Sunday, November 10, 2019

उदारमतवादाचा प्रवास आणि हिंदुत्ववादाचा थांबा

वसंत पळशीकर यांचा 'गोध्रा'या शीर्षकाचा एक लेख 'नवभारत'च्या मे २००२ च्या अंकात प्रकाशित झाला होता. हा लेख म्हणजे मिलिंद ओक यांच्या 'गोध्रा' या पुस्तिकेवरील टिपण आहे. भारतीय विचार साधना प्रकाशनाने ही पुस्तिका एप्रिल २००२ मध्ये [प्रकाशित केली होती. भारतीय विचार साधना हे प्रकाशनगृह हिंदुत्वनिष्ठ विचारांच्या प्रसारार्थ साहित्य प्रकाशित करते हे बहुतेक वाचकांना माहीत असेल. किशोर बेडकिहाळ यांनी संपादित केलेल्या 'जिहाद, गुलाल आणि सारीपाट' या पुस्तकात हा लेख आहे. हिंदू-मुस्लिम जातीयवादावरील (जमातवादावरील?) वसंत पळशीकरांच्या लेखांचं संकलन म्हणजे हे पुस्तक. हमीद दलवाई, नरहर कुरुंदकर, अ. भि. शहा यांच्या मुस्लिम जातीयवादाविषयीच्या भूमिकेवर टिप्पणी करणारे लेख या पुस्तकाच्या पहिल्या विभागात आहेत. शिवाय मुस्लिम मानसिकता, धर्मनिरपेक्षता/सांप्रादायिकता, भारत-पाकिस्तान संबंध आणि दंगली अशा पुढील चार विभागात इतर लेख आहेत. 

'गोध्रा' या लेखात पळशीकर लिहितात की एका अंगाने पाहिल्यास विश्व हिंदू परिषद, तबलीगी जमात व तत्सम अन्य धर्मीय संघटनांच्या धर्मकेंद्रित कार्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण सामान्य अनुभव असा की 'विशुद्ध धर्मा'चे पालन जसे वाढते तसे पालन करणाऱ्यांच्या ठायी कट्टरता, इतरांविषयी दुरावा, असहिष्णुता वाढते. याचे एक कारण हे की 'विशुद्ध धर्म' हा रेखीवपणे, धारदारपणे अन्य धर्मीयांपासून स्वतःचे वेगळेपण व श्रेष्ठत्व अधोरेखित करण्यावर भर देतो. त्याची मांडणी ही शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य वाढवणारी असते आणि एका धर्मपीठाची मक्तेदारी सत्ता प्रस्थापित करू पाहणारी असते. पळशीकर पुढे लिहितात की तबलीगी जमात, मदरसे किंवा विश्व हिंदू परिषद यांच्या संदर्भात मिलिंद ओक यांची दृष्टी सम नाही ही खरी समस्या आहे. तबलीगी जमात व अन्य मुस्लिम संघटनांचे कार्य त्यांच्या मनात तीव्र प्रतिक्रिया उत्पन्न करते, पण विश्व हिंदू परिषद व अन्य हिंदू संघटना यांचे कार्य मात्र तीव्र स्वागतशील प्रतिसाद उत्पन्न करते. 

आपापल्या धर्माचे उन्नत व विशुद्ध रूप सिद्ध करण्याची बौद्धिक वा व्यावहारिक कृती योग्य दिशेने व वळणाने होत आहे याची खूणगाठ कोणती हा कळीचा प्रश्न आहे असं पळशीकर पुढे म्हणतात आणि ते महत्त्वाचं आहे.

गेल्या काही वर्षातील मॉब लिंचिंगच्या घटना, गोरक्षकांचे हल्ले, कठुआ आणि उन्नाव येथील बलात्कारांच्या भीषण घटनांमधील हिंदुत्वाच्या धाग्याच्या पार्श्वभूमीवर पळशीकरांचे वरील मुद्दे आठवतात. या घटनांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. कठुआ घटनेनंतर मी स्वतःदेखील उद्वेगाने प्रतिक्रिया लिहिली. नंतर हिंदुत्वनिष्ठ मंडळींकडूनही प्रतिक्रिया आल्या. त्यात प्रामुख्याने निवडक निषेध, या घटनांचा संबंध हिंदू धर्माशी जोडणे याविरोधी प्रतिक्रिया होत्या. शब्दांची, विशेषतः तीव्र शब्दांची अडचण अशी असते की त्यांना उत्तर म्हणून तीव्रतर शब्द उमटू शकतात. हे घटनांनाही लागू होतं. कठुआसारख्या घटनेत जे झालं ते इतकं वाईट होतं की त्यावरील प्रतिक्रिया तीव्र असणं समजण्याजोगं होतं. बहुधा बऱ्याच हिंदुत्वनिष्ठ मंडळींना ते समजून घेता आलं नसावं. गेल्या काही वर्षांत आपलं परस्पर सौहार्द चांगल्यापैकी बिघडलेलं आहे. त्यात प्रतिक्रियांच्या अशा टकरीमुळे भर पडत असते. 

याबाबत बोलावंसं वाटतं याचं कारण हिंदुत्वनिष्ठ आणि विरोधक यांच्यातील मारामारी आजची नसली तरी आज ती गंभीर वळणावर आहे असं दिसतं. त्यात समाजमाध्यमांचा वाटा अर्थातच मोठा आहे. दृष्टिकोनात मूलभूतच फरक असल्याने मतभेद राहणार हे उघड आहे. प्राचीन भारतातील जडवादी आणि चैतन्यवादी यांच्यातील संघर्षाचंच हे विस्तारित, 'मल्टीपोलर' रूप आहे असं म्हणता येईल. पण या वादात मुळातील वादविषयाचा धागा बाजूला पडला आहे की काय अशीही शंका कधीकधी येते. मुळातील जे वादविषय आहेत त्यात दृष्टिकोनातील फरकाबाबत फारसं काही करता येणार नाही, पण हा फरक बाजूला ठेवून प्रत्यक्ष जगण्यात आपण काही विधायक करू शकतो का असा विचार करायला हवा आहे. दोन-एक वर्षांपूर्वी भाजप समर्थक आणि समाजमाध्यमांवर अतिशय सक्रीयपणे भाजपचा अजेंडा पुढे नेणाऱ्या शेफाली वैद्य यांच्याशी एक सविस्तर 'व्हॉट्सअॅप चर्चा' झाली होती. चर्चा चांगली झाली होती. त्यात मी त्यांना एके ठिकाणी असं म्हटलं होतं की मी तुमच्या बाजूला येणार नाही हे तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही माझ्या बाजूला येणार नाही हे मला माहीत आहे. त्यामुळे प्रश्न एवढाच उरतो की आपण 'शांततामय सहअस्तित्व' कसं टिकवायचं ?       
   
मला असं दिसतं की जर काही गोष्टी खुलेपणाने स्वीकारल्या गेल्या तर हे होऊ शकेल. वरील चर्चेमध्ये शेफाली वैद्य मला असं म्हणाल्या होत्या की तुम्ही उदारमतवादी वाटत नाही कारण तुम्ही बऱ्याच समजूतदारपणे बोलताय. आता इथे आपण थोडं खोलात जाऊ. २०१४ पासून राजकीय आघाडीवर जे सुरू आहे ते आपण पाहतोच आहोत. त्याबरोबर सामाजिक ध्रुवीकरण झालं आहे, समर्थक-विरोधक कडाक्याने भांडतायत. या गदारोळात मीही आहे. माझंही एक मत आहे. भाजप का नको याविषयी माझं काहीएक म्हणणं आहे आणि ते मी मांडलेलं आहे. पण तरी सत्तेत असणाऱ्या पक्षाचं मूल्यमापन केवळ माझ्याच निकषांवर करता येत नाही हे मला मान्य आहे. तिथे 'होलिस्टिक' विचार करावा लागतो. मला ज्या पक्षाची वैचारिक बैठक मान्य नाही त्या पक्षाने जर काही चांगली कामं केली, धोरणात्मक दृष्ट्या चांगले निर्णय घेतले  तर मला 'फक्त त्या गोष्टींचं स्वागत' करता यायला हवं. मला आणि आपल्या सगळ्यांना आपल्यातील मतभेदांच्या वर जाऊन एकमेकांतील गुणांचं (ते गुण तत्कालिक प्रभाव टाकणारे असले तरी) कौतुक करता यायला हवं. मी मागे एकदा लिहिलं होतं ते पुन्हा लिहितो. भाजपच्या बाबतीत अडचण अशी आहे की जे निगेटिव्ह आहे ते इतकं अस्वस्थ करणारं आहे की पॉझिटिव्हकडे बघावंसंही वाटत नाही. पण तरी उद्या समजा माझ्या दृष्टीने भाजप हा पक्ष 'सुधारला', माझ्या कडक निकषांवर तो खरा उतरला तर मी काय करेन? मग मला त्याला समर्थन द्यावं लागेल. पण राजकीय पक्ष वगैरे दूरची गोष्ट झाली. मला असं वाटतं की आज आपण एकमेकांमध्येच ही 'सुधारण्याची स्पेस' नाकारतो आहोत. तसा प्रयत्न आपण करत नाही आहोत. शेफाली वैद्य जर असं म्हणत असतील की तुम्ही उदारमतवादी वाटत नाही कारण तुम्ही समजूतदारपणे बोलताय तर उदारमतवादी लोकांबद्दल आज इतरांना काय वाटतं, जर ते नकारात्मक नसेल तर का हा विचार मी सुरू करेन. इथे पुन्हा शेफाली वैद्यांशी इतर बाबतीत सहमत होण्याचा प्रश्नच नाही. जिथे विरोध आहे तिथे विरोध आहेच. शेफाली वैद्य यांच्या व्यक्तिमत्वात समजूतदारपणा आहे/नाही हाही एक मुद्दा असू शकतो. त्यांची फेसबुक व ट्विटरवरील अभिव्यक्ती कधीकधी टोकाची विद्वेषी असते. पण त्यांच्या लिबरल्सबद्दलच्या अनुभवांममुळे त्यांचं जे रीडिंग आहे ते तपासून बघायला काय हरकत आहे? माझ्यात एखादी सुधारणा होऊ शकत असेल तर ती सुधारणा कुणी सुचवली याला मी महत्त्व देऊ नये. 'मॅटर ऑफ फॅक्ट' म्हणून मला ते स्वीकारता यायला हवं. 

हिंदुत्ववाद आणि उदारमतवाद या संघर्षात आणि इतरही टकरींमुळे 'पुरोगामी' शब्दाला नकारात्मक छटा आली आहे. वास्तविक वैचारिक कल म्हणून हिंदुत्ववादी, समाजवादी, कम्युनिस्ट अशा विभागण्या मान्य केल्या तरी हे काही 'वॉटर टाइट कंपार्टमेंट्स' नाहीत. धार्मिक विचारप्रणालीला आपल्या विचारविश्वात स्वतःच्या आत्मिक स्वास्थ्यासाठी स्थान देणारा पण धार्मिक आयडेंटिटी धारदार होऊ न देणारा मनुष्य पुरोगामी असू शकतो असं मला वाटतं. पळशीकर म्हणतात तसं 'विशुद्ध धर्मपालन' करताना कट्टरता, असहिष्णुता वाढते. त्यामुळे धर्मपालनाला जगण्यात काहीएक स्थान असणाऱ्यांची जबाबदारी वाढते. आज समंजस हिंदुत्व कुणीच बाळगत नाही का? मला वाटतं असे अनेक लोक आहेत, पण खरं सांगायचं तर मला हा प्रश्न गोंधळात टाकतो कारण माझ्या आकलनानुसार हिंदुत्व ही धारणा कट्टर मुस्लिम धार्मिकतेला उत्तर म्हणून निर्माण झाली आणि पुढे तिची वाटचाल कट्टर मुस्लिम धार्मिकतेच्या वास्तव/अस्थानी भीतीपोटी झाली आहे. (स्लॅश जाणीवपूर्वक वापरला आहे. हा मुद्दा चर्चेला खुला आहे.) ती 'भारतीयत्वा'कडे, 'आधुनिकते'कडे न जाता हिंदुत्वाभोवतीच रेंगाळत राहिली आहे. त्यामुळे प्रतिक्रियारहित अशी निव्वळ हिंदुत्व अशी काही संकल्पना आहे की नाही हे बहुधा तपासावं लागेल. जे असमंजस, विखारी हिंदुत्व आहे त्याचं दर्शन होत असतं. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया येतात. यात गडबड अशी होते की या प्रतिक्रियांमुळे समंजस हिंदुत्ववादी दुखावले जाऊ शकतात. पण अशा प्रतिक्रिया, असा उद्वेग येणार हे त्यांनी समजून घ्यायला हवं. हिंदू समाज हा एका अर्थाने सहिष्णू आहे म्हणूनच अशा प्रतिकिया येऊ शकतात. हिंदू समाज जातीच्या बाबतीत अतिशय असहिष्णू असला आणि आज विखारी हिंदुत्व प्रभावी होताना दिसत असलं तरी हा समाज ढोबळ मानाने समावेशक वृत्तीचा आहे. यातली एक व्यावहारिक बाजू अशी आहे की 'हिंदू' म्हणून एकच एक चेहरा नसल्याने या समाजाला समावेशक असण्यावाचून पर्यायही नाही. याबाबत सुरेश द्वादशीवारांनी दिलेली उपमा चपखल आहे. त्यांनी एका लेखात म्हटलं होतं की किराणा-भुसारच्या दुकानात किराणा आणि भुसार या नावाच्या वस्तू अस्तित्वात नसतात. अस्तित्वात असतं ते मीठ, मोहरी, साखर, रवा इ. हिंदू धर्म असाच आहे. इथे ब्राह्मण, मराठा, धनगर, माळी आणि इतर अनेक जाती असतात. फक्त 'हिंदू' असा कुणी नसतो. हिंदुत्वनिष्ठ मंडळींचा नेमका हाच आग्रह आहे की आपण सगळे 'हिंदू' आहोत म्हणून आपण एकत्र यायला हवं. 'हिंदू आयडेंटिटी' हा त्यांच्या प्रेमाचा विषय आहे. यात त्यांना संमिश्र यश मिळालं आहे. एक मोठा समुदाय या आयडेंटिटीच्या छत्राखाली आला आहे हे खरं आहे. (त्यातूनच विखारही उत्पन्न झाला आहे हे पुन्हा नोंदवू.) पण दुसरा मोठा समुदाय या छत्राच्या बाहेर आहे. शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदुत्ववाद्यांनी आपलंसं करण्यामागे संख्याबळ वाढवणे हा स्पष्ट हेतू आहेच. अन्यथा हिंदू धर्माचे कठोर टीकाकार असलेले, हिंदू म्हणून मी मरणार नाही असं म्हणणारे आंबेडकर स्वीकारण्यामागची संगती लावता येत नाही. 

एकीकडे टोकदार स्वरूपाचा हिंदुत्ववाद प्रबळ होत असताना दुसरीकडे बहुसंख्य 'हिंदू मानस' अजूनही 'हिंदू असण्या'प्रती हळवं आहे आणि त्यांना हिंदू धर्माची चिकित्सा नको आहे किंवा मुस्लिम धर्माची चिकित्सा झाली तरच हिंदू धर्माची चिकित्सा मान्य आहे असं दिसतं. त्याचा एक साइड इफेक्ट म्हणजे ज्या घटनांचा संबंध अतिरेकी हिंदुत्ववादाशी पोचतो त्याबद्दलही कुणी काही बोलू नये अशी अपेक्षा तयार झाल्यासारखी दिसते.     
  
मला असं वाटतं की आज झुंडीची मानसिकता ज्याप्रकारे वाढते आहे ती लक्षात घेता आपल्या धर्माविषयी सॉफ्ट कॉर्नर असणारी जी धार्मिक मानसिकता आहे (हिंदू आणि मुस्लिम दोन्ही) तिकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. कारण जी मानसिकता आज 'सॉफ्ट' आहे ती उद्या 'हार्ड' होतेच कारण या मानसिकतेचा पायाच मुळात 'रॅशनल' नाही आहे. धार्मिक दुखावलेपण हे तीव्र स्वरूपाचं असतं आणि तिथे प्रतिवाद केला तरी तो स्वीकारला जात नाही. एका धार्मिक कट्टरतेची चिकित्सा दुसऱ्या धार्मिक कट्टरतेच्या 'रेफरन्स'नेच झाली पाहिजे यात 'लॉजिकल फॅलसी' आहे - म्हणजे ते तर्कदृष्ट्या योग्य नाही. पण भारतीय संदर्भात त्याला वेगळा आयाम आहे हे खरं. कारण कट्टर हिंदुत्ववाद हा कट्टर मुस्लिम धार्मिकतेची प्रतिक्रिया म्हणून उभा राहिला आणि बळकट झाला असं म्हटलं जातं. याबाबत एक विचार करायला हरकत नाही. समजा भारतावर मुस्लिम शासकांनी राज्य केलं नसतं आणि पुढे मुस्लिम मूलतत्त्ववादाची झळ भारताला पोचलीच नसती तर हिंदू धार्मिकता कट्टर न होता जातीय कट्टरताच फक्त उरली असती असं म्हणता येईल का? 'जर-तर' च्या प्रश्नांना फारसा अर्थ नसतो हे खरं, पण हिंदू धार्मिकतेच्या स्वरूपाचा विचार करताना हा प्रश्न मनात डोकावतो आणि तो तितकाही अप्रस्तुत वाटत नाही. आणि गंमत म्हणजे आज धार्मिक कट्टरता जशी आहे तशीच जातीयही आहेच. धार्मिक आहे म्हणून सगळे एकत्र एका झेंड्याखाली आहेत असं झालेलं नाही. याला धार्मिक पुनुरुज्जीवनाच्या प्रयत्नांना आलेलं अपयश म्हणायचं, मर्यादित यश म्हणायचं की याची अन्य प्रकारे चिकित्सा करायची हाही एक प्रश्न आहेच. सध्या तो नोंदवून पुढे जाऊ. 

एक गोष्ट स्पष्ट आहे की धर्माची प्रस्तुतता मान्य केली तरी धर्म बहुसंख्य माणसांना हळवा आणि म्हणून कट्टर बनवत असल्याने धर्माच्या कक्षेच्या बाहेर राहून जे विचार करू शकतात त्यांच्यावर जास्त जबाबदारी येऊन पडते. पुढे जाण्याआधी एक किस्सा सांगतो. 'साइनफेल्ड' ही एक गाजलेली अमेरिकन मालिका. 'फ्रेंड्स'च्या आधीची. यातील एका भागात एका स्री व्यक्तीरेखेच्या तोंडी असा संवाद आहे की तिचं आणि गांधींचं पॅशनेट प्रेमप्रकरण होतं. 'गांधी त्यांचं टक्कल असलेलं डोकं तेलात बुडवून माझ्या शरीरावर फिरवत असत' असं ती म्हणते. (मूळ इंग्लिशमध्ये ऐकायला हे अधिक गंमतीदार वाटतं). आता हे बघत असताना मी हसत होतो. याचं कारण काय? एक म्हणजे मी लिबरल आहे, दुसरं म्हणजे विनोदी म्हणूनही, त्या विशिष्ट संदर्भात मला ते मान्य होतं. पण हा किंवा असा विनोद एखाद्या कट्टर हिंदुत्ववाद्याने केला असता तर मला तो चालला असता का? याचं उत्तर असं की विनोद जर खरंच दर्जेदार (आता यात सापेक्षता आहे, पण त्याला इलाज नाही!) असेल तर आवडेल. नसता तर राग आला असता किंवा तिकडे दुर्लक्ष केलं असतं किंवा स्वतंत्रपणे त्याचा उल्लेख लेखात वगैरे केला असता. मी जरी विनोद एंजॉय केला तरी तो 'निखळ विनोद' आहे की 'राजकीय स्टेटमेंट' आहे हे मला समजलं असतं. आता आपण दुसऱ्या बाजूला जाऊ. मी जर कट्टर हिंदू धार्मिकतेबाबत विनोदाने काही लिहिलं तर एखादा हिंदुत्ववादी ते विनोदाने घेऊ शकत नाही कारण त्याला त्यात निखळ विनोद दिसत नाही. त्याला त्यात राजकीय कोन दिसतो कारण विनोदाच्या मांडणीकडे तो त्या कोनातून बघतो. (आमच्या एका बऱ्यापैकी हिंदुत्ववादी काकांनी केलेला एक विनोद आठवला. कशावरून तरी तलाकविषयी बोलणं सुरू होतं. माझी आई उर्दू माध्यमाच्या शाळेत शिक्षिका होती. तिथे बऱ्याच मुस्लिम शिक्षिका होत्या. मी सहज म्हटलं की मला आठवत नाही कधी तलाक वगैरे झाल्याचं. त्यावर काका म्हणाले - नोकरी करणाऱ्या बायकोला कोण तलाक देईल? मी काकांना एक हिंदुत्ववादी टाळी दिली!)  

हा एक तिढा आहे आणि विशिष्ट संदर्भात आपण निव्वळ व्यक्ती म्हणून राहू शकत नाही हे आपल्याला मान्य करावं लागेलच. पण याच्या पुढे जाऊन मला हे म्हणायचं आहे की संघटित धर्माच्या कक्षेबाहेर असणाऱ्या माझ्यासारख्याकडे जास्त जबाबदारी असली तरी जे कक्षेच्या आत आहेत त्यांनीही परिघाकडे थोडा प्रवास करायला हरकत नाही. मुळात एक तर गांधी, फाळणी, काश्मीर, हिंदू-मुस्लिम संघर्ष याबाबत पुष्कळ गैरसमज असतात. राजकीय स्थित्यंतराच्या काळात जे घडतं त्याचं सोपं आणि सोयीस्कर आकलन करून दिलं जातं. त्यामुळे हिंदुत्ववादाच्या स्वरूपाविषयी काही बोललं तर त्याचा संबंध काश्मीर, फाळणी, मुस्लिम तुष्टीकरण याच्याशी न जोडता 'हे आपल्याच सामाजिक सुधारणेसाठी उपयोगी असू शकेल' असा विचार तरी किमान करून पाहावा.  

आज जे अस्वस्थ करणारं चित्र दिसतं त्या पार्श्वभूमीवर मला दोन-तीन गोष्टी दिसतात - 

  • एक म्हणजे उदारमतवादी लोकांनी धार्मिक हळवेपणाची 'ग्रॅव्हिटी' लक्षात घेऊन समंजस हिंदुत्ववाद्यांशी संवाद सुरू ठेवणं - जे अगदी कट्टर आहेत त्यांनाही तिखट उत्तर न देता त्यांना धार्मिक मूलतत्त्ववादाचं गांभीर्य समजावून सांगत राहणं (हे अवघड असू शकेल, पण मला वाटतं हाच एक मार्ग आहे. कारण कट्टरता ही मुळातच एकारलेली, नाजूक आणि म्हणूनच काहीशी हिंस्रही असते. त्यामुळे तिथे प्रहार केला की ती आणखी हिंस्र व्हायची शक्यता असते.) 
  • दुसरं म्हणजे उदारमतवादी लोकांनी धार्मिकदृष्ट्या हळव्या लोकांची ते दुखावले गेले तर माफी मागणं. यात भूमिका बदलायचा प्रश्न येत नाही. पण समजुतीचा प्रश्न येतो. कळत-नकळत जर धर्मश्रद्धेला धक्का बसला असेल किंवा काही कारणाने आपली मांडणी त्यांना एकारलेली वाटत असेल तर त्याची नोंद घेऊन, धार्मिक कट्टरतेची चिकित्सा करणं न सोडता, तिचे दुष्परिणाम दाखवून देणं न सोडता 'माणूस दुखावला गेला' म्हणून माफी मागणं आवश्यक आहे असं मला वाटतं. 
  • तिसरं म्हणजे धार्मिकदृष्ट्या हळव्या लोकांनी आपलं केंद्र सोडून परिघाकडे येणं. धार्मिक कक्षेच्या आत जी मौज आहे त्यापेक्षा अधिक मौज या कक्षेच्या बाहेर आहे कारण इथे मौजेबरोबर आपली परीक्षा घेणारी आव्हानंही आहेत!

यासंदर्भात मला आणखी एक असं वाटतं की कदाचित स्ट्रॅटेजी म्हणून 'डावा हिंदू' ही ओळख माझं म्हणणं पोचवायला उपयुक्त ठरू शकेल. संघटित धर्मापासून मुक्त होण्याच्या वाटचालीत आधी धार्मिक ओळख पुढे आणणं हेच कदाचित उपकारक ठरेल. धर्माचा प्रभाव असलेल्या समाजात धर्माची चौकट संवादाची जागा मोकळी करते म्हणून हे करायचं. हिंदुत्ववादी संघटनांचं यश धार्मिक ओळखीला चेतवण्याच्या सोप्या मार्गावरून गेल्यामुळे आहे. तिथे 'मूलभूत परिवर्तनाचं आव्हान' घेणं टाळलेलं आहे किंवा परिवर्तनाचं आव्हान घेतलं तरी ते बहुतेकदा धर्म-जातीच्या स्ट्रक्चरला, आर्थिक संरचनेच्या स्ट्रक्चरला धक्का न लावता घेतलेलं आहे. परिवर्तनात जेव्हा मूलभूत वैचारिक परिवर्तन अभिप्रेत असतं तेव्हा ते मोठं आव्हान असतं. हिंदुत्ववादी विचारात मूलभूत वैचारिक परिवर्तनापेक्षा हिंदुहितवाद, सेवाभाव या गोष्टी अधिक प्रभावी आहेत. त्या बळावर त्यांनी संस्थात्मक बांधणीही केली आहे. परंतु त्याला धर्माची दृश्य-अदृश्य चौकट आहेच. मग परिवर्तनाच्या विचारानेदेखील ही दृश्य-अदृश्य चौकट स्वीकारावी. आज कदाचित या चौकटीपासून बरीच फारकत घेतल्याने परिवर्तनाचा विचार रूजवता येत नसेल. 'मी तुमच्यातला नाही' असं सांगण्यापेक्षा 'मी तुमच्यातलाच आहे आणि मला माझं वेगळं म्हणणं मांडायचं आहे' असं म्हणणं अधिक फलदायी ठरू शकेल.

माझा एक मित्र मानवी उत्क्रांतीचा चांगला अभ्यासक आहे. त्याच्याबाबत सांगावी अशी एक विशेष गोष्ट म्हणजे त्याने या विषयाचे लहान मोड्यूल्स तयार केले आहेत आणि तो शाळेतील मुलांसमोर ते सादर करतो. त्याचं काम आणि त्याचा दृष्टीकोन मला खूप महत्त्वाचा वाटतो. एकदा गप्पा मारताना तो म्हणाला होता की उत्क्रांतीचा विषय निघाला की मी लोकांना सांगतो की देव आहे-नाही या वादात आपण पडायलाच नको. मी देवाचं अस्तित्व नाकारण्याकरता उत्क्रान्तीचा अभ्यास केलेला नाही. हा अभ्यास करताना मला जाम मजा आली म्हणून मी तो केला. ती मजा तुम्हालाही अनुभवता येईल म्हणून तुम्ही हा अभ्यास करा!

मला असं दिसतं की परिवर्तनाचा विचारदेखील लहान मोड्यूल्समधूनच प्रभावीपणे पोचेल. त्याचाच एक भाग 'डावा हिंदू' ही स्वतःची ओळख न्यूट्रॅलिटीने मान्य करणे हा असू शकेल. माणूस धार्मिक होतो, कट्टर होतो याच्या मुळाशी माणसाचं 'व्हल्नरेबल' मन आहे. मग मन जर व्हल्नरेबल आहे तर ते परिवर्तनाकडेही झुकू शकेल. त्यासाठी परिवर्तनवादी विचारात परिवर्तनशीलता हवी!

- 'सृजन' दिवाळी अंक, २०१९ 

No comments:

Post a Comment