Saturday, February 17, 2018

श्रद्धेचं 'वर्गी'करण

'श्रद्धेची चुकलेली वाट' या मागच्या लेखानंतर याच विषयावर थोडं अजून लिहावं, थोडा अजून शोध घ्यावा असं मला वाटत होतं. लेखावर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यातल्या काही प्रतिक्रियांमुळे तो विचार बळावला आणि हा लेख लिहायला मी उद्युक्त झालो. 

श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोघात काही फरक आहे का हा एक कळीचा प्रश्न आहे. तात्त्विकदृष्ट्या विचार केला तर  या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं द्यावं लागेल कारण श्रद्धादेखील मुळात अंतर्मनात उगवलेली, तिथे वसलेली आणि प्रश्नांच्या पलीकडची गोष्ट आहे. परंतु श्रद्धेचं अतिशय विपर्यस्त आणि हानीकारक स्वरूप म्हणजे अंधश्रद्धा असं म्हणून या दोघींमध्ये प्रत्यक्षात एक सीमारेषा आखता येईल आणि दोघी वेगळ्या आहेत असं म्हणता येईल. आपली श्रद्धा जोपासत आणि त्याचबरोबर विवेकही जागा ठेऊन गरज भासल्यास त्या श्रद्धास्थानाच्या विरोधी भूमिका घेणारा कुणी असेल तर तेही स्वागतार्ह आहे. मनाची गरज म्हणून श्रद्धा आहे, पण ती आपल्या विचारशक्तीवर मात करत नाही आहे हे चित्र आश्वासक आहे. आज आपल्याला श्रद्धा, अंधश्रद्धा, धार्मिक श्रद्धा या गोष्टींची व्यक्तीनिहाय विखुरलेली रूपे पाहायला मिळतात आणि त्यामुळे आपण जेव्हा या गोष्टीना सामोरे जातो तेव्हा त्यांच्याबाबत एकदम तुकडा पाडल्यासारखा निर्णय देता येत नाही. या सर्वच गोष्टींचा संबंध माणसाच्या मनःस्थितीशी आहे आणि इथे आपल्याला समाजातील विविध वर्ग लक्षात घ्यावेच लागतात. माणसाचं समाजातलं 'लोकेशन' काय आहे हे न तपासता त्याची मानसिकता आपल्या विचाराची फूटपट्टी लावून बघता येत नाही. एक अनुभव सांगतो. पुण्यातील 'सहेली' या वेश्याव्यवसायातील स्रियांच्या संघटनेशी मी जोडलेलो आहे. एकदा एका व्यावसायिक स्त्रीशी बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर काहीतरी लागल्याचं लक्षात आलं. चौकशी केल्यावर तिने सांगितलं की जिना उतरताना पाय अडखळून पडले आणि लागलं. जखम डोळ्याच्या जवळ होती. मी म्हटलं, 'बरं झालं, थोडक्यात निभावलं.' त्यावर ती चटकन म्हणाली, "फिर? भगवान है ना...भगवान संभालता है.. ." तिच्या बोलण्यात आणि आविर्भावात 'देव आहे' याची एवढी खात्री होती की मी क्षणभर स्तिमित झालो. वेश्यांच्या घरात देवांची रेलचेल असते हे मी पाहिलं होतं. शिवाय देवावर श्रद्धा असते हे मला नवीन नव्हतंच. पण तिच्या बोलण्यात जो ठामपणा होता त्या ठामपणामागे, तिच्या 'देव' या संकल्पनेत तिला उभं राहायला आवश्यक असा एक आधार होता. त्या आधाराचा मी विचार करत होतो आणि मला पराभूत वाटत होतं. 

अशाच प्रकारचा अनुभव इतरही लोकांसंदर्भात आधी आला होता. देवाधर्माबाबत पूर्ण उदासीनता, नवीन काही करायची उर्मी, पारंपरिकतेची काहीशी चीड या प्रारंभीच्या काळापासून 'ही एकूण सगळी गुंतागुंत आहे' या विचारापर्यंतच्या प्रवासात अशा अनुभवांनी आपला ठसा माझ्या मनावर उमटवला आहे. आपण जेव्हा काही 'नवीन विचार' करतो तेव्हा तो करायची मुभा मला माझ्या सामाजिक स्थानामुळे मिळाली आहे हे लक्षात आल्यावर मला वर म्हटलं तसं पराभूतही वाटलेलं आहे. आपल्या भोवतालच्या समाजाचा आपल्याला न कळणारा प्रवाह, विविध परिस्थितीत असलेली माणसं, त्यांचं जगणं, परस्परसंबंध, त्यांचे प्रश्न, त्यांच्यावर झालेला अन्याय, त्यांचं दुखावलेपण, एकटेपण, त्यांची स्वभाववैशिष्ट्यं या सगळ्याला आपण एका सूत्रात बांधू शकतो का असा प्रश्न पडायला लागल्यावर माझा ट्रॅक थोडा बदलत गेला. दिशा बदलली नाही, पण ट्रॅक बदलला. 
वरील उदाहरणातील त्या स्त्रीशी किंवा समाजातल्या कष्टकरी वर्गातील एखाद्या माणसाशी मी श्रद्धेबाबत काय बोलू शकतो ? परिवर्तनाबाबत काय बोलू शकतो ? इथे त्याच्यावर मर्यादा येतात. कारण मी जर 'जगण्याचं मूळ डिझाइन' अधिक चांगलं करू शकत नसेन तर मला त्याच्याही पुढचं काही बोलायचा अधिकार उरतो का ? पण याची दुसरी बाजू अशी की जर 'जगण्यातील सुख-दुःखाची कारणं ईश्वरी सत्तेत / इच्छेत नाहीत तर ती मानवनिर्मित आहेत' याची जाणीव झाली नाही तर माणूस खऱ्या अर्थाने स्वतःची उन्नती साधू शकेल का? तो संघर्षाला तयार होईल का? म्हणजे मग इथेही एकच एक उत्तर नाही. इथेही आपल्याला तारतम्याने निर्णय घ्यावा लागणार आणि विशिष्ट परिस्थितीत असलेल्या माणसांना अनुकूल अशा पद्धतीने बदल घडवायचा प्रयत्न करावा लागणार. 

परिवर्तन हवं हे मान्य केलं की त्याच्या पुढचा आत्यंतिक महत्वाचा प्रश्न येतो तो हा की 'कुणाचं परिवर्तन' ? आणि यातला जो 'कुणी' आहे तो शंभर प्रकारचा आहे. त्यामुळे आपण कुणाशी बोलतोय हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. समाजात वर्गसंघर्ष सतत कार्यरत असतो. दृश्य स्वरूपात दिसला नाही तरी त्याचा अंतःप्रवाह सुरू असतोच. मानवी आकांक्षांची टक्कर होते तेव्हा तो कार्यरत असतो. ही टक्कर अगदीच क्षीण असते किंवा नसते तेव्हा तो प्रभावी नसतो इतकंच. परिवर्तनवादी विचाराने जर वर्गसंघर्ष लक्षात घेतला नाही तर ते उलट दिशेने अंगावर येऊ शकतं. या पार्श्वभूमीवर जेव्हा मी श्रद्धेकडे बघतो तेव्हा मला जाणवतं की जो वर्ग आज सुस्थितीत आहे, शिक्षण आणि नोकरी - व्यवसायाच्या संधी ज्यांना मिळालेल्या आहेत तो वर्गदेखील चिकित्सक होऊ शकत नसेल तर ती गंभीर गोष्ट आहे. या वर्गानेही संघर्ष केला आहेच पण त्याचं फळही त्यांना मिळालेलं आहे. प्रत्येकालाच संघर्षाचं फळ मिळतं असं नाही त्यामुळे ज्यांना ते मिळालं आहे त्यांनी विश्लेषक वृत्ती ठेवावी ही अपेक्षा आहे. श्रीमंत, मध्यम आणि गरीब असं ढोबळ वर्गीकरण आपण करतो. पण मला यात दोन प्रमुख विभाग करावेसे वाटतात - आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि विपन्न. ज्यांची क्रयशक्ती भरपूर आहे किंवा भरपूर नसली तरी चांगली आहे ते संपन्न वर्गात येतात. त्यांच्या क्रयशक्तीत फरक असेल, काहींकडे अतिरिक्त संपत्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात असेल तर काहींकडे त्याहून कमी असेल. परंतु दोघांनाही उद्याची भ्रांत नाही आहे. जो विपन्न वर्ग आहे त्याला उद्याची भ्रांत आहे. त्यामुळे तो 'व्हल्नरेबल' आहे. या दोघांचं मूल्यमापन करताना त्यांना वेगळे निकष लावावे लागतील. आज श्रद्धेच्या, परंपरेच्या संदर्भात संपन्न वर्गाकडे पाहिलं तर निराश व्हायला होतं कारण समाजातील हा सुरक्षित वर्ग चिकित्सक व्हायला, कृतीशील व्हायला तयार नाही. हा वर्ग धार्मिक कट्टरता, श्रद्धेचं बाजारीकरण या सगळ्याच्या विरोधी भूमिका घेताना फारसा दिसत नाही. आधुनिकता ही मोबाइल आणि इतर उपकरणांच्या वापरात नसून ती विचारपद्धतीत असावी लागते. नेमका इथेच मोठा गोंधळ झाल्याचं दिसतं. ज्या वर्गाने आधुनिकतेचं धुरीणत्व स्वीकारायचं तो वर्गदेखील प्रश्न न विचारता परंपरेचा पाईक होताना दिसतो. यात परंपरेचं अतार्किक गौरवीकरण, सामाजिक प्रश्नांबाबत विश्लेषक वृत्तीचा अभाव, रेडिमेड उत्तरांवर विश्वास या गोष्टी अधोरेखित कराव्याशा वाटतात. आणि हे फार चिंताजनक आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून तुकड्या तुकड्यात जे येतं त्याला आपण ज्ञान म्हणणार असू, आपण इतिहास जर तिथे वाचणार असू तर अवघड आहे. म्हणजे मग शिक्षणाने आपल्याला माहिती दिली, पण त्यामानाने चिकित्सेची ताकद काहीच दिली नाही असं म्हणावं लागेल. 

जोपर्यंत बहुतांश मानवी व्यवहारांच्या केंद्रस्थानी पैसा आहे, पैसा माणसाला 'ड्राइव्ह' करतो आहे तोपर्यंत आपल्याला 'माणसाचं खरं मानवस्नेही रूप' दिसणार नाही अशी डाव्या विचारातील मांडणी आहे. संपन्न वर्गाची स्थितिशीलता पाहिली की यातलं तथ्य जाणवू लागतं!    

Saturday, February 3, 2018

श्रद्धेची चुकलेली वाट

समाजाने अधिक 'परिवर्तनस्नेही' होण्यासाठी सामाजिक परिवर्तनाचा ध्यास असलेल्यांचा दृष्टीकोन कसा असावा याविषयी मागच्या लेखात मी काही मुद्दे मांडले होते. या लेखात दुसऱ्या बाजूने विचार करू. म्हणजे धार्मिक-सामाजिक संदर्भात जे परंपरावादी आहेत त्यांच्यावरील जबाबदारी काय आहे ते पाहू. मागच्या लेखावर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यात नाशिकच्या एका वाचकाची प्रतिक्रिया बोलकी होती. नातेवाईक, मित्र-मैत्रिणी अशा विविध सामाजिक वर्तुळात वावरताना काही नवीन विचार मांडणाऱ्याची कोंडी होते याचा चांगलाच अनुभव गाठीशी आहे असं त्यांनी लिहिलं होतं. हा अनुभव त्यांच्यासारखा इतरही काहींच्या गाठीशी असेल. माझ्याही गाठीशी आहे. 'आपण एकटे पडतो' अशी मला बरेचदा जाणीव होते. अर्थात या द्वंद्वातील गुंते वैचारिक वाढीच्या टप्प्यावर लक्षात येत गेले आणि मी त्यातून मार्ग काढत गेलो. प्रास्ताविकाच्या लेखात लिहिलं होतं तसं दोन माणसांमध्ये जसं द्वंद्वात्मक नातं असतं तसं दोन संकल्पनांमध्ये, विचारांमध्ये असतं. हे द्वंद्व असणार आहे,अगदी कायम असणार आहे हे लक्षात घेऊनच सर्व संबंधितांना आपलं वर्तन आखावं लागतं. या द्वंद्वात परंपरेच्या 'फंक्शन'ला समजून घ्यायची एक जबाबदारी जशी परिवर्तनवाद्यांची आहे तशीच दुसरी जबाबदारी परंपरेचं 'डिसफंक्शन' समजून घ्यायची जबाबदारी परंपरानिष्ठ लोकांचीही आहे. आणि यात कळीच्या स्थानी आहे ती 'श्रद्धा'.  

मला बरेचदा 'श्रद्धा' या शब्दापेक्षाही 'धारणा' हा शब्द योग्य वाटतो. 'धारणा' म्हणजे retentive power (ग्रहणशक्ती), understanding (समज). श्रद्धेमध्ये 'पूर्ण शरणागती' आहे, स्वतः विचार न करता विश्वास टाकणं आहे तर धारणेमध्ये थोडा तरी विचार झालेला असणं अभिप्रेत आहे. पण तरी आपण सर्वपरिचित शब्द म्हणून 'श्रद्धा' हाच शब्द वापरू आणि आपण ज्याला श्रद्धा म्हणतो ती एक प्रकारे त्या माणसाची 'समज' आहे असं गृहीत धरू. मे. पुं. रेगे यांनी त्यांच्या 'विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा' या पुस्तकात श्रद्धेविषयी महत्वाचं विवेचन केलं आहे. हे संपूर्ण पुस्तक मला या विषयातील वैचारिक स्पष्टतेसाठी महत्त्वाचं वाटतं. यातील त्यांचा 'बुद्धीप्रामाण्यवाद' हा लहानसा लेख वाचण्यासारखा आहे. 'बुद्धीप्रामाण्य' हा शब्द आपल्या चांगल्या परिचयाचा आहे. माणसाने आपल्या बुद्धीला पटेल, बुद्धीच्या कसोटीवर जे उतरेल तेच करावं असं म्हटलं जातं. आता प्रश्न असा आहे की एखादा माणूस मांजर आडवी गेली की अपशकुन होतो असं समजत असेल तर ते त्याच्या बुद्धीला पटलेलं असतं म्हणूनच तो तसं समजत असतो. अनेक सामाजिक कुप्रथा कुणाच्या तरी बुद्धीला पटणाऱ्या होत्याच. माणूस जे जे निर्णय घेतो त त्याच्या बुद्धीनेच घेतो. मग अशा बुद्धीप्रामाण्याचं काय करायचं? (रेग्यांनी पुढे यावर विस्तृतपणे लिहिलं आहे. आत्ता त्यावर लिहीत नाही, पण त्याविषयी, खरं तर या पुस्तकाविषयी, सविस्तर लिहायला आवडेल.) रेग्यांची मांडणी वाचताना मला लक्षात आलं की 'बुद्धीप्रामाण्य' हा शब्द नेहमीच सर्वत्र लागू होईल असं नाही. काही ठिकाणी तो अपुरा पडू शकतो. 'विवेकवाद' हा शब्द अधिक समर्पक आहे. या शब्दातून 'चिकित्सक वृत्ती' ध्वनित होते. हा शब्द मनुष्याच्या निर्णयक्षमतेकडे, योग्य-अयोग्य यात फरक करण्याच्या क्षमतेकडे निर्देश करतो. त्यामुळे आपल्या श्रद्धा किंवा धारणा 'बुद्धीच्या कसोटीवर' घासून बघण्यापेक्षा 'विवेकाच्या कसोटीवर' घासून बघाव्यात.   

रेगे लिहितात, 'विवेकवाद म्हणजे आपल्या समजुती, विश्वास सत्य किंवा स्वीकारार्ह ठरवण्याची किंवा असत्य आणि/किंवा त्याज्य ठरवण्याची एक विशिष्ट पद्धती आहे.'  थोडक्यात विवेकवाद ही एक प्रभावी 'तपास यंत्रणा' आहे. आपल्या ज्या काही श्रद्धा, समजुती असतील त्यांना सतत तपासत राहिलं तरच आपल्याला नवा विचार स्वीकारणं, किमान त्या विचाराला पोचपावती देणं जमू शकेल. परंपरानिष्ठ मानसिकतेची एक मुख्य अडचण अशी आहे की परंपरेने चालत आलेलं 'बरोबर' आहे आणि नवीन काहीही 'चूक' आहे अशी मनुष्याची समजूत होऊन बसते. एखाद्या नव्या गोष्टीला तपासून बघावंसं वाटणं, ती स्वीकारायला जड जाणं हे अगदीच समजण्यासारखं आहे. पण ती 'चूक' आहे असा निर्वाळा दिला जात असेल तर त्यात धोका आहे. कारण यातून सुधारणेचे मार्गच बंद होतात किंवा मला जे नवं स्वीकारता येतं तेच 'योग्य', इतर नवं 'अयोग्य' अशी मानसिकता तयार होते आणि त्याचं रूपांतर हटवादीपणात, आक्रमकतेत होतं. आपल्याकडे अशा उदाहरणांची कमतरता भासू नये!

माणसाला हळवं करणाऱ्या गोष्टीत 'श्रद्धा' अग्रस्थानी आहे. ती कुणावर, कशावर हा प्रश्नच येत नाही. ती शंकरावर, गणपतीवर, भगवद्गीतेवर, कुराणावर, दत्तगुरूंवर, ज्योतिषावर, कार्ल मार्क्सवर, महात्मा गांधींवर, हिंदुत्ववादावर - कशावरही असू शकते. आणि मग तिथे कुणी तार्किक प्रश्न केले की जो बचावाचा प्रयत्न सुरू होतो तो ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याच्या बचावाचा प्रयत्न नसतो तर आपल्या स्वतःच्या बचावाचा प्रयत्न असतो. त्यामुळे इथे एक लक्षात घ्यायला हवं की माणसाच्या जीवनात श्रद्धेचं काहीएक स्थान आहे हे मान्यच आहे, माणसाने तर्ककठोर होऊन अगदी कोरडं होऊन जावं, समर्पित भावनेचा आधार कधीच घेऊ नये अशीही अपेक्षा नाही. श्रद्धा, समर्पण या गोष्टी माणसाच्या जगण्यात 'अँकर'चं काम करत असतात हेही मान्य आहे. पण मुद्दा असा की आपण ज्या श्रद्धास्थानांवर 'विसावतो' तिथून उठून पुढच्या प्रवासाला जाणार की नाही? शिवाय तिथे पुन्हा यायची मुभा नाही असंही नाही. माणसाचा जो 'आंतरिक स्वर' आहे तो त्याला/तिला पुन्हा त्या स्थानाकडे खेचतोच. जर एखाद्या माणसाला गणपतीला नमस्कार करून किंवा ठरविक दिवशी उपास करून शांत वाटत असेल, आनंद मिळत असेल तर तो त्याला मिळू न देणं चुकीचं होईल. पण प्रश्न नमस्कारापुरता किंवा उपासापुरता मर्यादित नाही. प्रश्न वृत्तीचा आहे. आणि इथे असं दिसतं की 'श्रद्धा' ही मूळची  एका अर्थी सकारात्मक संकल्पना हळूहळू नकारात्मक होत जाते. नमस्कार करणाऱ्याला नमस्कार न करणारा खुपू लागतो आणि मग संघर्षाची ठिणगी पडते.         

आपल्या श्रद्धेची सीमारेषा आखणे हा कळीचा प्रश्न आहे आणि इथे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उगम होतो. 'विज्ञान' म्हणजे नक्की काय ही सैद्धांतिक चर्चा आपण आत्ता बाजूला ठेवू आणि असं बघू की आज धर्मश्रद्धा, परंपरा पालनाचा आग्रह याचे जे दुष्परिणाम दिसतात त्याचं काय करायचं? तर मुख्य म्हणजे सश्रद्ध, परंपरांचं पालन करणारे जे लोक आहेत त्यांनी आपल्या 'कम्फर्ट झोन' च्या बाहेर यायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा. किमान या 'कम्फर्ट झोन'च्या सीमेवर तरी यावं. आज त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या श्रद्धेच्या विषयाचा, म्हणजे देवाधर्माचा बाजार मांडला जातो आहे. तो काही 'सश्रद्ध' लोकांनीच मांडला आहे. मग आपण जर त्या बाजाराचा भाग होत असू तर ते बरोबर आहे का हे त्यांनी स्वतःला विचारावं. या बाजारात आणि गोंगाटात निखळ श्रद्धा मुळात उरली आहे का या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी द्यावं. माझी खात्री आहे की या प्रश्नाचं सकारात्मक उत्तर मिळणार नाही. आज श्रद्धा खोल अंतर्मनात कमी आणि नाईलाजात, बाजारात जास्त आहे.  

श्रद्धेच्या परिणामी लोक अधिकाधिक एकारलेपणाकडे झुकतात की मुळातल्या एकारलेपणाला श्रद्धा खतपाणी घालते याचं उत्तर व्यक्तीगणिक वेगळं असू शकेल, पण आपली श्रद्धा, आपल्या समजुती ही आपली 'विचारपद्धती' होऊ लागली आहे का हा विचार प्रत्येकाने जरूर करावा. कारण श्रद्धा ही मनोवस्था होऊ शकते, विचारपद्धती होऊ शकत नाही! 

Saturday, January 20, 2018

पेशन्स फॉर परिवर्तन

पुलंनी विनोबा भावेंवर दोन लेख लिहिले आहेत. 'आम्ही सूक्ष्मात जातो' हा उपहासगर्भ लेख १९७८ सालचा आहे, तर 'मला दिसलेले विनोबा' हे व्यक्तिचित्रण १९५४ साली लिहिलेलं आहे. 'मला दिसलेले विनोबा' या लेखात एक छोटा किस्सा आहे. भूदानयात्रा सुरू आहे. देवराम नावाचा एक कार्यकर्ता विनोबांकडे गावकऱ्यांची तक्रार घेऊन येतो. लोक अडाणी आहेत, त्यांना भूदानाचं महत्त्व पटत नाही असं त्याचं म्हणणं असतं. त्यावर विनोबा म्हणतात, "अरे, लोक हुशार आहेत. अनोळखी माणसावर एकदम विश्वास टाकणारे लोक अडाणी आहेत की हुशार - सांग बघू!"

हा किस्सा मला विविध वेळी, विविध प्रसंगात आठवला आहे. मी तो बरेचदा उद्धृतही केला आहे. कुठलीही नवीन मांडणी करताना ती अशी हवी की समजून घेणाऱ्याच्या सर्व शंकांची उत्तरं ती देऊ शकेल. नवीन विचार करणाऱ्यावर जबाबदारी जास्त आहे कारण तो काहीतरी बदल करू बघतोय. तो जे मांडतो आहे त्याच्या अनेकविध बाजूंवर त्याने विचार केला आहे हे जर समोरच्याला दिसलं तर त्याचा विश्वास बळावतो. आधुनिकतेचा पुरस्कार करताना हे लक्षात ठेवावं लागतं की आपण ज्या लोकांकडे नवीन विचार घेऊन जातोय त्यांच्या काहीएक धारणा आहेत. त्यात कदाचित मूल्यदृष्ट्या चुकीच्या धारणाही असतील. पण तरी संयम बाळगून आपलं म्हणणं मांडलं तर बदलाची शक्यता वाढते. 

मला ही जाणीव एका टप्प्यावर होऊ लागली. वर उल्लेख केलेला पुलंचा लेख  मी शाळकरी वयात वाचला होता, पण त्यातला आशय पोचायaला अर्थातच काही काळ जावा लागला. आपल्याला समाजात, लोकांच्या मानसिकतेत काही बदल व्हावा असं वाटतं, जे प्रचलित आहे त्यातलं बरचसं आपल्याला पटत नाही, आपल्या मनात विद्रोह निर्माण होतो, आपण त्यातून व्यक्त होतो हे कळत होतं. मनातली हे प्रक्रिया परिचयाची झाली होती. त्याचं एक समाधानही होतं (आहे). पुढे 'मिळून साऱ्याजणी' या मासिकाशी व त्याआधी 'पुरूष उवाच' या अभ्यासगटाशी जोडला गेलो तेव्हा या सगळ्याला एक व्यासपीठ मिळालं. त्यानंतरच्या काळात 'आंदोलन', 'आजचा सुधारक' या मासिकांच्याही संपर्कात आलो. या सर्व मासिकांच्या स्वरूपात फरक असला तरी ही सर्व मासिकं विविध क्षेत्रात परिवर्तनाचा, प्रबोधनाचा प्रयत्न करणारी मासिकं होती. पुढे फेसबुक जन्माला आलं आणि तिथे एक वेगळंच विश्वरूपदर्शन होऊ लागलं. परस्परविरोधी सामाजिक, कलात्मक आणि प्रामुख्याने राजकीय विचारांचे लोक चर्चा करताना, भांडताना दिसू लागले. परिवर्तनाची आस असणाऱ्या माझ्यातल्या मनुष्याला या प्रवासात जी एक जाणीव झाली ती ही की आपल्याला आत्ता वाटतंय त्याच्या दहापट पेशन्स ठेवला तर आपण थोड्या बदलाची आशा करू शकतो. कौटुंबिक, धार्मिक, सामाजिक रचना - ज्या वषानुवर्षं अगणित लोकांना बांधून ठेवतात - त्या सहजासहजी हलवता येत नाहीत. परिवर्तनाच्या संदर्भात इथे मला एक विशेष गोष्ट जाणवली ती ही की 'प्रश्न फक्त माणसांचा नसून माणसांच्या संख्येचाही आहे!'

अर्थात यात दोन्ही बाजू मला समजत होत्या. तीव्रतेने व्यक्त होणं, आपली हरकत नोंदवणं हे आपल्या आतल्या खळबळीला वाट देण्यासाठी एकीकडे आवश्यक आणि दुसरीकडे 'हरकत वृत्तीवर आहे, व्यक्तीवर नाही' हेही मनात जागतं ठेवणं आवश्यक. आपण आपल्या क्षमतेच्या परिघात, आपल्या माध्यमातून प्रयत्न करायचे पण 'जमिनीवरचं वास्तव' ही एक बिकट गुंतागुंत आहे आणि तिथे आपण पुरे पडणार नाही हेही लक्षात ठेवायचं. ही माझ्यासाठी साक्षात्कारी जाणीव होती. एकाच वेळी शांत व अस्वस्थ करणारी जाणीव. 

यातून मग मला असं लक्षात आलं की आपल्याला सारखं व्यक्त व्हावंसं वाटतं हे ठीक, पण आपण पुष्कळ ऐकलं पाहिजे, आपल्याला नेमके प्रश्न विचारता आले पाहिजेत. मला अमुक एका बाबतीत अमुक बदल हवा असं वाटतं, पण संबंधित व्यक्तींना काय वाटतं, ते बदलाला तयार नसतील तर का नाहीत हे आपल्याला समजायला हवं. मुख्य म्हणजे मी जर काही वेगळं बोलत असेन तर तो मुद्दा बाजूला ठेवून 'माणूस' म्हणून इतरांची माझ्याबद्दल सकारात्मक भावना हवी. अलीकडे एका गटचर्चेत सहभागी झालो होतो. एका सहभागी मुलीने फार चांगला मुद्दा मांडला. ती म्हणाली की आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या दृष्टीने आपल्या काही गोष्टी समजून घेणं अवघड असलं तरी त्यांना आपल्याविषयी आत्मीयता वाटली, ती निर्माण व्हायला पूरक असं आपलं वर्तन असेल तर आपले वेगळे विचारही ते स्वीकारतात. त्यामुळे आपण काही नवीन मांडत असलो तरी रोजच्या जगण्याच्या पातळीवर आपण इतरांसारखेच परस्परावलंबी असतो हे लक्षात घेऊन आपण स्वतःकडे 'अनेकांपैकी एक' म्हणून पाहिलं तर ते इतरांना आश्वस्त करणारं असतं. मात्र इथे एक गोष्ट नोंदवतो. आज आपल्या आसपास सध्या जी परिस्थिती दिसते ती चिंताजनक आहे. 'वेगळा विचार असला तरी माणूस म्हणून तो मला जवळचा वाटतो' याऐवजी 'केवळ वेगळा विचार आहे म्हणून तो माणूसच मला मान्य नाही' हे बळावताना दिसतं. याला अर्थातच राजकीय संदर्भ आहे आणि चिंतेची बाब ही की मानवी संबंध हे आधी राजकीय आणि मग मानवी होऊ लागले आहेत. 

सामाजिक परिवर्तनचा विचार करणाऱ्यांचं धर्म, देव, श्रद्धा याबाबतचं आकलन कमी पडतं असं मत बरेचदा मांडलं गेलं आहे. त्यात तथ्य आहे. म्हणजे मला वैचारिक दिशेबद्दल काहीच शंका नाही. माणसाच्या अनेकविध प्रश्नांची उत्तरं विज्ञानच देऊ शकतं याबाबत माझ्या मनात संदेह नाही. देवा-धर्माच्या अतिरेकाने आपलं नुकसान केलं आहे याविषयीही मला शंका नाही. पण मुद्दा आहे तो काही गोष्टींची, संकल्पनांची प्रस्तुतता (त्या मान्य नसल्या तरी) समजून घेण्याचा. देवाधर्माखेरीज आपल्याकडील समाजजीवनाला जात हा एक स्फोटक आयाम आहे. तो कितीही पुसून टाकायचा म्हटला तरी पुसला जात नाही. इथे एक लक्षात घ्यावं लागेल की या गोष्टी नुसत्या असण्यापुरत्या असत नाहीत. त्यांचं काहीएक 'फंक्शन' (कार्य) असू शकतं. हे कार्य समजून घेतलं नाही तर त्या पुसता येणार नाहीत. परंपरेवर प्रहार करताना त्यातून काही नवीन निर्माण होणार नसेल तर ते प्रहार फार काही निष्पन्न करू शकणार नाहीत. माझा एक मित्र 'पुरोगामी कर्मकांडे' सुरू करायला हवीत असं म्हणतो. यातील कर्मकांडे या शब्दामुळे बिचकून न जाता 'लोकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी योजलेले साधन' म्हणून त्यांच्याकडे बघता येईल. ही कर्मकांडे अर्थातच वेगळी असतील. पण त्यातून एकी व्यासपीठ तयार होईल. आपण धार्मिक कर्मकांडांकडे पाहिलं तर असं दिसेल की त्यात संगीत, खेळ, कला, अशा विविध गोष्टींचा आधार घेतलेला असतो. माणसाला रंजन हवं असतं याची दखल घेऊन या गोष्टी धार्मिकतेत गुंफल्या जातात. परिवर्तनाचा विचार रुजवण्यासाठी गटचर्चा हे एक प्रभावी माध्यम होऊ शकतं. त्यात रंजकता कशी आणता येईल, विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन रंजक पद्धतीने कसा पोचवता येईल यावर विचार केला तर बदलाची प्रक्रिया लोकांना आपलीशी वाटेल. 
स्त्री-पुरूष समता, श्रद्धा-अंधश्रद्धा, ईश्वरी अस्तित्व-निरीश्वरवाद, धर्माधारित जीवन-निधर्मी जीवन, परंपरानिष्ठ विचार-वैचारिक उदारमतवाद, साहित्य-कलाविषयक धारणा या सर्वच 'संघर्ष-क्षेत्रात' नवतेच्या, प्रबोधनाच्या पुरस्कर्त्यांनी 'सर्वसाधारणपणे माणूस हा 'एलियन' (अनोळखी, उपऱ्या) गोष्टींना बिचकणारा प्राणी आहे' हे लक्षात ठेवून धोरण ठरवलं तर नवतेचाच मार्ग सुकर होणार आहे.      

Saturday, January 6, 2018

नवे-जुने, अधिक-उणे आणि आपण

'आपण जिथे आहोत तिथवर कसे आलो' या विचाराचा धागा 'आपण जिथे होतो तिथे तरी कसे आलो?' या विचाराशी जोडलेला आहे. मी विशिष्ट कुटुंबात जन्मलो. विशिष्ट संस्कारात वाढलो. पुण्यासारख्या शहरात आलो आणि राहिलो. माझ्यावरील संस्कारांना माझ्या स्वतःच्या अशा गुणदोषांची जोड मिळाली. या सगळ्यातून माझा प्रवास वैचारिक आणि भौतिकदृष्ट्या एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर होत गेला. हे जसं माझं झालं तसंच इतरांचंही झालेलं आहे. आणि हे होत राहणार आहे. या प्रवासात प्रत्येकाच्या बाबतीत काही सूक्ष्म तर काही ठळक टप्पे असतील. प्रत्येकाची वेगळी कथा असेल. माणसाचा हा जो प्रवास आहे, 'जनांचा प्रवाह' जो चालला आहे त्याचं संपूर्ण, सुस्पष्ट आकलन एका व्यक्तीला, एका विचारधारेला होणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी एकत्रितपणे जो खेळ मांडला आहे तो विस्मयचकित करणारा आहे, त्रस्त करणारा आहे, हताश-दुःखी-अस्वस्थ करणारा आहे आणि कुतूहलाने उत्साहित करणाराही आहे. माणसाविषयी आस्था असेल, करूणा असेल तर माणसांच्या प्रवासाची गोष्ट समजून घेणं आत्मिक समाधान देणारा अनुभव ठरू शकतो. 

मला नेहमी असं वाटतं की प्रश्न माणसांचा असण्यापेक्षा माणसांच्या संख्येचा असतो. 'परंपरा' आणि 'नवता' या दोन्हीकडे बघताना हे लक्षात ठेवावं लागतं. मी जेव्हा एखाद्या गोष्टीला 'परंपरा' म्हणतो तेव्हा ती गोष्ट काहीजणांच्या जीवनशैलीचा भाग असते. कदाचित तेही त्या गोष्टीकडे 'हे परंपरेने चालत आलेलं आहे' अशा दृष्टीने, 'परंपरा' नामक काहीएक चीज अस्तित्वात आहे हे मान्य करून बघत असतील. पण त्यामुळे त्यांच्या मनात संघर्ष निर्माण होत नाही. माझ्या मनात तो होतो. मला 'नवता' आकर्षित करते. पण मी इथे स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. तो असा की परंपरेचं काटेकोर पालन करणारा एखादा मनुष्य कधीच काही 'नवीन' करत नाही का? परंपरा आणि नवता या संज्ञा बहुतेकदा धर्म, श्रद्धा, नैतिकता या संदर्भात आणि सामाजिक व्यवस्थेच्या मूल्यांसंदर्भात वापरल्या जात असल्याने जगण्याची इतर अंगे - ज्यात व्यावसायिक, आर्थिक अंग प्रमुख आहे - दुर्लक्षित राहतात. एखादा धार्मिक, सश्रद्ध माणूस आहे. तो त्याबाबतीत परंपराप्रिय आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण तोच माणूस एखाद्या कंपनीत 'रीसर्च अँड डेव्हलपमेंट' विभागात महत्त्वाचं काम करतो आहे, त्याच्यात संशोधनाबद्दल आस्था आहे. म्हणजे धार्मिकदृष्ट्या तो परंपरेचा पाईक असला तरी त्याच्या कार्यक्षेत्रात तो नवतेचा पाईक आहे. वरील प्रश्नाच्या जोडीने येणार दुसरा स्वाभाविक प्रश्नही मी स्वतःला विचारला पाहिजे - नवतेकडे आकृष्ट होणारा कधीच परंपरेचा आधार घेत नाही का? हे प्रश्न आणि त्यांची वास्तव उत्तरे आपल्याला सांगतात की माणूस एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आणि एक 'सामाजिक घटित'म्हणून एकाच वेळी जगत असतो. आपण दुभंग व्यक्तिमत्वाविषयी ऐकतो. मला तर वाटतं की माणूस दुभंग तर असतोच, पण तो शतभंगही असू शकतो. त्याच्या जगण्याचे अनेक धागे असतात. तो कधी एखादा धागा सोडून देतो, कधी तोच धागा धरून ठेवतो. 

माणसाच्या या 'धरसोडी'चा सूक्ष्म विचार केला तर असं लक्षात येईल की त्यामागे 'स्वार्थ' ही प्रमुख अंतःप्रेरणा कार्यरत असते. एक उदाहरण घेऊ. एखादा मनुष्य कौटुंबिक दबावामुळे परंपरेचं पालन करत असेल तर सकृतदर्शनी 'तो स्वार्थी आहे' असं आपण म्हणणार नाही. परंतु आपण थोडं अधिक खोलात जाऊ. कौटुंबिक दबावाला झुगारण्याची आणि दुसरा पर्याय निर्माण करण्याची ताकद माझ्यात नाही, त्यामुळे सध्या या चौकटीत राहणंच श्रेयस्कर आहे अशा विचाराने जेव्हा बंधनं स्वीकारली जातात तेव्हा तो 'स्वार्थी' विचार असतो हे स्पष्टीकरण आपल्याला मान्य होईल. यासाठी 'स्वार्थ' या एकाच संकल्पनेची विविध रूपे लक्षात घ्यायला हवीत. स्वार्थ ही स्व-केंद्री संकल्पना आहे हे बरोबरच आहे. पण त्यातही 'स्व-विलासी' आणि 'स्व-विरोधी' असा फरक करता येईल. पहिल्यात 'स्व'चे थेट सुख, तशा सुखाची आकांक्षा आहे. दुसऱ्यात 'स्व'च्या इच्छेला मुरड घालून, तडजोड करून 'स्व'रक्षणार्थ मिळवलेलं 'मानीव' सुख आहे. मनुष्याकडे 'स्वार्थी माणूस' म्हणून पाहिलं तरी त्या स्वार्थाची उकल करता आली तर मनुष्याच्या वागण्यातल्या 'विसंगतीची संगती' लावायला मदत होईल. 
तत्वज्ञानात द्वंद्ववाद (dualism) ही एक संकल्पना आहे. ही संकल्पना दोन विरुद्ध तत्त्वांचा संघर्ष मांडते. माणसाच्या मनाबाबत मला असं जाणवतं की संस्कृतीजन्य 'विवेक' आणि उत्क्रान्तीजन्य 'विद्रोह' हा मनाचा एक मुख्य संघर्ष आहे. मन हे कायम या द्विस्थितीमध्ये (dual mode) असतं. इतकंच नाही तर कुठल्याही गोष्टीला 'एकच बाजू' नसते, दोन बाजू असतात असं जे आपण म्हणतो त्याअर्थीही मला द्वंद्ववाद महत्त्वाचा वाटतो. 'एक' असं काही नसतं, 'दोन' असतं, 'एका'वरच सगळा भार नाही, जे आहे ते 'दोघां'चं आहे हे समजणं माझ्यासाठी वेळोवेळी महत्त्वाचं ठरलं आहे. याच तर्काने परंपरेचा, नवतेचा किंवा अन्य कुठल्याही संकल्पनेचा 'एक आणि एकच' खुलासा करता येत  नाही. संकल्पना, विचार विविध पदर घेऊन येतात. त्या सगळ्या बाजूंचं आपलं आकलन जसजसं वाढत जातं तसतशी आपली वाढ होत जाते. हा विचार केंद्रस्थानी ठेवून आपण या सदराची वाट चालणार आहोत.               

'परंपरा आणि नवता' हे विंदा करंदीकर यांच्या एका समीक्षात्मक पुस्तकाचे शीर्षक आहे. विंदांनी 'कविता' या वाङ्मयप्रकाराबाबत त्यांच्या व्याख्यानातून, लेखांमधून जी मांडणी केली आहे त्याचं हे संकलन आहे. बीडच्या मराठवाडा साहित्य संमेलनात त्यांनी वाचलेल्या निबंधाचं शीर्षक 'परंपरा आणि नवता' असं होतं. या सदराविषयी संपादकांशी चर्चा करताना हे नाव सदराच्या विषयवस्तूसाठी मला अगदी समर्पक वाटलं. सार्वजनिक चर्चाविश्वातील अनेक चर्चा या विषयाच्या कक्षेत येतात. साहित्य, कला, सामाजिक प्रबोधन इथपासून राजकीय विचार, विज्ञान-तंत्रज्ञान, आर्थिक-व्यावसायिक क्षेत्र, शेती इथपर्यंत अनेक घटकांना हा विषय स्पर्श करतो. या विषयाचा विचार करताना आपण एक लक्षात ठेवू की 'परंपरा आणि नवता' हा एक मोठा 'स्पेक्ट्रम' आहे. यात व्यक्तिजीवनातील आणि समाजजीवनातील अनेक अंगे सामावली जाऊ शकतात. त्या सर्वच अंगांविषयी काही मांडणी करण्याची माझी पात्रता नाही. परंतु माझे जे आस्थाविषय आहेत त्याबाबत बोलायला, खरं म्हणजे संवाद साधायला आवडेल. मात्र आपण या संवादात एक काळजी घेऊ. परंपरा म्हणजे 'क्ष' नावाची एक गोष्ट आहे आणि 'नवता' म्हणजे 'य' नावाची एक गोष्ट आहे अशा साचेबद्ध पद्धतीने आपण या संकल्पनांकडे बघायला नको. या सदरातून आपण जो शोध घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तो प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात घेऊ. शब्द आणि व्याख्या मांडणीसाठी आवश्यक असल्या तरी त्यातून आपल्या आकलनाला मर्यादा पडू शकतात. त्यामुळे आपण वैचारिक खुलेपणाने परंपरा आणि नवता या दोन्ही संकल्पनांकडे पाहूया. 

वर मी ज्याचा उल्लेख केला आहे ते माणसाच्या मनात सुरू असलेलं द्वंद्व मला नेहमीच आकर्षित करत आलेलं आहे. 'जे आहे ते' आणि 'जे वाटतंय ते' या द्वंद्वात माणूस अडकलेला असतो. या द्वंद्वाची धार कमी-जास्त होत असते, पण द्वंद्व संपत नाही. माणसाचं हे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे आणि ते सर्जनशीलतेचं उगमस्थानही आहे. या द्वंद्वाचा शोध घ्यावा आणि काही धागे आपल्याला सोडवता येतात का ते पहावं हा या सदरामागचा माझा उद्देश आहे. तो सफल होतो की नाही हे आता वाचकांच्या प्रतिसादावरूनच ठरेल!

Saturday, November 4, 2017

पॉलीअ‍ॅमरी : बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था

माणसं स्वभावत: वेगवेगळी असतात. त्यांचं वेगळेपण त्यांच्या इतर व्यक्तींबरोबरच्या संबंधांतही परावर्तित होतं. स्त्री-पुरुष संबंधांतही हे परावर्तित होतं. स्त्री-पुरुष संबंधांमध्ये लग्नपूर्व-लग्नोत्तर-लग्नबाह्य़ अशा सर्वच पायऱ्यांवर प्रस्थापित नैतिकता आपली भूमिका बजावत असते. आपल्याकडे स्त्री-पुरुष संबंधांची ‘व्यवस्थात्मक सुरुवात’ सहसा एकपत्नी-एकपती पद्धतीने (मोनोगॅमीने) होत असली तरी मनातून ‘मोनोगॅमी’ राहीलच याची शाश्वती नसते. बऱ्याचदा ती प्रत्यक्षातही राहत नाही.

यात विविध टप्प्यांवर विविध प्रश्न पडत असतात. लग्न झालेलं असताना आपल्याला अन्य कुणाबद्दल काहीतरी वाटतंय, ते वाटणं योग्य आहे का? आपण अमुक गोष्ट करावी की करू नये? अमुक गोष्ट नैतिक की अनैतिक? अशा स्वरूपाचे हे प्रश्न असतात. कारण ज्या भावनांच्या, कृतींच्या संदर्भात हे प्रश्न पडतात, त्यांच्यात आपल्या मन:स्थितीवर दूरगामी परिणाम करण्याची ताकद असते. आपल्या सामाजिक स्थानावरही त्याचा परिणाम होऊ  शकतो. प्रेमभावना ही स्त्री-पुरुष संबंधांमधील निर्णायक भावना आहे. ही भावना प्रवाही असते, आणि प्रबळही. प्रेम म्हणजे नक्की काय, यावर अनेक अंगांनी बोललं जातं. ‘मॅरेज अँड मॉरल्स’ या पुस्तकातील बर्ट्रांड रसेलचं एक विधान उद्धृत करायचा मोह आवरत नाही – Love is something far more than desire for sexual intercourse; it is the principal means of escape from the loneliness which afflicts most men and women throughout the greater part of their lives.  जीवशास्त्रीय अभ्यास मानवी भावनांना अस्तित्वाच्या लढाईशी आणि प्रजोत्पादनाशी जोडतो. आणि ते बरोबरही आहे. आपल्या विचार-वर्तणुकीचा पाया जसा सामाजिक संस्कारांमध्ये आहे, तसाच तो आपल्या जैविक संरचनेतही आहे. ही बाब लक्षात न घेता त्या विचार-वर्तणुकीमुळे आनंदी/ दु:खी होत अपराधी वाटून घेणं हे हानीकारकच आहे. पण मुद्दा भावनांच्या तीव्रतेचा आहे. विशेषत: प्रेमाच्या बाबतीत पाहिलं तर प्रेम, आकर्षण जर प्रजोत्पादनापुरतं मर्यादित असतं तर त्याची तीव्रता लैंगिक इच्छेच्या मर्यादेत राहिली असती. पण प्रेमाची तीव्रता वाढते. प्रेम माणसाला व्यापून टाकू शकतं. माणूस जसा स्थिरावत गेला तसं प्रेमही स्थिरावत गेलं आहे. हे कशामुळे झालं? इथे एक थोडी विचित्र, पण सयुक्तिक तुलना करावीशी वाटते. ‘बलात्कार हे सिव्हिलायझेशनचं अपत्य आहे’ असं म्हणतात. त्याच न्यायाने तीव्र प्रेम, भावनिक गुंतणूक, मनाचा हळवेपणा- एकूणातच विविध प्रकारचे भावनिक आवेग हीदेखील सिव्हिलायझेशनचीच अपत्ये म्हणता येतील. इथे दोन प्रश्न उपस्थित होतात: ही अपत्ये जन्माला घालावीत का? आणि जन्माला आली, तर त्यांच्या संगोपनाचा योग्य मार्ग कुठला?

लग्नव्यवस्थेने प्रेमभावनेच्या बाबतीत हा प्रश्न सोडवण्याचा काही अंशी प्रयत्न केला आहे. स्त्री-पुरुष संबंधांचं नियमन करणारी व्यवस्था म्हणून लग्नव्यवस्था गेली अनेक शतके प्रचलित आहे. या व्यवस्थेला नैतिक अधिष्ठान आहे. लग्नसंस्थेविषयी साधकबाधक चर्चा सतत सुरू असली तरी अजूनही लग्नसंस्थेचं स्थान पक्कं आहे. लग्नाचं काहीसं लोकशाहीसारखं आहे. लोकशाहीत दोष आहेत, पण प्राप्त परिस्थितीत सर्वाना सामावून घेईल असा याहून चांगला पर्याय दिसत नाही. राज्यव्यवस्था लोकशाहीपाशी येऊन स्थिरावली आहे. आता या व्यवस्थेत सुधारणा होऊ  शकतील, पण फार मूलभूत बदल होऊ  शकत नाहीत, असं म्हटलं जातं. मात्र, लग्नव्यवस्थेच्या प्रचलित पद्धतीचा जो गाभा- एकपत्नीत्व/ एकपतीत्व- त्यात बदल होऊ  पाहत आहे. त्याची व्याप्ती कमी आहे; पण बदल होत आहेत. खरं तर बहुपत्नीत्व (पॉलीजिनी) वा बहुपतीत्व (पॉलीअँड्री) या पद्धती आधी अस्तित्वात होत्याच. काही समाजांमध्ये त्या आजही आहेत. परंतु एकपत्नीत्व/ एकपतीत्व (मोनोगॅमी) याला बहुतांश समाजांमध्ये एक घट्ट अशी सांस्कृतिक-नैतिक बैठक मिळाल्याने इतर पद्धतींकडे काहीशा नकारात्मकतेनेच पाहिलं जातं.

लिव्ह-इन रिलेशन, ओपन मॅरेज (लग्न झालेल्या जोडप्याकडून एकमेकांच्या लग्नबाह्य़ लैंगिक संबंधांना मान्यता) अशा व्यवस्था आज अस्तित्वात येताना दिसतात. अशासारखीच एक व्यवस्था म्हणजे ‘पॉलीअ‍ॅमरी’! ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत (२००६) पॉलीअ‍ॅमरीची व्याख्या अशी केली आहे.. The fact of having simultaneous close romantic relationships with two or more other individuals, viewed as an alternative to monogamy, esp. in regard to matters of sexual fidelity; the custom or practice of engaging in multiple romantic relationships with the knowledge and consent of all partners concerned. आज लग्नव्यवस्थेत अभिप्रेत असलेला ‘व्यवस्था विचार’ विस्तारित स्वरूपात, माणसाच्या नैसर्गिक उर्मीना न्याय देत, स्त्री-पुरुष किंवा समलिंगी नात्यांकडे गंभीरतेने बघत, लैंगिक इच्छेकडे आणि प्रेमभावनेकडे थिल्लरपणा म्हणून न बघता या माणसाच्या आंतरिक व सुंदर इच्छा आहेत अशा दृष्टीने बघत माणसांच्या बहुविध नात्यांची व्यवस्था लावण्याचा एक प्रयत्न ‘पॉलीअ‍ॅमरी’ या व्यवस्थेतून केला जातो. ‘पॉली’चा अर्थ ‘पुष्कळ’ (एकाहून जास्त). तर ‘अ‍ॅमोर’ या लॅटिन शब्दाचा अर्थ ‘प्रेम’! या व्यवस्थेची पहिली अट अशी आहे की, संबंधित व्यक्तींपैकी प्रत्येकाला प्रत्येकाच्या इतरांशी असलेल्या प्रेमाच्या नात्याच्या स्वरूपाविषयी पूर्ण कल्पना असेल. मोनोगॅमीमध्ये स्त्री-पुरुषांनी स्वत:च्या नवरा-बायकोकडूनच प्रेम व शारीरिक सुख घेणं अभिप्रेत आहे. ‘पॉलीअ‍ॅमरी’ची संकल्पना माणसातल्या बहुविध ऊर्मीना बहुविध व्यक्तींमार्फत नियमित करण्याचा प्रयत्न करते. त्याअर्थी या व्यवस्थेला एकच एक साचेबद्ध चेहरा नाही. उदा. एखादं लग्न झालेलं जोडपं आहे. जोडप्यातील स्त्रीच्या आयुष्यात अन्य कुणी पुरुष आला तर त्या पुरुषाशी तिचं नातं केवळ भावनिक राहू शकेल, किंवा भावनिक-शारीरिक दोन्ही असू शकेल. हीच गोष्ट जोडप्यातील पुरुषालाही लागू होईल. प्रेम किंवा शारीरिक समाधान या गोष्टी एका व्यक्तीपुरत्याच आहेत, ‘एक्सक्ल्यूझिव्ह’ आहेत, या प्रस्थापित दृष्टिकोनाला आव्हान देणारी ‘पॉलीअ‍ॅमरी’ची संकल्पना आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना काही प्रमाणात प्रत्यक्षात अस्तित्वात आहे. ज्याप्रमाणे लग्न यशस्वी किंवा अयशस्वी होतं, त्याचप्रमाणे नात्यांच्या या व्यवस्थेलाही यशाचा किंवा अपयशाचा सामना करावा लागतो. ही एक वेगळी संकल्पना असली तरी यात माणसंच सहभागी असल्याने व सहभागी माणसांच्या स्वभाववैशिष्टय़ांनुसार, अंगभूत गुण-दोषांनुसार याही व्यवस्थेत अडचणी येऊ  शकतात. परंतु या व्यवस्थेचं वेगळेपण माणसाला बंधमुक्ततेचा अनुभव देण्यात आहे. शिवाय बंधनाबाहेर जायची मुभा असणं याचा अर्थ ‘कुठलंच बंधन कधीच न बाळगणं’ असा होत नाही. (हा मुद्दा नेहमीच वादग्रस्त ठरतो. कारण ‘बंधन बाळगणे’ याची नेमकी व्याख्या करता येत नाही. तिथे तारतम्यच कामी येतं. सध्या हे नोंदवून पुढे जाऊ .)

‘पॉलीअ‍ॅमरी’चा गाभा सर्व संबंधित व्यक्तींना एकमेकांच्या नात्याच्या स्वरूपाची कल्पना असणे हा असला तरी त्याचे विविध ‘फॉर्म्स’ आहेत. यात वरील उदाहरणाप्रमाणे लग्नव्यवस्थेत असलेली जोडपीसुद्धा असू शकतात किंवा लग्न न करताही तिघे-चौघेजण एकत्र राहू शकतात. यात नात्यांमध्ये उतरंड असू शकते किंवा नसूही शकते. मुळात ‘पॉलीअ‍ॅमरी’ मुक्त व्यवस्था असल्याने तिथे कुठल्याच स्वरूपाच्या नातेसंबंधांना नकार नाही. विविध स्वरूपाच्या नातेसंबंधांचं नियोजन करण्याचा प्रयत्न आहे. व्यक्तीला एकाहून अधिक व्यक्तींशी गांभीर्याने (हा शब्द महत्त्वाचा!) संबंध ठेवता यायची मुभा असलेल्या आणि प्रेम व लैंगिकतेबद्दलची नवनैतिकता प्रस्थापित करू पाहणाऱ्या या व्यवस्थेचं स्वरूप समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे प्रयत्न करावे लागतील. कारण आज बहुतेक जण अशा प्रकारच्या बहुविध संबंधांना मनातून तयार नाहीत. आणि यात कुणाचा दोष आहे असंही नाही. ही व्यवस्था नवीन आहे, माहितीची नाही. त्यामुळे ती स्वीकारणं जड जाणारच. शिवाय लग्नव्यवस्थेमुळे ‘एकाला एक’ हे आपल्या मानसिकतेत रुजलं आहे. ते आपण सहजासहजी पुसू शकणार नाही. या लेखात पॉलीअ‍ॅमरीच्या स्वरूपाविषयी आपण प्राथमिक चर्चा करणार आहोत. पण एका लेखात सर्व शक्यतांवर तपशिलात बोलणं शक्य होणार नाही. पॉलीअ‍ॅमरीविषयी इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहे. काही फिल्म्स, माहितीपटही उपलब्ध आहेत.

पॉलीअ‍ॅमरीची मूळ संकल्पना आपण पाहिली. आता त्यातल्या गुंतागुंतीकडे येऊ आणि त्यासाठी प्रेम व लैंगिकता या दोन गोष्टींचा विचार करू.

प्रेम व लैंगिक आकर्षण या पूर्णत: भौतिक गोष्टी नव्हेत. ‘पूर्णत:’ म्हणण्याचं कारण असं की, जाणिवेचा उगमही जडातच आहे असं आधुनिक विज्ञान सांगतं. त्यामुळे या भावनांच्या मुळाशीही ‘जड’ कारणे आहेत. परंतु जाणिवेचं अस्तित्व व स्वरूप मात्र अनुभूतीच्या पातळीवर आहे. या माणसाच्या अंतर्मनात प्रकटणाऱ्या गोष्टी आहेत. दुसरं असं की, विविध भावभावनांचं जे स्वरूप एका व्यक्तीला अनुभवास येतं, ते तसंच्या तसं दुसऱ्या व्यक्तीच्या अनुभवास येईलच असं नाही. परंतु या दोन्ही गोष्टींचा खुलासा ‘आकर्षण’ हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून करता येईल. एकमेकांच्या भौतिक आणि/ किंवा मानसिक वैशिष्टय़ांमुळे व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात. मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासात स्त्रीविशिष्ट व पुरुषविशिष्ट गुणधर्माची बरीच चर्चा झालेली आहे. त्यासंदर्भातील विश्लेषण मॅट रिडलेसारख्या अभ्यासकांच्या पुस्तकात (रेड क्वीन : सेक्स अ‍ॅण्ड द इव्होल्यूशन ऑफ ह्य़ुमन नेचर) व इतरही लेखकांच्या पुस्तकांत पाहावयास मिळेल. यासंबंधी एक गोष्ट नोंदवणं महत्त्वाचं आहे. मानवी उत्क्रांती हा विषय वर्तनामागील जैविक कारणे जाणून घेण्याच्या दृष्टीने, समाजशास्त्रीय विषयांची चर्चा करण्यासाठी अनिवार्य करावा, इतका महत्त्वाचा आहे. कारण उत्क्रांती हे माणसाचं विज्ञान आहे. त्यामुळे माणसाच्या पायाभूत रचनेकडे दुर्लक्षून आपल्याला सामाजिक प्रश्नांची उत्तरं सापडणार नाहीत. समाजाची मूल्यात्मक बांधणी करताना या बांधणीच्या लघुत्तम एककाचं- म्हणजेच मनुष्याचं- ‘नेचर’ काय आहे, तो/ ती या ‘नेचर’ला सामाजिक चौकटीत बसवायचा प्रयत्न कुठवर ताणू शकेल, हा विचार व्हायला हवा. आज लग्नव्यवस्था अस्तित्वात असली तरी ‘मोनोगॅमी’ माणसाच्या आदिम ‘नेचर’च्या विरुद्ध असल्याने या व्यवस्थेला समांतर व्यवस्थाही सुरू असतात. पण त्याचा स्पष्ट उल्लेख होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ‘नेचर’चं महत्त्व इथे लक्षात येतं. मुळात सजीवसृष्टी अस्तित्वात येणं आणि तिच्यात बदल होत जाणं या प्रक्रियेत ‘प्रजोत्पादन’ हे सजीवांचं प्रमुख लक्षण राहिलं आहे. (समलिंगी संबंध याला अपवाद आहेत. या विशिष्ट जाणिवांचा खुलासा प्रजोत्पादनाच्या तर्काने करता येत नाही. जाणिवांची ही वेगळी वाट आहे, इतकंच म्हणता येईल.) समाजव्यवस्था ही ‘उत्क्रांत माणसा’ची गरज आहे; ‘उत्क्रांती’ची नाही. प्रजोत्पादनाच्या उद्देशामुळे स्त्री-पुरुषांमध्ये आकर्षण, लैंगिक ताण अस्तित्वात आहे. अर्थात आज प्रजोत्पादनालाही नियंत्रणात आणण्यात माणूस यशस्वी झाला आहे. पण म्हणून लैंगिक आकर्षण कमी झालेलं नाही. थोडक्यात, ‘माणूस कसा असायला हवा?’ हा जसा महत्त्वाचा विषय आहे, तसाच ‘माणूस आतून कसा आहे?’ हादेखील महत्त्वाचा विषय आहे. आणि दुसऱ्या प्रश्नाचा अभ्यास आधी केला तर पहिल्या प्रश्नाची योग्य उत्तरं मिळू शकतात.

उत्क्रांतीच्या अभ्यासाचं महत्त्व नोंदवून प्रेम व लैंगिकतेच्या मुद्दय़ाकडे येऊ. उत्क्रांती आपल्यासमोर या दोन्हींचे सविस्तर विश्लेषण ठेवू शकते. मात्र, त्यावर सामाजिक नियमनाच्या उद्देशाने प्रभावीपणे काम करणं हे माणसाचं कौशल्य आहे. उत्क्रांतिजन्य जाणिवांना आपण नैतिक चौकटीत बसवलं आहे. या चौकटी कणखर असतात आणि बहुसंख्य माणसे या चौकटीत राहणंच स्वीकारतात. माणसाचं अंतर्मन हे अनेकविध तृष्णांचं कोठार असल्याने चौकट दिली नाही तर अराजक माजेल अशी भीती असते आणि ती अनाठायी नाही. हीच भीती स्त्री-पुरुष आकर्षणालाही लावली जाते आणि या आकर्षणावर बंधनं येतात. ‘पॉलिअ‍ॅमरी’सारखी संकल्पना या आकर्षणाला, ओढीला नैसर्गिक व रास्त मानते आणि या ऊर्मीना वाट द्यायचा प्रयत्न करते. परंतु हे समजण्यासाठी ‘प्रेम’ या संकल्पनेचा विस्तार समजणं आवश्यक आहे. हा नाजूक मुद्दा आहे. कारण ‘प्रेम’ (एका वेळी तरी) एकाच व्यक्तीवर होऊ  शकतं, हा जवळजवळ सर्वमान्य सिद्धांत आहे. याचा एक खुलासा असा केला जातो की, प्रेमभावना ही अतिशय तरल, मनोविश्व व्यापणारी, सखोल भावना असल्याने ती एका वेळी एकाच व्यक्तीच्या बाबत अनुभवता येऊ  शकते. विशेषत: नात्याच्या आरंभीच्या काळात हे प्रकर्षांने जाणवतं. लैंगिक इच्छा प्रेमभावनेहून स्वतंत्र असली तरी एका व्यक्तीवरील प्रेमाची विस्तारित अभिव्यक्ती, मानसिक ओढीचं शारीरिक जोडलेपणात परावर्तित होणं अशा स्वरूपात लैंगिक संबंधाचं वर्णन केलं जातं. अर्थात कामेच्छा तिच्या स्वयंभू, प्रेमविरहित रूपातही अस्तित्वात असतेच. पण निव्वळ कामेच्छेला निव्वळ प्रेमाइतकी मूल्यात्मक मान्यता नाही. मुळात कामेच्छा ही ‘वाईट प्रवृत्ती’ या सदरातच ढकलली जाते. किमान आपल्याकडे तरी. (वास्तविक ‘प्रेम’ या भावनेचा ‘ट्रिगर पॉइंट’ शारीर आकर्षण आहे. विशेषत: स्त्री आणि पुरुषामध्ये जे जे काही असतं त्याचं मूळ लैंगिकतेत आहे अशीही एक मांडणी आहे. यात लैंगिकता केवळ शरीरसंबंध या अर्थाने येत नाही, तर ‘दोन व्यक्तींमधला निसर्गदत्त जैविक ताण’ या अर्थी येते.) तर मग ‘हे प्रेम एकाहून अधिक व्यक्तींबाबत शक्य होईलच कसं?’ हा प्रश्न येतो. इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की, हा प्रश्न अनुभूतीचा आहे. एखादी अनुभूती आपल्याला येत नाही म्हणजे ती अस्तित्वातच नसते असं नाही. यासाठी समलिंगी संबंधांचा दाखला देता येईल. समलिंगी संबंधांना आज इतरांकडून हळूहळू मान्यता मिळते आहे. अमेरिकेत समलिंगी लोकांना लग्नाची कायदेशीर संमतीही देण्यात आली आहे. समलिंगी संबंध ही नक्की काय अनुभूती आहे, हे माझ्यासारख्या हेटेरोसेक्शुअल लोकांना कळणार नाही. पण म्हणून मी या अनुभूतीला मोडीत काढू शकत नाही. मी या अनुभूतीचा धिक्कार करणं योग्य होणार नाही. त्यामुळे काही लोक जसे समलिंगी असतात किंवा काही लोक जसे डावखुरे असतात, तसेच एकाच वेळी दोन माणसांवर प्रेम करणारे काही ‘पॉलिअ‍ॅमरस’ लोक असतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी प्रेम ही एक गंभीर अनुभूती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रेमाकडे बऱ्याचदा थिल्लरपणा म्हणून पाहिलं जातं. वास्तविक प्रेम हा माणसाच्या भावनिक-लैंगिक आकांक्षांचा एक नैसर्गिक परिपाक आहे. आणि त्याला वाट करून देणं आवश्यक आहे. त्याचं नियमन करणं अगदीच गरजेचं आहे. कारण आपण आपल्या सर्वच इच्छा-आकांक्षांना एका ‘चॅनेल’मधून पुढे न्यायचा प्रयत्न करत असतो. ‘आत्ता मला हे हवं आहे आणि हे मिळालंच पाहिजे’ या वृत्तीचं समर्थन होऊ शकत नाही. परंतु प्रेमभावनेचं पूर्णपणे दमन करणं मात्र क्रूरपणाचं आहे.

भारतीय विचारामध्ये ‘स्वधर्म’ ही एक संकल्पना आहे. मे. पुं. रेगे यांनी त्यांच्या ‘व्यक्तिवादाचा उदय’ या लेखात या संकल्पनेच्या संदर्भाने म्हटलं आहे- ‘व्यक्तीच्या सामाजिक नात्यांना अनुसरून स्वधर्म अनेक रूपे धारण करतो. उदा. पतिधर्म, पुत्रधर्म, राजधर्म, इत्यादी. स्वधर्म निश्चित असतो. त्याच्या अनेक विशिष्ट रूपांत – उदा. पतिधर्म आणि राजधर्म यांच्यात- संघर्ष येऊ  शकेल किंवा संघर्ष आल्याचा भास होईल. तेव्हा विशिष्ट प्रसंगी स्वधर्माला अनुसरून आपले कर्तव्य काय आहे, हे ओळखणे कठीण असते. कर्म काय आणि अकर्म काय, याविषयी शहाणे लोकही गोंधळात सापडतील. पण ‘कर्म काय आहे’ याचे उत्तर सापडणे कठीण असले तरी त्याचे वस्तुनिष्ठ असे उत्तर असेल. आपले कर्तव्य काय, हे व्यक्तीने ‘ठरवायचे’ नसते, तर या प्रश्नाचे पूर्वनिश्चित उत्तर तिने ‘शोधून’ काढायचे असते. उत्तराला अनुसरून व्यक्तीने आचरण केले तर तिचे कल्याण होते. नाही तर तिला पाप लागते, तिचे अकल्याण होते. एवढेच कृतीपुरते स्वातंत्र्य व्यक्तीला असते. पण स्वधर्म काय आहे, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य तिला नसते.’

व्यक्तीला आपलं कर्तव्य ‘ठरवता’ येत नाही, तिला पूर्वनिश्चित उत्तर ‘शोधून’ काढावं लागतं, यात मेख आहे. बहुविध नातेसंबंधांमध्ये या गृहीत तत्त्वाला आव्हान दिलं जातं. कारण इथे पती-पत्नी-आई-वडील म्हणून करायच्या कर्तव्यांवर प्रश्न केले जात नसले तरी ‘माझं स्वत:प्रतिदेखील काही कर्तव्य आहे आणि मी त्याला न्याय देईन’ हा विचार प्रबळ आहे. आजच्या वर्तमानात बहुविध नातेसंबंधांबाबतची सर्वात मोठी अडचण ही आहे की, समाज म्हणून आपण अशा नातेसंबंधांना तयार नाही. प्रेम एकाच व्यक्तीवर असू शकतं, दुसऱ्याशी जे असतं ते ‘लफडं’ असतं, ही धारणा घट्ट आहे. प्रेमाकडे पहाण्याची आपली दृष्टीच मुळात स्वच्छ नाही. आपण प्रेम सहजतेने घेत नाही. ओझं म्हणून घेतो. त्यामुळे ज्या मोजक्या लोकांना दोन व्यक्तींबाबत ‘प्रेम’ वाटतं तेदेखील प्रस्थापित धारणेच्या दबावाखाली असतात. ‘स्वत:प्रतिचं कर्तव्य ठरवायचा’ प्रयत्न ते करतात, पण प्रस्थापित नीतीने निर्माण केलेल्या पेचातून त्यांचीही सहज सुटका होत नाही.

‘माझ्या लग्नाच्या जोडीदाराचा मला कंटाळा आलाय, अगदी नाइलाज म्हणून आम्ही एकत्र राहतोय’ अशा अवस्थेत अन्य कुणी आवडणं याला ‘पॉलिअ‍ॅमरी’ म्हणता येणार नाही. कारण यात एक नातं मुळात ‘रेटलं जातंय.’ तिथे प्रेम उरलेलंच नाही. ‘पॉलिअ‍ॅमरी’मध्ये एकाहून अधिक व्यक्तींवर ‘समान प्रेम’ अपेक्षित आहे. हा मुद्दा अधिक स्पष्ट करायला हवा. प्रेम ही अनुभूती वाहती असल्याने तिचं एकच सार्वत्रिक ठोकळेबाज स्वरूप असत नाही. दोन व्यक्तींबद्दलच्या प्रेमाच्या जातकुळीत सूक्ष्म भेद असू शकतात. यात प्राधान्यक्रमही असू शकतो. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या नातेसंबंधात असणारे अतिशय प्रगल्भ असावे लागतात. प्रेमाच्या पारंपरिक व्याख्येपासून, पारंपरिक अनुभूतीपासून वेगळं होऊन एका नव्या, अधिक समावेशक, प्रेम आणि लैंगिकतेतल्या ‘अहम्’ला बाजूला काढू शकणाऱ्या अनुभूतीपर्यंत ज्यांना जाता येईल तेच अशा व्यवस्थेत राहू शकतात. हे अवघड आहे. आणि आज तरी आपण समाज म्हणून या व्यवस्थेसाठी तयार नाही, हे नोंदवणं आवश्यक आहे.

लग्नसंबंधामध्ये जशा अडचणी असतात तशाच अडचणी बहुविध नातेसंबंधातही येऊ  शकतात. या व्यवस्थेतही माणूस अखेर माणूसच असतो आणि त्याचे अंगभूत गुणधर्म या व्यवस्थेलाही यशस्वी किंवा अयशस्वी करू शकतात. पण लग्नव्यवस्थेत जो एक मूळ ‘व्यवस्थे’चा म्हणून दोष आहे, तो या व्यवस्थेत नाही. एका माणसाने त्याच्या सर्व इच्छा एकाच माणसाकडून आयुष्यभर पूर्ण करून घ्याव्यात, हे मुळातच विवादास्पद आहे. ‘पॉलिअ‍ॅमरी’मध्ये ही सक्ती नाही. इथे ‘भावनिक साक्षरता’ (इमोशनल लिटरसी) मोठय़ा प्रमाणात वाढणं अभिप्रेत आहे. व्यक्तिस्वातंत्र्य विस्तारणं (प्रामाणिकपणा, नात्यांमधली पारदर्शकता, जिव्हाळा, एकमेकांना समजून घेणं- या मूलभूत तत्त्वांना न डावलता) अभिप्रेत आहे. त्याअर्थी ही व्यवस्था लग्नाहून प्रगल्भ आहे. परंतु लग्नाला पर्याय म्हणून ही व्यवस्था लगेच उभी राहू शकते असं नाही, हे अधोरेखित करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल, मनोविकासाचे बरेच टप्पे गाठावे लागतील. आपली आजची स्थिती अशी आहे की, तंत्रज्ञान, राहणी, अभिव्यक्ती यांत अचाट बदल झाले असले तरी आपला मेंदू अजूनही ‘मन इन्स्टिंक्ट’चा गुलाम असल्यासारखा आहे. आणि त्या, त्या समाजाचे प्रस्थापित नीतिनियम हेदेखील त्याच्या इन्स्टिंक्टचा भाग बनले आहेत. (उदा. अत्याधुनिक यंत्राचं डिझाइन करणारा एखादा बुद्धिमान तंत्रज्ञ आपल्या बायकोला कुणी अन्य पुरुष आवडतो आहे, हे सत्य सहज स्वीकारू शकेल का? किंवा एखादी आधुनिक आई आपला मुलगा समलिंगी आहे, हे वास्तव सहज स्वीकारू शकेल का? ‘सहज’ हा शब्द महत्त्वाचा आहे आणि सर्वसाधारण निरीक्षण अभिप्रेत आहे. अपवाद अर्थातच असतील.) तंत्राचा प्रदेश विस्तारला, पण जाणिवेचा प्रदेश तितकासा विस्तारला नाही. कदाचित माणसाने निर्माण केलेली सामाजिकता इतकी मजबूत आहे, की स्व आणि सामाजिकता या द्वंद्वात तीच कायम वरचढ ठरते आणि नेमकं हेच जाणिवेचा प्रदेश विस्तारण्याच्या आड येत असावं. आधी म्हटलं तसं जाणिवेचं जडवादी स्पष्टीकरण देता येत असेल तर जाणीव म्हणावी इतकी प्रवाही न होण्याचंही जडवादी स्पष्टीकरण देता येऊ  शकेल. माणूस आधी होता त्यापेक्षा कमी हिंसक (शारीरिक हिंसेबाबत) झाला आहे. (तुलनात्मकदृष्टय़ा बघा. वर्तमानातही हिंसा आहे, पण माणसाचं माणसाविषयीचं क्रौर्य तरी काही अंशी कमी झालं आहे.) पण इतर बाबतीत तसे म्हणता येईल का, याची शंका वाटते. द्वेष, मत्सर, असुरक्षितता, टोळी मानसिकता या प्रवृत्ती लाखभर वर्षांपूर्वी निर्माण होत होत्या, त्याच आजही निर्माण होतात. याला कारण चिरेबंदी सामाजिक-आर्थिक-लैंगिक बांधणी हेच असेल का, यावर विचार करायला हवा. ज्या जाणिवांच्या मुळाशी निखळ लैंगिकता आहे त्यांचं स्पष्टीकरण लैंगिक पुनरुत्पादनाच्या ‘उत्क्रान्तिजन्य जबाबदारी’च्या आधारे देता येऊ  शकेल. पण इतर मानवी इच्छा-आकांक्षा, भावना-संवेदना यांचा जो मोठा पट आहे तो अजूनही का बदलत नाही, यावर विचार व्हायला हवा. ‘पॉलिअ‍ॅमरी’सारखी संकल्पना प्रेमभावनेच्या बाबतीत हा पट विस्तारायचा प्रयत्न करते. प्रेमातील पझेसिव्हनेस, मत्सर या भावनांना बाजूला सारायचा प्रयत्न करते.  समाजाची घडी चालावी म्हणून कायदेशीर मान्यता असलेल्या लग्नव्यवस्थेअंतर्गत किंवा या व्यवस्थेच्या बाहेर स्वतंत्रपणे ही व्यवस्था कार्य करू शकते. ही अखेरीस माणसांची व्यवस्था असल्याने यात परस्परसंबंध, मुले, पालकत्व असे अनेक मुद्दे गुंतलेले आहेत. ही व्यक्तिसापेक्ष व्यवस्था आहे.  आणि एका लेखातून या व्यवस्थेचे सगळेच कंगोरे दाखवणं शक्य नाही.  त्याविषयी सविस्तर आणि सतत चर्चा करावी लागेल कारण ही व्यवस्था आपल्या प्रस्थापित मानसिकतेत बदल करू पाहते. पण लेखाच्या समारोपात या व्यवस्थेची काही मूलभूत लक्षणे सार रुपात पाहूया-
  • पॉलिअ‍ॅमरी’ ही माणसांच्या एकाहून अधिक गंभीर स्वरूपाच्या नात्यांची व्यवस्था आहे.
  • प्रेम एकाच व्यक्तीला देता येतं आणि तिथेच ते संपतं’ या प्रस्थापित धारणेला ही व्यवस्था आव्हान देते. प्रेम अमर्याद आहे आणि एका व्यक्तीवर तुम्ही ज्या तीव्रतेने प्रेम करता त्याच तीव्रतेने दुसऱ्या व्यक्तीवरही करू शकता, तुम्ही तुमचं ‘पूर्ण हृदय’ एकाहून अधिक व्यक्तींना देऊ शकता असं ही संकल्पना मांडते. या व्यवस्थेत प्रेम, प्रेमाच्या विविध छटा गांभीर्याने समजून घेणं अभिप्रेत आहे.
  • सामावून घेणं’ हे या व्यवस्थेचं प्रमुख लक्षण आहे. थोडक्यात सांगायचं तर ‘पती, पत्नी और वो’मधला ‘वो’ या व्यवस्थेत त्रासदायक ठरत नाही. त्याला/ तिला सामावून घेतलं जातं. ही ‘तीन लोकांची आनंदी व्यवस्था’ असणं अपेक्षित आहे.
  • या व्यवस्थेत ‘वन नाइट स्टँड’ चा समावेश होत नाही. केवळ लैंगिक आकर्षण व लैंगिक संबंधांची इच्छा म्हणजे पॉलीअ‍ॅमरी नव्हे. पण पॉलीअ‍ॅमरीमध्ये लैंगिक संबंध वर्ज्य नाहीत. याबाबत संबंधित स्त्री-पुरुषांना ‘लैंगिक शेअिरग’साठी तयार असावं लागतं. आणि ते आव्हानात्मक असू शकतं. विशेषत: पुरुषांसाठी (आधी म्हटल्याप्रमाणे लंगिकतेबाबतच्या स्त्री व पुरुष विशिष्ट जाणिवा उत्क्रान्तीजन्य आहेत आणि त्या उत्क्रांतीच्या अभ्यासाच्या आधारेच समजून घेता येतील व त्यावर कामही करता येऊ शकेल.)
  • सर्व संबंधित व्यक्ती एकाच छताखाली एकत्र राहिल्यास ही व्यवस्था प्रभावीपणे काम करू शकते.
  • प्रेम जर एकाहून अधिक व्यक्तींवर असू शकतं, मग ते दहा किंवा पन्नास जणांवर असू शकतं का? हा प्रश्न रास्त आहे. तत्त्वत: ‘असं असू शकतं’ हे मान्य करावं लागेल. पण आजचे सर्व वैयक्तिक व सामाजिक घटक, आपल्या मर्यादा लक्षात घेता व प्रेमभावना प्रतिसाद अपेक्षिते, हे लक्षात घेता आजच्या मानवाला दोन नात्यांमध्ये स्वत:ला विभागणं शक्य आहे. असं प्रस्तुत लेखकाला वाटतं. आजच्या मानवाची भावनिक, शारीरिक ऊर्जा त्याहून जास्त नाही.
  • ही व्यवस्था एकाहून अधिक व्यक्तींना कुटुंबाच्या कक्षेत घेणारी असल्याने मुलांचं पालकत्व ‘दोन आया’ किंवा ‘दोन बाबां’कडे जाऊ शकतं. जैविक पालकांची प्राथमिक जबाबदारी व इतरजण ‘विस्तारित पालक’ होऊ  शकतात.
  • विवेक आणि तारतम्य हा कोणत्याही व्यवस्थेचा गाभा असतो. ‘विशिष्ट परिस्थितीत काय केलं तर ते योग्य होईल, हे संबंधित व्यक्तींनी समजुतीने ठरवणं म्हणजे विवेकाने वागणं’ असं म्हणता येईल. या व्यवस्थेतदेखील प्रत्येक टप्प्यावर हेच अपेक्षित आहे.
  • ही व्यवस्था फक्त सुखवस्तू समाजापुरती मर्यादित आहे का? याचं उत्तर ‘हो’ असं द्यावं लागेल. याबाबत संख्याशास्त्रीय अभ्यास करता येईल. पण ज्याप्रमाणे माणसाच्या भौतिक आकांक्षा तीव्र असल्या तरी त्या आर्थिक पाठबळाशिवाय प्रत्यक्षात येत नाहीत, तसंच भावनिक आकांक्षादेखील वर्गीय (आपल्याकडे वर्गीय व जातीय) मर्यादांमुळे घडतात/ बिघडतात, हे क्लेशदायक वास्तव आहे. या व्यवस्थेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्यांमध्ये एका वेगळ्या प्रतीची प्रगल्भता असेल तरच या व्यवस्थेच्या यशाची शक्यता वाढते.
  • पॉलिअ‍ॅमरी’मध्ये ‘भावनिक साक्षरता’ (इमोशनल लिटरसी) मोठय़ा प्रमाणात वाढणं अभिप्रेत आहे. व्यक्तिस्वातंत्र्य विस्तारणं (प्रामाणिकपणा, नात्यांमधली पारदर्शकता, जिव्हाळा, एकमेकांना समजून घेणं- या मूलभूत तत्त्वांना न डावलता) अभिप्रेत आहे. त्याअर्थी ही व्यवस्था लग्नाहून प्रगल्भ आहे. परंतु लग्नाला पर्याय म्हणून ही व्यवस्था लगेच उभी राहू शकते असं नाही, हे अधोरेखित करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल, मनोविकासाचे बरेच टप्पे गाठावे लागतील.
(पॉलिअ‍ॅमरीबाबत इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहे. वाचकांनी ती अवश्य बघावी. morethantwo.com ही वेबसाइट पाहावी. पॉलिअ‍ॅमरीबाबतच्या अनेक प्रश्नांची उत्तरं या वेबसाइटवर मिळतील. यूटय़ूबवर काही फिल्म्स उपलब्ध आहेत, त्या बघाव्यात. १) Hidden Lives : Three in a bed २) 3 in a bed (ही बंगाली फिल्म आहे.)   फिल्म्सच्या शीर्षकात ‘बेड’हा शब्द असला तरी या फिल्म्स केवळ लैंगिक संबंधांबद्दल बोलत नाहीत. हा लेख लिहिण्यासाठी मला प्राजक्ता कोलते या मत्रिणीशी झालेल्या चर्चाचा पुष्कळ उपयोग झाला. या विषयावरील फिल्म्स, वेबसाईटची माहितीही तिनेच दिली आहे. प्राजक्ताचे आभार.)

(लोकसत्ता 'चतुरंग' ४ नोव्हेंबर २०१७ )

Monday, October 16, 2017

फेसबुकचं 'नेचर आणि नर्चर' 

'द सोशल नेटवर्क' हा डेव्हिड फिंचर दिग्दर्शित चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. हा चित्रपट फेसबुकची जन्मकथा सांगतो. मार्क झकरबर्ग हार्वर्डमध्ये शिकत असताना, वयाच्या वीस-बाविसाव्या वर्षी त्याने फेसबुक जन्माला घातलं. आधी त्याने फेसमॅश नावाची एक वेबसाईट तयार केली होती ज्यात दोन तरुणींच्या फोटोंची तुलना करून 'हॉट ऑर नॉट हॉट' हा गेम खेळता येई. कॉपीराईटचा मुद्दा आणि व्यक्तिगत प्रायव्हसीचा भंग या कारणांमुळे हार्वर्डने ही वेबसाईट बंद केली. यादरम्यान कॅमेरॉन विंकलवॉस, टायलर विंकलवॉस आणि दिव्य नरेंद्र यांनी 'हार्वर्ड कनेक्शन' नावाची वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी झकरबर्गला आमंत्रित केलं. परंतु हार्वर्ड कनेक्शनवर काम करण्याआधीच झकरबर्गने एदुआर्द सॅव्हेरीन या मित्राच्या मदतीने 'द फेसबुक' या वेबसाईटची निर्मिती केली. 'द फेसबुक' (आणि पुढे 'नॅपस्टर'चा सहसंस्थापक शॉन पार्करने सुचवल्यावरून फक्त 'फेसबुक') लोकप्रिय होऊ लागल्यावर झकरबर्गने आपली कल्पना चोरली म्हणून कॅमेरॉन विंकलवॉस, टायलर विंकलवॉस आणि दिव्य नरेंद्र यांनी त्याच्यावर खटला भरला. हा खटला चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे.

चित्रपटात एक प्रसंग आहे. मार्क झकरबर्ग त्याच्या वर्गात बसलाय. एक मित्र त्याच्याजवळ येतो. अमुक एक मुलगी सध्या सिंगल आहे का असं त्याला विचारतो. झकरबर्ग वैतागून 'माहीत नाही' म्हणतो. पण त्याच क्षणी त्याच्या मनात काहीतरी चमकतं आणि तो धावत आपल्या रूममध्ये येतो. लॅपटॉप उघडतो आणि 'द फेसबुक' वर नवीन फीचर अ‍ॅड करतो - रिलेशनशिप स्टेटस. फेसबुकवरची फीचर्स कशी तयार झाली असतील याची एक झलक या प्रसंगातून मिळते. आणखी एक प्रसंग सांगतो. हा चित्रपटाच्या अगदी सुरुवातीला आहे. मार्क झकरबर्गचं आणि त्याची गर्लफ्रेंड एरिका ऑलब्राईट यांचं ब्रेक-अप होतं आणि झकरबर्ग विमनस्क अवस्थेत त्याच्या रूमवर येऊन तिच्याबद्दल ब्लॉगवर अवमानकारक मजकूर पोस्ट करतो. (यानंतरच तो 'फेसमॅश'ला सुरूवात करतो.)

या चित्रपटाचा आणि प्रसंगांचा संदर्भ द्यायचं कारण हे की फेसबुकच्या स्वरूपाबद्दल हे प्रसंग काही बोलतात. दुसरं म्हणजे मी गेली काही वर्षं हे जे व्यासपीठ लिहिण्यासाठी वापरतो आहे त्याबद्दल थोडं लिहावं असं वाटतंय आणि ते लिहिताना या व्यासपीठाच 'नेचर' काय आहे आणि आपण 'नर्चर' करून ते बदलू शकतो आहोत का हेही तपासावंसं वाटतंय.

कविता लिहिण्यापासून सुरुवात करुन इतर लेखन (काही तर फक्त फेसबुकसाठी) करेपर्यंत जो अनेकांचा प्रवास झाला तोच माझाही झाला. यात जे मित्र-मैत्रिणी भेटले, माहिती मिळाली, चांगलं लेखन वाचायला मिळालं ते या प्लॅटफॉर्मचं मोठं देणं आहे. ही एक फार मोठी सकारात्मक गोष्ट नोंदवून पुढे जाऊ.

फेसबुक, ट्विटर किंवा इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स हा एक 'मानसशास्त्रीय आविष्कार' आहे असं मला वाटतं. माणसामधील अंतःस्थ भावनांना, विशेषतः विकारांना हात घालायची ताकद या माध्यमाच्या रचनेत आहे. फेसबुक निर्माण होताना मार्क झकरबर्गच्या मनात 'ऑफलाईन सोशल एक्सपीरियन्स ऑनलाईन आणणे' ही कल्पना होती. परंतु या ऑनलाईन एक्सपीरियन्समध्ये काही कळीचे फरक पडलेले दिसतात आणि त्याचा संबंध माणसं समोरासमोर बोलत नसल्याशी आहे. आज एखाद्या मुद्द्यावरून फेसबुकवर एकमेकांशी भांडणारे लोक किंवा शिवराळ भाषेतून व्यक्त होणारे लोक समोरासमोर आले तर ते तसं बोलतील का? भाजप समर्थक-विरोधक, आस्तिक-नास्तिक, डावे-उजवे, धर्म-विज्ञान, सवर्ण-दलित, खरा स्त्रीवाद-खोटा स्त्रीवाद अशा सगळ्या उदाहरणात हे दिसतं की माणसं समोरासमोर बोलत नसल्याने हे वाद टोकाला जातात, माणसं आपलं संतुलन हरवतात. हे होतं कारण संतुलन हरवण्याची मुभा इथे पटकन मिळते. माणूस समोर नाही आणि तो समोर यायची शक्यताही नाही हे समजलं की एक प्रकारची सुरक्षितता येते आणि माणूस तीव्रतेने बोलू लागतो. माणसं समोरासमोरदेखील भांडू शकतातच, पण आपल्यासमोर एक माणूस बसला आहे आणि बोलतो आहे हे पाहिल्यावर आपल्यातला तारतम्य बाळगणारा माणूस अधिक जागा राहतो. यात रूढ शिष्टाचारांचाही भाग आहेच. आणि तो ठीकच आहे. शिष्टाचार तोंडदेखले असतात हे खरं, पण ते शांततामय सहअस्तित्वासाठी आवश्यकही असतात. प्रत्यक्ष भेटीचा आणखी एक फायदा असा की दुसऱ्या भेटीच्या, माणूस अधिक कळण्याच्या शक्यता निर्माण होतात. हे ऑनलाईन भेटींमध्ये फारसं होत नाही.

मुळात वादविवादात काहीच गैर नाही. पण वाद कसा घालावा याची पद्धत मात्र गैर असू शकते. योग्य वादपद्धतीसाठी स्वतःला तयार करावं लागतं, थोडी मेहनत घ्यावी लागते. अहंकार नष्ट करणं शक्य नसलं तरी अहंकारावर नियंत्रण ठेवावं लागतं. आपण अपूर्ण आहोत, आपण चुकू शकतो हे लक्षात ठेवावं लागतं. आपलं वर्तन / विचार समीक्षेसाठी खुले ठेवावे लागतात. माणूस या प्राण्याविषयी आस्था, करुणा असावी लागते. माणसाचं मन, त्यातील तर्क प्रक्रिया हे अभ्यासण्याजोगं आहे, रोचक आहे. माणसाच्या आत एक डोह आहे जो निरखण्याजोगा आहे. ऑनलाईन जगात हे जमणं फार अवघड आहे. इथे माणसाच्या व्हर्च्युअल अतिदर्शनामुळे ही 'निरखण्याची स्पेस'च नाहीशी होतेय की काय अशी शंका येते. माणूस ऑफलाईन असताना जितका मोकळा होतो तितका तो ऑनलाईन असताना होतो का? (जे साधारण चित्र दिसतं त्यात त्याच्यातली नकारात्मकता मोकळी होताना दिसते.) एक तर तो स्वतःचा अजेंडा घेऊन वावरत असतो. फेसबुकसारखा प्लॅटफॉर्म हा प्रतिमानिर्मिती, मत-प्रतिक्रिया, वैचारिक शेअरिंग, निव्वळ गंमत, 'अनावर अभिव्यक्ती' अशा कारणांसाठी वापरला जातो. पण या गोष्टी या प्लॅटफॉर्मवरच फक्त घडत असल्याने माणसाला बांधतात जास्त, मोकळं कमी सोडतात. (ब्लॉग हे माध्यम मात्र मला स्वतःला या बाबतीत चांगलं वाटतं. कारण ब्लॉग मुळात सविस्तर लिहिण्यासाठी डिझाइन केलेला प्रकार आहे.)

जानेवारी २०१२ पासून मी हे माध्यम वापरायला सुरुवात केली. माध्यमावर 'होल्ड' येऊ लागल्यावर लिहिणं वाढत गेलं. आधी मी हिंदुत्ववादाबद्दल, धार्मिक विचारसरणीबद्दल टीकात्मक लिहायचो. तिरकसपणे लिहायचो. पण जेव्हा असं लक्षात येऊ लागलं की या विचारसरणीचे बरेच लोक इथे आहेत तेव्हा मला वाटू लागलं की प्रतिक्रियात्मक न लिहिता विश्लेषणात्मक लिहायला हवं. कारण माझ्या अवतीभवती माणसं आहेत आणि ती मला ऐकतायत. जेव्हा त्यांना हे कळेल मी माझं काहीएक विश्लेषण आहे तेव्हा ते माझं उपहासात्मक लिहिणंही समजून घेऊ शकतील. माझ्या म्हणण्याला, विरोधी भूमिकेला बैठक मिळेल. अन्यथा माझी एक पोस्ट-त्यावर तुझी एक पोस्ट, माझी एक कमेंट-त्यावर तुझी एक कमेंट एवढंच सुरु राहील. आपण इथे 'स्क्रीनशॉट-स्क्रीनशॉट' खेळायचं नाही हे मी ठरवलं होतं. किंबहुना तसा विचारही कधी मनात आला नाही. कधीकधी काही कमेंट्सवर शांत राहणं अवघड गेलं, पण जमलं. फेसबुकवरचा गलका वाढल्यावर जाणवू लागलं की हे प्रकरण हाताबाहेर जाऊ शकतं. आपल्याला लिहायचं वगैरे असलं आणि त्यासाठी हे माध्यम एका बाजूने अनुकूल असलं तरी दुसऱ्या बाजूने धोकादायकही आहे. कारण गर्दीचा, गलक्याचा परिणाम तुमच्या इच्छेची वाट न बघता तुमच्यावर होतो. या माध्यमाच्या रचनेतील अंगभूत मर्यादा आपल्यामध्येही हळूहळू येतील ही जाणीव काहीशी भीतीदायक होती. त्यामुळे जाणीवपूर्वक अंतर राखणं सुरु केलं.

वर उल्लेख केलेले जे विशिष्ट वाद आहेत त्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकेल पण त्यातला समान धागा विविध सामाजिक-आर्थिक-वैचारिक-भाषिक स्तरातील माणसं व्हर्च्युअली एकत्र येणं आणि आपल्या आजूबाजूला अशा विविध स्तरातील माणसं आहेत हे भान न राहणं हा आहे. पण मग गर्दी आहे म्हणून मी माझ्या मनातलं, विशेषतः संवेदनशील विषयांबाबतचं, बोलूच नये का? तर बोलावं, पण सतत न बोलता अधूनमधून, विस्ताराने, धक्कातंत्राचा आधार न घेता, स्वतःचंही मूल्यमापन करत बोलावं. आपण जर समीक्षाच करायला बसलो असू तर स्वतःला का वगळायचं? शिवाय आपण प्रेडिक्टेबल होतो आहोत का, धक्कातंत्रावर आपली हुकूमत असली तरी आपण धक्का देण्याकरताच लिहू लागलो आहोत का हेही जरूर तपासावं. एका विशिष्ट जागी गेल्यावर सगळ्यांच्याच भूमिका ठाम होत जातात. आणि मग त्या भूमिकेच्या रक्षणासाठी आपण आपल्या आतला आवाजदेखील दाबू लागतो. हे राजकारणात करावं लागतं. आपण हे करत असू तर ते राजकारण म्हणून करतो आहोत की आपल्याला करायचं नाहीये पण उघडपणे कबूल करायला अवघड वाटतं म्हणून करतो आहोत याची स्पष्टता स्वतःशी तरी असावीच. अलीकडे एकदा गप्पा मारताना मंदार काळे म्हणाला की आपण तोंड उघडलं की राजकारणीच होतो. आता या म्हणण्यात तथ्य आहे. त्यामुळे एखाद्या टोकाच्या भूमिकेसारखीच समन्वयाची भूमिकाही राजकारणी भूमिका आहे का? तर आहे. पण या राजकारणाचा उद्देश 'एलिमिनेशन' हा नाही. याचा उद्देश शांततामय सहअस्तित्व हा आहे. एक अंतःस्थ हेतू विरोधकाचं मतपरिवर्तन हाही आहे, पण ते विचारशील आणि म्हणून सक्षम परिवर्तन आहे.

कधीकधी असं होतं की रचना निर्दोष असते, पण माणसं दोषयुक्त असतात. कधीकधी रचनेतच दोष असतात. हे दोष माणसाच्या मूळच्या स्खलनशील स्वभावाला पूरक ठरतात. फेसबुकसारखं ,माध्यम दुसऱ्या वर्गात मोडणारं आहे. तरीही ते प्रभावी आणि उपयुक्त आहेच. मात्र सहअस्तित्व शांततामय असावं की द्वेषमय असावं हे अजून तरी आपल्या हातात आहे. वैचारिक विरोधासह एकोपा आणि सुसंवाद टिकवायचा असेल तर कदाचित फेसबुकच्या रचनेतही काही बदल होऊ शकतील, पण त्याबद्दल आज काही सांगता येणार नाही. त्यामुळे आपल्याला स्वतःमध्येच बदल करावा लागेल.

'द सोशल नेटवर्क' चित्रपटाचा शेवटही रोचक आहे. खटला संपल्यावर झकरबर्ग त्याच रूममध्ये बसलेला आहे. तो एरिका ऑलब्राईटला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो आणि तिच्या प्रतिसादाची वाट बघत पेज रिफ्रेश करत राहतो. फेसबुक कसं 'डिमांडिंग' होऊ शकतं याचा हा एक दाखला आहे. आणि जेव्हा एखादी गोष्ट 'अती डिमांडिंग'होते तेव्हा ती संथपणे राक्षसी होऊ लागली आहे का हा विचार डिमांड पुरवणाऱ्याने करावा लागतो. मार्क झकरबर्गने एक 'मॉन्स्टर' निर्माण केला आहे असं गमतीने म्हणता येईल पण ते गमतीतच स्वीकारणं मात्र धोक्याचं ठरेल!

(फेसबुक पोस्ट)  

Tuesday, October 10, 2017

पाटी कोरी करणाऱ्या कविता

माणसाचा  इतिहास असंख्य वळणं घेत घेत पुढे गेलेला आहे. या संपूर्ण प्रवासात काही वळणं अशी आहेत की त्यांचं विश्लेषण करताना मती कुंठित होते. भौतिक वा जैविक विज्ञानाशी संबंधित विषयांनाच नव्हे तर भौतिक-जैविक प्रेरणांचा परिपाक म्हणून उभ्या राहिलेल्या सामाजिक क्षेत्राला, व्यक्तींच्या परस्परसंबंधांनादेखील हे लागू होतं. याचं एक मुख्य कारण हेच की मनुष्य म्हणून आपण प्रचंड भौतिक प्रगती केलेली असली तरी आपल्यातला 'माणूस' हा आजदेखील आदिम भावनांचा गुलाम आहे. आपण अजूनही त्या अर्थाने 'प्रगत' नाही आणि कधीकधी तर लाज वाटावी इतके अप्रगत आहोत. 

पृथ्वीचा फोटो काढला चंद्रावरून 
तर खूप डाग दिसतील 
ते आम्ही नाहीत 
तुम्ही आहात!

चिन्नाक्का या वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रीने लिहिलेली ही छोटी कविता आहे. या ओळी वाचल्यावर मनात पहिल्यांदा समाधान आणि नंतर उद्वेग अशा भावना जाग्या झाल्या. चिन्नाक्काप्रमाणेच शांता, चंद्रिका, गुलाब आणि प्रेमला यांच्याही कविता आहेत. या कविता निराश करतात, स्वतःतल्या 'इंपोटंट इंटलेक्च्युअल'ची जाणीव नव्याने करून देतात आणि एक 'आवरणाखालचं समाधान' अशाकरता देतात की या स्त्रियांनी त्यांच्या वाटण्याला, त्यांच्या अनुभवांना अतिशय प्रभावीपणे मोकळी वाट करून दिली आहे. 

या कवितांमधला उदगार संमिश्र आहे. तो कधी आतून तुटलेपणाचा आहे, कधी बेगडी संस्कृतीच्या कानफटात मारणाऱ्या उद्रेकाचा आहे, कधी तटस्थपणाचा आहे, कधी समजुतीचा आहे. 'आम्ही कपडे पाहतो, तुम्ही कातडी पाहता. इतकाच फरक' या तीन ओळीत चिन्नाक्का तटस्थपणे जे बोलते ती नुसती कविता नसून सामाजिक-आर्थिंक भाष्य आहे. चंद्रिकाच्या 'आधी प्रेत म्हणून जन्मायचं' या कवितेतील आक्रोश पुरूषांना सुन्न करणारा आहे. पण हीच कवयित्री पुढच्या एका कवितेत 'त्यांच्याकडे थोडे पैसे असतात आणि एक उपाशी लिंग असतंय, मनात फक्त नाईलाज असतोय' असं म्हणते आणि कवितेचा शेवट 'ते आलेच नसते आमच्याकडे पैसे, लिंग आणि नाईलाज घेऊन तर आम्हीही इथं दिसलो नसतो' असं लिहून करते तेव्हा पुरूषाविषयीची तिची करूणा दिसते. चंद्रिकाच्या कविता लक्षवेधी वाटतात ते या कवितांमधल्या विचार-भावनांच्या जिवंतपणामुळे. त्यातली तीव्रता असह्य व्हाही इतकी जिवंत आहे. याखेरीज या कवितांच्या कवितापणाला वास्तवाच्या काहिलीबरोबर प्रतिभेची विलक्षण 'झळ' बसल्याचं जाणवतं. ही अशी खोलात बुडी मारणारी संवेदना आणि अशी टोकदार अभिव्यक्ती हिने कुठून आणली हा प्रश्न कविता वाचल्यावर सतावत राहतो.     

गुलाब या कवयित्रीची पहिलीच कविता समाजव्यवस्थात्मक झटका देणारी आहे. गटार साफ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला नाकारताना 'तुला तुझी बायको जवळ करत नाही, मग मला नाक नाहीये का?' असा प्रश्न विचारते तेव्हा ती एकमेकांत अडकलेल्या भीषण वास्तवाच्या तुकड्यांचं दर्शन घडवते. सर्वच कवयित्रींच्या कविता माणूस म्हणून, समाज म्हणून, सरकार म्हणून, प्रशासन म्हणून आपल्या सर्व व्यवस्थांच्या थोबाडीत मारणाऱ्या आहेतच, पण गुलाबची ही कविता वास्तवाचं वैचित्र्य जोरकसपणे अधोरेखित करत आपल्याला अधिकच विचारात पाडते. 'मांसाहारीच असतात शाकाहारी म्हणवणारेदेखील' असा शेवट असणाऱ्या तिच्या दुसऱ्या कवितेविषयी काही लिहावं इतकी शक्ती बहुधा कुठल्याच लेखक-समीक्षकात नसावी. ती माझ्यातही नाही.    

प्रेमलाच्या कविताही याच जातकुळीतल्या आहेत. 'तुला लाज नाही वाटत का?' असा प्रश्न एका 'सभ्य' स्त्रीने विचारल्यावर तिने कवितेततून जे उत्तर दिलंय त्याचं वाचन घराघरातून आणि जाहीर कार्यक्रमातून व्हावं इतकं समर्पक आणि आरसा दाखवणारं आहे. ही कविता वाचल्यावर मी कवयित्रीला 'स्टँडिंग ओव्हेशन' दिलं! पुढच्या एका कवितेतदेखील तिने पुरुषांचं लग्नबंधन आणि वेश्येशी असणारं 'लैंगिक बंधन' यांची तुलना करत अखेरीस पुरूष व वेश्या या संबंधातील वैय्यर्थावर नेमकेपणानं बोट ठेवलं आहे आणि ते अतिशय टोकदार, अस्वस्थ करणारं आहे. 

शांताने लिहिलेल्या 'म्हाताऱ्या लिलू'च्या कवितांमधून लिलूच्या लहानपणीच्या पुरूषी अत्याचाराच्या आठवणींबरोबरच एक आनंदी आठवणही आहे. वेश्यांनी लिहिलेल्या या कवितांमधून दिसणाऱ्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर ही एक कविता किंचित सुखावते. अर्थातच याचं एक सरळ कारण म्हणजे म्हाताऱ्या लिलूला लहानपणी काही आनंदाचे क्षण वाट्याला आले होते हे वाचून आपला अपराधभाव काहीही कारण नसताना कमी होतो हे आहे. 

खरं तर प्रत्येक कवितेवर स्वतंत्रपणेही काही लिहिता येईल. कवितेचे म्हणून काही निकष लावून त्यांची चर्चाही करता येईल. पण असं करावंसं वाटत नाही. कविता कुणीही लिहिलेल्या असोत, कवितेची चिकित्सा साहित्यकृती म्हणूनच व्हावी असंही कुणी म्हणतील. पण मला तसं नाही वाटत. साहित्यकृती हा जर माणसाचा उद्गार असेल तर तो त्या माणसासकट पाहता यायला हवा. या दृष्टीकोनाचे काही तोटेही आहेत. अशा दृष्टीकोनामुळे साहित्यकृतीच्या स्वतःच्या 'परिणामकारकतेवर परिणाम' होण्याची शक्यता आहे. पण मला असं वाटतं की दलित साहित्य लिहिलं जाऊ लागलं तेव्हा जसं त्या साहित्याची चिकित्सा करण्याचे वेगळे निकष प्रस्थापित साहित्यदृष्टीला निर्माण करावे लागले, तसंच वेश्यांच्या साहित्यकृतीसाठीही निकष लावावे लागतील. आणि हा खरं तर पुढचा विचार आहे. आत्ता या दहा-पंधरा कवितांमधून जे समोर आलं आहे, ते अस्वस्थ करणारं वास्तव दर्शन तर आहेच, पण कविता म्हणूनही ते अस्सल आहे, प्रभावी आहे. त्यामुळे कविता असण्याच्या पातळीवरच्या सगळ्याच शंका इथे निकालात निघाल्या आहेत. 

या कविता आपला अपराधभाव जागवणाऱ्या आहेत का? नक्कीच आहेत. समाज म्हणून आपल्या पराजयाच्या कहाण्या जिथे जिथे दिसतात त्यातलं एक ठसठशीत स्थान वेश्यावस्ती हे आहे. त्यामुळे या कविता बेतशुद्ध सुखी संसारात बेतशुद्ध अडचणी व बेतशुद्ध दुःख भोगणाऱ्या तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्यांना आणि लैंगिक व भावनिक भुकेची योग्य व्यवस्था लावण्यात अपयशी ठरलेल्या आपल्या समाजव्यवस्थेला झडझडून हलवतात हे तर खरंच आहे. पण या अपराधभावाच्या जोडीनेच वेश्यांच्या जगण्यातील असहायता आणि पुरूषांची लैंगिक असहायता स्थळकाळाचे, संस्कृतीचे जे विविध संदर्भ घेऊन उभी राहते ते अवाक करणारं आहे. या वेश्यांमधली ही लखलखती कवयित्री डोळे दिपवणारी आहे. मुळात वेश्या आधीच समाजातील सगळ्यांना अवघड जागेवर नेऊन उभं करणारी व्यक्ती आहे. या जागेवर सगळ्याच विचारप्रवाहांना एकमेकांच्या नग्नतेचा सामना करावा लागतो. त्यामुळे एकीकडे हे आहेच. दुसरीकडे त्यांच्या कवितांमधून उद्रेकाखेरीज ज्या विविध जाणिवा ज्या समजुतीने प्रकट झाल्या आहेत ते आपल्याला अधिकच लाजवणारं आहे. 

आणि नेमक्या याच कारणासाठी या कविता अधिकाधिक लोकांनी वाचायला हव्यात. त्यातून काय निष्पन्न होईल असाही प्रश्न येईल कदाचित. पण काही निष्पन्न होण्यासाठी नव्हे तर दृष्टीकोनाला वेगळं टोक येण्यासाठी, गुंतागुंत समजण्यासाठी, डोळ्यांवरचे संस्कृतीचे आणि शालीनतेचे भरजरी पडदे हटवण्यासाठी, लग्न नामक संस्थेचे सदस्य होण्यासाठी जी अनाकलनीय धावपळ चाललेली असते त्याचा पुनर्विचार करण्यासाठी, माणसाच्या - विशेषतः पुरूषाच्या नग्नतेची जाणीव होण्यासाठी, लैंगिकतेच्या विज्ञानाला अधिष्ठान मिळवून देण्यासाठी आणि त्यातून उत्तरांची शोधप्रक्रिया सुरू होण्यासाठी या कविता वाचाव्यात. 'अधिक चांगल्या' जगाची अपेक्षा सगळेचजण करतात. पण या जगाच्या निर्मितीचा विचार करताना, त्याचा पाया रचताना कोणत्या मूलभूत मुद्द्यांकडे लक्ष द्यायला हवं, लैंगिक संबंधांची व्यवस्था हा मूल्यव्यवस्थेचा भाग का असायला हवा हे लक्षात येण्यासाठी या कविता वाचाव्यात. 

या कविता वाचणं म्हणजे आपली पाटी कोरी करणं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांच्या शिक्षणाची लवकरात लवकर सुरूवात होवो ही सदिच्छा!

- कविता महाजन यांनी वेश्यांनी लिहिलेल्या काही कवितांचा अनुवाद केला होता. तो 'खेळ' या अनियतकालिकाच्या २०१७ सालच्या एका अंकात प्रकाशित झाला होता. त्याविषयीचा त्याच अंकातील हा लेख. कविता महाजन यांनी अनुवाद केलेल्या कविता खाली देत आहे.   

चिन्नाक्का

१.

आता तो
हस्तमैथुन करतानाही
धापा टाकतो
इतकं दुबळं बनलंय
त्याचं हृदय
प्रेमामुळे, तुझ्यामुळे
तू असं त्याच्या तोंडावर
दार आपटून
बंद करायला नको होतंस!
– त्याचा दोस्त म्हणवणारा
म्हणाला असं
आवाज कनवाळू करत
धंद्याच्या टायमाला
मग ब्ल्यू फिल्म पाहून तर
जोराचा हार्टअटक येवून
मरायलाच पाह्यजे होत्ता तो
आजपस्तोर निदान
बाराशे वेळा –
मी हासून म्हणाले
आणि विचारलं
बसणार आह्येस का तू
आसतील पैसे तर?
शेपूट आणि कनवाळूपणा
दोन्ही गांडीत घालून घेऊन
पळत सुटला
त्याचा दोस्त म्हणवणारा.

२.

आम्ही कपडे पाहतो
तुम्ही कातडी पाहता
इतकाच फरक

३.

पृथ्वीचा फोटो काढला चंद्रावरून
तर खूप डाग दिसतील
ते आम्ही नाहीत
तुम्ही आहात!

४.

खूप घाण साचली आहे
सगळं जग नरक झालंय
आणि सगळे जीव
निव्वळ किडे

शांता

१.

म्हातारी लिलू म्हणते
किती लिंगं बघितली मी आयुष्यात
जितकी नसतील या प्रुथ्वीवरती शिवलिंगं
मंदिरांमध्ये
धाकट्या भावाची इवलुशी नुन्नी
पाळण्यातून शूचं धनुष्य करणारी
आणि सावत्र बापाचा वरवंट्यासारखा बुल्ला
एकाच वयात मला माहीत झाला…
म्हातारी लिलू म्हणते…

२.

म्हातारी लिलू म्हणते
इथं मुलगी जन्मू नये, धंद्याला लावतात
इथं मुलगा जन्मू नये, दल्ला बनतो
इथं हिजडा जन्मू नये, भीकेला लावतो गुरू
पण आपलं कोणीतरी पाह्यजे ना दुनियेत
म्हणून हा कुत्रा पाळला…
म्हातारी लिलू म्हणते…

३.

म्हातारी लिलू म्हणते
पाट्यावर वाटलेल्या उडदाचे वडे
किती चवदार लागतात
आणि घरचा नारळ खवलून त्यात
परसातल्या मिरच्या खुडून घालायच्या
चटणी वाटायची दुधाळ
भरपूर कढीपत्ता घातलेली खमंग फोडणी
आजकाल नाकाला सगळे जुने वासच येतात
लहानपणीचे…
म्हातारी लिलू म्हणते…

चंद्रिका

१.

आधी प्रेत म्हणून जन्मायचं
कपाळावर लाल मळवट
देहावर हिरवी चिंधी पांघरून
सरणावर झोपायचं
वाट पाहायची पेटवण्याची
धाडधाड आग भडकेल
ताडकन फुटेल कवटी
वाट पाहायची

पण ओततच नाही कोणी रॉकेल
म्हणून डोळे उघडून पाह्यलं
तर वेगळंच सरण
लाकडांसारखे रचलेले खाली
पुरुष
दोन्ही बाजूंना पुरुष वरती पुरुष
मग जळण्याची रीत रद्द
मरण्याची रीत रद्द
तरीपण जगायचं
तरीपण जळायचं
धगधग आग धकधक दिल
खिसा कर उलटा
मी कुलटा तर कुलटा

प्रेताची भीती वाटली नाही
की जित्याचीही भीती
वाटत नाही

२.

त्यांच्याकडे थोडे पैसे असतात
आणि एक उपाशी लिंग असतंय
मनात फक्त नाईलाज असतोय
बाकी काही नसतंय
ना दया ना प्रेम ना आकर्षण ना माणुसकी

आमच्याचसाठी नसतंय असंही नाहीये
घरच्यांसाठी जरी असतं
तरी ते इथं दिसले नसते
आणि ते आलेच नसते आमच्याकडे
पैसे, लिंग आणि नाईलाज घेऊन
तर आम्हीही इथं दिसलो नसतो.

३.

काल चार गिर्हाईकं आलती
आज अजून एकावरच अडलंय
तो एक उतरला
समोर साईबाबाच्या फोटोला
झाकलं होतं पँट लटकावून
ती अडकवली पायांत
चेन वर खेचून साईबाबाला
पुन्हा नमस्कार केला
आल्यावर केलताच दचकून
पँटमधून साईबाबाला दिसत असंल काय?
मी विचारलं तर जास्तीच दचकला
शर्ट तर काढलाच नव्हता
तो नीट इन केला
पँटच्या खिशातल्या पाकिटातनं पैसे दिले
साईबाबाला पैशांनी काही दिसलं नसंल काय?

४.

आधी एकेका रात्रीत सात-आठ गिर्हाईकं यायची
सिझनला तर दहा-बारा
वर्षभरात कमी झाली
आता तीन-चार
सिझनला एखादं जास्ती
येतात चढतात उतरतात जातात
मी कधी कोणाचं नाव विचारत नाही
कोणी कधी माझं नावगावफळफूल विचारत नाही

गावात एका रात्रीत सोळा चढले होते
रांग लावून
मग इकडं विकलं मला सोळातल्या पहिल्यानं
अजूनही येतो कधी फुकट चढायला
मुद्दाम सांगतो गावातल्या बातम्या
घरातल्यासुद्धा

गावात आमच्यांची तीन घरं होती
त्यांच्यांची बावीस
दोन मोठे रस्ते अठरा गल्ल्या तीन दुकानं
एक शाळा
सत्तावीस नक्षत्रांची नावं घडाघडा सांगितली
तेव्हा सर म्हणाले होते शाब्बास
गणितात पहिली आलते सातवीला. 

५.

काही दिसत नाही
मला कोणाचा चेहरा दिसत नाही
कोणाला माझा चेहरा दिसत नाही

एक गेला की दुसरा येण्याआधी
मी टॉवेलनं मांड्या पुसते नुसती
ओल दिसत नाही तरी असतेच

काही आठवत नाही सकाळी
न दिसलेलं
पैसेही आता अम्मा दारातच घेते
आधीच

मग पडायचं असतं उलथं नुसतं
आता वासही येत नाहीत नाकाला
ना जिभेला चव

सकाळी कपडे घालावे लागतात
हागायला खोलीतून बाहेर जायचं म्हणून
साडीच्या टिकल्या चमकतात

डोळे दुखतात उजेडानं.

गुलाब

१.

बेंदाड भूत
लागली लूत
अत्तरमारीचा
उप्योग नाहीय्ये

गटार साफ करून आला तर
बायको घेत नाही उरावर
आणि मला काय
नाहीये नाक?

उलथ इथून
बेंदाड भूत

२.

तो खोटारडा म्हणालेला
की तो शाकाहारी आहे
त्यानं खाल्ले माझे ओठ चावून चावून
पिलं माझ्या डोळ्यांतलं रक्त
उठलं नाही त्याचं तर
अपयशानं संतापून
मारल्या बुक्क्या माझ्या मांड्यांमध्ये
खुपसली बोटं कचाकचा
टोचवली घाणेरडी नखं
म्हणाला, तो कधीच
वापरत नाही कण्डोम
बायकोनेही नऊ वेळा पोट पाडलंय
तिच्या भोकाचं भगदाड झालंय
म्हणून इथं येतो
तर काहीच जमत नाही इथल्या
घाणीत
कर प्रयत्न आणि आताही नाही उठलं
तर जीव घेईन तुझा!

मांसाहारीच असतात
शाकाहारी म्हणवणारे देखील.

प्रेमला

१.

मी कुसळय कुसळ… तुझ्या डोळ्यात घुसीन
मी मुसळय मुसळ… तुझा इगो ठेचीन
उखळाचा रोल करून करून
मी बोअर झालेय
जमिनीत गाडून घेऊन एकाचा कोपऱ्यात
मी बोअर झालेय

मी जाईन पळून कांडणारे हात घेऊन
कांडणाऱ्या हातांना सुद्धा आता
बोअर झालंय

सगळी मुसळं मसणात जाळा
कांडणारीचा देह काळानिळा
कोणी द्यावा कोणाला हात
आपल्याच साळी आहेत उखळा
गुपचूप व्हायचं दाढेखालचा भात

तरी म्हणायचं कांडताना गाणं
मी कुसळय कुसळ…

२.

गुपचूप गरोदर राहीन
उकंड्यावर बाळंत व्हईन
गंजक्या ब्लेडने कापीन नाळ
पोरगा जल्मला तर भडवा बनवीन
पोरगी जल्मली तर धंद्याला लावीन
पळून गेली पोरं वस्तीतून
बनली कोणी मोठी सायेब
तरी तुझं नाव लावणार नाहीत
तुला नसेल पत्ता तुला नसेल मालुमात
आणि तुझा वंश धंदा करेल गंदा
हीच तुझी सजा
मजा मारून विसरून गेल्याची

३.

तुला लाज नाही वाटत का? तिनं विचारलं
आणि झर्रकन मान फिरवली
आमच्यासारखी असती तर थुंकलीही असती
मी तिला नीट खालून वर बघितलं
मग वरून खाली बघितलं
बघितलं की लाजेनं बाईचं काय व्हतंय?

लाजत लाजत लग्न करायचं
लाजत लाजत कपडे घालायचे
लाजत लाजत कपडे काढायचे
लाजत लाजत पोट वाढवायचं
लाजत लाजत बाळंत व्हायचं
लाजत लाजत लेकराला पाजायचं
लाजत लेकीला लाजायला शिकवायचं
लाजत लाजत जेवायचं नवऱ्याच्या उष्ट्या ताटात
लाजत लाजत नोकरी करायची
लाजत लाजत सगळी कमाई घरात द्यायची
लाजत लाजत लपवायच्या खालेल्या शिव्या आणि मार
लाजत लाजत म्हातारं व्हायचं
लाजत लाजत दुखणं सोसायचं
लाजत लाजत मरून जायचं

मी म्हटलं तिला शेवटी
तुझा निर्लज्ज नवरा येतो माझ्याकडे
पण माझ्याऐवजी
त्याला विचारशील का जाब
की लाजशील अजून?

४.

मला सोडायचं तर कोर्टात
जावं नाही लागणार
मला सोडायचं तर पोटगी
द्यावी नाही लागणार
मला सोडायचं तर दु:ख नाही
मुलंबाळं दुरावल्याचं
मला सोडायचं तर अडणार नाही
घरसंसाराचा गाडा

मला सोडलं तर
वाचतील थोडे पैसे
खुश होईल लग्नाची बायको

फक्त मीच म्हणू शकते –
ना मी तुला धरलं होतं
ना तू मला धरलं होतं
मग सोडणार कोण कोणाला?
कोणाची सुटका होईल कोणापासून?
जाय जायचं तिकडं!