Sunday, March 1, 2015

नॉकआउट अभिव्यक्ती

‘एआयबी नॉकआउट’च्या ‘रोस्ट ऑफ रणवीर सिंग अँड अर्जुन कपूर’ मुळे वादंग निर्माण झालं आहे. यूट्यूबवर जेव्हा मी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा हा कार्यक्रम वादाला आमंत्रण देईल असं वाटून गेलं होतं. ते पुढे खरं ठरलं. यूट्यूबवर जो व्हिडिओ उपलब्ध आहे त्याच्या सुरुवातीला ‘एडिटेड फॉर यूट्यूब’ अशी सूचना आहे. म्हणजे प्रत्यक्ष कार्यक्रमात कदाचित अजून ‘मटेरियल’ असेल!

नाटकाचं स्टेज आणि सिनेमाचा पडदा या अशा गोष्टी आहेत की तिथे जे व्यक्त केलं जाऊ शकतं ते प्रत्यक्षात केलं तर त्याला समाजमान्यता मिळेलच असं नाही. शिवाय स्टेजवर किंवा पडद्यावर काय करावं, बोलावं याबाबतही साधारण संकेतांच्या बाहेर काही गेलं की प्रतिक्रिया उमटू लागतात. अनेक वर्षांपूर्वी ‘चोली के पीछे क्या है?’ हे गाणं वादग्रस्त ठरलं होतं. गाणं गाजलं, वाद शमला आणि त्यानंतर मग बरीच द्विअर्थी गाणी आली, ज्यांचं कुणाला फारसं काही वाटलं नाही. आज आयटम साँगचे शब्द कुणाला दुखावत वगैरे नाहीत. त्यात काव्यगुण नसले आणि बरेचदा या गाण्यांचा रोख सवंगतेकडे असला तरी. ‘क्या मै जवानी का अचार डालूंगी?’ असे शब्द असलेलंही गाणं मागे एका चित्रपटात येऊन गेलं होतं. वास्तविक आयटम साँगसुद्धा कलात्मक उंची गाठू शकतं हे गुलजारसारखा प्रतिभावंत जेव्हा 'कजरारे’ किंवा ‘बीडी जलायले’ सारखी गाणी लिहितो तेव्हा पटतं. पण गोची तिथेच आहे. 

ही गोची आहे आकलनाची, अनुभवाची आणि दृष्टीची. मी आणि माझ्यासारख्या अनेकांची (ज्यांचा संगीत या विषयाचा खूप अभ्यास नाही) संगीत या कलेबाबत जी भूमिका आहे त्यात शब्दरचनेचं सृजनात्मक सौंदर्य, संगीतातील माधुर्य  याला महत्त्व आहे. अभिव्यक्त व्हायला काहीच हरकत नाही, पण प्रत्येक कलाप्रकारामध्ये काही निकष ठरलेले आहेत आणि त्या निकषांवर आधारित असं एक मूल्य घडलेलं आहे, असं मी मानतो. आता पुढचा प्रश्‍न असा येतो की हे मूल्य प्रत्येकानेच मानावं का? याचं उत्तर ‘हो’ असेल तर पुढचा प्रश्‍न येतो की ‘का मानावं?’ या प्रश्नावर मी कदाचित कलेचं प्रयोजन काय असावं, नुसतंच थिरकायला लावण्यापेक्षा जर एखाद्या गीताने शब्द आणि सूर यांच्या माध्यमातून एक उन्नत अनुभूती दिली तर मला ते जास्त आवडेल' असं उत्तर देऊ शकतो.  आता यावर 'जी उन्नत अनुभूती मला गुलजारच्या शब्दांतून मिळते तीच मला यो यो हनीसिंगच्या शब्दांतून मिळते' असा कुणाचा दावा असेल तर तो मला समजू शकणार नाही, पण असा दावा कुणीतरी करतंय याची नोंद मला घ्यावी लागेल. कलेविषयी तुमची मूल्यदृष्टी तयार असली तरी त्याच्या सर्वस्वी विरोधी मूल्यदृष्टीदेखील असू शकते हे मला मान्य करावं लागेल. 

एआयबीच्या त्या व्हिडिओमुळे काही भुवया उंचावल्या गेल्या, आक्षेप घेतले गेले. श्‍लील-अश्‍लीलतेबाबतचे आक्षेप साधारण कुणाकडून घेतले जाऊ शकतात हे आपल्याला माहीत आहे. इथेही तसंच घडलं. आक्षेपाचं मुख्य कारण स्टेजवरून उच्चारल्या गेलेल्या अश्‍लील शब्दांशी जोडलेलं होतं. आता ‘अश्‍लील’ ही संकल्पना मुळात गोंधळात टाकणारी आहे. अश्लीलतेचा निर्णय घेणं कठीण असलं तरी अभिव्यक्तीचा विचार करताना मला असं वाटतं की जे बोललं जातं, केलं जातं त्याच्यामागे जी मनोवृत्ती आहे ती काय आहे हे कळणं महत्त्वाचं आहे. ही मनोवृत्ती उपभोगाची, लालसेची आहे की अनुभवाची, आस्वादाची आहे यावर श्‍लील-अश्‍लील अवलंबून असतं. हे थोडं विशद करायला हवं. मुळात एक असं मान्य करू की समाजधारणा साधारण ज्याप्रकारे झाली आहे आणि आज होते आहे त्यात काही गोष्टी गैर मानल्या गेल्या आहेत. हे असं आहे एवढं फक्त आत्ता मान्य करू. ते पटतंय, पटत नाही हा मुद्दा बाजूला ठेवू. तर स्वीकारार्ह काय आणि त्याज्य काय हे ठरलं आहे आणि त्या पायावर आपल्या सगळ्यांची मनं घडली आहेत. आपला पाठिंबा किंवा आपला विरोध याच्या मुळाशी हा पाया आहे. (यात इतिहास आणि संस्कृतीत गुंतलेले बारीक असे पुष्कळ धागे निघू शकतील, पण सध्या त्या विच्छेदनात जायला नको.) साधारण एका पायावर उभ्या असलेल्या समाजातही विविध मनोवृत्ती आहेत. प्रसंगानुरूप त्या समोर येतच असतात. पण यातला एक मुख्य फरक उपभोग आणि अनुभव हा आहे. उपभोग, लालसा तुम्हाला 'कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही किमतीवर अमुक एक गोष्ट हवीच' इथे आणून सोडते. या मनोवृत्तीत संयमाला स्थानच नसतं. हिंदी चित्रपटांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक प्रसंग, नाच, गाणी या उपभोगाच्या वृत्तीतून घडतात आणि कलात्मक उंची अजिबात गाठू शकत नाहीत. 'हे न करून चालणार आहे, आपल्याला जर कलात्मक उंची गाठता येत नाही तर आपण हे कामच करायला नको' या विचाराला तिथे जागाच नसते. कलात्मक उंची म्हणजे काय असा विचारही मुळात होत नाही. अशी अभिव्यक्ती मग अश्लील होते! त्यात अगदी थेट शिव्या वगैरे नसल्या तरी. (अनेक हिंदी-मराठी मालिका म्हणजे भावनिक पोर्नोग्राफी असते असं मला वाटतं ते याच अर्थाने!) दुसरीकडे अनुभवाच्या, आस्वादाच्या मनोवृत्तीत संयमाला स्थान असतं. संयम हा माणसाने मनाची मशागत करून कमावलेला गुण आहे. आपल्याला जगण्याच्या विविध बाजूंना स्पर्श करायचाय, माणूस हा देहरुपात अस्तित्वात असला तरी त्याचं आंतरिक रूप, आंतरिक गुंते शोधायचा प्रयत्न करायचाय आणि त्यामुळे वरवरच्या प्रदर्शनाला स्थान नाही या विचाराने इथे कलानिर्मिती होते. चांगली कला, अभिजात दृष्टी ही मनोवृत्तीशी जोडली की मग गुलजारची जीवनदृष्टी आणि हनीसिंगची जीवनदृष्टी यातला फरक लक्षात येतो. ‘हनीसिंगची जीवनदृष्टी’ हे जरा मनोरंजक वाटेल, पण मला वाटतं की ‘जीवनदृष्टी’ प्रत्येकामध्ये असतेच. तिचा परिघ कुठे, कितपत विस्तारलेला असतो हा वेगळा मुद्दा. 

या उहापोहाच्या पार्श्वभूमीवर अंतिम मुद्दा सापेक्षतेचा. आपल्याला जे वाटतं, ते 'वाटण्या'च्या पातळीवर असल्याने सगळी चर्चा व्याख्यांच्या पलिकडे जाऊन 'वाटण्या'पाशी थांबते. म्हणजे एखाद्याला गुलजारचे शब्द जर अश्लील वाटले तर त्याने मी भडकून जायचं कारण नाही. त्याला तसं वाटलं आहे ही वस्तुस्थिती मी स्वीकारली पाहिजे. माझं मत मी द्यावंच, पण जाणिवांची संपूर्ण वेगळी टोकं असू शकतात हे मला मान्य करावं लागेल. हे घडणं अपरिहार्य आहे कारण अभिव्यक्ती, कलात्मक निर्मिती ही नियमबद्ध, 'गणिती' निर्मिती नाही. ती संमिश्र , 'सब्जेक्टिव्ह' निर्मिती आहे. 

मनोवृत्तीचा विचार करून एआयबीच्या शोकडे पाहिलं की असं लक्षात येईल की हा हिंदी सिनेसृष्टीतील कुठल्याही मनोरंजक शोसारखा शो आहे. हिंदी चित्रपटांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात जशी उणीदुणी काढली जातात तशी ती इथेही काढली गेली. अर्थात फरक हा होता की ‘उणीदुणी काढणे’ हीच या शोची मुख्य थीम होती. त्यामुळे संपूर्ण शोमध्ये एकमेकांवर शेरेबाजी केली गेली, शिव्याशाप दिले गेले. काही टिप्पण्या अतिशय खोचक आणि दर्जेदार विनोदीही होत्या. गडबड झाली ती लिंग-योनीवाचक शब्दांच्या खुल्या वापरामुळे, समलिंगी संबंधांच्या, संभोगक्रियेच्या आणि हस्तमैथुनाच्या खुल्या उल्लेखामुळे. 

ही जी ‘गडबड’ झाली आहे ती एका विशिष्ट मानसिक घडणीच्या लोकांची झाली आहे. त्यांना संस्कृतीची आणि संस्कारांची काळजी वाटते. पण संस्कृती ज्या पिढीच्या हातात जाणार आहे, जाते आहे त्या पिढीने ‘एक भन्नाट विनोदी कार्यक्रम’ म्हणून तो बघून सोडूनही दिला आहे. कदाचित त्यांच्यापैकी काहींना त्यातले काही विनोद आवडले नसतीलही, पण म्हणून काही त्याची तक्रार करावी असं कुणाला वाटलं नाही. (खरं सांगायचं तर करण जोहरचे काही चित्रपट या शोपेक्षा त्रासदायक आहेत!) मला असं वाटतं की वरच्या पिढीतील अनेकांना या पिढीची भाषा आणि मानसिकता लक्षात येत नाहीये. इंग्लिशचा सहज वापर हीदेखील एक मर्यादा असू शकते. बरं, भाषा समजली तरी मानसिकता कळणं अवघड आहे. ‘दिल्ली बेली’ हा एक अप्रतिम चित्रपट आहे. या चित्रपटातील भाषा सगळ्यांना कळेल, रुचेल अशी नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनय देव यांनी त्यांच्या आईला - सीमा देव यांना चित्रपट दाखवल्यावर त्यांची प्रतिक्रिया 'यात फारच शिव्या आहेत रे, मला नाही आवडला’ अशी होती असं अभिनय देव यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. सीमा देव यांची अशी प्रतिक्रिया येणं हे अतिशय स्वाभाविक आहे. त्यांच्या पिढीला नवीन भाषा, नवीन मानसिकता कळणं खरंच अवघड आहे. आणि हे समजून घेणं हे आमचंच काम आहे. विजय तेंडुलकरांनी त्यांच्या पिढीविषयी खंत व्यक्त केली होती. बाकी क्षेत्रांचं माहीत नाही पण साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात वरच्या पिढीने टाकाऊ काम नक्कीच केलेलं नाही. जुन्या हिंदी चित्रपटांचं संगीत, त्यातील गाणी हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे इतकं मोठं काम त्या कलावंतांनी करून ठेवलं आहे. त्यामुळे तो काळ जगलेल्यांना जर एखादी गोष्ट आवडली नाही तर त्यांना दोष देता येणार नाही. हा दोन पूर्णपणे वेगळ्या 'फ्रेम ऑफ माइंड'चा फरक आहे. जी मनं काही आदर्शांनी घडली आहेत, ज्यांच्या दृष्टीने साधं-सरळ जगणं, लैंगिकतेचं नियोजन फक्त लग्नातूनच करणं हा संस्कारांचा भाग आहे त्यांची मानसिकता समजून घेतलीच पाहिजे. 

पण होतं असं की नवता स्वीकारणं अवघड असलं तरी त्यामुळे दोघेजण दोन टोकांना लांबवर गेले की काही देवाण-घेवाणच होऊ शकत नाही. काही थेट शब्दप्रयोगांमुळे धक्का बसणं हे अगदीच समजण्यासारखं आहे. परंतु अभिव्यक्तीच्या त्या प्रकाराने मला धक्का का बसला, त्यात मला काय चुकीचं वाटलं आणि ते एकूणात चांगलं का नाही याचं विश्‍लेषण करता येणं आवश्यक आहे. ‘क्या मै जवानी का अचार डालूंगी’ हे शब्द कानावर आघात करतात पण ते का आघात करतात याची मांडणी मला करता आली पाहिजे. आणि त्या चर्चेनंतरही एक अपेक्षित निकाल ‘आपले मार्गच वेगळे आहेत’ असा लागूच शकतो. आणि एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करून हे मार्ग वेगळे होऊ शकतात. म्हणजे मी गुलजारलाच ऐकेन आणि दुसरा एखादा ‘जवानी का अचार’ ऐकेल. पण सवंग निर्मितीत रमणाऱ्यांनी हेही लक्षात घ्यायला हवं की सवंगपणा काही काळापुरता लोकप्रिय होत असला तरी जे अभिजात आहे ते टिकतंच. भोवताली इतका गदारोळ सुरू असतानाही ‘प्यासा’ किंवा ‘मधुमती’ मधली गाणी आजही टिकतात, १९६३ सालची ‘कोसला’ टिकते, १९८३ सालचा ‘जाने भी दो यारो’ टिकतो. एआयबी रोस्ट हा एक  उल्लेखनीय कार्यक्रम आहे का? माझ्या मते नाही. का नाही? कारण मला उन्नत करेल, अस्वस्थ करेल असं त्यात काहीही नाही. तो रंजक आहे का? आहे. इंग्लिशमध्ये ’रेझ अ टोस्ट’ असा शब्दप्रयोग आहे. त्याचा अर्थ एखाद्याच्या सन्मानार्थ मद्याचा चषक उंचावणे असा होतो. या टोस्टच्या बरोबर उलटा प्रकार म्हणजे ’रोस्ट’. यात लोकांना आमंत्रित करून त्यांची ’खेचली’ जाते, अपमानही केला जातो – पण हे सगळं हेतुपूर्वक केलं जातं, विनोदाच्या आवरणाखाली केलं जातं. अमेरिकन आणि ब्रिटिश टेलिव्हिजनवर ’रोस्ट कॉमेडी’चे कार्यक्रम होतात. एआयबीच्या रोस्टमध्येही काही ’भंकस’ मस्तच होती. या कार्यक्रमाकडे फार गांभीर्याने बघायला हवं का?  नाही. बघून सोडून द्यावा असा हा कार्यक्रम आहे.  

एआयबीसारखेच टीव्हीएफ, बीइंग इंडियन हे यूट्यूब चॅनल्स जबरदस्त विनोदी व्हिडिओ तयार करत आहेत. त्याचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. या मंडळींची सृजानात्मक ताकद, निरीक्षणशक्ती, विनोदाची समज फारच चांगली आहे आणि त्यातून ते हिंदी सिनेमा, राजकारण, टिपिकल भारतीय मनोवृत्ती यावर झकास भाष्य करत आहेत. आलिया भटच्या अज्ञानी असल्याबद्दल तिची मनसोक्त खिल्ली उडवली गेली. पण नंतर आलिया भटला घेऊन एआयबीने ‘जीनियस ऑफ द इयर’ हा व्हिडिओ तयार केला. एकेमेकांची खुलेपणाने टर उडवणं ही स्वागतार्ह गोष्ट मानली पाहिजे. शिवाय सोशल मीडियामुळे प्रत्येकाच्या ‘क्रिएटिव्हीटी’ला उधाण आलं आहे आणि प्रत्येकाला काहीतरी बोलायचंय ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच सगळं विश्‍लेषण होणं गरजेचं आहे. 

सामाजिक वास्तव आणि कलाकाराची भूमिका हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यातही सामाजिक वास्तव आणि विनोदाची भूमिका हा एक उपविषय आहे. एआयबी किंवा इतर मंडळी जे करतात त्यातील सृजनात्मक आनंद अनुभवायला मला मजा येतेच, पण त्यापलीकडे जाऊन ही मंडळी आजच्या आर्थिंक-सामाजिक वास्तवाच्या विविध पैलूंना समजून घेऊ शकतात का ही मला उत्सुकता आहे. रणवीर सिंग किंवा अर्जुन कपूरवर विनोद करणं ठीकच आहे, पण विनोदाचं धारदार हत्यार महत्त्वाच्या अशा इतर अनेक ठिकाणी ते वापरू शकले तर बरंच होईल. 'बीईंग इंडियन' या इंटरनेट चॅनलने 'आय अ‍ॅम ऑफ़ेंडेड' हा दीड तासाचा व्हिडीओ तयार केला आहे. भारतात नव्याने उदयास आलेल्या 'स्टॅंड अप कॉमेडी' या प्रकाराबद्दल आणि भारतीय मानसिकतेबद्दल अनेक स्टॅंड अप कॉमेडियन्सनी यात त्यांची मते मांडली आहेत. जरूर बघावा असा हा व्हिडीओ आहे. एआयबीच्या टीमपैकी एक गुरसिमरन खंबा यानेही यात भाग घेतला आहे.  

या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मणी रत्नमच्या ‘युवा’ या चित्रपटातील एक प्रसंग आठवतो. ‘युवा’ ही तीन भिन्न स्तरातल्या युवकांची कथा आहे. यातला एक (विवेक ओबेरॉय) इंजिनियरिंग करून पुढे शिकू इच्छिणारा आहे. परीक्षा संपवून तो घरी येतोय. स्टेशनवर त्याचे निवृत्त आयएएस अधिकारी वडील (शंकर नाग) आणि धाकटा भाऊ त्याला घ्यायला आले आहेत. ट्रेनमध्ये कॉलेजमधली एक मुलगी आणि तो यांच्यातील चुंबनाचा एक सीन दिसतो. ट्रेन थांबल्यावर हा उतरतो आणि वडील-भावाला भेटतो. वडील विचारतात, 'पास होशील ना?' तेवढ्यात मागून ती मुलगी येते आणि त्याच्या गालाचं चुंबन घेऊन बाय करते. 'आय लव्ह यू, मला फोन कर' वगैरे म्हणते आणि निघून जाते. वडील हे सगळं बघतायत. ते काहीही बोलत नाही. पुन्हा विचारतात, ‘पास होशील ना?’ तो 'हो' म्हणतो आणि तिघेही चालू लागतात. वडील एकदाही ती मुलगी कोण होती वगैरे विचारत नाहीत. पुढे काय करणार असं विचारल्यावर तो आयएएस करायचं आहे असं म्हणतो. त्यावर वडील आयएएस करणं म्हणजे जोक नाही, आयएएस होण्यासाठी देशासाठी काहीतरी करायची ऊर्मी असावी लागते असं सांगत चर्चा करतात.   

संस्कृतीरक्षकांनी या वडिलांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा!

(अनुभव, मार्च २०१५)