केसरीवाड्यासमोर साधारण दहा - साडेदहाच्या सुमारास आम्ही सकाळची न्याहारी आटपून गाडीला किक मारायच्या बेतात होतो. दिवसातले सहा तासच फक्त चालू असणाऱ्या पुण्यातल्या अनेक हॉटेल्सपैकी एक हॉटेल तिथे आहे. पदार्थांची चव आणि 'कस्टमर सर्व्हिस' याचे जरी व्यस्त प्रमाण असले तरी पदार्थांची चव कायमच विजयी ठरत असल्यामुळे अनेक हॉटेल्समध्ये निमूटपणे ते देतील ती वागणूक सहन करीत बसावे लागते. उपर्निदिष्ट हॉटेलमध्ये बटाटेवडे उत्तम मिळतात. अर्थात बटाटेवडे संपले की परत जावे लागते. पुन्हा करायची तसदी मॅनेजमेंट घेत नाही. असो. तर सांगायचा मुद्दा गाडीला किक मारणार तोच समोर एक लक्षवेधी प्रसंग घडताना दिसला. साधारणत: केसरीवाड्याच्याच वयाचे एक प्राचीन गृहस्थ हातातली काठी जोरात हालवत रागारागाने एका दुचाकीस्वाराशी भांडत होते. असे प्रसंग टाळण्यात मजा नसते. कारण प्राचीन आणि अर्वाचीन मानव किती प्रकारांनी विकार प्रदर्शन करू शकतो याची झलक अशा प्रसंगातून बघायला मिळते.
"व्हॉट डू यू मीन बाय सॉरी ?" आजोबा, इंग्रजीतून.
"अहो, माझं लक्ष नव्हतं" दुचाकीस्वार.
"ते तर दिसतंच आहे. तुमचं तुमच्या केसांकडे लक्ष नाही. रस्त्यातल्या माणसांची बातच सोडा. शेवटचे कधी कापले होतेत ते तरी आठवतंय का ?" आजोबा.
"त्याचा इथे काय संबंध आजोबा ?" दुचाकीस्वार.
"लक्ष देण्याबद्दल बोलतोय मी." इथे काठी आपटली गेली.
"पण मी माफी मागितली ना ?" दुचाकीस्वार.
"पण तुम्ही असं करताच कसं ? खुशाल मागेपुढे ना बघता गाडी बाहेर काढायची घाई. नशीब माझं माझ्या मागून कुणी येत नव्हतं. नाहीतर मी आधी या रस्त्यावर गेलो असतो आणि नंतर सरळ त्या रस्त्यावर." इथे काठी वर गेली.
"बरं ठीक आहे. काही झालं तर नाही ना ?"
"म्हणून काय झालं ? तुमच्यासारख्यांचा सगळ्यांना त्रास आहे. तुम्ही सिग्नल तोडणार, जोरात हॉर्न वाजवणार, चुकीचं पार्किंग करणार. तुम्ही आत्ता इथे गाडी कशी लावली होतीत ?"
"म्हणजे?"
"म्हणजे मेन स्टँडला की साईड स्टँडला?"
"साईड स्टँडला."
"म्हणजे तिरकी. अजून एका गाडीची जागा वाया घालवलीत. तुम्हांला कसं कळत नाही हो इतकं साधं ? वाहतुकीचा बोऱ्या वाजलेलाच आहे. त्यातून तुमची ही बेशिस्त. त्यात भर म्हणून हे आहेच." काठी रस्त्यालगतच्या एका फलकाकडे गेली. त्यावर 'मस्ती ग्रुप - भव्य तोरण मिरवणूक' आणि दोन - तीन भवानीभक्तांचे भीषण फोटो, खाली ज्युनिअर भवानीभक्तांची नामावळ हे सगळं होतं.
"अहो आजोबा, मी त्या ग्रुपचा नाही. आमचा फक्त गणपती बसतो."
"पण आम्हांला त्रास आहेच ना. गणपती बसो की जगदंबा, तुम्ही बसवता हिमेश रेशमियाला..." आजोबांचे ज्ञान वाखाणण्याजोगे होते.
"बरं चला, मी जातो... सॉरी..." दुचाकीस्वार.
आजोबा काहीतरी बोलत होतेच... स्वत:शीच. मग ते चालू लागले. आम्हीही जरा थांबलो. आजोबांना पाठमोरं बघताना आम्ही जरा उद्विग्न झालो होतो. कदाचित हेच आजोबा एके काळी, म्हणजे ज्या काळी पुण्यात फिरणं हा सुखद अनुभव असेल त्या काळी, कसबा, मंडई, केसरीवाडा वगैरे गणपतींना आपुलकीने भेट देत असतील. त्यांचा आजच्या गणपती उत्सवाबद्दलचा उद्रेक त्या दुचाकीस्वाराला समजला असेल का ?
आम्ही खरेच उद्विग्न झालो. दोन मिनिटं केसरीवाड्यात जावं असं उगाच वाटलं. म्हणून आत गेलो. टिळकांच्या पुतळ्यापुढे उभे राहिलो. जरा बरं वाटलं. आम्ही स्वत: देवळात जात नसलो तरी स्थानमहात्म्याबद्दल आम्हाला शंका नाही. आगाखान पॅलेसमध्ये आम्हांला असंच बरं वाटलं होतं. अजूनही वाटतं. अर्थात तिथून परत हे यायलाच लागतं. पण तरी अधूनमधून अशा ठिकाणी असं पाच मिनिटं शांत उभं राहावं. देवळात असं उभं राहणं आम्हांला जमलेलं नसलं तरी इतर अशा जागा आहेत. लोकमान्यांच्या पुतळ्यासमोरून परत निघालो तोच एक भारदस्त आवाज ऐकू आला,
"कशासाठी आला होतात ?"
आम्ही गडबडलो. आवाज समोरूनच येत होता. आणि पुतळ्याखेरीज समोर कुणीच नव्हतं.
म्हणजे हे टिळक बोलले? बळवंतराव टिळक ? गीतारहस्य वगैरे लिहिणारे ?
"हो. मीच बोलतोय."
यांना कसं कळलं ? आमची बोलती बंद व्हायची वेळ आली होती.
"आम्हांला सगळं दिसतंय... बोला ..."
"काय बोलू ?" आम्ही चाचरलो.
"प्रश्न आहेत ना ?" टिळक गरजले.
"नाही... म्हणजे हो..." आम्ही.
"मग विचारा ना... घाबरायला काय झालं ? रोज किती जोर-बैठका काढता ?"
इथे तर विकेटच उडाली. शब्द गोळा करू लागलो तोच आवाज आला -
"राहू दे. तुमच्याकडे बघूनच कळतंय तुम्ही काही करत नसणार ते. बाहेर जे झालं त्याचा विचार करताय ?"
"हो." आम्ही प्रथमच ठामपणे बोललो.
"हं. तो आपट्यांचा मुलगा. इथे त्यांचं बिऱ्हाड होतं. केसरीत कामाला होते आपटे."
"हो का ? तरीच. मुलगा तसा नीट वाटला. त्याने माफी मागितली."
"मूर्ख आहात. मी त्या आजोबांबद्दल बोलतोय." चपराक बसली.
"हां हां. आजोबा... बरं बरं..."
"केसरी वाचता का ?"
पुन्हा संकट. पुन्हा शब्दांची जुळवाजुळव.
"नसाल वाचत तर सांगा की तसं. सकाळ वाचता का ?"
लोकमान्य निव्वळ ज्ञानी नसून अंतर्ज्ञानीही होते याच्यावर आमचा विश्वास बसू लागला होता.
"हो. वाचतो."
"कसा वाटतो ?"
"चांगला आहे."
"गुळमुळीत उत्तर नको. मनापासून सांगा." पुन्हा चपराक.
"पुण्याच्या आणि आसपासच्या गावातल्या प्रश्नांबद्दल निष्पक्ष भूमिका घेणारं वृत्तपत्र आहे असं वाटतं. मांडणी चांगली वाटते. व्यावसायिकतेचा भाग म्हणून तडजोड होतच नाही असं नाही म्हणता यायचं, पण पत्रकारितेच्या मूल्यांशी असलेली बांधिलकी अजून जपली गेली आहे असं वाटतं. आता जाहिरातींचा सुकाळ असतो हे खरं, पण आज वृत्तपत्र व्यवसाय त्यावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे... त्याला सकाळ तरी अपवाद कसा असणार ?" आम्ही एका दमात हे सगळं बोललो.
"राजकारणात तुम्हांला भविष्य आहे असं दिसतंय. कुठल्या पक्षाशी बांधिलकी वगैरे ?"
"छे हो. अजिबात नाही."
"हं. पुण्याच्या प्रश्नांबद्दल तुम्हांला काय वाटतं ?"
लोकमान्य ओपिनियन पोल वगैरे घेतायत की काय असं वाटायला लागलं. त्यांचा रोख कळत नव्हता.
"प्रश्न ? बरेच आहेत. वाहतुकीचे नियोजन नाही, शहर भरमसाठ वाढतंय, तेव्हा मुलांच्या शाळाप्रवेशापासून ते सरकारी दवाखान्यात रिकामी खाट मिळेपर्यंतच्या भरपूर समस्या आहेत. वाहतूक ही अगदी रोज दिसणारी समस्या..."
"कधीपासून तयार झालीय ही समस्या ?"
"गेल्या चार वर्षात जास्त वाढलीय."
"हं. लोंढा वाढतोय का माणसांचा ? पुण्यात येणाऱ्या ?"
हे जरा अवघड होत चाललं होतं. आम्ही पुतळ्याच्या मागे वाघ आणि भगवा झेंडा दिसतो का हे तपासून घेतलं. लोकमान्य नाजूक प्रश्नांवर का बरं आम्हांला बोलतं करू पाहतायत ?
"हो. नोकरीनिमित्त बरेच लोक येतात. आयटी इंडस्ट्री जोरात आहे ना पुण्यात. आता पुणं मेट्रो सिटी व्हायच्या मार्गावर आहे. शिवाय कॉलेजेस खूप वाढली आहेत."
"शेतकी महाविद्यालये किती आहेत ?"
इथे आम्ही चमकलो. का प्रश्न का बरं विचारला असावा ? पण प्रश्न इंटरेस्टिंग होता. कॉलेजेस म्हणजे मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, मेडिकल एवढीच असतात. शेतकी महाविद्यालय वगैरे ? शेतीचं शिक्षण ? अहो पण जमीन कुठे आहे इथे ?
"मग राहता कशाला इथे ?" अंतर्ज्ञानाने पुन्हा एकदा फटकारले. "अशी बेसुमार वाढ होत राहिली तर शहरावरचा ताण किती वाढेल ? मध्यंतरी पुण्याजवळ कुठेतरी जमीन देण्यावरून शेतकऱ्यांनी हिंसक संघर्ष केला म्हणे ?"
"हो. तसं झालं खरं."
"कठीण आहे. बरं, तुम्हांला पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल काय वाटतं ?"
हा तर गुगलीच होता. प्रत्यक्ष लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल मत विचारतायत ?
"जे मनापासून वाटतंय ते बोला. मी विचारतोय म्हणून दडपून जायचं काही कारण नाही." गर्जना झाली.
"अं ? ... हो ... हो ... म्हणजे तशी कल्पना छानच होती..." जीभ चावली आणि 'आहे' म्हणालो... पण आता जरा अवघड होत चाललंय.
"हं. तुम्ही देवळात जाता का ?"
"नाही." आम्ही जरा घाबरत पण खरं उत्तर दिलं.
"का ? देऊळ लांब आहे वाटतं घरापासून?" आमच्या शरीरयष्टीवर लोकमान्यांचा हा दुसरा शेरा होता.
"नाही. तसं नाही. देवावर भार टाकणं पटत नाही. आणि प्रतीकांमधे अडकलं की विचार खुंटतात असं वाटतं..."
"चांगलं आहे. बरं, गणेशोत्सवाचं अवघड होत चाललंय असं म्हणालात ते काय ?"
"अवघड म्हणजे मंडळांची संख्या भरमसाठ वाढलीय, त्यातून वाहतुकीची कोंडी वाढतेच आहे, लाऊडस्पीकरचे असह्य आवाज, विसर्जन मिरवणुकीतली अचकट विचकट गाणी आणि नाच हे सगळं बघवत नाही. गणपती संपले की नवरात्रीचा गोंगाट. शिवाय गणपतीच्या आधी गोकुळाष्टमीचा एक दिवसाचा त्रास असतोच."
"किती मंडळं आहेत ?"
"दोन हजाराच्या घरात."
"किती असावीत ?"
"पेठांप्रमाणे एक एक. इतरत्र वॉर्डप्रमाणे करता येऊ शकेल."
"हं. सार्वजनिक गणेशोत्सव मुळात आज योग्य आहे का ?"
हा प्रश्न भेदक होता. भारताने अणुकरारावर सही करावी का याचे उत्तर आम्ही एकवेळ देऊ शकलो असतो, पण हा प्रश्न खराखुरा स्फोटक होता. गणपती हा वास्तविक आवडता देव. आसमंतातील चिंता एका मोदकाबरोबर विसरायला लावणारा आणि अचपळ अंगाने सुंदर नर्तन करून आनंदाची प्रचिती देणारा हा दिलखुलास देव आम्हांला मनापासून आवडे. आम्ही भक्तिरसात कधीच डुंबू शकलो नसलो तरी. पण गणेशोत्सव ? गेली आठ दहा वर्षं आम्ही गणपती 'बघणं' सोडलं होतं. कुमारवयात पहाटे पाच पर्यंत घराबाहेर राहायची परवानगी मिळण्याचा एक दिवस म्हणून अनंत चतुर्दशीची आमच्या दप्तरी नोंद होती. शिवाय ‘गौरी’ बघण्याकडे जास्त कल. परंतु नंतर मात्र या उत्सवात अथर्वशीर्षाहूनही आयटेम साँगचे माहात्म्य जास्त आहे हे लक्षात येऊ लागले आणि आम्ही देवाची रजा घेतली.
आम्हांला गणपतीचे दिवस आठवले. नवरात्रीच्या रात्री आठवल्या. उत्सव या नावाखाली जे काही चालतं ते सगळं आठवलं आणि आम्ही ठामपणे म्हणालो "नाही. सार्वजनिक गणेशोत्सव योग्य 'होता' असं वाटतं. आजच्या गणेशोत्सवाचे स्वरूप योग्य नाही. इतरत्र खूप बदल झाले असताना उत्सवाच्या स्वरूपात बदल व्हायला हवा होता. तो झाला, पण चुकीचा. उत्सवातले भगवंताचे अधिष्ठान हरवले आणि तो विसर्जनापुरता उरला. उत्सव फक्त दहा दिवसांचाच असतो हे मान्य, पण त्यातून निपजणारी वृत्ती ही कायमची बनते. सार्वजनिक रस्ता कार्यक्रमांसाठी गृहीत धरला जाऊ लागला हे चूक. त्याविषयी कुणी काही बोललं तरी त्याला धर्मद्वेष्टा ठरवून टाकणं हे चूक. सार्वजनिक उत्सव ठीक आहे, पण सार्वजनिक जाणिवांचं काय ? आणि हे फक्त गणेशोत्सवालाच नाही तर सार्वजनिक त्रासांच्या सर्वच उत्सव-उपक्रमांना लागू होईल."
"इथपर्यंत कबूल केलंत याचा आनंद वाटला. तुम्ही चौथे आहात."
"म्हणजे?" नक्की ओपिनियन पोल.
"आत्तापर्यंत चाळीस एक जणांना थांबवून विचारलं. गणेशोत्सव योग्यच असा सरसकट निर्वाळा दिला सगळ्यांनी. तिघेजण फक्त विरुद्ध मत देऊ शकले. गप्प बसणारे नागरिक हा मोठा धोका वाटतो आम्हांला. तुम्ही गणेशोत्सवात जीव आणि ब्रेक मुठीत धरून गाड्या हाकता, नवरात्रीतही. वाहतूक नियंत्रक दिवे नसले, तरीही. आणि स्वयंशिस्तीबद्दल काय बोलायचं ? पुणे तिथे नागरिकशास्त्र उणे असं चित्र दिसतंय आम्हांला. शहरांची वाढ हा वेगळा प्रश्न आहेच. पण म्हणून बेशिस्त कशी खपेल ? तुम्ही सायकल तर विसरलेलेच दिसताय. पुण्यातल्या महाविद्यालयीन मुला-मुलींना सायकल वापरायची लाज कधीपासून वाटायला लागली ? आणि नोकरदारांना तरी काय हरकत आहे सायकल वापरायला ? बलसंवर्धन नाही, त्यामुळे दोन मैल सायकल चालवायची म्हटलं तरी त्या विचारानेच घाम फुटतो तुम्हांला. आणि मग आरोग्य मेळाव्यांना हजारोंनी हजेरी लावा! मध्यमवर्ग कायमच कोंडीत सापडलेला असतो, हे आम्हांला मान्य आहे. त्यामागे आर्थिक, सामाजिक पैलू आहेत. पण निरीक्षण नको ? बदलासाठी प्रयत्न नकोत ? कृत्रिमता कधीच चिरंतन नसते. वाहतूक असो की उत्सव, आटोपशीरपणा हवाच. आम्हांला तर असेही वाटून गेले की पाश्चिमात्यांचे क्लबात रात्रभर नाचणे बरे... किमान तिथे ढोंग तरी नाही. शिवाय बंद जागेमुळे इतरांना काहीच त्रास नाही. देवाच्या समोर आचरटासारखं नाचणाऱ्या मुलांचे काय भविष्य आहे ? जबाबदार नागरिक होता येईल असे कोणते गुण दिसतात त्यांच्यात ? आणि पुणे महानगरपालिका त्यांचं चौकाचौकात स्वागत करते ? आम्हांला एकदा जातीने महानगरपालिका आणि राजकीय पक्षांची चौकशी करायची आहे. आणि तुमच्या त्या दोन हजार मंडळांचीसुद्धा ! या सगळ्यांची डोकी ठिकाणावर आहेत ना हे तपासण्यासाठी..."
आम्ही भेदरून ऐकत होतो. लोकमान्य पुन्हा अवतरले तर ते स्वत:च्या हातांनी गणोशोत्सव बंद करायचं फर्मान काढतील याची आम्हांला खात्रीच पटली. तेवढ्यात पुन्हा त्यांचा आवाज ऐकू आला, "आम्ही निघतो आता. अभ्यासाची वेळ झालीय. तुम्हीही निघा. जमेल तेवढे प्रयत्न करीत रहा. आमचा गोपाळ म्हणायचा ते कधीकधी पटतं आम्हांला... लोकांत शहाणपणच नाही, तर ते स्वतंत्र होऊन काय दिवे लावणार ? असो..."
नमस्कार करून आम्ही निघालो. नारायण पेठेतून टिळक रस्त्यापर्यंत मेटाकुटीने आलो आणि टिळक स्मारक मंदिराच्या चौकातील वाहनांच्या कोंडीशी मुरारबाजीसारखे झुंजायाला लागलो. सिग्नल सुरू नव्हता. (याचे एक आम्हांला फार कौतुक आहे. ज्या पुण्यात आयटी तंत्रज्ञानाची डॉलरमय भरभराट झाली, त्या पुण्यात वाहतूक नियंत्रक दिव्यांचे 'प्रगत' तंत्रज्ञान अजूनही आलेले नाही. इंजिनिअरिंगच्या काही विद्यार्थ्यांनी हे 'प्रोजेक्ट' म्हणून करायला हरकत नाही - 'पुण्यातील कायम सुरू राहू शकणारे वाहतूक नियंत्रक दिवे !')
वाट काढत काढत घरच्या रस्त्याला लागताना आम्हांला लोकमान्यांशी झालेला संवाद आठवत होता. असं वाटून गेलं की 'प्रगत' माणसाचे प्रश्न कुठले असतील काही सांगता येत नाही. चालणं सोयीचं नाही म्हणून गाड्या आल्या. आता गाड्या आल्या तरी चालणं सोयीचं नाहीच. नैसर्गिक वाढीवर कदाचित आपला ताबा असू शकत नाही, पण माणसाने आरंभलेल्या वाढीवर माणसाचे नियंत्रण असू नये ?
त्या दिवशी संध्याकाळी आम्ही एक गोष्ट केली. गावात जाऊन एक नवी कोरी सायकल खरेदी केली. डोक्याचा त्रास वाचवायचा असेल तर हातापायांना थोडा त्रास दिला पाहिजे हे आमच्या लक्षात आलं होतं. गणेशोत्सव मंडळांशी कसं आणि काय़ बोलायचं याबाबत आम्ही लवकरच लोकमान्यांना पुन्हा भेटणार आहोत!
(प्रस्तुत लेखावर पु. ल. देशपांडे यांच्या 'लोकमान्य आणि आम्ही' या लेखाची छाप सहज दिसेल. तसे वाटल्यास आम्ही कुठलाही खुलासा करू शकणार नाही कारण ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे.)
(साप्ताहिक सकाळ, २८ जून २००८)