५ एप्रिलच्या रात्री झालेल्या दीपप्रज्वलनाच्या कार्यक्रमानंतर त्याचे पडसाद उमटलेच. 'फेसबुक वृत्तांकना'त लोकांनी फटाके उडवल्याचं वाचनात आलं. एक-दोन पोस्ट्समध्ये सोसायटीनेच दिवे घालवले, दिवे चालू असणाऱ्या घरांमधील लोकांना इतरांनी दिवे बंद करायला सांगितले असेही उल्लेख होते. एका भाजपसमर्थक मित्राने असं लिहिलं होतं की 'याला मूर्खपणा म्हणा हवं तर, पण हेच मूर्ख नरेंद्र मोदींना पुढच्या निवडणुकीत निवडून देतील'. हे विधान गंमतीत केलं गेलं होतं, पण या विधानावरून असं म्हणता येऊ शकेल की दीपप्रज्वलन हा कळत-नकळतपणे राजकीय कार्यक्रम झाला असं त्याला सुचवायचं होतं. अर्थात मोदींच्या प्रतीकात्मक कार्यक्रमांबाबत अशा स्वरूपाचं मत भाजप विरोधकांनीही व्यक्त केल्याचं दिसतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असं राजकारण होण्याला या मित्राचा फारसा आक्षेप आहे असं दिसलं नाही. गेल्या वर्षी बालाकोट हल्ल्यानंतर नरेंद्र मोदींनी एका निवडणूक सभेत शहीद जवानांच्या नावाने मतं मागितल्यानंतर एका मैत्रिणीने त्याचं समर्थन केल्याने मी हतबुद्ध झालो होतो ते आठवलं. ('सोच' या यू ट्यूब चॅनलने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवे लावण्याच्या आवाहनाच्या अनुषंगाने एक फार चांगला विश्लेषणात्मक व्हिडीओ केला आहे. तो जरूर पाहावा. लिंक - https://www.youtube.com/watch?v=MFyHXLBsoac&t=3s)
या संदर्भाने शंतनू पांडे यांनी त्यांचा एक जुना अनुभव शेअर केला आहे तो नोंदवावासा वाटतो. नवरात्रीच्या दिवसात ते एकदा अहमदाबादला असताना सरदार प्रकल्पाचा निकाल गुजरातच्या बाजूने लागल्यावर लोकांनी रस्त्यावर फटाके उडवले, मेधा पाटकरांना शिवीगाळ केली, त्यांचे पुतळे जाळले असं त्यांनी नोंदवलं आहे. वातावरणात उन्माद होता. लोक उत्स्फूर्तपणे गरबाही खेळले. साधारण पहाटे तीनपर्यंत हे चाललं. पोलीस आले नाहीत. नरेंद्र मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मेधा पाटकरांचे पुतळे जाळण्यात शासनाचा सहभाग अर्थातच नव्हता, पण आपल्या विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी तशी जमीन तयार करून द्यायचं काम नरेंद्र मोदी ज्या विचारधारेतून घडले ती विचारधारा आपल्या प्रचार यंत्रणेद्वारे करतच असते. एकूणच सामाजिक परिस्थितीतील न्यूआन्सेस - बारकावे - पुढे न आणता लोकांच्या मनातील स्वतःचं स्थान बळकट करण्यात नरेंद्र मोदींना सातत्याने जे यश आलं आहे त्याचा बराचसा वाटा या विचारधारेचा आहे. उलटीकडे असं होतं की न्यूआन्सेस लक्षात आणून देणाऱ्यांना विरोध होतो कारण ते एकूणातच 'नकारात्मक बोलणारे', कधी विकासाचे तर कधी संस्कृतीचे विरोधक असतात. मेधा पाटकरांना शिवीगाळ करणाऱ्यांना तसं करण्यात चूक वाटत नाही कारण नर्मदा बचाओ आंदोलन आपल्या विरोधात आहे याची त्यांना खात्री असते. आंदोलनाचा इतिहास त्यांना माहीत नसतो. 'पर्यायी विकासाचं मॉडेल', त्यासंबंधीची चर्चा त्यांच्यापर्यंत पोचलेली नसते. पोचली तरी त्यावरून त्यांच्या आकलनात काही बदल होईल अशीही शक्यता नसते. कारण ते एका व्यवस्थेने घडवलेले, त्या व्यवस्थेत स्वतःच्या जगण्याला आकार देण्यासाठी धडपडणारे सर्वसामान्य नागरिक असतात. 'हे पर्यावरणवादी लोक बघा स्वतः विमानातूनसुद्धा हिंडतील आणि धरणाला मात्र विरोध करतील' अशी बायनरी मांडणी त्यांना आकर्षित करते. बायनरी मांडणीत सर्व बारकावे नष्ट करून 'हा आपला शत्रू आहे' हे ठसवायची ताकद असते. हे अत्यंत घातक आहे आणि संघ/भाजप हे सातत्याने करत आले आहेत.
आज हे बरेचदा म्हटलं जातं की सगळी चर्चा मोदीभक्ती आणि मोदीद्वेष या बायनरीमध्ये अडकली आहे. त्याचा अनेक सुजाण लोकांना त्रासही होतो. या विधानाचे लेयर्स उलगडले जायला हवेत असं मला वाटतं. एक म्हणजे ज्यांना असं वाटतं त्यांनी नरेंद्र मोदींची मांडणीही बघावी. उदा. नरेंद्र मोदी नेहरूंबाबत घेतात ती भूमिका पूर्णपणे बायनरी असते. त्यांची इतिहास, भारतीय स्वातंत्र्यलढा, फाळणी याबाबतची भूमिकाही पूर्णपणे बायनरी असते. यावर प्रतिक्रिया उमटल्या की त्यांना मात्र 'मोदीद्वेष' या कोटीत बसवलं जाताना दिसतं. म्हणजे मूळ मांडणी बायनरी आहे हे लक्षात न घेता प्रतिक्रिया मात्र बायनरी ठरतात! मला असं दिसतं की 'नरेंद्र मोदी' या सामाजिक-राजकीय घटिताचा पुरेसा अभ्यास नसल्याने हे होत असावं.
याचा दुसरा लेयर असा की मोदींच्या राजकारणाची चिकित्सा करताना 'चिकित्सा' आणि 'द्वेष' यातला फरक विरळ होत गेला आहे हेही खरं आहे. हा तसा 'स्लिपरी रोड' आहे; पण काही बाबतीत हे अगदीच स्पष्ट दिसतं. मला तपशील नीट आठवत नाही, पण एक नक्की आठवतं की मागे एकदा नरेंद्र मोदी हिंदीत बोलले त्यावरून काहीतरी गदारोळ झाला होता. आता हे मूर्खपणाचं होतं. उलट इंग्लिशपेक्षा भारतीय भाषेतून बोलणं चांगलंच आहे. कुठली भाषा वापरली हा टीकेचा मुद्दा कसा काय होऊ शकतो? मोदींना विरोध करताना अशा प्रकारे ताळतंत्र सुटण्याचे प्रकार झालेले आहेत. आता यावर कुणी असं म्हणेल की मोदींनी ताळतंत्र सोडलेलं चालतं (उदा. त्यांचा डिस्लेक्सियाबाबतचा रिमार्क, इतरही बरीच उदाहरणं देता येतील), मग विरोध करणाऱ्यांनी सोडलं तर बिघडलं कुठे? हा प्रश्न ठीक आहे; पण याचा संबंध 'पॉवर'शी आहे हे लक्षात घ्यायला हवं. तुमच्याकडे जेव्हा पॉवर असते तेव्हा तुमच्या बाबतीतले मापदंड समाजाकडूनच बदलले जातात. मोदींच्या चुका पाठीशी घालायला जर बहुसंख्य लोक तयार असतील; किंबहुना त्या चुका आहेत असंच जर त्यांना वाटत नसेल तर ही जाणीव या बहुसंख्य लोकांना होईपर्यंत हे चित्र बदलणार नाही. आणि मोदींवर टीका करून ही जाणीव होतेय, हे चित्र बदलतंय असं फारसं दिसत नाही.
होतं असं की संघ-भाजप, हिंदुत्ववाद, नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका केली तर अनेक तटस्थ लोकांना ते नकोसं वाटू लागतंआणि काही समर्थक अर्थातच चिडतात. 'चिडणं' हा एक मानसिक-भावनिक प्रतिसाद आहे आणि तो समजून घ्यायला पाहिजे. आपल्या धारणांवर टीका झाली की चिडणं हे ह्यूमन/इरॅशनल लेव्हलला वर्क होतं. वैचारिक लेव्हलला नाही. चिडणं ही 'इंस्टिंक्टिव्ह प्रतिक्रिया' आहे. इथे धारणा चुकीच्या की बरोबर हा मुद्दा महत्त्वाचा नाही; 'त्या आहेत' हा मुद्दा महत्त्वाचा आहे. माणूस ही अतिशय 'व्हल्नरेबल' प्रजाती आहे. ती जितकी हुशार आहे तितकीच सेन्सिटिव्ह आहे. माणूस रॅशनल असल्याचा क्लेम करतो, पण तो अनेक बाबतीत पूर्णपणे इरॅशनल असतो. हे जसं मोदीसमर्थकांना लागू होतं तसं इतरही नेत्यांच्या समर्थकांना होतं. आता होतं असं की सातत्याने मोदींवर टीका झाली की समर्थक म्हणतात, आता तर काय व्हायचं ते होऊ दे. आपला सपोर्ट मोदींनाच! आणि ते दुप्पट उत्साहाने कामाला लागतात. हे असं होतं कारण वर म्हटल्याप्रमाणे हे 'ह्यूमन/इरॅशनल लेव्हल'ला वर्क होतं. वैचारिक लेव्हलला काही गोष्टी पटल्या तरी ह्यूमन/इरॅशनल लेव्हलचे निर्णय वेगळे असतात.
मुळात नरेंद्र मोदींचं राजकारणच ह्यूमन लेव्हलवरचं आहे. त्याचा मुकाबला वैचारिक लेव्हलवरून कसा करणार?हिंदुत्व, विकास, राष्ट्रवाद, माध्यमांचा प्रभावी वापर, एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फौज, गोष्टींचं सुलभीकरण ही सर्व भाजपच्या/मोदींच्या राजकारणाची अंगं आहेत. त्यामुळे प्रश्न हा की आपल्या राजकारणाचं अंग काय असावं? टीका हे ते अंग असेल तर ते काम करत नाही हे दिसलं आहे. मग आपला पुढचा पर्याय काय आहे? 'पॉलिटिक्स इज द आर्ट ऑफ पॉसिबल' असं जे म्हटलं जातं त्यात मोठा अर्थ दडलेला आहे. 'लोक वेडे झालेत', 'मोदींनी त्यांना हिप्नोटाइज केलंय' असं म्हणून प्रश्न सुटत नाही. तुम्ही त्यातून फक्त वेगळेच पडत जाता. 'वेगळं पडणं' स्वाभाविक आहे पण ते सोल्यूशन आहे का हा प्रश्न आहे. शिवाय त्यातून तुम्हांला हताशा येऊ शकते. त्यामुळे 'तुम्ही काय करणार' हा प्रश्न आहे आणि त्यासाठी आपण राजकीय व्हायची गरज आहे असं मला वाटतं. राजकीय होणं याचा अर्थ पक्षीय राजकारणात पडणं असाच फक्त नसतो. पक्षीय राजकारण हा एक प्रकार झाला. राजकीय होणं याचा अर्थ आपलं धोरण नीट ठरवणं आणि अंमलात आणणं. बेस्ट पॉसिबल क्रमांक एक, बेस्ट पॉसिबल क्रमांक दोन असा क्रम लावून घेणं. आजवर जे झालं ते झालं, पण आता सततची टीका टाळून, प्रतिक्रिया देत न बसताही आपण लोकांना विचार करायला उद्युक्त करू शकू का यावर विचार होण्याची गरज आहे. सरकारला प्रश्न विचारणं, असं करणं चुकीचं नाही हे लोकांना पटवून देण्याबरोबरच आम्ही अमुक अमुक बाबतीत सरकारच्याबरोबर आहोत हा संदेशही जाणं महत्त्वाचं आहे. प्रतीकात्मक कर्मकांडाबाबत मतभेद असले तर तिथे त्याक्षणी गप्प राहून नेमकेपणानं त्यातील खुपणाऱ्या बाजूंवर बोलणं आवश्यक आहे. (माझ्यासारख्यांनी विनोदाची उबळ टाळणं गरजेचं आहे!) लोक प्रभावाखाली असू शकतात, चुकीचंच वागू शकतात, पण लोक मुळातून वाईटच असतात असं आपण मानून चाललो तर अवघड आहे. अशाने मग तुमचं मोटिव्हेशनच संपून जातं.
यात अर्थातच विविध मुद्दे गुंतलेले आहेत. त्यावर बोलण्यासाठी व निश्चित काही ठरवण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या, डावे-समाजवादी-गांधीवादी-आंबेडकरवादी-स्त्रीवादी अशा सर्वच कार्यकर्त्या-विचारवंतांनी एकत्र येणं फार आवश्यक आहे. पॉलिटिक्स हे जसं 'आर्ट ऑफ पॉसिबल' आहे तसंच ते 'आर्ट ऑफ केपेबल'ही आहे. एकत्र येणं ही आपल्या केपेबलिटीची पहिली कसोटी ठरावी!
- ६ एप्रिल २०२०, फेसबुक पोस्ट
No comments:
Post a Comment