पुलंनी विनोबा भावेंवर दोन लेख लिहिले आहेत. 'आम्ही सूक्ष्मात जातो' हा उपहासगर्भ लेख १९७८ सालचा आहे, तर 'मला दिसलेले विनोबा' हे व्यक्तिचित्रण १९५४ साली लिहिलेलं आहे. 'मला दिसलेले विनोबा' या लेखात एक छोटा किस्सा आहे. भूदानयात्रा सुरू आहे. देवराम नावाचा एक कार्यकर्ता विनोबांकडे गावकऱ्यांची तक्रार घेऊन येतो. लोक अडाणी आहेत, त्यांना भूदानाचं महत्त्व पटत नाही असं त्याचं म्हणणं असतं. त्यावर विनोबा म्हणतात, "अरे, लोक हुशार आहेत. अनोळखी माणसावर एकदम विश्वास टाकणारे लोक अडाणी आहेत की हुशार - सांग बघू!"
हा किस्सा मला विविध वेळी, विविध प्रसंगात आठवला आहे. मी तो बरेचदा उद्धृतही केला आहे. कुठलीही नवीन मांडणी करताना ती अशी हवी की समजून घेणाऱ्याच्या सर्व शंकांची उत्तरं ती देऊ शकेल. नवीन विचार करणाऱ्यावर जबाबदारी जास्त आहे कारण तो काहीतरी बदल करू बघतोय. तो जे मांडतो आहे त्याच्या अनेकविध बाजूंवर त्याने विचार केला आहे हे जर समोरच्याला दिसलं तर त्याचा विश्वास बळावतो. आधुनिकतेचा पुरस्कार करताना हे लक्षात ठेवावं लागतं की आपण ज्या लोकांकडे नवीन विचार घेऊन जातोय त्यांच्या काहीएक धारणा आहेत. त्यात कदाचित मूल्यदृष्ट्या चुकीच्या धारणाही असतील. पण तरी संयम बाळगून आपलं म्हणणं मांडलं तर बदलाची शक्यता वाढते.
मला ही जाणीव एका टप्प्यावर होऊ लागली. वर उल्लेख केलेला पुलंचा लेख मी शाळकरी वयात वाचला होता, पण त्यातला आशय पोचायaला अर्थातच काही काळ जावा लागला. आपल्याला समाजात, लोकांच्या मानसिकतेत काही बदल व्हावा असं वाटतं, जे प्रचलित आहे त्यातलं बरचसं आपल्याला पटत नाही, आपल्या मनात विद्रोह निर्माण होतो, आपण त्यातून व्यक्त होतो हे कळत होतं. मनातली हे प्रक्रिया परिचयाची झाली होती. त्याचं एक समाधानही होतं (आहे). पुढे 'मिळून साऱ्याजणी' या मासिकाशी व त्याआधी 'पुरूष उवाच' या अभ्यासगटाशी जोडला गेलो तेव्हा या सगळ्याला एक व्यासपीठ मिळालं. त्यानंतरच्या काळात 'आंदोलन', 'आजचा सुधारक' या मासिकांच्याही संपर्कात आलो. या सर्व मासिकांच्या स्वरूपात फरक असला तरी ही सर्व मासिकं विविध क्षेत्रात परिवर्तनाचा, प्रबोधनाचा प्रयत्न करणारी मासिकं होती. पुढे फेसबुक जन्माला आलं आणि तिथे एक वेगळंच विश्वरूपदर्शन होऊ लागलं. परस्परविरोधी सामाजिक, कलात्मक आणि प्रामुख्याने राजकीय विचारांचे लोक चर्चा करताना, भांडताना दिसू लागले. परिवर्तनाची आस असणाऱ्या माझ्यातल्या मनुष्याला या प्रवासात जी एक जाणीव झाली ती ही की आपल्याला आत्ता वाटतंय त्याच्या दहापट पेशन्स ठेवला तर आपण थोड्या बदलाची आशा करू शकतो. कौटुंबिक, धार्मिक, सामाजिक रचना - ज्या वषानुवर्षं अगणित लोकांना बांधून ठेवतात - त्या सहजासहजी हलवता येत नाहीत. परिवर्तनाच्या संदर्भात इथे मला एक विशेष गोष्ट जाणवली ती ही की 'प्रश्न फक्त माणसांचा नसून माणसांच्या संख्येचाही आहे!'
अर्थात यात दोन्ही बाजू मला समजत होत्या. तीव्रतेने व्यक्त होणं, आपली हरकत नोंदवणं हे आपल्या आतल्या खळबळीला वाट देण्यासाठी एकीकडे आवश्यक आणि दुसरीकडे 'हरकत वृत्तीवर आहे, व्यक्तीवर नाही' हेही मनात जागतं ठेवणं आवश्यक. आपण आपल्या क्षमतेच्या परिघात, आपल्या माध्यमातून प्रयत्न करायचे पण 'जमिनीवरचं वास्तव' ही एक बिकट गुंतागुंत आहे आणि तिथे आपण पुरे पडणार नाही हेही लक्षात ठेवायचं. ही माझ्यासाठी साक्षात्कारी जाणीव होती. एकाच वेळी शांत व अस्वस्थ करणारी जाणीव.
यातून मग मला असं लक्षात आलं की आपल्याला सारखं व्यक्त व्हावंसं वाटतं हे ठीक, पण आपण पुष्कळ ऐकलं पाहिजे, आपल्याला नेमके प्रश्न विचारता आले पाहिजेत. मला अमुक एका बाबतीत अमुक बदल हवा असं वाटतं, पण संबंधित व्यक्तींना काय वाटतं, ते बदलाला तयार नसतील तर का नाहीत हे आपल्याला समजायला हवं. मुख्य म्हणजे मी जर काही वेगळं बोलत असेन तर तो मुद्दा बाजूला ठेवून 'माणूस' म्हणून इतरांची माझ्याबद्दल सकारात्मक भावना हवी. अलीकडे एका गटचर्चेत सहभागी झालो होतो. एका सहभागी मुलीने फार चांगला मुद्दा मांडला. ती म्हणाली की आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या दृष्टीने आपल्या काही गोष्टी समजून घेणं अवघड असलं तरी त्यांना आपल्याविषयी आत्मीयता वाटली, ती निर्माण व्हायला पूरक असं आपलं वर्तन असेल तर आपले वेगळे विचारही ते स्वीकारतात. त्यामुळे आपण काही नवीन मांडत असलो तरी रोजच्या जगण्याच्या पातळीवर आपण इतरांसारखेच परस्परावलंबी असतो हे लक्षात घेऊन आपण स्वतःकडे 'अनेकांपैकी एक' म्हणून पाहिलं तर ते इतरांना आश्वस्त करणारं असतं. मात्र इथे एक गोष्ट नोंदवतो. आज आपल्या आसपास सध्या जी परिस्थिती दिसते ती चिंताजनक आहे. 'वेगळा विचार असला तरी माणूस म्हणून तो मला जवळचा वाटतो' याऐवजी 'केवळ वेगळा विचार आहे म्हणून तो माणूसच मला मान्य नाही' हे बळावताना दिसतं. याला अर्थातच राजकीय संदर्भ आहे आणि चिंतेची बाब ही की मानवी संबंध हे आधी राजकीय आणि मग मानवी होऊ लागले आहेत.
सामाजिक परिवर्तनचा विचार करणाऱ्यांचं धर्म, देव, श्रद्धा याबाबतचं आकलन कमी पडतं असं मत बरेचदा मांडलं गेलं आहे. त्यात तथ्य आहे. म्हणजे मला वैचारिक दिशेबद्दल काहीच शंका नाही. माणसाच्या अनेकविध प्रश्नांची उत्तरं विज्ञानच देऊ शकतं याबाबत माझ्या मनात संदेह नाही. देवा-धर्माच्या अतिरेकाने आपलं नुकसान केलं आहे याविषयीही मला शंका नाही. पण मुद्दा आहे तो काही गोष्टींची, संकल्पनांची प्रस्तुतता (त्या मान्य नसल्या तरी) समजून घेण्याचा. देवाधर्माखेरीज आपल्याकडील समाजजीवनाला जात हा एक स्फोटक आयाम आहे. तो कितीही पुसून टाकायचा म्हटला तरी पुसला जात नाही. इथे एक लक्षात घ्यावं लागेल की या गोष्टी नुसत्या असण्यापुरत्या असत नाहीत. त्यांचं काहीएक 'फंक्शन' (कार्य) असू शकतं. हे कार्य समजून घेतलं नाही तर त्या पुसता येणार नाहीत. परंपरेवर प्रहार करताना त्यातून काही नवीन निर्माण होणार नसेल तर ते प्रहार फार काही निष्पन्न करू शकणार नाहीत. माझा एक मित्र 'पुरोगामी कर्मकांडे' सुरू करायला हवीत असं म्हणतो. यातील कर्मकांडे या शब्दामुळे बिचकून न जाता 'लोकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी योजलेले साधन' म्हणून त्यांच्याकडे बघता येईल. ही कर्मकांडे अर्थातच वेगळी असतील. पण त्यातून एकी व्यासपीठ तयार होईल. आपण धार्मिक कर्मकांडांकडे पाहिलं तर असं दिसेल की त्यात संगीत, खेळ, कला, अशा विविध गोष्टींचा आधार घेतलेला असतो. माणसाला रंजन हवं असतं याची दखल घेऊन या गोष्टी धार्मिकतेत गुंफल्या जातात. परिवर्तनाचा विचार रुजवण्यासाठी गटचर्चा हे एक प्रभावी माध्यम होऊ शकतं. त्यात रंजकता कशी आणता येईल, विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन रंजक पद्धतीने कसा पोचवता येईल यावर विचार केला तर बदलाची प्रक्रिया लोकांना आपलीशी वाटेल.
स्त्री-पुरूष समता, श्रद्धा-अंधश्रद्धा, ईश्वरी अस्तित्व-निरीश्वरवाद, धर्माधारित जीवन-निधर्मी जीवन, परंपरानिष्ठ विचार-वैचारिक उदारमतवाद, साहित्य-कलाविषयक धारणा या सर्वच 'संघर्ष-क्षेत्रात' नवतेच्या, प्रबोधनाच्या पुरस्कर्त्यांनी 'सर्वसाधारणपणे माणूस हा 'एलियन' (अनोळखी, उपऱ्या) गोष्टींना बिचकणारा प्राणी आहे' हे लक्षात ठेवून धोरण ठरवलं तर नवतेचाच मार्ग सुकर होणार आहे.
No comments:
Post a Comment