Saturday, September 15, 2018

मॅन, वुमन आणि मन

मागील लेखात आपण जातवास्तवाच्या आव्हानांविषयी बोललो होतो. विवाहसंस्था ही जातीसंस्थेची रक्षक आहे असं आपण म्हटलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या पुस्तकाचा आपण आधार घेतला होता त्या 'अनाहिलेशन ऑफ कास्ट' या पुस्तकात आंतरजातीय विवाह हा जातीव्यवस्था नष्ट करण्याचा एक मार्ग आहे असं त्यांनी नोंदवलेलं आहे. परंतु जात ही एक संकल्पना आहे, मनोवस्था आहे आणि त्यामुळे एखादा भौतिक अडथळा आपण दूर करतो तशी ती दूर होणार नाही - त्यासाठी संकल्पनात्मक बदलच करावा लागेल असं ते पुढे लिहितात. हा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. लेखाच्या शेवटी आपणही 'जात-धर्माने येणारा कमकुवतपणा नाकारणारं मन हवं आहे' असं म्हटलं होतं. 

'मनात बदल करणे' हा लिहायला-बोलायला सोपा, पण प्रत्यक्षात महाकठीण, त्रासदायक मुद्दा आहे. जेव्हा जेव्हा जुन्या-नव्याचा संघर्ष होतो, काहीतरी नवीन पुढे येऊन उभं ठाकतं तेव्हा स्वीकृती आणि अस्वीकृतीच्या रस्सीखेचीत मन दमून जात असतं. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात नवं काही मांडणाऱ्यांनी हे लक्षात घेऊन आपलं म्हणणं शांतपणे  मांडत राहणं श्रेयस्कर असतं. अभिव्यक्ती कधीकधी तिखट व्हायला हरकत नसते - कारण तिरकस, तिखट मांडणीसुद्धा परिणामकारक ठरू शकते. फक्त मुद्दा माणसांशी जोडून घेण्याचा असतो. आपला उद्देश जर बदल घडवणं हा असेल तर ती लांब पल्ल्याची लढाई आहे हे विसरून चालत नाही. आपले व्यूह त्या अनुषंगाने आखावे लागतात. 

विवाहसंस्था हा जातिव्यवस्थेशी घट्ट जोडलेला मुद्दा आहे. परंतु त्याचबरोबर आणि कदाचित त्याच्याही आधी तो स्त्री-पुरूष संबंधांशी जोडलेला मुद्दा आहे. स्त्री-पुरूष संबंध हा जातीप्रमाणेच इतरही अनेक सामाजिक रचितांचा पाया असतो. यातला एक मुख्य भाग अर्थातच माणसाची प्रजाती वाढवणे हा आहे. म्हणूनच स्त्री-पुरूष संबंधांचं नियमन आपल्या सामाजिक व्यवहारांच्या नियमनातील एक अतिशय कळीचा मुद्दा आहे. या लेखात आपण या विषयावरील चर्चेला सुरूवात करू.  
     
व्यक्तींमधील नातेसंबंध हा एक रोचक, रंजक असा विषय आहे. त्याबरोबरच तो एक तणावपूर्ण विषयही आहे. सामाजिक-आर्थिक रचितांमुळे आणि मानवी उर्मींमुळे नातेसंबंधांमध्ये ताण येतातच. आजच्या कुटुंबाच्या, सामाजिक संबंधांच्या स्वरूपात जे ताण आहेत ते या संबंधांना सुरूवात झाली तेव्हापासूनचे ताण आहेत. त्यामुळे नातेसंबंधांविषयी बोलताना एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला हवी की या विशिष्ट बाबतीत मानवी मेंदू काही हजार वर्षांपूर्वीच्या मानवी मेंदूसारखाच आहे. आपण तंत्रज्ञानात पुष्कळ प्रगती केली असली तरी ज्या भावभावनांचे आपण काही हजार वर्षांपूर्वी गुलाम होतो त्याचे गुलाम आपण अजूनही आहोत. तो एक मोठा संशोधनाचाच विषय आहे. टोळी समाजापासून आजवर आपल्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या, आपल्या वर्तनाला आकार देणाऱ्या दोन प्रमुख गोष्टी म्हणजे लैंगिकता आणि राजकारण. मानवी भावनांचा, इच्छा-आकांक्षांचा  'स्पेक्ट्रम' खूप मोठा आहे, त्यात अनेक छटा आहेत आणि या दोन गोष्टी त्यातील अनेकांवर आपलं वर्चस्व गाजवतात. 

स्त्री आणि पुरुषांमधील नातेसंबंध ही नातेसंबंधांची विशेष जातकुळी आहे. त्यातही छटा आहेतच. म्हणजे स्त्री - पुरुषांमधलं आदिम आकर्षण व प्रेम - ज्याचा पाया लैंगिकता आहे - ही एक मुख्य छटा. त्यानंतर कुटुंब संस्थेच्या विकासानंतर आई - मुलगा, बहीण - भाऊ, वडील - मुलगी या प्रेमाच्या इतर छटा येतात. निव्वळ लैंगिक आकर्षणाच्या वर भावनांचे स्तर चढत जाऊन स्त्री - पुरुषांमध्ये जे रोमँटिक नातं तयार होतं त्या नात्याचे बहुविध आयाम स्त्री - पुरुषांमधील नात्याला कायम आंदोलित करत आले आहेत.  युव्हाल हरारी या अभ्यासकाचं 'सेपियन्स' हे सध्या गाजत असलेलं पुस्तक आहे. या पुस्तकात त्याने एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. होमो सेपियन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानवाच्या प्रजातीने पृथ्वीवर आपलं बस्तान बसवलं त्यात त्याच्या 'कल्पित वास्तव' (Imagined Reality) रचण्याच्या क्षमतेचा मोठा वाटा होता. हे कल्पित वास्तव म्हणजे काय ? तर काल्पनिक कथानक रचणं आणि ते लोकांना पटवून देणं. होमो सेपियन्सनी जे समूहजीवन उभारलं आणि आजचे होमो सेपियन्स - म्हणजे तुम्ही-आम्ही सगळे - ज्या गुंतागुंतीच्या समूहजीवनात जगतो आहोत त्याचा आरंभ कल्पित वास्तवामुळे झाला असं युव्हाल हरारी लिहितो. देव, धर्म, मानवाधिकार, ईश्वर, समता व बंधुतेसारखी मानवी मूल्यं ही कल्पित वास्तवाची उदाहरणं आहेत. अनेकजणांनी या कल्पित वास्तवावर श्रद्धा ठेवली आणि त्यातून समाज रचना आकारास येत गेली. हे अधिक तपशिलात समजून येण्यासाठी 'सेपियन्स' वाचणं इष्ट होईल. पण मला स्त्री - पुरुष नातेसंबंधांचा विचार करताना या 'कल्पित वास्तवा'ची आठवण झाली कारण या विषयाचा विचार करत असताना एक प्रश्न पडतो तो असा की स्त्री - पुरुष संबंधांचं 'मूळ सत्य', 'खरं वास्तव' काय आहे ?

हा प्रश्न कदाचित काहींना अप्रस्तुत वाटेल, विषयाचा कीस पाडायच्या उद्देशाने विचारल्यासारखा वाटू शकेल. पण स्त्री-पुरूषांनामधील रोमँटिक नात्याविषयी, इंटिमेट रिलेशनविषयी बोलताना हा प्रश्न विचारणं तत्त्वतः महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. या प्रश्नाचं एक स्पष्ट उत्तर 'लैंगिकता' हे आहे. पण लैंगिकता म्हणजे तरी नक्की काय ? म्हणजे एखाद्या स्त्रीकडे / पुरुषाकडे पाहून एखाद्या पुरुषामध्ये / स्त्रीमध्ये कामभावना जागी होऊन शरीरसंबंधांची इच्छा निर्माण होणं ही लैंगिकता की आवडलेल्या स्त्री / पुरुषाला ओझरता स्पर्श केल्याने मनात निर्माण होणारं समाधान / बेचैनी म्हणजे लैंगिकता? आणि जर केवळ अव्यक्त आकर्षण असेल तर तीही लैंगिकता का? सेक्शुअल आणि असेक्शुअल यामधल्या फरकाची रेघ कशी आखायची? लैंगिकता या शब्दाचा अर्थ आपण सहसा शारीरिक आकर्षण, शरीरसंबंध याच्याशी जोडतो. पण कुठल्याही भावनेसारखाच लैंगिकतेचाही 'स्पेक्ट्रम' असतो, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. स्त्री व पुरुषामध्ये जे ताण अस्तित्वात असतात त्यात जैविक ताणही आहेत हे जर आपण समजून घेतलं तर या संबंधांचं व्यवस्थापन सोपं होईल. स्त्री व पुरुषाच्या विशिष्ट वर्तनाच्या मुळाशी जाणं सोपं होईल. 'लिंगभाव' हा शब्द या संदर्भात समर्पक आहे कारण तो लिंगविशिष्ट जाणिवेशी जोडलेला आहे.

मानवी इतिहासाच्या वाटचालीत आपण जी मूल्यं रुजवली ती युव्हाल हरारी म्हणतो तशी कल्पित वास्तवं असली तरी ती अस्तित्वाच्या लढाईत उपयुक्त ठरली आणि पुढे समूहजीवनासाठीदेखील उपयुक्त ठरली, व्यक्तीच्या स्वतंत्र व आनंदी जगण्यासाठी उपकारक ठरली. त्यामुळे तिथे काहीच दुमत नाही, परंतु जैविक प्रेरणा आपल्यावर अजूनही 'हावी' होऊ शकतात हे लक्षात न घेता मूल्यव्यवस्थेच्याच आधारे स्त्री - पुरुषांच्या वर्तनाचा उलगडा करायचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होत नाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे. जैविक प्रेरणांचा उल्लेख अशासाठी कारण आपण इथे स्त्री - पुरुषांमधील जैविक ताणाचा विचार करतो आहोत. स्त्री - पुरुष संबंधांना मित्रत्व, ममत्व, सहानुभूती हे आयाम अर्थात आहेतच आणि ते निःसंशयपणे 'प्रगल्भ आयाम' आहेत. परंतु स्त्री - पुरुषांमध्ये प्रेम, लैंगिक आकर्षण हे आयाम जैविक ताण निर्माण करतात म्हणून त्यावर विचार करणं आवश्यक वाटतं. कालानुरूप हे आयाम बदलतात हेही खरं आहे. म्हणजे पन्नासच्या दशकातील प्रेमभावना आणि आजची प्रेमभावना यात मूलभूत साम्य असलं तरी प्रकटीकरणात, प्रेमभावनेशी 'डील' करायच्या पद्धतीत आज फरक पडला आहे. लैंगिकता आपलं अस्तित्व स्पष्टपणे ठसवू पाहते आहे. या पार्श्वभूमीवर पुढील लेखात प्रेम, लैंगिकता यावर अधिक तपशीलात बोलू आणि त्याआधारे स्त्री-पुरूष संबंधांचं नवीन आकलन होऊ शकेल का ते तपासून पाहू.     

Saturday, September 1, 2018

जातवास्तवाचं आव्हान

एक जुना प्रसंग आठवतो. कॉलेज संपवून मी नोकरीला लागलो होतो. आमच्या कॉलनीतील एका परिचितांकडे काही कामाने जाणं व्हायचं. त्यांचा मुलगा त्यावेळी बहुधा सहावी-सातवीत होता. एके दिवशी त्याने मला अचानक विचारलं, "तू कोण आहेस?" मला आधी कळेना, पण नंतर लक्षात आलं की तो माझी जात विचारत होता. एका शाळकरी मुलाने मला असं विचारावं याची मला मौज वाटली. आज इतक्या वर्षांनी हे आठवल्यावर पुन्हा मौज वाटलीच, पण उद्विग्नही व्हायला झालं. 

आपण राहतो त्या समाजाशी, त्या समाजाच्या मानसिकतेशी आपली नाळ जुळते का याचं प्रत्येकाचं उत्तर असेल. माझं प्रामाणिक उत्तर 'नाही' कडे झुकण्याचं एक कारण आपल्या समाजातील जन्माधिष्ठित विभागणी हेही आहे. नाळ जुळत नाही हे बहुधा उद्वेगाने वाटतं पण त्याचवेळी भारतीय समाज, त्याचे अनेकविध पैलू हे समाजशास्त्रीयदृष्ट्या कुतूहलाचं वाटतं हेही खरं. आपलं सामाजिक स्थान बऱ्याच गोष्टी निश्चित करत असतं. 'मी विचार करू शकतो, लिहितो' यातला एक (मोठा) वाटा माझ्या वर्गीय स्थानाचा असतो आणि भारतीय संदर्भात तो जातीचाही असतो हे जाणवणं तसं विषण्ण करणारं आहे. आपल्या समाजातील जातवास्तवाचा विचार करताना मला विलास सारंगांच्या 'मॅनहोलमधला माणूस' या पुस्तकाची आठवण होते. मराठी साहित्य, समाज आणि  जातवास्तव हा या पुस्तकाचा विषय आहे. सारंग एके ठिकाणी लिहितात, 'अनेक शतकं समाजाने जातिव्यवस्था राबवलेली आहे. पिढ्यान पिढ्या हे ज्ञान मेंदूत संक्रमित झालेलं आहे आणि ते भारतीय माणसाच्या मनात नेणिवेचा भाग बनलेलं आहे. याही पुढे जाऊन असं म्हणता येईल की जातिभान हा घटक भारतीय माणसाच्या जनुकांचा भाग बनलेलं आहे. जातिवास्तवाचं प्रदीर्घ सातत्य लक्षात घेता जातियंत्रणा ही भारतीय माणसाच्या जनुकसंचिताचा भाग बनलेली असणं शक्य आहे. पुढल्या वीसेक वर्षात मेंदूतील जातिज्ञानाचं शरीरशास्त्रीय अस्तित्व पडताळून पाहता येणं शक्य आहे.'

'जात ही भारतीय समाजमनाच्या नेणिवेचा भाग बनली आहे' हे सारंगांचं विधान माझ्या मनातील विचार प्रतिबिंबित करणारं होतं. जातवास्तवाकडे मी 'आधुनिकतेतला अडसर' म्हणून तर बघतोच पण त्याच्याही आधी समाजाचं 'गुणवत्तापूर्ण जगणं' रोखणारा घटक म्हणूनही बघतो. जात या मुद्द्याबरोबर ओघाने येणारा मुद्दा म्हणजे आरक्षण.  सामाजिक विषमता दूर व्हायला मदत व्हावी म्हणून आरक्षणाची कल्पना अंमलात आणली गेली आणि ते स्वागतार्हच आहे. जन्माधिष्ठित विभागणीमुळे ज्यांच्यावर पिढ्यानपिढ्या अन्याय झाला त्यांना आता समान संधी मिळाव्यात म्हणून केलेलं हे 'पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन' होतं. आज या विषयातील गुंते वाढले आहेत आणि खरं सांगायचं तर त्यावर  बोलण्याइतका माझा अधिकार नाही. काही गोष्टी अगदीच जाणवतात, पण त्यावर निर्णायक काही म्हणता येईल असं वाटत नाही. (जात जायला हवी हे निर्णायकपणे वाटतं!) त्यामुळे आरक्षण हा मुद्दा बाजूला ठेवून आपण 'जात' या आरक्षणाच्या पुष्कळ आधीपासूनच्या वास्तवाबद्दल, आपण त्यावर काय करू शकतो याबद्दल बोलणार आहोत. याबाबत एक किस्सा सांगतो. काही महिन्यांपूर्वी भीमा - कोरेगावला जे घडलं त्या संदर्भाने मला एका परिचितांनी काही फॉरवर्डेड मेसेजेस पाठवले. दलित संघटनानांनी पुकारलेला बंद अनाठायी होता असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना मी एक मोठा रिप्लाय दिला. त्यातला एक मुद्दा असा होता - 'भीमा-कोरेगावला जे घडलं' आणि ‘भीमा-कोरेगावला जे घडलं त्यामुळे पुढे जे घडलं' यातील दुसऱ्या प्रकारामुळे अस्वस्थ, संतप्त होऊन बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. तुमचे मेसेजेस त्याच धर्तीचे आहेत. पण पहिल्या प्रकाराबाबत, म्हणजे 'भीमा कोरेगावला जे घडलं' त्याबाबत तुमची प्रतिक्रिया समजली नाही. ती समजून घ्यायला मला आवडेल. एकूणच सवर्ण-दलित संघर्षाबाबत तुम्हाला काय वाटतं, फार पूर्वी नाही तर अगदी अलीकडील काळापर्यंत दलितांवर जे अत्याचार झाले त्याबाबत तुम्हाला काय वाटतं, खैरलांजी-खर्डा आणि इतर घटनांबाबत तुम्हाला काय वाटतं हे समजून घ्यायला मला आवडेल. या घटना भयंकर होत्या आणि दोषींना शिक्षा व्हायला हवी असं तुम्ही म्हणाल याची मला कल्पना आहे. पण त्याच्यापुढे जाऊन, जातीवर आधारित आपल्या सामाजिक रचनेबाबत तुम्हाला काय वाटतं, सवर्ण आणि मुख्य म्हणजे शिक्षित, बुद्धिमान, शहरी विकासाचे लाभार्थी म्हणून आपली काही विशेष जबाबदारी आहे की नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं हे समजून घ्यायला मला आवडेल.'  

आपली जन्मदत्त जात, तिने प्रभावित केलेलं आपलं सांस्कृतिक जगणं, आपलं विचारविश्व आणि संथपणे, सूक्ष्मपणे, तर कधी बऱ्याच भडकपणे समाजामध्ये कळेल न कळेल अशी दरी निर्माण करत जाणारा जातिभेदाचा प्रवाह याचं आपलं आकलन काय आहे ? आपल्याला या भेदासह जगणं मान्य आहे, नाईलाजानं मान्य आहे, आपण यावर काही करू इच्छितो का असे बरेच प्रश्न मनात उभे राहतात. आणि अशावेळी मला अटळपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या 'अनाहिलेशन ऑफ कास्ट' या दीर्घ निबंधाची आठवण होते.

१९३६ साली लाहोरमधील जात-पात-तोडक-मंडळ या सुधारणावादी संस्थेनं आंबेडकरांना वार्षिक कार्यक्रमात व्याख्यानासाठी बोलावलं होतं. त्यांचं लिखित स्वरुपातील व्याख्यान मंडळाकडे आधी पोचलं आणि ते वाचल्यावर मंडळातील मंडळींच्या लक्षात आलं की हे प्रकरण आपल्याला झेपणारं नाही. कारण व्याख्यानात आंबेडकरांनी जातिव्यवस्थेची कठोर चिकित्सा केली होतीच, पण त्याचबरोबर त्यांनी हिंदू धर्माचीही चिकित्सा केली होती. मंडळाने कार्यक्रम रद्द केला. हे भाषण होऊ शकलं नाही. मग आंबेडकरांनी या व्याख्यानाच्या प्रती स्वतः छापून वितरित केल्या आणि हे छोटं पुस्तक परिवर्तनवादी चळवळीचं एक धारदार हत्यार बनलं. 

आंबेडकरांचं लेखन वाचताना तुम्हाला सावरून बसायला लागतं. कारण 'बॅरिस्टर' आंबेडकर जी तार्किक आर्ग्युमेंट्स करतात त्यांनी तुम्ही गारद व्हायची शक्यता असते. 'अनाहिलेशन ऑफ कास्ट' इंग्लिशमध्ये तर उपलब्ध आहेच पण त्याचे बऱ्याच भाषांमधून अनुवाद झाले आहेत. सुगावा प्रकाशनाने 'जातिप्रथेचे विध्वंसन' या नावाने मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे. (अनुवादक : गौतम शिंदे)  'भारतात सामाजिक सुधारणांना मित्र थोडे आणि टीकाकार फार' हे अधोरेखित करत आंबेडकरांच्या विवेचनाची सुरुवात होते आणि पुढे वाचताना आपण केवळ गुंगत जातो. मी हे पुस्तक वाचताना अनेक विधानं, काही परिच्छेद अधोरेखित करून ठेवले होते. वानगीदाखल काही उदाहरणं पहा - 'जात ही केवळ कामांची विभागणी नसून कामकऱ्यांची विभागणी आहे'. 'जातीचे अस्तित्व आणि जातीची जाणीव भूतकाळातील वैराची आठवण कायम ठेवण्याचं काम करते'. 'जातिपद्धती ही सामूहिक कृतीला प्रतिबंध करते'. 'चातुर्वर्ण्याच्या पद्धतीमुळे प्रत्यक्ष कृती करण्यास हिंदूंचे खालचे वर्ग असमर्थ बनवले होते'. 'बिगर हिंदूंमध्ये जातीला कोणतेही धार्मिक पावित्र्य नाही, परंतु हिंदूंमध्ये जातीला निःसंदिग्धपणे पावित्र्य दिलेले आहे. हिंदूंना त्यांचा धर्म जातींचा अलगपणा आणि विभक्तपणा एक सद्गुण म्हणून पाळण्यास भाग पाडतो. परंतु बिगर हिंदूंना त्यांचा धर्म जातींविषयी तोच दृष्टिकोन पाळण्यास भाग पाडत नाही'. 'आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी कामगार वर्गाला चेतावण्याकरता कार्ल मार्क्स म्हणाला होता, 'तुम्हाला तुमच्या बेड्यांशिवाय काहीच गमवावे लागणार नाही.' परंतु काहींना अधिक तर काहींना कमी असे वेगवेगळ्या जातींमध्ये सामाजिक व धार्मिक अधिकार अशा कौशल्यपूर्ण रीतीने विभागलेले आहेत की त्यामुळे मार्क्सची घोषणा हिंदूंना जातीपद्धतीविरुद्ध चेतवण्यास निरुपयोगी ठरते.' या पुस्तकात आंबेडकरांनी धर्माबद्दल जी मांडणी केली आहे त्यातील एक परिच्छेद तर जसाच्या तसा द्यायचा मोह होतो आहे, पण जागेअभावी तो टाळतो. 

आंबेडकरांचे विचार खरेखुरे क्रांतिकारक आहेत. त्यांनी हिंदू धर्म आणि जातीव्यवस्था याचं नीट विच्छेदन केलं आहे. कुठल्याही मांडणीवर - विशेषतः सामाजिक संरचनेबाबतच्या मांडणीवर - चर्चा होऊ शकते. कारण काही धागे सुटण्याची शक्यता असते.  त्यामुळे हे आंबेडकरांच्या मांडणीबाबतही संभवू शकेल. परंतु कनिष्ठ जातीत जन्मल्याचे अनेक चटके भोगत, त्यातून स्वतःला निग्रहपूर्वक उचलून घेत, सततच्या अभ्यासाने तर्कशक्ती विकसित करत परिवर्तनाचा पाया रचणाऱ्या आंबेडकरांचं विचारदर्शन थक्क करणारं आहे, त्यांच्याविषयी आदर जागवणारं आहे. या पुस्तकाच्या अखेरीस गांधीजींनी 'हरिजन' मध्ये आंबेडकरांच्या निबंधावर केलेल्या दोन टिप्पण्या आणि आंबेडकरांचं त्यावरील उत्तरही समाविष्ट करण्यात आलं आहे. ही चर्चाही वाचण्यासारखी आहे.  
इथवर सगळं ठीक आहे. जात व धर्म याबाबतचं आकलन वाढवण्यासाठी आंबेडकरांचं वाचन टाळणं अशक्यच आहे. पण प्रश्न पुढे आहे. प्रश्न 'आपला' आहे. 'जात' ही आजही व्यक्तीची ओळख म्हणून उभी आहेच. तेव्हा जातीसमोर हार मानायची की जातिअंतासाठीचे मार्ग शोधत राहायचं ? 'आपण' काय करायचं? मी जेव्हा माझं आडनाव लावणं बंद केलं तेव्हा आईचं नाव पुढे यायच्या आनंदाबरोबरच आपण जातीला किंचितसा - अगदी किंचितसा धक्का दिला हाही आनंद होता. पण जात ही चीज नावाव्यतिरिक्त खाणं - पिणं, कपडे, भाषा, काही सवयी अशा रूपांनीसुद्धा जिवंत असतेच. ती मनात जिवंत असते आणो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती लग्नामुळे जिवंत ठेवली जाते. आपल्याकडे विवाहसंस्था ही जातीसंस्थेची रक्षक आहे असं म्हणणं वावगं होणार नाही. मग या पहिलवानाला लोळवायचं कसं? 

जातिव्यवस्थेने केलेली गोची अशी आहे की तिने व्यक्तीला समूहभान दिलं आहे. जे आदिम टोळीसमूहाशी मिळतंजुळतं आहे. आधुनिक काळातील व्यापक समाजभान, राष्ट्रभान आणि अंतिम म्हणजे वैश्विक मनुष्यभान या सगळ्यावर ते कडी करतं. त्यामुळे आपली ओळख, अस्मिता या बाबींशी जोडलं गेलेलं हे भान काढणं फार अवघड आहे. इतर अनेक महत्त्वाच्या बाबतीत भानावर नसणारे आपण जातीबाबत मात्र फारच भानावर असतो! यातली व्यावहारिक बाजू हीच आहे की जात ही एक 'फंक्शनल' (कार्यशील, ज्याचा परिणाम रोजच्या जगण्यावर होतो अशी) गोष्ट आहे. जातीशी जोडलेली 'विवाह' हीदेखील एक 'फंक्शनल' गोष्ट आहे. व्यवस्था सुरळीत चालवायची तर मग खाणं-पिणं, सवयी, साधारण वृत्ती, श्रद्धा याबाबत आपल्यासारख्याच समूहातील मुलगा किंवा मुलगी निवडणं लोकांना श्रेयस्कर वाटतं. (इंग्लिशमध्ये 'नोन डेव्हील इज बेटर दॅन अननोन एंजल'असा एक वाक्प्रचार आहे. त्याची आठवण झाली.) पण या सोयीबरोबर संकुचितताही येते, वृथा अभिमान येतो आणि समाज विखुरला जातो.   
        
मला असं वाटू लागलं आहे की एकूण विचार करता, जातीच्या पहिलवानाची ताकद लक्षात घेता त्याच्याशी थेट दोन हात करणं जिथे जड जात असेल तिथे त्याला अशक्त कसं करता येईल हे पाहावं. त्याला जो खुराक लागतो तो कमी करत न्यावा. मग एका दिवशी तो संपेल. विलास सारंग म्हणतात तसं जात ही नेणिवेचा भाग बनली असेल, जातिभान हे आपल्या जनुकांचा भाग बनलं असेल तर काही शे - हजार वर्षांच्या या जाणिवेच्या अंगवळणी पडलेल्या भागाला काढून टाकायला कदाचित तेवढाच काळ जावा लागेल. आज जातवास्तव राजकीय कारणांमुळे आणि सामाजिक वैरभाव म्हणूनही प्रखर होत असलं तरी जातीअंताच्या आघाडीवर अगदीच अंधार आहे असंही नाही. विशेषतः तांत्रिक, आर्थिक आघाडीवरील बदल जातवास्तवाला थोडं थोडं हलवत आहेत. व्यक्तिस्वातंत्र्याची कक्षाही विस्तारते आहे. आंतरजातीय विवाह होत आहेत. त्यामुळे आशेच्या जागा दिसतात. पण नवतेला रोखण्याची ताकद जातवास्तवात अजूनही आहे. त्यामुळे आव्हान मोठं आहेच. त्यासाठी वेगवेगळ्या व्यूहरचना हव्या आहेत आणि मुख्य म्हणजे जात - धर्माच्या पोलादी पकडीतून येणारा हळवेपणा, व्यक्तिस्वातंत्र्याविषयीची भीती / तिरस्कार / अढी हे सगळं नाकारू शकणारं मन हवं आहे. सोबतीला आंबेडकर आहेतच! 

Saturday, August 18, 2018

गांधीजी, आधुनिकता आणि दुविधा - २

माझे वडील सर्वोदयी कार्यकर्ते होते. त्यांच्याशी माझ्या वरचेवर वाद-चर्चा व्हायच्या. गांधीं-विनोबांच्या प्रभावाखाली असलेले वडील आणि गांधी-विनोबांचा प्रभाव असला तरी 'मायक्रोसॉफ्ट-गूगलोत्तर' काळातला, आंबेडकर-डार्विन-स्त्रीवाद याही रसायनांकडे आकर्षित झालेला मी अशा दोन व्यक्तींमधली ती टक्कर असायची. मात्र त्यांचं एक म्हणणं माझ्या लक्षात राहिलं. ते म्हणाले की आम्ही सगळे गांधींच्या खांद्यावर बसून जग बघतोय. त्यामुळे आम्हांला थोडं दूरवरचं दिसू शकतं. तू आमच्या खांद्यावर बसला आहेस. त्यामुळे आम्हांला जे दिसत नाही ते तुला दिसत असणार हे मला मान्य आहे!

हा मुद्दा मला नोंद घेण्याजोगा वाटला कारण तो एका गांधीवादी कार्यकर्त्याकडून आला होता. चिकित्सेची 'स्पेस' खुली ठेवणारा होता. मुळात एक गोष्ट मान्य करायला हवी ती म्हणजे आपण भारतीय वृत्तीने 'पूजक' आहोत. आपल्याला एखाद्या अधिष्ठानाची सतत गरज असते. (आपल्या कामासाठी प्रेरणा म्हणून, आपल्यावर विवेकाचा अंकुश राहावा म्हणूनही ते होतं, परंतु याचे इतरही काही पैलू आहेत. सध्या एवढंच नोंदवून पुढे जाऊ.) 'वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) वास्तवा'ला महत्त्व न देता किंवा तिकडे दुर्लक्ष करून 'आपल्या मनात वसत असलेल्या' (पर्सीव्ह्ड, आपल्याला समजलेल्या) वास्तवाला महत्त्व देण्याच्या आपल्या मनोवृत्तीत आपल्या पूजक वृत्तीची मुळं दडलेली आहेत. आपली ही 'पूजक' वृत्ती एक ऐतिहासिक परिपाक आहेच, पण त्याबरोबर जातीय, आर्थिक विभागणीने आणि सरंजामी वृत्तीच्या अवशेषांनी शतभंग झालेलं आपलं समाजमानस आपल्या या वृत्तीला खतपाणी घालत असतं. मुद्दा असा की आपण जेव्हा ऐतिहासिक महत्त्वाच्या व्यक्तींचा विचार करतो तेव्हा आपल्या नैसर्गिक किंवा वैचारिक घडणीमुळे त्या व्यक्तीच्या प्रेमात असण्याची शक्यता गृहीत धरूनही त्या व्यक्तीच्या विचारांवर, त्यातल्या 'इसेन्स'वर लक्ष केंद्रित करण्याची गरज  आपल्याला लक्षात घ्यावी लागते. त्यांचे विचार स्थलकालसापेक्ष असू शकतात हे मान्य करायची तयारी असावी लागते. (रावसाहेब कसबे यांच्या 'आंबेडकरवाद - तत्त्व आणि व्यवहार' या पुस्तकातील पहिलं प्रकरण 'महापुरूष' यादृष्टीने वाचण्यासारखं आहे. 'महापुरूषांचा विचार फार सावधगिरीने करावा लागतो' हे त्यांचं म्हणणं तर अगदीच पटतं.) 

हे सगळं लक्षात घेऊन गांधीजींबाबत वस्तुनिष्ठपणे, 'इसेन्स'चा मुद्दा डोळ्यापुढे ठेवून विचार केला तरी मला ते 'गायडिंग लाइट' सारखे वाटतात. परंतु त्यांची मांडणी स्वप्नवत, आदर्शवादी आहे आणि तिला प्रत्यक्षाच्या मर्यादा आहेत, मानवी आकांक्षा, मानवी व्यवहार यांचा विचार करता ती पुरी पडत नाही असं अनेकांचं मत असतं. मागच्या लेखाच्या शेवटी ज्या तीन लेखांचा उल्लेख केला आहे त्यातील विश्राम गुप्ते यांच्या मांडणीत हा मुद्दा येतो. गांधीवाद आणि आधुनिकतावाद या दोन परस्परविरोधी विचारधारा आहेत असं त्यांच्या लेखाचं गृहीतक असल्याचं त्यांनी लेखात नमूद केलं आहे. त्यांचं विश्लेषण 'प्रत्यक्षातील अडचणींच्या' पार्श्वभूमीवर आदर्शाची चिकित्सा करणारं आहे तर चैत्रा रेडकर यांनी 'हिंद स्वराज'चं विश्लेषण करताना या पुस्तकातून पर्यायी जीवनशैलीच्या विकासाची गुणसूत्रे सापडतात असं म्हटलं आहे. हिंद स्वराजच्या लेखनामागचे राजकीय संदर्भही त्यांनी तपासले आहेत. त्यांचा एक मुद्दा मला विशेष महत्त्वाचा वाटला - 'औद्योगिक भांडवलशाहीमुळे खेड्यांच्या वाट्याला आलेली विपन्नावस्था, ग्रामीण भागांचे शहरांकडून होणारे शोषण, शहरांवरील ग्रामीण भागांचे परावलंबित्व या सर्व बाबींचे भान गांधी आणि मार्क्स दोघानांही होते. यावरील इलाज म्हणून मार्क्सने उत्पादन साधनांवरील मालकीचा प्रस्ताव मांडला तर गांधींनी यंत्रविवेक सुचवला. बाजारी अर्थव्यवस्थेतून मुक्तीसाठी उत्पादन साधनांवर सामूहिक मालकी प्रस्थापित करण्याचा मार्क्सचा मार्ग आपल्याला क्रांतिकारी वाटतो, मात्र गांधींनी सुचवलेला मार्ग स्वप्नाळू, अवास्तव आणि अशक्य वाटतो याचा अर्थ काय लावायचा?'  

वरील मुद्द्याचा रोख अर्थातच परिवर्तनाच्या सामाजिक-राजकीय चळवळीत असणाऱ्या कार्यकर्त्या-विचारवंतांकडे आहे. सर्वसामान्य लोकांसाठी कदाचित मार्क्स आणि गांधी दोघांचीही मांडणी अवघड, स्वप्नाळूच असेल. मात्र इथे आपण एक लक्षात घेऊ की सर्वच क्रांतदर्शी विचारवंतांचा रोख सहअस्तित्व सुकर व्हावं, समाजात शांती-समृद्धी-न्याय असावा याकडे असतो. त्यासाठीचा त्यांचा असा एक 'पर्स्पेक्टिव्ह' असतो. त्याचा विस्तार आपल्याला करावा लागतो. मला असं दिसतं की गांधीवाद, मार्क्सवाद किंवा इतर कुठल्याही विचारधारेचा 'गाइडलाइन' म्हणून विचार न करता त्यातील शब्दांविषयी, काही निर्णयांविषयी वाद घालत 'ते चुकले की नाही' याचा खल करण्यात आपला पुष्कळ वेळ जातो. इतिहासाचा अभ्यास म्हणून ते करायला हरकत नाहीच, पण तो आजचा आपला जीवन-मरणाचा प्रश्न करण्यात काही हशील नाही. 

मागच्या लेखात मिलिंद बोकीलांच्या लेखाचा उल्लेख केला आहे. हा दीर्घ लेख फक्त 'हिंद स्वराज'विषयी नाही. गांधीजी हे 'एकूण प्रकरण' समजून घ्यायच्या दृष्टीने तो अतिशय उपयुक्त आहे. विज्ञानासंदर्भातील गांधीजींची मते ही एक प्रकारे त्यांच्या विचारदर्शनाला पडलेली मर्यादा आहे असं बोकील नोंदवतात. परंतु त्यांच्या सर्व विचारांतून अंतिमतः दिसणारा गांधी कोणता याचं उत्तर बोकीलांनी 'नीतीसाठी तळमळणारा गांधी' असं दिलं आहे. याशिवाय गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाबाबत लोकांचा जो गोंधळ होतो तो दूर होईल असं विवेचन त्यांनी केलं आहे. आपण गांधीजींची दृष्टी स्वीकारली नाही पण आपली स्वतःची अशी किंवा आपल्याला उपयोगी अशी विकासाची दृष्टी आपण विकसित केली नाही हे त्यांचं निरीक्षणही योग्य आहे. आजचे आपल्यासमोरचे विकासाचे आणि विकासामुळे निर्माण झालेले पेच त्याची साक्ष देतात.   

गांधीजींबाबतची विविध मते लक्षात घेतली तर असं दिसतं की त्यांचा अंतिम उद्देश एका नव्या वास्तवाची निर्मिती करण्याचा होता. ते वस्तुगत, व्यवहार्य प्रश्नांशीच झुंजत होते. त्यांच्या कल्पनेत एक माणूस होता आणि त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावी लागेल अशी बाब म्हणजे ते स्वतः त्या माणसाचं प्रतिबिंब होते. गांधीजींना नैतिक उंची प्राप्त झाली कारण बऱ्याच अव्यवहार्य गोष्टी त्यांनी स्वतः करून दाखवल्या. कमीत कमी गरजा ठेवून जगता येतं हे त्यांनी स्वतःच्या जगण्यातून दाखवून दिलं आणि जगासमोर एक उदाहरण ठेवलं.   

एक गोष्ट खरी की गांधीजींचे समकालीन बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल यांनी गांधीजींच्या आदर्शांना संविधानात्मक आणि संस्थात्मक जोड दिली. गांधी आणि आंबेडकर यांच्यात काही मतभेद होते हे सर्वश्रुत आहे. आंबेडकरांची धर्मविषयक आणि जातीनिर्मूलनविषयक भूमिका अधिक स्पष्ट आणि प्रखर होती आणि त्यामुळे अधिक आधुनिक होती असं म्हणता येईलच. तो स्वतंत्र विषय आहे. मात्र या सर्वच मंडळींनी नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाच्या पायाभरणीत - जी अतिशय आव्हानात्मक गोष्ट होती - अतुलनीय योगदान दिलं यात शंकाच नाही. ( स्वातंत्र्यानंतर उभारल्या गेलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेच्या मुंबई शाखेत कालांतराने 'सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्ह्ज फॉर रूरल एरियाज' या स्वतंत्र शाखेची निर्मिती करण्यात आली हे नोंद घेण्याजोगं आहे.)

गांधीजी, त्यांचा प्रभाव, देशाची 'डेव्हलपमेंट पॉलिसी', त्यातील कच्चे दुवे, त्यातूनच उभं राहिलेलं नर्मदा बचाओ आंदोलनासारखं जनआंदोलन, त्याच्या मागेपुढे उभी राहिलेली इतर अनेक जनआंदोलनं, शासकीय दमन, भांडवलशाहीचे हितसंबंध, लोकसंख्येचा प्रश्न आणि पर्यायी विकासाच्या वाटा हा एक मोठा अभ्यासविषय आहे. गांधीजींच्या मूळ मांडणीची परिणती पुढे 'सामाजिक न्याया'चे प्रश्न उभे करण्यात झालेली दिसते आणि ती अतिशय आश्वासक बाब आहे. तंत्रज्ञानातील प्रगती, भौतिक विकासाची ऊर्मी जोवर सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला बरोबर घेऊन चालते तोवरच तिचा चेहरा मानवी राहतो, अन्यथा ती भेसूर होऊ लागते हे पुन्हा पुन्हा दिसून आलं आहे.   

संबंधित विषयाबाबत शोध घेण्यासारखं बरंच आहे. यापुढील एक-दोन लेखामधून आपण तसा प्रयत्न करू. मात्र सध्या ही चर्चा थांबवून पुढच्या लेखात आपण वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत.  

Saturday, August 4, 2018

गांधीजी, आधुनिकता आणि दुविधा – १

'महात्मा गांधी' हे दोन शब्द समस्त भारतीयांच्या मनात काहीएक हालचाल निर्माण करतात. ही हालचाल बहुस्तरीय असते. ही हालचाल होते कारण या नावाबरोबर मनात जे काही उलट-सुलट उमटतं ते टाळून आपल्याला पुढे जाता येत नाही. आज राजकीय पटलावर जवाहरलाल नेहरूंची छाया गडद झालेली (केलेली) दिसते आणि गांधी नावापुरते उरले आहेत असं दिसतं. पण भारतातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर गांधींचा सहज प्रभाव बराच काळ राहिला. आज त्याची तीव्रता कमी-जास्त होत असली तरी गांधींची आठवण होत नाही असं होत नाही. 'गांधी' हा माणूस आणि विचार भारतीय जाणिवेत आहेच. बदलत्या काळाच्या ओघात गांधी विचार काय होता, त्याच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक बाजू काय होत्या हे सर्वसामान्यांच्या स्मृतीतून पुसलं जात 'गांधी' हे साधारणपणे चांगुलपणा मोजण्याचं एक 'स्टॅंडर्ड' म्हणून उरलं आहे. मात्र भारतात आणि जगातदेखील गांधीजींविषयी आजवर इतकं लिहिलं आणि बोललं गेलं आहे की त्या प्रसिद्ध 'हत्ती आणि सात आंधळे' या गोष्टीतील हत्तीच्या जागी गांधीजींना सहज ठेवता येईल!

गांधीजी हा माझ्या कुतूहलाचा विषय आहे. काही मूलभूत विचार काळ बदलला तरी सुसंगत ठरतात. गांधींनी असे विचार दिले आहेत आणि स्वतःच्या कृतीतून त्यांची परिणामकारकता सिद्ध केली आहे. शिवाय माझ्यासारख्या माणसाला तर 'कर के देखो' म्हणणारे गांधी जवळच्या मित्रासारखेच वाटतात. परंपरा आणि आधुनिकता या संघर्षात गांधीजींनी अतिशय महत्त्वाचे 'कन्सर्न्स' उपस्थित केले आहेत. त्यामुळे आपल्या चर्चेत गांधीजी येणं अगदी अपरिहार्यच होतं. 

'हिंद स्वराज' हे गांधीजींचं एक गाजलेलं पुस्तक. १९०९ साली लंडन ते दक्षिण आफ्रिका या प्रवासात दहा दिवसात त्यांनी हे पुस्तक लिहिलं. लंडनमध्ये त्यांना जे स्वराज्यप्रेमी भारतीय तरूण भेटले त्यांच्याशी झालेल्या संवादाचं सार या पुस्तकात आहे. 'संपादक आणि वाचक' अशा दोघांमधील संवादातून गांधीजी आपले विचार मांडतात. मूळ गुजराती पुस्तकाचा त्यांनी स्वतःच इंग्लिश अनुवाद केला. दोन्ही पुस्तकांवर सरकारने बंदी घातली होती. १९१५ साली गांधीजी भारतात आले. आल्यावर त्यांनी पुन्हा इंग्लिश अनुवाद प्रसिद्ध केला. यावेळी मात्र सरकारने त्याचा विरोध केला नाही. गांधीजी आफ्रिकेत असताना गोपाळ कृष्ण गोखले यांनी हे पुस्तक वाचलं होतं. त्यांना ते आवडलं नाही आणि गांधीजी हे पुस्तक स्वतःच रद्द करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. परंतु गांधीजींनी तसं केलं नाही. ते म्हणाले की हे पुस्तक मी पुन्हा लिहिलं असतं तर त्याच्या भाषेत मी सुधारणा केली असती पण माझे मूळ विचार तेच आहेत. पुढे तीस वर्षांनंतर, १९३८ साली 'आर्यन पाथ' या मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या इंग्लिश मासिकाने 'हिंद स्वराज अंक' प्रकाशित केला होता. या मासिकाला पाठवलेल्या लहानशा पत्रात गांधीजींनी हेच म्हटलं आहे. या पत्रात आणखी एक गंमत आहे. पत्राच्या शेवटी गांधीजी लिहितात - 'दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना मार्गदर्शन करण्याचं मोलाचं काम या पुस्तकाने केलं हे मी वाचकांना सांगू इच्छितो. याच्या विरुद्ध बाजूने विचार करण्यासाठी वाचकांनी माझ्या एका स्वर्गीय मित्राचे मतही लक्षात घ्यावे. 'हे पुस्तक एका मूर्ख माणसाने लिहिलं आहे' असं तो म्हणाला होता.'

एका मूर्ख माणसाने बऱ्याच शहाण्यांना विचारात पाडलं असं या पुस्तकात काय आहे? 'हिंद स्वराज' ज्यांनी वाचलं आहे ते त्यांची प्रतिक्रिया देऊ शकतीलच, पण ज्यांनी ते वाचलेलं नाही त्यांनी ते जरूर वाचावं. थोडे धक्के बसतील, पण तरी वाचावं. 'हिंद स्वराज' मध्ये गांधीजींनी भारतीय परंपरा आणि संस्कृतीचं माहात्म्य अधोरेखित करत पाश्चात्त्य आधुनिकतेवर कठोर टीका केली आहे. आपण ज्याला सहजपणे प्रगतीचं लक्षण म्हणतो अशा अनेक गोष्टी त्यांनी कुचकामाच्या ठरवल्या आहेत. उदा. रेल्वे, डॉक्टर आणि वकील यांनी भारताला कंगाल केलं आहे असं ते म्हणतात. सुधारणा, विकास हा एक प्रकारचा आजार आहे असं ते सांगतात. आणि मौज अशी आहे की आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ ते जे मुद्दे मांडतात ते वाचून आपण त्याक्षणी तरी नकळत होकारार्थी मान डोलावतो. आपल्याला ते व्यावहारिकदृष्ट्या पटत नाही, पण त्या म्हणण्यात सत्यांश आहे असं वाटतं. पुस्तकातील मांडणी धक्कादायक वाटली तरी १९२४ साली या पुस्तकाच्या संदर्भाने झालेल्या एका चर्चेतील गांधीजींचं म्हणणं अधिक आश्वासक वाटतं.  या चर्चेत ते म्हणतात की मी यंत्रांच्या विरोधात नाही. आपलं शरीर हे एक नाजूक यंत्रच आहे. चरखा हे यंत्रच आहे. परंतु अडचण अशी आहे की आपण आज यंत्रांच्या मागे वेड्यासारखे धावत आहोत. यंत्रांचा वापर करण्यामागे जे प्रेरक कारण आहे ते 'श्रमाची बचत' हे नसून 'संपत्तीचा लोभ' हे आहे. हे विधान खोलात विचार करण्यासारखं आहे. 

यंत्र, आधुनिकता याबाबत गांधीजींचा जो 'डिनायल मोड' दिसतो त्याचा संबंध त्यांना जो 'नीतिमान माणूस' निर्माण व्हावासा वाटत होता त्याच्याशी आहे. माणसाची भौतिक प्रगती, सुखसुविधायुक्त जीवन आणि माणसाची नैतिक उन्नती या झगड्यात त्यांची निवड स्पष्ट होती. खरं तर नैतिक उन्नतीला पर्यायच असू शकत नाही, पण भौतिक प्रगती जेव्हा हळूहळू समाजमनाचा कब्जा घेते तेव्हा नैतिकता 'बॅक सीट'ला जाऊ लागते आणि मग निवडीचीच वेळ येते.  माणूस हा परंपरानिष्ठ, आधुनिकतावादी असा काही असण्यापेक्षा 'माणूस' म्हणून उन्नत असणं गांधीजींना अभिप्रेत होतं आणि त्याच्या आड जे येईल ते नको असं त्यांचं म्हणणं होतं. मग ती परंपरा असो की आधुनिकता. गांधीजींची 'फंडामेंटल' मांडणी तात्त्विक संघर्षाला जन्म देणारी आहे. आज आपण यंत्रांनी घेरले गेलो आहोत. आपलं आयुष्य सोपं झालं आहे. पण आपण जर यंत्र उत्पादनाची पूर्ण साखळी (कच्चा माल - त्यावरील प्रक्रिया - उत्पादन - वितरण) जवळून पाहिली तर तिथे सगळं आलबेल आहे असं आपण म्हणू शकू का? मॉलमध्ये किंवा दुकानात वस्तूंच्या अवतीभवती जी प्रसन्नता आणि चकचकीतपणा दिसतो तो या उत्पादन साखळीतल्या प्रत्येक टप्प्यावर आणि मुख्य म्हणजे त्यात गुंतलेल्या माणसांच्या जगण्यात आणि अंतरंगात दिसेल का? भौतिक प्रगती झाली, पण त्याबरोबर वाढलेलं प्रदूषण, शहरातील बेसुमार गर्दी आणि बकाल जगणं, गुन्हेगारी, आर्थिक विषमता या गोष्टी भौतिक प्रगतीच्या कुठल्या अकाउंटला टाकायच्या हा प्रश्न आहे. 'प्यासा' चित्रपटात साहिर लुधियानवीसारखा कवी वेश्यावस्ती पाहणाऱ्या नायकाच्या मनात 'जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है?' हा प्रश्न उभा करतो. माझं लहानपण भिवंडीत गेलं. तिथल्या यंत्रमाग चालवणाऱ्या कामगारांची राहायची जागा आणि कामाची जागा दोन्ही बघताना अगदी हाच प्रश्न मनात येतो. अनेक ठिकाणी फिरताना हा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. आज आपण टीव्ही, मोबाइल, इंटरनेट या गोष्टी वापरतो, पण त्यांचे दुष्परिणाम लपून राहिलेले नाहीत. व्हॉट्सअॅप हे संवादाचं माध्यम म्हणून चांगलं आहे, पण जर त्यावरून अफवा पसरून काही निर्दोष लोकांचे जीव जात असतील तर काय करायचं? इथे गांधीजींच्या 'माणसाची' आठवण होतेच. माणूसच जर घडायचा बाकी आहे तर त्याच्या हाती यंत्र देऊन काय उपयोग? 

आधुनिकतेने माणसासमोर टाकलेले काही पेच गहन आहेत. एक गोष्ट खरी की तंत्रज्ञान विरुद्ध माणूस असा मूळ झगडा नाही. मूळ झगडा माणूस विरूद्ध माणूस असाच आहे. नैसर्गिक संसाधनं आणि उत्पादन साधनांवरील केंद्रित मालकी, काही मोजक्या लोकांच्या बुद्धीमुळे शक्य झालेली आणि मोजक्या लोकांच्या नियंत्रणात राहणारी तंत्रज्ञानाची झेप, मात्र त्यातून प्रभावित होणारं असंख्यांचं जगणं आणि या सगळ्या गतिशील वास्तवात शासनयंत्रणेचा सहभाग आणि नियंत्रण असे विविध मुद्दे इथे विचारात घ्यावे लागतात. गांधीजींचं वैशिष्ट्य हे की माणसाची स्वतंत्र, स्वावलंबी, आत्मबलयुक्त आणि सामाजिक दृष्टी असलेली घडण डोळयासमोर ठेवून ते समाजनिर्मितीचा विचार करतात.  प्रत्यक्षात ते शक्य झालं का, होईल का हा मुद्दा वेगळा, पण विवेक जागा ठेवायचं, मूलभूत प्रश्न विचारायचं काम गांधीजी करतात. 'थांबा आणि विचार करा' हे सांगतात आणि म्हणूनच ते आपल्यासाठी 'गाइडिंग लाइट' ठरतात!   

पुढील लेखात आपण हीच चर्चा पुढे नेणार आहोत. दरम्यान प्रस्तुत विषयासंदर्भात हे तीन लेख जरूर वाचावेत - १) ‘महात्मा गांधी’ (मिलिंद बोकील, दीपावली - दिवाळी २०१७), २) 'हिंद स्वराज - समाजसापेक्ष विकासाच्या प्रतिमानाचा आराखडा' (चैत्रा रेडकर, आंदोलन - जानेवारी-फेब्रुवारी २०११' ३) ‘हिंद स्वराज आणि आधुनिकता' (विश्राम गुप्ते, मुक्त शब्द - दिवाळी २०१७.) या लेखांसाठी माझ्याशी संपर्क साधता येईल.

Saturday, July 21, 2018

मध्यांतरातील संवाद

एखादी नवीन मांडणी करण्याआधी वास्तवातील बारकावे, सूक्ष्मभेद (न्यूअन्सेस) लक्षात घेऊन नवीन विचारासाठी समतल क्षेत्र निर्माण करणे गरजेचे असते. आपण आजवर जी चर्चा केली आहे त्यात हा विचार जागा होता. किंबहुना आजवरच्या चर्चेचं स्वरूपच तसं होतं. आता यापुढील लेखांमधून विश्लेषणात्मक विचार करण्याबरोबरच काही विशिष्ट मुद्द्यांवर थेट चर्चा करू या. नातेसंबंधांचे नवीन प्रारूप याविषयी आपण बोलायला सुरूवात केली आहेच. स्री-पुरूष सहजीवन, प्रेम, लैंगिक संबंध या अंगांनी तो धागा पुढे न्यायचा प्रयत्न करू. याशिवाय जीवन कौशल्ये (लाइफ स्किल्स) आणि सामाजिक शिष्टाचारांच्या संदर्भातही काही नवीन सापडतंय का ते पाहू. राष्ट्रवाद, पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षता, धर्माची प्रस्तुतता आणि निधर्मी जगणं हे मुद्दे आज सतत चर्चेत आहेत. त्यावर आपल्याला काही मांडता येतंय का ते पाहू. हे विषय राजकीयदृष्ट्या संवेदनशील झाले असले तरी ते मुळात संकल्पनात्मक आणि सामाजिक महत्त्वाचे आहेत. आणि दुसरं म्हणजे राजकीय क्षेत्र आपण आपल्या चर्चेत अस्पर्शित ठेवावं असंही अजिबात नाही.       
    
परंपरा आणि नवता, श्रद्धा आणि तर्क, धर्म आणि विज्ञान या गोष्टी परस्परविरोधी वाटल्या तरी त्या 'इनहेरंटली' तशा असतात का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मुळात हे लक्षात घ्यायला हवं की विचारांचं, कृतीचं नामकरण करणं ही आपली मानसिक (आणि मानसिक आहे म्हणून सामाजिकही) गरज असते. लेखमालेच्या अगदी पहिल्या लेखात आपण म्हटलं होतं की परंपरा म्हणजे ‘क्ष’ नावाची एक गोष्ट आहे आणि नवता म्हणजे ‘य’ नावाची एक गोष्ट आहे अशा साचेबद्ध पद्धतीने आपण या संकल्पनांकडे बघायला नको. यांनतर आपण असंही म्हणालो आहोत की सामान्यीकरण करणं बरेचदा आवश्यक असलं तरी वास्तवाचे अनेकविध पैलू असतात आणि यातील एखादा किंवा अनेक पैलू आपण सोयीसाठी जे नामकरण करतो त्याच्या विरोधीही असू शकतात. 'बर्डमॅन' हा माझा एक अतिशय आवडता चित्रपट आहे. या चित्रपटातील एका गहन अवतरणाची इथे आठवण होते -  'अ थिंग इज अ थिंग, नॉट व्हॉट इज सेड ऑफ दॅट थिंग!' भाषा ही आपली 'फ्रेंड, फिलॉसॉफर, गाइड' असली तरी भाषा वापरून ज्या वास्तवाचं वर्णन करायचं ते वास्तव इतकं व्यामिश्र असतं की तिथे तीही कधीकधी कमी पडते. (बर्डमॅनमधील 'कोट'ला समांतर जाणारी 'रॉकस्टार' या हिंदी चित्रपटामधील इर्शाद कामिल यांनी लिहिलेल्या गाण्याची ओळ आहे - जो भी मैं कहना चाहूँ, बरबाद करे अल्फाज मेरे...!)         

परंपरेचं एक मोठं बलस्थान असं असतं की ती माणसाला सुरक्षितता देते. तंत्रज्ञानाने माणसाचं जगणं मोठ्या प्रमाणात बदलून टाकलं असलं तरी माणसाच्या मनातील आदिम जाणिवा तंत्रज्ञानाला अद्याप तरी बदलता आलेल्या नाहीत. माणसाच्या कृत्यांमागे, वर्तनामागे कारण म्हणून कार्यरत असणाऱ्या भावना कुठल्या याचं उत्तर आपण देऊ शकू. पण सूक्ष्म विचार केला तर असं दिसेल की 'भीती' ही भावना सर्वात प्रबळ असते. स्वार्थ - म्हणजेच स्वहित / स्वसुख या भावनेच्या पोषणासाठीही भीतीच मदत करते. जीवशास्रीय व इतरही अभ्यासासंदर्भात प्रॉक्झिमेट कॉझेस (नजीकची कारणे) आणि अल्टिमेट कॉझेस (अंतिम कारणे) अशी कारणांची वर्गवारी केली जाते. एखाद्या घटनेमागचं लगेचचं कारण वेगळं आणि मुळाशी असलेलं अंतिम कारण वेगळं असतं. दैनंदिन जगण्यातील एखादं उदाहरण पाहू. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे गाडीला अपघात झाला हे झालं अपघाताचं नजीकचे कारण. पण चालकाचं नियंत्रण का सुटलं? त्याच्या मनःस्थितीत काही बदल झाले का की ज्यांच्यामुळे नियंत्रण सुटलं? याचं उत्तर म्हणजे अंतिम कारण. आपल्या अनेक विचार-वर्तनामागे भीती हे अंतिम कारण असतं. निसर्गात चाललेल्या 'टिकून राहण्याच्या' लढाईत माणूस आज पुढे आला असला तरी त्या आदिम भीतीने त्याची पाठ सोडलेली नाही. मृत्यूच्या भयाबरोबर सामाजिक दडपण, प्रतिष्ठा टिकवणे, इतरांच्या नजरेतून उतरण्याचं भय या आणि अशा इतर भयांपोटी माणूस अनेक गोष्टी करतो. यात परंपरा जगण्याला एक समाजमान्य चौकट देते आणि बहुतांश माणसांना त्यात सुरक्षित वाटतं. 

नवतेचा विचार अगदी व्यावहारिक संदर्भात केला तर माणूस सर्वसाधारणपणे नवं काही कधी स्वीकारतो याचं एक स्पष्ट उत्तर असंही आहे की त्यात काही फायदा असेल तर! (या फायद्याचं मूळही अखेरीस भीतीत सापडतं. सुख, फायदा या गोष्टींमुळे अंतिमतः सुरक्षितताच मिळणार असते). बँकेत एफडी करण्यापेक्षा शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडात अधिक फायदा आहे म्हणून आपण तिथे पैसे गुंतवतो. एटीम, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आज मोठ्या प्रमाणात वापरलं जातं कारण ते सोयीस्कर आहे. वेळ वाचवणारं आहे. मात्र जगण्याच्या व्यवहारी-आर्थिक बाजूंना जे लागू होतं ते सामाजिक रचनेच्या इतर अंगांना लागू होतंच असं नाही. त्यामुळे मोबाइलमधल्या नावीन्याचं स्वागत करायला आपण उत्सुक असतो, तिथे नैतिकतेच्या भानगडी नसतात. पण प्रेम, लग्न, लैंगिक संबंध याबाबत आपण नावीन्याचं स्वागत करायला बिचकतो. 'प्रयोग कुठे करायचे' याबाबत आपल्या धारणा घट्ट असतात. कारण आपल्या धारणा आपली 'कम्फर्ट लेव्हल' निश्चित करत असतात.  

सामाजिक संदर्भात, विशिष्ट मुद्द्यांबाबत ही कम्फर्ट लेव्हल वाढवणे हा रचनात्मक नवतेचा एक प्रमुख प्रयत्न असायला हवा. वास्तवात हे होण्यासाठी ज्या माध्यमांचा हातभार लागू शकतो त्यात साहित्य, नाटक, चित्रपट, टेलिव्हिजन आणि आता इंटरनेट अशी विविध माध्यमे आहेत. यातील टीव्ही आणि इंटरनेट या दोन माध्यमांकडे बघणं मला विशेष मौजेचं वाटतं. कारण एकीकडे परंपरेची स्पेस विस्तारताना दिसते तर दुसरीकडे नवतेची. इंटरनेटवर व्यक्तिगत देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने, व्यक्तींचं एकमेकांना 'अती एक्स्पोजर' मिळत असल्याने तिथले प्रश्नही बिकट आहेत हे खरं, पण विषयांची हाताळणी या अंगाने पाहिलं तर इंटरनेट हे अधिक मुक्त व्यासपीठ आहे. मागच्या लेखात उल्लेख केला होता त्याप्रमाणे उपद्रव मूल्य असणारी अभिव्यक्ती तिथे असली तरी त्याचबरोबर कलात्मक, परफॉर्मन्स बेस्ड अभिव्यक्तीही तिथे आहे. इंटरनेटचं विश्व आज प्रचंड विस्तारलं आहे. ऑनलाईन स्ट्रीमिंगद्वारे चित्रपट आणि मालिकांबरोबरच अनेक विषयांवरील फिल्म्स, डॉक्युमेंटरीज पाहता येतायत. विनोदाला - आणि बेधडक विनोदाला - भरपूर वाव मिळतो आहे. एआयबीसारख्या यूट्यूब चॅनेलवर पारंपरिक भारतीय लग्नातील ढोंगी पणाची खिल्ली उडवणारे धमाल व्हीडिओज आहेत. मराठी यूट्यूब चॅनल्सही आहेत. स्टॅन्ड-अप कॉमेडी हा प्रकार पुष्कळच लोकप्रिय आहे. या कॉमेडीच्या विषयात कुटुंबसंस्था, लग्नसंस्था, पालक-मुले, प्रेम आणि लैंगिकता, पोर्नोग्राफी यासारख्या अनेक विषयांवर चर्चा-टिप्पणी केली जात आहे. ती उपरोधिक, परंपरेतील दोषांवर बोट ठेवणारी, व्यक्तिस्वातंत्र्याचा - विशेषतः स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी आहे. बहुतांश कॉमेडियन्स पुरूष असले तरी अदिती मित्तलसारखी स्त्री कॉमेडियनदेखील तिच्या धडक सादरीकरणातून आपला प्रभाव टाकते आहे. अलीकडे नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला 'लस्ट स्टोरीज' हा चित्रपट, 'सेक्रेड गेम्स'सारखी मालिका भारतीय प्रेक्षकाला नवी वळणं घ्यायला लावत आहेत. दुसरीकडे टीव्हीवर मात्र प्रयोगशीलतेची दारं बंद असल्यासारखी आहेत. रिअ‍ॅलिटी शोजमधून नव्या कलाकारांना व्यासपीठ मिळालं असलं तरी टीव्ही मालिकांचं साधारण रंगरूप डोळे दिपवणारं आहे! टीव्ही घरातील सगळे एकत्र बघतात आणि इंटरनेट हे 'व्यक्तिगत माध्यम' आहे त्यामुळे त्यात फरक असण्याबद्दल काही म्हणणं नाही, पण सगळे एकत्र बसून जे बघत आहेत त्याच्याहून पुष्कळ चांगलं असं काही बघू शकतील!

असो. पुढील लेखापासून आपण सुट्या विषयांवर बोलायला सुरूवात करू.  

Saturday, July 7, 2018

आपल्या घडण्याचा प्रश्न

मागील लेखात मे. पुं. रेगे यांच्या एका अवतरणाच्या आधारे आपण थोडा संकल्पनात्मक ऊहापोह केला होता. 'परंपरा आणि नवता' हे मध्यवर्ती सूत्र धरून आपण जी चर्चा करत आहोत त्यात मला रेग्यांच्या पुस्तकाची (विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा) वारंवार आठवण होते. 'हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन', 'विवेक आणि न्याय', 'स्वातंत्र्य, समता आणि न्याय', ‘इहवाद आणि सर्वधर्मसमभाव’ ही त्यांची इतर काही पुस्तके. बर्ट्रांड रसेलच्या 'प्रॉब्लेम्स ऑफ फिलॉसॉफी' या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला आहे. तत्वज्ञानाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे रेगे मराठीतील वैचारिक साहित्यातील एक अग्रणी होते. त्यांच्या बरोबरीने नरहर कुरुंदकर, वसंत पळशीकर, राम बापट, दि. के. बेडेकर, शरद पाटील, दि. य. देशपांडे, भा. ल. भोळे ही नावेही अधोरेखित करावी अशी आहेत. मी स्वतः साहित्य आणि सिनेमाकडे ओढला जाणारा मनुष्य असलो तरी माझ्यासाठी वैचारिक साहित्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. भवतालात घडणाऱ्या घटनांचा अन्वयार्थ लावण्याचं, मूलभूत स्वरूपाचे प्रश्न उपस्थित करण्याचं, माणसाच्या आंतरिक विश्वाचा वेध घेण्याचं महत्त्वाचं काम वैचारिक साहित्य करत असतं. (ढोबळमानाने बोलायचं झालं तर सकस कथात्म साहित्य, नाटक, चित्रपट याला माणसाच्या चिंतनाचा सर्जनशील आविष्कार म्हणता येईल तर वैचारिक साहित्य हा माणसाच्या सर्जनाचा चिंतनशील आविष्कार आहे असं म्हणता येईल. दोन्ही प्रकारअगदी कप्पेबंद आहेत, इकडून तिकडे जाताच येत नाही असं नाही. पण साधारण फरकाची रेषा काढायची ठरवली तर वरील विधान मान्य होऊ शकेल. वैचारिक साहित्याला सर्जनाचा चिंतनात्मक आविष्कार म्हणण्याचं कारण हे की एखाद्या तत्त्ववेत्त्याच्या, विचारवंताच्या मनात सृष्टीविषयी, माणसाविषयी, संकल्पनांविषयी जे विचारमंथन सुरू असतं त्याला तो त्याच्या सर्जनशीलतेच्या बळावर आकार देतो, नवी मांडणी करतो. त्यातून जे समोर येतं ते फिक्शनल नसून चिंतनात्मक असतं. दुसऱ्या बाजूला कथात्म साहित्य हा फिक्शनल आविष्कार असला तरी तो कसदार होण्यासाठी मुळात लेखक हा 'विचारवंत' असावा लागतो. जीए कुलकर्णींच्या कथा, विजय तेंडुलकर, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार यांची नाटके, दिबाकर बॅनर्जी, अनुराग कश्यप, रजत कपूर, विशाल भारद्वाज, आनंद गांधी यांच्यासारखे हिंदी चित्रपटाला नवं वळण देणारे दिग्दर्शक ही काही उदाहरणे वानगीदाखल देता येतील.)    

'भारतीय तत्वज्ञान' या शीर्षकाचं श्रीनिवास दीक्षित यांचं एक पुस्तक आहे. भारतीय तत्वज्ञानाची तोंडओळख करून घ्यायच्या दृष्टीने हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. या पुस्तकातील 'तत्वज्ञान म्हणजे काय?' या पहिल्या प्रकरणात तत्वज्ञान मुळात पाहिजे कशाला? त्याचा उपयोग काय? या प्रश्नांची दीक्षितांनी तीन उत्तरे दिली आहेत. पहिल्या उत्तरात ते लिहितात -  जीवनाचे अथवा सत्याचे जे दर्शन आपण प्रमाण मानतो त्यावर आपल्या वृत्ती आधारित असतात. वास्तवाचे स्वरूप अमुक एक आहे असे आपण विचारपूर्वक ठरवत नाही. परंपरेने आणि परिस्थितीमुळेही काही मते अंगी मुरतात आणि वृत्ती निर्धारित होतात. पण वास्तवाच्या स्वरूपाविषयी आपली मते विचारपूर्वक बनवणे, म्हणजेच तत्त्वचिंतन करणे आणि वृत्तींना विचारपूर्वक वळण देणे केव्हाही श्रेयस्कर होय. असे करण्याने आपण खरेखुरे, अस्सल जीवन जगू शकतो.' त्यांचं दुसरं उत्तर असं की तत्वज्ञानाशी परिचय असेल तर माणसाच्या विचाराचे सर्वच संदर्भ व्यापक होतात. स्वतःच्या दुःखाकडे तो विश्वाच्या संदर्भात पाहतो. त्यामुळे दुःखाचे आघात सहन करण्याची त्याची क्षमता जास्त असते. (दीक्षितांनी इथे फार अर्थपूर्ण आणि सुंदर शब्द योजले आहेत - चिरंतनाच्या चिंतनाने आणि अखंडाच्या अभ्यासामुळे वृत्ती उदार होतात आणि जीवन गंभीर बनते.) तिसरं उत्तर असं की तत्त्वज्ञानातील युक्तिवाद सूक्ष्म असतात आणि काटेकोरही असतात. त्यामुळे तत्त्वज्ञानाचा अभ्यास केलेल्या व्यक्तीच्या विचारात आपोआपच एक शिस्त येते आणि ही शिस्त इतर कोणत्याही विषयाच्या अभ्यासास उपयोगी पडते. 

दीक्षितांनी तवज्ञानाबाबत जे म्हटलं आहे ते मला वैचारिक साहित्याविषयी म्हणावंसं वाटतं. विशेषतः 'आपली मते विचारपूर्वक बनवणे, खरेखुरे - अस्सल जीवन जगणे' हे आजच्या काळाच्या संदर्भाने तर मला फारच महत्त्वाचं वाटतं.आमच्या घरातला टीव्ही बंद केल्याला आता सात-आठ वर्षं झाली. केव्हातरी कुणाकडे टीव्ही पाहिला गेला तर आपला निर्णय योग्य होता याची खात्रीच पटते. टीव्हीमुळे आपल्याला वास्तवाचं यथायोग्य आकलन होतं असं कुणी म्हणत असेल तर त्याच्याशी बोलायला मला आवडेल. काही सन्माननीय अपवाद वगळता टीव्हीचं एकूण रूप - बातम्या आणि मनोरंजन दोन्ही अंगाने - भयावह झालं आहे आणि टीव्ही बघणारा 'टीव्ही कन्झ्यूम करणारा' झाला आहे. एखादा विषय किंवा एखादा प्रश्न समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी दोन पर्याय असतात. एक म्हणजे स्वतः घराबाहेर पडून माहिती घेणे, संशोधन करणे किंवा मग ज्यांनी संशोधन केलं आहे त्यांची मांडणी वाचणे, बारकावे समजून घेणे. पहिला पर्याय सर्वांना सर्व बाबतीत शक्य होणार नाही हे उघड आहे. पण मग अशावेळी दुसरा पर्याय निवडणं बहुतांश लोकांनी बंदच केलंय की काय अशी कधीकधी शंका येते. अल्बर्ट आईन्स्टाईनच एक प्रसिद्ध विधान आहे - एव्हरीथिंग शुड बी मेड अ‍ॅज सिंपल अ‍ॅज पॉसिबल, बट नॉट सिंपलर. पण वास्तवातील गुंतागुंत मोकळी करून समोर ठेवण्याऐवजी वास्तवाचं सुलभीकरण करून एक बाजू घेऊन मोकळं होण्याचं प्रमाण वाढताना दिसतं आणि ते धोकादायक आहे. 

हे सुलभीकरण सामाजमाध्यमे, टीव्ही अशा प्रमुख व्यासपीठांवर वरेचवर होताना दिसतं. अभिव्यक्तीला अवकाश मिळणं ही निःसंशयपणे स्वागतार्ह गोष्ट आहे. अभिव्यक्तीचं लोकशाहीकरण होणं हेदेखील स्वागतार्हच आहे. पण अभिव्यक्तीमुळे होणारं रंजन, प्रबोधन जेव्हा प्रचाराकडे झुकू लागतं, अभिव्यक्ती जेव्हा मानवी जाणिवांचा पट विस्तारू शकत नाही आणि अभिव्यक्तीचं 'उपद्रव मूल्य' जेव्हा वाढू लागतं तेव्हा ती चिंतेची बाबही होते. अशी अभिव्यक्ती सुलभीकरण करणारी असते आणि सुलभीकरणाचा धोका असा की त्यातून समाजाचं ध्रुवीकरण झपाट्याने होतं. रामचंद्र गुहा यांनी एका मुलाखतीत समाजमाध्यमांच्या बाबतीत म्हटलं होतं की समाजमाध्यमांमुळे लोकांमध्ये काळा आणि पांढरा अशा दोन रंगांचा दृष्टीकोन आला आहे आणि वास्तवातील बारकावे टिपण्याची नजर हरवून गेली आहे. समाजमाध्यमे (फेसबुक, ट्विटर आणि इतर ऑनलाईन डिस्कशन प्लॅटफॉर्म्स) हा मुळात एक मानसशास्त्रीयदृष्ट्या परिणामकारक आविष्कार आहे असं मला वाटतं. माणसामधील अंतःस्थ भावनांना, विशेषतः विकारांना हात घालायची ताकद या माध्यमांच्या स्वरूपात आहे. फेसबुक निर्माण करताना मार्क झुकेरबर्गच्या मनात 'ऑफलाईन सोशल एक्सपीरियन्स ऑनलाईन आणणे' ही कल्पना होती. परंतु या ऑनलाईन एक्सपीरियन्समध्ये काही कळीचे फरक पडलेले दिसतात आणि त्याचा संबंध माणसं समोरासमोर बोलत नसल्याशी आणि विविध सामाजिक-आर्थिक-वैचारिक-भाषिक स्तरातील माणसं व्हर्च्युअली एकत्र येणं आणि आपल्या आजूबाजूला अशा विविध स्तरातील माणसं आहेत हे भान न राहणं याच्याशी आहे. गेल्या काही वर्षांत झपाटयाने आकारास आलेलं समाजमाध्यमांचं नवीन व्यासपीठ आणि टीव्हीचं बदललेलं रूप यामुळे आपल्या मानसिकतेवर आपल्या नकळत मोठा परिणाम झाला आहे. वर वृत्तीनिर्धारणाचा मुद्दा आला आहे. आपल्या आजच्या भवतालाचा - जिथे 'इन्स्टंट डिसीजन' प्रबळ होतो आहे - विचार करताना आपली वृत्ती कशी घडते आहे याचा विचार केला तर त्याचं फारसं आश्वासक उत्तर मिळत नाही.   

वैचारिकतेचा पाया मजबूत असण्याचा एक अर्थ चिकित्सक वृत्ती, शोधक वृत्ती जागी असणं हा आहे. आपल्याला प्रत्येकालाच व्यवहारी आयुष्य जगायचं असतं. रोजच्या जगण्याच्या लढाईत तत्त्वचिंतन वगैरे कसं काय जमायचं, शोध-चिकित्सा यांना वेळ कसा द्यायचा हे प्रश्न रास्त आहेत. त्यावर श्रीनिवास दीक्षितांनी दिलेली उत्तरे वर उद्धृत केली आहेतच. पण एक रूपकात्मक आणि म्हणून अधिक प्रभावी उत्तर एका चित्रपटातील प्रसंगात मिळतं. अमिताभ बच्चनची मध्यवर्ती भूमिका असलेला 'मैं आझाद हूँ' हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणारा 'आझाद' हा इसम लोकांसमोर एक भाषण करतो. या भाषणात तो एक किस्सा सांगतो - ट्रेन चालली आहे. ट्रेनमध्ये प्रवासी आहेत. एका प्रवाशाने आपलं सामान आपल्या डोक्यावर घेतलं आहे. असं का बाबा? असं विचारल्यावर तो प्रवासी उत्तरतो की माझ्या सामानाची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार? आझाद पुढे असं म्हणतो की आपलं बहुधा या प्रवाशासारखं झालं आहे. आपल्या प्रत्येकाकडे आपलं ओझं आहेच. पण ते आपल्या डोक्यावर घेऊन बसण्यापेक्षा ट्रेन योग्य मार्गाने चालली आहे का, नीट चालली आहे का हे तपासणं जास्त गरजेचं आहे. कारण ट्रेन जर नीट चालली असेल तरच आपण आपल्या सामानासह इच्छित स्थळी पोचणार आहोत! 

Saturday, June 23, 2018

व्यक्तिस्वातंत्र्याचा विवेक

नातेसंबंधांतील प्रगल्भतेसंदर्भात पाश्चिमात्त्य-पौर्वात्त्य मानसिकता याबाबत बोल्ट आपण 'व्यक्तिस्वांतत्र्य' या संकल्पनेपाशी आलो होतो. मुळात मानसिकतेबाबत एखादं विधान करताना ते विधान एका 'ट्रेंड'कडे निर्देश करतं, विश्लेषण करताना 'सामान्यीकरण' केलं गेलं तरी या सामान्यीकरणातून दिसणारा समाजाचा चेहरा हा त्या समाजाचा एकच एक चेहरा असतो असं नाही हेही आपण बोललो. आपण हे लक्षात घेऊया की भौतिक विज्ञानात पदार्थांचं वर्तन नियमबद्ध असल्याने त्याविषयी निश्चित स्वरूपाचं बोलता येणं शक्य असतं, पण मानवी वर्तनाबाबत ते शक्य नसतं. मात्र इथे एक मेख आहे. मानवी वर्तनाचा संबंध मानवी विचारप्रक्रियेशी, मानवी जाणिवेशी आहे. ही विचारप्रक्रिया, जाणीव हे सगळं काहीसं गूढ वाटलं तरी हे सगळं म्हणजे मानवी मेंदूतील भौतिक घडामोडींचा परिपाक आहे. हे लक्षात आलं की आपण 'जाणिवेचं विज्ञान' समजून घ्यायच्या जवळ जातो. माणसाच्या मनाशी संबंधित गोष्टींचा पाया मुळात भौतिक आहे हे ज्ञान आपल्याला मानवी वर्तनाच्या खुलाशाकडे, उत्तरांकडे नेणारं आहे.

या संदर्भात 'विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा' या मे. पुं. रेगे यांच्या पुस्तकातील एक उतारा उद्धृत करण्याचा मोह मला टाळता येत नाही. या पुस्तकाचा उल्लेख मागे एकदा या लेखमालेत केल्याचं काही वाचकांना आठवत असेल. 'विवेकवाद' या प्रकरणात रेगे लिहितात - 

जे जे विश्वात घडते आहे त्याची यादी करायची झाली तर तिच्यात मानसिक घटनांचा अंतर्भाव करावा लागेल हे उघड आहे. एखाद्या हरणाच्या शरीराला जर दर्भांकुर टोचला तर ती भौतिक घटना असते आणि त्या हरणाला जी वेदना होते ते मानसिक घटना असते. आपण केवळ भौतिक घटना घेतल्या तर त्या कोणत्या नियमांना अनुसरून घडतात, हे जसे वैज्ञानिक पद्धती शोधून काढू शकते त्याप्रमाणे भौतिक घटना आणि मानसिक घटना यांच्या साहचर्याने नियमही ती शोधून काढू शकते. स्विच दाबला की विजेचा दिवा का लागतो ह्या, बहुसंख्य भारतीय विवेकवाद्यांना माहीत नसलेल्या गोष्टीचा उलगडा वैज्ञानिक पद्धती करू शकते. त्याप्रमाणे गुप्तधनाचा शोध लागावा म्हणून एखादा माणूस नरबळी का देतो याचे स्पष्टीकरणही ती करू शकते.    

माणूस, त्याचे अनुभव, विचार आणि कृत्ये हाही विश्वाचा भाग आहे आणि वैज्ञानिक पद्धतीने विश्वाच्या इतर घटकांचे स्वरूप आणि त्यांच्यामधील परस्परसंबंध यांचे जसे स्पष्टीकरण करता येते तसेच मानवी घटनांचेही करता येते आणि ते केले पाहिजे, माणसाचे विज्ञान रचले पाहिजे, भौतिक विज्ञानाइतकेच दृढपणे आणि पद्धतशीरपणे रचले पाहिजे, हा प्रबोधनकालीन विवेकवादाचा संकल्प आणि आकांक्षा होती. माणसाची प्रकृती गुंतागुंतीची असल्यामुळे विज्ञानाच्या ह्या भागाचा आशय आणि अंतर्गत रचना, उदाहरणार्थ, वनस्पतीशास्त्राचा आशय व रचना यांच्यापेक्षा अधिक गुंतागुंतीची असेल व माणसाचे विज्ञान रचणे अधिक कठीण ठरेल हे ह्या विवेकवाद्यांना मान्य होते. पण हे विज्ञान रचणे तत्त्वतः शक्य आहे ह्याविषयी त्यांना शंका नव्हती.   
भौतिक, रासायनिक, जैविक, मानसिक प्रक्रियांचे विज्ञान जसे रचले पाहिजे तसे माणसांच्या अनुभवांचे आणि कृत्यांचे विज्ञानही रचले पाहिजे. ही विज्ञाने, किंवा एका सर्वंकष विज्ञानाचे हे वेगवेगळे भाग, अर्थात माणसांनी रचायचे आहेत आणि ते माणसासाठी रचायचे आहेत. म्हणजे माणसाचे सुख किंवा कल्याण साधण्यासाठी रचायचे आहेत. माणसाचे सुख कशात असते? विवेकाला अनुसरून जगण्यात माणसाचे सुख असते. पण विवेकाला अनुसरून जगणे म्हणजे कसे जगणे?

विवेकाला अनुसरून जगणे म्हणजे कसे जगणे हा कळीचा प्रश्न आहे. रेगे पुढे लिहितात की माणसाने विवेकाला अनुसरून जगणे योग्य असते या विवेकवादी सिद्धांताचा अर्थ काहीही असो, हा सिद्धांत हे विवेकवादाचे एक वेगळे परिमाण आहे. माणसाने कसे जगावे हे विवेकवाद सांगतो. त्याचबरोबर विश्वात खरोखर काय आहे याचा निर्णय करण्याची विवेकवादी रीत तो सांगतो. विवेकवादाच्या या दोन अंगांमध्ये काय परस्परसंबंध असू शकेल? अस्तित्वाचे स्वरूप काय आहे याचा शोध घेणारी वैज्ञानिक पद्धती माणसाने कसे जगावे याचे नियमन करणाऱ्या तत्त्वाला जन्म देऊ शकते का? वैज्ञानिक नीती, विज्ञानप्रणित मूल्ये असे काही असू शकते का?

रेग्यांनी उपस्थित केलेले हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. या लेखमालेत आपण श्रद्धा-अंधश्रद्धा, कार्यकारणभाव शोधण्याची मानसिकता, मानवी नातेसंबंधांचं नवीन प्रारूप अशा विषयांना स्पर्श केला आहे. त्यावर पुढेही बोलणार आहोत. या सगळ्याचा आटापिटा कशासाठी? तर आपल्या जगण्यातील काही बाजूंना घासून-पुसून बघणं, काही बदल करणं आवश्यक वाटतं म्हणून. रेगे म्हणतात तसं 'माणसाने कसे जगावे याचे नियमन करणाऱ्या तत्त्वा'ला यातून जन्म मिळेल का? 'वैज्ञानिक नीती आणि मूल्ये' सांगता येतील का?
हे प्रश्न नेमके आहेत आणि म्हणूनच अवघडही आहेत. व्यक्तीच्या इच्छा आणि समूहजीवनाची बंधनं या दोन्हीची प्रस्तुतता मान्य करत एक 'आदर्श समाज' आणि एक 'आदर्श जगणं' निर्माण करण्याचा किंवा किमान तशी कल्पना करण्याचा प्रयत्न अनेक विचारवंतांनी सातत्याने केला आहे. यातील मुख्य आव्हान व्यक्ती आणि समाज यांच्यातील ताण कमी करणे हेच आहे. परंतु विवेकवादाच्या संदर्भात 'वैज्ञानिक नीती' म्हणजे काय?' यावर तपशीलात जाऊन मांडणी करणं आवश्यक आहे असं वाटतं.  

'व्यक्तिस्वातंत्र्य' हे माणसाच्या विज्ञानाच्या संदर्भाने एक वैज्ञानिक मूल्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. या मूल्याचा उच्चार करताना आणि त्याचा आग्रह धरत असतानाच त्याची नीट उकल करणंही आवश्यक आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हे आधुनिक काळातील मूल्य आहे. अगदी शुद्ध रूपात त्याचं स्वरूप 'व्यक्तीला तिच्या इच्छेनुसार वागण्याचं स्वातंत्र्य' असंच असणार आहे. म्हणजे आपण जर सूक्ष्म विचार केला तर एखाद्याला घराबाहेरही नग्नावस्थेत राहावंसं वाटलं तर व्यक्तिस्वातंत्र्याच्या संकल्पनेनुसार त्याला तसं राहता आलं पाहिजे. हेच पुढे नेऊन असंही म्हणता येईल की योग्य वाटलं म्हणून एखाद्याला मारून टाकण्याचं स्वातंत्र्यही व्यक्तीला असलं पाहिजे. पण आपण अशा व्यक्तिस्वांत्र्याला मान्यता देणार नाही. पहिल्या उदाहरणात चुकीचं असं खरं तर काही नाही, परंतु समाज उभा राहताना काही धारणा घेऊन उभा राहतो. त्या धारणांशी खटका उडाला की समाजात अस्वस्थता पसरते. त्यामुळे इथे धारणांचा संघर्ष होतो आहे. दुसऱ्या उदाहरणात मात्र मी सोडून इतरांच्या जगण्याच्या स्वातंत्र्यावरच घाला घातला जातो आहे. ही गंभीर बाब आहे.

त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचा संदर्भ कोणता, व्यक्तिस्वातंत्र्य कशासाठी हे पाहणं आवश्यक ठरतं. आता आपण आणखी एक उदाहरण घेऊ. व्यक्तिस्वातंत्र्य - म्हणजेच इच्छेचं स्वातंत्र्य - आहे म्हणून माणूस आहे त्याहून अधिक सुखी, आरामदायक जीवन जगू पाहतो. हे करत असताना तो इतरांच्या स्वातंत्र्यावर घाला घालत नाही का? शहरांना पाणी मिळावं म्हणून शहरांपासून दूरच्या गावातले लोक विस्थापित होतात. मग शहरी लोकांच्या स्वातंत्र्याला काय म्हणणार? एखादा खेड्यातला मुलगा आहे. त्याने मुंबईत आल्यावर त्याच्या दृष्टीने तोकड्या कपड्यातील एखादी मुलगी पाहिली आणि तो लैंगिकदृष्ट्या उद्दीपित झाला तर तो त्याचा दोष की त्या मुलाच्या मनात स्री शरीराविषयीची सहजता, सकारात्मतता रूजू देण्यात अपयशी ठरलेल्या त्याच्या पर्यावरणाचा दोष? की मग आपलं स्वातंत्र्य आविष्कृत करताना त्या मुलीच्या विचारांतून काही सामाजिक धागे सुटले म्हणून त्या मुलीचा दोष? 'स्वातंत्र्यातील संघर्ष' दर्शवणारी अशी इतरही उदाहरणं देता येतील. म्हणजे मग थोडक्यात आपल्या स्वातंत्र्याच्या प्रत्येक कृतीबाबत प्रश्नचिन्ह लावता येईल का?  

विचार करताना असं लक्षात येतं की आपण सामाजिक संकल्पना समजून घेताना सर्व काही नेमकेपणाने चिमटीत पकडू शकत नाही. परंतु हेच खरं आव्हान आहे. रेग्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा आपण प्रयत्न केला तर मला जे दिसतं ते असं - जगणं कसं असावं हे सांगणारी वैज्ञानिक नीती म्हणजे जी नीती आपल्याला समग्रतेतून सूक्ष्माकडे आणि सूक्ष्मातून समग्रतेकडे असा दुहेरी प्रवास घडवू शकते, जी नीती आपल्याला भौतिक-सांस्कृतिक विकासाच्या विविध टप्प्यांवरचे प्रश्न, संघर्ष सोडवायला - किमान त्यातील ताण कमी करायला वैचारिक मदत करू शकते ती नीती होय.