Saturday, December 22, 2018

स्वप्न आहे सोबतीला...

एखाद्या प्रसन्न रात्री मित्रांबरोबर गप्पा रंगत आलेल्या असाव्यात, काही मौलिक प्रश्न पुढे येत जावेत, त्यातून डोक्यातील चक्रं आपल्या सोयीच्या वाटेऐवजी थोड्या अवघड वाटांवरून धावू लागावीत आणि एकूणात चर्चेला रोमांचक स्वरूप येत असताना सकाळी उठून कामावर जायचंय म्हणून सभा बरखास्त करण्याची वेळ यावी... अशा वेळी जी मनःस्थिती होते तशी माझी आत्ताची मनःस्थिती आहे. 

गेल्या नोव्हेंबरमध्ये ‘चतुरंग’कडून लेखमालिका लिहिण्याविषयी प्रस्ताव आला तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया नकाराची होती. आपल्याला स्तंभलेखन जमणार नाही असं मला ठामपणे वाटत होतं. शिवाय स्तंभलेखन म्हणजे 'कमिटमेंट'! त्यामुळे मी लेखमाला न लिहिणंच कसं योग्य होईल हे मी त्यांना पटवून द्यायचा सर्वतोपरीने प्रयत्न केला. पण त्यांचा आग्रह कायम होता. आज लेखमालेचा समारोप करताना मी त्यांचे आभार मानतो कारण गेल्या वर्षभर मी जे काही थोडंफार लिहू शकलो, विविध वाचकांशी जोडून घेऊ शकलो, त्यांच्या प्रश्न-प्रतिक्रिया-प्रशंसेमुळे विचारमग्न आणि उत्साही राहू शकलो त्याचं श्रेय त्यांना जातं. 

माणसाने लावलेल्या सगळ्या शोधांमध्ये भाषेचा शोध ही एक विलक्षण गोष्ट आहे. एकेकाळी नसलेल्याच किंवा निःशब्द रूपात असणाऱ्या जाणिवा, विचार भाषेतून प्रकट होऊ लागल्यावर त्यांच्यातील गुंतागुंत, टक्कर, रस्सीखेच सगळंच वाढत गेलं आहे. लिहिण्यातून व्यक्त व्हायची सवय असलेल्या माझ्यासारख्याला भाषेचा मोठा आधार तर वाटतोच, पण कधीकधी भाषेचं भयही वाटतं. कारण भाषेतून जे मी सांगतो ते 'मला जे म्हणायचं आहे आणि मला जे म्हणायचं नाही' ते सगळं निर्दोषपणे सांगता येतंच असं नाही. शिवाय आणखी एक प्रश्नही सतावत असतो. तो म्हणजे विश्वाचा एवढा मोठा पसारा - तो उलगडण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते विविध विज्ञानशाखांचे अभ्यासक, माणसाच्या मनोविश्वाचा आणि सामाजिक व्यवस्थांचा अभ्यास करणारे मानव्यशास्त्राच्या शाखांचे अभ्यासक यांच्या योगदानापुढे आपण वेगळं असं काय सांगणार? 

पण इथेच एक 'ट्विस्ट' आहे. ज्ञानाची विविध क्षेत्रे आपल्याला विशिष्ट विषयाची सखोल माहिती देतात. त्या त्या क्षेत्रातील ज्ञानी मनुष्य हा समाजाचा एक 'अ‍ॅसेट' असतो. या ज्ञानक्षेत्रांच्या बरोबरीने जे व्यापक असं 'वैचारिक क्षेत्र' आहे ते विविध ज्ञानक्षेत्रांतील घडामोडींचा परस्परसंबंध, त्यांचे सकारात्मक-नकारात्मक सामाजिक परिणाम, समाजव्यवस्थेचे विविध पैलू, त्यातील सुधारणा या गोष्टींवर सतत विचार करत असतं. मानसशास्त्रातील ज्ञानी मनुष्य एखाद्याच्या मानसिक आजारावर उपचार करू शकेल, परंतु वैचारिक क्षेत्रातील मनुष्य आपल्या निरीक्षणातून आजवर लक्ष गेलं नाही अशा एखाद्या ठिकाणी या ज्ञानाची गरज आहे हे सांगू शकेल. वैचारिक क्षेत्रातील मनुष्यासाठी 'समाज' हा एक प्रमुख आस्थेचा विषय असतो. 'विशिष्ट ज्ञान' त्याला आकर्षित करतंच, पण 'ज्ञानाचं उपयोजन' त्याला अधिक आकर्षित करतं. वैचारिक क्षेत्र हे प्रामुख्याने कुतूहल, नियोजन या पायावर आधारलेलं असल्याने खरं तर आपल्यापैकी प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार या शिलेदार होऊ शकतो. आपण प्रत्येकजण समाजाचा भाग असतो आणि समाजव्यवस्थेसंदर्भात, संकल्पनांच्या संदर्भात विश्लेषक विचार करण्याची क्षमता विकसित झाली तर प्रत्येकजण काही कल्पना मांडू शकतो, उपाय सुचवू शकतो. रोजच्या जगण्याच्या पलीकडे जात वैचारिक घुसळण सुरू ठेवण्याची प्रक्रिया आपण सुरू ठेवली तर त्यातून आपलं 'मनुष्यत्व' उजळून निघत असतं. 

ही लेखमाला लिहीत असताना मला हे अनुभवता आलं. मनातील बऱ्याच प्रश्नांना आणि उत्तरांना वाट मोकळी करून देता आली. यात अपूर्णतेची जाणीव तर नक्कीच आहे. ज्या विषयांना आपण या मालिकेत स्पर्श केला त्या सर्वच विषयांवर अधिक सविस्तर उत्तरं मिळतील अशी मांडणी करता येईल. हे विषय सामाजिक, नैतिक स्वरूपाचे असल्याने तिथे गणितासारखी उत्तरं मिळत नाहीत. असं असलं तरी अमुक एका प्रश्नावर मला हे उत्तर दिसतं हे सांगणं ही आपली जबाबदारी असतेच. 'जातीयता संपायला हवी' असं मी म्हणत असेन तर ती संपवण्याकरता मला कोणते उपाय दिसतात हे मी सांगितलं पाहिजे. ते उपाय किती परिणामकारक आहेत हा पुढचा मुद्दा, परंतु केवळ 'विशफुल थिंकिंग' करत राहणं हा व्यापक बदलासाठीचा उपाय असू शकत नाही.  
ज्या विषयांवर बोलायची इच्छा होती पण ते राहून गेलं त्यात प्रतिगामी-पुरोगामी हा संकल्पनाभेद, धर्मश्रद्धा आणि आपलं मानस, धर्मश्रद्धा आणि राजकारण हे विषय आहेत. गांधीजींची आधुनिकतेविषयीची मुळापासूनची वेगळी दृष्टी आणि तिची प्रस्तुतता यावर आपण बोललो, पण तो धागा आणखी पुढे नेता येईल. मागील लेखात आपण जीवन कौशल्ये या विषयावर बोललो. त्याच्या पुढे जात, काही व्यवहारिक उदाहरणं घेत जीवन कौशल्ये विकसित करण्याच्या प्रक्रियेवर तपशीलात बोलता येईल. लोकशाही व्यवस्थेत सत्तेचं विकेंद्रीकरण आणि त्यातून स्वशासन हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. या विषयावर गांधीजी आणि त्यांच्यानंतर विनोबा भावे यांनी मूलभूत मांडणी केली आहे. मराठीत मिलिंद बोकील यांनी या विषयावर मौलिक लेखन केलं आहे. या सगळ्याचा आधार घेत या विषयावर थोडी चर्चा करायचं मनात होतं. आपण प्रेम आणि लैंगिकतेविषयी बोललो, परंतु या विषयाशी जोडलेला महत्त्वाचा सामाजिक मुद्दा वेश्याव्यवसाय हा आहे. लैंगिक गरज आणि लैंगिक इच्छा यांच्या पूर्ततेची व्यवस्था समाजमान्य नैतिकतेअंतर्गत होत नसल्याने वेश्याव्यवसाय अस्तित्वात आहे. लग्नव्यवस्थेला समांतर चालणारी, परंतु विस्कळीत, बहुतेकदा शोषणावर आधारलेली, कुणाही संवेदनशील मनुष्याला अस्वस्थ करणारी ही व्यवस्था आहे. यासंदर्भात 'पुरूष' म्हणूनचं लैंगिक मनोविश्व घडत असताना वेश्याव्यवसायाबद्दल विचार होत होताच, हे जग पाहिलंही होतं,  परंतु पुण्यातील 'सहेली' या 'सेक्स वर्कर्स कलेक्टिव्ह'शी जोडला गेल्यानंतर वास्तवाच्या अधिक जवळ जाता आलं. त्यामुळे याबाबत सविस्तर लिहायचं होतं. पारंपरिक चौकटीला छेद देत काही चित्रपटांनी मुख्य प्रवाहाला वेगळं वळण दिलं त्याबद्दल थोडं बोलायचं होतं. 

हे सगळं इतरत्र किंवा याच व्यासपीठावर पुढे बोलता येईलच. आत्ता मात्र निरोपाचा क्षण आहे. या लेखमालेच्या निमित्ताने अनेक वाचकांशी इ-मेलद्वारे जो संवाद झाला तो मला समाधानी आणि समृद्ध करणारा ठरला आहे. अनेकांशी अनेक संदर्भात बोलणं झालं. काहीजणांनी या लेखमालिकेमुळे/विशिष्ट लेखामुळे त्यांना मदत झाल्याचं कळवलं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. माणसांशी असं जोडलं जाण्याचं मोल फार आहे. सर्व वाचक मित्र-मैत्रिणींचे मनःपूर्वक आभार! 

आहे ती चौकट बदलून काही नवं करण्याचा विचार करणाऱ्याला स्वप्नाळू, अव्यवहारी, कधी उपहासाने क्रांतिकारक वगैरे म्हटलं जातं. नवी दिशा कोणती, ही वाट चांगलीच असेल कशावरून हे नीटपणे न कळल्याने किंवा सांगणाऱ्यालाही नीट सांगता न आल्याने असं होतं. परंतु असं स्वप्नाळू असणं हे आवश्यक आहेच. त्याविषयी शंका नसावी. जॉन लेनन या विख्यात गायकाचं एक वचन आठवतं. तो म्हणतो - तुम्ही एकट्याने पाहिलेलं स्वप्न हे फक्त स्वप्न असतं. पण सगळ्यांनी एकत्र पाहिलेल्या स्वप्न म्हणजे वास्तव असतं! त्यामुळे स्वप्न तर बघतच राहूयात. लेट्स ड्रीम टुगेदर! 

Saturday, December 8, 2018

व्यवस्था विचार

मागील दोन-चार लेखांवर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यातून प्रेम आणि लैंगिकता हे 'बर्निंग' विषय आहेत हे दिसून आलं. स्त्री-पुरूषांमधील नात्याचं 'गतिशास्त्र' (डायनॅमिक्स) हा विषय सामाजिक महत्त्वाच्या विषयांपैकी एक कळीचा विषय आहे हे तर खरंच. विशेषतः पुरूषाच्या लैंगिक वर्तनाबाबत (त्याच्या नियमनाबाबत) अधिक बोललं जायला हवं आहे. लैंगिक समाधान आपल्या जागी महत्त्वाचं आहेच, पण पुरूषासाठी त्याचा 'ट्रॅप' तयार होतो आणि त्यात त्याचं मानस अडकूनच पडतं. याबाबत काय उपाय करता येतील याची चर्चा आपण मागच्या लेखात केली होती. ती आणखी पुढे जाऊ शकतेच. पण आजच्या लेखात आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय मानवी वर्तनाच्या सगळ्याच बाजूंना कवेत घेणारा आहे. हा विषय म्हणजे जीवन कौशल्ये - लाइफ स्किल्स. सध्या प्रचलित असलेली शिक्षणपद्धती, त्यातील अधिक-उण्या बाजू हा एक फार मोठा विषय आहे. आपण बोलणार आहोत ते या औपचारिक शिक्षणाव्यतिरिक्त जे शिक्षण होत असतं, जे होणं अपेक्षित असतं त्या शिक्षणाबद्दल. 

मोठयांनी (म्हणजे आपण सगळे) घातलेल्या अनेक घोळांची मुळं आपल्या छोटेपणात दडलेली असतात. (इथे 'छोटेपणात'वर नकळत श्लेष साधला गेला आहे!) मुलांना त्यांच्या वाढीच्या विविध टप्प्यांवर कोणकोणत्या विषयांची कशी कशी ओळख करून द्यायची हा एक महत्त्वाचा आणि अवघड प्रश्न आहे. हे थेटपणे (कल्पकतेने, पण सत्य पोचेल अशा प्रकारे) व्हावं असं मला वाटतं. इथे 'जीवन कौशल्ये' (लाइफ स्किल्स) हा विषय समोर येतो. 'जीवन कौशल्ये' या विषयाअंतर्गत अनेक गोष्टींची तयारी होणं अपेक्षित आहे. यात कौंटुंबिक नातेसंबंध, व्यावसायिक नातेसंबंध, त्यातील ताण व त्यांचं व्यवस्थापन, प्रेम, लैंगिकता, राजकीय-सामाजिक जाण, नागरिक म्हणून आपली कर्तव्यं अशा अनेकानेक गोष्टी आणि त्यांचे विविध पदर आहेत. या सगळ्यात रॅशनॅलिटीवर आधारलेला एक दृष्टीकोन स्वीकारता येऊ शकतोच. परंतु इथे दोन मुद्दे उपस्थित होतात. एक म्हणजे माणूस रॅशनल विचार करू शकत असला तरी तो स्वभावदृष्ट्या प्रत्येक वेळी पूर्णपणे रॅशनल असेलच असं नाही. त्यामुळे रॅशनॅलिटी काम करणार का हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा विरुद्ध बाजूने आव्हानात्मक आहे. तो असा की रॅशनॅलिटी यशस्वी झाली आणि काही  'अतार्किक' परंतु माणसाला माणसाशी बांधून ठेवणाऱ्या हळव्या भावभावनांना सोडचिठ्ठी दिली गेली तर काय? उदा. मला हे नेहमी वाटतं की जन्म आणि मृत्यू या दोन्ही विषयांबाबत मुलांना वयाच्या विशिष्ट टप्प्यावर (साधारणतः पौगंडावस्थेत) खरं काय ते सांगितलं गेलं पाहिजे. आता जर जन्म-मृत्यूचं वैज्ञानिक वास्तव माहीत झालं तर आपल्या जवळच्या कुणाच्या मृत्यूनंतर जाणवणारं दुःख, उदासी, त्या माणसाच्या आठवणीने जाणवणारा एकाकीपणा, डोळ्यात येणारे अश्रू या ज्या एका अर्थी अतार्किक पण मानवीय, आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवणाऱ्या, जगण्यासाठी जो भावनिक पाया लागतो तो रचणाऱ्या भावना आहेत त्या नाहीशा होतील का? प्रेम, आकर्षण, ईर्षा, अहंकार या भावनांचं ‘रॅशनल नियमन’ झालं तर त्यातली खुमारी निघून जाईल का? 

यावर विचार करताना दोन गोष्टी जाणवतात. एक म्हणजे परंपरा-आधुनिकता या संघर्षाच्या पलीकडे असणारी माणसाची घडण लक्षात घेता तर्काधिष्ठीत विचार, परंपरेला प्रश्न करणं यामुळे माणूस कोरडा होईल असं मला वाटत नाही. दुसरं म्हणजे 'रॅशनॅलिटी' आणि 'सेन्सिटिव्हिटी' या दोन्ही गोष्टी एकत्र चालू शकतात. त्यांना तसं चालायला लावणं हे नवतेपुढील एक आव्हान आहे. जगात दगड-धोंडे आहेत तसेच सजीवही आहेत, माणूस हादेखील एक सजीव प्राणीच आहे, त्याच्या अस्तित्वामागे कुठलंही प्रयोजन वगैरे नाही, जीव आणि जाणीव यांच्या असण्याची तार्किक उकल होऊ शकते हे समजून घेत असताना त्याच्या परिणामी 'सगळं जर प्रयोजनहीन (आणि म्हणून अर्थहीन) आहे तर मग नीतीमूल्ये हवीतच कशाला? जगण्याला तरी काय अर्थ आहे?' हा प्रश्न उद्वेगाने न विचारणारं स्थिर आणि विवेकी मानस घडवणं हे नवतेपुढील आव्हान आहे. (सजीव रचनांसंदर्भात एक आठवलं. 'आधुनिक विज्ञानाचे स्वरूप' हे मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं पुस्तक आहे.  'आजचा सुधारक' या मासिकात प्रकाशित झालेल्या काही लेखांचं हे संकलन आहे. या पुस्तकातील मिलिंद वाटवे यांचा 'आत्मा हवाच का?' हा लेख जरूर वाचावा.) त्यामुळे आधुनिक जीवन कौशल्यांविषयी बोलत असताना या आव्हानाचा विचार झालेला असणं आवश्यक आहे. 

या विचारासह मला हे म्हणावंसं वाटतं की जीवन कौशल्ये विकसित करताना आपण अधिक विचारी, अधिक 'वास्तववादी' असायला हवं आहे. कदाचित अतिरंजित वाटेल पण आपण जेव्हा आपला देश अजून मागे आहे असं म्हणतो, देशापुढील प्रश्नांची मालिका संपत नाही असं म्हणतो तेव्हा राजकीय-आर्थिक कारणांबरोबरच आपली जीवन कौशल्ये विकसित झालेली नसणं हेही एक कारण त्यामागे असतं. एक नेहमीचं, साधं उदाहरण घेऊ. आपल्या देशाचं काही खरं नाही असं आपण उद्वेगाने बरेचदा म्हणतो, पण आपण राहतो त्या सोसायटीचं काम बघायलाही कुणी उत्स्फूर्तपणे पुढे येत नाही. प्रश्ना सोडवण्यापेक्षा, त्यासाठी इनोव्हेटिव्ह विचार करण्यापेक्षा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकत्र येण्यापेक्षा त्या प्रश्नांसह जगणं पुढे रेटणं बहुतेकजण पसंत करतात. 'गोष्टी सुधारण्यासाठी आपण जागचं हलणं, थोडी जोखीम पत्करणं गरजेचं आहे' हा विचारच मनात न रूजल्यामुळे हे होतं. 'आपल्याला हालचाल करायला हवी' हे शिकवलं जाणं हा जीवनकौशल्याचा भाग आहे. हे कितीतरी ठिकाणी लागू होईल. लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पुष्कळ रस असतो, पण आपल्या गावची ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका कशी काम करते याचं आपल्याला फारसं ज्ञान नसतं. आपल्याला काय काय माहीत हवं, आपल्याकडे कोणती कौशल्ये हवीत याची यादी आपण करू शकतो खरं तर. ती केली तर आपल्याला जीवन कौशल्यांचा खरा आवाका ध्यानात येईल. याकरता एक रोचक पद्धत वापरता येईल. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ज्या अनेक बाह्य व आंतरिक क्रिया करतो त्या बघाव्यात. यात आपल्या असं लक्षात येईल की आपण इतक्या गोष्टींवर अवलंबून असताना आपल्या नियंत्रणात फार कमी गोष्टी आहेत. माणसांची संख्या वाढणं, त्यातून गुंतागुंतीच्या सामाजिक रचना तयार होणं याला सर्वस्वी आपण एकटे जबाबदार नाही हे ठीक, पण या रचनांचे फायदे आहेत तसेच काही दुःखदायक पैलूही आहेत याचं किमान भान तरी असावं. उदा. सकाळी आपण शौचाला जातो. मलमूत्र विसर्जन आणि त्याची व्यवस्था हा एक विषय तिथे आपल्याला मिळेल. आपल्या मलमूत्राची विल्हेवाट कशी लावायची हा इतर अनेक मुद्द्यांसारखाच जीवन कौशल्याशी संबंधित मुद्दा आहे. आज आपल्या जीवन कौशल्याच्या कक्षेत घरातला संडास स्वच्छ ठेवणं आणि सोसायटीचं ड्रेनेज तुंबलं तर ते साफ करून घेणं एवढंच आहे. पण 'ड्रेनेज सफाई करणाऱ्या कामगारांचं जगणं' हा एक मोठा मुद्दा आहे. त्यावर आपण प्रत्यक्ष काही केलं तर उत्तमच, पण जर करत नसू तर आपल्या समाजातील हा एक प्रश्न आहे हे आपण मुलांना सांगणार की नाही? हे एक उदाहरण झालं. आता दिवसभरातल्या इतर क्रियांची यादी पाहिली तर आपल्या कक्षेत असलेली आणि आपल्या कक्षेत नसलेली अनेक जीवन कौशल्ये सापडतील. आणि मला असं दिसतं की आपण अनेक महत्त्वाचे प्रश्न आपल्याकडे उत्तर नाही म्हणून मुलांसमोर आणण्याचं टाळतो किंवा त्यावर थातुरमातुर उत्तर देऊन वेळ निभावून नेतो. समाज गुंतागुंतीचा आणि मुलांच्या प्रश्नांना सोपी उत्तरं हे गणित काही बरोबर नाही. कुठला प्रश्न वयाच्या कुठल्या टप्प्यावर मुलांसमोर आणावा यावर विचार व्हावाच, पण एकदम विशीत गेल्यावर मुलांसमोर काही गोष्टी येऊन आदळतात आणि मग तयारीअभावी मुलं कमकुवत पडतात. 

यासंदर्भात मला दोन प्रमुख गुण विकसित व्हायला हवेत असं वाटतं. पहिला म्हणजे विश्लेषक वृत्ती - विषयाची माहिती घेऊन आपलं आकलन तयार करण्याची, विविध शक्यता विचारात घेत उपाययोजना करण्याची सवय आणि दुसरा म्हणजे धैर्य. मुलांमध्ये त्यांच्या वाढीच्या वयात हे दोन गुण निर्माण होऊ शकले तर समाजाचं चित्र बदलायला पुष्कळ मदत होईल. हे करायचं कसं? तर बोलत राहून. वास्तवाचं चित्र दाखवत राहून. व्यसनमुक्तीच्या प्रोग्रॅम्समध्ये 'स्पॉन्सर' आणि 'स्पॉन्सी' असं एक नातं असतं. रिकव्हर झालेला 'स्पॉन्सर' रिकव्हरीत असलेल्या एकाची - 'स्पॉन्सी'ची जबाबदारी घेतो. हा स्पॉन्सर म्हणजे स्पॉन्सीचा आधारस्तंभ असतो. आपलं नियंत्रण सुटतंय, आपण पुन्हा व्यसनाकडे जातोय असं ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी स्पॉन्सीने स्पॉन्सरला फोन करून, भेटून, बोलून ते सांगायचं आणि स्पॉन्सरने त्याला शब्दांद्वारे आधार देऊन त्याला पुन्हा मार्गावर आणायचं. हे सगळं सपोर्ट ग्रुप्सअंतर्गत होत असतं. असे सपोर्ट ग्रुप असणं, तिथे मोकळेपणाने बोलता येणं हे समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तो जीवन कौशल्याचाच भाग आहे.  मला असं वाटतं की मुलांशी आपलं नातं साधारणपणे या धर्तीचं असायला हवं. त्याचा उपयोग व्यक्तिगत प्रश्नांसाठी होईलच आणि सामाजिक प्रश्नांची जाण विकसित करण्यासाठीही होईल.   

व्यवस्थापनशास्त्रात 'सिस्टिम्स थिंकिंग' असा एक दृष्टीकोन शिकवला जातो. 'आपल्याला व्यवस्था लावायची आहे' हा यातला मुख्य विचार आहे. अनंत गोष्टी घडत आहेत. त्यातील प्रत्येक गोष्टीची नीट व्यवस्था लागली तर ती गोष्ट इतर गोष्टींमध्ये अडथळा आणणार नाही. हे आपल्या जगण्यालाही लागू आहे. जगण्यातील जे मोठे - मॅक्रो लेव्हलचे - विषय आहेत (उदा. लोकशाही, भांडवलशाही, समाजवाद, आर्थिक उदारीकरण इ.) ते मायक्रो लेव्हलच्या (रोजच्या जगण्यातील प्रश्न/विषय) विषयांतूनच तयार होत असतात. म्हणून मायक्रोस्कोपिक दृष्टी ठेवून तिथले प्रश्न सोडवण्यावर भर दिला तर वरचे प्रश्न सोडवायला मदत होईल.

Saturday, November 24, 2018

संवादातून बदल

आपण जी संस्कृती निर्माण केली आहे, ज्या मान्यतांच्या आधारे आपण जगतो, आपले व्यवहार पार पाडतो त्यातला एक लक्षणीय भाग ‘निर्णय घेणे’ हा आहे. आपल्याला पदोपदी काही ना काही ठरवायला लागतं, उपलब्ध पर्यायांमधून एक पर्याय निवडावा लागतो. यातला एक कळीचा भाग ‘चूक’ आणि ‘बरोबर’ ठरवणे हा आहे. ‘चूक’ आणि ‘बरोबर’च्या मुळाशी ‘नीतीविचार’ आहे. हा ‘नीतीविचार’ पूर्णपणे सुसंगत, गणिती प्रक्रियेने चालणारा नसतो. तो सामाजिक असतो आणि या नीतीविचारावर प्रभाव टाकणारी आपल्याच मनातील वैचारिक आणि भावनिक बले असतात. त्यांच्या परिणामी आपला ‘नीतीविचार’ आकार घेतो. मागच्या लेखात आपण म्हटलं तसं सांस्कृतिक रचितं तयार होत असताना, ती अस्तित्वात असताना वास्तविक रचितंही असतात. आपण ज्याला वाईट, चूक असं म्हणतो ते समाजासाठी वाईट आणि चूक असलं तरी वास्तवात ते 'असतं' हेच पुरेसं बोलकं आहे. नीतीविचारांचा प्रयत्न समाजाची घडी बसवायचा असतो, परंतु अशा पुष्कळ जागा असतात जिथे नीतीविचार पुरा पडत नाही. त्यामुळे नैतिकता समाजासाठी असली तरी ती अखेरीस व्यक्तीनिष्ठ राहते.

म्हणूनच समाजात जे जे प्रश्न दिसतात त्यांचा विचार निव्वळ नैतिकतेच्या कसोटीवर करून चालत नाही. अमुक एक वर्तन सर्वांच्या हिताचं आहे म्हणून बरोबर आहे हे ठीक. परंतु त्याच्याही पुढे जाऊन ते नैसर्गिकरित्याच बरोबर आहे असा आग्रह धरला जाणं थोडं गडबडीचं आहे. मुळात नैसर्गिक म्हणजे काय याबाबतच आपला बरेचदा घोळ होतो. कारण वर्तनाला आपण नैतिकतेच्या फूटपट्टीने मोजायचा प्रयत्न करतो. प्रत्यक्षात जे ‘चांगलं’ आहे आणि जे ‘वाईट’ आहे ते सगळं नैसर्गिकच आहे. निसर्ग हा ‘चांगला’, ‘दयाळू’, ‘क्षमाशील’ असा काही नसतो. निसर्ग म्हणजे 'असणं'. निसर्गाला मूल्यदृष्टी नाही. असलीच तर 'अस्तित्वदृष्टी' आहे. अस्तित्व टिकवण्याच्या संघर्षाचं अविरत फिरणारं चक्र हा निसर्गाचा प्रमुख भाग आहे. त्यात आपण ज्याला ‘चांगलं’ म्हणतो असे पैलू आहेत आणि आपण ज्याला ‘वाईट’ म्हणतो असे पैलूही आहेत. ‘चांगलं’ आणि ‘वाईट’, ‘चूक’ आणि बरोबर’ हा निर्णय सतत घ्यावा लागत असल्याने माणूस निसर्गत: जसा आहे तसा व्यक्त होत नाही. माणसावर नियंत्रण असावं या हेतूच्या पूर्ततेसाठी ते योग्य असलं तरी त्यामुळे माणसाची घुसमट होणे आणि त्यातून दुर्वर्तन होणे हीदेखील एक बाजू आहे.

‘दुर्वर्तन’ त्रासदायक असल्यानेच तो अभ्यासाचा विषय असायला हवा. आपल्या अंतरंगात भावभावनांचा, उलटसुलट विचारांचा कल्लोळ माजलेला असतो. परंतु तो उलगडून समोर मांडण्याची पद्धत आपण विकसित केलेली नाही. आपण भाषेच्या माध्यमातून आपल्या मनातील बोचऱ्या, दुखऱ्या, गोंधळलेल्या जागांचं नेमकं वर्णन करू शकलो तर आपलं सहअस्तित्व पुष्कळच सुकर होईल. इथे काळजी घ्यायची आहे ती एकच. ‘तुझ्या मनात असं आलंच कसं?’, ‘हे काहीतरी भयंकरच आहे’ अशा प्रतिक्रिया न देता मनातलं आधी पूर्ण ऐकून घ्यायचं. कारण मनातलं भयंकर असलं तरी ते ‘असतं’. मागच्या लेखात आपण लैंगिक गुन्ह्यांवरील उपायांसंबंधी बोलू असं म्हटलं होतं. मला पुरुषांच्या संदर्भात, त्यांच्या कामेच्छेच्या संदर्भात त्यांनी त्यांची कामेच्छा स्त्रीकडे स्पष्टपणे प्रकट करावी आणि त्यामुळे बिचकून न जाता स्त्रीने ती ऐकून त्यावर आपला निर्णय द्याावा हा एक पहिला उपाय सुचवावासा वाटतो. आपण पुरुषांबाबत बोलतो आहोत म्हणून पुरुषाचा उल्लेख केला आहे. वास्तविक विविध प्रकारचं ‘सेक्शुअल ओरिएंटेशन’ असणाºया सर्वांनाच ते लागू होतं.

आता हे बोलायला, लिहायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात करायला अवघड आहे असा प्रतिवाद होईल. तो बरोबर आहे. कारण आपण कामेच्छेचा निषेध पुष्कळ केला आहे. कामेच्छेला समजून घेतलेलं नाही. इथे पुन्हा प्रेमाचीच आठवण होते. प्रेम म्हटलं की आपल्याला ‘लफडं’ आठवतं. आपण प्रेमाकडे निर्मळपणे पाहण्यात बरेचदा कमी पडतो. (आता पुढे बोलायचं झालं तर आपण राग, द्वेष, मत्सर, अहंकार या आणि अशा विविध भावच्छटांनाही समजून घेत नाही. ‘द्वेष करणे हे वाईट’ हे ठीक आहे, पण तरी ‘द्वेष वाटतो' त्याचं काय? आता त्यावर काम करायचं तर आधी त्याविषयी बोलायला हवं. ते ऐकून घेतलं जायला हवं. या भावभावनांची ताकद फार मोठी आहे. त्यांच्या प्रभावामुळे पडलेला लहानसा तडा जर वेळीच सांधला गेला नाही तर पुढे जाऊन आणखी विध्वंस होऊ शकतो. सध्या इथे थांबून कामेच्छेकडे परत येऊ.)

कामेच्छेवर त्वरित 'अंमल' करण्याची पुरुषाची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला वळण देण्यासाठी कामेच्छेचं शब्दातून प्रकटीकरण हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. शिवाय पुरुषांना (मुलांना) त्याबाबत कुणा स्त्रीशी बोलता आलं तर अधिकच बरं होईल. पुरुषाची सामाजिक आणि जैविक गोची झाल्याने त्याचं कामविश्व एकूणातच डळमळीत, अस्थिर, गुंतागुंतीचं, त्याच्या मनोविश्वावर ‘हावी’ होणारं झालं आहे. स्त्री ही त्याच्या कामेच्छेचा विषय आहे तो जैविक अंगाने. सामाजिक अंगाने स्त्री हा मनुष्यत्वाचा, स्वतंत्र अस्तित्वाचा विषय आहे. परंतु या दोन्ही अंगांनी या विषयाचं प्रगल्भ ज्ञान त्याला झालेलं नाही. पितृसत्ताक व्यवस्था त्याला स्त्रीच्या अंतरंगाशी एकरुप होऊन तिला समजून घेऊ देत नाही तर कामेच्छेचं नियोजन न झाल्याने ती उफाळून वर येत त्याच्या विवेकाचाही कब्जा घेते. अशा परिस्थितीत त्याचा जर स्त्रीशी संवाद होत राहिला तर बदलाची शक्यता वाढेल. माझा व्यक्तिगत अनुभवही याला पुष्टी देणारा आहे. हेटरोसेक्शुअल पुरुष म्हणून माझं कामविश्व कसं आहे, त्यातल्या अवघड जागा कोणत्या, प्रश्न कोणते हे सगळं ऐकून घेणाऱ्या मैत्रिणी जेव्हा मला भेटल्या आणि त्यांनी जेव्हा ‘तुला जे होतंय ते ठीक आहे. त्याचा ताण घेऊ नकोस.  त्याविषयी आपण बोलत राहू’, असं सांगितलं तेव्हा माझा मानसिक भार हलका व्हायला मदत झाली. (मला अशा मैत्रिणी उशिरा आणि एक-दोघीच भेटल्या. आज जी मुले विशीत आहेत त्यांना अशा मैत्रिणी असतील अशी आशा करतो!)

कामेच्छा स्त्रीसमोर शब्दांतून प्रकट केल्याने त्यातील तीव्रता, अनावरता कमी व्हायला मदत होण्याबरोबरच या विशिष्ट इच्छेचं ‘सामान्यीकरण’ व्हायलाही मदत होईल. पुरुष आणि स्त्री दोघांनाही ही इच्छा सहजभावाने घेता येणं शक्य होईल. यापुढे जाऊन कामेच्छेचं नियोजन हा मुद्दा येतो. इथे जे पुरुषविशिष्ट ‘प्रॉब्लेम एरियाज’ आहेत तिथे काम करण्याची एक कल्पना मला सुचते. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी, अगदी घरातदेखील होणारा स्त्रियांचा लैंगिक छळ ही एक मोठी समस्या आहे. याबाबत कायदाही केला गेला आहे आणि कायद्याातील तरतुदींमध्ये पुरुषांचं प्रशिक्षण, सुधारणा यासाठीची स्पेस उपलब्ध आहे. लैंगिक दुर्वर्तन करणारा पुरुष आढळल्यास त्याच्या मानसिकतेचं ‘ऑडिट’ करण्याची काही एक प्रक्रिया होऊ शकली तरी त्याच्यात सुधारणा व्हायची शक्यता वाढेल. स्त्रीची स्वतंत्र आणि सक्षम व्यक्ती म्हणून नोंद घेण्याची वृत्ती घडवणं आणि त्याबरोबरच त्याच्या कामविश्वाबाबत त्याला बोलतं करून त्याची ‘तपासणी’ करत राहणं अशा दोन उद्देशांनी हे ‘ऑडिट’ करता येऊ शकेल. याला पुरुष चटकन् तयार होणार नाहीत हे खरं, परंतु माणसाला बोलतं करण्यासाठी काही क्रिएटिव्ह उपाययोजना करता येतात. त्यातून हळूहळू माणसं मोकळी होतात. उदा. एखाद्याा ऑफिसमधल्या पुरुषांना ‘मला सतावणारे कामविषयक प्रश्न, ‘मला माझ्या आसपासच्या स्त्रियांबद्दल काय वाटतं’ किंवा या धर्तीवरचे प्रश्न देऊन त्यांना त्यांचं म्हणणं निनावी पद्धतीने लिहायला सांगता येईल. पुरूषांची मानसिकता बदलायला हवी आहे यात शंकाच नाही. ती कशी बदलायची हा प्रश्न आहे आणि त्यासाठी आपल्याला आपली कल्पनाशक्ती राबवावी लागेल.  

लैंगिक कुतूहल जागं होणं या पहिल्या टप्प्यापासून ते विस्कळीत, वाईट प्रकारे मनात रुजणं या दरम्यानच्या विविध टप्प्यांवर पुरुषांसाठी काही कार्यक्रम आखता येतील. कोणत्याही सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयासारखाच हाही विषय सविस्तर बोलण्याचा आहे. आपला समाज फार मोठ्या प्रमाणात विभाजित आहे. त्यामुळे मुंबईतल्या एखाद्याा मोठ्या ऑफिसमध्ये काम करणारा विवाहित पुरुष आणि त्याच मुंबईत रोजंदारीवर काम करणारा एखाद्याा स्थलांतरित मजूर यांच्या कामविश्वाबाबत वेगळा विचार करावा लागेल. महत्त्वाची गोष्ट ही की स्त्रीला निर्भयपणे, कुठल्याही बाह्य ताणाशिवाय वावरता येण्यासाठी आपण पितृसत्ताक व्यवस्थेचा, पारंपरिक पुरुषी मानसिकतेचा निषेध करण्याच्या पलीकडे जाऊन या व्यवस्थेत, मानसिकतेत बदल व्हावेत यासाठी एकत्र येऊन आपण काय करू शकतो हे शोधणं. स्त्री-पुरुष संबंध आणि विशेषत: कामेच्छा हा ‘अस्थिर’ विषय आहे. त्यामुळे त्याबाबत निर्णायक बोलण्याची घाई न करता विश्लेषणात्मक बोलण्याची मानसिकता तयार करणे हा यातला पहिला टप्पा ठरेल.

Saturday, November 10, 2018

पुरूषातील लैंगिकता, लैंगिकतेतील पुरूष

अलीकडे चित्रपटगृहात एक अत्यंत प्रभावी (आणि महत्त्वाची) जाहिरात बघण्यात आली. नाव नेमकं आठवत नाही, पण हेल्पलाइनची जाहिरात आहे. एक मध्यमवयीन गृहस्थ लिफ्टमध्ये शिरतो. त्याच्यामागे एक लहान मुलगा फुटबॉल की बास्केटबॉलशी खेळत आत शिरतो. त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर अस्वस्थ भाव आहेत. लिफ्टचं दार बंद होतं. पुढच्या दृश्यात लिफ्टचं दार उघडतं. मुलगा बाहेर पडतो. पाठोपाठ हा गृहस्थही बाहेर पडतो. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तसेच आहेत. जाहिरात इथे संपते आणि स्क्रीनवर कॅप्शन झळकते - 'डू यू लाइक चिल्ड्रेन इन अ वे यू शुड नॉट?' हेल्प इज अ‍ॅव्हलेबल.' (लहान मुलं ज्या प्रकारे आवडायला नकोत त्या प्रकारे तुम्हाला आवडतात का? आम्ही तुम्हाला याबाबत मदत करू शकतो.) 

ही जाहिरात पाहून मला अतिशय बरं वाटलं. एखाद्या प्रश्नाचा केवळ निषेध करण्यापेक्षा तो प्रश्न समजून घेऊन नेमक्या जागी काम करायचा प्रयत्न करणाऱ्या उपक्रमाची ती जाहिरात होती. आता यानंतर माझ्या मनात आलं की याच धर्तीवर आणखी एक जाहिरात करता येईल. त्यात लहान मुलाच्या जागी एक स्त्री असेल. पुरूष तोच असला तरी चालेल. जाहिरात संपल्यानंतर कॅप्शन अशी असेल - स्त्रीकडे बघून तुम्हांला सतत उत्तेजित व्हायला होतं का? आम्ही तुम्हाला याबाबत मदत करू शकतो! 

मला जे म्हणायचं आहे ते बहुधा तुमच्या लक्षात आलं असेल. गेल्या दोन-तीन लेखांत आपण प्रेमसंबंधांविषयी बोललो होतो. त्यानंतर लैंगिक संबंधांविषयी मला काही सांगायचं होतं आणि ही जाहिरात माझ्या मदतीला धावून आली!     

कामेच्छा हा प्रेमासारखाच एक महत्त्वाचा विषय आहे. या विषयाबाबत खुलेपणाने, विश्लेषणात्मक बोलण्याइतपत आपण आपली 'सामाजिक मनोभूमिका' तयार केलेली नाही. प्रेमाबाबत जे झालं आहे तसंच काहीसं इथेही झालं आहे. 'संस्कृती'च्या उभारणीत काही गोष्टी नाकारल्या जातात, काही स्वीकारल्या जातात हे आपण मागे एकदा म्हटलं आहे. यात होतं असं की एका बाजूला सांस्कृतिक रचितं तयार होत असली तरी दुसऱ्या बाजूला त्यांना छेद देणारी 'वास्तव रचितं'ही असतात. लैंगिकतेबाबतचं वास्तव, लैंगिक इच्छेचं प्रकटन हा एक चिंताजनक विषय झाला आहे हे आपल्याला दिसतंच आहे. बलात्कारांच्या वाढलेल्या घटना, त्यातील हिंसाचार, पुरूषांकडून कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक, लग्नव्यवस्थेअंतर्गत असणारे बलात्कार व लैंगिक असमाधानाशी जोडलेले प्रश्न असे अनेक मुद्दे आहेत. लग्नसंस्था, लैंगिक संबंध आणि नैतिकता यावर स्वतंत्रपणे बोलता येईल. या लेखात आपण प्रामुख्याने 'पुरूषी लैंगिक वर्तन' यावर चर्चा करू. 

स्पिनोझा या सतराव्या शतकातील डच तत्वज्ञाचं एक मननीय विधान आहे - 'माणसाच्या कृत्यांकडे पाहून रडण्यापेक्षा, हसण्यापेक्षा किंवा त्यांचा तिरस्कार करण्यापेक्षा ती समजून घेण्याचा मी सतत प्रयत्न करतो.' माणसाची कृत्ये समजून घेणं अशाकरता महत्त्वाचं की ते नीट झालं तरच आपण प्रश्नांच्या उत्तराच्या दिशेने जाऊ शकतो. मला लैंगिकतेच्या क्षेत्रात हा विचार लक्षणीय वाटतो. पुरूषांचं लैंगिक वर्तन अनेक प्रकारांनी विस्कळीत, वाईट आणि स्त्रीसाठी अतीव दुःखदायक असं राहिलेलं आहे. पुरूषसत्ताक व्यवस्थेमध्ये पुरूषाचा अहंकार जोपासला जातो, स्त्रीला दुय्यम स्थान मिळतं आणि तिचं शोषण होतं हे तर आहेच. या व्यवस्थेने पुरूषाचीही गोची केली आहे आणि त्याच्यातला 'माणूस' झाकोळला आहे. पण व्यवस्थाजन्य अहंकाराबरोबरच पुरूषाची कामेच्छा हादेखील एक घटक असेल तर त्यावर मात करण्यासाठी आधी त्याचा अभ्यास केला पाहिजे. आज मासिक पाळीसारख्या विषयावर खुलेपणाने बोललं जातं आहे हे अतिशय स्वागतार्ह आहे. त्याच खुलेपणाने पुरूषाच्या 'इरेक्शन'विषयी, वीर्यस्खलनाविषयी देखील बोललं जाणं आवश्यक आहे. विशिष्ट वयात मुलींशी आणि मुलांशी त्यांच्या 'मनातील लैंगिकतेविषयी' बोललं जाणं आवश्यक आहे. आज जर पुरूषाचं लैंगिक वर्तन अडचणीचं ठरत असेल तर या विषयासंबंधीच्या विश्लेषणात्मक चर्चेला सामाजिक चर्चाविश्वात स्थान मिळायला हवं. 

र. धों. कर्वे यांच्या 'समाजस्वास्थ' मासिकात स्वतःच्या कामजीवनातील अडचणींबाबत वाचक पत्र लिहीत. वीर्यस्खलन, कामोत्तेजना, शरीरसंबंध, संतती नियमन यांच्याशी संबंधित प्रश्नांबाबत एका मराठी मासिकातून १९३०-१९४० च्या दशकांत चर्चा होत असे तशी चर्चा नंतर होत होती का माहीत नाही. आज अशी चर्चा करणारं मासिक/वृत्तपत्र नाही. माध्यमांचा इतका मारा असताना लैंगिक संबंधांवर नेमकेपणाने बोलणाऱ्या चर्चा, व्हिडीओज बघायला मिळत नाहीत. इंग्लिशमध्ये आहेत, मराठीत नाहीत. २००८ पासून 'समाजस्वास्थ्य' या मासिकाचं त्याच नावाने पुनुरुज्जीवन करण्याचा प्रयत्न मनीषा सबनीस यांनी केला. त्यात लैंगिक प्रश्नांविषयी चर्चाही होत असे. पण पुढे हे मासिक तग धरू शकलं नाही.      

पुरूषाची कामेच्छा आणि स्त्रीची कामेच्छा यात फरक आहेत का? असल्यास का? कोणते? पुरूषाच्या लैंगिक इच्छेचं नेमकं स्वरूप काय आहे? त्याची लैंगिक इच्छा गुन्हेगारी वळण का घेते? लैंगिक इच्छा नियंत्रणाबाहेर जात असेल तर त्यावर उपाय काय? हे या चर्चेतील काही समर्पक प्रश्न आहेत. मुळात सजीवांमध्ये लैंगिक इच्छा असते याचं एक प्रमुख कारण लैंगिक संबंधांतून प्रजोत्पादन होतं हे आहे. आपली गुणसूत्र टिकवून ठेवणं, त्यासाठी संतती जन्माला घालणं ही सजीवांची एक मुख्य प्रेरणा आहे. भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल वाटणारं आकर्षण, त्यातून लैंगिक इच्छा चेतवली जाणं याच्या मुळाशी प्रजोत्पादनाचा 'ड्राइव्ह' आहे. अर्थात प्रजोत्पादन करायचं नसेल तरी माणसामध्ये लैंगिक इच्छा निर्माण होते. याचं कारण लैंगिक संबंधांतून केवळ प्रजोत्पादनच होत नाही तर 'प्लेझर'देखील मिळतं आणि प्रजोत्पादन व प्लेझर या दोन गोष्टी वेगळ्या करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. त्यामुळे 'प्रजेच्या जबाबदारीचं' ओझं टाळून निव्वळ आनंद' ही बाब माणसामध्ये या क्रियेचं आकर्षण वाढवण्यास कारणीभूत ठरली आहे. याची नोंद घेऊन पुरूषांच्या संदर्भाने विचार करता लैंगिक इच्छा निर्माण होणं, ती वाढणं, नियंत्रणाबाहेर जाणं आणि परिणामी त्यांच्याकडून गुन्हा घडणं या साखळीचा जर नीट अभ्यास केला, त्याबाबत पुरूषांना बोलतं केलं गेलं तर पुरूषाचा विवेक जागवायला मदत होऊ शकेल. कामेच्छा आणि स्त्रीवर नियंत्रण ठेवण्याची, अहंकाराची पुरूषसत्ताक व्यवस्थेकडून मिळालेली 'देणगी' या दोन्हीचा प्रभाव पुरूषाच्या मानसिकेतेवर आहे. याची उकल करून ती पुरूषांसमोर मांडत राहणं गरजेचं आहे.      

पुरूषाच्या बाबतीत लैंगिक तृप्ती हे विरेचनाचं माध्यम आहे. या तृप्तीअभावी, इरेक्शनच्या परिणामी पुरुषांत अवघडलेपण येतं, त्याचं मनःस्वास्थ्य गडबडू शकतं आणि ही इच्छा त्याच्या विवेकावरदेखील मात करू शकते. लैंगिक इच्छेची ही 'उत्क्रांतीजन्य ताकद' नोंद घेण्याजोगी आहे. ज्या पुरूषाची स्त्रीबाबतची मानसिकता मध्ययुगीनच आहे त्याला त्याच्या लैंगिक इच्छेबाबत काही प्रश्नच पडणार नाही. कारण त्याच्या दृष्टीने स्त्री ही भोग्य वस्तूच आहे. पण अशी मानसिकता नसणाऱ्या पुरूषांबाबतही लैंगिक इच्छा आपला प्रभाव दाखवते का हे तपासणं आवश्यक आहे. याबाबत एक उदाहरण आठवलं. 'मी टू' चळवळीत चित्रपट दिग्दर्शक विकास बहल याच्यावर आरोप झाले. विकास बहलने 'क्वीन' हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. जो पुरूष स्त्री स्वातंत्र्याचा एक सशक्त उद्गार असलेला चित्रपट तयार करतो तो वास्तवात संपूर्णपणे वेगळा, पारंपरिक पुरूषी मानसिकतेचा असू शकतो ही एक शक्यता आहेच. पण तो तसा नसून काही परिस्थितीजन्य कारणांमुळे किंवा मनःस्थिती बिघडून, नियंत्रण सुटल्यामुळे त्याच्याकडून अपराध घडला का हेही तपासायला हवं. मुद्दा हा की केवळ आरोप-प्रत्यारोपात न अडकता, शक्यता विचारात घेत, त्यांचा शोध घेत आपण समस्येच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार की नाही? बलात्काराकडे इव्होल्यूशनरी बायॉलॉजीच्या अंगाने पाहणारं ’नॅचरल हिस्टरी ऑफ रेप : बायॉलॉजिकल बेसेस ऑफ सेक्शुअल कोअर्शन’ हे रँडी थॉर्नहिल आणि क्रेग पाल्मर या लेखकद्वयीचं एक पुस्तक आहे. यातील एका परिच्छेदाचा माझ्या एका लेखासाठी मी अनुवाद केला होता. तो इथे देतो आहे -
           
मनुष्यांमधील बलात्काराची अंतिम कारणे स्त्री-पुरूषांच्या लैंगिक उत्क्रांतीमधील फरकातच सापडतील. स्त्रीच्या लैंगिकतेचं नियमन करणाऱ्या मानसिक यंत्रणा स्त्रीमध्ये उत्क्रांत झाल्या आणि त्याला प्रतिसाद म्हणून बलात्कार ही क्रिया उत्क्रांत झाली असे पुरावे सांगतात. स्त्री तिच्यातील या मानसिक यंत्रणांमुळे आपल्या संभाव्य लैंगिक जोडीदारांमध्ये भेद करू शकली. नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेत जर मानवी स्त्रीची निवड 'कुठल्याही नराबरोबर, कुठल्याही परिस्थितीत रत होण्यास तयार' अशी झाली असती तर बलात्कार घडला नसता. दुसऱ्या बाजूला, नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेत जर मानवी पुरूषाची निवड 'विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट मादीकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होणे' अशी झाली असती तर बलात्कारांचं प्रमाण खूपच कमी असतं आणि 'जी स्त्री समागम करण्यास उत्सुक आहे त्याच स्त्रीशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा' अशा प्रकारे जर मानवी पुरूषाची नैसर्गिक निवड झाली असती तर बलात्काराची शक्यताच नष्ट झाली असती!

लैंगिक इच्छा, तिचं घडणं-बिघडणं आणि त्याचं प्रतिबिंब लैंगिक वर्तनात पडणं यामागे जैविक आणि सामाजिक दोन्ही घटक जबाबदार असतात आणि त्यामुळे लैंगिक गुन्ह्यांबाबत या दोन्ही अंगांनी विचार करून उपाय शोधावे लागतील हे नोंदवून आपण थांबू आणि पुढील लेखात उपायांचा विचार करू. 

Saturday, October 27, 2018

पॉलीॲमरी : तिघांची आनंदी गोष्ट

४ नोव्हेंबर २०१७ च्या चतुरंग पुरवणीत 'पॉलीॲमरी' या विषयावर मी एक लेख लिहिला होता. एकाहून अधिक व्यक्तींशी असणारे गंभीर प्रेमसंबंध आणि सर्व संबंधित व्यक्तींना त्याबाबतची स्पष्टता हा पॉलीॲमरीचा गाभा आहे. त्या लेखात संकल्पनात्मक मांडणी झाली होती. या लेखात 'अंमलबजावणी' विषयी विचार करू.  

बहुविध प्रेमसंबंध स्वीकारण्यासाठी प्रगल्भ मानसिकतेची आवश्यकता असते ते आपण आधीच्या लेखात पाहिलं आहे. आता असं गृहीत धरू की अशा नात्यांमध्ये काही व्यक्ती आहेत. तर त्यांनी हे पुढे कसं न्यायचं? इथे दोन शक्यता आहेत. जर सर्व संबंधित व्यक्ती एकमेकांचे नातेसंबंध स्वीकारत असतील तर प्रश्नच नाही. पण जर काहींना असे संबंध मान्य नसतील तर ते अडचणीचं होतं. आणि मग जे पॉलीॲमरस आहेत त्यांनी इतरजण तयार होईपर्यंत वाट पाहणं इष्ट ठरतं. आज आपण समाज म्हणून या संकल्पनेसाठी तयार नाही आहोत. त्यामुळे जे तयार आहेत त्यांना अस्तित्वात असलेले नातेसंबंध टिकवून नव्या नातेसंबंधात जायचं असेल तर त्यांच्याकडे वाट पाहण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. अन्यथा एक नातं थांबवून दुसऱ्या नात्यात जायचा निर्णय घेता येतोच, पण मग ते मोनोगॅमस होतं. 

या व्यवस्थेचा स्वीकार करण्यातली प्रमुख अडचण प्रेमातील पझेसिव्हनेस ही आहे. आणि तो कसा घालवायचा याकरता कुठलंही रेडिमेड उत्तर नाही. सतत बोलत राहून, एकत्र राहण्याचे प्रयोग करत राहून हा बदल होऊ शकतो. यात परिस्थितीच्या आवश्यकतेनुसार भावनिक व लैंगिक दोन्ही प्रयोग करता येतील. त्यावर प्रत्येकाने आपापल्या मानसिक तयारीनुसार विचार करावा व कृती करावी. आपल्या मानसिकतेत पझेसिव्हनेसची भावना खूप खोलवर रुजल्याने ती सहजासहजी बाजूला काढणं अवघड आहे. पझेसिव्हनेस (मालकी हक्क) आणि जेलसी (मत्सर) या दोन्ही भावना एकमेकींना समांतर चालत असतात. आहार, निद्रा, भय, मैथुन या आदिम जाणिवांचा विस्तार होऊनच राग, द्वेष, मत्सर, प्रेम या भावना निर्माण झाल्या आहेत. आपल्या मेंदूत जे जे काही निर्माण होतं त्याचा धागा आपल्या उत्क्रांतीच्या वाटचालीशी जोडलेला आहे. त्यात पुन्हा स्त्री आणि पुरूष असा फरकही आहे. त्यामुळे आपल्या भावनांमुळे विचलित न होता 'हे मला वाटत नाही तर माझ्या मेंदूतल्या न्यूरॉन्सना वाटतंय' असा विचार केला तर आपण आपल्या भावनांना चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. हाच धागा पकडून मालकी हक्क आणि मत्सर या भावनांवरही काम करता येऊ शकेल. दुसरं म्हणजे आपलं प्रेमाचं माणूस आधी 'स्वतंत्र माणूस' आहे हे मनात रूजवायचा प्रयत्न केल्यानेही मदत होईल.   

एक गोष्ट लक्षात घेऊया की व्यक्तींची बलस्थाने आणि कमकुवत स्थाने ही व्यक्तींनी एकत्र येऊन लावलेल्या व्यवस्थेचीही बल स्थाने आणि कमकुवत स्थाने असतात. त्यामुळे कोणत्याही व्यवस्थेला एकच एक ठरीव साचा असत नाही. हेच बहुविध नातेसंबंधांनाही लागू होतं. त्या त्या उदाहरणातील व्यक्तींच्या स्वभावानुसार, सामर्थ्य व कमकुवतपणानुसार त्या त्या उदाहरणातील व्यवस्थेच्या स्वरूपात फरक पडू शकेल. सर्वजण एकत्र राहत असतील तर ही व्यवस्था परिणामकारक ठरते. पण काही ठिकाणी एकत्र न राहताही ती व्यवस्था चांगली चालू शकते. त्यामुळे मुळात व्यवस्था लवचीक असणं चांगलं. (स्त्री-पुरूष संबंधांबाबत इथून पुढे लवचीक व्यवस्थाच परिणामकारक ठरतील असं एकूणात दिसतं.) व्यक्ती एकत्र राहिल्या तर घर चालवण्यासाठी जे करावं लागतं त्या सर्व कामांची विभागणी तर करावी लागेलच आणि प्रत्येक नात्याचं स्वरूप आणि त्यानुसार वेळेची विभागणी हेही करावं लागेल. व्यक्ती एकत्र राहत नसतील तर दैनंदिन कामांचा मुद्दा न येता वेळेच्या विभागणीचा मुद्दा फक्त येईल.   

व्यक्तींमधले संबंध निभावणं यात जशी व्यक्तींमधील प्रगल्भताच मुख्य भूमिका पार पाडते तेच मुलांबाबतही लागू होईल. मुलांसाठी जैविक आई-वडील अर्थातच अग्रस्थानी असतील आणि इतरजण दुय्य्म स्थानी - पण घरातील / नात्यातील सदस्य म्हणून असतील. यातली एक महत्त्वाची बाजू ही की लहानपणापासूनच नातेसंबंधांच्या अशा नव्या स्वरूपाची ओळख मुलांना झाली तर त्यांची वाढही या व्यवस्थेला पूरक होईल आणि प्रेमभावनेतील मुक्तता पहिल्यापासूनच अनुभवल्याने त्याची त्यांना मोठेपणी मदत होईल. 

अशा प्रकारच्या नात्याची कल्पना आसपासच्या लोकांना, नातलगांना द्यावी की न द्यावी या प्रश्नाचे उत्तरही एकसाची नाही. ज्यांना ही गोष्ट पचनी पडणं शक्य नाही त्यांना हे सांगावं की सांगू नये हा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. इथे प्रश्न नैतिकतेचा नाही. 'काही प्रामाणिक इच्छा आणि इतरांची अपुरी तयारी' असा हा संघर्ष आहे. त्यामुळे इथे काहीएक मध्यममार्ग काढावा लागेल. ही गोष्ट हळूहळू समजावूनही सांगता येईल. त्यासाठी उपलब्ध साहित्याचा आधार घेता येईल. गटचर्चा घेता येतील. आपल्या मनातील विविध भावनांबाबत आपली 'साक्षरता' (इमोशनल लिटरसी) कशी वाढेल यासाठी प्रयत्न करता येतील. माणसाचं एक सत्य असं आहे की तो प्रेमाचा भुकेला असतो. त्याला स्वतःचं एक माणूस हवं असतं. ज्यांना पॉलीॲमरी ही संकल्पना स्वीकारायला जड जाते त्यांना हा विश्वास मिळाला की ही प्रेमाची व्याप्ती वाढवणारी संकल्पना आहे, सर्वसमावेशक संकल्पना आहे, यात कुणा एकाला डावलण्याचा प्रश्नच येत नाही, तर त्यांची पावलं हळूहळू स्वीकृतीकडे पडू शकतात.  

एखादा नवा विचार आणि त्याअनुषंगाने नवीन व्यवस्था हा 'पॅराडाइम' (पॅटर्न, साचा) मधला बदल असतो. माणसाच्या इतिहासात वेगवेगळ्या टप्प्यांवर हे बदल घडलेलेच आहेत. कुटुंबव्यवस्थाही त्याला अपवाद नाही. पॉलीॲमरी हाही एक बदल आह. ही व्यवस्था सार्वत्रिक होईल किंवा होणारही नाही. झाली तर भविष्यात तिला कायदेशीर मान्यताही मिळू शकेल. आजचा मुद्दा इतकाच आहे की जर काही (मोजक्या) लोकांना काही वेगळं वाटत असेल तर त्याचा शोध घ्यायची, त्याबाबत प्रयोगशील असण्याची मुभा त्यांना असावी. अडचण अशी होते की पारंपरिक व्यवस्थेतील लोकांना त्या व्यवस्थेबाहेरचं काही दिसलं की ते त्यांना चुकीचं वाटतं. त्यांना 'वेगळं' वाटणं, स्वीकारता न येणं हे मान्यच आहे, पण 'चुकीचं' वाटत असेल तर अडचण आहे. समूहकेंद्री, संस्कृतीकेंद्री, धर्मकेंद्री विचारांनी अस्मितेचा अभिमान गौरवास्पद ठरवला आहे. त्याकरता प्रसंगी हिंसेलाही मूक संमती दिली आहे. पण प्रेमासारख्या मुक्तिदायी भावनेला मात्र बंदिस्त केलं गेलं आहे. तिथे काही वेगळं करायला बंदी आहे. (इथे मला 'प्रेमाचं होऊ द्या ना जागतिकीकरण' असं म्हणणारे कवी अरूण काळे आठवले!) मला असं वाटतं की बहुविध नातेसंबंधांची चर्चा करताना प्रेमभावनेमधील मोकळिकीचा मुद्दा आज जे प्रौढ आहेत, ज्यांची काहीएक मानसिकता तयार झाली आहे त्यांच्यापेक्षा जे तरुण, टीनएजर्स आहेत, जे नव्याने गोष्टी समजून घेत आहेत त्यांच्यापर्यंत पोचवणं गरजेचं आहे. लहान मुलांना वाढवतानाही आपण आपल्याला जे अप्रिय वाटतं त्याविषयी बोलायचं टाळतो. तिथेही जर आपण बदल केला आणि विविध विषयांना नेहमीच मूल्यात्मक दर्जात किंवा मूल्यनिर्णयात न गुंतवता 'जे आहे ते' मांडायचा प्रयत्न केला तर मुलंही कप्पेबंद विचार करणार नाहीत. बदलाच्या मानसिकतेचा संबंध वयाशी असतोच असं नाही हे खरं आहे, पण जर पाटी कोरी असेल तर नवीन चित्र काढायला अधिक अवकाश मिळतो हेही खरंच!

Wednesday, October 24, 2018

मानवी तस्करी, वेश्याव्यवसाय आणि आपण  

एप्रिल २०१८ मध्ये मुंबईतील लॅमिंग्टन रोडवरील ओम निवास या इमारतीवर पोलिसांनी रात्री धाड टाकली होती. या परिसरात वेश्याव्यवसाय चालतो आणि इथे धाडसत्र सुरूच असतं. पण या धाडीदरम्यान घडलेली वाईट गोष्ट ही की पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करताना दोन वेश्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून मरण पावल्या. दोरखंडाच्या साहाय्याने इमारतीच्या मागील बाजूने खाली उतरण्याचा त्या प्रयत्न करत होत्या. त्यांची वयं ५० व ३१ अशी होती. या घटनेची बातमी मुंबई मिररमध्ये १२ एप्रिल २०१८ रोजी प्रसिद्ध झाली आहे. पोलिसांच्या धाडी ही वेश्यांच्या डोक्यावर असलेली सततची टांगती तलवार असते. यात त्यांना वरचेवर अपमानाचा, दबावाचा सामना करावा लागतो. यातून सुटण्याचा प्रयत्न करताना दोघींचा मृत्यू व्हावा हे आणखी भयंकर आहे.

वेश्या आणि वेश्याव्यवसाय हा सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. समाजातील काही व्यावसायिक अतिशय हलाखीचं जिणं जगतात आणि समाज म्हणून आपल्यासाठी ते लाजिरवाणं आहे. गटार सफाई करणारे कामगार, वेश्या ही याची काही उदाहरणं आहेत. कोणत्याही व्यवसायामागचं प्रमुख कारण आर्थिक गरज हे असतं. वेश्याव्यवसायाचंही तसंच आहे. मात्र या संदर्भाने वेश्या ढोबळमानाने दोन गटात विभागल्या गेल्या आहेत. बळजबरीने व्यवसायात आणल्या गेलेल्या आणि आणि स्वेच्छेने व्यवसाय करणाऱ्या. आजचा भारतीय कायदा एकट्या स्रीने स्वेच्छेने वेश्याव्यवसाय केला तर तो गुन्हा समजत नाही. पण एकाहून अधिक स्रियांनी एकत्र व्यवसाय करणे, घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय करणे गुन्हा आहे. व्यवसायासाठी 'सॉलीसिटिंग' करणं हा गुन्हा आहे. वेश्येने कमावलेल्या पैशावर उदरनिर्वाह करणं हाही गुन्हा आहे.

पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत 'सहेली' ही 'सेक्स वर्कर्स कलेक्टिव्ह' गेली वीस वर्षे विविध प्रश्नांवर काम करते आहे. वेश्यांचं आरोग्य, त्यांचं समुपदेशन, नागरिक म्हणून त्यांचे हक्क त्यांना मिळवून देणे यावर आणि वेश्याव्यवसायाबाबत समाजाचा दृष्टीकोन बदलावा यासाठी 'सहेली' काम करते आहे. भारत सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे The Trafficking of Persons (Prevention, Protection and Rehabilitation) Bill, 2017 नुकतंच संसदेत सादर झालं आणि मंजूरही झालं. या बिलासंदर्भात नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स (एनएनएसडब्ल्यू) या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने तपशीलात एक टिपण तयार केलं होतं. त्यात प्रामुख्याने बिलातील तरतुदींवर तपशीलात प्रतिक्रिया दिली गेली आहे. याखेरीज 'सहेली'साठी मी एक टिपण तयार केलं होतं. ते इथे देत आहे. वेश्याव्यवसायाशी संबंधित 'फोर्स्ड रेस्क्यू' (सक्तीची मुक्ती) या एका मुख्य मुद्द्यावर वाचकांना प्राथमिक माहिती मिळावी हा यामागचा उद्देश आहे. मुद्दा थोडक्यात पोचावा यासाठी काही भाग गाळला आहे. -

वेश्याव्यवसायाचे वास्तव लक्षात न घेता प्रस्थापित नैतिकतेच्या चौकटीतूनच या व्यवसायाकडे नेहमी पाहिले जाते आणि ते अडचणीचे आहे. वेश्याव्यवसायाकडे 'व्यवसाय' म्हणून बघितले जात नाही. या व्यवसायात स्रिया स्वेच्छेने व बळजबरीने दोन्ही प्रकारे येतात. परंतु कायद्याचा दृष्टीकोन आजवर 'या स्रियांची आज इच्छा काय आहे हे लक्षात न घेता त्यांना या व्यवसायातून 'मुक्त' करणे, त्यांचे पुनर्वसन करणे - मुळात वेश्याव्यवसायाचे उच्चाटन करणे असाच राहिलेला आहे. वेश्याव्यवसाय म्हणजे ट्रॅफिकिंग असे साधारण समीकरण तयार केले गेले आहे. पण ते वस्तुस्थितीला धरून नाही. या व्यवसायात काही स्रिया स्वेच्छेने येतात हे लक्षात घेतले जात नाही. त्यामुळे शासनाच्या दृष्टिकोनात मोठी गफलत आहे. प्रस्तुत बिलदेखील याच दृष्टीकोनातून तयार केले गेले आहे आणि त्यामुळेच त्यावर सविस्तर टिप्पणी करणे आवश्यक आहे.

बिलातील तरतुदींनुसार गावा-शहरातील वेश्यावस्त्यांवर छापे घालून व्यवसाय बंद करण्याची कारवाई शासनाकडून केली जाईल याची आम्हाला धास्ती वाटते आहे. विविध गावा-शहरातील वेश्यावस्त्यांवर छापे घालून व्यवसाय बंद करण्याची कारवाई शासनाकडून केली जाईल हे स्पष्ट आहे. या बिलाद्वारे जिल्हा कृती दल (डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स) स्थापन करण्यात येऊन त्यांना अमर्याद अधिकार दिले जाणार आहेत. पोलीसांकडून वेश्यांवर सातत्याने आपल्या अधिकारांचा वापर (गैरवापरदेखील) होत असतो. त्यात भर घातली गेली तर वेश्यांचे प्रश्न आणखी चिघळतील. वर उल्लेख केला आहे त्याप्रमाणे या व्यवसायाचे वास्तव समजून न घेता या स्रियांना व्यवसायातून बाहेर काढण्याचीच घाई होताना दिसते. एक उदाहरण घेऊ. पुण्यातील बुधवार पेठेत आज सुमारे तीन हजार स्रिया वेश्याव्यवसाय करत आहेत. या स्रियांचा व्यवसाय बंद केला तर त्या कुठे जातील आणि काय करतील याचा विचार शासनाने केला आहे का? वेश्यांची संख्या लक्षात घेता या स्रियांना 'मुक्त' केले तर त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न शासन सोडवणार आहे का? मुळातला प्रश्न हा आहे की एखाद्या स्त्रीला बळजबरीने या व्यवसायात आणले गेले असेल तर तिला इच्छेविरुद्ध आणले गेले हे उघडच आहे. अशा प्रकारे फसवून, बळजबरीने कुणालाही या व्यवसायात आणायला 'सहेली'चा विरोधच आहे. पण आज ती वेश्याव्यवसाय करते आहे आणि अर्थार्जन करते आहे. व्यवसायात येताना तिची इच्छा विचारात घेतली गेली नव्हती, तिचे शोषण झाले होते. मग त्यावेळी जर तिला कुणी मदत करू शकले नव्हते तर आज ती व्यवसायात स्थिरावल्यावर तिच्या व्यवसायाकडे नैतिकतेच्या चष्म्यातून बघत तिला व्यवसाय सोडण्यास सांगणे योग्य आहे का? व्यवसायात येताना तिच्यावर बळजबरी झाली होती तशीच आता व्यवसाय सोडतानाही करायची का? बळजबरीने व्यवसायात आणणे हे शोषण आहे तसेच बळजबरीने व्यवसायाबाहेर काढणे हेदेखील शोषणच नाही का?

आज जी वेश्यावस्ती दिसते त्यात 'ट्रॅफिकिंग' होऊन गेलेल्या' स्रिया राहत आहेत. त्यांचे प्रश्न आज वेगळे आहेत. ट्रॅफिकिंग होऊच नये यासाठी बिलात जे उपाय (Preventive measures) योजले आहेत ते अतिशय ढोबळ स्वरूपाचे आहेत. उदा. facilitating the implementation of livelihood and educational programmes for vulnerable communities किंवा developing appropriate law and order framework to ensure prevention of trafficking of persons यातून ट्रॅफिकिंग रोखण्याचे नक्की कुठले कार्यक्रम आहेत किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचे योग्य फ्रेमवर्क म्हणजे नक्की काय या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. वेश्याव्यवसायात स्वेच्छेने येणाऱ्या स्रिया आर्थिक कारणांनी येतात. ज्या स्वेच्छेने येत नाहीत त्याही आर्थिक कारणांमुळेच या व्यवसायात ढकलल्या जातात. या व्यवसायाच्या मुळाशी इतर कुठल्याही व्यवसायाच्या मुळाशी असतो तो आर्थिक उद्देशच प्रबळ आहे. ट्रॅफिकिंग थांबवायचे असेल तर ज्या स्रियांना बळजबरीने व्यवसायात आणले जाते त्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, आपल्याला कुणी फसवू नये यासाठी त्यांची व्यावहारिक समज वाढवणे, मुलींना समर्थ बनवणे, आसपासच्या लोकांना सजग करणे अशा अनेक आघाड्यांवर काम करणे गरजेचे आहे. त्याबाबतचा काही कृतिकार्यक्रम बिलामध्ये दिलेला नाही. एक गोष्ट खरी आहे की समाजातील आर्थिक विषमता कमी होणे, कुटुंब नियोजनासाठी सामाजिक प्रबोधन होणे या गोष्टी संथगतीने होतात. शासन याबाबतीत एका मर्यादेपर्यंतच काम करू शकते हेही मान्य. पण जर मुळापाशी काम करण्याची क्षमता मर्यादित असेल तर खोडावर घाव घालण्यात काय अर्थ आहे? वेश्यागृहांना टाळे ठोकून ट्रॅफिकिंग थांबणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

शासनाच्या या बिलाबद्दल आणि वेश्याव्यवसायाबाबत शासनाचे जे एकूण धोरण आहे त्याला आक्षेप असण्याचे एक कारण हेही आहे की शासन पुनर्वसनाचा पुरस्कार करते, पण पुनर्वसन झालेल्या वेश्यांची उदाहरणे दिसत नाहीत. आज सुधारगृहांची अवस्था वाईट आहे. पुनर्वसन योजनांना प्रश्न विचारायची गरज आहे. कायमस्वरूपी, मुख्य प्रवाहात आणल्या गेलेल्या स्रियांची संख्या उपलब्ध नाही. त्यामुळे शासनाचा पुनर्वसनाचा आग्रह कमकुवत पडतो.

याबाबत एक महत्त्वाचा मुद्दा शासनाच्या निदर्शनास आणून द्यायला हवा. शासनाला जर खरोखरच ट्रॅफिकिंग रोखायचे असेल तर त्यासाठी वेश्याव्यवसायातील स्रिया मदत करू शकतील. त्यातील ज्या स्रिया स्वतः त्या अनुभवातून गेल्या आहेत त्यांना ट्रॅफिकिंगबाबतचे बारकावे माहीत आहेत. 'एनएनएसडब्ल्यू'च्या सभासद संघटनांनी शासनाला याबाबत मदत केली आहे. पण आज परिस्थिती अशी आहे की वेश्येच्या डोक्यावर पोलीस पकडून तरी नेतील किंवा जबरदस्तीने सोडवतील तरी या भीतीची टांगती तलवार आहे. तिच्या डोळ्यासमोर शासनाचं जे चित्र आहे तेच मुळात तिला घाबरवणारं आहे. अशा परिस्थितीत या स्त्रियांच्या मनात शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. यातून ट्रॅफिकिंग रोखण्याचा मार्गही सुकर होऊ शकतो. शासनाने हे कृपया लक्षात घ्यावे.

प्रस्तावित बिलाच्या पार्श्वभूमीवर आमची भूमिका सारांशाने अशी आहे -

  • शासनाने मानवी तस्करी विरोधात कारवाई जरूर करावी, पण वेश्याव्यवसायाविरुद्ध कारवाई करू नये. वेश्याव्यवसायाला गुन्हा समजू नये.
  • वेश्याव्यवसायाबाबतचे धोरण/कायदा ठरवताना या व्यवसायातील व्यक्ती, त्यांच्या संघटना, राष्ट्रीय पातळीवरील नेटवर्क यांना सहभागी करून घ्यावे. आज तसे होत नाही आहे.
  • शासनाने हे लक्षात घ्यावे की वेश्याव्यवसाय एकटीने करण्याऐवजी एकत्रितरित्या करणं स्रियांना अधिक सुरक्षित वाटतं. शिवाय वेश्यावस्तीत या स्रिया ज्या घरात राहतात त्या घरांच्या मालकिणी-मालक, वस्तीतले दलाल हे सगळे नेहमीच शोषण करणारे नसतात असे स्रियांचे अनुभव सांगतात. वस्तीमध्ये या स्रियांसाठी एक सपोर्ट सिस्टीम तयार झाली आहे. हे वास्तव लक्षात न घेता ट्रॅफिकिंग रोखण्याच्या नावाखाली वेश्याव्यवसायावरच कारवाईचा बडगा उगारणे चुकीचे आहे.
  • वेश्याव्यवसायाकडे 'व्यवसाय' म्हणून बघावे. इतर व्यवसायांसारखा हा व्यवसाय आहे हे मान्य केले की मग त्यानंतर पुढच्या गोष्टी घडू शकतील.
  • वेश्याव्यवसायाचा संबंध लैंगिक व्यवहाराशी आहे आणि लैंगिक व्यवहाराकडे समाज म्हणून आपण स्वच्छ दृष्टीने बघत नाही ही एक मुख्य अडचण आहे. त्यामुळे स्वेच्छेने हा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडेही आपण सकारत्मकतेने पाहू शकत नाही. शासनाच्या वेश्याव्यवसायाबाबतच्या धोरणात याच मानसिकतेचे प्रतिबिंब पडलेले दिसते. या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे.
  • एखादी स्री स्वेच्छेने वेश्याव्यवसाय करत असेल तर ती तो स्वेच्छेने करत नाही, नाईलाजाने करते आणि म्हणून त्यात खऱ्या अर्थाने 'स्वेच्छा' नाहीच असा युक्तिवाद बरेचदा केला जातो. या युक्तिवादातील अडचण अशी आहे की स्वेच्छेचा मुद्दा केवळ वेश्याव्यवसायालाच नव्हे तर इतरही व्यवसायांना लागू होतो. अनेकजण नाईलाज म्हणून नोकरी-व्यवसाय करत असतात. पण त्या व्यवसायांबाबत हा युक्तिवाद केला जात नाही. याचे कारण पुन्हा लैंगिक व्यवहाराकडे पाहण्याची दृष्टी हेच आहे. विवाहाव्यतिरिक्त येणारे लैंगिक संबंध अनैतिक मानले जाणे यातच मुळात घोळ आहे. लैंगिक संबंध ही नाजूक गोष्ट आहे, त्यात काळजी घ्यायला हवी, मानवी संबंध व समाजव्यवस्था यादृष्टीने लैंगिक व्यवहारांचे नियमन करणे आवश्यक आहे हे मान्यच आहे, पण म्हणून लैंगिक व्यवहारच मोडीत काढणे योग्य नाही. हे लैंगिक व्यवहार पैशाच्या आधारे, व्यवसाय म्हणून, व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि स्वास्थ्य याची काळजी घेऊन होत असतील तर त्यांना विरोध करण्याचे काही कारण नाही.
  • लैंगिक गरज ही माणसाची गरज आहे. लग्नसंस्थेमार्फत या गरजेचे नियमन काही अंशी केले जात असले तरी ते पूर्णतः केले जात नाही. लग्नसंस्थेच्याबाहेर असणाऱ्या व्यक्तींची लैंगिक गरज हाही एक मुद्दा आहेच. वेश्याव्यवसाय अस्तित्वात आहे कारण विविध व्यक्तींच्या, वयाच्या विविध टप्प्यांवरील लैंगिक गरजेची व लैंगिक आकांक्षांची पूर्तता समाजातील स्री-पुरुषांच्या परस्पर सहकार्यातून होण्याची समाजमान्य व्यवस्था अस्तित्वात नाही. म्हणूनच लग्नसंस्थेला समांतर असलेली वेश्याव्यवस्था इतिहासात खूप आधीपासून अस्तित्वात आहे. त्यामुळे वेश्याव्यवसायाच्या गुन्हेगारीकरणाने प्रश्न संपणारे नाहीत. लैंगिक गरजेचे/इच्छेचे नियमन हा प्रमुख विषय आणि ती गरज/इच्छा पैशाच्या मोबदल्यात पूर्ण करण्याला मान्यता असणे/नसणे हा उपविषय असे दोन मुद्दे आहेत. त्यावर काम केलं तर कदाचित वेश्याव्यवसायाचं स्वरूप बदलायला मदत होईल.

(या विषयासंदर्भातील विचारी प्रतिक्रियांचं स्वागत आहे.)

२४ ऑक्टोबर २०१८, फेसबुक पोस्ट

Saturday, October 13, 2018

प्रोग्रॅमिंगच्या पलीकडचं प्रेम

'निःशब्द' हा रामगोपाल वर्माने दिग्दर्शित केलेला चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. साठ वर्षांचा एक गृहस्थ विजय (अमिताभ बच्चन) आणि त्याच्या विशीतल्या मुलीची मैत्रिण जिया (जिया खान) हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. यातून मोठा गहजब उडतोआणि सगळेच नातेसंबंध ताणले जातात. विजयच्या मनात अपराधभाव दाटून येतो आणि शेवटी सगळीच नाती तुटतात. कथेचा शेवट दुःखात होतो. 

आपण ही कथा उदाहरणादाखल म्हणून घेऊया, पण ती उदाहरणादाखल आहे हेही लक्षात ठेवूया. या कथेतील पुरूषाच्या जागी स्त्री असू शकेल आणि ती तिच्याहून वयाने बऱ्याच लहान असलेल्या तरूणाच्या प्रेमात पडू शकेल. किंवा एखाद्या उदाहरणात समवयस्क स्त्री-पुरूष लग्नबाह्य प्रेमात पडू शकतील. 'निःशब्द'मध्ये विजयच्या मनात जे होतं ते प्रातिनिधीक आहे. वास्तविक पाहता प्रेमात पडणं ही एक चांगली गोष्ट आहे. सुंदर गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूने असं म्हणता येईल की तिचं उदात्तीकरण करण्याचीही खरं तर गरज नाही. एक सहज भावना म्हणून प्रेमाकडे बघण्यात काहीच अडचण असता कामा नये. प्रेमात गुन्हेगारी स्वरूपाचं काहीच नाही. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. स्त्री-पुरूषांमधील प्रेम हे सहजतेने घेतलं जात नाही. मुळात आपण प्रेमात पडलो म्हणजे आपलं काहीतरी चुकतंय असं प्रेमात पडणाऱ्यालाच आधी वाटतं. पहिल्यावहिल्या किंवा तारूण्यातील प्रेमात बहुधा असं वाटत नाही, पण लग्न झाल्यावर किंवा प्रौढावस्थेत कुणाविषयी प्रेम वाटलं तर अपराधभावाने मन दबून जातं. असं होतं कारण आपण प्रेमभावनेला स्वतंत्र, मोकळं ठेवलेलं नाही. स्त्री-पुरूषांमधील 'रोमँटिक लव्ह' हा सुटा विषय म्हणून रोमांचक वाटला तरी प्रत्यक्ष जगण्यात आपण प्रेमाला 'ओझं' केलं आहे किंवा ते आपल्याकडून झालं आहे. आदिम अवस्थेपासून आजच्या अवस्थेपर्यंत येताना आपण अनेक गोष्टी स्वीकारल्या, अनेक नाकारल्या, अनेक गोष्टींना वळण दिलं. त्यामुळे आपलं मानस हे स्वतंत्रपणे, आपण एकट्याने घडवलेलं असणं शक्य नाही. आपल्या मानसिकतेमागे 'माणसाची महाकथा' उभी आहे. आपलं मन हे एका अर्थी 'प्रोग्रॅम्ड' आहे. पण माणूस आणि इतर सजीवांमध्ये एक प्रमुख फरक असा केला जातो की 'माणूस हा जाणिवेची जाणीव असणारा सजीव आहे'. त्यामुळेच तो जाणिवेला आकार देऊ शकतो. मागच्या लेखात आपण युव्हाल हरारीने मांडलेली 'कल्पित वास्तव' ही संकल्पना पाहिली होती. आपण 'कल्पित वास्तवा'वर विश्वास ठेवणारे मनुष्यप्राणी आहोत, पण 'कल्पित वास्तव' आपण निर्माण करतो याचीही आपल्याला जाणीव आहे. 

मग या आपल्या बलस्थानाचा आपल्याला उपयोग होऊ शकेल का? विजय आणि जिया प्रेमात पडल्यावर जो गहजब उडतो तो टाळून त्या दोघांच्या जाणिवांकडे थोड्या तटस्थपणे बघणं आपल्याला शक्य आहे का? आपण जी नैतिकतेची भक्कम भिंत आपल्या आंतरिक प्रेरणांभोवती उभी केली आहे त्या भिंतीवर चढून पलीकडे पाहायचा प्रयत्न आपण करू शकतो का? गडबड अशी होते की ही भिंत आहे, हा जगाचा शेवट नाही हेच आपण लक्षात घेत नाही. भिंतीपलीकडे काहीतरी असू शकतं हा विचार करायला आपण शिकायला हवं. वरील उदाहरणात विजय त्याच्या प्रेमाबद्दल बायकोला लगेच सांगू शकत नाही. अपराधभाव त्याला ग्रासून टाकतो. तो तिला सांगतो पण कालांतराने. इतक्या वर्षांच्या सहजीवनानंतर तो आपल्या मनातलं मोकळेपणाने, दडपण न घेता बायकोला सांगू शकत नाही कारण असं काही होणं हे चुकीचं आहे अशी दोघांचीही ठाम धारणा आहे. वास्तविक लग्न झालेलं असताना अन्य कुणाविषयी प्रेम/आकर्षण वाटणं हे मुळात याचं द्योतक आहे की या मानवी उर्मींचा लग्न झालेलं असण्या/नसण्याशी संबंध नाही. लग्नव्यवस्था, त्यावर आधारलेली कुटुंबव्यवस्था जर इतकी कार्यक्षम आणि परिणामकारक असेल तर स्त्री-पुरूषांच्या मनात असे विचारच येता कामा नयेत. पण तसं होताना दिसत नाही. कारण व्यवस्था हा नियमनाचा प्रयत्न असतो आणि त्याबद्दल व्यवस्थेचा आदर करायला हवाच, पण व्यवस्थेतून निर्मूलन होऊ शकत नाही. 

विनोबा भावे यांचं 'स्वराज्यशास्त्र' नावाचं एक छोटंसं पण राजकीय विचारासंदर्भात अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. यात त्यांनी 'राजकीय प्रश्नाचा कृत्रिम अर्थ' आणि 'राजकीय प्रश्नाचा स्वाभाविक अर्थ' दिले आहेत. भाषाभेद, धर्मभेद, आर्थिक भेद हे मूळ भेद नव्हेत. त्यामुळे तेवढेच लक्षात घेऊन व्यवस्था कशी राखायची हा राजकीय प्रश्नाचा कृत्रिम अर्थ आहे असं ते लिहितात. समाजात स्वाभाविकपणे वर्ग असा कोणताच नाही, तर कमी-अधिक सामर्थ्याची माणसे आहेत. ह्या कमीअधिक सामर्थ्याच्या माणसांनी मिळून आपली व्यवस्था कशी राखून घ्यावी हा राजकीय प्रश्नाचा मूलभूत आणि स्वाभाविक अर्थ होतो असं त्यांचं प्रतिपादन आहे. 'कृत्रिम अर्थ' आणि 'स्वाभाविक अर्थ' हा भेद आपण स्त्री-पुरूष संबंधांबाबत पाहिला तर 'नैतिकदृष्ट्या अमुक एक वर्तन योग्य असताना स्त्री-पुरूष त्याचं पालन करत नाहीत म्हणून प्रश्न निर्माण होतात' हा झाला कृत्रिम अर्थ. 'प्रेम, रोमँटिक क्षण अनुभवायची आस, शारीरिक आकर्षण, मैत्रभाव, राग-द्वेष-कंटाळा, नात्यातील साचलेपण यासारख्या इतर मानवी भावना अशा विविध पातळ्यांवर स्त्री-पुरूषांमधील आंतरसंबंध कायम कार्यरत असतात. तर त्यांची व्यवस्था कशी लावायची हा मूलभूत अर्थ आहे. (केवळ स्त्री-पुरूषच नव्हे, तर सर्वच मानवी संबंधांना हे लागू होईल). लग्न, लिव्ह इन, ओपन मॅरेज हे व्यवस्थांचे पर्याय आहेत. त्यातून स्त्री-पुरूष संबंधांचं नियमन होईल हे खरं, पण म्हणून  व्यवस्थेला पावित्र्य बहाल करणं हे स्वतःची फसवणूक करण्यासारखं आहे. स्त्री-पुरूष संबंधांबाबत गरजेचं काय असेल तर ती सम्यक, तटस्थ दृष्टी. प्रेमामुळे, लैंगिक आकर्षणामुळे स्त्री-पुरूषात जे घडतं त्याकडे 'जगबुडी आली' या भावनेने न बघता मानवी जाणीव म्हणून बघता येण्याची क्षमता. (आणि याचं प्रशिक्षण किशोरवयात सुरू व्हायला हवं. जीवनकौशल्य या विषयावर आपण या लेखमालेत बोलणार आहोत.)

आपल्यावरील संस्कार, प्रस्थापित नैतिकता आणि यामुळे घडलेलं आपलं मानस यातून संपूर्णपणे मुक्त होणं आपल्याला शक्य नाही. पण या सगळ्याबरोबरच प्रबोधन आणि परिवर्तनाच्या चळवळीने आपल्याला दिलेलं दुसरं एक साधन आहे ते म्हणजे तर्क आणि विवेक. आपल्याभोवती जे घडतं त्याला आपल्यावरील 'संस्कारां'निशी सामोरं जाण्यापेक्षा 'विवेका'ने सामोरं जाण्याची आवश्यकता आहे. 'निःशब्द' चित्रपटाचं उदाहरण पाहिलं तर आपला नवरा वयाने मुलीच्या प्रेमात पडला आहे हे कळल्यावर बायको आणि मुलीला धक्का बसणं हे समजण्यासारखं आहे. पण आता हे घडलं आहे तर त्याला सामोरं जायचा मार्ग आपण शोधूया हा विवेकी विचार आहे. स्त्री-पुरूषांमधील जैविक ताण प्रबळ होतात, होऊ शकतात हे स्वीकारत या संबंधांचं व्यवस्थापन करणं ही विवेकी कृती आहे. पण इथेच दृष्टीचा प्रश्न येतो. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी स्वच्छ नाही. प्रेमात माणूस बहकतो, तो स्वतःला समर्पित करू पाहतो आणि त्यातून त्याचंच नुकसान होतं या काळजीपोटी त्याला सावधगिरीचा सल्ला देणं हे ठीक, पण म्हणून प्रेम नाकारण्याला अर्थ नाही. मला असं वाटतं की एकीकडे चित्रपट आणि कथांमधून उभं केलेलं प्रेमाचं उदात्त रूप, प्रेम हे सर्वस्व आहे अशी कल्पना आणि दुसरीकडे प्रेमाचा साधा स्वीकारही न करणारं जातीय, वर्गीय आणि सांस्कृतिक वास्तव या परस्परविरोधी शक्तींमध्ये आपण आपलं स्वतःचं, व्यक्ती म्हणूनचं, स्त्री-पुरूष म्हणूनचं 'प्रेमाचं आकलन' करून घेण्यात कमी पडतो. ते जर होऊ शकलं तर आपण प्रेमामुळे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या गाष्टींमुळे हबकून जाणार नाही. विजयच्या बायको आणि मुलीने 'तुम्ही दोघे प्रेमात पडला आहात. आता हे नातं पुढे कस न्यावं असं तुम्हाला वाटतं? या नात्याची आणि इतर नात्यांची व्यवस्था कशी लावावी असं तुम्हाला वाटतं?' असे प्रश्न विचारणं अधिक गरजेचं आहे. या प्रश्नांमध्ये सहजीवनाचं नवीन प्रारूप तयार व्हायच्या शक्यता आहेत. 

'तत्त्वविचार' हा शब्द जड वाटला तरी तो महत्त्वाचा आणि दिशादर्शक आहे. प्रेम असो, राग असो, भौतिक इच्छा-आकांक्षा असोत की लैगिंक आकर्षण असो - आपण आपल्या वैचारिक सामर्थ्याच्या आणि वैज्ञानिक दृष्टीच्या बळावर या प्रत्येक उर्मीचा तात्त्विक विचार केला तरच आपल्याला प्रत्यक्षात काय करायचं हे कळू शकेल. चूक-बरोबर ठरवण्याआधी 'स्वरूप समजून घेणं' महत्त्वाचं आहे. पुढील लेखात आपण 'प्रेमाची व्यवस्था' लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या 'पॉलीॲमरी' या संकल्पनेच्या 'अंलबजावणी'विषयी बोलू. या संकल्पनेवर गेल्या वर्षी एक विस्तृत लेख मी 'चतुरंग'मध्येच लिहिला होता. ज्यांनी तो लेख वाचला नसेल त्यांना  https://www.loksatta.com/lekh-news/articles-in-marathi-on-what-is-polyamorous-relationship-1580267/ या लिंकवर तो वाचता येईल. (हा लेख या ब्लॉगवर इथे वाचता येईल.)




Wednesday, October 10, 2018

आपलं कामजीवन 

ओट्यावर वाळत घातलेल्या भांड्यांना पाय फुटून ती निमूटपणे आपापल्या जागेवर जाऊन बसली असती तर आयुष्यात सुखाचे काही प्रहर अजून आले असते असं ज्या क्षणी वाटतं तो क्षण म्हणजे आपल्या कामजीवनाचा उत्कर्षबिंदू असतो. आपलं कामजीवन हे आपल्या जड-चेतन विश्वाइतकंच बहुरंगी, बहुढंगी आहे. रोज रात्री दाराबाहेरच्या कडीला दुधाची पिशवी अडकवण्यापासून ते दहाएक वर्षांतून एकदा घराला रंग देण्यापर्यंत कामजीवनाची अद्भुत रूपं फक्त चकितच करणारी नाहीत, तर मानवाविषयी करुणा उत्पन्न करणारी आहेत.

भाई देशपांडे एकदा म्हणाले होते, "सुनीताला कामं दिसतात. मला दिसतच नाहीत." अशा थोर भाग्याच्या पुरुषांपैकी आपण नाही याची जाणीव होऊन, फेमिनिझमचं बाळकडू घेत राहिल्यानं माझं कामजीवन समृद्ध झालं आहे हे आरंभीच नमूद करतो. घर हे मुळात राहण्यापेक्षा काम करण्याची जागा आहे. जेरड डायमंडपासून युव्हाल नोआ हरारीपर्यंत अनेकांनी शेतीनं माणसाची प्रमुख गोची केली असं लिहिलं आहे. माझा मुद्दा त्याहूनही खोलातला आहे. शेतीनंच नव्हे तर काहीतरी करत राहण्याच्या वृत्तीनं माणसाची गोची केली आहे. मग ती शेती असो किंवा अन्य काही असो. जीव वाचला, पोट भरलं, झोपायची सोय झाली की गप राहायचं सोडून 'अजून काहीतरी करू' असं ज्याक्षणी माणसाला वाटलं तो क्षण माणसाची ऐतिहासिकदृष्ट्या लक्षणीय गोची करणारा होता. सारखं काहीतरी करणं हा माणसाला मिळालेला शाप आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण एक काम दुसरी कामं जन्माला घालतं. शिवाय त्यानं इतरांची कामलालसा वाढते, ते वेगळंच. साहित्याचंच उदाहरण घेऊ. (इतकं निरुपद्रवी दुसरं कोण आहे!) एके काळी मोजकेच दिवाळी अंक निघत असत. ती संख्या आता शे-दोनशेच्या घरात आहे असं ऐकतो. शिवाय ऑनलाइन अंकही प्रसिद्ध होऊ लागले. एवढं होऊन सांस्कृतिक सुस्कारे कमी झाले का? तर नाही. खरं तर सांस्कृतिक उपक्रम जेवढे वाढतील तेवढी संस्कृती अधिकाधिक धोक्यात येत जाते. जेव्हा काही लिहिलं जात नव्हतं तेव्हा वास्तविक काही अडत नव्हतं. साहित्य आलं, आणि पाठोपाठ साहित्यव्यवहारही आला. पुढे मग अर्थातच व्यवहार साहित्यावर भारी पडू लागला आणि संमेलनं, चर्चासत्रं, व्याख्यानं सुरू होऊन, जे लिहिलं आहे ते का लिहिलं आहे, किंवा जे लिहिलंच नाही ते का लिहिलं नाही, याविषयी चर्चा झडू लागल्या. आजमितीस मराठीत जितकं साहित्य निर्माण होतं त्याहूनही जास्त चर्चा निर्माण होते. (यात फेसबुक धरलेलं नाही. ते धरलं तर कहरच होईल.) मला तर असंही वाटतं की कालांतरानं चर्चक-समीक्षकच सेंटर कोर्टात उतरून एकमेकांशी मॅच खेळतील आणि लेखक चेंडू उचलून देण्यापुरते राहतील.

काहीही न करण्यात जो आनंद आहे त्याला माणूस पारखा झाल्यानं माणसाचं जीवन विस्कळीत झालं आहे. रोज सकाळी सहस्रांच्या संख्येनं आवराआवरी करून, बूट चढवून कामाला जाणं आणि हे अनंत सकाळी करत राहणं हे प्रगतीचं नसून अधोगतीचं लक्षण आहे. खूप काम करून तर मधमाशासुद्धा आपलं जीवन व्यतीत करतात. काम खूप वाढवून ठेवणाऱ्या प्राण्याला प्रगत कसं काय म्हणायचं हा एक मोठाच प्रश्न आहे. कामं कमी कमी व्हायला हवीत. तर ती प्रगती. यंत्रानं कामं सोपी केली ही तर गेल्या दोन शतकातील सर्वांत मोठी थाप आहे. यंत्रानं काही केलं असेलच तर नवीन कामं निर्माण केली आहेत. माणूस चंद्रावर गेला याचं पुष्कळ कौतुक होतं. पण तो चंद्रावर गेल्यानं नक्की काय झालं याचं उत्तर हे कौतुक करणाऱ्यांपैकी कितीजण देऊ शकतील याची मला रास्त शंका आहे. एकूणच माणसाच्या काम करण्यामुळे तो रिकामपणाच्या आनंदाला कसा मुकला आणि त्याच्यातील परात्मभाव कसा वाढीस लागला ही एलिएनेशनची थिअरी समूळ विस्तारानं सांगणं आज गरजेचं झालं आहे.

या एलिएनेशनची सुरुवात घरापासूनच होते. रोज सकाळी एखाद्या सुखद, बेधुंद करणाऱ्या आठवणीनं (किंवा अजिबात कुठलीच आठवण वगैरे न येता) जाग न येता; पाण्याचा पंप चालू करायचा आहे या आठवणीने जाग येणं ही एक मन विषण्ण करणारी गोष्ट आहे. आणि ही नुसती सुरुवातच असते. पुढचा संपूर्ण दिवस म्हणजे एक न संपणारी कामसाखळी असते. आणि या साखळीतील कामांचे, उपकामांचे, त्यातून उद्भवणाऱ्या वैतागांचे, उपवैतागांचे इतके नमुने आणि कंगोरे आहेत की 'कामेची केला दीन किती नर' असं म्हणावंसं वाटतं. ओट्यावरची भांडी नुसती आपापल्या जागी ठेवली की झालं असं होत नाही. ओट्यावरचं पाणी पुसून घ्यायला लागतं. स्वयंपाक झाला की अन्न मिळतं हे ठीक, पण त्याबरोबरच बर्नरखालची तबकडी स्वच्छ करणं आणि शेगडीच्या मागच्या भिंतीवरील डाग पुसणं ही कामं वाढतात. विशेषतः भरतासाठी वांगं भाजताना ती तबकडी जी काय विद्रूप होते, त्याला तोड नाही. भाजी शिजली की झालं असं नसतं. उरलेली भाजी काढून ठेवावी लागते. उन्हाळयात चुकून भाजी फ्रिजच्या बाहेर राहिली तर संपलंच. कुकर लावणं हे वास्तविक किती सोपं काम आहे? पण त्यातही भात सांडला तर पाणीमिश्रित भातातलं पाणी वेगळं करून भात वेगळा करणं हे काम वाढतं. पोळ्या करणं हा तर फारच सेक्सी प्रकार आहे. एक तर कणीक नीट असावी लागते. ती असली आणि नीट मळली गेली तरी कधीकधी - फॉर सम अननोन रीझन - फुलके फुलायचं नावच घेत नाहीत. सगळं नीट असताना एखादा फटाका का फुटत नाही, हे जसं कळत नाही तसंच इथेही आहे. शिवाय पोळ्या लाटतानाही काही पोळ्या बहुधा केवळ निषेध म्हणून व्यवस्थित लाटून घेत नाहीत. आणि पोळ्या करून झाल्या की ओट्यावर सांडलेलं पीठ पुसून घेणं हा कार्यक्रम आहेच.

सिंक हा द्रौपदीच्या अक्षयपात्रासारखाच प्रकार आहे. फक्त ते पात्रांचं अक्षयपात्र आहे. सिंक पूर्ण रिकामं आहे, त्यात अगदी एकही चमचा नाही हे दृश्य बघायला मी, साहित्यसंमेलनात व्यासपीठावर एकही राजकारणी नाही हे दृश्य बघण्याइतकाच उत्सुक असतो. सिंक हे जसं पात्रांचं अक्षयपात्र आहे तसं बरणी हे पदार्थांचं कृष्णविवर आहे. त्यातून वस्तू बघता बघता नाहीशा होतात. म्हणजे तुम्ही यादी वगैरे करता, सगळ्या गोष्टी आणता. तूरडाळ शिल्लक आहे असा तुमचा दृढविश्वास असतो आणि नेमका दुसऱ्या दिवशी तुरीच्या डाळीनं बरणीचा तळ गाठल्याचं लक्षात येतं. अशा वेळी स्वतःवर चरफडण्यापेक्षा दुसरं काही करता येत नाही. बरेच दिवस झाले कुळथाचं पिठलं केलं नाही, म्हणून कुळथाच्या पिठल्याचे डोहाळे लागावेत तर कुळीथ पीठ आणावं लागणार आहे असा साक्षात्कार होतो. केव्हातरी पुलावाचा वगैरे बेत ठरतो. तुम्ही भाज्या आणून दिलेल्या असतात. चिरून ठेवलेल्या असतात. तांदूळ धुऊन ठेवलेले असतात. पुढचा भाग अर्धांगिनीवर सोपवून तुम्ही नेटफ्लिक्स उघडून बसता. वीसएक मिनिटं होतात न होतात तोच 'अरे, तमालपत्र राहिलंच की' हे कानी पडतं. मग फ्रॅंक अंडरवुड, वॉल्टर व्हाइट किंवा अशाच कुणा सिद्धपुरुषांच्या लीळा पाहण्याचं अर्धवट सोडून तमालपत्र आणण्यासाठी उठावं लागतं. दुकान फार लांब असतं असं नाही, पण व्यत्यय ही संख्यात्मक संकल्पना नसून गुणात्मक संकल्पना आहे. त्यामुळे व्हायचा तो त्रास होऊन गेलेला असतो.

घेऊ घेऊ म्हणून चाललं होतं, ती रॉयल एनफिल्ड घेतल्यावर पाचशे सीसी इंजिनात उत्पन्न होणाऱ्या भरभक्कम टॉर्कइतकाच भरभक्कम आनंद झाला होता. त्या आनंदाच्या भरात 'आता काय होईल ते होईल, पण एनफिल्डच्या हँडलला पिशवी अडकवायची नाही' अशी भीष्मप्रतिज्ञा मनातल्या मनात केली होती. ती सुमारे दीड दिवस टिकली. कृष्णविवरासमोर एनफिल्ड काय चीज आहे?

बसल्या जागी अंतःचक्षूंना कामं दिसणं तर फार वाईट. म्हणजे तुम्ही विचार करत असताना मराठी साहित्याच्या सद्यस्थितीबद्दल (वाढवून ठेवलेल्या कामाचे परिणाम. दुसरं काय!); पण प्रत्यक्षात विचार घरंगळत असतो तो 'दूध गार झाल्यावर विरजण लावायचं आहे' हा. मराठी कथेला पाहिल्यासारखं टोक उरलं आहे की नाही या विषयावर काही लिहिताना 'कोथिंबीर निवडायची राहिली आहे' हा टोकदार विचार जखम करून जातो. (शेपू, कोथिंबीर आणि मेथी निवडणे ही सृजनशक्तीपाताची त्रिसूत्री आहे. आपल्याकडे 'रेनेसान्स' झालं नाही याच्या काही कारणांपैकी एक कारण इथल्या समाजाला भाज्या निवडाव्या लागत होत्या हे आहे. यावर वाद घालायला आपण तयार आहोत!) 'महाराष्ट्रातील प्रबोधनाची वाटचाल' यावर तुम्ही काहीएक मौलिक, आंतरिक गुंतागुंतयुक्त विचार करत असताना स्वयंपाकघरातल्या व्हाइट बोर्डावर लिहिलेली कामांची यादी डोळ्यांसमोर नाचू लागते आणि प्रबोधनाची वाटचाल मंदावते. हे सगळं कशामुळे? तर कामामुळे. म्हणून जीवनाला आराम पडण्यासाठी जीवनातील काम काढून टाकलं पाहिजे. त्यासाठी 'काहीही न करणे' या एकमेव आनंददायी क्रियेला सतत प्रोत्साहन देणं गरजेचं आहे.

'काहीतरी करू' यात ट्रिपला वगैरे जाणंसुद्धा सामील आहे. ट्रिप हा वास्तविक तापदायक प्रकार आहे. ज्या कुठल्या प्रेक्षणीय स्थळी तुम्ही जाता तिथे उंचावलेल्या हातांमधल्या कॅमेऱ्यांपेक्षा वेगळं काय दिसतं? तारखा ठरवा, तिकिटं बुक करा, सामान भरा (यात काहीतरी विसरणं आणि काहीतरी उगीच घेतलं जाणं हे नेहमीचं आहे. थंडी असेल म्हणून स्वेटरने बॅगेतली जागा अडवायची आणि तिथे गेल्यावर उकाडा हजर किंवा पाऊस नसेल म्हणून घेतलेली छ्त्री बाजूला काढायची आणि पोचल्यावर स्वागताला पाऊस हजर!), भलामोठा प्रवास करा, हॉटेलात चेक-इन करा, तिथे अमुक-नाही-तमुक-नाही म्हणून मॅनेजमेंटशी भांडा, चार ठिकाणच्या गर्दीत सामील होऊन काहीतरी बघितल्याचा आपल्याला आनंद झालाय हे स्वतःच्या मनावर ठसवा - हा एवढा खटाटोप सांगितलाय कुणी? 'प्रवासाने माणसाला शहाणपण येते' वगैरे सुविचार तर पूर्णपणे दिशाभूल करणारे आहेत. प्रवासामुळे फक्त खर्च होतो. शहाणपण ही वस्तू मुळातच तुमच्याकडे असावी लागते. त्यासाठी वणवण करायची गरज नसते. मनुष्यप्राणी हा एक कल्पनातीत वैचित्र्यानं भरलेला प्रकार आहे हे कळण्याकरता प्रवास कशाला हवा?

कामजीवन हे एक्स्पोनेन्शियली तापत जाणारं प्रकरण आहे. त्यामुळे वेळच्या वेळीच आवर घातला नाही तर ते हाताबाहेर जाऊ शकतं. त्यासाठी आजूबाजूला सजगपणे बघत ज्या ज्या ठिकाणी कामाचं उगमस्थान दिसेल त्या त्या ठिकाणी ठामपणे 'नाही' म्हणणं आवश्यक आहे. खरेदी वगैरे तर अगदीच टाळावी. जेव्हा खरेदी मिनिमम होईल तेव्हाच इकॉनॉमी ऑप्टिमम होईल. या एकूणच प्रश्नाबाबत मुळात एक गोष्ट माझ्या पक्की लक्षात आली आहे. काहीही न करता निवांत बसलो असतानाच ती लक्षात आली. युरेका मोमेंटच म्हणा ना. (मूलभूत जाणिवा निवांतपणा असतानाच होतात. न्यूटन, आर्किमिडीज साक्ष आहेत. फक्त इतर लोकांनी त्यांनी लावलेल्या शोधापाशी थांबायला हवं होतं. गुरुत्वाकर्षण आहे हे कळलं ना? उत्तम. पुढे जाऊन आकाशात रॉकेट्स कशाला सोडायची?) मी त्याला 'द ह्यूमन ट्रूथ' असं नाव दिलं आहे. हे ट्रुथ असं - माणसं काहीएक संख्येनं एकत्र आली की करेक्ट असं काही घडण्याची शक्यताच लयाला जाते. एकत्र आली की माणसं काहीतरी घोळच घालतात. (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहेच!) त्यामुळे काहीतरी करण्याची जळमटं लोकांच्या मनातून काढून टाकणं अगत्याचं झालं आहे. काहीही न करण्याकरता माणसं एकत्र येतील तेव्हाच मानवी इतिहास आश्वासक वळण घेईल. अन्यथा कामजीवन माणसाचं माकड करतच राहणार आहे!

(ऐसी अक्षरे, दिवाळी २०१८)


Sunday, October 7, 2018

कवितेत आणि कवितेबाहेर

दिनकर मनवर यांच्या 'पाणी कसं अस्तं' या कवितेतील एका उल्लेखावरून जो वाद सुरू झाला तो एकाच वेळी खेदजनक आणि विचारप्रवृत्त करणाराही आहे. 'विचारप्रवृत्त करणारा' असं म्हणण्याचं कारण हे की या वादाच्या निमित्ताने मनात घोळत राहणारे आणि कालांतराने नाहीसे होणारे काही मुद्दे पुन्हा मनात घोळू लागले. त्यांचा संबंध कलाकाराशी आणि कलात्मक अभिव्यक्तीशी आहे. यात अंतिम असं काही बोलता येईल असं वाटत नाही, पण जे जाणवतं ते सांगायचा प्रयत्न करतो.

'टीकास्वयंवर' या पुस्तकातील 'मराठी कादंबरी : प्रेरणा व स्वरूप' या लेखात भालचंद्र नेमाडेंनी चि. त्र्यं. खानोलकरांच्या कादंबऱ्यांवर विस्तृत टिप्पणी केली आहे. त्यात 'अगोचर' या खानोलकरांच्या कादंबरीतील बलात्काराचा एक प्रसंग त्यांनी उद्धृत केला आहे. 'कुणी तिच्या झिंज्या ओढीत होते तर कुणी तिची चोळी फाडून तिचे घट्ट स्तन चुरगळीत होते' या वाक्यात 'घट्ट' हा शब्द लेखकाने वाचकांचे लिंगसंवेदन उत्पन्न करण्यासाठी म्हणून वापरला आहे आणि त्यातून लेखकाची नैतिकता उघड होते असं नेमाडे लिहितात. एका हिंसक, निषेधार्ह घटनेचं वर्णन करताना हा कामोत्तेजित करणारा शब्द लेखकाला वापारावासा वाटणं याला त्यांचा आक्षेप आहे. हा आक्षेप पूर्णपणे पटण्यासारखा आहे. परंतु खानोलकरांना 'मॅटर ऑफ फॅक्ट' म्हणून हा शब्द वापरायचा होता ही शक्यता असू शकते का हाही प्रश्न विचारता येऊ शकेल. नेमाडेंनी खानोलकरांच्या कादंबरीलेखनाची, त्यांच्या शैलीची चिकित्सा करताना या कादंबऱ्यांना थ्रिलर फँटसीचं स्वरूप आहे, त्यात दुःखाचं संवेदन नाही, अनुभूतीचं दारिद्र्य भाषेच्या अलंकरणाने आणखी हास्यास्पद होते (हे विशिष्ट निरीक्षण स्वतंत्र मुद्दा म्हणून मला महत्त्वाचं वाटलं. हा मुद्दा 'लेखक' होण्याच्या महत्त्वाकांक्षेने केल्या गेलेल्या, परंतु अलंकरणाला, शाब्दिक कसरतीला अधिक महत्त्व देत पुनुरुक्तीत अडकलेल्या इतरही लेखनाला लागू होऊ शकेल) असं म्हटलं आहे. ही निरीक्षणे समीक्षा दृष्टीला पटावीत अशीच आहेत. परंतु आक्षेप मान्य करूनही खानोलकरांच्या कादंबऱ्या स्वतंत्रपणे मला आवडल्या असं कुणी म्हणू शकेल.

हे उदाहरण दिनकर मनवरांच्या कवितेसंदर्भात आठवायचं कारण 'काय लिहिलं आहे' आणि 'काय प्रतीत होत आहे' यात फरक असण्याची शक्यता नेहमीच अस्तित्वात असल्याने कलाकृतीला 'अभिव्यक्ती' आणि 'अभिव्यतीचा परिणाम' हे दोन आयाम प्राप्त होतातच होतात. कलाकृती त्यातून सुटू शकत नाही हे एका अर्थी दुःखद आहे असं म्हणता येईल पण ते कलाकृतीचं 'भागधेय' आहे. दिनकर मनवर यांनी लैंगिक संवेदना उत्पन्न करण्याच्या उद्देशाने किंवा विशिष्ट समूहातील स्त्रीचा अवमान करण्याच्या उद्देशाने लिहिलं नाही हे स्पष्टच आहे. त्यामुळे हेतूबद्दल शंका नाहीच. पण प्रश्न हेतूचा नसून परिणामांचा आहे.

अस्मितेचा स्त्रीशी आणि स्त्रीच्या चित्रणाशी फार जवळचा संबंध आहे. आपल्या जाती/समूहातील स्त्रियांचे प्रश्न काय आहेत याविषयी फारसे उत्सुक नसणारे लोकही त्या स्त्रियांच्या शीलरक्षणाविषयी, त्यांच्या प्रतिमेविषयी संवेदनशील असतात. हा गुंता साहित्य-कलेच्या पुढे जाऊन पुरूष म्हणूनच्या काही जैविक वृत्तींपाशी, पुरूषसत्ताक राजकारणापाशी आणि त्याने घडवलेल्या मानसिकतेपाशी जाऊन पोचतो. त्याविषयी स्वतंत्रपणे लिहावं असं बरंच आहे कारण त्यात पुरूष आक्रमक म्हणून आणि हतबल म्हणूनही अडकलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा फक्त नोंदवून पुढे जाऊ. कवितेत आदिवासी मुलीऐवजी इतर समूहातील मुलीचा उल्लेख असता तर चाललं असतं का असा प्रश्न या वादासंदर्भात विचारला गेला. अशा वादाच्या प्रसंगी कलाकाराच्या सामाजिक बांधिलकीचा मुद्दाही डोकं वर काढतो. म्हणजे भोवतालच्या जगात इतके प्रश्न असताना तुम्ही अभिव्यक्तीचं काय घेऊन बसलात? तुम्ही प्रत्यक्ष कृती कधी करणार? असे प्रश्न विचारले जातात. लेखक-कवीच्या 'लेखक-कवी असण्या'तच अंतर्भूत असलेल्या गुणधर्माच्या आधारे, कृतीशील लेखक-कवींच्या उदाहरणांच्या आधारे याची उत्तरे देता येतील. पण त्याने वाद शमत नाही. याचं कारण कलाकृतीमुळे निर्माण झालेली भावनिक अस्थिरता हे आहे.
समग्रपणे विचार करत तयार  झालेली मनोभूमिका आणि भावनिक स्थिरता ढळवणारी काही घडलं की त्यावर हल्ला चढवणारी मनोभूमिका यात दुसरी बरेचदा जिंकते. दिनकर मनवर गंभीरपणे कविता लिहिणारे कवी आहेत, त्यांचं सामाजिक भान जागृत आहे - प्रखर आहे हे मुद्दे भावनिक स्थिरतेला धक्का लागल्यावर लक्षात घेतले जाऊ शकत नाहीत. (खरं तर भावनिक स्थिरतेला धक्का लागला की एखादा विचारी अभ्यासकदेखील तीव्रतेने प्रतिक्रिया देऊ शकतो. बौद्धिक क्षमता असूनही जाणिवांचे अनेक आयाम संवेदनेच्या कक्षेत राहणे हे आपलं - सेपियन्सचं - एक लक्षण आहेच.) दुसरा मुद्दा तफावतीचा आहे आणि तो महत्त्वाचा आहे.

कवितेतील उल्लेख न खटकणारे लोक जसे आहेत तसाच तो उल्लेख खटकणारे लोकही आहेत. त्यातही आदिवासी मुलीचा संदर्भ असल्याने विरोधाला आणखी धार आहे. यातील आदिवासी हा मुद्दा बाजूला ठेवून फक्त अवयवाचा विचार केला तर असं दिसतंच की स्त्रीच्या अवयवांशी पुरूषाची लैंगिक इच्छा घट्ट जोडून टाकली गेली आहे. 'स्तन' हा शब्द उच्चारला किंवा स्तनांचं चित्र डोळ्यापुढे आणलं की किती पुरूषांना बाळाचं दुग्धपान आठवतं, किती पुरूषांचं लैंगिक संवेदन जागं होतं आणि किती पुरूषांमध्ये पूर्ण न्यूट्रॅलिटी जागी राहते असा प्रयोग करून बघायला हरकत नाही. आणि लैंगिक संवेदन जागं होत असेल तरी अपराधी वाटायचं कारण नाही. कपडे आणि कपड्यांशी जोडली गेलेली सभ्यता याने आपल्याला सुरक्षा, सौंदर्यदृष्टी वगैरे दिली असली तरी ते 'सुपरस्ट्रक्चर' आहे. या गोष्टींनी आपली लैंगिक-भावनिक गोचीदेखील  केली आहे. शिवाय आपल्याकडे भाषा आहे असं आपण म्हणतो, पण आपल्याकडे स्पष्टपणे बोलण्याइतपत भाषाच नसते बरेचदा. उदा. एखादा मुलगा/मुलगी मला 'हॉट' वाटतो/वाटते यातल्या 'हॉट' मधला नेमका अर्थ पकडेल असा शब्द मराठीत नाही. प्रेम किंवा आकर्षणासारखी सहज भावना व्यक्त करणं हेसुद्धा जिथे शब्दांतून नीट जमत नाही तिथे लैंगिक आकर्षणाबद्दल काय बोलणार? आपण एकूणातच शरीराला खासगीत कोंडून ठेवलं आहे. (मला काही इंग्लिश मालिका आवडण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे शरीर, लैंगिक इच्छा याच्याशी संबंधित अनेक गोष्टींना सहजतेने मांडण्याची, त्याविषयी बोलायची आणि विनोदाच्या मुशीतून सहज-सुंदर करण्याची हातोटी तिथे बघायला मिळते. कितीतरी एपिसोड्स आणि त्यातील उल्लेख आठवतात.) माध्यमांतून कलात्मकपणे या विषयांवर बोललं गेलं की या विषयातील ताण हलके व्हायला मदत होते. हा सहजभाव येणं महत्त्वाचं आहे. स्त्रीच्या स्तनांबद्दल आज स्त्रीमध्ये सहजभाव नाही कारण तो पुरूषात नाही. पुरूषात नाही कारण त्याच्या कामनेचं एक केंद्र असलेले स्तन झाकलेले आहेत. ते झाकलेले आहेत कारण पुन्हा तेच - पुरूषात सहजभाव नाही. हे एक चक्र तयार झालं आहे आणि ते मोडल्याखेरीज स्त्रीविशिष्ट उल्लेखांनी बिथरून जाणं थांबणार नाही. 'स्तन' हा शब्द रोजच्या बोलण्यात सार्वत्रिक झाल्याशिवाय त्याला चिकटलेली लैंगिक संवेदनाची धार कमी होणार नाही. (स्त्रीचे स्तन हे पुरूषाच्या कामनेचं केंद्र का असतात हा पुरूषाच्या लैंगिक आणि मानसशास्त्रीय घडणीशी जोडलेला प्रश्न आहे. याविषयी गूगल सर्च केल्यास प्राथमिक माहिती मिळू शकेल.)

कवितेतील उल्लेखाने जो वाद सुरू झाला तो समाजातील तफावतीकडे निर्देश करतो. ही कविता वाचताना वर्गातील आदिवासी मुलीला संकोचल्यासारखं होईल असा एक मुद्दा पुढे आला आहे. व्यवहार्य अडचण म्हणून हा मुद्दा मान्य होण्यासारखा आहे. जगण्यात आणि मानसिकतेत तफावत असताना एका दृष्टिकोनाचा आग्रह धरणं आपल्याला टिकाऊ उत्तरांकडे नेत नाही. 'आदिवासी' किंवा अन्य समूहवाचक, जातीवाचक उल्लेख जर विभागणीचं द्योतक आहे तरत्या विभागणीपोटी होणाऱ्या परिणामांनाही सामोरं जावं लागेल. 'वस्तुस्थिती' ही चीज आदर्श, सिद्धांत, विचारधारा या सगळ्याला पुरून उरणारी असते. जात, आयडेंटिटी, अस्मिता या गोष्टी त्रासदायक असल्या तरी त्या 'वस्तुस्थिती' आहेत. त्यामुळे  सामोरं जाताना आयडियॉलॉजिकल पाया असलेली स्ट्रॅटेजी वापरल्याशिवाय तरणोपाय नाही. आदिवासी, मुलगी आणि स्तन हे तीन विषय/शब्द खरं तर सामाजिक रचित, सांस्कृतिक रचित आणि जैविक रचित या तीन रचितांचं आणि ती एकमेकांत गुंतलेल्या वास्तवाचं प्रतिनिधीत्व करतात. कवितेतील उल्लेखाने कुणी दुखावलं जायचं, कुणाला राग यायचं काहीच कारण नाही हे एका बाजूला बरोबरच आहे. यात राजकीय हेतू असतील तर तो आणखी वेगळाच मुद्दा आहे! पण या उल्लेखाने खरोखरच कुणी दुखावले गेले असतील तर त्यांच्याशी संवाद झाला पाहिजे असं वाटतं. आदिवासी हा शब्द विशिष्ट समूहाकडे निर्देश करतो हे खरंच आहे. हा समूह एका संस्कृतीचं, परंपरेचं आणि ज्ञानसाठ्याचं प्रतिनिधीत्व करतो. जातीय तेढ वाढलेली असण्याच्या पार्श्वभूमीवर जल-जंगल-जमीन याच्याशी जोडल्या गेलेल्या, पर्यायी जीवनशैली म्हणून काहीएक प्रारूप जगासमोर ठेवण्याची क्षमता असलेल्या आदिवासी समूहांचं 'असणं' महत्त्वाचं आहे. त्यांची आणि आपली नाळ मुळात एकाच ठिकाणी जोडलेली आहे. आपण वेगळे झालो आहोत हे खरं आहे, आपल्यावर त्यांनी रागवावं याची पुष्कळ कारणं आपण त्यांना दिली आहेत. त्यात भर पडायला नको असं मनापासून वाटतं.

(७ ऑक्टोबर २०१८, लोकसत्ता) 

Saturday, September 15, 2018

मॅन, वुमन आणि मन

मागील लेखात आपण जातवास्तवाच्या आव्हानांविषयी बोललो होतो. विवाहसंस्था ही जातीसंस्थेची रक्षक आहे असं आपण म्हटलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या पुस्तकाचा आपण आधार घेतला होता त्या 'अनाहिलेशन ऑफ कास्ट' या पुस्तकात आंतरजातीय विवाह हा जातीव्यवस्था नष्ट करण्याचा एक मार्ग आहे असं त्यांनी नोंदवलेलं आहे. परंतु जात ही एक संकल्पना आहे, मनोवस्था आहे आणि त्यामुळे एखादा भौतिक अडथळा आपण दूर करतो तशी ती दूर होणार नाही - त्यासाठी संकल्पनात्मक बदलच करावा लागेल असं ते पुढे लिहितात. हा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. लेखाच्या शेवटी आपणही 'जात-धर्माने येणारा कमकुवतपणा नाकारणारं मन हवं आहे' असं म्हटलं होतं. 

'मनात बदल करणे' हा लिहायला-बोलायला सोपा, पण प्रत्यक्षात महाकठीण, त्रासदायक मुद्दा आहे. जेव्हा जेव्हा जुन्या-नव्याचा संघर्ष होतो, काहीतरी नवीन पुढे येऊन उभं ठाकतं तेव्हा स्वीकृती आणि अस्वीकृतीच्या रस्सीखेचीत मन दमून जात असतं. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात नवं काही मांडणाऱ्यांनी हे लक्षात घेऊन आपलं म्हणणं शांतपणे  मांडत राहणं श्रेयस्कर असतं. अभिव्यक्ती कधीकधी तिखट व्हायला हरकत नसते - कारण तिरकस, तिखट मांडणीसुद्धा परिणामकारक ठरू शकते. फक्त मुद्दा माणसांशी जोडून घेण्याचा असतो. आपला उद्देश जर बदल घडवणं हा असेल तर ती लांब पल्ल्याची लढाई आहे हे विसरून चालत नाही. आपले व्यूह त्या अनुषंगाने आखावे लागतात. 

विवाहसंस्था हा जातिव्यवस्थेशी घट्ट जोडलेला मुद्दा आहे. परंतु त्याचबरोबर आणि कदाचित त्याच्याही आधी तो स्त्री-पुरूष संबंधांशी जोडलेला मुद्दा आहे. स्त्री-पुरूष संबंध हा जातीप्रमाणेच इतरही अनेक सामाजिक रचितांचा पाया असतो. यातला एक मुख्य भाग अर्थातच माणसाची प्रजाती वाढवणे हा आहे. म्हणूनच स्त्री-पुरूष संबंधांचं नियमन आपल्या सामाजिक व्यवहारांच्या नियमनातील एक अतिशय कळीचा मुद्दा आहे. या लेखात आपण या विषयावरील चर्चेला सुरूवात करू.  
     
व्यक्तींमधील नातेसंबंध हा एक रोचक, रंजक असा विषय आहे. त्याबरोबरच तो एक तणावपूर्ण विषयही आहे. सामाजिक-आर्थिक रचितांमुळे आणि मानवी उर्मींमुळे नातेसंबंधांमध्ये ताण येतातच. आजच्या कुटुंबाच्या, सामाजिक संबंधांच्या स्वरूपात जे ताण आहेत ते या संबंधांना सुरूवात झाली तेव्हापासूनचे ताण आहेत. त्यामुळे नातेसंबंधांविषयी बोलताना एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला हवी की या विशिष्ट बाबतीत मानवी मेंदू काही हजार वर्षांपूर्वीच्या मानवी मेंदूसारखाच आहे. आपण तंत्रज्ञानात पुष्कळ प्रगती केली असली तरी ज्या भावभावनांचे आपण काही हजार वर्षांपूर्वी गुलाम होतो त्याचे गुलाम आपण अजूनही आहोत. तो एक मोठा संशोधनाचाच विषय आहे. टोळी समाजापासून आजवर आपल्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या, आपल्या वर्तनाला आकार देणाऱ्या दोन प्रमुख गोष्टी म्हणजे लैंगिकता आणि राजकारण. मानवी भावनांचा, इच्छा-आकांक्षांचा  'स्पेक्ट्रम' खूप मोठा आहे, त्यात अनेक छटा आहेत आणि या दोन गोष्टी त्यातील अनेकांवर आपलं वर्चस्व गाजवतात. 

स्त्री आणि पुरुषांमधील नातेसंबंध ही नातेसंबंधांची विशेष जातकुळी आहे. त्यातही छटा आहेतच. म्हणजे स्त्री - पुरुषांमधलं आदिम आकर्षण व प्रेम - ज्याचा पाया लैंगिकता आहे - ही एक मुख्य छटा. त्यानंतर कुटुंब संस्थेच्या विकासानंतर आई - मुलगा, बहीण - भाऊ, वडील - मुलगी या प्रेमाच्या इतर छटा येतात. निव्वळ लैंगिक आकर्षणाच्या वर भावनांचे स्तर चढत जाऊन स्त्री - पुरुषांमध्ये जे रोमँटिक नातं तयार होतं त्या नात्याचे बहुविध आयाम स्त्री - पुरुषांमधील नात्याला कायम आंदोलित करत आले आहेत.  युव्हाल हरारी या अभ्यासकाचं 'सेपियन्स' हे सध्या गाजत असलेलं पुस्तक आहे. या पुस्तकात त्याने एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. होमो सेपियन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानवाच्या प्रजातीने पृथ्वीवर आपलं बस्तान बसवलं त्यात त्याच्या 'कल्पित वास्तव' (Imagined Reality) रचण्याच्या क्षमतेचा मोठा वाटा होता. हे कल्पित वास्तव म्हणजे काय ? तर काल्पनिक कथानक रचणं आणि ते लोकांना पटवून देणं. होमो सेपियन्सनी जे समूहजीवन उभारलं आणि आजचे होमो सेपियन्स - म्हणजे तुम्ही-आम्ही सगळे - ज्या गुंतागुंतीच्या समूहजीवनात जगतो आहोत त्याचा आरंभ कल्पित वास्तवामुळे झाला असं युव्हाल हरारी लिहितो. देव, धर्म, मानवाधिकार, ईश्वर, समता व बंधुतेसारखी मानवी मूल्यं ही कल्पित वास्तवाची उदाहरणं आहेत. अनेकजणांनी या कल्पित वास्तवावर श्रद्धा ठेवली आणि त्यातून समाज रचना आकारास येत गेली. हे अधिक तपशिलात समजून येण्यासाठी 'सेपियन्स' वाचणं इष्ट होईल. पण मला स्त्री - पुरुष नातेसंबंधांचा विचार करताना या 'कल्पित वास्तवा'ची आठवण झाली कारण या विषयाचा विचार करत असताना एक प्रश्न पडतो तो असा की स्त्री - पुरुष संबंधांचं 'मूळ सत्य', 'खरं वास्तव' काय आहे ?

हा प्रश्न कदाचित काहींना अप्रस्तुत वाटेल, विषयाचा कीस पाडायच्या उद्देशाने विचारल्यासारखा वाटू शकेल. पण स्त्री-पुरूषांनामधील रोमँटिक नात्याविषयी, इंटिमेट रिलेशनविषयी बोलताना हा प्रश्न विचारणं तत्त्वतः महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. या प्रश्नाचं एक स्पष्ट उत्तर 'लैंगिकता' हे आहे. पण लैंगिकता म्हणजे तरी नक्की काय ? म्हणजे एखाद्या स्त्रीकडे / पुरुषाकडे पाहून एखाद्या पुरुषामध्ये / स्त्रीमध्ये कामभावना जागी होऊन शरीरसंबंधांची इच्छा निर्माण होणं ही लैंगिकता की आवडलेल्या स्त्री / पुरुषाला ओझरता स्पर्श केल्याने मनात निर्माण होणारं समाधान / बेचैनी म्हणजे लैंगिकता? आणि जर केवळ अव्यक्त आकर्षण असेल तर तीही लैंगिकता का? सेक्शुअल आणि असेक्शुअल यामधल्या फरकाची रेघ कशी आखायची? लैंगिकता या शब्दाचा अर्थ आपण सहसा शारीरिक आकर्षण, शरीरसंबंध याच्याशी जोडतो. पण कुठल्याही भावनेसारखाच लैंगिकतेचाही 'स्पेक्ट्रम' असतो, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. स्त्री व पुरुषामध्ये जे ताण अस्तित्वात असतात त्यात जैविक ताणही आहेत हे जर आपण समजून घेतलं तर या संबंधांचं व्यवस्थापन सोपं होईल. स्त्री व पुरुषाच्या विशिष्ट वर्तनाच्या मुळाशी जाणं सोपं होईल. 'लिंगभाव' हा शब्द या संदर्भात समर्पक आहे कारण तो लिंगविशिष्ट जाणिवेशी जोडलेला आहे.

मानवी इतिहासाच्या वाटचालीत आपण जी मूल्यं रुजवली ती युव्हाल हरारी म्हणतो तशी कल्पित वास्तवं असली तरी ती अस्तित्वाच्या लढाईत उपयुक्त ठरली आणि पुढे समूहजीवनासाठीदेखील उपयुक्त ठरली, व्यक्तीच्या स्वतंत्र व आनंदी जगण्यासाठी उपकारक ठरली. त्यामुळे तिथे काहीच दुमत नाही, परंतु जैविक प्रेरणा आपल्यावर अजूनही 'हावी' होऊ शकतात हे लक्षात न घेता मूल्यव्यवस्थेच्याच आधारे स्त्री - पुरुषांच्या वर्तनाचा उलगडा करायचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होत नाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे. जैविक प्रेरणांचा उल्लेख अशासाठी कारण आपण इथे स्त्री - पुरुषांमधील जैविक ताणाचा विचार करतो आहोत. स्त्री - पुरुष संबंधांना मित्रत्व, ममत्व, सहानुभूती हे आयाम अर्थात आहेतच आणि ते निःसंशयपणे 'प्रगल्भ आयाम' आहेत. परंतु स्त्री - पुरुषांमध्ये प्रेम, लैंगिक आकर्षण हे आयाम जैविक ताण निर्माण करतात म्हणून त्यावर विचार करणं आवश्यक वाटतं. कालानुरूप हे आयाम बदलतात हेही खरं आहे. म्हणजे पन्नासच्या दशकातील प्रेमभावना आणि आजची प्रेमभावना यात मूलभूत साम्य असलं तरी प्रकटीकरणात, प्रेमभावनेशी 'डील' करायच्या पद्धतीत आज फरक पडला आहे. लैंगिकता आपलं अस्तित्व स्पष्टपणे ठसवू पाहते आहे. या पार्श्वभूमीवर पुढील लेखात प्रेम, लैंगिकता यावर अधिक तपशीलात बोलू आणि त्याआधारे स्त्री-पुरूष संबंधांचं नवीन आकलन होऊ शकेल का ते तपासून पाहू.     

Saturday, September 1, 2018

जातवास्तवाचं आव्हान

एक जुना प्रसंग आठवतो. कॉलेज संपवून मी नोकरीला लागलो होतो. आमच्या कॉलनीतील एका परिचितांकडे काही कामाने जाणं व्हायचं. त्यांचा मुलगा त्यावेळी बहुधा सहावी-सातवीत होता. एके दिवशी त्याने मला अचानक विचारलं, "तू कोण आहेस?" मला आधी कळेना, पण नंतर लक्षात आलं की तो माझी जात विचारत होता. एका शाळकरी मुलाने मला असं विचारावं याची मला मौज वाटली. आज इतक्या वर्षांनी हे आठवल्यावर पुन्हा मौज वाटलीच, पण उद्विग्नही व्हायला झालं. 

आपण राहतो त्या समाजाशी, त्या समाजाच्या मानसिकतेशी आपली नाळ जुळते का याचं प्रत्येकाचं उत्तर असेल. माझं प्रामाणिक उत्तर 'नाही' कडे झुकण्याचं एक कारण आपल्या समाजातील जन्माधिष्ठित विभागणी हेही आहे. नाळ जुळत नाही हे बहुधा उद्वेगाने वाटतं पण त्याचवेळी भारतीय समाज, त्याचे अनेकविध पैलू हे समाजशास्त्रीयदृष्ट्या कुतूहलाचं वाटतं हेही खरं. आपलं सामाजिक स्थान बऱ्याच गोष्टी निश्चित करत असतं. 'मी विचार करू शकतो, लिहितो' यातला एक (मोठा) वाटा माझ्या वर्गीय स्थानाचा असतो आणि भारतीय संदर्भात तो जातीचाही असतो हे जाणवणं तसं विषण्ण करणारं आहे. आपल्या समाजातील जातवास्तवाचा विचार करताना मला विलास सारंगांच्या 'मॅनहोलमधला माणूस' या पुस्तकाची आठवण होते. मराठी साहित्य, समाज आणि  जातवास्तव हा या पुस्तकाचा विषय आहे. सारंग एके ठिकाणी लिहितात, 'अनेक शतकं समाजाने जातिव्यवस्था राबवलेली आहे. पिढ्यान पिढ्या हे ज्ञान मेंदूत संक्रमित झालेलं आहे आणि ते भारतीय माणसाच्या मनात नेणिवेचा भाग बनलेलं आहे. याही पुढे जाऊन असं म्हणता येईल की जातिभान हा घटक भारतीय माणसाच्या जनुकांचा भाग बनलेलं आहे. जातिवास्तवाचं प्रदीर्घ सातत्य लक्षात घेता जातियंत्रणा ही भारतीय माणसाच्या जनुकसंचिताचा भाग बनलेली असणं शक्य आहे. पुढल्या वीसेक वर्षात मेंदूतील जातिज्ञानाचं शरीरशास्त्रीय अस्तित्व पडताळून पाहता येणं शक्य आहे.'

'जात ही भारतीय समाजमनाच्या नेणिवेचा भाग बनली आहे' हे सारंगांचं विधान माझ्या मनातील विचार प्रतिबिंबित करणारं होतं. जातवास्तवाकडे मी 'आधुनिकतेतला अडसर' म्हणून तर बघतोच पण त्याच्याही आधी समाजाचं 'गुणवत्तापूर्ण जगणं' रोखणारा घटक म्हणूनही बघतो. जात या मुद्द्याबरोबर ओघाने येणारा मुद्दा म्हणजे आरक्षण.  सामाजिक विषमता दूर व्हायला मदत व्हावी म्हणून आरक्षणाची कल्पना अंमलात आणली गेली आणि ते स्वागतार्हच आहे. जन्माधिष्ठित विभागणीमुळे ज्यांच्यावर पिढ्यानपिढ्या अन्याय झाला त्यांना आता समान संधी मिळाव्यात म्हणून केलेलं हे 'पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन' होतं. आज या विषयातील गुंते वाढले आहेत आणि खरं सांगायचं तर त्यावर  बोलण्याइतका माझा अधिकार नाही. काही गोष्टी अगदीच जाणवतात, पण त्यावर निर्णायक काही म्हणता येईल असं वाटत नाही. (जात जायला हवी हे निर्णायकपणे वाटतं!) त्यामुळे आरक्षण हा मुद्दा बाजूला ठेवून आपण 'जात' या आरक्षणाच्या पुष्कळ आधीपासूनच्या वास्तवाबद्दल, आपण त्यावर काय करू शकतो याबद्दल बोलणार आहोत. याबाबत एक किस्सा सांगतो. काही महिन्यांपूर्वी भीमा - कोरेगावला जे घडलं त्या संदर्भाने मला एका परिचितांनी काही फॉरवर्डेड मेसेजेस पाठवले. दलित संघटनानांनी पुकारलेला बंद अनाठायी होता असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना मी एक मोठा रिप्लाय दिला. त्यातला एक मुद्दा असा होता - 'भीमा-कोरेगावला जे घडलं' आणि ‘भीमा-कोरेगावला जे घडलं त्यामुळे पुढे जे घडलं' यातील दुसऱ्या प्रकारामुळे अस्वस्थ, संतप्त होऊन बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. तुमचे मेसेजेस त्याच धर्तीचे आहेत. पण पहिल्या प्रकाराबाबत, म्हणजे 'भीमा कोरेगावला जे घडलं' त्याबाबत तुमची प्रतिक्रिया समजली नाही. ती समजून घ्यायला मला आवडेल. एकूणच सवर्ण-दलित संघर्षाबाबत तुम्हाला काय वाटतं, फार पूर्वी नाही तर अगदी अलीकडील काळापर्यंत दलितांवर जे अत्याचार झाले त्याबाबत तुम्हाला काय वाटतं, खैरलांजी-खर्डा आणि इतर घटनांबाबत तुम्हाला काय वाटतं हे समजून घ्यायला मला आवडेल. या घटना भयंकर होत्या आणि दोषींना शिक्षा व्हायला हवी असं तुम्ही म्हणाल याची मला कल्पना आहे. पण त्याच्यापुढे जाऊन, जातीवर आधारित आपल्या सामाजिक रचनेबाबत तुम्हाला काय वाटतं, सवर्ण आणि मुख्य म्हणजे शिक्षित, बुद्धिमान, शहरी विकासाचे लाभार्थी म्हणून आपली काही विशेष जबाबदारी आहे की नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं हे समजून घ्यायला मला आवडेल.'  

आपली जन्मदत्त जात, तिने प्रभावित केलेलं आपलं सांस्कृतिक जगणं, आपलं विचारविश्व आणि संथपणे, सूक्ष्मपणे, तर कधी बऱ्याच भडकपणे समाजामध्ये कळेल न कळेल अशी दरी निर्माण करत जाणारा जातिभेदाचा प्रवाह याचं आपलं आकलन काय आहे ? आपल्याला या भेदासह जगणं मान्य आहे, नाईलाजानं मान्य आहे, आपण यावर काही करू इच्छितो का असे बरेच प्रश्न मनात उभे राहतात. आणि अशावेळी मला अटळपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या 'अनाहिलेशन ऑफ कास्ट' या दीर्घ निबंधाची आठवण होते.

१९३६ साली लाहोरमधील जात-पात-तोडक-मंडळ या सुधारणावादी संस्थेनं आंबेडकरांना वार्षिक कार्यक्रमात व्याख्यानासाठी बोलावलं होतं. त्यांचं लिखित स्वरुपातील व्याख्यान मंडळाकडे आधी पोचलं आणि ते वाचल्यावर मंडळातील मंडळींच्या लक्षात आलं की हे प्रकरण आपल्याला झेपणारं नाही. कारण व्याख्यानात आंबेडकरांनी जातिव्यवस्थेची कठोर चिकित्सा केली होतीच, पण त्याचबरोबर त्यांनी हिंदू धर्माचीही चिकित्सा केली होती. मंडळाने कार्यक्रम रद्द केला. हे भाषण होऊ शकलं नाही. मग आंबेडकरांनी या व्याख्यानाच्या प्रती स्वतः छापून वितरित केल्या आणि हे छोटं पुस्तक परिवर्तनवादी चळवळीचं एक धारदार हत्यार बनलं. 

आंबेडकरांचं लेखन वाचताना तुम्हाला सावरून बसायला लागतं. कारण 'बॅरिस्टर' आंबेडकर जी तार्किक आर्ग्युमेंट्स करतात त्यांनी तुम्ही गारद व्हायची शक्यता असते. 'अनाहिलेशन ऑफ कास्ट' इंग्लिशमध्ये तर उपलब्ध आहेच पण त्याचे बऱ्याच भाषांमधून अनुवाद झाले आहेत. सुगावा प्रकाशनाने 'जातिप्रथेचे विध्वंसन' या नावाने मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे. (अनुवादक : गौतम शिंदे)  'भारतात सामाजिक सुधारणांना मित्र थोडे आणि टीकाकार फार' हे अधोरेखित करत आंबेडकरांच्या विवेचनाची सुरुवात होते आणि पुढे वाचताना आपण केवळ गुंगत जातो. मी हे पुस्तक वाचताना अनेक विधानं, काही परिच्छेद अधोरेखित करून ठेवले होते. वानगीदाखल काही उदाहरणं पहा - 'जात ही केवळ कामांची विभागणी नसून कामकऱ्यांची विभागणी आहे'. 'जातीचे अस्तित्व आणि जातीची जाणीव भूतकाळातील वैराची आठवण कायम ठेवण्याचं काम करते'. 'जातिपद्धती ही सामूहिक कृतीला प्रतिबंध करते'. 'चातुर्वर्ण्याच्या पद्धतीमुळे प्रत्यक्ष कृती करण्यास हिंदूंचे खालचे वर्ग असमर्थ बनवले होते'. 'बिगर हिंदूंमध्ये जातीला कोणतेही धार्मिक पावित्र्य नाही, परंतु हिंदूंमध्ये जातीला निःसंदिग्धपणे पावित्र्य दिलेले आहे. हिंदूंना त्यांचा धर्म जातींचा अलगपणा आणि विभक्तपणा एक सद्गुण म्हणून पाळण्यास भाग पाडतो. परंतु बिगर हिंदूंना त्यांचा धर्म जातींविषयी तोच दृष्टिकोन पाळण्यास भाग पाडत नाही'. 'आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी कामगार वर्गाला चेतावण्याकरता कार्ल मार्क्स म्हणाला होता, 'तुम्हाला तुमच्या बेड्यांशिवाय काहीच गमवावे लागणार नाही.' परंतु काहींना अधिक तर काहींना कमी असे वेगवेगळ्या जातींमध्ये सामाजिक व धार्मिक अधिकार अशा कौशल्यपूर्ण रीतीने विभागलेले आहेत की त्यामुळे मार्क्सची घोषणा हिंदूंना जातीपद्धतीविरुद्ध चेतवण्यास निरुपयोगी ठरते.' या पुस्तकात आंबेडकरांनी धर्माबद्दल जी मांडणी केली आहे त्यातील एक परिच्छेद तर जसाच्या तसा द्यायचा मोह होतो आहे, पण जागेअभावी तो टाळतो. 

आंबेडकरांचे विचार खरेखुरे क्रांतिकारक आहेत. त्यांनी हिंदू धर्म आणि जातीव्यवस्था याचं नीट विच्छेदन केलं आहे. कुठल्याही मांडणीवर - विशेषतः सामाजिक संरचनेबाबतच्या मांडणीवर - चर्चा होऊ शकते. कारण काही धागे सुटण्याची शक्यता असते.  त्यामुळे हे आंबेडकरांच्या मांडणीबाबतही संभवू शकेल. परंतु कनिष्ठ जातीत जन्मल्याचे अनेक चटके भोगत, त्यातून स्वतःला निग्रहपूर्वक उचलून घेत, सततच्या अभ्यासाने तर्कशक्ती विकसित करत परिवर्तनाचा पाया रचणाऱ्या आंबेडकरांचं विचारदर्शन थक्क करणारं आहे, त्यांच्याविषयी आदर जागवणारं आहे. या पुस्तकाच्या अखेरीस गांधीजींनी 'हरिजन' मध्ये आंबेडकरांच्या निबंधावर केलेल्या दोन टिप्पण्या आणि आंबेडकरांचं त्यावरील उत्तरही समाविष्ट करण्यात आलं आहे. ही चर्चाही वाचण्यासारखी आहे.  
इथवर सगळं ठीक आहे. जात व धर्म याबाबतचं आकलन वाढवण्यासाठी आंबेडकरांचं वाचन टाळणं अशक्यच आहे. पण प्रश्न पुढे आहे. प्रश्न 'आपला' आहे. 'जात' ही आजही व्यक्तीची ओळख म्हणून उभी आहेच. तेव्हा जातीसमोर हार मानायची की जातिअंतासाठीचे मार्ग शोधत राहायचं ? 'आपण' काय करायचं? मी जेव्हा माझं आडनाव लावणं बंद केलं तेव्हा आईचं नाव पुढे यायच्या आनंदाबरोबरच आपण जातीला किंचितसा - अगदी किंचितसा धक्का दिला हाही आनंद होता. पण जात ही चीज नावाव्यतिरिक्त खाणं - पिणं, कपडे, भाषा, काही सवयी अशा रूपांनीसुद्धा जिवंत असतेच. ती मनात जिवंत असते आणो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती लग्नामुळे जिवंत ठेवली जाते. आपल्याकडे विवाहसंस्था ही जातीसंस्थेची रक्षक आहे असं म्हणणं वावगं होणार नाही. मग या पहिलवानाला लोळवायचं कसं? 

जातिव्यवस्थेने केलेली गोची अशी आहे की तिने व्यक्तीला समूहभान दिलं आहे. जे आदिम टोळीसमूहाशी मिळतंजुळतं आहे. आधुनिक काळातील व्यापक समाजभान, राष्ट्रभान आणि अंतिम म्हणजे वैश्विक मनुष्यभान या सगळ्यावर ते कडी करतं. त्यामुळे आपली ओळख, अस्मिता या बाबींशी जोडलं गेलेलं हे भान काढणं फार अवघड आहे. इतर अनेक महत्त्वाच्या बाबतीत भानावर नसणारे आपण जातीबाबत मात्र फारच भानावर असतो! यातली व्यावहारिक बाजू हीच आहे की जात ही एक 'फंक्शनल' (कार्यशील, ज्याचा परिणाम रोजच्या जगण्यावर होतो अशी) गोष्ट आहे. जातीशी जोडलेली 'विवाह' हीदेखील एक 'फंक्शनल' गोष्ट आहे. व्यवस्था सुरळीत चालवायची तर मग खाणं-पिणं, सवयी, साधारण वृत्ती, श्रद्धा याबाबत आपल्यासारख्याच समूहातील मुलगा किंवा मुलगी निवडणं लोकांना श्रेयस्कर वाटतं. (इंग्लिशमध्ये 'नोन डेव्हील इज बेटर दॅन अननोन एंजल'असा एक वाक्प्रचार आहे. त्याची आठवण झाली.) पण या सोयीबरोबर संकुचितताही येते, वृथा अभिमान येतो आणि समाज विखुरला जातो.   
        
मला असं वाटू लागलं आहे की एकूण विचार करता, जातीच्या पहिलवानाची ताकद लक्षात घेता त्याच्याशी थेट दोन हात करणं जिथे जड जात असेल तिथे त्याला अशक्त कसं करता येईल हे पाहावं. त्याला जो खुराक लागतो तो कमी करत न्यावा. मग एका दिवशी तो संपेल. विलास सारंग म्हणतात तसं जात ही नेणिवेचा भाग बनली असेल, जातिभान हे आपल्या जनुकांचा भाग बनलं असेल तर काही शे - हजार वर्षांच्या या जाणिवेच्या अंगवळणी पडलेल्या भागाला काढून टाकायला कदाचित तेवढाच काळ जावा लागेल. आज जातवास्तव राजकीय कारणांमुळे आणि सामाजिक वैरभाव म्हणूनही प्रखर होत असलं तरी जातीअंताच्या आघाडीवर अगदीच अंधार आहे असंही नाही. विशेषतः तांत्रिक, आर्थिक आघाडीवरील बदल जातवास्तवाला थोडं थोडं हलवत आहेत. व्यक्तिस्वातंत्र्याची कक्षाही विस्तारते आहे. आंतरजातीय विवाह होत आहेत. त्यामुळे आशेच्या जागा दिसतात. पण नवतेला रोखण्याची ताकद जातवास्तवात अजूनही आहे. त्यामुळे आव्हान मोठं आहेच. त्यासाठी वेगवेगळ्या व्यूहरचना हव्या आहेत आणि मुख्य म्हणजे जात - धर्माच्या पोलादी पकडीतून येणारा हळवेपणा, व्यक्तिस्वातंत्र्याविषयीची भीती / तिरस्कार / अढी हे सगळं नाकारू शकणारं मन हवं आहे. सोबतीला आंबेडकर आहेतच! 

Saturday, August 18, 2018

गांधीजी, आधुनिकता आणि दुविधा - २

माझे वडील सर्वोदयी कार्यकर्ते होते. त्यांच्याशी माझ्या वरचेवर वाद-चर्चा व्हायच्या. गांधीं-विनोबांच्या प्रभावाखाली असलेले वडील आणि गांधी-विनोबांचा प्रभाव असला तरी 'मायक्रोसॉफ्ट-गूगलोत्तर' काळातला, आंबेडकर-डार्विन-स्त्रीवाद याही रसायनांकडे आकर्षित झालेला मी अशा दोन व्यक्तींमधली ती टक्कर असायची. मात्र त्यांचं एक म्हणणं माझ्या लक्षात राहिलं. ते म्हणाले की आम्ही सगळे गांधींच्या खांद्यावर बसून जग बघतोय. त्यामुळे आम्हांला थोडं दूरवरचं दिसू शकतं. तू आमच्या खांद्यावर बसला आहेस. त्यामुळे आम्हांला जे दिसत नाही ते तुला दिसत असणार हे मला मान्य आहे!

हा मुद्दा मला नोंद घेण्याजोगा वाटला कारण तो एका गांधीवादी कार्यकर्त्याकडून आला होता. चिकित्सेची 'स्पेस' खुली ठेवणारा होता. मुळात एक गोष्ट मान्य करायला हवी ती म्हणजे आपण भारतीय वृत्तीने 'पूजक' आहोत. आपल्याला एखाद्या अधिष्ठानाची सतत गरज असते. (आपल्या कामासाठी प्रेरणा म्हणून, आपल्यावर विवेकाचा अंकुश राहावा म्हणूनही ते होतं, परंतु याचे इतरही काही पैलू आहेत. सध्या एवढंच नोंदवून पुढे जाऊ.) 'वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) वास्तवा'ला महत्त्व न देता किंवा तिकडे दुर्लक्ष करून 'आपल्या मनात वसत असलेल्या' (पर्सीव्ह्ड, आपल्याला समजलेल्या) वास्तवाला महत्त्व देण्याच्या आपल्या मनोवृत्तीत आपल्या पूजक वृत्तीची मुळं दडलेली आहेत. आपली ही 'पूजक' वृत्ती एक ऐतिहासिक परिपाक आहेच, पण त्याबरोबर जातीय, आर्थिक विभागणीने आणि सरंजामी वृत्तीच्या अवशेषांनी शतभंग झालेलं आपलं समाजमानस आपल्या या वृत्तीला खतपाणी घालत असतं. मुद्दा असा की आपण जेव्हा ऐतिहासिक महत्त्वाच्या व्यक्तींचा विचार करतो तेव्हा आपल्या नैसर्गिक किंवा वैचारिक घडणीमुळे त्या व्यक्तीच्या प्रेमात असण्याची शक्यता गृहीत धरूनही त्या व्यक्तीच्या विचारांवर, त्यातल्या 'इसेन्स'वर लक्ष केंद्रित करण्याची गरज  आपल्याला लक्षात घ्यावी लागते. त्यांचे विचार स्थलकालसापेक्ष असू शकतात हे मान्य करायची तयारी असावी लागते. (रावसाहेब कसबे यांच्या 'आंबेडकरवाद - तत्त्व आणि व्यवहार' या पुस्तकातील पहिलं प्रकरण 'महापुरूष' यादृष्टीने वाचण्यासारखं आहे. 'महापुरूषांचा विचार फार सावधगिरीने करावा लागतो' हे त्यांचं म्हणणं तर अगदीच पटतं.) 

हे सगळं लक्षात घेऊन गांधीजींबाबत वस्तुनिष्ठपणे, 'इसेन्स'चा मुद्दा डोळ्यापुढे ठेवून विचार केला तरी मला ते 'गायडिंग लाइट' सारखे वाटतात. परंतु त्यांची मांडणी स्वप्नवत, आदर्शवादी आहे आणि तिला प्रत्यक्षाच्या मर्यादा आहेत, मानवी आकांक्षा, मानवी व्यवहार यांचा विचार करता ती पुरी पडत नाही असं अनेकांचं मत असतं. मागच्या लेखाच्या शेवटी ज्या तीन लेखांचा उल्लेख केला आहे त्यातील विश्राम गुप्ते यांच्या मांडणीत हा मुद्दा येतो. गांधीवाद आणि आधुनिकतावाद या दोन परस्परविरोधी विचारधारा आहेत असं त्यांच्या लेखाचं गृहीतक असल्याचं त्यांनी लेखात नमूद केलं आहे. त्यांचं विश्लेषण 'प्रत्यक्षातील अडचणींच्या' पार्श्वभूमीवर आदर्शाची चिकित्सा करणारं आहे तर चैत्रा रेडकर यांनी 'हिंद स्वराज'चं विश्लेषण करताना या पुस्तकातून पर्यायी जीवनशैलीच्या विकासाची गुणसूत्रे सापडतात असं म्हटलं आहे. हिंद स्वराजच्या लेखनामागचे राजकीय संदर्भही त्यांनी तपासले आहेत. त्यांचा एक मुद्दा मला विशेष महत्त्वाचा वाटला - 'औद्योगिक भांडवलशाहीमुळे खेड्यांच्या वाट्याला आलेली विपन्नावस्था, ग्रामीण भागांचे शहरांकडून होणारे शोषण, शहरांवरील ग्रामीण भागांचे परावलंबित्व या सर्व बाबींचे भान गांधी आणि मार्क्स दोघानांही होते. यावरील इलाज म्हणून मार्क्सने उत्पादन साधनांवरील मालकीचा प्रस्ताव मांडला तर गांधींनी यंत्रविवेक सुचवला. बाजारी अर्थव्यवस्थेतून मुक्तीसाठी उत्पादन साधनांवर सामूहिक मालकी प्रस्थापित करण्याचा मार्क्सचा मार्ग आपल्याला क्रांतिकारी वाटतो, मात्र गांधींनी सुचवलेला मार्ग स्वप्नाळू, अवास्तव आणि अशक्य वाटतो याचा अर्थ काय लावायचा?'  

वरील मुद्द्याचा रोख अर्थातच परिवर्तनाच्या सामाजिक-राजकीय चळवळीत असणाऱ्या कार्यकर्त्या-विचारवंतांकडे आहे. सर्वसामान्य लोकांसाठी कदाचित मार्क्स आणि गांधी दोघांचीही मांडणी अवघड, स्वप्नाळूच असेल. मात्र इथे आपण एक लक्षात घेऊ की सर्वच क्रांतदर्शी विचारवंतांचा रोख सहअस्तित्व सुकर व्हावं, समाजात शांती-समृद्धी-न्याय असावा याकडे असतो. त्यासाठीचा त्यांचा असा एक 'पर्स्पेक्टिव्ह' असतो. त्याचा विस्तार आपल्याला करावा लागतो. मला असं दिसतं की गांधीवाद, मार्क्सवाद किंवा इतर कुठल्याही विचारधारेचा 'गाइडलाइन' म्हणून विचार न करता त्यातील शब्दांविषयी, काही निर्णयांविषयी वाद घालत 'ते चुकले की नाही' याचा खल करण्यात आपला पुष्कळ वेळ जातो. इतिहासाचा अभ्यास म्हणून ते करायला हरकत नाहीच, पण तो आजचा आपला जीवन-मरणाचा प्रश्न करण्यात काही हशील नाही. 

मागच्या लेखात मिलिंद बोकीलांच्या लेखाचा उल्लेख केला आहे. हा दीर्घ लेख फक्त 'हिंद स्वराज'विषयी नाही. गांधीजी हे 'एकूण प्रकरण' समजून घ्यायच्या दृष्टीने तो अतिशय उपयुक्त आहे. विज्ञानासंदर्भातील गांधीजींची मते ही एक प्रकारे त्यांच्या विचारदर्शनाला पडलेली मर्यादा आहे असं बोकील नोंदवतात. परंतु त्यांच्या सर्व विचारांतून अंतिमतः दिसणारा गांधी कोणता याचं उत्तर बोकीलांनी 'नीतीसाठी तळमळणारा गांधी' असं दिलं आहे. याशिवाय गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाबाबत लोकांचा जो गोंधळ होतो तो दूर होईल असं विवेचन त्यांनी केलं आहे. आपण गांधीजींची दृष्टी स्वीकारली नाही पण आपली स्वतःची अशी किंवा आपल्याला उपयोगी अशी विकासाची दृष्टी आपण विकसित केली नाही हे त्यांचं निरीक्षणही योग्य आहे. आजचे आपल्यासमोरचे विकासाचे आणि विकासामुळे निर्माण झालेले पेच त्याची साक्ष देतात.   

गांधीजींबाबतची विविध मते लक्षात घेतली तर असं दिसतं की त्यांचा अंतिम उद्देश एका नव्या वास्तवाची निर्मिती करण्याचा होता. ते वस्तुगत, व्यवहार्य प्रश्नांशीच झुंजत होते. त्यांच्या कल्पनेत एक माणूस होता आणि त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावी लागेल अशी बाब म्हणजे ते स्वतः त्या माणसाचं प्रतिबिंब होते. गांधीजींना नैतिक उंची प्राप्त झाली कारण बऱ्याच अव्यवहार्य गोष्टी त्यांनी स्वतः करून दाखवल्या. कमीत कमी गरजा ठेवून जगता येतं हे त्यांनी स्वतःच्या जगण्यातून दाखवून दिलं आणि जगासमोर एक उदाहरण ठेवलं.   

एक गोष्ट खरी की गांधीजींचे समकालीन बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल यांनी गांधीजींच्या आदर्शांना संविधानात्मक आणि संस्थात्मक जोड दिली. गांधी आणि आंबेडकर यांच्यात काही मतभेद होते हे सर्वश्रुत आहे. आंबेडकरांची धर्मविषयक आणि जातीनिर्मूलनविषयक भूमिका अधिक स्पष्ट आणि प्रखर होती आणि त्यामुळे अधिक आधुनिक होती असं म्हणता येईलच. तो स्वतंत्र विषय आहे. मात्र या सर्वच मंडळींनी नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाच्या पायाभरणीत - जी अतिशय आव्हानात्मक गोष्ट होती - अतुलनीय योगदान दिलं यात शंकाच नाही. ( स्वातंत्र्यानंतर उभारल्या गेलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेच्या मुंबई शाखेत कालांतराने 'सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्ह्ज फॉर रूरल एरियाज' या स्वतंत्र शाखेची निर्मिती करण्यात आली हे नोंद घेण्याजोगं आहे.)

गांधीजी, त्यांचा प्रभाव, देशाची 'डेव्हलपमेंट पॉलिसी', त्यातील कच्चे दुवे, त्यातूनच उभं राहिलेलं नर्मदा बचाओ आंदोलनासारखं जनआंदोलन, त्याच्या मागेपुढे उभी राहिलेली इतर अनेक जनआंदोलनं, शासकीय दमन, भांडवलशाहीचे हितसंबंध, लोकसंख्येचा प्रश्न आणि पर्यायी विकासाच्या वाटा हा एक मोठा अभ्यासविषय आहे. गांधीजींच्या मूळ मांडणीची परिणती पुढे 'सामाजिक न्याया'चे प्रश्न उभे करण्यात झालेली दिसते आणि ती अतिशय आश्वासक बाब आहे. तंत्रज्ञानातील प्रगती, भौतिक विकासाची ऊर्मी जोवर सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला बरोबर घेऊन चालते तोवरच तिचा चेहरा मानवी राहतो, अन्यथा ती भेसूर होऊ लागते हे पुन्हा पुन्हा दिसून आलं आहे.   

संबंधित विषयाबाबत शोध घेण्यासारखं बरंच आहे. यापुढील एक-दोन लेखामधून आपण तसा प्रयत्न करू. मात्र सध्या ही चर्चा थांबवून पुढच्या लेखात आपण वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत.