Thursday, October 29, 2020

बुद्धी, विवेक आणि वास्तव – २

‘बुद्धिप्रामाण्यवाद हा समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे’ ही या विशेषांकाची मध्यवर्ती कल्पना आहे. ‘बुद्धिप्रामाण्य’ या संज्ञेविषयी पहिल्या लेखात मे. पुं. रेगे यांच्या मांडणीच्या संदर्भाने आपण चर्चा केली. ‘बुद्धिप्रामाण्य’ या शब्दाऐवजी ‘विवेक’ हा शब्द मला अधिक योग्य वाटतो हे मी तिथे मांडलं आहे.

समस्त सृष्टीमध्ये मानव, मानवेतर असंख्य सजीव आणि अर्थातच निर्जीव जग यांचा समावेश होतो. ‘बुद्धिप्रामाण्यवाद हा समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे’ या विधानाचा अर्थ ‘माणसाने बुद्धिप्रामाण्य स्वीकारणं समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे’ असा अभिप्रेत आहे. (मानवासह मानवेतर सजीवांनीही बुद्धिप्रामाण्य स्वीकारावं असा एक दुसरा मजेशीर अर्थ या विधानातून निघू शकण्याची शक्यता आहे; पण तो अर्थ अर्थातच गैरलागू आहे.) ‘सृष्टीसाठी हितकारक काय आहे?’ असा जेव्हा आपण – म्हणजे माणसं – विचार करतो तेव्हा आपण एक रोचक प्रश्न विचारत असतो. ‘हित’, ‘हितकारक’ म्हणजे नक्की काय, हिताची व्याख्या व्यक्तिनिरपेक्ष आहे की विविध परिस्थितींमध्ये, विविध विचारदृष्टींनुसार ती विविध प्रकारे परिभाषित होते अशा तात्त्विक मुद्द्यांपासूनच या प्रश्नाचा वेध सुरू होऊ शकतो. शिवाय पहिल्या लेखातील ‘बुद्धिप्रामाण्य की विवेक’ हा संदर्भही इथे लागू होईल. माणसाने निसर्गात हस्तक्षेप करत स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केलं, त्यात निसर्गाचा ऱ्हास झाला आणि आज तर पर्यावरणीय संकटाने भीषण रूप धारण केलं आहे. माणसाने निसर्गातील हस्तक्षेपाची सुरुवात त्याच्या बुद्धीच्या बळावरच केली. पुढे त्याची गरज/हाव वाढल्यावर जे दुष्परिणाम झाले त्यावरही त्याने आपल्या बुद्धीच्या बळावर उपाय शोधले. माणसाचा हा बुद्धिप्रामाण्यवाद त्याच्या स्वतःसाठी हितकारक ठरला असेल, पण  सृष्टीसाठी तो हितकारक ठरला की अहितकारक? सृष्टीपासून हळूहळू वेगळं होत तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःची प्रतिसृष्टी निर्माण करणार्‍या माणसाला ‘सृष्टी’विषयी काही बोलण्याचा मुळात अधिकार आहे का? की मग बुद्धिप्रामाण्यवादाचे चांगला आणि वाईट असे दोन प्रकार आहेत? असे काही प्रश्न इथे उपस्थित होतात.

हे प्रश्न बाजूला ठेवले आणि वरील विधान ‘विवेकवाद हा समस्त मानवजातीसाठी हितकारक आहे’ असं बदललं तर ते पटण्यासारखं आहे. पण प्रत्यक्षात विवेकवाद किंवा एकूणच आधुनिक विचारपद्धती, मूल्यसंकल्पना व्यापक प्रमाणात प्रभावी ठरत नाही असं दिसतं. आज तर संकुचित राष्ट्रवाद, धार्मिकता यांचा प्रभाव वाढलेला दिसतो. याची कारणं तात्कालिक राजकीय विचारसरणी, माणसाला सतत प्रभावित करत राहणारं सांस्कृतिक राजकारण, अत्यंत विषम अशी सामजिक रचना, त्यातून जन्मणारी आणि आधुनिक विचारपद्धती आपल्या कक्षेत घेऊ शकणार नाही अशी माणसाची असहायता आणि माणसाच्या काही मूलभूत तर काही दृढ झालेल्या/केल्या गेलेल्या प्रेरणांमध्येही सापडू शकतात.  

आपला वैचारिक प्रवास काही मूल्यसंकल्पनांची निश्चिती करतो आणि त्यांना मार्गदर्शक मानून पुढे जाण्यात आपलं सर्वांचं हित आहे असं आपण मानतो. आदिम काळातील हिंसक, वर्चस्ववादी प्रेरणा मागे सारत आपण अधिक सहिष्णू, समावेशक झालो हे खरं असलं तरी वर्चस्व प्रस्थापित करण्याचे इतर अनेक, विशेषतः बाजारकेंद्री, मार्ग आपण शोधलेच. थेट शारीरिक हिंसेपेक्षा ‘अप्रत्यक्ष सामाजिक हिंसा’ होऊ लागली. गुलामीची प्रथा गेली तरी मानसिक गुलामगिरी राहिलीच. (जातिव्यवस्था सर्वात चिवट! सर्व काही पचवून विजयी मुद्रेने उभी आहे.) पण मूल्यसंकल्पना म्हणून काही तत्त्वांना, उदा. न्याय, सत्य, अहिंसा इ., आपण आज सामूहिक मान्यता दिली आहे. आता या संकल्पना सररास, सोयीनुसार वाकवल्या जातात हे आपण बघतोच. परंतु वर्चस्वासाठी, राजकीय-आर्थिक फायद्यासाठी या संकल्पनांना वाकवण्याबरोबरच आर्थिक-राजकीयदृष्ट्या बलवान नसणारेही स्थलकालसापेक्षतेने, दैनंदिन व्यवहारात, धोरणात्मक निर्णय म्हणूनही या संकल्पनांना वाकवत असतात. माणसाचं प्रत्यक्ष जगणं आणि संकल्पनात्मक जगणं यात कायमच तफावत राहते. संकल्पनांचं स्वतःत ‘परिपूर्ण’ असणं आणि वास्तवाचंदेखील स्वतःत ‘परिपूर्ण आणि अटळ’ असणं या झगड्यात माणूस जगत राहतो. वास्तवाला वेगळं वळण देण्यासाठी मूल्यसंकल्पनांना त्यांच्या ‘परिपूर्णतेपासून’, त्यांच्या विशुद्ध स्वरूपापासून किंचितही ढळू न देता वास्तवाचा मुकाबला करणं यासाठी असामान्य मनःशक्ती लागते आणि ती सर्वांच्या ठायी प्रकट होणं शक्य नसतं. त्यामुळे विशिष्ट संकल्पना ‘हितकारक’ आहेत असं म्हणताना ‘माणसाचं वास्तव’ विसरून चालत नाही.    

बुद्धिप्रामाण्य/विवेक, अनीश्वरवाद यांचा विचार माणसाच्या सामाजिक आणि आंतरिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवरच करावा लागेल. हजारो वर्षांच्या प्रवासानंतर, एकोणिसाव्या शतकापासून सुरू झालेल्या उत्क्रांतीच्या अभ्यासानंतर, मोठ्या वैचारिक घुसळणीनंतरदेखील ‘ईश्वर’ ही संकल्पना प्रभावहीन होत नाही कारण माणसाने ईश्वर कल्पनेला त्याच्या नैतिक, सांस्कृतिक जगण्याचा भाग केलं आहे आणि सृष्टीच्या उत्पत्तीचं अन्य स्पष्टीकरण जनमानसात स्थान मिळवू शकलेलं नाही. अर्थात ईश्वरी रूपाच्या कल्पनेत फरक असू शकेल. काही आस्तिकांच्या मनात ईश्वरी अस्तित्वाचा अर्थ ‘एक देहधारी ईश्वर’ असा नसून ‘सृष्टी निर्माण करणार्‍या शक्ती’ असाही असू शकेल. कदाचित काहीजण ईश्वरी अस्तित्व मान्य करून मूर्तिपूजा नाकारत असतील. मागील लेखात म्हटल्याप्रमाणे हा एक स्पेक्ट्रम आहे आणि त्याच्या एका अंतिम टोकाला संपूर्ण जडवादी स्पष्टीकरण आहे. हे जडवादी स्पष्टीकरण स्वीकारणं बहुसंख्य माणसांना कठीण का जातं? एक मुख्य कारण म्हणजे बहुतांश समाज धर्म आणि ईश्वरभक्ती या ‘डिफॉल्ट सेटिंग’मध्येच वाढतो. त्याने धर्म आणि ईश्वरविरहित जग पाहिलेलंच नाही. दुसरं म्हणजे माणसाच्या वृत्ती ईश्वर आणि धर्म कल्पनांमुळे बदलत गेल्या आहेत. माणूस त्याच्या आंतरिक भाव-भावना, इच्छा, विचार आणि विकार यांना ईश्वराचा ‘शोध’ लागण्याआधी देत असलेला प्रतिसाद आणि ईश्वराचा शोध लागल्यानंतर देत असलेला प्रतिसाद यात फरक असणार आहे. या संदर्भात आपल्याला काही प्रश्न विचारता येतील. माणसात जेव्हा जाणीव ‘निर्माण’ झाली तेव्हा तिच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत होत्या? ‘कुणीतरी आहे ज्याने मला निर्माण केलं’ हा विचार तिच्यामध्ये अंतर्भूतच होता की तो एका कुठल्यातरी टप्प्यावर आला? जाणिवेत ‘दुःख’ कधी आलं? माणसाने एका टप्प्यावर ईश्वर शोधला असेल तर त्याने जोवर ईश्वर शोधला नव्हता तोवर तो आपल्या विविध भाव-भावनांचा सामना कसा करत असेल? मुळात ईश्वराचा शोध लागल्यानंतरच माणसाच्या मनात तोवर नसलेल्या काही भाव-भावनांनी जन्म घेतला का? इतर अनेक बाबतीत जसं एकदा ‘शोध लागल्यावर’ मागे फिरणं शक्य होत नाही तसं ईश्वराबाबत (माणूस त्याच्या अस्तित्वाची, त्याच्या दुःखाची कारणं जड सृष्टीबाहेर शोधू लागल्यावर) घडलं का? हे सगळे प्रश्न मानवप्राण्याच्या एका अचंबित करणार्‍या भल्यामोठ्या वाटचालीवर पसरलेले आहेत. कदाचित यांपैकी काहींची उत्तरं शोधली गेली असतील, काहींचा शोध सुरू असेल. हे प्रश्न उपस्थित करण्याचं कारण असं की माणसाची जाणीव एका गुंतागुंतीच्या प्रवासातून निर्माण झाली आहे हे लक्षात यावं. आपण ‘बायनरी’ भूमिका घेऊच शकतो, पण जाणीव सदासर्वदा ‘बायनरी’त काम करत नाही. तिचं स्वरूप प्रवाही आहे. त्यातून सृष्टीचा पसारा इतके अनंत प्रश्न निर्माण करतो की जडवादी स्पष्टीकरण मान्य करणं बहुतेकांना अवघड वाटतं.

या चर्चेतला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ईश्वरी संकल्पना ही एक नाट्यमय, रोमांचकारक संकल्पना आहे. त्यात एक ‘दिव्यत्वा’ची अनुभूती आहे. आपण फारच छोटे आहोत आणि या विराट सृष्टीच्या निर्मात्याला शरण जाणं, त्याला समर्पित असणं हीच आपली गती आहे हे मनुष्य मान्य करतो कारण हे मान्य करण्यात, या समर्पणात त्याला शांतता व समाधान अनुभवता येतं (किमान असा दावा तरी केला जातो. एक मात्र खरं की ‘शांत होण्याची’, बाह्य व आंतरिक खळबळीचा/स्ट्रेसचा परिणाम म्हणून व त्यावर उपाय म्हणून काही मार्गांचा अवलंब करण्याची गरज नास्तिकांनादेखील भासते. हा एक कळीचा मुद्दा आहे. प्रश्न ईश्वराचा नाही, मनाचा आहे!). आधुनिक विज्ञानाने आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली, अनेक रहस्यं उलगडली. खरं तर ‘विज्ञान’ हा काही ‘नवीन शोध’ नव्हेच. अस्तित्वाच्या वाटचालीत माणसाबरोबर विज्ञान होतंच. मात्र गेल्या दोन-तीन शतकांमध्ये वैज्ञानिक विचारपद्धतीला चांगला आकार आला. आधी गूढतेच्या कक्षेत असणारे अनेक मुद्दे विज्ञानाने स्पष्टीकरणाच्या कक्षेत आणले. याची दुसरी बाजू अशी की हे होण्याआधी हजारो वर्षं आणि विज्ञानाचा प्रभाव वाढल्यावरदेखील माणसाच्या मनाची मशागत कथा-नाट्य-संगीत-चित्र यांनी झाली आहे. ‘गोष्टीचं’, ‘नाट्यमयतेचं’ माणसाला असणारं आकर्षण हा एक संशोधनाचाच विषय आहे. (माणसांना एकत्र आणण्यासाठी आणि एकत्र ठेवण्यासाठी माणसाने ‘गोष्टी’चा कसा प्रभावी वापर केला, ‘कल्पित वास्तवा’चा माणसाला त्याच्या आदिम प्रवासात तर उपयोग झालाच, पण आधुनिक काळातील अनेक संस्था-संकल्पनादेखील ‘कल्पित वास्तवा’च्या आधारे उभ्या राहिल्या याबाबत युव्हाल हरारीच्या ‘सेपियन्स’मधील विवेचन वाचण्यासारखं आहे.) ईश्वराची कल्पना, तिची रूपं, या कल्पनेभोवती उभ्या राहिलेल्या कथा माणसाच्या मनाला भुलवतात. माणसाच्या विविध कलात्मक आविष्कारांमध्ये ईश्वराच्या कल्पनेचं प्रतिबिंब सातत्याने पडलेलं दिसतं. अनेकदा तर ईश्वरभक्ती हीच कलात्मक निर्मितीची प्रेरणादेखील ठरते. माणसाच्या चिंतनात स्थान मिळवण्यापेक्षाही ईश्वराने माणसाच्या रंजनात स्थान मिळवल्याने त्याला सहजासहजी निवृत्त करता येत नाही. (बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ‘हू वेअर द शूद्राज?’ या ग्रंथातील ‘द रिडल ऑफ द शूद्राज’ या पहिल्या प्रकरणात ऋग्वेदातील पुरुषसूक्ताचा सविस्तर परामर्श घेतला आहे. पुरुषसूक्त म्हणजे विश्वोत्पत्तीसंबंधीचा एक सिद्धांत आहे. याबाबत आंबेडकरांनी एक टिप्पणी केली आहे – Cosmogonies have never been more than matters of academic interest and have served no other purpose than to satisfy the curiosity of the student and to help to amuse children. विश्वोत्पत्तीबाबतचे जगातील प्राचीन ग्रंथांमधील/धर्मग्रंथातील सिद्धांत ‘अम्यूझमेंट’ – ‘रंजन’ या श्रेणीत नक्कीच मोडतील. पण ‘बिग बँग थिअरी’सारखा संशोधनावर आधारित वैज्ञानिक सिद्धांत या श्रेणीत जाऊ शकणार नाही. आंबडेकरांनाही तसं अभिप्रेत नसावं. मुद्दा असा की कार्यकारणभावाऐवजी ‘रंजन’ हे केवळ मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठीही उपयोगी ठरतं. समाजव्यवस्था लावण्याच्या संदर्भात, ईश्वरविषयक, नीतीविषयक कल्पना दृढ करण्याच्या संदर्भात प्रौढांकडेदेखील बालक म्हणूनच पाहिलं जातं.)

अनीश्वरवादासमोरील आव्हान मोठं का आहे हे या काही मुद्द्यांवरून लक्षात यावं. वास्तविक  ईश्वरविषयक कल्पना, श्रद्धा, धर्मश्रद्धा यांचं विपर्यस्त स्वरूप आपल्याला आजूबाजूला दिसत असतं. माणसाच्या मनोविकासात त्याचा अडथळा होतो आहे, चिकित्सक वृत्तीची, विवेकाची पिछेहाट होते आहे हेही आपण पाहतो. या पार्श्वभूमीवर आणि तात्त्विक कारणामुळेही ईश्वर, धर्म या संकल्पनांवर प्रश्न उपस्थित करणं, त्या नाकारणं स्वाभाविक आहे. मात्र नकाराच्या पुढे जाऊन  ‘जे काहींना दिसतं आहे ते इतर बहुसंख्यांना का दिसत नाही?’ ‘ईश्वर, धर्म यांचं माणसाच्या मनोव्यापारातील ‘फंक्शन’ काय आहे?’ ‘धार्मिक आणि ईश्वरी ‘डाएट’वरच जर माणसं वाढत असतील तर एक वेगळं डाएट चांगलं आहे हे पटवून देण्यासाठी काय करावं लागेल?’ हे प्रश्न विचारणंही गरजेचं आहे. या संदर्भात एक मुद्दा मांडावासा वाटतो. ‘राजकारण’ हा शब्द ऐकला की आपल्या मनात एकदम नकारात्मक भावना उत्पन्न होते. स्वार्थ, सत्तास्पर्धा, त्याकरता विधिनिषेधशून्य मार्गांचा वापर हे सत्तेच्या राजकारणाचं स्वरूप डोळ्यासमोर येत असल्याने असं होतं. पण ‘राजकारण’ ही एक व्यापक संज्ञा आहे आणि ‘सत्ता व्यवहार’ या दृष्टीने पाहता आपल्या घरात, नातेसंबंधांतदेखील राजकारण असतं हे आपल्याला मान्य होईल. आपण – मानव समूह म्हणून – राजकरणापासून मुक्त असू शकत नाही. ईश्वर, धर्म या संकल्पना त्यांच्या मुळातील स्वरूपापासून बदलत बदलत पक्षीय, सांस्कृतिक राजकारणाचे महत्त्वाचे आयाम म्हणून स्थिरावल्या आहेत. या संकल्पनांचा पुरेपूर वापर करून समाजमानस पुरेसं कमकुवत केलं गेलं आहे. चिकित्सेचा अवकाश कमी कमी होत गेला आहे. असं असताना जडवादाचं ‘व्यापक राजकारण’ कसं असावं हा विचार केल्याखेरीज निव्वळ नकाराने काही साध्य होईल असं दिसत नाही. ज्यांना ‘काही अधिक समजलं आहे’ त्यांनी हे अधिकचं ज्ञान समूहात सार्वत्रिक करण्याचे कल्पक मार्ग शोधल्याशिवाय ते ज्ञान, ती विचारदृष्टी विशिष्ट लोकांपुरतीच सीमित राहते.

‘जडवाद’ या आपल्या छोट्या पुस्तकाच्या प्रास्ताविकात लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटलं आहे – 

अनीश्वरवादाला ‘जडवादा’वाचून मुळीच महत्त्व नाही. एकाच वादाच्या जडवाद व अनीश्वरवाद या दोन बाजू आहेत. जडवाद ही विधायक (पॉझिटिव्ह) बाजू असून अनीश्वरवाद ही अभावात्मक (निगेटिव्ह) बाजू आहे. जडवादाची विधायक विचारसरणी बरोबर व निश्चित लक्षात घेतली म्हणजे त्यातून अनीश्वरवाद आपोआप सिद्ध होतो. जडवादाची किंवा विज्ञानाची बौद्धिक भूमिका ज्याच्या नीट लक्षात येईल, त्याच्या बुद्धीत ईश्वराला भूमी मिळूच शकत नाही. मिळाल्यास ती एक बाकीच्या व्यवस्थित विचारसरणीशी विसंगत असलेली व परंपरागत श्रद्धेने राखून ठेवलेली कल्पना होय, असेच म्हणावे लागेल.

वरील उद्धृतामधील ‘विधायक बाजू’ आणि ‘अभावात्मक बाजू’ या संज्ञा लक्षात घेण्यासारख्या आहेत. ‘ईश्वर नाही’ असं म्हटलं की त्यातील नकारामुळे ‘मग काय आहे?’ हा प्रतिप्रश्न लगेच विचारला जातो. ‘ईश्वर आहे’ हा दावा असणार्‍यांनी आपला दावा सिद्ध करावा असं म्हटलं की त्यावर विविध प्रकारे उत्तरं येतात. ‘हवा दिसत नाही, पण ती असतेच. त्यासाठीही तुम्ही पुरावा मागणार का’ वगैरे ठरलेले प्रतिप्रश्न येतात. यातून वितंडवाद सुरू होतो. जडवादाची सविस्तर मांडणी – विधायक बाजू – बाजूला पडते. इथे आपल्या असं लक्षात येईल की ‘धारणांशी सामना’ म्हणजे ‘मनुष्याशी सामना’ असतो आणि मनुष्य हे सलग, एकरेषीय असं घटित नाही. विविध धारणांचा, त्यांच्या रचनेचा विचार करताना, त्यांना भिडताना ‘धोरणात्मक दृष्टी’ (राजकीय दृष्टी) महत्त्वाची ठरते. या दृष्टीने पाहता ईश्वराच्या रोमांचकारक कल्पनेला आव्हान देताना जडवादी मांडणी पहिल्या टप्प्यावर तरी रंजक-रोमांचक, कथात्म पद्धतीने प्रस्तुत करता येईल का, सृष्टीच्या उत्पत्तीमागील रहस्य उलगडणे याबरोबरच माणसाच्या अशांत, अस्थिर अंतर्मनाला आधार देण्यासाठी काय करता येईल यावर मंथन होणं आवश्यक आहे.

अखेरीस या संदर्भाने काही मुद्दे मांडावेसे वाटतात.

  • ‘प्रबोधन’ हा शब्द न वापरता प्रबोधन करता येईल का हा शोध घ्यायची आज गरज आहे. ‘आपल्याला कुणीतरी शिकवायला आलं आहे’ ही भावना बहुसंख्यकांना निरुत्साही करणारी असते. विशेषतः माणसाच्या मुळातल्या अस्थिर मनोवृत्तींवर आज माहितीच्या स्फोटाने, समाजमाध्यमांनी, धार्मिक-राष्ट्रवादी उन्मादाने जे परिणाम केले आहेत त्याचे बरेच आयाम आहेत. अस्थिरतेत भर घालण्याबरोबरच स्वतःविषयीचा अस्थानी आत्मविश्वास वाढणे, स्वप्रतिमेत आणि समोर आलेल्या आयत्या माहितीत गुंग होणे हाही एक आयाम आहे. या पार्श्वभूमीवर आपण ज्या भाषेत संवाद साधू पाहतो ती समोरच्याला आपल्यापासून दूर लोटते आहे का हे पाहणं आवश्यक ठरतं. ‘नवा माणूस निर्माण करणं’ या उद्दिष्टाआधीचं उद्दिष्ट ‘माणूस जोडणं’ हे असायला हवं.    
  • देव-धर्म-श्रद्धा याबाबतची बहुसंख्य समाजाची संवेदनशीलता लक्षात घेता ‘नकारा’ची दृष्टी न ठेवता ‘धर्माचा विवेक’, ‘श्रद्धेचा विवेक’ अशासारख्या शीर्षकांनी आपली मांडणी करता येऊ शकेल. (‘विवेक’ केंद्रस्थानी ठेवून ही मालिका पुढे राजकीय विवेक, भौतिक विकासाचा विवेक अशी पुढे जाऊ शकते.)
  • वैज्ञानिक विचार, परिवर्तनाचा विचार हे ‘काहीतरी वेगळं आहे’ म्हणून मुख्य धारेतील सांस्कृतिक विश्वापासून दूर राहिलेलं आहे. त्यांना लोकांच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग बनवण्याच्या दृष्टीने वैज्ञानिक विषयांवर आधारलेली, चिकित्सेचा विचार झिरपवणारी काही छोटी ‘मोड्यूल्स’ तयार करून ती विविध सांस्कृतिक माध्यमांतून प्रसारित करता येतील का यावर विचार होऊ शकतो.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत सांगीतिक कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, गप्पांचे कार्यक्रम, एकपात्री प्रयोग, स्टँड-अप कॉमेडी या आणि इतर फॉर्मेट्सचा वापर उत्क्रांती, मानसशास्त्र, मेंदूविज्ञान, इहवाद यांची ओळख करून देण्यासाठी कसा होऊ शकेल हा विचार करता येईल. उदा. आपल्या विचार-विकारांच्या मुळाशी मेंदूत स्रवणारे हॉर्मोन्स असतात. या हॉर्मोन्सना व्यक्तिरूप देऊन एखादी एकांकिका बसवता येऊ शकेल का? ‘माणूस दोन पायावर चालू लागला’ किंवा ‘माणूस बोलू लागला’ याची गोष्ट नाट्यरूपात सादर होऊ शकेल का? इ.  
  • प्रागतिक विचारांना धरून उभ्या राहिलेल्या मूल्यसंकल्पना त्यांच्या मूळ स्वरूपाच्या पातळीवर परिस्थितीनिरपेक्ष, ‘वास्तव’निरपेक्ष असल्या तरी सामाजिक वास्तवाच्या संदर्भात जेव्हा त्या उभ्या राहतात तेव्हा वास्तवाच्या शक्तींपुढे त्या निष्प्रभ ठरू शकतात. समाजाचा एकूण जीवनविकास कमालीचा असमान असताना मूल्यसंकल्पनांचा विकास समान व्हावा ही अपेक्षा गैरलागू ठरते; खरं तर असंवेदनशीलही ठरते. आर्थिक असुरक्षिततेचा सामना करणारे असंघटित क्षेत्रातील असंख्य कामगार, जातीय शोषणाचा आजही बळी ठरणारे हजारो दलित, जिवाचीदेखील सुरक्षितता मिळत नाही अश्या परिस्थितीत काम करणारे भारतातील सफाई कामगार या आणि अशा अनेक समाजघटकांच्या संदर्भात विवेक, नास्तिक्य किंवा इतर संकल्पना कोणत्या स्वरूपात उभ्या राहतील? या मोठ्या वर्गाच्या दृष्टीने ‘विवेकी विचार’ म्हणजे काय असेल? प्रबोधनाची चळवळ समाजातील या मोठ्या वर्गासंदर्भात ‘विवेक’ या संकल्पनेचा विचार कशी करते? हे प्रश्न टाळता येणारे नाहीत.
  • समाजाचं होत आलेलं ‘वर्गीकरण’ लक्षात घेता आपली विचारदृष्टी/मांडणी विशिष्ट वर्गाच्या विशिष्ट प्रश्नांना कवेत घेऊ शकते का? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. त्या दृष्टीने पाहता विवेकवादी चळवळीबरोबरच सामाजिक न्यायाचे, मानवी प्रतिष्ठेसाठीचे लढेही अग्रक्रमावर येतात आणि विवेकवादी चळवळीचा त्यांच्याशी समन्वय साधला जातो आहे का, धोरणात्मक देवाण-घेवाण होते आहे का, हे तपासत राहणं आवश्यक ठरतं.
('आजचा सुधारक'च्या 'बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य' या विशेषांकात (ऑक्टोबर २०२२०) प्रकाशित. -  https://www.sudharak.in/2020/10/3812/)

No comments:

Post a Comment