Friday, June 10, 2016

पुरुषत्वाचा लैंगिक मसुदा - अर्ध्या वाटेवरचे विचार

अरुण साधू यांच्या 'मुंबई दिनांक'ने एके काळी मला झपाटलं होतं. ही मुंबईची आणि मुंबईतल्या माणसांची गोष्ट आहे. प्रत्येक पात्राच्या अवतीभवती घडणाऱ्या घडामोडींमधून मुंबई 'घडते' आणि कादंबरी पुढे सरकते. यात अय्यर नावाचा पत्रकार आहे, डी-कास्टा हा कामगार पुढारी आहे, मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे आहेत, काही आम आदमी - दयानंद पानिटकर, किशोर वझे हे आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक दुय्यम व्यक्तिरेखा आहेत. कादंबरीने जे झपाटलं, त्यात एक कोन त्यातील काही थेट लैंगिक संदर्भाचा होता. मी ही कादंबरी वाचली, तेव्हा वीस-बावीस वर्षांचा होतो. काही मुली किंवा स्क्रीनवरील काही ललनांविषयी विशेष ममत्व वाटण्याचा हा काळ होता. जयवंत दळवींची 'चक्र', 'ऋणानुबंध' या कादंबऱ्यांमधून लैंगिक विश्वाने दार किलकिलं केलं होतं. शिवाय आशू रावजी आणि दिनू कानडे या नावाचं एक लेखकद्वय होतं. त्यांच्या पुस्तकात संभोगाची रसभरित वर्णने असत. 'हैदोस'सारखी 'आउट अँड आउट' पोर्नोग्राफिक पुस्तकंही वाचली जायची. ब्लू फिल्म्स पाहायलाही सुरुवात झालेली होती. त्यामुळे लैंगिकता कधी अस्पष्टपणे, तर कधी स्पष्टपणे समोर येतच होती. पण 'मुंबई दिनांक'चा या संदर्भातला उल्लेख मी मुद्दाम करतोय, कारण या कादंबरीनं उत्तम साहित्यकृतीचं दर्शन तर घडवलंच, पण लैंगिकतेचे काही नवे आयाम दाखवले. लैंगिकतेची एक नवी दृष्टी दिली. कामेच्छा ही आजूबाजूला सर्वत्र, सर्व लोकांच्या मनात वावरत असते; अय्यरसारखा एखादा त्याबाबत बेधडकपणे वागतो आणि हे काम उरकून पुढच्या कामाला लागतो; याचा अर्थ ही गोष्ट अगदी सहजपणेही होऊ शकते - हे या कादंबरीतून दिसलं. मुख्य म्हणजे त्यातील काही विधानांनी, मांडणीने - आणि अय्यरचा जो स्वसंवाद सुरू असतो, त्याने - माझ्यावर परिणाम केला. सॅली (अय्यरशी गहिरं नातं असलेली वेश्या) गेल्यानंतर अय्यरचा स्वतःशी झालेला संवादही विशेष होता. कादंबरीत पुढे अय्यर आणि मकामुरा नामे एक जपानी चित्रकार यांच्या भेटीचा प्रसंग आहे. भेटीदरम्यान हा चित्रकार संभोगाची चित्रं काढतो हे अय्यरला कळतं. त्यांच्या संवादातलं मकामुराचं म्हणणं माझ्या लक्ष्यात राहिलं. "धिस इज द मोस्ट चॅलेंजिंग सब्जेक्ट. टिंगल करण्यासारखा हा विषय नाही. आयुष्याचं मूलतत्त्व म्हणजे हा विषय. जीवनातल्या बाकी क्षेत्रांवर यंत्रयुगानं आक्रमण केलं आहे. पण ही क्रिया अमर आहे. ही अशीच अबाधित चालू राहील." 

मी लैंगिकतेसंदर्भात जे थोडं-फार लिहिलं आहे त्यात 'प्रचंड भौतिक-तांत्रिक प्रगती करूनही अजिबात न बदललेली जैविक क्रिया' ही नोंद माझ्याकडून घेतली गेली. त्याच्या मुळाशी कधीकाळी वाचलेला हा संवाद आहे. हा संवाद वाचताना एकूणच प्रेम आणि सेक्स या एकमेकात गुंतलेल्या गोष्टी आहेत; आणि डी-कास्टा, अय्यरसारखे आपले 'हीरो'सुद्धा त्यावर मात करू शकत नाहीत याचा अर्थ प्रेमाकर्षण, लैंगिक आकर्षण हे नॉर्मलच असलं पाहिजे असं वाटायचं. 

कामभावना जागी होताना सहज, निसर्गत:च जागी होते; मात्र ती शमवणं तितकंसं सोपं नाही हे लक्षात आल्यापासून या इच्छेच्या नियोजनाचं काय करता येईल, काय करायला हवं हे विचार डोक्यात घोळत असत. टीनएज आणि विशी-पंचविशीच्या काळाकडे पाहिलं, की नैतिकतेच्या कचाट्यात सापडलेली तरुण जनता दिसते. मी स्वत: स्त्रीबद्दलचं आकर्षण आणि स्त्रीवादाबद्दलचं आकर्षण या दोन्ही ट्रॅक्सवर चालत होतो. त्या काळात बरेच उलट-सुलट विचार होत होते. वेश्या या विषयाबाबत तेव्हापासून आस्था होती. त्याबरोबर होतं ते एक प्रकारचं सहसंवेदन. जोडलेपणाची आणि  असहायतेची, अपराधबोधाची जाणीव. वाढीच्या टप्प्यांवर जेव्हा 'व्यवस्था' महत्त्वाची हे उमगू लागलं तेव्हा मला वेश्या फारच जवळची वाटू लागली.  मी वेश्यांकडे गेलेलोही आहे.  तिथल्या अनुभवांचं वैविध्य बरंच आहे.  मला वेश्येबरोबर असताना शांत आणि कनेक्टेड वाटलेलं आहे. शारीरिक समाधान (आणि त्यामुळे नंतर मिळणारं मानसिक 'निचरा'-स्वास्थ्य) मिळालेलं आहे. खळबळही जाणवलेली आहे. वेश्येबद्दल मला जे वाटतं; त्याच्याशी मानसिक अस्वास्थ्य, पराभूत जाणीव हे कायमचं जोडलं गेलेलं आहे. आपण वांझोटे बुद्धिवादी आहोत ही जाणीव ज्यांनी करून दिली आहे, त्यांत वेश्या वरच्या स्थानावर आहेत. शारीरिक गरज इतकी सरळ, स्पष्ट असताना तिच्या पूर्ततेची कोणतीही व्यवस्था नसावी? आणि जी आहे, ती अशी शोषणाधारित असावी? माझं वेश्यांशी झालेलं शारीरिक आणि भावनिक शेअरिंग यावर - आणि महत्त्वाचं म्हणजे कधीकधी माणूस असण्याच्या नैतिक गोचीवरही मात करणारी 'पुरुष' असण्याची शरीरकेंद्री गोची काय असते हे जे मला या अनुभवांमधून जाणवलं, त्यावर - मी काही चर्चांमधून बोललो आहे.  त्यावर सविस्तर लिहायला हवं असं वाटतं. पण अजून तरी मी काही निर्णय घेतलेला नाही. (याबाबत एक सांगावंसं वाटतं. एखाद्या विषयावर काही मांडत असताना तुमचा दृष्टिकोन  मांडण्याइतकंच महत्त्वाचं असतं ते अनुभवकथन. कारण 'काय असायला हवं' या विचाराइतकंच 'प्रत्यक्षात काय झालं? काय होऊ शकतं? बदलाची, पर्यायाची गरज का आहे?' हे महत्त्वाचं असतं आणि ते 'आपबीती'तून स्पष्ट होऊ शकतं. आपण स्वतःच एक 'केस स्टडी' होऊ शकतो. विशेषतः परिवर्तनवादी विचारांचा ध्यास असलेल्यांसाठी हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे कामप्रेरणेबाबत लिहितानादेखील आपल्या बाबतीत काय घडलं हे सांगणं आवश्यक आहे.) 

'मिळून साऱ्याजणी'च्या संपादक गीताली वि. मं., त्यांचा नवरा मुकुंद सा. न. आणि इतर समविचारी मित्र यांनी एकत्र येऊन 'पुरुष उवाच' या नावाचा एक गट सुरू केला होता. स्त्री-पुरुष समतेबाबत, स्त्रीवादाबाबत आस्था असलेल्या पुरुषांनी एकत्र येऊन बोलावं असा या गटाचा उद्देश. या गटाच्या बैठकींना मी जाऊ लागलो आणि मला बोलायला व्यासपीठ मिळालं. मग 'मिळून साऱ्याजणी'च्याही संपर्कात आलो. पुढे तिथे कामही केलं. या प्रवासात आणि आज तो प्रवास (तात्पुरता) थांबल्यावर माझ्या लक्ष्यात येत गेलं, की मला - एका पुरुषाला - कामजीवनाबद्दल स्त्रियांशी बोलता आल्याने बराच फायदा झाला आहे. दुसरं म्हणजे 'मिळून साऱ्याजणी'च्या संपादकीय विभागात काम केलेला मी एकटाच पुरुष होतो. माझ्याआधी एक जण तिथे होते, पण अगदीच अल्प काळाकरता. संपादकीय कामात ज्या चर्चा रंगायच्या, त्यांत माझा 'पर्स्पेक्टिव्ह' कधीकधी वेगळा असायचा. तो बहुदा मी पुरुष असल्यामुळेही असेल. पण स्त्रीवादी विचाराकडे माझा ओढा असल्याने मला फार मोठ्या विचारकलहाला कधीच सामोरं जावं लागलं नाही. कारण स्त्रीवादाची चिकित्सा होणं मला मान्यच होतं आणि आहे, पण स्त्रीप्रश्न म्हणून काहीतरी व्यापक प्रमाणात आपल्याकडे अस्तित्वात आहे याबाबत माझ्या मनात शंका नव्हती. विचारधारेचं 'रिजिडीकरण' झाल्यामुळे येणारे दोष स्त्रीवादातही आहेतच; पण स्त्रीवाद 'पर्स्पेक्टिव्ह' देतो का? तर 'देतो'  हे स्पष्ट आहे. 

एक लक्ष्यात येत होतं, की आधुनिकतेच्या आणि नैतिकतेच्या परिप्रेक्ष्यात पाहिलं, तर आपल्या कामप्रेरणेची गोची झाली आहे. कारण निसर्गतः असलेली तीव्र जैविक प्रेरणा आणि व्यवस्थेची बंधनं यांत आपण अडकलो आहोत. (यात पुन्हा व्यक्तिसापेक्ष आणि काही लिंगसापेक्ष फरकही आहेतच. उदा. कामेच्छेच्या तीव्रतेतील फरक. कामेच्छेमधील भावनिक गुंतवणुकीतील फरक - संभोगानंतर सहसा स्त्रीला काही वेळ शांतपणे बाहुपाशात पडून राहावंसं वाटतं आणि पुरुषाला मात्र सहसा 'हिला अजून किती वेळ जवळ घ्यावं लागेल' असं वाटतं. स्त्रीचं 'वस्तुकरण' पुरुषाकडून त्याला कळायच्या आत होतं. पुरुषांची 'insertive' कामेच्छा आणि स्त्रीची 'receptive' कामेच्छा यातील द्वंद्वात्मक नातं. पुरुषाला 'मोकळं होण्यासाठी' शरीरात गुंतायचं असतं, तर सहसा स्त्रीला गुंतण्यासाठी मोकळं व्हायचं असतं इत्यादी. इतरही भिन्नत्वाचे मुद्दे.) कामेच्छेमुळे पुरुषाला लिंगाच्या ताठरलेपण येतं,  त्यातून 'अवघडलेपण' येतं आणि कामेच्छा पूर्ण झाल्यावरही कालांतराने ते येत राहतं, तसं 'अवघडलेपण' स्त्रीला येत नाही हा एक फरक जाणवू लागला होता. माणूस सृष्टीचा घटक आहे, आणि म्हणून त्याला जे वाटतं, तो जे काही करतो, ते सगळंच मूलत: नैसर्गिक आहे (मग ते नैतिकदृष्ट्या चुकीचं असलं तरी) हे लक्ष्यात येऊ लागलं. बलात्काराविषयी शोध घेत असताना 'नॅचरल हिस्टरी ऑफ रेप : बायोलोजिकल बेसेस ऑफ सेक्शुअल कोअर्शन' या पुस्तकाशी परिचय झाला. लैंगिक संदर्भात पुरुष 'पुरुषासारखा' का वागतो याची उत्क्रांतीच्या अंगाने उकल करायचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.  मॅट रिडलेसारख्या उत्क्रांतीच्या अभ्यासकाने 'द रेड क्वीन : सेक्स अँड द इव्होल्यूशन ऑफ ह्यूमन नेचर' या पुस्तकात स्त्री-पु्रुषांमधील लैंगिकतेबाबतच्या मानसिकतेतील फरकाचा ऊहापोह केला आहे. या पुस्तकातील 'Sexing the mind' या प्रकरणाच्या शेवटी टेस्टोस्टेरॉन या 'पुरुषीकरण' करणाऱ्या संप्रेरकाविषयी तो लिहितो - There are two periods when testosterone levels rise in male children: in the womb, from about six weeks after conception, and at puberty. As Anne Moir and David Jessel put it in a recent book - Brain Sex, the first pulse of hormone exposes the photographic negative; the second develops it. This is a crucial difference from the way the hormone affects the body. The body is masculinized by testosterone from the testicles at puberty, whatever its womb experience. But not the mind. The mind is immune to testosterone unless it was exposed to a sufficient concentration (relative to female hormones) in the womb. It would be easy to engineer a society with no sex difference in attitude between men and women: Inject all pregnant women with the right dose of hormones, and the result would be men and women with normal bodies but identical feminine brains: War, rape, boxing, car racing, pornography, and hamburgers and beer would soon be distant memories: A feminist paradise would have arrived. 

उत्क्रांतीचे अभ्यासक जैविक प्रेरणेच्या, मूळ 'डिझाईन'च्या आधारे पुरुषी वर्तनाचा आणि स्त्री वर्तनाचा खुलासा करतात. मंगला सामंतांसारखे अपवाद वगळता स्त्रीवादी अभ्यासकांना बरेचदा ते मान्य होत नाही, कारण वर्तनातील 'नर्चर'चा भाग त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. खरं असं आहे, की माणसाच्या कृतीचं कारण नेचर आणि नर्चर दोघांच्याही मिश्रणातून तयार होतं; पण लैंगिक संदर्भात नर्चरमुळे जर नेचर दाबलं जात असेल, तर ते उफाळून वर येतंच. प्रेम, शारीर आकर्षण या प्रेरणा संस्कृतीकरणाने कितीही दाबल्या, तरी त्या पुन्हा पुन्हा पृष्ठभागावर येतात. 'सेक्स इज द बेस्ट मेडिसिन' (इफ टेकन विथ प्रिकॉशन) हे मी माझ्या 'पुरुष असण्याच्या' अनुभवावरून सांगू शकतो. होतं काय, की सेक्सविषयी प्रचंड चर्चा करण्यात आपण वेळ वाया घालवतो. ते करून मोकळे होत नाही. ही जर एक अटळ अशी भावना आहे, तर तिचा अनुभव घेऊन, मोकळं होऊन मग इतर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष्य द्यावं हे आपल्याला कळत नाही. भूक लागलेली असताना काम नीट होत नाही हा नियम याही गरजेला लागू आहे. मी आजवर एकदाही दारू प्यायलो नाही. प्यावी असं कधी वाटलं नाही. पण मित्रांबरोबर ‘बसलो' आहे. चकणा पुष्कळ खाल्ला आहे. यात एक टप्पा असा आला, की मला मित्रांची विमानं उडण्याचा कंटाळा येऊ लागला. त्यानंतर मी विमान न उडणाऱ्या मित्रांबरोबरच बसू लागलो. पण विशी-पंचविशीच्या वयात असं लक्ष्यात यायचं, की दारूभोवती ज्या गप्पा रंगतात त्यांत बाई हा विषय असतो. दारू प्यायलेली नसतानाच्या चिंतनातही बाई हा विषय असतो. मग एवढा वेळ जर त्यात वाया चालला आहे, तर ते करून मोकळं का होत नाही असा प्रश्न मला पडायचा. स्त्रीबद्दल आकर्षण वाटणं यात गैर काय आहे? म्हणजे बाईच्या शरीराबद्दल अचकट-विचकट विनोद करणं, रस्त्यातल्या बाईकडे कामुक नजरेने पाहणं हे मान्य; पण प्रत्यक्ष सेक्स मात्र वाईट? मला दारूत बुडणं खरं तर कृत्रिम वाटतं. 'हाय कंबख्त तूने पीही नहीं' असं म्हणणाऱ्यांना मला कधीकधी 'हाय कंबख्त तूने लीही नहीं' असं म्हणावसं वाटतं. सेक्स अतिशय 'लिबरेटिंग' असतं, सुंदर असतं हे आपल्याला कळलेलंच नाही. आपण सेक्सला 'गिल्ट'मध्ये ढकलून दारू पीत बसलो आहोत! आज पस्तिशी-चाळिशीच्या घरातले मित्रदेखील विशीतल्या उत्साहाने कामुक विनोद वगैरे पाठवतात तेव्हा मौज वाटते.

मुळात 'लैंगिक प्रश्न' असं काही अस्तित्वात आहे का हा विचार केला, तर 'हो, आहे' असं उत्तर येतं. इथे पुन्हा बरेच गट पाडता येतील. ज्यांच्यासाठी हा 'प्रश्न' म्हणून अस्तित्वात नाही, ज्यांना लग्नाच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होते आहे असं वाटतं अशांचा एक गट. ज्यांना लग्नपूर्व काळातही काही अडचण जाणवली नाही, अशांचा एक गट. लग्नपूर्व काळात अडचण आली आहे, अशांचा एक गट. लग्न न झाल्यामुळे अडचण येत आहे अशांचा एक गट. लग्नानंतर जोडीदार गेल्यामुळे अडचण येत आहे, अशांचा एक गट. लग्नोत्तर काळात जोडीदाराचा लैंगिक संदर्भात कंटाळा आला आहे, अशांचा एक गट इ. ज्यांना लैंगिक प्रश्न जाणवत नाही, त्यांचा यासंदर्भात विचार करायची अर्थातच आवश्यकता नाही. त्यामुळे तो विचार इतर गटांबाबतच करावा लागेल

आज आपण ज्या टप्प्यावर आहोत, तिथे आपण  काही अंशी का होईना पण कामप्रेरणेचं अस्तित्व किमान मान्य तरी केलेलं आहे. अर्थात मुक्त लैंगिकतेचा तत्वत: पुरस्कार करणारे व प्रत्यक्षातही स्वत:च्या वा जोडीदाराच्या मुक्ततेचं ओझं होऊ न देणारे किती जण आहेत याची आकडेवारी माझ्याकडे नाही. वरील मत माझ्या प्राथमिक निरीक्षणावर आधारलेलं आहे. मागे एका मैत्रिणीला गप्पांच्या ओघात मी विचारलं, ”तुझ्या नवऱ्याचा बाहेर कुणाशी संबंध आल्याचं कळलं, तर तुला काय वाटेल?” तिने चटकन उत्तर दिलं, “काहीही करा, पण मुलं जन्माला घालू नका म्हणजे झालं.” आता प्रत्यक्षात तिच्या नवऱ्याचा संबंध आला, तर ती ते सहजतेने स्वीकारेल का हा प्रश्न आहेच; पण तिची 'तात्त्विक मंजुरी' मला सूचक वाटली. पत्रकारितेत असणाऱ्या एका मैत्रिणीशी बोलताना तिने सांगितलं; की आपल्याला कल्पना नसते, पण लग्नव्यवस्थेला समांतर अशी एक भावनिक-शारीरिक संबंधांची व्यवस्था नीट रचली गेलेली असते आणि ती छुपेपणाने सुरू असते. आता अशी व्यवस्था कमी-अधिक प्रमाणात जर सुरू असेल, तर काही लोकांनी भावनिक गुंतवणुकीचा आणि कामेच्छेचा प्रश्न त्यांच्या परीने सोडवला आहे असंही मानता येईल. मला असं वाटतं की अशी समांतर व्यवस्था असणं अगदीच शक्य आहे आणि स्वाभाविकही आहे, कारण मुळात लग्न ही नैसर्गिक व्यवस्था नव्हे. (आता मी वर म्हटलं; तसं 'माणूस जे काही करतो' ते नैसर्गिक असेल, तर लग्न नैसर्गिक का नाही? ते नैसर्गिक नाही, कारण तो निसर्गातला हस्तक्षेप आहे. आपल्या इतर अनेक गोष्टींसारखाच. माणसाला उन्हाळ्यात गार हवा हवीशी वाटणं नैसर्गिक आहे. पण एसी तयार करणं हा निसर्गातला हस्तक्षेप आहे. प्रेरणा नैसर्गिक आणि प्रेरणेच्या परिणामी निसर्गातील वस्तूंमध्ये किंवा मानवी स्वभावात बदल करून केलेली व्यवस्थानिर्मिती हा हस्तक्षेप. यातील तात्त्विक खोलात अजूनही जाता येईल. कारण जर हस्तक्षेप केल्याने नवीन प्रेरणा निर्माण झाल्या आहेत, तर त्या नैसर्गिक मानायच्या का; असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. सध्या फक्त हे नोंदवून पुढे जाऊ.) जर प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला एकाच भिन्नलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण वाटत असतं, तर लग्न 'नैसर्गिक' झालं असतं. 'मानवी प्रेरणेला न्याय देणारी' या संदर्भाने ती नैसर्गिक व्यवस्था नाही. खरंतर बहुविध नातेसंबंध असणं नैसर्गिक आहे. खासगी मालमत्तेच्या उगमानंतर लग्नसंस्था बळकट झाली आणि खासगी मालमत्ता टिकून राहिल्याने लग्नसंस्थाही टिकून राहिली आहे. त्यामुळे आज प्रचंड संख्येच्या समुदायाला एक चौकट देण्याच्या प्रयत्नातील एक प्रयत्न म्हणूनही लग्नसंस्थेकडे पाहावं लागतं. पण कामप्रेरणेच्या बाबतीत आपण 'संस्थात्मक' सुधारणा न केल्याने लग्नसंस्था कळाहीन झाली आहे. (र. धों. कर्वे यांच्या 'कामशास्त्राचा सामाजिक विचार' या लेखातील एक परिच्छेद मननीय आहे -  ज्या समागमाने एकापासून दुसऱ्यास कोणताही रोग लागतो तो अनीतीचा समजला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या समागमापासून समाजास अनिष्ट अशी संतती उत्पन्न होते तोही अनीतीचाच समजला पाहिजे. हे दोन्ही नियम इतरांप्रमाणेच पती-पत्नीच्या समागमालाही तितक्याच जोराने लागतात हे विशेष लक्ष्यात ठेवण्यासारखे आहे. वास्तविक पाहता गर्भधारणेचा व रोगसंसर्गाचाही प्रतिबंध हल्ली सहज करता येतो. त्यामुळे जरूर असल्यास हे दोन्ही उपाय वापरल्यास विवाहबाह्य संबधातील अनीती आता पार नाहीशी करता येईल. तेव्हा ज्यास असा संबंध ठेवणे असेल त्यांनी त्याची माहिती मिळवून तिचा उपयोग केला पाहिजे. पारंपरिक नीतीच्या कल्पना आमच्या मते याबाबतीत त्याज्य आहेत. समागमास भटांची किंवा कायद्याची परवानगी लागण्याचे काहीच कारण नाही. हल्ली विवाहित स्त्रियांवर कायद्याने समागमाची सक्ती असते. हा कायद्याचा व धर्माचा रानटीपणा आहे. या बाबतीत वेश्यांस जे स्वातंत्र्य असते, यावरून विवाहसंस्थेची किंमत होते. अनेकांशी समागमाची इच्छा स्त्रीपुरुषांस नैसर्गिक आहे व वर सांगितलेल्या दोन्ही प्रकारची खबरदारी घेतली असता त्यात कोणाचेही खरोखर नुकसान नाही. यामुळे आमचे मते ती अनीती नाही. वेश्यांनी देहविक्रय करणे किंवा पुरुषांनी त्याचा उपयोग करणे यातही आमचे मते अनीती नाही.)

लैंगिकतेला नैतिक परिमाण असावं का? लग्नबाह्य शरीरसंबंधाला सहसा 'अनैतिक' म्हटलं जातं. म्हणजे नैतिकता टिकवायची असेल, तर कामसुखातील वैविध्य, वेगळ्या अनुभवाची आस, रोमांचकता याला नकार द्यायचा का? मला व्यक्तिशः तसं वाटत नाही. पण हा मुद्दा तितका सरळही नाही, कारण तो समाजधारणेशी निगडित आहे. कामप्रेरणा शारीरिक आणि मानसिक अशा दोन पातळ्यांवर कार्यरत असते. आणि ती काही आपली एकमेव प्रेरणा नव्हे. माणसामध्ये नैतिक प्रेरणादेखील कार्यरत असते. प्रचलित नैतिक प्रेरणा विवाहपूर्व आणि विवाहबाह्य कामसुखापासून मागे ओढणारी असल्याने शारीरिक सुखाच्या पूर्ततेमागोमाग मानसिक अस्वास्थ्य आलं, तर काय? लग्न मरेपर्यंत टिकावं असं नाही; पण लग्नव्यवस्थेची हुशारी अशी आहे, की तुम्ही सहवासामुळे संवेदनाप्रधान होतच जाता. मग त्यातून बाहेर कसं पडायचं? यात मला एक-दोन मार्ग दिसतात. एक मार्ग हा - की लग्नाच्या पद्धतीमध्ये एक मूलभूत बदल करणं आणि 'ही तुमची आजन्म घालून दिलेली गाठ वगैरे नाही, तुम्हांला एकमेकांचा कंटाळा यायची शक्यता आहे, त्यामुळे जर असं झालं तर अमुक अमुक मार्ग आहेत', असं सगळं लग्न होतानाच सांगणं. अर्थात ही शक्यता धूसर दिसते. कारण भारतीय संदर्भात तरी लग्न 'कायमच्या स्थैर्या'च्या संकल्पनेवर उभं आहे आणि लग्नाबाबतची भारतीय मानसिकता 'अतिनैतिक', 'अतिसंवेदनशील' अशी आहे. परंतु तरीही नवीन दृष्टीने विचार करणाऱ्या लोकांनी लग्नाला नवीन स्वरूप द्यायचं ठरवलं, तर एक नवी सुरुवात होऊ शकते. 'ओपन मॅरेज'सारखी व्यवस्था असणं हाही एक मार्ग आहे. आव्हान असं आहे, की कामप्रेरणेला पावित्र्याच्या जोखडातून बाहेर काढता येईल का हे पाहणं आणि या प्रक्रियेत कामेच्छा ही अखेरीस जीवनाचा एक भाग आहे, संपूर्ण जीवन नव्हे हेदेखील लक्ष्यात ठेवणं.  हे लक्ष्यात ठेवलं तरच भरकटलेपण येणार नाही. कुठल्याही सुखाबाबत असतो तो 'संयम आणि भाना'चा मुद्दा कामसुखालाही लागू होतो आणि तो या सुखाबाबत थोडा जास्तच महत्त्वाचा आहे.

कामेच्छा आणि तिचे विविध आविष्कार - हस्तमैथुनापासून पॉर्न साहित्य, पॉर्न फिल्म्स, वेश्यागमन,  लग्नपूर्व लैंगिक संबंध, लग्नबाह्य संबंध - यांतील प्रत्येकाची चर्चा नैतिकतेच्या प्रस्थापित चौकटीतून केली; तर त्याबाबतचं मूल्यनिर्णयन होऊ शकणार नाही. कारण मुळात आपल्याकडे तरी हे सगळं नैतिकदृष्ट्या 'वाईट' आहे. त्यामुळे या चौकटीच्या बाहेरून पाहिलं, तरच आपल्याला काहीएक मूल्यनिर्णयन करता येईल. पॉर्नचं उदाहरण घेऊ. लग्नाआधी पॉर्न पाहणं मान्य असतं, पण प्रत्यक्ष सेक्स मान्य होत नाही. लग्नानंतर नवरा-बायकोंमधील संबंध मान्य होतो, पण पॉर्न पाहणं मान्य होत नाही. इथे 'आता तुला एक खेळणं दिलंय, तर तू शेजारच्या मुलाचं खेळणं कशाला मागतोस?' हा ‘नियमनाचा' विचार आणि 'मी तुला पुरेसा/पुरेशी नाही का?' हा दुखावलेल्या मनाचा एक विचार असतो. लग्नाची आणि लग्नकेंद्री नात्याची ही एक अडचणच आहे. 'कर्तव्यभावनेतून शारीरिक समाधान' ही कल्पनाच काहीशी भयंकर आहे. ('कर्तव्यभावनेतून प्रेम'देखील न पटणारं!). एकमेकांच्या लैंगिक तृप्तीसाठी एकमेकांना 'नेमून' देणं हे फारच गमतीशीर आहे. त्यामुळे आपल्याला लैंगिक तिढा सोडवायचा असेल, तर ही गृहीतकं सोडावी लागतील, मानसिकता बदलावी लागेल, आपल्या शारीरिक गरजेविषयी स्पष्ट बोलावं लागेल. लैंगिक भुकेचं प्रमाण कमी-अधिक असू शकतं, लैंगिक तृप्तीच्या (sexual gratification) प्रत्येकाच्या वेगळ्या कल्पना असू शकतात  हे समजून घ्यावं लागेल.

लग्नानंतर पॉर्न पाहणं यात काही गैर नाही; पण हे मान्य करूनदेखील पॉर्नबाबतचं मूल्यनिर्णयन करावं लागेल. (आपण जे जे काही करतो, त्याचं मूल्यनिर्णयन होऊच शकतं. आपण आपल्या कृतीच्या मूल्यनिर्णयनाची सवय लावून घेणं चांगलंच. कारण त्यामुळेच 'उपभोक्ता' म्हणून जगत असताना आणि बऱ्याच अंशी ते अपरिहार्य आहे हे मान्य असतानासुद्धा 'माणूस' म्हणून माझी अमुक कृती योग्य/अयोग्य/आवश्यक/अनावश्यक आहे का हा विचार मनात जागता राहू शकतो.) पॉर्न पाहण्याची वारंवारता, त्याचं व्यसन लागणं, त्याचे मानसिक-शारीरिक-कौटुंबिक दुष्परिणाम या अंगाने ते करता येईल. शिवाय एका गोष्टीबाबत शंका असायचं कारण नाही. लैंगिक समाधानाचं स्थान मान्य केलं तरी ते माणूस म्हणून जगण्याचं सार्थक नाही. गरज ही गरजच असावी. तिने विवेकशक्तीवर घाव घालू नये. 'खाण्याकरता जगतो की जगण्याकरता खातो' हा प्रश्न लैंगिकतेलाही लागू आहे. तेव्हा या व इतर निकषांच्या आधारे लग्नानंतर इतर कुणाशी किंवा वेश्येशी आलेले संबंध याचंही मूल्यनिर्णयन करता येईल. (उदा. लैंगिक समाधान घेणं या गोष्टीला तात्त्विक मंजुरी दिल्याने काहीही करून, वाटेल तेव्हा ते आपल्याला मिळायलाच हवं अशी आपली वृत्ती होते आहे का? 'व्यसन' या शब्दाची व्याख्या करणं अवघड असलं, तरी ते अशक्य नाही. त्यामुळे पॉर्न किंवा कुणा व्यक्तीशी येणारे संबंध याचं आपल्याला व्यसन लागतंय का हे ठरवणं गरजेचं आहे. आपलं मनोविश्व लैंगिकतेने व्यापून गेलं आहे का? आपण आपल्या कार्यक्षेत्रात आपलं योगदान  देत आहोत ना? याची तपासणी करत राहणं आवश्यक आहे.) लग्नाच्या वेळी या मुद्द्यांवर काहीच चर्चा होत नाही. मी वर म्हटलं, तसं ती व्हावी; म्हणजे पुढचा मार्ग सुकर होईल. मात्र ती झाली नसेल आणि लग्नानंतर हे मुद्दे उभे राहिले; तर त्याबाबत दोघांनी बसून, बोलून ठरवणं हेच योग्य आहे. ते कदाचित अवघड आहे, कारण असे संवाद करायची आपल्याला सवय नाही; पण असा संवाद होणं हाच मार्ग योग्य आहे. अन्यथा लग्नव्यवस्थेचे फायदे घेत स्वतःच्या प्रेम आणि कामसंबंधी वर्तनाला एकतर्फी वळण देणं योग्य नव्हे.

मला स्वतःला पॉर्नपेक्षा लग्नपूर्व आणि लग्नोत्तर प्रत्यक्ष लैंगिक संबंध अधिक आरोग्यपूर्ण वाटतात. यातली अडचण अर्थातच ही आहे, की लैंगिक सुखाचा प्रश्न सोडवण्याची व्यवस्था 'समाजमान्य नैतिकते'अंतर्गत लावली गेलेली नाही आणि लैंगिक समाधानाकडे बघण्याची आपली दृष्टी स्वच्छ नाही. त्यामुळे तिथे बदल झाल्याशिवाय पुढे काही होणार नाही. शिवाय लैंगिक इच्छेमध्ये कायम भोगलालसाच आहे असंही मला वाटत नाही. लैंगिक इच्छेला सौंदर्यानुभवाचं परिमाणदेखील आहे आणि इतर अनेक अनुभवांच्या ओढीसारखीच या अनुभवाची ओढ वाटणं नैसर्गिक आहे. Penetrative sex (भेदन संभोग) हा एक आविष्कार तर झालाच; पण शारीरिक अनुभव, स्पर्शाचा अनुभव हा दर वेळी तिथपर्यंत जाण्यासाठीच हवा असतो असं नाही.  एखादं चांगलं गाणं ऐकणं, निसर्गाच्या सान्निध्यात जावंसं वाटणं यासारखंच शारीरिक अनुभव घ्यावासा वाटणं हीदेखील एक सहज ऊर्मी होऊ शकते. 

कामजीवनाबाबत विचार करताना मला एक जाणवतं ते असं, की ही 'टू वे प्रोसेस' असल्याने ती कायमच 'फूलप्रूफ', घर्षणरहित अशी होणं अशक्य आहे. हे नातंच मुळात द्वंद्वात्मक असल्याने त्यावर सतत काम करत राहणं एवढंच आपण करू शकतो. फक्त आपल्याला यावर काम करायला हवं आहे (त्याचं नियोजन करण्यासाठी, त्यातील आनंद वाढवण्यासाठी किंवा त्याचा अतिरेक टाळण्यासाठी) हे कळणं गरजेचं आहे!

(ऐसी अक्षरे - पॉर्न विशेषांक : जून २०१६)

http://www.aisiakshare.com/node/5266


Tuesday, March 1, 2016

मला दिसणारी आजची लेखिका

साहित्याची वर्गवारी हा खरं तर मला थोडासा विचारात पाडणारा प्रकार आहे. म्हणजे कथा, कविता, कादंबरी याबाबत नव्हे, तर स्त्री साहित्य, दलित साहित्य, बालसाहित्य अशा वर्गीकरणाबाबत. एकीकडे अशी विभागणी अपरिहार्य वाटते. उदा. बालसाहित्य हा एक वेगळा कप्पा करावा लागेलच, कारण लहान मुलांच्या जाणिवा हळूहळू घडवत न्याव्या लागतात. त्यामुळे त्यांच्याकरता लिहिलं जाणारं साहित्य याला एक स्वतंत्र अस्तित्व आहे. पण सगळ्या 'मोठ्या माणसांमध्ये'सुद्धा इतके कप्पे आहेत की त्याची कधीकधी गंमत वाटते. मला वाटतं की समाज कसा-किती विभाजित आहे याची साक्ष हे प्रकार देत असतात.

स्त्रीवाद, स्त्री लिखित साहित्य याविषयी मला आस्था आहे. 'मिळून साऱ्याजणी'मध्ये सहसंपादक म्हणून काम करत असताना जेव्हा महाराष्ट्रातल्या विविध भागांमधून स्त्रियांचे लेख, कविता, अनुभव वाचायला मिळत तेव्हा मला तिथे असल्याचं समाधान मिळायचं. अर्थात पुरूष लेखकांचे अनुभव, साहित्य वाचतानादेखील समाधान वाटायचं, पण जेव्हा कुणी स्त्री तिच्या जाणिवांविषयी, आत्मभानाविषयी, तिने सोसलेल्या त्रासांविषयी लिहायची तेव्हा एक सार्थकता जाणवायची. स्त्रीवादाचा माझा विद्याशाखीय अभ्यास नाही. माझं जे थोडंफार आकलन आहे ते प्रामुख्याने जाणिवेतून आलेलं आकलन आहे. स्त्री असणं हे काय असतं हे मला पूर्णपणे कधीच समजू शकणार नाही कारण मी पुरूष आहे. (आणि हे उलट बाबतीतही खरं आहे!) स्त्रियांवरील पुरूषांकडून होणारे अत्याचार, आधुनिकतेच्या आवरणाखाली लपवले जाणारे स्त्रियांचे प्रश्न हे सगळं पुरूष म्हणून मला शरम वाटावी असंच आहे. दुसरीकडे शोषितांच्या दुःखाला किंवा त्या दुःखाच्या एकत्रित प्रकटीकरणाला जेव्हा धार येते तेव्हा त्यात खऱ्याबरोबर खोटेही आवाज मिसळले जाऊ लागतात आणि 'शोषित' नक्की कोण आहे असा एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. ज्यांना वंचित-शोषित समूहांसाठी काही करायचं आहे त्यांच्यापुढे हे एक मोठंच आव्हान तयार होतं. मला वाटतं की स्त्रीवादापासून प्रेरित झालेल्या लेखनाकडे बघताना ही बाजूदेखील लक्षात घ्यायला हवी.

साहित्याच्या लेखक-विशिष्ट वर्गवारीबाबत माझी तक्रार नसली, तसं होणं अपरिहार्य आहे हेही मान्य होण्यासारखं असलं तरी तसं करणं हे त्या साहित्याचं मूल्यमापन करण्याची पूर्वअट असावी का याबाबत माझ्या मनात संभ्रम आहे. म्हणजे कविता महाजन यांची 'ब्र' ही कादंबरी मला कादंबरी म्हणून आवडते की ती एका स्त्रीने लिहिली आहे म्हणून जास्त आवडते? 'आंधळ्याच्या गायी' या संग्रहातील कथांनी मला हलवून सोडलं हे म्हणताना त्या कथा एका स्त्रीने लिहिल्या आहेत म्हणून मला जास्त हलवून सोडतात का?

मला असं वाटतं की ललित (किंवा वैचारिकदेखील) वाङ्ग्मयाचा परिणाम, प्रभाव याच्या मुळाशी कितीही नाकारलं तरी 'आयडेंटिटी'सापेक्ष अस्तित्व असतंच. आपण साहित्य घटकाभर बाजूला ठेवू, पण मी जेव्हा एखाद्या पुरूषाला प्रथमच भेटतो तेव्हा त्याची पुरूष अशी वेगळी 'आयडेंटिटी' मी लक्षात घेत नाही. हेच स्त्रीच्या बाबतीत काय होतं? मला वाटतं अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म पातळीवर असेल, पण 'स्त्री' ही तिची आयडेंटिटी मी लक्षात घेतो. प्रस्तुत लेखात मी आजच्या स्त्री साहित्याबद्दलचं माझं निरीक्षण मांडणार आहे. परंतु हे करत असताना साहित्याच्या आस्वादाला, मूल्यमापनाला काही बाधा येते का हा प्रश्न मात्र माझ्या मनात रेंगाळतो आहे.

आणखी एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे. माझं निरीक्षण, माझं आकलन याला अर्थातच माझ्या मर्यादा आहेत. त्यामुळे मी दाखवेन ते मला माझ्या स्थानावरून दिसलेलं चित्र असेल. ते चित्र अंतिम असं काही दाखवतंय असा माझा भ्रम नाही आणि वाचकांचाही तो नसावा.

स्त्री लिखित साहित्य स्त्रिया लिहू लागल्या तेव्हापासून ते आतापर्यंत बदलत गेलं आहे. कारण वास्तव जगण्याचे संदर्भच बदलत गेले आहेत. परंतु तरीही 'स्त्रीपणाचे प्रश्न' आजही या साहित्याचा 'अंडरकरंट' आहे असं म्हणावसं वाटतं. याची एक सरळ दिसणारी दुसरी बाजू म्हणजे 'वास्तवाचे संदर्भ बदलले, पण स्त्रीचा जो साथीदार - पुरूष - तो फारसा बदलला नाही' अशी आहे का? मला वाटतं आहे. म्हणजे पुरूष अजिबातच बदलला नाही असं नाही, पण स्त्री आणि समाज असे दोघे जेव्हा समोरासमोर उभे राहतात तेव्हा तिला जे व्यापक चित्र दिसतं त्या चित्रात तिला असे पुरूष बहुधा फारसे आढळत नाहीत. अर्थात याबाबतीत मला एक मत नोंदवावंसं वाटतं. गौरी देशपांडे यांनी आपल्या काळाच्या पुढे जाऊन लिहिलं. त्यांच्या लेखनात कदाचित स्त्री-पुरूष संबंधांच्या नव्या व्यवस्थेची प्रारूपे मांडली गेली नसतील, पण त्या काळातील सर्वसाधारण स्त्रीपेक्षा त्यांची नायिका दोन पावलं पुढे आहे असं दिसतं. आज आपण जिथे आहोत त्यापेक्षा त्यांचा काळ स्त्री-पुरूष समतेच्या बाबतीत काहीसा मागे होता असं म्हणता येईल. असं असताना गौरी देशपांडेंसारखी 'पुढची नजर' ठेवून, किंबहुना त्यांना जे दिसलं त्याच्याही पुढे जाऊन काही लिहिताना कुणी दिसत नाही. अर्थात हे कथात्म साहित्याबाबत. कथात्म साहित्य सोडता इतर विविध विषयांवर माहितीपूर्ण लिखाण करणाऱ्या अनेक लेखिका आज दिसतात. (मला चटकन सुचणारी काही नावं - उत्क्रांतीसारख्या महत्त्वाच्या विषयावर मराठीत ग्रंथ लिहिणाऱ्या सुलभा ब्रह्मनाळकर, कॉपीराईट कायद्याविषयी 'लोकसत्ता'मधून गेल्या वर्षी ज्यांनी सदर चालवलं त्या मृदुला बेळे, वन्य प्राण्यांविषयी रोचक लेखन करणाऱ्या डॉ. विनया जंगले, स्त्री-पुरूष संबंध आणि स्त्री प्रश्नाकडे विज्ञानाच्या भिंगातून पाहणाऱ्या मंगला सामंत, नगररचनाशास्त्रातील जाणकार सुलक्षणा महाजन, गावगाड्याचं आजचं चित्र मांडणाऱ्या उल्का महाजन, तत्त्वज्ञान-सामाजिक अभ्यासाच्या प्रांतात लेखन/अनुवाद करणाऱ्या सुनीती देव, संजीवनी कुलकर्णी, करूणा गोखले, अनुवादाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक स्त्री अनुवादक इत्यादी. अशी इतरही नावं दिसतील. याखेरीज स्त्री चळवळीशी संबंधित असलेल्या अनेक अभ्यासक, पत्रकार त्यांचं योगदान देत आहेतच.)        

तर साहित्याच्या क्षेत्रात लेखिका जे योगदान देत आहेत त्यात मला वाटतं की अजूनही म्हणावं इतकं 'पुढे जाणं' होत नाही. स्त्री-पुरूष संबंधांबाबत जरी असेल तरी काही नवं, संरचनात्मक असं फारसं वाचायला मिळत नाही. मी स्वतः फेसबुक पिढीचाच प्रतिनिधी आहे. फेसबुक, इंटरनेटवरील मराठी वेबसाईट्स या व्यासपीठांशी परिचय असणारा आहे. इथे अनेक स्त्रिया लिहिताना दिसतात. सर्वच वयोगटातील. विज्ञान, सामाजिक-आर्थिक मुद्दे, स्त्री प्रश्न, स्त्री-पुरूष संबंध अशा अनेक बाबतीत इथे चर्चा होतात. यात अनेक स्त्रिया आपलं मत नोंदवतात. परंतु जे मुद्रित माध्यमाबाबत आहे, तेच इथेही आहे. स्त्रियांच्या इतर लेखनात वैविध्य असलं तरी कविता अजूनही एका कोषात घुटमळताना दिसते. समीक्षा, पुस्तक परिचय, ललित निबंध हे प्रकार कमी-अधिक प्रमाणात हाताळले जातात. प्रामुख्याने ब्लॉगवर किंवा वेबसाईट्सवर. याखेरीज फेसबुकवरील स्फुटलेखन हा एक नवा फॉर्म म्हणून पुढे यायची शक्यता आहे. तिथे ललित, चर्चात्मक स्वरूपाचं लेखन जास्त आहे. आणि ते तुकड्यांच्या स्वरूपात असलं तरी सगळंच लेखन दुर्लक्ष करावं असं अजिबात नाही.

स्त्री लेखकांच्या लिहिण्यात पुरूषसत्ताक व्यवस्थेविषयीची नाराजी दिसते, पुरूषांविषयीचीही नाराजी दिसते. पण मला कधीकधी असं वाटतं की सततच्या नाराजीतून किंवा टीकेतून हाती काही लागेनासं होतं. दुसरा एक मुद्दा यासंबंधीच्या चर्चेत बरेचदा पुढे येतो तो हा की आत्मभान जागं झालेल्या स्त्रीने आपल्या लिहिण्यातून आपला असंतोष प्रकट करावाच, पण जर ती स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करत नसेल, लग्नसंस्थेचे आर्थिक लाभ घेत असेल तर या संस्थेची चौकट न मोडता, सुरक्षित स्थानावरून तिने स्त्रीवादी विचारांचा प्रसार करावा का? स्त्री प्रश्न सर्वत्र सारखे नसतात. पुण्या-मुंबईतील एखादी सुखवस्तू गृहिणी आणि मराठवाड्यातील एखाद्या खेड्यातील स्त्री यांच्यात कमालीचं अंतर आहे. सुखवस्तू गृहिणी जेव्हा स्त्रीवादी विचाराचा आधार घेऊन सहानुभूतीच्या परिघात जाऊ बघते तेव्हा ते स्वीकारणं जरा जड जातं. तिने आपली कक्षा अधिक विस्तारणं अपेक्षित आहे.          

मनस्विनी लता रवींद्र या तरुण लेखिकेच्या 'ब्लॉगच्या आरशापल्याड' या कथासंग्रहाच्या मलपृष्ठावर कथाकार, नाटककार जयंत पवार यांनी त्यांच्या ब्लर्बमध्ये मनस्विनीच्या लक्षणीय अभिव्यक्तीकडे लक्ष वेधताना म्हटलं आहे की अभिव्यक्तीतील बेधडकपणा हा तिच्या पिढीचा स्थायीभाव आहे, पण जगण्याची व्यामिश्रता समजून न घेता येणं हादेखील या पिढीचा स्थायीभाव आहे. मनस्विनीसारख्या ताकदीच्या नव्या लेखिकेचा ते अपवाद करतात, पण त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे असं मला वाटतं. विशेषतः मी वर इंटरनेटवरील लेखनाचा जो उल्लेख केला आहे त्यासंदर्भात मला हे जाणवतं. लेखनातील एकसुरीपणा हा व्यामिश्रता समजून न घेतल्याने येतो. ही समज ज्या लेखिकांमध्ये दिसते त्यात आज मनस्विनी, वंदना भागवत ('स्तब्ध' या वंदना भागवत यांच्या कथासंग्रहातील ''इतर कोणी नाही तरी…' सारखी एका पुरूषाची कथा मला आश्वस्त करणारी होती) अशी नावं दिसतात. 'मिळून साऱ्याजणी'मध्ये 'पुलावरून पाणी जाय' हे सदर लिहिणाऱ्या नीलम माणगावे यांच्या स्फुटलेखनात मला हे दिसलं. 'निळ्या डोळ्यांची मुलगी' ही कादंबरी लिहिणाऱ्या शिल्पा कांबळे यांच्यात ही समज दिसते. उल्का चाळके या मुलीची कथा सांगणारी ही कादंबरी आहे. कादंबरीच्या ब्लर्बवर उल्काच्या कवितेतील सुरूवातीचा भाग छापला आहे. तो द्यायचा मोह आवरत नाही -

प्रिय मार्क्स,
तू मला ओळखत नाहीस
पण मी तुला ओळखते
तुझा जन्म जर्मनीचा
वंशाने ज्यू  
जेनी बायको
एंजल्स मित्र
आणि हेगेल गुरू
ही तुझी जुजबी माहिती

आता माझ्याबद्दल ऐक
मी कु. उल्का बा. चाळके.
वय वर्षं बावीस.
धर्माने बौद्ध, पूर्वीची महार, ढोर, चांभार, ढक्कलवार
किंवा कोळी, न्हावी, कोष्टी, गावित, कातकरी, वडार
किंवा वाणी, गोसावी, जोशी
शेवटी धनगर, बामन, सोनार
ही माझी जुजबी माहिती.
   
उल्का चाळकेची जाणीव आणि तिचं आकलन आपल्या समाजाच्या संदर्भात फार महत्त्वाचं आहे. परंतु असं लक्षवेधी लिखाण करणाऱ्या लेखिका तुरळकच आहेत हे सांगावसं वाटतं.

हे म्हणत असताना मी लेखाच्या प्रारंभी मांडलेल्या मुद्द्याकडे पुन्हा येतो. नव्या लेखनात अजूनही संरचनात्मक मांडणी, आकलनाच्या कक्षा वाढल्या आहेत हे दर्शवणारं लेखन कमी दिसत असलं तरी स्त्री- स्वरात काहीसा तोच-तोपणा येण्यामागे स्त्रीचं झगडणं अजून संपत नाही आहे हे एक कारण दिसतं आणि दुसरं कारण ज्या स्त्रियांना जगण्याचे प्रश्न भेडसावत नाहीत त्यांना अजूनही बंध तोडावेसे वाटत नाहीत हे आहे. ज्या क्षणी त्या आपलं सुरक्षित स्थान सोडून उल्का चाळकेला प्रत्यक्ष भेटायला जातील, अन्यायाच्या आणखी पुढे जाऊन आर्थिक-सामाजिक संरचना आणि विचार-वर्तणुकीतील लिंगसापेक्ष गुंत्यांना सामोऱ्या जातील त्या क्षणी कदाचित त्यांच्याहीकडून साहित्यात लक्षणीय स्वरूपाची भर पडू शकेल!

(प्रेरक ललकारी - मार्च २०१६)

Thursday, November 5, 2015

देहधून टिपणारी कविता

काळाच्या पटावरील कुठल्याही तुकड्यामध्ये जे जे साहित्य निर्माण झालं आहे त्यात कविता हा साहित्य प्रकार नेहमीच लक्षवेधी ठरला आहे. प्रत्येक साहित्य प्रकाराचं स्वत:ची अशी काही अंगभूत वैशिष्ट्ये आहेत आणि काळाच्या प्रवाहाबरोबर त्या सर्वांनी अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. लेखक आणि कवी आपापल्या काळाचे प्रॉडक्ट जसे असतात तसेच ते आपल्या काळावर स्वार व्हायचं सामर्थ्यही बाळगून असतात. त्यांची अभिव्यक्तीची निकड ही साहित्यप्रकारांच्या प्रचलित स्वरुपाची मोडतोड करणारीही असू शकते आणि अशा घर्षणातूनच काळानुरुप साहित्याचं स्वरुप बदलत राहतं. कवितादेखील त्याला अपवाद नाही.

मराठी कवितेचा वेध आजवर अनेक समीक्षकांनी, अनेक अंगांनी घेतला आहे. कविता हा माझाही आस्थाविषय असला तरी कवितेबाबतची विद्याशाखीय बैठक माझ्याकडे नाही. कविता ही माझ्याकरता एक अनुभूती आहे. तिने मला ‘दर्शन’ घडवलं आहे, अस्वस्थ आणि उन्नत केलं आहे आणि प्रामुख्याने ती माझ्याकरता ‘क्रिएटिव्ह जीनियस’चा आविष्कार म्हणून समोर आली आहे. मला खरं तर कवितेविषयी काही बोलूच नये, कविता शोधत हिंडावं आणि कुठली कविता आपल्याला ‘खतम’ करतेय ते पाहावं इतकंच वाटतं. एखादी कविता आपल्यावर अतिशय तीव्र आघात करते, एखादी कविता केवळ तिच्या शब्दसौंदर्याने मोहून टाकते किंवा एखादी कविता शब्दात पकडता न येणारा तीव्र अनुभव देते. कविता तिच्या ‘असण्याने’ अंतर्मनातील अनेक स्थळांना स्पर्श करते आणि कधीकधी या स्थळांना जोडणारे पूलही बांधते. हा संपूर्ण अनुभव घेणं, तो ‘प्रोसेस’ करणं ही एक विलक्षण प्रक्रिया आहे. आणि मला असं वाटतं की ही प्रक्रिया हा एक अतिशय व्यक्तिगत स्वरूपाचा अनुभव आहे. कवितेशी जोडलेपण वाटणं अथवा न वाटणं याचा संबंधहा अनुभव येण्याशी आहे. 
  
मी पहिल्या परिच्छेदात म्हटलं तसं कवितेचं स्वरुप बदलत गेलं आहे आणि कवितेने हाताळलेले विषय हेही या बदलाचं एक कारण आहे. अर्थात एकाच काळात अनेक स्वरुपांच्या कविता वाचायला मिळतात हे खरं, पण काळाची छाप त्या काळात लिहिल्या जाणार्‍या सकस कवितेवर पडलेली दिसते. एकोणिसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनुक्रमे केशवसुत (१८६६-१९०५) आणि मर्ढेकर (१९०९-१९५६) या दोघांनी मराठी कवितेला महत्त्वाचं वळण दिलं. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात दलित कवितेने मराठी साहित्यात आणखी एक सशक्त प्रवाह निर्माण केला आणि नव्वदोत्तरी कालखंडात ‘विखंडित वास्तवा’ची कविता जन्माला आली. या दीड-दोन शतकांच्या काळात मराठी कवितेने अनेक जाणिवांना स्पर्श केला आहे. मानवी लैंगिकता, शरीर अनुभव, शारीर जाणीव, 'लैंगिक द्वंद्व’ याबाबतची जाणीवदेखील या कवितेत, विशेषत: साठोत्तरी काळातील स्त्रीवादी जाणिवेच्या कवितेत दिसून येईल.

मानवी लैंगिकता आणि शरीर विचार हा खरं तर आपल्या अस्तित्वाशी जोडलेला, अविभाज्य, कदाचित 'प्रथम' असा विचार आहे. कवितेने ही जाणीव कशा प्रकारे प्रकट केली आहे हे पाहणे रंजक आणि उद्बोधक ठरेल. या लेखातून अशाच काही कवितांची ओळख करुन द्यायचा प्रयत्न मी करणार आहे. यातील बहुतेक कवी माझे समकालीन आहेत. फेसबुक, ब्लॉग यासारख्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या आम्हा मित्र-मैत्रिणींच्या गटातले आहेत.  नव्वदोत्तरी कवींच्या पुढच्या पिढीतली ही कविता आहे. ‘अभिधानंतर’ (दिवाळी,२०१४) च्या अंकात विश्राम गुप्ते यांनी ‘फेसबुक आणि कविता’ या शीर्षकाचा एक दीर्घ लेख लिहिला आहे. यात त्यांनी या कवितेची उत्तम ओळख करुन दिली आहे. (साहित्यातील नवीन प्रवाहांकडे आस्थेने बघत त्याची साक्षेपी समीक्षा करण्याचं महत्त्वाचं काम विश्राम गुप्ते सातत्याने करत आले आहेत. मी स्वत: या फेसबुक कवितेचा प्रतिनिधी असल्याने त्यांच्याविषयीची कृतज्ञता इथे आवर्जून नोंदवतो. ‘अतिरिक्त’ (मार्च २०१३) च्या अंकात त्यांनी नव्वदोत्तरी कवींविषयी लिहिलेले विस्तृत लेखही त्यांच्या अभ्यासपूर्ण आस्थेची साक्ष देणारे आहेत. ते जरूर वाचावेत.)

अर्थात या विषयाच्या अनुषंगाने काही इतर जुन्या-नव्या कवितांचे संदर्भ मी टाळणार नाही आहे. मुळात माझा प्रयत्न फेसबुकवरील आजच्या कवितेवर लक्ष देत ही कविता लैंगिकतेबाबत, सेक्शुअर फँटसीबाबत, देहभानाबाबत काय बोलते आहे हे सांगणे हा आहे, परंतु फक्त फेसबुकपुरतंच मर्यादित न राहता किंवा आमच्या पिढीच्या काळापुरतं न बोलता एखादी जुनी कविता याबाबत काय बोलली होती तेही सांगायला मला आवडेल. यात अर्थातच मी न वाचलेल्या अनेक कविता निसटायची शक्यता आहे. ही मर्यादा वाचक लक्षात घेतील अशी मी आशा करतो.

फेसबुकच्या महाकाय पसार्‍यात आणि बरेचदा चिंतेत टाकणार्‍या उद्रेकी देवाण-घेवाणीत काही चांगले कवी मित्र-मैत्रिणी जोडता आले ही एक मोठीच जमेची बाजू आहे. आधुनिक, महानगरी जाणिवांबरोबरच वर्गीय व जातीय विभाजनाला आव्हान देणारी सामाजिक कविताही इथे भेटते. नव्या स्त्री जाणिवा दिसतात, आभासी जगातल्या अस्वस्थ जाणिवा दिसतात आणि तरल काव्यमयतेचा पडदा पूर्ण बाजूला करून थेट आतलं, 'पँशनेटली सेक्शुअल', व्यक्तीवादी मुशीतनं घडलेल्या प्रामाणिक कबुलीचा प्रत्यय देणारं मनोगत मांडणारी कविताही दिसते. ही कविता जशी subtle आहे तशीच ती बेधडकही आहे आणि तिचा हा ‘सेक्सी’ अवतार चकित करणारा आणि दाद द्यायला लावणारा आहे.

‘बाइक सेक्स’ या नावापासूनच भन्नाट असलेल्या कवितेत प्रणव सखदेव हा कवी आपल्यापैकी अनेकांना आलेला शरीर अनुभव बरोब्बर शब्दात पकडतो –

गाडी गाडी सुसाट वारा
रोखठोक अर्जंट ब्रेक
पाठीच्या कॅनव्हासवर
मांसल मांसल उबदार शेक

कानापाशी गुणगुण भुंगी
मानेवरती ओली जीभ
सिग्नल पाळत धावे गाडी
दाबत दाबत पीप पीप

कानपाळीवर ओठ गुलबट
जणू सिल्कचा काठपदर
पोटापाशी हात घट्ट
भूक होते खालीवर

लेदरसीट गरमागरम
ढुंगणावर घासे मांडी
मोठी मोठी होत जाते
आतल्या आत जादूची कांडी

हा essentially पुरुष अनुभव आहे आणि प्रणवने ही ‘राइड’ त्याच्या शब्दातून जिवंत केली आहे. नैसर्गिक सत्याला जादूमध्ये बसवून तो काव्यात्म परिणाम तर साधतोच, पण वाचणार्‍यांच्या, विशेषत: पुरुषांच्या मनात ‘पटल्याचं’ हास्य खुलवतो.

अजिंक्य दर्शने याची एक कविता मला वरच्या कवितेसारखीच तिच्या अंतिम परिणामामुळे फार लक्षवेधी वाटते. कवितेचं शीर्षक आजच्या बोलीभाषेतलं, पण उर्दूकडून उसनं घेतलेलं, बोलकं आहे -

उफ्फ  -
६९, मिशनरी, डॉगी
वीर्याळलेली पहाट
कोकीळेचं नरडं

कोंबड्याचा मोबाईल आलार्म
ओलावल्याएली पँट
पाणावल्याएले डोळे

अंगाला फुटलेलं पांघरूण
सेमी-ट्रान्स्परंट खिडकी
पहाटलेला ब्रश, व्हिंटेज मोड

सकाळ ऊर्फ रद्दी
दूध ऊर्फ चितळे
बाई ऊर्फ सुवर्णा

पोळ्या ऊर्फ कागद
भाजी ऊर्फ लगदा
चहा ऊर्फ चॉकलेटी साय

एक कावळी आंघोळ
झिजलेला लक्स
मळीचा फ्लक्स

गरम पाणी
गरम बाथरूम
वाफाळलेला मी

तरारलेल्या फँटसीज्
काही फटीग फेल्युअर्स
आणि दारावर थाप

अर्धवट ओलं शरीर
अर्धवट हातातलं ‘काम’
अर्धवटलेली झपझप पाऊलं

लक्ष्मी अष्टक, भक्तीसागर
उदबत्त्या, गूळ खोबरं, जप वगैरे
सगळंच तीनदा तीनदा...

पँटीनच्या केसांवर तीर्थ
पुसटसं एक थेंब कुंकू
श्रद्धाळलेले गंध

लिफ्ट बंद
चढणाऱ्या पायऱ्या
ओझरता कुजलेला डक्ट

 १२५ सीसी, बटन स्टार्ट
ढर्रर्रर्र...ढर्रर्रर्ऱ...ढर्रर्रर्र...
गाडी बंद, गोट्या कपाळात

प्रतीक्षा दुग्धाळ हसतीये
अगं थांब..एवढं काय झालंय
मादक तुषार, कपाळात गरमाहट

कॉक रिझर्व्हवर पिळला
ढर्रर्र..गाडी स्टार्ट..टोटल कंट्रॉल
प्रतीक्षा हसतीये..मी बुंग...

पत्र्या मारूती, ऑफिसला उशीर
मग ख्रिश्चनी नमस्कार
फक्..मुलचंदानी इकडे काय करतीये?

मी हजर, ती हाय, भीमरूपी येतं?
मी हो, तिच्या जवळ, मोठ्याने पुटपुटतो
लिटिल लाऊडर..साली मंदिरात काय एरोटिक हसते?

भीमरूपी...बिच हसणं थांबव
महारूद्रा...ए शिवू नकोस
भिमरूपी..६९, मिशनरी, डॉगी
फक्...लेट मी कॉन्सट्रेट यू बिच...भी..म..रू..पी...

कविता प्रवाही आहे. कवी जणू आपल्यालाही बरोबर घेऊन, सकाळची आवराआवर करून, त्यातले अनेक बारकावे, विशेषतः 'एकट्या पुरुषाच्या शरीरधर्मा'चे बारकावे  दाखवत पुण्यातल्या पत्र्या मारूतीच्या मंदिरापाशी येतोय आणि त्याच्या ‘इरॉटिक हसणार्‍या’ मूलचंदानी नामे मैत्रिणीला भेटवतो. आणि कवितेत जागोजागी (आणि शेवटच्या चार ओळीत विशेष) अजिंक्य आपली टाळी मिळवतो. ‘भीमरुपी महारुद्रा’च्या जोडीला किंवा अंघोळ करून, गाडी स्टार्ट करून निघेपर्यंत मागे येणारे सेक्शुअल विचार तो इतक्या धाडकन मांडतो की आपण अवाक् होतो. आणि त्या अवाक् होण्यात ‘हे असं होतं बरं का’ ही कबुली असते. शब्दांची थेट पेरणी करत, परंतु त्यामुळे कविता न विस्कटवता एक संपूर्ण अनुभव आहे तसा मांडण्याची क्षमता या कवितेमध्ये आहे.

अजिंक्यच्या या कवितेनंतर मला चटकन आठवतेय ती सलील वाघ यांची ‘देवदर्शन’ ही कविता. सलील वाघ हे नव्वदोत्तरी कवितेतील एक महत्त्वाचं नाव. माझ्यासकट अनेक समकालीन कवींवर त्याच्या कवितेची मोहिनी आहे. आपल्या अंगभूत धीटपणे एकसंधपणा न सोडता व्यक्तिगत लैंगिकतेचा 'षटकार' मारल्यासारखा अनुभव ही कविता देते.

तळ्यातल्या गणपतीला
नेहमीच गर्दी असते
चतुर्थीला तर मी जातोच मित्राबरोबर खास
लाईन असते मोठी
पण फार जागृत दैवत
लायनीत उभा होतो
तेवीस बायका लायनीत
सेहेचाळीस तरी लायनीबाहेर
पुरुषं पोरं तर कित्येक
पंधराएक तरी धंदेवाल्या असतील गर्दीत
बाकीच्या धंदा न जगणार्‍या पतिव्रता
आणि धक्के मारणारे सगळेच भाविक
रांगेत.... रांगेबाहेर....
एका सँडल घालणार्‍या पोरीचा
स्कर्ट वर गेला सगळे भाविक तिकडे
मी मात्र पूजा-अभिषेकांचे रेट
तसेच रांगेतल्या बायांचे बॉल
पाहून घेतले तेवढ्यात माझं
आत्मभान वाढलं लाईन पुढे सरकली
एक जनरल ओळखीचा मित्र भेटला
जातीनी पत्रकार नाहीत समीक्षक असावा
खूप बोलणं झालं काही बाही
नेमाड्यांची नवनैतिकतावादी भूमिका
ही च्यूत्येगिरी आहे असा त्याचा मतितार्थ होता
माझी काहीच हरकत नव्हती
आपल्याला काय घेणंय मी म्हणलंही
वाङमयाची लफडी वाईट तेवढ्यात
एक मित्र आला आयेमडीआरचा
त्यानी पूनम शहाला
फ्लॅटवर कसं ठोकलं ते सागितलं
कल्ला यार
तेवढ्यात माझा नंबर आला मी
मुठ्ठ्या मारून बळकट झालेले माझे पंजे
देवाला जोडले अभावित प्रसाद घेऊन निघालो
तर पाकिट आणि चपला गायब

एक सलग अनुभवाचे अनेक तुकडे आणि एकेका तुकड्यामागचं एक सलग जगणं. हीदेखील अर्थातच पुरुषाची कविता आहे आणि हा पुरुष नि:संकोचपणे आपली स्वत:ची व इतरांचीही लैंगिक बाजू आपल्यासमोर बजावून मांडतोय. चांगली कविता आघात करते असं जे मी सुरुवातीला म्हटलं त्यात मला या कवितेतल्यासारखा आघात अभिप्रेत आहे. आणि आघात वेगळा व ‘चमकदारपणा’ वेगळा. आघाताचं मूळ कमालीच्या अस्वस्थेत असतं. काहीतरी झडझडून सांगण्यात असतं. इथे कवीला फक्त शॉक देऊन आपल्याकडे लक्ष वेधून द्यायचं नसतं तर त्याच्या जगण्याचा पैस त्याला आपल्यासमोर कधी आस्थेनं तर कधी हताशपणे मांडायचा असतो. लैंगिक जाणिवांचं प्रभावी प्रकटन करणार्‍या कवितांपैकी ही माझी एक आवडती कविता आहे.

लैंगिक जाणीव, शारीरभान हे अनेक स्वरुपात मांडलं जाऊ शकतं. साकेत कानेटकर हा कवी अजिंक्य किंवा प्रणवसारखाच धडकपणे बोलतो आणि लैंगिकतेचा संदर्भ देत एकमेकांच्या आंतरिक ओठीचं साफल्य अनुभवण्याची अपेक्षा धरतो. त्याची ‘जजमेंट डे’ ही कविता पहा -

तुला नॉर्स्टल्जिया रिव्हिझिट करायचाय तेव्हा ये.
माझ्या हाडांवरचं क्लेश उपभोगायचंय तेव्हा ये.
पण जेव्हा माझे विचार आठवून यावंसं वाटेल
तेव्हा हे वाटणं कन्फर्म करून ये
हा दिवस असू शकतो आपला
जजमेंट डे ठरवण्याचा.
काँट्रॅडिक्शन्स मान्य करुन एकत्र येण्याचा.

नव्या कवितेतील इंग्लिश शब्दांचा वापर हा कदाचित वाङमयीन वादाला आमंत्रण देणारा मुद्दा ठरु शकेल पण काही संदर्भात इंग्लिश शब्द चपखल बसतात आणि काही समकालीन अनुभूती समकालीन भाषेशिवाय येऊ शकत नाही हे खरं. अनुभवाचा प्रवाह खंडित न करता या कवितेत इंग्लिश शब्द जागा पटकावून बसले आहेत आणि त्यांना जागेवरुन उठवावंसं वाटत नाही हे या रचनेचं वैशिष्ट्य आहे. फेसबुक पिढीतील कवितेत इंग्लिश शब्दांचा वापर असलेल्या अनेक रचना दिसतात. इंग्लिशचा अतिवापर यावर वेगळी चर्चा संभवते, पण मला वाटतं की कवितेचं ‘कवितापण’ जपलं जात असेल तर शब्दांच्या वापराला सूट द्यायला हरकत नसावी.

देह जाणीव आणि लैंगिक जाणीव या कवितांमधून अनेक अस्तरं घेऊन प्रकट हाताना दिसते तेव्हा थेटपणा, बेधडकपणा यातच फक्त अडकून न राहता ही कविता खोलातही उतरते आहे. खरं तर मांडणीतला थेटपणासुद्धा उथळपणे येत नाहीच, परंतु शब्दांच्या प्रभावी वापरामुळे, अनुभवाच्या थेट वर्णनामुळे आत्मिक अनुभूतीकडे दुर्लक्ष होतं का असं वाटायची शक्यता आहे. अजिंक्य दर्शने त्याच्या एका कवितेचा शेवट करताना म्हणतो -

काट्यावर मारलंय करियर
फाट्यावर मारल्यात मुली
तरी सगळ्या नसण्यात हल्ली असणं लपत नाही.

हे ‘नसण्यातलं असणं’ वाचताना खराखुरा कवी आपल्याला दिसतो. सत्यपालसिंग राजपूत याच्या ‘लिपीकथा’ या कवितेतील एक तुकडा पहा. कविता बरीच मोठी आहे. त्यातील हा सुरुवातीचा भाग -

तुमच माझं कुणाचंही
लिपी म्हणजे एक आयुष्य असू शकते.

आपण आईच्या गर्भात असतो
तेव्हाची न आठवणारी आपली जाणीव
लिपी असू शकते गूढ
मोहंजोदारोच्या मुद्रांवरची न वाचता येणारी
आपण ओठांनी जेव्हा पहिल्यांदा लुचतो आईचे स्तनाग्र
तेव्हा आईला फुटलेला असू शकतो लिपीचाच पान्हा
शिकारनृत्य असू शकतं आपलं मातीत खेळत राहणं
हे म्हणजे लिपीनंच घेतलेलं एक वळण
कोळशानं भिंतीवर मारलेल्या रेघोट्या

किंवा गिरवलेली पहिली अक्षरं पाटीवर
म्हणजेच फक्त लिपी नसू शकते

लिपी असू शकते माणसाच्या संस्कृतीचे चित्र
भीमबेटकाच्या गुहेतलं
सहावीत रागारागात वर्गातल्या पोराच्या थोबाडीत
उमटलेली आपली लाल बोटं
किंवा लिपी असू शकते अवघड
अगदीच लहानपणी पँटच्या चैनीत अडकलेल्या नुन्नीसारखी.

लिपी म्हणजे भाषा आपल्यासमोर येताना जे रुप घेऊन येते ते रुप. सत्यपालने अनेक रुपं मांडून ‘लिपीकथा’ सांगितली आहे. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्पर्शबिंदूंचे अनेक दाखले देत तो ही कथा सांगतो. कवितेत पुढे तो एके ठिकाणी म्हणतो,

एखाद्या विप्लवी संघटनेच्या मेंबरशिपचं पावतीपुस्तक
किंवा दीर्घ किसनंतर प्रेयसीने काढलेले विव्हळते सित्कार
मानवी डोक्यातून आलेली लिपी असू शकते
थिअरी ऑफ रिलेटिव्हीटी

लैंगिक जाणीव, देह जाणीव याचा विचार करताना मला असं वाटतं की जैविक आणि सामाजिक दोन्ही घटकांचा परिणाम म्हणून पुरुषाची कविता आणि स्त्रीची कविता यात रोचक फरक पडत जातो. पुरूषाचं 'अवघडलेपण' कवितेतून पप्रकट होतं ते बऱ्याचदा देहाच्या पातळीवर आणि स्त्रीचं अवघडलेपण मात्र प्रामुख्याने मानसिक पातळीवर प्रकट होतं. कवयित्रींच्या कविता वाचताना तिचं 'आतूनचं तुटलेपण' फार भिडतं. कारण तिच्या उद्गारात एका आदिम दुःखाचा साक्षात्कार झाल्यासारखा वाटतो. पुरुष स्त्रीचं 'असणं', त्याच्या लैगिकतेतील आंदोलनं प्रकट करतो. त्यातून त्याची असोशी दिसते पण 'सेक्शुअली सरेंडर' होणंही प्रतीत होतं. तर स्त्री कविता स्वतःच्या आत बघत आपल्याच जाणिवेचा अर्थ लावायच्या प्रयत्नात असलेली दिसते. आणि आधुनिक कवितेत तर विद्रोह फार प्रत्ययकारी रीतीने समोर आला आहे. मेघना पेठे यांची मला आवडलेली एक कविता. स्त्रीत्वाचा आणि पुरुषत्वाचा पुन्हा मुळापासून शोध घेऊ पाहणारी.         

खूप खूप वर्षांपूर्वी..
जेव्हा कापूसही नव्हता नि कापडही
फक्त आंगभर केस होते
पुढल्या पायांचे हात होताना
कणा अजून ताठ व्हायचा होता
सूर होता पण गाणी नव्हती
धातू असेल पण नाणी नव्हती
अजून जेव्हा जमवाजमव सुरू झाली नव्हती..
तेव्हा कुठे रे होते
हे उच्च रवातले कज्जे तंटे?
ह्या स्पर्धा, ही ईर्ष्या, हे राजकारण
हा कमी जास्तीचा विचार, वर-खालीचा
हे नवरा-बायको प्रकरण..
फुकटचा झोल विनाकारण

तेव्हा होते फक्त आग, आकाश, वारा, आभाळ
वाहतं पाणी आणि बदलते ऋतू रानोमाळ
तेव्हा होतं फक्त जंदणं आणि मरणं
तेव्हा होतं फक्त जगणं आणि मरणं
नव्हता शिकारीचा गर्व, नव्हता वेणांचा अभिमान
फक्त असण्याला सलाम, फक्त असण्याला रामराम

जन्म देताना वा जीव जाताना मी गुहेत.. एकटी
जीव घेताना वा जीव जाताना तू रानात.. एकटा
असं असणार हे मान्य होतं.
नो ऑब्जेक्शन, नो अ‍ॅटिट्यूड्स
फुकट फाटक्या ’दुकट्या’ झुली पांघरत नव्हतो..
..जशा आज पांघरतो
नि आणखीच उघडे पडतो..

चल ना जाऊ पुन्हा त्या रानातल्या गुहेत
आपण तिथेच की रे बरे होतो..

कविता महाजन, प्रज्ञा दया पवार, अनुराधा पाटील अशा महत्त्वाच्या लेखिका-कवयित्रींनी त्यांच्या कवितेतून लैंगिकतेचे अनेक पैलू उलगडले आहेत. प्रत्येकीची कविता उद्धृत करणं शक्य नसलं तरी त्यांची नोंद इथे आवश्यक वाटते.

फेसबुकवरच भेटलेल्या योजना यादवची एक कविता पहा. आजच्या काळाची, आणि विशेषतः स्त्रीच्या आजच्या काळाची -

स्पायकरच्या ट्रायल रुममध्ये
कपडे उतरवत असताना
रोखलेले असतात
डिझायनरचे डोळे आपल्यावर

पायाच्या घोटापासून कंबरेपर्यंतचा आकार
मांड्यांचा घेराव , स्तनांचा विस्तार
स्कॅन होत राहतो आरशा पल्याड

जीन्स चढवतात ते हात
आपले नसतात
पायही बहुदा आपले नसतात
नव्या कपड्यात खुललेला अहं
तो ही नसतोच आपला .

डिझायनर
बेमालूम घुसलेला असतो शरीरात
दुकानात पाय ठेवल्यापासून .

योजना तिच्या अनेक कवितांमधून स्त्री असण्याला आणि स्त्रीच्या अतृप्त असण्याला आवेगाने भिडली आहे. 'स्वप्न - २' या तिच्या कवितेत तर तिने शरीराला असा काही स्पर्श केला आहे की मी अबोल होत मनोमन तिच्या पाठीवर थाप मारली.

शरीरात रूतून बसलीयत
माणसं
दाटीवाटीनं

नवरा योनीच्या तळघरात
पोरगी त्याच्या मांडीवर
पोटाच्या मध्यभागापर्यंत

उरलेले भाग
मिळतील तसे
वाटून घेतलेत प्रत्येकानं

अन्
आई मात्र
उभीच आहे शरीरात
नखशिखांत ...

योजनालादेखील - जी फेसबुक पिढीची प्रतिनिधी आहे - 'आई' शरीरात कायम 'उभी' आहे असं वाटतं आणि तिचं शरीर वाटून घेतलं गेलं आहे असं वाटतं तेव्हा ती एक महत्त्वाचं विधान करते आहे हे लक्षात घ्यायला हवं. मेघना पेठेंच्या मघाशी उद्धृत केलेल्या कवितेची आठवण करून देणारी योजनाची ही कविता पहा -

निव्वळ अंगावर अंग
घासण्यापुरते
हवे असतो जर
आपण एकमेकांना

संवादाचा एखादाही तंतू
जुळला नसता आपल्यात .

उर्जा विरून गेल्यावर
अलगद झालो असतो मोकळे

धास्तावलो नसतो
मत्सराच्या धाकाने

ठेवले नसते पहारे

निव्वळ अंगावर अंग
घासण्यापुरतेच
हवे असतो आपण
एकमेकांना

तर कदाचित

भेटलो असतो
मोकळ्या मनाने .

या कवितेतल्या प्रत्ययाने मला फार अस्वस्थ केलं आहे. मुळात मला ही एकदम 'जेंडर न्यूट्रल' कविता वाटते. ही भावना स्त्री, पुरुष कुणाचीही असू शकेल असं वाटतं. मानवी संबंधांतील जे नग्न सत्य आहे, जे तंत्रयुगातही कायम राहिलं आहे आणि अजूनही कायम राहणार आहे त्याचा स्पष्ट उल्लेख करत, त्याच एकमेव आधारे मानवी संबंध परिपुष्ट होतील अशी आशा व्यक्त करणारी ही कविता आहे. यातील विचार कदाचित पटेल, कदाचित पटणार नाही, पण ही कविता विचार ट्रिगर करण्याच्या दृष्टीने मला फार महत्त्वाची वाटते.

कविता ही फक्त कविता असते. ती इंटरनेटच्या नवीन स्पेसमधली कविता असली आणि तिचे काळ-स्थळाचे आयाम बदललेले असले तरी ती आपलं कवितापण घेऊनच उभी असते. या कवितेतून दिसलेली देहजाणीव मला आश्वासक वाटते कारण ती अतिशय प्रामाणिक आहे. 'नववधू प्रिया मी बावरते' या भा. रा. तांब्यांच्या कवितेपासून 'आपण नाही साल तुझी बायको होणार' या मेघना पेठेंच्या कवितेपर्यंतचा वैचारिक प्रवास आपल्यासमोर आहे. त्या त्या काळातली प्रामाणिक भावना मांडणं हे जर कवितेचं एक मुख्य काम असेल तर मला वाटतं फेसबुकवरची सकस कविता ते काम मनोभावे करते आहे. तिची भाषा लवचीक आहे, जाणीवा धीट आहेत आणि ती व्यक्तीकेंद्री विचारातून उमटणारा समर्थ संवाद साधायचा प्रयत्न करते आहे. आज ही कविता ज्या ‘पॅटर्न’मध्ये बोलते आहे ते इतकं प्रभावी आहे की ही कविता उद्या काय बोलणार आहे याची मला उत्सुकता आहे!         

(मेहता मराठी ग्रंथजगत, दिवाळी २०१५)
x