Saturday, June 9, 2018

स्वतंत्र आणि समग्र

मागच्या लेखाच्या शेवटी आपण भारतीय आणि पाश्चिमात्त्य मानसिकतेतील फरकाबाबत बोलायला सुरूवात केली होती. हा विषय थोडा गंभीर आहे आणि यावर नीट बोललं गेलं पाहिजे. मुख्य म्हणजे केवळ भारतीय-पाश्चिमात्त्य तुलना इतकंच नव्हे तर एकूणात आपण कोणत्याही बाबतीत जेव्हा 'तुलनात्मक टिप्पणी' करतो तेव्हा त्याला जोडून काही गोष्टी येतात त्या लक्षात घेणं आवश्यक असतं. 

माध्यमांचा प्रसार, व्यावसायिक व इतरही कारणांमुळे वाढलेली माणसांची वाहतूक यामुळे आज जग कधी नव्हे इतकं जवळ आलं आहे. वृत्तपत्रे, रेडिओ, मग टेलिव्हिजन, चित्रपट यामुळे बसल्या जागी भिन्न संस्कृतींचं दर्शन होऊ लागलं होतंच. अलीकडे इंटरनेटमुळे त्यात मोठी भर पडली. व्यक्तींचा प्रत्यक्ष संवाद सोपा झाला. टीव्ही, चित्रपट, इंटरनेट या गोष्टी आपल्या घराच्या खिडक्या म्हणून काम करू लागल्या आणि या खिडक्यांमधून बाहेरचं जग दिसू लागलं. या जगाविषयीचे ठोकताळे बांधता येऊ लागले. जे प्रत्यक्षात परदेशी गेले, राहिले त्यांना जो 'संस्कृती संघर्ष' अनुभवायला मिळाला असेल तो खिडकीतून बाहेर बघणाऱ्यांना अनुभवायला मिळणार नाही. त्यामुळे त्यांच्या आकलनाला मर्यादा पडणारच. परंतु खिडकीतून दिसणाऱ्या जगामुळे अधिक-उण्या दोन्ही बाजूंची किमान ओळख करून घेणं शक्य झालं. अमेरिकेतील मुक्त जीवनशैलीमुळे प्रभावित होत असतानाच याच खिडक्यांवाटे ज्यांची नोम चॉम्स्कीसारख्या विचारवंताशी ओळख झाली त्यांना अमेरिकन साम्राज्यवादाचं भीषण रूपही दिसलं. अमेरिकेचं परराष्ट्र धोरण, शासनपुरस्कृत भांडवलशाही याबाबत चॉम्स्की यांनी केलेलं लेखन मोलाचं आहे. त्यामुळे माझ्यासारख्या 'खिडकीतून बाहेर बघणाऱ्या' माणसाला अमेरिकन समाजजीवनातील काही पैलूंनी आकर्षित केलं तरी हे अमेरिकेचं संपूर्ण दर्शन नव्हे हे लक्षात ठेवावं लागतं. इथे आपण एक गोष्ट लक्षात घेऊ. आपण एखाद्या विचाराकडे जेव्हा आकर्षित होतो तेव्हा ती काहीशी 'मायक्रोस्कोपिक' दृष्टी असते. त्या विशिष्ट विचारापुरतीच ती असते. तो विचार बाळगणाऱ्या माणसाच्या, मानवसमूहाच्या एकूण जगण्याचं मूल्यमापन त्या विचारावरून करता येत नाही. तिथे 'डायकॉटॉमी' (विरोधाभास) असूच शकते. इतिहासात-वर्तमानात अनेक ठिकाणी हे आढळून येईल. हिटलर हे नाव घेतल्यावर आपल्या मनात कुठलीच सकारात्मक भावना येऊ शकत नाही. पण याच हिटलरने काही अप्रतिम चित्रं काढली आहेत. त्यामुळे हिटलर वाईट असला तरी त्याची चित्रं चांगली असू शकतात हे नाकारता येत नाही. त्याचं त्या क्षेत्रात काही सकारात्मक योगदान असेल तर त्याची नोंद घ्यावी लागते. याच न्यायाने मला अमेरिकन, युरोपियन किंवा अन्य कुठल्याही समाजातील काही विशिष्ट बाबी आवडल्या, घेण्याजोग्या वाटल्या, तर त्या बाबतीत ते योग्य असतं. तो समाज इतर बाबतीत कसा आहे हा वेगळा मुद्दा असतो. व्यक्तिशः मला पाश्चात्त्य समाजातील नातेसंबंधांविषयीची प्रगल्भता आकर्षित करते, पण त्या समाजातील उपभोक्तावाद अडचणीचा वाटतो. म्हणजे मला एकाच वेळी 'स्वतंत्रपणे' आणि 'समग्रपणे' बघता यायला लागतं. यातून एक महत्त्वाची गोष्ट साध्य होते. आपण बहुविधता लक्षात घेऊ लागतो. आपल्याला अपील होणाऱ्या गोष्टींच्या दर्शनाने आपण वाहवत जात नाही. या बहुविधतेच्या खोलात जाणंही समाजशास्त्रीय-मानसशास्त्रीय दृष्ट्या मोठं रोचक असू शकतं. अनेक विरोधाभास समोर उभे राहतात आणि त्यांची उकल करण्यातली मौज अनुभवता येते. सामाजिक अभ्यासाचा हा पैलू विशिष्ट संस्कृती, विशिष्ट मानसिकतेच्या विकासक्रमाशी जोडलेला आहे. यात मौज आहे तशीच दमणूकही आहे. कारण सामाजिक अभ्यास हा गणित किंवा पदार्थविज्ञानासारखा नियमांनी बांधलेला नसतो. 'माणूस' या एककाशी जोडल्या गेलेल्या अनेक गोष्टी असतात. इतर माणसांशी जोडल्या गेलेल्या गोष्टींशी त्यांचा संपर्क येतो आणि समाजाचं गतिशास्त्र निर्माण होऊ लागतं. त्यामुळे भारतीय असे आहेत, अमेरिकन्स असे आहेत, जपानी असे आहेत या टिप्पण्यांकडे स्थूलमानाने बघावं लागतं. हे इतरही बाबतीत लागू होईल. म्हणजे अगदी काँग्रेस हा पक्ष असा आहे, लोकसत्ता हे वर्तमानपत्र अमुक प्रकारचं आहे, डावे असे असतात, उजवे असे असतात अशी विधानं स्वतंत्र टिप्पणी करत असतात. समग्र टिप्पणी एक-दोन विधानांमधून करताच येत नाही. त्यासाठी कार्यकारणभावाच्या खोलात जावं लागतं.

या पार्श्वभूमीवर हे लक्षात घेऊ की सामाजिक संदर्भात सामान्यीकरण करणाऱ्या विधानांकडे विशिष्ट निरीक्षण म्हणून पाहावं. मला पाश्चिमात्त्य समाज अधिक प्रयोगशील दिसतो आणि भारतीय समाज स्थितीशील दिसतो हे एक विशिष्ट निरीक्षण आहे. यात सामान्यीकरण आहे, पण ते काही अंशी अपरिहार्यही आहे. कारण एखाद्या समाजाची साधारण रूपरेषा विशद करण्यासाठी ते आवश्यक आहे. पाश्चिमात्त्य समाज प्रयोगशील आहे तर का आहे आणि भारतीय समाज स्थितीशील असला तर का आहे याचा शोध घ्यायला सुरूवात केली तर बरीच तथ्ये समोर येऊ शकतील. दोन्ही समाज  इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असल्याने त्यांच्यात हा फरक आहे असंही उत्तर असू शकेल. मुख्य म्हणजे प्रयोगशील असो वा स्थितीशील - त्या समाजाचा 'क्रॉस सेक्शन' घेतला तर आपल्याला स्थिर, शांत, विचारी किंवा  विचारातून आलेली 'अस्थिर शांतता' अनुभवणारी माणसं अधिक दिसतात की एकूणात दुःखी माणसं अधिक दिसतात हेही पाहता येईल. 

तुलनात्मक टिप्पणीविषयी आपण थोडं सविस्तर बोललो, पण ते आवश्यक आहे असं मला वाटतं. विशेषतः सध्या दीर्घ विवेचनापेक्षा थोडक्यात लिहिलेल्या मजकुराचा प्रभाव जास्त पडताना दिसतो. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप या समाजमाध्यमांद्वारे हे होताना आपण पाहतो. इथे होणाऱ्या स्वतंत्र विधानांचा आणि सामान्यीकरणाचा धोका असा की ते भडक पद्धतीने, नकारात्मक भावना ट्रिगर होतील अशा पद्धतीनेही होतं. त्यातून ध्रुवीकरणाखेरीज काही साध्य होत नाही. आपण जेव्हा आपल्या निरीक्षणाच्या आधारे एखादं सामान्यीकरण कसणारं विधान करतो तेव्हा त्याच्या पुष्ट्यर्थ काही मुद्दे मांडता येणं गरजेचं असतं. त्यामागे आपलं म्हणून काही आकलन आहे का, आपला म्हणून काही विचार झाला  आहे का हे तपासणं आवश्यक असतं. सामान्यीकरण न करता बोलायचं ठरवलं - म्हणजे समग्रपणेच बोलायचं ठरवलं तर बहुधा आपलं बोलणं अगदीच नाहीसं होईल कारण समग्रतेला कवेत घेणं सहजसाध्य नसतं. जवळजवळ अशक्यच असतं. हे समजण्यासारखं आहे. त्यामुळे आपण तेवढी सूट स्वतःला द्यावीच. पण स्वतंत्र विधानाच्या पलीकडे समग्र म्हणून काही आहे, तिथे पोचण्याचा आपला प्रयत्न तरी असला पाहिजे याची जाणीव जागी असली तर आपला वैचारिक प्रवास अधिक समृद्ध होतो. 

नातेसंबंधांच्या अधिक निरोगी रचनेबाबत मला 'खिडकीतून' जे दिसलं आहे ते आश्वस्त करणारं आहे. वर आपण बोललो आहोत तसं खिडकीतून पूर्ण सत्य नाहीच कळणार, पण जे दिसलं ते महत्त्वाचं आहे आणि आपल्याकडे हे 'मिसिंग' आहे ही जाणीव मात्र मला खोडता आली नाही. पुलंनी पौर्वात्य आणि पाश्चिमात्त्य संस्कृतीबाबत 'त्यांची द्राक्ष संस्कृती आणि आपली रुद्राक्ष संस्कृती' असा एक विनोदी उल्लेख केला आहे. आज भारतातही द्राक्ष संस्कृती पाय रोवून उभी राहिली आहे आणि रुद्राक्ष संस्कृतीही आहेच, पण नातेसंबंधांच्या मोकळिकीबाबत, त्यातील  'साक्षरतेबाबत' बोलायचं झालं तर आपण भारतीय 'लेस प्रोग्रेसिव्ह आणि मोअर अ‍ॅग्रेसिव्ह' आहोत आणि पाश्चिमात्त्य 'मोअर प्रोग्रेसिव्ह आणि लेस अ‍ॅग्रेसिव्ह' आहेत असं दिसतं. आणि याचं मूळ व्यक्तिस्वातंत्र्याला मूल्यात्मक मान्यता देऊन त्याची स्पेस विस्तारण्यामध्ये आहे.

Saturday, May 26, 2018

शक्यतांचा विचार आणि स्वीकार

गेल्या नऊ लेखांमधून 'परंपरा आणि नवता' हे मध्यवर्ती सूत्र धरून आपण काही विषयांवर प्रामुख्याने संकल्पनात्मक चर्चा केली आहे. मला असं वाटतं की जेव्हा कुणी वैचारिक स्वरूपाचं काही लेखन करतं तेव्हा त्या लेखनाचा एक मुख्य उद्देश लिहिणाऱ्याने स्वतःचं आकलन वाढवणं हा असायला हवा. वैचारिक लेखन हे मुख्यत्वे संकल्पनांचा, विचारकलहांचा, व्यवस्थात्मक उत्तरांचा धांडोळा घेणारं असतं. त्यात एक प्रभाव हा 'पर्स्पेक्टिव्ह'चाही असतो. विशिष्ट दृष्टीकोन तिथे प्रभावी असू शकतो. त्यामुळे आपण 'अंतिम सत्य' मांडतोय असा लेखकाचा आग्रह नसावा. मानवनिर्मित जग अचंभित करणारं आहे. मौजेचं आहे. कारुण्याचं आहे. दुःखाचं आहे. विवादांचं आहे. या जगाचं आपलं आकलन, आपल्या 'नव्या जगाच्या कल्पना' मांडायची स्पेस लेखकाला मिळायला हवीच, फक्त वर म्हटलं तसं लेखकाचा एक हेतू स्वःताची समज वाढवणं हाही असायला हवा. 

लेखमाला लिहिण्याच्या प्रोसेसमधून हा उद्देश पूर्ण होतो आहे याचं मला समाधान आहे. कधीकधी असाही विचार मनात येतो की आपण उंटावरून शेळ्या हाकतोय का? पण वाचक जेव्हा प्रतिक्रिया देतात, 'वाचून काहीतरी नवीन मिळालं'असं कळवतात तेव्हा बरं वाटतं. अर्थात वाचकांच्या सकारात्मक प्रतिक्रियांबरोबरच इतरांच्या न दिल्या गेलेल्या नकारात्मक प्रतिक्रियाही असू शकतात याची जाणीव मनात जागी असते. परंपरा आणि नवतायाबाबत भारतीय संदर्भात चर्चा अधिक टोकदार होते याचं कारण भारतीय समाजव्यवस्थेच्या रचनेत आहे. ही रचना एकसंध नाही आणि त्याच्या परिणामी, या रचनेचं उत्पादन असलेला भारतीय माणूसही शतखंड आहे. भारत एकाच वेळी सोळाव्या आणि एकविसाव्या शतकात वावरत असतो असं म्हटलं जातं ते खरंच आहे. अमर्त्य सेन यांचं 'आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन' नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक मी वाचलेलं नाही, पण हे शीर्षक मला 'भारतीयत्वा'च्या एका लक्षणाचं अचूक वर्णन करणारं वाटतं. हे आर्ग्युमेंटचं जनुक इथल्या सर्व प्रकारच्या वैविध्यामुळे विकसित झालं आहे आणि एका अर्थी ते उपकारक आहे, पण दुसऱ्या बाजूने नवतेला अटकाव करणारंही आहे. भारतीय उदारमतवादावर आज, विशेषतः राजकीय परिप्रेक्ष्यातून, बरीच टीका होते आहे. (याचा यथायोग्य शोध स्वतंत्रपणे घेता येईल. या लेखमालेत पुढे तो घ्यावा असं माझ्या मनात आहे.) परंतु आपण साधारण निरीक्षण केलं तर असं दिसेल की प्रबोधनाचा, बदलाचा विचार रुजायला भारतीय मातीत थोडा वेळच लागतो. इथली गुंतागुंत 'युनिक' स्वरूपाची आहे. त्यामुळेच परंपरा आणि आधुनिकता या संकल्पनांना भारतीय संदर्भात, विविध परिप्रेक्ष्यात काय अर्थ प्राप्त होतो हे तपासावं लागतं. 

या लेखमालेचा पहिला एक तृतीयांश टप्पा संपत असताना उजळणी म्हणून हे मांडावंसं वाटलं. विशेषतः 'पुरोगामी' या शब्दाभोवती गेल्या काही वर्षात जे नकारात्मक वर्तुळ तयार झालेलं दिसतं त्या पार्श्वभूमीवर आधुनिकतेच्या आग्रहाबरोबरच आधुनिकतेची चिकित्सा करत राहणंही गरजेचं आहे. एखादा विचार स्वतंत्रपणे आकर्षक असतो, पण त्याच्याकडे 'विथ रेफरंस टू रिअ‍ॅलिटी' पाहिलं की चित्र वेगळं दिसतं. 

हे सगळं नोंदवून आता पुढे जाऊ. 

मागील लेखात आपण नातेसंबंधांविषयी थोडं बोललो होतो. आता नात्यांच्या नव्या रचनेबाबत, प्रारूपाबाबत बोलूया. स्वतःची भावनिक साक्षरता तपासत राहणे, त्यात सुधारणा करत राहणे ही निरोगी नात्यांची पूर्वअट तर आहेच. दुसरं असं की व्यक्तिस्वातंत्र्य आणि नात्यांमध्ये अपरिहार्यपणे येणाऱ्या अपेक्षा, त्यातून निर्माण होणारी बंधनं याचा समतोल साधण्याची कला अवगत करून घेणं आवश्यक आहे. भारतीय संदर्भात एक गोष्ट अधोरेखित करायला हवी. 'व्यक्तिस्वातंत्र्य' किंवा मुळात 'स्वातंत्र्य' या संकल्पनेचा ऊहापोह करणं शक्य असलं (आणि तो व्हावा) तरी आपली व्यक्तिस्वातंत्र्याची व्याख्या बरीच अलीकडे थांबते. नात्यांमधलं 'एक्स्प्लोरेशन' - शोध - याला आपण सहसा तयार नसतो. 'टिकवणं चांगलं - बदलणं वाईट' अशी आपली साधारण समजूत आहे. याबाबत किमान 'थॉट एक्सपेरिमेंट' करावा असंही फारसं कुणाला वाटत नाही.त्यातून आहे त्या व्यवस्थेचं गौरवीकरण होऊ लागतं. ती पवित्र वगैरेसुद्धा होते. याचं एक कारण आपल्या भक्कम कुटुंबसंस्थेत आणि तीतून आकारास आलेल्या घट्ट मानसिकतेत आहे. नवं स्वीकारताना पारखून स्वीकारावं याबाबत दुमत नाही, पण नवं समोर आलं की गडबडून जाणं म्हणजे शक्यतांचा विचार केलेला नसणं. हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो 'जीवनकौशल्यां'च्या शिक्षणाशी जोडलेला आहे. 'विविध शक्यता असू शकतात' हा विचारच मनात रुजवला न जाणं तसं गंभीर आहे. इथे पुन्हा एकदा चित्रपट आठवला. रॉबिन विल्यम्स या महान अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेला 'मिसेस डाउटफायर' हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. घटस्फोटानंतर आपल्या मुलांना भेटण्यासाठी स्रीवेष धारण करून बायकोच्या घरी बेबीसिटर म्हणून डॅनियल (रॉबिन विल्यम्स) दाखल होतो. पुढे बऱ्याच गमतीजमती घडतात. शेवटी सत्य उघडकीस आल्यानंतर मुलांच्या आईच्या - मिरांडाच्या (सॅली फील्ड) हे लक्षात येतं की डॅनियल आणि मुलं एकमेकांशिवाय राहू शकणार नाहीत. मुलांची कस्टडी तिच्याकडे असते. त्यात बदल करायला ती तयार होते आणि डॅनियल त्याच्या मूळ रूपातच मुलांना भेटायला रोज येऊ लागतो. डॅनियल आणि मिरांडा घटस्फोटितच राहतात. चित्रपटाच्या शेवटी डॅनियलचा एक मोनोलॉग आहे. तो आता एक टीव्ही शो करतो आहे. एका घटस्फोटित दांपत्याच्या मुलीने लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना तो म्हणतो की कुटुंबाचे विविध प्रकार असू शकतात. विविध व्यवस्थांनी कुटुंब तयार होऊ शकतं आणि या सर्व व्यवस्थांमध्ये कुटुंबातील प्रेम टिकू शकतं. मला हा मोनोलॉग फार आवडला. डॅनियल-मिरांडामध्ये आणि त्यांच्या कुटुंबामध्ये जे घडतं ते घडतंच, पण अखेरीस 'ते दोघे पुन्हा एकत्र आले आणि सुखाने संसार करू लागले'असं होत नाही. ते वेगळेच राहतात. आपण आता वेगळं राहणं श्रेयस्कर आहे हे त्यांना समजलेलं असतं. या वेगळ्या राहण्यातही मुलांची व्यवस्था नीट लागते. त्या दोघांमधला संवादही सुरू राहतो. आता हे चित्रपटातील कल्पनाचित्र आहे हे बरोबर, पण किमान कल्पनेत तरी काही नवीन घडतं आहे याचं मला समाधान वाटलं. 

याच चित्रपटाचा हिंदी रीमेक 'चाची ४२०' या नावाने आला होता. कमल हासनसारख्या ताकदवान अभिनेत्याने यात प्रमुख भूमिका केली होती. दिग्दर्शकही तोच होता. पण चित्रपट 'मिसेस डाउटफायर'ची उंची अजिबात गाठू शकला नव्हता. कमल हासनने स्रीवेष घेतल्यावर त्याचा घरमालक आणि सासरा त्याच्याकडे आकृष्ट होणं हे तर अतिशय टिपिकल होतं आणि आपल्या मानसिकतेचं द्योतकही होतं. चित्रपट बऱ्याच ठिकाणी बटबटीत होता. अखेरीस अपेक्षेप्रमाणे नवरा-बायको एकत्र येतात आणि सुखाने संसार करू लागतात हे होतंच. 'मिसेस डाउटफायर' आणि 'चाची ४२०' हे मानसिकतेतील फरकाचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. 'बीइंग इंडियन'मध्ये काही गोष्टी अनुस्यूत असल्यासारख्या धरल्या जातात. त्याची गरज आहे का असा प्रश्न पडतो. हा जो मोल्ड तयार झाला आहे तो आपण ब्रेक का करू शकत नाही? मी मागे काही चर्चांमधून मांडलेला मुद्दा इथेही मांडतो. भारतीय तत्वज्ञान परंपरेतील विविध विचारप्रवाह पाहिले तर आपल्या लक्षात येईल की इथे मनुष्य आणि सृष्टीच्या नात्याचा खोलवर विचार झाला आहे. भारतीय इतिहासाला जातीय विभाजनाचा मोठा विवादास्पद पैलू आहे. परंपरेचा अभिमान बाळगणारे बरेचजण या पैलूकडे बहुतेकदा दुर्लक्ष करतात. परंतु हे मान्य केलं तरी भारतीय तत्त्वज्ञानात वैचारिक खाद्य पुष्कळ आहे हेही खरं. मला असं दिसतं की आपण या वैचारिक बैठकीकडे, तात्विक संघर्षाकडे दुर्लक्ष करतो आणि आपली परंपरा लग्न-कुटुंबसंस्था-जातीव्यवस्था  यांच्या भक्कमपणापुरती मर्यादित ठेवतो. (ज्या लेखामुळे र. धों. कर्व्यांवर पहिला खटला भरला गेला त्या लेखात (व्यभिचाराचा प्रश्न) त्यांनी हिंदू परंपरेतील दाखले देऊन स्री-पुरूष संबंधात आता अनैतिक ठरवल्या गेलेल्या कृत्यांना एकेकाळी मान्यता होती हे दाखवून दिलं आहे. महाभारत, कामसूत्र यांचा आधार घेत ते हे मांडतात.) मुद्दा असा की आपण जर आपल्या वैचारिक परंपरेचा आधार घेतला तर कुटुंब, नातेसंबंध याबाबत प्रयोग करणं, त्यातील नवतेला सामोरं जाणं आपल्याला जड जाणार नाही. कुटुंबसंस्था भक्कम असणं, मानवी नात्यांमध्ये ओलावा असणं आवश्यकच आहे. हे मुळातच इथे असल्याने आपल्याला बिचकून जायचं काही कारण नाही. पण दिसतं असं की आपण थोडे बिचकतो आणि ज्यांची कुटुंबसंसंस्था मोडकळीस आली आहे असा आपला दावा असतो ते पाश्चिमात्त्य मात्र प्रत्यक्षात नव्या रचनेचा स्वीकार (कल्पनेत तरी नक्कीच) करताना दिसतात.  

या मुद्द्यापाशी थांबू आणि पुढील लेखात यावर अधिक सविस्तरपणे बोलू.

Saturday, May 12, 2018

तुझे आहे मनापाशी

माझ्या आईने लहानपणी केव्हातरी सांगितलेली एक गोष्ट आहे. महंमद पैगंबरांची. ती खरी-खोटी-दंतकथा जी काही असेल ती असेल, पण माझ्या चांगली लक्षात राहिली. पैगंबर आणि त्यांचा एक शत्रू - अशा दोघांमध्ये युद्ध चालू आहे. दोघांच्याही तलवारी भिडल्या आहेत. एका क्षणी पैगंबर आपल्या प्रतिस्पर्ध्याला चीत करतात आणि तलवारीचं टोक त्याच्या छातीवर ठेवतात. तो घाबरून देवाचा धावा करू लागतो. 'आता मला कोण वाचवणार?' असं म्हणू लागतो. तेव्हा पैगंबर तलवार बाजूला घेतात आणि त्याचा हात धरून त्याला उठवतात. मग त्याला मिठी मारून म्हणातात. 'मी आहे ना तुला वाचवायला!' 

'एकातलं अनेक असणं' कसं आवश्यक आहे याची जाणीव होत असण्याच्या टप्प्यावर आज ही कथा वेगळ्या महत्त्वाने आठवते. या सदराच्या पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे 'एकावर सगळा भार नाही. जे आहे ते दोघांचं आहे.' हे समजणं माझ्यासाठी महत्त्वाचं ठरलं. आणि विविध संदर्भात पाहू जाता केवळ दोनच नाही तर अनेक घटक एकाच वेळी अस्तित्वात असतात हेही लक्षात आलं. एक गंमतीशीर उदाहरण द्यावंसं वाटतं. 'नटसम्राट' नाटकातल्या प्रसिद्ध स्वगतात गणपतराव बेलवलकर जसं 'मी आहे हॅम्लेट, मी ऑथेल्लो, मी ज्यूलियस सीझर, मी आहे प्रतापराव आणि मी सुधाकर' असं म्हणतात तसं आपणही स्वतःला ‘मी विवेकी, मीच विकारी, मी गोंधळलेला, मी ठाम, मी तर्कशुद्ध, मी भावनिक' असं म्हणू शकतो. वरील कथेत पैगंबर 'दोन भूमिका' निभावतात आणि त्यातून एक शिक्षण होतं. आपण आपल्या अंतरातल्या विविध प्रवाहांकडे शांतपणे बघत, त्यांच्यावर नियंत्रण मिळवत, योग्य वेळी योग्य प्रवाहाला वाट देऊ शकलो तर मानवी नातेसंबंधांना विधायक वळण मिळू शकेल का?

मागच्या लेखाच्या अखेरीस 'मानवी नातेसंबंधांच्या नव्या रचनेबाबत चर्चा करू' असं आपण म्हटलं होतं, पण मला वाटतं आधी 'मानवी नाती' या मूळ विषयाच्या आजूबाजूने थोडं भटकून येऊ. 

आपण माणसं म्हणजे 'जैव उत्पादन' आहोत. आणि हे उत्पादन लक्षावधी वर्षांपासून 'मॉडिफाय' होत आलं आहे. यात ज्या मूलभूत, अस्तित्व टिकवण्याशी संबंधित मनोवृत्ती आहेत त्या टिकलेल्या असल्या तरी त्यातही अनाकलनीय बदल व्हायची शक्यता असते. आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी त्याला डोक्यावर घेणारी माकडीण पाणी वर चढू लागल्यावर पिल्लाच्या डोक्यावर उभी राहते ही गोष्ट आपण वाचली आहे. पण या गोष्टीच्या उलटही घडू शकतं. विशेषतः माणसाच्या बाबतीत. माणसाने सामाजिकतेचा मोठा 'फोर्स' तयार केल्याने हे होतं. त्यामुळे 'माणूस कसा आहे?' याचं एकच एक उत्तर नाही. अठराव्या शतकातील फ्रेंच तत्त्वज्ञ रूसो याने 'आपण निसर्गतः कसे आहोत हे आपल्याला कधीच कळू शकणार नाही' असं म्हटलं होतं. इथे त्याचाही रोख 'निसर्गभावी आकांक्षा-उर्मींकडून समाजभावी आकांक्षा-उर्मींकडे' असणाऱ्या माणसाच्या प्रवासाकडे आहे. माणसाच्या या गतिशील, अनिश्चित रचनेमुळे मानवी नातेसंबंध 'डिफाइन' करणारा एक नेमका धागा पकडता येत नाही. मानवी नातेसंबंधांवर अंतिम असं भाष्य करता येत नाही. 

माणसाला माणूस हवा असतो तसाच तो नकोही असतो. 'हेल इज अदर पीपल' हे सार्त्रचं विधान प्रसिद्ध आहे. माणूस 'स्व' आणि 'पर' या द्वैताशी कायम झुंजत असतो. त्याच्या विचारविश्वाला अनेक पदर असल्याने त्याचे मनोव्यापार एकाच दिशेने जाणारे नसतात. माणसाचं वर्तन घडवणारं माणसाचं मन त्याला अनेक दिशांकडे खेचतं. हे असं सर्वच माणसांचं होतं आणि त्यातून 'नात्यांचं गतिशास्त्र' आकाराला येतं. तुटलेल्या/तुटत चाललेल्या नात्यापासून अगदी घट्ट बांधलेल्या नात्यापर्यंत नात्यांच्या विविध 'श्रेणी' आपण सगळेच अनुभवतो. मानवी नात्यांवर प्रभाव टाकणाऱ्या भावना नात्यासाठी विघातक किंवा विधायक असतात. यात प्रेम, द्वेष, राग, असूया अशा सगळ्याच भावना येतात. यातला 'प्रेम' हा एक 'बॅलन्सिंग फोर्स' आहे. माणसाच्या - खरं तर सर्वच सजीवांच्या मनात 'प्रेम' ही भावना कधी-कशी उत्पन्न झाली, विशेषतः माणसाच्या बाबतीत प्रेमाच्या विविध 'जातकुळी' कशा निर्माण झाल्या हा एक संशोधनाचा विषय आहे. पण माणसाला 'स्व'पासून अंशतः तरी वेगळं करून 'पर'पाशी (ध्यानीमनी नसताना इथे 'परपाश' हा श्लेष झाला आहे!) न्यायची ताकद प्रेम या भावनेत  आहे. स्री-पुरूष संदर्भात किंवा जिथे 'रोमँटिक लव्ह' कार्यरत असतं तिथे 'स्व'आणि 'पर'च्या एकमेकांतील तीव्र गुंतवणुकीमुळे समतोल बिघडतो, पण सामाजिक प्राणी म्हणून माणसाला प्रेम ही भावना तिच्या विविध रूपात (अनुकंपा, मैत्री, कृतज्ञता इ.) एकमेकांशी जोडून घ्यायला, एकमेकांना समजून घ्यायला मदत करते. 'रोमँटिक लव्ह'चं उगमस्थान शोधू गेलं तर ते मानसिक जोडलेपणापाशी सापडू शकतं तसंच शारीरिक जोडलेपणापाशीदेखील सापडू शकतं. प्रेम आणि लैंगिकता हे 'परस्परोद्भव' असू शकतात. प्रेमाच्या इतर जातकुळींचं उगमस्थान नैतिकतेपाशी आहे. नैतिक टोचणीतून त्या निर्माण होतात. अगदी रोमँटिक प्रेमदेखील त्याची तीव्रता कमी होऊ लागली तरी नैतिक टोचणीतून जिवंत राहू शकतं.     

नातेसंबंधांवर प्रभाव टाकणाऱ्या प्रत्येकच विघातक/विधायक भावनेकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन विचार करणे ही 'भावनिक साक्षरतेची' पहिली पायरी आहे. भावना, जाणीव या गोष्टी 'अचल', दरवेळी नेमकेपणाने सांगता येतीलच अशा नसतात. पण तरी 'स्व'ने त्यांच्याकडे सतत लक्ष द्यायला लागतं कारण त्या 'स्व'वर मोठा परिणाम घडवत असतात. आपण प्रेमाचा विचार केला तसाच द्वेषाचा, असूयेचा, इतर भावनांचा करता येईल. तटस्थपणे हा विचार करणं, विविध भावना 'डीकोड' करता येणं आणि 'स्व' व या भावना यात फरक करून 'स्व'ला शांत, स्थिर राखायचा प्रयत्न करणं ही एक हितकारक सवय आहे. आदर्शाच्या पातळीवर आणि व्यवहाराच्या पातळीवर सर्वच बाबतीत फरक पडतो हे अगदी खरं आहे, पण सुरूवात म्हणून आपण जर असं विश्लेषण करू शकलो तर खूप मदत होईल. या विश्लेषणाची पुढची पायरी ज्या संबंधित व्यक्तीबाबत विशिष्ट भावना प्रबळ आहे त्या व्यक्तीशी त्याबाबत बोलता येणं ही आहे. 'खेळघर' या रवींद्र रूक्मिणी पंढरीनाथ यांच्या कादंबरीत 'आपल्या बहुतेक सर्व समस्यांच्या मुळाशी किडलेले नातेसंबंध' आहेत असा उल्लेख आहे. विचार करावा असं हे विधान आहे. नातेसंबंधांचं स्वरूप गुंतागुंतीचं आहे. माणसाच्या मनातील विघातक आणि विधायक भावना, त्यांची विविध रूपे, विभिन्न सामाजिक आणि आर्थिक चौकटी, परिस्थितीजन्य कारणं अशा बऱ्याच कारणांनी मानवी नातेसंबंध घडत किंवा बिघडत असतात. त्याचा एकूण समाजस्वास्थ्यावर परिणाम होत असतो म्हणून त्याविषयी मोकळेपणाने बोललं पाहिजे. 'ब्लॉकेजेस' तपासली पाहिजेत. अस्तित्वात असलेल्या नातेसंबंधांबाबत हे होऊ शकलं तर त्यातून नवीन रचना उत्क्रान्त होऊ शकेल. आपण जर नीट पाहिलं तर असं दिसेल की भावना डीकोड करणं, त्याबाबत बोलणं, नातेसंबंधांचं पुनरावलोकन करत राहणं या 'जीवनकौशल्या'चं शिक्षण आपल्याकडे दिलं जात नाही. एकूणातच 'जीवनकौशल्ये'- लाइफ स्किल्स - हा आपल्याकडे दुर्लक्षित विषय आहे. पौगंडावस्थेतील / तरूण वयातील मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडले तरी आपल्याला संकट आल्यासारखं वाटतं. मग प्रेम, राग, आकर्षण, लैंगिक इच्छा आणि इतर भावनांचे आवर्त प्रत्येकाला आपल्या मनातच जिरवावे लागतात. त्याबाबत बोलायला आपल्याकडे व्यासपीठ नाही. कुटुंबसंस्थेने हे व्यासपीठ खरं तर द्यायला हवं, पण तसं होताना दिसत नाही. भावना व्यक्त करायची योग्य भाषाही आपण नीटशी विकसित करू शकलेलो नाही. त्यामुळे आपल्याला सुरूवात तर मुळापासून करावी लागेल असं दिसतं.          

Saturday, April 28, 2018

मागे, मध्यात आणि पुढे

माझ्या काही आवडीच्या इंग्लिश मालिकांपैकी एक म्हणजे मॉडर्न फॅमिली. एका वयस्कर अमेरिकन व्यावसायिक गृहस्थ,त्याच्याहून तरुण असलेली त्याची मूळची कोलंबियन बायको, तिचा पहिल्या नवऱ्यापासूनचा मुलगा - असं एक कुटुंब. या गृहस्थाला त्याच्या पहिल्या घटस्फोटित बायकोपासून दोन मुलं आहेत. त्यातली मुलगी, तिचा नवरा, त्यांची तीन मुलं असं दुसरं कुटुंब. तिसरं कुटुंब या गृहस्थाच्या मुलाचं आहे. हा मुलगा गे आहे. तो, त्याचा साथीदार (शब्द अधिक योग्य वाटतो! 'नवरा' आणि 'बायको' म्हटल्यावर ज्या स्वाभाविक पण तरी कधीकधी नकोशा वाटणाऱ्या छटा जाणवतात त्या एकदम पुसून निघतात. अर्थात मालिकेत हे दोघेही लग्न करतातच.) आणि त्यांनी दत्तक घेतलेली मुलगी असं तिसरं कुटुंब. ही तीन कुटुंबं आणि या मंडळींचे परस्परसंबंध, त्यांच्यातलं प्रेम आणि मारामाऱ्या, इतर उपकथानकं अशी एकूण मनोरंजक मालिका आहे. यातल्या गे जोडप्याच्या चित्रणाबाबत मी थोडा विशेष उत्सुक होतो कारण हे चित्रण प्रथमच बघायला मिळत होतं. अमेरिकेतील किंवा अन्य ठिकाणच्या गे लोकांचं या चित्रणाबाबत काय म्हणणं आहे याचा शोध अद्याप तरी मी घेतलेला नाही, पण मला हे चित्रण आवडलं. 

मालिकेतील एका भागात या दोन्ही पुरूषांच्या चुंबनाचा एक प्रसंग आहे. जेव्हा तो सीन सुरू होत होता तेव्हा मी मला स्वतःला मुद्दाम आतमध्ये निरखत होतो. दोन पुरूषांचं चुंबन दृश्य तोवर मी पाहिलं नव्हतं. (एके काळी हिंदी चित्रपटांतून समलिंगी संबंधांची फक्त टवाळीच केली जायची. नंतर त्याकडे गांभीर्याने पाहिलं जाऊ लागलं. 'दोस्ताना' या चित्रपटात जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन यांचं एक चुंबनदृश्य होतं. ते स्पष्टपणे चित्रित केलं गेलं नव्हतं. अलीकडे हिंदी चित्रपटाला शंभर वर्षं पूर्ण झाल्याबद्दल 'बॉम्बे टॉकीज' हा चार स्वतंत्र लघुकथांचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या कथेत दोन पुरुषांचं चुंबन दृश्य स्पष्टपणे चित्रित केलं गेलं होतं.) त्या दोघांनी एकमेकांचं चुंबन घेतलं तेव्हा माझ्या मनात नक्की काय काय उमटलं याची मी नोंद ठेवली होती. मला ते दृश्य सहजपणे बघता आलं असलं तरी स्री-पुरूषाचं चुंबन पाहतानाची सहजता त्यात होती असं मी खात्रीशीरपणे सांगू शकत नव्हतो. यातला एक भाग असा की त्यात मला चुकीचं काहीच वाटत नव्हतं हे पूर्णपणे खरं, पण मला त्याची 'सवय' नव्हती. त्यामुळे अगदी एक क्षण मला जो 'वेगळेपणा' जाणवला तो त्या सवयीच्या अभावी जाणवला होता. पण तो अगदी एक क्षणच होता. त्यातून बाहेर येऊन मी पुढे बघू लागलो. 

एखाद्या नवीन गोष्टीचा स्वीकार/अस्वीकार करणं याला दोन-तीन बाजू आहेत. एक म्हणजे ती गोष्ट अयोग्य वाटून अजिबातच स्वीकारता न येणं. दुसरी म्हणजे ती गोष्ट तत्त्वतः मान्य असणं, पण स्वीकारायला जड जाणं आणि तिसरी म्हणजे ती थोड्याच प्रयत्नांनी किंवा अगदी सहजदेखील स्वीकारून पुढे जाणं. आपण स्वीकृत केलेल्या गोष्टींचा नकळत आपल्या मनात एक 'साचा' तयार होतो आणि हा साचाच फक्त योग्य आहे असं आपल्याला वाटू लागतं. त्याच्याबाहेरचं काही दिसलं की आपल्याला ते योग्य वाटत नाही किंवा स्वीकारता येत नाही. 

पण यात एक मेख आहे. आणि त्यावर नीट विचार केला पाहिजे. या सदरातील अगदी पहिल्या लेखात आपण म्हटलं होतं की परंपरा म्हणजे 'क्ष' नावाची एक गोष्ट आहे आणि नवता म्हणजे 'य' नावाची एक गोष्ट आहे अशा साचेबद्ध पद्धतीने आपण या संकल्पनांकडे पाहायला नको. हे पुन्हा एकदा इथे नोंदवू. यात म्हणायचं असं आहे की एकाची परंपरा दुसऱ्याची नवता असू शकते. हे उलटही असू शकतं. आता या पार्श्वभूमीवर अमुक इतक्या अंतरावर पोचलेला मनुष्य आधुनिक आणि त्याच्या मागे असलेला मनुष्य पारंपरिक असं म्हणता येईल का? वर दिलेलं उदाहरण घेऊ. दोन पुरूषांचं चुंबन बघणं एखाद्याला फारसं जड गेलं नाही. हेच दुसऱ्या एखाद्याला फारच अवघड गेलं. तिसरा एक असा आहे की त्याला चुंबन दृश्य दाखवणंच गैर वाटतं. चौथा एक असा आहे की ज्याला समलिंगी संबंधच मान्य नाहीत. आता या सगळ्यांमध्ये आधुनिक कोण आणि पारंपरिक कोण असं विचारलं तर पहिला मनुष्य आधुनिक आहे असं आपण म्हणू. पण त्याला दोन पुरूषांचं नातं मान्य आहे. तीन पुरूषांचे परस्पर प्रेमसंबंध आहेत हे त्याला मान्य होत नाही. मग तो आधुनिक होतो का?

मला जाणवलेलं एक सत्य असं आहे की आपण सगळे वेगवेगळा पायऱ्यांवर उभे असतो. आणि त्यावरून आपल्यात संघर्ष सुरू असतो. म्हणजे मी ज्या पायरीवर उभा आहे तिथून मला समोरचं सुंदर दृश्य दिसतंय. ते इतरांना दिसत नाही म्हणून मी त्रागा करून घेतो. पण माझ्या हे लक्षात येत नाही की मी जिथे उभा आहे तिथे यायला इतरांना अजून वेळ लागणार आहे. माझ्यापुढे निघून गेलेल्या काहींना माझ्याबद्दल हेच वाटत असेल. इथे आपण तात्त्विक संघर्षापाशी येतो. आधुनिकता म्हणजे नक्की काय आणि परंपरा म्हणजे नक्की काय हे प्रश्न आपल्याला पडतात. 

'एव्हरी वॉर इन द वर्ल्ड इज द वॉर ऑफ डेफिनेशन्स' असं म्हटलं जातं. आधुनिकता आणि परंपरेच्या बाबतीत हे वॉर सुरू असतं याचंही कारण हेच आहे. पण मग हा तिढा सुटणार कसा? मला याचं उत्तर असं दिसतं की विशिष्ट क्षणी, विशिष्ट ठिकाणी जे बल प्रभावी असेल ते जिंकेल. एखाद्या समाजात विशिष्ट कालखंडात विशिष्ट धारणा का प्रभावी असतात याची कारणं संमिश्र आहेत. त्या बदलतात कशा याचंही उत्तर संमिश्र आहे. वैचारिक प्रबोधन, तांत्रिक प्रगती, त्या त्या समाजाची विशिष्ट 'वीण' आणि त्यातून घडलेली विशिष्ट मानसिकता असे विविध घटक त्याला कारणीभूत असतात. 

यातला तिसरा घटक मला विशेष प्रभावशाली वाटतो. 'मेंढा-लेखा' या गावाचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल. गडचिरोली जिल्ह्यातील या लहानशा गावाने आपल्या परिसरातील वनावर सामूहिक हक्काचा दावा २००९ साली मान्य करून घेतला. असं करणारं हे देशातील पहिलं गाव आहे. या गावाचं वैशिष्ट्य असं की इथल्या ग्रामसभेत सर्वसहमतीने निर्णय घेतले जातात. ('गोष्ट मेंढा लेखाची' या मिलिंद बोकील लिखित पुस्तकात या गावाची प्रेरणादायक कथा वाचता येईल). तिथे गेलो असताना तिथले ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल मला म्हणाले की सर्वसहमतीचं तत्त्व, सामूहिक वनहक्क या गोष्टी इथे यशस्वी झाल्या कारण मुळात या गावातील लोकांमध्ये एक वेगळेपण आहे. त्यांचं हे म्हणणं माझ्या लक्षात राहिलं होतं. ही मानसिकता कशी घडवायची हाच एक प्रश्न असतो. 

परंपरा आणि आधुनिकतेसंदर्भात चर्चा करताना त्यातील तात्त्विक स्पष्टतेचा मुद्दा लक्षात घेऊन आपण पुढे गेलो तर आपला मार्ग सुकर होतो. पण माणसाच्या मुक्ततेची नवी दिशा दाखवणाऱ्या विशिष्ट आधुनिकेतचा आग्रह धरणं हेही अपरिहार्य असतं. मानवी नातेसंबंध या आधुनिकेतच्या कक्षेत येतात. आपण सहसा नातेसंबंधांबाबत प्रयोग करायला कचरतो. ते केले पाहिजेत. विज्ञान जसं प्रयोगाशिवाय पुढे जाऊ शकत नाही तसंच कौटुंबिक-सामाजिक रचनासुद्धा नातेसंबंधातील प्रयोगाशिवाय सुदृढ राहू शकत नाही. यापुढील काही लेखांमध्ये नातेसंबंधांच्या नव्या रचनेबाबत आपण चर्चा करू.   

Saturday, April 14, 2018

'आँखों देखी' ची दृष्टी

इंग्लिश भाषेत 'अनलर्निंग' हा एक चांगला शब्द आहे. इंग्लिशमधील 'डिझर्व्ह' ला जसा चपखल मराठी शब्द सापडत नाही तसंच  'अनलर्निंग' बाबतही म्हणता येईल. आपण आजवर जे पाहिलं, अनुभवलं त्यातून आणि औपचारिक शिक्षणातून जे शिकलो ते थोडं बाजूला ठेवून नव्या दृष्टीने, नव्या बाजूने काही शिकणं म्हणजे 'अनलर्निंग'. गेल्या २-३ लेखांमध्ये आपण प्रश्न विचारण्याबद्दल बोलतो आहोत. 'अनलर्निंग' ही प्रश्न विचारण्याला समांतर अशी एक प्रक्रिया आहे. हाच धागा धरून मला या लेखात एका चित्रपटाबाबत काही सांगायचं आहे. 

'सिनेमा' हा एकूणातच माझ्या प्रेमाचा विषय आहे. 'गोष्ट सांगण्याचं' अतिशय प्रभावी माध्यम म्हणजे सिनेमा. कथा, सादरीकरण, अभिनय, संगीत अशा विविध अंगांनी आपल्याला अनेक चित्रपट आवडतात. पण काही चित्रपट असे असतात की ते पुसता येणार नाही असा ठसा उमटवतात. हिंदी, मराठी व इंग्लिश भाषेतील अनेक चित्रपटांनी माझ्या बाबतीत हे केलं. लेखनविश्वात जसे कथा, कादंबरी, कविता या साहित्यप्रकारांसोबतच वैचारिक लेखन हाही एक प्रकार असतो तसाच 'वैचारिक चित्रपट' असा एक प्रकार मला करावासा वाटतो. २०१३ साली रजत कपूर या दिग्दर्शकाचा 'आँखो देखी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपट लिहिलाही त्यानेच होता. तुमच्यापैकी काहींनी तो पाहिला असेल. हा चित्रपट काही फारसा चालला नाही. (चांगल्या, काहीतरी वेगळं देणाऱ्या चित्रपटाचं जे होतं तेच याचंही झालं.) रजत कपूरचे 'मिक्स्ड डबल्स', 'मिथ्या' हे चित्रपट अतिशय प्रभावी होते. 'वैचारिक' दृष्ट्या प्रेक्षकाला हलवण्याची क्षमता असलेले जे मोजके दिग्दर्शक आहेत, त्यातला हा एक दिग्दर्शक. त्यामुळे त्याचा हाही चित्रपट वेगळा असणार याची खात्री होती. पण चित्रपट पाहिल्यावर मात्र मी रजत कपूरला दंडवतच घातला. 

दिल्लीच्या एका गजबजलेल्या भागात राहणारं एक मध्यमवर्गीय कुटुंब. अगदी सरळसोट. कुठल्याही इतर चार कुटुंबांसारखं. आपला कथानायक म्हणजे या कुटुंबाचा प्रमुख - पन्नाशीच्या पुढचा एक गृहस्थ. बायको, एक मुलगी, एक मुलगा, धाकटा भाऊ, त्याची बायको आणि मुलगा असं एकत्र कुटुंब. एके दिवशी कुणीतरी वार्ता आणतं की घरातल्या मुलीचं अमुक एका मुलाबरोबर 'प्रकरण' सुरु आहे आणि तो मुलगा काही चांगला नाही. झालं! हे ऐकून आपला कथानायक, त्याचा भाऊ, मेव्हणा, आसपासची दोन टाळकी असे सगळे मिळून त्या मुलाचा समाचार घ्यायला म्हणून निघतात. मात्र त्या मुलाला प्रत्यक्ष भेटल्यावर जेव्हा तो थोड्याश्या दटावणीनंतर रडू लागतो तेव्हा कथानायकाच्या लक्षात येतं की हा तर अगदीच सरळ-साधा मुलगा आहे. आपलंच चुकलं. घरी आल्यावर तो विचारात पडतो. त्याच्या लक्षात येतं की आपण फार चटकन विश्वास ठेवतो कुणावरही. आपल्या डोक्यात लहानपणापासून गोष्टी घुसवल्या जातात, आपल्या आजूबाजूचं जग ओरडून आपल्याला अनेक गोष्टी सांगत असतं आणि आपण ते निमूटपणे होऊ देतो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तो घरात जाहीर करतो की आजपासून मी कुठल्याही ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. प्रत्येक गोष्टीला पारखून घेईन, प्रश्न विचारेन, स्वतः अनुभव घेईन आणि मगच माझा निर्णय घेईन. नव्या निश्चयाच्या उमेदीने तो घराबाहेर पडतो. पुढे काय होतं हे प्रत्यक्ष बघण्यातच मजा आहे. पण तरी तो घराबाहेर पडल्यानंतर लगेचचा प्रसंग सांगायचा मोह टाळता येत नाही. बाहेर पडल्या पडल्या त्याला त्याच्या गल्लीतले परिचयाचे पुजारी भेटतात. त्याला प्रसाद देतात. हातातला प्रसाद निरखून बघत तो एक क्षण थबकतो, मग प्रसाद खातो आणि म्हणतो 'हा कलाकंद होता. गोड होता. चांगला होता.' त्यावर पुजारी परत 'हा प्रसाद आहे' असं सांगतात. तरी तो  'हा कलाकंद होता. गोड होता', एवढंच म्हणत त्यांना निरोप देतो.

'मला एवढं समजलं' या बिंदूपाशी निग्रहाने थांबायचा त्याचा प्रयत्न त्याला मुक्ततेचा अनुभव देतो. पन्नाशीच्या पुढचा हा गृहस्थ  'अनलर्निंग' चा मार्ग स्वीकारतो आणि त्याचा हा सगळा प्रवास प्रेक्षकांसाठी देखील डोळे उघडणारा ठरतो. एका प्रसंगात तर मी त्याला बसल्या जागेवरून टाळीच दिली. 'वस्तू हातातून सोडली की ती खाली पडते यातलं मला फक्त 'ती खाली पडते' एवढंच समजलं, ती का खाली पडते हे मला माहीत नाही' असं याने म्हटल्यावर एकजण 'ती गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडते' असं अपेक्षित उत्तर देतो. त्यावर हा 'तुझ्याकडे बघून तुला गुरुत्वाकर्षण म्हणजे नक्की काय हे कळतं आहे असं वाटत नाही' असं म्हणतो. आता यावर मी खरंच विचार केला, न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला होता, गुरुत्व बल ९.८ मीटर्स / सेकंदाचा वर्ग इतकं असतं हे आपणही शिकलोय. पण हे सगळं 'मला' नक्की कितपत कळतंय ? 'गुरुत्वाकर्षण' म्हणजे काय हे मी विस्तृतपणे, सप्रमाण दाखवून देऊ शकतो का? तर नाही. 

'आँखों देखी'च्या नायकाची 'एन्क्वायरी'ची जी पद्धत आहे ती आपल्याला बरंच काही देऊन जाते. या चित्रपटाने माझ्यावर फार परिणाम केला. माहिती, ज्ञान आणि पुढे 'माझी मनोभूमिका' या साखळी प्रक्रियेमध्ये आपण शांत, निगर्वी, 'विद्यार्थी' भूमिकेमध्ये असायला हवं हे समजणं मला 'आतमध्ये' शांत करून गेलं. बरं, चित्रपटात त्याचा दृष्टीकोन सतत, संपूर्णपणे संशयवादी असाही नाही. काही बाबतीत स्वतःला अनुभव नसला, माहीत नसलं तरी दुसऱ्याला झालेलं ज्ञानही मी स्वीकारलं पाहिजे याला त्याची तयारी आहे. पण मी आधी लिहिलं तसं हे सगळं प्रत्यक्ष बघण्यात मजा आहे. 

या चित्रपटाचं मोठं वैशिष्ट्य हे की तो अगदी साध्या माणसातल्या वैचारिक परिवर्तनाची गोष्ट सांगतो. आणि त्यात कसलाही अभिनिवेश नाही. चित्रपटाला कथानायकाच्या मुलीच्या लग्नाची पार्श्वभूमी आहे, कथानायक आणि त्याच्या भावामधल्या संघर्षाची डूब आहे, मध्यमवर्गीय जगण्याचे अनेक संदर्भ आहेत. चित्रपट बघताना ही गोष्ट आपल्या शेजारच्या घरात घडते आहे असं वाटत राहतं. कथानायकाच्या वैचारिक उलाघालीच्या पार्श्वभूमीवर इतर सगळी माणसं, त्याच्या स्वतःच्या मानवी मर्यादा हे सगळं आपलं वाटतं. मागच्या लेखात मी म्हटलं होतं तसं संशोधन ही फक्त प्रयोगशाळेतच करायची गोष्ट आहे असं नाही. आपण 'का?' हा प्रश्न आपल्या दैनंदिन जगण्याशी संबंधित गोष्टींबाबत दैनंदिन जगण्याच्या ठिकाणीच विचारू शकतो. 'आँखों देखी' चा नायक नेमकं हेच करतो.     
आकलनासाठी आवश्यक अशा 'एन्क्वायरी'च्या पहिल्या पायरीवर या नायकासारखा पुरेसा काळ न घालवल्यानं पुढच्या पायऱ्यांवर अडचणी येतात. कारण सुरूवातच चुकलेली असते. विशेष म्हणजे 'मला एवढं माहीत आहे, पुढचं माहीत नाही' ही भूमिका, ही जाणीव परंपरा असो की नवता - दोन्ही ठिकाणी लागू होते. म्हणजे असं की परंपरेचं पालन करताना 'हे परंपरेचं पालन आहे' इथेच थांबून परंपरा पालनाच्या पुष्ट्यर्थ तोकडे दावे केले गेले नाहीत तरी पुष्कळ होईल. आणि नवतेच्या बाबतीत 'हा प्रयोग आहे. याच्या परिणामांसाठी तयार राहूया' असा मोकळेपणा असेल तर ते हितकारक ठरेल.          

आज टीव्हीच्या आणि समाजमाध्यमांच्या रेट्यामुळे अनावश्यक माहितीची, अर्धवट ज्ञानाची आणि असत्याची भीतीदायक घुसळण होते आहे. त्यातून माणसांची मनंही अस्थिर होत आहेत, आपल्यापर्यंत आलेले माहितीचे तुकडे कसलीही शहानिशा न करता खरे मानले जातायत. अशा वेळी 'आँखों देखी'च्या दृष्टीचं महत्त्व पटल्यावाचून राहत नाही. आज आपल्याकडे जी सामाजिक आणि राजकीय ध्रुवीकरणाची परिस्थिती दिसते आहे त्यात तर ही दृष्टी औषधाचं काम करू शकेल!

Saturday, March 31, 2018

का आणि कसं?

माझी एक फार जुनी इच्छा आहे. गमतीशीर वाटेल. पण आहे. रस्त्यात किरकोळ अपघात बरेचदा घडतात. एखादी गाडी दुसरीला ठोकते. कधी वेगामुळे, कधी 'ब्लाइंड टर्न'वर दोन वाहनांची टक्कर होते. आमच्या घरासमोर एक छोटा चौक आहे. तिथे असं बरेचदा घडतं. गंभीर स्वरूपाचं कधी काही घडलेलं नाही. पण किरकोळ धक्का आणि परिणामी शाब्दिक बुक्की असा एक कार्यक्रम होतो. या कायक्रमात दोघेहीजण 'मी कसा बरोबर होतो' हे प्रामुख्याने सांगत एक प्रेमळ संवाद सुरू करतात. पुलंची 'म्हैस' आठवायची झाली तर 'बा'चा'बा'ची सुरू होते! तर माझी इच्छा ही की कधीतरी आपल्याला असं दृश्य बघायला मिळेल ज्यात ज्यांचा अपघात झाला आहे ते दोघे शांतपणे 'हा अपघात नक्की का आणि कसा घडला'याची चर्चा करतील, एका निष्कर्षावर येतील आणि तोडगा काढून आपल्या वाटेने निघून जातील. आजही लोक तोडगा काढतातच, पण ती प्रक्रिया काही सुखावह नसते. 

'प्रश्न विचारण्याने आपण असा काय तीर मारणार आहोत?'असा प्रश्न प्रश्न विचारायच्या वृत्तीवर केला जाऊ शकतो असं मागच्या लेखाच्या शेवटी आपण म्हटलं होतं. त्याचं एक उत्तर म्हणून वर दिलेल्या उदाहरणाकडे आपल्याला बघता येईल. अपघात तर झाला आहे, कुणाची तरी किंवा दोघांचीही चूक तर आहेच, नुकसान तर झालंच आहे - तर आता 'हे का झालं?' हा प्रश्नच विचारला नाही तर घटनेचा उलगडा कसा होणार? पण प्रश्न न विचारल्याने 'मी बरोबर होतो. चूक त्याची आहे' या गृहीतकानेच वाद सुरू होतो. किंबहुना 'माझं बरोबरच आहे' हे गृहीत धरून जे काही बोललं जातं ती चर्चा किंवा विश्लेषण नसून 'वाद' असतो. (विचारधारांचे 'वाद' होण्याच्या मुळाशी हाच धागा असतो हे लक्षात येईल.) त्यामुळे 'अपघात कसा झाला?' हा प्रश्न विचारणं अत्यावश्यक आहे. 'मी बरोबरच होतो' हे विधान करणं अनावश्यक आहे. कारण मग विश्लेषण होऊच शकत नाही, उत्तर मिळू शकत नाही. 

'प्रश्न विचारणं' या गोष्टीचं महत्त्व अतिव्यापक आहे. मी ज्या पेनाने हा लेख लिहिला आणि नंतर ज्या कीबोर्डवर मी तो टाईप केला ते पेन, कीबोर्ड, कंप्यूटर या वस्तू निर्माण कशा झाल्या हे मला माहीत नाही. म्हणजे या वस्तू कारखान्यात तयार होतात एवढंच मला माहीत आहे. मला निर्मिती प्रक्रिया माहीत नाही. माझ्या मनात विविध विचार येतात, विकारही येतात, मी माझ्या परीने विश्लेषण करतो - हे कसं होतं, मी ते का करतो याचं निश्चित उत्तर माझ्याकडे नाही. थोडक्यात माझ्या आसपास मी पाहिलं तर मला शेकडो प्रश्नांची मालिका दिसते आणि आपण अज्ञानी आहोत ही माझी जाणीव तीव्र होत जाते. पण या प्रश्नमालिकेमुळे आणि आपण अज्ञानी आहोत या जाणिवेमुळे मी एकाच वेळी अस्वस्थ होतो आणि शांतही होतो. 

अस्वस्थ वाटतं कारण आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव होते. पण त्याचबरोबर शांत वाटतं कारण 'आपल्याला जाणीव झाली आहे' याची जाणीव होते आणि आपला रस्ता योग्य आहे, या रस्त्याने गेलो तरच आपल्याला थोडं काही कळू शकेल हेही जाणवतं. जगात 'कारणांचा पसारा' इतका आहे की तो आवरणं जवळजवळ अशक्य आहे. पण जर माझ्या मनात प्रश्न असतील तर माझ्या कुठल्याही कृतीची प्रस्तुतता, योग्यायोग्यता ठरवायला मला मदत होते. दुसरं म्हणजे एखाद्या जरी प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतं तेव्हा होणारा आनंद अवर्णनीय असतो. 'आध्यात्मिक' या शब्दाला आज फार वेगवेगळे अर्थ आणि संदर्भ येऊन चिकटले आहेत. मी या शब्दाकडे 'एखादी प्रखर अनुभूती', 'मी आणि सृष्टी यांच्यातील एकत्व जाणवण्याचा क्षण', 'ज्ञानजाणीव' अशा अर्थांनी बघतो. उत्तर सापडण्याचा आनंद हा अशाच स्वरूपाचा असतो. जगातील अनेक संशोधकांना, शास्त्रज्ञांना याचा अनुभव असतो. आर्किमिडीज 'युरेका' असं ओरडत अंघोळ अर्धवट सोडून बाहेर आला ही गोष्ट आपण वाचलेली असते. पण त्या क्षणाचा आनंद फक्त आर्किमिडीजलाच माहीत असतो. हा आनंद महत्त्वाचा आहे कारण असा आनंद जेव्हा जेव्हा कुणाला झाला आहे तेव्हा माणसाने इतिहासात एक पाऊल पुढे टाकलं आहे. आर्किमिडीज किंवा इतर मोठ्या संशोधकांइतकी बौद्धिक चिकाटी आपल्याकडे नसेल, पण तरीही आपल्या ज्ञानाच्या मर्यादित परिघातदेखील हा आनंद आपल्याला मिळवता येऊ शकतो. म्हणून प्रश्न विचारण्याचं महत्त्व आहे. 

स्री-पुरूष संबंध, या दोघांची जीवशास्त्रीय आणि सामाजिक घडण, त्यांच्या लैंगिक संबंधांचं विश्व हा माझ्या आस्थेचा विषय आहे. पौगंडावस्थेपासून आत्तापर्यंत पुरूष म्हणून आणि माणूस म्हणून मी वेगवेगळ्या अनुभवांतून, जाणिवांतून गेलो. पुरूषसत्ताक व्यवस्थेत स्त्रीवर अन्याय होतो, तिचं शोषण होतं. हे थांबलं पाहिजे. त्यासाठी पुरूषांनी पुढे यायला पाहिजे हे तर कधीच उमगलं होतं. पण 'पुरूष विशिष्ट प्रकारे वागतो ते का?' हा विचार सुरू झाला, पुरूषाच्या (आणि स्त्रीच्याही) लैंगिक मनोविश्वाचा मानवी उत्क्रान्तीच्या आधारे थोडा अभ्यास केला तेव्हा काही गोष्टी नव्याने समजल्या. 'पुरूष बलात्कार करतो' या विधानानंतर अर्थातच 'हे वाईट आहे, भयंकर आहे. पुरूषांमध्ये सुधारणा व्हायला हवी आहे' ही विधाने येतात. पण 'पुरूष बलात्कार का करतो?' हा प्रश्न विचारला की संशोधनाची सुरूवात होते. 'संवेदना' आणि 'संशोधन' या दोन्ही परस्परपूरक गोष्टी आहेत. केवळ संवेदना असेल तर उत्तर सापडणार नाही. केवळ संशोधन असेल तर संशोधनाचा उचित उपयोग कसा करायचा, संशोधन 'राबवायचं' कसं हे कळणार नाही. संवेदनेतून कार्यकारणभाव कळत नाही. तो संशोधनातूनच कळू शकतो. 'पुरूष असा का वागतो?' हा प्रश्न आणि पुढचा अभ्यास हा माझ्यासाठी 'युरेका' क्षण होता. हेच लग्नसंस्थेबाबतही झालं. 'नवरा' हा प्रॉब्लेम नाही आहे आणि 'बायको' हाही प्रॉब्लेम नाही आहे - प्रॉब्लेम 'लग्न' हा आहे याची जाणीव झाली तेव्हा लग्नसंस्थेमध्ये लवचीकता कशी आणता येईल असा विचार सुरू झाला. स्त्री-पुरूष संबंधांचं 'गतिशास्त्र' (डायनॅमिक्स) पाहताना प्रत्येक ठिकाणी 'का?' हा प्रश्न विचारला तरच आपण उत्तरांकडे जाऊ, अन्यथा संवेदनेमध्ये अडकून राहू हे जाणवणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. 

प्रख्यात इतिहास संशोधक इ. एच. कार यांचं इतिहासाच्या अभ्यासाबाबतचं एक अवतरण आहे. 'व्हॉट इज हिस्टरी?' या त्यांच्या पुस्तकात एके ठिकाणी ते म्हणतात की इतिहासाचा अभ्यास म्हणजे केवळ घटनांचा अभ्यास नव्हे तर घटनेमागच्या कारणांचा अभ्यास. खरा इतिहासकार आणि अधिक व्यापकपणे - खरा विचारवंत, म्हणजे 'का?' हा प्रश्न सतत विचारणारा मनुष्य. त्यांचं हे म्हणणं इतिहासच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील संशोधनाबाबतचं सार्वकालिक सत्य सांगतं.               

संशोधन ही फक्त प्रयोगशाळेतच करायची गोष्ट आहे असं नाही. आपण 'का?' हा प्रश्न आपल्या दैनंदिन जगण्याशी संबंधित गोष्टींबाबत दैनंदिन जगण्याच्या ठिकाणीच विचारू शकतो. तसा तो विचारला तर आपल्याला नव्या वाटा सापडतात. आपल्यापैकी प्रत्येकाची काही बलस्थाने आहेत, काही मर्यादा आहेत. व्यक्तिशः आपण जगात किती सकारात्मक बदल घडवू शकतो हे सांगता येणार नाही. पण प्रश्न विचारायची, विविध बाजूंनी विश्लेषण करण्याची वृत्ती जरी आपण अंगिकारली तरी याचा एकत्रित परिणाम म्हणूनसुद्धा अनेक गोष्टी सुकर होतील. 

Saturday, March 17, 2018

प्रश्न प्रश्न विचारण्याचा आहे

'तत्त्वज्ञान म्हणजे काय?' हा प्रश्न म्हणजे तत्त्वज्ञान स्वतः प्रत्येक गोष्टीबाबत जो प्रश्न विचारतं त्याच प्रकारचा  प्रश्न आहे. त्याची विविध अंगांनी उत्तरेही दिली गेली आहेत. मला स्वतःला तत्त्वज्ञान म्हणजे संकल्पनांची चर्चा, संकल्पनांचे विश्लेषण आहे असं वाटतं. विश्वाच्या उत्पत्तीपासून ते या विश्वाचा घटक असलेल्या माणसाच्या मनापर्यंतचे अनेक विषय तत्त्वज्ञानाच्या कक्षेत येतात. गेल्या काही शतकांतील वैज्ञानिक संशोधनाने तत्त्वज्ञानाच्या कक्षेतील काही प्रश्न विज्ञानाच्या कक्षेत आणले. माणसाला दुःख होतं ते का हा प्रश्न तात्त्विक अंगाने चर्चिला जाऊ शकतो, पण दुःख नामक जाणीव जेव्हा होते तेव्हा मानवी मेंदूत नक्की काय घडतं, कोणती रसायने स्रवतात हे विज्ञान शोधू शकतं. दुःखाप्रमाणेच इतर भाव-भावनांनाही हे लागू होईल. मानवी जाणिवेचा संपूर्ण खुलासा, जाणिवेचं संपूर्ण आकलन अजून झालेलं नसलं तरी जाणीव ही गूढ अशी बाब नसून ती मुळात भौतिक गोष्ट आहे, रासायनिक क्रियांचा जाणीव हा परिणाम आहे इथपर्यंत विज्ञान आलं आहे. विज्ञान सततच्या प्रयत्नांतून अनेक गुंते सोडवू शकतं. त्यामुळे आपल्या सर्व समस्यांवरचा मार्ग विज्ञानच दाखवू शकेल याविषयी शंका नसली तरी तत्त्वज्ञान संकल्पनात्मक, मूल्यात्मक झगड्यात कळीची भूमिका बजावत असल्याने आपण तत्त्वज्ञानाला टाळू शकत नाही. तत्त्वज्ञान हा शब्द आणि हा विषय रूक्ष किंवा अवघड वाटला तरी प्रत्येक व्यक्ती जगताना तिचं तिचं म्हणून एक तत्त्वज्ञान घेऊनच जगत असते. व्यक्ती जे लहान-मोठे निर्णय घेते त्याला तिच्या तत्त्वज्ञानाचाच आधार असतो. 

लेखाच्या सुरुवातीलाच तत्त्वज्ञानाचा आधार घ्यावासा वाटला याला कारणही तसंच आहे. मी एक चांगला संशयात्मा आहे. त्यामुळे 'आपल्याला आत्ता जे वाटतंय ते बरोबर आहे का?' हा प्रश्न माझ्या मनात वरचेवर येत असतो. आपण काहीएक मत-निरीक्षण-विचार मांडतो. यात समता व स्वांतत्र्यासारख्या मूलभूत मूल्यांना उचलून धरणारे जे विचार आहेत त्यांच्याबाबत मला शंका नसते, पण इतर बाबतीत मनामध्ये संघर्ष होत असतो. खरं तर समता व स्वांतत्र्य या संकल्पनांबाबतही प्रत्यक्षातील मानवी जगण्याच्या संदर्भात, या संकल्पनांच्या नेमक्या अर्थाच्या संदर्भात चर्चा होऊ शकते. पण या मूल्यांचे जे साधारण स्वरूप आहे त्याबाबत मूलभूत तात्त्विक मतभेद नाहीत हे खरं. इतर बऱ्याच बाबतीत (म्हणजे सामाजिक विश्लेषणासंदर्भात) होतं असं की सामाजिक, आर्थिक, राजकीय बले इतकी जोरदार असतात की आपण नक्की कुठल्या स्थानावरून बोलायचं असा प्रश्न पडतो. 

गेल्या दोन लेखांमध्ये श्रद्धा, अंधश्रद्धा याबाबत लिहिल्यानंतर असं जाणवलं की या विशिष्ट विषयाचा संबंध माणसाच्या मानसिक घडणीशी, त्याच्या सामाजिक स्थानाशी आहे हे खरं पण या सगळ्याची नोंद घेऊन, आपल्या मनातील विचारकलहाला लक्षात घेऊन आपल्याला एका ‘किमान साधारण भूमिके’वर यावं लागतं. असं नाही केलं तर परिवर्तनाचा मार्गच आखला न जाण्याची भीती असते. 

ही ‘किमान साधारण भूमिका’ कोणती? तर 'प्रश्न विचारणं' ही ती भूमिका आहे. मला वाटतं की दिवसाच्या शेवटी आपल्याला एखाद-दोन तरी प्रश्न पडले असतील तर तो दिवस कारणी लागला असं म्हणायला हरकत नाही! आणि ते प्रश्न फार अवघड असावेत असंही नाही. जग निर्माण कसं झालं किंवा सजीव निर्माण कसे झाले हे मोठे प्रश्न आहेत. पण रोजच्या जगण्याशी संबंधित प्रश्नदेखील पडावेत. प्रश्नांची ही रेंज कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध इथपासून ते समाजव्यवस्थेपर्यंत असू शकते, असावी. सॉक्रेटिस या ग्रीक तत्वज्ञाची प्रश्न विचारून गोष्टी समजून घ्यायची पद्धत होती. 'सॉक्रेटिक डिबेट' या नावाने ती ओळखली जाते. एखाद्या विधानाची, मताची, दृष्टीकोनाची वेगवेगळ्या बाजूंनी, तर्कशास्त्राचे निकष लावूनउलटतपासणी करणे हे यातलं मुख्य सूत्र आहे. पद्धतीच्या तपशीलात जायची आवश्यकता नाही, पण यातला गाभा लक्षात घ्यायला हवा. प्रश्न विचारणे आणि त्यातून 'क्रिटिकल थिंकिंग' (विश्लेषणात्मक विचारपद्धती) विकसित करणे हा तो गाभा आहे. माणसाच्या उत्क्रान्तीच्या प्रवासात त्याने दोन प्रवृत्ती जपलेल्या आहेत. एक म्हणजे 'फाईट' आणि दुसरी म्हणजे 'फ्लाईट'. पहिली प्रवृत्ती त्याला आव्हानांशी लढायला लावते आणि दुसरी त्याला आव्हानांपासून पळून जायला लावते. आदिम संदर्भात या दोन्हीमध्ये चूक-बरोबर ठरवणं अप्रस्तुत होईल. कारण जगण्याच्या स्पर्धेत टिकून राहण्याकरता या दोघातलं जमेल ते करणं भाग होतं. या प्रवृतीचे अंश माणसात आजही दिसतात. आपल्या इतरही भाव-भावना आदिम स्वरूपात आजही टिकून आहेत. परंतु या आदिम भाव-भावानांबरोबरच माणसाने प्रश्न विचारायची वृत्ती जागी ठेवली म्हणून तो पुढे येऊ शकला. आता त्याने केलेली प्रगती नेत्रदीपक असली तरी त्यातून नवीन आव्हाने उभी राहतात हा मुद्दा आहे, पण ही प्रगती साध्य करणं हे निश्चितच उल्लेखनीय आहे, गौरवास्पद आहे. या प्रगतीचे लाभार्थी पुष्कळजण आहेत. तुम्ही-मी सगळेच. मात्र गंमत ही आहे की आपण या लाभाचे धनी होण्यातच धन्यता मानतो आहोत. आपण स्वतः कदाचित तांत्रिक प्रगतीत योगदान देऊ शकणार नाही कारण त्या विषयातलं ज्ञान आपल्याकडे नाही. परंतु आपला दृष्टीकोन तरी चिकित्सक असू शकतो? ज्याला आपण 'शिक्षण' म्हणतो ते केवळ विषयांचं ज्ञान देणारं नसून 'विश्लेषक बुद्धी' विकसित करणार असावं अशी अपेक्षा तर आपण ठेवू शकतो?

परंपरा आणि परंपरेनुसार वर्तन माणसाला एक 'जमीन' मिळवून देतं हे मान्यच आहे, परंतु अधिकाधिक लोकांनी जर नवीन विचार केला, परंपरेला प्रश्न विचारले तर नवीन जमीन तयार होईल. ही मशागत झाली नाही तर नवीन काही पिकणार कसं? हे लिहिताना मला एक प्रसंग आठवला. शाळेतल्या एका जुन्या मित्राकडे गेलो होतो. त्याची बायको (तीही आमची वर्गमैत्रीण) त्यांच्या लहान मुलीचं डोकं देवापुढी टेकवायचा प्रयत्न करत होती. फार गमतीदार दृश्य होतं. ती मुलगी बिचारी काही केल्या डोकं टेकवायला तयार नव्हती. (कारण तिला मुळात काही कळतच नव्हतं). आणि माझी मैत्रीण मात्र तिला मूर्तीपुढे नतमस्तक करून सोडायच्या हट्टाला पेटली होती. माझ्या मनात विचार आला की हा आग्रह कशासाठी? माणसामध्ये नम्रता असायला हवी हे योग्यच आहे, पण ती अशाच पद्धतीने येऊ शकते का? मला स्वतःला मूल नसल्याने मला काही प्रश्नांचा सामना करावा लागलेला नाही. पण जर कुणा लहानग्याने मला प्रश्न केला की 'देव असतो का?' तर मी 'माहीत नाही' म्हणेन. देव, धर्म, जन्म, मृत्यू, सामाजिक विषमता या व इतर विषयांबाबत आपण मुलांशी स्पष्टपणे बोलायला हवं. मला असं वाटतं की आपण काही गोष्टी आपल्या भीतीमुळे त्यांच्यापासून लपवून ठेवतो आणि काही गोष्टी आपल्या भीतीमुळे त्यांच्यावर लादतो. 'जर मला शिक्षा करणारी देव नामक व्यक्ती किंवा शकी नाहीच आहे तर मी चांगलं का वागू?' असा प्रश्न जर कुणी केला तर किंवा कुणाचं वर्तन अनिर्बंधतेच्या दिशेने जाताना दिसलं तर मी जे उत्तर देईन ते माणूस म्हणूनच्या माझ्या बौद्धिक उंचीचं मोजमाप करणारं असेल. माणूस म्हणून मी माझ्या स्वतःच्या आणि इतरांबरोबरच्या जगण्याचं नियमन करू शकलो, त्याला सकारात्मक वळण देऊ शकलो, तर्काचा आग्रह धरतानाच मानवी जगण्याला जो संवेदनेचा ओलावा लागतो तो टिकवून ठेवू शकलो तर माणूस म्हणूनच ते माझं श्रेय असेल. माझ्या प्रश्नांचं, माझ्या दुःखाचं, अडचणीचं उत्तर शोधायला - किमान त्यांचं नियमन करायला मला अदृश्य शक्तीवर विसंबून राहायला लागत नाही, माझ्या आसपासची माझ्यासारखी माणसंच ते काम करू शकतात हे जर शक्य झालं तर आणखी काय हवं?

प्रश्न विचारणं हे ठीक, पण प्रश्न विचारून तरी आपण असा काय तीर मारणार आहोत असा एक प्रश्न येऊ शकेल. त्यावर पुढील लेखात बोलूया.