साहित्याची वर्गवारी हा खरं तर मला थोडासा विचारात पाडणारा प्रकार आहे. म्हणजे कथा, कविता, कादंबरी याबाबत नव्हे, तर स्त्री साहित्य, दलित साहित्य, बालसाहित्य अशा वर्गीकरणाबाबत. एकीकडे अशी विभागणी अपरिहार्य वाटते. उदा. बालसाहित्य हा एक वेगळा कप्पा करावा लागेलच, कारण लहान मुलांच्या जाणिवा हळूहळू घडवत न्याव्या लागतात. त्यामुळे त्यांच्याकरता लिहिलं जाणारं साहित्य याला एक स्वतंत्र अस्तित्व आहे. पण सगळ्या 'मोठ्या माणसांमध्ये'सुद्धा इतके कप्पे आहेत की त्याची कधीकधी गंमत वाटते. मला वाटतं की समाज कसा-किती विभाजित आहे याची साक्ष हे प्रकार देत असतात.
स्त्रीवाद, स्त्री लिखित साहित्य याविषयी मला आस्था आहे. 'मिळून साऱ्याजणी'मध्ये सहसंपादक म्हणून काम करत असताना जेव्हा महाराष्ट्रातल्या विविध भागांमधून स्त्रियांचे लेख, कविता, अनुभव वाचायला मिळत तेव्हा मला तिथे असल्याचं समाधान मिळायचं. अर्थात पुरूष लेखकांचे अनुभव, साहित्य वाचतानादेखील समाधान वाटायचं, पण जेव्हा कुणी स्त्री तिच्या जाणिवांविषयी, आत्मभानाविषयी, तिने सोसलेल्या त्रासांविषयी लिहायची तेव्हा एक सार्थकता जाणवायची. स्त्रीवादाचा माझा विद्याशाखीय अभ्यास नाही. माझं जे थोडंफार आकलन आहे ते प्रामुख्याने जाणिवेतून आलेलं आकलन आहे. स्त्री असणं हे काय असतं हे मला पूर्णपणे कधीच समजू शकणार नाही कारण मी पुरूष आहे. (आणि हे उलट बाबतीतही खरं आहे!) स्त्रियांवरील पुरूषांकडून होणारे अत्याचार, आधुनिकतेच्या आवरणाखाली लपवले जाणारे स्त्रियांचे प्रश्न हे सगळं पुरूष म्हणून मला शरम वाटावी असंच आहे. दुसरीकडे शोषितांच्या दुःखाला किंवा त्या दुःखाच्या एकत्रित प्रकटीकरणाला जेव्हा धार येते तेव्हा त्यात खऱ्याबरोबर खोटेही आवाज मिसळले जाऊ लागतात आणि 'शोषित' नक्की कोण आहे असा एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. ज्यांना वंचित-शोषित समूहांसाठी काही करायचं आहे त्यांच्यापुढे हे एक मोठंच आव्हान तयार होतं. मला वाटतं की स्त्रीवादापासून प्रेरित झालेल्या लेखनाकडे बघताना ही बाजूदेखील लक्षात घ्यायला हवी.
साहित्याच्या लेखक-विशिष्ट वर्गवारीबाबत माझी तक्रार नसली, तसं होणं अपरिहार्य आहे हेही मान्य होण्यासारखं असलं तरी तसं करणं हे त्या साहित्याचं मूल्यमापन करण्याची पूर्वअट असावी का याबाबत माझ्या मनात संभ्रम आहे. म्हणजे कविता महाजन यांची 'ब्र' ही कादंबरी मला कादंबरी म्हणून आवडते की ती एका स्त्रीने लिहिली आहे म्हणून जास्त आवडते? 'आंधळ्याच्या गायी' या संग्रहातील कथांनी मला हलवून सोडलं हे म्हणताना त्या कथा एका स्त्रीने लिहिल्या आहेत म्हणून मला जास्त हलवून सोडतात का?
मला असं वाटतं की ललित (किंवा वैचारिकदेखील) वाङ्ग्मयाचा परिणाम, प्रभाव याच्या मुळाशी कितीही नाकारलं तरी 'आयडेंटिटी'सापेक्ष अस्तित्व असतंच. आपण साहित्य घटकाभर बाजूला ठेवू, पण मी जेव्हा एखाद्या पुरूषाला प्रथमच भेटतो तेव्हा त्याची पुरूष अशी वेगळी 'आयडेंटिटी' मी लक्षात घेत नाही. हेच स्त्रीच्या बाबतीत काय होतं? मला वाटतं अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म पातळीवर असेल, पण 'स्त्री' ही तिची आयडेंटिटी मी लक्षात घेतो. प्रस्तुत लेखात मी आजच्या स्त्री साहित्याबद्दलचं माझं निरीक्षण मांडणार आहे. परंतु हे करत असताना साहित्याच्या आस्वादाला, मूल्यमापनाला काही बाधा येते का हा प्रश्न मात्र माझ्या मनात रेंगाळतो आहे.
आणखी एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे. माझं निरीक्षण, माझं आकलन याला अर्थातच माझ्या मर्यादा आहेत. त्यामुळे मी दाखवेन ते मला माझ्या स्थानावरून दिसलेलं चित्र असेल. ते चित्र अंतिम असं काही दाखवतंय असा माझा भ्रम नाही आणि वाचकांचाही तो नसावा.
स्त्री लिखित साहित्य स्त्रिया लिहू लागल्या तेव्हापासून ते आतापर्यंत बदलत गेलं आहे. कारण वास्तव जगण्याचे संदर्भच बदलत गेले आहेत. परंतु तरीही 'स्त्रीपणाचे प्रश्न' आजही या साहित्याचा 'अंडरकरंट' आहे असं म्हणावसं वाटतं. याची एक सरळ दिसणारी दुसरी बाजू म्हणजे 'वास्तवाचे संदर्भ बदलले, पण स्त्रीचा जो साथीदार - पुरूष - तो फारसा बदलला नाही' अशी आहे का? मला वाटतं आहे. म्हणजे पुरूष अजिबातच बदलला नाही असं नाही, पण स्त्री आणि समाज असे दोघे जेव्हा समोरासमोर उभे राहतात तेव्हा तिला जे व्यापक चित्र दिसतं त्या चित्रात तिला असे पुरूष बहुधा फारसे आढळत नाहीत. अर्थात याबाबतीत मला एक मत नोंदवावंसं वाटतं. गौरी देशपांडे यांनी आपल्या काळाच्या पुढे जाऊन लिहिलं. त्यांच्या लेखनात कदाचित स्त्री-पुरूष संबंधांच्या नव्या व्यवस्थेची प्रारूपे मांडली गेली नसतील, पण त्या काळातील सर्वसाधारण स्त्रीपेक्षा त्यांची नायिका दोन पावलं पुढे आहे असं दिसतं. आज आपण जिथे आहोत त्यापेक्षा त्यांचा काळ स्त्री-पुरूष समतेच्या बाबतीत काहीसा मागे होता असं म्हणता येईल. असं असताना गौरी देशपांडेंसारखी 'पुढची नजर' ठेवून, किंबहुना त्यांना जे दिसलं त्याच्याही पुढे जाऊन काही लिहिताना कुणी दिसत नाही. अर्थात हे कथात्म साहित्याबाबत. कथात्म साहित्य सोडता इतर विविध विषयांवर माहितीपूर्ण लिखाण करणाऱ्या अनेक लेखिका आज दिसतात. (मला चटकन सुचणारी काही नावं - उत्क्रांतीसारख्या महत्त्वाच्या विषयावर मराठीत ग्रंथ लिहिणाऱ्या सुलभा ब्रह्मनाळकर, कॉपीराईट कायद्याविषयी 'लोकसत्ता'मधून गेल्या वर्षी ज्यांनी सदर चालवलं त्या मृदुला बेळे, वन्य प्राण्यांविषयी रोचक लेखन करणाऱ्या डॉ. विनया जंगले, स्त्री-पुरूष संबंध आणि स्त्री प्रश्नाकडे विज्ञानाच्या भिंगातून पाहणाऱ्या मंगला सामंत, नगररचनाशास्त्रातील जाणकार सुलक्षणा महाजन, गावगाड्याचं आजचं चित्र मांडणाऱ्या उल्का महाजन, तत्त्वज्ञान-सामाजिक अभ्यासाच्या प्रांतात लेखन/अनुवाद करणाऱ्या सुनीती देव, संजीवनी कुलकर्णी, करूणा गोखले, अनुवादाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक स्त्री अनुवादक इत्यादी. अशी इतरही नावं दिसतील. याखेरीज स्त्री चळवळीशी संबंधित असलेल्या अनेक अभ्यासक, पत्रकार त्यांचं योगदान देत आहेतच.)
तर साहित्याच्या क्षेत्रात लेखिका जे योगदान देत आहेत त्यात मला वाटतं की अजूनही म्हणावं इतकं 'पुढे जाणं' होत नाही. स्त्री-पुरूष संबंधांबाबत जरी असेल तरी काही नवं, संरचनात्मक असं फारसं वाचायला मिळत नाही. मी स्वतः फेसबुक पिढीचाच प्रतिनिधी आहे. फेसबुक, इंटरनेटवरील मराठी वेबसाईट्स या व्यासपीठांशी परिचय असणारा आहे. इथे अनेक स्त्रिया लिहिताना दिसतात. सर्वच वयोगटातील. विज्ञान, सामाजिक-आर्थिक मुद्दे, स्त्री प्रश्न, स्त्री-पुरूष संबंध अशा अनेक बाबतीत इथे चर्चा होतात. यात अनेक स्त्रिया आपलं मत नोंदवतात. परंतु जे मुद्रित माध्यमाबाबत आहे, तेच इथेही आहे. स्त्रियांच्या इतर लेखनात वैविध्य असलं तरी कविता अजूनही एका कोषात घुटमळताना दिसते. समीक्षा, पुस्तक परिचय, ललित निबंध हे प्रकार कमी-अधिक प्रमाणात हाताळले जातात. प्रामुख्याने ब्लॉगवर किंवा वेबसाईट्सवर. याखेरीज फेसबुकवरील स्फुटलेखन हा एक नवा फॉर्म म्हणून पुढे यायची शक्यता आहे. तिथे ललित, चर्चात्मक स्वरूपाचं लेखन जास्त आहे. आणि ते तुकड्यांच्या स्वरूपात असलं तरी सगळंच लेखन दुर्लक्ष करावं असं अजिबात नाही.
स्त्री लेखकांच्या लिहिण्यात पुरूषसत्ताक व्यवस्थेविषयीची नाराजी दिसते, पुरूषांविषयीचीही नाराजी दिसते. पण मला कधीकधी असं वाटतं की सततच्या नाराजीतून किंवा टीकेतून हाती काही लागेनासं होतं. दुसरा एक मुद्दा यासंबंधीच्या चर्चेत बरेचदा पुढे येतो तो हा की आत्मभान जागं झालेल्या स्त्रीने आपल्या लिहिण्यातून आपला असंतोष प्रकट करावाच, पण जर ती स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करत नसेल, लग्नसंस्थेचे आर्थिक लाभ घेत असेल तर या संस्थेची चौकट न मोडता, सुरक्षित स्थानावरून तिने स्त्रीवादी विचारांचा प्रसार करावा का? स्त्री प्रश्न सर्वत्र सारखे नसतात. पुण्या-मुंबईतील एखादी सुखवस्तू गृहिणी आणि मराठवाड्यातील एखाद्या खेड्यातील स्त्री यांच्यात कमालीचं अंतर आहे. सुखवस्तू गृहिणी जेव्हा स्त्रीवादी विचाराचा आधार घेऊन सहानुभूतीच्या परिघात जाऊ बघते तेव्हा ते स्वीकारणं जरा जड जातं. तिने आपली कक्षा अधिक विस्तारणं अपेक्षित आहे.
मनस्विनी लता रवींद्र या तरुण लेखिकेच्या 'ब्लॉगच्या आरशापल्याड' या कथासंग्रहाच्या मलपृष्ठावर कथाकार, नाटककार जयंत पवार यांनी त्यांच्या ब्लर्बमध्ये मनस्विनीच्या लक्षणीय अभिव्यक्तीकडे लक्ष वेधताना म्हटलं आहे की अभिव्यक्तीतील बेधडकपणा हा तिच्या पिढीचा स्थायीभाव आहे, पण जगण्याची व्यामिश्रता समजून न घेता येणं हादेखील या पिढीचा स्थायीभाव आहे. मनस्विनीसारख्या ताकदीच्या नव्या लेखिकेचा ते अपवाद करतात, पण त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे असं मला वाटतं. विशेषतः मी वर इंटरनेटवरील लेखनाचा जो उल्लेख केला आहे त्यासंदर्भात मला हे जाणवतं. लेखनातील एकसुरीपणा हा व्यामिश्रता समजून न घेतल्याने येतो. ही समज ज्या लेखिकांमध्ये दिसते त्यात आज मनस्विनी, वंदना भागवत ('स्तब्ध' या वंदना भागवत यांच्या कथासंग्रहातील ''इतर कोणी नाही तरी…' सारखी एका पुरूषाची कथा मला आश्वस्त करणारी होती) अशी नावं दिसतात. 'मिळून साऱ्याजणी'मध्ये 'पुलावरून पाणी जाय' हे सदर लिहिणाऱ्या नीलम माणगावे यांच्या स्फुटलेखनात मला हे दिसलं. 'निळ्या डोळ्यांची मुलगी' ही कादंबरी लिहिणाऱ्या शिल्पा कांबळे यांच्यात ही समज दिसते. उल्का चाळके या मुलीची कथा सांगणारी ही कादंबरी आहे. कादंबरीच्या ब्लर्बवर उल्काच्या कवितेतील सुरूवातीचा भाग छापला आहे. तो द्यायचा मोह आवरत नाही -
प्रिय मार्क्स,
तू मला ओळखत नाहीस
पण मी तुला ओळखते
तुझा जन्म जर्मनीचा
वंशाने ज्यू
जेनी बायको
एंजल्स मित्र
आणि हेगेल गुरू
ही तुझी जुजबी माहिती
आता माझ्याबद्दल ऐक
मी कु. उल्का बा. चाळके.
वय वर्षं बावीस.
धर्माने बौद्ध, पूर्वीची महार, ढोर, चांभार, ढक्कलवार
किंवा कोळी, न्हावी, कोष्टी, गावित, कातकरी, वडार
किंवा वाणी, गोसावी, जोशी
शेवटी धनगर, बामन, सोनार
ही माझी जुजबी माहिती.
उल्का चाळकेची जाणीव आणि तिचं आकलन आपल्या समाजाच्या संदर्भात फार महत्त्वाचं आहे. परंतु असं लक्षवेधी लिखाण करणाऱ्या लेखिका तुरळकच आहेत हे सांगावसं वाटतं.
हे म्हणत असताना मी लेखाच्या प्रारंभी मांडलेल्या मुद्द्याकडे पुन्हा येतो. नव्या लेखनात अजूनही संरचनात्मक मांडणी, आकलनाच्या कक्षा वाढल्या आहेत हे दर्शवणारं लेखन कमी दिसत असलं तरी स्त्री- स्वरात काहीसा तोच-तोपणा येण्यामागे स्त्रीचं झगडणं अजून संपत नाही आहे हे एक कारण दिसतं आणि दुसरं कारण ज्या स्त्रियांना जगण्याचे प्रश्न भेडसावत नाहीत त्यांना अजूनही बंध तोडावेसे वाटत नाहीत हे आहे. ज्या क्षणी त्या आपलं सुरक्षित स्थान सोडून उल्का चाळकेला प्रत्यक्ष भेटायला जातील, अन्यायाच्या आणखी पुढे जाऊन आर्थिक-सामाजिक संरचना आणि विचार-वर्तणुकीतील लिंगसापेक्ष गुंत्यांना सामोऱ्या जातील त्या क्षणी कदाचित त्यांच्याहीकडून साहित्यात लक्षणीय स्वरूपाची भर पडू शकेल!
(प्रेरक ललकारी - मार्च २०१६)
No comments:
Post a Comment