Tuesday, December 17, 2019

पुरूषातून 'माणूस' घडवण्याचा प्रश्न

आपलीच असं नव्हे तर जगभरातली आजवरची साधारण समाजव्यवस्था, या व्यवस्थेेने घडवलेलं समाजमानस आणि त्यातून उभे राहिलेले स्त्रियांचे प्रश्न यावर चर्चा होणं, त्यावर काम होणं, सामाजिक सुधारणा होणं, कायद्यात सुधारणा होणं ही प्रक्रिया सुरू होऊन बराच काळ लोटला असला तरी मुळापाशी अजून बरंच काम व्हायची गरज आहे याची साक्ष पटवणारे प्रसंग वरचेवर घडत असतात. बलात्कार व हिंसेच्या अमानुष घटनांनी देश हदरून जात असतानाच मेघना गुलजार या संवेदनशील दिग्दर्शकाच्या नव्या चित्रपटाच्या ट्रेलरने स्त्रीला केवळ ती स्त्री आहे म्हणून ज्या गोष्टींचा सामना करावा लागला आहे त्यातीलच एका, काहीशा विस्मृतीत गेलेल्या गोष्टीला उजाळा मिळाला आहे. ‘छपाक’ या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पडुकोण आपल्याला अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या तरूणीच्या भूमिकेत भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मी अग्रवाल या मुलीच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटातून लक्ष्मी अग्रवालवर झालेला अॅसिड हल्ला आणि तिचा पुढचा लढा आपल्याला दिसेलच, पण या विषयासंदर्भातील प्रमुख प्रश्न अर्थातच 'हे का होतं?' आणि 'हे कसं थांबवायचं?' हे आहेत.

सामाजिक गुन्ह्यांमागची कारणं शोधत आपण त्यांच्या मुळाशी जाऊ लागलो की आपल्याला आपल्याच समाजव्यवस्थेतील अनेक कमकुवत धागे दिसू लागतात. त्यामुळे प्रभावित झालेल्या माणसांतील विविधांगी गुणदोष दिसू लागतात. गुन्हेगार हा 'कारण' आहे की 'परिणाम' आहे हाही प्रश्न आपल्याला पडू लागतो. स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत ते पाहता आपण समाज म्हणून अजूनही स्त्रीच्या मानसिक,शारीरिक उर्मींना पूरक असा पुरूष घडवू शकलेलो नाही हे सिद्ध होतच आहे. अर्थात हे एक ढोबळ विधान आहे. पुरूषांमध्ये बदल झाले आहेत, होत आहेत. आज त्याबाबतचं चित्र आशादायक आहे. मात्र त्याचवेळी विविध स्तरातील पुरूषांसोबत विविध पातळ्यांवर , विविध पद्धतीने काम करणं गरजेचं आहे हेही आधोरेखित होतं आहे. स्त्री- पुरुष संबधाचा विचार करताना प्रेम, मैत्री, आकर्षण, लैंगिक इच्छा या भावभावनांचा अनेकविध छटा आणि त्यांचा या संबंधावरील परिणाम आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. आपल्याला हेही लक्षात घ्यावं लागतं की समाजाची घडी ज्याप्रकारे लागत गेली आहे आणि त्यातून ज्याप्रकारे विविध प्रकारच्या विषमतेला मूक मान्यता मिळत गेली आहे. त्यातून स्त्री-पुरूष संबंधावर मोठा परिणाम झाला आहे. स्त्री-पुरूष संबंध हे इतर मानवी संबंधांसारखेच 'द्वंद्वात्मक' आहेत आणि त्याला स्त्री पुरुषांमधल्या आदिम आकर्षणाची जोड आहे. दोन मित्रांमध्ये भांडण झालं की त्यांच्यात वादावादी होईल, कदाचित मारामारीही होईल. इतर वेगवेगळ्या नात्यांबाबत भांडण, मतभेद वेगवेगळी रूप धारणं करतील. स्त्री-पुरूष नात्यातही, म्हणजे रोमँटिक नात्यातही हे लागू होतं. मात्र रोमॅंटिक स्वरूपाच्या नात्यात किंवा त्या नात्याला सुरूवातदेखील व्हायच्या अगोदर स्वत:ला किंवा दुसऱ्याला उद्ध्वस्त करण्याइतपत टोकाचा विचार माणसाकडून का केला जातो हे समजून घेणं, त्यावर बोललं जाणं आवश्यक आहे.

यात माणूस म्हणजे प्रामुख्याने पुरूष अपेक्षित आहे, कारण एकतर्फी प्रेमातून एखाद्या मुलीला त्रास देणं, प्रेम नाकारलं गेल्यावर तिच्यावर हिंसक हल्ला करणं इथंपासून ते स्वत:चा देवदास करून घेऊन आपलं आयुष्य निराशेच्या गर्तेत लोटून देणं इथवरच्या सर्व प्रकारात पुरूषच अग्रेसर आहेत. यातून 'सामान्यत: पुरूष स्त्रीपेक्षा प्रेमाच्या बाबतील असमंजस व कमकुवत आहे' या विधानाला पुष्टी मिळते. आपल्याला नेमक्या याच मानसिकतेमागील कारणं शोधता यायला हवी आहेत.

स्त्री-पुरुष संबंधामध्ये प्रेम, आकर्षण ही भावना बऱ्याच गुंतागुंतीची आहे. या भावनांच्या मानसशास्त्रीय व जीवशास्त्रीय अंगान केलेल्या तपशीलवार विश्लेषणात जाणं आवश्यक आहेच कारण त्याशिवाय त्यांच संपूर्ण आकलन होणं शक्य नाही. (खरं तर आपण आपल्या प्रत्येकच भावनेचा अभ्यास करायला हवा कारण आपल्या भावनाच आपल्याकडून बरंच काही करून घेत असतात). इथे आपण एक अगदी छोटा प्रयत्न करून बघूया. 

स्त्री-पुरूषांबाबत लैंगिक आकर्षण हा एक आदिम 'फोर्स' आहे. निसर्गाला स्त्री-पुरूष जवळ यायला हवे आहेत कारण त्यातून पुनरूत्पादन होणार आहे. या आकर्षणाच्या वर, मानवी संस्कृतीच्या प्रवाहात जो एक सुंदर स्तर निर्माण झाला आहे तो प्रेमाचा आणि त्याच्या विविध छटांचा आहे. मला असं दिसतं की आज आपल्यासमोरचं आव्हान हे आहे की प्रेम, आकर्षण या संकल्पनांना त्यांच्या कमालीच्या ठोकळेबाज, एकांगी रूपातून बाहेर काढणं आणि त्यांचा अधिक प्रगल्भ, समावेशक अर्थ मुलामुलींच्या मनामध्ये रूजवणं.

प्रेम ही भावना निर्माण कशी होते? आपल्याला अमुक मुलींविषयी जे वाटतं ते प्रेम आहे म्हणजे काय आहे? तिला जर आपल्याविषयी काही वाटतं नसेल तर आपण तिथून मागे का फिरू शकत नाही? एका मुलीने आपल्याला नाही म्हटंले म्हणून आपण तिच्यावर अॅसिड फेकण्याइतके हिंसक का होतो? आपल्या आत असं काय आहे जे आपल्याला इतकं हिंसक बनवतं? हे व असे अनेक प्रश्न पुरूषांनी स्वत:ला विचारणं आणि समाजाने - प्रामुख्याने पालक, शिक्षक, मित्र आणि हितचिंतक यांनी - पुरूषांना त्याबाबत तपासत राहणं फार आवश्यक आहे. स्त्री-पुरूष संबधांना मिळालेलं हिंसेचे हे भयानक परिमाण आपल्याला सामूहिक प्रयत्नानेच नाहीसं करता येईल. मला असं दिसतं की त्यासाठी मुलांच्या वाढीच्या वयात त्यांच्या मानसिक स्वास्थाकडे सतत लक्ष देत राहणं गरजेचं आहे. माणसामध्ये हिंसेची बीज आहेतच. ती पुरूषांमध्ये अधिक प्रमाणात आहेत कारण आपल्या पृथ्वीवरील अस्तित्वाच्या लढाईच्या खूप पहिल्या टप्प्यापासून राज्यव्यवस्थेच्या, समाजव्यवस्थेच्या अलीकडील टप्प्यापर्यंत पुरूषातील आक्रमकता व वर्चस्ववादी वृत्ती यांनी कळीची भूमिका बजावली आहे. पुरूषामधील हिंसेला जैविक आणि समाजरचनेतून मिळालेला सामाजिक असे दोन्ही आधार आहेत. या दोन्हींना ओळखून त्याविषयी पुरूषांना जागं करत राहणं आणि हिंचेची धार कमी करत राहणं हे आपल्याला करावं लागणार आहे.

आजवर हे अनेकदा बोललं गेलं आहे की मुलांना विशेष वागणूक देऊन वाढवणं हे त्यांच्यासाठी आणि समाजासाठी घातक ठरत आलं आहे. त्यामुळे पहिला धडा म्हणून तो आपण लक्षात ठेवायला हवाच. सर्वसाधारणपणे पाहता असं दिसतं की पुरूषामध्ये लैंगिक इच्छा ही स्त्रीपेक्षा जास्त प्रमाणात आपला अंमल गाजवत असते. स्त्री ही 'प्राप्त करण्याची गोष्ट' आहे हे पुरूषाच्या मनोवृत्तीत त्याच्याही नकळत आकार घेत असतं. यात जसा जैविक ऊर्मींचा हात आहे तसाच सामाजिक घडणीचाही हात आहे. त्यामुळे पुरूषाला पारंपरिक पौरूषाच्या कल्पनांपासून जाणीवपूर्वक दूर नेणं हा त्याच्यातील जैविक उर्मीला वळण देण्याच्या प्रयत्नातला एक महत्त्वाचा भाग आहे. सामाजिक विषमता आणि त्यातून स्त्री पुरूष संबंधांवर होणारे परिणाम हा एक विस्तृत आणि वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. त्यावर व्यक्तिशः कुणाला काय आणि किती करता येईल हा एक प्रश्नच आहे. त्यामुळे तो मुद्दा बाजूला ठेवला तर आपल्याला आपल्या नियंत्रणाच्या कक्षेत तरी संवेदनशील, सजग आणि पुरूष असण्याच्या अहंकाराच्या ओझ्यापासून मुक्त असलेला 'माणूस' घडवता येईल का हा विचार आपण सर्वांनी करावा. आपण मुलाला केवळ तो मुलगा आहे म्हणून स्वयंपाकघरातील कामातून सूट देतो का हे तपासण्यापासून त्याचं लैंगिक व मानसिक स्वास्थ्य कसं आहे हे चाचपून बघण्यापर्यंत अनेक गोष्टींचा यात अंतर्भाव होऊ शकतो. अशा गोष्टी ओळखून आपण त्यावर काम सुरू केलं तर ते आपल्या मुलींना आपणच निर्माण केलेल्या या समाजात सुरक्षित वाटण्याच्या दिशेने पडलेलं एक आश्वासक पाऊल ठरेल! 

- दिव्य मराठी 'मधुरिमा' (१७ डिसेंबर २०१९)

Sunday, December 8, 2019

वास्तवाचा दाह, वास्तवाचं आकलन

'बलात्कार' या विषयावर काही लिहायचं, बोलायचं बाकी आहे का हा एक आणि तसं केल्याने काही फरक पडणार आहे का हा दुसरा, असे दोन प्रश्न मनात येतात. ते काहीशा हतबलतेने आलेले प्रश्न आहेत. आपल्या - होमो सेपियन्सच्या - जगण्यात आपण इथवर आलो, नेत्रदीपक प्रगती केली हे अचंबित करत असताना त्या जाणिवेच्या तळातून 'आपण इथवर येऊन चूक केली का?' असा एक विरुद्ध, अस्तित्ववादी प्रश्न डोकं वर काढतो. हा प्रश्न पडायला कारण ठरेल अशा घटना आजूबाजूला घडत असतात. आपणच निर्माण केलेल्या वास्तवाच्या दुखऱ्या बाजू आपल्या 'सिव्हिलाइज्ड' जगण्यावर धडका देत असतात. भौतिक अर्थाने आपलं जगणं पुष्कळ सुखकर झालं आहे हे खरं आहे. आपण तुलनेने पुष्कळ सुरक्षित जीवन जगतो आहोत आणि जीवन सुरक्षित झाल्यावर सुरू झालेल्या सांस्कृतिक प्रवाहाला आपण जगण्याचा भाग बनवलं आहे. परंतु कला-संस्कृतीबरोबर राजकारण-शिक्षण-धर्म-तत्त्वज्ञान-नीती या आणि अशा इतर वर्तुळांमधून आपलं जगणं फिरत असताना खाडकन मुस्कटात मारल्यासारखी एखादी घटना घडते आणि आपण क्षणभर सुन्न होतो. यातला आणखी एक सूक्ष्म भाग असा की शास्त्रीयदृष्ट्या एक - म्हणजे होमो सेपियन - आणि सामाजिकदृष्ट्या शेकडो तुकड्यात विभागलल्या गेलेल्या आपल्यामधील कोण, कधी, कशाने सुन्न होतं हाही एक अभ्यासाचा विषय आहे आणि तो मनुष्य या एका प्रजातीचं शतभंग स्वरूप आपल्यासमोर ठेवतो. 

हैदराबाद येथील प्रियांका रेड्डी या व्यवसायाने पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या सव्वीस वर्षांच्या तरूणीवर गेल्या आठवड्यात सामूहिक बलात्कार झाला आणि बलात्काऱ्यांनी तिचा खून करून तिचा मृतदेह जाळून टाकला. त्याच दिवशी रांचीमध्ये विधी शाखेच्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आणि तमिळनाडूतील कांचीपुरम येथे रोजा नावाच्या एका वीस वर्षाच्या मुलीच्या हत्येची घटना उघडकीस आली. स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या या घटनांमधील सातत्य नवीन नाही. गेल्या काही वर्षातली अनेक घटनांची यादी आपल्यासमोर आहे. खैरलांजी, दिल्ली, कोपर्डी, कठुआ, उन्नाव ही काही ठळक नावं. अशा घटनांनंतर संतापाची लाट उसळणं, त्यातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येणं हे समजण्याजोगं आहे. असं होणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. विविध सामाजिक प्रश्नांवर लोकांकडून उत्स्फूर्तपणे आंदोलन होत राहणं हे आश्वासक आहे. मात्र त्याचवेळी या सगळ्या भीषण वास्तवाच्या पोटात नक्की काय आहे आणि जे आहे ते का आहे, त्याचं काय करायचं या प्रश्नाला आपण सामोरं गेलं पाहिजे. 

बलात्कारासारख्या घटनेचे आरंभ बिंदू वेगवेगळे असू शकतात. अनियंत्रित किंवा विकृत लैंगिक इच्छा, लैंगिक उपासमार, पुरूषसत्ताक व्यवस्थेत घडलेल्या मानसिकतेतून निपजलेला स्त्रीबद्दलचा दूषित दृष्टीकोन, गुन्हेगारी पर्यावरणात वाढल्याने घडलेली आणि ज्याला समाज 'गुन्हा' म्हणतो त्याला गुन्हा न मानण्याची मानसिकता, कधी सेंद्रीयपणे तर कधी सामाजिक पर्यावरणामुळे घडलेली हिंसक वृत्ती अशा विविध सुट्या कारणांपैकी काहींच्या / सर्वांच्या एकत्रीकरणामुळे घडलेलं पुरूषाचं मानस बलात्काराच्या मुळाशी आहे. इथे आपण एक मुद्दा लक्षात घेऊया. 'सामान्यीकरण' हा सत्यशोधनाचा आणि त्यामुळे होणाऱ्या ज्ञानाचा शत्रू आहे. 'स्त्री अशी असते', 'पुरूष असा असतो' अशी विधानं किंवा या गृहीतकांवर आधारलेलं चित्रण ललित लेखनात करायला हरकत नाही, पण सामाजिक संशोधनात ते होऊ नये. दुसऱ्या बाजूने हेही खरं आहे की स्त्रीविशिष्ट आणि पुरूषविशिष्ट असे काही गुणधर्म आहेत. ते जैविक आणि सामाजिक अशा दोन्ही प्रभावांमुळे तयार होत असतात. एखाद्या विशिष्ट घटनेचं विश्लेषण करताना त्यामागे हे गुण कार्यरत होते का हे तपासण्याची काळजी मात्र घ्यायला हवी. बलात्काराच्या गुन्ह्यांमागे जे पुरूषी मानस आहे ते तसं का घडत गेलं आहे याचा विचार केल्याशिवाय त्यावर उपाय करणं शक्य होणार नाही आणि परिणामी बलात्कार थांबणारही नाहीत. 

आपण जेव्हा 'का?' हा प्रश्न सतत विचारतो तेव्हा आपण मुळापाशी जाऊ लागतो. बलात्काराचे गुन्हे थांबत नाहीत हे वास्तव या प्रश्नाच्या मुळापाशी आवश्यकतेइतकं काम झालेलं नाही या दुसऱ्या वास्तवाची साक्ष देतं. एकीकडे मूल्याधारित विचार रूजवण्यासाठी प्रबोधनाच्या अंगाने काम होत राहणं आणि दुसरीकडे व्यवस्थेच्या पातळीवर कायदा, सुरक्षेचे विविध उपाय या अंगाने काम होत राहणं आवश्यक आहे. (प्रबोधनाची चळवळ आणि प्रशासन दोन्हीकडून दोन्ही अंगाने कामं होऊ शकतातच). परंतु समाजाच्या विषम रचनेचं काय? पराकोटीची आर्थिक विषमता असताना, त्या विषमतेमुळे लोकांचं जगणं, त्यांचे विचार प्रभावित होत असताना मूल्यविचारांबाबत सगळेजण एकाच पातळीवर यावेत ही अपेक्षा फोलच ठरणार. जगण्याकरताच जर लढाई करायला लागत असेल तर मूल्यांचं महत्त्व कमीच होत जातं. याचा अर्थ मूल्यविचार महत्त्वाचा नाही असं अजिबातच नाही, पण त्याच्या प्रसाराला मर्यादा आहेत, तो विचार उद्ध्वस्त करणाऱ्या गोष्टी आजूबाजूला घडणार याची मानसिक तयारी असणं आवश्यक आहे. मूल्यविचार आणि वास्तवाचं स्वरूप यांच्यातला झगडा कमी व्हायचा असेल तर मूल्यविचारांचा निव्वळ पुरस्कार करून चालणार नाही. त्याकरता वास्तवाच्या डोहात उतरावं लागेल. बलात्काराच्या बऱ्याचशा घटनांमधील गुन्हेगारांची सामाजिक -शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर हे लक्षात येईल. समाजाच्या या 'अंडरबेली'पर्यंत आपण -  बुद्धिवंत आणि विचारी लोक - पोचलेलो नाही. याला अपवाद अर्थातच असतील. शिवाय यात व्यावहारिक अडचणी असू शकतील. इतरही कारणं असतील. पण जिथे काम होणं गरजेचं आहे तिथे ते होत नसेल तर आहे त्या चित्रात फारसा बदल होणार नाही. एका बाजूला लेख लिहिले जातील, चर्चा होतील, मतं व्यक्त केली जातील आणि काही दिवसांनी पुन्हा बलात्काराची बातमी येईल. 

हा निराशावाद नाही. पण यात थोडी हताशा जरूर आहे. आपण समग्रपणे गोष्टी समजून घ्यायला समाज म्हणून कमी पडतोय या जाणिवेची रूखरूख आहे. यादसंर्भात 'लैंगिकता आणि पुरूषाची प्रकृती' या एका गोष्टीबाबत आपण आपलं आकलन जर वाढवलं तर या विषयाकडे बघण्याची एक दृष्टी मिळेल आणि आपला विचार योग्य दिशेने जाईल असं वाटतं. 

इंग्लिशमध्ये 'मेल इरेक्शन हॅज नो कॉन्शन्स' असा एक वाक्प्रयोग आहे. इथे लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट ही की कॉन्शन्स नसणं हे योग्य आहे असं इथे म्हणायचं नाही. 'कॉन्शन्स नसतो' ही वस्तुस्थिती फक्त सांगायची आहे. पुरूषांची लैंगिक इच्छा चाळवली जाण्याचे अनेक प्रकार विविध माध्यमांमधून उपलब्ध असले तरी पुरूषाच्या लैंगिक मनोविश्वाचं स्वरूप काय आहे याचा फारसा अभ्यास होताना दिसत नाही. (स्त्रीच्या लैंगिक मनोविश्वाचं स्वरूप काय आहे यावरही अभ्यास होत नाही. पुरूषाचा उल्लेख करण्याचं साधं कारण हे की त्याची लैंगिक इच्छा धोकादायक वळणं घेते हे अनेक वेळा दिसलं आहे.) इरेक्शन असलेला, येऊ घातलेला पुरूष त्याच्या 'नॉर्मल' रूपाहून वेगळं रूप धारण करू शकतो. पुरूषाची लैंगिक इच्छा ही 'इंसर्टिव्ह' स्वरूपाची असते तर स्त्रीची 'रिसेप्टिव्ह' स्वरूपाची असते. पुरूषाला 'आतलं बाहेर' टाकायचं असतं आणि स्त्रीला 'बाहेरचं आत' घ्यायचं असतं. स्त्रीदेखील लैंगिकदृष्ट्या अतृप्त असूच शकते. पण त्यामुळे ती हिंसक होताना दिसत नाही. पुरूषाबाबत हा 'फोर्स' फार मोठ्या प्रमाणावर काम करतो आणि प्रसंगी त्याच्या विवेकालाही खाऊन टाकतो याच्या मुळाशी लैंगिक संबंधांमधून प्रजोत्पादन होतं हे कारण आहे. तो 'फोर्स' इतक्या ताकदीचा आहे कारण आपण तांत्रिकदृष्ट्या प्रचंड प्रगती केलेली असली तरी आपण प्रजोत्पादन अजूनही लैंगिक संबंधांतूनच करतो आहोत. त्याला अनुसरून स्त्रीचं व पुरूषाचं जे मानस घडलं आहे, जी वृत्ती घडली आहे त्यात अद्याप मोठा बदल झालेला नाही. स्त्रीमध्ये तिचं बीज मासिक पाळीद्वारे बाहेर पडतं तर पुरूषामध्ये ते वीर्यस्खलनाद्वारे बाहेर पडतं. पुरूषबीजाचा संयोग स्रीबीजाशी होणार नसला तरी त्याला शरीराबाहेर पडावंच लागतं. सुरूवातीला पाहिलं त्याप्रमाणे पुरूषाच्या मनात बलात्काराच्या आरंभ बिंदूंचं जे मिश्रण कार्यरत असतं त्यात हा एक जैविक भाग कार्यरत असतो. 

पण म्हणजे मग जैविक प्रेरणा म्हणून पुरूषांना कायम सूट द्यायची का? अजिबात नाही. पण ही जैविक प्रेरणा आहे याची जाणीव त्यांना आणि स्त्रियांना करून द्यायची. माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की लैंगिक इच्छेबाबत, त्यातून येणाऱ्या अवघडलेपणाबाबत नुसतं तोंडाने बोललं तरी तो ताण हलका व्हायला मदत होते. ती इच्छा 'डायव्हर्ट' करण्याचे मार्ग शोधता येतात. लोकसत्ता 'चतुरंग'मधील २०१८ सालच्या माझ्या सदरातील एका लेखात मी पुरूषांसाठी 'सेक्स ऑडिट' करावं असं सुचवलं होतं. त्यावर खरोखर विचार व्हावा. बलात्काराचा विचार करताना 'एक अत्यंत आदिम, सहज क्रिया - ज्यात खरं तर अगदी सौम्य स्वरूपाची हिंसाही अंतर्भूत असू शकते - ती इतक्या टोकाच्या हिंसकतेकडे जाते आहे याचा अर्थ पुरूषांच्या मनात आणि आपल्या सामाजिक रचनेत काहीतरी मोठी गडबड होतेय का' हा विचार आपण केला तर आपल्याला काही उत्तरं मिळू शकतील. इथे आपल्याला पुरूषाची लैंगिकता, पुरूषसत्ताक व्यवस्थेने घडवलेली त्याची वर्चस्ववादी वृत्ती, त्यातून स्त्रीकडे 'माणूस' म्हणून न पाहता निव्वळ 'माझ्या इच्छापूर्तीचं साधन' म्हणून पाहण्याची लागलेली सवय, परिस्थितीजन्य कारणं या सगळ्याचा सुटा सुटा आणि एकत्रित दोन्ही प्रकारे विचार करायला हवा. बलात्कारांच्या अनेक केसेस समोर घेऊन त्यामागील नेमक्या कारणांचा सामाजिक संशोधनाच्या दृष्टीने अभ्यास करायला हवा. समाजातील पुरूषांच्या कोणत्या 'सेगमेंट'वर काम करण्याची जास्त गरज आहे हे शोधायला हवं. पुरूषांच्या वर्तनाचे तपशील, त्यातील वीक पॉईंट्स समजून घ्यायला हवेत. पुरूषांनी त्यांच्या लैंगिक मनोविश्वाला पोर्नोग्राफी, अचकट-विचकट विनोद, स्त्रीचं वस्तूकरण यात बंदिस्त न करता हे मनोविश्व सार्वजनिक चर्चाविश्वाचा भाग व्हायला हवं. 

बलात्काराच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे सार्वजनिक चर्चाविश्वात 'स्त्री विरुद्ध पुरूष' असं एक चित्र उभं राहिल्यासारखं दिसतं. अर्थात हे चित्र केवळ याच संदर्भात उभं राहतं असंही नाही. स्त्रीवादी सिद्धांतनातून पुरूषसत्ताक व्यवस्थेची जी चिकित्सा झाली आहे आणि पुरूषांसमोर जो आरसा धरला गेला आहे त्यातून दिसणारं आपलं रूप मान्य न करण्याच्या पुरूषांच्या अहंकार प्रेरित वर्तनातूनही हा संघर्ष उभा राहतो आहे. दुसऱ्या बाजूने पाहता स्त्रीवादी सिद्धांतनाचं उपयोजन स्त्री-पुरूष संबंधातील प्रत्येक आयामाला लावण्याच्या आग्रहातूनही हे होत आहे. खरं तर वैचारिक संघर्षातून सामाजिक आकलन अधिक नेमकं होत जाणं अपेक्षित आहे, पण तसं न होता शत्रुभावी विचार प्रबळ होताना दिसतो आणि ते धोक्याचं आहे. 

विविध सामाजिक समस्या आपल्यासमोर आपल्या 'प्रगत मेंदू'ला आव्हान देत उभ्या असतात. आपला देश एकाच वेळी अनेक शतकांमध्ये जगत असल्याने इथल्या सामाजिक प्रश्नांचं स्वरूप अधिक गुंतागुंतीचं आहे. ते समजून घेताना एकांगी विचार करण्याचं टाळणं, संख्याशास्त्रीय माहितीचा आधार घेणं, सरसकटीकरण न करता 'स्पेसिफ़िसिटी' लक्षात घेणं आणि कारणांच्या मुळाशी जाण्यासाठी 'फिल्ड'वर उतरणं याला पर्याय नाही. बलात्काराबाबत बोलायचं झालं तर भारतीय पुरूष हा भारतीय स्त्रीचा ऐतिहासिक गुन्हेगार आहे यात शंकाच नाही. परंतु त्याला गुन्हेगार राहू न देण्यासाठी आजच्या भारतीय स्त्रीने 'पुरूष प्रबोधना'च्या प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवायला हवा. ही तिला केलेली विनंती आहे. तिच्या सहभागाशिवाय 'पुरूषांचं सक्षमीकरणा'ला प्रबोधनाच्या चळवळीच्या कार्यक्रमपत्रिकेत प्रमुख स्थान मिळणार नाही!    

- लोकसत्ता 'लोकरंग' (८ डिसेंबर २०१९)