गांधीजी आणि त्यांचा 'रिलेव्हन्स' या विषयावर चर्चा करताना गांधीजी आणि हिंदुत्ववादी राजकारण हा संदर्भ पूर्णपणे टाळता येणं शक्य नाही म्हणून हे नोंदवलं.
तर मुद्दा असा की गांधीजी आपल्याला नीट कळले आहेत का? आणि जर गांधीजी म्हणजे 'एका गालावर कुणी मारलं तर दुसरा गाल पुढे करा' किंवा 'रोज खजूर खा, तांबडा भोपळा खा, सिनेमा बघू नका, कुठलंही यंत्र वापरू नका' हे आपलं आकलन असेल तर आपली प्रचंडच मोठी गफलत झाली आहे! ('एका गालावर कुणी मारलं तर दुसरा गाल पुढे करा' हे मुळात येशू ख्रिस्ताचं वचन आहे. गांधीजींचं नाही.) गांधीजींचं एकूण तत्त्वज्ञान, त्यांचा 'जीवनमार्ग' हा अहिंसा, सत्य, साधेपणा, स्वावलंबन या मूल्यांवर आधारित आहे हे स्पष्टच आहे. त्यांची एक जीवनदृष्टी होती. परस्परपूरक आणि माणसाचं 'मनुष्यत्व' सिद्ध करणारं जीवन कसं असावं याविषयी त्यांची एक धारणा होती. आता या विशिष्ट जीवनदृष्टीवर आधारलेलं प्रत्यक्ष जीवन कदाचित कुणाला 'अव्यवहार्य' वाटूच शकतं. पण प्रश्न असा आहे की अशी जीवनदृष्टी असण्याचा आणि त्याप्रमाणे जगण्याचा गांधीजींना अधिकार आहे की नाही? ते ज्या पद्धतीने जगले तंतोतंत त्याच पद्धतीने जगानेदेखील जगावं यासाठी त्यांनी कधी कुणाला वेठीला धरलं नाही. जगाने - निदान भारताने, त्यांच्या आसपासच्या माणसांनी, एक विशिष्ट जीवनशैली स्वीकारावी अशी त्यांची इच्छा नक्कीच असणार/होती, त्यांच्या लेखनातून, भाषणांतून त्यांनी आपल्या जीवनशैलीचा प्रसारही केला असेल; पण पुन्हा तोच प्रश्न - त्यांना तसं करण्याचा अधिकार का नसावा? झालं असं की गांधीजींची एकूण मांडणी इतकी वेगळी आणि अनोखी होती की 'हे काहीतरी ग्रेट आहे' असं वाटून सगळ्यांना गांधीजींचा नैतिक धाक वाटू लागला. पण 'हे ग्रेट आहे'च्या पोटात 'आपल्याला काय हे जमणार नाही' हाही विचार होता. त्याचंच पर्यवसन पुढे 'हे अव्यवहार्य आहे' या विचारात झालेलं दिसतं.
गांधीजींना त्यांच्या अनुयायांनी, राजकीय वारसांनी गांधीजींना एका उंचीवर नेऊन ठेवलं आणि त्यातून गांधी म्हणजे एक 'अवघड आदर्श' आहे, तो प्रत्यक्षात साध्य करता येत नाही अशी समजूत सार्वत्रिक झाली. वर उल्लेख केल्याप्रमाणे यात भर म्हणून हिंदुत्ववादी विचारधारेने गांधीजींची पुरेपूर बदनामी होईल याची काळजी घेतली. आंबेडकरवादी, कम्युनिस्ट, समाजवादी यांचेही गांधीजींशी मतभेद होतेच; पण त्यांनी गांधीजींबाबत विद्वेषी, विखारी आणि खोटा प्रचार केला नाही. क्वचित काही ठिकाणी तीव्र भाषा वापरलेली आढळू शकेल; पण हिंदुत्ववाद्यांनी जसं गांधी-नेहरूंना शत्रू मानलं होतं तसं इथे नक्कीच झालेलं नाही.
एका लेखाच्या मर्यादेत आपल्याला सर्वच मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करता येणार नाही; पण गांधीजींबाबत 'ते यंत्रविरोधी होते, त्यांना आधुनिकता नको होती' हा जो आक्षेप दिसतो त्याविषयी थोडं बोलता येईल. यंत्र, आधुनिकता याबाबत गांधीजींचा जो 'डिनायल मोड' दिसतो त्याचा संबंध त्यांना जो 'नीतिमान माणूस' निर्माण व्हावासा वाटत होता त्याच्याशी आहे असं मला दिसतं. (मला कुणी विचारलं की गांधीजी आपल्याला काय देतात तर माझं एका शब्दातलं उत्तर 'नीतीविवेक' हे असेल). माणसाची भौतिक प्रगती, सुखसुविधायुक्त जीवन आणि माणसाची नैतिक उन्नती या झगड्यात त्यांची निवड स्पष्ट होती. खरं तर नैतिक उन्नतीला पर्यायच असू शकत नाही, पण भौतिक प्रगती जेव्हा हळूहळू समाजमनाचा कब्जा घेते तेव्हा नैतिकता 'बॅक सीट'ला जाऊ लागते आणि मग निवडीचीच वेळ येते. माणूस हा परंपरानिष्ठ, आधुनिकतावादी असा काही असण्यापेक्षा 'माणूस' म्हणून उन्नत असणं गांधीजींना अत्यंत महत्त्वाचं वाटत होतं आणि त्याच्या आड जे येईल ते नको असं त्यांचं म्हणणं होतं. मग ती परंपरा असो की आधुनिकता.
आज आपण यंत्रांनी घेरले गेलो आहोत. आपलं आयुष्य सोपं झालं आहे. पण आपण जर यंत्र उत्पादनाची पूर्ण साखळी (कच्चा माल - त्यावरील प्रक्रिया - उत्पादन - वितरण) जवळून पाहिली तर तिथे सगळं आलबेल आहे असं आपण म्हणू शकू का? मॉलमध्ये किंवा दुकानात वस्तूंच्या अवतीभवती जी प्रसन्नता आणि चकचकीतपणा दिसतो तो या उत्पादन साखळीतल्या प्रत्येक टप्प्यावर आणि मुख्य म्हणजे त्यात गुंतलेल्या माणसांच्या जगण्यात आणि अंतरंगात दिसतो का? भौतिक प्रगती झाली, पण त्याबरोबर वाढलेलं प्रदूषण, शहरातील बेसुमार गर्दी आणि बकाल जगणं, गुन्हेगारी, आर्थिक विषमता या गोष्टी भौतिक प्रगतीच्या कुठल्या खात्यावर टाकायच्या हा प्रश्न आहे. आज आपण टीव्ही, मोबाइल, इंटरनेट या गोष्टी वापरतो, पण त्यांचे दुष्परिणाम लपून राहिलेले नाहीत. व्हॉट्सअॅप हे संवादाचं माध्यम म्हणून चांगलं आहे, पण त्याचा वापर विद्वेषी प्रचारासाठी केल्याने काय झालं आहे हे आपल्याला माहीत आहे. इथे गांधीजींच्या 'माणसाची' आठवण होतेच. माणूसच जर घडायचा बाकी आहे तर त्याच्या हाती यंत्र देऊन काय उपयोग?
आधुनिकतेने माणसासमोर टाकलेले काही पेच गहन आहेत. एक गोष्ट खरी की तंत्रज्ञान विरुद्ध माणूस असा मूळ झगडा नाही. मूळ झगडा माणूस विरूद्ध माणूस असाच आहे. नैसर्गिक संसाधनं आणि उत्पादन साधनांवरील केंद्रित मालकी, काही मोजक्या लोकांच्या बुद्धीमुळे शक्य झालेली आणि मोजक्या लोकांच्या नियंत्रणात राहणारी तंत्रज्ञानाची झेप, मात्र त्यातून प्रभावित होणारं असंख्यांचं जगणं आणि या सगळ्या गतिशील वास्तवात शासनयंत्रणेचा सहभाग आणि नियंत्रण असे विविध मुद्दे इथे विचारात घ्यावे लागतात. गांधीजींचं वैशिष्ट्य हे की माणसाची स्वतंत्र, स्वावलंबी, 'आत्मबल'युक्त आणि सामाजिक दृष्टी असलेली घडण डोळयासमोर ठेवून ते समाजनिर्मितीचा विचार करतात. प्रत्यक्षात ते शक्य झालं का, होईल का हा मुद्दा वेगळा, पण विवेक जागा ठेवायचं, मूलभूत प्रश्न विचारायचं काम गांधीजी करतात. 'थांबा आणि विचार करा' हे सांगतात आणि म्हणूनच ते आपल्यासाठी 'गाइडिंग लाइट' ठरतात.
गांधीजींनी पूर्ण यंत्रविरोध केलेला नाही तर यंत्रविवेक सांगितला आहे. आज आपण 'डिजिटल डीटॉक्स'बद्दल बोलतो आहोत. 'स्क्रीन टाइम' कमी करण्याबद्दल बोलतो आहोत. पर्यावरणीय संकटाबद्दल बोलतो आहोत. आत्मिक शांतीबद्दल बोलतो आहोत. यंत्रांचा वापर जेव्हा आजच्यापेक्षा कैक पटीने कमी होता तेव्हा गांधीजी असंच काही सांगत होते यात त्यांचं द्रष्टेपण दिसून येतं. 'पर्यावरण रक्षण' हा शब्ददेखील चर्चेत नव्हता तेव्हा गांधीजी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा पुरस्कार करत होते - पर्यावरणपूरक जीवनशैली हा शब्द न वापरता! लक्षात घेण्याजोगा भाग हा की अशी जीवनशैली स्वीकारणं याला त्यांच्या दृष्टीने एक 'स्वतोमूल्य' होतं. पर्यावरणाचा इतका विनाश होईल याची त्यांना कदाचित त्या क्षणी कल्पनाही नसेल; पण पर्यावरणाला बाधा पोचेल म्हणून नाही तर एक जीवनमूल्य म्हणून विशिष्ट जीवनशैली स्वीकारली पाहिजे हा त्यांचा विचार निश्चितच क्रांतदर्शी होता.
गांधीजींबाबत एक अडचण अशी झाली आहे की त्यांचा वापर मोजमापाच्या फूटपट्टीसारखा केला जातो. म्हणजे गांधीजींचा प्रभाव असलेल्या एखाद्याने जर नवीन कार घेतली किंवा बंगला बांधला तर 'हे तुम्हांला बरं चालतं? आता कुठे गेला तुमचा गांधीवाद?' असं त्याला विचारलं जाऊ शकतं. गांधीजी ज्या जीवनशैलीचा पुरस्कार करत होते तिच्याशी सुसंगत नसलेल्या काही गोष्टी करूनही आपण गांधीजींच्या प्रभावात आहोत असं म्हणणं योग्य होईल का या प्रश्नाचं उत्तर मी 'हो, होईल' असं देईन. याचं कारण असं की गांधीविचाराचा परीघ बराच मोठा आहे आणि 'गांधीविचार' या फूटपट्टीने सगळंच मोजत राहिलं तर मग जोवर आपण पंचा नेसत नाही तोवर आपल्याला गांधींचं नाव घेण्याचा अधिकार नाही असं म्हणावं लागेल. वर म्हटलं तसं नीतीविवेक हा गांधीविचाराच्या गाभ्याशी आहे. त्यामुळे त्या कसोटीवर आपली कृती घासून पाहणं हे आपण जरूर करावं. गाडी किंवा बंगला बाजूला ठेवू, आपण बाजारातून साधा शर्ट घेतला तरी त्या शर्टच्या निर्मितीत कुणाचं शोषण झालेलं नाही असं आपण खात्रीपूर्वक सांगू शकणार नाही. पण म्हणून आपण शर्टदेखील घ्यायचा नाही असं ठरवण्यात हशील नाही. आपण कपड्यांच्या मोहात किती अडकायचं हा निर्णय मात्र आपण विवेकाने घेऊ शकतो. शिवाय जर एखाद्याला खरंच वाटलं की मी माझा शर्ट माझ्या हाताने तयार करेन आणि त्याने तसं केलं तर ते अर्थातच प्रशंसनीय आहे. पण गांधीविचार उचलून धरण्यासाठी तशी पूर्वअट असू शकत नाही. (आजही हाताने सूत कातून त्याचे कपडे वापरणारे काहीजण आहेत. पुण्यात राहणारे माधव सहस्त्रबुद्धे हे एक उदाहरण. माधवदादा सूतकताईचं प्रशिक्षणही देतात. यूट्यूबवर त्यांचे व्हिडीओ पाहता येतील).
एका बाबतीत मात्र मी आग्रही आहे. आपण जर गांधीविचारांमुळे खरोखरच प्रभावित झालो असू तर ते आपल्या संवादी आणि सहिष्णू असण्यातून मात्र दिसायला हवं. याबाबतचा माझा अनुभव सांगावासा वाटतो. मी गेली बरीच वर्षं फेसबुकवर सक्रीय होतो. वर उल्लेख केलेली संवादमालिका मी फेसबुकवर लिहिली यात फेसबुकचा एक व्यासपीठ म्हणून जसा सहभाग आहे तसाच याच माध्यमावर पडलेले गटतट, त्यांच्यातला विसंवाद आणि विखार ही कारणेही आहेत. राजकीय ध्रुवीकरण इतक्या घातक वळणावर आलं आहे की विवेक जागृत असणाऱ्या कुणाही माणसाला अगदी नैराश्य यावं. अशा वातावरणात गांधीजींचा शांत, संयमी स्वरच मदतीला येणार आहे. या सगळ्या कोलाहलाला भेदून जाणार आहे. फेसबुकवरील माझ्या वावरात मी संयमीपणे, दुराग्रह न बाळगता, विरोधी मताला - अगदी विद्वेषी टिप्पण्यांनाही शांतपणे उत्तर देत जे लेखन केलं त्याचा प्रेरणास्रोत मला गांधीविचारच वाटतो. आणि मला हे आवर्जून नोंदवावंसं वाटतं की शांतपणे प्रतिवाद करण्याचे सकारात्मक परिणाम मला दिसलेले आहेत. विरोधी मत असलेले अनेकजण माझ्याशी शांतपणे बोलते झाले आहेत. 'माणूस परिवर्तनशील आहे, माणसात बदल होऊ शकतो, माणसातला माणूस जागा करणं हे माझं उद्दिष्ट असायला हवं' यावर गांधीजींचा विश्वास होता. या मूलभूत विश्वासाचा माझ्या व्यक्तिगत आयुष्यात आणि सामाजिक आयुष्यातही मला फार फायदा झाला आहे.
त्यामुळे आपल्याला सगळ्या चर्चेअंतीदेखील जर गांधीजी 'टोकाचे आदर्शवादी' वाटत असतील तर ठीक आहे. तो मुद्दा बाजूला ठेवू. त्यांचं व्यापक तत्त्वज्ञान/विचार बाजूला ठेवू. पण त्यांनी ज्या मूल्यांचा आग्रह धरला ती मूल्यं - खरं बोलणं, दुसऱ्याचं ऐकून घेणं, संवाद करत राहणं, मुळात माणसांविषयी मनामध्ये प्रेम असणं - ही जरी आपण रोजच्या जगण्यात आचरणात आणू शकलो तरी पुष्कळ झालं.एवढी एक सोपी फूटपट्टी लावली आणि बाकी अवजड फूटपट्ट्या बाजूला ठेवल्या तरी हरकत नाही. इथे यशस्वी झालो की हळूहळू इतर आघाड्यांवरही यश येऊ शकेल!
('संवाद' या अन्नपूर्णा परिवाराच्या मासिकात प्रकाशित)
No comments:
Post a Comment