Saturday, February 17, 2018

श्रद्धेचं 'वर्गी'करण

'श्रद्धेची चुकलेली वाट' या मागच्या लेखानंतर याच विषयावर थोडं अजून लिहावं, थोडा अजून शोध घ्यावा असं मला वाटत होतं. लेखावर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यातल्या काही प्रतिक्रियांमुळे तो विचार बळावला आणि हा लेख लिहायला मी उद्युक्त झालो. 

श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोघात काही फरक आहे का हा एक कळीचा प्रश्न आहे. तात्त्विकदृष्ट्या विचार केला तर  या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं द्यावं लागेल कारण श्रद्धादेखील मुळात अंतर्मनात उगवलेली, तिथे वसलेली आणि प्रश्नांच्या पलीकडची गोष्ट आहे. परंतु श्रद्धेचं अतिशय विपर्यस्त आणि हानीकारक स्वरूप म्हणजे अंधश्रद्धा असं म्हणून या दोघींमध्ये प्रत्यक्षात एक सीमारेषा आखता येईल आणि दोघी वेगळ्या आहेत असं म्हणता येईल. आपली श्रद्धा जोपासत आणि त्याचबरोबर विवेकही जागा ठेऊन गरज भासल्यास त्या श्रद्धास्थानाच्या विरोधी भूमिका घेणारा कुणी असेल तर तेही स्वागतार्ह आहे. मनाची गरज म्हणून श्रद्धा आहे, पण ती आपल्या विचारशक्तीवर मात करत नाही आहे हे चित्र आश्वासक आहे. आज आपल्याला श्रद्धा, अंधश्रद्धा, धार्मिक श्रद्धा या गोष्टींची व्यक्तीनिहाय विखुरलेली रूपे पाहायला मिळतात आणि त्यामुळे आपण जेव्हा या गोष्टीना सामोरे जातो तेव्हा त्यांच्याबाबत एकदम तुकडा पाडल्यासारखा निर्णय देता येत नाही. या सर्वच गोष्टींचा संबंध माणसाच्या मनःस्थितीशी आहे आणि इथे आपल्याला समाजातील विविध वर्ग लक्षात घ्यावेच लागतात. माणसाचं समाजातलं 'लोकेशन' काय आहे हे न तपासता त्याची मानसिकता आपल्या विचाराची फूटपट्टी लावून बघता येत नाही. एक अनुभव सांगतो. पुण्यातील 'सहेली' या वेश्याव्यवसायातील स्रियांच्या संघटनेशी मी जोडलेलो आहे. एकदा एका व्यावसायिक स्त्रीशी बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर काहीतरी लागल्याचं लक्षात आलं. चौकशी केल्यावर तिने सांगितलं की जिना उतरताना पाय अडखळून पडले आणि लागलं. जखम डोळ्याच्या जवळ होती. मी म्हटलं, 'बरं झालं, थोडक्यात निभावलं.' त्यावर ती चटकन म्हणाली, "फिर? भगवान है ना...भगवान संभालता है.. ." तिच्या बोलण्यात आणि आविर्भावात 'देव आहे' याची एवढी खात्री होती की मी क्षणभर स्तिमित झालो. वेश्यांच्या घरात देवांची रेलचेल असते हे मी पाहिलं होतं. शिवाय देवावर श्रद्धा असते हे मला नवीन नव्हतंच. पण तिच्या बोलण्यात जो ठामपणा होता त्या ठामपणामागे, तिच्या 'देव' या संकल्पनेत तिला उभं राहायला आवश्यक असा एक आधार होता. त्या आधाराचा मी विचार करत होतो आणि मला पराभूत वाटत होतं. 

अशाच प्रकारचा अनुभव इतरही लोकांसंदर्भात आधी आला होता. देवाधर्माबाबत पूर्ण उदासीनता, नवीन काही करायची उर्मी, पारंपरिकतेची काहीशी चीड या प्रारंभीच्या काळापासून 'ही एकूण सगळी गुंतागुंत आहे' या विचारापर्यंतच्या प्रवासात अशा अनुभवांनी आपला ठसा माझ्या मनावर उमटवला आहे. आपण जेव्हा काही 'नवीन विचार' करतो तेव्हा तो करायची मुभा मला माझ्या सामाजिक स्थानामुळे मिळाली आहे हे लक्षात आल्यावर मला वर म्हटलं तसं पराभूतही वाटलेलं आहे. आपल्या भोवतालच्या समाजाचा आपल्याला न कळणारा प्रवाह, विविध परिस्थितीत असलेली माणसं, त्यांचं जगणं, परस्परसंबंध, त्यांचे प्रश्न, त्यांच्यावर झालेला अन्याय, त्यांचं दुखावलेपण, एकटेपण, त्यांची स्वभाववैशिष्ट्यं या सगळ्याला आपण एका सूत्रात बांधू शकतो का असा प्रश्न पडायला लागल्यावर माझा ट्रॅक थोडा बदलत गेला. दिशा बदलली नाही, पण ट्रॅक बदलला. 
वरील उदाहरणातील त्या स्त्रीशी किंवा समाजातल्या कष्टकरी वर्गातील एखाद्या माणसाशी मी श्रद्धेबाबत काय बोलू शकतो ? परिवर्तनाबाबत काय बोलू शकतो ? इथे त्याच्यावर मर्यादा येतात. कारण मी जर 'जगण्याचं मूळ डिझाइन' अधिक चांगलं करू शकत नसेन तर मला त्याच्याही पुढचं काही बोलायचा अधिकार उरतो का ? पण याची दुसरी बाजू अशी की जर 'जगण्यातील सुख-दुःखाची कारणं ईश्वरी सत्तेत / इच्छेत नाहीत तर ती मानवनिर्मित आहेत' याची जाणीव झाली नाही तर माणूस खऱ्या अर्थाने स्वतःची उन्नती साधू शकेल का? तो संघर्षाला तयार होईल का? म्हणजे मग इथेही एकच एक उत्तर नाही. इथेही आपल्याला तारतम्याने निर्णय घ्यावा लागणार आणि विशिष्ट परिस्थितीत असलेल्या माणसांना अनुकूल अशा पद्धतीने बदल घडवायचा प्रयत्न करावा लागणार. 

परिवर्तन हवं हे मान्य केलं की त्याच्या पुढचा आत्यंतिक महत्वाचा प्रश्न येतो तो हा की 'कुणाचं परिवर्तन' ? आणि यातला जो 'कुणी' आहे तो शंभर प्रकारचा आहे. त्यामुळे आपण कुणाशी बोलतोय हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. समाजात वर्गसंघर्ष सतत कार्यरत असतो. दृश्य स्वरूपात दिसला नाही तरी त्याचा अंतःप्रवाह सुरू असतोच. मानवी आकांक्षांची टक्कर होते तेव्हा तो कार्यरत असतो. ही टक्कर अगदीच क्षीण असते किंवा नसते तेव्हा तो प्रभावी नसतो इतकंच. परिवर्तनवादी विचाराने जर वर्गसंघर्ष लक्षात घेतला नाही तर ते उलट दिशेने अंगावर येऊ शकतं. या पार्श्वभूमीवर जेव्हा मी श्रद्धेकडे बघतो तेव्हा मला जाणवतं की जो वर्ग आज सुस्थितीत आहे, शिक्षण आणि नोकरी - व्यवसायाच्या संधी ज्यांना मिळालेल्या आहेत तो वर्गदेखील चिकित्सक होऊ शकत नसेल तर ती गंभीर गोष्ट आहे. या वर्गानेही संघर्ष केला आहेच पण त्याचं फळही त्यांना मिळालेलं आहे. प्रत्येकालाच संघर्षाचं फळ मिळतं असं नाही त्यामुळे ज्यांना ते मिळालं आहे त्यांनी विश्लेषक वृत्ती ठेवावी ही अपेक्षा आहे. श्रीमंत, मध्यम आणि गरीब असं ढोबळ वर्गीकरण आपण करतो. पण मला यात दोन प्रमुख विभाग करावेसे वाटतात - आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि विपन्न. ज्यांची क्रयशक्ती भरपूर आहे किंवा भरपूर नसली तरी चांगली आहे ते संपन्न वर्गात येतात. त्यांच्या क्रयशक्तीत फरक असेल, काहींकडे अतिरिक्त संपत्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात असेल तर काहींकडे त्याहून कमी असेल. परंतु दोघांनाही उद्याची भ्रांत नाही आहे. जो विपन्न वर्ग आहे त्याला उद्याची भ्रांत आहे. त्यामुळे तो 'व्हल्नरेबल' आहे. या दोघांचं मूल्यमापन करताना त्यांना वेगळे निकष लावावे लागतील. आज श्रद्धेच्या, परंपरेच्या संदर्भात संपन्न वर्गाकडे पाहिलं तर निराश व्हायला होतं कारण समाजातील हा सुरक्षित वर्ग चिकित्सक व्हायला, कृतीशील व्हायला तयार नाही. हा वर्ग धार्मिक कट्टरता, श्रद्धेचं बाजारीकरण या सगळ्याच्या विरोधी भूमिका घेताना फारसा दिसत नाही. आधुनिकता ही मोबाइल आणि इतर उपकरणांच्या वापरात नसून ती विचारपद्धतीत असावी लागते. नेमका इथेच मोठा गोंधळ झाल्याचं दिसतं. ज्या वर्गाने आधुनिकतेचं धुरीणत्व स्वीकारायचं तो वर्गदेखील प्रश्न न विचारता परंपरेचा पाईक होताना दिसतो. यात परंपरेचं अतार्किक गौरवीकरण, सामाजिक प्रश्नांबाबत विश्लेषक वृत्तीचा अभाव, रेडिमेड उत्तरांवर विश्वास या गोष्टी अधोरेखित कराव्याशा वाटतात. आणि हे फार चिंताजनक आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून तुकड्या तुकड्यात जे येतं त्याला आपण ज्ञान म्हणणार असू, आपण इतिहास जर तिथे वाचणार असू तर अवघड आहे. म्हणजे मग शिक्षणाने आपल्याला माहिती दिली, पण त्यामानाने चिकित्सेची ताकद काहीच दिली नाही असं म्हणावं लागेल. 

जोपर्यंत बहुतांश मानवी व्यवहारांच्या केंद्रस्थानी पैसा आहे, पैसा माणसाला 'ड्राइव्ह' करतो आहे तोपर्यंत आपल्याला 'माणसाचं खरं मानवस्नेही रूप' दिसणार नाही अशी डाव्या विचारातील मांडणी आहे. संपन्न वर्गाची स्थितिशीलता पाहिली की यातलं तथ्य जाणवू लागतं!    

Saturday, February 3, 2018

श्रद्धेची चुकलेली वाट

समाजाने अधिक 'परिवर्तनस्नेही' होण्यासाठी सामाजिक परिवर्तनाचा ध्यास असलेल्यांचा दृष्टीकोन कसा असावा याविषयी मागच्या लेखात मी काही मुद्दे मांडले होते. या लेखात दुसऱ्या बाजूने विचार करू. म्हणजे धार्मिक-सामाजिक संदर्भात जे परंपरावादी आहेत त्यांच्यावरील जबाबदारी काय आहे ते पाहू. मागच्या लेखावर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यात नाशिकच्या एका वाचकाची प्रतिक्रिया बोलकी होती. नातेवाईक, मित्र-मैत्रिणी अशा विविध सामाजिक वर्तुळात वावरताना काही नवीन विचार मांडणाऱ्याची कोंडी होते याचा चांगलाच अनुभव गाठीशी आहे असं त्यांनी लिहिलं होतं. हा अनुभव त्यांच्यासारखा इतरही काहींच्या गाठीशी असेल. माझ्याही गाठीशी आहे. 'आपण एकटे पडतो' अशी मला बरेचदा जाणीव होते. अर्थात या द्वंद्वातील गुंते वैचारिक वाढीच्या टप्प्यावर लक्षात येत गेले आणि मी त्यातून मार्ग काढत गेलो. प्रास्ताविकाच्या लेखात लिहिलं होतं तसं दोन माणसांमध्ये जसं द्वंद्वात्मक नातं असतं तसं दोन संकल्पनांमध्ये, विचारांमध्ये असतं. हे द्वंद्व असणार आहे,अगदी कायम असणार आहे हे लक्षात घेऊनच सर्व संबंधितांना आपलं वर्तन आखावं लागतं. या द्वंद्वात परंपरेच्या 'फंक्शन'ला समजून घ्यायची एक जबाबदारी जशी परिवर्तनवाद्यांची आहे तशीच दुसरी जबाबदारी परंपरेचं 'डिसफंक्शन' समजून घ्यायची जबाबदारी परंपरानिष्ठ लोकांचीही आहे. आणि यात कळीच्या स्थानी आहे ती 'श्रद्धा'.  

मला बरेचदा 'श्रद्धा' या शब्दापेक्षाही 'धारणा' हा शब्द योग्य वाटतो. 'धारणा' म्हणजे retentive power (ग्रहणशक्ती), understanding (समज). श्रद्धेमध्ये 'पूर्ण शरणागती' आहे, स्वतः विचार न करता विश्वास टाकणं आहे तर धारणेमध्ये थोडा तरी विचार झालेला असणं अभिप्रेत आहे. पण तरी आपण सर्वपरिचित शब्द म्हणून 'श्रद्धा' हाच शब्द वापरू आणि आपण ज्याला श्रद्धा म्हणतो ती एक प्रकारे त्या माणसाची 'समज' आहे असं गृहीत धरू. मे. पुं. रेगे यांनी त्यांच्या 'विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा' या पुस्तकात श्रद्धेविषयी महत्वाचं विवेचन केलं आहे. हे संपूर्ण पुस्तक मला या विषयातील वैचारिक स्पष्टतेसाठी महत्त्वाचं वाटतं. यातील त्यांचा 'बुद्धीप्रामाण्यवाद' हा लहानसा लेख वाचण्यासारखा आहे. 'बुद्धीप्रामाण्य' हा शब्द आपल्या चांगल्या परिचयाचा आहे. माणसाने आपल्या बुद्धीला पटेल, बुद्धीच्या कसोटीवर जे उतरेल तेच करावं असं म्हटलं जातं. आता प्रश्न असा आहे की एखादा माणूस मांजर आडवी गेली की अपशकुन होतो असं समजत असेल तर ते त्याच्या बुद्धीला पटलेलं असतं म्हणूनच तो तसं समजत असतो. अनेक सामाजिक कुप्रथा कुणाच्या तरी बुद्धीला पटणाऱ्या होत्याच. माणूस जे जे निर्णय घेतो त त्याच्या बुद्धीनेच घेतो. मग अशा बुद्धीप्रामाण्याचं काय करायचं? (रेग्यांनी पुढे यावर विस्तृतपणे लिहिलं आहे. आत्ता त्यावर लिहीत नाही, पण त्याविषयी, खरं तर या पुस्तकाविषयी, सविस्तर लिहायला आवडेल.) रेग्यांची मांडणी वाचताना मला लक्षात आलं की 'बुद्धीप्रामाण्य' हा शब्द नेहमीच सर्वत्र लागू होईल असं नाही. काही ठिकाणी तो अपुरा पडू शकतो. 'विवेकवाद' हा शब्द अधिक समर्पक आहे. या शब्दातून 'चिकित्सक वृत्ती' ध्वनित होते. हा शब्द मनुष्याच्या निर्णयक्षमतेकडे, योग्य-अयोग्य यात फरक करण्याच्या क्षमतेकडे निर्देश करतो. त्यामुळे आपल्या श्रद्धा किंवा धारणा 'बुद्धीच्या कसोटीवर' घासून बघण्यापेक्षा 'विवेकाच्या कसोटीवर' घासून बघाव्यात.   

रेगे लिहितात, 'विवेकवाद म्हणजे आपल्या समजुती, विश्वास सत्य किंवा स्वीकारार्ह ठरवण्याची किंवा असत्य आणि/किंवा त्याज्य ठरवण्याची एक विशिष्ट पद्धती आहे.'  थोडक्यात विवेकवाद ही एक प्रभावी 'तपास यंत्रणा' आहे. आपल्या ज्या काही श्रद्धा, समजुती असतील त्यांना सतत तपासत राहिलं तरच आपल्याला नवा विचार स्वीकारणं, किमान त्या विचाराला पोचपावती देणं जमू शकेल. परंपरानिष्ठ मानसिकतेची एक मुख्य अडचण अशी आहे की परंपरेने चालत आलेलं 'बरोबर' आहे आणि नवीन काहीही 'चूक' आहे अशी मनुष्याची समजूत होऊन बसते. एखाद्या नव्या गोष्टीला तपासून बघावंसं वाटणं, ती स्वीकारायला जड जाणं हे अगदीच समजण्यासारखं आहे. पण ती 'चूक' आहे असा निर्वाळा दिला जात असेल तर त्यात धोका आहे. कारण यातून सुधारणेचे मार्गच बंद होतात किंवा मला जे नवं स्वीकारता येतं तेच 'योग्य', इतर नवं 'अयोग्य' अशी मानसिकता तयार होते आणि त्याचं रूपांतर हटवादीपणात, आक्रमकतेत होतं. आपल्याकडे अशा उदाहरणांची कमतरता भासू नये!

माणसाला हळवं करणाऱ्या गोष्टीत 'श्रद्धा' अग्रस्थानी आहे. ती कुणावर, कशावर हा प्रश्नच येत नाही. ती शंकरावर, गणपतीवर, भगवद्गीतेवर, कुराणावर, दत्तगुरूंवर, ज्योतिषावर, कार्ल मार्क्सवर, महात्मा गांधींवर, हिंदुत्ववादावर - कशावरही असू शकते. आणि मग तिथे कुणी तार्किक प्रश्न केले की जो बचावाचा प्रयत्न सुरू होतो तो ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याच्या बचावाचा प्रयत्न नसतो तर आपल्या स्वतःच्या बचावाचा प्रयत्न असतो. त्यामुळे इथे एक लक्षात घ्यायला हवं की माणसाच्या जीवनात श्रद्धेचं काहीएक स्थान आहे हे मान्यच आहे, माणसाने तर्ककठोर होऊन अगदी कोरडं होऊन जावं, समर्पित भावनेचा आधार कधीच घेऊ नये अशीही अपेक्षा नाही. श्रद्धा, समर्पण या गोष्टी माणसाच्या जगण्यात 'अँकर'चं काम करत असतात हेही मान्य आहे. पण मुद्दा असा की आपण ज्या श्रद्धास्थानांवर 'विसावतो' तिथून उठून पुढच्या प्रवासाला जाणार की नाही? शिवाय तिथे पुन्हा यायची मुभा नाही असंही नाही. माणसाचा जो 'आंतरिक स्वर' आहे तो त्याला/तिला पुन्हा त्या स्थानाकडे खेचतोच. जर एखाद्या माणसाला गणपतीला नमस्कार करून किंवा ठरविक दिवशी उपास करून शांत वाटत असेल, आनंद मिळत असेल तर तो त्याला मिळू न देणं चुकीचं होईल. पण प्रश्न नमस्कारापुरता किंवा उपासापुरता मर्यादित नाही. प्रश्न वृत्तीचा आहे. आणि इथे असं दिसतं की 'श्रद्धा' ही मूळची  एका अर्थी सकारात्मक संकल्पना हळूहळू नकारात्मक होत जाते. नमस्कार करणाऱ्याला नमस्कार न करणारा खुपू लागतो आणि मग संघर्षाची ठिणगी पडते.         

आपल्या श्रद्धेची सीमारेषा आखणे हा कळीचा प्रश्न आहे आणि इथे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उगम होतो. 'विज्ञान' म्हणजे नक्की काय ही सैद्धांतिक चर्चा आपण आत्ता बाजूला ठेवू आणि असं बघू की आज धर्मश्रद्धा, परंपरा पालनाचा आग्रह याचे जे दुष्परिणाम दिसतात त्याचं काय करायचं? तर मुख्य म्हणजे सश्रद्ध, परंपरांचं पालन करणारे जे लोक आहेत त्यांनी आपल्या 'कम्फर्ट झोन' च्या बाहेर यायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा. किमान या 'कम्फर्ट झोन'च्या सीमेवर तरी यावं. आज त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या श्रद्धेच्या विषयाचा, म्हणजे देवाधर्माचा बाजार मांडला जातो आहे. तो काही 'सश्रद्ध' लोकांनीच मांडला आहे. मग आपण जर त्या बाजाराचा भाग होत असू तर ते बरोबर आहे का हे त्यांनी स्वतःला विचारावं. या बाजारात आणि गोंगाटात निखळ श्रद्धा मुळात उरली आहे का या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी द्यावं. माझी खात्री आहे की या प्रश्नाचं सकारात्मक उत्तर मिळणार नाही. आज श्रद्धा खोल अंतर्मनात कमी आणि नाईलाजात, बाजारात जास्त आहे.  

श्रद्धेच्या परिणामी लोक अधिकाधिक एकारलेपणाकडे झुकतात की मुळातल्या एकारलेपणाला श्रद्धा खतपाणी घालते याचं उत्तर व्यक्तीगणिक वेगळं असू शकेल, पण आपली श्रद्धा, आपल्या समजुती ही आपली 'विचारपद्धती' होऊ लागली आहे का हा विचार प्रत्येकाने जरूर करावा. कारण श्रद्धा ही मनोवस्था होऊ शकते, विचारपद्धती होऊ शकत नाही!