Monday, October 16, 2017

फेसबुकचं 'नेचर आणि नर्चर' 

'द सोशल नेटवर्क' हा डेव्हिड फिंचर दिग्दर्शित चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. हा चित्रपट फेसबुकची जन्मकथा सांगतो. मार्क झकरबर्ग हार्वर्डमध्ये शिकत असताना, वयाच्या वीस-बाविसाव्या वर्षी त्याने फेसबुक जन्माला घातलं. आधी त्याने फेसमॅश नावाची एक वेबसाईट तयार केली होती ज्यात दोन तरुणींच्या फोटोंची तुलना करून 'हॉट ऑर नॉट हॉट' हा गेम खेळता येई. कॉपीराईटचा मुद्दा आणि व्यक्तिगत प्रायव्हसीचा भंग या कारणांमुळे हार्वर्डने ही वेबसाईट बंद केली. यादरम्यान कॅमेरॉन विंकलवॉस, टायलर विंकलवॉस आणि दिव्य नरेंद्र यांनी 'हार्वर्ड कनेक्शन' नावाची वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी झकरबर्गला आमंत्रित केलं. परंतु हार्वर्ड कनेक्शनवर काम करण्याआधीच झकरबर्गने एदुआर्द सॅव्हेरीन या मित्राच्या मदतीने 'द फेसबुक' या वेबसाईटची निर्मिती केली. 'द फेसबुक' (आणि पुढे 'नॅपस्टर'चा सहसंस्थापक शॉन पार्करने सुचवल्यावरून फक्त 'फेसबुक') लोकप्रिय होऊ लागल्यावर झकरबर्गने आपली कल्पना चोरली म्हणून कॅमेरॉन विंकलवॉस, टायलर विंकलवॉस आणि दिव्य नरेंद्र यांनी त्याच्यावर खटला भरला. हा खटला चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे.

चित्रपटात एक प्रसंग आहे. मार्क झकरबर्ग त्याच्या वर्गात बसलाय. एक मित्र त्याच्याजवळ येतो. अमुक एक मुलगी सध्या सिंगल आहे का असं त्याला विचारतो. झकरबर्ग वैतागून 'माहीत नाही' म्हणतो. पण त्याच क्षणी त्याच्या मनात काहीतरी चमकतं आणि तो धावत आपल्या रूममध्ये येतो. लॅपटॉप उघडतो आणि 'द फेसबुक' वर नवीन फीचर अ‍ॅड करतो - रिलेशनशिप स्टेटस. फेसबुकवरची फीचर्स कशी तयार झाली असतील याची एक झलक या प्रसंगातून मिळते. आणखी एक प्रसंग सांगतो. हा चित्रपटाच्या अगदी सुरुवातीला आहे. मार्क झकरबर्गचं आणि त्याची गर्लफ्रेंड एरिका ऑलब्राईट यांचं ब्रेक-अप होतं आणि झकरबर्ग विमनस्क अवस्थेत त्याच्या रूमवर येऊन तिच्याबद्दल ब्लॉगवर अवमानकारक मजकूर पोस्ट करतो. (यानंतरच तो 'फेसमॅश'ला सुरूवात करतो.)

या चित्रपटाचा आणि प्रसंगांचा संदर्भ द्यायचं कारण हे की फेसबुकच्या स्वरूपाबद्दल हे प्रसंग काही बोलतात. दुसरं म्हणजे मी गेली काही वर्षं हे जे व्यासपीठ लिहिण्यासाठी वापरतो आहे त्याबद्दल थोडं लिहावं असं वाटतंय आणि ते लिहिताना या व्यासपीठाच 'नेचर' काय आहे आणि आपण 'नर्चर' करून ते बदलू शकतो आहोत का हेही तपासावंसं वाटतंय.

कविता लिहिण्यापासून सुरुवात करुन इतर लेखन (काही तर फक्त फेसबुकसाठी) करेपर्यंत जो अनेकांचा प्रवास झाला तोच माझाही झाला. यात जे मित्र-मैत्रिणी भेटले, माहिती मिळाली, चांगलं लेखन वाचायला मिळालं ते या प्लॅटफॉर्मचं मोठं देणं आहे. ही एक फार मोठी सकारात्मक गोष्ट नोंदवून पुढे जाऊ.

फेसबुक, ट्विटर किंवा इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स हा एक 'मानसशास्त्रीय आविष्कार' आहे असं मला वाटतं. माणसामधील अंतःस्थ भावनांना, विशेषतः विकारांना हात घालायची ताकद या माध्यमाच्या रचनेत आहे. फेसबुक निर्माण होताना मार्क झकरबर्गच्या मनात 'ऑफलाईन सोशल एक्सपीरियन्स ऑनलाईन आणणे' ही कल्पना होती. परंतु या ऑनलाईन एक्सपीरियन्समध्ये काही कळीचे फरक पडलेले दिसतात आणि त्याचा संबंध माणसं समोरासमोर बोलत नसल्याशी आहे. आज एखाद्या मुद्द्यावरून फेसबुकवर एकमेकांशी भांडणारे लोक किंवा शिवराळ भाषेतून व्यक्त होणारे लोक समोरासमोर आले तर ते तसं बोलतील का? भाजप समर्थक-विरोधक, आस्तिक-नास्तिक, डावे-उजवे, धर्म-विज्ञान, सवर्ण-दलित, खरा स्त्रीवाद-खोटा स्त्रीवाद अशा सगळ्या उदाहरणात हे दिसतं की माणसं समोरासमोर बोलत नसल्याने हे वाद टोकाला जातात, माणसं आपलं संतुलन हरवतात. हे होतं कारण संतुलन हरवण्याची मुभा इथे पटकन मिळते. माणूस समोर नाही आणि तो समोर यायची शक्यताही नाही हे समजलं की एक प्रकारची सुरक्षितता येते आणि माणूस तीव्रतेने बोलू लागतो. माणसं समोरासमोरदेखील भांडू शकतातच, पण आपल्यासमोर एक माणूस बसला आहे आणि बोलतो आहे हे पाहिल्यावर आपल्यातला तारतम्य बाळगणारा माणूस अधिक जागा राहतो. यात रूढ शिष्टाचारांचाही भाग आहेच. आणि तो ठीकच आहे. शिष्टाचार तोंडदेखले असतात हे खरं, पण ते शांततामय सहअस्तित्वासाठी आवश्यकही असतात. प्रत्यक्ष भेटीचा आणखी एक फायदा असा की दुसऱ्या भेटीच्या, माणूस अधिक कळण्याच्या शक्यता निर्माण होतात. हे ऑनलाईन भेटींमध्ये फारसं होत नाही.

मुळात वादविवादात काहीच गैर नाही. पण वाद कसा घालावा याची पद्धत मात्र गैर असू शकते. योग्य वादपद्धतीसाठी स्वतःला तयार करावं लागतं, थोडी मेहनत घ्यावी लागते. अहंकार नष्ट करणं शक्य नसलं तरी अहंकारावर नियंत्रण ठेवावं लागतं. आपण अपूर्ण आहोत, आपण चुकू शकतो हे लक्षात ठेवावं लागतं. आपलं वर्तन / विचार समीक्षेसाठी खुले ठेवावे लागतात. माणूस या प्राण्याविषयी आस्था, करुणा असावी लागते. माणसाचं मन, त्यातील तर्क प्रक्रिया हे अभ्यासण्याजोगं आहे, रोचक आहे. माणसाच्या आत एक डोह आहे जो निरखण्याजोगा आहे. ऑनलाईन जगात हे जमणं फार अवघड आहे. इथे माणसाच्या व्हर्च्युअल अतिदर्शनामुळे ही 'निरखण्याची स्पेस'च नाहीशी होतेय की काय अशी शंका येते. माणूस ऑफलाईन असताना जितका मोकळा होतो तितका तो ऑनलाईन असताना होतो का? (जे साधारण चित्र दिसतं त्यात त्याच्यातली नकारात्मकता मोकळी होताना दिसते.) एक तर तो स्वतःचा अजेंडा घेऊन वावरत असतो. फेसबुकसारखा प्लॅटफॉर्म हा प्रतिमानिर्मिती, मत-प्रतिक्रिया, वैचारिक शेअरिंग, निव्वळ गंमत, 'अनावर अभिव्यक्ती' अशा कारणांसाठी वापरला जातो. पण या गोष्टी या प्लॅटफॉर्मवरच फक्त घडत असल्याने माणसाला बांधतात जास्त, मोकळं कमी सोडतात. (ब्लॉग हे माध्यम मात्र मला स्वतःला या बाबतीत चांगलं वाटतं. कारण ब्लॉग मुळात सविस्तर लिहिण्यासाठी डिझाइन केलेला प्रकार आहे.)

जानेवारी २०१२ पासून मी हे माध्यम वापरायला सुरुवात केली. माध्यमावर 'होल्ड' येऊ लागल्यावर लिहिणं वाढत गेलं. आधी मी हिंदुत्ववादाबद्दल, धार्मिक विचारसरणीबद्दल टीकात्मक लिहायचो. तिरकसपणे लिहायचो. पण जेव्हा असं लक्षात येऊ लागलं की या विचारसरणीचे बरेच लोक इथे आहेत तेव्हा मला वाटू लागलं की प्रतिक्रियात्मक न लिहिता विश्लेषणात्मक लिहायला हवं. कारण माझ्या अवतीभवती माणसं आहेत आणि ती मला ऐकतायत. जेव्हा त्यांना हे कळेल मी माझं काहीएक विश्लेषण आहे तेव्हा ते माझं उपहासात्मक लिहिणंही समजून घेऊ शकतील. माझ्या म्हणण्याला, विरोधी भूमिकेला बैठक मिळेल. अन्यथा माझी एक पोस्ट-त्यावर तुझी एक पोस्ट, माझी एक कमेंट-त्यावर तुझी एक कमेंट एवढंच सुरु राहील. आपण इथे 'स्क्रीनशॉट-स्क्रीनशॉट' खेळायचं नाही हे मी ठरवलं होतं. किंबहुना तसा विचारही कधी मनात आला नाही. कधीकधी काही कमेंट्सवर शांत राहणं अवघड गेलं, पण जमलं. फेसबुकवरचा गलका वाढल्यावर जाणवू लागलं की हे प्रकरण हाताबाहेर जाऊ शकतं. आपल्याला लिहायचं वगैरे असलं आणि त्यासाठी हे माध्यम एका बाजूने अनुकूल असलं तरी दुसऱ्या बाजूने धोकादायकही आहे. कारण गर्दीचा, गलक्याचा परिणाम तुमच्या इच्छेची वाट न बघता तुमच्यावर होतो. या माध्यमाच्या रचनेतील अंगभूत मर्यादा आपल्यामध्येही हळूहळू येतील ही जाणीव काहीशी भीतीदायक होती. त्यामुळे जाणीवपूर्वक अंतर राखणं सुरु केलं.

वर उल्लेख केलेले जे विशिष्ट वाद आहेत त्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकेल पण त्यातला समान धागा विविध सामाजिक-आर्थिक-वैचारिक-भाषिक स्तरातील माणसं व्हर्च्युअली एकत्र येणं आणि आपल्या आजूबाजूला अशा विविध स्तरातील माणसं आहेत हे भान न राहणं हा आहे. पण मग गर्दी आहे म्हणून मी माझ्या मनातलं, विशेषतः संवेदनशील विषयांबाबतचं, बोलूच नये का? तर बोलावं, पण सतत न बोलता अधूनमधून, विस्ताराने, धक्कातंत्राचा आधार न घेता, स्वतःचंही मूल्यमापन करत बोलावं. आपण जर समीक्षाच करायला बसलो असू तर स्वतःला का वगळायचं? शिवाय आपण प्रेडिक्टेबल होतो आहोत का, धक्कातंत्रावर आपली हुकूमत असली तरी आपण धक्का देण्याकरताच लिहू लागलो आहोत का हेही जरूर तपासावं. एका विशिष्ट जागी गेल्यावर सगळ्यांच्याच भूमिका ठाम होत जातात. आणि मग त्या भूमिकेच्या रक्षणासाठी आपण आपल्या आतला आवाजदेखील दाबू लागतो. हे राजकारणात करावं लागतं. आपण हे करत असू तर ते राजकारण म्हणून करतो आहोत की आपल्याला करायचं नाहीये पण उघडपणे कबूल करायला अवघड वाटतं म्हणून करतो आहोत याची स्पष्टता स्वतःशी तरी असावीच. अलीकडे एकदा गप्पा मारताना मंदार काळे म्हणाला की आपण तोंड उघडलं की राजकारणीच होतो. आता या म्हणण्यात तथ्य आहे. त्यामुळे एखाद्या टोकाच्या भूमिकेसारखीच समन्वयाची भूमिकाही राजकारणी भूमिका आहे का? तर आहे. पण या राजकारणाचा उद्देश 'एलिमिनेशन' हा नाही. याचा उद्देश शांततामय सहअस्तित्व हा आहे. एक अंतःस्थ हेतू विरोधकाचं मतपरिवर्तन हाही आहे, पण ते विचारशील आणि म्हणून सक्षम परिवर्तन आहे.

कधीकधी असं होतं की रचना निर्दोष असते, पण माणसं दोषयुक्त असतात. कधीकधी रचनेतच दोष असतात. हे दोष माणसाच्या मूळच्या स्खलनशील स्वभावाला पूरक ठरतात. फेसबुकसारखं ,माध्यम दुसऱ्या वर्गात मोडणारं आहे. तरीही ते प्रभावी आणि उपयुक्त आहेच. मात्र सहअस्तित्व शांततामय असावं की द्वेषमय असावं हे अजून तरी आपल्या हातात आहे. वैचारिक विरोधासह एकोपा आणि सुसंवाद टिकवायचा असेल तर कदाचित फेसबुकच्या रचनेतही काही बदल होऊ शकतील, पण त्याबद्दल आज काही सांगता येणार नाही. त्यामुळे आपल्याला स्वतःमध्येच बदल करावा लागेल.

'द सोशल नेटवर्क' चित्रपटाचा शेवटही रोचक आहे. खटला संपल्यावर झकरबर्ग त्याच रूममध्ये बसलेला आहे. तो एरिका ऑलब्राईटला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो आणि तिच्या प्रतिसादाची वाट बघत पेज रिफ्रेश करत राहतो. फेसबुक कसं 'डिमांडिंग' होऊ शकतं याचा हा एक दाखला आहे. आणि जेव्हा एखादी गोष्ट 'अती डिमांडिंग'होते तेव्हा ती संथपणे राक्षसी होऊ लागली आहे का हा विचार डिमांड पुरवणाऱ्याने करावा लागतो. मार्क झकरबर्गने एक 'मॉन्स्टर' निर्माण केला आहे असं गमतीने म्हणता येईल पण ते गमतीतच स्वीकारणं मात्र धोक्याचं ठरेल!

(फेसबुक पोस्ट)  

No comments:

Post a Comment