मिळून साऱ्याजणी (दिवाळी २०१६)
Thursday, October 20, 2016
‘मिळून सार्याजणी’तले दिवस
मिळून साऱ्याजणी (दिवाळी २०१६)
Monday, October 10, 2016
गांधीवादात दडलेले ‘आदर्श’ पुरोगामित्व
२ ऑक्टोबर २०१६ च्या 'लोकरंग'मधील राजीव साने यांचा 'गांधीवादात दडलेले संघीय प्रतिगामित्व' हा लेख वाचला. राजीव साने अभ्यासू आहेत आणि त्यांच्या विश्लेषक विचारपद्धतीविषयी मला आदर आहे. अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान आणि विविध सामाजिक मुद्दे यावरील त्यांच्या मांडणीतून बरेचदा मला स्पष्टता आली आहे हे प्रारंभीच नोंदवतो. संकल्पनांना व्याख्यारूप द्यायचा त्यांचा प्रयत्नही मला स्पृहणीय वाटतो. पण हा लेख वाचून मात्र आश्चर्य वाटले. सान्यांसारख्या अभ्यासकानेच हा लेख लिहिला आहे ना अशी शंका आली.
साने यांनी लेखात अनेक सुटे मुद्दे घेतले आहेत. त्यात गांधीजींच्या मनातील अंधश्रद्धा, लैंगिकतेबाबतची त्यांची मते, ब्रह्मचर्याचा आग्रह, त्यांनी संसदेला वेश्या आणि वांझ म्हणणे, ग्रामस्वराज्य, स्वावलंबन अशा विविध गोष्टींचा उल्लेख येतो. मला स्वतःला गांधीजींनी संसदेला वेश्या आणि वांझ म्हणणे अजिबात पटलेले नाही. पण त्यांची जी विधानं टोकाची वाटतात, जे शब्द त्यांनी उच्चारले ते शब्द धरून संपूर्ण गांधी समजून घेता येतात का हा प्रश्न आहे आणि तसे ते समजून घेता येत नाहीत हे त्याचं उत्तर आहे. त्यांनी काहीही म्हटलं तरी ते क्षम्य मानायचं असा माझा बिलकुल आग्रह नाही, पण एका गोष्टीची नोंद आपण घेतली पाहिजे. आपलं मानस घडवणारं सांस्कृतिक पर्यावरण बदलत असतं. सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीचं पर्यावरण आणि आत्ताचं पर्यावरण यात फरक आहे. त्यात पुन्हा भारतीय पर्यावरण कमालीचं संमिश्र आहे. आणि म्हणून त्यावेळी आपले नेते काय बोलले, त्यांची टिप्पणी काय होती यावर आज विचार करायला हरकत नाही, पण त्याचबरोबर या नेत्यांचं मानस कसं घडलं होतं हाही विचार करावा. य. दि. फडके यांनी 'खरी ही न्यायाची रीती' या पुस्तकात सवर्ण-बहुजन संघर्षासंदर्भात एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या वर्षांमधले 'केसरी'तील काही उतारे उद्धृत केले आहेत. त्यातून 'केसरी'कारांचा 'प्रतिगामी'पणा दिसतो. पण ती उद्धृते वाचताना तो काळ लक्षात घेतला तर असा विचार तेव्हा होत होता आणि त्याचं मूल्यनिर्णयन आज करताना काळ्या-पांढऱ्या रंगात करता येईल का यावर विचार करावा लागतो. (या दृष्टीने य.दि. फडके यांचेच 'व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक वाचण्याजोगे आहे.)
साने आश्रमातील मुलीच्या केशवपनाचे उदाहरण देतात. केशवपन करणे टोकाचे आहे हे मान्य. पण शाकाहाराचा आग्रह धरणाऱ्या गांधींजींनी खान अब्दुल गफारखान यांना आश्रमात मांसाहार करण्याची अनुमती दिली होती. त्याला काय म्हणणार? गांधींमध्ये जी संमिश्रता दिसते त्याला देता येत नाही. 'हिंद स्वराज' या पुस्तकातील मांडणीविषयी भरपूर चर्चा झालेली आहे, होतही असते. इथे सविस्तर लिहिणं शक्य नाही, पण वृत्तपत्रातील लेखातून या पुस्तकावर काही प्रतिक्रिया देणं इष्ट नाही एवढं नोंदवतो. शांतपणे वाचावे, मनन करावे असं हे पुस्तक आहे. गांधीजींची त्यातील मते अनेकांना टोकाची वाटतात, पण मुळात गांधीजी कायमच आदर्श जीवनशैलीचा वेध घेत आले होते. जगण्यातला आदर्श काय आहे याचा ते शोध घेत होते आणि त्यामुळे त्यांचे प्रयत्न माणसाची नैतिक उंची वाढवण्याकडे झुकलेले होते. त्यांना ज्या विश्वाचा ध्यास होता ते विश्व सर्वसामान्यांकरता आणि मानवी घडण व सर्वसामान्य आकांक्षा डोळ्यापुढे ठेवून अर्थशास्त्रीय विचार मांडणाऱ्या अर्थतज्ज्ञ मंडळींकरता दुर्बोध आणि अव्यवहार्य वाटणे स्वाभाविक आहे. राजीव साने अर्थशास्त्र उत्तम जाणतात, पण गांधीजींची मांडणीच मुळात त्यांनी स्वतः विकसित केलेल्या नीतीशास्त्रावर आधारलेली होती. त्यात राजीव सानेंना व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा, भौतिक प्रगतीचा संकोच झालेला दिसतो. गांधीजी व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या किंवा भौतिक प्रगतीच्या विरुद्ध नव्हते, पण त्यांचा भर साध्यसाधन विवेकावर होता आणि अर्थशास्त्र पेलू शकणार नाही इतका तो वजनदार होता. त्यांची रेल्वेविरुद्धची मते साने यांनी उद्धृत केली आहेत, पण गांधीजींनी रेल्वेविरुद्ध कधी आंदोलन सुरू केले नाही हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी यंत्राबद्दल त्यांची मते मांडली, पण त्यांनी कारखाने बंद करायची चळवळ चालवली नाही. मला एक प्रश्न राहून राहून पडतो तो हा की गांधींनी ज्या 'अव्यवहार्य', 'प्रगतीला मारक' कल्पना मांडल्या त्यातली एकही कल्पना टिकलेली नसताना, त्यांच्या सर्व नैतिक आदर्शांचा भारतीय जनतेने पराभव केलेला असताना गांधीजींसारख्या माणसाची अर्थशास्त्रातील जाणकार असलेल्या सानेंना किंवा इतरांना भीती का वाटावी? किंवा त्याबाबत त्यांच्या हत्येनंतर अडुसष्ठ वर्षांनी त्यांच्या जन्मदिनीच त्याचा विचार करावा असं त्यांना का वाटावं?
साने लिहितात, 'अहिंसेचे तत्त्व मनुष्यांपुरते अंगिकारले जायलाही वेळ लागणार आहे. ते घडायच्या आधीच इतर जीवांनाही ते तत्त्व लागू करता येण्याइतकी नैतिक उन्नती आणि तांत्रिक प्रगती अद्याप झालेली नाही.' याचा अर्थ हा की माणूस अजूनही इतर माणसांबाबत पूर्णपणे अहिंसक झालेला नाही तर मग तो इतर प्राण्यांबाबत अहिंसक कसा होईल? ( 'इतर जीवांनाही' हे म्हणताना सानेंना माणूस आणि इतर जीव अभिप्रेत असावेत. वाघाने अहिंसक होऊन गवत खाणे त्यांना अभिप्रेत नसावे. कारण गांधींनाही वाघाने गवतच खावे असे वाटत नव्हते.) साने पुढे लिहितात, 'उद्या एखादे उच्च तंत्र सापडून कदाचित आपण प्रत्येक अन्नघटक सिंथेसाइजही करू शकू. अरेच्चा! पण मग ते जैव राहणार नाही'. हे बरोबर आहे. पण पुढे ते लिहितात. 'आपल्याला सगळे काही जैव हवे; आणि ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हे मात्र निषिद्ध!' यात गडबड आहे. 'जीवो जीवस्य जीवनम' हे एका सजीवाने दुसऱ्या सजीवाला खाऊन जगणे याअर्थी म्हटले आहे. पण शाकाहाराच्या निर्मितीत, शाकाहारी पद्धतीत हा मुद्दा येतोच कुठे? 'जीवो जीवस्य जीवनम' हे फक्त माणसासाठी नको असे गांधीजींचे म्हणणे होते. वर म्हटले तसे वाघाने अहिंसक व्हावे असे ते म्हटल्याचे ऐकिवात, वाचनात नाही. साने पुढे लिहितात, 'गांधीजींचा शाकाहाराचा आग्रह हा उल्लेख अशासाठी, की गोरक्षण आणि आता गोहत्याबंदी या धर्मवादी अँटिसेक्युलर प्रकाराचे जनक गांधीजीच आहेत.' गांधीजींनी गोरक्षणाचा आग्रह धरला होता हे बरोबर आहे. पण त्याला शेती आणि शेतकऱ्याचा संदर्भ होता. हिंदू धर्माचा संदर्भ अजिबात नव्हता. त्यांनी गोरक्षणाचा कायदा व्हावा म्हणून चळवळ उभारली नव्हती. तसा आग्रह त्यांनी एकदाही धरला नव्हता. आता धर्मवादी मंडळींनी गायीला धर्माच्या गोठ्यात बांधले तर त्याला गांधी कसे काय जबाबदार? त्यामुळे साने यांचे वरील विधान मोडीत निघते.
साने लिहितात, 'मॅक्रो-इकॉनॉमीला स्वत:चे गतिशास्त्र असते याचे भान न ठेवता ‘मायक्रो’त तथाकथित आदर्श बनवायचा, हे अत्यंत बालिश आहे. स्थानिक अनुभवावरून व्यापक परिणाम कळूच शकत नाहीत. सद्हेतू असला की सुपरिणामच होतील, हेच मुळात खरे नाही.' हे त्यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. पण इथेही पुन्हा वर उल्लेख केलेला मुद्दाच येतो. गांधीजींनी सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी जेव्हा त्यांची कल्पना मांडली तेव्हा ती त्यांच्या प्रयोग करायच्या ऊर्मीतून आलेली होती. त्यांच्या अर्थशास्त्रीय अभ्यासातून आलेली नव्हती. गांधीजींची मांडणी खोडून काढायला काहीच हरकत नाही, पण गांधीजींनी ती मांडणी अर्थतज्ज्ञ म्हणून केलेली नव्हती, एका नव्या रचनेचा उद्गाता म्हणून केली होती हे लक्षात ठेवलेले बरे. गांधीजींची ग्रामस्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आलेली नाही. स्वावलंबनाचा त्यांचा आग्रह प्रत्यक्षात उतरलेला नाही. आज जे स्वावलंबी आहेत त्यातले बरेचसे नाईलाजाने, परवडत नाही म्हणून स्वावलंबी आहेत. गांधीजींची कल्पना, त्यांचा आग्रह टिकलेला नाही हे यातून दिसतेच. एखादा विचार यशस्वी झालेला नाही याचा सरळ अर्थ तो अजूनतरी लोकांच्या गळी उतरलेला नाही असा होतो. दुसरीकडे 'आदर्श' विचार हा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लागू होईल, तसा तो केलाच पाहिजे याकरता इतरांना ते जे करत आहेत त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला नाही. आणि मुळात स्वावलंबन याचा अर्थ मी माझं अन्न निर्माण करेन, माझे कपडे निर्माण करेन, माझं घर बांधेन, गाडीही मीच निर्माण कारेन आणि पेट्रोलही मीच निर्माण करेन असा होतो का? तसं गांधीजींनी म्हटलं आहे का? स्वावलंबन देशाच्या संदर्भात पाहिले, समूहाच्या संदर्भात पाहिले तर गांधीजी काय म्हणत होते ते लक्षात येईल. 'स्वावलंबन ही फार महागडी गोष्ट आहे. ज्याला जे काम सर्वात जास्त चांगले जमते, त्यालाच ते करायला देण्यात सर्वाचाच फायदा असतो, हे अर्थशास्त्राचे प्राथमिक तत्त्व आहे. हे तत्त्व नाकारणारे ‘हिंदू अर्थशास्त्र’ हे शुद्ध थोतांड आहे.' असं साने लिहितात. यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे गांधीजींनी स्वयंपूर्ण खेड्याची कल्पना मांडली होती. माणूस त्याच्या प्रत्येक गरजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असू शकत नाही हे त्यांना कळत होतं. पण भारतीय संदर्भात लघुतम एकक खेडे हे आहे आणि तिथे स्वयंपूर्णता यावी हे त्यांचं स्वप्न होतं. यात खेड्यातल्या लोकांनी घराबाहेर किंवा खेड्याबाहेर कधीच पडू नये, प्रत्येकाने शिंपीकाम, सुतारकाम, शेती, लोहारकाम हे सर्व स्वतः शिकून घ्यावं म्हणजे या व्यवसायांची गरजच उरणार नाही असं त्यांनी म्हटलेलं नाही. दुसरं म्हणजे 'हिंदू अर्थशास्त्र' ही संज्ञा गांधीजींनी वापरलेली नाही. त्यांनी मुळात 'अर्थशास्त्र' हा शब्द तरी कितीवेळा वापरला आहे याचीच मला शंका आहे.
सानेंचा मूळ आग्रह मला पटत नाही असे नाही. 'माणूस कसा असावा आणि तो जसा असायला हवा आहे त्यासाठी काय केले पाहिजे?' या गांधीजींच्या आग्रहासारखाच 'माणूस कसा असतो आणि तो जसा असतो तसा स्वीकारून त्याच्यासाठी काय केले पाहिजे?' हा विचार करणेही मला आवश्यक वाटते. पण म्हणून गांधीविचारातील वेगळेपण, 'माणसाला बदलायची' त्यांची आस (जी त्यांना शांततामय सहअस्तित्वासाठी महत्त्वाची वाटत होती) दुर्लक्षित करता येत नाही. साने या दोन्हीमध्ये एक रेषा आखून गांधीजी तिकडे आणि आपण इकडे अशी आखणी करतात ती खटकणारी आहे. 'प्रगती', 'आधुनिकता' या शब्दांच्या गांधीजींच्या व्याख्यांचा मेळ आपल्या व्याख्यांशी बसत नाही. त्यामुळे प्रगतीचे आपले मानदंड गांधींना लावले तर तर गांधी हरणारच आहेत. गांधीजी 'आदर्शाचं' बोलत होते आणि त्यांच्या दृष्टीपथात 'आव्हानं' यायची होती. आता जर आपल्या दृष्टीपथात आव्हानं आहेत तर आपण त्यावर विचार करावाच, पण तो विचार 'बघा, आम्ही जिंकलो' या आवेशाने करण्यात हशील नाही. कारण दृष्टीपथातील आव्हानांपैकी अनेक परिस्थितीजन्य असली तरी अनेक आव्हानं आपणच निर्माण केलेलीही आहेत.
गांधीविचार हा एकरेषीय विचार नाही. त्यांचे विचार दैनंदिन आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींवरदेखील प्रभाव टाकतात, समूहजीवनाला दिशा देतात. आज शांतपणे विचार करणाऱ्याला, समन्वय साधणाऱ्याला गमतीने 'गांधीवादी' म्हटलं जातं हे याचंच द्योतक आहे. अशावेळी त्या विचारांमधील काही गोष्टी निवडून त्याची चिकित्सा एका छोट्या लेखात करता येईल का याचाही विचार व्हावा. आपल्या लेखात साने यांनी गांधीजींची जी मते वादग्रस्त ठरतील ती नेमकी निवडली आहेत. आपल्या विरोधकाबाबत बोलताना सहसा असं केलं जातं. परंतु या पद्धतीमधील अडचण अशी असते की त्यातून 'निवडक निषेध'च फक्त होतो. साने यांनीच केलेला खुलासाच वापरायचा म्हटला तर संबंधित मनुष्य जे 'मॅक्रो तत्त्वज्ञान' सांगतो आहे त्याला स्वतःचं गतिशास्त्र असतं, त्यामुळे 'मायक्रो'कडे किती लक्ष द्यायचं हे ठरवावं लागेल! शिवाय त्यातही वर दिलेल्या काही ढोबळ चुका आहेतच. (त्यातलीच आणखी एक म्हणजे गांधीजींनी शरीराला नरकद्वार मानल्याचा उल्लेख. असा उल्लेख माझ्या तरी पाहण्यात नाही. शरीराचे चोचले पुरवू नयेत, शरीर हे साधन आहे त्यामुळे ते नीट राखावे असे मात्र त्यांनी म्हटले आहे.)
साने यांच्या त्रोटक लेखाच्या पार्श्वभूमीवर अरूण सारथी यांच्या 'गांधी आणि गांधीवाद' या पंचवीस पानी लेखाची आठवण होते. गांधीजींची चिकित्सा करताना त्यांनीदेखील गांधींना पारंपरिक, प्रतिगामी हिंदू ठरवले आहे. 'महाराष्ट्राची शोकांतिका' या पुस्तकात हा लेख आहे. या लेखाबाबतची उल्लेखनीय गोष्ट अशी की लेखाचा समारोप करताना सारथी लिहितात, 'पुढील चर्चेसाठी आवश्यक असा पूर्वपक्ष मी मांडला आहे. त्यावर विचारवंतांनी टीका केली तरच मला समाधान वाटेल. भारतातील आजची परिस्थिती माझ्या दृष्टीने भयानक आहे अशा तऱ्हेच्या विमर्शातून त्याची कारणे सापडण्याची शक्यता आहे.' राजीव साने व्यासंगी आणि तर्ककठोर अभ्यासक आहेत, पण त्यांनी तर्ककर्कश्य होऊन निष्कर्षावर यायची घाई करू नये असे सांगावेसे वाटते.