Saturday, November 24, 2018

संवादातून बदल

आपण जी संस्कृती निर्माण केली आहे, ज्या मान्यतांच्या आधारे आपण जगतो, आपले व्यवहार पार पाडतो त्यातला एक लक्षणीय भाग ‘निर्णय घेणे’ हा आहे. आपल्याला पदोपदी काही ना काही ठरवायला लागतं, उपलब्ध पर्यायांमधून एक पर्याय निवडावा लागतो. यातला एक कळीचा भाग ‘चूक’ आणि ‘बरोबर’ ठरवणे हा आहे. ‘चूक’ आणि ‘बरोबर’च्या मुळाशी ‘नीतीविचार’ आहे. हा ‘नीतीविचार’ पूर्णपणे सुसंगत, गणिती प्रक्रियेने चालणारा नसतो. तो सामाजिक असतो आणि या नीतीविचारावर प्रभाव टाकणारी आपल्याच मनातील वैचारिक आणि भावनिक बले असतात. त्यांच्या परिणामी आपला ‘नीतीविचार’ आकार घेतो. मागच्या लेखात आपण म्हटलं तसं सांस्कृतिक रचितं तयार होत असताना, ती अस्तित्वात असताना वास्तविक रचितंही असतात. आपण ज्याला वाईट, चूक असं म्हणतो ते समाजासाठी वाईट आणि चूक असलं तरी वास्तवात ते 'असतं' हेच पुरेसं बोलकं आहे. नीतीविचारांचा प्रयत्न समाजाची घडी बसवायचा असतो, परंतु अशा पुष्कळ जागा असतात जिथे नीतीविचार पुरा पडत नाही. त्यामुळे नैतिकता समाजासाठी असली तरी ती अखेरीस व्यक्तीनिष्ठ राहते.

म्हणूनच समाजात जे जे प्रश्न दिसतात त्यांचा विचार निव्वळ नैतिकतेच्या कसोटीवर करून चालत नाही. अमुक एक वर्तन सर्वांच्या हिताचं आहे म्हणून बरोबर आहे हे ठीक. परंतु त्याच्याही पुढे जाऊन ते नैसर्गिकरित्याच बरोबर आहे असा आग्रह धरला जाणं थोडं गडबडीचं आहे. मुळात नैसर्गिक म्हणजे काय याबाबतच आपला बरेचदा घोळ होतो. कारण वर्तनाला आपण नैतिकतेच्या फूटपट्टीने मोजायचा प्रयत्न करतो. प्रत्यक्षात जे ‘चांगलं’ आहे आणि जे ‘वाईट’ आहे ते सगळं नैसर्गिकच आहे. निसर्ग हा ‘चांगला’, ‘दयाळू’, ‘क्षमाशील’ असा काही नसतो. निसर्ग म्हणजे 'असणं'. निसर्गाला मूल्यदृष्टी नाही. असलीच तर 'अस्तित्वदृष्टी' आहे. अस्तित्व टिकवण्याच्या संघर्षाचं अविरत फिरणारं चक्र हा निसर्गाचा प्रमुख भाग आहे. त्यात आपण ज्याला ‘चांगलं’ म्हणतो असे पैलू आहेत आणि आपण ज्याला ‘वाईट’ म्हणतो असे पैलूही आहेत. ‘चांगलं’ आणि ‘वाईट’, ‘चूक’ आणि बरोबर’ हा निर्णय सतत घ्यावा लागत असल्याने माणूस निसर्गत: जसा आहे तसा व्यक्त होत नाही. माणसावर नियंत्रण असावं या हेतूच्या पूर्ततेसाठी ते योग्य असलं तरी त्यामुळे माणसाची घुसमट होणे आणि त्यातून दुर्वर्तन होणे हीदेखील एक बाजू आहे.

‘दुर्वर्तन’ त्रासदायक असल्यानेच तो अभ्यासाचा विषय असायला हवा. आपल्या अंतरंगात भावभावनांचा, उलटसुलट विचारांचा कल्लोळ माजलेला असतो. परंतु तो उलगडून समोर मांडण्याची पद्धत आपण विकसित केलेली नाही. आपण भाषेच्या माध्यमातून आपल्या मनातील बोचऱ्या, दुखऱ्या, गोंधळलेल्या जागांचं नेमकं वर्णन करू शकलो तर आपलं सहअस्तित्व पुष्कळच सुकर होईल. इथे काळजी घ्यायची आहे ती एकच. ‘तुझ्या मनात असं आलंच कसं?’, ‘हे काहीतरी भयंकरच आहे’ अशा प्रतिक्रिया न देता मनातलं आधी पूर्ण ऐकून घ्यायचं. कारण मनातलं भयंकर असलं तरी ते ‘असतं’. मागच्या लेखात आपण लैंगिक गुन्ह्यांवरील उपायांसंबंधी बोलू असं म्हटलं होतं. मला पुरुषांच्या संदर्भात, त्यांच्या कामेच्छेच्या संदर्भात त्यांनी त्यांची कामेच्छा स्त्रीकडे स्पष्टपणे प्रकट करावी आणि त्यामुळे बिचकून न जाता स्त्रीने ती ऐकून त्यावर आपला निर्णय द्याावा हा एक पहिला उपाय सुचवावासा वाटतो. आपण पुरुषांबाबत बोलतो आहोत म्हणून पुरुषाचा उल्लेख केला आहे. वास्तविक विविध प्रकारचं ‘सेक्शुअल ओरिएंटेशन’ असणाºया सर्वांनाच ते लागू होतं.

आता हे बोलायला, लिहायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात करायला अवघड आहे असा प्रतिवाद होईल. तो बरोबर आहे. कारण आपण कामेच्छेचा निषेध पुष्कळ केला आहे. कामेच्छेला समजून घेतलेलं नाही. इथे पुन्हा प्रेमाचीच आठवण होते. प्रेम म्हटलं की आपल्याला ‘लफडं’ आठवतं. आपण प्रेमाकडे निर्मळपणे पाहण्यात बरेचदा कमी पडतो. (आता पुढे बोलायचं झालं तर आपण राग, द्वेष, मत्सर, अहंकार या आणि अशा विविध भावच्छटांनाही समजून घेत नाही. ‘द्वेष करणे हे वाईट’ हे ठीक आहे, पण तरी ‘द्वेष वाटतो' त्याचं काय? आता त्यावर काम करायचं तर आधी त्याविषयी बोलायला हवं. ते ऐकून घेतलं जायला हवं. या भावभावनांची ताकद फार मोठी आहे. त्यांच्या प्रभावामुळे पडलेला लहानसा तडा जर वेळीच सांधला गेला नाही तर पुढे जाऊन आणखी विध्वंस होऊ शकतो. सध्या इथे थांबून कामेच्छेकडे परत येऊ.)

कामेच्छेवर त्वरित 'अंमल' करण्याची पुरुषाची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला वळण देण्यासाठी कामेच्छेचं शब्दातून प्रकटीकरण हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. शिवाय पुरुषांना (मुलांना) त्याबाबत कुणा स्त्रीशी बोलता आलं तर अधिकच बरं होईल. पुरुषाची सामाजिक आणि जैविक गोची झाल्याने त्याचं कामविश्व एकूणातच डळमळीत, अस्थिर, गुंतागुंतीचं, त्याच्या मनोविश्वावर ‘हावी’ होणारं झालं आहे. स्त्री ही त्याच्या कामेच्छेचा विषय आहे तो जैविक अंगाने. सामाजिक अंगाने स्त्री हा मनुष्यत्वाचा, स्वतंत्र अस्तित्वाचा विषय आहे. परंतु या दोन्ही अंगांनी या विषयाचं प्रगल्भ ज्ञान त्याला झालेलं नाही. पितृसत्ताक व्यवस्था त्याला स्त्रीच्या अंतरंगाशी एकरुप होऊन तिला समजून घेऊ देत नाही तर कामेच्छेचं नियोजन न झाल्याने ती उफाळून वर येत त्याच्या विवेकाचाही कब्जा घेते. अशा परिस्थितीत त्याचा जर स्त्रीशी संवाद होत राहिला तर बदलाची शक्यता वाढेल. माझा व्यक्तिगत अनुभवही याला पुष्टी देणारा आहे. हेटरोसेक्शुअल पुरुष म्हणून माझं कामविश्व कसं आहे, त्यातल्या अवघड जागा कोणत्या, प्रश्न कोणते हे सगळं ऐकून घेणाऱ्या मैत्रिणी जेव्हा मला भेटल्या आणि त्यांनी जेव्हा ‘तुला जे होतंय ते ठीक आहे. त्याचा ताण घेऊ नकोस.  त्याविषयी आपण बोलत राहू’, असं सांगितलं तेव्हा माझा मानसिक भार हलका व्हायला मदत झाली. (मला अशा मैत्रिणी उशिरा आणि एक-दोघीच भेटल्या. आज जी मुले विशीत आहेत त्यांना अशा मैत्रिणी असतील अशी आशा करतो!)

कामेच्छा स्त्रीसमोर शब्दांतून प्रकट केल्याने त्यातील तीव्रता, अनावरता कमी व्हायला मदत होण्याबरोबरच या विशिष्ट इच्छेचं ‘सामान्यीकरण’ व्हायलाही मदत होईल. पुरुष आणि स्त्री दोघांनाही ही इच्छा सहजभावाने घेता येणं शक्य होईल. यापुढे जाऊन कामेच्छेचं नियोजन हा मुद्दा येतो. इथे जे पुरुषविशिष्ट ‘प्रॉब्लेम एरियाज’ आहेत तिथे काम करण्याची एक कल्पना मला सुचते. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी, अगदी घरातदेखील होणारा स्त्रियांचा लैंगिक छळ ही एक मोठी समस्या आहे. याबाबत कायदाही केला गेला आहे आणि कायद्याातील तरतुदींमध्ये पुरुषांचं प्रशिक्षण, सुधारणा यासाठीची स्पेस उपलब्ध आहे. लैंगिक दुर्वर्तन करणारा पुरुष आढळल्यास त्याच्या मानसिकतेचं ‘ऑडिट’ करण्याची काही एक प्रक्रिया होऊ शकली तरी त्याच्यात सुधारणा व्हायची शक्यता वाढेल. स्त्रीची स्वतंत्र आणि सक्षम व्यक्ती म्हणून नोंद घेण्याची वृत्ती घडवणं आणि त्याबरोबरच त्याच्या कामविश्वाबाबत त्याला बोलतं करून त्याची ‘तपासणी’ करत राहणं अशा दोन उद्देशांनी हे ‘ऑडिट’ करता येऊ शकेल. याला पुरुष चटकन् तयार होणार नाहीत हे खरं, परंतु माणसाला बोलतं करण्यासाठी काही क्रिएटिव्ह उपाययोजना करता येतात. त्यातून हळूहळू माणसं मोकळी होतात. उदा. एखाद्याा ऑफिसमधल्या पुरुषांना ‘मला सतावणारे कामविषयक प्रश्न, ‘मला माझ्या आसपासच्या स्त्रियांबद्दल काय वाटतं’ किंवा या धर्तीवरचे प्रश्न देऊन त्यांना त्यांचं म्हणणं निनावी पद्धतीने लिहायला सांगता येईल. पुरूषांची मानसिकता बदलायला हवी आहे यात शंकाच नाही. ती कशी बदलायची हा प्रश्न आहे आणि त्यासाठी आपल्याला आपली कल्पनाशक्ती राबवावी लागेल.  

लैंगिक कुतूहल जागं होणं या पहिल्या टप्प्यापासून ते विस्कळीत, वाईट प्रकारे मनात रुजणं या दरम्यानच्या विविध टप्प्यांवर पुरुषांसाठी काही कार्यक्रम आखता येतील. कोणत्याही सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयासारखाच हाही विषय सविस्तर बोलण्याचा आहे. आपला समाज फार मोठ्या प्रमाणात विभाजित आहे. त्यामुळे मुंबईतल्या एखाद्याा मोठ्या ऑफिसमध्ये काम करणारा विवाहित पुरुष आणि त्याच मुंबईत रोजंदारीवर काम करणारा एखाद्याा स्थलांतरित मजूर यांच्या कामविश्वाबाबत वेगळा विचार करावा लागेल. महत्त्वाची गोष्ट ही की स्त्रीला निर्भयपणे, कुठल्याही बाह्य ताणाशिवाय वावरता येण्यासाठी आपण पितृसत्ताक व्यवस्थेचा, पारंपरिक पुरुषी मानसिकतेचा निषेध करण्याच्या पलीकडे जाऊन या व्यवस्थेत, मानसिकतेत बदल व्हावेत यासाठी एकत्र येऊन आपण काय करू शकतो हे शोधणं. स्त्री-पुरुष संबंध आणि विशेषत: कामेच्छा हा ‘अस्थिर’ विषय आहे. त्यामुळे त्याबाबत निर्णायक बोलण्याची घाई न करता विश्लेषणात्मक बोलण्याची मानसिकता तयार करणे हा यातला पहिला टप्पा ठरेल.

Saturday, November 10, 2018

पुरूषातील लैंगिकता, लैंगिकतेतील पुरूष

अलीकडे चित्रपटगृहात एक अत्यंत प्रभावी (आणि महत्त्वाची) जाहिरात बघण्यात आली. नाव नेमकं आठवत नाही, पण हेल्पलाइनची जाहिरात आहे. एक मध्यमवयीन गृहस्थ लिफ्टमध्ये शिरतो. त्याच्यामागे एक लहान मुलगा फुटबॉल की बास्केटबॉलशी खेळत आत शिरतो. त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर अस्वस्थ भाव आहेत. लिफ्टचं दार बंद होतं. पुढच्या दृश्यात लिफ्टचं दार उघडतं. मुलगा बाहेर पडतो. पाठोपाठ हा गृहस्थही बाहेर पडतो. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तसेच आहेत. जाहिरात इथे संपते आणि स्क्रीनवर कॅप्शन झळकते - 'डू यू लाइक चिल्ड्रेन इन अ वे यू शुड नॉट?' हेल्प इज अ‍ॅव्हलेबल.' (लहान मुलं ज्या प्रकारे आवडायला नकोत त्या प्रकारे तुम्हाला आवडतात का? आम्ही तुम्हाला याबाबत मदत करू शकतो.) 

ही जाहिरात पाहून मला अतिशय बरं वाटलं. एखाद्या प्रश्नाचा केवळ निषेध करण्यापेक्षा तो प्रश्न समजून घेऊन नेमक्या जागी काम करायचा प्रयत्न करणाऱ्या उपक्रमाची ती जाहिरात होती. आता यानंतर माझ्या मनात आलं की याच धर्तीवर आणखी एक जाहिरात करता येईल. त्यात लहान मुलाच्या जागी एक स्त्री असेल. पुरूष तोच असला तरी चालेल. जाहिरात संपल्यानंतर कॅप्शन अशी असेल - स्त्रीकडे बघून तुम्हांला सतत उत्तेजित व्हायला होतं का? आम्ही तुम्हाला याबाबत मदत करू शकतो! 

मला जे म्हणायचं आहे ते बहुधा तुमच्या लक्षात आलं असेल. गेल्या दोन-तीन लेखांत आपण प्रेमसंबंधांविषयी बोललो होतो. त्यानंतर लैंगिक संबंधांविषयी मला काही सांगायचं होतं आणि ही जाहिरात माझ्या मदतीला धावून आली!     

कामेच्छा हा प्रेमासारखाच एक महत्त्वाचा विषय आहे. या विषयाबाबत खुलेपणाने, विश्लेषणात्मक बोलण्याइतपत आपण आपली 'सामाजिक मनोभूमिका' तयार केलेली नाही. प्रेमाबाबत जे झालं आहे तसंच काहीसं इथेही झालं आहे. 'संस्कृती'च्या उभारणीत काही गोष्टी नाकारल्या जातात, काही स्वीकारल्या जातात हे आपण मागे एकदा म्हटलं आहे. यात होतं असं की एका बाजूला सांस्कृतिक रचितं तयार होत असली तरी दुसऱ्या बाजूला त्यांना छेद देणारी 'वास्तव रचितं'ही असतात. लैंगिकतेबाबतचं वास्तव, लैंगिक इच्छेचं प्रकटन हा एक चिंताजनक विषय झाला आहे हे आपल्याला दिसतंच आहे. बलात्कारांच्या वाढलेल्या घटना, त्यातील हिंसाचार, पुरूषांकडून कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक, लग्नव्यवस्थेअंतर्गत असणारे बलात्कार व लैंगिक असमाधानाशी जोडलेले प्रश्न असे अनेक मुद्दे आहेत. लग्नसंस्था, लैंगिक संबंध आणि नैतिकता यावर स्वतंत्रपणे बोलता येईल. या लेखात आपण प्रामुख्याने 'पुरूषी लैंगिक वर्तन' यावर चर्चा करू. 

स्पिनोझा या सतराव्या शतकातील डच तत्वज्ञाचं एक मननीय विधान आहे - 'माणसाच्या कृत्यांकडे पाहून रडण्यापेक्षा, हसण्यापेक्षा किंवा त्यांचा तिरस्कार करण्यापेक्षा ती समजून घेण्याचा मी सतत प्रयत्न करतो.' माणसाची कृत्ये समजून घेणं अशाकरता महत्त्वाचं की ते नीट झालं तरच आपण प्रश्नांच्या उत्तराच्या दिशेने जाऊ शकतो. मला लैंगिकतेच्या क्षेत्रात हा विचार लक्षणीय वाटतो. पुरूषांचं लैंगिक वर्तन अनेक प्रकारांनी विस्कळीत, वाईट आणि स्त्रीसाठी अतीव दुःखदायक असं राहिलेलं आहे. पुरूषसत्ताक व्यवस्थेमध्ये पुरूषाचा अहंकार जोपासला जातो, स्त्रीला दुय्यम स्थान मिळतं आणि तिचं शोषण होतं हे तर आहेच. या व्यवस्थेने पुरूषाचीही गोची केली आहे आणि त्याच्यातला 'माणूस' झाकोळला आहे. पण व्यवस्थाजन्य अहंकाराबरोबरच पुरूषाची कामेच्छा हादेखील एक घटक असेल तर त्यावर मात करण्यासाठी आधी त्याचा अभ्यास केला पाहिजे. आज मासिक पाळीसारख्या विषयावर खुलेपणाने बोललं जातं आहे हे अतिशय स्वागतार्ह आहे. त्याच खुलेपणाने पुरूषाच्या 'इरेक्शन'विषयी, वीर्यस्खलनाविषयी देखील बोललं जाणं आवश्यक आहे. विशिष्ट वयात मुलींशी आणि मुलांशी त्यांच्या 'मनातील लैंगिकतेविषयी' बोललं जाणं आवश्यक आहे. आज जर पुरूषाचं लैंगिक वर्तन अडचणीचं ठरत असेल तर या विषयासंबंधीच्या विश्लेषणात्मक चर्चेला सामाजिक चर्चाविश्वात स्थान मिळायला हवं. 

र. धों. कर्वे यांच्या 'समाजस्वास्थ' मासिकात स्वतःच्या कामजीवनातील अडचणींबाबत वाचक पत्र लिहीत. वीर्यस्खलन, कामोत्तेजना, शरीरसंबंध, संतती नियमन यांच्याशी संबंधित प्रश्नांबाबत एका मराठी मासिकातून १९३०-१९४० च्या दशकांत चर्चा होत असे तशी चर्चा नंतर होत होती का माहीत नाही. आज अशी चर्चा करणारं मासिक/वृत्तपत्र नाही. माध्यमांचा इतका मारा असताना लैंगिक संबंधांवर नेमकेपणाने बोलणाऱ्या चर्चा, व्हिडीओज बघायला मिळत नाहीत. इंग्लिशमध्ये आहेत, मराठीत नाहीत. २००८ पासून 'समाजस्वास्थ्य' या मासिकाचं त्याच नावाने पुनुरुज्जीवन करण्याचा प्रयत्न मनीषा सबनीस यांनी केला. त्यात लैंगिक प्रश्नांविषयी चर्चाही होत असे. पण पुढे हे मासिक तग धरू शकलं नाही.      

पुरूषाची कामेच्छा आणि स्त्रीची कामेच्छा यात फरक आहेत का? असल्यास का? कोणते? पुरूषाच्या लैंगिक इच्छेचं नेमकं स्वरूप काय आहे? त्याची लैंगिक इच्छा गुन्हेगारी वळण का घेते? लैंगिक इच्छा नियंत्रणाबाहेर जात असेल तर त्यावर उपाय काय? हे या चर्चेतील काही समर्पक प्रश्न आहेत. मुळात सजीवांमध्ये लैंगिक इच्छा असते याचं एक प्रमुख कारण लैंगिक संबंधांतून प्रजोत्पादन होतं हे आहे. आपली गुणसूत्र टिकवून ठेवणं, त्यासाठी संतती जन्माला घालणं ही सजीवांची एक मुख्य प्रेरणा आहे. भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल वाटणारं आकर्षण, त्यातून लैंगिक इच्छा चेतवली जाणं याच्या मुळाशी प्रजोत्पादनाचा 'ड्राइव्ह' आहे. अर्थात प्रजोत्पादन करायचं नसेल तरी माणसामध्ये लैंगिक इच्छा निर्माण होते. याचं कारण लैंगिक संबंधांतून केवळ प्रजोत्पादनच होत नाही तर 'प्लेझर'देखील मिळतं आणि प्रजोत्पादन व प्लेझर या दोन गोष्टी वेगळ्या करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. त्यामुळे 'प्रजेच्या जबाबदारीचं' ओझं टाळून निव्वळ आनंद' ही बाब माणसामध्ये या क्रियेचं आकर्षण वाढवण्यास कारणीभूत ठरली आहे. याची नोंद घेऊन पुरूषांच्या संदर्भाने विचार करता लैंगिक इच्छा निर्माण होणं, ती वाढणं, नियंत्रणाबाहेर जाणं आणि परिणामी त्यांच्याकडून गुन्हा घडणं या साखळीचा जर नीट अभ्यास केला, त्याबाबत पुरूषांना बोलतं केलं गेलं तर पुरूषाचा विवेक जागवायला मदत होऊ शकेल. कामेच्छा आणि स्त्रीवर नियंत्रण ठेवण्याची, अहंकाराची पुरूषसत्ताक व्यवस्थेकडून मिळालेली 'देणगी' या दोन्हीचा प्रभाव पुरूषाच्या मानसिकेतेवर आहे. याची उकल करून ती पुरूषांसमोर मांडत राहणं गरजेचं आहे.      

पुरूषाच्या बाबतीत लैंगिक तृप्ती हे विरेचनाचं माध्यम आहे. या तृप्तीअभावी, इरेक्शनच्या परिणामी पुरुषांत अवघडलेपण येतं, त्याचं मनःस्वास्थ्य गडबडू शकतं आणि ही इच्छा त्याच्या विवेकावरदेखील मात करू शकते. लैंगिक इच्छेची ही 'उत्क्रांतीजन्य ताकद' नोंद घेण्याजोगी आहे. ज्या पुरूषाची स्त्रीबाबतची मानसिकता मध्ययुगीनच आहे त्याला त्याच्या लैंगिक इच्छेबाबत काही प्रश्नच पडणार नाही. कारण त्याच्या दृष्टीने स्त्री ही भोग्य वस्तूच आहे. पण अशी मानसिकता नसणाऱ्या पुरूषांबाबतही लैंगिक इच्छा आपला प्रभाव दाखवते का हे तपासणं आवश्यक आहे. याबाबत एक उदाहरण आठवलं. 'मी टू' चळवळीत चित्रपट दिग्दर्शक विकास बहल याच्यावर आरोप झाले. विकास बहलने 'क्वीन' हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. जो पुरूष स्त्री स्वातंत्र्याचा एक सशक्त उद्गार असलेला चित्रपट तयार करतो तो वास्तवात संपूर्णपणे वेगळा, पारंपरिक पुरूषी मानसिकतेचा असू शकतो ही एक शक्यता आहेच. पण तो तसा नसून काही परिस्थितीजन्य कारणांमुळे किंवा मनःस्थिती बिघडून, नियंत्रण सुटल्यामुळे त्याच्याकडून अपराध घडला का हेही तपासायला हवं. मुद्दा हा की केवळ आरोप-प्रत्यारोपात न अडकता, शक्यता विचारात घेत, त्यांचा शोध घेत आपण समस्येच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार की नाही? बलात्काराकडे इव्होल्यूशनरी बायॉलॉजीच्या अंगाने पाहणारं ’नॅचरल हिस्टरी ऑफ रेप : बायॉलॉजिकल बेसेस ऑफ सेक्शुअल कोअर्शन’ हे रँडी थॉर्नहिल आणि क्रेग पाल्मर या लेखकद्वयीचं एक पुस्तक आहे. यातील एका परिच्छेदाचा माझ्या एका लेखासाठी मी अनुवाद केला होता. तो इथे देतो आहे -
           
मनुष्यांमधील बलात्काराची अंतिम कारणे स्त्री-पुरूषांच्या लैंगिक उत्क्रांतीमधील फरकातच सापडतील. स्त्रीच्या लैंगिकतेचं नियमन करणाऱ्या मानसिक यंत्रणा स्त्रीमध्ये उत्क्रांत झाल्या आणि त्याला प्रतिसाद म्हणून बलात्कार ही क्रिया उत्क्रांत झाली असे पुरावे सांगतात. स्त्री तिच्यातील या मानसिक यंत्रणांमुळे आपल्या संभाव्य लैंगिक जोडीदारांमध्ये भेद करू शकली. नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेत जर मानवी स्त्रीची निवड 'कुठल्याही नराबरोबर, कुठल्याही परिस्थितीत रत होण्यास तयार' अशी झाली असती तर बलात्कार घडला नसता. दुसऱ्या बाजूला, नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेत जर मानवी पुरूषाची निवड 'विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट मादीकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होणे' अशी झाली असती तर बलात्कारांचं प्रमाण खूपच कमी असतं आणि 'जी स्त्री समागम करण्यास उत्सुक आहे त्याच स्त्रीशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा' अशा प्रकारे जर मानवी पुरूषाची नैसर्गिक निवड झाली असती तर बलात्काराची शक्यताच नष्ट झाली असती!

लैंगिक इच्छा, तिचं घडणं-बिघडणं आणि त्याचं प्रतिबिंब लैंगिक वर्तनात पडणं यामागे जैविक आणि सामाजिक दोन्ही घटक जबाबदार असतात आणि त्यामुळे लैंगिक गुन्ह्यांबाबत या दोन्ही अंगांनी विचार करून उपाय शोधावे लागतील हे नोंदवून आपण थांबू आणि पुढील लेखात उपायांचा विचार करू.