Sunday, May 14, 2017

स्वराज्यशास्त्र : काही मूलभूत  

राजकारण, परिवर्तनवादी विचाराची स्थिती, उजवे-डावे-मधले यांच्यातील प्रेममय संवाद आणि एकूणातील तप्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 'काही मूलभूत' म्हणून विनोबांच्या 'स्वराज्यशास्त्र'ची आठवण होते. प्रस्तुत टिपणात या पुस्तकाचा परिचय किंवा त्याची सविस्तर चर्चा नाही. काही परिच्छेद, जे मला माझ्या आकलनाच्या दृष्टीने उल्लेखनीय वाटले ते जसेच्या तसे दिले आहेत आणि त्याआधारे मीही काही मांडायचा प्रयत्न केला आहे. यात थोडा विस्कळीतपणा आला आहे, पण तरी मुद्दा पोचेल अशी मला आशा आहे. पुस्तकाच्या आरंभी विनोबांनी 'राजकीय प्रश्नाचे आजचे कृत्रिम अर्थ' आणि 'राजकीय प्रश्नाचा स्वाभाविक अर्थ' अशी दोन टिपणे लिहिली आहेत. ती अशी - 

राजकीय प्रश्नाचे आजचे कृत्रिम अर्थ - 

आजच्या घटकेला मानवसमाजात वरचा वर्ग, मधला वर्ग आणि खालचा वर्ग, असे तीन वर्ग विनाकारण करण्यात येतात. आणि ह्या तीन वर्गांनी परस्परांत कशी व्यवस्था राखावी असा राजकीय प्रश्नाचा कृत्रिम अर्थ केला जातो. हिंदू समाजात कार्यविभागानुसार वर्ण-विभाग कल्पून ह्या वर्णांनी परस्परांत व्यवस्था कशी राखावी, असा राजकीय प्रश्नाचा दुसरा एक कृत्रिम अर्थ केला जातो. तसेच जगामध्ये काही लोकांपाशी सपंत्ती गोळा झाली आहे आणि काही लोकांपाशी ती नाही; ही आजची अवस्था लक्षात घेऊन श्रीमंत आणि गरीब असे किंवा अशांसारखे दोन वर्ग कल्पून ह्या वर्गांनी परस्परांची व्यवस्था कशी राखावी, असा राजकीय प्रश्नाचा आणखी एक कृत्रिम अर्थ केला जातो. 

ह्या तिन्ही अर्थांना कृत्रिम म्हणण्याचे कारण, त्यांची उभारणी काल्पनिक किंवा अ-मूलभूत भेदावर केली आहे हे होय. 'वर, खाली आणि मधे' म्हणजे काय याची व्याख्या कल्पनेशिवाय काहीच नाही. तीन, चार किंवा अधिक वर्ण हे आम्हीच बनवलेले. तेव्हा त्यावर उभारलेली विचारसरणी ही काल्पनिकच, म्हणजे आमच्या कल्पनेची. आणि जेथे ती आहे, तेथे 'मिथ्या' या अर्थाने काल्पनिक नाही असे म्हटले तरी ती मूलभूत तर नाहीच. श्रीमंत आणि गरीब ह्या भेदाला काल्पनिक म्हणणे जड वाटले, तरी तो मूलभूत भेद नाही. म्हणजे तो कारणरूप नव्हे, तर कारण-विशेषाचे कार्य आहे. शिवाय, सूक्ष्म पाहिले तर तो भेद काल्पनिकही आहे. म्हणजे श्रीमंत हा पैशाने श्रीमंत आणि गरीब हा पैशाने गरीब असे म्हटले तर ह्याच्या उलट गरीब हा श्रमशक्तीने श्रीमंत आणि आजचा श्रीमंत म्हणवलेला श्रमशक्तीने गरीब असे म्हणता येईल. असे पाहिले म्हणजे श्रीमंत आणि गरीब याही कल्पना ठरू पाहतात. 

वरील तीन प्रकारांशिवाय, पुन्हा भाषाभेदाला आणि धर्मभेदाला धरून पारस्परिक व्यवस्थेचा प्रश्न उभा करून त्याला राजकीय रूप दिले जाते. पण हेही भेद मूलभूत नव्हेत, असे थोड्या विचाराने लक्षात येईल. 

राजकीय प्रश्नाचा स्वाभाविक अर्थ -  

काही माणसे स्वभावतःच, म्हणजे निसर्गाने, अधिक बुद्धिमान किंवा अधिक शक्तिशाली असतात आणि काही अर्थात कमी बुद्धीचे आणि कमी शक्तीचे असतात. बुद्धी आणि शक्ती ह्या दोहींचा समावेश सामर्थ्य ह्या एका शब्दात करता येईल. ज्याला आपण संपत्ती, साधन-सामग्री, दर्जा इत्यादी म्हणतो, त्या सर्व गोष्टी सामर्थ्यातूनच निर्माण होतात. म्हणून मानवात काही समर्थ आणि पुष्कळसे असमर्थ असे दोन वर्ग कल्पिता येतील. पण वर्ग ह्या नात्याने ते सिद्ध होण्यास त्यांच्यात संघटना कल्पून घ्यावी लागेल. म्हणजे सर्व समर्थ संघटनेने एकवटले तर समर्थांचा वर्ग सिद्ध होईल. अन्यथा तो वर्ग काल्पनिकच. असमर्थ एकवटले तर त्यांचा वर्ग सिद्ध होईल. पण सिद्ध होता क्षणीच तो आत्महत्या करून घेईल. म्हणजे तो असमर्थ ठरणार नाही, समर्थ होईल. कारण सामर्थ्य जसे शक्तीने आणि बुद्धीने तसे संख्येनेही निर्माण होते. उलट तो वर्ग एकवटला नाही तर वर्ग ह्या नात्याने काल्पनिकच ठरेल. 

थोडक्यात हा अर्थ निष्पन्न झाला की समाजात स्वाभाविकपणे वर्ग असा कोणताच नाही, कमीअधिक सामर्थ्याची माणसे आहेत. ह्या कमीअधिक सामर्थ्याच्या माणसांनी मिळून आपली व्यवस्था कशी राखून घ्यावी हा राजकीय प्रश्नाचा मूलभूत आणि स्वाभाविक अर्थ होतो. ह्यातून अ-मूलभूत आणि काल्पनिक अनेक प्रश्न कल्पिता येतात आणि मग पुढे सोडवावेही लागतात. 

यानंतर विनोबांनी 'विविध राज्यपद्धतींचे संभवनीय प्रकार' मांडले आहेत. प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात ही मांडणी आहे. इतर आनुषंगिक विषयांवरही विनोबा बोलले आहेत. यातील काही मुद्दे आदर्शवत वाटतील, कदाचित अव्यवहार्यही वाटतील. पण विनोबांचा हा धागा अर्थातच गांधीजींशी जुळणारा आहे. गांधीजींची ग्रामस्वराज्याची मांडणी किंवा त्यांची माणसाच्या नैतिक उन्नयनाविषयीची मांडणी वाचताना 'हे कसं होणार? हे माणसाच्या मूलभूत ऊर्मींशी फटकून होतंय का?' असं वाटतं, पण तरी एक मान्य होतं की हे 'फंडामेंटली करेक्ट' आहे. त्यांचा 'माणसाचा आदर्श' हा व्यावहारिक वास्तवापेक्षा आकर्षित करतो. गांधींचं 'फंडामेंटली करेक्ट' असणं गांधींना दुर्लक्षित न करता येण्याचं एक प्रमुख कारण आहे. गांधी-विनोबा, त्यांचा आदर्श विचार हे काहीसं व्यायामासारखं आहे. व्यायाम करायचा कंटाळा येतो, पण व्यायाम करणं नेहमीच करेक्ट असतं!

विनोबांचं वरील टिपण किंवा पुस्तकातील पुढील मांडणी वाचतानाही हे होतं. आज आपण राजकारणाचं स्वरूप पाहतो आहोत. त्यातील नैतिक ऱ्हासाविषयी बोलतो आहोत. राजकारणातील नैतिक ऱ्हास हा खरं तर फार धक्कादायक विषय असण्याचं कारण नाही. तो अशासाठी की हा ऱ्हास होणं अपरिहार्यच होतं आणि आहे. पक्षीय राजकारणाच्या 'डीएनए'मध्येच हा ऱ्हास लिहिलेला आहे. राजकारणी संधीसाधू असतात यात नवल वाटावं असं काय आहे? राजकारणात टिकून राहणं, सत्ता हातात ठेवणं यासाठी ते करावंच लागतं. लोकशाहीचं स्वरूपच मुळात 'शहाण्याला संधी' असं नसून 'बहुमताला संधी' असं आहे. व्यवस्थेसाठी एक चौकट आखावी लागते, ती लोकशाहीने आखली आहे. या चौकटीत सुधारणेला जागा कुठे आहे ते बघणं आवश्यकच आहे. पण त्याबरोबरच 'मानवी सहजीवन अधिकाधिक सुकर कसं होईल? आपल्याला जो उतरंडविहीन, परस्परावलंबी समाज अभिप्रेत आहे तो कसा घडेल? माणसाचं नैतिक उन्नयन कसं होईल' हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून जे विचार करतात त्यांनी या चौकटीचा वापरच न करता बहुमताला नावं ठेवली तर त्यातून परिवर्तन साध्य होणार नाही. किंवा 'स्वराज्यशास्त्र'मध्ये सत्ताकेंद्री राजकारणाच्या वातावरणात विनोबा, गांधी या लोकांचं म्हणणं कितपत तग धरेल? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आज मूल्यव्यवस्था देखील बदलू पाहते आहे. तेव्हा आज काही नवीन मांडणी करताना या मांडणीचा आधार घेणं योग्य आहे का हा प्रश्न पडणं रास्त आहे. या प्रश्नाचा शोध घेताना पुन्हा एकदा 'स्वराज्यशास्त्र'मधलंच एक उद्धृत द्यावंसं वाटतं - 

'जनता केव्हाही वादनिष्ठ किंवा पद्धतीनिष्ठ नसते. ती जीवननिष्ठ असते. जीवन चांगले चालले, मग वाद किंवा पद्धती कोणती का असेना, जनतेला त्याची फिकीर नसते. वाद तत्त्वज्ञानी काढतात, पद्धती व्यवहारी चालवतात आणि समाज सहकार्य करतो. पहिले दोघे अनुक्रमे वादनिष्ठ आणि पद्धतीनिष्ठ असतात. पण तेही शेवटी आपल्या मतांप्रमाणे जीवननिष्ठ असतात, म्हणूनच तसे असतात. अमुक वादाशिवाय जीवन चांगले बनणे शक्य नाही, असे तत्त्वज्ञानी विचाराने मानतो आणि म्हणून, म्हणजे आपल्या जीवननिष्ठेमुळेच तो वादनिष्ठ झालेला असतो. व्यवहारी अमुक पद्धतीशिवाय जीवन चांगले चालणे शक्य नाही असे आपल्या अनुभवावरून ठरवतो आणि म्हणून आपल्या जीवननिष्ठेमुळेच तो पद्धतीनिष्ठ बनलेला असतो. परंतु आग्रहामुळे आणि मोहामुळे कधी कधी जीवननिष्ठा आणि पद्धतीनिष्ठा लोकांची मने - तत्त्वज्ञाची, व्यवहाऱ्याची आणि इतरांचीही - काही काळापर्यंत काबीज करू शकतात.'      
विनोबांच्या या मांडणीत एक 'कायमस्वरूपी झगडा' दिसतो. आजच्या संदर्भातही हे दिसेल. आज बहुमताचा कल भाजपकडे झुकलेला असताना अनेकांना असं वाटतं की सांप्रदायिकतेचा, धार्मिक ध्रुवीकरणाचा आधार घेत मोठ्या झालेल्या पक्षाला लोकांनी निवडून कसं दिलं? लोकांना नक्की काय झालं आहे? भारताच्या बहुविध सांस्कृतिक ओळखीचं काय होणार? हे प्रश्न रास्तच आहेत. पण तें वादनिष्ठेतून आलेले आहेत. पण वस्तुस्थिती अशी की जनता काँग्रेसच्या काळातही जीवननिष्ठ होती आणि आजही आहे. उद्या भाजप किंवा काँग्रेस सोडून तिसऱ्या पक्षाचं सरकार आलं तरी जनता जीवननिष्ठच असेल. त्यामुळे आपल्याला बदल हवा असेल  तर आपलया वादनिष्ठेला जनसन्मुख कसं करायचं हे पाहावं लागेल. 'जीवननिष्ठ'ही व्हावे लागेल. वादनिष्ठेला सोडचिट्ठी देऊ नये, पण तीमुळे जीवननिष्ठा झाकोळू देऊ नये. 

विनोबादेखील गांधींसारखेच 'प्युरिस्ट' असले तरी त्यांची मनुष्यस्वभावाची समज व्यावहारिक पातळीवरची होती हे स्वराज्यशास्त्र वाचताना जाणवतं. तरीही त्यांच्या माणसाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. गांधी-विनोबांसारख्या मंडळींचं अप्रूप अशाकरता वाटतं की 'माणूस कसा असतो' हे माहीत असूनदेखील त्यांनी 'माणूस कसा असावा' याची आग्रहपूर्वक मांडणी केली. माणसाला व्यायाम घडवायचा प्रयत्न केला. त्यांची मांडणी आज कशी लागू होईल हा विचार अप्रस्तुत नाही. गांधी-विनोबांनी विचार केलेला नव्हता अशा अनेक गोष्टी आणि आव्हाने आज असतील. परंतु 'माणूस' आमूलाग्र बदललेला नाही. त्यामुळे मूलभूत मांडणी म्हणून तिकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 

ज्यांनी परिवर्तनाचा विचार केला, अगदी टोकाचेही आदर्श कल्पिले अशा गांधी-विनोबांसारख्या मंडळींबाबत एक गोष्ट जाणवते ती अशी की ते कमालीचे क्रियाशील होते. व्यक्तिगत पातळीवर कदाचित निराशेने त्यांच्या मनाला स्पर्श  केला असेलही, पण कार्यकर्ता, विचारवंत म्हणून ते सकारात्मक राहिले. आज हे ठळकपणे जाणवतं. आणि म्हणूनच हे नोंदवावंसं वाटतं की परिवर्तनाचा विचार हा सशक्त विचार आहे. तो वादनिष्ठ आहे, क्रिटिकल आहे.  म्हणूनच त्याने स्वतःला बंदिस्त करून घेऊ नये. प्रतिक्रिया देत राहणं ही स्थितीशीलता आहे. जर हा विचार चिकित्सक विचार असेल तर त्याने स्वतःचीही चिकित्सा केलीच पाहिजे.    

स्वराज्यशास्त्रमधील व्यवस्थेच्या विविध पद्धती असोत, गांधींची ग्रामस्वराज्याची संकल्पना असो, आंबेडकरांची जातीविहीन समाजाची संकल्पना असो किंवा इतरही (आदर्शवत वाटणाऱ्या) संकल्पना असोत - या संकल्पनांच्या मुळाशी परिवर्तनाची आच आहे. त्यामुळे या संकल्पनांना प्रयोगशाळेत स्थान देऊन पुढे काम करणं गरजेचं आहे. संपूर्ण समाजाकडे 'लॅब' म्हणून बघता येत नाही. ते गडबडीचं ठरेल. त्यामुळे वैचारिक प्रयोगशाळा, तिथे तयार झालेलं रसायन हा एक भाग आणि त्या रसायनाच्या 'उपयोजित आवृत्त्या' हा दुसरा भाग अशा प्रकारे काम करणं इष्ट होईल. 

- १४ मे २०१७, फेसबुक पोस्ट 


No comments:

Post a Comment