Saturday, May 27, 2017

'भारत' नावाचा कोलाहल 

ज्या विविध ताण्या-बाण्यांनी 'भारत' ही 'घटना' घडत आलेली आहे ते ताणे-बाणे अभ्यासणे ही एक विलक्षण गोष्ट आहे, दमवणारी गोष्ट आहे. भारताच्या इतिहासाबाबतच काय, पण वर्तमानाबाबतही काही निश्चितपणे बोलणे अवघड आहे कारण भारतीय समाज एकाच वेळी विविध कालखंडात वावरत असती. भारतीय समाज ज्या विविध राजकीय आणि सामाजिक वळणांच्या प्रवाहातून वहात गेलेला आहे त्यांची गती आणि दिशा समजून घेणे सोपे नाही. कारण या प्रवाहांचे वाहणे जसे स्वतंत्र आहे तसेच ते एकमेकांत गुंतलेलेही आहे. आचार-विचार, श्रद्धा-समजुती, रूढी-परंपरा यांचे कमालीचे वैविध्य, त्यांच्यातील झगडा आणि या वैविध्याला कवेत घेऊन कधी अतीव कष्टाने तर कधी क्लांत समाधानाने उभे असलेले 'भारतीयत्व' ही जगभरातल्या समाजशास्त्रज्ञांसाठी कुतूहलाची गोष्ट ठरत आली आहे यात नवल नाही.   

भारतीयत्वाच्या बहुविधतेचा हा धागा पकडून आजच्या भारतातील परिस्थतीविषयीची निरीक्षणे मांडणारे 'इंडिया डायव्हर्सिटी' हे पुस्तक म्हणजे इथल्या विविधतेची आणि खरे म्हणजे विविध प्रश्नांची एक छोटी सफर आहे. पुस्तकात एकूण १८ लेख आणि काही कविता आहेत. बरेचसे लेख विविध इंग्लिश नियतकालिकांतून, रीसर्च जर्नल्समधून आधी प्रकाशित झालेले आहेत. पुस्तकाचे संपादन हिल्डा डेव्हिड आणि फ्रान्सिस जार्मन यांचे आहे. हिल्डा डेव्हिड पुण्यातील सिम्बायोसिस महाविद्यालयात प्राध्यापक आहेत तर फ्रान्सिस जार्मन जर्मनीतील हिल्डशाईम विद्यापीठातील इंग्लिश, सांस्कृतिक अभ्यास आणि आंतरसांस्कृतिक संवादाचे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांनी इजिप्त, थायलंड, जपान व युरोपातील विविध विद्यापीठांमधूनही अध्यापन केले आहे.पुस्तकाची सुरूवात त्यांच्याच लेखाने होते. लेखात त्यांनी  'वैविध्य' आणि 'भिन्नत्व' या संकल्पनांची चर्चा केलेली आहे. माणसाला विशिष्ट माणूस 'आपला' वाटतो आणि विशिष्ट माणूस 'वेगळा' वाटतो, हे का होते? आज ज्ञान-तंत्रज्ञान युगातही माणसातल्या आदिम आणि संपादित प्रेरणा माणसाला माणसापासून दूर किंवा जवळ करतात हे आपण अनुभवतो. यात भाषा, वर्ण, धर्म, जात हे मुद्दे तर आहेतच, पण स्त्री आणि पुरूष हे भिन्नत्वदेखील स्त्रीला पुरूष व पुरूषाला स्त्री समजण्याच्या आड येते. जार्मन यांनी इथे 'जेंडर कल्चर' ही संज्ञा वापरली आहे. आणि याचाच पुढचा भाग म्हणजे लैंगिक प्रवृत्तीमुळे (सेक्शुअल ओरिएंटेशन) आलेली भिन्नत्वाची भावना. अर्थात या विविध मुद्द्यांच्या 'वैज्ञानिक खोला'त न जाता त्यांनी लेखाचा रोख भारताच्या सामाजिक-राजकीय घडणीवर ठेवला आहे. 

२००२ च्या गुजरात दंगलीवर 'फायनल सोल्यूशन' हा माहितीपट तयार करणारे राकेश शर्मा यांची मुलाखत भाजपच्या २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या विजयाचा ऊहापोह करणारी आहे. विविध राज्यात भाजपने वापरलेली रणनीती, नरेंद्र मोदी-अमित शहा यांचे संघटन कौशल्य व इतर आनुषंगिक बाबींवर ते बोलले आहेत. ही मुलाखत सप्टेंबर २०१४ मधील आहे. मुलाखतीच्या अखेरीस त्यांनी भाजपच्या पुढील वाटचालीबाबत उत्सुकता दर्शवली आहे. संघाच्या कडव्या हिंदुत्वाचाच आधार घेत भाजप पुढे जाणार की राष्ट्रीय ओळख आणि राष्ट्रीय प्रभाव निर्माण करण्यासाठी 'सेंटर-राईट' पक्ष म्हणून आपली प्रतिमा निर्माण करणार? २०१९ मध्ये जे नवीन मतदार असतील (अंदाजे ३५ कोटी) त्यांच्यापुढे भाजप कुठला चेहरा घेऊन जाईल? या प्रश्नांची उत्तरे 'डायव्हर्स' आहेत आणि वादाला आमंत्रण देणारी आहेत हे वेगळं सांगायला नको. 

लेखिका गीता हरिहरन यांचा लेख दिल्लीतील निर्भया बलात्कार घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली शहर आणि लगतच्या हरियाणाचे भीषण वास्तव समोर ठेवतो तर या लेखानंतरचे आर्मेन मोदी यांचे अनुभवकथन बचतगटांच्या मदतीने खेड्यातील स्त्रियांच्या जगण्यात घडणाऱ्या 'सायलेंट रिव्होल्यूशन'चे चित्रण करतो. कवी, नाटककार आणि समलिंगी व्यक्तींच्या हक्कांसाठी लढणारे आर. राज राव यांचा लेख कलम ३७७, भारतीय कायदा आणि समलिंगी संबंधांबाबतची सामाजिक मानसिकता यावर विस्तृत भाष्य करणारा आहे. समलैंगिकतेचा धावत ऐतिहासिक आढावाही त्यांनी घेतला आहे. दुसऱ्या महायुद्धात नाझी पक्षाने जर्मनीतील समलिंगी व्यक्तींना जी क्रूर वागणूक दिली तो अध्यायही या लेखात आला आहे. आदिवासी व वन्य जमातींचा समावेश असणाऱ्या डीनोटीफाईड ट्राइब्जपैकी (डीएनटी) बऱ्याच जमातींना चुकीने 'गुन्हेगार जमाती' ठरवले गेले आहे. या प्रश्नाचा मागोवा घेणारा मंजू रामानन यांचा लेख पुस्तकात आहे. ईशान्येकडील राज्यांमधील सांस्कृतिक भिन्नता, तिथले स्थलांतरितांचे प्रश्न, फुटीर संघटनांच्या हालचाली, धर्माचे राजकारण याची चिकित्सा दिब्यज्योती सरमा यांनी केली आहे. वाल्मिकी रामायणातील मानव, वानर व राक्षस हे तीन मुख्य समूह व त्यांच्या समूहांतर्गत असणाऱ्या भिन्न चालीरीती (विशेषतः स्त्री-पुरूष संबंध, विवाहसंस्था) आणि त्यांच्या संघर्षातून निर्माण झालेले प्रश्न याचा रोचक वेध अर्शिया सत्तार यांनी घेतला आहे. शूर्पणखेला रामायणातील संघर्षाचा आरंभबिंदू म्हणता येईल. राक्षसी म्हणून शूर्पणखेला तिला आवडणाऱ्या पुरूषांना मिळवण्याचा 'राक्षस धर्मदत्त' अधिकारच आहे. याचा सामना जेव्हा राम-लक्ष्मणाच्या 'अयोध्या धर्मा'शी होतो तेव्हा संघर्ष सुरू होतो. मानव, वानर व राक्षस स्त्रियांचे व त्यांच्या सामाजिक अधिकारांचे वाल्मिकी रामायणातील चित्रण पुष्कळच बोलके आहे.

भारतात धार्मिक संघर्षाच्या त्रिकोणाचे तीन कोन म्हणजे हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन. एम. एच. जफर आणि जोएल टिमोथी यांनी अनुक्रमे इस्लामच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता आणि भारतातील ख्रिस्ती धर्माचे, विशेषतः चर्चचे  स्थान यावर विवेचन केले आहे. जफर यांचा लेख त्रोटक आहे. इस्लामच्या काही माहीत नसलेल्या बाजूंविषयी ते बोलले आहेत, पण इस्लामचे आजचे सर्वसाधारण स्वरूप दहशतवादाशी जोडले गेलेले असल्याने कुराणचे आकलन, इस्लामचा गाभा आणि त्यातील गुंतागुंत अधिक स्पष्टपणे समोर यायला हवी होती असे वाटते. भारतातील चर्चचे इतिहास-वर्तमान मांडताना चर्चमध्ये जातीव्यवस्था आपली भूमिका बजावते हे जोएल टिमोथी यांचे निरीक्षण महत्त्वाचे आहे. चर्चसंबंधी त्यांनी एकूणातच परखडपणे आपली भूमिका मांडली आहे. 

नाटककार रामू रामनाथन यांचा ललित व माहितीपर अशा दोन अंगांनी लिहिलेला लेख महाराष्ट्रातील विद्रोही चळवळीतील कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा विस्तृत आलेख मांडतो. कबीर कला मंच, नागपूरचा देशभक्ती युवा मंच आणि यातील कलाकारांना झालेली अटक, मुंबईत शिवाजी पार्कवर झालेले साहित्य संमेलन आणि धारावीत आयोजित केले गेलेले विद्रोही साहित्य संमेलन, महाराष्ट्राचे गदर म्हणून ओळखले जाणारे शाहीर संभाजी भगत यांच्या 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाला झालेला विरोध, 'विद्रोही' मासिकाचे संपादक सुधीर ढवळे यांच्या अटकेचा तपशील (यात त्यांच्यावरील आरोपपत्रातील काही भागही दिला आहे) हे सर्व मांडत त्यांनी शासनाच्या भूमिकेवर प्रश्न उभे केले आहेत. कबीर कला मंचाच्या दोन केसेसबाबत (पहिली ज्योती चोरगे व सुषमा रामटेके आणि दुसरी दीपक डेंगळे व इतर) न्यायाधीश अभय ठिपसे यांनी जो निकाल दिला त्यातील पहिल्या केसच्या २६ पानी निकालपत्रातील काही महत्त्वाचे मुद्दे लेखात जसेच्या तसे उद्धृत केले आहेत. माओवादी चळवळीचा विचार करताना सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक भेदभावामुळे वंचित समूहातील अनेक लोक माओवादाकडे आकर्षित होतात आणि त्यामुळे त्या सर्वांना दहशतवादी संघटनेचे सभासद समजणे चुकीचे आहे असे निकालपत्रात म्हटले आहे. विद्रोही कलावंतांबाबत शासनाच्या नकारात्मक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा उठून दिसतो. मराठी वाचकांना महाराष्ट्रातील विद्रोही चळवळीतील घडामोडींची ओळख करून घ्यायच्या दृष्टीने हा लेख उपयुक्त ठरेल. 

प्रमिला पॉल यांचा लेख भारताच्या सहिष्णू-असहिष्णू अशा संमिश्र रूपाकडे लक्ष वेधतो. टी. डब्ल्यू. गेराघटी या आयरिश लेखकांचा एका परदेशी माणसाच्या नजरेतून दिसणाऱ्या भारताविषयीचा लेखही अशाच स्वरूपाचा आहे. पुस्तकात याखेरीज जेरी पिंटो, संयुक्ता दासगुप्ता. गायत्री पगडी यांचे ललित स्वरूपाचे लेख आहेत. लॅमिंग्टन रोडला केंद्रस्थानी ठेवून मुंबई महानगरातील घरांचे प्रकार, घराभोवतीचे पर्यावरण आणि इथल्या 'प्रॉपर्टी मार्केट'मध्ये होणारे बदल टिपणारा प्रसाद शेट्टी व रूपाली गुप्ते यांचा लेख आहे. मीना कंडासामी, पीर खान व अरुंधती सुब्रमणियम यांच्या कविता आहेत. 

या देशातील विविधता,  त्या पार्श्वभूमीवर ठळक होणारा लेखकाचा आस्थाविषय आणि त्याचे लेखकाला जाणवलेले पैलू, परिघावरील / उपेक्षित लोकांच्या जगण्याचे प्रश्न, त्यांच्या सामाजिक अस्तित्वाशी जोडलेले न्यायाचे प्रश्न आणि यातून लेखकाच्या मनात उमटलेली प्रतिक्रिया हा संपूर्ण पुस्तकाचा अंतःस्वर आहे. यात प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न फारसा नाही तर प्रश्नाची व्याप्ती वाचकांना जाणवून द्यायचा प्रयत्न आहे. सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक म्हणजे भारतातल्या काही ठिकाणांची धावती सफर आहे. पुस्तकाचे शीर्षक 'इंडिया डायव्हर्सिटी' असे असले तरी पुस्तकाचे स्वरूप या डायव्हर्सिटीमुळे निर्माण होणारे प्रश्न आणि त्यांचा सामना करताना होणारी दमछाक प्रामुख्याने दाखवते. आणि ते योग्यही आहे. कारण 'वैविध्य असूनही भारतातील लोक गुण्यागोविंदाने राहतात' या विधानाबरोबरच 'ते गुण्यागोविंदाने राहात नाहीत' हेही सांगणे आवश्यक आहे. दोन्ही विधानांमध्ये सत्यांश आहेच, पण अप्रिय सत्यांश न सांगण्याकडे सहसा आपला कल असतो. तो इथे टाळला गेला आहे. मात्र पुस्तकाच्या शीर्षकावरून कदाचित काही वाचकांची दिशाभूल व्हायची शक्यता नाकारता येत नाही. 

पुस्तकातील लेख धावता आढावा घेणारे असले तरी लेखातील मांडणीविषयी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी त्यांचे मत नोंदवू शकतील. पुस्तकात ज्या विषयांना स्पर्श केला गेला आहे त्यातील प्रत्येक विषय अर्थातच स्वतंत्रपणे अभ्यासावा असा आहे. आणि तसे केले तरच त्या विषयाचे योग्य आकलन होऊ शकेल. त्यामुळे भारतातील वैविध्य व त्यातील अडचणी यांचे 'ट्रेलर' म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल. शक्य तितक्या वैविध्यपूर्ण विषयांना हात घालणारे लेख संकलित करून छोटेखानी पुस्तकाच्या माध्यमातून या विषयांची तोंडओळख वाचकांना करून द्यायच्या दृष्टीने पुस्तक नक्कीच उपयुक्त आहे.

इंडिया डायव्हर्सिटी. संपादक : हिल्डा डेव्हिड, फ्रान्सिस जार्मन 
ओम बुक्स इंटरनॅशनल
पृष्ठे : २१५
किंमत : रू. ३५०/-            

(२७ मे २०१७, बुकमार्क - लोकसत्ता)

Sunday, May 14, 2017

स्वराज्यशास्त्र : काही मूलभूत  

राजकारण, परिवर्तनवादी विचाराची स्थिती, उजवे-डावे-मधले यांच्यातील प्रेममय संवाद आणि एकूणातील तप्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 'काही मूलभूत' म्हणून विनोबांच्या 'स्वराज्यशास्त्र'ची आठवण होते. प्रस्तुत टिपणात या पुस्तकाचा परिचय किंवा त्याची सविस्तर चर्चा नाही. काही परिच्छेद, जे मला माझ्या आकलनाच्या दृष्टीने उल्लेखनीय वाटले ते जसेच्या तसे दिले आहेत आणि त्याआधारे मीही काही मांडायचा प्रयत्न केला आहे. यात थोडा विस्कळीतपणा आला आहे, पण तरी मुद्दा पोचेल अशी मला आशा आहे. पुस्तकाच्या आरंभी विनोबांनी 'राजकीय प्रश्नाचे आजचे कृत्रिम अर्थ' आणि 'राजकीय प्रश्नाचा स्वाभाविक अर्थ' अशी दोन टिपणे लिहिली आहेत. ती अशी - 

राजकीय प्रश्नाचे आजचे कृत्रिम अर्थ - 

आजच्या घटकेला मानवसमाजात वरचा वर्ग, मधला वर्ग आणि खालचा वर्ग, असे तीन वर्ग विनाकारण करण्यात येतात. आणि ह्या तीन वर्गांनी परस्परांत कशी व्यवस्था राखावी असा राजकीय प्रश्नाचा कृत्रिम अर्थ केला जातो. हिंदू समाजात कार्यविभागानुसार वर्ण-विभाग कल्पून ह्या वर्णांनी परस्परांत व्यवस्था कशी राखावी, असा राजकीय प्रश्नाचा दुसरा एक कृत्रिम अर्थ केला जातो. तसेच जगामध्ये काही लोकांपाशी सपंत्ती गोळा झाली आहे आणि काही लोकांपाशी ती नाही; ही आजची अवस्था लक्षात घेऊन श्रीमंत आणि गरीब असे किंवा अशांसारखे दोन वर्ग कल्पून ह्या वर्गांनी परस्परांची व्यवस्था कशी राखावी, असा राजकीय प्रश्नाचा आणखी एक कृत्रिम अर्थ केला जातो. 

ह्या तिन्ही अर्थांना कृत्रिम म्हणण्याचे कारण, त्यांची उभारणी काल्पनिक किंवा अ-मूलभूत भेदावर केली आहे हे होय. 'वर, खाली आणि मधे' म्हणजे काय याची व्याख्या कल्पनेशिवाय काहीच नाही. तीन, चार किंवा अधिक वर्ण हे आम्हीच बनवलेले. तेव्हा त्यावर उभारलेली विचारसरणी ही काल्पनिकच, म्हणजे आमच्या कल्पनेची. आणि जेथे ती आहे, तेथे 'मिथ्या' या अर्थाने काल्पनिक नाही असे म्हटले तरी ती मूलभूत तर नाहीच. श्रीमंत आणि गरीब ह्या भेदाला काल्पनिक म्हणणे जड वाटले, तरी तो मूलभूत भेद नाही. म्हणजे तो कारणरूप नव्हे, तर कारण-विशेषाचे कार्य आहे. शिवाय, सूक्ष्म पाहिले तर तो भेद काल्पनिकही आहे. म्हणजे श्रीमंत हा पैशाने श्रीमंत आणि गरीब हा पैशाने गरीब असे म्हटले तर ह्याच्या उलट गरीब हा श्रमशक्तीने श्रीमंत आणि आजचा श्रीमंत म्हणवलेला श्रमशक्तीने गरीब असे म्हणता येईल. असे पाहिले म्हणजे श्रीमंत आणि गरीब याही कल्पना ठरू पाहतात. 

वरील तीन प्रकारांशिवाय, पुन्हा भाषाभेदाला आणि धर्मभेदाला धरून पारस्परिक व्यवस्थेचा प्रश्न उभा करून त्याला राजकीय रूप दिले जाते. पण हेही भेद मूलभूत नव्हेत, असे थोड्या विचाराने लक्षात येईल. 

राजकीय प्रश्नाचा स्वाभाविक अर्थ -  

काही माणसे स्वभावतःच, म्हणजे निसर्गाने, अधिक बुद्धिमान किंवा अधिक शक्तिशाली असतात आणि काही अर्थात कमी बुद्धीचे आणि कमी शक्तीचे असतात. बुद्धी आणि शक्ती ह्या दोहींचा समावेश सामर्थ्य ह्या एका शब्दात करता येईल. ज्याला आपण संपत्ती, साधन-सामग्री, दर्जा इत्यादी म्हणतो, त्या सर्व गोष्टी सामर्थ्यातूनच निर्माण होतात. म्हणून मानवात काही समर्थ आणि पुष्कळसे असमर्थ असे दोन वर्ग कल्पिता येतील. पण वर्ग ह्या नात्याने ते सिद्ध होण्यास त्यांच्यात संघटना कल्पून घ्यावी लागेल. म्हणजे सर्व समर्थ संघटनेने एकवटले तर समर्थांचा वर्ग सिद्ध होईल. अन्यथा तो वर्ग काल्पनिकच. असमर्थ एकवटले तर त्यांचा वर्ग सिद्ध होईल. पण सिद्ध होता क्षणीच तो आत्महत्या करून घेईल. म्हणजे तो असमर्थ ठरणार नाही, समर्थ होईल. कारण सामर्थ्य जसे शक्तीने आणि बुद्धीने तसे संख्येनेही निर्माण होते. उलट तो वर्ग एकवटला नाही तर वर्ग ह्या नात्याने काल्पनिकच ठरेल. 

थोडक्यात हा अर्थ निष्पन्न झाला की समाजात स्वाभाविकपणे वर्ग असा कोणताच नाही, कमीअधिक सामर्थ्याची माणसे आहेत. ह्या कमीअधिक सामर्थ्याच्या माणसांनी मिळून आपली व्यवस्था कशी राखून घ्यावी हा राजकीय प्रश्नाचा मूलभूत आणि स्वाभाविक अर्थ होतो. ह्यातून अ-मूलभूत आणि काल्पनिक अनेक प्रश्न कल्पिता येतात आणि मग पुढे सोडवावेही लागतात. 

यानंतर विनोबांनी 'विविध राज्यपद्धतींचे संभवनीय प्रकार' मांडले आहेत. प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात ही मांडणी आहे. इतर आनुषंगिक विषयांवरही विनोबा बोलले आहेत. यातील काही मुद्दे आदर्शवत वाटतील, कदाचित अव्यवहार्यही वाटतील. पण विनोबांचा हा धागा अर्थातच गांधीजींशी जुळणारा आहे. गांधीजींची ग्रामस्वराज्याची मांडणी किंवा त्यांची माणसाच्या नैतिक उन्नयनाविषयीची मांडणी वाचताना 'हे कसं होणार? हे माणसाच्या मूलभूत ऊर्मींशी फटकून होतंय का?' असं वाटतं, पण तरी एक मान्य होतं की हे 'फंडामेंटली करेक्ट' आहे. त्यांचा 'माणसाचा आदर्श' हा व्यावहारिक वास्तवापेक्षा आकर्षित करतो. गांधींचं 'फंडामेंटली करेक्ट' असणं गांधींना दुर्लक्षित न करता येण्याचं एक प्रमुख कारण आहे. गांधी-विनोबा, त्यांचा आदर्श विचार हे काहीसं व्यायामासारखं आहे. व्यायाम करायचा कंटाळा येतो, पण व्यायाम करणं नेहमीच करेक्ट असतं!

विनोबांचं वरील टिपण किंवा पुस्तकातील पुढील मांडणी वाचतानाही हे होतं. आज आपण राजकारणाचं स्वरूप पाहतो आहोत. त्यातील नैतिक ऱ्हासाविषयी बोलतो आहोत. राजकारणातील नैतिक ऱ्हास हा खरं तर फार धक्कादायक विषय असण्याचं कारण नाही. तो अशासाठी की हा ऱ्हास होणं अपरिहार्यच होतं आणि आहे. पक्षीय राजकारणाच्या 'डीएनए'मध्येच हा ऱ्हास लिहिलेला आहे. राजकारणी संधीसाधू असतात यात नवल वाटावं असं काय आहे? राजकारणात टिकून राहणं, सत्ता हातात ठेवणं यासाठी ते करावंच लागतं. लोकशाहीचं स्वरूपच मुळात 'शहाण्याला संधी' असं नसून 'बहुमताला संधी' असं आहे. व्यवस्थेसाठी एक चौकट आखावी लागते, ती लोकशाहीने आखली आहे. या चौकटीत सुधारणेला जागा कुठे आहे ते बघणं आवश्यकच आहे. पण त्याबरोबरच 'मानवी सहजीवन अधिकाधिक सुकर कसं होईल? आपल्याला जो उतरंडविहीन, परस्परावलंबी समाज अभिप्रेत आहे तो कसा घडेल? माणसाचं नैतिक उन्नयन कसं होईल' हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून जे विचार करतात त्यांनी या चौकटीचा वापरच न करता बहुमताला नावं ठेवली तर त्यातून परिवर्तन साध्य होणार नाही. किंवा 'स्वराज्यशास्त्र'मध्ये सत्ताकेंद्री राजकारणाच्या वातावरणात विनोबा, गांधी या लोकांचं म्हणणं कितपत तग धरेल? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आज मूल्यव्यवस्था देखील बदलू पाहते आहे. तेव्हा आज काही नवीन मांडणी करताना या मांडणीचा आधार घेणं योग्य आहे का हा प्रश्न पडणं रास्त आहे. या प्रश्नाचा शोध घेताना पुन्हा एकदा 'स्वराज्यशास्त्र'मधलंच एक उद्धृत द्यावंसं वाटतं - 

'जनता केव्हाही वादनिष्ठ किंवा पद्धतीनिष्ठ नसते. ती जीवननिष्ठ असते. जीवन चांगले चालले, मग वाद किंवा पद्धती कोणती का असेना, जनतेला त्याची फिकीर नसते. वाद तत्त्वज्ञानी काढतात, पद्धती व्यवहारी चालवतात आणि समाज सहकार्य करतो. पहिले दोघे अनुक्रमे वादनिष्ठ आणि पद्धतीनिष्ठ असतात. पण तेही शेवटी आपल्या मतांप्रमाणे जीवननिष्ठ असतात, म्हणूनच तसे असतात. अमुक वादाशिवाय जीवन चांगले बनणे शक्य नाही, असे तत्त्वज्ञानी विचाराने मानतो आणि म्हणून, म्हणजे आपल्या जीवननिष्ठेमुळेच तो वादनिष्ठ झालेला असतो. व्यवहारी अमुक पद्धतीशिवाय जीवन चांगले चालणे शक्य नाही असे आपल्या अनुभवावरून ठरवतो आणि म्हणून आपल्या जीवननिष्ठेमुळेच तो पद्धतीनिष्ठ बनलेला असतो. परंतु आग्रहामुळे आणि मोहामुळे कधी कधी जीवननिष्ठा आणि पद्धतीनिष्ठा लोकांची मने - तत्त्वज्ञाची, व्यवहाऱ्याची आणि इतरांचीही - काही काळापर्यंत काबीज करू शकतात.'      
विनोबांच्या या मांडणीत एक 'कायमस्वरूपी झगडा' दिसतो. आजच्या संदर्भातही हे दिसेल. आज बहुमताचा कल भाजपकडे झुकलेला असताना अनेकांना असं वाटतं की सांप्रदायिकतेचा, धार्मिक ध्रुवीकरणाचा आधार घेत मोठ्या झालेल्या पक्षाला लोकांनी निवडून कसं दिलं? लोकांना नक्की काय झालं आहे? भारताच्या बहुविध सांस्कृतिक ओळखीचं काय होणार? हे प्रश्न रास्तच आहेत. पण तें वादनिष्ठेतून आलेले आहेत. पण वस्तुस्थिती अशी की जनता काँग्रेसच्या काळातही जीवननिष्ठ होती आणि आजही आहे. उद्या भाजप किंवा काँग्रेस सोडून तिसऱ्या पक्षाचं सरकार आलं तरी जनता जीवननिष्ठच असेल. त्यामुळे आपल्याला बदल हवा असेल  तर आपलया वादनिष्ठेला जनसन्मुख कसं करायचं हे पाहावं लागेल. 'जीवननिष्ठ'ही व्हावे लागेल. वादनिष्ठेला सोडचिट्ठी देऊ नये, पण तीमुळे जीवननिष्ठा झाकोळू देऊ नये. 

विनोबादेखील गांधींसारखेच 'प्युरिस्ट' असले तरी त्यांची मनुष्यस्वभावाची समज व्यावहारिक पातळीवरची होती हे स्वराज्यशास्त्र वाचताना जाणवतं. तरीही त्यांच्या माणसाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. गांधी-विनोबांसारख्या मंडळींचं अप्रूप अशाकरता वाटतं की 'माणूस कसा असतो' हे माहीत असूनदेखील त्यांनी 'माणूस कसा असावा' याची आग्रहपूर्वक मांडणी केली. माणसाला व्यायाम घडवायचा प्रयत्न केला. त्यांची मांडणी आज कशी लागू होईल हा विचार अप्रस्तुत नाही. गांधी-विनोबांनी विचार केलेला नव्हता अशा अनेक गोष्टी आणि आव्हाने आज असतील. परंतु 'माणूस' आमूलाग्र बदललेला नाही. त्यामुळे मूलभूत मांडणी म्हणून तिकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 

ज्यांनी परिवर्तनाचा विचार केला, अगदी टोकाचेही आदर्श कल्पिले अशा गांधी-विनोबांसारख्या मंडळींबाबत एक गोष्ट जाणवते ती अशी की ते कमालीचे क्रियाशील होते. व्यक्तिगत पातळीवर कदाचित निराशेने त्यांच्या मनाला स्पर्श  केला असेलही, पण कार्यकर्ता, विचारवंत म्हणून ते सकारात्मक राहिले. आज हे ठळकपणे जाणवतं. आणि म्हणूनच हे नोंदवावंसं वाटतं की परिवर्तनाचा विचार हा सशक्त विचार आहे. तो वादनिष्ठ आहे, क्रिटिकल आहे.  म्हणूनच त्याने स्वतःला बंदिस्त करून घेऊ नये. प्रतिक्रिया देत राहणं ही स्थितीशीलता आहे. जर हा विचार चिकित्सक विचार असेल तर त्याने स्वतःचीही चिकित्सा केलीच पाहिजे.    

स्वराज्यशास्त्रमधील व्यवस्थेच्या विविध पद्धती असोत, गांधींची ग्रामस्वराज्याची संकल्पना असो, आंबेडकरांची जातीविहीन समाजाची संकल्पना असो किंवा इतरही (आदर्शवत वाटणाऱ्या) संकल्पना असोत - या संकल्पनांच्या मुळाशी परिवर्तनाची आच आहे. त्यामुळे या संकल्पनांना प्रयोगशाळेत स्थान देऊन पुढे काम करणं गरजेचं आहे. संपूर्ण समाजाकडे 'लॅब' म्हणून बघता येत नाही. ते गडबडीचं ठरेल. त्यामुळे वैचारिक प्रयोगशाळा, तिथे तयार झालेलं रसायन हा एक भाग आणि त्या रसायनाच्या 'उपयोजित आवृत्त्या' हा दुसरा भाग अशा प्रकारे काम करणं इष्ट होईल. 

- १४ मे २०१७, फेसबुक पोस्ट 


Sunday, February 19, 2017

रचनाच कर्ता आहे

'आधुनिक विज्ञानाचे स्वरूप' हे मौज प्रकाशनाचे एक लहानसे (११६ पाने) पुस्तक आहे. 'आजचा सुधारक'मध्ये जानेवारी ते मार्च २००४ दरम्यान प्रकाशित झालेल्या लेखांचे हे संकलन आहे. 'आजचा सुधारक'च्या डार्विन विशेषांकाचे पुस्तकरूप म्हणजे मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेले 'डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य'. मराठीत जे विज्ञानविषयक लेखन झाले आहे त्यात ही दोन पुस्तके महत्त्वाची ठरावीत. 

'आधुनिक विज्ञानाचे स्वरूप' या पुस्तकात 'आत्मा हवा का?' या शीर्षकाचा मिलिंद वाटवे यांचा एक लेख आहे. 'सजीवांच्या सगळ्या जीवन प्रक्रियांचे नियंत्रण करण्यासाठी भौतिकी आणि रसायनशास्त्राच्या नियमात न बसणाऱ्या एखाद्या वेगळ्याच शक्तीची गरज आहे का? दुसऱ्या शब्दात, पूर्णतः भौतिक आणि रासायनिक नियमांवर आधारित आणि त्यापेक्षा वेगळी कुठलीही गोष्ट न आणता एवढ्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया चालू शकतात हे सिद्ध करता येईल का?' यावर प्रस्तुत लेखात मिलिंद वाटवे यांनी चर्चा केली आहे. त्यांची मुख्य मांडणी अशी आहे की सजीवांचे कार्य चालण्यासाठी आधिभौतिक शक्तीची गरज तर नाहीच, परंतु अशी काही शक्ती असणे आणि तिने सर्व क्रियांचे नियंत्रण करणे तत्त्वतःच अशक्य आहे. या मुद्याबाबत ते लिहितात, 'भौतिक नियमात बसू शकत नाही असा काही आत्मा किंवा जीवशक्ती असणे शक्यच नाही असे दाखवून देता येऊ शकते. यामागचे तर्कशास्त्र समजायला अवघड नाही. सजीव यंत्रणेत ज्या क्रिया चालतात त्या भौतिक आहेत याविषयी वाद नाहीत. वाद आहे तो या क्रिया नियंत्रण करणारी काही आधिभौतिक शक्ती आहे की नाही याविषयी, भौतिक क्रियेचे नियंत्रण करायचे म्हणजे काय करायचे, तर ती सुरू करायची, बंद करायची अथवा तिला दिशा द्यायची. या तीनही गोष्टी करण्यासाठी काही जोर लावावा लागेल. जोर लावणे ही क्रिया भौतिकच आहे. त्यामुळे नियंत्रण करणे ही क्रियाही भौतिकच असणे भाग आहे. जी चीज स्वतःच भौतिकत्व नसलेली आहे तिला भौतिक जोर कसा लावता येणार? आणि तसा लावता आला नाही तर ती नियंत्रण कसे करणार? डॅनियल डेनेट नावाच्या शास्त्रज्ञाने ही गोष्ट एका गमतीशीर उदाहरणातून सांगितली आहे. तो म्हणतो की भुताच्या गोष्टीमध्ये अशासारखा एक प्रसंग हमखास असतो की एखादे भूत भिंतीतून आरपार येते आणि टेबलावरचा खंजीर उचलते. आता ही गोष्ट किती अतार्किक आहे ते पाहा. भिंतीतून आरपार जाण्याचा गुणधर्म जर त्या भुतात असेल तर त्याची बोटेही खंजिरामधून आरपार जातील. त्याला तो खंजीर उचलता कसा येईल? भिंतीतून आरपार जाणे आणि खंजीर उचलणे या दोन्ही गोष्टी एकाच 'एंटिटी'ला करणे शक्य नाही. आपली आत्म्याची कल्पना या भुताच्या गोष्टीइतकीच तर्कदुष्ट आहे. जर हा आत्मा भौतिक नसेल तर त्याला भौतिक गोष्टींचे नियंत्रण करता येणार नाही. आणि जर तो भौतिक गोष्टींचे नियंत्रण करत असेल तर त्याला भौतिक शक्ती वापरावीच लागेल. तसे असेल तर ती शक्ती भौतिक प्रयोगांनी दाखवणे आणि मोजणे शक्य होईल. आणि जी वस्तू भौतिक प्रयोगांनी दाखवता येते ती भौतिकच असली पाहिजे.' भौतिक क्रियांचे नियंत्रण करण्यासाठी आत्म्याची आवश्यकता नाही, किंबहुना असे नियंत्रण करणे मुळातच शक्य नाही हे सांगताना 'रचनाच रचनेतील क्रियांचे नियोजन-नियंत्रण करते' असा विचार ते मांडतात. 

इथे त्यांनी संगणकाचे उदाहरण दिले आहे - 'एखादा संगणक असतो किंवा एखादे स्वयंचलित यंत्र असते. आपण बटण दाबल्याबरोबर ते आपले ठरलेले काम करू लागते. आपण बटण दाबतो म्हणजे त्यातून वीजप्रवाह सोडतो. ऊर्जा देतो. ऊर्जा कशी वापरायची यासंबंधीच्या सूचना देत नाही. जेव्हा वीजप्रवाह बंद असतो तेव्हा यंत्राची रचना तेवढी असते, कार्य नसते. ऊर्जा दिली की कार्य सुरू होते. दिलेली ऊर्जा, तो वीजप्रवाह वाटेल तसा धावत नाही. योग्य प्रकारेच धावतो आणि योग्य ते कामच करतो. इथे दिलेली ऊर्जा कशी वापरायची हे कोण ठरवते? वीजप्रवाहाने कुठून कसे वाहावे हे कोण ठरवते? त्या यंत्राची रचनाच ठरवते.' ज्याप्रमाणे संगणक बंद असताना संगणकाची रचना तशीच असते त्याचप्रमाणे नेहमी ३० अंश सेल्सियसला जगणाऱ्या मानवी पेशीचे तापमान आपण ३०० अंशांनी कमी म्हणजे -२७० अंश केले तर काय होईल यावर मिलिंद वाटवे लिहितात. उणे २७३ अंश हे सर्वात कमी तापमान असू शकते. यांच्या खाली तापमान नेणे तत्त्वतःच शक्य नाही. म्हणून याला शून्य अंश निव्वळ तापमान म्हणतात. प्रत्यक्षात हे तापमान मिळवता येत नाही. पण द्रवरूप हायड्रोजन अथवा द्रवरूप हेलिअमच्या साहाय्याने याच्या अगदी जवळ म्हणजे दोन अंश निव्वळ तापमानापर्यंत एखादी वस्तू गार करणे शक्य असते. आणि या तापमानाला पेशी गोठवण्याचे प्रयोग झालेले आहेत. आता या गोठवलेल्या पेशीत कोणत्याही प्रक्रिया चालू नाहीत. मग काय आहे? तर शुद्ध रचना. रचना आणि कार्य ही यंत्राची आणि सजीवांची दोन अविभाज्य अंगे असतात. गोठवलेल्या पेशीमध्ये कार्य नाही, पण रचना आहे अशी अवस्था मिळू शकते. (रचनेशिवाय कार्य मात्र असू शकत नाही.) ही पेशी आपण पुन्हा नेहमीच्या तापमानाला आणली तर काय होईल? जे आढळले आहे ते असे की ती पेशी पुन्हा पूर्ववत जिवंत पेशीसारखी वागू लागली. आपण पेशीला ऊर्जा दिली पण ऊर्जा कशी वापरायची यासंबंधी काही सूचना दिल्या नाहीत. तरीसुद्धा पेशीच्या क्रिया सुरू झाल्या. म्हणजे रचनेतच क्रियांचे नियंत्रण करण्याची योजना आहे. 

या मांडणीवर असा प्रश्न येऊ शकतो की वरील उदाहरणात पेशीला ऊर्जा देणे किंवा संगणकात वीजप्रवाह सोडणे ही कामे माणसाने केली आहेत. सजीवात हा 'वीजप्रवाह; कोण सोडतो? पेशी निर्माण कोण करतो? यावर लेखात स्वतंत्रपणे चर्चा केलेली नसली तरी यासाठी 'इमर्जंट प्रॉपर्टीज' याविषयी वाचता येईल. प्राथमिक माहितीकरता विकिपीडियावरील पहिले दोन परिच्छेद देतो. 'Emergence' ने विकिपीडियावर सर्च करता येईल. -   
In philosophy, systems theory, science, and art, emergence occurs when an entity is observed to have properties its parts do not have on their own. These properties or behaviors emerge only when the parts interact in a wider whole. For example, smooth forward motion emerges when a bicycle and its rider interoperate, but neither part can produce the behavior on their own.

Emergence plays a central role in theories of integrative levels and of complex systems. For instance, the phenomenon of life as studied in biology is an emergent property of chemistry, and psychological phenomena emerge from the neurobiological phenomena of living things.

थोडक्यात अन्य गोष्टींप्रमाणेच अनेकविध घटकांच्या परस्पर संबंधांतून 'लाईफ' निर्माण झाले असे म्हणता येते. मिलिंद वाटवे यांच्या 'रचनाच कर्ता आहे' या मांडणीसारखीच मांडणी विद्यानंद नंजुंदय्या यांच्या 'डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य' या पुस्तकातील लेखात आढळते. 'जीव आणि जाणीव : उत्क्रांतीवादी दृष्टिकोन' या लेखाच्या समारोपात ते लिहितात, 

माणसे उत्क्रान्तीतून घडली आहेत. उत्क्रान्तीचे वर्णन केवळ इहवादी रूपात केले जाऊ शकते. प्रजोत्पादनातील यशाला पूरक जीनसंचांचा प्रसार त्यांच्या वाहकांना (शरीरांना) उत्क्रान्त करतो. प्रजोत्पादनातले यश शारीरिक व वागणुकीतील गुणधर्मांवर अवलंबून असते, म्हणजे वर्तणूकही उत्क्रान्त झालेली आहे. जाणिवेचा संबंध मनःस्थितीशी आहे आणि या मनःस्थिती मेंदूतील चेतापेशींच्या विद्युत-व्यवहारातून घडतात. त्यामुळे जाणिवेचे इहवादी (जडवादी, मटेरियलिस्टिक) स्पष्टीकरण देता येते असा युक्तिवाद करू शकतो.

जाणिवेसकटच्या आपल्या अस्तित्वाचे स्पष्टीकरण आपल्याला देता येऊ शकते हा आश्वस्त करणारा विचार आहे. आपल्या मनातील राग-लोभ-मोह-मत्सर-अहंकार-द्वेष-आसक्ती इत्यादी (यात गॉसिपदेखील अ‍ॅड करता येईल) आणि इतर अनेक भावछटा (ज्या आपल्या आपणच अनुभवू शकतो), परस्परांमधील भावनिक-लैंगिक आकर्षण या सर्वांचा खुलासा 'आपली रचना' आणि आपल्या पर्यावरणाला प्रतिसाद द्यायची या रचनेची आपल्या अस्तित्वाच्या विशिष्ट टप्प्यावरील क्षमता यातच आहे. 

माझ्या आकलनानुसार आपली 'आजची अडचण'  ही आहे की तंत्रज्ञान, राहणी, अभिव्यक्ती यात अचाट बदल झाले असले तरी आपला मेंदू अजूनही बऱ्याच अंशी 'ह्यूमन इन्स्टिंक्ट' चा गुलाम असल्यासारखा आहे. आणि त्या त्या समाजाचे प्रस्थापित नीतीनियम हेदेखील त्याच्या इन्स्टिंक्टचा भागच बनले आहेत. (उदा. अत्याधुनिक यंत्राचं डिझाइन करणारा एखादा बुद्धिमान तंत्रज्ञ आपल्या बायकोला कुणी अन्य पुरूष आवडतो आहे हे सत्य सहज स्वीकारू शकेल का? किंवा एखादी आधुनिक आई आपला मुलगा समलिंगी आहे हे सत्य सहज स्वीकारू शकेल का? 'सहज' हा शब्द महत्त्वाचा आहे आणि सर्वसाधारण निरीक्षण अभिप्रेत आहे. अपवाद अर्थातच असतील.) 

तंत्राचा प्रदेश विस्तारला, पण जाणिवेचा प्रदेश तितकासा विस्तारला नाही. कदाचित माणसाने निर्माण केलेली सामाजिकता इतकी मजबूत आहे की स्व आणि सामाजिकता या द्वंद्वात तीच कायम वरचढ ठरते आणि नेमकं हेच जाणिवेचा प्रदेश विस्तारण्याच्या आड येत असावं. अर्थात जाणिवेचे जडवादी स्पष्टीकरण देता येत असेल तर जाणीव म्हणावी इतकी प्रवाही न होण्याचेही जडवादी स्पष्टीकरण देता येऊ शकेल. माणूस आधी होता त्यापेक्षा कमी हिंसक (शारीरिक हिंसेबाबत) झाला आहे. (तुलनात्मक दृष्ट्या बघावं. वर्तमानातही हिंसा आहे, पण माणसाचे माणसाविषयीचे क्रौर्य तरी काही अंशी कमी झाले आहे.) पण इतर बाबतीत तसे म्हणता येईल का याची शंका वाटते. द्वेष, मत्सर, असुरक्षितता, टोळी मानसिकता या प्रवृत्ती (मेंदूतील चेतापेशींच्या विद्युत व्यवहारातून) लाखभर वर्षांपूर्वी निर्माण होत होत्या त्याच आजही निर्माण होतात. याला कारण चिरेबंदी सामाजिक-आर्थिंक-लैंगिक बांधणी हेच असेल का? विचार करायला हवा. ज्या जाणिवांच्या मुळाशी निखळ लैंगिकता आहे त्यांचं स्पष्टीकरण लैंगिक पुनरुत्पादनाच्या 'उत्क्रान्तीजन्य जबाबदारी'च्या आधारे देता येऊ शकेल. पण इतर मानवी इच्छा-आकांक्षा, भावना-संवेदना यांचा जो मोठा पट आहे तो अजूनही का बदलत नाही यावर विचार व्हावा.

- फेसबुक पोस्ट 

Friday, December 30, 2016

२०१६ : काही विस्कळीत नोंदी

'हजारों ख्वाहिशें ऐसी' या सुधीर मिश्रा दिग्दर्शित चित्रपटात अगदी सुरुवातीलाच एक स्वगत आहे. नक्षलवादी चळवळीतला एक कार्यकर्ता (जो या चित्रपटातल्या तीन प्रमुख व्यक्तिरेखांपैकी एक आहे) स्वतःच्या प्रेयसीशी पत्रातून बोलतो आहे. मोर्चा आणि आंदोलनाच्या दृश्यांच्या पार्श्वभूमीवर त्याचा आवाज आपण ऐकतो. तो स्वतःला आणि एकूणच त्याच्या कॉलेज-वर्तुळातल्या मित्रांना उद्देशून म्हणतो, ‘चळवळीत भाग घेतलेल्या काही विद्यार्थ्यांच्या कथा ऐकून मी स्तब्ध झालो. स्वतःबद्दल विचार करायला लागलो. आपण स्वतःला काय समजतो? थोडी रॅडिकल जारगन, थोडं राजकारण, थोडं रॉक अँड रोल - पण मुख्यत्वे शॉक व्हॅल्यू!’ चित्रपट पाहताना मी त्याच्या या मनोगतापाशी अडखळलो होतो. ‘हे वर्ष आपल्यासाठी कसं होतं?’ याचा विचार आज वर्षाखेरीस करताना हे मनोगत आठवून पुन्हा अडखळायला होतं आहे.

चार्ल्स डिकन्सच्या ‘अ टेल ऑफ टू सिटीज’ या गाजलेल्या कादंबरीतलं पहिलं विधान प्रसिद्ध आहे. ‘इट वॉज द बेस्ट ऑफ टाइम्स, इट वॉज द वर्स्ट ऑफ टाइम्स, इट वॉज द एज ऑफ विस्डम, इट वॉज द एज ऑफ फूलिशनेस...’ अशी त्या विधानाची सुरुवात आहे. मला हेच विधान ‘अ टेल ऑफ वन नेशन’ म्हणून भारताविषयी म्हणावं असं वाटतं. गेलं एकच वर्ष नव्हे, तर गेली दोन-तीन वर्षं हा देश सतत ढवळून निघतो आहे. केंद्रातलं सत्तांतर हा एक मुद्दा झाला, पण समाजमाध्यमांच्या ‘स्फोटा’मुळे, टीव्हीच्या अतिरेकामुळे, एकाच वेळी अभिव्यक्तीच्या होणाऱ्या स्वागतार्ह आणि भयावह लोकशाहीकरणामुळे आपण बहुधा कधी नव्हे अशा चालत्या-बोलत्या-गात्या-नाचत्या-हलत्या-वाहत्या समाजात राहतोय, तसंच कधी कुठल्या धारेबरोबर पुढे जातोय हे आपलं आपल्यालाच कळत नाहीये, असं काहीसं वाटतं.

‘मी कोण आहे? मी स्वतःला काय समजतो? आजच्या माध्यमबहुल काळात ‘शॉक व्हॅल्यू’ हे माझ्याही कृतीचं मुख्य अंग होऊ पाहतंय का?’ या प्रश्नांना सामोरं जाण्याचा प्रयत्न मी सध्या करतो आहे; गेल्या वर्षात करत होतो. अनेकांना अनेक टप्प्यांवर अस्तित्वविषयक प्रश्न पडत असतात. या प्रश्नांनी ज्यांचं विचारविश्व व्यापलं होतं, असे तत्त्वज्ञ, अभ्यासक, त्यांनी निर्माण केलेले विचारप्रवाह माणसाच्या आत्मचिंतनाची साक्ष देतात. माझं आत्मचिंतन (आणि आत्मपरीक्षण) मला काय सांगतं? मला हा प्रश्न फार महत्त्वाचा वाटायला लागला आहे.

आपण सगळे या पृथ्वी नामक ग्रहावरच्या निसर्गाचा, पृथ्वीवरच्या एका देशाचा, तिच्यावरच्या एका गावाचा-शहराचा, समूहाचा, कुटुंबाचा, सरमिसळ असलेल्या एका जाड्या-भरड्या, ‘फंक्शनल-डिसफंक्शनल’ (समृद्ध अडगळ!) संस्कृतीचा, एका राज्यव्यवस्थेचा, न्यायव्यवस्थेचा, जात-वर्ग-विचारव्यवस्थेचा, लिंगसापेक्ष घडणीचा, लिंगनिरपेक्ष वैचारिकतेचा, लवचीक नैतिकतेचा आणि आणखीही कशाकशाचा भाग असतो. यांमधल्या बऱ्याचशा व्यवस्थांचे आपण उपभोक्ते असतो. अर्थव्यवस्थेच्या महाकाय चक्रातला एक सांधा म्हणून ही अर्थव्यवस्था ‘चालवत’ही असतो (भांडवली अर्थव्यवस्थेचा भाग असलेला माणूस ती व्यवस्था ‘चालवल्याशिवाय’ जगूच शकत नाही). एकमेकांना अशा प्रकारे छेद देणाऱ्या वर्तुळांचा मी जेव्हा भाग असतो, तेव्हा माझी ‘भूमिका’ काय असावी? आणि एवढंच नव्हे, तर कुठल्या व्यवस्था-घटकाबाबत माझी काय भूमिका असायला हवी?

हे प्रश्न थोडे थकवणारे आहेत.

पण सृष्टी आणि समाजाचं तात्त्विक आकलन करून घ्यायच्या ओढीमध्ये आपल्याला व्यवस्था-घटकांबाबतच्या भूमिकेतून सुटता येत नाही. का सुटता येत नाही? किंवा का सुटू नये? याचं मला दिसणारं कारण म्हणजे, या अफाट विश्वात आपण माणूस म्हणून आपल्या वैचारिक आणि शारीरिक क्षमतेसह उभ्या असण्यामागे माणसाची महाकथा आहे, आणि आपण प्रत्येक जण या महाकथेत आपल्या नकळत योगदान देत असतो. त्यामुळे नैतिक दृष्टिकोनातून नव्हे, तर अगदी व्यवहारवादी दृष्टिकोनातूनदेखील आपली एक भूमिका असणं आवश्यक असतं.

आता पुढचा प्रश्न. भूमिका असणं पुरेसं आहे का? बिस्मार्कचं एक प्रसिद्ध वचन आहे – ‘एखादा मनुष्य जेव्हा एखादी गोष्ट तत्त्वतः मान्य करतो, तेव्हा ती अमलात आणण्यात त्याला काडीचाही रस नसतो.’ मी भूमिकेबाबत या ‘विचार-कृती’ द्वैताचा विचार करतो आहे. मी समतावादी असणं किंवा मी व्यक्तिस्वातंत्र्य मानणं एवढं पुरेसं आहे का? मी तत्त्वतः समतेचं तत्त्व मान्य केलं आहे, पण स्वतःच्या मर्यादेमुळे समतेच्या चळवळीत भाग घेऊ शकत नाही, हेही ठीक आहे; पण माझ्या ‘समता मान्य करण्याने’ मला समता म्हणजे काय हे समजतं का?

‘तत्त्वविचार’ बऱ्याचदा आपल्याला गप्प बसवतो. कारण तत्त्वविचार आपल्या समोरचे मार्ग ‘ब्लॉक’ करू शकतो. तत्त्वज्ञ कृती करायला धजावत नाही, कारण त्याला एकाच वेळी अनेक ‘परिणामस्वरूप शक्यता’ दिसत असतात. सरत्या वर्षातला माझा अनुभव, माझ्या विचारांच्या दिशांनी घेतलेली वळणं आणि कृतीच्या पातळीवर मला जाणवणारं अपुरेपण असं काय काय या परिणामस्वरूप शक्यतांशी जोडलेलं आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये मी फेसबुकवर काय काय लिहीत होतो; या वर्षीही लिहिलं. दीर्घ स्वरूपाचे लेखही लिहिले. आता थांबलो आहे. ३ सप्टेंबर २०१५ रोजी मी एक लेख लिहिला होता. घरी उदारमतवादी विचारांच्या सान्निध्यात वाढल्याने आणि बाहेर हिंदू पर्यावरणात वाढल्याने कट्टर हिंदुत्ववादाविषयी मनात असलेला राग, त्या तुलनेत मुस्लीम धर्माविषयीचं माझं तोकडं आकलन आणि त्यामुळे मुस्लीम धर्माची न केलेली चिकित्सा (यात एक भाग हिंदू समाज आपला वाटणं आणि जाणत्या वयात मुस्लीम समाजाशी मर्यादित संपर्क आल्याने मुस्लीम समाज काहीसा परका वाटणं हाही भाग आहे), पुरोगामी विचारविश्वातून इस्लामिक मूलतत्त्ववादाविषयी म्हणाव्या इतक्या ठळकपणे न उमटणाऱ्या प्रतिक्रिया अशा काही गोष्टींचा धांडोळा घ्यायचा मी प्रयत्न केला होता. त्यावरच्या चर्चेतून मला काही नवीन धागे मिळाले. पुढे मी काही हिंदुत्ववादी मंडळींशी प्रत्यक्षही बोललो. २०१६ मध्ये या विषयावर माझा बराच विचार झाला. ‘धर्मश्रद्धा’ हा विषय मला कायम चिकित्सेचा वाटत असला आणि संघटित धर्माशिवाय लोक एकत्र येऊ शकतात, त्यासाठी माणसांच्या मनात अस्तित्वविषयक आणि व्यवस्थाविषयक जिज्ञासा जागी असायला हवी असं मला वाटत असलं, तरी धर्मश्रद्धेने लोकांना प्रभावित केल्यामुळे त्याबाबत विचार तर करावाच लागतो. मला असं जाणवलं की, उजव्या विचारसरणीत परिवर्तनाच्या काही खुणा दिसत असल्या, तरी गेल्या काही वर्षांमध्ये उजव्या विचाराला मिळालेलं वाढतं पाठबळ आणि धर्मकेंद्री विचारपद्धतीमुळे आधुनिकेतचं (विचारातली आधुनिकता) आव्हान पेलण्यातील अडचणी, यामुळे हा परिवर्तनाचा प्रवास ऊर्ध्वगामी होण्यापेक्षा अधोगामीच होईल की काय अशी भीती वाटते. यातली मला दिसलेली एक महत्त्वाची बाब म्हणजे उजव्या विचारधारेचे धुरीण या विचारसरणीतल्या कच्च्या दुव्यांवर लक्ष देऊन ते बळकट करण्याऐवजी अजूनही परंपरा-श्रेष्ठत्वाला उजाळा देताना दिसतात. कार्यात्मक पातळीवर ते नव्याचा स्वीकार करतात, त्याचा प्रसारही करतात, पण धार्मिकतेमुळे मूळ वैचारिक बैठक काहीशी आक्रसलेलीच राहते. उजवा विचार स्वबळावर स्वतःची कक्षा वाढवू शकेल, का याबद्दल मला शंका वाटते. कारण हा विचार आज तरी धर्म, राष्ट्र अशा चौकटीमध्ये बंदिस्त आहे. ‘संथ गतीने परिवर्तनाकडे’ असं जरी त्याचं वर्णन केलं जात असलं (‘न्यू राईट’ हा शब्दप्रयोगही अलीकडे ऐकला), तरी त्याच्या अंगभूत क्षमतेविषयी मला प्रश्न आहेत. २०१६ मध्ये तरी त्या दूर झाल्या नाहीत.

माणसाच्या अस्तित्वाला काहीही प्रयोजन नाही; जगात दगड-धोंडे आहेत, तसाच माणूसही आहे, असं मानवी उत्क्रांतीचा अभ्यास सांगतो; पण तरीही माणसाबद्दलचे अनेकानेक प्रश्न अनुत्तरितही आहेत, विशेषतः मानवी जाणिवेविषयीचे. असं असलं तरी अस्तित्वाचा शोध घ्यायची उत्क्रान्तीची दिशा मला योग्य वाटते. ‘जाणीव’ हेदेखील कायमचं गूढ आहे, असं समजायचं कारण नाही. आपल्याला असं दिसेल की, पूर्वी जे प्रश्न तत्त्वज्ञानाचे होते, ते काळाच्या प्रवाहात विज्ञानाच्या कक्षेत आले आणि विज्ञानाने त्याला उत्तर दिलं. धर्म आणि देव यांसारख्या संकल्पनांचा आपल्यावरचा प्रभाव कमीकमी होत गेला आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. या संकल्पनांची प्रासंगिकता होतीच, अजूनही ती संपलेली नाही, पण सोळाव्या शतकातला श्रद्धावान आणि आजचा श्रद्धावान यांच्यात आपल्याला सहज फरक दिसेल. त्या वेळच्या श्रद्धावानापेक्षा आजचा श्रद्धावान जास्त तार्किक विचार करणारा आहे. सोळाव्या शतकातली पूजाअर्चा आणि आजची पूजाअर्चा यांच्यात फरक आहे. पूजाअर्चा ही प्रतीकात्मक आहे. त्यामुळे ती टाळता येऊ शकते, कमी-जास्त करता येऊ शकते, त्यात शॉर्टकट्स घेता येऊ शकतात हे आजचा श्रद्धावान मानतो आणि तसं करतोदेखील. आपण जर माणसाचा ऐतिहासिक प्रवास पाहिला, तर तो अज्ञानातून ज्ञानाकडे, धर्माकडून विज्ञानाकडे, गूढाकडून स्पष्टीकरणाकडे असाच आहे; धर्माचं स्थान कमीकमीच होत गेलं आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिकतेचा आग्रह धरणाऱ्या आणि धार्मिकतेला जवळजवळ 'इंडिस्पेन्सिबल' मानणाऱ्या उजव्या विचाराला समजून घेणं मला अवघड जातं.

आणखी एक मुद्दा. धार्मिकता आणि माणसाचा आत्मशोध यांच्यात मी फरक करतो. मोठ्याच्या मोठ्या समूहाला घालून दिलेली एक चौकट, माणसांनी ‘रुळावर’ राहावं म्हणून केलेले नियम या आधारे धर्माचं स्पष्टीकरण दिलं जातं. ते अगदीच चुकीचं नाही. माझी अडचण धर्माच्या प्रवासाबद्दल आहे. मागे एकदा मी पाचगणीजवळ एका अगदी लहानशा गावात गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती. काही बायका सार्वजनिक नळावर धुणी-भांडी करत होत्या. गावात एक मंदिर होतं. गाई-गुरं परत येत होती. त्या क्षणी माझ्या मनात विचार चमकला, ‘इथल्या जीवनाच्या संदर्भात मी माझ्याच देवा-धर्माविषयीच्या दृष्टीकोनाकडे कसं पाहतो? इथल्या माणसाच्या जीवनदृष्टीशी मला जोडून घ्यायचं असेल, तर मला इथे राहावं लागेल. तो जे काम करतो, ते करावं लागेल. इथल्या मंदिरात जावं लागेल. इथल्या पर्यावरणात देव आणि धर्म याला जे ‘डायमेंन्शन’ मिळतं, ते मला इथे राहिलो तरच मिळेल.’ असं असलं, तरी अशाच छोट्या खेड्यात काही शतकांपूर्वी जी कर्मकांडं केली जात होती, त्यांतली बरीचशी आज नाहीशी झालेली दिसतील; आधुनिकतेच्या खुणा दिसतील. मग भौतिक आधुनिकता आत्मसात केली गेली, तशीच वैचारिक आधुनिकता आत्मसात करणं अशक्य आहे, असं मानायचं कारण नाही. धार्मिकतेचं स्तोम कमी करून आत्मशोध सुरू ठेवणं शक्य आहे. त्यामुळे आर्थिक, सामाजिक व मानसिक स्थानातील भेद लक्षात घेऊनही प्रत्येकाचा प्रवास 'संघटित धर्मपालना'पासून 'संघटित धर्मचिकित्से'पर्यंत होऊ शकतो ही शक्यता अगदीच उडवून लावावी अशी नाही.

उजव्या विचारातल्या अपुरेपणाच्या पार्श्वभूमीवर पुरोगामी विचारविश्वावर आज जी टीका-टिप्पणी होते आहे, ती पूर्णपणे मोडीत न काढता त्यावर सुधारकी दृष्टीने (जी पुरोगामी विचारांचीच ठेव आहे) विचार करणंही गरजेचं आहे. संक्रमण काळातही आपण फक्त ‘रॅडिकल जारगन’ वापरतो आहोत का, शॉक व्हॅल्यूपुरतंच लिहीत-बोलत आहोत का हा विचार जरूर व्हावा. आज सार्वजनिक चर्चाविश्वात जे वातावरण दिसतं आहे, ते आश्वासक नाही. याचं एक मुख्य कारण म्हणजे, ‘पुरोगामित्व’ हीच मुळात काहीतरी संशयास्पद गोष्ट आहे, ती आपल्या समाजात ‘फिट’ होऊ शकणार नाही अशी समजूत पसरते आहे. ती धोकादायक आहे. दि.के.बेडेकर ‘मानव सान्त आहे’ असं म्हणतात. मानवी बुद्धी, मानवी मन, मानवी कर्तृत्व, मानवी समज या सगळ्याला मर्यादा असते. तिला त्यांनी ‘मानवी सांतत्व’ म्हटलं आहे; पण म्हणून मर्यादेची कक्षाच न विस्तारणं त्यांना मान्य नाही (धर्मश्रद्धा : एक पुनर्विचार - दि. के. बेडेकर, प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई). पुरोगामी विचार हा भक्कम विचार असेल, त्यात माणसाविषयी आस्था असेल तर या विचाराच्या पुरस्कर्त्यांनी गडबडून न जाता स्वतःच्या मार्गाची पुनर्रचना, नव्या मार्गाची आखणी यांवर भर दिला पाहिजे. दुसरं एक म्हणजे, आज विविध माध्यमांमधून ‘पुरोगामी-प्रतिगामी’, ‘उजवे-डावे’ असे शब्दप्रयोग सरसकट वापरून ध्रुवीकरण केलं जात असल्याने अनेक सूक्ष्म भेद (nuances) लक्षातच घेतले जात नाहीत; आणि हा गुंता सोडवायची मोठी जबाबदारी आजच्या अभ्यासक-विचारवंतांवर आहे. अनेक कळीच्या प्रश्नांवर देशभर कार्यरत असणारे पुरोगामी कार्यकर्ते माध्यमचर्चांमध्ये दुर्लक्षित राहतात आणि ‘पुरोगामी लोक’ म्हणून सरसकट टीकाटिप्पणी सुरू राहते. लोकशाही व्यवस्थेतल्या सुधारणेच्या जागा, निवडणूक प्रक्रियेतल्या सुधारणेच्या जागा, विकेंद्रीकरण, नैसर्गिक साधन-संपत्तीवरचा अधिकार अशा मूलभूत मुद्द्यांवर फारशा प्रभावीपणे चर्चा होत नाहीत. देव, धर्म असलं कुठलंही अधिष्ठान नसताना लोकांनी शासनव्यवस्थेच्या मूल्यमापनाच्या पद्धती विकसित करणं, स्वतःच्या प्रश्नांकरता, प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांकरता एकत्र येणं मला महत्त्वाचं वाटतं. समूहाने एकत्र येऊन समूहापुढचे प्रश्न सोडवणं; स्वशासनासारख्या दीर्घ पल्ल्याच्या, अवघड, पण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणं हे समूहाच्या उन्नतीचं लक्षण आहे; आणि समूहाच्या चर्चेत ‘स्वशासनच’ नाही, तर इतर अनेक मुद्दे येऊ शकतात. यात स्त्री-पुरुष-संबंध येतील; नैतिकता म्हणजे काय, समता म्हणजे काय, सामाजिक न्याय म्हणजे काय हे मुद्दे येतील; व्यक्तिस्वातंत्र्य आणि समूहजीवनातली अपरिहार्यता यांची सांगड कशी घालायची हा मुद्दा येईल... अनेक मुद्दे येतील. एकमेकांवरच्या आरोप-प्रत्यारोपांपेक्षा अशी चर्चा, वैचारिक घुसळण (मतभेदांसह) आज हवी आहे.

२०१६ मधल्या राजकीय-सामाजिकदृष्ट्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या घटनांबाबत भाष्य होतच राहील. ते व्हावंच. माझ्यासाठी हे वर्ष माझा आंतरिक प्रवास अधिक वेगाने सुरू होण्याचं वर्ष होतं. ‘ज्ञान अमर्याद आहे, जाणीव प्रवाही आहे आणि त्यामुळे आपण कायमच प्रवासात असणार आहोत’ हे या वर्षातलं माझं मुख्य शिक्षण होतं!

(अक्षरनामा, ३० डिसेंबर २०१६) 

Thursday, October 20, 2016

‘मिळून सार्‍याजणी’तले दिवस

‘मिळून सार्‍याजणी’च्या कार्यालयात मी पहिल्यांदा गेलो तो दिवस कोणता होता, विद्याताईंना प्रथम कधी भेटलो हे खरं तर आठवत नाही. पण ‘मिळून सार्‍याजणी’शी मी जोडला गेलो त्याला गीतालीताईंशी झालेली ओळख आणि त्यांच्या घरी होणार्‍या ‘पुरुष उवाच’ गटाच्या बैठका कारण ठरल्या. ‘मागे वळून बघण्या’इतकं माझं वय झालेलं नसलं तरी मागे काहीतरी आहे याची जाणीव व्हावी अशा टप्प्यावर मी आहे. दुसरं म्हणजे ‘मिळून सार्‍याजणी’ हा माझ्यासाठी प्रेमाचा विषय आहे. मी चांगलाच भटक्या वृत्तीचा होतो (आणि आहे), त्यामुळे कॉलेज सोडल्यापासून अनेक नोकर्‍याही सोडल्या. पंधरा-वीस वर्षांच्या काळात आठ-दहा नोकर्‍या करणारा मनुष्य कुठल्याही कंपनीच्या दृष्टीने फारशा गंभीरपणे घेण्यासारखा विषय असू शकत नाही. पण मीदेखील नोकरीला मर्यादित गंभीरपणेच घेतल्याने उभयपक्षी सामंजस्य होतं. मात्र ‘मिळून सार्‍याजणी’ त्याला अपवाद ठरलं.  आणि त्याचं खरं कारण हेच की तिथे मी फक्त नोकरी केली नाही!

काही माणसांनी एकत्र येऊन काही काम करणं ही मौजेची गोष्ट असते. मग ती अगदी पाच-दहा माणसांची छोटी कंपनी असो की टाटा-इन्फोसिससारख्या अजस्त्र कंपन्या असोत. एकटा माणूससुद्धा जिथे स्वत:शी आतल्या आत भांडत असतो तिथे दुसरा आला किंवा पन्नासावा आला तर काय होत असेल याची कल्पना करता येईल. माझ्यासारख्या मुळातल्या स्वप्नाळू मनुष्याला कामातल्या औपचारिक भागापेक्षा कामाचा गाभा जास्त आकर्षित करतो. म्हणजे महिन्याचा अंक पोस्टाने रवाना करण्यात अनेक तांत्रिक गोष्टी गुंतलेल्या असतात आणि त्या आवश्यकही आहेत, महत्त्वाच्या आहेत. पण मुख्य प्रश्‍न, आस्थेचे प्रश्‍न हे की आपण हे मासिक का काढतोय? आपला जीव यात गुंतला आहे ना? आपण जे बोलतोय, लिहितोय ते योग्य आहे ना?आपल्याला स्वत:चं परीक्षण करायला हवंय का? कुठल्याही संस्थेच्या - मग ती ‘मिळून सार्‍याजणी’ असो किंवा एखादी बँक असो, आयटी कंपनी असो की चहाचं दुकान असो, हे गाभ्याचे प्रश्‍न सर्वात महत्त्वाचे असतात आणि 'मिळून सार्‍याजणी'त मला या गाभ्याच्या प्रश्‍नांना भिडता आलं, चर्चा करता आली म्हणून मी तिथे फार रमलो. एवढंच नाही, तर आज तिथे नसतानाही '‘हे आपलं मासिक’ आहे ही जाणीव जागी आहे. विद्याताई किंवा गीतालीताई माझ्या इतर कंपन्यांमधल्या ‘बॉस’सारख्या असत्या तर कदाचित मी वर्षभरातच बाहेर पडलो असतो. (अर्थात त्या ‘बॉस’ नव्हत्या असंही नाही. पण बॉसकडे स्वत:ला आवडतं किंवा नावडतं करून घ्यायचं कौशल्य असतं. त्यांनी स्वत:ला ‘आवडतं’ करून घेतलं हे त्यांच यश आहे!)

अभ्यास, करियर, सिनेमा, नाटक, सामाजिक प्रश्न, सेक्स, प्रेम, आकर्षण अशा बर्‍याच गोष्टींचा एकत्र गुंता जेव्हा मेंदू काबीज करून बसलेला असतो त्या वयात मी ‘पुरुष उवाच’च्या संपर्कात आलो. तिथल्या चर्चांमधून मला मानसिक पातळीवर बरंच मोकळं होता आलं. स्त्री-पुरुष संबंध, लैंगिकता हे माझे आस्थाविषय होते आणि त्यावर बोलण्यासाठी मला एक व्यासपीठ मिळालं. आपल्यासारखेच प्रश्‍न पडणारे काहीजण आहेत आणि ते उत्तरांचा शोध घ्यायचा गांभीर्याने प्रयत्न करतायत ही माझ्यासाठी एक आनंददायक गोष्ट होती. शिवाय तिथे केवळ स्त्री-पुरुष संबंधच नव्हे, तर इतर अनेक सामाजिक प्रश्‍नांवर चर्चा होत असत आणि त्यातून मला बरंच शिकायला मिळालं. रा.प. नेने, राम बापट अशा मजबूत लोकांना मी प्रथम ऐकलं ते ‘पुरुष उवाच’च्या अभ्यासवर्गात. या गटाच्या बैठकांमध्ये ओघानेच ‘मिळून सार्‍याजणी’चाही विषय निघे. विद्याताईदेखील अभ्यासवर्गांना येत असत. मी त्यावेळी जाहिरात क्षेत्रात काम करत होतो. ‘मिळून सार्‍याजणी’च्या कार्यालयात याच दिवसात प्रथम गेलो. साधार २००३-०४ च्या सुमारास. त्या वेळेला थोडंसं लिहायलाही लागलो होतो. पण लेखन प्रक्रिया, संपादन, मासिकांची कार्यपद्धती याबाबत अगदीच अनभिज्ञ होतो. मला वाटतं ‘मिळून सार्‍याजणी’त गेलो तो मी लिहिलेल्या लेखासंदर्भातच. ‘कधी छापून येईल?’ हा लेखकाचा आवडता प्रश्‍न विचारायला. (आपण लिहिलेलं लगेच छापून येत नाही हा शोधही तेव्हाच लागला.) पुढे मग संपर्क वाढला. संपादकीय विभागात थोडं साहाय्य करु लागलो. आणि मला एकदम जाणवलं की धिस इज व्हेअर आय बिलाँग! लेख, संपादन, संस्करण, चर्चा, विषयांची निवड, अंकाचं स्वरूप यात आपण रमतोय, आपल्याला हे जमतंय आणि यात आपण काहीतरी चांगला काम करू शकू असं आपल्याला वाटतंय ही जाणीव तीव्र झाली. मग हळूहळू काम करत गेलो. संपादकीय विभाग तर माझं आवडीचं ठिकाण होतंच, पण व्यवस्थापक सुहासिनी जोशी यांनी काम सोडायचं ठरवल्यावर मी व्यवस्थापक म्हणूनही काम केलं. हातून काही चांगलं लिहिलं गेल्याच्या आनंदाइतकाच जमाखर्चाचा ताळमेळ बसल्यावर होणारा आनंदही लक्षणीय असतो हे व्यवस्थापक म्हणून काम करताना लक्षात आलं. मुख्य म्हणजे मासिक चालवायच्या व्यावहारिक बाजूंची ओळख झाली.  

मी काम करू लागलो तेव्हा गीतालीताई संपादक म्हणून काम पाहू लागल्या होत्या. विद्याताईंचा सहभागही होताच, पण थोड्या प्रमाणात. विद्याताईंच्या मुख्य संपादकीय कारकीर्दीत मी काम केलं नाही, पण तरीही आम्ही एकत्र काम केलंच. मासिकाशी संबंधित असलो तरी पूर्ण वेळ फक्त मासिकासाठी काम केलं ते तीन-चार वर्षं. २०११ सालच्या दिवाळी अंकात वेश्याव्यवसायावर चर्चा करणारा विशेष विभाग होता. त्याचं संपादन मी केलं होतं. स्वतंत्रपणे संपादनाची जबाबदारी मी पहिल्यांदा उचलली ती या विभागाच्या वेळी. पुढे २०१४ च्या दिवाळी अंकापर्यंत काम केलं आणि मग थांबलो. 

या काळात काळाबरोबर माझ्यातही बदल झाले. दृष्टीकोन विस्तारला. कितीतरी लोकांशी परिचय झाला. पुष्पा भावे, छाया दातार, मंगला सामंत, वंदना भागवत, विद्युत भागवत, मिलिंद बोकील, प्रतिमा परदेशी, मंगला गोडबोले, मनीषा गुप्ते, मीना सेषू, रजिया पटेल, लता प्र. म., शुभदा देशमुख, सतीश गोगूलवार आणि इतरही अनेक. हा प्रामुख्याने वैचारिक विश्वातला संचार होता. शिवाय एकाला टक्कर देणारं दुसरं विश्वही मला इथे पाहायला मिळालं. समाजविचारातील बारकाबे, फरक लक्षात आले. सामाजिक क्षेत्रात काम करतानाची आव्हाने समजली. विशीतला कम्युनिस्ट चाळिशीत भांडवलशहा होतो असं म्हणतात. विशीतला मी - जो फेमिनिस्ट/कम्युनिस्ट होतो तो आज चाळिसाव्या वर्षी फेमिनिस्ट/कम्युनिस्ट आहे का?

हा प्रश्‍न गहन आहे! आणि खरं तर वेगवेगळ्या शाखांमधून विस्तारत जाणार्‍या उत्तराचा आहे. आज विचार करताना हे जाणवतं की आपण एखादा दृष्टीकोन स्वीकारतो त्याला जगात एक नाव किंवा प्रचलित भाषेत 'लेबल' तयार असतं. आपणही ते लावून घेतो. कारण आपण त्या दृष्टीकोनाचे आग्रही असतो. त्यात फार काही गैर आहे असंही नाही. पण माणूस आणि जीवन हे जर व्यामिश्र आहे तर विचारधारा एका लेबलाच्या मर्यादेत सामावू शकते का? किंवा मी एका विचाराचा आग्रह धरला की मी त्या विचाराचा 'वादी' होतो का?     

एक गोष्ट स्पष्ट आहे की स्त्रीवाद, डावा विचार, विद्रोही विचार ही एक भूमिका असली आणि भूमिका, विचारधारा ‘नैसर्गिक सत्य’ सांगत नसल्या तरी त्या भूमिका घेणं, विचारधारा स्वीकारणं आवश्यक असतं याबाबतही माझ्या मनात संदेह नाही. कारण नैसर्गिक सत्य जे आहे ते आहेच, पण माणूस म्हणून, समाज म्हणून आपण निसर्गाशी सुरू असलेल्या संघर्षाची धार कमी करायचा प्रयत्न करत असतो. निसर्गात स्त्री आहे, स्त्रीवाद नाही. निसर्गात विविधता आहे, समता नाही. निसर्ग एकात्म असेल, पण ती योजनाबद्ध एकात्मता नाही. मुळात निसर्ग फक्त ‘असतो’. तो ‘चांगला’ किंवा ‘वाईट’ नसतो. ही वस्तुस्थिती आहे. पण माणसाने निसर्गात हस्तक्षेप केला आहे, करतो आहे हीदेखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या हस्तक्षेपाबरोबरच मूल्य जाणिवेचे प्रश्‍नही उभे राहणारच आणि आपण त्याला सामोरं गेलंच पाहिजे. 

स्त्री ही स्वतंत्र व्यक्ती आहे, तिला स्वतंत्र इच्छा-आकांक्षा-राग-लोभ-विचार-विकार आहेत आणि त्या सगळ्यासह तिला ‘माणूस’ म्हणून जगण्याचा हक्क आहे हा विचार आपण सगळेच आज मान्य करतो आहोत आणि त्याचं प्रतिबिंब आजच्या स्त्रीजीवनात पडतानाही दिसतं आहे.. पण या बदलाची गती मंद आहे आणि अलीकडे स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये झालेली वाढ अर्थातच चिंताजनक आहे. ‘मिळून सार्‍याजणी’मध्ये काम करत असताना माझा ‘माणूस’ म्हणून असलेला दृष्टिकोन आणि ‘पुरुष’ म्हणूनचा लिंगसापेक्ष दृष्टिकोन यातील संघर्षही मला अनुभवता आला. ‘स्त्रियांनी आणि पुरुषांनी परस्परांशी संवाद साधणे’ हे मासिकाचं उद्दिष्ट आहे आणि स्त्रीप्रश्‍न हाताळत असताना पुरुषांचं प्रबोधन करणं, प्रसंगी त्यांना समजून घेणं गरजेचं आहे ही जाण विद्याताई आणि गीतालीताई दोघींमध्ये आहे. स्त्रीप्रश्‍नाबाबत विचार करताना मी पुरुषाची लैंगिक जडणघडण (जी नैसर्गिक उर्मी आणि सामाजिक संस्कार या दोन्हीच्या मिश्रणातून तयार होते) या विषयावर बराच विचार करतो. या विषयावर मी थोडंफार लिहिलंही आहे. ‘मिळून सार्‍याजणी’ मध्ये काम करत असताना मी या मुद्यावर स्त्रीवादी न्वहे तर जीवशास्त्रीय दृष्टीने काही मांडायचा प्रयत्न केला आणि मला ती मोकळीक मिळाली हे आवर्जून नोंदवतो. 

‘मिळून सार्‍याजणी’ हे स्त्री चळवळीचं मुखपत्र नसलं तरी अनेक एकट्या-दुकट्या जणींचं ते मुखपत्र आहे. विद्याताईंच्या पिढीच्या मानाने माझ्या पिढीत ‘सिनिसिझम’ थोडा जास्त आहे. ‘ह्याने काय होणार? हे कशाला करायचं?’ असा विचार आम्ही जरा जास्त करतो. आणि मग काही न करणंच बरं आहे या निष्कर्षाला येतो! पण ‘सार्‍याजणी’ला येणाऱ्या पत्रांनी मला सिनिसिझम झटकायला बरीच मदत केली. एखाद्या छोट्या गावातल्या बाईने लिहिलेला तिचा अनुभव, तिच्या विचारात झालेला बदल वाचताना मला अगदी आध्यात्मिक पातळीवरचं जोडलेपण जाणवलेलं आहे. आपण ‘मिळून सार्‍याजणी’ सारख्या मासिकात काम करतोय हे महत्त्वाचं आहे, आपण हे करायला हवं, यात आपल्या क्षमतांची सार्थकता आहे असं मला वाटलेलं आहे. दोन वर्षापूर्वी मी काम थांबवलं त्याचं एक कारण कामातलं साचलेपण हे होतं हे खरं आहे, पण तो माझा  व्यक्तिगत निर्णय होता. ‘मिळून सार्‍याजणी’ सारखं मासिक चालू असणं, त्याची आवश्यकता याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही. 

मराठीतली बरीचशी नियतकालिकं आणि मिळून सार्‍याजणी यातला एक प्रमुख फरक असा की हे सर्वसमावेशक मासिक आहे. म्हणजे ‘मुक्त शब्द’चे किंवा ‘अनुभव’चे संपादकीय निकष जितके कठोर असतील तितके ते ‘मिळून सार्‍याजणी’चे नसतील. पण सर्वसमावेशक असूनसुद्धा या मासिकाने सर्वसामान्यांची अभिव्यक्ती आणि वैचारिक मांडणी यात चांगला समतोल साधला आहे. संपादकीय विभागात मतभिन्नता होतेच (आणि ती झाली तरच मजाही असते), तशी ती इथेही व्हायची. आणि मग क्वचित प्रसंगी ‘मौजे’च्या भागवतपंथाची पुस्तके वाचत मोठे झालेले माझे जीन्स उफाळून यायचे.  त्यावर मग ‘पण आपल्याला सहभागासाठी या लेखाला स्थान द्यायला हवं ‘असं गीतालीताई म्हणाल्या की मी शांत व्हायचो. साहित्य, साहित्याचा दर्जा, वाङ्मयीन मूल्यांची कुस्ती हे एकीकडे रोचक असतं तर एकीकडे थोडं दमवणारंही असतं. 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक साहित्य आणि सामाजिक चळवळ अशा दोन्ही आघाड्या सांभाळणारं मासिक असल्याने (आणि विद्रोहाकडे झुकणारं असलं तरी मासिकाचं कार्यालय कर्वे रोड, प्रभात रोडला लागून असल्याने) ते एकांगी झालेलं नाही. भारतात काँग्रेसचं जे स्थान आहे ते बहुधा मराठी मासिकांमध्ये ‘मिळून सार्‍याजणी’चं आहे!

‘मिळून सार्‍याजणी’ हे अर्थातच मुख्यत्वे स्त्रियांचं जग आहे. संपादकीय विभागात बर्‍यापैकी काम केलेला मी एकटाच पुरुष. मला याबाबत थोडं सांगायचं आहे. काय होतं की आपण सगळे ‘माणूस’ आहोत हे तर झालंच, पण आपल्यातल्या या पहिल्या ओळखीनंतरची दुसरी ओळख म्हणजे आपल्यातला लिंगभाव. त्यामुळे सूक्ष्मातिसूक्ष्म रुपात, समोरची व्यक्ती स्त्री असेल तर मी त्या व्यक्तीची नोंद ‘स्त्री’ म्हणून घेतोच. त्याने माझ्या वर्तनात काही प्रचंड फरक वगैरे पडत नाही, पण ही नोंद घेतली जाते खरी. हेच उलटीकडूनही होत असेल. ‘मिळून सार्‍याजणी’ या मासिकाकडे मी ओढला गेलो याचं मुख्य कारण हे चर्चा करणारं मासिक आहे. मुळात मी पत्रकारितेतला नव्हतोच. पत्रकारितेत करिअर करणं हे माझं ध्येयही नव्हतं. मला भरपूर चर्चा करायची होती. ही चर्चा करता येईल म्हणून मी ‘मिळून सार्‍याजणी’ त दाखल झालो आणि इथे मला असं लक्षात आलं की हे ‘स्त्रियांचं मासिक’ किंवा ‘स्त्रियांनी चालवलेलं मासिक’ असलं तरी माझी ती सूक्ष्मातिसूक्ष्म पातळीवरची नोंद बहुधा मागे पडतेय. कारण इथे मी ज्या स्त्रियांच्या संपर्कात आलो त्या विचार करणार्‍या स्त्रिया होत्या. स्त्रियांसाठीच्या म्हणून मासिकामध्ये ‘मिळून सार्‍याजणी’ उठून दिसतं आणि माझ्यासारख्याला ते आकर्षित करतं कारण एका अर्थी हे स्त्रियांचं मासिक असलं तरी ते पारंपरिक स्त्रीत्वापासून मुक्त झालेलं आहे. 

पण याचबरोबर दुसरीही एक बाजू मांडतो. ही बाजू वरच्या मांडणीला छेद देणारी आहे. स्त्रीवाद, स्त्री लिखित साहित्य, स्त्री प्रश्‍न, स्त्री जाणीव असं म्हटल्याने स्त्री ही ‘स्त्री’चं राहणार आहे असं काहीसं अधोरेखित होतं का? सांगता येत नाही. कदाचित ही विशिष्ट ओळख पूर्ण पुसली जाईल तो काळाचा टप्पा अजून बराच लांब आहे. तो कधी येईल, येईल का हे माहीत नाही. पण इतिहास-वर्तमानाच्या ओझ्यामुळे आज तरी स्त्रीला ‘स्त्री’ म्हणून स्वतंत्र ओळख ठेवावी लागतेय. माझ्या विचारांच्या प्रवासात एक टप्पा असा आला की जिथे मला या सततच्या द्वैताचं काहीसं ओझं वाटू लागलं. आपण आता लिंगसापेक्षतेच्या सीमा ओलांडून एका शांत प्रदेशात आलोय (निदान आपल्याला आत्ता तरी असं वाटतंय), मग आता आपण इथेच थांबावं असं वाटू लागलं. याचा अर्थ स्त्रीवाद अप्रासंगिक झालेला नाही. पण आपल्या अंगभूत गुणांमुळे किंवा दुर्गुणांमुळे आपण या कक्षेत फार काळ राहू शकणार नाही असं मला वाटू लागलं. 

आणि अशा वेळी तर मला एका निष्ठेने, पंचवीस वर्षांहून अधिक काळ काम करणार्‍या विद्याताईंसारख्यांचं अधिकच कौतुक वाटतं. वंदना भागवत एकदा बोलताना म्हणाल्या होत्या की परिवर्तनाचा विचार करणारे आपण संस्थात्मक उभारणीकडे फार दुर्लक्ष करतो. तिथे मिळून सार्‍याजणी, नारी समता मंच अशा संस्थांचं महत्त्व कळू लागतं. आज स्त्रीवाद म्हणजे काय? स्त्री प्रश्‍न काय आहेत? यातले गुंते काय आहेत? असे प्रश्‍न पडणार्‍या कुणालाही मी या मासिकाकडे पाठवू शकतो. (कुणास ठाऊक, कदाचित मीदेखील काही दिवसांनी पुन्हा इथेच येईन!)

‘मिळून सार्‍याजणी’चं कार्यालय हे माझ्यासाठी कार्यालय नसून हक्काचं, गप्पा मारायचं ठिकाण आहे. संपादकीय विभागात कधीही गेलो तरी मला ‘अ‍ॅट होम’ वाटतं. गीतालीताई, विद्याताई दोघींनीही मला, माझ्या बडबडीला सहन केलं आहे. त्यांच्याविषयी कधीतरी स्वतंत्रपणेच लिहायला हवं. ‘मिळून सार्‍याजणी’तल्या मानसी घाणेकर यांचा उल्लेख न करता मला पुढे जाणं शक्यच नाही. वयाने थोड्या मोठ्या, पण विचाराने माझ्या जातकुळीच्या मानसीताई म्हणजे मिळून साऱ्याजणीच्या इतिहासातलं एक  प्रकरण आहे. मी कधी व्यक्तीचित्रं रेखाटण्याचा प्रयत्न केला तर त्यात मानसी घाणेकर नक्की असतील! 

‘सहानुभूती’ या शब्दाबाबत पुलंनी एके ठिकाणी चांगलं लिहिलं आहे. ते लिहितात, सहानुभूती या शब्दात कारुण्याचे, दयेचे चार थेंब कुणी आणून टाकले आहेत कुणास ठाऊक? वास्तविक ती सह-अनुभूती आहे. जे तुला जाणवतंय, वाटतंय ते मी जाणून घ्यायचा प्रयत्न करणं, तो अनुभव घ्यायचा प्रयत्न करणं असा त्याचा अर्थ आहे. तुझ्या मनाजवळ यायचा प्रयत्न करणं म्हणजे सहानुभूती. ही सह-अनुभूती मला ‘मिळून सार्‍याजणी’नं दिली. स्त्रियांचं हे विश्‍व बघताना मी उदास झालो आहे, हताश झालो आहे, विचारात पडलो आहे, गोंधळातही पडलो आहे. पण या उलथापालथीनंच मला पुष्कळ काही दिलं आहे. मी वर म्हटलं तसा आज मी शांत झालो असेन कदाचित, स्थिर झालो असेन, पण ती दृष्टी येण्याकरताचा माझा व्यायाम इथे घडला आहे. जीवनातल्या कुठल्याही क्षेत्रात मला वैचारिकता फार महत्त्वाची वाटते. पण वैचारिकतेची पूर्वअट संवेदना, सहानुभूती ही असते. ही संवेदना मी ‘सार्‍याजणी’त अनुभवली. त्यामुळे माझ्या अंतरातल्या माझ्याच विविध ओळखींपैकी 'साऱ्याजणीच्या टीममधला एक सदस्य' ही एक ओळख मला समाधान देणारी आहे. या लेखाला 'मिळून साऱ्याजणीतले दिवस' असं शीर्षक जरी मी दिलेलं असलं तरी ते शीर्षक मी प्रत्यक्ष 'साऱ्याजणी'त काम न करण्यापुरतंच मर्यादित आहे. बाकी मी आज जगात वावरणारा 'साऱ्याजणी'तलाच एकजण आहे!               

मिळून साऱ्याजणी (दिवाळी २०१६)  
x