Saturday, March 3, 2007

मी मराठी!

इये मराठीचिये पुण्यनगरीत मराठीची विद्यमान स्थिती काय हा प्रश्न आम्हाला बरेच दिवस भेडसावत होता. मराठीवर मनापासून प्रेम करणारा एक मराठी(च) माणूस या नात्याने आम्हाला हा प्रश्न जिव्हाळ्याचा वाटतो. पुण्याच्ता ट्रॅफिक (म्हणजे? हां, रहदारी) मधून आपण रोज जातो आणि अजूनही जिवंत आहोत ही भावना तशी सुखकारक आहे. त्यामुळे आपल्या मायबोलीचा प्रश्न किती बिकट आहे याचा अभ्यास करण्याकरता त्याच ट्रॅफिकमधून मार्ग काढत आपण पुणं पालथं घालायचं असं आम्ही ठरवलं. 

पुण्याच्या चतुःसीमा आता अत्यंत विस्तारलेल्या आहेत हे आम्ही प्रथम लक्षात घेतलं. पूर्वी असं नव्हतं. (हं!). पण आपल्या सध्याच्या अभ्यासाचा तो विषय नाही, हे आम्ही स्वतःच्या मनाला बजावलं आणि पुढल्या आखणीला सुरुवात केली. पण सुरुवातीलाच अडलो. मराठीची सद्यस्थिती नक्की कशी, कुठे बघायची हे काही कळेना. भाषेची सुरुवात कशी झाली हा प्रश्न जितका गहन तितकाच भाषेची का टप्प्यावरची अवस्था काय हाही प्रश्न गहनच. पुण्याच्या मध्यवर्ती भागातून सुरुवात करावी म्हटलं तर सदाशिव, नारायण, टिळक, बाजीराव, लक्ष्मी, कुमठेकर, गुरूवार-शनिवार वगैरे ठसठशीत मराठी नावांतून मराठी सुखात नांदते आहे हे आम्ही जाणतोच. 'रूपाली धुलाई केंद्र', 'आवळा संशोधन केंद्र', 'जनसेवा दुग्ध मंदिर', 'चर्मशिल्प' इत्यादी दुकानांच्या पाट्यांमधूनच मराठीपण झळकते. (दुकानाच्या आत गेल्यावर का होते, यावर काही पूर्वग्रहदूषित मंडळींनी दिशाभूल करणारा मजकूर लिहून ठेवला आहे. आम्ही त्याचा आत्ताच निषेध करतो. मराठी दुकानदार तुसडा असतो वगैरे साफ खोटं आहे. आत्मभान जेव्हा उन्मनी अवस्थेस जाऊन पोचते तेव्हा त्याचे नानाविध आविष्कार क्षुद्र जनांना त्रासदायक वाटणारच!). त्यामुळे तिथे मराठी सुखात आहे. गावाच्या थोडं बाहेर जाऊन बघावं - म्हणजे ईस्ट स्ट्रीट, कँप वगैरे किंवा इकडे हडपसर, मुंढवा, कोंढवा वगैरे तर तिथेही स्पष्ट फरक नजरेस येईल असे आमचे मत झाले. कारण कँप भागात इंग्लिशचे प्राबल्य जास्त आहे हे तिथल्या पादचाऱ्याला पत्ता विचारला तरी लक्षात येते. फरक अगदी स्पष्ट, उघड आहे असं जाणवू लागलं. मग हा अभ्यासच रद्द करावा का असंही वाटून गेलं. ढोबळमानाने बोलायचं झालं तर मराठीची स्थिती काही ठिकाणी चांगली आणि काही ठिकाणी वाईट आहे असा निष्कर्ष आम्ही काढला. पण मग मराठीच्या दुरवस्थेविषयी मराठी आसमंतात इतकी चर्चा का बरं होते? की यात केवळ संशोधनाचा आव आणण्याचा हेतू आहे? दुरवस्था म्हणावी तर तीनशेहून अधिक दिवाळी अंक निघतात ते कसे? बायकोला विचारले असता ती म्हणाली,  तुला काय वाटतं? दिवाळी अंकवाले काय फुलटाईम (पूर्ण वेळ) हाच धंदा (धंदा? हर हर!) करतात? त्यांची मुलंबिलं तिकडे अमेरिकेत सेटल्ड असतात. (सेटल होणे हा मराठीच शब्द आहे). म्हणून त्यांना जमतं….बायकोबद्दलचं आमचं आदरयुक्त प्रेम उफाळून आलं!

दिवाळी अंकांचा खपही बऱ्यापैकी होतो असे आम्हाला आमच्या एका मित्राकडून कळले होते. आमचे हे मित्र पुस्तक विक्री व्यवसायात असून ते शेक्सपियरच्या नाटकांवरील तौलनिक समीक्षेपासून ते 'स्नेहबंध', 'थरार', 'अकल्पित' अशा शीर्षकाच्या मराठी कादंबऱ्या निष्काम मनाने विकतात. पुस्तक हे विकण्याचे 'साहित्य' आहे यावर त्यांचा विश्वास आहे. आमची बायको जशी आमच्या मदतीस धावून येते तसेच हेही गल्ल्यावर बसून, लक्ष्मीच्या साक्षीने आम्हाला सारस्वतिक कलहातून बाहेर काढतात. 
"तू लेका मर असाच!" अशा प्रेमळपणे आमच्या प्रश्नाचे स्वागत झाले. 
"अरे म्हणजे काय? तू मराठी पुस्तकं विकतोस ना? तुला माहीत नको मराठीची सद्यस्थिती काय आहे ती?"
"सद्यस्थिती? हां, हां…आलं लक्षात. ये, बस. चहा घेणार ना?"
"घेऊ की."
चहा आला. तोपर्यंत हे आपद्ग्रस्त चेहऱ्याने विचार करत होते. 
"अरे काय आहे, लोक पुस्तकं विकत घेतात अजूनही. नाही असं नाही."
"कुठल्या प्रकारची पुस्तकं?"
"सगळ्या प्रकारची. कथा-कादंबऱ्या, आत्मचरित्रं, सेल्फ-हेल्प..."
"म्हणजे?" 
"म्हणजे 'जीवनात यशस्वी कसे व्हावे', 'तुमचे भविष्य तुमच्या हाती' छापाची पुस्तकं."
"बरं."
"तर लोक पुस्तकं घेतात अधूनमधून. अनुवादित कादंबऱ्यांनाही मागणी असते बऱ्यापैकी. शिवाय लहान मुलांची पुस्तकंही घेतात लोक."
"म्हणजे पुस्तक विक्री हा निकष लावला तर मराठीची स्थिती चांगली आहे असं म्हणता येईल."
"हो. पण एक आहे. पुस्तक घेऊन लोक घरी गेले की त्या पुस्तकांचं काय करतात हे मात्र आपण सांगू शकणार नाही."

हे आम्हाला आवडलं. बोलणं संपता संपता डोक्याला चालना देऊन जाणारी माणसं आपल्याला आवडतात. 

दुकानातून बाहेर पडल्यावर आम्हाला वाटलं की आता काही लोकांना प्रत्यक्ष भेटलंच पाहिजे. मराठीच अर्थात. म्हणून मग आम्ही हिच्या एका मैत्रीणीकडे गेलो. ती हिची कॉलेजातली (महाविद्यालयातली) मैत्रीण. तिला वाचायची आवड आहे असं हिने सांगितलं होतं. दार वाजवल्यावर आतून 'कमिंग, वन मिनिट!' असा स्त्रीस्वर ऐकू आला. म्हटलं झालं! ही तर आंग्लाळलेली दिसते. पण तरी धीर टिकवून धरला. (शिवाय स्त्रीस्वरातील 'आले हं' हे एक झिणझिण्या आणणारं प्रकरण आहे! असो.)

"या...लेखक!" अशी कुचकट मानवंदना स्वीकारत आम्ही आत आलो. प्रशस्त हॉल, (दिवाणखाना, बरोबर ना? हो दिवाणखानाच. आदिलशहा, औरंगजेब वगैरे लोकांना ते जाण्यापूर्वी काही शब्द परत करायचे राहून गेले. त्यातलाच एक असावा हा), उंची सोफा (मराठी प्रतिशब्द नाही...), बांबूच्या खुर्च्या, झोपाळा आणि कोपऱ्यात एक केवळ तिरस्कार या भावनेला लायक अशा चेहऱ्याचं कुत्रं. बांधलेलं होतं, म्हणून आम्ही निश्चिंत झालो. 

"काय घेणार? चहा, कॉफी की ड्रिंक? घेता ना?...."
"नको. मला खरं तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते."
"वा! अहो रायटर्स लाइक यू आर हिअर टू आन्सर अवर क्वेश्चन्स! आणि तुम्ही म्हणताय की..."
"तसं नाही. ही म्हणत होती की तुम्ही वाचता बरंच. तेव्हा मराठीच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल थोडं बोलायचं होतं. "
वास्तविक अशा जोरदार घरात राहणाऱ्या बाईला एकंदरीत सगळीच परिस्थिती चांगली वाटत असेल, तेव्हा मराठी तरी त्याला अपवाद कशी असणार असा विचार आमच्या मनात येऊन गेला.
"मराठीची परिस्थिती? ऑफ कोर्स! ऑफ कोर्स! मी खरं सांगू का, मला काही तुमच्याइतकं माहीत नाही. पण रागावू नका, सध्या चांगले लेखकच कुठे आहेत? आम्ही वाचायचं काय?"
"असं कसं म्हणता? एवढी नवीन पुस्तकं येत असतात. तुम्ही पाहता की नाही? नवीन लेखक लिहित आहेतच की..."
"हो, तशी वाचते मी. पण वेळही व्हायला हवा ना..."

इथून आता गाडी मुलांच्या शाळा, अभ्यास, नवऱ्याचं ऑफिस इथे जाणार हे आम्ही ताडलं. या वाचनप्रिय मैत्रिणीचं वाचिक कौशल्य दांडगं आणि वाचनाची अवस्था बिकट वाटत होती. मग आंम्ही एक डायरेक्ट (थेट) प्रश्न टाकला.

"तुमची मुलं कुठल्या शाळेत जातात?" 
"दोघंही सेंट मीराजमध्ये होती. धाकटा आता कॉलेजला आहे. मोठी नुकतीच नोकरीला लागलीय."
"अच्छा, म्हणजे इंग्लिश माध्यम."
"हो. अहो त्याशिवाय निभाव कसा लागणार? आपल्या वेळची गोष्ट वेगळी होती."
                        
'आपल्या वेळची गोष्ट वेगळी होती' हे वाक्य ऐकल्यावर जी ठेच लागते ती आत्ताही लागली. पण इंग्लिशचा मुद्दा विचारात पाडणारा होताच. 

"तुमचं बरोबर आहे. पण मग मुलांना भाषेची ओळख होणार कशी?"
"वा! घरात आम्ही स्ट्रिक्टली मराठीच बोलतो. त्यांच्यावर संस्कारसुद्धा मराठीच आहेत." पुन्हा ठेच. पण आम्ही धीराचे आहोत. 
"अरे वा! पण मग मुलांना वाचायची वगैरे आवड आहे की नाही?"  
"आहे. पण माध्यम इंग्लिश म्हटल्यावर त्यांना इंग्लिश जास्त कम्फर्टेबल वाटतं. आणि आमची मोठी आता जॅपनीज इंटरप्रिटर म्हणून नोकरी करतेय. गेल्याच वर्षी तिने कोर्स पूर्ण केला. चांगली डिमांड आहे मार्केटमध्ये."

इथे आम्हाला एक उत्तर मिळालं. मार्केट डिमांड! मराठीला 'मार्केट'मध्ये डिमांड किती? जवळजवळ शून्य! जॅपनीजला आहे. त्यामुळे मार्केटच्या नियमांप्रमाणे मराठी मागे पडणार. म्हणजे मराठीची प्रतिष्ठा वाढायला मराठी व्यावसायिकांनी बाजारपेठ काबीज केली पाहिजे. पण जॅपनीज माणूस जपानीतून बाजारपेठ काबीज करतो. मराठीजनांना आभार मानायलाही इंग्लिश लागतं. जमायचं कसं? ज्ञानेश्वरांची ओवी अमर खरीच, पण ती शेवटी ओवी. तिला 'सेल्स पोटँशियल' कुठाय? आम्हाला अतीव दुःख झालं. ज्या भाषेनं साहित्यिक जन्माला घातले, त्या भाषेनं व्यावसायिक निर्माण करू नयेत? इथे उत्तरातलं अजून एक उत्तर सापडलं. भाषा बोलणारे लोक कसे आहेत, यावर भाषेचं भवितव्य आहे. मुंबईला गुजरात्यांची आणि इतर परप्रांतीयांची चलती आहे म्हणून मराठीजन कण्हत असतात. नरीमन पॉईंटला ब्रिटीश एम्बसीत इंग्लिश-हिंदीबरोबर गुजरातीतूनसुद्धा सूचना लावल्या आहेत. अंबानी, हिरानंदानी या मंडळींच्या साम्राज्याला शिवाजी मंदिरमध्ये 'नामदेव म्हणे'च्या प्रयोगांनी उत्तर देणे म्हणजे वाघाला पिपाणी वाजवून घाबरवण्याचा प्रयत्न करण्यापैकी आहे. गुजराती व्यापारी इंग्लिशचा यत्किंचितही न्यूनगंड न बाळगता आपला माल विकतो आणि मराठी जनता इंग्लिशशी झगडत इंग्लिशला चिकटून राहते. माल खपला नाही तरी बेहत्तर, गिऱ्हाईकाने इंग्लिशची चूक काढली की जी जखम होते ती अतुलनीय असते.

आम्ही पुन्हा प्रश्नांच्या चक्रात सापडलो. सगळं मान्य केलं तरी मग मराठी माणसाच्या प्रामाणिकपणाचं, कष्टाचं काहीच मोल नाही? सरळमार्गी मराठी माणूस नाटकात रमतो अन शेकडो खोट्यानाट्या उलाढाली जिथे करायला लागतात त्या मुंबईत त्याला स्वतःचं व्यावसायिक साम्राज्य उभं करता आलं नाही हा त्याचा दोष झाला? म्हणजे आता समजायचं काय? मराठीच्या दुरवस्थेला मराठी माणसाचं व्यावसायिक अपयश कारणीभूत आहे? की मुळातच ही चिंता निरर्थक आहे?  कुठल्याही प्रादेशिक भाषेला जे स्थान असतं ते मराठीला आहेच असं म्हणता येईल का? आणि तसं म्हणता येत असेल तर मग प्रश्न कुठे उरतो? 

आम्ही चिंतनात बुडलो असतानाच बहुधा 'मोठी' येउन बसली असावी. 'मोठी' साधारण चोवीस-पंचवीसची असावी. तिने 'हाय' फेकल्यावर आम्हीही 'हाय' फेकलं. 

"अगं आपली सुषमामावशी आहे ना तिचे हे मिस्टर." मराठीची अजून एक गोची! 'यजमान' वगैरे फार म्हणजे फारच कालबाह्य झाल्यावर नवऱ्याची ओळख करून देताना 'मिस्टर' वापरणं म्हणजे कमाल होती. मिस्टर हे वास्तविक संबोधन. 'मीट मिस्टर अँड मिसेस जोन्स' हे ठीक आहे पण आंग्ल मंडळी 'ही इज जोन्स आंटीज मिस्टर' अशी भयानक ओळख करून देत नाहीत.
"हो. आय नो. मी तुमचा एक लेख वाचला आहे."
मोठीनं आपला एक लेख वाचला आहे याचा आनंद होई-होईतो मावळला. तो अंक सुषमामावशीनेच दिला होता असं पुढे कळलं.
"काका, (कार्टी वयावर उठलीय) मला पण तशी मराठी लिटरेचरची आवड आहे. मी शाळेत असताना 'मृत्युंजय' वाचून संपवली होती." 'एकदाची' हा शब्द ती विसरली असावी असं तिच्या एकूण आविर्भावावरून वाटलं.
"हो का? वा! तुझे मित्र-मैत्रिणी वाचतात का मराठी?"
"नाही हो. मराठी मित्र-मैत्रिणी तसे कमी होते जॅपनीजला. कॉलेजला असताना होते. नंतर जॅपनीज घेतल्यावर फ्रेंड सर्कलच बदललं. आमच्याकडे म्हणजे एकदम नॅशनल इंटिग्रेशन आहे. सगळीकडून स्टुडंट्स येतात."

हे अजून एक उत्तर. आधी नसलेली किंवा कमी असलेली आणि आता असलेली किंवा खूप वाढलेली भाषांची सरमिसळ. एकीचा दुसरीवर परिणाम होणारच. अर्थात परिणाम कोण जास्त 'करून घेते'  हा मुद्दा चिंतनीयच. 

"शेवटी काय आहे, सगळं कंडीशनल असतं. नाही का?" मोठीची आई. 

यावर 'हो' म्हणून आम्ही निघालो. 

लक्षात आलं ते असं की सगळं काही आपल्या लक्षात येत नाही. भाषेचा प्रवाहही नाही आणि तिचं साठलेपणही नाही. मग भाषा उरते कुठे? 'कोसला'त, बटाट्याच्या चाळीत, आठवणींच्या पक्ष्यांत, तुकारामाच्या गाथेत आणि कोलटकरांच्या कवितेतही! आपण जपावं ते हे सगळं. बाकी मग भाषा विल टेक केअर ऑफ हरसेल्फ! तिची वळणं आणि त्या वळणांमागची कारणं आपल्या नियंत्रणात नाहीत!

(साप्ताहिक सकाळ, ३ मार्च २००७)

No comments:

Post a Comment