूलाग्र बदललेला नाही. त्यामुळे मूलभूत मांडणी म्हणून तिकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 

ज्यांनी परिवर्तनाचा विचार केला, अगदी टोकाचेही आदर्श कल्पिले अशा गांधी-विनोबांसारख्या मंडळींबाबत एक गोष्ट जाणवते ती अशी की ते कमालीचे क्रियाशील होते. व्यक्तिगत पातळीवर कदाचित निराशेने त्यांच्या मनाला स्पर्श  केला असेलही, पण कार्यकर्ता, विचारवंत म्हणून ते सकारात्मक राहिले. आज हे ठळकपणे जाणवतं. आणि म्हणूनच हे नोंदवावंसं वाटतं की परिवर्तनाचा विचार हा सशक्त विचार आहे. तो वादनिष्ठ आहे, क्रिटिकल आहे.  म्हणूनच त्याने स्वतःला बंदिस्त करून घेऊ नये. प्रतिक्रिया देत राहणं ही स्थितीशीलता आहे. जर हा विचार चिकित्सक विचार असेल तर त्याने स्वतःचीही चिकित्सा केलीच पाहिजे.    

स्वराज्यशास्त्रमधील व्यवस्थेच्या विविध पद्धती असोत, गांधींची ग्रामस्वराज्याची संकल्पना असो, आंबेडकरांची जातीविहीन समाजाची संकल्पना असो किंवा इतरही (आदर्शवत वाटणाऱ्या) संकल्पना असोत - या संकल्पनांच्या मुळाशी परिवर्तनाची आच आहे. त्यामुळे या संकल्पनांना प्रयोगशाळेत स्थान देऊन पुढे काम करणं गरजेचं आहे. संपूर्ण समाजाकडे 'लॅब' म्हणून बघता येत नाही. ते गडबडीचं ठरेल. त्यामुळे वैचारिक प्रयोगशाळा, तिथे तयार झालेलं रसायन हा एक भाग आणि त्या रसायनाच्या 'उपयोजित आवृत्त्या' हा दुसरा भाग अशा प्रकारे काम करणं इष्ट होईल. 

- १४ मे २०१७, फेसबुक पोस्ट 


Sunday, February 19, 2017

रचनाच कर्ता आहे

'आधुनिक विज्ञानाचे स्वरूप' हे मौज प्रकाशनाचे एक लहानसे (११६ पाने) पुस्तक आहे. 'आजचा सुधारक'मध्ये जानेवारी ते मार्च २००४ दरम्यान प्रकाशित झालेल्या लेखांचे हे संकलन आहे. 'आजचा सुधारक'च्या डार्विन विशेषांकाचे पुस्तकरूप म्हणजे मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेले 'डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य'. मराठीत जे विज्ञानविषयक लेखन झाले आहे त्यात ही दोन पुस्तके महत्त्वाची ठरावीत. 

'आधुनिक विज्ञानाचे स्वरूप' या पुस्तकात 'आत्मा हवा का?' या शीर्षकाचा मिलिंद वाटवे यांचा एक लेख आहे. 'सजीवांच्या सगळ्या जीवन प्रक्रियांचे नियंत्रण करण्यासाठी भौतिकी आणि रसायनशास्त्राच्या नियमात न बसणाऱ्या एखाद्या वेगळ्याच शक्तीची गरज आहे का? दुसऱ्या शब्दात, पूर्णतः भौतिक आणि रासायनिक नियमांवर आधारित आणि त्यापेक्षा वेगळी कुठलीही गोष्ट न आणता एवढ्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया चालू शकतात हे सिद्ध करता येईल का?' यावर प्रस्तुत लेखात मिलिंद वाटवे यांनी चर्चा केली आहे. त्यांची मुख्य मांडणी अशी आहे की सजीवांचे कार्य चालण्यासाठी आधिभौतिक शक्तीची गरज तर नाहीच, परंतु अशी काही शक्ती असणे आणि तिने सर्व क्रियांचे नियंत्रण करणे तत्त्वतःच अशक्य आहे. या मुद्याबाबत ते लिहितात, 'भौतिक नियमात बसू शकत नाही असा काही आत्मा किंवा जीवशक्ती असणे शक्यच नाही असे दाखवून देता येऊ शकते. यामागचे तर्कशास्त्र समजायला अवघड नाही. सजीव यंत्रणेत ज्या क्रिया चालतात त्या भौतिक आहेत याविषयी वाद नाहीत. वाद आहे तो या क्रिया नियंत्रण करणारी काही आधिभौतिक शक्ती आहे की नाही याविषयी, भौतिक क्रियेचे नियंत्रण करायचे म्हणजे काय करायचे, तर ती सुरू करायची, बंद करायची अथवा तिला दिशा द्यायची. या तीनही गोष्टी करण्यासाठी काही जोर लावावा लागेल. जोर लावणे ही क्रिया भौतिकच आहे. त्यामुळे नियंत्रण करणे ही क्रियाही भौतिकच असणे भाग आहे. जी चीज स्वतःच भौतिकत्व नसलेली आहे तिला भौतिक जोर कसा लावता येणार? आणि तसा लावता आला नाही तर ती नियंत्रण कसे करणार? डॅनियल डेनेट नावाच्या शास्त्रज्ञाने ही गोष्ट एका गमतीशीर उदाहरणातून सांगितली आहे. तो म्हणतो की भुताच्या गोष्टीमध्ये अशासारखा एक प्रसंग हमखास असतो की एखादे भूत भिंतीतून आरपार येते आणि टेबलावरचा खंजीर उचलते. आता ही गोष्ट किती अतार्किक आहे ते पाहा. भिंतीतून आरपार जाण्याचा गुणधर्म जर त्या भुतात असेल तर त्याची बोटेही खंजिरामधून आरपार जातील. त्याला तो खंजीर उचलता कसा येईल? भिंतीतून आरपार जाणे आणि खंजीर उचलणे या दोन्ही गोष्टी एकाच 'एंटिटी'ला करणे शक्य नाही. आपली आत्म्याची कल्पना या भुताच्या गोष्टीइतकीच तर्कदुष्ट आहे. जर हा आत्मा भौतिक नसेल तर त्याला भौतिक गोष्टींचे नियंत्रण करता येणार नाही. आणि जर तो भौतिक गोष्टींचे नियंत्रण करत असेल तर त्याला भौतिक शक्ती वापरावीच लागेल. तसे असेल तर ती शक्ती भौतिक प्रयोगांनी दाखवणे आणि मोजणे शक्य होईल. आणि जी वस्तू भौतिक प्रयोगांनी दाखवता येते ती भौतिकच असली पाहिजे.' भौतिक क्रियांचे नियंत्रण करण्यासाठी आत्म्याची आवश्यकता नाही, किंबहुना असे नियंत्रण करणे मुळातच शक्य नाही हे सांगताना 'रचनाच रचनेतील क्रियांचे नियोजन-नियंत्रण करते' असा विचार ते मांडतात. 

इथे त्यांनी संगणकाचे उदाहरण दिले आहे - 'एखादा संगणक असतो किंवा एखादे स्वयंचलित यंत्र असते. आपण बटण दाबल्याबरोबर ते आपले ठरलेले काम करू लागते. आपण बटण दाबतो म्हणजे त्यातून वीजप्रवाह सोडतो. ऊर्जा देतो. ऊर्जा कशी वापरायची यासंबंधीच्या सूचना देत नाही. जेव्हा वीजप्रवाह बंद असतो तेव्हा यंत्राची रचना तेवढी असते, कार्य नसते. ऊर्जा दिली की कार्य सुरू होते. दिलेली ऊर्जा, तो वीजप्रवाह वाटेल तसा धावत नाही. योग्य प्रकारेच धावतो आणि योग्य ते कामच करतो. इथे दिलेली ऊर्जा कशी वापरायची हे कोण ठरवते? वीजप्रवाहाने कुठून कसे वाहावे हे कोण ठरवते? त्या यंत्राची रचनाच ठरवते.' ज्याप्रमाणे संगणक बंद असताना संगणकाची रचना तशीच असते त्याचप्रमाणे नेहमी ३० अंश सेल्सियसला जगणाऱ्या मानवी पेशीचे तापमान आपण ३०० अंशांनी कमी म्हणजे -२७० अंश केले तर काय होईल यावर मिलिंद वाटवे लिहितात. उणे २७३ अंश हे सर्वात कमी तापमान असू शकते. यांच्या खाली तापमान नेणे तत्त्वतःच शक्य नाही. म्हणून याला शून्य अंश निव्वळ तापमान म्हणतात. प्रत्यक्षात हे तापमान मिळवता येत नाही. पण द्रवरूप हायड्रोजन अथवा द्रवरूप हेलिअमच्या साहाय्याने याच्या अगदी जवळ म्हणजे दोन अंश निव्वळ तापमानापर्यंत एखादी वस्तू गार करणे शक्य असते. आणि या तापमानाला पेशी गोठवण्याचे प्रयोग झालेले आहेत. आता या गोठवलेल्या पेशीत कोणत्याही प्रक्रिया चालू नाहीत. मग काय आहे? तर शुद्ध रचना. रचना आणि कार्य ही यंत्राची आणि सजीवांची दोन अविभाज्य अंगे असतात. गोठवलेल्या पेशीमध्ये कार्य नाही, पण रचना आहे अशी अवस्था मिळू शकते. (रचनेशिवाय कार्य मात्र असू शकत नाही.) ही पेशी आपण पुन्हा नेहमीच्या तापमानाला आणली तर काय होईल? जे आढळले आहे ते असे की ती पेशी पुन्हा पूर्ववत जिवंत पेशीसारखी वागू लागली. आपण पेशीला ऊर्जा दिली पण ऊर्जा कशी वापरायची यासंबंधी काही सूचना दिल्या नाहीत. तरीसुद्धा पेशीच्या क्रिया सुरू झाल्या. म्हणजे रचनेतच क्रियांचे नियंत्रण करण्याची योजना आहे. 

या मांडणीवर असा प्रश्न येऊ शकतो की वरील उदाहरणात पेशीला ऊर्जा देणे किंवा संगणकात वीजप्रवाह सोडणे ही कामे माणसाने केली आहेत. सजीवात हा 'वीजप्रवाह; कोण सोडतो? पेशी निर्माण कोण करतो? यावर लेखात स्वतंत्रपणे चर्चा केलेली नसली तरी यासाठी 'इमर्जंट प्रॉपर्टीज' याविषयी वाचता येईल. प्राथमिक माहितीकरता विकिपीडियावरील पहिले दोन परिच्छेद देतो. 'Emergence' ने विकिपीडियावर सर्च करता येईल. -   
In philosophy, systems theory, science, and art, emergence occurs when an entity is observed to have properties its parts do not have on their own. These properties or behaviors emerge only when the parts interact in a wider whole. For example, smooth forward motion emerges when a bicycle and its rider interoperate, but neither part can produce the behavior on their own.

Emergence plays a central role in theories of integrative levels and of complex systems. For instance, the phenomenon of life as studied in biology is an emergent property of chemistry, and psychological phenomena emerge from the neurobiological phenomena of living things.

थोडक्यात अन्य गोष्टींप्रमाणेच अनेकविध घटकांच्या परस्पर संबंधांतून 'लाईफ' निर्माण झाले असे म्हणता येते. मिलिंद वाटवे यांच्या 'रचनाच कर्ता आहे' या मांडणीसारखीच मांडणी विद्यानंद नंजुंदय्या यांच्या 'डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य' या पुस्तकातील लेखात आढळते. 'जीव आणि जाणीव : उत्क्रांतीवादी दृष्टिकोन' या लेखाच्या समारोपात ते लिहितात, 

माणसे उत्क्रान्तीतून घडली आहेत. उत्क्रान्तीचे वर्णन केवळ इहवादी रूपात केले जाऊ शकते. प्रजोत्पादनातील यशाला पूरक जीनसंचांचा प्रसार त्यांच्या वाहकांना (शरीरांना) उत्क्रान्त करतो. प्रजोत्पादनातले यश शारीरिक व वागणुकीतील गुणधर्मांवर अवलंबून असते, म्हणजे वर्तणूकही उत्क्रान्त झालेली आहे. जाणिवेचा संबंध मनःस्थितीशी आहे आणि या मनःस्थिती मेंदूतील चेतापेशींच्या विद्युत-व्यवहारातून घडतात. त्यामुळे जाणिवेचे इहवादी (जडवादी, मटेरियलिस्टिक) स्पष्टीकरण देता येते असा युक्तिवाद करू शकतो.

जाणिवेसकटच्या आपल्या अस्तित्वाचे स्पष्टीकरण आपल्याला देता येऊ शकते हा आश्वस्त करणारा विचार आहे. आपल्या मनातील राग-लोभ-मोह-मत्सर-अहंकार-द्वेष-आसक्ती इत्यादी (यात गॉसिपदेखील अ‍ॅड करता येईल) आणि इतर अनेक भावछटा (ज्या आपल्या आपणच अनुभवू शकतो), परस्परांमधील भावनिक-लैंगिक आकर्षण या सर्वांचा खुलासा 'आपली रचना' आणि आपल्या पर्यावरणाला प्रतिसाद द्यायची या रचनेची आपल्या अस्तित्वाच्या विशिष्ट टप्प्यावरील क्षमता यातच आहे. 

माझ्या आकलनानुसार आपली 'आजची अडचण'  ही आहे की तंत्रज्ञान, राहणी, अभिव्यक्ती यात अचाट बदल झाले असले तरी आपला मेंदू अजूनही बऱ्याच अंशी 'ह्यूमन इन्स्टिंक्ट' चा गुलाम असल्यासारखा आहे. आणि त्या त्या समाजाचे प्रस्थापित नीतीनियम हेदेखील त्याच्या इन्स्टिंक्टचा भागच बनले आहेत. (उदा. अत्याधुनिक यंत्राचं डिझाइन करणारा एखादा बुद्धिमान तंत्रज्ञ आपल्या बायकोला कुणी अन्य पुरूष आवडतो आहे हे सत्य सहज स्वीकारू शकेल का? किंवा एखादी आधुनिक आई आपला मुलगा समलिंगी आहे हे सत्य सहज स्वीकारू शकेल का? 'सहज' हा शब्द महत्त्वाचा आहे आणि सर्वसाधारण निरीक्षण अभिप्रेत आहे. अपवाद अर्थातच असतील.) 

तंत्राचा प्रदेश विस्तारला, पण जाणिवेचा प्रदेश तितकासा विस्तारला नाही. कदाचित माणसाने निर्माण केलेली सामाजिकता इतकी मजबूत आहे की स्व आणि सामाजिकता या द्वंद्वात तीच कायम वरचढ ठरते आणि नेमकं हेच जाणिवेचा प्रदेश विस्तारण्याच्या आड येत असावं. अर्थात जाणिवेचे जडवादी स्पष्टीकरण देता येत असेल तर जाणीव म्हणावी इतकी प्रवाही न होण्याचेही जडवादी स्पष्टीकरण देता येऊ शकेल. माणूस आधी होता त्यापेक्षा कमी हिंसक (शारीरिक हिंसेबाबत) झाला आहे. (तुलनात्मक दृष्ट्या बघावं. वर्तमानातही हिंसा आहे, पण माणसाचे माणसाविषयीचे क्रौर्य तरी काही अंशी कमी झाले आहे.) पण इतर बाबतीत तसे म्हणता येईल का याची शंका वाटते. द्वेष, मत्सर, असुरक्षितता, टोळी मानसिकता या प्रवृत्ती (मेंदूतील चेतापेशींच्या विद्युत व्यवहारातून) लाखभर वर्षांपूर्वी निर्माण होत होत्या त्याच आजही निर्माण होतात. याला कारण चिरेबंदी सामाजिक-आर्थिंक-लैंगिक बांधणी हेच असेल का? विचार करायला हवा. ज्या जाणिवांच्या मुळाशी निखळ लैंगिकता आहे त्यांचं स्पष्टीकरण लैंगिक पुनरुत्पादनाच्या 'उत्क्रान्तीजन्य जबाबदारी'च्या आधारे देता येऊ शकेल. पण इतर मानवी इच्छा-आकांक्षा, भावना-संवेदना यांचा जो मोठा पट आहे तो अजूनही का बदलत नाही यावर विचार व्हावा.

- फेसबुक पोस्ट