Sunday, November 10, 2019

उदारमतवादाचा प्रवास आणि हिंदुत्ववादाचा थांबा

वसंत पळशीकर यांचा 'गोध्रा'या शीर्षकाचा एक लेख 'नवभारत'च्या मे २००२ च्या अंकात प्रकाशित झाला होता. हा लेख म्हणजे मिलिंद ओक यांच्या 'गोध्रा' या पुस्तिकेवरील टिपण आहे. भारतीय विचार साधना प्रकाशनाने ही पुस्तिका एप्रिल २००२ मध्ये [प्रकाशित केली होती. भारतीय विचार साधना हे प्रकाशनगृह हिंदुत्वनिष्ठ विचारांच्या प्रसारार्थ साहित्य प्रकाशित करते हे बहुतेक वाचकांना माहीत असेल. किशोर बेडकिहाळ यांनी संपादित केलेल्या 'जिहाद, गुलाल आणि सारीपाट' या पुस्तकात हा लेख आहे. हिंदू-मुस्लिम जातीयवादावरील (जमातवादावरील?) वसंत पळशीकरांच्या लेखांचं संकलन म्हणजे हे पुस्तक. हमीद दलवाई, नरहर कुरुंदकर, अ. भि. शहा यांच्या मुस्लिम जातीयवादाविषयीच्या भूमिकेवर टिप्पणी करणारे लेख या पुस्तकाच्या पहिल्या विभागात आहेत. शिवाय मुस्लिम मानसिकता, धर्मनिरपेक्षता/सांप्रादायिकता, भारत-पाकिस्तान संबंध आणि दंगली अशा पुढील चार विभागात इतर लेख आहेत. 

'गोध्रा' या लेखात पळशीकर लिहितात की एका अंगाने पाहिल्यास विश्व हिंदू परिषद, तबलीगी जमात व तत्सम अन्य धर्मीय संघटनांच्या धर्मकेंद्रित कार्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण सामान्य अनुभव असा की 'विशुद्ध धर्मा'चे पालन जसे वाढते तसे पालन करणाऱ्यांच्या ठायी कट्टरता, इतरांविषयी दुरावा, असहिष्णुता वाढते. याचे एक कारण हे की 'विशुद्ध धर्म' हा रेखीवपणे, धारदारपणे अन्य धर्मीयांपासून स्वतःचे वेगळेपण व श्रेष्ठत्व अधोरेखित करण्यावर भर देतो. त्याची मांडणी ही शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य वाढवणारी असते आणि एका धर्मपीठाची मक्तेदारी सत्ता प्रस्थापित करू पाहणारी असते. पळशीकर पुढे लिहितात की तबलीगी जमात, मदरसे किंवा विश्व हिंदू परिषद यांच्या संदर्भात मिलिंद ओक यांची दृष्टी सम नाही ही खरी समस्या आहे. तबलीगी जमात व अन्य मुस्लिम संघटनांचे कार्य त्यांच्या मनात तीव्र प्रतिक्रिया उत्पन्न करते, पण विश्व हिंदू परिषद व अन्य हिंदू संघटना यांचे कार्य मात्र तीव्र स्वागतशील प्रतिसाद उत्पन्न करते. 

आपापल्या धर्माचे उन्नत व विशुद्ध रूप सिद्ध करण्याची बौद्धिक वा व्यावहारिक कृती योग्य दिशेने व वळणाने होत आहे याची खूणगाठ कोणती हा कळीचा प्रश्न आहे असं पळशीकर पुढे म्हणतात आणि ते महत्त्वाचं आहे.

गेल्या काही वर्षातील मॉब लिंचिंगच्या घटना, गोरक्षकांचे हल्ले, कठुआ आणि उन्नाव येथील बलात्कारांच्या भीषण घटनांमधील हिंदुत्वाच्या धाग्याच्या पार्श्वभूमीवर पळशीकरांचे वरील मुद्दे आठवतात. या घटनांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. कठुआ घटनेनंतर मी स्वतःदेखील उद्वेगाने प्रतिक्रिया लिहिली. नंतर हिंदुत्वनिष्ठ मंडळींकडूनही प्रतिक्रिया आल्या. त्यात प्रामुख्याने निवडक निषेध, या घटनांचा संबंध हिंदू धर्माशी जोडणे याविरोधी प्रतिक्रिया होत्या. शब्दांची, विशेषतः तीव्र शब्दांची अडचण अशी असते की त्यांना उत्तर म्हणून तीव्रतर शब्द उमटू शकतात. हे घटनांनाही लागू होतं. कठुआसारख्या घटनेत जे झालं ते इतकं वाईट होतं की त्यावरील प्रतिक्रिया तीव्र असणं समजण्याजोगं होतं. बहुधा बऱ्याच हिंदुत्वनिष्ठ मंडळींना ते समजून घेता आलं नसावं. गेल्या काही वर्षांत आपलं परस्पर सौहार्द चांगल्यापैकी बिघडलेलं आहे. त्यात प्रतिक्रियांच्या अशा टकरीमुळे भर पडत असते. 

याबाबत बोलावंसं वाटतं याचं कारण हिंदुत्वनिष्ठ आणि विरोधक यांच्यातील मारामारी आजची नसली तरी आज ती गंभीर वळणावर आहे असं दिसतं. त्यात समाजमाध्यमांचा वाटा अर्थातच मोठा आहे. दृष्टिकोनात मूलभूतच फरक असल्याने मतभेद राहणार हे उघड आहे. प्राचीन भारतातील जडवादी आणि चैतन्यवादी यांच्यातील संघर्षाचंच हे विस्तारित, 'मल्टीपोलर' रूप आहे असं म्हणता येईल. पण या वादात मुळातील वादविषयाचा धागा बाजूला पडला आहे की काय अशीही शंका कधीकधी येते. मुळातील जे वादविषय आहेत त्यात दृष्टिकोनातील फरकाबाबत फारसं काही करता येणार नाही, पण हा फरक बाजूला ठेवून प्रत्यक्ष जगण्यात आपण काही विधायक करू शकतो का असा विचार करायला हवा आहे. दोन-एक वर्षांपूर्वी भाजप समर्थक आणि समाजमाध्यमांवर अतिशय सक्रीयपणे भाजपचा अजेंडा पुढे नेणाऱ्या शेफाली वैद्य यांच्याशी एक सविस्तर 'व्हॉट्सअॅप चर्चा' झाली होती. चर्चा चांगली झाली होती. त्यात मी त्यांना एके ठिकाणी असं म्हटलं होतं की मी तुमच्या बाजूला येणार नाही हे तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही माझ्या बाजूला येणार नाही हे मला माहीत आहे. त्यामुळे प्रश्न एवढाच उरतो की आपण 'शांततामय सहअस्तित्व' कसं टिकवायचं ?       
   
मला असं दिसतं की जर काही गोष्टी खुलेपणाने स्वीकारल्या गेल्या तर हे होऊ शकेल. वरील चर्चेमध्ये शेफाली वैद्य मला असं म्हणाल्या होत्या की तुम्ही उदारमतवादी वाटत नाही कारण तुम्ही बऱ्याच समजूतदारपणे बोलताय. आता इथे आपण थोडं खोलात जाऊ. २०१४ पासून राजकीय आघाडीवर जे सुरू आहे ते आपण पाहतोच आहोत. त्याबरोबर सामाजिक ध्रुवीकरण झालं आहे, समर्थक-विरोधक कडाक्याने भांडतायत. या गदारोळात मीही आहे. माझंही एक मत आहे. भाजप का नको याविषयी माझं काहीएक म्हणणं आहे आणि ते मी मांडलेलं आहे. पण तरी सत्तेत असणाऱ्या पक्षाचं मूल्यमापन केवळ माझ्याच निकषांवर करता येत नाही हे मला मान्य आहे. तिथे 'होलिस्टिक' विचार करावा लागतो. मला ज्या पक्षाची वैचारिक बैठक मान्य नाही त्या पक्षाने जर काही चांगली कामं केली, धोरणात्मक दृष्ट्या चांगले निर्णय घेतले  तर मला 'फक्त त्या गोष्टींचं स्वागत' करता यायला हवं. मला आणि आपल्या सगळ्यांना आपल्यातील मतभेदांच्या वर जाऊन एकमेकांतील गुणांचं (ते गुण तत्कालिक प्रभाव टाकणारे असले तरी) कौतुक करता यायला हवं. मी मागे एकदा लिहिलं होतं ते पुन्हा लिहितो. भाजपच्या बाबतीत अडचण अशी आहे की जे निगेटिव्ह आहे ते इतकं अस्वस्थ करणारं आहे की पॉझिटिव्हकडे बघावंसंही वाटत नाही. पण तरी उद्या समजा माझ्या दृष्टीने भाजप हा पक्ष 'सुधारला', माझ्या कडक निकषांवर तो खरा उतरला तर मी काय करेन? मग मला त्याला समर्थन द्यावं लागेल. पण राजकीय पक्ष वगैरे दूरची गोष्ट झाली. मला असं वाटतं की आज आपण एकमेकांमध्येच ही 'सुधारण्याची स्पेस' नाकारतो आहोत. तसा प्रयत्न आपण करत नाही आहोत. शेफाली वैद्य जर असं म्हणत असतील की तुम्ही उदारमतवादी वाटत नाही कारण तुम्ही समजूतदारपणे बोलताय तर उदारमतवादी लोकांबद्दल आज इतरांना काय वाटतं, जर ते नकारात्मक नसेल तर का हा विचार मी सुरू करेन. इथे पुन्हा शेफाली वैद्यांशी इतर बाबतीत सहमत होण्याचा प्रश्नच नाही. जिथे विरोध आहे तिथे विरोध आहेच. शेफाली वैद्य यांच्या व्यक्तिमत्वात समजूतदारपणा आहे/नाही हाही एक मुद्दा असू शकतो. त्यांची फेसबुक व ट्विटरवरील अभिव्यक्ती कधीकधी टोकाची विद्वेषी असते. पण त्यांच्या लिबरल्सबद्दलच्या अनुभवांममुळे त्यांचं जे रीडिंग आहे ते तपासून बघायला काय हरकत आहे? माझ्यात एखादी सुधारणा होऊ शकत असेल तर ती सुधारणा कुणी सुचवली याला मी महत्त्व देऊ नये. 'मॅटर ऑफ फॅक्ट' म्हणून मला ते स्वीकारता यायला हवं. 

हिंदुत्ववाद आणि उदारमतवाद या संघर्षात आणि इतरही टकरींमुळे 'पुरोगामी' शब्दाला नकारात्मक छटा आली आहे. वास्तविक वैचारिक कल म्हणून हिंदुत्ववादी, समाजवादी, कम्युनिस्ट अशा विभागण्या मान्य केल्या तरी हे काही 'वॉटर टाइट कंपार्टमेंट्स' नाहीत. धार्मिक विचारप्रणालीला आपल्या विचारविश्वात स्वतःच्या आत्मिक स्वास्थ्यासाठी स्थान देणारा पण धार्मिक आयडेंटिटी धारदार होऊ न देणारा मनुष्य पुरोगामी असू शकतो असं मला वाटतं. पळशीकर म्हणतात तसं 'विशुद्ध धर्मपालन' करताना कट्टरता, असहिष्णुता वाढते. त्यामुळे धर्मपालनाला जगण्यात काहीएक स्थान असणाऱ्यांची जबाबदारी वाढते. आज समंजस हिंदुत्व कुणीच बाळगत नाही का? मला वाटतं असे अनेक लोक आहेत, पण खरं सांगायचं तर मला हा प्रश्न गोंधळात टाकतो कारण माझ्या आकलनानुसार हिंदुत्व ही धारणा कट्टर मुस्लिम धार्मिकतेला उत्तर म्हणून निर्माण झाली आणि पुढे तिची वाटचाल कट्टर मुस्लिम धार्मिकतेच्या वास्तव/अस्थानी भीतीपोटी झाली आहे. (स्लॅश जाणीवपूर्वक वापरला आहे. हा मुद्दा चर्चेला खुला आहे.) ती 'भारतीयत्वा'कडे, 'आधुनिकते'कडे न जाता हिंदुत्वाभोवतीच रेंगाळत राहिली आहे. त्यामुळे प्रतिक्रियारहित अशी निव्वळ हिंदुत्व अशी काही संकल्पना आहे की नाही हे बहुधा तपासावं लागेल. जे असमंजस, विखारी हिंदुत्व आहे त्याचं दर्शन होत असतं. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया येतात. यात गडबड अशी होते की या प्रतिक्रियांमुळे समंजस हिंदुत्ववादी दुखावले जाऊ शकतात. पण अशा प्रतिक्रिया, असा उद्वेग येणार हे त्यांनी समजून घ्यायला हवं. हिंदू समाज हा एका अर्थाने सहिष्णू आहे म्हणूनच अशा प्रतिकिया येऊ शकतात. हिंदू समाज जातीच्या बाबतीत अतिशय असहिष्णू असला आणि आज विखारी हिंदुत्व प्रभावी होताना दिसत असलं तरी हा समाज ढोबळ मानाने समावेशक वृत्तीचा आहे. यातली एक व्यावहारिक बाजू अशी आहे की 'हिंदू' म्हणून एकच एक चेहरा नसल्याने या समाजाला समावेशक असण्यावाचून पर्यायही नाही. याबाबत सुरेश द्वादशीवारांनी दिलेली उपमा चपखल आहे. त्यांनी एका लेखात म्हटलं होतं की किराणा-भुसारच्या दुकानात किराणा आणि भुसार या नावाच्या वस्तू अस्तित्वात नसतात. अस्तित्वात असतं ते मीठ, मोहरी, साखर, रवा इ. हिंदू धर्म असाच आहे. इथे ब्राह्मण, मराठा, धनगर, माळी आणि इतर अनेक जाती असतात. फक्त 'हिंदू' असा कुणी नसतो. हिंदुत्वनिष्ठ मंडळींचा नेमका हाच आग्रह आहे की आपण सगळे 'हिंदू' आहोत म्हणून आपण एकत्र यायला हवं. 'हिंदू आयडेंटिटी' हा त्यांच्या प्रेमाचा विषय आहे. यात त्यांना संमिश्र यश मिळालं आहे. एक मोठा समुदाय या आयडेंटिटीच्या छत्राखाली आला आहे हे खरं आहे. (त्यातूनच विखारही उत्पन्न झाला आहे हे पुन्हा नोंदवू.) पण दुसरा मोठा समुदाय या छत्राच्या बाहेर आहे. शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदुत्ववाद्यांनी आपलंसं करण्यामागे संख्याबळ वाढवणे हा स्पष्ट हेतू आहेच. अन्यथा हिंदू धर्माचे कठोर टीकाकार असलेले, हिंदू म्हणून मी मरणार नाही असं म्हणणारे आंबेडकर स्वीकारण्यामागची संगती लावता येत नाही. 

एकीकडे टोकदार स्वरूपाचा हिंदुत्ववाद प्रबळ होत असताना दुसरीकडे बहुसंख्य 'हिंदू मानस' अजूनही 'हिंदू असण्या'प्रती हळवं आहे आणि त्यांना हिंदू धर्माची चिकित्सा नको आहे किंवा मुस्लिम धर्माची चिकित्सा झाली तरच हिंदू धर्माची चिकित्सा मान्य आहे असं दिसतं. त्याचा एक साइड इफेक्ट म्हणजे ज्या घटनांचा संबंध अतिरेकी हिंदुत्ववादाशी पोचतो त्याबद्दलही कुणी काही बोलू नये अशी अपेक्षा तयार झाल्यासारखी दिसते.     
  
मला असं वाटतं की आज झुंडीची मानसिकता ज्याप्रकारे वाढते आहे ती लक्षात घेता आपल्या धर्माविषयी सॉफ्ट कॉर्नर असणारी जी धार्मिक मानसिकता आहे (हिंदू आणि मुस्लिम दोन्ही) तिकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. कारण जी मानसिकता आज 'सॉफ्ट' आहे ती उद्या 'हार्ड' होतेच कारण या मानसिकतेचा पायाच मुळात 'रॅशनल' नाही आहे. धार्मिक दुखावलेपण हे तीव्र स्वरूपाचं असतं आणि तिथे प्रतिवाद केला तरी तो स्वीकारला जात नाही. एका धार्मिक कट्टरतेची चिकित्सा दुसऱ्या धार्मिक कट्टरतेच्या 'रेफरन्स'नेच झाली पाहिजे यात 'लॉजिकल फॅलसी' आहे - म्हणजे ते तर्कदृष्ट्या योग्य नाही. पण भारतीय संदर्भात त्याला वेगळा आयाम आहे हे खरं. कारण कट्टर हिंदुत्ववाद हा कट्टर मुस्लिम धार्मिकतेची प्रतिक्रिया म्हणून उभा राहिला आणि बळकट झाला असं म्हटलं जातं. याबाबत एक विचार करायला हरकत नाही. समजा भारतावर मुस्लिम शासकांनी राज्य केलं नसतं आणि पुढे मुस्लिम मूलतत्त्ववादाची झळ भारताला पोचलीच नसती तर हिंदू धार्मिकता कट्टर न होता जातीय कट्टरताच फक्त उरली असती असं म्हणता येईल का? 'जर-तर' च्या प्रश्नांना फारसा अर्थ नसतो हे खरं, पण हिंदू धार्मिकतेच्या स्वरूपाचा विचार करताना हा प्रश्न मनात डोकावतो आणि तो तितकाही अप्रस्तुत वाटत नाही. आणि गंमत म्हणजे आज धार्मिक कट्टरता जशी आहे तशीच जातीयही आहेच. धार्मिक आहे म्हणून सगळे एकत्र एका झेंड्याखाली आहेत असं झालेलं नाही. याला धार्मिक पुनुरुज्जीवनाच्या प्रयत्नांना आलेलं अपयश म्हणायचं, मर्यादित यश म्हणायचं की याची अन्य प्रकारे चिकित्सा करायची हाही एक प्रश्न आहेच. सध्या तो नोंदवून पुढे जाऊ. 

एक गोष्ट स्पष्ट आहे की धर्माची प्रस्तुतता मान्य केली तरी धर्म बहुसंख्य माणसांना हळवा आणि म्हणून कट्टर बनवत असल्याने धर्माच्या कक्षेच्या बाहेर राहून जे विचार करू शकतात त्यांच्यावर जास्त जबाबदारी येऊन पडते. पुढे जाण्याआधी एक किस्सा सांगतो. 'साइनफेल्ड' ही एक गाजलेली अमेरिकन मालिका. 'फ्रेंड्स'च्या आधीची. यातील एका भागात एका स्री व्यक्तीरेखेच्या तोंडी असा संवाद आहे की तिचं आणि गांधींचं पॅशनेट प्रेमप्रकरण होतं. 'गांधी त्यांचं टक्कल असलेलं डोकं तेलात बुडवून माझ्या शरीरावर फिरवत असत' असं ती म्हणते. (मूळ इंग्लिशमध्ये ऐकायला हे अधिक गंमतीदार वाटतं). आता हे बघत असताना मी हसत होतो. याचं कारण काय? एक म्हणजे मी लिबरल आहे, दुसरं म्हणजे विनोदी म्हणूनही, त्या विशिष्ट संदर्भात मला ते मान्य होतं. पण हा किंवा असा विनोद एखाद्या कट्टर हिंदुत्ववाद्याने केला असता तर मला तो चालला असता का? याचं उत्तर असं की विनोद जर खरंच दर्जेदार (आता यात सापेक्षता आहे, पण त्याला इलाज नाही!) असेल तर आवडेल. नसता तर राग आला असता किंवा तिकडे दुर्लक्ष केलं असतं किंवा स्वतंत्रपणे त्याचा उल्लेख लेखात वगैरे केला असता. मी जरी विनोद एंजॉय केला तरी तो 'निखळ विनोद' आहे की 'राजकीय स्टेटमेंट' आहे हे मला समजलं असतं. आता आपण दुसऱ्या बाजूला जाऊ. मी जर कट्टर हिंदू धार्मिकतेबाबत विनोदाने काही लिहिलं तर एखादा हिंदुत्ववादी ते विनोदाने घेऊ शकत नाही कारण त्याला त्यात निखळ विनोद दिसत नाही. त्याला त्यात राजकीय कोन दिसतो कारण विनोदाच्या मांडणीकडे तो त्या कोनातून बघतो. (आमच्या एका बऱ्यापैकी हिंदुत्ववादी काकांनी केलेला एक विनोद आठवला. कशावरून तरी तलाकविषयी बोलणं सुरू होतं. माझी आई उर्दू माध्यमाच्या शाळेत शिक्षिका होती. तिथे बऱ्याच मुस्लिम शिक्षिका होत्या. मी सहज म्हटलं की मला आठवत नाही कधी तलाक वगैरे झाल्याचं. त्यावर काका म्हणाले - नोकरी करणाऱ्या बायकोला कोण तलाक देईल? मी काकांना एक हिंदुत्ववादी टाळी दिली!)  

हा एक तिढा आहे आणि विशिष्ट संदर्भात आपण निव्वळ व्यक्ती म्हणून राहू शकत नाही हे आपल्याला मान्य करावं लागेलच. पण याच्या पुढे जाऊन मला हे म्हणायचं आहे की संघटित धर्माच्या कक्षेबाहेर असणाऱ्या माझ्यासारख्याकडे जास्त जबाबदारी असली तरी जे कक्षेच्या आत आहेत त्यांनीही परिघाकडे थोडा प्रवास करायला हरकत नाही. मुळात एक तर गांधी, फाळणी, काश्मीर, हिंदू-मुस्लिम संघर्ष याबाबत पुष्कळ गैरसमज असतात. राजकीय स्थित्यंतराच्या काळात जे घडतं त्याचं सोपं आणि सोयीस्कर आकलन करून दिलं जातं. त्यामुळे हिंदुत्ववादाच्या स्वरूपाविषयी काही बोललं तर त्याचा संबंध काश्मीर, फाळणी, मुस्लिम तुष्टीकरण याच्याशी न जोडता 'हे आपल्याच सामाजिक सुधारणेसाठी उपयोगी असू शकेल' असा विचार तरी किमान करून पाहावा.  

आज जे अस्वस्थ करणारं चित्र दिसतं त्या पार्श्वभूमीवर मला दोन-तीन गोष्टी दिसतात - 

  • एक म्हणजे उदारमतवादी लोकांनी धार्मिक हळवेपणाची 'ग्रॅव्हिटी' लक्षात घेऊन समंजस हिंदुत्ववाद्यांशी संवाद सुरू ठेवणं - जे अगदी कट्टर आहेत त्यांनाही तिखट उत्तर न देता त्यांना धार्मिक मूलतत्त्ववादाचं गांभीर्य समजावून सांगत राहणं (हे अवघड असू शकेल, पण मला वाटतं हाच एक मार्ग आहे. कारण कट्टरता ही मुळातच एकारलेली, नाजूक आणि म्हणूनच काहीशी हिंस्रही असते. त्यामुळे तिथे प्रहार केला की ती आणखी हिंस्र व्हायची शक्यता असते.) 
  • दुसरं म्हणजे उदारमतवादी लोकांनी धार्मिकदृष्ट्या हळव्या लोकांची ते दुखावले गेले तर माफी मागणं. यात भूमिका बदलायचा प्रश्न येत नाही. पण समजुतीचा प्रश्न येतो. कळत-नकळत जर धर्मश्रद्धेला धक्का बसला असेल किंवा काही कारणाने आपली मांडणी त्यांना एकारलेली वाटत असेल तर त्याची नोंद घेऊन, धार्मिक कट्टरतेची चिकित्सा करणं न सोडता, तिचे दुष्परिणाम दाखवून देणं न सोडता 'माणूस दुखावला गेला' म्हणून माफी मागणं आवश्यक आहे असं मला वाटतं. 
  • तिसरं म्हणजे धार्मिकदृष्ट्या हळव्या लोकांनी आपलं केंद्र सोडून परिघाकडे येणं. धार्मिक कक्षेच्या आत जी मौज आहे त्यापेक्षा अधिक मौज या कक्षेच्या बाहेर आहे कारण इथे मौजेबरोबर आपली परीक्षा घेणारी आव्हानंही आहेत!

यासंदर्भात मला आणखी एक असं वाटतं की कदाचित स्ट्रॅटेजी म्हणून 'डावा हिंदू' ही ओळख माझं म्हणणं पोचवायला उपयुक्त ठरू शकेल. संघटित धर्मापासून मुक्त होण्याच्या वाटचालीत आधी धार्मिक ओळख पुढे आणणं हेच कदाचित उपकारक ठरेल. धर्माचा प्रभाव असलेल्या समाजात धर्माची चौकट संवादाची जागा मोकळी करते म्हणून हे करायचं. हिंदुत्ववादी संघटनांचं यश धार्मिक ओळखीला चेतवण्याच्या सोप्या मार्गावरून गेल्यामुळे आहे. तिथे 'मूलभूत परिवर्तनाचं आव्हान' घेणं टाळलेलं आहे किंवा परिवर्तनाचं आव्हान घेतलं तरी ते बहुतेकदा धर्म-जातीच्या स्ट्रक्चरला, आर्थिक संरचनेच्या स्ट्रक्चरला धक्का न लावता घेतलेलं आहे. परिवर्तनात जेव्हा मूलभूत वैचारिक परिवर्तन अभिप्रेत असतं तेव्हा ते मोठं आव्हान असतं. हिंदुत्ववादी विचारात मूलभूत वैचारिक परिवर्तनापेक्षा हिंदुहितवाद, सेवाभाव या गोष्टी अधिक प्रभावी आहेत. त्या बळावर त्यांनी संस्थात्मक बांधणीही केली आहे. परंतु त्याला धर्माची दृश्य-अदृश्य चौकट आहेच. मग परिवर्तनाच्या विचारानेदेखील ही दृश्य-अदृश्य चौकट स्वीकारावी. आज कदाचित या चौकटीपासून बरीच फारकत घेतल्याने परिवर्तनाचा विचार रूजवता येत नसेल. 'मी तुमच्यातला नाही' असं सांगण्यापेक्षा 'मी तुमच्यातलाच आहे आणि मला माझं वेगळं म्हणणं मांडायचं आहे' असं म्हणणं अधिक फलदायी ठरू शकेल.

माझा एक मित्र मानवी उत्क्रांतीचा चांगला अभ्यासक आहे. त्याच्याबाबत सांगावी अशी एक विशेष गोष्ट म्हणजे त्याने या विषयाचे लहान मोड्यूल्स तयार केले आहेत आणि तो शाळेतील मुलांसमोर ते सादर करतो. त्याचं काम आणि त्याचा दृष्टीकोन मला खूप महत्त्वाचा वाटतो. एकदा गप्पा मारताना तो म्हणाला होता की उत्क्रांतीचा विषय निघाला की मी लोकांना सांगतो की देव आहे-नाही या वादात आपण पडायलाच नको. मी देवाचं अस्तित्व नाकारण्याकरता उत्क्रान्तीचा अभ्यास केलेला नाही. हा अभ्यास करताना मला जाम मजा आली म्हणून मी तो केला. ती मजा तुम्हालाही अनुभवता येईल म्हणून तुम्ही हा अभ्यास करा!

मला असं दिसतं की परिवर्तनाचा विचारदेखील लहान मोड्यूल्समधूनच प्रभावीपणे पोचेल. त्याचाच एक भाग 'डावा हिंदू' ही स्वतःची ओळख न्यूट्रॅलिटीने मान्य करणे हा असू शकेल. माणूस धार्मिक होतो, कट्टर होतो याच्या मुळाशी माणसाचं 'व्हल्नरेबल' मन आहे. मग मन जर व्हल्नरेबल आहे तर ते परिवर्तनाकडेही झुकू शकेल. त्यासाठी परिवर्तनवादी विचारात परिवर्तनशीलता हवी!

- 'सृजन' दिवाळी अंक, २०१९ 

Tuesday, November 5, 2019

गांधीविचार : अध्याय २०१९

गांधींच्या बाबतीत सजगपणे, जाणतेपणानं विचार करायला मी कधी सुरुवात केली हे मला सांगता यायचं नाही. गांधी, नेहरु, जेपी आणि विनोबा हे सगळेजण लहानपणापासून पुस्तकं, चर्चा आणि प्रभाव या स्वरुपात घरामध्ये वास्तव्य करत होते. माझ्या वडिलांची ‘सर्वोदयी’ विचारदृष्टी जगण्याची मूल्यात्मक बाजू सतत स्पष्टपणे दाखवत होती.  व्यावहारिक पातळीवर जगण्याचे अनेक संघर्ष होतेच आणि त्यावेळी ‘या मूल्यांचं नक्की काय करायचं ?’ हा प्रश्‍न पडला नाही असंही नाही, पण या सर्व मंडळींनी जे भरणपोषण केलं त्याचे परिणाम पुढे अनेकदा प्रत्ययास आले.

गांधी हे एक विचारात पाडणारं, कधी कधी गोंधळात पाडणारं रसायन आहे यात शंकाच नाही. गांधींविषयी नव्याने काही लिहायची गरज आहे का असं एकीकडे वाटत असताना दुसर्‍या बाजूने गांधीविचारांच आकलन करुन घ्यायची उत्सुकता असणारी नवीन पिढीही तयार होताना दिसते. गांधी हा समकालीन सामाजिक, राजकीय विचारातला एक ‘लंबी रेस का घोडा’ आहे आणि गांधीविचार हा मानवी परस्पर संबंध, मानवी आकांक्षा, मानवनिर्मित अनेक व्यवस्था यांच्या ‘फंक्शनिंग’मध्ये कमी-अधिक प्रमाणात योगदान देत असतो. हे वारंवार दिसून येतं. आपण गेल्या दोन शतकांकडे नजर टाकली तर ‘व्यवस्था-विचार’ म्हणून उदयास आलेल्या मार्क्सवादानंतर गांधीविचार हा आणखी एक ‘व्यवस्था-विचार’ होता असं स्पष्टपणे दिसतं. भारतीय सामाजिक अभिसरणाची सुरुवात, जोतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर, र.धों.कर्वे, बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे आणि इतरही अनेक अभ्यासक विचारवंत-कार्यकर्त्यांच्या योगदानातून होते. भारतीय समाज प्रवाहाला वळण देण्यात या सगळ्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. गांधींच्या बाबतीत जो अधिकचा फरक पडला तो त्यांच्या राजकीय प्रभावामुळे, त्यांच्या तत्त्वज्ञानात्मक मांडणीमुळे आणि त्यांनी दाखवलेल्या रचनात्मक कार्याच्या दिशेमुळे. खरं पाहता निव्वळ वैचारिक, आधुनिकता केंद्री, क्रांतदर्शी दृष्टीने तुलना केली तर आंबेडकरांचं जातिबद्ध भारतीय समाजाचं आकलन आणि या समाजाच्या रचनेमध्ये मुळातून काही बदल करण्यासाठीची वैचारिक दिशा ही गांधींपेक्षा अधिक’ मूलगामी आहे असं म्हणता येईल. र.धों.कर्व्यांचे स्त्री-पुरुष संबंधाबाबतचे, संतती नियमनाबाबतचे विचार पाहता या विशिष्ट मुद्यावर ते गांधींपेक्षा अधिक पुढे होते असंही दिसू शकेल. त्यमुळे प्रागतिकतेच्या विविध निकषांवर गांधी मागे पडण्याचीच शक्यता जास्त आहे. असं असताना गांधी विचार ‘शिळा’ होत नाही, समाजिक संबंधांमध्ये,राजकीय ’ जाणिवेच्या व आनुषंगिक भूमिकेच्या बाबतीत तो सतत अस्तित्व टिकवून ठेवतो याचं कारण काय असावं?

मला याचं कारण हे दिसतं की गांधीविचार हा ‘आतून बाहेर’ असा प्रवास करणारा विचार आहे. गांधींची एकादश व्रते आणि त्यांच्या मांडणीतला नैतिकतेचा, साधनशुचितेचा आग्रह, त्यांचं एकूण तत्त्वज्ञान माणसाला एका उन्नत पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणारं आहे. त्यात मग अर्थातच अवघड आदर्श आहेत. आपण ज्याला सहजपणे ‘अव्यवहार्य’ म्हणू अशा गोष्टी आहेत. रसहीन-एकसुरी वाटेल अशी जीवनशैली आहे. व्यवस्था-विचार करायचा तर मानव-विचारापासून सुरुवात करायला हवी हे मार्क्सही म्हणतो; पण आधुनिकता, सहज प्रेरणांना न्याय, उद्यमशीलता, सृजनशीलता या व इतर पैलूंना कवेत घ्यायचं स्वातंत्र्य असणार्‍या माणसाची ‘नैतिक बैठक’ काय असावी हा गांधीविचाराचा गाभा आहे. या नैतिक भूमिकेविषयी मत-मतांतरं असू शकतात. कारण गांधीविचार हा प्रामुख्याने 'माणूस कसा असतो?' यापेक्षा 'माणसाने कसं असायला हवं?' याचा विचार करतो. त्यामुळे तो रूढार्थाने 'व्यवहार्य' होत नाही आणि मतभेद उत्पन्न होतात. शिवाय गांधीविचारांचं सुलभीकरण, अपप्रचार, चुकीचे अर्थ लावणं यामुळेही गांधींबद्दल भरपूर गैरसमज होतात.  

माणसाचं एक प्रमुख वैशिष्ट्य असं की त्याच्या आदिम काळातील जगण्याच्या लढाईपासून ते आजच्या अत्याधुनिक जगण्यापर्यंत त्याने ‘विचारधारा’ जन्माला घातल्या आहेत. दुसर्‍या बाजूला त्याचं आजचं दैनंदिन जीवन इतकं गुंतागुंतीचं आहे की ‘विचारधारा’ बरहुकूम वागत येईलच असं नाही. माणसाला क्षणोक्षणी कसले ना कसले निर्णय घ्यावे लागतात. तिथे विचारधारेबरोबरच, किंबहुना त्याहूनही थोड्या जास्त प्रमाणात, त्याच्या मूलभूत प्रेरणाच प्रभावी ठरत असतात. गांधींचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य असं की त्यांनी या मूलभूत प्रेरणांच्या - 'ह्यूमन इंस्टिंक्ट’च्या जागी ‘इन्हेस्टिगेशन’ला आणून बसवायचा प्रयत्न केला. समग्र गांधीविचाराची व्यापकता, त्याविषयीची मत-मतांतरे, त्यांची राजकीय भूमिका या सगळ्यावर पुष्कळ चर्चा होत असते. होत राहीलही. तो एक अभ्यास विषय आहेच. पण समकालीन संदर्भात गांधींची प्रस्तुतता यावर ‘मला’ - म्हणजे नव्वदीच्या दशकात मोठ्या झालेल्या आणि पुढे आर्थिक उदारीकरण, इंटरनेट, मोबाईल, गूगल अन् फेसबुक, यू ट्यूब आणि नेटफिक्स, जनलोकपाल आंदोलन, नर्मदा बचाओ आंदोलन आणि देशभरात सुरु असलेली इतर जनआंदोलनं, टीव्हीची मनोरंजन आणि पत्रकारिता या दोन्ही अंगांनी झालेली संपूर्ण अवनती, उजव्या आणि डाव्या विचारातला तीव्र झालेला संघर्ष, बहुसंख्याकवादाला चढलेली धार आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न, 'सत्योत्तर' काळाचे प्रश्न या आणि आनुषंगिक उलथापालथीचा साक्षीदार असलेल्या एका भारतीयाला - काय वाटतं हे अधिक आत्मीयतेने सांगावसं वाटतं.

फेसबुक हे राजकीय - सामाजिक विचारांचं रणांगण बनलं आहे हे या माध्यमाशी परिचित असलेल्या बहुतेकांना माहीत आहे. याच मैदानात मीही माझं म्हणणं अनेक वर्ष मांडत आलो आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी मी फेसबुकवर ‘मी आणि गांधीजी’ ही संवादमालिका लिहू लागलो. वर उल्लेख केलेल्या ‘अस्वस्थ वर्तमाना’त जगणारा एक तरुण आणि गांधीजी यांच्यात ‘आज’ घडणारा संवाद असं या मालिकेचं स्वरुप आहे. यातले गांधीजी हे ‘महात्मा गांधी’ असले तरी ‘मी’च्या मित्राच्या जागी आहेत. त्यामुळे त्यांच्यातला संवाद मित्रांमधल्या संवादासारखा आहे. मला हे लिहावसं वाटलं, गांधीजींना ‘बोलवावसं’ वाटलं याच्यातच गांधीविचार आज मार्गदर्शक ठरु शकतो हा विश्‍वास दिसून येतो.

इथे एक गोष्ट स्पष्ट करुन घेऊ. ‘गांधीविचार’ म्हटलं की त्यात अनेकविध गोष्टी येऊ शकतात. मला गांधीविचारातला वर उल्लेख केलेला ‘इन्व्हेस्टिगेशन’चा भाग आकर्षित करतो. त्याचा मी संवादमालिकेमध्ये उपयोग केलेला आहे. आता एक गोष्ट खरी की माझा व्यक्तिगत वैचारिक कल (जो गांधीवाद - नेहरूवाद - मार्क्सवाद - स्त्रीवाद - उदारमतवाद यांच्या एका मिश्रणातून तयार झाला आहे) या संवादांमध्ये अधूनमधून प्रतिबिंबित होतो. पण माझा प्रयत्न ‘इन्व्हेस्टिगेशन’चा, विचार तपासून बघण्याचा असतो. स्वतःला तपासून बघणं, स्वतःमध्ये सुधारणेच्या जागा कुठे आहेत त्या शोधणं हा २०१९ मधल्या ‘मला’ आणि १९४० मधल्या गांधींना जोडणारा दुवा ठरतो.

मी मागे लेख/चर्चांमधून अनेक वेळा उल्लेख केलेला मुद्दा इथे पुन्हा लिहितो, कारण तो आवश्यक आहे असं मला वाटतं. वैचारिक कल, व्यक्तिगत घडण, व्यक्तिगत अनुभव हे सगळं एका बाजूला ठेवलं तरी दुसर्‍या बाजूला एक मानवीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असा विचार आहे आणि त्याचा आपल्याला आज विसर पडलाय की काय अशी शंका येते. हा विचार खरं तर अजिबात गुंतागुंतीचा नाही. साधा सरळ आहे. तो अगदी आपल्या आईबाबांनी घरी शिकवलेला असेल इतका साधा आहे. ‘माझं चुकू शकतं’ हा तो विचार. मला असं दिसतं की कमालीचं राजकीय ध्रुवीकरण झालेल्या आजच्या काळात ‘आपलं काहीतरी चुकत असेल’ एवढी शक्यता जरी आपण आपल्या मनाशी बोललो तरी ती एक मोठी सुरुवात ठरेल!

आपल्याला आज असं वाटत नाही कारण आपलं टोकाचं ‘पक्षीय राजकीयीकरण’ झालं आहे. राजकीय भूमिका असण्याबद्दल आक्षेप नाहीच, पण ‘राजकीय हिंसकता’ असण्याबद्दल नक्की आक्षेप आहे. कारण त्याचं पर्यवसन समाजस्वास्थ बिघडण्यात, परस्पर सौहार्द बिघडण्यात होतं. आपण आज या ‘राजकीय हिंसकते’च्या प्रभावाखाली आलो आहोत. माणसातली आदिम ‘टोळी जाणीव’ तीव्र होत आहे आणि आधुनिक उपकरणांनी, तंत्रज्ञानाच्या चमत्कारांनी वेढलेले आपण मनातून मात्र आदिम जाणिवांचे गुलाम होत आहोत. आपण वैचारिकदृष्ट्या इतके ‘स्थितीशील’ कसे झालो ? हिंसक राजकारणाने आपल्यातला स्वतंत्रपणे विचार करु शकणारा, कुठल्याही संघटनेचं - पक्षाचं - नेत्याचं जोखड नाकारणारा लोकशाहीवादी सजग नागरिक कसा काय संपवला? यावर एक प्रतिवाद असा आहे की, मुळातच आपण स्वतंत्र विचार वगैरे करणारे, समता-स्वातंत्र्य-वैज्ञानिकतेचा पुरस्कार करणारे नव्हतोच. आपण परंपराप्रिय आहोत. आपल्याला अधिकारांची, श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची उतरंड मनातूनच आवडते. आज फक्त ते कमकुवत आवरण गळून पडलंय आणि आपल्यातला मूळ ‘विघटित भारतीय’, ‘एकारलेला भारतीय’ समोर आला आहे. आज जर आपण सार्वजनिक चर्चाविश्वाकडे नजर टाकली तर हे सहज लक्षात येईल. आपली 'न्यूरोप्लॅस्टिसिटी' कमालीची कमी झाली आहे / आहे. 'न्यूरोप्लॅस्टिसिटी' म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यभर त्याच्या मेंदूमध्ये नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार करून मेंदूमध्ये बदल होण्याची क्षमता. या क्षमतेमुळे न्यूरॉन्स नवीन परिस्थतीला, एखाद्या बदलाला, नव्या माहितीला प्रतिसाद देऊ शकतात. आपल्या मेंदूचा हा एक भौतिक गुणधर्म आहे आहे. अ‍ॅडल्ट ब्रेनपेक्षा डेव्हलपिंग ब्रेनमध्ये न्यूरोप्लॅस्टिसिटी जास्त असते. साध्या भाषेत सांगायचं तर न्यूरोप्लॅस्टिसिटी जास्त असणं म्हणजे सवयीच्या नसलेल्या परिस्थितीला, विचाराला लवकर 'अ‍ॅडजस्ट' होणं. त्या विचाराप्रती लगेच आक्रमक न होता तो तपासायचा प्रयत्न करणं. एक उदाहरण घेऊ. दोन माणसांना प्रत्येकी एक केळं दिलं. ते दिसायला केळ्यासारखंच आहे, पण चव कारल्यासारखी आहे. दोघांनाही खाल्ल्यावर विचित्र वाटेल, आवडणार नाही. कारण 'केळं खायचं आहे' या विचारातच 'विशिष्ट चवीचं फळ खायचं आहे' हा विचार अनुस्यूत असतो. त्यामुळे दोघेही भांबावतील. परंतु कारल्याच्या चवीचं  केळं असू शकतं या वस्तुस्थितीचा स्वीकार जो मनुष्य तुलनेने सहजगत्या, लवकर करेल त्याची न्यूरोप्लॅस्टिसिटी जास्त आहे असं म्हणता येईल. आता ही परीक्षा अनेक गोष्टींबाबत घेता येऊ शकते. आजच्या 'वैचारिकदृष्ट्या विस्कटलेल्या' काळात आपण अस्मिता, राजकीय पक्ष, विचारसरणी, ऐतिहासिक व्यक्ती यांची ओझी वागवत जगतो आहोत. अशा वेळी आपण जेव्हा विरोधी मताविषयी सहिष्णु असलं पाहिजे असं म्हणतो तेव्हा त्याचा 'भौतिक अर्थ' न्यूरोप्लॅस्टिसिटी वाढवणं हा असतो. माणसं एकच बाजू का घेतात, समोर दिसत असूनदेखील सत्य का नाकारतात किंवा सत्याकडे काणाडोळा का करतात याचं उत्तर न्यूरोप्लॅस्टिसिटीमध्ये दडलेलं आहे. ती त्याला एकतर्फी, एका बाजूला झुकण्याचा गुण बहाल करते.  

भारतीय मनोवृत्तीच्या संदर्भात हे विश्लेषण बऱ्याच अंशी खरं आहे असं मला वाटतं. पण यावर करायचं काय ? तर हा सगळा गुंता सोडवायला गांधीमार्गाचा उपयोग होतोय का पहायचं. मी माझ्यापुरता एक प्रयत्न या संवादमालिकेतून (आणि फेसबुकवरील इतरही लेखनातून) केला आणि मला हे खरचं दिसून आलं की आपली समाजिक - राजकीय भूमिका कुठलीही असली तरी आपण अंतःकरणातून, प्रामाणिकपणे स्व-चिकित्सेला तयार असलो, वैचारिक विरोध कायम ठेवला तरी ‘माणूस’ म्हणून एकमेकांशी जोडून घ्यायच्या जागा आपण सुरक्षित राखल्या तर सहअस्तित्व शांततामय होऊ शकतं. फेसबुकवर हिंदुत्ववादी विचारांच्या मंडळींशी माझी बरेचदा चर्चा झाली आहे. मी माझ्या लिखाणातून कट्टर हिंदुत्ववादाबाबतची नाराजी उघडपणे मांडली आहे. त्याचबरोबर उदारमतवाद्यांच्या दृष्टीकोनातील खटकणाऱ्या गोष्टींबाबतही मी लिहिलं आहे. या चर्चांमध्ये माझ्या हे लक्षात आलं की 'माणूस' म्हणून आपण विरोधी विचाराच्या माणसाच्या मनात प्रेमभाव निर्माण करू शकलो तर संवाद सुकर होऊ शकतो. (याबाबत तपशीलात लिहिता येईल, पण त्याबाबत स्वतंत्रपणे सविस्तर लिहिणं इष्ट होईल. कारण त्यात हिंदुत्ववाद आणि उदारमतवाद यांच्या वैचारिक भूमिकेतील फरक, मूल्यात्मक फरक, अभिव्यक्तीची पद्धत अशा विविध मुद्द्यांवर बोलावं लागेल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा की एखाद्या विचारधारेला एखाद्या नावाने संबोधणं ही खरं तर एक व्यावहारिक तडजोड असते. त्यातून त्या विचारधारेचा साधारण कल लक्षात येतो इतकंच. प्रत्यक्षात दोन भिन्न विचारधारांमध्ये काही साम्यस्थळंही असू शकतात.) आपण एक लक्षात घ्यायला हवं की मानवी मेंदू इतर प्राण्यांच्या मेंदूपेक्षा विकसित (आपल्या विकासाच्या कल्पनेनुसार!) असला तरी तो अंतिमतः मनुष्य‘प्राण्या’चा मेंदू आहे. आधी म्हटल्याप्रमाणे आपले सर्व ‘इन्स्टिक्ट्स' एकविसाव्या शतकातही नीट शाबूत आहेत. प्रत्यक्ष हिंसा कमी झाली असली तरी मेंदूतली ‘हिंसकतेची केंद्रं’ बंद पडलेली नाहीत. (इथे मला असंही म्हणावसं वाटतं की त्यामुळे गडबडून जायचं कारण नाही. आपण सगळे ‘उत्क्रांतीची उत्पादनं’ आहोत. ‘भीती’ या आदिम भावनेपासून असूया, दुःख, एकटेपण, निराशा, आनंद अशा भावनांच्या कोलाहलापर्यंत आपल्या मनात भावनांचा जो भलामोठा पैस (आणि पेच!) तयार झाला आहे त्यामागचा उत्क्रांतीजन्य हेतू ‘टिकून राहणे’ हा आहे. एका टोळीत सामील होऊन राहणं, एक बाजू घेणं, राजकीयीकरण होणं हादेखील याच प्रक्रियेचा भाग आहे. पण आपलं वैशिष्ट्य हे की आपल्याला हे सगळं समजू शकतं. माणूस हा ‘जाणिवेची जाणीव’ असणारा प्राणी आहे आणि ते त्याचं बलस्थान आहे.) त्यामुळे गांधी जे सांगतात ते सहजपणे जमणारं नाही. 

गांधींचा माणसाला उन्नत करण्याचा जो प्रयत्न होता त्याचं बीज ‘जाणिवेची जाणीव’ करुन देण्यात आहे. मानवसमूह जर नैतिकदृष्ट्या समर्थ झाला, सामूहिक निर्णयक्षमता आणि कार्यक्षमता जर विकसित झाली तर ‘हे राजकारण’ आणि ‘हे जीवन’ असं द्वैत नष्ट होईल का? गांधींनी आणि त्यांच्या नंतर विनोबांनी विकेंद्रित राज्यव्यवस्थेबाबत जो विचार केला आहे तो भारतासारख्या देशासाठी पथदर्शक आहे. तो यशस्वी न होण्यामागची मुख्य अडचण सामूहिक इच्छाशक्ती आणि कृतीसामर्थ्याचा अभाव ही आहे. त्याच्या जोडीला बदलत्या काळाची आव्हानेदेखील आहेत. पण स्वयंपूर्ण आणि स्वतंत्र असण्याच्या मूलभूत विचाराचं महत्त्व त्यामुळे उणावत नाही.

गांधी आज ‘रिलेव्हंट’ आहेत का हा प्रश्‍न, हा विषय आता खरं तर जुनाच झालाय जरा. हा प्रश्‍न सारखा सारखा विचारावासा वाटतो, गांधी सारखा ‘आडवा येतो’ याचं कारणच हे आहे की, गांधी अगदी मूलभूत, अगदी आवश्यक आणि खरं तर अगदी सोपं असं काही सांगत होते. सर्वांना जर शांततेने एकत्र राहायचं असेल तर काय करायला लागेल याचा मंत्र त्यांनी दिला होता. गांधींची आठवण होत राहते कारण आपल्याला अद्याप शांततेनं एकत्र राहणं जमलेलं नाही हे आहे!  शांततामय सहअस्तित्वाचा गांधीविचार जेव्हा जगण्याचा भाग होईल तेव्हा तो वेगळा असा काही उरणार नाही. त्याची 'आठवण काढावी' लागणार नाही. मला कधीकधी असं वाटतं की गांधींना रिटायर करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे गांधीविचार आत्मसात करणं!  गांधींना खोटा नमस्कार करणाऱ्यांनी, गांधी ज्यांना सतत सलतात त्यांनी, २०१९ साली गांधींच्या प्रतिकृतीला गोळ्या घालण्याचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं!

(तरूण भारत, दीपोत्सव २०१९)

Tuesday, February 26, 2019

प्रतीकात्मतेचे पाझर

महाराष्ट्राचे पहिले सहकारमंत्री बाळासाहेब भारदे यांनी भारतीय राजकारणाविषयी केलेलं एक विधान प्रसिद्ध आहे, 'काँग्रेस म्हणजे खुर्च्या, समाजवादी म्हणजे चर्चा, कम्युनिस्ट म्हणजे मोर्चा आणि संघ म्हणजे पूजाअर्चा'. यात जनसंघ किंवा भाजपचं नाव नसून संघाचं नाव आहे याची एक वेगळी नोंद घ्यायला हवी. त्यांचं हे निरीक्षण मार्मिक असलं तरी आजच्या संदर्भात पाहता 'भाजप म्हणजे खुर्च्या' असा बदल करणं अवाजवी ठरणार नाही. विविध पक्षांचं राजकारण कुठल्या अंगाने पुढे सरकतं, त्यातलं चूक बरोबर काय, राजकीय अपरिहार्यता आणि नैतिक पेच यांच्यातील संघर्षाचं काय याविषयी आपण विचार करू लागलो तर एक मोठाच 'डिस्कोर्स' उभा राहतो. राजकीय अभ्यासक त्याची मांडणी करतच असतात. परंतु गेल्या काही वर्षात उजव्या विचारसरणीचा वाढलेला प्रभाव, केंद्रातील भाजप सरकारवर आणि विशेषतः नरेंद्र मोदींवर होणारी टीका आणि दुसऱ्या बाजूला त्यांना मिळत असलेला जनाधार या पार्श्वभूमीवर उजव्या विचारसरणीच्या विविध पैलूंवर सातत्याने चर्चा होते. याच मालिकेतला एक ताजा मुद्दा आहे, नरेंद्र मोदींनी कुंभमेळ्यातल्या पाच सफाई कर्मचाऱ्यांची केलेली पाद्यपूजा. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार नरेंद्र मोदींनी पाच कामगारांचे पाय धुतले आणि त्यांना 'कर्मयोगी' असं संबोधलं. त्यानंतर ते म्हणाले, 'सफाई कामगार हे खरे सेवक आणि तपस्वी आहेत'.

यानंतर समाजमाध्यमांवर आणि इतरत्र अपेक्षेप्रमाणे चर्चा सुरू झालीच. त्यात अर्थातच टीका आणि समर्थन दोन्ही सूर होते. मला व्यक्तिशः हे कृत्य देशातील हजारो सफाई कामगारांच्या मूलभूत प्रश्नांची क्रूर खिल्ली उडवणारं वाटलं. निषेधार्ह वाटलं. सफाई कामगारांची, हाताने मैला वाहणाऱ्यांची अवस्था कुणापासून लपून राहिलेली नाही. गटारातील विषारी वायूमुळे देशात गेल्या वर्षी शंभरच्या वर सफाई कामगारांचे मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काही कामगारांचे पाय धुऊन पंतप्रधान काय सुचवू पाहतात? परंपराप्रिय आणि भावनाप्रधान अशा बहुसंख्य भारतीय जनतेला भारावून टाकण्याचा हा प्रयत्न नक्की कुठल्या चौकटीत टाकायचा असा प्रश्न पडतो. तो राजकारणाच्या चौकटीत घालणं भाजप समर्थकांना मान्य होणार नाही. त्याला खरोखरीचा उमाळा, खरोखरीच सद्गदित होऊन केलेलं कृत्य म्हणावं तर अशा प्रतीकात्मक कृतीपेक्षा बरंच काही करण्याचं सामर्थ्य तुमच्या पदाने तुम्हाला दिलेलं असताना एखाद्या सर्वसामान्य, दुर्बल, श्रद्धाळू माणसासारखं मन उचंबळून आणून केवळ एका भावनिक कृतीत समाधान का मानून घ्यायचं?

या प्रश्नातच एक मेख आहे. उजव्या विचारांचा एकूण आवाका आणि या विचाराने प्रेरित कार्यपद्धती पाहिली तर असं दिसेल की इथे प्रतीकांना अतिशय महत्त्व आहे. ते करताना आपण हे लक्षात ठेवूया की आपल्या चर्चेत उजव्या विचाराचा धार्मिक-सांस्कृतिक पैलू अभिप्रेत आहे. सरसकट डावं आणि उजवं अशी विभागणी करणं ढोबळ वर्गीकरणासाठी उपयोगी ठरत असलं तरी त्यात बरेच तपशील निसटून जातात. वर्गीकरण किंवा व्याख्या करणं हे बरेचदा आकलनाला मर्यादा घालणारं ठरतं हे आपण  लक्षात ठेवूया. उजव्या विचारसरणीने कायमच लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रतीकांचा, कर्मकांडांचा, भावनिक आव्हानांचा वापर केलाय. अर्थात यातून आपल्याला दिसतंच की काही लोक एकत्र येऊन इतर काहींच्या विरुद्ध उभे राहतात. पण विचार म्हणून तो एकत्रीकरणाचाच प्रयत्न असतो, असं त्यांचं प्रतिपादन असतं. गेल्या वर्षी अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थींची कलशयात्रा सगळ्या राज्यांमध्ये काढण्यात आली होती. अगदी २०१४ पर्यंत मागे गेलो तर संसदेत प्रवेश करताना नरेंद्र मोदींनी संसदेच्या पायऱ्यांवर डोकं टेकवण्याचा प्रसंगही आपल्याला आठवेल. संघाच्या विविध कार्यक्रमांपैकी शस्त्रपूजा हा एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो. नवीन लोकांशी जोडून घेण्याकरता संघ स्वयंसेवक त्यांना राख्या बांधतात. प्रतीकात्मक मूल्य असलेले असे बरेच कार्यक्रम सांगता येतील. अशा प्रतीकात्मक गोष्टी संघटना बांधणीकरता, कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मकता, उत्साह निर्माण करण्याकरता आवश्यक आहेत म्हणून त्यांचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. उजव्या विचारसरणीतील ही प्रतीकात्मता खरं तर भारतीय परंपरेतूनच आलेली आहे आणि त्यामुळे ती स्वीकारणं लोकांनाही जड जात नाही.

इथवर सगळं ठीक असलं तरी गडबड अशी होते की या प्रतीकात्मतेलाच असाधारण महत्त्व प्राप्त होऊ लागतं. प्रतीकात्मक कृत्य केलं की झालं, पुढे जाऊन मूळ, अवघड प्रश्नाला भिडलो नाही तरी चालेल अशी एक विपरीत मानसिकता तयार होऊ लागते. उजव्या विचारसरणीचे बरेच कार्यकर्ते, समर्थक अशा मानसिकतेचे बळी असलेले दिसतात. हे कुणाचे दोष दाखवण्यासाठी नाही. तर आज आपण ज्या ध्रुवीकरणात जगतो आहोत ते आपल्या सामाजिक स्वास्थ्यासाठी चांगलं नाही, हे सांगण्यासाठी आहे. खरं तर कुठल्याही संघटनेत, राजकीय पक्षात असणारे लोक विविध स्वभाववैशिष्टयांनी युक्त असतातच. डाव्या पुरोगामी चळवळीत देखील वैचारिक खुलेपणा नसणारे लोक असतात. याचं एक साधं कारण हे आहे की आपल्या 'विचारसरणीवर आधारित' ओळखीआधीची आपली ओळख 'माणूस' ही आहे आणि माणूस हा अनेक भल्याबुऱ्या गुणधर्मांचं गाठोडं आहे. परंतु असं असलं तरी विचारकलहाच्या पलीकडे जाऊन, आपल्या विचारसरणीशी तीव्र निष्ठा बाळगणारे 'कडवे' कार्यकर्ते तयार करण्यात संख्यात्मक दृष्ट्या उजव्या विचारसरणीला तुलनेने चांगलं यश मिळालेलं आहे.

या यशाचा एक आधार 'सहज, सोपं आव्हान' हा आहे. आता सहज-सोपं म्हणजे काय हे थोडं समजावून घेऊ. सामाजिक आणि राजकीय आघाडीवर संघ, भाजपने केलेलं काम अगदी सोपं होतं, असा याचा अर्थ नाही. परंतु हे यश मिळवण्याकरता जो आधार घेतला गेला आणि घेतला जातो, तो सोपा होता. माणसांना विशिष्ट दिशेने कार्यप्रवण करण्यासाठी धर्म, संस्कृती, राष्ट्र हे अमूर्त आणि एका अर्थी 'रेडिमेड' आधार जेव्हा घेतले जातात तेव्हा माणूस कार्यप्रवण होतो, कष्टाने कार्यही करतो. पण सामाजिक, वर्गीय, जातीय रचनांची गुंतागुंत समजून घेऊन मुळातून काही बदल घडवण्याची मानसिकता वाढीला लागत नाही. यातून कार्य उभं राहतंच, पण मानसिकता मात्र ठराविक साच्यातलीच राहते.

नरेंद्र मोदींनी केलेली पाद्यपूजा अशा मानसिकतेकडे निर्देश करते. यात व्यक्तिविशिष्ट गुणधर्माचाही भाग आहेच. ज्याला साध्या भाषेत नाटकीपणा म्हटलं जातं, तो नरेंद्र मोदींच्या स्वभावाचा एक भाग आहे. निवडणूकपूर्व काळातील प्रचार भाषणांपासून सत्तेवर आल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणांमधूनही तो दिसतो. त्यांच्या या स्वभाववैशिष्ट्यामुळे त्यांनी केलेल्या प्रतीकात्मक कृतीला धार चढतेच. आपल्या भाषणांमधून 'देशाचा पंतप्रधान' बोलतो आहे असं जाणवून देण्याऐवजी 'पक्षाचा प्रचारक' बोलतो आहे असंच वरचेवर जाणवतं. त्यातून प्रतिक्रियावादी, आक्रमक, भावनिक राजकारणाला त्यांनी अग्रस्थान दिल्याने त्यांच्या स्वतःच्याही उक्ती आणि कृतीचे पडसाद उमटणं स्वाभाविक झालंय. नरेंद्र मोदींनी स्वतःच 'नरेंद्र मोदी' हा नायक आणि खलनायक दोन्ही निर्माण केलेत!

प्रतीकात्मक कृत्यांना भावनिक महत्त्व देऊन त्यांची गरज प्रस्थापित करणं, हा उजव्या विचारसरणीत खोलवर रूजलेला विचार आहे. त्याचे आविष्कार बेगडी वाटले तरी विचारसरणीसाठी त्यांचं धोरणात्मक महत्त्व फार आहे. आज उजव्या विचारसरणीचे लोक देशभक्त कोण आणि देशद्रोही कोण, हे ठरवताना दिसतात. यातून विश्लेषणाची स्पेस नष्ट होत जाते आणि सुलभीकरणाची स्पेस वाढत जाते. खेद अशा गोष्टीचा होतो की नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात काय काय चांगले बदल झाले हे मोदींचे समर्थक आपल्या फेसबुक पोस्ट्समधून सांगतात, पण प्रत्यक्ष पंतप्रधान एखाद्या शांत, गंभीर, पंतप्रधानपदाचा आब राखणाऱ्या भाषणातून ते का सांगत नाहीत असा प्रश्न पडतो! नरेंद्र मोदींनी जनहिताचा एकही निर्णय घेतला नाही असं नाहीच. पण प्रतीकात्मतेचा अतिरिक्त सोस बाळगल्याने आपण स्वतःदेखील एक 'नकारात्मक प्रतीक' होतो आणि आपल्या कार्यापेक्षा आपली विचारसरणी पृष्ठभागावर येत राहते, हे त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी लक्षात घेतलं तर बरं होईल.

(कोलाज.इन या संकेस्थळावर प्रकाशित)

Saturday, December 22, 2018

स्वप्न आहे सोबतीला...

एखाद्या प्रसन्न रात्री मित्रांबरोबर गप्पा रंगत आलेल्या असाव्यात, काही मौलिक प्रश्न पुढे येत जावेत, त्यातून डोक्यातील चक्रं आपल्या सोयीच्या वाटेऐवजी थोड्या अवघड वाटांवरून धावू लागावीत आणि एकूणात चर्चेला रोमांचक स्वरूप येत असताना सकाळी उठून कामावर जायचंय म्हणून सभा बरखास्त करण्याची वेळ यावी... अशा वेळी जी मनःस्थिती होते तशी माझी आत्ताची मनःस्थिती आहे. 

गेल्या नोव्हेंबरमध्ये ‘चतुरंग’कडून लेखमालिका लिहिण्याविषयी प्रस्ताव आला तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया नकाराची होती. आपल्याला स्तंभलेखन जमणार नाही असं मला ठामपणे वाटत होतं. शिवाय स्तंभलेखन म्हणजे 'कमिटमेंट'! त्यामुळे मी लेखमाला न लिहिणंच कसं योग्य होईल हे मी त्यांना पटवून द्यायचा सर्वतोपरीने प्रयत्न केला. पण त्यांचा आग्रह कायम होता. आज लेखमालेचा समारोप करताना मी त्यांचे आभार मानतो कारण गेल्या वर्षभर मी जे काही थोडंफार लिहू शकलो, विविध वाचकांशी जोडून घेऊ शकलो, त्यांच्या प्रश्न-प्रतिक्रिया-प्रशंसेमुळे विचारमग्न आणि उत्साही राहू शकलो त्याचं श्रेय त्यांना जातं. 

माणसाने लावलेल्या सगळ्या शोधांमध्ये भाषेचा शोध ही एक विलक्षण गोष्ट आहे. एकेकाळी नसलेल्याच किंवा निःशब्द रूपात असणाऱ्या जाणिवा, विचार भाषेतून प्रकट होऊ लागल्यावर त्यांच्यातील गुंतागुंत, टक्कर, रस्सीखेच सगळंच वाढत गेलं आहे. लिहिण्यातून व्यक्त व्हायची सवय असलेल्या माझ्यासारख्याला भाषेचा मोठा आधार तर वाटतोच, पण कधीकधी भाषेचं भयही वाटतं. कारण भाषेतून जे मी सांगतो ते 'मला जे म्हणायचं आहे आणि मला जे म्हणायचं नाही' ते सगळं निर्दोषपणे सांगता येतंच असं नाही. शिवाय आणखी एक प्रश्नही सतावत असतो. तो म्हणजे विश्वाचा एवढा मोठा पसारा - तो उलगडण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते विविध विज्ञानशाखांचे अभ्यासक, माणसाच्या मनोविश्वाचा आणि सामाजिक व्यवस्थांचा अभ्यास करणारे मानव्यशास्त्राच्या शाखांचे अभ्यासक यांच्या योगदानापुढे आपण वेगळं असं काय सांगणार? 

पण इथेच एक 'ट्विस्ट' आहे. ज्ञानाची विविध क्षेत्रे आपल्याला विशिष्ट विषयाची सखोल माहिती देतात. त्या त्या क्षेत्रातील ज्ञानी मनुष्य हा समाजाचा एक 'अ‍ॅसेट' असतो. या ज्ञानक्षेत्रांच्या बरोबरीने जे व्यापक असं 'वैचारिक क्षेत्र' आहे ते विविध ज्ञानक्षेत्रांतील घडामोडींचा परस्परसंबंध, त्यांचे सकारात्मक-नकारात्मक सामाजिक परिणाम, समाजव्यवस्थेचे विविध पैलू, त्यातील सुधारणा या गोष्टींवर सतत विचार करत असतं. मानसशास्त्रातील ज्ञानी मनुष्य एखाद्याच्या मानसिक आजारावर उपचार करू शकेल, परंतु वैचारिक क्षेत्रातील मनुष्य आपल्या निरीक्षणातून आजवर लक्ष गेलं नाही अशा एखाद्या ठिकाणी या ज्ञानाची गरज आहे हे सांगू शकेल. वैचारिक क्षेत्रातील मनुष्यासाठी 'समाज' हा एक प्रमुख आस्थेचा विषय असतो. 'विशिष्ट ज्ञान' त्याला आकर्षित करतंच, पण 'ज्ञानाचं उपयोजन' त्याला अधिक आकर्षित करतं. वैचारिक क्षेत्र हे प्रामुख्याने कुतूहल, नियोजन या पायावर आधारलेलं असल्याने खरं तर आपल्यापैकी प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार या शिलेदार होऊ शकतो. आपण प्रत्येकजण समाजाचा भाग असतो आणि समाजव्यवस्थेसंदर्भात, संकल्पनांच्या संदर्भात विश्लेषक विचार करण्याची क्षमता विकसित झाली तर प्रत्येकजण काही कल्पना मांडू शकतो, उपाय सुचवू शकतो. रोजच्या जगण्याच्या पलीकडे जात वैचारिक घुसळण सुरू ठेवण्याची प्रक्रिया आपण सुरू ठेवली तर त्यातून आपलं 'मनुष्यत्व' उजळून निघत असतं. 

ही लेखमाला लिहीत असताना मला हे अनुभवता आलं. मनातील बऱ्याच प्रश्नांना आणि उत्तरांना वाट मोकळी करून देता आली. यात अपूर्णतेची जाणीव तर नक्कीच आहे. ज्या विषयांना आपण या मालिकेत स्पर्श केला त्या सर्वच विषयांवर अधिक सविस्तर उत्तरं मिळतील अशी मांडणी करता येईल. हे विषय सामाजिक, नैतिक स्वरूपाचे असल्याने तिथे गणितासारखी उत्तरं मिळत नाहीत. असं असलं तरी अमुक एका प्रश्नावर मला हे उत्तर दिसतं हे सांगणं ही आपली जबाबदारी असतेच. 'जातीयता संपायला हवी' असं मी म्हणत असेन तर ती संपवण्याकरता मला कोणते उपाय दिसतात हे मी सांगितलं पाहिजे. ते उपाय किती परिणामकारक आहेत हा पुढचा मुद्दा, परंतु केवळ 'विशफुल थिंकिंग' करत राहणं हा व्यापक बदलासाठीचा उपाय असू शकत नाही.  
ज्या विषयांवर बोलायची इच्छा होती पण ते राहून गेलं त्यात प्रतिगामी-पुरोगामी हा संकल्पनाभेद, धर्मश्रद्धा आणि आपलं मानस, धर्मश्रद्धा आणि राजकारण हे विषय आहेत. गांधीजींची आधुनिकतेविषयीची मुळापासूनची वेगळी दृष्टी आणि तिची प्रस्तुतता यावर आपण बोललो, पण तो धागा आणखी पुढे नेता येईल. मागील लेखात आपण जीवन कौशल्ये या विषयावर बोललो. त्याच्या पुढे जात, काही व्यवहारिक उदाहरणं घेत जीवन कौशल्ये विकसित करण्याच्या प्रक्रियेवर तपशीलात बोलता येईल. लोकशाही व्यवस्थेत सत्तेचं विकेंद्रीकरण आणि त्यातून स्वशासन हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. या विषयावर गांधीजी आणि त्यांच्यानंतर विनोबा भावे यांनी मूलभूत मांडणी केली आहे. मराठीत मिलिंद बोकील यांनी या विषयावर मौलिक लेखन केलं आहे. या सगळ्याचा आधार घेत या विषयावर थोडी चर्चा करायचं मनात होतं. आपण प्रेम आणि लैंगिकतेविषयी बोललो, परंतु या विषयाशी जोडलेला महत्त्वाचा सामाजिक मुद्दा वेश्याव्यवसाय हा आहे. लैंगिक गरज आणि लैंगिक इच्छा यांच्या पूर्ततेची व्यवस्था समाजमान्य नैतिकतेअंतर्गत होत नसल्याने वेश्याव्यवसाय अस्तित्वात आहे. लग्नव्यवस्थेला समांतर चालणारी, परंतु विस्कळीत, बहुतेकदा शोषणावर आधारलेली, कुणाही संवेदनशील मनुष्याला अस्वस्थ करणारी ही व्यवस्था आहे. यासंदर्भात 'पुरूष' म्हणूनचं लैंगिक मनोविश्व घडत असताना वेश्याव्यवसायाबद्दल विचार होत होताच, हे जग पाहिलंही होतं,  परंतु पुण्यातील 'सहेली' या 'सेक्स वर्कर्स कलेक्टिव्ह'शी जोडला गेल्यानंतर वास्तवाच्या अधिक जवळ जाता आलं. त्यामुळे याबाबत सविस्तर लिहायचं होतं. पारंपरिक चौकटीला छेद देत काही चित्रपटांनी मुख्य प्रवाहाला वेगळं वळण दिलं त्याबद्दल थोडं बोलायचं होतं. 

हे सगळं इतरत्र किंवा याच व्यासपीठावर पुढे बोलता येईलच. आत्ता मात्र निरोपाचा क्षण आहे. या लेखमालेच्या निमित्ताने अनेक वाचकांशी इ-मेलद्वारे जो संवाद झाला तो मला समाधानी आणि समृद्ध करणारा ठरला आहे. अनेकांशी अनेक संदर्भात बोलणं झालं. काहीजणांनी या लेखमालिकेमुळे/विशिष्ट लेखामुळे त्यांना मदत झाल्याचं कळवलं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. माणसांशी असं जोडलं जाण्याचं मोल फार आहे. सर्व वाचक मित्र-मैत्रिणींचे मनःपूर्वक आभार! 

आहे ती चौकट बदलून काही नवं करण्याचा विचार करणाऱ्याला स्वप्नाळू, अव्यवहारी, कधी उपहासाने क्रांतिकारक वगैरे म्हटलं जातं. नवी दिशा कोणती, ही वाट चांगलीच असेल कशावरून हे नीटपणे न कळल्याने किंवा सांगणाऱ्यालाही नीट सांगता न आल्याने असं होतं. परंतु असं स्वप्नाळू असणं हे आवश्यक आहेच. त्याविषयी शंका नसावी. जॉन लेनन या विख्यात गायकाचं एक वचन आठवतं. तो म्हणतो - तुम्ही एकट्याने पाहिलेलं स्वप्न हे फक्त स्वप्न असतं. पण सगळ्यांनी एकत्र पाहिलेल्या स्वप्न म्हणजे वास्तव असतं! त्यामुळे स्वप्न तर बघतच राहूयात. लेट्स ड्रीम टुगेदर! 

Saturday, December 8, 2018

व्यवस्था विचार

मागील दोन-चार लेखांवर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यातून प्रेम आणि लैंगिकता हे 'बर्निंग' विषय आहेत हे दिसून आलं. स्त्री-पुरूषांमधील नात्याचं 'गतिशास्त्र' (डायनॅमिक्स) हा विषय सामाजिक महत्त्वाच्या विषयांपैकी एक कळीचा विषय आहे हे तर खरंच. विशेषतः पुरूषाच्या लैंगिक वर्तनाबाबत (त्याच्या नियमनाबाबत) अधिक बोललं जायला हवं आहे. लैंगिक समाधान आपल्या जागी महत्त्वाचं आहेच, पण पुरूषासाठी त्याचा 'ट्रॅप' तयार होतो आणि त्यात त्याचं मानस अडकूनच पडतं. याबाबत काय उपाय करता येतील याची चर्चा आपण मागच्या लेखात केली होती. ती आणखी पुढे जाऊ शकतेच. पण आजच्या लेखात आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय मानवी वर्तनाच्या सगळ्याच बाजूंना कवेत घेणारा आहे. हा विषय म्हणजे जीवन कौशल्ये - लाइफ स्किल्स. सध्या प्रचलित असलेली शिक्षणपद्धती, त्यातील अधिक-उण्या बाजू हा एक फार मोठा विषय आहे. आपण बोलणार आहोत ते या औपचारिक शिक्षणाव्यतिरिक्त जे शिक्षण होत असतं, जे होणं अपेक्षित असतं त्या शिक्षणाबद्दल. 

मोठयांनी (म्हणजे आपण सगळे) घातलेल्या अनेक घोळांची मुळं आपल्या छोटेपणात दडलेली असतात. (इथे 'छोटेपणात'वर नकळत श्लेष साधला गेला आहे!) मुलांना त्यांच्या वाढीच्या विविध टप्प्यांवर कोणकोणत्या विषयांची कशी कशी ओळख करून द्यायची हा एक महत्त्वाचा आणि अवघड प्रश्न आहे. हे थेटपणे (कल्पकतेने, पण सत्य पोचेल अशा प्रकारे) व्हावं असं मला वाटतं. इथे 'जीवन कौशल्ये' (लाइफ स्किल्स) हा विषय समोर येतो. 'जीवन कौशल्ये' या विषयाअंतर्गत अनेक गोष्टींची तयारी होणं अपेक्षित आहे. यात कौंटुंबिक नातेसंबंध, व्यावसायिक नातेसंबंध, त्यातील ताण व त्यांचं व्यवस्थापन, प्रेम, लैंगिकता, राजकीय-सामाजिक जाण, नागरिक म्हणून आपली कर्तव्यं अशा अनेकानेक गोष्टी आणि त्यांचे विविध पदर आहेत. या सगळ्यात रॅशनॅलिटीवर आधारलेला एक दृष्टीकोन स्वीकारता येऊ शकतोच. परंतु इथे दोन मुद्दे उपस्थित होतात. एक म्हणजे माणूस रॅशनल विचार करू शकत असला तरी तो स्वभावदृष्ट्या प्रत्येक वेळी पूर्णपणे रॅशनल असेलच असं नाही. त्यामुळे रॅशनॅलिटी काम करणार का हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा विरुद्ध बाजूने आव्हानात्मक आहे. तो असा की रॅशनॅलिटी यशस्वी झाली आणि काही  'अतार्किक' परंतु माणसाला माणसाशी बांधून ठेवणाऱ्या हळव्या भावभावनांना सोडचिठ्ठी दिली गेली तर काय? उदा. मला हे नेहमी वाटतं की जन्म आणि मृत्यू या दोन्ही विषयांबाबत मुलांना वयाच्या विशिष्ट टप्प्यावर (साधारणतः पौगंडावस्थेत) खरं काय ते सांगितलं गेलं पाहिजे. आता जर जन्म-मृत्यूचं वैज्ञानिक वास्तव माहीत झालं तर आपल्या जवळच्या कुणाच्या मृत्यूनंतर जाणवणारं दुःख, उदासी, त्या माणसाच्या आठवणीने जाणवणारा एकाकीपणा, डोळ्यात येणारे अश्रू या ज्या एका अर्थी अतार्किक पण मानवीय, आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवणाऱ्या, जगण्यासाठी जो भावनिक पाया लागतो तो रचणाऱ्या भावना आहेत त्या नाहीशा होतील का? प्रेम, आकर्षण, ईर्षा, अहंकार या भावनांचं ‘रॅशनल नियमन’ झालं तर त्यातली खुमारी निघून जाईल का? 

यावर विचार करताना दोन गोष्टी जाणवतात. एक म्हणजे परंपरा-आधुनिकता या संघर्षाच्या पलीकडे असणारी माणसाची घडण लक्षात घेता तर्काधिष्ठीत विचार, परंपरेला प्रश्न करणं यामुळे माणूस कोरडा होईल असं मला वाटत नाही. दुसरं म्हणजे 'रॅशनॅलिटी' आणि 'सेन्सिटिव्हिटी' या दोन्ही गोष्टी एकत्र चालू शकतात. त्यांना तसं चालायला लावणं हे नवतेपुढील एक आव्हान आहे. जगात दगड-धोंडे आहेत तसेच सजीवही आहेत, माणूस हादेखील एक सजीव प्राणीच आहे, त्याच्या अस्तित्वामागे कुठलंही प्रयोजन वगैरे नाही, जीव आणि जाणीव यांच्या असण्याची तार्किक उकल होऊ शकते हे समजून घेत असताना त्याच्या परिणामी 'सगळं जर प्रयोजनहीन (आणि म्हणून अर्थहीन) आहे तर मग नीतीमूल्ये हवीतच कशाला? जगण्याला तरी काय अर्थ आहे?' हा प्रश्न उद्वेगाने न विचारणारं स्थिर आणि विवेकी मानस घडवणं हे नवतेपुढील आव्हान आहे. (सजीव रचनांसंदर्भात एक आठवलं. 'आधुनिक विज्ञानाचे स्वरूप' हे मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं पुस्तक आहे.  'आजचा सुधारक' या मासिकात प्रकाशित झालेल्या काही लेखांचं हे संकलन आहे. या पुस्तकातील मिलिंद वाटवे यांचा 'आत्मा हवाच का?' हा लेख जरूर वाचावा.) त्यामुळे आधुनिक जीवन कौशल्यांविषयी बोलत असताना या आव्हानाचा विचार झालेला असणं आवश्यक आहे. 

या विचारासह मला हे म्हणावंसं वाटतं की जीवन कौशल्ये विकसित करताना आपण अधिक विचारी, अधिक 'वास्तववादी' असायला हवं आहे. कदाचित अतिरंजित वाटेल पण आपण जेव्हा आपला देश अजून मागे आहे असं म्हणतो, देशापुढील प्रश्नांची मालिका संपत नाही असं म्हणतो तेव्हा राजकीय-आर्थिक कारणांबरोबरच आपली जीवन कौशल्ये विकसित झालेली नसणं हेही एक कारण त्यामागे असतं. एक नेहमीचं, साधं उदाहरण घेऊ. आपल्या देशाचं काही खरं नाही असं आपण उद्वेगाने बरेचदा म्हणतो, पण आपण राहतो त्या सोसायटीचं काम बघायलाही कुणी उत्स्फूर्तपणे पुढे येत नाही. प्रश्ना सोडवण्यापेक्षा, त्यासाठी इनोव्हेटिव्ह विचार करण्यापेक्षा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकत्र येण्यापेक्षा त्या प्रश्नांसह जगणं पुढे रेटणं बहुतेकजण पसंत करतात. 'गोष्टी सुधारण्यासाठी आपण जागचं हलणं, थोडी जोखीम पत्करणं गरजेचं आहे' हा विचारच मनात न रूजल्यामुळे हे होतं. 'आपल्याला हालचाल करायला हवी' हे शिकवलं जाणं हा जीवनकौशल्याचा भाग आहे. हे कितीतरी ठिकाणी लागू होईल. लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पुष्कळ रस असतो, पण आपल्या गावची ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका कशी काम करते याचं आपल्याला फारसं ज्ञान नसतं. आपल्याला काय काय माहीत हवं, आपल्याकडे कोणती कौशल्ये हवीत याची यादी आपण करू शकतो खरं तर. ती केली तर आपल्याला जीवन कौशल्यांचा खरा आवाका ध्यानात येईल. याकरता एक रोचक पद्धत वापरता येईल. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ज्या अनेक बाह्य व आंतरिक क्रिया करतो त्या बघाव्यात. यात आपल्या असं लक्षात येईल की आपण इतक्या गोष्टींवर अवलंबून असताना आपल्या नियंत्रणात फार कमी गोष्टी आहेत. माणसांची संख्या वाढणं, त्यातून गुंतागुंतीच्या सामाजिक रचना तयार होणं याला सर्वस्वी आपण एकटे जबाबदार नाही हे ठीक, पण या रचनांचे फायदे आहेत तसेच काही दुःखदायक पैलूही आहेत याचं किमान भान तरी असावं. उदा. सकाळी आपण शौचाला जातो. मलमूत्र विसर्जन आणि त्याची व्यवस्था हा एक विषय तिथे आपल्याला मिळेल. आपल्या मलमूत्राची विल्हेवाट कशी लावायची हा इतर अनेक मुद्द्यांसारखाच जीवन कौशल्याशी संबंधित मुद्दा आहे. आज आपल्या जीवन कौशल्याच्या कक्षेत घरातला संडास स्वच्छ ठेवणं आणि सोसायटीचं ड्रेनेज तुंबलं तर ते साफ करून घेणं एवढंच आहे. पण 'ड्रेनेज सफाई करणाऱ्या कामगारांचं जगणं' हा एक मोठा मुद्दा आहे. त्यावर आपण प्रत्यक्ष काही केलं तर उत्तमच, पण जर करत नसू तर आपल्या समाजातील हा एक प्रश्न आहे हे आपण मुलांना सांगणार की नाही? हे एक उदाहरण झालं. आता दिवसभरातल्या इतर क्रियांची यादी पाहिली तर आपल्या कक्षेत असलेली आणि आपल्या कक्षेत नसलेली अनेक जीवन कौशल्ये सापडतील. आणि मला असं दिसतं की आपण अनेक महत्त्वाचे प्रश्न आपल्याकडे उत्तर नाही म्हणून मुलांसमोर आणण्याचं टाळतो किंवा त्यावर थातुरमातुर उत्तर देऊन वेळ निभावून नेतो. समाज गुंतागुंतीचा आणि मुलांच्या प्रश्नांना सोपी उत्तरं हे गणित काही बरोबर नाही. कुठला प्रश्न वयाच्या कुठल्या टप्प्यावर मुलांसमोर आणावा यावर विचार व्हावाच, पण एकदम विशीत गेल्यावर मुलांसमोर काही गोष्टी येऊन आदळतात आणि मग तयारीअभावी मुलं कमकुवत पडतात. 

यासंदर्भात मला दोन प्रमुख गुण विकसित व्हायला हवेत असं वाटतं. पहिला म्हणजे विश्लेषक वृत्ती - विषयाची माहिती घेऊन आपलं आकलन तयार करण्याची, विविध शक्यता विचारात घेत उपाययोजना करण्याची सवय आणि दुसरा म्हणजे धैर्य. मुलांमध्ये त्यांच्या वाढीच्या वयात हे दोन गुण निर्माण होऊ शकले तर समाजाचं चित्र बदलायला पुष्कळ मदत होईल. हे करायचं कसं? तर बोलत राहून. वास्तवाचं चित्र दाखवत राहून. व्यसनमुक्तीच्या प्रोग्रॅम्समध्ये 'स्पॉन्सर' आणि 'स्पॉन्सी' असं एक नातं असतं. रिकव्हर झालेला 'स्पॉन्सर' रिकव्हरीत असलेल्या एकाची - 'स्पॉन्सी'ची जबाबदारी घेतो. हा स्पॉन्सर म्हणजे स्पॉन्सीचा आधारस्तंभ असतो. आपलं नियंत्रण सुटतंय, आपण पुन्हा व्यसनाकडे जातोय असं ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी स्पॉन्सीने स्पॉन्सरला फोन करून, भेटून, बोलून ते सांगायचं आणि स्पॉन्सरने त्याला शब्दांद्वारे आधार देऊन त्याला पुन्हा मार्गावर आणायचं. हे सगळं सपोर्ट ग्रुप्सअंतर्गत होत असतं. असे सपोर्ट ग्रुप असणं, तिथे मोकळेपणाने बोलता येणं हे समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तो जीवन कौशल्याचाच भाग आहे.  मला असं वाटतं की मुलांशी आपलं नातं साधारणपणे या धर्तीचं असायला हवं. त्याचा उपयोग व्यक्तिगत प्रश्नांसाठी होईलच आणि सामाजिक प्रश्नांची जाण विकसित करण्यासाठीही होईल.   

व्यवस्थापनशास्त्रात 'सिस्टिम्स थिंकिंग' असा एक दृष्टीकोन शिकवला जातो. 'आपल्याला व्यवस्था लावायची आहे' हा यातला मुख्य विचार आहे. अनंत गोष्टी घडत आहेत. त्यातील प्रत्येक गोष्टीची नीट व्यवस्था लागली तर ती गोष्ट इतर गोष्टींमध्ये अडथळा आणणार नाही. हे आपल्या जगण्यालाही लागू आहे. जगण्यातील जे मोठे - मॅक्रो लेव्हलचे - विषय आहेत (उदा. लोकशाही, भांडवलशाही, समाजवाद, आर्थिक उदारीकरण इ.) ते मायक्रो लेव्हलच्या (रोजच्या जगण्यातील प्रश्न/विषय) विषयांतूनच तयार होत असतात. म्हणून मायक्रोस्कोपिक दृष्टी ठेवून तिथले प्रश्न सोडवण्यावर भर दिला तर वरचे प्रश्न सोडवायला मदत होईल.

Saturday, November 24, 2018

संवादातून बदल

आपण जी संस्कृती निर्माण केली आहे, ज्या मान्यतांच्या आधारे आपण जगतो, आपले व्यवहार पार पाडतो त्यातला एक लक्षणीय भाग ‘निर्णय घेणे’ हा आहे. आपल्याला पदोपदी काही ना काही ठरवायला लागतं, उपलब्ध पर्यायांमधून एक पर्याय निवडावा लागतो. यातला एक कळीचा भाग ‘चूक’ आणि ‘बरोबर’ ठरवणे हा आहे. ‘चूक’ आणि ‘बरोबर’च्या मुळाशी ‘नीतीविचार’ आहे. हा ‘नीतीविचार’ पूर्णपणे सुसंगत, गणिती प्रक्रियेने चालणारा नसतो. तो सामाजिक असतो आणि या नीतीविचारावर प्रभाव टाकणारी आपल्याच मनातील वैचारिक आणि भावनिक बले असतात. त्यांच्या परिणामी आपला ‘नीतीविचार’ आकार घेतो. मागच्या लेखात आपण म्हटलं तसं सांस्कृतिक रचितं तयार होत असताना, ती अस्तित्वात असताना वास्तविक रचितंही असतात. आपण ज्याला वाईट, चूक असं म्हणतो ते समाजासाठी वाईट आणि चूक असलं तरी वास्तवात ते 'असतं' हेच पुरेसं बोलकं आहे. नीतीविचारांचा प्रयत्न समाजाची घडी बसवायचा असतो, परंतु अशा पुष्कळ जागा असतात जिथे नीतीविचार पुरा पडत नाही. त्यामुळे नैतिकता समाजासाठी असली तरी ती अखेरीस व्यक्तीनिष्ठ राहते.

म्हणूनच समाजात जे जे प्रश्न दिसतात त्यांचा विचार निव्वळ नैतिकतेच्या कसोटीवर करून चालत नाही. अमुक एक वर्तन सर्वांच्या हिताचं आहे म्हणून बरोबर आहे हे ठीक. परंतु त्याच्याही पुढे जाऊन ते नैसर्गिकरित्याच बरोबर आहे असा आग्रह धरला जाणं थोडं गडबडीचं आहे. मुळात नैसर्गिक म्हणजे काय याबाबतच आपला बरेचदा घोळ होतो. कारण वर्तनाला आपण नैतिकतेच्या फूटपट्टीने मोजायचा प्रयत्न करतो. प्रत्यक्षात जे ‘चांगलं’ आहे आणि जे ‘वाईट’ आहे ते सगळं नैसर्गिकच आहे. निसर्ग हा ‘चांगला’, ‘दयाळू’, ‘क्षमाशील’ असा काही नसतो. निसर्ग म्हणजे 'असणं'. निसर्गाला मूल्यदृष्टी नाही. असलीच तर 'अस्तित्वदृष्टी' आहे. अस्तित्व टिकवण्याच्या संघर्षाचं अविरत फिरणारं चक्र हा निसर्गाचा प्रमुख भाग आहे. त्यात आपण ज्याला ‘चांगलं’ म्हणतो असे पैलू आहेत आणि आपण ज्याला ‘वाईट’ म्हणतो असे पैलूही आहेत. ‘चांगलं’ आणि ‘वाईट’, ‘चूक’ आणि बरोबर’ हा निर्णय सतत घ्यावा लागत असल्याने माणूस निसर्गत: जसा आहे तसा व्यक्त होत नाही. माणसावर नियंत्रण असावं या हेतूच्या पूर्ततेसाठी ते योग्य असलं तरी त्यामुळे माणसाची घुसमट होणे आणि त्यातून दुर्वर्तन होणे हीदेखील एक बाजू आहे.

‘दुर्वर्तन’ त्रासदायक असल्यानेच तो अभ्यासाचा विषय असायला हवा. आपल्या अंतरंगात भावभावनांचा, उलटसुलट विचारांचा कल्लोळ माजलेला असतो. परंतु तो उलगडून समोर मांडण्याची पद्धत आपण विकसित केलेली नाही. आपण भाषेच्या माध्यमातून आपल्या मनातील बोचऱ्या, दुखऱ्या, गोंधळलेल्या जागांचं नेमकं वर्णन करू शकलो तर आपलं सहअस्तित्व पुष्कळच सुकर होईल. इथे काळजी घ्यायची आहे ती एकच. ‘तुझ्या मनात असं आलंच कसं?’, ‘हे काहीतरी भयंकरच आहे’ अशा प्रतिक्रिया न देता मनातलं आधी पूर्ण ऐकून घ्यायचं. कारण मनातलं भयंकर असलं तरी ते ‘असतं’. मागच्या लेखात आपण लैंगिक गुन्ह्यांवरील उपायांसंबंधी बोलू असं म्हटलं होतं. मला पुरुषांच्या संदर्भात, त्यांच्या कामेच्छेच्या संदर्भात त्यांनी त्यांची कामेच्छा स्त्रीकडे स्पष्टपणे प्रकट करावी आणि त्यामुळे बिचकून न जाता स्त्रीने ती ऐकून त्यावर आपला निर्णय द्याावा हा एक पहिला उपाय सुचवावासा वाटतो. आपण पुरुषांबाबत बोलतो आहोत म्हणून पुरुषाचा उल्लेख केला आहे. वास्तविक विविध प्रकारचं ‘सेक्शुअल ओरिएंटेशन’ असणाºया सर्वांनाच ते लागू होतं.

आता हे बोलायला, लिहायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात करायला अवघड आहे असा प्रतिवाद होईल. तो बरोबर आहे. कारण आपण कामेच्छेचा निषेध पुष्कळ केला आहे. कामेच्छेला समजून घेतलेलं नाही. इथे पुन्हा प्रेमाचीच आठवण होते. प्रेम म्हटलं की आपल्याला ‘लफडं’ आठवतं. आपण प्रेमाकडे निर्मळपणे पाहण्यात बरेचदा कमी पडतो. (आता पुढे बोलायचं झालं तर आपण राग, द्वेष, मत्सर, अहंकार या आणि अशा विविध भावच्छटांनाही समजून घेत नाही. ‘द्वेष करणे हे वाईट’ हे ठीक आहे, पण तरी ‘द्वेष वाटतो' त्याचं काय? आता त्यावर काम करायचं तर आधी त्याविषयी बोलायला हवं. ते ऐकून घेतलं जायला हवं. या भावभावनांची ताकद फार मोठी आहे. त्यांच्या प्रभावामुळे पडलेला लहानसा तडा जर वेळीच सांधला गेला नाही तर पुढे जाऊन आणखी विध्वंस होऊ शकतो. सध्या इथे थांबून कामेच्छेकडे परत येऊ.)

कामेच्छेवर त्वरित 'अंमल' करण्याची पुरुषाची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला वळण देण्यासाठी कामेच्छेचं शब्दातून प्रकटीकरण हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. शिवाय पुरुषांना (मुलांना) त्याबाबत कुणा स्त्रीशी बोलता आलं तर अधिकच बरं होईल. पुरुषाची सामाजिक आणि जैविक गोची झाल्याने त्याचं कामविश्व एकूणातच डळमळीत, अस्थिर, गुंतागुंतीचं, त्याच्या मनोविश्वावर ‘हावी’ होणारं झालं आहे. स्त्री ही त्याच्या कामेच्छेचा विषय आहे तो जैविक अंगाने. सामाजिक अंगाने स्त्री हा मनुष्यत्वाचा, स्वतंत्र अस्तित्वाचा विषय आहे. परंतु या दोन्ही अंगांनी या विषयाचं प्रगल्भ ज्ञान त्याला झालेलं नाही. पितृसत्ताक व्यवस्था त्याला स्त्रीच्या अंतरंगाशी एकरुप होऊन तिला समजून घेऊ देत नाही तर कामेच्छेचं नियोजन न झाल्याने ती उफाळून वर येत त्याच्या विवेकाचाही कब्जा घेते. अशा परिस्थितीत त्याचा जर स्त्रीशी संवाद होत राहिला तर बदलाची शक्यता वाढेल. माझा व्यक्तिगत अनुभवही याला पुष्टी देणारा आहे. हेटरोसेक्शुअल पुरुष म्हणून माझं कामविश्व कसं आहे, त्यातल्या अवघड जागा कोणत्या, प्रश्न कोणते हे सगळं ऐकून घेणाऱ्या मैत्रिणी जेव्हा मला भेटल्या आणि त्यांनी जेव्हा ‘तुला जे होतंय ते ठीक आहे. त्याचा ताण घेऊ नकोस.  त्याविषयी आपण बोलत राहू’, असं सांगितलं तेव्हा माझा मानसिक भार हलका व्हायला मदत झाली. (मला अशा मैत्रिणी उशिरा आणि एक-दोघीच भेटल्या. आज जी मुले विशीत आहेत त्यांना अशा मैत्रिणी असतील अशी आशा करतो!)

कामेच्छा स्त्रीसमोर शब्दांतून प्रकट केल्याने त्यातील तीव्रता, अनावरता कमी व्हायला मदत होण्याबरोबरच या विशिष्ट इच्छेचं ‘सामान्यीकरण’ व्हायलाही मदत होईल. पुरुष आणि स्त्री दोघांनाही ही इच्छा सहजभावाने घेता येणं शक्य होईल. यापुढे जाऊन कामेच्छेचं नियोजन हा मुद्दा येतो. इथे जे पुरुषविशिष्ट ‘प्रॉब्लेम एरियाज’ आहेत तिथे काम करण्याची एक कल्पना मला सुचते. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी, अगदी घरातदेखील होणारा स्त्रियांचा लैंगिक छळ ही एक मोठी समस्या आहे. याबाबत कायदाही केला गेला आहे आणि कायद्याातील तरतुदींमध्ये पुरुषांचं प्रशिक्षण, सुधारणा यासाठीची स्पेस उपलब्ध आहे. लैंगिक दुर्वर्तन करणारा पुरुष आढळल्यास त्याच्या मानसिकतेचं ‘ऑडिट’ करण्याची काही एक प्रक्रिया होऊ शकली तरी त्याच्यात सुधारणा व्हायची शक्यता वाढेल. स्त्रीची स्वतंत्र आणि सक्षम व्यक्ती म्हणून नोंद घेण्याची वृत्ती घडवणं आणि त्याबरोबरच त्याच्या कामविश्वाबाबत त्याला बोलतं करून त्याची ‘तपासणी’ करत राहणं अशा दोन उद्देशांनी हे ‘ऑडिट’ करता येऊ शकेल. याला पुरुष चटकन् तयार होणार नाहीत हे खरं, परंतु माणसाला बोलतं करण्यासाठी काही क्रिएटिव्ह उपाययोजना करता येतात. त्यातून हळूहळू माणसं मोकळी होतात. उदा. एखाद्याा ऑफिसमधल्या पुरुषांना ‘मला सतावणारे कामविषयक प्रश्न, ‘मला माझ्या आसपासच्या स्त्रियांबद्दल काय वाटतं’ किंवा या धर्तीवरचे प्रश्न देऊन त्यांना त्यांचं म्हणणं निनावी पद्धतीने लिहायला सांगता येईल. पुरूषांची मानसिकता बदलायला हवी आहे यात शंकाच नाही. ती कशी बदलायची हा प्रश्न आहे आणि त्यासाठी आपल्याला आपली कल्पनाशक्ती राबवावी लागेल.  

लैंगिक कुतूहल जागं होणं या पहिल्या टप्प्यापासून ते विस्कळीत, वाईट प्रकारे मनात रुजणं या दरम्यानच्या विविध टप्प्यांवर पुरुषांसाठी काही कार्यक्रम आखता येतील. कोणत्याही सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयासारखाच हाही विषय सविस्तर बोलण्याचा आहे. आपला समाज फार मोठ्या प्रमाणात विभाजित आहे. त्यामुळे मुंबईतल्या एखाद्याा मोठ्या ऑफिसमध्ये काम करणारा विवाहित पुरुष आणि त्याच मुंबईत रोजंदारीवर काम करणारा एखाद्याा स्थलांतरित मजूर यांच्या कामविश्वाबाबत वेगळा विचार करावा लागेल. महत्त्वाची गोष्ट ही की स्त्रीला निर्भयपणे, कुठल्याही बाह्य ताणाशिवाय वावरता येण्यासाठी आपण पितृसत्ताक व्यवस्थेचा, पारंपरिक पुरुषी मानसिकतेचा निषेध करण्याच्या पलीकडे जाऊन या व्यवस्थेत, मानसिकतेत बदल व्हावेत यासाठी एकत्र येऊन आपण काय करू शकतो हे शोधणं. स्त्री-पुरुष संबंध आणि विशेषत: कामेच्छा हा ‘अस्थिर’ विषय आहे. त्यामुळे त्याबाबत निर्णायक बोलण्याची घाई न करता विश्लेषणात्मक बोलण्याची मानसिकता तयार करणे हा यातला पहिला टप्पा ठरेल.

Saturday, November 10, 2018

पुरूषातील लैंगिकता, लैंगिकतेतील पुरूष

अलीकडे चित्रपटगृहात एक अत्यंत प्रभावी (आणि महत्त्वाची) जाहिरात बघण्यात आली. नाव नेमकं आठवत नाही, पण हेल्पलाइनची जाहिरात आहे. एक मध्यमवयीन गृहस्थ लिफ्टमध्ये शिरतो. त्याच्यामागे एक लहान मुलगा फुटबॉल की बास्केटबॉलशी खेळत आत शिरतो. त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर अस्वस्थ भाव आहेत. लिफ्टचं दार बंद होतं. पुढच्या दृश्यात लिफ्टचं दार उघडतं. मुलगा बाहेर पडतो. पाठोपाठ हा गृहस्थही बाहेर पडतो. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तसेच आहेत. जाहिरात इथे संपते आणि स्क्रीनवर कॅप्शन झळकते - 'डू यू लाइक चिल्ड्रेन इन अ वे यू शुड नॉट?' हेल्प इज अ‍ॅव्हलेबल.' (लहान मुलं ज्या प्रकारे आवडायला नकोत त्या प्रकारे तुम्हाला आवडतात का? आम्ही तुम्हाला याबाबत मदत करू शकतो.) 

ही जाहिरात पाहून मला अतिशय बरं वाटलं. एखाद्या प्रश्नाचा केवळ निषेध करण्यापेक्षा तो प्रश्न समजून घेऊन नेमक्या जागी काम करायचा प्रयत्न करणाऱ्या उपक्रमाची ती जाहिरात होती. आता यानंतर माझ्या मनात आलं की याच धर्तीवर आणखी एक जाहिरात करता येईल. त्यात लहान मुलाच्या जागी एक स्त्री असेल. पुरूष तोच असला तरी चालेल. जाहिरात संपल्यानंतर कॅप्शन अशी असेल - स्त्रीकडे बघून तुम्हांला सतत उत्तेजित व्हायला होतं का? आम्ही तुम्हाला याबाबत मदत करू शकतो! 

मला जे म्हणायचं आहे ते बहुधा तुमच्या लक्षात आलं असेल. गेल्या दोन-तीन लेखांत आपण प्रेमसंबंधांविषयी बोललो होतो. त्यानंतर लैंगिक संबंधांविषयी मला काही सांगायचं होतं आणि ही जाहिरात माझ्या मदतीला धावून आली!     

कामेच्छा हा प्रेमासारखाच एक महत्त्वाचा विषय आहे. या विषयाबाबत खुलेपणाने, विश्लेषणात्मक बोलण्याइतपत आपण आपली 'सामाजिक मनोभूमिका' तयार केलेली नाही. प्रेमाबाबत जे झालं आहे तसंच काहीसं इथेही झालं आहे. 'संस्कृती'च्या उभारणीत काही गोष्टी नाकारल्या जातात, काही स्वीकारल्या जातात हे आपण मागे एकदा म्हटलं आहे. यात होतं असं की एका बाजूला सांस्कृतिक रचितं तयार होत असली तरी दुसऱ्या बाजूला त्यांना छेद देणारी 'वास्तव रचितं'ही असतात. लैंगिकतेबाबतचं वास्तव, लैंगिक इच्छेचं प्रकटन हा एक चिंताजनक विषय झाला आहे हे आपल्याला दिसतंच आहे. बलात्कारांच्या वाढलेल्या घटना, त्यातील हिंसाचार, पुरूषांकडून कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक, लग्नव्यवस्थेअंतर्गत असणारे बलात्कार व लैंगिक असमाधानाशी जोडलेले प्रश्न असे अनेक मुद्दे आहेत. लग्नसंस्था, लैंगिक संबंध आणि नैतिकता यावर स्वतंत्रपणे बोलता येईल. या लेखात आपण प्रामुख्याने 'पुरूषी लैंगिक वर्तन' यावर चर्चा करू. 

स्पिनोझा या सतराव्या शतकातील डच तत्वज्ञाचं एक मननीय विधान आहे - 'माणसाच्या कृत्यांकडे पाहून रडण्यापेक्षा, हसण्यापेक्षा किंवा त्यांचा तिरस्कार करण्यापेक्षा ती समजून घेण्याचा मी सतत प्रयत्न करतो.' माणसाची कृत्ये समजून घेणं अशाकरता महत्त्वाचं की ते नीट झालं तरच आपण प्रश्नांच्या उत्तराच्या दिशेने जाऊ शकतो. मला लैंगिकतेच्या क्षेत्रात हा विचार लक्षणीय वाटतो. पुरूषांचं लैंगिक वर्तन अनेक प्रकारांनी विस्कळीत, वाईट आणि स्त्रीसाठी अतीव दुःखदायक असं राहिलेलं आहे. पुरूषसत्ताक व्यवस्थेमध्ये पुरूषाचा अहंकार जोपासला जातो, स्त्रीला दुय्यम स्थान मिळतं आणि तिचं शोषण होतं हे तर आहेच. या व्यवस्थेने पुरूषाचीही गोची केली आहे आणि त्याच्यातला 'माणूस' झाकोळला आहे. पण व्यवस्थाजन्य अहंकाराबरोबरच पुरूषाची कामेच्छा हादेखील एक घटक असेल तर त्यावर मात करण्यासाठी आधी त्याचा अभ्यास केला पाहिजे. आज मासिक पाळीसारख्या विषयावर खुलेपणाने बोललं जातं आहे हे अतिशय स्वागतार्ह आहे. त्याच खुलेपणाने पुरूषाच्या 'इरेक्शन'विषयी, वीर्यस्खलनाविषयी देखील बोललं जाणं आवश्यक आहे. विशिष्ट वयात मुलींशी आणि मुलांशी त्यांच्या 'मनातील लैंगिकतेविषयी' बोललं जाणं आवश्यक आहे. आज जर पुरूषाचं लैंगिक वर्तन अडचणीचं ठरत असेल तर या विषयासंबंधीच्या विश्लेषणात्मक चर्चेला सामाजिक चर्चाविश्वात स्थान मिळायला हवं. 

र. धों. कर्वे यांच्या 'समाजस्वास्थ' मासिकात स्वतःच्या कामजीवनातील अडचणींबाबत वाचक पत्र लिहीत. वीर्यस्खलन, कामोत्तेजना, शरीरसंबंध, संतती नियमन यांच्याशी संबंधित प्रश्नांबाबत एका मराठी मासिकातून १९३०-१९४० च्या दशकांत चर्चा होत असे तशी चर्चा नंतर होत होती का माहीत नाही. आज अशी चर्चा करणारं मासिक/वृत्तपत्र नाही. माध्यमांचा इतका मारा असताना लैंगिक संबंधांवर नेमकेपणाने बोलणाऱ्या चर्चा, व्हिडीओज बघायला मिळत नाहीत. इंग्लिशमध्ये आहेत, मराठीत नाहीत. २००८ पासून 'समाजस्वास्थ्य' या मासिकाचं त्याच नावाने पुनुरुज्जीवन करण्याचा प्रयत्न मनीषा सबनीस यांनी केला. त्यात लैंगिक प्रश्नांविषयी चर्चाही होत असे. पण पुढे हे मासिक तग धरू शकलं नाही.      

पुरूषाची कामेच्छा आणि स्त्रीची कामेच्छा यात फरक आहेत का? असल्यास का? कोणते? पुरूषाच्या लैंगिक इच्छेचं नेमकं स्वरूप काय आहे? त्याची लैंगिक इच्छा गुन्हेगारी वळण का घेते? लैंगिक इच्छा नियंत्रणाबाहेर जात असेल तर त्यावर उपाय काय? हे या चर्चेतील काही समर्पक प्रश्न आहेत. मुळात सजीवांमध्ये लैंगिक इच्छा असते याचं एक प्रमुख कारण लैंगिक संबंधांतून प्रजोत्पादन होतं हे आहे. आपली गुणसूत्र टिकवून ठेवणं, त्यासाठी संतती जन्माला घालणं ही सजीवांची एक मुख्य प्रेरणा आहे. भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल वाटणारं आकर्षण, त्यातून लैंगिक इच्छा चेतवली जाणं याच्या मुळाशी प्रजोत्पादनाचा 'ड्राइव्ह' आहे. अर्थात प्रजोत्पादन करायचं नसेल तरी माणसामध्ये लैंगिक इच्छा निर्माण होते. याचं कारण लैंगिक संबंधांतून केवळ प्रजोत्पादनच होत नाही तर 'प्लेझर'देखील मिळतं आणि प्रजोत्पादन व प्लेझर या दोन गोष्टी वेगळ्या करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. त्यामुळे 'प्रजेच्या जबाबदारीचं' ओझं टाळून निव्वळ आनंद' ही बाब माणसामध्ये या क्रियेचं आकर्षण वाढवण्यास कारणीभूत ठरली आहे. याची नोंद घेऊन पुरूषांच्या संदर्भाने विचार करता लैंगिक इच्छा निर्माण होणं, ती वाढणं, नियंत्रणाबाहेर जाणं आणि परिणामी त्यांच्याकडून गुन्हा घडणं या साखळीचा जर नीट अभ्यास केला, त्याबाबत पुरूषांना बोलतं केलं गेलं तर पुरूषाचा विवेक जागवायला मदत होऊ शकेल. कामेच्छा आणि स्त्रीवर नियंत्रण ठेवण्याची, अहंकाराची पुरूषसत्ताक व्यवस्थेकडून मिळालेली 'देणगी' या दोन्हीचा प्रभाव पुरूषाच्या मानसिकेतेवर आहे. याची उकल करून ती पुरूषांसमोर मांडत राहणं गरजेचं आहे.      

पुरूषाच्या बाबतीत लैंगिक तृप्ती हे विरेचनाचं माध्यम आहे. या तृप्तीअभावी, इरेक्शनच्या परिणामी पुरुषांत अवघडलेपण येतं, त्याचं मनःस्वास्थ्य गडबडू शकतं आणि ही इच्छा त्याच्या विवेकावरदेखील मात करू शकते. लैंगिक इच्छेची ही 'उत्क्रांतीजन्य ताकद' नोंद घेण्याजोगी आहे. ज्या पुरूषाची स्त्रीबाबतची मानसिकता मध्ययुगीनच आहे त्याला त्याच्या लैंगिक इच्छेबाबत काही प्रश्नच पडणार नाही. कारण त्याच्या दृष्टीने स्त्री ही भोग्य वस्तूच आहे. पण अशी मानसिकता नसणाऱ्या पुरूषांबाबतही लैंगिक इच्छा आपला प्रभाव दाखवते का हे तपासणं आवश्यक आहे. याबाबत एक उदाहरण आठवलं. 'मी टू' चळवळीत चित्रपट दिग्दर्शक विकास बहल याच्यावर आरोप झाले. विकास बहलने 'क्वीन' हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. जो पुरूष स्त्री स्वातंत्र्याचा एक सशक्त उद्गार असलेला चित्रपट तयार करतो तो वास्तवात संपूर्णपणे वेगळा, पारंपरिक पुरूषी मानसिकतेचा असू शकतो ही एक शक्यता आहेच. पण तो तसा नसून काही परिस्थितीजन्य कारणांमुळे किंवा मनःस्थिती बिघडून, नियंत्रण सुटल्यामुळे त्याच्याकडून अपराध घडला का हेही तपासायला हवं. मुद्दा हा की केवळ आरोप-प्रत्यारोपात न अडकता, शक्यता विचारात घेत, त्यांचा शोध घेत आपण समस्येच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार की नाही? बलात्काराकडे इव्होल्यूशनरी बायॉलॉजीच्या अंगाने पाहणारं ’नॅचरल हिस्टरी ऑफ रेप : बायॉलॉजिकल बेसेस ऑफ सेक्शुअल कोअर्शन’ हे रँडी थॉर्नहिल आणि क्रेग पाल्मर या लेखकद्वयीचं एक पुस्तक आहे. यातील एका परिच्छेदाचा माझ्या एका लेखासाठी मी अनुवाद केला होता. तो इथे देतो आहे -
           
मनुष्यांमधील बलात्काराची अंतिम कारणे स्त्री-पुरूषांच्या लैंगिक उत्क्रांतीमधील फरकातच सापडतील. स्त्रीच्या लैंगिकतेचं नियमन करणाऱ्या मानसिक यंत्रणा स्त्रीमध्ये उत्क्रांत झाल्या आणि त्याला प्रतिसाद म्हणून बलात्कार ही क्रिया उत्क्रांत झाली असे पुरावे सांगतात. स्त्री तिच्यातील या मानसिक यंत्रणांमुळे आपल्या संभाव्य लैंगिक जोडीदारांमध्ये भेद करू शकली. नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेत जर मानवी स्त्रीची निवड 'कुठल्याही नराबरोबर, कुठल्याही परिस्थितीत रत होण्यास तयार' अशी झाली असती तर बलात्कार घडला नसता. दुसऱ्या बाजूला, नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेत जर मानवी पुरूषाची निवड 'विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट मादीकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होणे' अशी झाली असती तर बलात्कारांचं प्रमाण खूपच कमी असतं आणि 'जी स्त्री समागम करण्यास उत्सुक आहे त्याच स्त्रीशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा' अशा प्रकारे जर मानवी पुरूषाची नैसर्गिक निवड झाली असती तर बलात्काराची शक्यताच नष्ट झाली असती!

लैंगिक इच्छा, तिचं घडणं-बिघडणं आणि त्याचं प्रतिबिंब लैंगिक वर्तनात पडणं यामागे जैविक आणि सामाजिक दोन्ही घटक जबाबदार असतात आणि त्यामुळे लैंगिक गुन्ह्यांबाबत या दोन्ही अंगांनी विचार करून उपाय शोधावे लागतील हे नोंदवून आपण थांबू आणि पुढील लेखात उपायांचा विचार करू.