कॉँग्रेसने केलेलं मुस्लिमांचं लांगूलचालन हा हिंदुत्ववादी राजकारणाचा एक प्रमुख, किंबहुना एकमेव, आधार आहे. हा मुद्दा हिरीरीने मांडताना त्याबाबतचे अनेक जोडमुद्दे लक्षात न घेतले जाणं हाही अर्थातच या राजकारणाचा भाग आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका विधानाच्या निमित्ताने भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी १४ मे रोजी जो लेख लिहिला आहे तो याची साक्ष आहे. विजय वडेट्टीवार यांच्या विधानाच्या संदर्भाने राज्याचे माजी पोलीस महानिरीक्षक आणि 'हू किल्ड करकरे?' या पुस्तकाचे लेखक एस. एम. मुश्रीफ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की न्यायालयाच्या निकालात हे स्पष्ट म्हटलं आहे की हेमंत करकरे यांच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या या अजमल कसाब किंवा इस्माइल खान यांच्या बंदुकीतून झाडल्या गेल्या नव्हत्या. मुश्रीफ यांनी या प्रकरणाचा जो अभ्यास केला त्यात त्यांना हेमंत करकरे यांच्यावर संजय गोविलकर या सहायक पोलीस निरीक्षकांच्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या गेल्या होत्या असं आढळलं. संजय गोविलकर आरएसएसशी संबंधित आहेत असा मुश्रीफ यांचा दावा आहे. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे मुश्रीफ यांनी एक अहवाल तयार करून तत्कालीन सरकारकडे दिला; पण त्यावर पुढे काही कारवाई झाली नाही.
ही घटना जेव्हा घडली तेव्हा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं. आता प्रश्न असा की सरकार काँग्रेसचं असूनही जर मुश्रीफ यांच्या अहवालावर काही कारवाई झाली नसेल तर हे सरकार मुस्लिमधार्जिणं नसून हिंदूधार्जिणं आहे असं म्हणता येईल का? विनय सहस्त्रबुद्धे तसं म्हणतील का? मुस्लिम समाजाची मर्जी राखणं हा काँग्रेसचा परंपरागत अजेंडा राहिला आहे असं सहस्त्रबुद्धे लिहितात. काम संजय गोविलकर या आरएसएसशी संबंधित अधिकाऱ्यांना वाचवण्याचं काम काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने केलं तर हा हिंदू समाजाची मर्जी राखण्याचा प्रयत्न आहे असं विनय सहस्त्रबुद्धे म्हणतील का?
अजमल कसाबने झाडलेल्या गोळीने हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला नसला तरी तो फक्त एक मुद्दा आहे. अजमल कसाबने गोळ्याच झाडल्या नाहीत असं कुणीच म्हणत नाही आहे. अर्थात या प्रकरणातील सत्य काय याबद्दल आपण अंतिम निर्णय न देणं योग्य. हेमंत करकरे यांचा मृत्यू असो की गोध्रा येथे साबरमती एक्प्रेसचा डबा पेटल्याचं / पेटवून दिल्याचं प्रकरण असो की आणखी एखादं प्रकरण असो, सत्यापर्यंत पोचण्यासाठी पुष्कळच मेहनत घ्यावी लागते आणि हाती जे येईल ते पूर्ण सत्य आहे असा दावा आपण करू शकतो का हा एक मोठाच प्रश्न आहे. सत्य हे कल्पितापेक्षा अद्भुत असतं असं म्हणतात. सत्य हे अद्भुत असेल/नसेल, काही बाबतीत ते अप्राप्य नक्कीच असावं.
काँग्रेसने खिलाफत चळवळीला दिलेल्या पाठिंब्यापासून सुरुवात करून विनय सहस्त्रबुद्धे यांनी मुस्लिम लांगूलचालनाच्या आणखी काही घटनांचा तपशील दिला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या प्रांतिक निवडणुकांमध्ये बंगाल, नॉर्थ वेस्ट फ्रंटीयर, पंजाब व सिंध प्रांतात हिंदू महासभा व मुस्लिम लीग यांनी युती करून काँग्रेस विरोधात निवडणूक लढवली होती. १९४३ साली सिंध प्रांत युती सरकारने वेगळा पाकिस्तान बनवण्यासाठी ठराव पास केला. या सरकारमध्ये हिंदू महासभेचे ३ मंत्री होते. कुणीही विरोध केला नाही. गांधी फाळणीला जबाबदार होते, मुस्लिमधार्जिणे होते म्हणून त्यांचा खून करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांच्या पिस्तुलांना कासिम रझवी दिसला नाही. निझाम व जिना दिसले नाहीत. या पिस्तुलातील गोळी इ.स. १९२० नंतर इंग्रजांच्याही विरोधात झाडली गेली नाही - हे सदर लेखक म्हणत नाही तर नरहर कुरुंदकरांनी 'शिवरात्र' या त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे.
या उदाहरणांच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववाद्यांनादेखील मुस्लिमधार्जिणे म्हणता येईल. मग तसं म्हणायचं का? की आज निवडणूक आचारसंहिता नरेंद्र मोदी सोडून जशी सगळ्यांना लागू होते तसंच मुस्लिमांशी सख्य केलं, जिथे विरोध करायला हवा तिथे केला नाही तरी हिंदुत्ववादी हिंदूधार्जिणेच राहतात? स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात धर्मनिरपेक्षता राखली गेली नाही. मुस्लिमांचा अनुनय झाला. तसाच तो काही प्रमाणात हिंदूंचाही झाला. काँग्रेसने धार्मिक अनुनय केला नाही असं म्हणताच येणार नाही, म्हणूही नये. पण त्याचं राजकारण करत असताना हिंदुत्ववादी विचारधारेमधील विसंगतींकडेही लक्ष वेधलं जाणारच. हिंदुत्ववादी सातत्याने काँग्रेस आणि गांधींकडे बोट दाखवतात; पण गांधींना फाळणी रोखण्यात अपयश आलं तरी गांधी लढले होते हे कसं नाकारायचं? शिवाय फाळणी झाली ते योग्य झालं असं म्हणणारेही अनेक अभ्यासक आहेत. सावरकरवादी अभ्यासक शेषराव मोरे यांचंही हे मत आहे. हिंदुत्ववादी स्वतः लढ्यात उतरले नाहीतच; पण त्यांनी गांधींवर मनसोक्त तोंडसुख घेतलं. कुरुंदकर लिहितात - हैद्राबादचा लढा हा तर मुस्लिमविरोधी होता. भारताची एकात्मता निर्माण करणारा होता. हिंदुत्ववाद्यांनी या लढ्यात तरी काय भाग घेतला ? शक्ती लहान असणे हा गुन्हा नसतो. स्वातंत्र्यलढा चालू असताना शक्ती न वापरणे हा मात्र गुन्हा असतो!
मुस्लिम समुदाय हा समाजघटक एकूण सामाजिक-आर्थिक प्रगतीत मागे राहिला हा विनय सहस्त्रबुद्धे यांचा मुद्दा मात्र बरोबर आहे. त्यासाठी आजवरच्या सरकारांचं मूल्यमापन व्हावंच. शिवाय आपल्या सामाजिक-मानसिक घडणीचंही मूल्यमापन व्हावं. कारण मुस्लिम समाजाचं 'घेटोयाझेशन' होण्याच्या मुळाशी याही घटकाचा सहभाग आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर तिहेरी तलाकवर आलेली बंदी, पारंपरिक मुस्लीम कारागिरांसाठी ‘हुनर हाट’सारख्या योजना यामुळे देशातील मुस्लिम सरकारला धन्यवाद देत असतील असं सहस्त्रबुद्धे यांनी लिहिलं आहे. जे सकारात्मक बदल झाले आहेत त्यांचं अर्थातच स्वागत आहे. फक्त प्रश्न असा की ही सकारात्मकता सर्वव्यापक आहे का? सहस्त्रबुद्धे यांच्या लेखाच्या बाजूच्या पानावर ज्युलिओ रिबेरो यांचाही लेख आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचाराच्या सभेत मुस्लिम समुदायाबद्दल जे द्वेषयुक्त उद्गार काढले त्याविषयीचा हा लेख आहे. सत्तेचा वरदहस्त मिळाल्याने आज मुस्लिम समुदायाला उघडपणे, सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. एका फेसबुक ग्रुपवर झालेल्या ट्रोलिंगची दखल खुद्द 'लोकसत्ता'ने अलीकडे अग्रलेख लिहून घेतली होती. धार्मिक ध्रुवीकरण टोकाला पोचलं आहे. भर संसदेत भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी मुस्लिमांबद्दल अपशब्द उच्चरले होते. आता खुद्द पंतप्रधान त्यांना सामील झाले आहेत. याबद्दल मुस्लिम समाज मोदींना धन्यवाद देत असेल की कसं? विनय सहस्त्रबुद्धे यांचं यावर काय मत आहे? मुख्य म्हणजे 'मुस्लिम कट्टरतेला (आणि मुस्लिम तुष्टीकरणाला) उत्तर' या गृहीतकावर सुरु झालेला हिंदुत्ववादी राजकारणाचा प्रवाह आता हिंदूंना तितकंच कट्टर करतो आहे. एखाद्या धार्मिक समूहाची कट्टरता हा जर प्रश्न असेल तर तो कायदा-सुव्यवस्थेच्या आधारे हाताळायला जायला हवा. तो धार्मिक उन्मादानेच हाताळला जातो आहे. ही कुणाला धन्यवाद देण्याजोगी गोष्ट आहे का?
'हिंदू-मुस्लिम संबंधांचं एकूण गतिशास्त्र' हा विषय राजकारणाच्या कक्षेत गेल्याने या विषयाचं फार मोठं नुकसान झालं आहे. या विषयावरील चर्चा राजकीय परिप्रेक्ष्यातच पाहिली जाते. हे बदलायला हवं. शिवाय एका दीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासातील काही उदाहरणे घेऊन अमुक पक्षाची ही चूक तर तमुक पक्षाची ही चूक असं करत बसण्यात खरं तर काही हशील नाही. राजकारणाची सोय म्हणून त्यातून लोकांचं (पक्षी : मतपेढीचं) 'पर्सेप्शन बिल्डिंग' होतं; पण आपली एकूणातली 'सामाजिक समज' कुठल्याच अर्थाने पुढे जात नाही. धार्मिक राजकारण घातक आहे ते या दृष्टीने.
No comments:
Post a Comment