Friday, November 1, 2013

टु वेड ऑर नॉट टु वेड

'चूक' आणि 'बरोबर' यांची कुस्ती बहुधा माणूस अस्तित्वात असल्यापासून सुरू असेल. अनेक बाबतीत चूक काय आणि बरोबर काय हे स्पष्ट दिसत असलं तरी अनेक बाबतीत ते तसं दिसत नाही. व्यक्ती, व्यक्तीच्या इच्छा- प्रेरणा आणि समाज, समाजाचे संकेत यातील द्वंद्व त्याला कारणीभूत आहेच. शिवाय व्यक्ती-व्यक्तींमधील धारणांचा फरकही चूक-बरोबरच्या व्याख्या बदलू शकतो. आणि 'पूर्णपणे चूक' किंवा 'पूर्णपणे बरोबर'च्या मध्ये 'थोडसं चूक' आणि 'थोडसं बरोबर' हे खेळाडूही आपली इनिंगची वाट पाहत असतातच. 

एक गोष्ट मात्र नक्की की 'आपलं चुकलं' ही जाणीव जागी असणं चांगलंच. 

लग्न या प्रकाराबाबत मी बराच गोंधळात होतो. लग्न झालं तेव्हा मी तीस वर्षांचा होतो. आज माझ्या लग्नाला सहा वर्षं झाली आहेत आणि लग्नाविषयी शंका, अडचणी असणारा मी लग्न करून आनंदात आहे. यात अर्थातच माझं कर्तृत्व काही नाही. जोडीदाराचा शोध सुरू असताना मला मनासारखी (खरं तर अपेक्षेहून जास्त मनासारखी) जोडीदार मिळाली इतकंच. त्याआधीच्या आठ-नऊ वर्षांत दोन पॉवरफुल प्रेमं केली होती. त्यातलं एक एकविसाव्या वर्षी आणि दुसरं, जे अपघाताने घडलं, अठ्ठाविसाव्या वर्षी. पण मला जे सांगायचं आहे, जे कन्फेस करायचं आहे, ते यापैकी काही नाही. मात्र ते एका मुलीबद्दलच आहे आणि तिच्याबाबतीत लग्नापर्यंत येऊन पोचलो होतो तरी ते 'प्रेम' नसून ती माझ्याकडून झालेली एक गफलत होती. 

ती माझी कॉलेजातली मैत्रीण. अभ्यासात हुशार. इंजिनियरिंग करून पुढे अमेरिकेला गेली होती. मग तिथे नोकरी आणि भारतात परत. काही वर्षं नोकरी. मी या काळात पुण्यात नोकरी करत होतो. (नोकऱ्या बदलत होतो असं म्हणणं जास्त योग्य होईल!) आमचा मेलवर सतत संपर्क असायचा. तिच्या बुद्धीमत्तेचं, स्वतंत्र विचारांचं मला आकर्षण वाटे. एका क्षणी मी तिला मेलवरून 'तू मला आवडतेस' असं कळवलं होतं. तिचा होकार होता. 

ती भारतात आल्यावर आमच्या प्रत्यक्ष भेटी होऊ लागल्या. आणि त्यादरम्यान मला काही वेगळं वाटू लागलं. म्हणजे आपल्याला हिच्याबद्दल नक्की प्रेम आहे की ही इतर मुलींसारखी नाही याचं आकर्षण फक्त आहे? प्रत्यक्ष सहवासातून काहीएक धारदार प्रेम, भावनिक ओढा उत्पन्न होतो तो होत नव्हता. एकूणात 'इट इज नॉट वर्किंग' असं लक्षात आल्यावर मी तिच्याशी मोकळेपणानं बोललो आणि आम्ही थांबायचा निर्णय घेतला. 

इथपर्यंत खरं तर सगळं ठीक होतं. ब्रेक-अप होतातच. नात्यांमधलं एक सत्य आहेच ते. पण माझ्याकडून जी गफलत झाली ती नंतर. या ब्रेक-अप नंतर एका वर्षाने, काहीच कल्पना नसताना एक 'अपघाती' भावनिक उलथापालथ घडली. यात माझी एक दुसरी जुनी मैत्रीण गुंतलेली होती. तो काळ बराच अवघड होता. मानसिक स्थिरता नव्हती आणि एकूणच अतिशय हतबल झाल्यासारखं वाटत होतं. (देवदास पुरूषांचाच का होतो, स्त्रियांचा का होत नाही यावर संशोधन करायला हवं!). या कथेतली गुंतागुंत सगळी सांगता येणं इथं शक्य नाही, पण थोडक्यात सांगायचं तर 'अचानकपणे आलेल्या वादळात' सगळं 'सैरभैर' वगैरे होतं तसं झालं होतं. त्या गोंधळाच्या, व्यक्तिगत दुःखाच्या काळात मी वर्षभरापूर्वी ब्रेक-अप झालेल्या मैत्रिणीकडे पुन्हा वळलो आणि ते माझं चुकलं. त्या मनस्थितीत मी दूरचा विचार करू शकलो नाही. मानसिक स्थिरता नसताना कुठलाही निर्णय घेऊ नये हे मला कळलं नाही. मुळात जिच्याविषयी आपल्या मनात काही भावना नाहीत, मैत्रीण म्हणूनच केवळ जी आपल्याला हवी आहे, तिला पुन्हा नात्यात ओढणं चुकीचं होतं. त्याचा परिणामही अपेक्षितच झाला. पाया भक्कम नसल्याने वरचं काहीच टिकणारं नव्हतं. त्यामुळे मग तिच्याशी लग्नाच्या निर्णयापर्यंत गेलेली गाडी मागे आली. तिला पुन्हा एकदा 'नाही' म्हटलं. तिच्या घरी मी कॉलेजच्या दिवसांपासून माहीत होतो. तिचा चांगला मित्र म्हणून. लग्नाचं ठरल्यावर मी तिच्या आई-वडिलांना भेटलोही होतो. ती माझ्या आई-वडिलांना भेटली होती. आणि एवढं सगळं झाल्यावर मी 'नाही' म्हणालो!

आपण लग्नाचा वगैरे निर्णय घेतो आहोत पण हे काही खरं नाही ही जाणीव तीव्र झाल्यामुळेच मी नाही म्हणालो. लग्नाबाबत माझा निर्णय पक्का होत नाही आहे याची झलक खरं तर माझ्या वागण्या-बोलण्यातून मिळत असणारच. पण तरीही तिने माझ्यावर विश्वास ठेवला होता. 

अंतिम निर्णय 'नाही' असा ठरल्यावर मग आमचा संपर्क जवळजवळ संपलाच. एक-दोनदा फोन झाला असेल. एकदा एका कार्यक्रमात भेट झाली. तेव्हा कसलीच कटुता नव्हती हे विशेष. 

माझ्याकडून 'नाही' असं ठरल्यानंतर मी अजून एक केलं. आता ती लग्न करेल का (ती माझ्याहून दोन वर्षांनी मोठी आहे) या चिंतेपेक्षाही तिला सोबत मिळेल का, मुख्य म्हणजे लग्न नाही केलं तर शारीरिक गरजेचं काय हे प्रश्न मला पडले होते. आता यावर 'तू हा विचार करायचं काहीच कारण नाही, तुझा निर्णय तू घेतलास ना? मग बाकीची चिंता कशाला?' असंही कुणी म्हणेल. पण त्यावेळेला मला ती चिंता वाटली खरी. मुळात माझी शारीरिक सुखाबाबतची भूमिका अशी होती (आणि आहे) की या सुखाकरता माणसाला लग्न करायला लागू नये. लग्न हे सोबतीसाठी, स्थैर्यासाठी ठीक आहेच, पण शारीरिक सुखासाठी लग्न हे फारच बोअरिंग आहे. शारीरिक गरज ही एक जैविक गरज आहे आणि समज असलेल्या स्त्री-पुरूषांना ती परस्पर समजुतीने पूर्ण करता येईल इथपर्यंत त्या समाजाचा विकास झालेला असावा. या धारणेतून मी तिला एका मेलमध्ये म्हटलं की आपण लग्न करणार नसलो तरी तुझी इच्छा असेल तर शारीरिक संबंधांसाठी मी तयार आहे. यात ‘तिला हे सुख सहज मिळेल का?’ याची चिंता अंतर्भूत होती. माझा उद्देश वगैरे ठीक असला तरी मी असं लिहिल्याचा तिच्यावर काय परिणाम झाला असेल असं मला अलीकडे एकदा विचार करताना वाटलं. मी काहीतरी 'ऑफर' करतो आहे आणि ते आमच्या ब्रेक-अपच्या पार्श्वभूमीवर, याचा तिला राग आला असल्याची शक्यता आहे.  

या घटनेनंतर तिने लग्नाचा धसका घेतला असेल का? आता लग्न वगैरे नकोच असं ती म्हणाल्याचं मला आठवतंय. लग्न-संसार या गोष्टींबाबत ती फारशी उत्साही नव्हती (माझ्यासारखीच). शिवाय ती 'साच्यातली' मुलगी नसल्याने अशा गोष्टीचा एखाद्या 'साचेबद्ध' मुलीला होईल तितका त्रास तिला झाला नसेल असाही माझा कयास होता. पण हे सगळं खात्रीलायकरित्या कसं सांगणार? शिवाय असं जरी काही झालं नसलं तरी चूक ती चूकच राहते!

आज हे आठवताना अपराधी वाटतंच आणि अर्थातच आता काही बदल होऊ शकत नाही ही भावना त्यात भर घालते. मात्र असं असतानाही मी लग्न केलं, सोबतीचा आनंद घेतला, एकूणात व्यक्तिगत आयुष्यात सुखी झालोच. त्यामुळे विचार करताना मला नेहमी वाटतं की मी किंवा अजून कुणी - विविध प्रकारची, कमी-जास्त ओझी घेऊन 'जगत' असतातच. जगणं सुकर व्हावं ही मूलभूत, स्वार्थी प्रेरणा जागी असतेच. दुसरं मला वाटतं की सामाजिक रचितं माणसाची चांगलीच गोची करू शकतात. बहुतेक वेळा हे बघायला मिळतं की 'लग्न' हा एकमेव पर्याय उपलब्ध असल्याने निर्णयाचा गोंधळ उडतो. एखाद्या व्यक्तीबरोबर काही काळ राहून मग लग्नाचा निर्णय घेणं हा तार्किक मार्ग (जो पाश्चिमात्य देशांमध्ये उपलब्ध आहे) उपलब्धच नसल्याने 'एक निर्णय - आयुष्यभरासाठी' याचं फार दडपण येतं. अर्थात यात व्यक्तीसापेक्षताही आहे. जिथे मी कमी पडलो तिथे कदाचित दुसरा एखादा नीट हाताळणी करूही शकला असता. ‘विशिष्ट माणूस’ ‘विशिष्ट परिस्थितीत’ असताना त्याला ‘विशिष्ट मदत’ मिळाली तरच बहुधा चुका टळू शकतात! मानवी संबंधात चुकांमुळे येणारं दुखावलेपण टाळता येऊ शकतं. 
'कन्फेस' करावं असं माणसागणिक बरंच काही असू शकेल. आपल्या खासगी अस्तित्वाची पट्टी लावून बघितलं तर बऱ्याच गोष्टी मोजता येतात. सामाजिक अस्तित्वाची पट्टी लावली तर कदाचित आपण सगळे फारच गंभीर गुन्हे करतो असं लक्षात येईल! पण हरकत नाही. व्यक्तिगत आयुष्याकडे जरी आपण नग्न होऊन पाहू शकलो तरी ते एक चांगलंच लक्षण. सामाजिक अस्तित्व निर्दोष व्हायला त्यामुळे मदतच होईल!

-  पुरूष उवाच, दिवाळी २०१३. ‘कन्फेशन बॉक्समधून' या विभागातील लेख)

प्रस्तुत लेखात शारीरिक समाधानाबाबत जो मुद्दा आला आहे त्याचा नंतर केलेला विस्तार -  

मी वरील घटनाक्रम एकदा एका लेखिकेशी गप्पा मारताना बोलण्याच्या ओघात त्यांना सांगितला होता. मी स्वतःला ऑफर केलं हे जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा त्यांना ते रुचलं नाही. हेतू चांगला असला तरी त्या मुलीला कसं वाटलं असेल याचा विचार कर असं त्या म्हणाल्या. त्यांचं मत ऐकल्यावर मला असं वाटलं की खरंच आपलं चुकलं. मी त्यावर अजून विचार केला. आपण जेव्हा तिला असं म्हटलं तेव्हा आपल्याला स्वतःला तिच्याबद्दल शारीरिक आकर्षण वाटत होतं का? तर ते नव्हतं वाटत. पण तरी मी तयार होतो का? होतो. त्यात उपकाराची भावना होती का? नव्हती. माझ्या लेखी तो मला मान्य असलेला एक परस्पर संबंध होता. एका गरजेची चाचपणी करणं आणि त्या गरजेचं समाधान करणं होतं. 'तिचं समाधान' या एका प्रमुख मुद्द्यासाठी मी ते  करत होतो हे खरं आहे. 
   
याला रूढ अर्थाने पुरूष वेश्या असं म्हणता येणार नाही कारण यात आर्थिक व्यवहार नाही. (अर्थात वेश्यावृत्तीही वाईट नसते.) मग मला असं जाणवलं की यात तत्त्वतः काही गैर नाही. आता शरीराची गरज जर दुसऱ्या शरीरानेच पूर्ण होऊ शकते, तर त्यात भयंकर असं काय आहे? हा मानसिकतेचा मुद्दा आहे, द्वंद्वात्मक मुद्दा आहे हे अगदी बरोबर आहे. ही गोष्ट न आवडणं किंवा न पचणं समजण्यासारखं आहे. पण हे न आवडणारं किंवा न पचणारं असलं तरी शारीरिक समाधानाबाबत या दृष्टीकोनातून मार्ग निघू शकतो असं मला वाटतं. लैंगिक समाधानाची प्रगल्भ अशी एक व्यवस्था जर आपल्याला लावायची असेल तर असा विचार करावा लागेल. मी आधी म्हटलं तसं वेश्यावृत्ती ही अजिबात हीन वृत्ती नव्हे. मला तर वेश्येला कमी लेखणं वगैरे कधी झेपलेलंच नाही! वेश्येचा अनादराने उल्लेख होतो तेव्हा मी भयंकर अस्वस्थ होतो. कारण हा ढोंगीपणाचा कळस आहे. वेश्याव्यवस्थेत प्रश्न आहे तो आर्थिक आणि शारीरिक शोषणाचा. ते खरं आव्हान आहे. त्यावर काहीही करण्याची क्षमता नसणारे वेश्येला हीन ठरवून मोकळे होतात.  

दुसरा मुद्दा हा की लग्नव्यवस्थेच्या अंतर्गतदेखील लैंगिक समाधान हे कायम दुहेरी आनंदाचं असतं असं नाही. आपल्या बाकी सर्व गरजा एकेकट्याच्या असल्या तरी या गरजेला दुसरा माणूसच लागतो ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यासाठी एकच माणूस असणं याचा स्त्री-पुरूष दोघांनाही कंटाळा येणं हे समजण्यासारखं आहे. त्यामुळे लग्नव्यवस्थेच्या आत किंवा बाहेर ही अडचण स्पष्ट असताना त्याचं निराकरण करणारी व्यवस्था लावायचा विचार करण्यात संकोच वाटायचं काही कारण नाही. अर्थात लग्नपूर्व आणि लग्नोत्तर ही गरज ज्यांना भासते अशांच्या दृष्टीकोनातून हा विचार करावा लागेल. लग्नव्यवस्थेत जे समाधानी आहेत त्यांचा हा प्रश्न नाही. किंवा लग्नाआधीदेखील ज्यांची अडचण होत नाही त्यांचा हा प्रश्न नाही.   

यात स्त्री-विशिष्ट, पुरूष-विशिष्ट आणि समाजधारणा-विशिष्ट असे मुद्दे गुंतलेले आहेत. यातला मुख्य मुद्दा म्हणजे लैंगिक समाधानाबाबततचा साधारण पुरूष दृष्टीकोन व साधारण स्त्री दृष्टीकोन आणि त्यातील द्वंद्व. लैंगिक समाधानाच्या प्रगल्भ व्यवस्थेत यावर विचार व्हायला हवा. आणि आपल्याला मूल्याधिष्ठित समाजधारणा हवी आहे हे लक्षात ठेवणं अर्थातच अपेक्षित आहे. 'प्रगल्भ व्यवस्था' हा शब्दप्रयोग त्यासाठीच योजला आहे. पुरेसा विचार असल्याशिवाय लैंगिक समाधानासारख्या  तशा नाजूक विषयाला (आपल्या समाजात याबाबत नाजूकपणाबरोबर ढोंगीपणाही दिसतो) सामोरं जाणं घातक ठरू शकेल. आता 'प्रगल्भ व्यवस्था' म्हणजे नक्की काय? तर शारीरिक गरजेची पूर्ती करावीशी वाटेल तेव्हा या गरजेचं 'नियमन' करण्याच्या उद्देशाने आखलेली व्यवस्था. यात स्त्री-पुरूष संबंधांमधील मोकळेपणाइतकंच 'गरजेचं नियमन' म्हणजे 'कुठल्याही किमतीवर गरजेची पूर्ती' नव्हे हा विचार रूजणं आवश्यक आहे. वयात आलेल्या मुला-मुलींनी शारीरिक गरज पूर्ण करणे यात काहीच गैर नाही, परंतु इतर कुठल्याही गरजेच्या पूर्तीला जो संयमाचा नियम आपण लावतो, जे तारतम्य आपण बाळगतो ते बाळगणं आवश्यक आहे. यात बरेच प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे मी ज्या व्यवस्थेचं सूतोवाच केलं आहे त्याबाबत अधिक खोलात मांडणी करावी लागेल याची मला कल्पना आहे.