'मराठीचे विचारविश्व व सध्याचे वैचारिक लेखन' हा दिवंगत श्री. श्री. मा. भावे यांचा 'नवभारतमधील लेख' या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ग्रंथातील संकलित लेख वाचल्यानंतर एक-दोन निवडक मुद्द्यांना स्पर्श करावासा वाटला. प्रस्तुत लेख सप्टेंबर २०१७ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता आणि आता भावे हयात नाहीत त्यामुळे त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा होणं शक्य नाही. पण भावे महाराष्ट्रातील एका समृद्ध वैचारिक परंपरेचे वाहक होते आणि त्या परंपरेला अनुसरून एखाद्या वैचारिक/विश्लेषणात्मक मांडणीची/त्या मांडणीतील काही मुद्द्यांची चिकित्सा करणं अप्रस्तुत होणार नाही. खरं तर भावे यांच्या या लेखाचा विषय आणि त्यांचं वैचारिक, इतिहास संशोधन क्षेत्रातील एकूण योगदान हे 'प्रश्नोत्तरे, चर्चा आणि त्यातून आकलनात भर/बदल' या प्रक्रियेशी नातं सांगणारं आहे. आजच्या एकूण वातावरणात ही प्रक्रिया नामशेष होते की काय अशी भीती वाटते. त्याहीमुळे भावेंच्या लेखावर काही म्हणणं आवश्यक वाटतं. ते असते तर अर्थातच त्यांच्याशी संवाद होऊ शकला असता. आज ते नाहीत आणि त्यांच्या व त्यांच्या वरच्या पिढीतील इतरही अनेक खंदे अभ्यासक नाहीत. पण आपण त्यांची संवाद व चर्चेची परंपरा पुढे नऊच शकतो.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यासारखी नैसर्गिक विज्ञाने (नॅचरल सायन्सेस) आणि ज्याला मानव्य विद्या (ह्यूमॅनिटीज) म्हटलं जातं त्यातील एक मुख्य फरक असा की नैसर्गिक विज्ञानांमध्ये केली जाणारी विधानं प्रयोग आणि निष्कर्ष यावर आधारित असतात आणि त्यामुळे वस्तुनिष्ठ असतात तर सामाजिक विज्ञानामधील विधानं निरीक्षणांवर आधारलेली असली तरीही ती आत्मनिष्ठ असतात. कारण निरीक्षणाचा विषय जड वस्तू नसतो तर 'मनुष्य' हा असतो. वस्तूंचे गुणधर्म आणि वर्तन जसं भौतिक नियमांनी बद्ध असतं तसं माणसाचं नसतं. मानवी गुणधर्म आणि वर्तन अस्थिर असतं आणि त्यामुळे त्याविषयी विधान करणं हे जिकीरीचं आणि जबाबदारीचंही काम आहे. मनुष्याने निर्माण केलेल्या विचारधारांनाही हे लागू होतं. विचारधारा - मग ती मार्क्सवादी असो, गांधीवादी असो, समाजवादी असो, धर्मवादी असो - ही भौतिक गोष्ट नसते आणि तिचा पाया संकल्पनात्मक, मूल्यात्मक असा असतो. (म्हणूनच 'आयडियॉलॉजी' या शब्दला 'कल्पनाप्रणाली' हा शब्द अधिक चपखल वाटतो). विचारधारेचं विशुद्ध रूप आणि प्रत्यक्षातील रूप यात तफावत असते. भावे यांनी त्यांच्या लेखात 'हिंदुत्ववादी विचारप्रणाली अतिशय लवचीक आणि गमखाऊ आहे. तिला विरोध करून किंवा त्या विचारसरणीतील दोष किंवा अंतर्विरोध दाखवून काही बौद्धिक व सांप्रदायिक समाधान लाभले तरी परिस्थिती बदलणार नाही.' असा एक उल्लेख केला आहे. यातलं दुसरं विधान पटण्यासारखं आहे कारण त्याची प्रचिती गेल्या काही वर्षात आली आहे.मात्र पहिलं विधान काळजीपूर्वक तपासावं असं आहे. 'गमखाऊ' म्हणजे पडतं घेणारा/घेणारी. सावरकरांचा हिंदुत्ववाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदुत्ववाद, भाजपचा हिंदुत्ववाद यात काही भेद असतीलही, पण हिंदुत्ववाद ही पडतं घेणारी विचारसरणी आहे या विधानाला पुष्टी मिळेल असं हिंदुत्ववादाच्या मांडणीतलं दर्शन नाही. प्रत्यक्षातलं तर नाहीच नाही. निदान आजच्या हिंदुत्ववादाचं तरी. राजकीय संदर्भात पाहिलं तर सगळेच पक्ष गरजेनुसार समझोता करतात, कालचे शत्रू आजचे मित्र होतात ही गोष्ट सर्वज्ञात आहे. तो वेगळा विषय. (वर जो 'विशुद्ध रूप' आणि 'प्रत्यक्षातील रूप' उल्लेख केला आहे तो इथे लावता येईल. विशुद्ध रूपाला कल्पना मांडायची असते तर प्रत्यक्ष रूपाला सत्ता मिळवायची असते.) पण हिंदुत्ववादी विचारसरणीचं जे वर्णन भावे यांनी २०१७ मध्ये केलं आहे ते करताना या विचारसरणीच्या आजच्या सामाजिक व राजकीय धुरीणांनी आपल्या उद्दिष्टांसाठी कोणते मार्ग अवलंबले, विविध प्रसारमाध्यमांचा आणि मुख्यत्वे समाजमाध्यमांचा कसा वापर करून घेतला, त्यातून समाजात दुभंग कसा निर्माण झाला या गोष्टी विचारात घेतलेल्या दिसत नाहीत. आता 'हिंदुत्ववादाचं विशुद्ध रूप' आणि 'हिंदुत्ववादाचं प्रत्यक्षातील रूप' यात फरक आहे असं जर भावे यांना अभिप्रेत असेल किंवा इतरही कुणाला अभिप्रेत असेल तर त्याबाबतची मांडणी व्हावी.
वर म्हटलं तसं विविध विचारधारा या संकल्पनात्मक, मूल्यात्मक पायावर उभ्या असतात. काही मूल्यं प्रमाण मानून गांधींनी आपली मांडणी केली, मार्क्सनेही केली. या मांडणीत समाजाची रचना कशी असावी याविषयी काही बोललं गेलं आहे. ते कल्पनाचित्र असल्याने - एक आदर्श चित्र असल्याने - त्यात कच्चे दुवे असणार. परंतु ती एक व्यापक मांडणी आहे हे खरं. आता हिंदुत्वाच्या मांडणीत असं काही व्यापक चित्र दिसतं का? या मांडणीत धर्मभावनेला प्राधान्य, हिंदूंचं हित, आपल्या परंपरांचं (भारतात या परंपरा कुठल्या, त्या कोण ठरवणार हा आणखी एक प्रश्न आहेच!) जतन, राष्ट्रवादी वृत्ती (यातही वृत्ती 'असण्या'पेक्षा 'दिसणं' जास्त आवश्यक आहे) या गोष्टींचा अंतर्भाव होतो. यात गुंतागुंतीच्या अशा आर्थिक, राजकीय रचनांचा काही मूलभूत, वेगळा विचार दिसत नाही. जगभरात जे मूलतत्त्ववादी विचार आहेत त्यांचं स्वरूप साधारण असंच आहे. पण आज जर धर्म' या संकल्पनेच्या प्रस्तुततेविषयीच प्रश्न उपस्थित केले जात असतील तर अशी धर्मकेंद्री मांडणी कितपत स्वीकारार्ह मानायची? धर्मभावनेला संपूर्ण नकार देणं किंवा धार्मिकतेची बहुतांश लोकांना वाटणारी निकड नाकारणं इथे अभिप्रेत नाही. पण धार्मिकता ही मानवी मनाचं जे अबोध, काहीसं अस्थिर आणि कमकुवत स्वरूप आहे त्यावर आधारलेली गोष्ट आहे. असं असताना या मनाची इथून पुढची मशागत विवेक आणि तर्काच्या आधारावर करायची की धार्मिकतेच्या? धार्मिकता या दोन्ही गोष्टींसह नांदू शकते असा युक्तिवाद कुणी करेल. हे होणं पूर्णपणे अशक्य आहे असं नाही, किंबहुना काही प्रमाणात ते होतही असेल, पण धार्मिक जाणीव, धर्मश्रद्धा हा विषयच असा आहे की तो मनाला संवेदनक्षम आणि दुराग्रही करतो. कारण तो थेट माणसाच्या स्व-ओळखीशी, त्याच्या या विश्वातील स्थानाशी जोडतो. त्यामुळे धार्मिक ओळखीचा आग्रह हा बहुतांश लोकांना कट्टरतेकडेच नेताना दिसतो. धार्मिक, सश्रद्ध मन हे चटकन दुखावलं जाणारं मन आहे. याची प्रचिती आज हिंदुत्वाच्या कट्टर रुपावरुन येते. हे रूप हिंदुत्ववादी संघटनांच्या, नेत्यांच्या कृतीतून, अभिव्यक्तीतून, समाजमाध्यमांवरील पद्धतशीर प्रचारातून आणि हिंदुत्व समर्थकांच्या समाजमाध्यमांवरील व इत्रतरच्या अभिव्यक्तीवरून समोर येतं. आजवर हिंदूंवर अन्याय झाला आहे आणि त्यामुळे त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे असा हिंदुत्ववादी विचारसरणीचा दावा असतो. या मुद्याबाबतही सविस्तर बोलता येईल. पण ते स्वतंत्रपणे करणं इष्ट होईल.
वैचारिक लेखनाबाबत बोलताना भावे यांनी वैचारिक लेखन कशाला म्हणायचं, मराठी समाज वैचारिक लेखनाची कोणती मानके मानत आला आहे हे व इतर प्रश्न उपस्थित केले आहेत ते महत्त्वाचे आहेत. त्यांनी पुढे वैचारिक लेखनाचे दोन ढोबळ भाग सांगितले आहेत - आवाहनात्मक व उपदेशकी वैचारिक लेखन आणि विवेचक व विश्लेषणात्मक लेखन. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘वैचारिक लेखन सुमार होते आहे’ या तक्रारीचे मूळ वैचारिक लेखन म्हणजे आवाहनात्मक किंवा उपदेशपर लिखाण या एकांगी दृष्टिकोनात आहे. साम्यवादी संप्रदायाचे लोक अशा प्रकारच्या लेखनाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या कुंठितावस्थेतून ही तक्रार आली आहे. मराठीत विज्ञान-तंत्रज्ञान, शेती व शेतीचे अर्थकारण तसंच ज्ञानाची नवनवीन क्षेत्रं याबाबत नवीन लेखन होत आहे आणि ते भावे यांनी केलेल्या वर्गीकरणानुसार दुसऱ्या प्रकारचं वैचारिक लेखन आहे असं त्यांचं प्रतिपादन आहे. भावे यांनी केलेली वर्गवारी रोचक आहे. पण त्यांनी वैचारिक लेखनाची उदाहरणं म्हणून जे विषय नोंदवले आहेत त्यासंदर्भात थोडं बोलता येईल.
एखाद्या विषयावरील माहितीपर लेखनाचं मोठं महत्व आहे, पण अशा लेखनाला वैचारिक लिखाण म्हणण्याविषयी शंका वाटते. तंत्रज्ञानाचं उदाहरण घेतलं तर एखादं औद्योगिक अथवा वैद्यकीय उपयोगाचं यंत्र, उदा. बॉयलर, एअर कॉम्प्रेसर, सीएनसी मशीन, एक्स रे मशीन, डोळे तपासायचं यंत्र किंवा इतर अंनत प्रकारची यंत्रं यांच्या कार्यप्रणालीविषयी लेखन होणं हे अतिशय स्तुत्य आणि आवश्यकही आहे. हेच इतर क्षेत्रांनाही लागू होईल. उदा. रुपया चढला आणि पडला म्हणजे काय? आपला मेंदू काम कसं करतो? कर कसे आकारले जातात? आर्थिक उदारीकरण म्हणजे काय? अशासारख्या हजारो प्रश्नांविषयी लेखन होऊ शकेल (ते होतही असतं आणि व्हावंच.). पण अशा माहितीपर लेखनाला वैचारिक लेखन म्हणता येईल का? मला असं वाटतं की 'बॉयलरनिर्मितीची कारणं आणि परिणाम' किंवा 'आर्थिक उदारीकरणाची कारणं आणि परिणाम' या विषयावरील लेखनाला वैचारिक लेखन म्हणता येईल. 'काय आहे?' पेक्षा 'का आहे?' याचा खुलासा करणारं लेखन म्हणजे वैचारिक लेखन असं ढोबळपणे म्हणता येईल. हा मुद्दा माहितीपर लेखनाला वेगळ्या संदर्भात लागू होईल. उदा. बॉयलर निर्माण करताना विशिष्ट भागासाठी विशिष्ट धातू वापरायचा ही झाली माहिती. पण तोच धातू का वापरायचा हा झाला विचार. आता माहितीपर लेखनात ही बाजू पूर्णपणे अनुपस्थित असते असं अजिबात नाही. कारणमीमांसेचा अंतर्भाव तिथे विविध ठिकाणी, गरजेनुसार होतच असतो. पण त्या लेखनाचा मूळ उद्देश तो नसतो. तो काही अंशी साध्य होत असेल तर ते स्वागतार्हच आहे, पण तो एक साइड-इफेक्ट असल्यासारखा असतो. मात्र वैचारिक लेखनाचा मुख्य उद्देशच जे होत असतं त्याच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक-मानवीय अशा संदर्भातील कारण आणि परिणामांविषयी बोलणं, विविध बिंदू जोडून घेत एखाद्या संकल्पनेचा, प्रणालीचा प्रवास मांडणं हा असतो. इथे दर्जात्मक तुलनेचा प्रश्न नाही. या दोन वेगळ्या जातकुळी आहेत इतकंच.
भावे म्हणतात त्याप्रमाणे आवाहनात्मक आणि उपदेशकी लिखाणालाच फक्त वैचारिक लेखन म्हटलं गेलं आहे असं निश्चितपणे म्हणता येत नाही. कारण स्वातंत्र्यपूर्व काळातही (ज्या काळात अशा लेखनाला वैचारिक लेखन म्हणण्याचा समाजाचा कल राहिला असं निरीक्षण भावे यांनी नोंदवलं आहे) फुले-आगरकरांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेकांनी जे लेखन केलं ते केवळ आवाहनात्मक किंवा उपदेशकी होतं असं म्हणता येत नाही. या सर्व नेत्यांचं उद्दिष्ट समाजपरिवर्तन हे असलं तरी त्यांनीदेखील विश्लेषणात्मक लेखन मोठ्या प्रमाणात केलेलं आहे - विशेषतः आंबेडकरांनी. खरं पाहू गेल्यास ही वर्गवारी ढोबळ असल्याने दोन्हीची सरमिसळ असल्याची बरीच उदाहरणं सापडतील. या चर्चेमध्ये भावे यांचा रोख साम्यवादी लोकांकडे आहे असं दिसतं. साम्यवादी मांडणीत जो समाजपरिवर्तनाचा अंतःप्रवाह कायम दिसत राहतो त्यामुळे बहुधा त्यांना तसं करावंसं वाटलं असेल. पण साम्यवादी विचारधारेच्या लेखनातही निव्वळ विश्लेषण मोठ्या प्रमाणात केलं गेल्याचं दिसेल.
लेखात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सामाजिक संदर्भाने लेखन करत असताना ते वस्तुनिष्ठ न राहता आत्मनिष्ठ होण्याचा धोका संभवतोच. याही टिपणाबाबत असं झालं असण्याची शक्यता आहे. मुळात हे सगळे विषय प्रवाही असल्याने त्यावर विचारमंथन होत राहणं, आरोग्यपूर्ण वाद-संवाद होत राहणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांचं कमालीचं 'राजकीयीकरण' झालेल्या काळात याची निकड जास्त जाणवते.