Thursday, November 5, 2015

देहधून टिपणारी कविता

काळाच्या पटावरील कुठल्याही तुकड्यामध्ये जे जे साहित्य निर्माण झालं आहे त्यात कविता हा साहित्य प्रकार नेहमीच लक्षवेधी ठरला आहे. प्रत्येक साहित्य प्रकाराचं स्वत:ची अशी काही अंगभूत वैशिष्ट्ये आहेत आणि काळाच्या प्रवाहाबरोबर त्या सर्वांनी अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. लेखक आणि कवी आपापल्या काळाचे प्रॉडक्ट जसे असतात तसेच ते आपल्या काळावर स्वार व्हायचं सामर्थ्यही बाळगून असतात. त्यांची अभिव्यक्तीची निकड ही साहित्यप्रकारांच्या प्रचलित स्वरुपाची मोडतोड करणारीही असू शकते आणि अशा घर्षणातूनच काळानुरुप साहित्याचं स्वरुप बदलत राहतं. कवितादेखील त्याला अपवाद नाही.

मराठी कवितेचा वेध आजवर अनेक समीक्षकांनी, अनेक अंगांनी घेतला आहे. कविता हा माझाही आस्थाविषय असला तरी कवितेबाबतची विद्याशाखीय बैठक माझ्याकडे नाही. कविता ही माझ्याकरता एक अनुभूती आहे. तिने मला दर्शनघडवलं आहे, अस्वस्थ आणि उन्नत केलं आहे आणि प्रामुख्याने ती माझ्याकरता क्रिएटिव्ह जीनियसचा आविष्कार म्हणून समोर आली आहे. मला खरं तर कवितेविषयी काही बोलूच नये, कविता शोधत हिंडावं आणि कुठली कविता आपल्याला खतमकरतेय ते पाहावं इतकंच वाटतं. एखादी कविता आपल्यावर अतिशय तीव्र आघात करते, एखादी कविता केवळ तिच्या शब्दसौंदर्याने मोहून टाकते किंवा एखादी कविता शब्दात पकडता न येणारा तीव्र अनुभव देते. कविता तिच्या असण्यानेअंतर्मनातील अनेक स्थळांना स्पर्श करते आणि कधीकधी या स्थळांना जोडणारे पूलही बांधते. हा संपूर्ण अनुभव घेणं, तो प्रोसेसकरणं ही एक विलक्षण प्रक्रिया आहे. आणि मला असं वाटतं की ही प्रक्रिया हा एक अतिशय व्यक्तिगत स्वरूपाचा अनुभव आहे. कवितेशी जोडलेपण वाटणं अथवा न वाटणं याचा संबंधहा अनुभव येण्याशी आहे. 
  
मी पहिल्या परिच्छेदात म्हटलं तसं कवितेचं स्वरुप बदलत गेलं आहे आणि कवितेने हाताळलेले विषय हेही या बदलाचं एक कारण आहे. अर्थात एकाच काळात अनेक स्वरुपांच्या कविता वाचायला मिळतात हे खरं, पण काळाची छाप त्या काळात लिहिल्या जाणार्‍या सकस कवितेवर पडलेली दिसते. एकोणिसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनुक्रमे केशवसुत (१८६६-१९०५) आणि मर्ढेकर (१९०९-१९५६) या दोघांनी मराठी कवितेला महत्त्वाचं वळण दिलं. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात दलित कवितेने मराठी साहित्यात आणखी एक सशक्त प्रवाह निर्माण केला आणि नव्वदोत्तरी कालखंडात विखंडित वास्तवाची कविता जन्माला आली. या दीड-दोन शतकांच्या काळात मराठी कवितेने अनेक जाणिवांना स्पर्श केला आहे. मानवी लैंगिकता, शरीर अनुभव, शारीर जाणीव, 'लैंगिक द्वंद्वयाबाबतची जाणीवदेखील या कवितेत, विशेषत: साठोत्तरी काळातील स्त्रीवादी जाणिवेच्या कवितेत दिसून येईल.

मानवी लैंगिकता आणि शरीर विचार हा खरं तर आपल्या अस्तित्वाशी जोडलेला, अविभाज्य, कदाचित 'प्रथम' असा विचार आहे. कवितेने ही जाणीव कशा प्रकारे प्रकट केली आहे हे पाहणे रंजक आणि उद्बोधक ठरेल. या लेखातून अशाच काही कवितांची ओळख करुन द्यायचा प्रयत्न मी करणार आहे. यातील बहुतेक कवी माझे समकालीन आहेत. फेसबुक, ब्लॉग यासारख्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या आम्हा मित्र-मैत्रिणींच्या गटातले आहेत.  नव्वदोत्तरी कवींच्या पुढच्या पिढीतली ही कविता आहे. अभिधानंतर’ (दिवाळी,२०१४) च्या अंकात विश्राम गुप्ते यांनी फेसबुक आणि कविताया शीर्षकाचा एक दीर्घ लेख लिहिला आहे. यात त्यांनी या कवितेची उत्तम ओळख करुन दिली आहे. (साहित्यातील नवीन प्रवाहांकडे आस्थेने बघत त्याची साक्षेपी समीक्षा करण्याचं महत्त्वाचं काम विश्राम गुप्ते सातत्याने करत आले आहेत. मी स्वत: या फेसबुक कवितेचा प्रतिनिधी असल्याने त्यांच्याविषयीची कृतज्ञता इथे आवर्जून नोंदवतो. अतिरिक्त’ (मार्च २०१३) च्या अंकात त्यांनी नव्वदोत्तरी कवींविषयी लिहिलेले विस्तृत लेखही त्यांच्या अभ्यासपूर्ण आस्थेची साक्ष देणारे आहेत. ते जरूर वाचावेत.)

अर्थात या विषयाच्या अनुषंगाने काही इतर जुन्या-नव्या कवितांचे संदर्भ मी टाळणार नाही आहे. मुळात माझा प्रयत्न फेसबुकवरील आजच्या कवितेवर लक्ष देत ही कविता लैंगिकतेबाबत, सेक्शुअर फँटसीबाबत, देहभानाबाबत काय बोलते आहे हे सांगणे हा आहे, परंतु फक्त फेसबुकपुरतंच मर्यादित न राहता किंवा आमच्या पिढीच्या काळापुरतं न बोलता एखादी जुनी कविता याबाबत काय बोलली होती तेही सांगायला मला आवडेल. यात अर्थातच मी न वाचलेल्या अनेक कविता निसटायची शक्यता आहे. ही मर्यादा वाचक लक्षात घेतील अशी मी आशा करतो.

फेसबुकच्या महाकाय पसार्‍यात आणि बरेचदा चिंतेत टाकणार्‍या उद्रेकी देवाण-घेवाणीत काही चांगले कवी मित्र-मैत्रिणी जोडता आले ही एक मोठीच जमेची बाजू आहे. आधुनिक, महानगरी जाणिवांबरोबरच वर्गीय व जातीय विभाजनाला आव्हान देणारी सामाजिक कविताही इथे भेटते. नव्या स्त्री जाणिवा दिसतात, आभासी जगातल्या अस्वस्थ जाणिवा दिसतात आणि तरल काव्यमयतेचा पडदा पूर्ण बाजूला करून थेट आतलं, 'पँशनेटली सेक्शुअल', व्यक्तीवादी मुशीतनं घडलेल्या प्रामाणिक कबुलीचा प्रत्यय देणारं मनोगत मांडणारी कविताही दिसते. ही कविता जशी subtle आहे तशीच ती बेधडकही आहे आणि तिचा हा सेक्सीअवतार चकित करणारा आणि दाद द्यायला लावणारा आहे.

बाइक सेक्सया नावापासूनच भन्नाट असलेल्या कवितेत प्रणव सखदेव हा कवी आपल्यापैकी अनेकांना आलेला शरीर अनुभव बरोब्बर शब्दात पकडतो –

गाडी गाडी सुसाट वारा
रोखठोक अर्जंट ब्रेक
पाठीच्या कॅनव्हासवर
मांसल मांसल उबदार शेक

कानापाशी गुणगुण भुंगी
मानेवरती ओली जीभ
सिग्नल पाळत धावे गाडी
दाबत दाबत पीप पीप

कानपाळीवर ओठ गुलबट
जणू सिल्कचा काठपदर
पोटापाशी हात घट्ट
भूक होते खालीवर

लेदरसीट गरमागरम
ढुंगणावर घासे मांडी
मोठी मोठी होत जाते
आतल्या आत जादूची कांडी

हा essentially पुरुष अनुभव आहे आणि प्रणवने ही राइडत्याच्या शब्दातून जिवंत केली आहे. नैसर्गिक सत्याला जादूमध्ये बसवून तो काव्यात्म परिणाम तर साधतोच, पण वाचणार्‍यांच्या, विशेषत: पुरुषांच्या मनात पटल्याचंहास्य खुलवतो.

अजिंक्य दर्शने याची एक कविता मला वरच्या कवितेसारखीच तिच्या अंतिम परिणामामुळे फार लक्षवेधी वाटते. कवितेचं शीर्षक आजच्या बोलीभाषेतलं, पण उर्दूकडून उसनं घेतलेलं, बोलकं आहे -

उफ्फ  -
६९, मिशनरी, डॉगी
वीर्याळलेली पहाट
कोकीळेचं नरडं

कोंबड्याचा मोबाईल आलार्म
ओलावल्याएली पँट
पाणावल्याएले डोळे

अंगाला फुटलेलं पांघरूण
सेमी-ट्रान्स्परंट खिडकी
पहाटलेला ब्रश, व्हिंटेज मोड

सकाळ ऊर्फ रद्दी
दूध ऊर्फ चितळे
बाई ऊर्फ सुवर्णा

पोळ्या ऊर्फ कागद
भाजी ऊर्फ लगदा
चहा ऊर्फ चॉकलेटी साय

एक कावळी आंघोळ
झिजलेला लक्स
मळीचा फ्लक्स

गरम पाणी
गरम बाथरूम
वाफाळलेला मी

तरारलेल्या फँटसीज्
काही फटीग फेल्युअर्स
आणि दारावर थाप

अर्धवट ओलं शरीर
अर्धवट हातातलं काम
अर्धवटलेली झपझप पाऊलं

लक्ष्मी अष्टक, भक्तीसागर
उदबत्त्या, गूळ खोबरं, जप वगैरे
सगळंच तीनदा तीनदा...

पँटीनच्या केसांवर तीर्थ
पुसटसं एक थेंब कुंकू
श्रद्धाळलेले गंध

लिफ्ट बंद
चढणाऱ्या पायऱ्या
ओझरता कुजलेला डक्ट

 १२५ सीसी, बटन स्टार्ट
ढर्रर्रर्र...ढर्रर्रर्ऱ...ढर्रर्रर्र...
गाडी बंद, गोट्या कपाळात

प्रतीक्षा दुग्धाळ हसतीये
अगं थांब..एवढं काय झालंय
मादक तुषार, कपाळात गरमाहट

कॉक रिझर्व्हवर पिळला
ढर्रर्र..गाडी स्टार्ट..टोटल कंट्रॉल
प्रतीक्षा हसतीये..मी बुंग...

पत्र्या मारूती, ऑफिसला उशीर
मग ख्रिश्चनी नमस्कार
फक्..मुलचंदानी इकडे काय करतीये?

मी हजर, ती हाय, भीमरूपी येतं?
मी हो, तिच्या जवळ, मोठ्याने पुटपुटतो
लिटिल लाऊडर..साली मंदिरात काय एरोटिक हसते?

भीमरूपी...बिच हसणं थांबव
महारूद्रा...ए शिवू नकोस
भिमरूपी..६९, मिशनरी, डॉगी
फक्...लेट मी कॉन्सट्रेट यू बिच...भी..म..रू..पी...

कविता प्रवाही आहे. कवी जणू आपल्यालाही बरोबर घेऊन, सकाळची आवराआवर करून, त्यातले अनेक बारकावे, विशेषतः 'एकट्या पुरुषाच्या शरीरधर्मा'चे बारकावे  दाखवत पुण्यातल्या पत्र्या मारूतीच्या मंदिरापाशी येतोय आणि त्याच्या इरॉटिक हसणार्‍यामूलचंदानी नामे मैत्रिणीला भेटवतो. आणि कवितेत जागोजागी (आणि शेवटच्या चार ओळीत विशेष) अजिंक्य आपली टाळी मिळवतो. भीमरुपी महारुद्राच्या जोडीला किंवा अंघोळ करून, गाडी स्टार्ट करून निघेपर्यंत मागे येणारे सेक्शुअल विचार तो इतक्या धाडकन मांडतो की आपण अवाक् होतो. आणि त्या अवाक् होण्यात हे असं होतं बरं काही कबुली असते. शब्दांची थेट पेरणी करत, परंतु त्यामुळे कविता न विस्कटवता एक संपूर्ण अनुभव आहे तसा मांडण्याची क्षमता या कवितेमध्ये आहे.

अजिंक्यच्या या कवितेनंतर मला चटकन आठवतेय ती सलील वाघ यांची देवदर्शनही कविता. सलील वाघ हे नव्वदोत्तरी कवितेतील एक महत्त्वाचं नाव. माझ्यासकट अनेक समकालीन कवींवर त्याच्या कवितेची मोहिनी आहे. आपल्या अंगभूत धीटपणे एकसंधपणा न सोडता व्यक्तिगत लैंगिकतेचा 'षटकार' मारल्यासारखा अनुभव ही कविता देते.

तळ्यातल्या गणपतीला
नेहमीच गर्दी असते
चतुर्थीला तर मी जातोच मित्राबरोबर खास
लाईन असते मोठी
पण फार जागृत दैवत
लायनीत उभा होतो
तेवीस बायका लायनीत
सेहेचाळीस तरी लायनीबाहेर
पुरुषं पोरं तर कित्येक
पंधराएक तरी धंदेवाल्या असतील गर्दीत
बाकीच्या धंदा न जगणार्‍या पतिव्रता
आणि धक्के मारणारे सगळेच भाविक
रांगेत.... रांगेबाहेर....
एका सँडल घालणार्‍या पोरीचा
स्कर्ट वर गेला सगळे भाविक तिकडे
मी मात्र पूजा-अभिषेकांचे रेट
तसेच रांगेतल्या बायांचे बॉल
पाहून घेतले तेवढ्यात माझं
आत्मभान वाढलं लाईन पुढे सरकली
एक जनरल ओळखीचा मित्र भेटला
जातीनी पत्रकार नाहीत समीक्षक असावा
खूप बोलणं झालं काही बाही
नेमाड्यांची नवनैतिकतावादी भूमिका
ही च्यूत्येगिरी आहे असा त्याचा मतितार्थ होता
माझी काहीच हरकत नव्हती
आपल्याला काय घेणंय मी म्हणलंही
वाङमयाची लफडी वाईट तेवढ्यात
एक मित्र आला आयेमडीआरचा
त्यानी पूनम शहाला
फ्लॅटवर कसं ठोकलं ते सागितलं
कल्ला यार
तेवढ्यात माझा नंबर आला मी
मुठ्ठ्या मारून बळकट झालेले माझे पंजे
देवाला जोडले अभावित प्रसाद घेऊन निघालो
तर पाकिट आणि चपला गायब

एक सलग अनुभवाचे अनेक तुकडे आणि एकेका तुकड्यामागचं एक सलग जगणं. हीदेखील अर्थातच पुरुषाची कविता आहे आणि हा पुरुष नि:संकोचपणे आपली स्वत:ची व इतरांचीही लैंगिक बाजू आपल्यासमोर बजावून मांडतोय. चांगली कविता आघात करते असं जे मी सुरुवातीला म्हटलं त्यात मला या कवितेतल्यासारखा आघात अभिप्रेत आहे. आणि आघात वेगळा व चमकदारपणावेगळा. आघाताचं मूळ कमालीच्या अस्वस्थेत असतं. काहीतरी झडझडून सांगण्यात असतं. इथे कवीला फक्त शॉक देऊन आपल्याकडे लक्ष वेधून द्यायचं नसतं तर त्याच्या जगण्याचा पैस त्याला आपल्यासमोर कधी आस्थेनं तर कधी हताशपणे मांडायचा असतो. लैंगिक जाणिवांचं प्रभावी प्रकटन करणार्‍या कवितांपैकी ही माझी एक आवडती कविता आहे.

लैंगिक जाणीव, शारीरभान हे अनेक स्वरुपात मांडलं जाऊ शकतं. साकेत कानेटकर हा कवी अजिंक्य किंवा प्रणवसारखाच धडकपणे बोलतो आणि लैंगिकतेचा संदर्भ देत एकमेकांच्या आंतरिक ओठीचं साफल्य अनुभवण्याची अपेक्षा धरतो. त्याची जजमेंट डेही कविता पहा -

तुला नॉर्स्टल्जिया रिव्हिझिट करायचाय तेव्हा ये.
माझ्या हाडांवरचं क्लेश उपभोगायचंय तेव्हा ये.
पण जेव्हा माझे विचार आठवून यावंसं वाटेल
तेव्हा हे वाटणं कन्फर्म करून ये
हा दिवस असू शकतो आपला
जजमेंट डे ठरवण्याचा.
काँट्रॅडिक्शन्स मान्य करुन एकत्र येण्याचा.

नव्या कवितेतील इंग्लिश शब्दांचा वापर हा कदाचित वाङमयीन वादाला आमंत्रण देणारा मुद्दा ठरु शकेल पण काही संदर्भात इंग्लिश शब्द चपखल बसतात आणि काही समकालीन अनुभूती समकालीन भाषेशिवाय येऊ शकत नाही हे खरं. अनुभवाचा प्रवाह खंडित न करता या कवितेत इंग्लिश शब्द जागा पटकावून बसले आहेत आणि त्यांना जागेवरुन उठवावंसं वाटत नाही हे या रचनेचं वैशिष्ट्य आहे. फेसबुक पिढीतील कवितेत इंग्लिश शब्दांचा वापर असलेल्या अनेक रचना दिसतात. इंग्लिशचा अतिवापर यावर वेगळी चर्चा संभवते, पण मला वाटतं की कवितेचं कवितापणजपलं जात असेल तर शब्दांच्या वापराला सूट द्यायला हरकत नसावी.

देह जाणीव आणि लैंगिक जाणीव या कवितांमधून अनेक अस्तरं घेऊन प्रकट हाताना दिसते तेव्हा थेटपणा, बेधडकपणा यातच फक्त अडकून न राहता ही कविता खोलातही उतरते आहे. खरं तर मांडणीतला थेटपणासुद्धा उथळपणे येत नाहीच, परंतु शब्दांच्या प्रभावी वापरामुळे, अनुभवाच्या थेट वर्णनामुळे आत्मिक अनुभूतीकडे दुर्लक्ष होतं का असं वाटायची शक्यता आहे. अजिंक्य दर्शने त्याच्या एका कवितेचा शेवट करताना म्हणतो -

काट्यावर मारलंय करियर
फाट्यावर मारल्यात मुली
तरी सगळ्या नसण्यात हल्ली असणं लपत नाही.

हे नसण्यातलं असणंवाचताना खराखुरा कवी आपल्याला दिसतो. सत्यपालसिंग राजपूत याच्या लिपीकथाया कवितेतील एक तुकडा पहा. कविता बरीच मोठी आहे. त्यातील हा सुरुवातीचा भाग -

तुमच माझं कुणाचंही
लिपी म्हणजे एक आयुष्य असू शकते.

आपण आईच्या गर्भात असतो
तेव्हाची न आठवणारी आपली जाणीव
लिपी असू शकते गूढ
मोहंजोदारोच्या मुद्रांवरची न वाचता येणारी
आपण ओठांनी जेव्हा पहिल्यांदा लुचतो आईचे स्तनाग्र
तेव्हा आईला फुटलेला असू शकतो लिपीचाच पान्हा
शिकारनृत्य असू शकतं आपलं मातीत खेळत राहणं
हे म्हणजे लिपीनंच घेतलेलं एक वळण
कोळशानं भिंतीवर मारलेल्या रेघोट्या

किंवा गिरवलेली पहिली अक्षरं पाटीवर
म्हणजेच फक्त लिपी नसू शकते

लिपी असू शकते माणसाच्या संस्कृतीचे चित्र
भीमबेटकाच्या गुहेतलं
सहावीत रागारागात वर्गातल्या पोराच्या थोबाडीत
उमटलेली आपली लाल बोटं
किंवा लिपी असू शकते अवघड
अगदीच लहानपणी पँटच्या चैनीत अडकलेल्या नुन्नीसारखी.

लिपी म्हणजे भाषा आपल्यासमोर येताना जे रुप घेऊन येते ते रुप. सत्यपालने अनेक रुपं मांडून लिपीकथासांगितली आहे. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्पर्शबिंदूंचे अनेक दाखले देत तो ही कथा सांगतो. कवितेत पुढे तो एके ठिकाणी म्हणतो,

एखाद्या विप्लवी संघटनेच्या मेंबरशिपचं पावतीपुस्तक
किंवा दीर्घ किसनंतर प्रेयसीने काढलेले विव्हळते सित्कार
मानवी डोक्यातून आलेली लिपी असू शकते
थिअरी ऑफ रिलेटिव्हीटी

लैंगिक जाणीव, देह जाणीव याचा विचार करताना मला असं वाटतं की जैविक आणि सामाजिक दोन्ही घटकांचा परिणाम म्हणून पुरुषाची कविता आणि स्त्रीची कविता यात रोचक फरक पडत जातो. पुरूषाचं 'अवघडलेपण' कवितेतून पप्रकट होतं ते बऱ्याचदा देहाच्या पातळीवर आणि स्त्रीचं अवघडलेपण मात्र प्रामुख्याने मानसिक पातळीवर प्रकट होतं. कवयित्रींच्या कविता वाचताना तिचं 'आतूनचं तुटलेपण' फार भिडतं. कारण तिच्या उद्गारात एका आदिम दुःखाचा साक्षात्कार झाल्यासारखा वाटतो. पुरुष स्त्रीचं 'असणं', त्याच्या लैगिकतेतील आंदोलनं प्रकट करतो. त्यातून त्याची असोशी दिसते पण 'सेक्शुअली सरेंडर' होणंही प्रतीत होतं. तर स्त्री कविता स्वतःच्या आत बघत आपल्याच जाणिवेचा अर्थ लावायच्या प्रयत्नात असलेली दिसते. आणि आधुनिक कवितेत तर विद्रोह फार प्रत्ययकारी रीतीने समोर आला आहे. मेघना पेठे यांची मला आवडलेली एक कविता. स्त्रीत्वाचा आणि पुरुषत्वाचा पुन्हा मुळापासून शोध घेऊ पाहणारी.         

खूप खूप वर्षांपूर्वी..
जेव्हा कापूसही नव्हता नि कापडही
फक्त आंगभर केस होते
पुढल्या पायांचे हात होताना
कणा अजून ताठ व्हायचा होता
सूर होता पण गाणी नव्हती
धातू असेल पण नाणी नव्हती
अजून जेव्हा जमवाजमव सुरू झाली नव्हती..
तेव्हा कुठे रे होते
हे उच्च रवातले कज्जे तंटे?
ह्या स्पर्धा, ही ईर्ष्या, हे राजकारण
हा कमी जास्तीचा विचार, वर-खालीचा
हे नवरा-बायको प्रकरण..
फुकटचा झोल विनाकारण

तेव्हा होते फक्त आग, आकाश, वारा, आभाळ
वाहतं पाणी आणि बदलते ऋतू रानोमाळ
तेव्हा होतं फक्त जंदणं आणि मरणं
तेव्हा होतं फक्त जगणं आणि मरणं
नव्हता शिकारीचा गर्व, नव्हता वेणांचा अभिमान
फक्त असण्याला सलाम, फक्त असण्याला रामराम

जन्म देताना वा जीव जाताना मी गुहेत.. एकटी
जीव घेताना वा जीव जाताना तू रानात.. एकटा
असं असणार हे मान्य होतं.
नो ऑब्जेक्शन, नो अ‍ॅटिट्यूड्स
फुकट फाटक्या दुकट्याझुली पांघरत नव्हतो..
..जशा आज पांघरतो
नि आणखीच उघडे पडतो..

चल ना जाऊ पुन्हा त्या रानातल्या गुहेत
आपण तिथेच की रे बरे होतो..

कविता महाजन, प्रज्ञा दया पवार, अनुराधा पाटील अशा महत्त्वाच्या लेखिका-कवयित्रींनी त्यांच्या कवितेतून लैंगिकतेचे अनेक पैलू उलगडले आहेत. प्रत्येकीची कविता उद्धृत करणं शक्य नसलं तरी त्यांची नोंद इथे आवश्यक वाटते.

फेसबुकवरच भेटलेल्या योजना यादवची एक कविता पहा. आजच्या काळाची, आणि विशेषतः स्त्रीच्या आजच्या काळाची -

स्पायकरच्या ट्रायल रुममध्ये
कपडे उतरवत असताना
रोखलेले असतात
डिझायनरचे डोळे आपल्यावर

पायाच्या घोटापासून कंबरेपर्यंतचा आकार
मांड्यांचा घेराव , स्तनांचा विस्तार
स्कॅन होत राहतो आरशा पल्याड

जीन्स चढवतात ते हात
आपले नसतात
पायही बहुदा आपले नसतात
नव्या कपड्यात खुललेला अहं
तो ही नसतोच आपला .

डिझायनर
बेमालूम घुसलेला असतो शरीरात
दुकानात पाय ठेवल्यापासून .

योजना तिच्या अनेक कवितांमधून स्त्री असण्याला आणि स्त्रीच्या अतृप्त असण्याला आवेगाने भिडली आहे. 'स्वप्न - २' या तिच्या कवितेत तर तिने शरीराला असा काही स्पर्श केला आहे की मी अबोल होत मनोमन तिच्या पाठीवर थाप मारली.

शरीरात रूतून बसलीयत
माणसं
दाटीवाटीनं

नवरा योनीच्या तळघरात
पोरगी त्याच्या मांडीवर
पोटाच्या मध्यभागापर्यंत

उरलेले भाग
मिळतील तसे
वाटून घेतलेत प्रत्येकानं

अन्
आई मात्र
उभीच आहे शरीरात
नखशिखांत ...

योजनालादेखील - जी फेसबुक पिढीची प्रतिनिधी आहे - 'आई' शरीरात कायम 'उभी' आहे असं वाटतं आणि तिचं शरीर वाटून घेतलं गेलं आहे असं वाटतं तेव्हा ती एक महत्त्वाचं विधान करते आहे हे लक्षात घ्यायला हवं. मेघना पेठेंच्या मघाशी उद्धृत केलेल्या कवितेची आठवण करून देणारी योजनाची ही कविता पहा -

निव्वळ अंगावर अंग
घासण्यापुरते
हवे असतो जर
आपण एकमेकांना

संवादाचा एखादाही तंतू
जुळला नसता आपल्यात .

उर्जा विरून गेल्यावर
अलगद झालो असतो मोकळे

धास्तावलो नसतो
मत्सराच्या धाकाने

ठेवले नसते पहारे

निव्वळ अंगावर अंग
घासण्यापुरतेच
हवे असतो आपण
एकमेकांना

तर कदाचित

भेटलो असतो
मोकळ्या मनाने .

या कवितेतल्या प्रत्ययाने मला फार अस्वस्थ केलं आहे. मुळात मला ही एकदम 'जेंडर न्यूट्रल' कविता वाटते. ही भावना स्त्री, पुरुष कुणाचीही असू शकेल असं वाटतं. मानवी संबंधांतील जे नग्न सत्य आहे, जे तंत्रयुगातही कायम राहिलं आहे आणि अजूनही कायम राहणार आहे त्याचा स्पष्ट उल्लेख करत, त्याच एकमेव आधारे मानवी संबंध परिपुष्ट होतील अशी आशा व्यक्त करणारी ही कविता आहे. यातील विचार कदाचित पटेल, कदाचित पटणार नाही, पण ही कविता विचार ट्रिगर करण्याच्या दृष्टीने मला फार महत्त्वाची वाटते.

कविता ही फक्त कविता असते. ती इंटरनेटच्या नवीन स्पेसमधली कविता असली आणि तिचे काळ-स्थळाचे आयाम बदललेले असले तरी ती आपलं कवितापण घेऊनच उभी असते. या कवितेतून दिसलेली देहजाणीव मला आश्वासक वाटते कारण ती अतिशय प्रामाणिक आहे. 'नववधू प्रिया मी बावरते' या भा. रा. तांब्यांच्या कवितेपासून 'आपण नाही साल तुझी बायको होणार' या मेघना पेठेंच्या कवितेपर्यंतचा वैचारिक प्रवास आपल्यासमोर आहे. त्या त्या काळातली प्रामाणिक भावना मांडणं हे जर कवितेचं एक मुख्य काम असेल तर मला वाटतं फेसबुकवरची सकस कविता ते काम मनोभावे करते आहे. तिची भाषा लवचीक आहे, जाणीवा धीट आहेत आणि ती व्यक्तीकेंद्री विचारातून उमटणारा समर्थ संवाद साधायचा प्रयत्न करते आहे. आज ही कविता ज्या पॅटर्नमध्ये बोलते आहे ते इतकं प्रभावी आहे की ही कविता उद्या काय बोलणार आहे याची मला उत्सुकता आहे!         

(मेहता मराठी ग्रंथजगत, दिवाळी २०१५)
x

संदर्भासह अस्पष्टीकरण

कवितेविषयी तटस्थपणे बोलणं शक्य आहे का? कवितेबद्दल तरलतेने, व्याकुळ वगैरे होऊन बोलणं बहुधा सोपं आहे. पण कवितेचं आणि कवितालेखनाच्या प्रक्रियेचं वस्तुनिष्ठ विश्लेषण होऊ शकेल का? खरं तर मराठी साहित्यात नावाजलेल्या समीक्षकांनी याविषयी लेखन केलं आहे.  वसंत पाटणकर, म. सु. पाटील यांची कवितेविषयीची पुस्तके उपलब्ध आहेत. मर्ढेकर, रा.भा. पाटणकर यांनीदेखील त्यांच्या लेखनातून कवितेचा शोध घेतला आहे. अरुणा ढेरेंसारख्या संवेदनशील, ज्येष्ठ कवयित्रीने कवितेविषयी साध्या-सोप्या भाषेत लेखन केलं आहे. अशी बरीच नावं घेता येतील. पण काही अपवाद सोडता कवी स्वतः कवितेबद्दल फारसे बोलत नाहीत. कवितेविषयी कवीला काय वाटतं? कविता लिहिण्याच्या 'प्रोसेस'बद्दल काय वाटतं? माझ्या वाचनात हे फारसं आलेलं नाही. आणि याचं एक खरं कारण कविता लिहूनही मी कवितेविषयी बराच उदासीन राहिलो आहे. म्हणजे मी कविता लिहिल्या, कवितालेखनात खंड पडला तेव्हा ‘म्हणजे आता कविता लिहिणं संपलं आपलं?’ असं वाटून मी उद्विग्नदेखील झालो, पण मी कविता खूप आसुसून वाचलेल्या नाहीत किंवा कवितांबद्दलचं लेखन फारसं वाचलेलं नाही. कवितांचं विश्लेवषण करण्राचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला नाही. मला जे वाटतंय ते योग्य आहे की नाही मला माहीत नाही, पण मला कविता लिहिणं हा एक उच्च कोटीचा आत्मिक अनुभव वाटतो. तो अनुभव शब्दातीत आहे आणि म्हणूनच त्या अनुभवातून जी निर्मिती होते त्याचं विश्लेनषण आपल्याला करता येत नाही असं मला वाटतं. तो अनुभव घेणं, घेत राहणं आणि सोडून देणं इतकंच मी करत आलो आहे. किंवा मला इतकंच जमलं आहे. 

कविता लिहायचं प्रमाण प्रचंड आहे. लिहिणारे बहुतेक सर्वजण सुरुवातीला किंवा केव्हा ना केव्हा कविता लिहितातच. कविता हा एकाच वेळी अतिअवघड आणि अतिसोपा प्रकार आहे. मी स्वत: बहुतेक कविता मुक्तछंदात लिहिल्या आहेत. त्यापैकी काही कवितांबाबत मला ‘या मुक्तछंदात लय आहे’ अशी प्रतिक्रिया मिळाली तर काहींबाबत ‘हे स्फुट लिहिल्यासारखं आहे’ अशी प्रतिक्रिया मिळाली. छंदोबद्ध कविताही मी लिहिल्या. पण त्या मोजक्याच. कविता लिहायला सुरुवात झाली तेव्हा. मुक्तछंद किंवा मुक्तगद्य हे माझे आवडते फॉर्म. कोलटकर, नामदेव ढसाळ, मनोहर ओक, रघू दंडवते, नारारण सुर्वे, द. भा. धामणस्कर, अरुण काळे या व अशा इतरही कवींनी माझ्यावर गारुड केलं आहे. पण ग्रेस, ना. धों. महानोर, बालकवी, गुलजार, अनिल या व अशा इतर कवींच्या शब्दकळेनेही गारुड केलं आहे. सांगायचं म्हणजे मुक्तछंद हा फॉर्म माझ्या जास्त जवळचा असला तरी मुक्तछंदात ‘कवितापण’ असतं का याबद्दल मी कधीकधी संभ्रमित होतो. ज्याला यमक आहे, गेयता आहे त्याच फॉर्मला कविता म्हणावं आणि इतर वेळा मुक्तगद्य हा शब्द वापरावा असं वाटतं. पण हा मुद्दा इथेच सोडून पुढे जाऊ. कारण हा थोडा तांत्रिक भाग आहे आणि त्यावर वेगळी चर्चा होऊ शकेल.

माझी आस्था अर्थातच मुक्त किंवा छंदोबद्ध स्वरुपातली कविता ही आहे. मी म्हटलं तसं कवितेविषयी मी उदासीन राहतो ते विश्लेषणाच्या अंगाने. एरवी आवडलेल्या कवितांचा आस्वाद घेतला जातोच. परंतु इथेही एक मेख आहे. कवितेत मी ‘राहू’ शकत नाही. मला ही माझी मर्यादा वाटते आणि बलस्थानही. मर्यादा अशाकरता की असं केल्याने माझं कवितेचं आकलन अपुरं राहतं. आणि बलस्थान अशाकरता की ‘अतिपरिचयात अवज्ञा’ व्हायचा धोका टळतो. कवितेवर प्रेम करणारे काहीजण सतत कवितेतच 'राहिल्या'मुळे अतितरल, अतिभावुक होतात आणि मग त्यांची चेष्टा केली जाते हे फेसबुकशी परिचित असलेल्या वाचकांना (म्हणजे हा लेख वाचणाऱ्या बहुतेक सगळ्यांनाच) माहीत असेल.

हा लेख मी माझं स्वत:चं कविता लेखन, माझी कवितेविषयीची दृष्टी आणि माझं आकलन याच मुद्यांभोवती लिहितो आहे. मी २००५-०६ साली पहिली कविता लिहिली. २०१४ मध्ये माझा कवितासंग्रह प्रकाशित झाला - 'सायलेंट मोडमधल्या कविता'. मुद्रित माध्यमात (मासिकात) कविता प्रकाशित झाल्या असल्या तरी मी प्रामुख्याने फेसबुकवर कविता पोस्ट करत आलो आहे. माझा लेख वाचताना, माझा अनुभव वाचताना मी फार प्रथितयश कवी नाही हे वाचकांनी कृपया ध्यानात ठेवावं.  कवितेबद्दल आणि माझ्या अनुभवाबद्दल मोकळेपणानं बोलणं एवढाच माझा उद्देश आहे. कवितेच्या तांत्रिक अंगाबद्दल, कवितेविषयी समीक्षेच्या परिभाषेत बोलण्याची माझी क्षमता नाही. त्यामुळे तशी परिभाषा किंवा कवितेबद्दलचं विद्याशाखीय विवेचन तुम्हाला वाचायला मिळणार नाही याची खात्री बाळगा.

बहुतेकजणांच्या बाबतीत होतं ते माझ्याही बाबतीत झालं. प्रेम इत्यादीचा भंग झाल्यामुळे आम्ही आयुष्यात पहिल्यांदा कवितासदृश असं काहीतरी लिहिलं. त्याक्षणी त्याचं फार अप्रूप वाटलं होतं. मग पहिल्या आठ एक कविता त्याच मनोवस्थेत लिहिल्या गेल्या. तोपर्यंत माझ्या वाचनात कवितांचा अंतर्भाव अजिबातच नव्हता. पुलं, नेमाडे, अरुण साधू, जी. ए. कुलकर्णी, श्री. ना. पेंडसे ही व अशी मंडळी मानगुटीवर होती. पण जेव्हा आपण आतून कमालीचे तुटतो तेव्हा आपण इतर काही न लिहिता कविता लिहिली हे मला जाणवलं. पहिला आवेग अर्थातच कालांतराने ओसरला. भग्न झालेलं हृदय कॅलेंडरच्या पानागणिक हळूहळू सांधलं जातं हे कळलं. पण यादरम्यान एक चांगली गोष्ट घडली. ती म्हणजे व्यक्तिगत वेदनेच्या कोषातून कविताही बाहेर आली. मला एकदम कुणीतरी ‘गेट्स ओपन’ केली आहेत असं वाटलं. पाणी वाहतं झालं होतं. मग हळूहळू कवितेची ताकद आणि तिचं झपाटलेपण लक्षात येऊ लागलं. ही आपली भयानक सुंदर सहचरी आहे हे कळलं. आपण हळूहळू ‘कवी’ वगैरे होतोय हे जाणवू लागलं. बरेचदा तर एखादी कविता लिहून झाली की ‘हे मी लिहिलंय’? अशा अविश्वाोसाने मी कागदाकडे पाहिलं आहे. कविता लिहितानाची मनोवस्था अद्वितीय असते. मी आध्यात्मिक वृत्तीचा मनुष्य नाही. अज्ञेयवादी आहे. आपणहून देवळात कधीच गेलेलो नाही. धर्म ही त्याग करायची गोष्ट आहे. इथवर मी कधीच आलो आहे. असं असलं तरी विश्वातली अनेक रहस्ये आपल्या बुद्धीबाहेरची असू शकतात हे कुठल्याही विज्ञाननिष्ठ माणसासारखं माझंही मत आहे. कविता लिहितानाची मन:स्थिती ही मला अशीच गूढ वाटते. उमज, आवेग, गोंधळ, दृश्य-अदृश्य प्रतिमा, जोडलेपण, तुटलेपण अशी सगळी सरमिसळ झाल्याशिवाय कविता लिहिली जात नाही. आणखी एक अनुभव म्हणजे - काहीतरी एक असं घडलेलं असतं.- एखादा प्रसंग, बोलला गेलेला एखादा शब्द, मनात उठलेली तीव्र प्रतिक्रिया- ज्यामुळे हातात पेन घेतलं जातं आणि पुढची दहा मिनिटं सगळं आपोआप होतं. आपल्याकडून कुणीतरी कविता लिहून घेतंय असं वाटतं. लिहितानाचे ते क्षण, ती मनोवस्था आणि नंतर येणारं रिकामपण - कवीची खरी कमाई ही एवढीच! बाकी पुढचे सगळे सोपस्कार!

कधीकधी अचानक एखादी ओळ डोक्यात चमकते आणि मग हातात पेन आलं की पूर्ण कविता होते. या किंवा वरच्या परिच्छेदात दिलेल्या कारणांपैकी एका कारणामुळे मी कविता लिहिली आहे. परंतु एक मुख्य कारण म्हणजे तुटलेपण. कमालीचं अस्वास्थ्य असताना उत्तम कविता लिहिली जाते. बहुतेक सर्व कविता एकटाकी लिहिलेल्या असल्या तरी क्वचित काही कविता अपूर्णतेकडून काही दिवसांनी पूर्णत्वाकडे गेल्या आहेत. काहींवर थोडं संस्करणही केलं आहे. इथे एक गोष्ट मात्र कबूल करावीशी वाटते. कविता हा साहित्यिक अभिव्यक्तीचा कदाचित सर्वात ‘रॉ’ असा प्रकार आहे, सर्वात थेट, उत्स्फूर्त असा प्रकार आहे. पण कथा-कादंबरीसारखे साहित्यप्रकार हे अधिक आव्हानात्मक आहेत. कविता हा प्रखर आत्माविष्कार आहे आणि कथा-कादंबरी हा संवेदनेचा सलग, वैचारिक आविष्कार आहे असं मला वाटतं. यात डावं-उजवं करण्याचा प्रश्न नाही. मला जे जाणवतं ते सांगतो आहे इतकंच.

तर कविता अशी येत गेलेली आहे. मी जी कविता लिहिली तिच्या रुपाबद्दल, आशयाबद्दल विविध मते असू शकतात. तशी ती प्रत्येक कवीच्या कवितांबाबत असू शकतात. पण मला असं वाटतं की स्वत:च्या कवितेचं मूल्यमापन करायची एक दृष्टी कवीमध्ये विकसित व्हायला हवी. मी मुद्दामच ‘दृष्टी’ असं म्हणतोय. समीक्षेची क्षमता नसणं हे मी समजू शकतो. पण एक प्रगल्भ अशी, तटस्थपणे स्वत:च्या कवितेचं अवलोकन करु शकणारी ‘दृष्टी’ मात्र कवीकडे असावी असं वाटतं. आपली कविता काय सांगू पाहते आहे. याची उमज कविता लिहिण्याच्या प्रवासात पडत जायला हवी. कवितेमध्ये अतीभावनिक गुंतवणूक असण्यापेक्षा बौद्धिक गुंतवणूक असेल तर कविता अधिक सशक्त होते असं माझं निरीक्षण आहे. मी याआधी ज्या प्रेमभंगाच्या कवितांचा उल्लेख केला त्या माझ्या कविता अतीसामान्य दर्जाच्या आहेत. त्यामुळे त्या मी कधीच पुढे आपल्या नाहीत. पण ती सुरुवात होती. ते कवितेशी पहिलं ‘एनकाऊंटर’ होतं. त्यामुळे अत्यंत उत्कटतेने लिहिलेली कविताही सामान्य दर्जाची होती. अर्थात मी म्हटलं तसं तिथेच प्रकरण आटोपलं नाही याचं मला फार बरं वाटतं. कविता आणि आपण या सहप्रवासात जी व्यापक दृष्टी विकसित व्हायला हवी ती झाली याचा मला आनंद होतो. महत्त्वाचा धडा हा की अत्यंत उत्कटतेने लिहिलेली कवितादेखील सामान्य दर्जाची असू शकते. बरेचदा होतं असं की स्वत: कवीच कवितेचा शत्रू ठरतो. कारण आपण जी कविता लिहू ती चांगलीच असणार असा त्याने ग्रह करुन घेतलेला असतो. कविता लिहिणं ही मोठीच गोष्ट आहे. कवितानिर्मितीचा आनंद होणं, अतिशर तरल भावावस्था निर्माण होणं, शब्दांच्या, शब्दार्थाच्या प्रेमात पडून मन त्यातच गुंतलेलं राहणं हे सगळं समजण्यासारखं आहे. कविता लिहायला सुरुवात होतानाच्या काळात तर हे होणं अगदीच स्वाभाविक आहे. (मी २००६-०७ साली फेसबुकवर नव्हतो याचं मला कधीकधी बरं वाटतं. नाहीतर ‘झाली कविता की टाक फेसबुकवर’ असं करुन स्वत:ला आणि कवितेला बिघडवून घेतलं असतं.) कवितेची मोहिनी जबरदस्तच आहे. पण म्हणूनच तिथे सांभाळावंही लागतं. ‘व्यक्त होणं’ हा आजचा युगधर्म आहे आणि सतत व्यस्त होण्याने आज एकूणच ‘समाज स्वास्थ्य’ धोक्यात आलंय की काय अशी मला भीती वाटते. या अती व्यक्त होण्याने कवितेलाही इजा पोचवली आहे.

मी स्वत: फेसबुक कवी असल्याने त्याबाबत थोडं विस्ताराने बोलणं इष्ट होईल. मी वर उल्लेख केलेले धोके स्वत:देखील अनुभवले आहेत. क्षणात शे-पाचशेजणांपर्यंत पोचण्याची सोय असलेलं व्यासपीठ हाताशी असताना त्याचा सतत वापर करण्याचा मोह टाळणं हे तसं अवघडच आहे. मी बरेचदा कविता पोस्ट करण्यापासून स्वत:ला परावृत्त केलं आहे. दोन कवितांमध्ये किमान पंधरा-एक दिवसांची तरी गॅप असावी असं मी माझ्यापुरतं ठरवून घेतलं होतं आणि ते मी बर्याधपैकी पाळलेलं आहे. या माध्यमामुळे कवितेलाही व्यासपीठ मिळालं ही एक जमेची बाजू असली तरी याच व्यासपीठावर कवितेची थट्टाही झालेली आहे आणि ही थट्टा व्हायला अतीउत्साही कवीच कारणीभूत आहेत. वास्तविक मी वर म्हटलं तसं कविता लिहिणं, कवी असणं ही एक विशेष गोष्ट आहे. पण या विशेषत्वाचा आबही राखता यायला हवा. मासिकांमध्ये जेव्हा कविता प्रकाशित होतात तेव्हा ज्या वाचकाला कवितेत फारसा रस नाही त्याला ती पाने टाळता येतात. फेसबुक या ‘दैनिका’त होतं असं की तुमच्या डोळ्यासमोर सतत कविता येत जाण्याची शक्यता असते आणि त्यातून वाचकाचा (यूझरचा) वैताग बहुधा वाढत जातो. मी याबाबत मागे एकदा फेसबुकवरच सविस्तर लिहिलं होतं.

मी कविता लिहू लागल्यावर मला स्वत:त काही बदल जाणवले का? याचं उत्तर ‘हो’ असं आहे. मी स्वत:शी जास्त बोलू लागलो. मला असं जाणवू लागलं की आपल्या जाणिवांची उगमस्थानं वाढली आहेत. माझा माझ्याशी होणारा ‘डायलॉग’ अनेकानेक नव्या जाणिवांसह होऊ लागला. मी, माझं पर्यावरण, मी माझी नेहमीची जागा सोडून इतरत्र जातो तेव्हा त्या प्रवासातलं पर्यावरण, जिथे जातो तिथलं पर्यावरण - हे सर्व चिमटीत धरायचा प्रयत्न होऊ लागला. मला या विविध पर्यावरणांवर ‘भाष्य’ करण्यासाठी एक ‘फॉर्म’ मिळाला. एकदा पुणे-दापोली प्रवासात असताना बसमध्ये गर्दी होती. त्या गर्दीत ‘माणसं’ यावरच एक कविता लिहिली गेली. हे सर्वच कवीचं होतं का मला माहीत नाही. पण प्रवास हा मला लिहिण्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे. (विंदा करंदीकरांच्या एका कवितासंग्रहातील कवितांखाली तारीख आणि त्या त्या गावा/शहरांची नावं आहेत. ते वाचून मला बरं वाटलं होतं) एका जागी अडकून राहणं कवी-लेखकासाठी वाईटच. (मात्र मला हा विषय निघाला की हटकून जीएंची आठवण होते. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या आयुष्यातला बहुतेक सर्व काळ ते धारवाडमध्ये राहिले. एकाच गावात राहून त्यांनी त्यांच्या कथांमधून जी सृष्टी निर्माण केली, ज्या प्रतींचं लेखन केलं ते पाहिलं की अवाक् व्हायला होतं!) फिरते राहिलो तर मेंदूतली विविध केंद्रंही फिरती राहतात.

कवितेची ‘स्टोरी’ तशी मोठी आहे. जगताना कुठे कुठे अडखळलो, कुठे कुठे ठेचा लागल्या, दु:खही-आनंदही-प्रेमही-रागही-रितेपणही-भरलेपणही असं सगळं कधी-कुठे अनुभवलं त्याची एक स्पष्ट-अस्पष्ट गोळाबेरीज म्हणजे कविता. कविता म्हणून जे काही लिहिलं ते लिहिताना मला माझ्या अस्तित्वाच्या एका अज्ञात उंचीवरच्या टोकाला जाता आलं. आपण तिथेच कायम राहिलो तर काय होईल हा प्रश्न थोडा अप्रस्तुत आहे, कारण वास्तवात ते कुठल्याच कवीला शक्य होत नाही असं मला वाटतं. पण विचार केला की वाटतं की त्या टोकाला कायम राहणं म्हणजे स्वत:ला अनुभवाच्या अंतिमतेशी जोडून घेणं आहे. असं राहणं हे कसं असेल? आनंददायी असेल की दु:खदायी? जो अनुभव गाठीशी आहे तो सांगतो की या टोकाला काहीच जाणवत नाही. शब्द आपल्याला मुक्त करतात. आपला तात्पुरता लय होतो आणि पुन्हा जिवंत होऊन आपण त्या टोकावरुन खाली ऐहिकाकडे येतो. त्यामुळे तिथेच कायम राहायचं असेल तर ते ऐहिकाशी कायमचं तुटलेपण असेल. तिथली भूमी वेगळी आहे. मुख्य म्हणजे ती सीमांनी बद्ध असलेली भूमी नाही. तिथे फक्त आपण आणि अमर्याद भूमी एवढंच आहे. तिथे आपल्याला जे दिसतं ते वेगळं आहे. तिथले नाद आणि प्रतिमा वेगळ्या आहेत. तिथे आपण जे अर्थांकन करतो ते वेगळं आहे. तिथे जातो तेव्हा आपण नवे होतो, अनोळखी होतो, स्वतंत्र होतो. 

हे जरी खरं असलं तरी आपण तिथे जाऊ शकतो यात आपलं कर्तृत्व काय आहे असाही प्रश्न मी स्वतःला विचारत असतो. म्हणूनच तिथे जे जाऊ शकतात त्यांनी अभिमान व नम्रता दोन्ही बाळगणं गरजेचं आहे असं वाटत राहतं. आणि कवितेविषयी मौन बाळगण्यातच शहाणपण आहे हेही जाणवत राहतं!

(पूर्वप्रसिद्धी : रेषेवरील अक्षरे, कविता विशेषांक : दिवाळी २०१५) 

Thursday, September 3, 2015

एक लिबरल हिंदू मनोगत 

डॉ. कलबुर्गी यांची हत्या, त्यावरील बजरंग दलाच्या सह-समन्वयकाचे ट्वीट या पार्श्वभूमीवर मी काही लिहिलं होतं. त्याचा समारोप करताना मी 'अजिबात भावनिक न होता पूर्णपणे स्ट्रॅटेजिक विचारच करावा लागेल' असं म्हटलं होतं. त्या पोस्टवर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यापैकी काहींच्या अनुषंगाने मला बोलायचं आहे. पण त्याआधी थोडी प्रस्तावना आवश्यक आहे.

मला धर्मविरहीत जगण्याची कल्पना आकर्षित करते. मी स्वतः खरं तर तसं जगतो आहे. आणि ते केल्याने मला काहीही अडचण आलेली नाही. पण अर्थातच हे सगळं इतकं सोपं नाही याची मला कल्पना आहे. म्हणजे प्रत्येकाला धर्मविरहित जगता येईल असं नाही. वेगवेगळ्या प्रसंगी मी वैयक्तिक दुःख इतरांसारखंच अनुभवलं आहे, पण मी एका टोकाचं दुःख, अस्तित्व पणाला लागतं असं दुःख अनुभवलेलं नाही. उदा. माझं घर भूकंपात पडलेलं नाही किंवा आगीत जळालेलं नाही, माझ्या घरातील कुणी कधी दंगलीत, अपघातात मारलं गेलेलं नाही. मला अतिशय हलाखीत दिवस काढायला लागलेले नाहीत. मी स्त्री नसल्यामुळे मला आपल्या समाजातील स्त्रीच्या मानसिकतेतील असुरक्षिततेचा अनुभव नाही.

एकूणात माझा जो काही थोडाफार संघर्ष असेल तो एक मध्यमवर्गीय संघर्ष आहे. माझं माझ्या दुःखांशी वैर नाही, पण मला दुःख झालं असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा ते मी माझ्या सामाजिक स्थानासकटच म्हणत असतो याचं भान मला ठेवावं लागतं. उदा. सकाळचीच भाजी काय संध्याकाळी असं वाटून जेव्हा मी वैतागतो तेव्हा असं वाटण्यात फार मोठा गुन्हा आहे असं नाही, पण सकाळची भाजी संध्याकाळी मिळणं हेदेखील काही लोकासांठी सुख असू शकतं ही जाण मला ठेवावीच लागते.

माझ्यासारखा माणूस जेव्हा 'माझा' म्हणून विचार करतो तेव्हा मला 'माझा' विचार करण्याइतपत लिबर्टी आहे हे मला लक्षात ठेवावंच लागत. कारण मी जो काही विचार करतो, करू शकतो त्यात माझ्या व्यक्तिगत आयुष्यातील घडणीचा सहभाग असतो. माझ्या सामाजिक स्थानाचा सहभाग असतो. मी जर एखाद्या वेश्येच्या पोटी जन्माला आलो असतो तर मी कसा विचार केला असता? मी जर दंगलीत मारल्या गेलेल्या आई-वडिलांचा मुलगा असतो तर मी कसा वाढलो असतो? मी जर हातावर पोट असणाऱ्या एखाद्या मजुराचा मुलगा असतो तर मी कसा विचार केला असता?

आपल्याला दुःख असणं हे मला मान्यच आहे. पण आपल्या दुःखाची प्रत, त्याची जातकुळी ओळखण्याइतपत आपला मानसिक विकास व्हायला हवा यात मला शंका वाटत नाही. मी जर समाजाचा भाग असेन तर समाजविचार सोडून विचार करणं मला योग्य वाटत नाही.

म्हणूनच मी धार्मिक नसलो तरी धर्म, श्रद्धा या गोष्टींकडे मला काळजीपूर्वक बघावं लागतं हे मला विसरून चालत नाही. धर्म, श्रद्धा या गोष्टींकडे विविध संदर्भात बघावं लागतं. श्रद्धेला संपूर्ण न नाकारता, सत्प्रवृत्त माणसांच्या श्रद्धेचा अनादर न करता माझ्यासारख्या अश्रद्ध माणसांना त्यांचं म्हणणं मांडता यायला हवं. मी उद्वेगाने अनेक वेळा धर्माबद्दल तिरकसपणे लिहिलं आहे, पण तो हल्ला अर्थातच धर्माचे नकारात्मक परिणाम, धर्माच्या अतिरेकामुळे येणारं अवलंबित्व, विचारशक्तीचा ऱ्हास यावर आहे. मला असं वाटतं की स्वतंत्र विचाराची शक्ती असेल तर वेश्येच्या पोटी जन्माला आलेला मुलगा असो की मजुराच्या पोटी जन्मलेला मुलगा असो की एखाद्या विचारवंताच्या पोटी जन्माला आलेला मुलगा असो - सगळ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते. ही शक्ती धर्म देतो असं मला वाटत नाही. मार्क्सचं 'धर्म ही अफूची गोळी आहे' हे वाक्य वारंवार उद्धृत केलं जातं, पण त्या वाक्याआधी जी संपूर्ण मांडणी आहे ती बरेचदा वाचली जात नाही. ती मुद्दाम इथे देतो -

Man makes religion, religion does not make man. Religion is, indeed, the self-consciousness and self-esteem of man who has either not yet won through to himself, or has already lost himself again. But man is no abstract being squatting outside the world. Man is the world of man – state, society. This state and this society produce religion, which is an inverted consciousness of the world, because they are an inverted world. Religion is the general theory of this world, its encyclopedic compendium, its logic in popular form, its spiritual point d’honneur, its enthusiasm, its moral sanction, its solemn complement, and its universal basis of consolation and justification. It is the fantastic realization of the human essence since the human essence has not acquired any true reality. The struggle against religion is, therefore, indirectly the struggle against that world whose spiritual aroma is religion.
Religious suffering is, at one and the same time, the expression of real suffering and a protest against real suffering. Religion is the sigh of the oppressed creature, the heart of a heartless world, and the soul of soulless conditions. It is the opium of the people.

शेवटच्या परिच्छेदात मार्क्स म्हणतो की धर्म हा हृदयशून्य जगाचे हृदय आहे, आत्मा हरवलेल्या परिस्थितीचा आत्मा आहे. धर्म ही अफूची गोळी आहे.

मी धार्मिक मनुष्य नाही. अज्ञेयवादी आहे. घरात देवघर नाही. पण मी क्वचित कधी सत्यनारायणाचं बोलावणं आलं तर जातो. नमस्कारही करतो. ते औपचारिकच असतं, पण निमंत्रणाला नकार देणं काहीसं जड जातं. मी धार्मिक नसलो तरी भिडस्त आहे. पटकन नाही म्हणता येंत नाही. वैचारिक समता की माणसाशी जोडलेपण असा प्रसंग आला तर मी जोडलेपणाची निवड करेन. अर्थात त्यासाठी माणूस सत्प्रवृत्त, हिंसा न करणारा, हिंसेवर विश्वास नसलेला असायला हवा. धार्मिक माणूस सत्प्रवृत्त असूच शकतो. धर्मांध माणूस नाही. मुळात धर्म हे माझ्या दृष्टीने एक कोडं आहे. (धर्म हा शब्द मी सगळीकडे हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन इ. संघटित धर्म या रूढ अर्थानेच वापरतो आहे.)

हे सगळं सांगणं आवश्यक वाटलं कारण मला पुढे जे म्हणायचं आहे ते म्हणायच्या आधी माझी व्यक्तिगत भूमिका काय हे सांगणं गरजेचं वाटलं.

मागे एकदा याकूब मेमनच्या फाशीबाबत लोकसत्तात जो अग्रलेख आला होता त्यावरील एका प्रतिक्रियेला मी प्रतिक्रिया दिली. ती वाचून अर्थातच पुन्हा प्रतिक्रिया आल्या. स्वामीजी निश्चलानंद यांनी तीव्र नकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यांना मी दहशतवादाचं समर्थन करतो आहे असं वाटलं. त्यावर मी दहशतवादाचं समर्थन करत नाही असं म्हणून त्यांची माफी मागितली. मनापासून मागितली. मला असं वाटतं की मी ही माफी मागितली पाहिजे, कारण मी जेव्हा तिरकसपणे काही लिहितो तेव्हा कदाचित काही सत्प्रवृत्त माणसांनाही मी दुखावलं असेल. आणि अशा वेळी माफी मागण्यात कमीपणा वाटायचं कारण नाही. कारण माणूस दुखावला गेला आहे हे सत्य मला नाकारता येत नाही.

डावे-उजवे-मधले हे सगळे विचाराने कुठल्याही बाजूचे असले तरी ती माणसं आहेत आणि म्हणून परिवर्तनीय आहेत असं मला वाटतं. मला सोशल मीडियाची भीती वाटते ती या माध्यमामुळे आपण अधिकाधिक एकारलेले, अपरिवर्तनीय होत आहोत असं वाटतं म्हणून. आपण फार तीव्रतेने भांडतोय. सतत भांडतोय. 'आपलं चुकू शकतं' हे आपण विसरतोय का? आपण सगळे मुळात एकाच व्यवस्थेत राहतोय. तुम्ही कम्युनिस्ट असा किंवा उजवे असा, ऑफिसातला बॉस किंवा व्यावसायिक असू तर आपले क्लायंट्स हेच आपले नियंत्रक आहेत हे सत्य आहे. आपल्याला आपल्या वॉर्डमधल्या नगरसेवकाचे 'की रिझल्ट एरियाज' माहीत आहेत का? अशा वेळी आपण पंतप्रधान, आरबीआयचे गव्हर्नर यांच्या कामाविषयी बातम्या, लेख याच्या आधारे जोरात भांडू शकतो याची मला मौज वाटते.

सोशल मीडियाच्या या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर सिलेक्टिव्ह निषेधाचा मुद्दा पुढे येतो.

मुस्लिम दहशतवाद, मुस्लिमांकडून झालेले/होणारे अत्याचार याबाबत पुरोगामी इ. लोक काही बोलत नाहीत असा एक आक्षेप अनेकजण नेहमी घेतात. याबाबत पुढे काही लिहिण्याअगोदर मी हे कबूल करतो की या आक्षेपात तथ्य आहे. यामागची कारणं सांगता येतील. पण ही वस्तुस्थिती आहे असं मला वाटतं. याचाच थोडा परामर्श घ्यावा असं वाटतं.

मुस्लिम हे अल्पसंख्य आहेत आणि त्यांना या देशात सुरक्षित वाटणं गरजेचं आहे, मुस्लिम दहशतवादाचं रूप उग्र असलं तरी प्रत्येक मुस्लिम दहशतवादी नसतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे असा एक विचार आहे आणि मीदेखील हा विचार मानणाऱ्यांपैकी आहे. मुस्लिम शासकांनी इथे, विशेषतः उत्तर भारतात अनेक शतकं राज्य केलं. बाबराने इब्राहिम लोधीचा पराभव केला तो १५२६ मध्ये. तिथून मुघल साम्राज्याची सुरूवात होते. इब्राहिम लोधीच्या आधी त्याचा बाप सिकंदर लोधी, त्याआधी सिकंदर लोधीचा बाप बहलोल खान, त्याआधी सईद साम्राज्य असा सगळा इतिहास पुष्कळच मागे जातो. आणि त्यात केवढी गुंतागुंत असेल याची कल्पनाच केलेली बरी.
आर्य बाहेरूनच आले आणि त्यांनी इथल्या लोकांना दास केलं अशी जी मांडणी आहे त्याला आंबेडकरांनी आक्षेप घेतला आहे. 'शूद्र पूर्वी कोण होते?' या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात हे सगळं त्यांनी विस्तृतपणे मांडलं आहे. वैदिक परंपरेला आव्हान देणारी श्रमण परंपरा, इतर अनेक पंथ असं बरंच काही इथे घडलेलं आहे. त्यावर पुष्कळ संशोधन झालं आहे. अनेक मत-मतांतरे आहेत. त्यात शिरणं हा माझा उद्देश नाही. माझी तेवढी कुवतही नाही. हे सगळं सांगावसं वाटलं कारण या देशाच्या इतिहासाबाबत काहीही विधान करणं अशक्य आहे असं मला वाटतं. माझं इतिहासाबाबत एवढं एकच मत ठाम आहे. एकाने काही मांडलं की त्यावर दुसरा आक्षेप घेतो, दुसऱ्याने काही मांडलं की त्यावर तिसरा आक्षेप घेतो. भारताचा इतिहास हा बाकी काही नाही तरी आक्षेपांचा इतिहास आहे हे नक्की!

आता या अत्यंत म्हणजे अत्यंत गुंतागुंतीच्या संस्कृतीत, समाजात काहीजण फक्त एकच झेंडा घेऊन उभे आहेत. काहीजण हिंदुत्वाचा झेंडा घेऊन उभे आहेत - मुस्लिम इथले नाहीत, आक्रमक आहेत, त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे ही त्यांची भूमिका आहे. माझ्यासारखे काही आधुनिक विचारांचा झेंडा घेऊन उभे आहेत - धर्म वगैरे विसरा आता आणि खऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्या ही माझी भूमिका आहे. मुस्लिम मूलतत्त्ववादी इस्लामचा झेंडा घेऊन उभे आहेत - त्यांना हिंदू बहुसंख्यांचा धोका वाटतो.

आता आपण माझ्याबद्दल बोलू. मी हिंदू धर्मातील वाईट गोष्टींबाबतच का लिहितो? मला मुस्लिम समाजातील दोष दिसत नाहीत का?

याची ठळक कारणं -

मी लिबरल हिंदू घरात जन्माला आलो. लहानपणी मुस्लिम लोकांमध्ये पुष्कळ वावरलो. अगदी घरातल्यासारखा. ('असलेपण-नसलेपण' या माझ्या ब्लॉगवरील लेखात मी याबाबत सविस्तर लिहिलं आहे.) दंगल पाहिली तेव्हा मुस्लिम काय किंवा हिंदू काय, आक्रमक म्हणून कुणीच लक्षात राहिले नाहीत. दंगलीची प्रत्यक्ष झळ पोचली नाही. हिंदू घरात वाढत होतो त्यामुळे हिंदू परंपरा जवळून पाहिल्या. हिंदू समाजात सतीसारख्या काही भयंकर परंपरा होत्या हे कळलं. देवाची मूर्ती काहीही म्हणजे काहीही करू शकत नाही हे कळलं. पुढे मग सगळंच फोल वाटू लागलं. सामाजिक वाचन झालं त्यात हिंदू समाज, हिंदू धर्मसुधारणा याचाही समावेश होता. धार्मिक वाचन झालं नाही. आईने एकदा लहानपणी शनिमाहात्म्य वाचून दाखवलं होतं. तेव्हा मला साडेसाती सुरू होती म्हणून. पण ती शनीची गोष्ट मी गोष्ट म्हणूनच ऐकली होती. मोठेपणी गीतारहस्य उत्साहाने वाचायला घेतलं होतं, पण ते काही झेपेना. भक्तीयोगात मला शरण जा, माझी भक्ती करा असं काही यायला लागलं तेव्हा कंटाळा अधिकच वाढला. देव समजा ठीक आहे, पण देवळाच्या बाहेर भिकारी का असतात? आत देव - सगळ्या जगाचा त्राता आणि त्याच्या दाराबाहेर भिकारी कसे? पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून अर्ध्या किलोमीटरवर वेश्यावस्ती आहे. मंदिरात जाणं योग्य, पण या बायकांशी बोलणं चांगलं नाही असं का? असे प्रश्न पडू लागले. मला असं लक्षात येऊ लागलं की आपण भौतिक जगाकडे आस्थेने बघणाऱ्यांपैकी आहोत. आपल्याला अध्यात्माची गोडीच नाही. आपल्याला जमिनीवरचे, जगण्याचे प्रश्न जास्त खुणावतात. आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला गणपतीकडे बघून काही वेगळं, शांत, प्रसन्न असं वाटत नाही. आपल्याला त्या वेश्येमध्ये रस आहे. आपल्याला तिच्याशी बोलावसं वाटतं. या जगात दुःखाचं एक मूलभूत कारण पैसे नसणं हे आहे. असं असताना धर्म त्याबद्दल काय सांगतो? तर काही नाही. धर्म म्हणतो की पैसे कसे कमवायचे ते तुमचं तुम्ही बघा. पण तुम्ही पैशासाठी वेश्याव्यवसाय करणं वाईट. आणि ते करणारेही वाईट. पण मग जिला फसवून या व्यवसायात आणलं ती वाईट कशी?

धर्माने मला, म्हणजे प्रश्न विचारणाऱ्या माणसाला काय दिलं? किंवा धर्मपालन करणाऱ्या आसपासच्या लोकांनी मला वैचारिकदृष्ट्या काय दिल? तर काही नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरं ते देऊ शकत नव्हते. त्यांच्या श्रद्धेला माझा विरोध नव्हताच, पण ते बदल घडवून आणू शकत नाहीत हे लक्षात येत होतं. धर्म माणसांना एकत्र ठेवतो असं सांगण्यात येतं. पण जर सगळ्यांना व्यवस्थित पैसे मिळाले आणि सगळ्यांनी नागरिकशास्त्राचे नियम पाळले तरी सगळे एकत्र राहतीलच की. उलट ते अधिक चांगल्या पद्धतीने एकत्र राहतील. मग सगळ्यांकडे पैसे असतील, सगळेजण नागरिकशास्त्र समजून घेतील यासाठी काय करायचं?

ऐहिक जगाचे प्रश्न सोडवण्यासाठी अध्यात्म किंवा धर्म कसे उपयोगी पडतील, मुळात उपयोगी पडू शकतील का असा विचार मी केला नाही हेही खरं आहे. कारण त्यातला रसच संपला होता. माझी वैचारिक भूक भागत नव्हती त्यामुळे धर्माबद्दलची माझी आस्था संपली होती. आपल्या प्रश्नांची उत्तरं धर्मात, परंपरांमध्ये नाहीत हे लक्षात आलं.
माझ्या आसपासचे लोक हिंदू होते. आहेत. ज्या सार्वजनिक उत्सवांमुळे त्रास झाला (आवाज, गर्दी, लोकांची गैरसोय) ते प्रामुख्याने हिंदू उत्सव होते. माझ्यावर ज्यांचा प्रभाव पडला त्या गांधींना मारणारे हिंदू होते. दुसरा प्रभाव म्हणजे आंबेडकर. त्यांनी ज्या समाजातील जाती-आधारित शोषण मला दाखवलं तो हिंदू समाज होता. दाभोळकरांची हत्या झाल्यावर त्यांच्या चित्रापुढे फुली मारणारी सनातन प्रभात ही हिंदू संघटना आहे. स्टेन्स आणि त्यांची दोन लहान मुलं यांना जिवंत जाळणारा दारासिंग हा कट्टर हिंदुत्ववादी होता. कुलबर्गी यांच्या हत्येनंतर ट्वीट करणारा हिंदुत्ववादी होता. दंगलीचा संदर्भ मी देत नाहीये. कारण त्यात दोन्हीकडील माथेफिरू असतात. आणि गरीब हिंदू व गरीब मुस्लिम श्रीमंत हिंदू आणि श्रीमंत मुस्लिमांनी भडकावल्यामुळे मूर्खपणे एकमेकांचे गळे कापतात. दंगल हा एक वेगळाच विषय आहे. मी काही सुटे प्रसंग देतोय ज्यात दंगल वगैरे नसताना अचानकपणे हत्याकांड घडलेलं आहे.

वर उल्लेख केलेल्या कट्टर हिंदुत्ववाद्यांप्रमाणेच कट्टर मुस्लिमांनी इथे अलिकडे अशा प्रकारची हत्याकांडे केली आहेत का? माझ्या माहितीत तरी नाही. आणि जर असं काही घडलं असेल तर ते निषेधार्हच आहे.
मी हिंदू धर्माची माझ्या कुवतीनुसार थोडीफार चिकित्सा करतो, करू शकतो कारण माझ्याकडे तेवढी सामग्री आहे. माझ्याकडे मुस्लिम धर्माविषयीची इतकी सामग्री नाही.

थोडक्यात, 'मला धर्म नाही आणि मला धर्मविरहित जगू द्या' हे मी आज सांगत असलो तरी मी ज्या धर्माला पाहिलं, अनुभवलं आणि ज्या धर्मामुळे मला वैचारिक त्रास झाला तो हिंदू धर्म होता. मी मुस्लिम असतो आणि लिबरल असतो तर मी मुस्लिम धर्माची चिकित्सा केली असती. कारण त्यावेळी माझ्याकडे मुस्लिम धर्माविषयीची सामग्री असती.

आता ही चिकित्सा करताना मी उपरोधिक झालो आहे हे खरं आहे. आणि त्यामुळे कुणा सत्प्रवृत्त धार्मिक माणसाला मी दुखावलं असेल तर त्याबद्दल मी दिलगीर आहे. मला 'खुमखुमी' येते हे खरं आहे, कारण धर्मांधता माझ्यातल्या क्रिएटिव्ह माणसाला जागं करते.

मला मुस्लिमांचा त्रास कुठे दिसतो? अर्थातच दहशतवादी कृत्यात. मग मी त्या हल्ल्यांनी व्यथित होऊन लेख लिहिला का? निषेधाची कविता केली का? नाही केली. याचं कारण? माहीत नाही. मला काही सुचलं नाही इतकंच. ’मला का सुचलं नाही’ याचं विश्लेषण होऊ शकतं. आणि मी त्याबाबतीतील प्रश्नोत्तरांना तयार आहे.

मी स्वतः 'पुरोगामी' गटातला आहे. म्हणजे मला या गटातील लोकांचं सगळं पटतं का? नाही. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण द्यावं का? खुशाल द्यावं. महाराष्ट्र भूषण हा एक फार मोठा पुरस्कार आहे असं मला वाटतं का? अजिबात नाही. नोबेल पुरस्कार मिळालेल्या माणसाहून नोबेल न मिळालेला भारी माणूस जगात असू शकतो का? हो. असू शकतो. दाभोळकर, पानसरे यांचे मारेकरी सापडले तर त्यांना फाशी द्यावी का? देऊ नये. माझ्यावर दाभोळकर, पानसरे यांचा प्रभाव आहे का? अर्थातच आहे. औरंगजेब रोडचं नाव बदलायला माझी काही हरकत? अजिबात नाही. महात्मा गांधी रोडचं नावदेखील बदलावं. त्यांचे पुतळे वगैरेसुद्धा काढावेत. 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक बंद करावं का? करू नये. माझ्या आसपास गांधींना मनसोक्त नावं ठेवणारे लोक आहेत. मी त्यांच्याशी प्रतिवाद करतो का? नाही करत. कारण गांधी न आवडणारे लोक असू शकतात हे मला स्वीकारता आलंच पाहिजे असं मला वाटतं. गांधींवर जे जे आक्षेप आहेत ते ते मला तपासावेसे वाटतात. कारण गांधींचा माझ्यावर प्रभाव आहे. मी त्यांचा भक्त नाही. ज्या दिवशी मी 'भक्त' होईन त्या दिवशी मी संपेन असं मला वाटतं.
माझ्यासमोर आव्हान हे आहे की मी गांधी विचार रस्त्यांची नावं, पुतळे याशिवाय लोकापर्यंत कसे पोचवू शकतो हे बघण्याचं. मला 'गांधी' लोकांपर्यंत पोचवायचे नाहीत. गांधी विचार पोचवायचा आहे.

गांधींचा खून झाल्यावर ब्राह्मणांची घरं जाळली गेली तेव्हा ती वाचवण्यासाठी गांधीवादी मंडळीसुद्धा गेली होती. आता समजा गोळवलकर गुरुजींची हत्या झाली असती तर आपल्याकडे काय घडलं असतं? हिंदुत्ववादी मंडळींनी 'हो, मी गोळवलकरांना मारलं' अशा नावाचं नाटक चालू दिलं असतं का? हत्या समजा मुस्लिम माणसाने केली असती तर मुसलमानांची घरं वाचवायला हिंदुत्ववादी गेले असते का? गांधीप्रणित सहिष्णुता आणि धर्मप्रणित असहिष्णुता यात हा जो फरक आहे तो आपण, विशेषतः हिंदुत्ववादी मित्रांनी लक्षात घेतला पाहिजे.

आता शेवटचं.

'पुरोगामी' या शब्दाबद्दल आणि त्या विचारांच्या लोकांबद्दल आज जी नाराजी दिसते तिकडे दुर्लक्ष नाही करता येणार. आपण स्वतःला तपासलं पाहिजे. आपण खरोखरच सिलेक्टिव्ह निषेध करतो का? आपण खरोखरच काहीही झालं तरी मुस्लिमांची बाजू घेतो का हे तपासलं पाहिजे. देशांतर्गत ज्या काही घटना होत आहेत त्यात मुस्लिम दोषी असतील तर ते दोषी आहेत हे ठामपणे म्हटलं पाहिजे. मुळात हा हिंदू-मुस्लिम असा प्रश्नच नाही. आपण गुन्हेगारांचा निषेध करणार असू तर सर्वच गुन्हेगारांचा निषेध करायला हवा. मला कल्पना आहे की कदाचित असा निषेध होऊनदेखील उजव्या विचारांच्या लोकांपर्यंत तो पोचला नसेल. पण तरी त्यांच्यात जी नाराजी दिसते ती अशी दुर्लक्षून चालणार नाही असं मला वाटतं. आपण आपला विचार फक्त निषेधाच्या माध्यमातून कसा पोचवू शकणार? परिवर्तनाच्या चळवळीत अनेक मोठे कार्यकर्ते होऊन गेले. अनेक कार्यकर्ते आजही काम करत आहेत. पण संघाच्या शाखा झपाट्याने वाढतात आणि परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यक्रमाला परिवर्तन झालेले लोकच जास्त प्रमाणात असतात हे का? धर्म आणि श्रद्धा या देशातल्या लोकांच्या डीएनएमध्ये आहे. कदाचित परिवर्तन माझ्या डीएनएमध्ये आहे तसंच. म्हणून आपल्याला वादापेक्षाही कल्पकता दाखवावी लागेल. संध्याकाळी खेळायला म्हणून मुलांना एकत्र करून संघाची शाखा भरवली जाते. ही कल्पना चांगली आहे. आपण परिवर्तनाचा विचार अशा माध्यमातून रुजवू शकतो का? खेळण्यासाठी मुलांना एकत्र करून त्यांच्यात वैज्ञानिक विचार रुजवता येतील का? आपण परिवर्तनवादी आहोत याचा आपल्याला अहंकार आहे का? आपण सामान्य माणसाशी जोडून घेऊ शकत नाही आहोत का? धर्माची चिकित्सा तर व्हावीच, पण आपण फक्त तेवढंच करतो आहोत का? आपण पर्याय देतो आहोत का? आपल्याला परिवर्तन हवं आहेच, पण असे अनेक प्रश्नही आपण आपल्याला विचारले पाहिजेत. कारण आपण प्रश्न विचारणारेच लोक आहोत. त्यातून आपली स्वतःचीदेखील सुटका नाही.

भारतातील खरा झगडा हा हिंदू-मुस्लिम नसून कम्युनल हिंदू आणि लिबरल हिंदू हा आहे असं राम मनोहर लोहियांनी म्हटल्याचं स्मरतं. मला असं वाटतं हे दोघे एकत्र आले, किमान त्यांच्यातले ताण कमी झाले तर कदाचित आपल्याकडचे बरेच प्रश्न सुटतील. विभागला गेलेला फोर्स एकत्र येईल. हा भाबडेपणा आहे हे मला मान्य आहे. पण तरी मी हे म्हणतो आहे. कदाचित भाबडेपणा हाच माझा स्ट्रॅटेजिक विचार असेल.

३ सप्टेंबर २०१५, फेसबुक पोस्ट


Sunday, March 1, 2015

नॉकआउट अभिव्यक्ती

‘एआयबी नॉकआउट’च्या ‘रोस्ट ऑफ रणवीर सिंग अँड अर्जुन कपूर’ मुळे वादंग निर्माण झालं आहे. यूट्यूबवर जेव्हा मी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा हा कार्यक्रम वादाला आमंत्रण देईल असं वाटून गेलं होतं. ते पुढे खरं ठरलं. यूट्यूबवर जो व्हिडिओ उपलब्ध आहे त्याच्या सुरुवातीला ‘एडिटेड फॉर यूट्यूब’ अशी सूचना आहे. म्हणजे प्रत्यक्ष कार्यक्रमात कदाचित अजून ‘मटेरियल’ असेल!

नाटकाचं स्टेज आणि सिनेमाचा पडदा या अशा गोष्टी आहेत की तिथे जे व्यक्त केलं जाऊ शकतं ते प्रत्यक्षात केलं तर त्याला समाजमान्यता मिळेलच असं नाही. शिवाय स्टेजवर किंवा पडद्यावर काय करावं, बोलावं याबाबतही साधारण संकेतांच्या बाहेर काही गेलं की प्रतिक्रिया उमटू लागतात. अनेक वर्षांपूर्वी ‘चोली के पीछे क्या है?’ हे गाणं वादग्रस्त ठरलं होतं. गाणं गाजलं, वाद शमला आणि त्यानंतर मग बरीच द्विअर्थी गाणी आली, ज्यांचं कुणाला फारसं काही वाटलं नाही. आज आयटम साँगचे शब्द कुणाला दुखावत वगैरे नाहीत. त्यात काव्यगुण नसले आणि बरेचदा या गाण्यांचा रोख सवंगतेकडे असला तरी. ‘क्या मै जवानी का अचार डालूंगी?’ असे शब्द असलेलंही गाणं मागे एका चित्रपटात येऊन गेलं होतं. वास्तविक आयटम साँगसुद्धा कलात्मक उंची गाठू शकतं हे गुलजारसारखा प्रतिभावंत जेव्हा 'कजरारे’ किंवा ‘बीडी जलायले’ सारखी गाणी लिहितो तेव्हा पटतं. पण गोची तिथेच आहे. 

ही गोची आहे आकलनाची, अनुभवाची आणि दृष्टीची. मी आणि माझ्यासारख्या अनेकांची (ज्यांचा संगीत या विषयाचा खूप अभ्यास नाही) संगीत या कलेबाबत जी भूमिका आहे त्यात शब्दरचनेचं सृजनात्मक सौंदर्य, संगीतातील माधुर्य  याला महत्त्व आहे. अभिव्यक्त व्हायला काहीच हरकत नाही, पण प्रत्येक कलाप्रकारामध्ये काही निकष ठरलेले आहेत आणि त्या निकषांवर आधारित असं एक मूल्य घडलेलं आहे, असं मी मानतो. आता पुढचा प्रश्‍न असा येतो की हे मूल्य प्रत्येकानेच मानावं का? याचं उत्तर ‘हो’ असेल तर पुढचा प्रश्‍न येतो की ‘का मानावं?’ या प्रश्नावर मी कदाचित कलेचं प्रयोजन काय असावं, नुसतंच थिरकायला लावण्यापेक्षा जर एखाद्या गीताने शब्द आणि सूर यांच्या माध्यमातून एक उन्नत अनुभूती दिली तर मला ते जास्त आवडेल' असं उत्तर देऊ शकतो.  आता यावर 'जी उन्नत अनुभूती मला गुलजारच्या शब्दांतून मिळते तीच मला यो यो हनीसिंगच्या शब्दांतून मिळते' असा कुणाचा दावा असेल तर तो मला समजू शकणार नाही, पण असा दावा कुणीतरी करतंय याची नोंद मला घ्यावी लागेल. कलेविषयी तुमची मूल्यदृष्टी तयार असली तरी त्याच्या सर्वस्वी विरोधी मूल्यदृष्टीदेखील असू शकते हे मला मान्य करावं लागेल. 

एआयबीच्या त्या व्हिडिओमुळे काही भुवया उंचावल्या गेल्या, आक्षेप घेतले गेले. श्‍लील-अश्‍लीलतेबाबतचे आक्षेप साधारण कुणाकडून घेतले जाऊ शकतात हे आपल्याला माहीत आहे. इथेही तसंच घडलं. आक्षेपाचं मुख्य कारण स्टेजवरून उच्चारल्या गेलेल्या अश्‍लील शब्दांशी जोडलेलं होतं. आता ‘अश्‍लील’ ही संकल्पना मुळात गोंधळात टाकणारी आहे. अश्लीलतेचा निर्णय घेणं कठीण असलं तरी अभिव्यक्तीचा विचार करताना मला असं वाटतं की जे बोललं जातं, केलं जातं त्याच्यामागे जी मनोवृत्ती आहे ती काय आहे हे कळणं महत्त्वाचं आहे. ही मनोवृत्ती उपभोगाची, लालसेची आहे की अनुभवाची, आस्वादाची आहे यावर श्‍लील-अश्‍लील अवलंबून असतं. हे थोडं विशद करायला हवं. मुळात एक असं मान्य करू की समाजधारणा साधारण ज्याप्रकारे झाली आहे आणि आज होते आहे त्यात काही गोष्टी गैर मानल्या गेल्या आहेत. हे असं आहे एवढं फक्त आत्ता मान्य करू. ते पटतंय, पटत नाही हा मुद्दा बाजूला ठेवू. तर स्वीकारार्ह काय आणि त्याज्य काय हे ठरलं आहे आणि त्या पायावर आपल्या सगळ्यांची मनं घडली आहेत. आपला पाठिंबा किंवा आपला विरोध याच्या मुळाशी हा पाया आहे. (यात इतिहास आणि संस्कृतीत गुंतलेले बारीक असे पुष्कळ धागे निघू शकतील, पण सध्या त्या विच्छेदनात जायला नको.) साधारण एका पायावर उभ्या असलेल्या समाजातही विविध मनोवृत्ती आहेत. प्रसंगानुरूप त्या समोर येतच असतात. पण यातला एक मुख्य फरक उपभोग आणि अनुभव हा आहे. उपभोग, लालसा तुम्हाला 'कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही किमतीवर अमुक एक गोष्ट हवीच' इथे आणून सोडते. या मनोवृत्तीत संयमाला स्थानच नसतं. हिंदी चित्रपटांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक प्रसंग, नाच, गाणी या उपभोगाच्या वृत्तीतून घडतात आणि कलात्मक उंची अजिबात गाठू शकत नाहीत. 'हे न करून चालणार आहे, आपल्याला जर कलात्मक उंची गाठता येत नाही तर आपण हे कामच करायला नको' या विचाराला तिथे जागाच नसते. कलात्मक उंची म्हणजे काय असा विचारही मुळात होत नाही. अशी अभिव्यक्ती मग अश्लील होते! त्यात अगदी थेट शिव्या वगैरे नसल्या तरी. (अनेक हिंदी-मराठी मालिका म्हणजे भावनिक पोर्नोग्राफी असते असं मला वाटतं ते याच अर्थाने!) दुसरीकडे अनुभवाच्या, आस्वादाच्या मनोवृत्तीत संयमाला स्थान असतं. संयम हा माणसाने मनाची मशागत करून कमावलेला गुण आहे. आपल्याला जगण्याच्या विविध बाजूंना स्पर्श करायचाय, माणूस हा देहरुपात अस्तित्वात असला तरी त्याचं आंतरिक रूप, आंतरिक गुंते शोधायचा प्रयत्न करायचाय आणि त्यामुळे वरवरच्या प्रदर्शनाला स्थान नाही या विचाराने इथे कलानिर्मिती होते. चांगली कला, अभिजात दृष्टी ही मनोवृत्तीशी जोडली की मग गुलजारची जीवनदृष्टी आणि हनीसिंगची जीवनदृष्टी यातला फरक लक्षात येतो. ‘हनीसिंगची जीवनदृष्टी’ हे जरा मनोरंजक वाटेल, पण मला वाटतं की ‘जीवनदृष्टी’ प्रत्येकामध्ये असतेच. तिचा परिघ कुठे, कितपत विस्तारलेला असतो हा वेगळा मुद्दा. 

या उहापोहाच्या पार्श्वभूमीवर अंतिम मुद्दा सापेक्षतेचा. आपल्याला जे वाटतं, ते 'वाटण्या'च्या पातळीवर असल्याने सगळी चर्चा व्याख्यांच्या पलिकडे जाऊन 'वाटण्या'पाशी थांबते. म्हणजे एखाद्याला गुलजारचे शब्द जर अश्लील वाटले तर त्याने मी भडकून जायचं कारण नाही. त्याला तसं वाटलं आहे ही वस्तुस्थिती मी स्वीकारली पाहिजे. माझं मत मी द्यावंच, पण जाणिवांची संपूर्ण वेगळी टोकं असू शकतात हे मला मान्य करावं लागेल. हे घडणं अपरिहार्य आहे कारण अभिव्यक्ती, कलात्मक निर्मिती ही नियमबद्ध, 'गणिती' निर्मिती नाही. ती संमिश्र , 'सब्जेक्टिव्ह' निर्मिती आहे. 

मनोवृत्तीचा विचार करून एआयबीच्या शोकडे पाहिलं की असं लक्षात येईल की हा हिंदी सिनेसृष्टीतील कुठल्याही मनोरंजक शोसारखा शो आहे. हिंदी चित्रपटांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात जशी उणीदुणी काढली जातात तशी ती इथेही काढली गेली. अर्थात फरक हा होता की ‘उणीदुणी काढणे’ हीच या शोची मुख्य थीम होती. त्यामुळे संपूर्ण शोमध्ये एकमेकांवर शेरेबाजी केली गेली, शिव्याशाप दिले गेले. काही टिप्पण्या अतिशय खोचक आणि दर्जेदार विनोदीही होत्या. गडबड झाली ती लिंग-योनीवाचक शब्दांच्या खुल्या वापरामुळे, समलिंगी संबंधांच्या, संभोगक्रियेच्या आणि हस्तमैथुनाच्या खुल्या उल्लेखामुळे. 

ही जी ‘गडबड’ झाली आहे ती एका विशिष्ट मानसिक घडणीच्या लोकांची झाली आहे. त्यांना संस्कृतीची आणि संस्कारांची काळजी वाटते. पण संस्कृती ज्या पिढीच्या हातात जाणार आहे, जाते आहे त्या पिढीने ‘एक भन्नाट विनोदी कार्यक्रम’ म्हणून तो बघून सोडूनही दिला आहे. कदाचित त्यांच्यापैकी काहींना त्यातले काही विनोद आवडले नसतीलही, पण म्हणून काही त्याची तक्रार करावी असं कुणाला वाटलं नाही. (खरं सांगायचं तर करण जोहरचे काही चित्रपट या शोपेक्षा त्रासदायक आहेत!) मला असं वाटतं की वरच्या पिढीतील अनेकांना या पिढीची भाषा आणि मानसिकता लक्षात येत नाहीये. इंग्लिशचा सहज वापर हीदेखील एक मर्यादा असू शकते. बरं, भाषा समजली तरी मानसिकता कळणं अवघड आहे. ‘दिल्ली बेली’ हा एक अप्रतिम चित्रपट आहे. या चित्रपटातील भाषा सगळ्यांना कळेल, रुचेल अशी नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनय देव यांनी त्यांच्या आईला - सीमा देव यांना चित्रपट दाखवल्यावर त्यांची प्रतिक्रिया 'यात फारच शिव्या आहेत रे, मला नाही आवडला’ अशी होती असं अभिनय देव यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. सीमा देव यांची अशी प्रतिक्रिया येणं हे अतिशय स्वाभाविक आहे. त्यांच्या पिढीला नवीन भाषा, नवीन मानसिकता कळणं खरंच अवघड आहे. आणि हे समजून घेणं हे आमचंच काम आहे. विजय तेंडुलकरांनी त्यांच्या पिढीविषयी खंत व्यक्त केली होती. बाकी क्षेत्रांचं माहीत नाही पण साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात वरच्या पिढीने टाकाऊ काम नक्कीच केलेलं नाही. जुन्या हिंदी चित्रपटांचं संगीत, त्यातील गाणी हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे इतकं मोठं काम त्या कलावंतांनी करून ठेवलं आहे. त्यामुळे तो काळ जगलेल्यांना जर एखादी गोष्ट आवडली नाही तर त्यांना दोष देता येणार नाही. हा दोन पूर्णपणे वेगळ्या 'फ्रेम ऑफ माइंड'चा फरक आहे. जी मनं काही आदर्शांनी घडली आहेत, ज्यांच्या दृष्टीने साधं-सरळ जगणं, लैंगिकतेचं नियोजन फक्त लग्नातूनच करणं हा संस्कारांचा भाग आहे त्यांची मानसिकता समजून घेतलीच पाहिजे. 

पण होतं असं की नवता स्वीकारणं अवघड असलं तरी त्यामुळे दोघेजण दोन टोकांना लांबवर गेले की काही देवाण-घेवाणच होऊ शकत नाही. काही थेट शब्दप्रयोगांमुळे धक्का बसणं हे अगदीच समजण्यासारखं आहे. परंतु अभिव्यक्तीच्या त्या प्रकाराने मला धक्का का बसला, त्यात मला काय चुकीचं वाटलं आणि ते एकूणात चांगलं का नाही याचं विश्‍लेषण करता येणं आवश्यक आहे. ‘क्या मै जवानी का अचार डालूंगी’ हे शब्द कानावर आघात करतात पण ते का आघात करतात याची मांडणी मला करता आली पाहिजे. आणि त्या चर्चेनंतरही एक अपेक्षित निकाल ‘आपले मार्गच वेगळे आहेत’ असा लागूच शकतो. आणि एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करून हे मार्ग वेगळे होऊ शकतात. म्हणजे मी गुलजारलाच ऐकेन आणि दुसरा एखादा ‘जवानी का अचार’ ऐकेल. पण सवंग निर्मितीत रमणाऱ्यांनी हेही लक्षात घ्यायला हवं की सवंगपणा काही काळापुरता लोकप्रिय होत असला तरी जे अभिजात आहे ते टिकतंच. भोवताली इतका गदारोळ सुरू असतानाही ‘प्यासा’ किंवा ‘मधुमती’ मधली गाणी आजही टिकतात, १९६३ सालची ‘कोसला’ टिकते, १९८३ सालचा ‘जाने भी दो यारो’ टिकतो. एआयबी रोस्ट हा एक  उल्लेखनीय कार्यक्रम आहे का? माझ्या मते नाही. का नाही? कारण मला उन्नत करेल, अस्वस्थ करेल असं त्यात काहीही नाही. तो रंजक आहे का? आहे. इंग्लिशमध्ये ’रेझ अ टोस्ट’ असा शब्दप्रयोग आहे. त्याचा अर्थ एखाद्याच्या सन्मानार्थ मद्याचा चषक उंचावणे असा होतो. या टोस्टच्या बरोबर उलटा प्रकार म्हणजे ’रोस्ट’. यात लोकांना आमंत्रित करून त्यांची ’खेचली’ जाते, अपमानही केला जातो – पण हे सगळं हेतुपूर्वक केलं जातं, विनोदाच्या आवरणाखाली केलं जातं. अमेरिकन आणि ब्रिटिश टेलिव्हिजनवर ’रोस्ट कॉमेडी’चे कार्यक्रम होतात. एआयबीच्या रोस्टमध्येही काही ’भंकस’ मस्तच होती. या कार्यक्रमाकडे फार गांभीर्याने बघायला हवं का?  नाही. बघून सोडून द्यावा असा हा कार्यक्रम आहे.  

एआयबीसारखेच टीव्हीएफ, बीइंग इंडियन हे यूट्यूब चॅनल्स जबरदस्त विनोदी व्हिडिओ तयार करत आहेत. त्याचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. या मंडळींची सृजानात्मक ताकद, निरीक्षणशक्ती, विनोदाची समज फारच चांगली आहे आणि त्यातून ते हिंदी सिनेमा, राजकारण, टिपिकल भारतीय मनोवृत्ती यावर झकास भाष्य करत आहेत. आलिया भटच्या अज्ञानी असल्याबद्दल तिची मनसोक्त खिल्ली उडवली गेली. पण नंतर आलिया भटला घेऊन एआयबीने ‘जीनियस ऑफ द इयर’ हा व्हिडिओ तयार केला. एकेमेकांची खुलेपणाने टर उडवणं ही स्वागतार्ह गोष्ट मानली पाहिजे. शिवाय सोशल मीडियामुळे प्रत्येकाच्या ‘क्रिएटिव्हीटी’ला उधाण आलं आहे आणि प्रत्येकाला काहीतरी बोलायचंय ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच सगळं विश्‍लेषण होणं गरजेचं आहे. 

सामाजिक वास्तव आणि कलाकाराची भूमिका हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यातही सामाजिक वास्तव आणि विनोदाची भूमिका हा एक उपविषय आहे. एआयबी किंवा इतर मंडळी जे करतात त्यातील सृजनात्मक आनंद अनुभवायला मला मजा येतेच, पण त्यापलीकडे जाऊन ही मंडळी आजच्या आर्थिंक-सामाजिक वास्तवाच्या विविध पैलूंना समजून घेऊ शकतात का ही मला उत्सुकता आहे. रणवीर सिंग किंवा अर्जुन कपूरवर विनोद करणं ठीकच आहे, पण विनोदाचं धारदार हत्यार महत्त्वाच्या अशा इतर अनेक ठिकाणी ते वापरू शकले तर बरंच होईल. 'बीईंग इंडियन' या इंटरनेट चॅनलने 'आय अ‍ॅम ऑफ़ेंडेड' हा दीड तासाचा व्हिडीओ तयार केला आहे. भारतात नव्याने उदयास आलेल्या 'स्टॅंड अप कॉमेडी' या प्रकाराबद्दल आणि भारतीय मानसिकतेबद्दल अनेक स्टॅंड अप कॉमेडियन्सनी यात त्यांची मते मांडली आहेत. जरूर बघावा असा हा व्हिडीओ आहे. एआयबीच्या टीमपैकी एक गुरसिमरन खंबा यानेही यात भाग घेतला आहे.  

या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मणी रत्नमच्या ‘युवा’ या चित्रपटातील एक प्रसंग आठवतो. ‘युवा’ ही तीन भिन्न स्तरातल्या युवकांची कथा आहे. यातला एक (विवेक ओबेरॉय) इंजिनियरिंग करून पुढे शिकू इच्छिणारा आहे. परीक्षा संपवून तो घरी येतोय. स्टेशनवर त्याचे निवृत्त आयएएस अधिकारी वडील (शंकर नाग) आणि धाकटा भाऊ त्याला घ्यायला आले आहेत. ट्रेनमध्ये कॉलेजमधली एक मुलगी आणि तो यांच्यातील चुंबनाचा एक सीन दिसतो. ट्रेन थांबल्यावर हा उतरतो आणि वडील-भावाला भेटतो. वडील विचारतात, 'पास होशील ना?' तेवढ्यात मागून ती मुलगी येते आणि त्याच्या गालाचं चुंबन घेऊन बाय करते. 'आय लव्ह यू, मला फोन कर' वगैरे म्हणते आणि निघून जाते. वडील हे सगळं बघतायत. ते काहीही बोलत नाही. पुन्हा विचारतात, ‘पास होशील ना?’ तो 'हो' म्हणतो आणि तिघेही चालू लागतात. वडील एकदाही ती मुलगी कोण होती वगैरे विचारत नाहीत. पुढे काय करणार असं विचारल्यावर तो आयएएस करायचं आहे असं म्हणतो. त्यावर वडील आयएएस करणं म्हणजे जोक नाही, आयएएस होण्यासाठी देशासाठी काहीतरी करायची ऊर्मी असावी लागते असं सांगत चर्चा करतात.   

संस्कृतीरक्षकांनी या वडिलांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा!

(अनुभव, मार्च २०१५)

Tuesday, August 5, 2014

लाल सवाल!

हा प्रदेश आपल्या ओळखीचा नाही. हे रस्ते, दोन्ही बाजूचं जंगल, मधूनच विरळ जंगलात जमिनीवरचं काही वेचणारे लोक, रस्त्यालगतची ही लाल ‘शहीद स्मारक’, गस्त घालणारे जवान आणि इथल्या वातावरणात जाणवणारा ताण- हे सगळं आपल्याला नवीन आहे. आणि का कुणास ठाऊक, पण आपल्याला या वातावरणाचं आकर्षण वाटतंय. अनाकलनीय असं आकर्षण.

आमच्या गाडीचा ड्रायव्हर गाडी थोडी हळू करतो. रस्त्यामध्ये काही पत्रकं दिसतायत. पांढर्‍या कागदावर लाल शाईने काहीतरी लिहिलं आहे. काही हाताने लिहिलेली आहेत, काही छापील. पत्रकांवर एक स्टीलचा डबा ठेवलेला आहे. आम्ही गाडीतून उतरून फोटो काढतो. मागून कुठूनतरी लष्करी स्वरातली दरडावणी ऐकू येते आणि आम्ही मुकाट्याने गाडीत बसून पुढे निघतो.

दंतेवाड्यापासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एक कार्यकर्ता श्रीवास्तव आमच्याबरोबर आहेत. त्यांच्याबरोबर ‘पटेलवाडा’ नावाच्या एका छोट्या गावात आम्ही जातो. हे अर्थात श्रीवास्तवांमुळेच शक्य होतं. कारण जिथे आमची गाडी थांबते तिथून डावीकडे आत गेल्यावर एखादी छोटीशी का होईना पण लोकवस्ती आहे असं अजिबात लक्षात येत नव्हतं. गावात एका कुटुंबाची भेट होते. राजकुमार भास्कर, लक्ष्मीबाई आणि त्यांची मुलं. झोपडीवजा घर. पण प्रशस्त. मधल्या मोकळ्या जागेत मोहाची फुलंं वाळवण्याचं काम सुरू आहे. क्रिकेटच्या बॅटसारखी एक मोठी लाकडी बॅट घेऊन लक्ष्मीबाई वाळलेल्या फुलांना धोपटत होत्या. या फुलांपासूनच दारू बनते. राजकुमार भास्कर सांगतात की एस्सारच्या खाणीसाठी इथून एक पाइपलाइन टाकायची आहे. त्यात आमची शेतं घेतली जाणार आहेत. आम्ही त्याला स्पष्ट नकार दिला आहे. आता काय होतं ते पाहायचं. त्या घरावर डिश अँटेना आहे. कुठले चॅनल्स बघता, महिन्याला किती पैसे देता असं विचारल्यावर कळतं की गेल्या वर्षी ‘कन्यादान’ योजनेअंतर्गत सरकारने सगळ्यांना टी.व्ही. आणि ही अँटेना फुकट दिली आहे. त्याचे मासिक चार्जेसही भरायला लागत नाहीत. ‘कन्यादान’ योजनेखाली टी.व्ही.? ही स्कीम की प्रलोभन? राजकुमार-लक्ष्मीबाईंच्या घरून निघताना एका खोलीच्या बंद दरवाजाकडे लक्ष जातं. तिथे प्रियांका चोप्राचा फोटो लावलेला असतो.

पुढचं गाव धुरली. अतिशय टुमदार खेडं. मधून छोटी वाट. दोन्ही बाजूला छोटी छोटी घरं. इथेही मोहाची फुलं वाळवायचं काम चाललं आहे. घराबाहेर मुलं खेळतायत. श्रीवास्तवना ज्यांना भेटायचंय त्यांच्या घरी जाण्यासाठी वाट वळते आणि अचानक समोर सीआरपीएफचा ताडमाड जवान दिसतो. हातात रायफल. जमिनीवर रोखलेली. चेहरा निर्विकार. पाहताक्षणी आवडलेल्या त्या गावामध्ये आपण जवानाचं चित्र कल्पिलेलं नव्हतं म्हणून आपण एकदम चमकलो हे लक्षात येतं. ‘फोटो घेऊ का तुमचा?’ असं त्याला खुणेनी विचारल्यावर तो हातानेच नाही म्हणतो. आम्ही पुढे चालू लागतो.

असं लक्षात येतं की गावच्या एका ‘पटेल’ला पोलिसांनी चौकशीसाठी नेलं आहे. त्याची बायको आम्हांला गावात भेटते. ती त्यामानाने बरीच शांत आहे. ‘ये तो होतेही रहता है’ हे तिचं भाष्यही सूचक असतं. मघाशी रस्त्यात दिसलेल्या टिफिन बॉक्सचाही उलगडा इथे होतो. तो डबा टिफिन बॉम्ब असल्याचा संशय होता हे कळतं. इथे आम्ही आवंढा गिळतो, पण तो बॉम्ब नव्हता, भुसा भरलेला टिफिन होता हे तपासाअंती कळलेलं असतं. गावातून बाहेर पडत गाडीकडे जात असताना आजूबाजूने सीआरपीएफचे  जवानदेखील रस्त्याकडे चालू लागल्याचं दिसतं. धुरली गावचा सीआरपीएफचा आजचा वेढा उठलेला असतो. ‘यहॉं दिन में सीआरपीए फका राज होता है और रातमें अंदरवालोंका’ असं ऐकलेलं असतं. ‘अंदरवाले’ म्हणजे माओवादी.

दंतेवाड्याहून निघाल्यापासून रस्त्याच्या उजवीकडे बैलाडिला डोंगराची रांग दिसत होती. आता आम्ही निघालोय ते बचेलीकडे. बैलाडिलाच्या माथ्यावरचे दिवे आता चमकू लागले आहेत. या डोंगरावर एनएमडीसी (नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) खाणकाम करते. एनएमडीसी स्थापन झाली १९५८ साली. ही खनिज उत्पादक कंपनी भारत सरकारच्या ताब्यात आहे. कंपनी स्थापनेनंतर लगेच बैलाडिला डोंगरावर लोहखनिजाच्या खाणी सुरू झाल्या. आज छत्तीसगड आणि कर्नाटकमधील आपल्या मालकीच्या ३ खाणींमधून कंपनी सुमारे ३ कोटी टन एवढं अजस्त्र लोहखनिज बाहेर काढते. हे लोहखनिज जगातील सर्वोत्तम दर्जाचं आहे आणि स्टील निर्माण करण्यासाठी जे गुणधर्म असावे लागतात ते या लोहखनिजात पुरेपूर आहेत.

छत्तीसगड राज्याची निर्मिती झाली २००० साली. राज्यात एकूण सव्वीस जिल्हे आणि नव्वद विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभा मतदारसंघ अकरा. एनएमडीसी वसली आहे तो दंतेवाडा जिल्हा आणि जवळचे बस्तर, बिजापूर, सुकमा हे जिल्हे अतिशय संवेदनशील. माओवाद्यांच्या प्रभावाखाली असलेले. इथे जम बसवताना माओवाद्यांशी सामना अटळच. अर्थात एनएमडीसी ही सरकारी कंपनी. त्यामुळे सगळंच पाठबळ उपलब्ध. दंतेवाड्यात प्रवेश करतानाच ‘नुसत्या आयडियॉलॉजीने काय होणार? खरा विकास शिक्षणानेच होऊ शकतो.’ अशा आशयाचे एनएमडीसीचे बोर्डस् दिसतात. एनएमडीसीने दंतेवाड्यात २०१० पासून पॉलिटेक्निक कॉलेज सुरू केलं आहे. दंतेवाडा, बस्तरच्या भागात आरोग्य, सार्वजनिक सुविधा यासाठीही कंपनी खर्च करत असते.

एनएमडीसीने बैलाडिला डोंगरावर खाणकाम सुरू केल्यापासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ‘संयुक्त खदान मजदूर संघ’ (एसकेएमएस) स्थापन करून काम सुरू केलं होतं. पुढे १९८० च्या सुमारास या भागात- दंडकारण्यात - पीपल्स वॉर ग्रुपने आपली मुळं पसरायला सुरुवात केली. पीपल्स वॉर ग्रुप म्हणजेच ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) पीपल्स वॉर’. अगदी अलीकडे, म्हणजे २००४ मध्ये पीपल्स वॉर ग्रुप आणि माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर ऑफ इंडिया यांच्या एकत्रीकरणातून भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) स्थापन झाली. १९६७ मध्ये नक्षलवादी चळवळ सुरू झाली ती कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट) च्या पुढाकाराने. त्यात फूट पडून निर्माण झाली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट). आज नक्षलवादी किंवा माओवादी हे शब्द समानार्थानेच वापरले जातात. आम्ही ज्या श्रीवास्तव साहेबांबरोबर हिंडत होतो त्यांचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि डाव्या आघाडीतील मोठा घटक असणारा भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या दोघांहून त्यांचं हे माओवादी भावंड फार जहाल आहे. माओवादी कम्युनिस्ट पक्षावर भारत सरकारने बंदी घातली आहे आणि त्यामुळे अर्थातच माओवाद्यांना सापडले की लगेच अटक होते.

बचेलीला ‘एनएमडीसी’चं साम्राज्य आहे. कंपनीच्या अखत्यारीतील भागात प्रवेश करताच कार्यालयीन इमारती, सुशोभित रस्ते लक्ष वेधून घेतात. इथेच संयुक्त खदान मजदूर संघाचं कार्यालय आहे. तिथे युनियनच्या कार्यकर्त्यांशी थोडावेळ चर्चा करून आम्ही किरंदुलला पोचलो तेव्हा अंधारून आलं होतं. किरंदुरलला पक्षाच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन होतं. तिथे थोडा वेळ थांबून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. चारच दिवसांनी लोकसभेच्या निवडणुका होत्या.

***

‘‘मग बॅक टू जगदलपूर?’’ मन्या विचारता झाला.
‘‘हो. आणि तिथून एक दिवसानंतर रायपूर. मग पुणे.’’ मी म्हटलं.
‘‘निवडणुकीचे निकाल मात्र प्रातिनिधिक आहेत.’’ मन्या म्हणाला.
‘‘हो. बस्तरमधून भाजपचाच उमेदवार निवडून आला. एकूण अकरापैकी दहा जागांवर भाजपचे खासदार निवडून आले. आम्ही जगदरपूरला असताना सोनी सोरीला भेटलो होतो. माओवादी असल्याच्या संशयावरून तिला अनेक महिने तुरुंगात ठेवलं होतं. तिच्यावर अनन्वित अत्याचार झाले. त्या सगळ्यातून सुटून ती ‘आप’तर्फे उभी राहिली तेव्हा आदिवासी समाजाचा खरा चेहरा या निवडणुकीत दिसतोय असं वाटत होतं. पण काही उपयोग झाला नाही.’’ मी.
‘‘पण माओवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला होता ना? म्हणजे ग्रामीण भागातलं मतदान कमी होणारच होतं. आणि सोनी सोरीचा मुख्य मतदार तिथलाच होता.’’ मन्या.
‘‘हो. हे मात्र खरं.’’ मी.
‘‘अतिडाव्या विचारामुळे एक चांगला उमेदवार हरला असं म्हणायचं का?’’ मन्या म्हणाला.
‘‘अतिडाव्या विचाराला संसदीय लोकशाही मान्यच नाही मुळात. त्यामुळे चांगला उमेदवार हरल्याचं त्यांना दु:ख नाही. मुख्य म्हणजे उमेदवार चांगला असेल तरी तो त्यांना हवे ते बदल घडवेल असंही त्यांना वाटत नाही.’’ मी म्हटलं. हे म्हणत असताना सोनी सोरीची तिच्या निवडणूक प्रचारात आम्ही घेतलेली भेट मला आठवली. चाळिशीच्या आतल्या या बाई. गीदम हे त्यांचं गाव. तिथं प्राथमिक शिक्षिका म्हणून त्या काम करतात. त्यांच्यावरील बहुतांश आरोप आता मागे घेतले गेले आहेत. त्या आम्हांला सांगत होत्या, माओवाद्यांशी माझे कधीच संबंध नव्हते. आताही मला बंदुकीपेक्षा शिक्षणाच्या माध्यमातून माझ्या आदिवासी बांधवांसाठी काम करायचंय. त्यांनी त्यांचं संकल्पपत्र एक हजार रुपयांच्या स्टँपपेपरवर छापून प्रकाशित केलं होतं. यात त्यांनी पन्नास मुद्दे मांडले होते आणि एक्कावन्नावा मुद्दा असा होता की निवडून आल्यावर बदल अथवा बदलाची सुरुवात तुम्हाला दिसली नाही तर मतदारांनी मला ‘रिकॉल’ करावं. हे संकल्पपत्रच माझा राजीनामा म्हणून समजावं. संकल्पपत्रात सार्वजनिक सुविधा, प्रशासकीय सुविधा याबाबतचे बरेच मुद्दे अंतर्भूत होते. एनएमडीसी आणि एस्सारसारख्या कंपन्यांमुळे विस्थापित झालेल्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून मी प्रयत्न करेन, तसेच विस्थापित कुटुंबांना त्यांच्या जमिनीचा आणि श्रमाचा मोबदला मिळेल यासाठीही मी प्रयत्न करेन असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र टाटा, एस्सार या खासगी उद्योगांना खाणकामाची कंत्राटं देण्याबाबत त्यांची काय भूमिका आहे याचा उल्लेख नव्हता.
‘‘अतिडाव्या विचाराचं एक रोमँटिक आकर्षण बर्‍याच बुद्धीजीवी लोकांना असतं. हे लोक स्वत: एक दिवस अचानक पुण्याहून मुंबईला जावं लागलं तर आयत्या वेळी तिकीट काढून जायला बिचकतात. त्यांना रिझर्वेशनशिवाय जमत नाही. स्वत:ची सगळी प्रॉपर्टी सुरक्षित ठेवून त्यांनी पार्टटाईम क्रांती करायची असते. अशा लोकांच्या प्रभावाखाली येऊन बिघडू नकोस रे बाबा.’’ मन्याने माझी लिंक तोडली.
‘‘असंच काही नाही. अतिडाव्या चळवळीत कोबाद गांधी आणि अनुराधा गांधीसारखी संपूर्णपणे डीक्लास झालेली माणसं होती. तू समजतोस इतकं सगळंच काही उथळ नाहीये.’’ मी म्हटलं.
‘‘मग चांगलंच आहे. पण तुला स्वत:ला नक्षली-माओवादी विचारांचा मार्ग पटतो का?’’ मन्याने विचारलं.
हा मात्र कळीचा प्रश्‍न होता. मीच कशाला, पण अगदी भल्या जाणत्या विचारवंतांची विकेट काढणारा. ‘विचारधारा म्हणावी तर पटते पण हिंसेचं तत्त्वज्ञान नाही पटत’ असं नेहमीचं उत्तर देता येतंच, पण त्याने भागत नाही. कारण अतिडाव्या चळवळीच्या पोटात शिरून मागे मागे जाऊ लागलं की सरंजामशाही, जातीव्यवस्था यांची भयावह दडपशाही, लोकशाही रुजवण्यात आलेलं अपयश आणि या सगळ्याविरुद्धचा हिंसक उद्रेक दिसू लागतो आणि मग शोषितांनी शस्त्र का उचलायची नाहीत असा प्रश्‍न पडतो. अर्थात १९६९ मध्ये नक्षलबाडीत झालेला पहिला उठाव, तेव्हाची परिस्थिती आणि २०१४ मधला नक्षलवाद यात तुलना व्हावीच. मूल्यमापन व्हावंच. कारण नक्षलवादी हिंसेचं, विशेषत: त्यात भरडल्या जाणार्‍या निष्पापांचं वर्तमान फारच अस्वस्थ करणारं होतं. पण ‘हिंसा नको’ असं म्हणताना आपण एका सुरक्षित स्थानावरून हे बोलतो आहोत हे जाणवत राहतं.
‘‘काय रे?’’ मन्याने मला हलवलं.
‘‘अं? हो, तुझा प्रश्‍न कळला. पण याचं उत्तर देणं अवघड आहे अरे.’’ मी म्हटलं आणि मन्यालाच विचारलं, ‘‘तुला काय वाटतं?’’
मन्या चमकला. त्याने बहुतेक उलट्या प्रश्‍नाची अपेक्षा केली नसावी. पण तो निग्रहाने म्हणला, ‘‘निर्णय हो-नाही मध्येच हवा असेल तर मी म्हणेन नाही.’’
मी हसून म्हटलं, ‘‘हो-नाही मध्ये उत्तर तू मागत होतास. मी मागतच नव्हतो. आता तिथल्या आदिवासींच्या जगण्याबद्दल म्हणशील तर हे खरंच आहे की त्यांची दोन्हीकडून कुचंबणा होते. शासन त्यांना विस्थापित करतं आणि माओवादी त्यांना बंदूक देऊ बघतात. विस्थापित झाले तर झगडून त्यांना काही मिळवता तरी येईल, पण त्यांनी बंदूक हातात घेतली तर देशाचे गुन्हेगार ठरतील पण खरं तर त्यांना कुठे काय मिळालंय विस्थापनाच्या मोबदल्यात आजवर? मायनिंगसारख्या महाकाय प्रोजेक्टस्मुळे त्यांची जमीन, पाणी, जंगलं सगळंच केलं. जातंय. तुला आश्‍चर्य वाटेल, पण गेल्या वर्षी जयराम रमेशनी हे स्वत: एका व्याख्यानात मान्य केलंय की आदिवासींचं शोषण झालेलं आहे. खासगीच नव्हे, तर सार्वजनिक कंपन्यांकडूनही. आणि माओवाद्यांनी या अन्यायाबाबत आपल्याला जागं केलं. पुढे ते असंही म्हणतात की माओवाद्यांचा मुकाबला लष्करी बळाने नाही तर राजकीय पद्धतीने केला पाहिजे. हिंसेचा मार्ग योग्य की अयोग्य हे आपण सांगणं अवघड असतं अरे. उद्या एखादं धरण बांधायचं म्हणून तुझं घर पाण्याखाली गेलं किंवा एखादा मोठा कारखाना लावायचंय म्हणून तुझी जमीन सरकारनी घेतली तर तू शांतपणेच ते सहन करशील याची तुला खात्री आह? मन्या, मला वाटतं हिंसा ही एक अत्यंत थेट प्रतिक्रिया आहे. त्याने प्रश्‍न सुटतो का? नाही कदाचित. पण तू असं बघ की दोन हजारच्या दशकापर्यंत, भारतातील १० राज्यातील १८० जिल्ह्यात माओवादी कार्यरत होते. आत्ताच्या ताज्या सरकारी आकड्यानुसार ती संख्या ८३ आहे. पण हे लोण इतक्या झपाट्याने पसरलं याचा अर्थ काय? शासनाची दडपशाही, जातीयता याची झळ आपल्याला बसत नाही. आपण शहरं वाढताना बघतो. ती कशी वाढतात हे तुलाही माहीत आहे. शहरं वाढतात, वस्तूंच्या गरजा वाढतात, मग उत्पादन वाढवणं आलं. उत्पादन वाढवायचं म्हणजे कच्चा माल हवा. म्हणजे मग निसर्गाकडे जाणं आलं. निसर्ग कुठे आहे? बैलाडिलाच्या डोंगरावर. तिथे खाणकाम करायचं म्हणजे स्थानिकांना हटवणं आलं. ते स्टील वापरतच नाहीत पण आपण वापरतो म्हणून त्यांना तिथून उठावं लागतं.’’ मी धडाधड बोलत होतो.
‘‘मान्य. पण मग असं असतंच. ज्या आदिवासी पाड्यावर वीज आहे ती वीजदेखील त्यांनी निर्माण केलेली नाही. दुसरीकडूनच आलेली आहे. मग आता असं म्हणायचं का की हे आदिवासी शोषक आहेत? या हिशेबाने आपण सगळे एकाच वेळी शोषक आणि शोषित नसतो का?’’ मन्या म्हणाला.
‘‘वीज वापरतात ते ठीक. पण जेव्हा भारनियमन होतं तेव्हा तिथे दहा-बारा तास होतं हे तू विसरतोस. आधी शहरांनाच वीज दिली जाते.’’ मी.
‘‘अरे, पण शहरं महसूलपण देतात. त्याचं काय?’’ मन्या.
‘‘हो, पण तो खर्चही तिथेच होतो ना! म्हणजे सोर्स लांब कुठंतरी आहे. तिथल्या मालाचं प्रोसेसिंग आणि विक्री इथे होते. त्यावर शासन आणि नागरी समाज जगतात. आणि त्या लांबवरच्या सोर्सपाशी त्यांच्या पद्धतीने शांतपणे राहणारे मात्र देशोधडीला लागतात. हे अस्वस्थ करणारं नाही वाटतं तुला?’’ मी विचारलं.
‘‘मी तुझी संवेदना समजू शकतो. पण तू संवेदना अंतिम आहे असं प्लीज मानू नकोस. तुला काय वाटतं? भौतिक प्रगती कशी साध्य होत गेली आहे? आधी नदी पार करून जायला नावा होत्या. त्यामुळे नावाड्यांना रोजगार मिळायचा. पण म्हणून पूल बांधणीचं तंत्र विकसित झालंच ना? ‘पूल नको’ असं आपण म्हणालो का? हे एक उदाहरण झालं, पण हे सगळीकडे लागू होतं असं नाही तुला वाटत?’’ मन्या.
‘‘म्हणजे तुला असं म्हणायचंय की कुठल्याही टप्प्यावर काही माणसांच्या वाट्याला उपेक्षा येणारच?’’ मी.
‘‘तू संवेदना बाजूला ठेवून विचार कर आणि उत्तर शोध. तुम्ही भौतिकतेचा प्रवाह थांबवू शकता का हा प्रश्‍न आहे आणि त्याचं उत्तर नाही असं आहे.’’ मन्या म्हणाला.
‘‘भौतिकतेचा प्रवाह थांबवायचा नाही म्हणजे मानवीय दृष्टीकोनाला तिलांजली द्यायची? एखादी मोठी योजना आखताना लोकांचा विचारच करायचा नाही? अरे मग ‘गव्हर्नन्स’चा अर्थ काय लेको?’’ मी.
‘‘हो. ‘गव्हर्नन्स’चं मोठं फेल्युअर आहे हे मान्यच आहे.’’ मन्या म्हणाला.

मन्याच्या कबुलीनंतर मी अधिक काही बोललो नाही. छत्तीसगडमध्ये पत्रकार मित्रांबरोबर घालवलेला आठवडा अपरिहार्यपणे अस्वस्थ करणारा असणार होता याची मला कल्पना होतीच आणि पुण्याला परतल्यावर ‘कधी भेटतोस?’ हा बोडसाचा मेसेज वाचल्यावर मन्याशी बोलताना आपली अस्वस्थता अपरिहार्यपणे बाहेर पडणार हेही मला कळत होतं. अर्थात ‘गव्हर्नन्स’ या मुद्यावर मन्याचं एकमत झालं असलं तरी ‘गव्हर्नन्स’ उभा राहतो आयडियॉलॉजीवर’ हा माझा पुढचा मुद्दा आणि पुढची चर्चा मी टाळली. कारण गव्हर्नन्स, भौतिक प्रगती, विकास या सगळ्याच्या मुळाशी कुठली आयडियॉलॉजी असावी, मुळात एकच मार्गदर्शक आयडियॉलॉजी असावी का यावर मंथन करणं म्हणजे दंडकारण्यात शिरून वाट शोधण्याइतकं अवघड होतं!

- मिळून साऱ्याजणी (ऑगस्ट २०१४) 

Monday, February 3, 2014

एक होती आजी

मृतदेहाचा स्पर्श चांगलाच गार असतो. आजीला हात लावून बघितलं तेव्हा ती गेली आहे हे मला जाणवलं होतं. खात्री करून घेण्यासाठी डॉक्टरांना बोलावलं. नंतर मग पुढच्या हालचाली. अँब्युलंसमध्ये मी आणि माझे वडील. समोर आजी. वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत तिला ठेवलं. ज्वाळांचा लोट उठता उठता दार बंद झालं आणि मी क्षणभर डोळे मिटले. आजीचं प्रेत आपण जाळलं खरं, पण 'आजी गेली' म्हणजे नक्की काय  झालं? ती नक्की गेली का? असे विचित्र प्रश्न त्याक्षणी डोक्यात घोळत होते.

आजी गेली तेव्हा ती पंच्याऐंशी वर्षांची होती. १ सप्टेंबर २०११. त्या दिवशी गणपती बसले होते. मला त्याचं विशेष असं काही वाटत नसलं तरी आजीला वाटलं असतं. तिच्या अखेरच्या आजारपणात ती काही महिने तिच्या धाकट्या मुलीकडे, म्हणजे माझ्या मावशीकडे होती. त्या दरम्यान संक्रांत आली होती. त्या दिवशी आजीला भेटायचं राहून गेलं. म्हणजे संक्रांत आहे म्हणून मावशीकडे जाऊन आजीला भेटावं असं डोक्यातच आलं नाही. आठवड्यातून दोनदा आम्ही (मी आणि ही) तिला भेटायला जायचोच. पण संक्रांत निसटली. त्यानंतर जेव्हा गेलो तेव्हा आजी आमच्यावर जाम भडकली होती. संक्रांत असून तुम्ही आला नाहीत भेटायला, याचं एक जाऊ दे, पण तुझ्याही लक्षात नाही आलं? असं तिने आम्हाला आणि विशेषतः हिला बरंच सुनावलं. मी मुलगा आहे त्यामुळे काही गोष्टी मला अर्थातच कळणार नाहीत आणि ही मुलगी आहे त्यामुळे तिला त्या अर्थातच कळतील असं एका ऐंशीपलीकडच्या बाईचं गृहीतक असावं यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नाही. पण आजीला दुसरीही एक बाजू होती आणि ती चांगली आधुनिक होती. माझ्याचबाबतीतला एक किस्सा आठवतो. माझं लग्न व्हायच्या आधीची गोष्ट. मी आणि माझी एक मैत्रीण. आम्ही लग्नाचं ठरवलं होतं. पण नंतर काही कारणाने माझ्याकडून नकार दिला गेला. तपशीलात सगळं सांगणं इथे शक्य नाही. कारण ते मोठंच विषयांतर होईल. आजीलाही सगळं तपशीलात सांगणं मला शक्य होत नव्हतं. लग्न ही गोष्ट एकविसाव्या शतकात आधी होती तेवढी 'रूटीन' राहिलेली नाही हे माझ्या प्राचीन आजीला कसं समजावून सांगायचं या विचारात मी होतो तो तिनेच मला त्रिफळाचित केलं. 'ती तुला शरीरसुख देण्यात कमी पडणार आहे का?' असा थेट सवाल टाकला. आजीला मी मार्कं दिले! (लग्नाचा निर्णय न घेण्यामागे हे कारण नव्हतं हे जाता जाता सांगून टाकतो.)

मी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्याला आजीकडे आलो आणि पुढची एकोणीस वर्षे आजीबरोबर राहिलो. सध्या आजी नसलेल्या घरात राहतोय. ती माझ्या आईची आई. तिला दोन मुली. आजोबा ती अठ्ठावीस वर्षांची असताना वारले. आजीने पुढे एकटीने सगळं केलं. त्यामुळे स्वभावात हट्टीपणा भरपूर. 'विशिष्ट' (म्हणजे तिच्या!) पद्धतीनेच सगळं व्हायला हवं हा आग्रह. पन्नाशीतल्या तिच्या मुलींना दांडीवर कपडे कसे वाळत घाला हेही ती उत्साहाने सांगायची. आवडलं नाही की स्पष्ट बोलून दाखवणं हा एक (चांगला) गुण. माणसाचं मूल्यमापन करायची तिची अशी एक खास पद्धत. मी जेव्हा नोकऱ्यांची धरसोड करायचो तेव्हा जरा काळजीत पडायची, पण 'तुला योग्य वाटेल ते कर' हे मात्र तिने कायम ठेवलं. अत्यंत धोरणी, शिस्तप्रिय स्वभाव. त्यामुळे गडबड, बेशिस्त, वेळ न पाळणं याचा मनापासून राग. पैशाची हाव नाही, पण अखेरीस पैसा महत्त्वाचा याबाबत संदेहही नाही. माझे एक दूरचे मामा, जयंत बापट, ऑस्ट्रेलियात असतात. रसायनशास्त्रातून डॉक्टरेट. नावाजलेले अभ्यासक. समाजसशास्त्रातील एका विषयावरही डॉक्टरेट. अलिकडेच 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' पुरस्काराने सन्मानित. आजीला त्यांचं फार कौतुक. पुण्यात आले की आजीला भेटायला यायचे. ते पौरोहित्य करायचे. ऑस्ट्रेलियात त्यांनी लग्नही लावली होती. आजीला या गोष्टीचं विशेष कौतुक. एकदा घरी आले होते. इतरही काही नातेवाईक होते. पौरोहित्याचा विषय निघाला. आजीने स्वछ प्रश्न टाकला, "काय रे जयंता, तुला तिकडे लग्न लावायचे किती पैसे मिळतात?" मी पुन्हा आजीला मार्कं दिले!

म्हातारी माणसं एक 'काळ' वागवत जगत असतात. आजीसुद्धा स्मरणरंजनात रमायचीच. त्यावेळी तिचा चेहरा खुलून यायचा. पण ती स्मरणात 'अडकलेली' मात्र नव्हती. टीव्ही बघताना शंभर प्रश्न विचारायची. रोजचा पेपर नीट वाचायची. त्यावरही प्रश्न. एकदा मला म्हणाली की मला खरं तर पेपरातलं सगळं कळत नाही. पण तरी मी वाचते. किमान शब्द तरी ओळखीचे होतात. एकदा तिने गुगली टाकला होता - 'अमेरिकेत पैसे ठेवले तर व्याज जास्त मिळतं का रे?' मी चकित. हा प्रश्न आजीला का पडावा? मग लक्षात आलं की त्याचा संबंध परकीय गुंतवणुकीबाबतच्या एका बातमीशी होता.

'इतर जातीचे लोक', 'खालच्या जातीचे लोक' असा उल्लेख खूप वर्षांपूर्वी तिच्या बोलण्यात आल्याचं स्मरतं. यात काही वावगं आहे असं तिला वाटत नसणारच. (यात काही वावगं न वाटण्याची आपल्या समाजाची मानसिकता आपल्याबद्दल पुष्कळच बोलते!) त्यावेळी तिच्याशी वाद घातला नव्हता कारण तेव्हापर्यंत वादाचं अंग विकसित व्हायचं होतं. माझ्या आजीच्याच वयाच्या एका दुसऱ्या आजीने एकदा कुठल्यातरी संदर्भात महारांचा उल्लेख केला होता. ही माझ्या एका मैत्रिणीची आजी. नक्की शब्द आठवत नाहीत, पण महारांचा उल्लेख करताना त्यांची 'चेहराबोली' मला बरंच काही सांगून गेली होती. त्यावर मी प्रबोधनाचा थोडा प्रयत्न केला. मैत्रिणीला नंतर फोन करून 'महार जिथवर गेले तिथवरचा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची एक व्याख्या आहे, म्हणजे आपल्या राज्याचं नावच महार लोकांवरून पडलं आहे हे तुझ्या आजीला सांग' असं सांगितलं. तिने ते आजीला सांगितलं की नाही माहीत नाही. माझ्या आजीशी या विषयावर बोलायचा प्रसंग नंतर कधी आला नाही. आता मात्र वाटतं की जातीच्या मुद्द्यावर एकदा तिला काही प्रश्न विचारून बोलतं करायला हवं होतं.

घरात कामाला ज्या बायका यायच्या त्यांच्याशी तिचे सलोख्याचे संबंध होते. (एकदा तिने आमच्या बाईंना अंडा करी करून आणायला सांगितली होती. याचं कारण म्हणजे आजीने एकदा अंडा करी केली होती आणि त्यात खोबऱ्याचा इतका मारा केला होता की ती उपासाची अंडा करी झाली होती! तिची चव आमच्या बाईंनी घेतल्यावर त्यांना अर्थातच 'या बामणांनी वाट लावलीय बैदा करीची!' असं मनात वाटून नैराश्य आलं असणार आणि म्हणून त्यांनी अंडा करी करून आणायची ऑफर दिली होती. ती आजीने स्वीकारली!) आपल्या घरात कुणी माणूस आपली कामं करतो/करते यात एक काहीतरी 'मूलभूत चूक' आहे इथवर माझा जो प्रवास झाला तो आजीचा झाला नव्हता. त्यामुळे सगळ्यांची छान संबंध असले तरी 'या बायकांचं असंच असतं, त्यांना भलती सूट देऊ नये' वगैरेवर तिचा आतून ठाम विश्वास होता. शिवाय 'पगार वेळेवर दिलाच पाहिजे. माझी एक तारीख कधी चुकत नाही. पण काम चोख व्हायला हवं. नसते लाड चालणार नाहीत' अशी स्पष्ट भांडवली भूमिका होतीच. पगार वेळेवर देतो हे चांगलंच आहे, पण पगार 'किती' असावा यावर तिचा वेगळा दृष्टीकोन अर्थातच नव्हता.

पन्नास वर्षांचं अंतर असणाऱ्या आम्हा दोघांबाबत विचार करताना मला वाटतं की जशी तिची मला कधीकधी 'कटकट' व्हायची तशी माझीही तिला होत असणारच. वेळेवर आंघोळ न करणं, मोजे न धुणं, 'हा शर्ट कुठे मळलाय?' ही कायमस्वरूपी भूमिका असणं, व्यायामाचा आळस करणं, रात्री उशीरा घरी येणं, कामात चालढकल करणं या सगळ्याचा तिला त्रास झाला असणारच. वीस-बावीस वर्षांच्या वयात प्रत्येकाला आजूबाजूच्या लोकांविषयी 'हे लोक असं का वागतात?' हाच प्रश्न सारखा पडत असतो. त्याची कारणंही सबळ असू शकतात, पण स्वतःकडे क्रिटिकली बघणं होत नाही कारण ते वयच एका अलौकिक मुग्धतेचं असतं. असो.

घरात आजी असणं याला एक अर्थ होता. एक परिमाण होतं. आजारी माणूस आणि त्याची सेवा हा एक स्वतंत्र विषय आहे. तो अनुभव आपल्याला पुष्कळ काही शिकवतो हा माझा अनुभव आहे. त्यामुळे प्रत्येकाने तो घ्यावा. तो अनुभव अगदी आनंददायकच असतो असं नाही, कारण आजारी माणसामध्ये जी स्वभाववैशिष्ट्ये विकसित होतात ती तापदायक असू शकतात. पण त्यातला आत्मिक आनंद फार मोठा आहे हे खरं. आजीच्या शेवटच्या आजारपणात तिचं सगळं करणं, तिला हळूहळू मृत्यूकडे जाताना बघणं यात अनेक गोष्टी गुंतलेल्या होत्या. त्या अनुभवावर तर स्वतंत्रपणेच लिहिता येईल. पण हिंडती-फिरती असतानाची आजी आठवली की हे परिमाण स्पष्ट होत जातं. जिवंत माणूस त्याच्या गुण-दोषांसह जिवंत असतो. पण माणूस 'असणं' अनेक शक्यतांना जन्म देतं. मग त्यात जिव्हाळा, संवाद, संघर्ष - सगळंच आलं. आजीबरोबर हे सगळं व्हायचं. संघर्षाचं प्रमाण कधी वाढत असलं तरी जो संवाद होता तो प्रामाणिक होता याचं मला बरं वाटतं.

आजीमध्ये जे आधुनिक आणि जुनाटपणाचं मिश्रण होतं त्याचं मला आश्चर्य वाटायचं. लग्न झाल्यावर एकदा केव्हातरी काही निमित्ताने आम्ही दोघांनी तिला वाकून नमस्कार केला तेव्हा आशीर्वाद देताना ती 'पहिला मुलगाच हवा आहे' असं ती स्पष्टपणे म्हणाली होती. आणि वर 'हो, मी स्पष्ट बोलतेय' हेही होतं. मी लग्नाआधीच आपल्याला मूल नको असा निर्णय घेतला होता आणि तसा प्रस्ताव हिच्यासमोर ठेवला होता. त्याला हिने लगेच मान्यताही दिली होती. अशा आशीर्वादानंतर कालांतराने आजीला आमचा हा निर्णय सांगितल्यावर तिला अर्थातच वाईट वाटलं होतं. पण मला अपेक्षित होती तितकी तिची प्रतिक्रिया तीव्र नव्हती. याबाबतीत मघाशी ज्या मैत्रिणीच्या आजीचा उल्लेख केला त्यांचाही एक किस्सा सांगण्यासारखा आहे. या मैत्रीणीला दोन मुली. दुसरी मुलगी झाल्यावर 'देव परीक्षाच बघत असतो' अशी आजीची प्रतिक्रिया. मुलगा होऊ दे असं मागणं मागणाऱ्या आजीचं तर्कशास्त्र असं की 'मुलगा काय अन मुलगी काय - दोन्ही सारखेच, पण मागताना चांगलंच मागावं की!' आजी लोकांचं हे 'मुलगा फिक्सेशन' एकूणच जबरदस्त! आणि मुलीवर प्रेम नाही असं नाही, पण त्यांच्या मेंदूचा एक कोपरा 'मुलगा झाला' या बातमीने जो उल्हसित होतो त्याला तोड नाही. माझ्या एका मित्राला पहिली मुलगी. दुसरा मुलगा. त्याला मुलगा झाल्याचं कळल्यावर माझ्या आजीचा चेहरा लक्षणीयरित्या खुलला आणि ती 'जिंकलं एकदाचं' असं म्हणाली होती! (हा आनंद अतिसूक्ष्म रूपात आजीनंतरच्या पिढीतल्या काही बायकांमध्येही असतो असं माझं निरीक्षण आहे.)

आजीला माझ्याबद्दल किती कळायचं याची मला शंकाच आहे. 'नोकऱ्यांची धरसोड करणारा' ही एक ओळख होती माझी. 'विद्वान' अशीही एक उपरोधिक ओळख (जे ती अर्थातच 'हा स्वतःला फार शहाणा समजतो' याला पर्याय म्हणून म्हणायची!) एखादा लेख कुठे छापून आला की ते मासिक कौतुकाने शेजाऱ्यांना, पाहुण्यांना दाखवायची. लेखात काय आहे हे तिला माहीत नसायचं. कविता वगैरे तर फारच दूरचा प्रांत. 'गाणं' तिला आवडायचं. 'कविता' तिच्या दृष्टीने बहुधा मुलीसारखी असावी!

आजी 'प्रथम व्यवहार, मग बाकी सगळं' यावर श्रद्धा असणारी आणि मी व्यवहाराचं महत्त्व (कदाचित नाईलाजाने) मानणारा, पण माणसातल्या उर्मींना पहिला मान देणारा. एक गोष्ट मात्र खरी की आजीचा हिशेबीपणा, नीटनेटकेपणा, शिस्त याचा मला फायदा झाला. त्या अर्थी ती मॅनेजमेंट गुरू होती! माझ्यातला कमालीचा विस्कळीतपणा आटोक्यात यायला आजीचं मोठं योगदान आहे.

आजीच्या पिढीतले बरेचसे लोक त्यांच्या शिस्तशीर जगण्यामुळे सुखी असावेत. किंवा शिस्तशीर जगणं हाच त्यांच्या आनंदाचा एक भाग असावा. टिळक टँकवर एकदा एक सीनियर काका भेटले होते. 'गेली वीस वर्षं रोज सकाळी सहा वाजता पोहायला येतो!' असं त्यांनी म्हटल्यावर त्यांच्याबद्दल मला एकदम कंटाळायुक्त आदर वाटू लागला होता. आजीच्या आखीव दिनक्रमाविषयी मला असंच काहीसं वाटायचं. मात्र एक उल्लेखनीय गोष्ट ही की तिने कधी कुठली तक्रार केली नाही. आपलं एकटीचं आयुष्य नीट आखून जगत राहिली. तिचं घराबाहेर पडणं बंद झाल्यावर तिचा घरातला दिनक्रम सुरू झाला होता. आम्ही दोघं दिवसभर बाहेर. घरात तिचे काही बारीक-सारीक उद्योग चालायचे. पुढे जेव्हा ती अगदी अंथरूणाला खिळली तेव्हाही 'कंटाळा येतो दिवसभर' असं कधीकधी म्हणायची ती अगदी सहज म्हणून, त्राग्याने अजिबात नाही. शेवटच्या दिवसात 'मला लवकर मरण येऊ दे म्हणून प्रार्थना करा' असं म्हणायची. मात्र दिनक्रम अचूक सुरू होता. तिला मी साधारण एक दिवसाआड आंघोळ घालायचो. आंघोळ झाली की नीट केस वगैरे विंचरून पावडर लावायची. टिकली लावायची. क्वचित केव्हातरी 'आज वडापाव आणतोस का?' अशी फर्माईशही व्हायची!

मी आईबरोबर जितकी वर्षं राहिलो त्याहून जास्त काळ आजीबरोबर राहिलो. अतिशय घट्ट धारणा असलेली आजी आणि सगळ्याच धारणा लवचीक असणारा मी. 'मग त्यात काय झालं?'  हा माझा आवडता प्रश्न आणि 'हे असंच व्हायला पाहिजे' हे तिचं मत. आपण भारत देशात एका विशिष्ट वर्गात, विशिष्ट शहरात, विशिष्ट पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात राहतो म्हणून आपण 'विशिष्ट' घडलो, यात आपलं कर्तृत्व काय हा मला सतावणारा प्रश्न तर असे प्रश्न पाडून न घेता 'मी जे काही केलं ते माझ्या हिमतीवर. पैसे नव्हते तेव्हा काटकसर केली आणि पैसे साठवले. कुणाहीकडे काही मागितलं नाही' असं सांगत दिवाळी-होळीचे पैसे मागायला आलेल्यांना वाटेला लावणारी आजी. 'आहे हे काँम्प्लिकेटेड आहे' हा माझा विचार आणि 'आहे हे असं आहे' हा तिचा विचार. ती आजारपणात जेव्हा माझ्या मावशीकडे राहायला जायची तेव्हा तिला महिन्याचे पैसे द्यायची! तिच्या आजारपणातला सगळा खर्च तिच्याच खात्यातून झाला. म्हणजे अधिक पैसे लागले असते तर आम्ही होतोच, पण ते तसे लागलेच नाहीत. आणि याची नोंद मीही घेतली खरी!

दोन अनोळखी माणसांची भेट, दोन माणसांतला वाद, दोन समूहातला संघर्ष म्हणजे 'दोन विश्वांची' टक्कर असते. स्पष्ट विरोधी भूमिकांमध्ये तर हे दिसतंच, पण प्रेमाच्या नात्यांमध्येही हे दिसतं. आजीच्या शेवटच्या दिवसात तिच्याजवळ असताना मला काय वाटायचं? ती काही असामान्य व्यक्ती नव्हती. पण ती माझी आजी होती. सहवासाने माणसाच्या भावना बहुधा टोकदार होतात. आणि तो माणूस नाहीसा झाला की इतर टोकं बोथट होत जात आपुलकीचं टोक अधिक तीव्र होतं. आजी म्हणजे एक 'काळ', 'स्वभाव', 'पद्धत' असं बरंच काही होती. खरकट्या भांड्यात पाणी घालून ठेवावं, घासलेली भांडी वाळत टाकताना आत थोडी हवा जाईल अशा बेताने पालथे घालावीत, उद्या करायच्या कामांची यादी आज रात्रीच टेबलावर तयार असावी किंवा भिंतीवरच्या पाटीवर लिहिलेली असावी, कॅलेंडरचा उपयोग आपलं एक नवीन कॅलेंडर बनवण्यासाठी कसा करावा, घरातल्या वाणसामानाच्या डब्यांवर घारीसारखी नजर कशी ठेवावी, स्वयंपाकघरातलं लॉजिस्टिक्स कसं सांभाळावं, घड्याळ डोळ्यांना कसं बांधून घ्यावं, स्वछता म्हणजे नक्की काय अशा अनेक गोष्टी मी तिच्याकडून शिकलो. खाड्कन मनातलं बोलायचा स्पष्टवक्तेपणा सोडून!

तिला आजारपणात त्रास झालाच. पण खूप जास्त नाही. गँगरिनने एक पाय निकामी होऊ लागल्यावर त्याचा काही भाग कापायचा निर्णय आंम्ही घेतला आणि त्यानंतर काही दिवसातच ती गेली. ती गेल्याचं मला सकाळी तिला उठवायला गेलो तेव्हा कळलं. रात्रीत कधीतरी ती गेली. त्याआधी तिने मला हाक मारली असेल का? रात्री ती हाक मारायची किंवा जवळचं पाणी प्यायचं भांडं वाजवायची. त्या रात्री तिने हाक मारली नव्हती. भांड्याचाही आवाज ऐकू आला नव्हता. त्यामुळे तो प्रश्न मला त्रास देत राहिला. अस्वस्थ करत राहिला. अजूनही ते आठवलं की मला अस्वस्थ व्हायला होतं. ती जातानाच्या क्षणी मी तिच्याजवळ नव्हतो याचा त्रास होत राहतो.

आजीचा मृत्यू अनपेक्षित नव्हता. त्यामुळे ती गेल्यानंतर आम्हाला कुणाला खूप धक्का असा बसला नाही. एखादा अपेक्षित मृत्यू झाल्यावरही जेव्हा लोक खूप रडतात तेव्हा मला त्याचं काहीसं आश्चर्य वाटतं. अर्थात ते रडणं खरोखरीच मनापासून असेल तर चांगलंच. बरेच दिवस अंथरूणाला खिळलेला माणूस जातो तेव्हा त्याची सेवा करणाऱ्यांना सुटल्यासारखं वाटत असणार हेही सत्य आहे. मला तसं वाटलं का? याचं प्रामाणिक उत्तर 'हो' असं द्यावं लागेल. पण माणसाचं 'वाटणं' इतकं एकरेषीय नसतंच. अमुक घटनेनंतर 'तुम्हाला काय वाटलं?' हा फार अवघड प्रश्न आहे. 'आता आजी नाही' याचा संबंध फक्त 'आता आपलं काम कमी झालं' याच्याशीच फक्त नव्हता. मला तीव्रतेने वाटलं ते हे की आपल्याकडून ती आजारपणात कधी दुखावली तर गेली नसेल ना? आणि तसं झालं असेल तर तिने परत यावं. मी पुन्हा सगळं व्यवस्थित करेन. हे वाटणं अर्थातच तर्काच्या पलिकडचं. पण तर्काच्या पलीकडेच बहुधा आपण स्वतःशी खरं बोलतो! विद्युतदाहिनीत नेईपर्यंत मी अगदीच शांतपणे सगळं करत होतो. रात्री झोपताना मात्र मला तिच्या आठवणीने काहीतरी वेगळं वाटू लागलं. ती असताना घरात देव होते. ती पूजा करायची. मी लहानपणी केव्हातरी पूजा केली असेल. नंतर भावाचा संपूर्ण अभाव निर्माण झाला आणि देवपूजा हा समीक्षेचा विषय बनला. पण आजी गेल्यावर मी तिचा फोटो फ्रेम करून भिंतीवर लावला आणि अनेक वर्षांनी प्रथमच कुठल्यातरी फोटोपुढे हात जोडले. मुख्य म्हणजे ते करताना मला कमालीचं शांत वाटत होतं. मला ते मनापासून करावसं वाटत होतं. माणसाचं पृथ्वीवर असणं हा उत्क्रांतीचा एक भाग आहे आणि त्यामागे कुठलंही प्रयोजन नाही ही माझी धारणा आहे. (तीही अर्थात लवचीक आहे!) आपल्या अस्तित्वाबाबत विचार करताना उत्क्रांतिवाद दाखवतो ती दिशा मला योग्य वाटते. त्यातून कदाचित सगळीच्या सगळी उत्तरं मिळत नसली तरी. शरीर आणि जाणीव यासह असलेलं सजीवांचं अस्तित्व जडातूनच विकसित झालं आहे हे मला पटतं. मात्र 'जाणीव' ही गोष्ट आपल्याला आपल्याचपासून काहीसं वेगळं पाडते खरी. जाणीव हीदेखील जडातूनच आली आहे हे पटतं, पण जाणीवच बहुधा वेगवेगेळे प्रश्नही उपस्थित करते. आज आजीचा फोटो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. तिची आठवण आली की मी तिच्या फोटोला हात लावून नमस्कार करतो. 'नमस्कार करणे' ही क्रिया आपोआप झाल्यासारखी होते. काही क्षण डोळे मिटतो. त्यावेळी मला एक अव्यक्त जोडलेपण जाणवतं. शांतपणे कॉटवर पाय हलवत बसलेली आजी आठवते. तिचे खास टोमणे आठवतात. आजारपणातली तिची असहायता आठवते. आणि अखेरीस तिच्या माझ्या नात्यातलं सगळं पुसलं जाऊन तिच्याविषयीचं प्रेम उरतं. हे सगळं होत असताना मला वाटतं की मी थोडा माझ्या बुद्धीच्या कक्षेच्या बाहेर येतो. आणि कदाचित तिथे थोडा वेळ असायला मला आवडतं.              

आजीला आम्ही 'इन्ना' म्हणायचो. आमचं (म्हणजे आजीचं) घर पुण्यात अगदी मध्यवर्ती ठिकाणी असल्याने मित्रांना जमण्यासाठी सोयीचं होतं - आहे. कॉलेजच्या दिवसांपासून 'इन्नाच्या घरी जमू' हे परवलीचं वाक्य होतं. आजही क्वचित तसं म्हटलं गेलं की मला बरं वाटतं. 'इन्नाचं घर' ही आमच्या घराची ओळख आहे. 'शेरलॉक' या बीबीसीवरील मालिकेत (अ स्कँडल इन बेलग्रॅव्हिया) मिसेस हडसनला होम्सच्या शत्रूकडून इजा झाल्यावर वॉटसन सुचवतो की त्यांनी काही दिवस दुसरीकडे राहायला जावं. त्यावर होम्स म्हणतो, "मिसेस हडसनने बेकर स्ट्रीट सोडायचा? नो! इंग्लंड वुड फॉल!" इन्नाचं तिच्या घरात असणंही काहीसं असंच आहे. त्या घरात तिला सर्वस्वी अनोळखी असे मार्क्स आणि आंबेडकर आलेले आहेत, देव नाहीसे झालेले आहेत. विचारांच्या पातळीवरचा माझा प्रवास तिच्या दृष्टीने दूरचा झाला असला तरी आमचं घर नाव घेताना तरी 'इन्नाचं घर' म्हणूनच ओळखलं जाईल. का ते माहीत नाही, पण मी तिच्याहून वेगळा असलो तरी माझीही ती मूक इच्छा आहे. याचं कारण बहुधा असं असावं की तसं नाही झालं तर द हाऊस मे नॉट फॉल, बट आय वुड फील लिटल पेन!

Saturday, February 1, 2014

मुजफ्फरनगर : भय इथले का संपत नाही?

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर आणि शामली जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर २०१३ मध्ये उसळलेल्या दंगलीत अनेक गावांनी या दंगलीचा भीषण वणवा अनुभवला. लाख बावडी हे असंच एक खेडं. लाख बावडीबरोबरच लिसाड, फुगना, कुत्बा, किराना, बुधना आणि बाहवाडी या गावांनाही मोठी झळ पोचली.

लाख बावडी गावचा पस्तीस वर्षाचा आबिद खान सांगतो की ८ सप्टेंबरला सकाळी साडेसातच्या सुमारास काही तरूण घराबाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की जीव प्यारा असेल तर लगेच पळून जा. घरातले आम्ही सगळे बिल्लू प्रधानच्या घराकडे निघालो. बिल्लू प्रधान म्हणजे सुधीरकुमार, लाखबावडी गावचा निवडून आलेला प्रमुख. तो बिल्लू प्रधान या नावाने ओळखला जातो. तुम्हाला काही होणार नाही असं सांगून बिल्लू प्रधानने त्याच्या मोठ्या घरात काही जणांना आसरा दिला आणि काही जणांना वेगवेगळ्या बाजूंनी पळून जायला सांगण्यात आलं.

आबिदच्या कुटुंबियांप्रमाणेच इतरही काही जण तिथे आले होते. त्यात सुमारे ३० स्त्रिया होत्या. बिल्लू प्रधानने जो रस्ता दाखवला होता त्या रस्त्याने आबिद, त्याचे आजोबा आणि त्याच्याबरोबरचे सुमारे ५० जण निघाले. या रस्त्यातच एक जमाव त्यांची वाट बघत थांबला होता. आबिदचे आजोबा आणि काका त्याच्या डोळ्यासमोर मारले गेले. आबिद आणि त्याचे वडील जीव वाचवण्यासाठी ऊसाच्या शेतात लपले. आबिदने पोलिसांना फोन केला. पोलीस चार तासाने, सगळं संपल्यावर आले. तोपर्यंत गावातल्या ८० लोकांना मारण्यात आलं होतं. आबिदच्या आजोबांचा मृतदेह त्याच दिवशी मिळाला. त्याच्या आईचा जखमी, नग्नावस्थेतला मृतदेह दुसऱ्या दिवशी मिळाला. त्याच दिवशी आबिद आणि वाचलेले कुटुंबीय गाजियाबादमधील लोई येथील निर्वासित छावणीत जाण्यासाठी निघाले.
       
आबिदचा हा अनुभव आऊटलुक साप्ताहिकाच्या तीस डिसेंबरच्या अंकात प्रकाशित झाला आहे. नेहा दीक्षित यांनी लिहिलेल्या लेखात आबिदबरोबरच इतर अनेक अनुभव आहेत आणि ते सुन्न करणारे आहेत. निर्वासित छावण्यात राहणाऱ्या अनेक स्त्रियांना त्यांनी प्रयत्नपूर्वक बोलतं केलं आणि त्या स्त्रियांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या कहाण्या सांगितल्या.

प्रत्येक कहाणीच्या तपशीलात जायची गरज असली तरी एका अर्थी तशी गरज नाहीदेखील कारण त्यात काय असणार आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. दंगल आणि दंगलीत स्त्रियांची विटंबना याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. इतिहास लाजिरवाणा असतो आणि तरीही त्याची पुनरावृत्ती होतेच. मग शतक कुठलंही असो. त्यादृष्टीने मध्ययुग आणि एकविसावं शतक यात काही फरक नाही!    

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हिमांशूकुमार यांचे निर्वासित छावण्यांच्या भेटीदरम्यानचे अपडेट्सदेखील महत्त्वाचे आहेत. ते लिहितात, मुजफ्फरनगर-शामली भागातील जौला येथील निर्वासित छावणीत राहणाऱ्या लियाकतला एके दिवशी विशेष तपासणी पथकाच्या अधिकाऱ्यांनी मुजफ्फरनगरला यायचा आग्रह केला आणि ते म्हणाले की तू ज्यांच्या नावाने तक्रार दाखल केली आहेस ती नावे काढून टाक. त्यावेळेला बहुतेक जण नमाज पढायला गेले होते. लियाकतला जबरदस्तीने गाडीत बसवल्यावर उपस्थित स्त्रिया गाडीपुढे आडव्या पडल्या. थोड्या वेळात नमाज पढायला गेलेले लोक परत आले. पोलिसांना लियाकतला तिथेच सोडून द्यावं लागलं आणि ते परत गेले. लियाकतचा व्हीडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहे. कहर म्हणजे सरकारच निर्वासित लोकांना हुसकावून लावण्याच्या प्रयत्नात आहे. २७ डिसेंबर २०१३ रोजी सरकारनेच काही झोपड्या तोडल्याचं वृत्त आहे.

५१००० मुस्लिम लोकांचे विस्थापन (अधिकृत सरकारी आकडा, खरा आकडा माहीत नाही), बलात्कार, खून, शामली आणि मुजफ्फरनगर भागातील हजारो लोक निर्वासित छावण्यात वस्तीला, त्यांच्या मनातील भीती, गाव सोडायला लागल्याचं दुःख, छावण्यातील अपुऱ्या सुविधा, १२ वर्षाखालील ३४ मुलांचा थंडीने गारठून मृत्यू आणि या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांचं वक्तव्य असं होतं की निर्वासित छावण्यात कुणी निर्वासित राहातच नाहीत, तिथे आहेत ते भाजप आणि काँग्रेसने पेरलेले राजकीय कार्यकर्ते आणि षड्यंत्रकारी लोक!

मुलायमसिंग यादव आजतागायत एकदाही निर्वासित छावणीला भेट द्यायला गेलेले नाहीत. समाजवादी पार्टीचा वार्षिक महोत्सव - सैफई महोत्सव - जो मुलायमसिंगांच्या सैफई या जन्मगावी दरवर्षी साजरा होतो त्यात यावर्षी कपिल शर्मा, कैलाश खेर, सलमान खान, शामक दावर वगैरेंनी हजेरी लावली. या महोत्सवाचं उद्घाटन वरिष्ठ पत्रकार वेदप्रकाश वैदिक यांच्या हस्ते झालं. यावेळी जया बच्चन उपस्थित होत्या. (महाराष्ट्रात अमिताभ बच्चनने राज ठाकरेंशी मांडवली केली त्यावरचा हा बहुधा उतारा असावा!). अखिलेश यादव आणि मुलायमसिंग यादव यांनी या 'सांस्कृतिक' महोत्सवाचा पहिल्या रांगेत बसून आनंद घेतला. ८ जानेवारी रोजी माधुरी दीक्षितचं नृत्य आणि सलमान खान, रणवीर सिंग, सोहा अली खान यांचा संयुक्त कार्यक्रम याने महोत्सवाची सांगता झाली. माधुरी दीक्षितच्या 'डेढ इश्किया' या आगामी चित्रपटावरील मनोरंजन कर राज्यात माफ करण्याची घोषणाही उत्तर प्रदेश सरकारने केली. हा चित्रपट करमुक्त करण्याचं कारण सांगताना एका प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितलं की या चित्रपटाचा काही भाग लखनौमध्ये चित्रित झाला आहे म्हणून तो करमुक्त करण्यात आला! मुजफ्फरनगरच्या जखमा ताज्या असताना, निर्वासित छावण्यात लोक हालात राहात असताना हा महोत्सव नीट सुरू झाला, तो १५ दिवस चालला, त्यावर वारेमाप खर्च केला गेला, माधुरी दीक्षितला आणण्यासाठी सरकारी विमान गेलं आणि दीक्षितबाई सैफईला पोचल्यावर सलमान खान, रणवीर सिंग आणि सोहा अली खानला आणण्यासाठे ते विमान पुन्हा मुंबईला पाठवण्यात आलं!    

मुजफ्फरनगर अनाकलनीय प्रकरण झालं आहे. मुस्लिमांची मसीहा म्हणवणारी समाजवादी पार्टी मुस्लिमांकडे संपूर्ण दुर्लक्ष करते आहे आणि दुसरीकडे भाजप अर्थातच धार्मिक विद्वेषाचा तवा गरम कसा राहील याची काळजी घेण्यात गुंतली आहे. २००२ साली गुजरातमध्ये राज्यसरकार पुरस्कृत हिंसा घडली. २०१३ मधलं मुजफ्फरनगरचं चित्रही वेगळं नाही. नियोजनबद्ध कत्तल! प्रत्येकच सरकार धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करतं. पण महत्त्वाचं असतं ते सरकार अधिकृत पत्रक, जाहीरनामे, घोषणा दर्शनी भागात, लोकांना दिसतील असं ठेवून जे दिसत नाही अशा कोपऱ्यात जे करतं ते!

मुजफ्फरनगर प्रकरण सुरू झालं ते २७ ऑगस्ट २०१२ ला. कवाल गावातल्या शाहनवाज नावाच्या एका मुस्लिम मुलाने एका जाट मुलीची छेड काढली आणि तिच्या दोन भावांनी (सचिन आणि गौरव) त्या मुलाचा खून केला. (एक माहिती अशी आहे की सात जाट युवकांनी मिळून हे कृत्य केलं. उरलेल्या पाच जणांना अजूनही अटक झालेली नाही.) याला प्रत्युत्तर म्हणून चिडलेल्या मुस्लिम समूहाने या दोन्ही भावांना मारलं.

आता गडबड अशी आहे की मुळात छेड काढली की नाही इथपासून गोंधळ आहे. प्रत्यक्षदर्शी लोक सांगतात की असं काही झालंच नव्हतं. वाद सुरू झाला तो सायकलींच्या टकरीवरून आणि त्यात मुलीची छेड काढल्याचा मुद्दा आणला गेला तो हिंदुत्ववादी अजेंड्याचा भाग म्हणून. अजून एक शक्यता अशी की त्या जाट मुलीचे आणि त्या मुस्लिम मुलाचे प्रेमसंबंध होते आणि जाट लोकांना ते मान्य नव्हतं. त्यामुळे शाहनवाजला मारणं हा ऑनर किलिंगचा प्रकार असू शकेल. गावातल्या काही दलितांकडून ही माहिती मिळाली असं फ्रंटलाईन पाक्षिकाच्या सप्टेंबर १८, २०१३ च्या अंकातील अजॉय आशीर्वाद महाप्रशस्त यांच्या लेखात म्हटलं आहे. याच लेखात ते म्हणतात की सचिन आणि गौरवच्या अंत्यसंस्कारानंतर परत येताना जाट लोक कवालमधील मुस्लिम वस्तीत गेले आणि त्यांनी मुस्लिमांच्या घरांची आणि दुकानांची तोडफोड केली. मशीदीचंही नुकसान केलं. एक मुस्लिम रहिवासी सांगतो की त्यावेळी ते 'जाओ पाकिस्तान वर्ना कब्रस्तान', 'हिंदू एकता जिंदाबाद', एक के बदले एकसौ' अशा घोषणा देत होते'. हा रहिवासी पुढे म्हणतो की दोन जाट मुलांना मारलं हे चूकच आहे. त्यातील दोषी लोकांना अटक करा आणि शिक्षा कराच. पण आमचा काय दोष? आम्ही यात हकनाक अडकलो आहोत आणि भीतीत जगण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही.

नात्सी जर्मनीने काही काळ पी. जी. वुडहाऊस या प्रसिद्ध ब्रिटीश लेखकाला अटकेत ठेवलं होतं. जर्मनांकडून छळ होऊनही तुझ्या मनात त्यांच्याबाबत राग कसा नाही असं पत्रकारांनी विचारल्यावर वुडहाऊस म्हणाला, 'आय कॅननॉट हेट इन प्ल्यूरल्स' - मी घाऊक तिटकारा कधीच करत नाही! आणि धार्मिक-जातीय दंगलींमध्ये नेमकं हेच होतं. घाऊक तिटकारा! एका मुस्लिम मुलाने चूक केली (ती चूकदेखील धार्मिक संबंधातली नाहीच!) म्हणून सगळ्या मुस्लिमांवर हल्ला. दुसरीकडे एका मुस्लिम मुलाला मारल्याच्या गुन्ह्याबद्दल कायदा हातात घेऊन त्या हिंदू मुलांना मारून टाकणं हीदेखील चूकच. (हे बहुसंख्याकांच्या हातात कोलीत दिल्यासारखं होतं). गुन्हा आणि गुन्हेगार याकडे सरळ दृष्टीने, एक विशिष्ट केस म्हणून न बघता त्याला हमखास जातीय-धार्मिक रंग दिला जातो आणि मग निष्पापांचं मुजफ्फरनगर व्हायला अजिबात वेळ लागत नाही! सामान्य नागरिक भडक माथ्याचे आहेत आणि अगदी मूर्ख आहेत हे जरी क्षणभर मान्य केलं तरी प्रशासनाचं काय? प्रशासनाने जानवं घालता कामा नये आणि नमाजही पढता कामा नये अशी अपेक्षा ठेवणं गैर आहे का? प्रशासनाने फक्त न्याय करणं आणि परिस्थिती आटोक्यात ठेवणं अपेक्षित आहे. आणि ते जर होत नसेल, कोणत्याही कारणाने, तर तो दोष त्यांचा नाही तर कुणाचा? मुजफ्फरनगरमध्ये एवढं सगळं होऊनही मुलायमसिंग यादव तिकडे फिरकले नाहीत. दुसरीकडे जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या कार्यकर्त्यांनी मात्र १४ ते २० डिसेंबरदरम्यान मुजफ्फरनगरमध्ये फिरून परिस्थितीची माहिती घेतली, लोकांशी संवाद केला आणि २० डिसेंबर ते २३ डिसेंबर अशी चार दिवसांची 'दिल जोडो, नफरत छोडो यात्रा' आयोजित केली. संवेदना जागी असणारे लोक आपल्या परीने शांततेसाठी प्रयत्न करताना दिसतात आणि ज्यांच्या पाठीशी सगळ्या यंत्रणा, पोलीस तैनात आहे ते मात्र अशा वेळीही जागचे हलत नाहीत! दंगलीच्या वेळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसबळाचा वापर केला जातो, पीडितांना नुकसानभरपाई दिली जाते हे ठीकच पण अशा भीतीच्या वातावरणात सलोखा निर्माण करण्यासाठी 'आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, घाबरू नका' हा मानसिक आधार देण्याची फार गरज असते. अल्पसंख्य समाजाला तर याची अतिशय गरज असते. सरकार-प्रशासन हे का करत नाही? की अशा 'आउट ऑफ फॅशन' गोष्टी जनआंदोलनांसाठी राखून ठेवल्या आहेत? (अशा वेळी गांधीबाबांची आणि नौखालीची आठवण येतेच आणि मग प्रशासन, सरकार, अगदी राजकीय विश्लेषक वगैरे मंडळीसुद्धा त्यावर भाबडेपणाचं लेबल लावून मोकळे होतात!)

२७ ऑगस्टच्या घटनेनंतर सेक्शन १४४ लागू केलं गेलं होतं. पण तरीही ३० ऑगस्ट रोजी एक जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीशी संबंधित जिल्हा आणि राज्य पातळीवरचे मुस्लिम नेते उपस्थित होते. त्यांच्याकडून प्रक्षोभक भाषणे केली गेली. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी यांच्यातून वास्तविक विस्तवही जात नाही, पण या व्यासपीठावर ते एकत्र आले. त्यापाठोपाठ भाजपचे आमदार सोम संगीत यांनी एक फेक व्हीडिओ अपलोड केला. (हे संगीत सोम ठाकूर जमातीचे नेते. मुजफ्फरनगरमधील सरधना येथील पूर्णतः धर्माआधारित निवडणुकीत ते भाजपच्या तिकीटावर हाजी याकूब कुरेशी यांच्याविरुद्ध जिंकले होते. हे कुरेशी म्हणजे ज्यांनी डेन्मार्कच्या व्यंगचित्रकाराविरुद्ध त्याने महंमद पैगंबरांच आक्षेपार्ह चित्रण केलं म्हणून फतवा काढला होता आणि त्याचं शीर आणून देणाऱ्याला पन्नास लाखांचं इनाम जाहीर केलं होतं! व्हीडीओ प्रकरणात संगीत सोमवर गुन्हा दाखल झाला.) त्यात मुस्लिम जमावाकडून दोन हिंदू मुलांची कशी निर्घृण हत्या झाली याचं चित्रण आहे असा प्रचार केला गेला. या व्हीडीओमुळे धार्मिक तणाव मोठ्या प्रमाणात वाढला. ७ सप्टेंबर रोजी हजारो जाट शेतकऱ्यांची एक 'बहू बेटी बचाओ महापंचायत' बोलावली गेली. ही सभा भाजपच्या स्थानिक कार्यालयाच्या पुढाकाराने भरवली गेली होती. स्थानिक हिंदू नेत्यांची या सभेत प्रक्षोभक भाषणे झाली. या सभेनंतर हिंसेच्या घटना वाढल्या आणि परिस्थिती हाताबाहेर गेली.

कलम १४४ लागू असताना राजकीय नेत्यांना सभा आयोजित करण्याची परवानगी कशी मिळाली आणि या नेत्यांना अटक का झाली नाही (त्यांची नावे नंतर दाखल केल्या गेलेल्या एफआयआरमध्ये होती) हे प्रश्न अनुत्तरित आहेत. यामधून काही काँस्पिरसी थिअरीजनी जन्म घेतला - हिंदू आणि मुस्लिम मते वाटून घेण्यासाठी समाजवादी पार्टी आणि भाजप यांच्यात छुपा करार झाला आहे, काँग्रेसचा उद्देश मुख्य मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष हटवणं हा आहे, भाजपला जाट मतदारसंघ काबीज करायचा आहे इ. याव्यतिरिक्त या दंग्यांचा सर्वात मोठा 'राजकीय खुलासा' असाही आहे की नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी उत्तर प्रदेश काबीज करण्याचे भाजपचे हे डावपेच आहेत. आजच्या भारतीय राजकारणावरील उजव्या शक्तींचा प्रभाव बघता येत्या दिवसात काय होऊ शकतं याची एक झलक मुजफ्फरनगरच्या निमित्ताने बघायला मिळाली आहे. संघ परिवार आणि भाजप यांच्याकडून जातीविशिष्ट (मुजफ्फरनगरच्या संदर्भात जाट लोकांशी संबंधित) चालीरीतींचा संबंध 'धार्मिकते'शी जोडण्याचा प्रयत्न होताना दिसतो. जात-संस्कृती आणि धर्म-राजकारण यातील सीमारेषा पुसण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जातो आणि त्यातूनच ७ सप्टेंबरच्या 'बहू-बेटी बचाओ पंचायतीचं रूपांतर हिंदू अस्मिता 'लव्ह जिहादीं'पासून वाचवायच्या संघर्षात झालं.  (संदर्भ : इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली, ५ ऑक्टोबर २०१३. Mujaffarnagar 2013 - Meanings of Violence, हिलाल अहमद यांचा लेख). लव्ह जिहाद म्हणजे मुस्लिम तरूण मुलांनी इतर धर्मीय मुलींना लक्ष्य बनवून, त्यांच्याशी प्रेमाचं नाटक करून त्यांना इस्लाम स्वीकारायला लावणे. विश्व हिंदू परिषदेची प्रेस नोट म्हणते की जिहादी लोकांकडून गावोगावच्या हिंदू मुलींच्या शीलहरणाच्या घटना सहन करण्याच्या पलीकडे गेल्या तेव्हा समाज त्यांच्या विरोधात बहू बेटी बचाओ आंदोलनाच्या रूपाने उभा राहिला आहे. गावोगावी जर हिंदू मुली शीलभ्रष्ट होत असतील तर आजवर विश्व हिंदू परिषद आणि भाजप वगैरे मंडळी गप्प बसली हे एक नवलच! आणि ज्या हिंदू मुलींवर हिंदू पुरूषांकडून अत्याचार झाले आहेत त्या हिंदू पुरूषांबाबत आपलं काय म्हणणं आहे हेही विहिंपने एकदा सांगून टाकावं!

हिलाल अहमद यांच्या लेखात त्यांनी आणखी एका मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे ते म्हणजे मुजफ्फरनगरमधील मुस्लिम लोकांमधील जातीभेद. अश्रफ मुस्लिम हे उच्चजातीय आहेत आणि नॉन अश्रफ समूह हे निम्नजातीय समजले जातात. (मुजफ्फरनगरमध्ये एकूण लोकसंख्येच्या ३०% मुस्लिम आहेत). एका अनधिकृत अंदाजानुसार मुजफ्फरमधील दंगलीत जे मुस्लिम मारले गेले त्यातील बहुसंख्य मुस्लिम तथाकथित खालच्या जातीचे होते.

मुजफ्फरनगरची परिस्थिती मानवीय दृष्टीकोनातून पाहिलं तर ती कमालीची भीषण आहे हे उघडच आहे. पण त्याहून धडकी भरते ती भविष्याच्या कल्पनेनी. उत्तर प्रदेशचं भारतीय राजकारणातील महत्त्व सर्वश्रुत आहे. बहुमतासाठी आवश्यक २७२ जागांपैकी ८० म्हणजे सुमारे तीस टक्के जागा उत्तर प्रदेशच्या आहेत. अमित शहा सध्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे 'पोल मॅनेजर' आहेत त्यामुळे बऱ्याच गोष्टींकडे आपोआपच निर्देश होतो आहे. नरेंद्र मोदींना उत्तर प्रदेशमध्ये धडाक्यात प्रमोट केलं जात आहे. समाजवादी पार्टीबाबत संभ्रमच आहे. कारण हिंदू मतांकरता ते उघडपणे काही करणार नाहीत आणि दुसरीकडे मुस्लिमांसाठीही ते काही करत नाही आहेत. मुजफ्फरनगरमुळे त्यांच्यावर प्रशासकीय नामुष्की ओढवली आहे ती वेगळीच. त्यामुळे त्यांची बस जवळजवळ चुकलीच आहे. काँग्रेसचं पानिपत लोकसभा निवडणुकीत रोखता येणार नाही ही बऱ्याच जणांची अटकळ आहे (सोनिया गांधीचीसुद्धा असेल!). आणि तसंही उत्तर प्रदेशातून काँग्रेस उखडली गेल्यात जमा आहे. अजित सिंग यांच्या राष्ट्रीय लोक दल या जाट पक्षाचाही फारसा प्रभाव राहिलेला नाही. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दहा जागा मिळाल्या होत्या. २००१ मध्ये त्यांनी भाजपशी युती केली होती आणि नंतर ते बाजू बदलत राहिले आहेत. त्यामुळे गेली काही वर्षं जाट समुदाय भाजपकडे वळू लागला आहे. (मुजफ्फरनगरने तर त्यावर शिक्कामोर्तबच केलं आहे). वाल्मिकी समुदाय, जो दलित समुदाय आहे, भाजपने आपल्याकडे वळवायला सुरूवात केली आहे. शामलीध्ये सप्टेंबर ४, २०१३ रोजी झालेल्या वाल्मिकी-मुस्लिम चकमकीत काही वाल्मिकींना अटक झाली होती. त्यानंतर भाजपने तिथे बंद पुकारला आणि शामलीच्या पोलिस अधीक्षकांची बदली करण्याची मागणी केली. तो मुस्लिमच होता. काही महिन्यांपूर्वी एका वाल्मिकी मुलीवर बलात्कार झाला तेव्हा भाजप नेते हुकूम सिंग यांनी मोठी सभा बोलावली, धरणं दिलं आणि संबधित पोलिस अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी केली. प्रकरण शेकेल म्हणून सप्टेंबर २० रोजी सरकारने त्या अधिकाऱ्याची बदली केली. रोहिलखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेश (जिथे वरूण गांधी भाजपचे प्रतिनिधी आहेत) मध्ये भाजप सक्रिय आहे. 'आप'ने दिल्लीत झेंडा रोवला असला तरी उत्तर प्रदेशबाबत आत्ता काही सांगता येणं कठीण आहे. या परिस्थितीत भाजपने आपले हातपाय पसरायला जी सुरूवात केली आहे त्यात ते यशस्वी झाले तर?

समकालीन हिंदुत्व स्वतःला कसं प्रकट करतं आहे आणि कोणकोणत्या मार्गाने प्रकट करतं आहे इकडे नीट पाहिलं पाहिजे. हिंदुत्वाचं वादळ पुरेसं ताकदवान झालं आहे. 'आप'सारख्या पक्षाने जनतेत नवचैतन्य आणलं असलं आणि ती अतिशय स्वागतार्ह, कौतुकास्पद गोष्ट असली तरी पूर्ण देशाचा विचार करताना भाजपचं अस्तित्व आणि वेग पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष विचारांसाठी चिंताजनक आहे. म्हणूनच मुजफ्फरनगर देशाला कुठे घेऊन जाईल ही भीती वाटते आणि ही भीती वाटते याचं कारण धर्माधिष्ठीत राजकारण करणारे अजूनही लोकांना आपल्याकडे वळवू शकतात या वास्तवात आहे.

- मिळून साऱ्याजणी (फेब्रुवारी २०१४)