Friday, February 9, 2024

राजकारण्यांच्या दृष्टीने जे नवप्रबोधन ती प्रत्यक्षात वैचारिक अधोगतीही असू शकते!

‘केवळ निर्माण नव्हे, हे नवप्रबोधन’ हा राकेश सिन्हा यांचा ‘पहिली बाजू’ सदरात प्रसिद्ध झालेला लेख आहे, पण त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांची दुसरी बाजू आहे, ती चांगली मजबूत आहे आणि ती मांडणारे अनेकजण राजकीय पक्षाशी बांधील नसलेले आहेत. आपल्या देशाच्या सामाजिक पर्यावरणाविषयी जागृत असलेल्या माझ्यासारख्या अनेकांच्या मनातली ही बाजू आहे.

राकेश सिन्हा यांनी पहिल्याच परिच्छेदात राम या दैवताने जीवनातील आदर्श मांडले आहेत असं म्हटलं आहे. तात्त्विक पातळीवरून, आदर्शाच्या व्याख्येवरून यासंदर्भात चर्चा होऊ शकते. पण एका व्यापक मान्यतेच्या संदर्भात हे विधान बरोबर आहे. राम हा सत्यवचनी म्हणून ओळखला जातो. या गुणाच्या पार्श्वभूमीवर भाजपने आयटी सेल स्थापन करुन असत्याचा प्रचार करणं राकेश सिन्हा यांना कसं वाटतं हे समजून घेण्याची उत्सुकता आहे. 'हम जो चाहे वो संदेश जनता तक पहुंचा सकते हैं। चाहे खट्टा हो या मीठा हो, सच्चा हो या झूठा हो।  ये काम हम कर सकते है, मगर वो इसलिये हो पाया हम ३२ लाख व्हॉट्सअ‍ॅप का एक ग्रुप बना के खड़े थे।' हे विधान अन्य कुणाचं नसून गृहमंत्री अमित शहा यांचं आहे. २०१८ साली अमित शहा यांनी हे विधान कोटा, राजस्थानमधील भाजपच्या सोशल मीडिया कार्यकर्त्यांसमोर बोलताना केलं होतं. १७ जून २०१८ रोजी शिवम शंकर सिंग या भाजप आयटी सेलमध्ये राम माधव यांच्याबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्याने 'मी भाजप का सोडतो आहे?' या शीर्षकाची एक पोस्ट 'मीडियन' या संकेतस्थळावर लिहिली होती. त्यात त्याने भाजपचं मूल्यमापन 'गुड, बॅड आणि अग्ली' अशा तीन भागात केलं होतं. मी भाजप सोडतो आहे याचं मुख्य कारण भाजपतर्फे पसरवले जाणारे  खोटे मेसेजेस हे आहे असं त्याने म्हटलं होतं.    

श्रीरामाच्या सत्यवचनी असण्याच्या आणि त्या श्रीरामाला राजकीय फायद्यासाठी वापरण्याच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा लक्षात घ्यावा लागतो. लेखात राकेश सिन्हा यांनी धर्मनिरपेक्षतेला कालबाह्य कल्पना म्हटलं आहे. याआधी समाजमाध्यमांवर भाजप समर्थकांकडून अशा आशयाची विधानं केली गेल्याचं प्रस्तुत लेखकाने पाहिलं आहे. भारतातील धर्मनिरपेक्षता हा मोठा वादग्रस्त विषय आहे यात शंकाच नाही. यावर अनेक अभ्यासकांनी विविध बाजूंनी मांडणी केली आहे. काँग्रेसने मुस्लिमांचं तुष्टीकरण केलं हा मुद्दा शहाबानो निकालाचा तसेच हज सबसिडीचा दाखल देऊन कायम मांडला जातो. ते योग्यच आहे. पण राजीव गांधींनी १९८५ च्या शहाबानो निकालानंतर १९८६ मध्ये बाबरी मशिदीचं कुलूप उघडलं ते 'बॅलन्स' साधण्यासाठी असं म्हटलं गेलं तरी त्याला सर्वसामान्यांच्या राजकीय चर्चांमध्ये 'हिंदू तुष्टीकरण' म्हटलं जात नाही. दुसरं उदाहरण १९९१ च्या 'प्रार्थनास्थळे (विशेष तरतूद) कायदा, १९९१' हे आहे. माधव गोडबोले यांनी त्यांच्या 'भारताची धर्मनिरपेक्षता : धोक्याच्या वळणावर' या पुस्तकात लिहिलं आहे - 'या कायद्याच्या कलम ३ मध्ये म्हटलं आहे की कोणत्याही धर्माच्या किंवा धर्माच्या पंथाच्या प्रार्थनास्थळाचे किंवा त्याच्या भागाचे त्याच धर्माच्या दुसऱ्या पंथाच्या अथवा अन्य धर्माच्या वा त्याच्या पंथाच्या प्रार्थनास्थळामध्ये कोणालाही रूपांतर करता येणार नाही. कलम ४ मध्ये जाहीर करण्यात आले आहे की, प्रार्थनास्थळ १५ ऑगस्ट १९४७ रोजी ज्या स्वरूपात अस्तित्वात असेल, त्याचप्रमाणे ते ठेवण्यात येईल. मात्र याच कायद्याच्या कलम ५ मध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं की 'अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रार्थनास्थळाला...त्यासंबंधीच्या दाव्याला, अपीलाला किंवा इतर कोणत्याही प्रक्रियेला या कायद्यातील कोणतीही तरतूद लागू होणार नाही.' गोडबोले पुढे लिहितात की काँग्रेसचा हा एक परिपूर्ण राजकीय डाव होता. एका बाजूने त्यांना तो सर्वात धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचा दावा करता येत होता, तर दुसऱ्या बाजूने बहुसंख्य हिंदूंचाही अनुनय होत होता. (पृष्ठ २५९)   

'कॅराव्हॅन' मासिकाच्या ऑक्टोबर २०२३ च्या अंकात 'हिंदू कार्ड : हाऊ काँग्रेस लेजिटिमाइझ्ड द संघ'ज कम्युनल पॉलिटिक्स' या शीर्षकाचा कुर्बान अली यांचा एक दीर्घ लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात त्यांनी काँग्रेसच्या हिंदू अनुनयाचे (विशेषतः १९८० ते १९८४ या कालखंडातील इंदिरा गांधींच्या हिंदू अनुययाचे) दाखले दिले आहेत. हे सगळं असलं तरी काँग्रेसला कधीच कुणी 'हिंदूंचं तुष्टीकरण करणारा पक्ष' म्हणत नाही. अगदी भाजपचे विरोधकदेखील नाही. याचं कारण काँग्रेस हा मुस्लिमधार्जिणा पक्ष आहे हे जनमानसावर ठसवण्यात संघ-भाजपची प्रचारयंत्रणा यशस्वी झाली आहे. २०२२ साली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे-फडणवीस आघाडीचं सरकार आलं. त्यानंतर केल्या गेलेल्या जाहिरातींमध्ये 'हिंदू सणांवरचं विघ्न टळलं, आपलं सरकार आलं' असा उल्लेख होता. ते वाचल्यावर हिंदू सण ध्वनीप्रदूषणाच्या असह्य त्रासासकट नियमित साजरे केले जात असताना हे विघ्न कधी आलं होतं असा प्रश्न माझ्यासारख्या नागरिकांना पडला होता.  

याच्या पोटातला एक मुद्दा असा की 'हिंदू तुष्टीकरणाचा प्रश्नच येत नाही कारण तो हिंदूंचा हक्कच आहे' अशी हिंदुत्वाची राजकीय धारणा व त्या प्रभावाखालील हिंदूंची सामाजिक धारणा असावी; किंबहुना ती आहेच. मुस्लिमांना दुय्यम नागरिक लेखणं इतकंच नाही तर शक्य झालं तर ते इथे नकोतच अशी अनेक हिंदूंची इच्छा आहे. अर्थातच हिंदुत्वाचे धुरीण हे उघडपणे बोलत नाहीत. पण प्रस्तुत लेखकाला विविध चर्चांमधून, समाजमाध्यमांवरील प्रतिक्रियांवरुन हा 'अंतःप्रवाह' जाणवत असतो. ही धारणा निर्माण करणारे आणि बाळगणारे बहुतेक हिंदू उच्चवर्णीय आहेत हा योगायोग नाही. (शिवाय ओबीसी समुदायालाही तिकडे वळवून घेतलं गेलं आहे. ओबीसी वर्ग हा आजच्या भाजपचा एक 'प्रमुख आधारस्तंभ' बनला आहे). 

हिंदू-मुस्लिम संदर्भ लक्षात घेतला तर गंगा-जमनी तहजीबचं उदाहरण देत असताना हिंदूंच्या मनात 'मुस्लिम आक्रमक म्हणून आले आणि त्यांनी आमचा सांस्कृतिक वारसा उद्ध्वस्त केला'’याबाबत रोष असेल तर उदारमतवादी विचाराने या हिंदू मानसाला झुकतं माप देत या मानसाशी संवाद साधण्याचा फारसा प्रयत्न केला नाही,  भारतीय समाजाची पारंपरिक/सांस्कृतिक 'बैठक' लक्षात न घेता आपली मांडणी केली या आरोपात तथ्य आहे. इथे मुळातला झगडा 'संवैधानिक मानस' आणि 'धार्मिक मानस' हा आहे. हे फक्त इथे नोंदवू कारण याबाबत वेगळी चर्चा करता येईल. इथे दृष्टीकोन, व्याख्या याबाबतचे बरेच मतभेद संभवतात. मुद्दा असा की एकविसाव्या शतकातल्या आधुनिक वैचारिकतेच्या संदर्भात आता 'संघटित धर्म' या संकल्पनेबाबतच प्रश्नचिन्ह उभी राहत असताना 'धर्मनिरपेक्षता कालबाह्य झाली आहे' असं म्हणणं आपल्याला कुठे नेईल हा गंभीर प्रश्न उभा राहतो. 

सिन्हा यांनी लेखात पुढे म्हटलं आहे की १८७२ ते १९४१ या काळात ज्या आठ जनगणना झाल्या त्यांच्या अहवालात हिंदूंच्या धर्मांतरणाच्या संथ गतीबद्दल चिंता आहे. यातून लक्षात येते की धर्मांतर हा वसाहतवाद्यांच्या सभ्यीकरण मोहिमेचा भाग होता. वसाहतवाद्यांनी हिंदूंमधील विविधता ही 'भेदभाव' किंवा प्रतिस्पर्धी ओळख म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला. हिंदूंमधील विविधता ही 'भेदभाव' नव्हती असं जर सिन्हा यांना म्हणायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर जोतिबा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, बाबासाहेब आंबेडकर इ. लोकांना अभ्यासक्रमातून वगळण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करावी. महाड येथील चवदार तळे सत्याग्रहानंतर तिथले पाणी उच्चजातीय हिंदूंनी 'शुद्ध' करून घेणे हा बहुधा 'विविधते'चा भाग असावा. भेदभावाचा नाही. असो. या मुद्द्याबद्दल अधिक काही लिहवत नाही. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आरंभलेल्या कामाला सिन्हा 'हिंदू नवप्रबोधन' - रेनेसाँ म्हणतात. चौदाव्या शतकात इटलीतील फ्लोरेन्समध्ये सुरू झालेली रेनेसाँ चळवळ ही प्रामुख्याने संगीत, नृत्य, शिल्प, स्थापत्य, या क्षेत्रात बदल घडवणारी होती. रेनेसाँने ख्रिश्चनिटीला पूर्णपणे नाकारले नाही; पण बुद्धीमंत वर्ग, कलाकार यांच्या धर्मसंकल्पनेकडे बघण्याच्या दृष्टीत फरक पडला आणि कलेच्या आविष्कारात ती प्रतिबिंबित झाली. रेनेसाँने प्रामुख्याने कलाक्षेत्रात क्रांती घडवली आणि पुढे सतराव्या/अठराव्या शतकातील 'एज ऑफ एनलायटन्मेंट'ने तात्त्विक व राजकीय विचारात क्रांती घडवली. 'एज ऑफ एनलायटन्मेंट'ला प्रबोधनयुग म्हटलं जातं आणि रेनेसाँला पुनर्जागरण म्हटलं जातं. सिन्हा म्हणतात त्याची दुसरी बाजू मांडायची झाली तर गेल्या काही वर्षांतील मुस्लिमांचे झुंडबळी, दलितांवरील अत्याचार, विरोधी मत प्रकट करणाऱ्याला देशद्रोही म्हणून निकालात काढणं, पगारी ट्रोल्समार्फत समाजमाध्यमांवरुन पद्धतशीरपणे द्वेष पसरवणं, 'जय श्रीराम' म्हणत नाही म्हणून लोकांना मारहाण करणं हा हिंदू नवप्रबोधनाचा/पुनर्जागरणाचा भाग आहे का? असल्यास तसं स्पष्ट म्हणावं कारण मग आम्ही असे प्रश्न तरी विचारणार नाही! 

हिंदू धर्म सहिष्णु आहे हे विधान सवर्ण किंवा माझ्यासारखे जातिव्यवस्थेचे चटके न बसलेले लोकच करू शकतात. पण तरीही या धर्मातील नास्तिकांना नास्तिक म्हणून राहता येतं ही गोष्टही अमान्य करता येणार नाही. मात्र आज जेव्हा कुणाशीही संभाषण सुरु करताना ते 'जय श्रीराम' ने होत असेल तर त्यावर काय प्रतिसाद देणं अपेक्षित आहे? विशेषतः माझ्यासारख्या अज्ञेयवाद्याने? आणि मी जर उलटा ‘नमस्कार’ केला तर त्यातून मी हिंदूविरोधी ठरणार नाही याची आज खात्री आहे का? ग्रामीण मंडळींचा ‘रामराम’ आणि आजचा ‘जय श्रीराम’ यात काहीच गुणात्मक फरक नाही असं सिन्हा किंवा त्यांच्या विचारांचे लोक म्हणतील; पण वस्तुस्थिती तशी नाही. ‘जय श्रीराम’ म्हणणारे सगळेच उन्मादी नाहीत हे मान्य; पण प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर डीजे लावून नाचणारे तरुण किंवा त्या रात्री दुचाकीवरुन जय श्रीरामच्या घोषणा देत फिरणारे तरुण उन्मादी नसून विवेकी आहेत आणि त्यांच्याशी भारताच्या एकूणच बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक इतिहासाबद्दल साधकबाधक चर्चा करता येऊ शकते हे सिन्हा तरी मान्य करतील का? 

रामरामला रामरामने उत्तर देण्यात प्रस्तुत लेखकाला काहीच अडचण येत नसे. आजही येत नाही. पण जय श्रीरामबाबत येते. हे का होतं याचा विचार सिन्हा आणि मंडळींनी जरूर करावा. ‘हिंदू’ या धार्मिक/सांस्कृतिक संज्ञा/ संकल्पनेचा राजकारणासाठी व्यापक प्रमाणात उपयोग करून घेत असताना त्यातले सामाजिक-वैचारिक अंतर्विरोध काय आहेत इकडेही लक्ष द्यावं. हिंदुत्ववादी राजकारण ही क्रियेला प्रतिक्रिया आहे असं थोडक्यात म्हणून त्याचं समर्थन करता येईल; पण कुठल्याही राजकारणाचं ‘थोडक्यात’ समर्थन करता येतं का याचा विचार करावा. एखादा प्रश्न ज्या पातळीवर निर्माण झाला असेल त्या पातळीवर उभं राहून तो सोडवता येत नाही; त्याच्या वर जाऊन तो सोडवावा लागतो या आशयाचं अल्बर्ट आइन्स्टाईनचं विधान आहे. धार्मिक संदर्भात या विधानाचा विचार करावा. प्रस्तुत लेखक म्हणतो आहे त्या उन्मादाचा, सामाजिक ध्रुवीकरणाचा अनुभव किंवा त्याचा त्रास हिंदुत्वाच्या धुरिणांना किंवा कुठल्याच धार्मिक राजकारणाच्या धुरीणांना थेट होत नाही. तो सर्वसामान्य नागरिकांना होत असतो. त्यामुळे अमुक एक गोष्ट ‘नवप्रबोधन’ आहे की नाही हे त्यांना ठरवू द्यावं. धार्मिक/राजकीय धुरीण ज्याला नवप्रबोधन म्हणतात ती प्रत्यक्षात वैचारिक अधोगती असू शकते!

(लोकसत्ता, ८ फेब्रुवारी २०२४)


Thursday, June 8, 2023

इतका वैचारिक गोंधळ बरा नव्हे!

राम माधव हे नवीन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचं समर्थन आणि प्रशंसा करणारा लेख लिहितात आणि ‘लोकसत्ता’मध्ये ‘पहिली बाजू’ या सदरात या लेखाचा अनुवाद छापला जातो, यात काही नवल नाही. पण त्या लेखात (‘आपली ‘धर्मशाही’!’ – ६ जून) त्यांनी मांडलेल्या मुद्दय़ांवर- विशेषत: या मुद्दय़ांना आधारभूत असणाऱ्या राजकीय तत्त्वज्ञानावर- स्वतंत्रपणे लिहिणंच योग्य होईल. कारण तो विचारदृष्टीतील फरकाचा, सैद्धांतिक वेगळेपणाचा विषय आहे. हिंदूत्ववादी आणि उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष विचारांत एक मूलभूत स्वरूपाचा फरक आहे. हे दोन्ही ‘वल्र्ड व्ह्यू’ वेगळे आहेत आणि त्याचा प्रमुख संदर्भ धर्मकारण हा आहे. काही बाबतीत संवादाच्या जागा असू शकतातच; किंबहुना काही सामाजिक-सांस्कृतिक संदर्भात हिंदूत्ववादी उदारमतवादीदेखील असू शकतात, असतात. पण जिथं एकमत होणं शक्य नाही अशी धर्मकारण ही एक मोठी जागा आहे. या बाबतीत व्यक्तिश: मला संवादी भूमिका घेऊन चर्चा करणं आवश्यक वाटतं. परंतु असा संवादी सूर आसपासच्या प्रचंड गलक्यात विरून जातो हे वरचेवर अनुभवायला येतं. शिवाय राम माधव (किंवा रवींद्र साठे) यांच्या लेखांसारखे अगदी मूलभूत गोंधळ असलेले लेख समोर आले की विशेष हतबुद्ध व्हायला होतं. अशा वेळी स. ह. देशपांडेंसारख्या हिंदूत्वाचा (हिंदूसंघटन करण्याचा) पुरस्कार करणाऱ्या आणि त्याबाबतची सविस्तर मांडणी करणाऱ्या लेखकाची आठवण होते. देशपांडे यांच्या विचारांशी सहमत होणं शक्य नसलं तरी निदान धर्माधारित विचारपद्धतीला व्यवस्थित शब्दबद्ध करण्याचं काम त्यांनी केलं होतं हे मान्य करावं लागतं.   

राम माधव यांच्या लेखातील काही विधानं चक्रावून टाकणारी आहेत. उदा. ‘गांधींसाठी धर्मविरहित राजकारण हे पाप होते’ आणि ‘नेहरूवादी राजकारण फोफावले ते सामाजिक विभाजनाच्या आधारे’ ही दोन विधाने. या विधानांमधून जो धादांत खोटा संदेश जातो आहे त्याचा प्रतिवाद करावा अशीही इच्छा खरं तर होत नाही. पण तरी तो करणं आवश्यक आहे. कारण असाच विचार करत राहिलो तर ‘दुसरी बाजू’ लोकांसमोर कशी येणार, हा प्रश्न सतावत राहतो.

गांधींनी धर्माचं महत्त्व ओळखलं होतं हे खरंच आहे. त्यामागे त्यांची मूळची धर्मश्रद्ध वृत्ती होती. त्यांना धर्माला टाकून द्यायचं नव्हतं; पण म्हणून त्यांना धर्म थेट राजकारणातही आणायचा नव्हता. ते रामाचं नाव घेत असत; पण म्हणून त्यांनी रामाला स्वातंत्र्य चळवळीच्या केंद्रस्थानी आणलं नाही. त्यांनी कुठेही रामाच्या मूर्तीची स्थापना केली नाही. गांधींच्या आश्रमात सर्वधर्मप्रार्थना होत असे. धर्म हा त्यांच्या चिंतनाचा विषय असेल; पण त्यांनी त्याचा वापर दुसऱ्या धर्माविरुद्ध हत्यार म्हणून कधीही केला नाही. याउलट हिंदूत्ववादी राजकारणाने काय केलं हे जगजाहीर आहे. यातली मेख अशी आहे की हिंदूत्ववादी राजकारण एकाच वेळी अनेक तोंडांनी बोलण्यात वाकबगार आहे. त्यामुळे हिंदूत्ववादी राजकारण मुस्लिमांच्या विरोधात आहे असं म्हटलं की मुस्लीम राष्ट्रीय मंचसारखं उदाहरण पुढे केलं जाऊ शकतं. एपीजे अब्दुल कलामांसारखे ‘गुड मुस्लीम’ आपल्याला हवे आहेत असं म्हणत दुसरीकडे आयटी सेलच्या मार्फत मुस्लीम कसे ‘बॅड’ आहेत याचे संदेश फिरवले जातात. याला धर्मकेंद्री राजकारण म्हणतात, किंवा ‘गांधींसाठी धर्मविरहित राजकारण हे पाप होते’ असं विधान करणं याला धर्मकेंद्री राजकारण म्हणतात. गांधींनी केलं त्याला धर्मकेंद्री राजकारण म्हणत नाहीत.

सामाजिक विभाजन या शब्दाचा अर्थ काय? दोन समूहांमध्ये बेबनाव निर्माण करणं. नेहरूप्रणीत राजकारणानं हे कधी केलं? या देशात अनेक धर्माचे, जातींचे लोक राहतात आणि त्यामुळे देशाची सामाजिक वीण टिकवून ठेवण्यासाठी शीर्षस्थ नेत्यांकडून जे संतुलित, विचारी वर्तन अपेक्षित असतं ते नेहरू आणि नंतरच्या नेत्यांमध्ये दिसून येतं. आज काय स्थिती आहे? सामाजिक विभाजन कोण करतंय? हे सगळं स्पष्टपणे इथं लिहायलाच हवं का? ऐंशी-नव्वदच्या दशकात माध्यमिक इयत्तांच्या पुढलं शिक्षण झालेल्या माझ्यासारख्या अनेकांना हे आठवत असेल की त्या वेळी सामाजिक सलोखा राखण्यासाठी शासकीय प्रसारमाध्यमं प्रयत्न करत असत. लघुपट, गाणी प्रसिद्ध होत असत. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’सारखं अजरामर गाणं आणि त्याचं चित्रीकरण माझ्यासारख्या अनेकांच्या मनावर कायमचं कोरलं गेलं आहे. आज ‘राष्ट्रीय एकात्मता’ हा शब्द तरी ऐकू येतो का? आज पद्धतशीरपणे मुस्लीम द्वेष पसरवला जातोय ते सामाजिक विभाजन नसून सामाजिक ऐक्याचा प्रयत्न आहे का?

मग ‘नेहरूवादी विभाजन’ कुठलं?

हिंदू कोड बिल हा सामाजिक विभाजनाचा प्रयत्न होता असं राम माधव यांना वाटत असण्याची दाट शक्यता आहे. वर जो ‘वल्र्ड व्ह्यू’चा उल्लेख केला आहे तो इथं लागू होतो. हिंदू कोड बिल आणलं याचा अर्थच हिंदू आणि मुस्लिमांमध्ये विभाजन आहे हे जर गृहीतच धरलं असेल तर पुढे काही बोलण्यात अर्थ उरत नाही. आणि हिंदू कोड बिल आणून तुमच्यावर अन्याय केला आहे हे हिंदूंच्या मनात आपोआप आलेलं नाही. ते पद्धतशीरपणे निर्माण करून दिलं गेलं आहे. हिंदू-मुस्लीमसंदर्भात इतिहासात जे झालं ते कुणीही अमान्य करणार नाही. पण त्यासाठी आपलं संपूर्ण राजकारण, आपला संपूर्ण ‘डिस्कोर्स’ एकांगी ठेवणं, धर्माधारित ठेवणं हे विभाजनाचं राजकारण आहे. इतिहास खोदत न बसता आता पुढे जाऊ असं म्हणत असणाऱ्यांना पुन्हा पुन्हा मागे नेणं हे विभाजनाचं राजकारण आहे. ‘केरळ स्टोरी’मधल्या मुली ‘हिंदू’ असणं आणि लैंगिक शोषण झालेल्या मुली फक्त ‘कुस्तिगीर’ असणं हे विभाजनाचं राजकारण आहे.

‘प्रार्थनास्थळे (विशेष तरतूद) कायदा, १९९१’च्या कलम ३ मध्ये म्हटलं आहे की कोणत्याही धर्माच्या किंवा धर्माच्या पंथाच्या प्रार्थनास्थळाचे किंवा त्याच्या भागाचे त्याच धर्माच्या दुसऱ्या पंथाच्या अथवा अन्य धर्माच्या वा त्याच्या पंथाच्या प्रार्थनास्थळामध्ये कोणालाही रूपांतर करता येणार नाही. कलम ४ मध्ये जाहीर करण्यात आलं आहे की, प्रार्थनास्थळ १५ ऑगस्ट १९४७ रोजी ज्या स्वरूपात अस्तित्वात असेल, त्याचप्रमाणे ते ठेवण्यात येईल. मात्र याच कायद्याच्या कलम ५ मध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं की ‘अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रार्थनास्थळाला.. त्यासंबंधीच्या दाव्याला, अपिलाला किंवा इतर कोणत्याही प्रक्रियेला या कायद्यातील कोणतीही तरतूद लागू होणार नाही.’ आता यावर राम माधव काँग्रेसला काय म्हणणार? हिंदू कोड बिल आणल्याने सामाजिक विभाजन झालं आणि ‘प्रार्थनास्थळे (विशेष तरतूद) कायदा, कलम ५’ नुसार सामाजिक ऐक्य साधलं गेलं? 

राजकारण करायला हरकत नाही. पण विस्तृत कालपटावरील घटनांकडे बघताना मागचे-पुढचे संदर्भ, काळाचा संदर्भ, कारणमीमांसा, उद्देश इ. मध्ये न जाता भलतेच अर्थ लावत लावत, सोयीची निवड करत करत आपला आणि इतरांचा मूलभूत वैचारिक गोंधळ तरी करू नये!

(लोकसत्ता, ७ जून २०२३)

Sunday, March 26, 2023

अवधूत नावाचा इसम

अवधूत डोंगरे हा एक 'इसम' आहे. म्हणजे तो लेखक आहे. त्याच्या चार कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यानेअनेक इंग्लिश पुस्तकांचे उत्तम मराठी अनुवाद केलेले आहेत. 'रेघ' नावाचा मराठीतील एक अतिशय दर्जेदार, उच्च संदर्भमूल्य असणारा ब्लॉग तो चालवतो. या ब्लॉगवरील लेख वाचणं हा एक दीर्घ संवादात्मक, अतिशय समृद्ध करणारा अनुभव असतो. डिजिटल व्यासपीठावरील कोलाहलात रेघेने आपलं एक वेगळं, शांत-संयमी स्थान निर्माण केलं आहे. पण हे सगळं असलं तरी अवधूत हा एक 'इसम' आहे. कुठेही भेटेल, सापडेल. बोलेल, प्रश्न विचारेल आणि आपल्याला विचारात टाकून आल्या वाटेने निघून जाईल असा इसम. 'इसम' हा 'इझमां'च्या पलीकडे जाईल असा शब्द आहे. 'इसम' फक्त असतो आणि त्याला पुष्कळ बोलायचं असतं. त्याला त्याचं आख्यान लावायचं असतं. आपल्या 'कॉमन मॅन' स्थानावरून. आणि तो ते लावत असतो. ऐकणारं कुणी आहे की नाही याची फिकीर न करता. 

'इसम' म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर असं जे काही उभं राहतं ते मी अवधूतला दहा-पंधरा वर्षांपूर्वी प्रथम भेटल्यापासून माझ्या डोळ्यांसमोर उभं राहत आलं आहे. त्यावेळी तो पुण्यात एका मासिकाच्या संपादकीय विभागात काम करत होता. अगदी अबोल, अंतर्मुख मनुष्य. काही लोकांना भेटलं की 'हा माणूस वेगळा आहे' असं जे आपल्याला जाणवत राहतं ते मला त्याच्याबाबतीत नेहमी जाणवत आलं आहे. अंतर्मुख म्हणजे इतका की याने कधी कुणाला गडगडाटी हसून टाळी दिली नसणार याची खात्रीच पटावी. त्याच्याहून दहा वर्षांनी मोठा असलो तरी भंकस करायची जन्मजात सवय असल्याने त्याच्यासमोर मी जरा सावरूनच असायचो/असतो. अर्थात भंकस हा अनेकपैकी एक पैलू असल्याने तो अडसर कधीच होत नाही. (शिवाय हेही सांगायला हरकत नाही की विनोद प्रिय असला तरी तत्वज्ञान तितकंच, किंबहुना थोडं जास्तच प्रिय असल्याने अवधूतसारखा समानधर्मी भेटला की माझ्यातला 'इसम'ही जागा होतो आणि आपलं आख्यान सुरु करतो.)

अवधूतशी असलेल्या 'लाँग डिस्टंस' मैत्रीने मला पुष्कळ काही दिलं आहे. मुख्य म्हणजे माझ्यातल्या आळशी, बेशिस्त माणसाला जाग आणायला मदत केली आहे. खरं सांगायचं तर कधीकधी थोडा न्यूनगंडही निर्माण केला आहे. कारण सर्वांना समान उपलब्ध असणाऱ्या 'काळ' नामक परिमाणात त्याने जे काम केलं आहे ते अचंबित करणारं आहे. आपल्याकडेही अवधूतकडे आहे तितकाच वेळ असतो; पण आपण तो पुरेपूर वापरण्यात कमी पडतो याची जाणीव झाली की शरमल्यासारखं होतं. पुस्तकांच्या दुकानात गेलं की अवधूतने अनुवाद केलेलं एखादं नवीन पुस्तक दिसतं आणि माझी स्वतःबद्दलची हताशा वाढते. माझ्यापाशी नेमका आकडा नाही; पण त्याने आजवर पंचवीस-एक तरी पुस्तकांचे अनुवाद केले असतील. आणि अनुवादक म्हणून अवधूतचं नाव असेल तर तो अनुवाद उत्तम असणार याची खात्री पटते असा त्याचा अनुवादाच्या क्षेत्रातला दरारा आहे. 

पुण्यात असताना होणाऱ्या गाठीभेटी त्याने पुणं सोडल्यावर फारच क्वचित होऊ लागल्या. अर्थात पुण्यात असतानाही वरचेवर भेटत असे असं नाही. त्याने स्वतःला वाचन-लेखन-अनुवाद याला वाहूनच घेतल्यासारखं होतं. मुळात लेखन-वाचन ही काही त्याच्या केवळ 'आवडीची गोष्ट' नाही. त्याच्यासाठी ते संवादाचं माध्यम आहे. चिंतनाचा विषय आहे. कमालीच्या गंभीरपणे करण्याची चीज आहे. मी संपादक म्हणून काम केलेलं असल्याने अवधूतसारखा लेखक संपादकासाठी किती मोलाचा असतो हे मी सांगू शकेन. लिहिण्याविषयीचं प्रेम, आस्था हा एक भाग झाला. पण मांडणीत वजन असणं, व्याकरणाच्या व इतर चुका नसणं, परिच्छेद नेमकेपणाने पाडलेले असणं, लेखनाला ओघ असणं हेही लेखनातील महत्त्वाचे भाग आहेत. सध्या आता जवळजवळ सगळेचजण लेख टाइप करून पाठवतात. वर्ड फाइल कशी तयार केली आहे याचाही संपादक म्हणून माझ्यावर प्रभाव पडत असतो. एकेकाळी कागदावर समास पाडून, सुवाच्य अक्षरात लिहिलेला मजकूर वाचताना संपादकांना जसा आनंद होत असेल तसा मला व्यवस्थित फॉर्मेट केलेली वर्ड फाइल बघून होतो. अवधूत त्याबाबतीत चुकूनही निराश करत नाही. त्याच्याकडून काहीही आलं की ते डोळे झाकून प्रिंटिंगला पाठवावं इतकं अचूक असतं. त्याच्याशी माझा संवाद हा प्रामुख्याने इमेलवर होतो. तुम्हांला जे म्हणायचं आहे ते नीट, व्यवस्थित फोड करून, संदिग्धतेला अजिबात जागा न ठेवता, सर्वंकष विचार करून आणि भाषेचा प्रभावी वापर करून लिहिता येणं ही वास्तविक फार अवघड गोष्ट नसायला हवी. पण ती दुर्मीळ झाली आहे खरी. अवधूतशी होणारा इमेल संवाद मला हा दुर्मीळ आनंद देतो. तो सोशल मीडियावर नाही. रेघेचं फेसबुक पेज आहे. त्याकरता तो फेसबुक वापरतो. पण व्यक्तिशः नाही. तिथे नसण्याबद्दलही त्याने बऱ्याच वर्षांपूर्वी सविस्तर लिहिलं होतं आणि अलीकडच्या एका भेटीत सविस्तर बोललाही होता. तू चुकूनही सोशल मीडियावर येऊ नकोस असं मी त्याला सांगितलंच. समाजमाध्यमं ही उपयुक्त माध्यमं असली तरी त्यांची एक दुसरी, दुखरी बाजूही आहे. त्याच्या खोलात जाण्याचं इथे प्रयोजन नाही, पण आपली 'परस्पर संवादाची भाषिक कुवत' या माध्यमांनी कमी केली आहे की काय अशी शंका येते. शिवाय 'डिस्ट्रॅक्शन' हा एक मोठा धोका आहेच. 

अवधूतच्या 'इसम' असण्यात त्याच्या व्यक्तित्वाचा वैशिष्ट्यांबरोबरच त्याच्या 'अपीअरन्स'चाही भाग आहे. इन न केलेला, चौकटीचा किंवा रेघांचा फुल शर्ट, दुमडलेल्या बाह्या, साधी ट्राउझर, चप्पल हा त्याचा पोशाख मी अनेक वर्षं पाहतो आहे. चेहरा अतिशय इंटेन्स. एकूणात एकदम साधासुधा. आणि हा साधेपणा 'ऑरगॅनिक' आहे. 'अंगावर येणारा साधेपणा' नव्हे. तो सहसा साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या गजबजाटात फारसा दिसत नाही. त्याला ते अगदीच वर्ज्य नसावं; पण त्याची मूळ प्रकृती शांतपणे आपलं काम करत राहण्याची आहे. लेखक असणं, लेखन करणं याबद्दल त्याची निश्चित मतं आहेत. भालचंद्र नेमाडे यांच्यावर त्याने एक फार प्रभावी, चिकित्सक लेख लिहिला आहे. मूळ लेख जरूर वाचा. पण त्यातला हा एक उल्लेख पहा -     

 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ' ही कादंबरी लिहायला तीस-बत्तीस वर्षं लागली, असं वेळोवेळी कुठे ना कुठे ऐकू येतं. अगदी काही महिन्यांपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीवर एक निवेदिकाही दुसऱ्या एका लेखकाची मुलाखत घेताना हे बोलून गेली. तीस वर्षं हा जगण्याचा कालावधी विविध अपरिहार्य, अटळ कामांसाठी वापरावा लागणं स्वाभाविक आहे. त्यामुळे कादंबरी लिहायला उशीर झाला, किंवा ती गडबडीत लिहिणं योग्य वाटलं नाही, इतर कामं प्राधान्यक्रमात वरती होती, अशी कारणं नोंदवली जात नाहीत. कधीतरी इतर कोणत्या मुलाखतीत ती ओझरती येतात- कौटुंबिक जबाबदाऱ्या, प्राध्यापकीय कामं, इत्यादी. हे गैर नाही. पण जणू काही तीस वर्षं एका कादंबरीचा ध्यास लेखकाला आणि वाचकांनाही होता, अशी मांडणी केली जाते. मग याची मिथकं तयार होतात. कादंबरी लिहिणं हे कष्टाचंच काम असतं, त्यासाठी कोणी प्रवास केला, वाचन केलं, तर ते त्या-त्या विषयसूत्रानुसार करावंच लागतं. पण ते नुसतं करून पुरत नाही. त्यासाठी एक मिथक तयार करावं लागतं- मोठ्ठा कालावधी, मोठ्ठं वाचन, इत्यादी. मग ते खरोखर महत्त्वाचं असल्याचं ठसवलं जातं. लेखकाचं स्वाभाविक काम म्हणून ते उरत नाही. 

स्वतः लेखक असलेला अवधूत लेखनाविषयी जेव्हा असं तटस्थपणे बोलतो तेव्हा बरं वाटतं. अवधूतच्या इतरही लेखांमधून तो शांतपणे, निरीक्षकाच्या भूमिकेतून त्याला जे दिसलं, जे 'पॉईंट आउट' करावंसं वाटलं ते करताना दिसतो. ह्रषीकेश पाळंदेसारखे काही अपवाद वगळता त्याचे समकालीन लेखक समाजमाध्यमांचा, एका अर्थी गर्दीचा भाग होऊन आपलं स्थान पक्कं करण्याच्या प्रयत्नात दिसतात. आज ते अपरिहार्य आहे असं म्हणता येईल; पण दोन्हीकडचे लेखक पाहणाऱ्या माझ्यासारख्या वाचकाला त्यांच्या 'लेखकीय वजना'त थोडा फरक जाणवतो हेही नोंदवायला हरकत नाही. लेखन हे करिअर असण्यात काहीच गैर नाही. शिवाय आज काळ असा आहे की तुम्ही अगदी थिअरॉटिकल फिजिसिस्ट असलात तरी तुमचं नाव होण्यासाठी तुम्हांला (सोशल मीडियावर) नाच करून दाखवता येणं आवश्यक ठरतं! लोकमानस असं काही बदलतं आहे की तुम्हांला दोन मिनिटात किंवा दोन परिच्छेदात 'व्यापक' बोलता येणं गरजेचं झालं आहे. पण हे करायला लागत असल्याने तुमच्या खोलात उतरण्याच्या क्षमतेवर नक्कीच परिणाम होतो असं माझं निरीक्षण आहे. अवधूतसारखा लेखक तिथे वरचढ ठरतो. त्याच्यासाठीदेखील लेखन हे एका अर्थी करिअर आहेच. पण त्याच्यात 'लेखक होण्याचा' अट्टाहास दिसत नाही कारण तो लेखक आहेच. त्याला त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. (इथे सामान्यीकरण करण्याचा हेतू नाही. पण एक ढोबळ निरीक्षण नोंदवण्याचा उद्देश जरूर आहे.)

माध्यमांच्या कोलाहलात काही सखोल वाचनाची, 'पर्स्पेक्टिव्ह'ची गरज 'रेघ' भागवतं. माझ्यासाठी अवधूतशी होणारा संवाद हाच परिणाम साधतो. झालंय असं की आजचं वास्तव विखंडित आहे तसंच माणसंही विखंडित आहेत. दीर्घ संवाद तर फारसा कुणालाच नको असतो. आपली मतं, धारणा पुन्हा पुन्हा तपासायचीही फारशी गरज कुणाला वाटत नाही. वास्तविक कुठलंही घटित त्याच्या आगेमागे शेकडो संदर्भ घेऊन येत असतं. घटिताविषयी भरपूर चर्चा होताना दिसते; पण या संदर्भांविषयी फारशी चर्चा होत नाही. आणि चर्चेला जी वळणं फुटत जातात तो तर वेगळाच विषय! वर जो करिअरचा मुद्दा आला त्याला जोडलेला एक मुद्दा असा की लेखन हा निव्वळ आवडीचा प्रांत असून चालत नाही. त्यासाठी तार्किक क्षमतेची, सुसंगतीची (coherence - the quality of forming a unified whole) गरज असते. अगदी समकालीन घटनांवरील टिप्पणी हा विषय घेतला तरी तिथेही याची गरज असते. पण जर करिअर साधायचं असेल तर मग हे मुद्दे मागे पडतात. कारण 'लेखक होणं' हे अधिक वरचढ ठरतं. त्यातून 'सोशल डिस्कोर्स'चं नुकसान होतं. लेखक जेव्हा कथा लिहितो, कादंबरी लिहितो तेव्हा त्याच्यावर सोशल डिस्कोर्सचं ओझं देण्याचं काहीच कारण नाही. त्या लेखनाची समीक्षा हा वेगळा विषय. पण जेव्हा काही भाष्य करणारं लेखन होत असतं तेव्हा मात्र 'सोशल डिस्कोर्स'चा मुद्दा लागू होतो. या पार्श्वभूमीवर अवधूतसारखा लेखक आणि भाष्यकार महत्त्वाचा ठरतो. 

भाषांतर करत असताना मूळ पुस्तकातील मांडणीविषयी प्रश्न पडून त्यावर भाषांतरकाराला काही म्हणावंसं वाटू शकतं. ते म्हणणं छापील स्वरूपात आल्याची उदाहरणं फारशी दिसत नाहीत. अवधूतची दोन मोठी टिपणं त्यादृष्टीने महत्त्वाची ठरतात. पहिलं म्हणजे 'स्वतःचा अवकाश तपासताना : मराठी भाषांतरकाराचं टिपण' (सुगावा प्रकाशन) आणि दुसरं 'एका शब्दाचा पेच - मराठी भाषांतरकाराचं टिपण' (साधना प्रकाशन).  
        
पहिल्या टिपणाची ओळख (मलपृष्ठावरील मजकूर) - 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'ॲनाहिलेशन ऑफ कास्ट' या संहितेची एस. आनंद यांनी संपादित केलेली व त्यांनीच टिपा जोडलेली आवृत्ती 'नवयान पब्लिशिंग'नं मार्च २०१४मध्ये प्रकाशित केली. या ग्रंथासाठी एक दीर्घ प्रस्तावना 'द डॉक्टर अँड द सेंट' या शीर्षकाखाली अरुंधती रॉय यांनी लिहिली. या संपूर्ण प्रस्तावनेचं मराठी भाषांतर 'सुगावा प्रकाशना'नं 'वंश, जात व जातिव्यवस्थेचं उच्चाटन' या शीर्षकाखाली स्वतंत्र पुस्तक म्हणून प्रसिद्ध केलं. रॉय यांच्या मांडणीसंदर्भात मराठी भाषांतरकाराचे काही तीव्र मतभेद आहेत. या मतभेदांची त्यानं केलेली नोंद स्वतंत्र पुस्तिकेच्या रूपात प्रसिद्ध करण्याचं ठरलं, ती ही पुस्तिका.

'स्वतःचा अवकाश तपासताना : मराठी भाषांतरकाराचं टिपण' हा मजकूर रॉय यांच्या पुस्तकाशी समांतरपणे लिहिला गेला, हे खरं. पण स्वतंत्रपणे वाचताना हा निबंध सध्याच्या काळातल्या अभिव्यक्तीविषयीचा एक अगदी लहानसा घटना-अभ्यास वा व्यक्ति-अभ्यास (केस-स्टडी) म्हणूनही वाचता येईल, असं वाटतं.

दुसऱ्या टिपणाची ओळख (पुस्तिकेचं मनोगत) -

अ. के. भागवत आणि ग. प्र. प्रधान यांनी १९५६ मध्ये लिहिलेल्या लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी चरित्राचं मराठी भाषांतर करण्याचं काम सदर भाषांतरकाराकडे आलं. भाषांतर करताना काही विशिष्ट शब्दांवर अधिक रेंगाळणं होतं. परक्या भाषेतल्या या काही शब्दांसाठी आपल्या भाषेत काही रूढ शब्द असतात. काही वेळा तसे शब्द नसतातही. काही वेळा असे रूढ प्रतिशब्द सहज उपलब्ध असले तरी ते पटत नाहीत, अपुरे वाटतात. अशा वेळी भाषांतरकारासमोरची गुंतागुंत वाढते. या पुस्तिकेमध्ये ही गुंतागुंत मांडली आहे. इथे भाषांतराचा आशय टिळक-चरित्र हा असल्यामुळे वरील गुंतागुंतीची उकल करताना टिळकांच्या जीवनातील काही घटना-घडामोडींचा संदर्भही त्यात सविस्तर आलाच आहे. शेवटी त्यांच्या आयुष्यातल्या घटना-घडामोडींचे वर्णन किंवा विवरण करण्यासाठीच मूळ लेखकांनी शब्द वापरले आहेत. त्यामुळे मराठी भाषांतरकाराने टिळक-चरित्राच्या निमित्ताने इतरही संदर्भ सोबतीला घेत, त्याच्यासमोर आलेले पेच किंवा त्याला जाणवलेल्या काही शक्यता नोंदवायचा प्रयत्न या टिपणातून केला आहे.

ही दोन्ही टिपणं (पुस्तिका) आवर्जून वाचावी अशी आहेत. अवधूतमधला भाषांतरकार आपलं काम करत असताना त्याच्यातला भाष्यकार किती विचक्षणपणे त्या व्यवहाराकडे बघतो हे लक्षात येतं. 'एका शब्दाचा पेच'मध्ये त्याने टिळकांच्या व्यक्तिमत्वावर संदर्भसंपृक्त प्रकाशझोत टाकला आहे. टिळकांच्या संदर्भात वापरलेल्या 'कन्झर्व्हेटिव्ह' या शब्दापाशी रेंगाळत पुढे त्याने एक मोठाच पट मांडला आहे. 'एकेक पदर उलगडणं' म्हणजे काय त्याचा प्रत्यय हे टिपण वाचताना येतो. 

व्यक्तीचित्रात त्या व्यक्तीबाबत लिहावं असं अपेक्षित असतं. पण अवधूतमधली व्यक्ती आणि त्याच्यातला भाष्यकार वेगळा काढणं मला कठीण वाटतं. व्यक्तिगत संदर्भात मला त्याच्याबद्दल फार माहितीही नाही. एकदा बोलता बोलता त्याने एकदम 'अरे मी लग्न केलं' असं हळू आवाजात सांगितलं होतं. त्यावर मी त्याचं अभिनंदन केलं. पुढे त्याला मुलगा झाल्याचं एका मित्राकडून कळलं. त्याच्याशी बोलताना व्यक्तिगत, कौटुंबिक बोलणं होत नाही. पण तो ज्या आस्थेने साहित्यावर, सामाजिकतेवर बोलतो ते त्याचं 'व्यक्तिगत'च असतं. तो साहित्यिक-सांस्कृतिक कोलाहलापासून फक्त भौतिकदृष्ट्याच लांब आहे. रेघेवरचं त्याचं लेखन वाचलं की तो या कोलाहलात आपलं म्हणणं ठामपणे मांडतो आहे हे लक्षात येतं. रेघेवरील त्याच्या निवडक लेखांचं पुस्तक प्रकाशित होतं आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे. या 'इसमा'चं आख्यान अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला त्याची मदत होईल. 

कुठलंही व्यक्तीचित्रण म्हणजे त्या व्यक्तीचं संपूर्ण चित्रण असूच शकत नाही. पण तरी काही व्यक्तींबाबत काहीतरी लिहावं असं वाटतं खरं. अवधूतबाबत मला तसं वाटत होतं. काही लिहावं असं बरेच दिवस मनात होतं. वाचकांना कदाचित हे त्याचं व्यक्तीचित्र वाटणार नाही. पण लेखक-भाष्यकार म्हणून तो मला कसा दिसतो याची कल्पना येईल. आपल्या 'वाटण्या'ला, आपल्या आतल्या गुंतागुंतीला बोलून मांडताना कधीकधी फार अवघड होतं. आमच्या मागच्या भेटीत अवधूतचं तसं होतंय असं मला जाणवलं. लेखक असण्यापेक्षा त्याचं 'इसम' असणं मला भावतं ते त्यामुळेच. त्याबाबतीत तो मला माझा सहप्रवासी वाटतो. कारण आसपास पाहिलं तर उत्तरं तयार असलेले, त्वरित निर्णय देणारे बरेचजण मला दिसतात; पण प्रश्नांपाशी रेंगाळणारे फारसे कुणी दिसत नाहीत.    

अवधूत लेखक आहे, त्याला युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळून आता काही वर्षं झाली. इथून पुढेही त्याला पुरस्कार मिळतील. पण त्याचा लेखकराव होऊ नये असं म्हणण्याचीही मला गरज वाटत नाही. कारण तसं होणार नाही याची मला खात्री आहे. इतपत तर मी त्याच्यातल्या इसमाला नक्कीच ओळखतो!   


Friday, October 14, 2022

हिंदुत्ववाद : निकड आत्मपरीक्षणाची

लोकशाही व्यवस्थेत राजकीय आघाडीवर जे सुरु असते त्याबाबत सर्वसामान्य नागरिक बघ्याची भूमिका घेण्याखेरीज फारसे काही करू शकणार नाहीत याची काळजी आपली राजकीय व्यवस्था घेते की सर्वसामान्य नागिरकच घेतात हा 'आधी अंडे की आधी कोंबडी' या धर्तीचा प्रश्न आहे. छोट्या समूहांमध्ये जे व्यवस्थाचालन शक्य असते ते लोकसंख्या क्रमाक्रमाने वाढत गेली की अशक्यप्राय होत जाते आणि प्रातिनिधीक लोकशाही आकार घेते. आता प्रातिनिधीक लोकशाहीत निवडून दिलेले प्रतिनिधी जे जे करतात (यात लोकहिताच्या कामांपासून भ्रष्टाचार आणि सत्तास्थापनेसाठीच्या विधिनिषेधशून्य राजकारणापर्यंतचे सर्व काही) ते नागरिकांनी त्यांना पटले किंवा पटले नाही तरी मान्य केले पाहिजे कारण नागरिकांना राजकीय व्यवस्थेचे फायदेही मिळत असतात त्यामुळे त्या व्यवस्थेच्या नकारात्मक बाजू स्वीकारण्याला पर्याय नाही असा एक युक्तीवाद प्राचीन अशा 'सामाजिक करारा'च्या सिद्धांताच्या आधारे करता येऊ शकेल. आपल्या काही हक्कांच्या रक्षणासाठी व्यक्तींनी त्यांच्या काही स्वातंत्र्यांचा त्याग करावा, त्याबाबतीत राज्यसंसंस्थेची महत्ता मान्य करावी असे हा सिद्धांत सांगतो. व्यक्ती जर परस्परसंबंधांचे नियमन करू शकत नसतील, त्यातून अराजक माजणार असेल तर शासनसंस्था निर्माण होणार आणि मग व्यक्तींना शासनसंस्थेचे वर्चस्व मान्य करावे लागणार. इथे व्यक्ती आणि शासनसंस्था यांच्यात एक 'करार' होतो आणि शासनसंस्थेला सार्वभौमत्व दिले जाते. 

थॉमस हॉब्ज हा सामाजिक कराराचा प्रवर्तक. त्यानंतर जॉन लॉक आणि रूसो यांनी सामाजिक कराराची त्यांची संकल्पना मांडली. या सिद्धांताबाबत आजवर जो विचार झालेला आहे त्यात राज्यसंस्थेच्या सार्वभौमत्वाचे समर्थन आणि सार्वभौम राज्यसंस्थेकडून होणारे नागरिकांचे शोषण या दोन्हीचा समावेश आहे. हाच धागा पकडून, पुढे नेत आपण असे म्हणू शकतो की राज्यसंस्था म्हणजे एका अर्थी एक 'निष्पक्ष संस्था' असायला हवी. 'संस्थाचालक' कुठलाही राजकीय पक्ष असला तरी त्या संस्थेची जी एक मूलभूत चौकट आहे त्यानुसार त्या त्या पक्षाच्या प्रतिनिधींचे वर्तन असावे. 'करार' करणाऱ्या नागरिकांची अशी अपेक्षा असणे गैर नाही. (त्या चौकटीचे पुन्हा अनंत आयाम असतात आणि त्यातील प्रत्येकाबाबत वेगळी चर्चा संभवू शकतेच. ती व्हावीच.) आपण आज ज्या राजकीय स्थितीत आहोत त्यात ही चौकट हलू लागली आहे आणि ती टिकते की नाही अशी शंका येऊ लागली आहे. हे निरीक्षण आजचे ननसून मागील बऱ्याच काळापासून मांडले जात आहे.   

याचा रोख केंद्रातील आजच्या सरकारकडे असला तरी पुढे जाण्याआधी एक गोष्ट नोंदवायची आहे. ती म्हणजे  आपल्या सगळ्यांमध्ये - म्हणजे केंद्र सरकारचे शीर्षस्थ नेते, प्रवक्ते, कट्टर समर्थक, केंद्र सरकारचे समीक्षक आणि मुख्य प्रवाहातील सरकारधार्जिण्या, प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक, माध्यमांनी साधलेल्या भयावह ध्रुवीकरणाच्या कचाट्यात सापडलेले नागरिक - एक मोठी विसंगती निर्माण झाली आहे. ती अशी की आपण सगळे एका 'पेज'वर नाही. सगळे एकाच वेळी एकाच पेजवर असणे फार अवघड आहे हे मान्य आहे; पण समर्थक दहाव्या पेजवर आणि विरोधक पन्नासाव्या पेजवर हे फार घातक आहे. राजकीय पक्षांच्या आघाड्यांच्या संदर्भात 'कॉमन मिनिमम प्रोग्रॅम' असतो तसा नागरिकांच्या संदर्भात पक्षनिरपेक्ष असा 'कॉमन अंडरस्टँडिंग प्रोग्रॅम' असणे अपेक्षित आहे. म्हणजे जे सुरु आहे त्यातले बरेच काही चुकीचे आहे यावरच जर एकमत नसेल तर चूक सुधारणार कशी? 

राजकीय आघाडीवर 'दृष्टीकोनांचा गुंता' नेहमीच असतो. तो आज आहे असं नाही. पण हा गुंता वाढत वाढत अशा जागी पोचला आहे की सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या समर्थकांना स्वच्छ दिसणारे सत्यदेखील मान्य करणे शक्य होत नाही आहे. भाजपविषयी कुठलाही पूर्वग्रह नसलेला मनुष्यदेखील गेल्या आठ वर्षात भारतातील राजकीय संस्कृतीची अवनती झाली आहे हे दर्शवणाऱ्या उदाहरणांची एक जंत्रीच देऊ शकेल. नरेंद्र मोदींनी आठ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेण्यापासून भाजपने स्वायत्त संस्थांना हाताशी धरून खेळलेल्या सूडाच्या राजकारणापर्यंत, जे. पी. नड्डा यांनी उघडपणे 'देशात भाजप हा एकच पक्ष टिकेल' म्हणण्यापासून गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मेधा पाटकर यांना तर नरेंद्र मोदींनी अलीकडेच 'आप'ला अर्बन नक्षल म्हणण्यापर्यंत अनेक गोष्टी सांगता येतील. वेळोवेळी त्या सांगितल्या गेल्याही आहेत आणि जी माध्यमे अद्याप स्वतंत्र आहेत त्यांनी त्याला स्थानही दिले आहे. परंतु तरी सार्वजनिक चर्चाविश्वात सत्तारूढ पक्षाची चिकित्सा ऐकून घेणे, समजून घेणे, त्यावर साधकबाधक चर्चा होणे याचा अवकाश कमी कमी होत गेल्याचे दिसते. 

हा अवकाश कमी होणे याच्या मुळाशी कडव्या हिंदुत्ववादाचा अवकाश वाढत जाणे (वाढवला जाणे) हे एक मुख्य कारण आहे असे दिसते. मुळात हिंदुत्ववाद ही एक वैशिष्ट्यपूर्ण, धर्माधिष्ठित विचारसरणी आहे. या विचारधारेचे तर्कशास्त्रच वेगळे आहे, या विचारधारेने घडवलेले मानस वेगळे आहे. ते तार्किक, आधुनिक संदर्भांच्या चौकटीतील युक्तिवाद समजून घेण्याच्या मनःस्थितीतील नाही. हे मानस 'हिंदू असण्या'प्रती हळवे आहे आणि त्याचा पोत राजकीय आहे. (हिंदुत्ववादाचे धुरीण बरेचदा सत्ताकांक्षेमुळे 'धूर्त हळवे' होतात, तर सर्वसामान्य, धर्मश्रद्ध जनतेला खरोखरचे हळवे  करून सोडण्यात त्यांना यश आले आहे). या देशात हिंदूंवर अन्याय झाला आहे ही त्याची दृढ समजूत आहे. हिंदूंवरील अन्याय, हिंदू-मुस्लिम संबंधांचे आयाम, धर्मनिरपेक्षता इ. मुद्दे कुठल्याही व्यापक संदर्भात समजून घ्यायची त्याची तयारी नाही. त्याला हिंदू धर्माची चिकित्साही नको आहे. आणि याची परिणती भाजप आणि नरेंद्र मोदींची चिकित्सा नको असण्यात झाली आहे. (भाजपचे नेते चंद्रकांत पाटील अलीकडेच बोलताना म्हणाले की आई-वडिलांवरून शिव्या दिलेल्या चालतील; पण नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांना शिव्या देऊ नका. हे उदाहरण प्रातिनिधिक म्हणता येईल.)

हिंदुत्ववादाने उपलब्ध करून दिलेला अवकाश पूर्णपणे व्यापल्यावर त्या बळावर अलगदपणे राजकीय अवकाशावर पोलादी पकड बसवणे नरेंद्र मोदी-अमित शहांना शक्य झाले आहे. इथे आपण हिंदुत्ववाद आणि डावा पुरोगामी विचार यामधील संघर्षाला बाजूला ठेवू. प्रकटन आणि परिणाम या दोन निकषांवर दोन्हीची चिकित्सा होऊच शकते. ती व्हावीच. पण तो वेगळा विषय होईल. राजकीय संदर्भात हिंदुत्ववादाने टोकाचे आक्रमक रूप धारण केल्याने त्याविषयीची चर्चा प्राधान्याने करणे गरजेचे आहे. हिंदुत्ववादाच्या राजकीय स्वरूपातून होणारे मुस्लिम व इतर धर्मीयांचे 'अदरिंग' (वेगळे पाडणे) आणि मुख्य म्हणजे हिंदू धर्माचाच होणारा संकोच याची जाणीव करून देत राहणे गरजेचे आहे.

परंतु वर उल्लेख केला त्याप्रमाणे एक अडचण अशी झाली आहे की या चर्चेसाठीचा अवकाशच आक्रसला आहे. दसऱ्याच्या दिवशी कॉलनीत लाउडस्पीकरचा आवाज कमी ठेवा असे सांगायला गेल्यावर हिंदूंनी सण कसे साजरे करायचे असे मला आयोजकांनी विचारले होते. असे इतरही अनुभव आणि निरीक्षणे आहेत; पण या लेखाच्या मर्यादेत सर्व मांडणे शक्य नाही. ही जी मानसिकता तयार झाली आहे तिच्या मुळाशी काही अंशी तरी 'हिंदू मनाची झालेली घुसमट' आहे का हा शोध घ्यायला काहीच हरकत नाही. पण आजचे हे हिंदू मानस एका 'ट्विस्टेड लॉजिक'च्या आधारावर आक्रमक झाले आहे असे स्पष्टपणे दिसते. 'आपले सरकार आले, हिंदू सणांवरचे विघ्न टळले' अशी जाहिरात पाहिल्यावर हतबुद्ध व्हायला झाले कारण कोरोनाकाळात सुरक्षेचा उपाय म्हणून सार्वजनिक सण बंद ठेवणे आवश्यक होते. आणि कोरोना नव्हता तेव्हा ध्वनीप्रदूषणाच्या सर्व मर्यादा ओलांडून उत्सव साजरे होतच होते. कधीच कुठले 'विघ्न' नव्हते. अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचेदेखील! पण तरीदेखील अशी जाहिरात करण्याचे बळ मिळते हे हिंदुत्ववादी राजकारणाचा मूलाधार आणि दिशा स्पष्ट करणारे आहे. 

आजच्या वर्तमानाचा विचार करताना गरज जाणवते ती संवादाची. राजकीय तत्वज्ञान आणि त्यातून निपजणारे राजकीय डावपेच एका पोकळीत निर्माण होत नाहीत. ते सामाजिक पायाच्या आधारावरच उभे राहतात. त्यामुळे या सामाजिक पायाकडे लक्ष देणे, तो मजबूत करणे आवश्यक ठरते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात हा पाया मजबूत आहे असे (काही अपवाद वगळता) हिंदुत्ववादी विचारसरणीच्या बहुसंख्य धुरिणांना आणि समर्थकांना मनापासून वाटत असावे. पण त्यांनी त्याचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. आणि यात दृष्टीकोनाचा फरक असण्याचा प्रश्नच नाही. जे सत्य आहे ते सत्यच असते. सामाजिक संबंधांची उसवलेली वीण आणि राजकीय क्षेत्रात संवैधानिक, लोकशाही मूल्यांचा आणि लोकशाही संस्थांचा झपाट्याने होणारा ऱ्हास हे आजचे सत्य आहे. त्याकडे बघणाऱ्याची वैचारिक चौकट किंवा वैचारिक कल हिंदुत्ववादाचा असला तरी ते सत्य बदलणार नाही. त्यामुळे हे सत्य मान्य करणे आणि संवादाला तयार होणे हे हिंदुत्ववादासाठी त्याने घेतलेल्या विपर्यस्त वळणावरून परतीचा प्रवास चालू करण्याचे पहिले पाऊल ठरेल! 

(लोकसत्ता, 'विचारमंच', ऑनलाइन आवृत्ती, १३ ऑक्टोबर २०२२)

Monday, September 12, 2022

गरज सर्वंकष समीक्षेची

'सामान्यपणाचा अहंकार' हा महेश एलकुंचवार यांचा लेख आणि शांता गोखले यांचा मराठी कादंबरीवरील लेख वाचून साहित्यनिर्मिती आणि/किंवा समीक्षेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या मनात काही हालचाल होणे स्वाभाविक आहे. समाजमाध्यमांवरही या लेखांचे पडसाद उमटलेले दिसले. कलानिर्मिती आणि त्यावरील समीक्षा हा विषय एका विशिष्ट विचारव्यूहात बांधणे शक्य असले, तसे केलेही जात असले, तरी अंतिमतः कलानिर्मिती हा एक प्रवाही आविष्कार असल्याने त्याला पूर्णांशाने कवेत घेणे किंवा त्याविषयी निर्णायक भाष्य करणे या दृष्टीने कुठलाही एक विचारव्यूह, एक दृष्टीकोन पुरा पडत नाही. या एका पायाभूत विचारावर भिस्त ठेवून काही म्हणावेसे वाटते.  

‘श्रेष्ठतम कादंबरीची प्रतीक्षाच’ असे शांता गोखले यांच्या लेखाचे शीर्षक असले तरी लेखात त्यांनी तसा थेट उल्लेख केल्याचे दिसत नाही. एलकुंचवारांनी मराठी जनांच्या सुस्त वृत्तीवर बोट ठेवले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात जी लोकोत्तर व्यक्तिमत्वे उदयास आली तशी स्वातंत्र्योत्तर काळात आलेली नाहीत आणि आपला कलाव्यवहार, सांस्कृतिक व्यवहार खुरटलेला राहिला आहे असे त्यांनी मांडले आहे. मराठी साहित्य आणि मराठी समाज यांच्याविषयी काही भाष्य करणाऱ्या या लेखांच्या अनुषंगाने थोडे अधिकचे विवेचन केल्यास ते अप्रस्तुत ठरू नये. 

सुरुवातीलाच आपल्याला साहित्य हे इतर उत्पादनांसारखे (घरगुती, औद्योगिक इ.) उत्पादन आहे की ती एका अबोध जाणिवेचे पाठबळ असणारी निर्मिती आहे असा एक प्राथमिक प्रश्न विचारता येईल. त्याच्याही पुढे जाऊन साहित्य किंवा कलाविष्कार यांचा अंतर्भाव काही अनिवार्य गोष्टींमध्ये होतो का असेही विचारता येईल. भौतिक उदाहरण घेऊन हे आणखी स्पष्ट होऊ शकेल. एखादा प्रदेश एखाद्या फळासाठी प्रसिद्ध असतो. ते फळ दुसऱ्या प्रदेशात होत नाही म्हणून त्या प्रदेशाला आपण कमी लेखत नाही. कदाचित त्या दुसऱ्या प्रदेशात अन्य काही गोष्टी चांगल्या होत असतील. पण जर त्या प्रदेशातील हवा अत्यंत प्रदूषित असेल, पाणी पिण्यालायक नसेल तर मात्र त्या प्रदेशाला आपण कमी प्रतीचा, मागास ठरवू. (सध्या प्रगत समजल्या जाणाऱ्या शहरांची अशी मागास अवस्था आहे हा वेगळा विषय!) आता आपण साहित्याला, अभिरुचीला शुद्ध हवा-पाण्यासारखे अनिवार्य समजतो की साहित्य किंवा अभिरुची हे एखाद्या अलंकारासारखे असून समाजाच्या मूळच्या सौष्ठवाशी त्यांचा थेट संबंध नाही असे समजतो यावर आपली पुढील टिप्पणी अवलंबून असेल. 

हे थोडेसे 'विचित्र विच्छेदन' करण्याचे कारण असे की समीक्षेची दृष्टी थोडी व्यापक व्हावी आणि त्यात वस्तुनिष्ठ म्हणता येतील अशा निकषांचा आधार घेतला जावा. साहित्य किंवा कलानिर्मितीची समीक्षा करताना 'जे निर्मिले जाते आहे' त्याकडे काही 'पूर्वसिद्ध निकषां'च्या आधारे बघत त्या निर्मितीला प्रतिसाद देणे, पुढील निर्मितीच्या गुणवत्तेत सुधारणा होईल म्हणून टीका-टिप्पणी करणे हे हेतू असतात आणि ते स्तुत्य आहेत. पण साहित्य, अभिरुची या गोष्टी सार्वकालिक, सर्वत्र एकसारख्याच असल्या पाहिजेत असा आग्रह असेल तर तो तपासून पहावा लागेल. 'अलीकडे जे लिहिले जाते त्यात फारसा दम नाही' असे सरधोपट विधान बरेचदा केले जाते. हे विधान करण्याआधी 'जे लिहिले जाते आहे ते सर्व' वाचले गेलेच असेल असे नाही. दुसरे म्हणजे एखाद्या कालखंडात लिहिले गेलेले आपल्याला अधिक प्रभावित करून गेले असेल आणि आज तसे लिहिले जात नसेल तर त्यामागे काय कारणे असावीत हाही शोध घेणे सयुक्तिक ठरेल. समीक्षेची बैठक सहसा संख्याशास्त्रीय माहितीवर आधारलेली किंवा वस्तुनिष्ठ अशी नसून आत्मनिष्ठ असते. त्यामुळे आपण थेट निष्कर्षांवर पोचतो. कारणमीमांसेत जात नाही. समीक्षेची बैठक वस्तुनिष्ठतेकडे जाण्यासाठी आपण काही मूलभूत प्रश्नांचा शोध घेऊ शकतो. उदा. 'महान साहित्यकृती म्हणजे काय? प्रचंड वैविध्य (संकल्पनात्मकदेखील) असणाऱ्या जगात महानतेची एकच सार्वत्रिक व्याख्या होऊ शकेल का?', 'अभिजात', 'चांगली अभिरुची' या संज्ञांचा अर्थ काय?' 'निर्मितीची मानवी आकांक्षा महत्त्वाची की निर्मितीची गुणवत्ता? असा फरक करावा की करू नये?' 'नैसर्गिक विज्ञानात, उदा. भौतिकशास्त्र, निश्चित विधाने करता येतात कारण तिथे सहभागी घटकांचे वर्तन नियमबद्ध असते. कला-साहित्य हे क्षेत्रही नियमबद्ध आहे असे आपल्याला वाटते का?' इ.  

वस्तुनिष्ठतेचा आग्रह कदाचित अनाठायी किंवा अशक्यप्राय वाटू शकेल. पण आत्मनिष्ठतेचा आधार बऱ्याच जास्त प्रमाणात घेतला जात असल्याने संतुलन साधण्यासाठी वस्तुनिष्ठतेकडे जाणे गरजेचे आहे असे वाटते. अरुण टिकेकर यांनी त्यांच्या 'सारांश' या ग्रंथातील 'साहित्याचे समाजशास्त्र' या लेखात उद्बोधक माहिती दिली आहे. त्यांनी हिपोलिट टेन या फ्रेंच वाङ्मयीन इतिहासकाराची मते उद्धृत केली आहेत. त्याचे एक मत असे - A literary work is not a mere play of imagination, the solitary caprice of a heated brain, but a transcript of contemporary manners, a type of certain kind of mind. यातील 'सर्टन काइंड ऑफ माइंड' हा उल्लेख महत्त्वाचा आहे. याच लेखात टिकेकरांनी टेनच्या आधी होऊन गेलेल्या हर्डर या जर्मन तत्त्वचिंतकांचे मतही नोंदवले आहे. ते असे की प्रत्येक वाङ्मयकृतीचे मूळ विशिष्ट सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीत सापडते. टिकेकर पुढे लिहितात की प्रसिद्ध जर्मन तत्त्वचिंतक हेगेल याचा दृष्टिकोन असा होता की प्रत्येक युग अभिव्यक्तीसाठी एखादा कला-प्रकार निवडत असते. याचा अर्थ असा की वाङ्मयाची पाळेमुळे समकालीन समाजातच रुजतात आणि वाढतात. हेगेलने असेही म्हटले आहे की नोकरशाही पद्धती आणि प्रत्येकाला काम वाटून देणारी पद्धती या दोहोंमुळे महाकाव्याचा वाङ्मयप्रकार लयाला जाऊन कादंबरी हा 'समकालीन' वाटणारा वाङ्मयप्रकार जन्माला आला. 

याच यादीत टिकेकरांनी अ‍ॅडम स्मिथचे मत नोंदवले आहे. ते असे की वाढत्या व्यापारीकरणामुळे आणि औद्योगिकीकरणामुळे कला आणि वाङ्मय यांचे समाजाशी असलेले जैविक नाते नकळत तुटते. हे मत लक्षणीय आहे. मानवी समाजाने त्याच्या दैनंदिन व्यवहारांमधून 'कला' नावाची गोष्ट बाजूला काढून, तिला व्यासपीठावर नेऊन, तिला वेगळे स्थान देऊन तिच्या आविष्करणाविषयी टीका-टिप्पणी करायला सुरुवात केली. कलेचा 'विशिष्ट विस्तार' झाला. अन्यथा रात्री सांगायच्या गोष्टींमधून, भिंतीवरील चित्रांमधून, समूहनृत्यातून, कामे करताना गाणी म्हणण्यातून कला ही जगण्याचा भाग बनून राहिली होतीच. तेव्हाही तिच्या आविष्करणाविषयी टिप्पणी होत नसेल असे नाही, पण तिला वेगळे, मंचीय स्वरूप प्राप्त झाले नव्हते. हे अशाकरता नोंदवले की माणसाच्या आंतरिक विश्वात असलेला कलेचा मूळ धागा लक्षात घेतला तर त्याच्या आजच्या असंख्य प्रकारे (यात सुमार दर्जाही आला) होणाऱ्या आविष्काराविषयी आपण अधिक सहानुभूतीपूर्वक विचार करू शकू. 

टिकेकरांनी दिलेल्या उद्धृतांमधून जी दृष्टी दिसते ती वस्तुनिष्ठतेच्या जवळ जाणारी आहे. कलात्मक अभिव्यक्तीच्या संदर्भात 'अमुक इनपुटमुळे तमुक आउटपुट' असे थेटपणे कधीच म्हणता येत नाही. अगदी वस्तुनिष्ठतेच्या संदर्भातदेखील. पण त्या त्या अभिव्यक्तीचे विश्लेषण अधिकाधिक नेमकेपणाने करायचे असल्यास हा मार्ग घ्यावा लागेल. 

एखाद्या समाजाचे 'सामूहिक मन' जसे आहे तसे का आहे याचा शोधदेखील जर वस्तुनिष्ठपणे घेण्याचा प्रयत्न केला तर सामान्यपणाचे उदात्तीकरण का केले जाते हे लक्षात येईल. यावर सविस्तर लिहिता येईल, पण मूल्यव्यवस्थेतील तफावत, कृषी आणि औद्योगिक समाजाच्या घडणीतील फरक ही काही ढोबळ निरीक्षणे इथे फक्त नोंदवून पुढे जाऊ. आपल्या अत्यंत जटिल रचनेच्या आणि जटिल परिणाम होत राहणाऱ्या समाजाचे रूप अस्वस्थ करणारे आहे हे खरेच आहे. हे केवळ कलेच्या आस्वादाबाबत नाही तर 'एक विवेकी समाज' या पातळीवरदेखील आहे. अशा विखंडित, विभाजित समाजात 'अभिरुचीसंपन्नता' ही मुळात व्याख्या करण्याजोगी संकल्पना म्हणून उरतच नाही. अशा समाजात वर्ग आणि जातिसंघर्ष जसा अटळ आहे तसा 'व्याख्यासंघर्ष'ही अटळ आहे! 

विलास सारंग यांनी 'मॅनहोलमधला माणूस' हा समीक्षाग्रंथ लिहून फार मोलाचे काम केले आहे. साहित्यनिर्मितीवर जातवास्तवाचा होणार परिणाम अभ्यासणे हेदेखील वस्तुनिष्ठ विश्लेषणाचे एक उदाहरण आहे. अर्नेस्ट हेमिंग्वेच्या 'ओल्ड मॅन अँड द सी' या गाजलेल्या लघुकादंबरीसारखी कादंबरी मराठीत बहुधा शक्य झाली नसती असे नोंदवत सारंग त्याचे कारणही देतात - 'मूलभूत अडचणी येतात. प्रथम म्हणजे मच्छीमार-जीवन हे मराठी वाङ्मयीन विश्वाचा भाग नाही. का नाही? मुख्यतः मराठी समाजवास्तवातील कडक विभाजनामुळे. जातीयंत्रणेमध्ये व्यवसायगमनक्षमतेला प्रतिबंध होत असल्याने या व्यवसायातील माणसांना तिथेच अडकून पडावं लागलं. मच्छीमार हा 'खालच्या' जातीचाच नव्हे, तर अशिक्षित, सांस्कृतिक केंद्रापासून दूर अशी परिस्थिती निर्माण झाली. आता हेमिंग्वेच्या कादंबरीतील कोळ्याची प्रगल्भ तात्त्विक विचार करण्याची क्षमता मराठी मच्छीमाराला कशी द्यायची?.......या कादंबरीचा पु. ल. देशपांडे यांनी मराठीत अनुवाद केला आहे. केवळ अनुवादच शक्य होता. कारण अमेरिकन लेखकाने क्यूबन मच्छीमाराविषयी लिहिलेली कादंबरी आपण वाचू शकतो व (त्यातील वास्तव सुरक्षित अंतरावर असल्याने) तिचा आस्वाद (गंध?) घेऊ शकतो. पण मराठी लेखकाने मराठी मच्छीमारावर अशी कादंबरी लिहिलीच तर सर्वसाधारण मराठी वाचकाचा भ्रुकुटिभंग होईल. असंस्कृत मच्छीमार इतका स्पष्ट, नितळ व तात्त्विक डूब असलेला विचार कसा करू शकतो? वास्तववादी परिप्रेक्ष्यातून कादंबरी नापास होईल.'  

आता सारंगांच्या वरील निरीक्षणाला छेद देईल असेही एखादे उदाहरण आढळण्याची शक्यता आहे. एक थेट नसले तरी थोडे जवळ जाईल असे उदाहरण म्हणजे पु. ल. देशपांडे यांच्या 'ती फुलराणी' मधील मंजुळेचे वडील. अर्थात ते नाटकातील मध्यवर्ती पात्र नव्हे. मुख्य म्हणजे हे नाटकही रूपांतरण आहे. पण दगडोबा साळुंके हे कष्टकरी समाजातील पात्र निर्माण करताना त्याला तत्त्वज्ञानात्मक डूब दिली गेली आहे आणि ती प्रेक्षकांना भावते. मूळ नाटकातील आल्फ्रेड डूलिटल हे पात्रही याच धर्तीचे असल्याने मराठीतही ते तसे आणले गेले हाही एक मुद्दा आहेच. फक्त त्याने प्रेक्षकांचा भ्रुकुटिभंग झाल्याचे दिसत नाही. सारंगांचे मूळ प्रतिपादन मान्य होण्यासारखे आहेच. या पुस्तकात मांडलेला विचार, केलेली एकूण मांडणी लक्षवेधी आहे यात शंकाच नाही. मराठी साहित्याच्या स्वरूपावर एक 'डार्क प्रकाशझोत' टाकणारे हे पुस्तक वाङ्मयीन अभ्यासकांसाठी महत्त्वाचे आहे. मात्र इथे लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी की अशी साक्षेपी समीक्षा किंवा भाष्य हे ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग हा स्वीडिश लेखक त्याच्या लेखनाबाबत लिहितो त्याप्रमाणे 'टू कट निअर द एकिंग नर्व्ह - दुखऱ्या नसेच्या जवळ कापण्याचा' प्रयत्न करत असते. समीक्षेचे आधार वस्तुनिष्ठतेत रुजलेले असले तरी अभिव्यक्तीचे स्वरूप तिच्या पकडीत नेमकेपणाने येईलच असे नाही. त्यामुळे सामाजिक-ऐतिहासिक-भौगोलिक संदर्भांची दखल घेत, निर्मात्याचे म्हणणे/भूमिका काय आहे यालाही स्थान देत समीक्षा केली गेली तर ती अधिक परिणामकारक होईल. आत्मनिष्ठ-वस्तुनिष्ठ याहीपेक्षा मग 'सर्वंकष' हा शब्द अधिक समर्पक वाटतो.  

या सगळ्या चर्चेत एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. ती ही की माणूस निर्मिती करत राहणार. साहित्य - मग ते अभिजात किंवा श्रेष्ठ असो वा नसो - निर्माण होत राहील. कारण अखेरीस 'मला काही सांगायचे आहे' ही माणसाची आच आहे आणि ती श्रेष्ठत्वाच्या इच्छेहून मोठी आहे. (या सांगण्याच्या आचेचे सकारात्मक-नकारात्मक पैलू आहेतच.) त्यामुळे महाकाव्य, कादंबरी, लघुकादंबरीपासून कथा, निबंध, स्फुटलेखन, आता ब्लॉग, समाजमाध्यमांवरील तुकडेवजा लेखन इथपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्याकडे सामान्यीकरण (जनरलायझेशन) टाळून पाहावं लागेल. दलित साहित्याने जसे साहित्याचे रूढ मापदंड बाजूला ठेवायला भाग पाडले तसेच हे नवीन फॉर्मेटसदेखील नवीन मानदंडांची मागणी करतील. मुख्य म्हणजे कथा, कादंबरी यासारख्या पारंपरिक वाङ्मयप्रकारांमध्येही आजच्या - एकीकडे डिजिटल तर दुसरीकडे अस्मितेच्या राजकारणाने प्रभावित झालेल्या - काळातील विषय आल्याने त्यांची भाषा आणि स्वरूपही बदलू शकेल. (बदलते आहेच). दृकश्राव्य माध्यमाचा प्रचंड प्रभाव, बाजाराचे बदलते संकेत आणि दबाव या गोष्टी आहेतच. याच पार्श्वभूमीवर लेखक-समीक्षक-वाचक आणि या तिघांनाही प्रभावित करणारे सामाजिक वास्तव यातील द्वंद्वात्मक नातेही विकसित होत राहील. या एकूण पार्श्वभूमीवर साहित्याच्या गुणवत्तेविषयीची चर्चा सुरु ठेवायला हरकत नाहीच, फक्त ते करत असताना आपण वर्तुळाकार मार्गात अडकून राहात नाही ना हे तपासणे, आपल्या चिकित्सेच्या पद्धतीची चिकित्सा करत राहणे आवश्यक आहे. 

(लोकसत्ता, 'लोकरंग', ११ सप्टेंबर २०२२)

Friday, March 18, 2022

सर्वोदय : वेध भविष्याचा

काही दिवसांपूर्वी वातावरण बदल (क्लायमेट चेंज) या विषयावरील एका परिषदेत ‘पब्लिक ॲडव्होकसी इनिशिएटिव्ह्‌ज फॉर राइट्‌स अँड व्हॅल्यूज’ या दिल्लीतील संस्थेचे संचालक अजय झा यांनी जग आणि भारत यांच्या संदर्भाने वातावरण बदलाच्या प्रश्नाची मांडणी करताना एक उल्लेख केला. तो असा की भारतातील 6 लाख खेडी डोळ्यांपुढे ठेवून, स्थानिक लोकांची बलस्थानं आणि आकांक्षा लक्षात घेऊन, विकेंद्रीकरणाच्या धोरणाचा अवलंब करत आपल्याला या प्रश्नाला भिडावं लागणार आहे. त्यांनी इतरही मुद्दे मांडले. ते इथं देण्याचं प्रयोजन नाही, पण त्यांनी मांडलेला हा मुद्दा ऐकताना मला आजचं वातावरण बदलाचं आव्हान, आजची आपल्यापुढची इतर आव्हानं या पार्श्वभूमीवर काही गोष्टी अटळपणे आठवल्या. शंभर-एक वर्षांपूर्वी गांधीदेखील भारतातील लक्षावधी खेड्यांचा उल्लेख करत होते. स्वयंपूर्ण खेड्यांचा आग्रह धरत होते. ‘निसर्गस्नेही जीवनशैली’ असा शब्द प्रचलित नसताना त्या जीवनशैलीचा आग्रह धरत होते. त्या वेळेस ‘वातावरण बदल’ हा शब्ददेखील अस्तित्वात नव्हता. आजचा परवलीचा शब्द ‘शाश्वत विकास’ (सस्टेनेबल डेव्हलपमेंट) हादेखील तेव्हा नव्हता. उत्तरोत्तर वेग घेत गेलेल्या औद्योगिकीकरणाची, शहरीकरणाची आज मोठ्या प्रमाणात दुखू लागलेली बाजू तेव्हा तितक्या प्रमाणात दुखत नव्हती. पण ‘आपण आज काय केलं तर ते आपल्या वर्तमान आणि भविष्यासाठी ‘सस्टेनेबल’ असेल,’ हा मूलभूत विचार पर्यावरणीय आणि इतर संकटं नसतानादेखील गांधींनी केला होता.     

विनोबांनी हा विचार पुढे नेला आणि भूदान-ग्रामदान आंदोलनातून ग्रामस्वराज्याच्या संकल्पनेला अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. आजची आपली एकूणच सामाजिक-राजकीय आणि महत्त्वाचं म्हणजे वैचारिक अवस्था बघताना हे दोघेही एका कोपऱ्यात बसून स्मितहास्य करत आहेत असं मला वाटतं. ‘मी आधीच सांगितलं होतं’ हे आपल्या आवडीचं वाक्य आहे. दैनंदिन व्यवहारात आपण ते बरेचदा वापरतो. पण या वाक्यावर एका अतिशय व्यापक अर्थाने खरा अधिकार गांधी-विनोबांचा आहे हे मला त्या परिषदेतली मांडणी ऐकताना प्रकर्षानं जाणवलं!

या ताज्या आठवणीच्या पार्श्वभूमीवर सर्वोदय विचारांना उजाळा देण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखातून केला आहे. त्याला निमित्त आहे 14 मार्च. 14 मार्च 2022 रोजी सर्वोदय स्थापनेच्या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात होत आहे. महात्मा गांधींच्या हत्येनंतर लगेचच, म्हणजे 14 मार्च 1948 रोजी विनोबांच्या मार्गदर्शनाने आणि पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल आदी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत ‘सर्वोदय’ संघटनेची स्थापना करण्यात आली. महात्मा गांधींनी 1908 मध्ये जॉन रस्किनच्या ‘अन टु द लास्ट’ या पुस्तकाचा गुजराती अनुवाद करून त्याला ‘सर्वोदय’ हे नाव दिलं होतं. (त्याआधी जैन परंपरेत भगवान महावीरांना उद्देशून हा शब्द वापरल्याचं दिसतं.) गांधीजींच्या कार्यकाळात सर्वोदय हा शब्द तितकासा रुळला नव्हता. विनोबांनी तो उचलून धरला.

सर्वोदय संघटनेच्या स्थापनेनंतर 18 एप्रिल 1951 रोजी पोचमपल्ली इथं पहिलं भूदान मिळाल्यापासून ऐतिहासिक भूदान यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा पुढची 13 वर्षं सुरू होती. या काळात  विनोबांच्या नेतृत्वाखाली सर्वोदयाच्या विचारानं प्रामुख्यानं भूदान-ग्रामदानाच्या माध्यमातून मूळ धरलं आणि सर्वोदय ही एक चळवळ म्हणून स्थिरावली. भूदान यात्रेचा इतिहास मोठा रोमहर्षक आणि प्रेरणादायक आहे. भूदान यात्रा आणि जमीन सुधारणेचे शासकीय प्रयत्न हे दोन्ही 1950 च्या दशकात समांतर चाललेले दिसतात. 1961 मध्ये कमाल जमीनधारणा कायदा बहुतेक राज्यांमध्ये लागू झाला होता. 1970 च्या आकडेवारीअनुसार या कायद्याने विविध राज्यांमधून 25.65 लाख एकर जमीन उपलब्ध झाली होती आणि त्यातली 11.77 लाख एकर जमीन वितरीत झाली होती. भूदान चळवळीने वितरीत केलेली जमीन 12.15 लाख एकर इतकी होती. अर्थात याच्या अधिक तपशिलात जात या चळवळीचा आढावा घेता येईलच, पण ते स्वतंत्रपणे करणं इष्ट होईल. एक आकडा उद्धृत करण्याचं कारण असं की जमीन सुधारणेबाबत बिगर-शासकीय मार्गानं, वैचारिक बदलाच्या मार्गानं, लोकसहभागाच्या मार्गानं एक मोठं पाऊल पडू शकलं ही अधोरेखित करण्याजोगी गोष्ट आहे आणि विनोबांच्या मूलभूत मांडणीचं, सर्वोदय विचाराचं हेच  मुख्य अंग आहे.

एकादश व्रतं (अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम, अस्वाद, भयवर्जन, सर्वधर्म समभाव, स्वदेशी आणि स्पर्श-भावना) ही सर्वोदयी विचारांचा गाभा आहेत. शासनमुक्त समाज, ‘राजनीती’ नाही तर ‘लोकनीती’, लोकांचा राज्यकारभारात सहभाग ही सर्वोदयाची मुख्य सूत्रं आहेत. भूदान चळवळीनंतर लहान-मोठ्या प्रमाणात सर्वोदयातील कार्यकर्त्यांनी विविध क्षेत्रांत आपलं काम सुरू ठेवलेलं असलं आणि आजही ते सुरू असलं तरी नजीकच्या भूतकाळात ‘व्यापक सामाजिक चळवळ’ म्हणून सर्वोदयाची ओळख निर्माण होऊ शकली नाही हे खरं आहे. पण सर्वोदयाचा विचार पथदर्शक आहे यात शंकाच नाही. विनोबांच्या वैचारिक योगदानाची अनेक अंगं आहेत. त्यातील धर्म-तत्त्वज्ञान, ईश्वरी संकल्पना, भक्तिमार्ग यांविषयीचं त्यांचं विवेचन हा प्रत्येकानं आपल्या स्वारस्यानुसार अभ्यासावा असा प्रांत आहे. पण त्यांचं स्वराज्यविषयक चिंतन, लोकांनी आपल्या स्वतःच्या प्रत्यक्ष सहभागातून शासनव्यवस्था चालवण्याविषयीची त्यांची मांडणी, राजकारण व सत्ताकारणाविषयीचे त्यांचे विचार- ज्यात ‘सत्ता नको, व्यवस्था हवी’ हा विचार केंद्रस्थानी आहे- हा मात्र सामाजिक-राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा प्रांत आहे. विनोबांचं हे आग्रही म्हणणं आहे की लोक हे त्यांच्या स्वयंभू प्रज्ञेच्या बळावर, ‘लोकनीती’च्या आधारे आपली व्यवस्था- लोकशासन लावू शकतील. कारण कुणीतरी तिसरा व्यवस्थापक- राज्यसंस्था यायच्या हजारो वर्षं अगोदरपासून माणसं हे करतच आलेली आहेत. त्यांचे लोकनीती, ग्रामस्वराज्य, स्वराज्यशास्त्र या पुस्तकांतील विचार त्या दृष्टीने अभ्यासावे असे आहेत. विनोबांचं वैशिष्ट्य हे की ते फार मूलभूत मुद्द्याला स्पर्श करत सहज सोपेपणानं आपल्या समोर मुद्दे ठेवतात. त्यांच्या इतर लिखाणांतूनही- विशेषतः ‘मधुकर’सारख्या पुस्तकातून- जे तुलनेने जास्त लोकप्रिय झालं- याची प्रचिती येते. ‘लोकनीती’मध्ये त्यांनी म्हटलं आहे- ‘‘आज जो उठतो तो म्हणतो, देशसेवा सत्तेद्वारे झाली पाहिजे. तसा त्यांचा विश्वास आहे. या तुमच्या गावाची स्वच्छता कुणी करायची? तर म्युनिसिपालिटीने. म्हणजे स्वच्छता म्युनिसिपालिटीच्या हातात. माणसांच्या हातात नाही. विवेकबुद्धीची जागा देवळातल्या पुजाऱ्यांनी घेतली. स्वच्छतेची जागा म्युनिसिपालिटीने घेतली, दानाची जागा टॅक्सने घेतली, निर्भयतेची आणि शौर्याची जागा सैन्याने घेतली, ज्ञानाची जागा युनिव्हर्सिटीने घेतली, दयेची जागा दवाखान्याने घेतली. अशा जागा बदलल्या म्हणजे पुरुषार्थ शिल्लक राहतो काय?’’ 

वरील उतारा विनोबांच्या विचारांची दिशा लक्षात यावी म्हणून उदाहरणादाखल दिला आहे. ‘स्वराज्यशास्त्र’ या पुस्तकात त्यांनी अधिक मूलगामी स्वरूपाचं, संकल्पनात्मक चिंतन केलं आहे. त्या तपशिलात जाण्याचा मोह टाळून आपण एका कळीच्या मुद्द्याकडे येऊ. हा कळीचा मुद्दा सोप्या भाषेत ‘हे सगळं ठीक आहे, पण ते प्रॅक्टिकल नाही’ अशा परिचित स्वरूपात मांडता येतो!

या मुद्द्याविषयी बोलावं असं मला वाटतं, कारण या मुद्द्यापाशीच विनोबांसारख्यांचं विचारविश्व अडकवून ठेवल्यासारखं झालं आहे आणि त्यातून गाभ्यातील विचाराकडं दुर्लक्ष होत आहे. ‘प्रॅक्टिकल नाही’ असं म्हणत असताना वस्तुस्थिती दिसण्यापेक्षा आपली हतबलता जास्त दिसत असते. या हतबलतेसाठी खरं तर आपण सगळेच जबाबदार आहोत. पण असं ‘दोषी ठरवून मोकळं होणं’ योग्य होणार नाही. कारण ते न्याय्य नसेल. माणसानं आपल्या प्रचंड मोठ्या ऐतिहासिक वाटचालीत टप्प्याटप्प्यानं अनेक गुंतागुंतीच्या व्यवस्था निर्माण केल्या. जगात निर्माण झालेली पहिली बँक आणि आजची बँकिंग व्यवस्था, जगातलं पहिलं न्यायालय आणि आजची न्यायव्यवस्था यांत फार मोठा फरक आहे. (पण मुळातली संकल्पना तीच आहे हेही इथे नोंदवू या.) माणसाला या व्यवस्थांच्या चौकटीतून सहज सुटता येत नाही आणि त्या व्यवस्थांवर त्याला अवलंबून राहावं लागतं आणि मग या व्यवस्था जगण्याचा अपरिहार्य भाग होतात हे खरं आहे. पण अशा गुंतागुंतीच्या वास्तवातदेखील, त्या वास्तवाशी काहीशी फारकत घेत, काही वेगळं मांडू पाहणाऱ्या विचाराला ‘आदर्श’ म्हणून मोडीत काढण्यात एक मोठा धोका असतो. तो म्हणजे दिशा हरवण्याचा. कारण प्रचलित व्यवस्था, प्रचलित वैचारिकता आपल्याला ‘सस्टेनेबल’ भविष्याकडे घेऊन जात नाही आहे हे कळत असूनदेखील ‘या दिशेला आता पर्याय नाही’ असं मानून आपण चालू लागतो आणि ‘आदर्श’ दाखवत असलेल्या दिशेनं चार पावलं चालून बघण्याचाही कंटाळा करतो.

आदर्श आणि वास्तव यांत फरक आहे हे मान्य करायला हरकत नाही. एखादी रचना आदर्श म्हणून आकर्षक वाटते; पण ती वास्तवात आणताना अनेक अडचणी येतात, आदर्श रचना असू शकते, पण आदर्श माणूस असू शकतो का- हे प्रश्न आहेतच. ते लक्षात न घेता रचनेची कल्पना केली तर ती कल्पनाच राहते हे खरं. पण होतं असं की ‘हे जमणार नाही तर त्याचा पाठपुरावा कशाला करा’ अशा दृष्टिकोनामुळे आपण प्रयत्नांपासूनदेखील लांब जाऊ लागतो. इंग्लिशमध्ये ‘डेव्हिल इज इन द डिटेल्स’ असं म्हटलं जातं. तसं मला ‘गॉड इज इन द इसेन्स’ असं म्हणावंसं वाटतं. विनोबांनी जी ग्रामकेंद्री मांडणी केली त्याच्या तपशिलात तर जायलाच हवं. त्यावर प्रचलित सामाजिक-आर्थिक संदर्भानं, मुख्य म्हणजे लोकांच्या आकांक्षांच्या संदर्भानं चर्चा व्हायला हवी, त्याची चिकित्सा व्हायला हवी. पण आपण जर एक साधा विचार केला की भारतात जर लक्षावधी खेडी आहेत, वाड्या-वस्त्या आहेत, आदिवासी पाडे आहेत आणि ही सगळी भौगोलिकता शतकानुशतकं, परकीय आक्रमणांदरम्यान आणि नंतरही टिकून राहिली आहे तर आपण जेव्हा स्वराज्याचा, स्वशासनाचा विचार करतो तेव्हा  भारताच्या ‘आत’ असलेल्या या एका भल्या मोठ्या भारतानं आपलं शासन आपल्या हातात ठेवावं, लोकसभा आणि विधानसभा या केंद्रीय व्यवस्थेला मोडीत न काढता केंद्रीय व्यवस्था आणि स्थानिक व्यवस्था यांच्यात सत्ता आणि अधिकार या बाबत सतत वाटाघाटी होत राहाव्यात, स्थानिक समुदाय आपल्या गावाच्या व्यवस्थेमध्ये अधिकाधिक सहभागी होत राहावा, त्यातून त्यांच्याकडे अधिकाधिक सत्तेचं हस्तांतरण होत राहावं आणि केंद्राचं नियंत्रण कमी होत जावं हा विचार आपल्याला सहज मान्य होईल.

या संदर्भातली एक मुख्य अडचण अशी आहे की आपण ‘स्वशासन’ हा चर्चेचा एक महत्त्वाचा विषय जवळजवळ बाद करून टाकला आहे. रातोरात चित्र बदलणार नाही हे बरोबर आहे. पण मुख्य धारेतील माध्यमांमधून, सार्वजनिक चर्चाविश्वामधून ‘स्वशासन’, ‘विकेंद्रीकरण’ या विषयांवर किती वेळा मंथन होतं हे पाहणं उद्बोधक ठरेल. मराठीमध्ये मिलिंद बोकिलांसारख्या अभ्यासकानं या विषयावर विपुल लेखन केलं आहे. गावपातळीवर विविध संघटना आणि कार्यकर्ते यावर काम करत आहेत. अगदी शासकीय प्रयत्नही सुरू आहेत. पण यांच्यापैकी किती जणांना वृत्तवाहिन्या चर्चेसाठी बोलावतात हे आपण एकदा तपासावं. सहकारी गृहरचना संस्था, मोठ्या कॉलनीज, स्थानिक कार्यक्रम यांतून ‘स्वशासन’ या विषयावर किती वेळा चर्चा आयोजित केल्या जातात, मित्रमंडळींच्या, नातेवाइकांच्या गटांमध्ये लोकशाहीसारख्या विषयावर पक्षांवर टीकाटिप्पणी न करता आणि ‘हे असंच चालायचं’ असे उसासे न टाकता किती वेळा गप्पा होतात हेही आपण तपासावं.

आपलं एक दुःखद वास्तव हे आहे की आपण शासनव्यवस्थेला नावं ठेवण्यापुरतेच उरलो आहोत. शासनव्यवस्थेमध्ये आपण अल्प प्रमाणात का होईना पण एकत्रितपणे काही हस्तक्षेप करू शकतो या विचाराला आपल्या चिंतनात फारसा अवकाश उरलेला नाही. आपली ही वृत्ती कशी तयार झाली? तर ही आजकालची घटना नाही. समूहाची व्यवस्था लावणं हे जसजसं केंद्रित होत गेलेलं आहे तसतसं हे होत गेलेलं आहे आणि त्यात एक मोठा घोळ असा झालेला आहे की आपलं जगणं आणि आपली व्यवस्था यांत अंतर पडत गेलं आहे. आपली सामूहिक व्यवस्था आपण बघणं ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे- तो निवडीचा मुद्दा नाही- हे आपण विसरलो आहोत. आणि विनोबांना नेमकं हेच अभिप्रेत होतं. आता इथं असं म्हटलं जाऊ शकेल की लोकशाही ही अशी व्यवस्था आहेच की! ज्यांना इच्छा आहे ते या व्यवस्थेत जाऊच शकतात. आणि इथंच खरी मेख आहे. समूहव्यवस्थेतील सहभाग हा लोकशाही व्यवस्थेत ऐच्छिक मुद्दा होतो - अनिवार्य मुद्दा होत नाही!

सर्वोदयाचा विचार या ‘अनिवार्यते’भोवती रचलेला विचार आहे. आपल्याला आज एका गुंतागुंतीच्या आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेत राहायचं आहे हे वास्तव आहे. फक्त मुद्दा हा आहे की आपण ही गुंतागुंत थोडी तरी सोडवू शकतो आहोत का? आपण काही प्रयोग करून बघू शकतो आहोत का? आपण कृषिकेंद्रित व्यवस्थेतून औद्योगिक व्यवस्थेत आलेलो आहोत. कृषिक्षेत्रातही औद्योगिकता आलेली आहेच. मग आता या परिस्थितीत प्रचलित राजकीय-आर्थिक व्यवस्थांपेक्षा अधिक चांगला असा कोणता पर्याय असू शकणार- असा प्रश्न विचारला जाऊ शकतो.  तर इथं असं लक्षात घेऊ या की सर्वच व्यवस्था हळूहळू विकसित होत गेलेल्या आहेत. मग विनोबा म्हणतात तसं राजनीतीकडून आपण लोकनीतीकडे जाऊच शकणार नाही का?

‘प्रगत’ माणसाची एक मोठी शोकांतिका ही आहे की व्यवस्थांचा डोलारा उभारताना त्याच्या एककाकडे - माणसाकडे क्रमाक्रमाने दुर्लक्ष होत गेलं आहे. व्यवस्थांच्या परिभाषेत माणूस हा ‘लाभार्थी’ असतो, ‘निर्माता’ नसतो. त्यामुळे व्यवस्थांची शक्ती प्रचंड, तर माणसाची शक्ती क्षीण- असं चित्र आज दिसतं. सर्वोदयाचा विचार माणसाचं सामर्थ्य दमनकारक न होता कसं वाढेल यावर लक्ष केंद्रित करतो आणि म्हणूनच तो भविष्यवेधी ठरतो.

(पूर्वप्रसिद्धी : साधना, १२ मार्च २०२२)

Monday, December 27, 2021

धार्मिक ओळखीचा आग्रह कट्टरतेकडेच नेतो!

'मराठीचे विचारविश्व व सध्याचे वैचारिक लेखन' हा दिवंगत श्री. श्री. मा. भावे यांचा 'नवभारतमधील लेख' या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ग्रंथातील संकलित लेख वाचल्यानंतर एक-दोन निवडक मुद्द्यांना स्पर्श करावासा वाटला. प्रस्तुत लेख सप्टेंबर २०१७ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता आणि आता भावे हयात नाहीत त्यामुळे त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा होणं शक्य नाही. पण भावे महाराष्ट्रातील एका समृद्ध वैचारिक परंपरेचे वाहक होते आणि त्या परंपरेला अनुसरून एखाद्या वैचारिक/विश्लेषणात्मक मांडणीची/त्या मांडणीतील काही मुद्द्यांची चिकित्सा करणं अप्रस्तुत होणार नाही. खरं तर भावे यांच्या या लेखाचा विषय आणि त्यांचं वैचारिक, इतिहास संशोधन क्षेत्रातील एकूण योगदान हे 'प्रश्नोत्तरे, चर्चा आणि त्यातून आकलनात भर/बदल' या प्रक्रियेशी नातं सांगणारं आहे. आजच्या एकूण वातावरणात ही प्रक्रिया नामशेष होते की काय अशी भीती वाटते. त्याहीमुळे भावेंच्या लेखावर काही म्हणणं आवश्यक वाटतं. ते असते तर अर्थातच त्यांच्याशी संवाद होऊ शकला असता. आज ते नाहीत आणि त्यांच्या व त्यांच्या वरच्या पिढीतील इतरही अनेक खंदे अभ्यासक नाहीत. पण आपण त्यांची संवाद व चर्चेची परंपरा पुढे नऊच शकतो. 

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यासारखी नैसर्गिक विज्ञाने (नॅचरल सायन्सेस) आणि ज्याला मानव्य विद्या (ह्यूमॅनिटीज) म्हटलं जातं त्यातील एक मुख्य फरक असा की नैसर्गिक विज्ञानांमध्ये केली जाणारी विधानं प्रयोग आणि निष्कर्ष यावर आधारित असतात आणि त्यामुळे वस्तुनिष्ठ असतात तर सामाजिक विज्ञानामधील विधानं निरीक्षणांवर आधारलेली असली तरीही ती आत्मनिष्ठ असतात. कारण निरीक्षणाचा विषय जड वस्तू नसतो तर 'मनुष्य' हा असतो. वस्तूंचे गुणधर्म आणि वर्तन जसं भौतिक नियमांनी बद्ध असतं तसं माणसाचं नसतं. मानवी गुणधर्म आणि वर्तन अस्थिर असतं आणि त्यामुळे त्याविषयी विधान करणं हे जिकीरीचं आणि जबाबदारीचंही काम आहे. मनुष्याने निर्माण केलेल्या विचारधारांनाही हे लागू होतं. विचारधारा - मग ती मार्क्सवादी असो, गांधीवादी असो, समाजवादी असो, धर्मवादी असो - ही भौतिक गोष्ट नसते आणि तिचा पाया संकल्पनात्मक, मूल्यात्मक असा  असतो. (म्हणूनच 'आयडियॉलॉजी' या शब्दला 'कल्पनाप्रणाली' हा शब्द अधिक चपखल वाटतो). विचारधारेचं विशुद्ध रूप आणि प्रत्यक्षातील रूप यात तफावत असते. भावे यांनी त्यांच्या लेखात 'हिंदुत्ववादी विचारप्रणाली अतिशय लवचीक आणि गमखाऊ आहे. तिला विरोध करून किंवा त्या विचारसरणीतील दोष किंवा अंतर्विरोध दाखवून काही बौद्धिक व सांप्रदायिक समाधान लाभले तरी परिस्थिती बदलणार नाही.' असा एक उल्लेख केला आहे. यातलं दुसरं विधान पटण्यासारखं आहे कारण त्याची प्रचिती गेल्या काही वर्षात आली आहे.मात्र पहिलं विधान काळजीपूर्वक तपासावं असं आहे. 'गमखाऊ' म्हणजे पडतं घेणारा/घेणारी. सावरकरांचा हिंदुत्ववाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदुत्ववाद, भाजपचा हिंदुत्ववाद यात काही भेद असतीलही, पण हिंदुत्ववाद ही पडतं घेणारी विचारसरणी आहे या विधानाला पुष्टी मिळेल असं हिंदुत्ववादाच्या मांडणीतलं दर्शन नाही. प्रत्यक्षातलं तर नाहीच नाही. निदान आजच्या हिंदुत्ववादाचं तरी. राजकीय संदर्भात पाहिलं तर सगळेच पक्ष गरजेनुसार समझोता करतात, कालचे शत्रू आजचे मित्र होतात ही गोष्ट सर्वज्ञात आहे. तो वेगळा विषय. (वर जो 'विशुद्ध रूप' आणि 'प्रत्यक्षातील रूप'  उल्लेख केला आहे तो इथे लावता येईल. विशुद्ध रूपाला कल्पना मांडायची असते तर प्रत्यक्ष रूपाला सत्ता मिळवायची असते.)  पण हिंदुत्ववादी विचारसरणीचं जे वर्णन भावे यांनी २०१७ मध्ये केलं आहे ते करताना या विचारसरणीच्या आजच्या सामाजिक व राजकीय धुरीणांनी आपल्या उद्दिष्टांसाठी कोणते मार्ग अवलंबले, विविध प्रसारमाध्यमांचा आणि मुख्यत्वे समाजमाध्यमांचा कसा वापर करून घेतला, त्यातून समाजात दुभंग कसा निर्माण झाला या गोष्टी विचारात घेतलेल्या दिसत नाहीत. आता 'हिंदुत्ववादाचं विशुद्ध रूप' आणि 'हिंदुत्ववादाचं प्रत्यक्षातील रूप' यात फरक आहे असं जर भावे यांना अभिप्रेत असेल किंवा इतरही कुणाला अभिप्रेत असेल तर त्याबाबतची मांडणी व्हावी. 

वर म्हटलं तसं विविध विचारधारा या संकल्पनात्मक, मूल्यात्मक पायावर उभ्या असतात. काही मूल्यं प्रमाण मानून गांधींनी आपली मांडणी केली, मार्क्सनेही केली. या मांडणीत समाजाची रचना कशी असावी याविषयी काही बोललं गेलं आहे. ते कल्पनाचित्र असल्याने - एक आदर्श चित्र असल्याने - त्यात कच्चे दुवे असणार. परंतु ती एक व्यापक मांडणी आहे हे खरं. आता हिंदुत्वाच्या मांडणीत असं काही व्यापक चित्र दिसतं का? या मांडणीत धर्मभावनेला प्राधान्य, हिंदूंचं हित, आपल्या परंपरांचं (भारतात या परंपरा कुठल्या, त्या कोण ठरवणार हा आणखी एक प्रश्न आहेच!) जतन, राष्ट्रवादी वृत्ती (यातही वृत्ती 'असण्या'पेक्षा 'दिसणं' जास्त आवश्यक आहे) या गोष्टींचा अंतर्भाव होतो. यात गुंतागुंतीच्या अशा आर्थिक, राजकीय रचनांचा काही मूलभूत, वेगळा विचार दिसत नाही. जगभरात जे मूलतत्त्ववादी विचार आहेत त्यांचं स्वरूप साधारण असंच आहे. पण आज जर धर्म' या संकल्पनेच्या प्रस्तुततेविषयीच प्रश्न उपस्थित केले जात असतील तर अशी धर्मकेंद्री मांडणी कितपत स्वीकारार्ह मानायची? धर्मभावनेला संपूर्ण नकार देणं किंवा धार्मिकतेची बहुतांश लोकांना वाटणारी निकड नाकारणं इथे अभिप्रेत नाही. पण धार्मिकता ही मानवी मनाचं जे अबोध, काहीसं अस्थिर आणि कमकुवत स्वरूप आहे त्यावर आधारलेली गोष्ट आहे. असं असताना या मनाची इथून पुढची मशागत विवेक आणि तर्काच्या आधारावर करायची की धार्मिकतेच्या? धार्मिकता या दोन्ही गोष्टींसह नांदू शकते असा युक्तिवाद कुणी करेल. हे होणं पूर्णपणे अशक्य आहे असं नाही, किंबहुना काही प्रमाणात ते होतही असेल, पण धार्मिक जाणीव, धर्मश्रद्धा हा विषयच असा आहे की तो मनाला संवेदनक्षम आणि दुराग्रही करतो. कारण तो थेट माणसाच्या स्व-ओळखीशी, त्याच्या या विश्वातील स्थानाशी जोडतो. त्यामुळे धार्मिक ओळखीचा आग्रह हा बहुतांश लोकांना कट्टरतेकडेच नेताना दिसतो. धार्मिक, सश्रद्ध मन हे चटकन दुखावलं जाणारं मन आहे. याची प्रचिती आज हिंदुत्वाच्या कट्टर रुपावरुन येते. हे रूप हिंदुत्ववादी संघटनांच्या, नेत्यांच्या कृतीतून, अभिव्यक्तीतून, समाजमाध्यमांवरील पद्धतशीर प्रचारातून आणि  हिंदुत्व समर्थकांच्या समाजमाध्यमांवरील व इत्रतरच्या अभिव्यक्तीवरून समोर येतं. आजवर हिंदूंवर अन्याय झाला आहे आणि त्यामुळे त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे असा हिंदुत्ववादी विचारसरणीचा दावा असतो. या मुद्याबाबतही सविस्तर बोलता येईल. पण ते स्वतंत्रपणे करणं इष्ट होईल.   

वैचारिक लेखनाबाबत बोलताना भावे यांनी वैचारिक लेखन कशाला म्हणायचं, मराठी समाज वैचारिक लेखनाची कोणती मानके मानत आला आहे हे व इतर प्रश्न उपस्थित केले आहेत ते महत्त्वाचे आहेत. त्यांनी पुढे वैचारिक लेखनाचे दोन ढोबळ भाग सांगितले आहेत - आवाहनात्मक व उपदेशकी वैचारिक लेखन आणि विवेचक व विश्लेषणात्मक लेखन. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘वैचारिक लेखन सुमार होते आहे’ या तक्रारीचे मूळ वैचारिक लेखन म्हणजे आवाहनात्मक किंवा उपदेशपर लिखाण या एकांगी दृष्टिकोनात आहे. साम्यवादी संप्रदायाचे लोक अशा प्रकारच्या लेखनाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या कुंठितावस्थेतून ही तक्रार आली आहे. मराठीत विज्ञान-तंत्रज्ञान, शेती व शेतीचे अर्थकारण तसंच ज्ञानाची नवनवीन क्षेत्रं याबाबत नवीन लेखन होत आहे आणि ते भावे यांनी केलेल्या वर्गीकरणानुसार दुसऱ्या प्रकारचं वैचारिक लेखन आहे असं त्यांचं प्रतिपादन आहे. भावे यांनी केलेली वर्गवारी रोचक आहे. पण त्यांनी वैचारिक लेखनाची उदाहरणं म्हणून जे विषय नोंदवले आहेत त्यासंदर्भात थोडं बोलता येईल. 

एखाद्या विषयावरील माहितीपर लेखनाचं मोठं महत्व आहे, पण अशा लेखनाला वैचारिक लिखाण म्हणण्याविषयी शंका वाटते. तंत्रज्ञानाचं उदाहरण घेतलं तर एखादं औद्योगिक अथवा वैद्यकीय उपयोगाचं यंत्र, उदा. बॉयलर, एअर कॉम्प्रेसर, सीएनसी मशीन, एक्स रे मशीन, डोळे तपासायचं यंत्र  किंवा इतर अंनत प्रकारची यंत्रं यांच्या कार्यप्रणालीविषयी लेखन होणं हे अतिशय स्तुत्य आणि आवश्यकही आहे. हेच इतर क्षेत्रांनाही लागू होईल. उदा. रुपया चढला आणि पडला म्हणजे काय? आपला मेंदू काम कसं करतो? कर कसे आकारले जातात? आर्थिक उदारीकरण म्हणजे काय? अशासारख्या हजारो प्रश्नांविषयी लेखन होऊ शकेल (ते होतही असतं आणि व्हावंच.). पण अशा माहितीपर लेखनाला वैचारिक लेखन म्हणता येईल का? मला असं वाटतं की 'बॉयलरनिर्मितीची कारणं आणि परिणाम' किंवा 'आर्थिक उदारीकरणाची कारणं आणि परिणाम' या विषयावरील लेखनाला वैचारिक लेखन म्हणता येईल. 'काय आहे?' पेक्षा 'का आहे?' याचा खुलासा करणारं लेखन म्हणजे वैचारिक लेखन असं ढोबळपणे म्हणता येईल. हा मुद्दा माहितीपर लेखनाला वेगळ्या संदर्भात लागू होईल. उदा. बॉयलर निर्माण करताना विशिष्ट भागासाठी विशिष्ट धातू वापरायचा ही झाली माहिती. पण तोच धातू का वापरायचा हा झाला विचार. आता माहितीपर लेखनात ही बाजू पूर्णपणे अनुपस्थित असते असं अजिबात नाही. कारणमीमांसेचा अंतर्भाव तिथे विविध ठिकाणी, गरजेनुसार होतच असतो. पण त्या लेखनाचा मूळ उद्देश तो नसतो. तो काही अंशी साध्य होत असेल तर ते स्वागतार्हच आहे, पण तो एक साइड-इफेक्ट असल्यासारखा असतो. मात्र वैचारिक लेखनाचा मुख्य उद्देशच जे होत असतं त्याच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक-मानवीय अशा संदर्भातील कारण आणि परिणामांविषयी बोलणं, विविध बिंदू जोडून घेत एखाद्या संकल्पनेचा, प्रणालीचा प्रवास मांडणं हा असतो. इथे दर्जात्मक तुलनेचा प्रश्न नाही. या दोन वेगळ्या जातकुळी आहेत इतकंच. 

भावे म्हणतात त्याप्रमाणे आवाहनात्मक आणि उपदेशकी लिखाणालाच फक्त वैचारिक लेखन म्हटलं गेलं आहे असं निश्चितपणे म्हणता येत नाही. कारण स्वातंत्र्यपूर्व काळातही (ज्या काळात अशा लेखनाला वैचारिक लेखन म्हणण्याचा समाजाचा कल राहिला असं निरीक्षण भावे यांनी नोंदवलं आहे) फुले-आगरकरांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेकांनी जे लेखन केलं ते केवळ आवाहनात्मक किंवा उपदेशकी होतं असं म्हणता येत नाही. या सर्व नेत्यांचं उद्दिष्ट समाजपरिवर्तन हे असलं तरी त्यांनीदेखील विश्लेषणात्मक लेखन मोठ्या प्रमाणात केलेलं आहे - विशेषतः आंबेडकरांनी. खरं पाहू गेल्यास ही वर्गवारी ढोबळ असल्याने दोन्हीची सरमिसळ असल्याची बरीच उदाहरणं सापडतील. या चर्चेमध्ये भावे यांचा रोख साम्यवादी लोकांकडे आहे असं दिसतं. साम्यवादी मांडणीत जो समाजपरिवर्तनाचा अंतःप्रवाह कायम दिसत राहतो त्यामुळे बहुधा त्यांना तसं करावंसं वाटलं असेल. पण साम्यवादी विचारधारेच्या लेखनातही निव्वळ विश्लेषण मोठ्या प्रमाणात केलं गेल्याचं दिसेल. 

लेखात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सामाजिक संदर्भाने लेखन करत असताना ते वस्तुनिष्ठ न राहता आत्मनिष्ठ होण्याचा धोका संभवतोच. याही टिपणाबाबत असं झालं असण्याची शक्यता आहे. मुळात हे सगळे विषय प्रवाही असल्याने त्यावर विचारमंथन होत राहणं, आरोग्यपूर्ण वाद-संवाद होत राहणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांचं कमालीचं 'राजकीयीकरण' झालेल्या काळात याची निकड जास्त जाणवते. 

(लोकसत्ता 'लोकरंग', २६ डिसेंबर २०२१)