Friday, December 30, 2016

२०१६ : काही विस्कळीत नोंदी

'हजारों ख्वाहिशें ऐसी' या सुधीर मिश्रा दिग्दर्शित चित्रपटात अगदी सुरुवातीलाच एक स्वगत आहे. नक्षलवादी चळवळीतला एक कार्यकर्ता (जो या चित्रपटातल्या तीन प्रमुख व्यक्तिरेखांपैकी एक आहे) स्वतःच्या प्रेयसीशी पत्रातून बोलतो आहे. मोर्चा आणि आंदोलनाच्या दृश्यांच्या पार्श्वभूमीवर त्याचा आवाज आपण ऐकतो. तो स्वतःला आणि एकूणच त्याच्या कॉलेज-वर्तुळातल्या मित्रांना उद्देशून म्हणतो, ‘चळवळीत भाग घेतलेल्या काही विद्यार्थ्यांच्या कथा ऐकून मी स्तब्ध झालो. स्वतःबद्दल विचार करायला लागलो. आपण स्वतःला काय समजतो? थोडी रॅडिकल जारगन, थोडं राजकारण, थोडं रॉक अँड रोल - पण मुख्यत्वे शॉक व्हॅल्यू!’ चित्रपट पाहताना मी त्याच्या या मनोगतापाशी अडखळलो होतो. ‘हे वर्ष आपल्यासाठी कसं होतं?’ याचा विचार आज वर्षाखेरीस करताना हे मनोगत आठवून पुन्हा अडखळायला होतं आहे.

चार्ल्स डिकन्सच्या ‘अ टेल ऑफ टू सिटीज’ या गाजलेल्या कादंबरीतलं पहिलं विधान प्रसिद्ध आहे. ‘इट वॉज द बेस्ट ऑफ टाइम्स, इट वॉज द वर्स्ट ऑफ टाइम्स, इट वॉज द एज ऑफ विस्डम, इट वॉज द एज ऑफ फूलिशनेस...’ अशी त्या विधानाची सुरुवात आहे. मला हेच विधान ‘अ टेल ऑफ वन नेशन’ म्हणून भारताविषयी म्हणावं असं वाटतं. गेलं एकच वर्ष नव्हे, तर गेली दोन-तीन वर्षं हा देश सतत ढवळून निघतो आहे. केंद्रातलं सत्तांतर हा एक मुद्दा झाला, पण समाजमाध्यमांच्या ‘स्फोटा’मुळे, टीव्हीच्या अतिरेकामुळे, एकाच वेळी अभिव्यक्तीच्या होणाऱ्या स्वागतार्ह आणि भयावह लोकशाहीकरणामुळे आपण बहुधा कधी नव्हे अशा चालत्या-बोलत्या-गात्या-नाचत्या-हलत्या-वाहत्या समाजात राहतोय, तसंच कधी कुठल्या धारेबरोबर पुढे जातोय हे आपलं आपल्यालाच कळत नाहीये, असं काहीसं वाटतं.

‘मी कोण आहे? मी स्वतःला काय समजतो? आजच्या माध्यमबहुल काळात ‘शॉक व्हॅल्यू’ हे माझ्याही कृतीचं मुख्य अंग होऊ पाहतंय का?’ या प्रश्नांना सामोरं जाण्याचा प्रयत्न मी सध्या करतो आहे; गेल्या वर्षात करत होतो. अनेकांना अनेक टप्प्यांवर अस्तित्वविषयक प्रश्न पडत असतात. या प्रश्नांनी ज्यांचं विचारविश्व व्यापलं होतं, असे तत्त्वज्ञ, अभ्यासक, त्यांनी निर्माण केलेले विचारप्रवाह माणसाच्या आत्मचिंतनाची साक्ष देतात. माझं आत्मचिंतन (आणि आत्मपरीक्षण) मला काय सांगतं? मला हा प्रश्न फार महत्त्वाचा वाटायला लागला आहे.

आपण सगळे या पृथ्वी नामक ग्रहावरच्या निसर्गाचा, पृथ्वीवरच्या एका देशाचा, तिच्यावरच्या एका गावाचा-शहराचा, समूहाचा, कुटुंबाचा, सरमिसळ असलेल्या एका जाड्या-भरड्या, ‘फंक्शनल-डिसफंक्शनल’ (समृद्ध अडगळ!) संस्कृतीचा, एका राज्यव्यवस्थेचा, न्यायव्यवस्थेचा, जात-वर्ग-विचारव्यवस्थेचा, लिंगसापेक्ष घडणीचा, लिंगनिरपेक्ष वैचारिकतेचा, लवचीक नैतिकतेचा आणि आणखीही कशाकशाचा भाग असतो. यांमधल्या बऱ्याचशा व्यवस्थांचे आपण उपभोक्ते असतो. अर्थव्यवस्थेच्या महाकाय चक्रातला एक सांधा म्हणून ही अर्थव्यवस्था ‘चालवत’ही असतो (भांडवली अर्थव्यवस्थेचा भाग असलेला माणूस ती व्यवस्था ‘चालवल्याशिवाय’ जगूच शकत नाही). एकमेकांना अशा प्रकारे छेद देणाऱ्या वर्तुळांचा मी जेव्हा भाग असतो, तेव्हा माझी ‘भूमिका’ काय असावी? आणि एवढंच नव्हे, तर कुठल्या व्यवस्था-घटकाबाबत माझी काय भूमिका असायला हवी?

हे प्रश्न थोडे थकवणारे आहेत.

पण सृष्टी आणि समाजाचं तात्त्विक आकलन करून घ्यायच्या ओढीमध्ये आपल्याला व्यवस्था-घटकांबाबतच्या भूमिकेतून सुटता येत नाही. का सुटता येत नाही? किंवा का सुटू नये? याचं मला दिसणारं कारण म्हणजे, या अफाट विश्वात आपण माणूस म्हणून आपल्या वैचारिक आणि शारीरिक क्षमतेसह उभ्या असण्यामागे माणसाची महाकथा आहे, आणि आपण प्रत्येक जण या महाकथेत आपल्या नकळत योगदान देत असतो. त्यामुळे नैतिक दृष्टिकोनातून नव्हे, तर अगदी व्यवहारवादी दृष्टिकोनातूनदेखील आपली एक भूमिका असणं आवश्यक असतं.

आता पुढचा प्रश्न. भूमिका असणं पुरेसं आहे का? बिस्मार्कचं एक प्रसिद्ध वचन आहे – ‘एखादा मनुष्य जेव्हा एखादी गोष्ट तत्त्वतः मान्य करतो, तेव्हा ती अमलात आणण्यात त्याला काडीचाही रस नसतो.’ मी भूमिकेबाबत या ‘विचार-कृती’ द्वैताचा विचार करतो आहे. मी समतावादी असणं किंवा मी व्यक्तिस्वातंत्र्य मानणं एवढं पुरेसं आहे का? मी तत्त्वतः समतेचं तत्त्व मान्य केलं आहे, पण स्वतःच्या मर्यादेमुळे समतेच्या चळवळीत भाग घेऊ शकत नाही, हेही ठीक आहे; पण माझ्या ‘समता मान्य करण्याने’ मला समता म्हणजे काय हे समजतं का?

‘तत्त्वविचार’ बऱ्याचदा आपल्याला गप्प बसवतो. कारण तत्त्वविचार आपल्या समोरचे मार्ग ‘ब्लॉक’ करू शकतो. तत्त्वज्ञ कृती करायला धजावत नाही, कारण त्याला एकाच वेळी अनेक ‘परिणामस्वरूप शक्यता’ दिसत असतात. सरत्या वर्षातला माझा अनुभव, माझ्या विचारांच्या दिशांनी घेतलेली वळणं आणि कृतीच्या पातळीवर मला जाणवणारं अपुरेपण असं काय काय या परिणामस्वरूप शक्यतांशी जोडलेलं आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये मी फेसबुकवर काय काय लिहीत होतो; या वर्षीही लिहिलं. दीर्घ स्वरूपाचे लेखही लिहिले. आता थांबलो आहे. ३ सप्टेंबर २०१५ रोजी मी एक लेख लिहिला होता. घरी उदारमतवादी विचारांच्या सान्निध्यात वाढल्याने आणि बाहेर हिंदू पर्यावरणात वाढल्याने कट्टर हिंदुत्ववादाविषयी मनात असलेला राग, त्या तुलनेत मुस्लीम धर्माविषयीचं माझं तोकडं आकलन आणि त्यामुळे मुस्लीम धर्माची न केलेली चिकित्सा (यात एक भाग हिंदू समाज आपला वाटणं आणि जाणत्या वयात मुस्लीम समाजाशी मर्यादित संपर्क आल्याने मुस्लीम समाज काहीसा परका वाटणं हाही भाग आहे), पुरोगामी विचारविश्वातून इस्लामिक मूलतत्त्ववादाविषयी म्हणाव्या इतक्या ठळकपणे न उमटणाऱ्या प्रतिक्रिया अशा काही गोष्टींचा धांडोळा घ्यायचा मी प्रयत्न केला होता. त्यावरच्या चर्चेतून मला काही नवीन धागे मिळाले. पुढे मी काही हिंदुत्ववादी मंडळींशी प्रत्यक्षही बोललो. २०१६ मध्ये या विषयावर माझा बराच विचार झाला. ‘धर्मश्रद्धा’ हा विषय मला कायम चिकित्सेचा वाटत असला आणि संघटित धर्माशिवाय लोक एकत्र येऊ शकतात, त्यासाठी माणसांच्या मनात अस्तित्वविषयक आणि व्यवस्थाविषयक जिज्ञासा जागी असायला हवी असं मला वाटत असलं, तरी धर्मश्रद्धेने लोकांना प्रभावित केल्यामुळे त्याबाबत विचार तर करावाच लागतो. मला असं जाणवलं की, उजव्या विचारसरणीत परिवर्तनाच्या काही खुणा दिसत असल्या, तरी गेल्या काही वर्षांमध्ये उजव्या विचाराला मिळालेलं वाढतं पाठबळ आणि धर्मकेंद्री विचारपद्धतीमुळे आधुनिकेतचं (विचारातली आधुनिकता) आव्हान पेलण्यातील अडचणी, यामुळे हा परिवर्तनाचा प्रवास ऊर्ध्वगामी होण्यापेक्षा अधोगामीच होईल की काय अशी भीती वाटते. यातली मला दिसलेली एक महत्त्वाची बाब म्हणजे उजव्या विचारधारेचे धुरीण या विचारसरणीतल्या कच्च्या दुव्यांवर लक्ष देऊन ते बळकट करण्याऐवजी अजूनही परंपरा-श्रेष्ठत्वाला उजाळा देताना दिसतात. कार्यात्मक पातळीवर ते नव्याचा स्वीकार करतात, त्याचा प्रसारही करतात, पण धार्मिकतेमुळे मूळ वैचारिक बैठक काहीशी आक्रसलेलीच राहते. उजवा विचार स्वबळावर स्वतःची कक्षा वाढवू शकेल, का याबद्दल मला शंका वाटते. कारण हा विचार आज तरी धर्म, राष्ट्र अशा चौकटीमध्ये बंदिस्त आहे. ‘संथ गतीने परिवर्तनाकडे’ असं जरी त्याचं वर्णन केलं जात असलं (‘न्यू राईट’ हा शब्दप्रयोगही अलीकडे ऐकला), तरी त्याच्या अंगभूत क्षमतेविषयी मला प्रश्न आहेत. २०१६ मध्ये तरी त्या दूर झाल्या नाहीत.

माणसाच्या अस्तित्वाला काहीही प्रयोजन नाही; जगात दगड-धोंडे आहेत, तसाच माणूसही आहे, असं मानवी उत्क्रांतीचा अभ्यास सांगतो; पण तरीही माणसाबद्दलचे अनेकानेक प्रश्न अनुत्तरितही आहेत, विशेषतः मानवी जाणिवेविषयीचे. असं असलं तरी अस्तित्वाचा शोध घ्यायची उत्क्रान्तीची दिशा मला योग्य वाटते. ‘जाणीव’ हेदेखील कायमचं गूढ आहे, असं समजायचं कारण नाही. आपल्याला असं दिसेल की, पूर्वी जे प्रश्न तत्त्वज्ञानाचे होते, ते काळाच्या प्रवाहात विज्ञानाच्या कक्षेत आले आणि विज्ञानाने त्याला उत्तर दिलं. धर्म आणि देव यांसारख्या संकल्पनांचा आपल्यावरचा प्रभाव कमीकमी होत गेला आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. या संकल्पनांची प्रासंगिकता होतीच, अजूनही ती संपलेली नाही, पण सोळाव्या शतकातला श्रद्धावान आणि आजचा श्रद्धावान यांच्यात आपल्याला सहज फरक दिसेल. त्या वेळच्या श्रद्धावानापेक्षा आजचा श्रद्धावान जास्त तार्किक विचार करणारा आहे. सोळाव्या शतकातली पूजाअर्चा आणि आजची पूजाअर्चा यांच्यात फरक आहे. पूजाअर्चा ही प्रतीकात्मक आहे. त्यामुळे ती टाळता येऊ शकते, कमी-जास्त करता येऊ शकते, त्यात शॉर्टकट्स घेता येऊ शकतात हे आजचा श्रद्धावान मानतो आणि तसं करतोदेखील. आपण जर माणसाचा ऐतिहासिक प्रवास पाहिला, तर तो अज्ञानातून ज्ञानाकडे, धर्माकडून विज्ञानाकडे, गूढाकडून स्पष्टीकरणाकडे असाच आहे; धर्माचं स्थान कमीकमीच होत गेलं आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिकतेचा आग्रह धरणाऱ्या आणि धार्मिकतेला जवळजवळ 'इंडिस्पेन्सिबल' मानणाऱ्या उजव्या विचाराला समजून घेणं मला अवघड जातं.

आणखी एक मुद्दा. धार्मिकता आणि माणसाचा आत्मशोध यांच्यात मी फरक करतो. मोठ्याच्या मोठ्या समूहाला घालून दिलेली एक चौकट, माणसांनी ‘रुळावर’ राहावं म्हणून केलेले नियम या आधारे धर्माचं स्पष्टीकरण दिलं जातं. ते अगदीच चुकीचं नाही. माझी अडचण धर्माच्या प्रवासाबद्दल आहे. मागे एकदा मी पाचगणीजवळ एका अगदी लहानशा गावात गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती. काही बायका सार्वजनिक नळावर धुणी-भांडी करत होत्या. गावात एक मंदिर होतं. गाई-गुरं परत येत होती. त्या क्षणी माझ्या मनात विचार चमकला, ‘इथल्या जीवनाच्या संदर्भात मी माझ्याच देवा-धर्माविषयीच्या दृष्टीकोनाकडे कसं पाहतो? इथल्या माणसाच्या जीवनदृष्टीशी मला जोडून घ्यायचं असेल, तर मला इथे राहावं लागेल. तो जे काम करतो, ते करावं लागेल. इथल्या मंदिरात जावं लागेल. इथल्या पर्यावरणात देव आणि धर्म याला जे ‘डायमेंन्शन’ मिळतं, ते मला इथे राहिलो तरच मिळेल.’ असं असलं, तरी अशाच छोट्या खेड्यात काही शतकांपूर्वी जी कर्मकांडं केली जात होती, त्यांतली बरीचशी आज नाहीशी झालेली दिसतील; आधुनिकतेच्या खुणा दिसतील. मग भौतिक आधुनिकता आत्मसात केली गेली, तशीच वैचारिक आधुनिकता आत्मसात करणं अशक्य आहे, असं मानायचं कारण नाही. धार्मिकतेचं स्तोम कमी करून आत्मशोध सुरू ठेवणं शक्य आहे. त्यामुळे आर्थिक, सामाजिक व मानसिक स्थानातील भेद लक्षात घेऊनही प्रत्येकाचा प्रवास 'संघटित धर्मपालना'पासून 'संघटित धर्मचिकित्से'पर्यंत होऊ शकतो ही शक्यता अगदीच उडवून लावावी अशी नाही.

उजव्या विचारातल्या अपुरेपणाच्या पार्श्वभूमीवर पुरोगामी विचारविश्वावर आज जी टीका-टिप्पणी होते आहे, ती पूर्णपणे मोडीत न काढता त्यावर सुधारकी दृष्टीने (जी पुरोगामी विचारांचीच ठेव आहे) विचार करणंही गरजेचं आहे. संक्रमण काळातही आपण फक्त ‘रॅडिकल जारगन’ वापरतो आहोत का, शॉक व्हॅल्यूपुरतंच लिहीत-बोलत आहोत का हा विचार जरूर व्हावा. आज सार्वजनिक चर्चाविश्वात जे वातावरण दिसतं आहे, ते आश्वासक नाही. याचं एक मुख्य कारण म्हणजे, ‘पुरोगामित्व’ हीच मुळात काहीतरी संशयास्पद गोष्ट आहे, ती आपल्या समाजात ‘फिट’ होऊ शकणार नाही अशी समजूत पसरते आहे. ती धोकादायक आहे. दि.के.बेडेकर ‘मानव सान्त आहे’ असं म्हणतात. मानवी बुद्धी, मानवी मन, मानवी कर्तृत्व, मानवी समज या सगळ्याला मर्यादा असते. तिला त्यांनी ‘मानवी सांतत्व’ म्हटलं आहे; पण म्हणून मर्यादेची कक्षाच न विस्तारणं त्यांना मान्य नाही (धर्मश्रद्धा : एक पुनर्विचार - दि. के. बेडेकर, प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई). पुरोगामी विचार हा भक्कम विचार असेल, त्यात माणसाविषयी आस्था असेल तर या विचाराच्या पुरस्कर्त्यांनी गडबडून न जाता स्वतःच्या मार्गाची पुनर्रचना, नव्या मार्गाची आखणी यांवर भर दिला पाहिजे. दुसरं एक म्हणजे, आज विविध माध्यमांमधून ‘पुरोगामी-प्रतिगामी’, ‘उजवे-डावे’ असे शब्दप्रयोग सरसकट वापरून ध्रुवीकरण केलं जात असल्याने अनेक सूक्ष्म भेद (nuances) लक्षातच घेतले जात नाहीत; आणि हा गुंता सोडवायची मोठी जबाबदारी आजच्या अभ्यासक-विचारवंतांवर आहे. अनेक कळीच्या प्रश्नांवर देशभर कार्यरत असणारे पुरोगामी कार्यकर्ते माध्यमचर्चांमध्ये दुर्लक्षित राहतात आणि ‘पुरोगामी लोक’ म्हणून सरसकट टीकाटिप्पणी सुरू राहते. लोकशाही व्यवस्थेतल्या सुधारणेच्या जागा, निवडणूक प्रक्रियेतल्या सुधारणेच्या जागा, विकेंद्रीकरण, नैसर्गिक साधन-संपत्तीवरचा अधिकार अशा मूलभूत मुद्द्यांवर फारशा प्रभावीपणे चर्चा होत नाहीत. देव, धर्म असलं कुठलंही अधिष्ठान नसताना लोकांनी शासनव्यवस्थेच्या मूल्यमापनाच्या पद्धती विकसित करणं, स्वतःच्या प्रश्नांकरता, प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांकरता एकत्र येणं मला महत्त्वाचं वाटतं. समूहाने एकत्र येऊन समूहापुढचे प्रश्न सोडवणं; स्वशासनासारख्या दीर्घ पल्ल्याच्या, अवघड, पण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणं हे समूहाच्या उन्नतीचं लक्षण आहे; आणि समूहाच्या चर्चेत ‘स्वशासनच’ नाही, तर इतर अनेक मुद्दे येऊ शकतात. यात स्त्री-पुरुष-संबंध येतील; नैतिकता म्हणजे काय, समता म्हणजे काय, सामाजिक न्याय म्हणजे काय हे मुद्दे येतील; व्यक्तिस्वातंत्र्य आणि समूहजीवनातली अपरिहार्यता यांची सांगड कशी घालायची हा मुद्दा येईल... अनेक मुद्दे येतील. एकमेकांवरच्या आरोप-प्रत्यारोपांपेक्षा अशी चर्चा, वैचारिक घुसळण (मतभेदांसह) आज हवी आहे.

२०१६ मधल्या राजकीय-सामाजिकदृष्ट्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या घटनांबाबत भाष्य होतच राहील. ते व्हावंच. माझ्यासाठी हे वर्ष माझा आंतरिक प्रवास अधिक वेगाने सुरू होण्याचं वर्ष होतं. ‘ज्ञान अमर्याद आहे, जाणीव प्रवाही आहे आणि त्यामुळे आपण कायमच प्रवासात असणार आहोत’ हे या वर्षातलं माझं मुख्य शिक्षण होतं!

(अक्षरनामा, ३० डिसेंबर २०१६) 

Thursday, October 20, 2016

‘मिळून सार्‍याजणी’तले दिवस

मिळून सार्‍याजणीच्या कार्यालयात मी पहिल्यांदा गेलो तो दिवस कोणता होता, विद्याताईंना प्रथम कधी भेटलो हे खरं तर आठवत नाही. पण मिळून सार्‍याजणीशी मी जोडला गेलो त्याला गीतालीताईंशी झालेली ओळख आणि त्यांच्या घरी होणार्‍या पुरुष उवाचगटाच्या बैठका कारण ठरल्या. मागे वळून बघण्याइतकं माझं वय झालेलं नसलं तरी मागे काहीतरी आहे याची जाणीव व्हावी अशा टप्प्यावर मी आहे. दुसरं म्हणजे मिळून सार्‍याजणीहा माझ्यासाठी प्रेमाचा विषय आहे. मी चांगलाच भटक्या वृत्तीचा होतो (आणि आहे), त्यामुळे कॉलेज सोडल्यापासून अनेक नोकर्‍याही सोडल्या. पंधरा-वीस वर्षांच्या काळात आठ-दहा नोकर्‍या करणारा मनुष्य कुठल्याही कंपनीच्या दृष्टीने फारशा गंभीरपणे घेण्यासारखा विषय असू शकत नाही. पण मीदेखील नोकरीला मर्यादित गंभीरपणेच घेतल्याने उभयपक्षी सामंजस्य होतं. मात्र मिळून सार्‍याजणीत्याला अपवाद ठरलं.  आणि त्याचं खरं कारण हेच की तिथे मी फक्त नोकरी केली नाही!

काही माणसांनी एकत्र येऊन काही काम करणं ही मौजेची गोष्ट असते. मग ती अगदी पाच-दहा माणसांची छोटी कंपनी असो की टाटा-इन्फोसिससारख्या अजस्त्र कंपन्या असोत. एकटा माणूससुद्धा जिथे स्वत:शी आतल्या आत भांडत असतो तिथे दुसरा आला किंवा पन्नासावा आला तर काय होत असेल याची कल्पना करता येईल. माझ्यासारख्या मुळातल्या स्वप्नाळू मनुष्याला कामातल्या औपचारिक भागापेक्षा कामाचा गाभा जास्त आकर्षित करतो. म्हणजे महिन्याचा अंक पोस्टाने रवाना करण्यात अनेक तांत्रिक गोष्टी गुंतलेल्या असतात आणि त्या आवश्यकही आहेत, महत्त्वाच्या आहेत. पण मुख्य प्रश्‍न, आस्थेचे प्रश्‍न हे की आपण हे मासिक का काढतोय? आपला जीव यात गुंतला आहे ना? आपण जे बोलतोय, लिहितोय ते योग्य आहे ना?आपल्याला स्वत:चं परीक्षण करायला हवंय का? कुठल्याही संस्थेच्या - मग ती मिळून सार्‍याजणीअसो किंवा एखादी बँक असो, आयटी कंपनी असो की चहाचं दुकान असो, हे गाभ्याचे प्रश्‍न सर्वात महत्त्वाचे असतात आणि 'मिळून सार्‍याजणी'त मला या गाभ्याच्या प्रश्‍नांना भिडता आलं, चर्चा करता आली म्हणून मी तिथे फार रमलो. एवढंच नाही, तर आज तिथे नसतानाही '‘हे आपलं मासिकआहे ही जाणीव जागी आहे. विद्याताई किंवा गीतालीताई माझ्या इतर कंपन्यांमधल्या बॉससारख्या असत्या तर कदाचित मी वर्षभरातच बाहेर पडलो असतो. (अर्थात त्या बॉसनव्हत्या असंही नाही. पण बॉसकडे स्वत:ला आवडतं किंवा नावडतं करून घ्यायचं कौशल्य असतं. त्यांनी स्वत:ला आवडतंकरून घेतलं हे त्यांच यश आहे!)

अभ्यास, करियर, सिनेमा, नाटक, सामाजिक प्रश्नसेक्स, प्रेम, आकर्षण अशा बर्‍याच गोष्टींचा एकत्र गुंता जेव्हा मेंदू काबीज करून बसलेला असतो त्या वयात मी पुरुष उवाचच्या संपर्कात आलो. तिथल्या चर्चांमधून मला मानसिक पातळीवर बरंच मोकळं होता आलं. स्त्री-पुरुष संबंध, लैंगिकता हे माझे आस्थाविषय होते आणि त्यावर बोलण्यासाठी मला एक व्यासपीठ मिळालं. आपल्यासारखेच प्रश्‍न पडणारे काहीजण आहेत आणि ते उत्तरांचा शोध घ्यायचा गांभीर्याने प्रयत्न करतायत ही माझ्यासाठी एक आनंददायक गोष्ट होती. शिवाय तिथे केवळ स्त्री-पुरुष संबंधच नव्हे, तर इतर अनेक सामाजिक प्रश्‍नांवर चर्चा होत असत आणि त्यातून मला बरंच शिकायला मिळालं. रा.प. नेने, राम बापट अशा मजबूत लोकांना मी प्रथम ऐकलं ते पुरुष उवाचच्या अभ्यासवर्गात. या गटाच्या बैठकांमध्ये ओघानेच मिळून सार्‍याजणीचाही विषय निघे. विद्याताईदेखील अभ्यासवर्गांना येत असत. मी त्यावेळी जाहिरात क्षेत्रात काम करत होतो. मिळून सार्‍याजणीच्या कार्यालयात याच दिवसात प्रथम गेलो. साधार २००३-०४ च्या सुमारास. त्या वेळेला थोडंसं लिहायलाही लागलो होतो. पण लेखन प्रक्रिया, संपादन, मासिकांची कार्यपद्धती याबाबत अगदीच अनभिज्ञ होतो. मला वाटतं मिळून सार्‍याजणीत गेलो तो मी लिहिलेल्या लेखासंदर्भातच. कधी छापून येईल?’ हा लेखकाचा आवडता प्रश्‍न विचारायला. (आपण लिहिलेलं लगेच छापून येत नाही हा शोधही तेव्हाच लागला.) पुढे मग संपर्क वाढला. संपादकीय विभागात थोडं साहाय्य करु लागलो. आणि मला एकदम जाणवलं की धिस इज व्हेअर आय बिलाँग! लेख, संपादन, संस्करण, चर्चा, विषयांची निवड, अंकाचं स्वरूप यात आपण रमतोयआपल्याला हे जमतंय आणि यात आपण काहीतरी चांगला काम करू शकू असं आपल्याला वाटतंय ही जाणीव तीव्र झाली. मग हळूहळू काम करत गेलो. संपादकीय विभाग तर माझं आवडीचं ठिकाण होतंच, पण व्यवस्थापक सुहासिनी जोशी यांनी काम सोडायचं ठरवल्यावर मी व्यवस्थापक म्हणूनही काम केलं. हातून काही चांगलं लिहिलं गेल्याच्या आनंदाइतकाच जमाखर्चाचा ताळमेळ बसल्यावर होणारा आनंदही लक्षणीय असतो हे व्यवस्थापक म्हणून काम करताना लक्षात आलं. मुख्य म्हणजे मासिक चालवायच्या व्यावहारिक बाजूंची ओळख झाली.  

मी काम करू लागलो तेव्हा गीतालीताई संपादक म्हणून काम पाहू लागल्या होत्या. विद्याताईंचा सहभागही होताच, पण थोड्या प्रमाणात. विद्याताईंच्या मुख्य संपादकीय कारकीर्दीत मी काम केलं नाही, पण तरीही आम्ही एकत्र काम केलंच. मासिकाशी संबंधित असलो तरी पूर्ण वेळ फक्त मासिकासाठी काम केलं ते तीन-चार वर्षं. २०११ सालच्या दिवाळी अंकात वेश्याव्यवसायावर चर्चा करणारा विशेष विभाग होता. त्याचं संपादन मी केलं होतं. स्वतंत्रपणे संपादनाची जबाबदारी मी पहिल्यांदा उचलली ती या विभागाच्या वेळी. पुढे २०१४ च्या दिवाळी अंकापर्यंत काम केलं आणि मग थांबलो. 

या काळात काळाबरोबर माझ्यातही बदल झाले. दृष्टीकोन विस्तारला. कितीतरी लोकांशी परिचय झाला. पुष्पा भावे, छाया दातार, मंगला सामंत, वंदना भागवत, विद्युत भागवत, मिलिंद बोकील, प्रतिमा परदेशी, मंगला गोडबोले, मनीषा गुप्ते, मीना सेषू, रजिया पटेल, लता प्र. म., शुभदा देशमुख, सतीश गोगूलवार आणि इतरही अनेक. हा प्रामुख्याने वैचारिक विश्वातला संचार होता. शिवाय एकाला टक्कर देणारं दुसरं विश्वही मला इथे पाहायला मिळालं. समाजविचारातील बारकाबेफरक लक्षात आले. सामाजिक क्षेत्रात काम करतानाची आव्हाने समजली. विशीतला कम्युनिस्ट चाळिशीत भांडवलशहा होतो असं म्हणतात. विशीतला मी - जो फेमिनिस्ट/कम्युनिस्ट होतो तो आज चाळिसाव्या वर्षी फेमिनिस्ट/कम्युनिस्ट आहे का?

हा प्रश्‍न गहन आहे! आणि खरं तर वेगवेगळ्या शाखांमधून विस्तारत जाणार्‍या उत्तराचा आहे. आज विचार करताना हे जाणवतं की आपण एखादा दृष्टीकोन स्वीकारतो त्याला जगात एक नाव किंवा प्रचलित भाषेत 'लेबल' तयार असतं. आपणही ते लावून घेतो. कारण आपण त्या दृष्टीकोनाचे आग्रही असतो. त्यात फार काही गैर आहे असंही नाही. पण माणूस आणि जीवन हे जर व्यामिश्र आहे तर विचारधारा एका लेबलाच्या मर्यादेत सामावू शकते का? किंवा मी एका विचाराचा आग्रह धरला की मी त्या विचाराचा 'वादी' होतो का?     

एक गोष्ट स्पष्ट आहे की स्त्रीवाद, डावा विचार, विद्रोही विचार ही एक भूमिका असली आणि भूमिका, विचारधारा नैसर्गिक सत्यसांगत नसल्या तरी त्या भूमिका घेणं, विचारधारा स्वीकारणं आवश्यक असतं याबाबतही माझ्या मनात संदेह नाही. कारण नैसर्गिक सत्य जे आहे ते आहेच, पण माणूस म्हणून, समाज म्हणून आपण निसर्गाशी सुरू असलेल्या संघर्षाची धार कमी करायचा प्रयत्न करत असतो. निसर्गात स्त्री आहे, स्त्रीवाद नाही. निसर्गात विविधता आहे, समता नाही. निसर्ग एकात्म असेल, पण ती योजनाबद्ध एकात्मता नाही. मुळात निसर्ग फक्त असतो’. तो चांगलाकिंवा वाईटनसतो. ही वस्तुस्थिती आहे. पण माणसाने निसर्गात हस्तक्षेप केला आहे, करतो आहे हीदेखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या हस्तक्षेपाबरोबरच मूल्य जाणिवेचे प्रश्‍नही उभे राहणारच आणि आपण त्याला सामोरं गेलंच पाहिजे. 

स्त्री ही स्वतंत्र व्यक्ती आहे, तिला स्वतंत्र इच्छा-आकांक्षा-राग-लोभ-विचार-विकार आहेत आणि त्या सगळ्यासह तिला माणूसम्हणून जगण्याचा हक्क आहे हा विचार आपण सगळेच आज मान्य करतो आहोत आणि त्याचं प्रतिबिंब आजच्या स्त्रीजीवनात पडतानाही दिसतं आहे.. पण या बदलाची गती मंद आहे आणि अलीकडे स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये झालेली वाढ अर्थातच चिंताजनक आहे. मिळून सार्‍याजणीमध्ये काम करत असताना माझा माणूसम्हणून असलेला दृष्टिकोन आणि पुरुषम्हणूनचा लिंगसापेक्ष दृष्टिकोन यातील संघर्षही मला अनुभवता आला. स्त्रियांनी आणि पुरुषांनी परस्परांशी संवाद साधणेहे मासिकाचं उद्दिष्ट आहे आणि स्त्रीप्रश्‍न हाताळत असताना पुरुषांचं प्रबोधन करणं, प्रसंगी त्यांना समजून घेणं गरजेचं आहे ही जाण विद्याताई आणि गीतालीताई दोघींमध्ये आहे. स्त्रीप्रश्‍नाबाबत विचार करताना मी पुरुषाची लैंगिक जडणघडण (जी नैसर्गिक उर्मी आणि सामाजिक संस्कार या दोन्हीच्या मिश्रणातून तयार होते) या विषयावर बराच विचार करतो. या विषयावर मी थोडंफार लिहिलंही आहे. मिळून सार्‍याजणीमध्ये काम करत असताना मी या मुद्यावर स्त्रीवादी न्वहे तर जीवशास्त्रीय दृष्टीने काही मांडायचा प्रयत्न केला आणि मला ती मोकळीक मिळाली हे आवर्जून नोंदवतो. 

मिळून सार्‍याजणीहे स्त्री चळवळीचं मुखपत्र नसलं तरी अनेक एकट्या-दुकट्या जणींचं ते मुखपत्र आहे. विद्याताईंच्या पिढीच्या मानाने माझ्या पिढीत सिनिसिझमथोडा जास्त आहे. ह्याने काय होणार? हे कशाला करायचं?’ असा विचार आम्ही जरा जास्त करतो. आणि मग काही न करणंच बरं आहे या निष्कर्षाला येतो! पण सार्‍याजणीला येणाऱ्या पत्रांनी मला सिनिसिझम झटकायला बरीच मदत केली. एखाद्या छोट्या गावातल्या बाईने लिहिलेला तिचा अनुभव, तिच्या विचारात झालेला बदल वाचताना मला अगदी आध्यात्मिक पातळीवरचं जोडलेपण जाणवलेलं आहे. आपण मिळून सार्‍याजणीसारख्या मासिकात काम करतोय हे महत्त्वाचं आहे, आपण हे करायला हवं, यात आपल्या क्षमतांची सार्थकता आहे असं मला वाटलेलं आहे. दोन वर्षापूर्वी मी काम थांबवलं त्याचं एक कारण कामातलं साचलेपण हे होतं हे खरं आहे, पण तो माझा  व्यक्तिगत निर्णय होता. मिळून सार्‍याजणीसारखं मासिक चालू असणं, त्याची आवश्यकता याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही. 

मराठीतली बरीचशी नियतकालिकं आणि मिळून सार्‍याजणी यातला एक प्रमुख फरक असा की हे सर्वसमावेशक मासिक आहे. म्हणजे मुक्त शब्दचे किंवा अनुभवचे संपादकीय निकष जितके कठोर असतील तितके ते मिळून सार्‍याजणीचे नसतील. पण सर्वसमावेशक असूनसुद्धा या मासिकाने सर्वसामान्यांची अभिव्यक्ती आणि वैचारिक मांडणी यात चांगला समतोल साधला आहे. संपादकीय विभागात मतभिन्नता होतेच (आणि ती झाली तरच मजाही असते), तशी ती इथेही व्हायची. आणि मग क्वचित प्रसंगी मौजेच्या भागवतपंथाची पुस्तके वाचत मोठे झालेले माझे जीन्स उफाळून यायचे.  त्यावर मग ‘पण आपल्याला सहभागासाठी या लेखाला स्थान द्यायला हवं असं गीतालीताई म्हणाल्या की मी शांत व्हायचो. साहित्य, साहित्याचा दर्जा, वाङ्मयीन मूल्यांची कुस्ती हे एकीकडे रोचक असतं तर एकीकडे थोडं दमवणारंही असतं. 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक साहित्य आणि सामाजिक चळवळ अशा दोन्ही आघाड्या सांभाळणारं मासिक असल्याने (आणि विद्रोहाकडे झुकणारं असलं तरी मासिकाचं कार्यालय कर्वे रोड, प्रभात रोडला लागून असल्याने) ते एकांगी झालेलं नाही. भारतात काँग्रेसचं जे स्थान आहे ते बहुधा मराठी मासिकांमध्ये ‘मिळून सार्‍याजणीचं आहे!

मिळून सार्‍याजणीहे अर्थातच मुख्यत्वे स्त्रियांचं जग आहे. संपादकीय विभागात बर्‍यापैकी काम केलेला मी एकटाच पुरुष. मला याबाबत थोडं सांगायचं आहे. काय होतं की आपण सगळे माणूसआहोत हे तर झालंचपण आपल्यातल्या या पहिल्या ओळखीनंतरची दुसरी ओळख म्हणजे आपल्यातला लिंगभाव. त्यामुळे सूक्ष्मातिसूक्ष्म रुपात, समोरची व्यक्ती स्त्री असेल तर मी त्या व्यक्तीची नोंद स्त्रीम्हणून घेतोच. त्याने माझ्या वर्तनात काही प्रचंड फरक वगैरे पडत नाही, पण ही नोंद घेतली जाते खरी. हेच उलटीकडूनही होत असेल. मिळून सार्‍याजणीया मासिकाकडे मी ओढला गेलो याचं मुख्य कारण हे चर्चा करणारं मासिक आहे. मुळात मी पत्रकारितेतला नव्हतोच. पत्रकारितेत करिअर करणं हे माझं ध्येयही नव्हतं. मला भरपूर चर्चा करायची होती. ही चर्चा करता येईल म्हणून मी मिळून सार्‍याजणीत दाखल झालो आणि इथे मला असं लक्षात आलं की हे ‘स्त्रियांचं मासिककिंवा स्त्रियांनी चालवलेलं मासिकअसलं तरी माझी ती सूक्ष्मातिसूक्ष्म पातळीवरची नोंद बहुधा मागे पडतेय. कारण इथे मी ज्या स्त्रियांच्या संपर्कात आलो त्या विचार करणार्‍या स्त्रिया होत्या. स्त्रियांसाठीच्या म्हणून मासिकामध्ये मिळून सार्‍याजणीउठून दिसतं आणि माझ्यासारख्याला ते आकर्षित करतं कारण एका अर्थी हे स्त्रियांचं मासिक असलं तरी ते पारंपरिक स्त्रीत्वापासून मुक्त झालेलं आहे. 

पण याचबरोबर दुसरीही एक बाजू मांडतो. ही बाजू वरच्या मांडणीला छेद देणारी आहे. स्त्रीवाद, स्त्री लिखित साहित्य, स्त्री प्रश्‍न, स्त्री जाणीव असं म्हटल्याने स्त्री ही स्त्रीचं राहणार आहे असं काहीसं अधोरेखित होतं का? सांगता येत नाही. कदाचित ही विशिष्ट ओळख पूर्ण पुसली जाईल तो काळाचा टप्पा अजून बराच लांब आहे. तो कधी येईल, येईल का हे माहीत नाही. पण इतिहास-वर्तमानाच्या ओझ्यामुळे आज तरी स्त्रीला स्त्रीम्हणून स्वतंत्र ओळख ठेवावी लागतेय. माझ्या विचारांच्या प्रवासात एक टप्पा असा आला की जिथे मला या सततच्या द्वैताचं काहीसं ओझं वाटू लागलं. आपण आता लिंगसापेक्षतेच्या सीमा ओलांडून एका शांत प्रदेशात आलोय (निदान आपल्याला आत्ता तरी असं वाटतंय), मग आता आपण इथेच थांबावं असं वाटू लागलं. याचा अर्थ स्त्रीवाद अप्रासंगिक झालेला नाही. पण आपल्या अंगभूत गुणांमुळे किंवा दुर्गुणांमुळे आपण या कक्षेत फार काळ राहू शकणार नाही असं मला वाटू लागलं. 

आणि अशा वेळी तर मला एका निष्ठेने, पंचवीस वर्षांहून अधिक काळ काम करणार्‍या विद्याताईंसारख्यांचं अधिकच कौतुक वाटतं. वंदना भागवत एकदा बोलताना म्हणाल्या होत्या की परिवर्तनाचा विचार करणारे आपण संस्थात्मक उभारणीकडे फार दुर्लक्ष करतो. तिथे मिळून सार्‍याजणी, नारी समता मंच अशा संस्थांचं महत्त्व कळू लागतं. आज स्त्रीवाद म्हणजे काय? स्त्री प्रश्‍न काय आहेत? यातले गुंते काय आहेत? असे प्रश्‍न पडणार्‍या कुणालाही मी या मासिकाकडे पाठवू शकतो. (कुणास ठाऊक, कदाचित मीदेखील काही दिवसांनी पुन्हा इथेच येईन!)

मिळून सार्‍याजणीचं कार्यालय हे माझ्यासाठी कार्यालय नसून हक्काचं, गप्पा मारायचं ठिकाण आहे. संपादकीय विभागात कधीही गेलो तरी मला अ‍ॅट होमवाटतं. गीतालीताई, विद्याताई दोघींनीही मला, माझ्या बडबडीला सहन केलं आहे. त्यांच्याविषयी कधीतरी स्वतंत्रपणेच लिहायला हवं. मिळून सार्‍याजणीतल्या मानसी घाणेकर यांचा उल्लेख न करता मला पुढे जाणं शक्यच नाही. वयाने थोड्या मोठ्या, पण विचाराने माझ्या जातकुळीच्या मानसीताई म्हणजे मिळून साऱ्याजणीच्या इतिहासातलं एक  प्रकरण आहे. मी कधी व्यक्तीचित्रं रेखाटण्याचा प्रयत्न केला तर त्यात मानसी घाणेकर नक्की असतील! 

सहानुभूतीया शब्दाबाबत पुलंनी एके ठिकाणी चांगलं लिहिलं आहे. ते लिहितात, सहानुभूती या शब्दात कारुण्याचे, दयेचे चार थेंब कुणी आणून टाकले आहेत कुणास ठाऊक? वास्तविक ती सह-अनुभूती आहे. जे तुला जाणवतंय, वाटतंय ते मी जाणून घ्यायचा प्रयत्न करणं, तो अनुभव घ्यायचा प्रयत्न करणं असा त्याचा अर्थ आहे. तुझ्या मनाजवळ यायचा प्रयत्न करणं म्हणजे सहानुभूती. ही सह-अनुभूती मला मिळून सार्‍याजणीनं दिली. स्त्रियांचं हे विश्‍व बघताना मी उदास झालो आहे, हताश झालो आहे, विचारात पडलो आहे, गोंधळातही पडलो आहे. पण या उलथापालथीनंच मला पुष्कळ काही दिलं आहे. मी वर म्हटलं तसा आज मी शांत झालो असेन कदाचित, स्थिर झालो असेन, पण ती दृष्टी येण्याकरताचा माझा व्यायाम इथे घडला आहे. जीवनातल्या कुठल्याही क्षेत्रात मला वैचारिकता फार महत्त्वाची वाटते. पण वैचारिकतेची पूर्वअट संवेदना, सहानुभूती ही असते. ही संवेदना मी सार्‍याजणीत अनुभवली. त्यामुळे माझ्या अंतरातल्या माझ्याच विविध ओळखींपैकी 'साऱ्याजणीच्या टीममधला एक सदस्यही एक ओळख मला समाधान देणारी आहे. या लेखाला 'मिळून साऱ्याजणीतले दिवस' असं शीर्षक जरी मी दिलेलं असलं तरी ते शीर्षक मी प्रत्यक्ष 'साऱ्याजणी'त काम न करण्यापुरतंच मर्यादित आहे. बाकी मी आज जगात वावरणारा 'साऱ्याजणी'तलाच एकजण आहे!               

मिळून साऱ्याजणी (दिवाळी २०१६)  
x

Monday, October 10, 2016

गांधीवादात दडलेले ‘आदर्श’ पुरोगामित्व

२ ऑक्टोबर २०१६ च्या 'लोकरंग'मधील राजीव साने यांचा 'गांधीवादात दडलेले संघीय प्रतिगामित्व' हा लेख वाचला. राजीव साने अभ्यासू आहेत आणि त्यांच्या विश्लेषक विचारपद्धतीविषयी मला आदर आहे. अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान आणि विविध सामाजिक मुद्दे यावरील त्यांच्या मांडणीतून बरेचदा मला स्पष्टता आली आहे हे प्रारंभीच नोंदवतो. संकल्पनांना व्याख्यारूप द्यायचा त्यांचा प्रयत्नही मला स्पृहणीय वाटतो. पण हा लेख वाचून मात्र आश्चर्य वाटले. सान्यांसारख्या अभ्यासकानेच हा लेख लिहिला आहे ना अशी शंका आली. 

साने यांनी लेखात अनेक सुटे मुद्दे घेतले आहेत. त्यात गांधीजींच्या मनातील अंधश्रद्धा, लैंगिकतेबाबतची त्यांची मते, ब्रह्मचर्याचा आग्रह, त्यांनी संसदेला वेश्या आणि वांझ म्हणणे, ग्रामस्वराज्य, स्वावलंबन अशा विविध गोष्टींचा उल्लेख येतो. मला स्वतःला गांधीजींनी संसदेला वेश्या आणि वांझ म्हणणे अजिबात पटलेले नाही. पण त्यांची जी विधानं टोकाची वाटतात, जे शब्द त्यांनी उच्चारले ते शब्द धरून संपूर्ण गांधी समजून घेता येतात का हा प्रश्न आहे आणि तसे ते समजून घेता येत नाहीत हे त्याचं उत्तर आहे. त्यांनी काहीही म्हटलं तरी ते क्षम्य मानायचं असा माझा बिलकुल आग्रह नाही, पण एका गोष्टीची नोंद आपण घेतली पाहिजे. आपलं मानस घडवणारं सांस्कृतिक पर्यावरण बदलत असतं. सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीचं पर्यावरण आणि आत्ताचं पर्यावरण यात फरक आहे. त्यात पुन्हा भारतीय पर्यावरण कमालीचं संमिश्र आहे. आणि म्हणून त्यावेळी आपले नेते काय बोलले, त्यांची टिप्पणी काय होती यावर आज विचार करायला हरकत नाही, पण त्याचबरोबर या नेत्यांचं मानस कसं घडलं होतं हाही विचार करावा. य. दि. फडके यांनी 'खरी ही न्यायाची रीती' या पुस्तकात सवर्ण-बहुजन संघर्षासंदर्भात एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या वर्षांमधले 'केसरी'तील काही उतारे उद्धृत केले आहेत. त्यातून 'केसरी'कारांचा 'प्रतिगामी'पणा दिसतो. पण ती उद्धृते वाचताना तो काळ लक्षात घेतला तर असा विचार तेव्हा होत होता आणि त्याचं मूल्यनिर्णयन आज करताना काळ्या-पांढऱ्या रंगात करता येईल का यावर विचार करावा लागतो. (या दृष्टीने य.दि. फडके यांचेच 'व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक वाचण्याजोगे आहे.)                

साने आश्रमातील मुलीच्या केशवपनाचे उदाहरण देतात. केशवपन करणे टोकाचे आहे हे मान्य. पण शाकाहाराचा आग्रह धरणाऱ्या गांधींजींनी खान अब्दुल गफारखान यांना आश्रमात मांसाहार करण्याची अनुमती दिली होती. त्याला काय म्हणणार? गांधींमध्ये जी संमिश्रता दिसते त्याला  देता येत नाही. 'हिंद स्वराज' या पुस्तकातील मांडणीविषयी भरपूर चर्चा झालेली आहे, होतही असते. इथे सविस्तर लिहिणं शक्य नाही, पण वृत्तपत्रातील लेखातून या पुस्तकावर काही प्रतिक्रिया देणं इष्ट नाही एवढं नोंदवतो. शांतपणे वाचावे, मनन करावे असं हे पुस्तक आहे. गांधीजींची त्यातील मते अनेकांना टोकाची वाटतात, पण मुळात गांधीजी कायमच आदर्श जीवनशैलीचा वेध घेत आले होते. जगण्यातला आदर्श काय आहे याचा ते शोध घेत होते आणि त्यामुळे त्यांचे प्रयत्न माणसाची नैतिक उंची वाढवण्याकडे झुकलेले होते. त्यांना ज्या विश्वाचा ध्यास होता ते विश्व सर्वसामान्यांकरता आणि मानवी घडण व सर्वसामान्य आकांक्षा डोळ्यापुढे ठेवून अर्थशास्त्रीय विचार मांडणाऱ्या अर्थतज्ज्ञ मंडळींकरता दुर्बोध आणि अव्यवहार्य वाटणे स्वाभाविक आहे. राजीव साने अर्थशास्त्र उत्तम जाणतात, पण गांधीजींची मांडणीच मुळात त्यांनी स्वतः विकसित केलेल्या नीतीशास्त्रावर आधारलेली होती. त्यात राजीव सानेंना व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा, भौतिक प्रगतीचा संकोच झालेला दिसतो. गांधीजी व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या किंवा भौतिक प्रगतीच्या विरुद्ध नव्हते, पण त्यांचा भर साध्यसाधन विवेकावर होता आणि अर्थशास्त्र पेलू शकणार नाही इतका तो वजनदार होता. त्यांची रेल्वेविरुद्धची मते साने यांनी उद्धृत केली आहेत, पण गांधीजींनी रेल्वेविरुद्ध कधी आंदोलन सुरू केले नाही हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी यंत्राबद्दल त्यांची मते मांडली, पण त्यांनी कारखाने बंद करायची चळवळ चालवली नाही. मला एक प्रश्न राहून राहून पडतो तो हा की गांधींनी ज्या 'अव्यवहार्य', 'प्रगतीला मारक' कल्पना मांडल्या त्यातली एकही कल्पना टिकलेली नसताना, त्यांच्या सर्व नैतिक आदर्शांचा भारतीय जनतेने पराभव केलेला असताना गांधीजींसारख्या माणसाची अर्थशास्त्रातील जाणकार असलेल्या सानेंना किंवा इतरांना भीती का वाटावी? किंवा त्याबाबत त्यांच्या हत्येनंतर अडुसष्ठ वर्षांनी त्यांच्या जन्मदिनीच त्याचा विचार करावा असं त्यांना का वाटावं?    

साने लिहितात, 'अहिंसेचे तत्त्व मनुष्यांपुरते अंगिकारले जायलाही वेळ लागणार आहे. ते घडायच्या आधीच इतर जीवांनाही ते तत्त्व लागू करता येण्याइतकी नैतिक उन्नती आणि तांत्रिक प्रगती अद्याप झालेली नाही.' याचा अर्थ हा की माणूस अजूनही इतर माणसांबाबत पूर्णपणे अहिंसक झालेला नाही तर मग तो इतर प्राण्यांबाबत अहिंसक कसा होईल? ( 'इतर जीवांनाही' हे म्हणताना सानेंना माणूस आणि इतर जीव अभिप्रेत असावेत. वाघाने अहिंसक होऊन गवत खाणे त्यांना अभिप्रेत नसावे. कारण गांधींनाही वाघाने गवतच खावे असे वाटत नव्हते.)  साने पुढे लिहितात, 'उद्या एखादे उच्च तंत्र सापडून कदाचित आपण प्रत्येक अन्नघटक सिंथेसाइजही करू शकू. अरेच्चा! पण मग ते जैव राहणार नाही'. हे बरोबर आहे. पण पुढे ते लिहितात. 'आपल्याला सगळे काही जैव हवे; आणि ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हे मात्र निषिद्ध!' यात गडबड आहे. 'जीवो जीवस्य जीवनम' हे एका सजीवाने दुसऱ्या सजीवाला खाऊन जगणे याअर्थी म्हटले आहे. पण शाकाहाराच्या निर्मितीत, शाकाहारी पद्धतीत हा मुद्दा येतोच कुठे? 'जीवो जीवस्य जीवनम' हे फक्त माणसासाठी नको असे गांधीजींचे म्हणणे होते. वर म्हटले तसे वाघाने अहिंसक व्हावे असे ते म्हटल्याचे ऐकिवात, वाचनात नाही. साने पुढे लिहितात, 'गांधीजींचा शाकाहाराचा आग्रह हा उल्लेख अशासाठी, की गोरक्षण आणि आता गोहत्याबंदी या धर्मवादी अँटिसेक्युलर प्रकाराचे जनक गांधीजीच आहेत.' गांधीजींनी गोरक्षणाचा आग्रह धरला होता हे बरोबर आहे. पण त्याला शेती आणि शेतकऱ्याचा संदर्भ होता. हिंदू धर्माचा संदर्भ अजिबात नव्हता. त्यांनी गोरक्षणाचा कायदा व्हावा म्हणून चळवळ उभारली नव्हती. तसा आग्रह त्यांनी एकदाही धरला नव्हता. आता धर्मवादी मंडळींनी गायीला धर्माच्या गोठ्यात बांधले तर त्याला गांधी कसे काय जबाबदार? त्यामुळे साने यांचे वरील विधान मोडीत निघते. 

साने लिहितात, 'मॅक्रो-इकॉनॉमीला स्वत:चे गतिशास्त्र असते याचे भान न ठेवता ‘मायक्रो’त तथाकथित आदर्श बनवायचा, हे अत्यंत बालिश आहे. स्थानिक अनुभवावरून व्यापक परिणाम कळूच शकत नाहीत. सद्हेतू असला की सुपरिणामच होतील, हेच मुळात खरे नाही.' हे त्यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. पण इथेही पुन्हा वर उल्लेख केलेला मुद्दाच येतो. गांधीजींनी सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी जेव्हा त्यांची कल्पना मांडली तेव्हा ती त्यांच्या प्रयोग करायच्या ऊर्मीतून आलेली होती. त्यांच्या अर्थशास्त्रीय अभ्यासातून आलेली नव्हती. गांधीजींची मांडणी खोडून काढायला काहीच हरकत नाही, पण गांधीजींनी ती मांडणी अर्थतज्ज्ञ म्हणून केलेली नव्हती, एका नव्या रचनेचा उद्गाता म्हणून केली होती हे लक्षात ठेवलेले बरे. गांधीजींची ग्रामस्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आलेली नाही. स्वावलंबनाचा त्यांचा आग्रह प्रत्यक्षात उतरलेला नाही. आज जे स्वावलंबी आहेत त्यातले बरेचसे नाईलाजाने, परवडत नाही म्हणून स्वावलंबी आहेत. गांधीजींची कल्पना, त्यांचा आग्रह टिकलेला नाही हे यातून दिसतेच. एखादा विचार यशस्वी झालेला नाही याचा सरळ अर्थ तो अजूनतरी लोकांच्या गळी उतरलेला नाही असा होतो. दुसरीकडे 'आदर्श' विचार हा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लागू होईल, तसा तो केलाच पाहिजे याकरता इतरांना ते जे करत आहेत त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला नाही. आणि मुळात स्वावलंबन याचा अर्थ मी माझं अन्न निर्माण करेन, माझे कपडे निर्माण करेन, माझं घर बांधेन, गाडीही मीच निर्माण कारेन आणि पेट्रोलही मीच निर्माण करेन असा होतो का? तसं गांधीजींनी म्हटलं आहे का? स्वावलंबन देशाच्या संदर्भात पाहिले, समूहाच्या संदर्भात पाहिले तर गांधीजी काय म्हणत होते ते लक्षात येईल. 'स्वावलंबन ही फार महागडी गोष्ट आहे. ज्याला जे काम सर्वात जास्त चांगले जमते, त्यालाच ते करायला देण्यात सर्वाचाच फायदा असतो, हे अर्थशास्त्राचे प्राथमिक तत्त्व आहे. हे तत्त्व नाकारणारे ‘हिंदू अर्थशास्त्र’ हे शुद्ध थोतांड आहे.' असं साने लिहितात. यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे गांधीजींनी स्वयंपूर्ण खेड्याची कल्पना मांडली होती. माणूस त्याच्या प्रत्येक गरजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असू शकत नाही हे त्यांना कळत होतं. पण भारतीय संदर्भात लघुतम एकक खेडे हे आहे आणि तिथे स्वयंपूर्णता यावी हे त्यांचं स्वप्न होतं. यात खेड्यातल्या लोकांनी घराबाहेर किंवा खेड्याबाहेर कधीच पडू नये, प्रत्येकाने शिंपीकाम, सुतारकाम, शेती, लोहारकाम हे सर्व स्वतः शिकून घ्यावं म्हणजे या व्यवसायांची गरजच उरणार नाही असं त्यांनी म्हटलेलं नाही. दुसरं म्हणजे 'हिंदू अर्थशास्त्र' ही संज्ञा गांधीजींनी वापरलेली नाही. त्यांनी मुळात 'अर्थशास्त्र' हा शब्द तरी कितीवेळा वापरला आहे याचीच मला शंका आहे. 

सानेंचा मूळ आग्रह मला पटत नाही असे नाही. 'माणूस कसा असावा आणि तो जसा असायला हवा आहे त्यासाठी काय केले पाहिजे?' या गांधीजींच्या आग्रहासारखाच 'माणूस कसा असतो आणि तो जसा असतो तसा स्वीकारून त्याच्यासाठी काय केले पाहिजे?' हा विचार करणेही मला आवश्यक वाटते. पण म्हणून गांधीविचारातील वेगळेपण, 'माणसाला बदलायची' त्यांची आस (जी त्यांना शांततामय सहअस्तित्वासाठी महत्त्वाची वाटत होती) दुर्लक्षित करता येत नाही. साने या दोन्हीमध्ये एक रेषा आखून गांधीजी तिकडे आणि आपण इकडे अशी आखणी करतात ती खटकणारी आहे. 'प्रगती', 'आधुनिकता' या शब्दांच्या गांधीजींच्या व्याख्यांचा मेळ आपल्या व्याख्यांशी बसत नाही. त्यामुळे प्रगतीचे आपले मानदंड गांधींना लावले तर तर गांधी हरणारच आहेत. गांधीजी 'आदर्शाचं' बोलत होते आणि त्यांच्या दृष्टीपथात 'आव्हानं' यायची होती. आता जर आपल्या दृष्टीपथात आव्हानं आहेत तर आपण त्यावर विचार करावाच, पण तो विचार 'बघा, आम्ही जिंकलो' या आवेशाने करण्यात हशील नाही. कारण दृष्टीपथातील आव्हानांपैकी अनेक परिस्थितीजन्य असली तरी अनेक आव्हानं आपणच निर्माण केलेलीही आहेत.     

गांधीविचार हा एकरेषीय विचार नाही. त्यांचे विचार दैनंदिन आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींवरदेखील प्रभाव टाकतात, समूहजीवनाला दिशा देतात. आज शांतपणे विचार करणाऱ्याला, समन्वय साधणाऱ्याला गमतीने 'गांधीवादी' म्हटलं जातं हे याचंच द्योतक आहे. अशावेळी त्या विचारांमधील काही गोष्टी निवडून त्याची चिकित्सा एका छोट्या लेखात करता येईल का याचाही विचार व्हावा. आपल्या लेखात साने यांनी गांधीजींची जी मते वादग्रस्त ठरतील ती नेमकी निवडली आहेत. आपल्या विरोधकाबाबत बोलताना सहसा असं केलं जातं. परंतु या पद्धतीमधील अडचण अशी असते की त्यातून 'निवडक निषेध'च फक्त होतो. साने यांनीच केलेला खुलासाच वापरायचा म्हटला तर संबंधित मनुष्य जे 'मॅक्रो तत्त्वज्ञान' सांगतो आहे त्याला स्वतःचं गतिशास्त्र असतं, त्यामुळे 'मायक्रो'कडे किती लक्ष द्यायचं हे ठरवावं लागेल! शिवाय त्यातही वर दिलेल्या काही ढोबळ चुका आहेतच. (त्यातलीच आणखी एक म्हणजे गांधीजींनी शरीराला नरकद्वार मानल्याचा उल्लेख. असा उल्लेख माझ्या तरी पाहण्यात नाही. शरीराचे चोचले पुरवू नयेत, शरीर हे साधन आहे त्यामुळे ते नीट राखावे असे मात्र त्यांनी म्हटले आहे.)  

साने यांच्या त्रोटक लेखाच्या पार्श्वभूमीवर अरूण सारथी यांच्या 'गांधी आणि गांधीवाद' या पंचवीस पानी लेखाची आठवण होते. गांधीजींची चिकित्सा करताना त्यांनीदेखील गांधींना पारंपरिक, प्रतिगामी हिंदू ठरवले आहे. 'महाराष्ट्राची शोकांतिका' या पुस्तकात हा लेख आहे. या लेखाबाबतची उल्लेखनीय गोष्ट अशी की लेखाचा समारोप करताना सारथी लिहितात, 'पुढील चर्चेसाठी आवश्यक असा पूर्वपक्ष मी मांडला आहे. त्यावर विचारवंतांनी टीका केली तरच मला समाधान वाटेल. भारतातील आजची परिस्थिती माझ्या दृष्टीने भयानक आहे अशा तऱ्हेच्या विमर्शातून त्याची कारणे सापडण्याची शक्यता आहे.' राजीव साने व्यासंगी आणि तर्ककठोर अभ्यासक आहेत, पण त्यांनी तर्ककर्कश्य होऊन निष्कर्षावर यायची घाई करू नये असे सांगावेसे वाटते. 

(लोकसत्ता, 'लोकरंग', ९ ऑक्टोबर २०१६)