Sunday, October 7, 2018

कवितेत आणि कवितेबाहेर

दिनकर मनवर यांच्या 'पाणी कसं अस्तं' या कवितेतील एका उल्लेखावरून जो वाद सुरू झाला तो एकाच वेळी खेदजनक आणि विचारप्रवृत्त करणाराही आहे. 'विचारप्रवृत्त करणारा' असं म्हणण्याचं कारण हे की या वादाच्या निमित्ताने मनात घोळत राहणारे आणि कालांतराने नाहीसे होणारे काही मुद्दे पुन्हा मनात घोळू लागले. त्यांचा संबंध कलाकाराशी आणि कलात्मक अभिव्यक्तीशी आहे. यात अंतिम असं काही बोलता येईल असं वाटत नाही, पण जे जाणवतं ते सांगायचा प्रयत्न करतो.

'टीकास्वयंवर' या पुस्तकातील 'मराठी कादंबरी : प्रेरणा व स्वरूप' या लेखात भालचंद्र नेमाडेंनी चि. त्र्यं. खानोलकरांच्या कादंबऱ्यांवर विस्तृत टिप्पणी केली आहे. त्यात 'अगोचर' या खानोलकरांच्या कादंबरीतील बलात्काराचा एक प्रसंग त्यांनी उद्धृत केला आहे. 'कुणी तिच्या झिंज्या ओढीत होते तर कुणी तिची चोळी फाडून तिचे घट्ट स्तन चुरगळीत होते' या वाक्यात 'घट्ट' हा शब्द लेखकाने वाचकांचे लिंगसंवेदन उत्पन्न करण्यासाठी म्हणून वापरला आहे आणि त्यातून लेखकाची नैतिकता उघड होते असं नेमाडे लिहितात. एका हिंसक, निषेधार्ह घटनेचं वर्णन करताना हा कामोत्तेजित करणारा शब्द लेखकाला वापारावासा वाटणं याला त्यांचा आक्षेप आहे. हा आक्षेप पूर्णपणे पटण्यासारखा आहे. परंतु खानोलकरांना 'मॅटर ऑफ फॅक्ट' म्हणून हा शब्द वापरायचा होता ही शक्यता असू शकते का हाही प्रश्न विचारता येऊ शकेल. नेमाडेंनी खानोलकरांच्या कादंबरीलेखनाची, त्यांच्या शैलीची चिकित्सा करताना या कादंबऱ्यांना थ्रिलर फँटसीचं स्वरूप आहे, त्यात दुःखाचं संवेदन नाही, अनुभूतीचं दारिद्र्य भाषेच्या अलंकरणाने आणखी हास्यास्पद होते (हे विशिष्ट निरीक्षण स्वतंत्र मुद्दा म्हणून मला महत्त्वाचं वाटलं. हा मुद्दा 'लेखक' होण्याच्या महत्त्वाकांक्षेने केल्या गेलेल्या, परंतु अलंकरणाला, शाब्दिक कसरतीला अधिक महत्त्व देत पुनुरुक्तीत अडकलेल्या इतरही लेखनाला लागू होऊ शकेल) असं म्हटलं आहे. ही निरीक्षणे समीक्षा दृष्टीला पटावीत अशीच आहेत. परंतु आक्षेप मान्य करूनही खानोलकरांच्या कादंबऱ्या स्वतंत्रपणे मला आवडल्या असं कुणी म्हणू शकेल.

हे उदाहरण दिनकर मनवरांच्या कवितेसंदर्भात आठवायचं कारण 'काय लिहिलं आहे' आणि 'काय प्रतीत होत आहे' यात फरक असण्याची शक्यता नेहमीच अस्तित्वात असल्याने कलाकृतीला 'अभिव्यक्ती' आणि 'अभिव्यतीचा परिणाम' हे दोन आयाम प्राप्त होतातच होतात. कलाकृती त्यातून सुटू शकत नाही हे एका अर्थी दुःखद आहे असं म्हणता येईल पण ते कलाकृतीचं 'भागधेय' आहे. दिनकर मनवर यांनी लैंगिक संवेदना उत्पन्न करण्याच्या उद्देशाने किंवा विशिष्ट समूहातील स्त्रीचा अवमान करण्याच्या उद्देशाने लिहिलं नाही हे स्पष्टच आहे. त्यामुळे हेतूबद्दल शंका नाहीच. पण प्रश्न हेतूचा नसून परिणामांचा आहे.

अस्मितेचा स्त्रीशी आणि स्त्रीच्या चित्रणाशी फार जवळचा संबंध आहे. आपल्या जाती/समूहातील स्त्रियांचे प्रश्न काय आहेत याविषयी फारसे उत्सुक नसणारे लोकही त्या स्त्रियांच्या शीलरक्षणाविषयी, त्यांच्या प्रतिमेविषयी संवेदनशील असतात. हा गुंता साहित्य-कलेच्या पुढे जाऊन पुरूष म्हणूनच्या काही जैविक वृत्तींपाशी, पुरूषसत्ताक राजकारणापाशी आणि त्याने घडवलेल्या मानसिकतेपाशी जाऊन पोचतो. त्याविषयी स्वतंत्रपणे लिहावं असं बरंच आहे कारण त्यात पुरूष आक्रमक म्हणून आणि हतबल म्हणूनही अडकलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा फक्त नोंदवून पुढे जाऊ. कवितेत आदिवासी मुलीऐवजी इतर समूहातील मुलीचा उल्लेख असता तर चाललं असतं का असा प्रश्न या वादासंदर्भात विचारला गेला. अशा वादाच्या प्रसंगी कलाकाराच्या सामाजिक बांधिलकीचा मुद्दाही डोकं वर काढतो. म्हणजे भोवतालच्या जगात इतके प्रश्न असताना तुम्ही अभिव्यक्तीचं काय घेऊन बसलात? तुम्ही प्रत्यक्ष कृती कधी करणार? असे प्रश्न विचारले जातात. लेखक-कवीच्या 'लेखक-कवी असण्या'तच अंतर्भूत असलेल्या गुणधर्माच्या आधारे, कृतीशील लेखक-कवींच्या उदाहरणांच्या आधारे याची उत्तरे देता येतील. पण त्याने वाद शमत नाही. याचं कारण कलाकृतीमुळे निर्माण झालेली भावनिक अस्थिरता हे आहे.
समग्रपणे विचार करत तयार  झालेली मनोभूमिका आणि भावनिक स्थिरता ढळवणारी काही घडलं की त्यावर हल्ला चढवणारी मनोभूमिका यात दुसरी बरेचदा जिंकते. दिनकर मनवर गंभीरपणे कविता लिहिणारे कवी आहेत, त्यांचं सामाजिक भान जागृत आहे - प्रखर आहे हे मुद्दे भावनिक स्थिरतेला धक्का लागल्यावर लक्षात घेतले जाऊ शकत नाहीत. (खरं तर भावनिक स्थिरतेला धक्का लागला की एखादा विचारी अभ्यासकदेखील तीव्रतेने प्रतिक्रिया देऊ शकतो. बौद्धिक क्षमता असूनही जाणिवांचे अनेक आयाम संवेदनेच्या कक्षेत राहणे हे आपलं - सेपियन्सचं - एक लक्षण आहेच.) दुसरा मुद्दा तफावतीचा आहे आणि तो महत्त्वाचा आहे.

कवितेतील उल्लेख न खटकणारे लोक जसे आहेत तसाच तो उल्लेख खटकणारे लोकही आहेत. त्यातही आदिवासी मुलीचा संदर्भ असल्याने विरोधाला आणखी धार आहे. यातील आदिवासी हा मुद्दा बाजूला ठेवून फक्त अवयवाचा विचार केला तर असं दिसतंच की स्त्रीच्या अवयवांशी पुरूषाची लैंगिक इच्छा घट्ट जोडून टाकली गेली आहे. 'स्तन' हा शब्द उच्चारला किंवा स्तनांचं चित्र डोळ्यापुढे आणलं की किती पुरूषांना बाळाचं दुग्धपान आठवतं, किती पुरूषांचं लैंगिक संवेदन जागं होतं आणि किती पुरूषांमध्ये पूर्ण न्यूट्रॅलिटी जागी राहते असा प्रयोग करून बघायला हरकत नाही. आणि लैंगिक संवेदन जागं होत असेल तरी अपराधी वाटायचं कारण नाही. कपडे आणि कपड्यांशी जोडली गेलेली सभ्यता याने आपल्याला सुरक्षा, सौंदर्यदृष्टी वगैरे दिली असली तरी ते 'सुपरस्ट्रक्चर' आहे. या गोष्टींनी आपली लैंगिक-भावनिक गोचीदेखील  केली आहे. शिवाय आपल्याकडे भाषा आहे असं आपण म्हणतो, पण आपल्याकडे स्पष्टपणे बोलण्याइतपत भाषाच नसते बरेचदा. उदा. एखादा मुलगा/मुलगी मला 'हॉट' वाटतो/वाटते यातल्या 'हॉट' मधला नेमका अर्थ पकडेल असा शब्द मराठीत नाही. प्रेम किंवा आकर्षणासारखी सहज भावना व्यक्त करणं हेसुद्धा जिथे शब्दांतून नीट जमत नाही तिथे लैंगिक आकर्षणाबद्दल काय बोलणार? आपण एकूणातच शरीराला खासगीत कोंडून ठेवलं आहे. (मला काही इंग्लिश मालिका आवडण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे शरीर, लैंगिक इच्छा याच्याशी संबंधित अनेक गोष्टींना सहजतेने मांडण्याची, त्याविषयी बोलायची आणि विनोदाच्या मुशीतून सहज-सुंदर करण्याची हातोटी तिथे बघायला मिळते. कितीतरी एपिसोड्स आणि त्यातील उल्लेख आठवतात.) माध्यमांतून कलात्मकपणे या विषयांवर बोललं गेलं की या विषयातील ताण हलके व्हायला मदत होते. हा सहजभाव येणं महत्त्वाचं आहे. स्त्रीच्या स्तनांबद्दल आज स्त्रीमध्ये सहजभाव नाही कारण तो पुरूषात नाही. पुरूषात नाही कारण त्याच्या कामनेचं एक केंद्र असलेले स्तन झाकलेले आहेत. ते झाकलेले आहेत कारण पुन्हा तेच - पुरूषात सहजभाव नाही. हे एक चक्र तयार झालं आहे आणि ते मोडल्याखेरीज स्त्रीविशिष्ट उल्लेखांनी बिथरून जाणं थांबणार नाही. 'स्तन' हा शब्द रोजच्या बोलण्यात सार्वत्रिक झाल्याशिवाय त्याला चिकटलेली लैंगिक संवेदनाची धार कमी होणार नाही. (स्त्रीचे स्तन हे पुरूषाच्या कामनेचं केंद्र का असतात हा पुरूषाच्या लैंगिक आणि मानसशास्त्रीय घडणीशी जोडलेला प्रश्न आहे. याविषयी गूगल सर्च केल्यास प्राथमिक माहिती मिळू शकेल.)

कवितेतील उल्लेखाने जो वाद सुरू झाला तो समाजातील तफावतीकडे निर्देश करतो. ही कविता वाचताना वर्गातील आदिवासी मुलीला संकोचल्यासारखं होईल असा एक मुद्दा पुढे आला आहे. व्यवहार्य अडचण म्हणून हा मुद्दा मान्य होण्यासारखा आहे. जगण्यात आणि मानसिकतेत तफावत असताना एका दृष्टिकोनाचा आग्रह धरणं आपल्याला टिकाऊ उत्तरांकडे नेत नाही. 'आदिवासी' किंवा अन्य समूहवाचक, जातीवाचक उल्लेख जर विभागणीचं द्योतक आहे तरत्या विभागणीपोटी होणाऱ्या परिणामांनाही सामोरं जावं लागेल. 'वस्तुस्थिती' ही चीज आदर्श, सिद्धांत, विचारधारा या सगळ्याला पुरून उरणारी असते. जात, आयडेंटिटी, अस्मिता या गोष्टी त्रासदायक असल्या तरी त्या 'वस्तुस्थिती' आहेत. त्यामुळे  सामोरं जाताना आयडियॉलॉजिकल पाया असलेली स्ट्रॅटेजी वापरल्याशिवाय तरणोपाय नाही. आदिवासी, मुलगी आणि स्तन हे तीन विषय/शब्द खरं तर सामाजिक रचित, सांस्कृतिक रचित आणि जैविक रचित या तीन रचितांचं आणि ती एकमेकांत गुंतलेल्या वास्तवाचं प्रतिनिधीत्व करतात. कवितेतील उल्लेखाने कुणी दुखावलं जायचं, कुणाला राग यायचं काहीच कारण नाही हे एका बाजूला बरोबरच आहे. यात राजकीय हेतू असतील तर तो आणखी वेगळाच मुद्दा आहे! पण या उल्लेखाने खरोखरच कुणी दुखावले गेले असतील तर त्यांच्याशी संवाद झाला पाहिजे असं वाटतं. आदिवासी हा शब्द विशिष्ट समूहाकडे निर्देश करतो हे खरंच आहे. हा समूह एका संस्कृतीचं, परंपरेचं आणि ज्ञानसाठ्याचं प्रतिनिधीत्व करतो. जातीय तेढ वाढलेली असण्याच्या पार्श्वभूमीवर जल-जंगल-जमीन याच्याशी जोडल्या गेलेल्या, पर्यायी जीवनशैली म्हणून काहीएक प्रारूप जगासमोर ठेवण्याची क्षमता असलेल्या आदिवासी समूहांचं 'असणं' महत्त्वाचं आहे. त्यांची आणि आपली नाळ मुळात एकाच ठिकाणी जोडलेली आहे. आपण वेगळे झालो आहोत हे खरं आहे, आपल्यावर त्यांनी रागवावं याची पुष्कळ कारणं आपण त्यांना दिली आहेत. त्यात भर पडायला नको असं मनापासून वाटतं.

(७ ऑक्टोबर २०१८, लोकसत्ता) 

No comments:

Post a Comment