मागील दोन-चार लेखांवर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यातून प्रेम आणि लैंगिकता हे 'बर्निंग' विषय आहेत हे दिसून आलं. स्त्री-पुरूषांमधील नात्याचं 'गतिशास्त्र' (डायनॅमिक्स) हा विषय सामाजिक महत्त्वाच्या विषयांपैकी एक कळीचा विषय आहे हे तर खरंच. विशेषतः पुरूषाच्या लैंगिक वर्तनाबाबत (त्याच्या नियमनाबाबत) अधिक बोललं जायला हवं आहे. लैंगिक समाधान आपल्या जागी महत्त्वाचं आहेच, पण पुरूषासाठी त्याचा 'ट्रॅप' तयार होतो आणि त्यात त्याचं मानस अडकूनच पडतं. याबाबत काय उपाय करता येतील याची चर्चा आपण मागच्या लेखात केली होती. ती आणखी पुढे जाऊ शकतेच. पण आजच्या लेखात आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय मानवी वर्तनाच्या सगळ्याच बाजूंना कवेत घेणारा आहे. हा विषय म्हणजे जीवन कौशल्ये - लाइफ स्किल्स. सध्या प्रचलित असलेली शिक्षणपद्धती, त्यातील अधिक-उण्या बाजू हा एक फार मोठा विषय आहे. आपण बोलणार आहोत ते या औपचारिक शिक्षणाव्यतिरिक्त जे शिक्षण होत असतं, जे होणं अपेक्षित असतं त्या शिक्षणाबद्दल.
मोठयांनी (म्हणजे आपण सगळे) घातलेल्या अनेक घोळांची मुळं आपल्या छोटेपणात दडलेली असतात. (इथे 'छोटेपणात'वर नकळत श्लेष साधला गेला आहे!) मुलांना त्यांच्या वाढीच्या विविध टप्प्यांवर कोणकोणत्या विषयांची कशी कशी ओळख करून द्यायची हा एक महत्त्वाचा आणि अवघड प्रश्न आहे. हे थेटपणे (कल्पकतेने, पण सत्य पोचेल अशा प्रकारे) व्हावं असं मला वाटतं. इथे 'जीवन कौशल्ये' (लाइफ स्किल्स) हा विषय समोर येतो. 'जीवन कौशल्ये' या विषयाअंतर्गत अनेक गोष्टींची तयारी होणं अपेक्षित आहे. यात कौंटुंबिक नातेसंबंध, व्यावसायिक नातेसंबंध, त्यातील ताण व त्यांचं व्यवस्थापन, प्रेम, लैंगिकता, राजकीय-सामाजिक जाण, नागरिक म्हणून आपली कर्तव्यं अशा अनेकानेक गोष्टी आणि त्यांचे विविध पदर आहेत. या सगळ्यात रॅशनॅलिटीवर आधारलेला एक दृष्टीकोन स्वीकारता येऊ शकतोच. परंतु इथे दोन मुद्दे उपस्थित होतात. एक म्हणजे माणूस रॅशनल विचार करू शकत असला तरी तो स्वभावदृष्ट्या प्रत्येक वेळी पूर्णपणे रॅशनल असेलच असं नाही. त्यामुळे रॅशनॅलिटी काम करणार का हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा विरुद्ध बाजूने आव्हानात्मक आहे. तो असा की रॅशनॅलिटी यशस्वी झाली आणि काही 'अतार्किक' परंतु माणसाला माणसाशी बांधून ठेवणाऱ्या हळव्या भावभावनांना सोडचिठ्ठी दिली गेली तर काय? उदा. मला हे नेहमी वाटतं की जन्म आणि मृत्यू या दोन्ही विषयांबाबत मुलांना वयाच्या विशिष्ट टप्प्यावर (साधारणतः पौगंडावस्थेत) खरं काय ते सांगितलं गेलं पाहिजे. आता जर जन्म-मृत्यूचं वैज्ञानिक वास्तव माहीत झालं तर आपल्या जवळच्या कुणाच्या मृत्यूनंतर जाणवणारं दुःख, उदासी, त्या माणसाच्या आठवणीने जाणवणारा एकाकीपणा, डोळ्यात येणारे अश्रू या ज्या एका अर्थी अतार्किक पण मानवीय, आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवणाऱ्या, जगण्यासाठी जो भावनिक पाया लागतो तो रचणाऱ्या भावना आहेत त्या नाहीशा होतील का? प्रेम, आकर्षण, ईर्षा, अहंकार या भावनांचं ‘रॅशनल नियमन’ झालं तर त्यातली खुमारी निघून जाईल का?
यावर विचार करताना दोन गोष्टी जाणवतात. एक म्हणजे परंपरा-आधुनिकता या संघर्षाच्या पलीकडे असणारी माणसाची घडण लक्षात घेता तर्काधिष्ठीत विचार, परंपरेला प्रश्न करणं यामुळे माणूस कोरडा होईल असं मला वाटत नाही. दुसरं म्हणजे 'रॅशनॅलिटी' आणि 'सेन्सिटिव्हिटी' या दोन्ही गोष्टी एकत्र चालू शकतात. त्यांना तसं चालायला लावणं हे नवतेपुढील एक आव्हान आहे. जगात दगड-धोंडे आहेत तसेच सजीवही आहेत, माणूस हादेखील एक सजीव प्राणीच आहे, त्याच्या अस्तित्वामागे कुठलंही प्रयोजन वगैरे नाही, जीव आणि जाणीव यांच्या असण्याची तार्किक उकल होऊ शकते हे समजून घेत असताना त्याच्या परिणामी 'सगळं जर प्रयोजनहीन (आणि म्हणून अर्थहीन) आहे तर मग नीतीमूल्ये हवीतच कशाला? जगण्याला तरी काय अर्थ आहे?' हा प्रश्न उद्वेगाने न विचारणारं स्थिर आणि विवेकी मानस घडवणं हे नवतेपुढील आव्हान आहे. (सजीव रचनांसंदर्भात एक आठवलं. 'आधुनिक विज्ञानाचे स्वरूप' हे मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं पुस्तक आहे. 'आजचा सुधारक' या मासिकात प्रकाशित झालेल्या काही लेखांचं हे संकलन आहे. या पुस्तकातील मिलिंद वाटवे यांचा 'आत्मा हवाच का?' हा लेख जरूर वाचावा.) त्यामुळे आधुनिक जीवन कौशल्यांविषयी बोलत असताना या आव्हानाचा विचार झालेला असणं आवश्यक आहे.
या विचारासह मला हे म्हणावंसं वाटतं की जीवन कौशल्ये विकसित करताना आपण अधिक विचारी, अधिक 'वास्तववादी' असायला हवं आहे. कदाचित अतिरंजित वाटेल पण आपण जेव्हा आपला देश अजून मागे आहे असं म्हणतो, देशापुढील प्रश्नांची मालिका संपत नाही असं म्हणतो तेव्हा राजकीय-आर्थिक कारणांबरोबरच आपली जीवन कौशल्ये विकसित झालेली नसणं हेही एक कारण त्यामागे असतं. एक नेहमीचं, साधं उदाहरण घेऊ. आपल्या देशाचं काही खरं नाही असं आपण उद्वेगाने बरेचदा म्हणतो, पण आपण राहतो त्या सोसायटीचं काम बघायलाही कुणी उत्स्फूर्तपणे पुढे येत नाही. प्रश्ना सोडवण्यापेक्षा, त्यासाठी इनोव्हेटिव्ह विचार करण्यापेक्षा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकत्र येण्यापेक्षा त्या प्रश्नांसह जगणं पुढे रेटणं बहुतेकजण पसंत करतात. 'गोष्टी सुधारण्यासाठी आपण जागचं हलणं, थोडी जोखीम पत्करणं गरजेचं आहे' हा विचारच मनात न रूजल्यामुळे हे होतं. 'आपल्याला हालचाल करायला हवी' हे शिकवलं जाणं हा जीवनकौशल्याचा भाग आहे. हे कितीतरी ठिकाणी लागू होईल. लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पुष्कळ रस असतो, पण आपल्या गावची ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका कशी काम करते याचं आपल्याला फारसं ज्ञान नसतं. आपल्याला काय काय माहीत हवं, आपल्याकडे कोणती कौशल्ये हवीत याची यादी आपण करू शकतो खरं तर. ती केली तर आपल्याला जीवन कौशल्यांचा खरा आवाका ध्यानात येईल. याकरता एक रोचक पद्धत वापरता येईल. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ज्या अनेक बाह्य व आंतरिक क्रिया करतो त्या बघाव्यात. यात आपल्या असं लक्षात येईल की आपण इतक्या गोष्टींवर अवलंबून असताना आपल्या नियंत्रणात फार कमी गोष्टी आहेत. माणसांची संख्या वाढणं, त्यातून गुंतागुंतीच्या सामाजिक रचना तयार होणं याला सर्वस्वी आपण एकटे जबाबदार नाही हे ठीक, पण या रचनांचे फायदे आहेत तसेच काही दुःखदायक पैलूही आहेत याचं किमान भान तरी असावं. उदा. सकाळी आपण शौचाला जातो. मलमूत्र विसर्जन आणि त्याची व्यवस्था हा एक विषय तिथे आपल्याला मिळेल. आपल्या मलमूत्राची विल्हेवाट कशी लावायची हा इतर अनेक मुद्द्यांसारखाच जीवन कौशल्याशी संबंधित मुद्दा आहे. आज आपल्या जीवन कौशल्याच्या कक्षेत घरातला संडास स्वच्छ ठेवणं आणि सोसायटीचं ड्रेनेज तुंबलं तर ते साफ करून घेणं एवढंच आहे. पण 'ड्रेनेज सफाई करणाऱ्या कामगारांचं जगणं' हा एक मोठा मुद्दा आहे. त्यावर आपण प्रत्यक्ष काही केलं तर उत्तमच, पण जर करत नसू तर आपल्या समाजातील हा एक प्रश्न आहे हे आपण मुलांना सांगणार की नाही? हे एक उदाहरण झालं. आता दिवसभरातल्या इतर क्रियांची यादी पाहिली तर आपल्या कक्षेत असलेली आणि आपल्या कक्षेत नसलेली अनेक जीवन कौशल्ये सापडतील. आणि मला असं दिसतं की आपण अनेक महत्त्वाचे प्रश्न आपल्याकडे उत्तर नाही म्हणून मुलांसमोर आणण्याचं टाळतो किंवा त्यावर थातुरमातुर उत्तर देऊन वेळ निभावून नेतो. समाज गुंतागुंतीचा आणि मुलांच्या प्रश्नांना सोपी उत्तरं हे गणित काही बरोबर नाही. कुठला प्रश्न वयाच्या कुठल्या टप्प्यावर मुलांसमोर आणावा यावर विचार व्हावाच, पण एकदम विशीत गेल्यावर मुलांसमोर काही गोष्टी येऊन आदळतात आणि मग तयारीअभावी मुलं कमकुवत पडतात.
यासंदर्भात मला दोन प्रमुख गुण विकसित व्हायला हवेत असं वाटतं. पहिला म्हणजे विश्लेषक वृत्ती - विषयाची माहिती घेऊन आपलं आकलन तयार करण्याची, विविध शक्यता विचारात घेत उपाययोजना करण्याची सवय आणि दुसरा म्हणजे धैर्य. मुलांमध्ये त्यांच्या वाढीच्या वयात हे दोन गुण निर्माण होऊ शकले तर समाजाचं चित्र बदलायला पुष्कळ मदत होईल. हे करायचं कसं? तर बोलत राहून. वास्तवाचं चित्र दाखवत राहून. व्यसनमुक्तीच्या प्रोग्रॅम्समध्ये 'स्पॉन्सर' आणि 'स्पॉन्सी' असं एक नातं असतं. रिकव्हर झालेला 'स्पॉन्सर' रिकव्हरीत असलेल्या एकाची - 'स्पॉन्सी'ची जबाबदारी घेतो. हा स्पॉन्सर म्हणजे स्पॉन्सीचा आधारस्तंभ असतो. आपलं नियंत्रण सुटतंय, आपण पुन्हा व्यसनाकडे जातोय असं ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी स्पॉन्सीने स्पॉन्सरला फोन करून, भेटून, बोलून ते सांगायचं आणि स्पॉन्सरने त्याला शब्दांद्वारे आधार देऊन त्याला पुन्हा मार्गावर आणायचं. हे सगळं सपोर्ट ग्रुप्सअंतर्गत होत असतं. असे सपोर्ट ग्रुप असणं, तिथे मोकळेपणाने बोलता येणं हे समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तो जीवन कौशल्याचाच भाग आहे. मला असं वाटतं की मुलांशी आपलं नातं साधारणपणे या धर्तीचं असायला हवं. त्याचा उपयोग व्यक्तिगत प्रश्नांसाठी होईलच आणि सामाजिक प्रश्नांची जाण विकसित करण्यासाठीही होईल.
व्यवस्थापनशास्त्रात 'सिस्टिम्स थिंकिंग' असा एक दृष्टीकोन शिकवला जातो. 'आपल्याला व्यवस्था लावायची आहे' हा यातला मुख्य विचार आहे. अनंत गोष्टी घडत आहेत. त्यातील प्रत्येक गोष्टीची नीट व्यवस्था लागली तर ती गोष्ट इतर गोष्टींमध्ये अडथळा आणणार नाही. हे आपल्या जगण्यालाही लागू आहे. जगण्यातील जे मोठे - मॅक्रो लेव्हलचे - विषय आहेत (उदा. लोकशाही, भांडवलशाही, समाजवाद, आर्थिक उदारीकरण इ.) ते मायक्रो लेव्हलच्या (रोजच्या जगण्यातील प्रश्न/विषय) विषयांतूनच तयार होत असतात. म्हणून मायक्रोस्कोपिक दृष्टी ठेवून तिथले प्रश्न सोडवण्यावर भर दिला तर वरचे प्रश्न सोडवायला मदत होईल.
No comments:
Post a Comment